Friday, March 18, 2022

अनाहत सत्य (भाग 16)

 अनाहत सत्य


भाग 16

"आयला! गोविंद भडकली रे ती. पहिल्यांदा तुला असं वागताना बघितलं यार! असा अचानक तिच्यावर काय गेलास? जा आता मस्का मारून परत आण तिला. By the way; महिजी तुम्ही मात्र मस्त स्टोरी रंगवत होतात हा. मजा येत होती ऐकताना." शेषा बडबड करत होता. त्याचं गोविंदकडे लक्ष नव्हतं. गोविंदचा चेहेरा कमालीचा चिडलेला होता. त्याने एकदा शेषाच्या दिशेने रागीट कटाक्ष टाकला आणि संस्कृती गेली होती त्या दिशेने तो तरातरा निघून गेला.

"स्टोरी? तुम्हाला काय मी उगाच रचून सांगितलेली गोष्ट वाटते का ही?" महिचा आवाज देखील चढला होता.

"मग काय? तुम्ही होतात का त्या राजदरबारामध्ये? राजा बरोबर? तो राजा काय बोलतो; काय करतो ते बघायला?" खदाखदा हसत शेषाने प्रश्न केला.

शेषाच्या त्या वाक्याने तर मही भलताच चिडला आणि ताडकन उभा राहिला. परिस्थिती एकदम तापलेली बघून जस्सी मध्ये पडला आणि एकदम दोघांना शांत करत म्हणाला; "अरे... अरे... तुम्ही दोघेसुद्धा काय भांडायला लागलात? शांत व्हा बघू! जाऊ दे ही सगळी चर्चा. यार शेषा.... तुझं घड्याळाकडे लक्ष आहे का? यार चार वाजून गेले आहेत. अजून आपण फक्त या सुरवातीच्या काही गुंफा बघितल्या आहेत. त्यात इथे कशाला आलो होतो ते राहीलं आहे बाजूला आणि आपण या गुंफा बघत फिरायला लागलो आहोत. आता गोविंद आणि संस्कृतीला येऊ दे. आपण निघू परत जायला. उद्या येऊया परत. काय हो महिरक्षक; तुम्ही उद्या असाल का पुढच्या गुंफा दाखवायला? की आम्ही उद्यासाठी वेगळा गाईड शोधायचा?"

जस्सी बोलत होता. मात्र शेषा आणि मही एकमेकांकडे खाऊ की गिळू असे बघत उभे होते. खरं तर जस्सीला ते कळत होतं; पण तो त्याकडे दुर्लक्ष करत होत. त्याने गोविंद गेला त्या दिशेने तोंड करत मोठ्याने गोविंदला हाक मारली; "गोविंद... यार संस्कृतीला घेऊन बाहेर ये; आपण निघुया. आजसाठी इतकंच पुरे."

मात्र.... जस्सीचा आवाज गोविंद आणि संस्कृतीपर्यंत पोहोचत होता की नाही.............

"सॉरी संस्कृती! मला लक्षात आलं की तू नक्की काहीतरी असं बोलून जाणार आहेस की त्याचा परिणाम अवघड होईल सांभाळायला. अग, जस्सी आणि शेषा आपलेच आहेत. पण हा गाईड! मला मुळात तो फार पटत नाहीय. त्यात त्याच्या समोर तू काहीतरी असं बोलली असतीस; ज्यामुळे सगळं एकदम उघड झालं असतं; म्हणून तुला थांबवायला मी....." गोविंद बोलत बोलत गुंफेच्या आत जात होता. त्याला संस्कृती दिसत होती. काहीशी आत गेलेली. त्याच्याकडे पाठ करून उभी असलेली. तो जसजसा आत जात होता; तसतसा त्याचा आवाज घुमायला लागला होता. त्याचं त्यालाच ते थोडं विचित्र वाटत होतं. तो एकीकडे संस्कृतीशी बोलत होता; तिला विनवत होता.... आणि दुसरीकडे त्याच्या मनात वेगळेच विचार चालू होते. 'आपला आवाज इतका धीरगंभीर आहे? वा! मस्तच वाटतं आहे आपलाच आवाज ऐकताना!' हा विचार आला आणि त्याचं त्यालाच हसू आलं. तो क्षणभर थांबला.

समोरच संस्कृती उभी होती..... 'अं!? संस्कृती!?' बांधा सांस्कृतीसारखाच होता. गोविंदची चूक होऊच शकत नव्हती.... पण तरीही..... ती?? 'यार भुरे कुरळे तर आहेत केस संस्कृती सारखे. फक्त विचित्र बांधले आहेत. संस्कृती घट्ट बो बांधते किंवा मोकळे ठेवते. बाजूला सॅक आहे की संस्कृतीची. जीन्सच आहे न? की काय असं घट्ट घातलं आहे? दोन्ही हात कंबरेवर ठेऊन अशी उभी राहात नाही संस्कृती. आयला! लाकडी बांगड्या आहेत का? गळ्यात काय आहे ते? कधी घेतलं? आपण पुढे येत होतो तेव्हा ते बाहेर हातात माळा घालून विकायला उभे राहिलेले लोक होते त्यांच्याकडून घेतलं की काय? पण आपल्या लक्षात नाही आलं का?' गोविंदचं मन आता अजून गोंधळायला लागलं होतं.

"जीन्स आणि टॉप घालून गुंफेच्या आत आलीस न ग? मग आता हे काय घातलं आहेस? कपडे कधी बदललेस ग?" काहीसा चेष्टेचा आणि खुपसा आश्चर्य वाटलेला आवाज होता गोविंदचा. "ए! संस्कृती!?" गोविंदने संस्कृतीला हाक मारली. 'दुसरी कोणी असावी की काय ती? पण कसं शक्य आहे? आपण सगळे बाहेर बसलो होतो तेव्हा या गुंफांच्या दिशेने कोणीच आलं नव्हतं. संस्कृती चिडून आतल्या दिशेने आली तेव्हा तर नक्की कोणी नव्हतं. मग...!???....' गोविंद पुरता सैरभैरला होता. तो तसाच थोडा पुढे गेला.

"यार संस्कृती! काय चेष्टा चालवली आहेस?" त्याच्या आवाजातला गोंधळ आणि खर्ज वाढत होता. तो आता त्या मुलीच्या अगदी जवळ येऊन पोहोचला होता. त्याने हात पुढे करून तिच्या खांद्यावर ठेवला आणि ती मागे वळली.

सुंदर भुऱ्या डोळ्यात काजळ, नाकामध्ये लाकडी पण सुंदर नाजूक दागिना, उंच मानेचं सौंदर्य वाढवणारी लाकडी नक्षीदार जाड पट्टी होती गळ्यात. तशाच नक्षीदार पट्ट्या हातात आणि पायाशी देखील; तिने घातलेल्या चांबडी बूट सदृश पायताणांच्या वर. ते बूट.... किंवा जे काही होतं ते..... गुढग्याच्याही वरपर्यंत बांधलेलं होतं. दोन्ही खांद्यांवर गाठी बांधलेला जाड कपडा.... तिच्या शेलाट्या सुंदर कोरीव-बांधीव बांध्याची कल्पना देत होता........ ती..... ती तीच होती!

...... संस्कृती!!! अहं!!! ...................... अपाला!!! बाजूला पडलेल्या चांबडी पिशवीतून बाहेर दिसणारी हत्यारं.... आणि सुंदर, मोहक चेहेऱ्यावरचा आत्मविश्वास आणि डोळ्यातली घट्ट पकड!!! ती अपालाच होती. गोविंदची खात्री झाली. 'माझी अपाला! याच मोहक सर्वांवर केवळ डोळ्यांनी नियंत्रण ठेवणाऱ्या चेहेऱ्याने वेड लावलंय आपल्याला.'

"गोविंदराज.... " अपालाने त्याला हाक मारली आणि त्यांची नजरानजर झाली.

गोविंदराजच्या पायात देखील अपाला प्रमाणे बूट सदृश काहीतरी होतं. अगदी मांड्यांपर्यंत पोहोचणारं. कंबरेला बांधलेल्या अधनियाचा काचा मांड्यांवर व्यवस्थित गच्च बसला होता. मात्र हातात आणि गळ्यात असलेल्या सोनेरी आणि चंदेरी धातूच्या कड्यांमुळे गोविंदचं 'राज' असणं अधोरेखित होत होतं.

"आपण दोघेच असताना तू मला फक्त गोविंद म्हणशील असा शब्द दिला आहेस अपाला." त्याचा आवाज प्रेमाने ओथंबलेला होता.

"हो! पण आपण इथे एकटे नाही आहोत." अपालाचा आवाज काहीसा मृदू, मिश्किल होता. तिने नजरेनेच तिच्या मागे कोणीतरी असल्याची खूण केली आणि गोविंदने तिच्या खांद्यावरून मागे नजर टाकली. जेमतेम तीन-साडेतीन फूट उंचीचे तिघे उभे होते. लुकलूकणाऱ्या डोळ्यातले भेदरलेले भाव, एका हातातली अवजारं सांभाळत आणि दुसरा हात मागे घेतलेला, तोंडात काहीतरी खाल्ल्याचा तोबरा भरलेला.... मात्र शरीराचा पिळदार, मजबूत घाट नजरेत भरण्याजोगा होता. त्यांच्याही मागे कोणीतरी होतं.... दोन गोड लूकलूकणारे हसरे डोळे.

"कुंजरराज....." गोविंदचा हुकमी आवाज गुंफेमध्ये घुमला.

"मी असाच इथे आलो होतो. मला नव्हतं माहीत इथे काम चालू आहे." एक गोड बालिश आवाज आला.

"बाहेर ये आधी." अपालाने हसत हात पुढे केला आणि तिच्या करंगळीला लहानशा नाजूक बोटांची मिठी बसली.

"कुंजर... किती वेळा सांगितलं आहे; मी काम करत असताना असं येऊ नकोस." अपालाने आपल्या लेकाचा; कुंजरचा; चेहेरा कुरवाळत म्हंटलं.

"पण मला तुला हे द्यायचं होतं मा." हातातल्या टोपलीतलं फळ पुढे करत तो म्हणाला. त्याने दिलेलं फळ प्रेमाने हातात घेत तिने त्याचा हात गोविंदच्या हातात दिला आणि म्हणाली; "मी येतेच थोड्या वेळात."

"हो! मी वाट बघतो." गोविंद म्हणाला आणि कुंजरचा हात हातात घेऊन गुंफेतून बाहेर पडला.

***

"गोविंदराज; आपण मंदिराजवळील वृक्षवाटिकेमध्ये थांबलात तर बरे होईल." गुंफेतून बाहेर येणाऱ्या गोविंदला सामोरे जात नाथा म्हणाला.

"बरं. चल; सोबतच जाऊ." गोविंदने कुंजरचा हात सोडून दिला. उड्या मारत कुंजर पुढे निघाला आणि गोविंदच्या दोन पावलं मागून नाथा चालायला लागला.

"राजकुमार!" काहीसं पुढे गेल्यावर नाथाने गोविंदला हाक मारली.

"बोल नाथा. मी ऐकतो आहे." मागे वळूनही न बघता गोविंद म्हणाला.

"महाराजांचे सुमंत कल्याण आपल्या भेटीसाठी थांबले आहेत." नाथाचा आवाज अजिजीचा होता.

"नाथा, तू वृक्षवाटिकेचा उल्लेख केलास त्याचवेळी माझ्या लक्षात आलं होतं. परत एकदा तेच प्रश्न आणि माझी तीच उत्तरं. तीच चर्चा आणि ..... जाऊ दे. तुला तरी मी काय सांगणार? मित्र आहेस माझा. सोबतीने चाल; इतकी विनंती देखील तू मान्य करत नाहीस माझी. मग इतरांना मी काही सांगून ते कितपत माझं म्हणणं ऐकतील याबद्दल मला शंकाच आहे." गोविंद शांतपणे बोलत होता. त्याचा स्वर मात्र दुखावलेला होता.

"राजकुमार, तुम्ही मला मित्र मानता हा माझा सन्मान आहे. एरवी मी नक्कीच तुमच्या सोबत चाललो असतो. मात्र सुमंत कल्याण यांनी जर मला तुमच्या सोबत पाऊल उचलताना बघितलं तर नगरातील माझे वृद्ध वडील मला परत कधीच दिसणार नाहीत; याची मला कल्पना आहे." नाथाचा आवाज दबलेला होता.

"मलाही त्याची कल्पना आहे नाथा. चल.... सुमंत कल्याण वाट बघत आहेत." गंभीर आवाजात गोविंद म्हणाला.

"राजकुमार गोविंदराज; प्रणाम." कंबरेत झुकत सुमंत कल्याण म्हणाले. मात्र त्यांच्या आवाजातला ताठरपणा आणि ताठ मानेने गोविंदच्या नजरेला दिलेली नजर यातून 'प्रणाम' शब्द कितपत अर्थपूर्ण होता याबद्दल गोविंदच्या मनात शंका होती.

"प्रणाम सुमंत. आज इथे या दगडांच्या राशींमध्ये येण्याचं प्रयोजन?" गोविंदने चेहेऱ्यावर कोणतीही भावना येऊ न देता प्रश्न केला.


"राजकुमार, आपण जाणताच. आदरणीय मही कृष्णराज उत्तरेकडील स्वारीची तयारी करत आहेत. त्यांची इच्छा आहे की आपण एकदा तरी नगरात येऊन त्यांना येऊन भेटून जावेत." सुमंत कल्याणने महाराजांची इच्छा बोलून दाखवली.

"बरं. येईन म्हणून निरोप द्यावात." गोविंदचा स्वर अजूनही भावनाहीन होता.

"कधी याल म्हणून सांगू?" सुमंत कल्याणने परत एकदा प्रश्न केला.

"या तुम्ही सुमंत." गोविंद म्हणाला आणि मागे वळून तिथून निघून गेला.

"नाथ." सुमंत कल्याणने नाथाला हाक मारली.

"सुमंत!" मान खाली घालून अत्यंत लीन आवाजात नाथाने उत्तर दिलं.

"तू बहुतेक केवळ मित्रत्वाचं नातं लक्षात ठेऊन आहेस." सुमंत कल्याण यांच्या आवाजातला थंडपणा नाथाच्या अंगावर काटा उभा करून गेला.

"सुमंत......" नाथ काहीतरी बोलणार होता. पण सुमंत कल्याणने उजवा हात वर करत त्याला थांबवलं आणि म्हणाला; "नाथा हे कधीही विसरू नकोस. आपली प्रामाणिकता राजसिहासनाशी असते. व्यक्तीसापेक्ष नसते. आज आदरणीय महाराज कृष्णराज या सिंहसनाधीश आहेत. त्यामुळे तुझी सेवा त्यांच्या चरणी रुजू होणे आवश्यक आहे."

"सुमंत... मी आपल्या शब्दाबाहेर नाही." नाथाचा आवाज अजूनच केविलवाणा झाला होता.

"मी सुमंत... राष्ट्रकूट घराण्यातील महिंचा रक्षक आहे. माझ्यासाठी माझे काम हा माझा कर्मयोग आहे. महिरक्षक असणे हा माझा सन्मान समजतो मी. परंतु मला असं का वाटतं आहे की तुझी सेवा महिंच्या चरणी रुजू करण्यापेक्षा इथे राजकुमार गोविंदराज यांच्या सोबत एक मित्र म्हणून राहण्यात तुला जास्त धन्यता वाटते आहे!" सुमंत कल्याण त्याच थंड आवाजात बोलत होते.

"सुमंत आपण विश्वास बाळगावात. माझ्या मानत कायम मही कृष्णराज यांच्या मनीची इच्छा हाच एक विचार असतो. वेळ येईल तेव्हा माझी सेवा मही चरणी अर्पण करेन; याची आपण पूर्ण खात्री बाळगावीत." नाथाच्या शब्दांवर सुमंत कल्याण यांचा कितपत विश्वास बसला ते नाथाला कळले नाही. पण एक उग्र कटाक्ष त्याच्या दिशेने टाकून सुमंत तिथून निघून गेले.

नाथाने एक दीर्घ निश्वास टाकला आणि मागे वळून तो राजकुमार गोविंदला शोधण्यास निघाला. दूरवर त्याला राजकुमार गोविंदराज दिसले. ते लेण्यांच्या रक्षणासाठी सतत जागरूक भीमतटरक्षक सोबत बसले होते. नाथाने भराभर पावलं उचलली आणि त्यांच्या जवळ जाऊन पोहोचला.

भीमतटरक्षक उंचापुरा प्रचंड मोठी शरीरयष्टी लाभलेला होता. आकाशातील घारीच्या चोचीतला साप देखील एका सध्या दगडाच्या फेकीत तो खाली पाडू शकत असे; इतकी तेज नजर होती त्याची. मात्र लेण्यांच्या संपूर्ण रक्षणाची जवाबदारी तीक्ष्णा त्याच्याकडे सुपूर्द करताना त्याच्या तल्लख बुद्धीचा विचार जास्त केला होता.

नाथाने पुढे होत भीमाला वळसा घातला आणि त्याच्या पुढ्यात गेला. भीमा लहानग्या कुंजरचा हात धरून त्याला उंच उडी मारण्यास शिकवत होता. कुंजर प्रत्येक उद्दीनंतर खिदळत होता. "कुंजर, तू केवळ मस्ती करतो आहेस हं. मी तुला खेळवत नाही आहे बेटा. उंच उडी आणि लांब उडी हा चपळतेवर मिळवायच्या नियंत्रणावरचा पहिला पाडाव आहे." भीमा एकीकडे हसत पण कुंजरला रागावत असल्याप्रमाणे बोलत होता.

कुंजरवर मात्र त्या बोलण्याचा काहीही परिणाम होत नव्हता. "पण भीमा काका, मी तेच तर करतो आहे. पाडाव पार करण्यासाठी तुमच्या हाताची गरज आहे मला." खिदळत कुंजरने उत्तर दिलं. त्याच्या उत्तरावर गोविंद, भीमतटरक्षक आणि नाथ सगळेच हसले. नाथ आलेला बघून भीमाने कुंजरच्या उड्यांच्या खेळाला थांबवलं आणि त्याच्याकडे बघत म्हणाला; "छे! दमलो बुवा तुझ्या शक्तीपूढे. आता मला थोड्या विश्रांतीची गरज आहे. तू पळ बघू. जा तुझ्या सोबत्यांसोबत खेळ."

"भीमा काका, मी लहान आहे; मंदबुद्धी नाही. तुम्हाला तातांसोबत आणि नाथ काका सोबत काहीतरी महत्वाचं बोलायचं असावं. ठीक. जातो मी खेळायला." असं म्हणून कुंजर निघाला. पण परत मागे वळून गोविंदकडे बघत तो म्हणाला; "तात, मा येईलच एवढ्यात. याल ना तुम्हीसुद्धा?" गोविंदने होकारार्थी मान हलवली आणि कुंजर गोडसं हसत तिथून पळत गेला.

"हुशार आहे कुंजर." तो गेला त्या दिशेने बघत नाथ म्हणाला.

"प्रश्नच नाही. म्हणूनच अपालाने त्याचं नाव कुंजर ठेवलं आहे. कुंजर.... गजराज आहे तो. अत्यंत बुद्धिवान! त्याचं शक्तीसामर्थ्य मी नक्कीच गजराजांप्रमाणे निर्माण करीन." कुंजर गेलेल्या दिशेने कौतुकाने बघत भीमतटरक्षक म्हणाला.

"तुम्हा दोघांचं कुंजरचं कौतुक करणं संपलं असलं तर आपण थोडं महत्वाचं बोलूया का?" गोविंदच्या आवाजातील गंभीरता लक्षात येऊन भीमा आणि नाथ दोघेही गोविंद समोरील दगडांवर बसले.

"सुमंत कल्याण परत तेच सांगायला आले होते न?" बराच वेळ शांततेत गेल्यानंतर कुठूनतरी सुरवात करावी या विचाराने भीमाने विषयाला तोंड फोडले.

"हो" इतकंच म्हणून गोविंद शांत बसला.

"पण त्यांचं म्हणणं मला तरी चुकीचं नाही वाटत राजकुमार." नाथाचा आवाज अजिजीचा होता.

"नाथ, मला देखील पिताजींची इच्छा चुकीची नाही वाटत. उत्तरेकडे चाल करून जाण्याचा त्यांचा मानस आहे. मला माहीत आहे की त्यांना सर्व ऋतू दोनवेळा अनुभवावे लागतील या प्रवासात. त्यामुळे त्यांची इच्छा आहे की मी राजगादी स्वीकारावी. सुमंत कल्याण यांनी देखील मला अनेकदा हे सांगितलं आहे. सुमंत पिताजींचे केवळ सल्लागार नाहीत; तर अत्यंत जवळचे मित्र आहेत. त्याहूनही महत्वाचं म्हणजे ते राष्ट्रकूट राजपरिवाराचे अत्यंत विश्वासार्ह सल्लागार आणि हितचिंतक आहेत." गोविंदचा स्वर आता थोडा समजूतदार होता. त्याच्या आवाजातला फरक जाणवल्याने नाथाने मनातच निश्वास सोडला.

"राजकुमार तुम्हाला सर्वच माहीत आहे. मग तरीही तुम्ही त्यांचं म्हणणं मान्य करत नाही आहात." नाथ म्हणाला.

"नाथा, तुला देखील सगळं माहीत आहे. तरी देखील तेच ते माझ्या तोंडून वदवून घ्यायला तुला का आवडतं ते मला अजूनही कळलेलं नाही. मी एकदाही म्हंटलेलं नाही की मला राजगादी नको. सुमंत कल्याण यांना देखील मी अनेकदा सांगितलं आहे की नगरात येऊन मही कृष्णराज यांच्या चरणी स्वतःला ठेवण्यात मला माझ्या आयुष्याची पूर्तता वाटते. मात्र; नाथा; तू चांगलंच जाणून आहेस की राजसीहासनापेक्षा देखील माझ्या आयुष्यात अपाला आणि कुंजर जास्त महत्वाचे आहेत. ज्याक्षणी अपाला आमच्या विवाहाचा प्रस्ताव मान्य करेल आणि माझ्या सोबत नगरात येण्यास रुकार देईल; मी एक क्षण देखील इथे थांबणार नाही." गोविंद म्हणाला.

"आणि मी का देईन रुकार आपल्या विवाहाला?" मागून अपालाचा आवाज ऐकून तिघांचेही डोळे मोठे झाले. भीमा आणि नाथ उठून उभे राहिले.

"माझी कामाची वेळ झाली. एकदा पूर्ण फिरून योग्य जागी रक्षक उभे आहेत का ते बघून घेतो." असं म्हणत भीमाने तिथून काढता पाय घेतला.

"कुंजरने बोलावलं होतं मला." नाथा स्वतःशीच बोलल्या सारखं करून भीमाच्या मागोमाग गेला.

"गोविंद! तुला देखील जायचं आहे का?" अपालाने गोविंदकडे बघत म्हंटलं.

"नाही. मला जाणून घ्यायचं आहे; का नाही करणार तू विवाह?" गोविंद शांतपणे म्हणाला.

"पुन्हा तेच? ज्याप्रमाणे सुमंत तुला नगरात येण्याविषयी सांगण्यास थकत नाहीत; त्याप्रमाणे तू मला तोच प्रश्न परत परत विचारण्यास थकत नाहीस. बरं! मी देखील उत्तर देण्यास थकणार नाही. गोविंद, विवाह बंधन का? आपण दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहोत; एकमेकांशी प्रामाणिक आहोत. तुझ्यामुळेच मला कुंजर प्राप्त झाला आहे. त्यासाठी नक्कीच मी तुझ्याशी आयुष्यभर एकनिष्ठ राहीन. मात्र गोविंद, कुंजर इतकंच माझं माझ्या कामावर प्रेम आहे. तीक्ष्णा सोबत मी देखील या विशाल शिव मंदिराच्या पूर्णत्वाचं स्वप्न बघितलं आहे. सर्वोत्तम मूर्ती निर्मिती आणि कळसाकडून मंदिर निर्मिती हा स्थापत्य अविष्कार तीक्ष्णा आणि मी नक्कीच पूर्णत्वास नेणार आहोत. त्यामुळे माझं काम पूर्ण होईपर्यंत मला त्यामध्ये खंड होईल असा कोणताही निर्णय घ्यायचा नाही." अत्यंत स्थिर आवाजात अपाला बोलत होती.

तिच्या जवळ जात तिचा हात हातात घेऊन गोविंद म्हणाला; "पण मी तुझ्या कामाच्या आड येतच नाही अपाला. तुझं हे स्वत्व जपून माझ्यावर प्रेम करणंच तर मला तुझ्या प्रेमात जास्त गुंतवून ठेवतं आहे. मी तुला आत्ता विवाह कर असं मुळीच म्हणत नाही. फक्त शब्द दे अपाला; की तू तुझ्या मंदिर पूर्ती नंतर देखील माझ्या सोबत असशील. तू कोणत्याही क्षणी मला सोडून निघून जाशील ही भीती मला कायम असते ग. म्हणून तर एका दिवसासाठी देखील मी नगरात जाण्याचा विचार करत नाही. अपाला; तुझ्या सर्व जवाबदारी संपल्या की मग आपण विवाह करू. नाहीतरी मही कृष्णराज यांना येण्यास दोन ऋतू काळ इतका अवधी लागणार आहे. तोवर तुझं निर्मिती कार्य पूर्ण होईलच. त्यानंतर आपण विवाह करू."

"अपाला विवाह करणार नाही." मंदिराच्या बाजूने सामोरे येत तीक्ष्णाने स्पष्ट शब्दात विधान केले.

क्रमशः


Friday, March 11, 2022

अनाहत सत्य (भाग 15)

 अनाहत सत्य

भाग 15

"माझी नजर तुझ्यावर आहे हे विसरू नकोस नाथा. तुझा उद्देश तू शब्दात सांगणार नाहीस; याची मला कल्पना आहे. पण तुला माझ्या क्षमतेचा अंदाज नाही. अजूनही तुझ्या उद्देशाचा मला व्यत्यय नाही. त्यामुळे उगाच कोणतेही वेगळे कृत्य करून गोविंद आणि अपाला यांच्या समोर मला अजून वेगळं चित्र उभं करायचं नाही. पण जर तुझं एकही कृत्य माझ्या उद्देशाच्या आड आलं तर मी कोणताही विचार करणार नाही." नैनाची नजर तीक्ष्ण होती आणि त्याहूनही तीक्ष्ण तिचे शब्द होते.

"शेषा?" जस्सीने शेषाच्या खांद्याला स्पर्श केला आणि विजेचा झटका बसावा तसा शेषा एकदम धडपडला. त्याची नजर भेदरलेली होती आणि नजरेतली सगळी ओळख पुसली गेली होती.

"अरे अरे?! काय झालं शेषा? ठीक आहेस ना?" त्याच्या जवळ जाऊन त्याला हात देऊन उठवत जस्सी म्हणाला.

शेषा भानावर आला. "अं?! हो हो! मी ठीक आहे. म्हणजे... अरे मला कळलंच नाही; पण काहीतरी झालं आत्ता इथे. आर मी....." शेषा जस्सीला काहीतरी सांगणार इतक्यात गोविंदने त्या दोघांनाही हाक मारली.

"जस्सी... शेषा... यार किती संथ आहात! चला लवकर या. अजून खूप काही बघायचं आहे." गोविंद बराच पुढे जाऊन उभा होता. तो एकटाच होता ते बघून जस्सीने त्याला लांबूनच ओरडून विचारलं; "अबे... संस्कृती कुठे आहे? तिला एकटीला सोडू नकोस त्या मही सोबत... चल रे शेषा... एकतर मला तो मही फारसा आवडत नाहीय. त्यात या गोविंदने तिला एकटीला सोडलेलं दिसतं आहे त्याच्या सोबत." असं म्हणून जस्सी भराभर पावलं उचलत गोविंदच्या दिशेने निघाला. शेषाने एकदा मागे वळून बघितलं. आपल्याला आत्ता जो अनुभव आला तो भास होता की सत्य!? शेषाच्या मनात आलं. पण इतक्यात पुढे गेलेल्या जस्सीने परत एकदा त्याला हाक मारली आणि मग मात्र शेषा गोविंद आणि जस्सीच्या दिशेने निघाला.

जस्सी आणि शेषा जवळ पोहोचले तसा गोविंद समोरच्या लेण्याच्या आत जायला निघाला. जस्सी देखील त्याच्या सोबत चालायला लागला. शेषाने परत एकदा गोविंदच्या काही पावलं मागे चालणं पसंत केलं. आता तर त्याची नजर अजूनच शोधक झाली होती. आपण नक्की काय शोधतो आहोत; हे त्याला देखील कळत नव्हतं. पण नुकताच आलेला अनुभव त्याच्या मनात ठाण देऊन बसला होता.

'नैनाच होती ती. पण तरीही काहीतरी वेगळं होतं तिच्यात. काय बरं? आणि नक्की काय म्हणाली ती? मला नाथा म्हणाली का? नाथा? कोण नाथा? गोविंद आणि अपाला! गोविंद म्हणजे आपला मित्र. पण ही अपाला कोण? तिचा माझा संबंध काय? बरं! त्यांच्या समोर तिला वेगळं चित्र उभं करायचं नाही. कोणाचं चित्र? कसलं चित्र? ते जाऊ दे; पण परत मूळ प्रश्न तसाच राहातो न. हे सगळं ती मला का सांगत होती? ते ही डोळ्यांतून आग ओकत! च्यायला हे काय चालू आहे?' गोविंदच्या मागून चालत शेषा विचार करत होता. त्याचं लेणी बघण्याकडे लक्षच नव्हतं. संस्कृती मात्र प्रत्येक इंच डोळ्यात तेल घालून बघत होती. जसं काही तिला आत्ताच बाहेर गेल्याक्षणी कोणीतरी या लेण्याचं चित्र काढायला सांगणार आहे.

"हे लेणं देखील अपूर्ण दिसतं आहे." गोविंद म्हणाला आणि त्याचा आवाज सगळ्या शांततेत एकदम घुमला. मही थोडा अंधारात उभा होता. पण त्याचं लक्ष या चौघांवर पूर्ण होतं. "हो! ही चार आणि पाच नंबरची लेणी पूर्ण झालेली नाहीत. तसे इथे हे अठ्ठावीस खांब आणि या वेगवेगळ्या मुद्रांमधल्या बुद्ध मूर्ती आहेत. या बाजूने या..." असं म्हणून त्याने गोविंदला अजून थोडं आत नेलं. "या इथे खोल्या आहेत तिथे बौद्ध संत-महंत ध्यानधारणा करायचे." मही अजून काहीतरी सांगणार होता; इतक्यात मागून आलेल्या संस्कृतीने म्हंटलं; "मुळात त्यासाठी नव्हत्या या खोल्या. तेव्हा देखील हाच तर वाद होता की नक्की काय वापर असावा या गुंफांचा. त्या पलीकडच्या खोलीमधून जो खाली जाणारा बोगदा आहे; आणि त्याच्या सारखे काही अजून आहेत इथल्या वेगवेगळ्या खोल्यांमधून आणि पुढच्या अनेक लेण्यांमधून देखील; त्याचं प्रयोजन जास्त महत्वाचं होतं. हवा खेळती राहण्यासाठी जे तंत्र वापरणं आवश्यक होतं ते कोणालाही न कळत करणं जरुरीचं होतं. तेव्हाही...." संस्कृती अजूनही काहीतरी बोलणार होती. पण परत एकदा गोविंदने तिच्या जवळ येत तिचा हात धरला. "संस्कृती काय करायचं आहे आपल्याला कोणती हवा कुठे खेळते आहे त्याबद्दल? अर्धवट आहेत या गुंफा. चला आपण पुढे जाऊ." तो तिच्याकडे बघत म्हणाला. शेवटचं वाक्य मात्र महिसाठी होतं.

"तुम्ही तर असं बोलता आहात मॅडम की तुम्हीच इथलं आर्किटेक्चर काढलं आहे." मही संस्कृतीकडे बघत म्हणाला. ती काहीतरी बोलायला पुढे होणार इतक्यात गोविंद मध्ये पडला आणि महिकडे बघत म्हणाला; "तुम्ही गाईड आहात. त्यामुळे फक्त आवश्यक ती माहिती द्या. इतर गप्पा नकोत." गोविंदच्या आवाजातला बदल मही सोबत जस्सीच्या देखील लक्षात आला. 'याला इतकं रागावायला काय झालं?' जस्सीच्या मनात आलं. पण तो काही बोलला नाही. "सॉरी" असं पुटपुटत मही तिथून बाहेर पडला. जस्सी देखील निघाला. गोविंदने संस्कृतीचा हात अजून सोडला नव्हता. "चल संस्कृती पुढे जाऊ या." तिला काही एक प्रश्न न विचारता गोविंद हळुवारपणे म्हणाला. बराचसा आधार असलेल्या त्या खोलीमधून बाहेर पडताना संस्कृतीने मागे वळून बघितलं. शेषा अत्यंत स्तब्ध उभा राहून खोली बाहेर पडणाऱ्या संस्कृतीकडे बघत होता.

"तू पुढे हो. शेषाची बहुतेक तंद्री लागली आहे. त्याला घेऊन येते." संस्कृती दबक्या आवाजात म्हणाली आणि गोविंदला अजून काही बोलू न देता स्वतःचा हात सोडवून घेत मागे वळली. गोविंदने मागे बघितलं आणि त्याच्या देखील लक्षात आलं की शेषा काहीसा विचित्र पद्धतीने अवघडून उभा आहे. त्यामुळे त्याला संस्कृतीचं म्हणणं पटलं. जस्सी आणि मही परत मागे वळू नयेत म्हणून तो पटकन पुढे निघाला.

"शेषा...." संस्कृतीने शेषा जवळ जात त्याला हाक मारली.

"अपाला?...."

"अं?....."

"तू तुझा मग काढत आली आहे तर ती." शेषा म्हणाला.

"कोण?"

"संस्कृती उगाच नाटकं करू नकोस. तुला नक्की कळतं आहे मी काय म्हणतो आहे ते." शेषाचा आवाज बदलला होता. त्यात स्पष्टपणा होता; पण अधिकार वाणी नव्हती ती.

"ती आली आहे? हा भास आहे की तू आत्ता मला.....?" संस्कृतीचा आवाज गोंधळलेला होता.

"म्हणजे तुला पण दिसली न ती?" शेषाने संस्कृतीला विचारलं.

"शेषा, तू आत्ता मला काय हाक मारलीस?" संस्कृतीने शेषाला प्रश्न केला.

"संस्कृती, तू नैनाला बघितलंस ना?" शेषाने तिला उलट प्रश्न केला.

"अपाला!? तू आत्ता अपाला म्हणालास का?" संस्कृती अजूनही वेगळ्याच तारेत होती. अचानक तिचे दोन्ही खांदे धरत शेषा म्हणाला; "हो संस्कृती; मी तुला अपाला म्हणून हाक मारली. कारण मला नैना म्हणाली की गोविंद आणि अपाला समोर तिला वेगळं चित्र नाही उभं करायचं. तिने गोविंदचं नाव घेतलं आणि त्याच्या सोबत संस्कृती ऐवजी ती अपाला म्हणाली. मला तिचं एकूण वागणंच कळलं नाही. अग, तिने मला नाथा म्हणून हाक मारली." शेषा अजूनही पूर्ण गोंधळलेला होता.

"नाथा? ओह! नाथा! तू?!" संस्कृती शेषाकडे बघत म्हणाली.

"संस्कृती, तू ठीक आहेस न?" शेषाने तिचे दोन्ही खांदे जोरात हलवत तिला विचारलं आणि एकदम शुद्धीवर आल्याप्रमाणे संस्कृतीने त्याच्याकडे बघितलं.

"अरे शेषा? तू इथे या खोलीच्या मध्यावर उभा राहून काहीतरी बडबडत होतास. मीच गोविंदला म्हंटलं मी शेषाला घेऊन येते तू पुढे हो. चल बघू. ते सगळे गेले केव्हाच." संस्कृती शुद्धीत येत म्हणाली. क्षणापूर्वी ती काय बोलत होती ते तिचं तिला देखील आठवत नव्हतं. शेषाच्या ते लक्षात आलं. तो काही एक न बोलता तिच्या सोबत खोली बाहेर आला आणि त्या गुंफेच्या बाहेर पडला. त्याच्या सोबत पुढे जात असताना संस्कृतीने परत एकदा मागे वळून बघितलं आणि तिला त्याच खोलीच्या मध्यावर नैना दिसली. ती संस्कृतीकडे शांत नजरेने बघत होती. त्या नजरेत कोणतीही नकारात्मक भावना नव्हती. असलंच तर एक आव्हान होतं. पुढे जाता जाता संस्कृती थांबली. शेषाच्या ते लक्षात नाही आलं. तो तसाच चालत पुढे गेला. संस्कृती परत एकदा मागे वळली.

"तोच वाद परत एकदा न अपाला?" नैना शांत नजरेने संस्कृतीकडे बघत म्हणाली.

"वाद तू घालते आहेस नैना. मी कायमच सांगत होते.... ते मार्ग सहज प्रवेश करण्यासारखे ठेवतानाच बिन महत्वाचे असल्याप्रमाणे निर्माण केले तरच ते कायमस्वरूपी राहातील हेच तर माझं म्हणणं होतं. पहा... आजही... इतक्या असंख्य वर्षांनंतर देखील कोणाच्याही लक्षात आलेलं नाही त्यांचं अस्तित्व. ही या जमिनी वरची आणि इथल्या सगळ्याच लेण्यांमधले हवा खेळती राहण्यासाठी मी निर्माण केलेली ही छिद्र.... निरुपद्रवी, बिनमहत्वाची वाटत आली आहेत. पण तेव्हा देखील तुला ते सगळं पटलं नव्हतं. केवळ तू सांगितलेल्या प्रमाणे स्थापत्य निर्मिती होत नव्हती; हा राग होता तुझा." संस्कृतीचा धीरगंभीर शांत आवाज त्या खोलीमध्ये घुमत होता.

"अपाला.... तू अजूनही मला समजून....." नैना बोलत असतानाच अचानक शेषाचा आवाज आला.

"संस्कृती? परत गेलीस की काय त्या खोलीत. चल ग बाई. तो गोविंद वैतागला आहे."

संस्कृतीने नकळत आवाजाच्या दिशेने मागे वळून बघितलं. तिला शेषा दिसला नाही. म्हणजे तो अगदीच पुढच्या दाराशी थांबलेला होता. संस्कृतीने परत एकदा समोर बघितलं. खोली रिकामी आणि थंड पडलेली होती. संस्कृतीने मान खाली घातली आणि डोळे घट्ट मिटले. क्षणभर ती तशीच उभी राहिली आणि मग मागे वळून न बघता झपाझप चालत तिथून बाहेर पडली.

"संस्कृती, मला काहीतरी भास होत आहेत. आणि माझी खात्री आहे तुला देखील." तिला समोर बघताच शेषा म्हणाला.

"शेषा, फक्त तू आणि मी नाही तर गोविंदला देखील काहीतरी वेगळं जाणवतं आहे." संस्कृती थेट त्याच्याकडे बघत म्हणाली.

"हो! पण त्यासगळ्याची चर्चा इथे नको संस्कृती. एकतर जस्सीला काही अनुभव आले आहेत का ते आपल्याला माहीत नाही. त्यामुळे इथे जर आपण काही बोलायला लागलो तर तो गोंधळेल. त्यातून अजून काही गडबड निर्माण होईल. त्यात तो आपला गाईड... तो काही मला बरा वाटत नाही. त्याला माझ्याबाबतीत काहीतरी पटलेलं दिसत नाही. तुसड्यासारखी उत्तरं देतो आहे. त्यामुळे तर आपण जास्त जपलं पाहिजे. तुला जर आणि जे काही वेगळं दिसतं किंवा जाणवतं आहे; ते मनात ठेव आत्ता. आपण हॉटेलवर गेल्यावर एकत्र बसून चर्चा करू. परत जाण्याची घाई देखील नाहीय आपल्याला. हवं तर उद्या परत येऊया इथे. आपले आपणच फिरुया. गाईड वगैरे काही नको. आजच या महिला अच्छा टाटा करून टाकू." शेषा शांतपणे बोलत होता. संस्कृतीला त्याचं म्हणणं पटलं आणि दोघेही समजूतदारपणे हसले. शेषा आणि संस्कृती गोविंद, जस्सी आणि महिला गाठायला तिथून बाहेर पडले. त्यावेळी आतून नैना त्यांच्याकडे बघत होती. तिच्या शेजारी जाड गोणपाटाप्रमाणे काहीतरी पांघरलेले एक वृद्ध देखील उभे होते. नैनाची नजर शांत आणि अधिकारी होती. तर त्या वृद्धाची नजर काळजीने भरलेली होती.

"अरे तुम्ही दोघे कुठे राहिला होतात? तुम्ही दोघे येइपर्यंत माहिती द्यायला सुरवात नाही करायची असं गोविंद सर म्हणाले." महिच्या आवाजात नाराजी होती. त्याने बोलताना गोविंदकडे मात्र त्याचा आवाज बदलला.

"चला, सगळे आले आहेत तर मी माहिती देतो. हे सहावे लेणे आहे. तारा बोधिसत्व यांची मूर्ती तुम्हाला इथे दिसेल. अरे जस्सी तिथे नाही इथे ये. इथून आत जायचं आहे." महिने माहिती द्यायला सूरवात केली आणि जस्सी दुसरीकडे वळला. त्यामुळे माहिती देण्याचे काम थांबवून मही जस्सीच्या मागे गेला.

"तुम्ही सांगा हो तुम्हाला जी माहिती द्यायची आहे त्याबद्दल. मी ऐकतो आहे. आणि जर मी ऐकलं नाही तरी सोडून द्या. मला फोटो काढण्यात जास्त इंटरेस्ट आहे." जस्सी डोळ्यावरचा कॅमेरा दूर न करता म्हणाला.

खांदे उडवून महिने परत बोलायला सुरवात केली. "तारा बोधिसत्व यांचे बौद्ध धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. इथून आत या. ही मूर्ती अवलोकितेश्वर यांची आहे. हे इथे या वेगवेगळ्या मूर्ती आहेत त्या विविध देवांच्या आहेत." मही कसलेल्या गाईडप्रमाणे बोलत बोलत पुढे जात होता.

"गोविंद, शेषाने देखील काहीतरी वेगळं अनुभवलं आहे." मही थोडा पुढे गेला आहे हे बघून संस्कृती गोविंदच्या कानाला लागली आणि म्हणाली. गोविंदने मागे वळून शेषाकडे बघितलं आणि शेषाने देखील होकारार्थी मान हलवली.

"संस्कृती हे नक्की काय चालू आहे? आपण इथे का आलो होतो? मला जो श्लोक मिळाला त्याचा अर्थ शोधायला ना? मग ते सोडून आत्ता आपण ही लेणी का बघतो आहोत? तुला, मला आणि शेषाला इथे आल्यापासून काहीतरी वेगळं जाणवतं आहे. ते काय आहे? मी खूपच गोंधळून गेलो आहे ग." अगदी दबक्या आवाजात गोविंद संस्कृतीला म्हणाला.

गोविंदचा हात हातात घेत अत्यंत प्रेमाने दाबत संस्कृती म्हणाली; "गोविंद आम्ही सगळेच गोंधळलो आहोत. आपण आज आत्ता इथेच थांबुया का? चल हॉटेलवर जाऊ आणि एकत्र नीट बोलूया. आपण इथे परत उद्या पण येऊच शकतो न. शेषा देखील मला तेच सुचवत होता."

गोविंद आणि संस्कृती बोलत होते तेव्हा शेषा काहीसा लांब उभं राहून त्यांच्याकडे बघत होता. त्याला कळत नव्हतं की संस्कृतीने गोविंदचा हात धरलेला त्याला का आवडत नाहीय. 'हे असं या दोघांचं जवळ येणं कळवायला हवं आपण.' त्याच्या मनात विचार आला आणि त्या विचाराचं शेषाला खूप आश्चर्य वाटलं. गोविंद आणि संस्कृती... they are made for each other. मला माहीत आहे हे. मग काय झालं आपल्याला? कोणालातरी हे सांगायला हवं निकडीने असं वाटतंय. पण कोणाला?' शेषा स्वतःच्याच विचारांमध्ये अडकत चालला होता.

"आपण पुढे जायचं का?" अचानक महिचा आवाज आला.

पुढे होत शेषा त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला; "का हो महिरक्षक; तुम्ही फक्त ही टेक्निकल माहिती देता आहात. ही माहिती तर औरंगाबाद किंवा लेणी असं कुठलंही पुस्तक वाचलं तरी मिळेल. पण ही लेणी कोणी कोरली? कधी कोरली? त्यामागचा उद्देश काय होता? याबद्दल काहीतरी माहिती द्या ना. ते जास्त इंटरेस्टिंग असेल न!"

"वा! चांगला प्रश्न विचारलास. वाटत नाही तुझ्याकडे बघून तू इतका हुशार असशील." मही चेष्टेच्या सुरात म्हणाला. पण गोविंदला ते अजिबात आवडलं नाही. "हे पहा मही, तुम्ही तुमचं काम करा. कोण किती हुशार आहे; ते आमचं आम्ही बघून घेऊ."

गोविंदचा चिडलेला आवाज ऐकून मही एकदम वरमला. "अरे सर, तुम्ही तर एकदम रागावलात." तो म्हणाला.

"माझ्या जवळच्या लोकांशी कोणी नीट वागलं नाही तर मला ते खपत नाही. हे लक्षात ठेव तू." आवाजावर ताबा आणत शांतपणे गोविंद म्हणाला.

"बरं, बरं! या लेण्यांचा इतिहास तर अगदी रंजक आहे सर. तुम्हाला खूपच आवडेल. आपण इथेच बसूया का? हे मधले लेणे अपूर्ण आहे. त्यामुळे ते बघायला कोणी फारसं थांबत नाही. आपल्याला कोणी डिस्टर्ब नाही करणार." मही म्हणाला.

"चालेल. इथेच बसूया. आपण सोबत आणलेली सॅंडविचेस आणि केक्स इथे बसून खाऊया. यार भूक लागली आहे मला." जस्सी खाली बसत म्हणाला. त्याच्याकडे बघत हसत संस्कृती म्हणाली; "जस्सी, भुके व्यतिरिक्त दुसरं काही सुचतं का रे तुला?"

"हो! रक्षक नीती आणि समुच्च नियोजन हा एक अंतस्थ विचार असतो सतत माझ्या डोक्यात." मान खाली घालून कॅमेरामध्ये काहीतरी करत जस्सी म्हणाला. त्याचं उत्तर ऐकून संस्कृतीच्या भुवया उचलल्या गेल्या.

"जस्सी??" तिने त्याला हाक मारली.

"काय ग?" जस्सीने वर बघत उलट प्रश्न केला. तिच्याकडे बघणारा जस्सी नेहेमीचाच होता. मात्र संस्कृतीची खात्री होती की मान खाली घालून कॅमेरामध्ये खुडबुड करताना काहीतरी उत्तर देणारा जस्सी कोणीतरी वेगळा होता. तिने गोविंदकडे बघितलं. गोविंदने देखील जस्सीचं बोलणं ऐकलं होतं. त्याने संस्कृतीला डोळ्यांनीच शांत राहायला सांगितलं आणि तो देखील जस्सी शेजारी खाली बसला.

"मही तू पण बस. खाता खाता गप्पा मारू आपण." गोविंद म्हणाला आणि सगळेच खाली बसले.

"ही वेरूळ लेणी साधारण इसविसन सातशे सत्तावन्न ते त्र्याऐंशी या काळात निर्माण झाली. आपल्याला दिसतात ही समोरची चौतीस लेणी आहेत. बारा बौद्ध, सतरा हिंदू आणि शेवटची पाच जैन. वेरूळ लेण्यांमधील सर्वात महत्वाचं किंवा असं म्हणू की जगप्रसिद्ध असं शंकर मंदिर आहे. बारा ज्योतिलिंगांपैकी एक हे घृष्णेश्वर मंदिर आहे .हे मंदिर विशेष ठरतं ते त्याच्या स्थापत्यासाठी. द्राविडी शैलीतलं हे मंदिर दोनशे शहाहत्तर फूट लांब, एकशे चोपन्न फूट रुंद आणि नव्वद फूट उंच आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हे मंदिर एकाच दगडामध्ये कोरलेलं आणि ते ही वर पासून खाली घडवत गेलेलं आहे. एकूण चाळीस हजार टन दगड काढला गेला या कामामध्ये. हे स्थापत्य विशेष ठरत ते अजून एका गोष्टीसाठी. या मंदिराची महल तीन बाजूंच्या वर होती; जी मंदिराच्या वरच्या भागात जोडली होती. अर्थात आता हे पूल पडले आहेत. मात्र त्यावेळची ती स्थापत्य शोभा नजर दिपवणारी होती.

या मंदिराच्या निर्मितीचा पहिला विचार आला तो राजकुट घरण्यामधील अतिआदरनिय महाराज पहीले कृष्णराज यांच्या. त्यांनी त्यांच्या अत्यंत विश्वासू सल्लागार मित्राशी जो राज्याचा सुमंत देखील होता; याविषयी चर्चा केली. त्यावेळी त्यांचं वय केवळ पस्तीस वर्षे होतं. दुर्दैवाने राष्ट्रकूट घरण्याबद्दल आपल्या इतिहासात फार काहीच माहिती नाही. पण खरं तर या घराण्याने इसविसन सातशे त्रेपन्न पासून ते इसविसन नऊशे ब्याएशी पर्यंत म्हणजे तब्बल दोनशे एकोणतीस वर्षे राज्य केलं. ते देखील दक्षिण भारता पासून ते मध्य ते अगदी उतरेपर्यंत. मूळ राष्ट्रकूट घराण्यातील आंतरसंबंधीत पण स्वतंत्र कुळशाखा होत्या त्यांच्या.

अति आदरणीय पाहिले कृष्णराज भगवान शंकराचे निस्सीम भक्त होते. एका महाशिवरात्रीच्या उत्तर रात्री महाराज शंभो शंकराची महापूजा बांधून विश्रांतसाठी त्यांच्या भवनात गेले. ते मंजावर पहुडले होते; परंतु त्यांचं मन अतीव सुखाने भरून गेलं होतं. त्या अवस्थेतच त्यांना शंकर भगवंतांनी दृष्टांत दिला आणि सांगितलं की तुझ्या राजधानी बाहेरील गुंफांमधून मी वास करतो आहे. मात्र अजूनही मला स्वस्थ स्थान प्राप्त झालेले नाही. ही स्थान निर्मिती केवळ तू मनावर घेतलंस तरच होईल. राजा, एक असं मंदिर बांध की जे विश्वामध्ये वेगळे ठरेल. ज्या मंदिराचा यावदचंद्रदिवाकररौ लौकिक राहील. या मंदिराच्या अस्तित्वाची गरज सार्वभौम वसुंधरेला आहे. उठ राजा.... प्रातःकली तुला भेटण्यास जी पहिली व्यक्ती येईल तीच व्यक्ती या मंदिराच्या स्थापत्यासाठी योग्य आहे; यावर विश्वास ठेव.

भगवान शंकर अंतर्धान पावले आणि महाराज मंचावर उठून बसले. त्यांनी त्वरेने त्यांच्या परम मित्राला सुमंताला बोलावणे पाठवलं. तो समोर येताच साश्रु नयनांनी महाराजांनी त्याला झालेला दृष्टांत कथित केला. तो देखील हर्षोल्लासित झाला आणि म्हणाला "महाराज, आपण आजवर भगवान शंकरांची जी उपासना केली आहात; त्याचंच हे फळ आहे. आपल्या इच्छेने आणि आपल्याच संकल्पनेमधून या मंदिराची निर्मिती होईल; याची मला खात्री आहे." महाराजांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी त्यांच्या परम मित्राला आदेश दिला की उगवत्या नारायणासोबत राजधानीमध्ये पुकारा करावा की आज महाराज आम जनतेस सामोरे येणार आहेत. सर्वसामान्यांपैकी ज्यांना कोणाला महाराजांना भेटण्याची इच्छा असेल; त्यांनी आज राजदरबारी यावे. महाराजांच्या ठायी निर्माण झालेल्या चैतन्याचा अंश त्यांच्या मित्राकडे देखील संक्रमित झाला. मागे फिरताना त्याने महाराजांना विनंती केली की आजच्या राजदरबारामध्ये निश्चिन्त प्रवेश परवानगी असावी. मात्र महाराजांशी एकांतात बोलत असताना परम मित्र आणि राज्याचा सुमंत तिथे उपस्थित राहणारच! महाराजांना या विनंतीमध्ये काहीच चुकीचे वाटले नाही. त्यांनी रुकार भरला आणि परम मित्र राजदरबाराची व्यवस्था बघण्यासाठी निघाला.

महाराज राजदरबारात येऊन बसले. त्यांची प्रसन्न मुद्रा त्यांच्या मनातला आनंद सर्वश्रुत करत होती. राष्ट्रकूट घराण्याच्या सार्वभौमत्वाचे महत्व माहीत असणारे अनेक व्यापारी महाराजांना भेटण्यास आले होते. गेली अनेक वर्षे हे व्यापारी उत्तर भारतामध्ये उतरून मध्य भारत पार करून दक्षिणेपर्यंत प्रवास करत असत. सोबत आणलेल्या विविध वस्तू विकून त्याबदल्यात त्यांना आवश्यक अशा वस्तू ते घेत असत. मात्र त्यांना विक्री कर प्रचंड मोठ्या प्रमाणात द्यावा लागत होता. जर परम आदरणीय कृष्णराज महाराजांनी या करामध्ये सवलत दिली तर त्यांचा व्यापार मोठा होणार होता. यासाठी त्यांनी महाराजांची वयक्तिक भेट मागितली. सर्वांना भेटून झाल्यानंतर विशेष कक्षामध्ये या व्यापाऱ्यांना घेऊन येण्यास महाराजांनी त्यांच्या परम मित्रास सांगितले. व्यापारी वर्ग महाराजांना विशेष कक्षामध्ये येऊन भेटला आणि त्यांनी त्याची इच्छा बोलून दाखवली. त्यावेळी महाराजांचा परम मित्र आणि राज्याचा सुमंत तिथेच उपस्थित होता. त्याने महाराजांच्या कानाला लागत महाराजांना सुचवलं की जर या व्यापाऱ्यांना आपण विक्री करामध्ये सूट दिली तर ते आपल्या इथे बनणाऱ्या वस्तू जास्त विकत घेतील; जेणेकरून आपल्या लोकांचाच जास्त फायदा होईल. महाराजांना देखील हे पटले आणि त्यांनी कर सवलती संदर्भात विचार करून निर्णय घेण्यात येईल; असे त्या व्यपाऱ्यांना वचन दिले. अत्यानंदि होऊन व्यापारी वर्ग तेथून बाहेर पडला.

काही बौद्ध महंत देखील महाराजांना भेटण्यास आले होते. ते राजधानीच्या दक्षिणेकडील गुंफांमधून राहात होते. त्यांना पाहाताच महाराजांना प्रथम प्रहरी मिळालेल्या दृष्टांताची आठवण झाली. सर्वच महंतांचा यथायोग्य आदर-सत्कार करून महाराजांनी त्यांच्या अडचणीविषयी पृच्छा केली. मूलतः अत्यंत मितभाषी आणि मनुष्यवस्तीपासून लांब रहाणारे हे बुद्ध महंत महाराजांच्या आदरातिथ्याने संकोचून गेले. त्यांच्या प्रमुखाने पुढे होत अत्यंत कमी शब्दात विषय मांडणी करत सांगितले की बौद्ध धर्मातील काही महत्वाच्या निर्णय प्रक्रियेसाठी सर्वच महंतांना काही काळासाठी त्यांचे राहाते ठिकाण सोडून जावे लागणार आहे. हे ठिकाण जरी सर्वसामान्य मनुष्यांच्या दृष्टिक्षेपातील असले तरी जर गुंफांमधील महंतांचा वावर बंद झाला तर तिथे हिंस्त्र जनावरांचा वास सुरू होईल. त्यामुळे त्यांनी महाराजांना विनंती केली की काही काळासाठी या गुंफांचे संरक्षण करण्याची जवाबदारी घ्यावी. महंतांच्या विनंतीला मान देऊन महाराजांनी तेथील बंदोबस्ताची पूर्ण जवाबदारी स्वीकारली. महंत निश्चिन्त होऊन महाराजांना दुवा देऊन निघून गेले.

त्यानंतर अनेक गावकरी आणि इतर मंडळी महाराजांना भेटली. काहींच्या अडचणी होत्या तर काही केवळ आशीर्वाद देण्यासाठी आले होते. काहींना महाराजांची प्रसन्न मुद्रा समाधान देऊन गेली; तर काहींनी महाराजांच्या कारभाऱ्यांनी दिलेल्या त्रासाबद्दल तक्रार करून दाद मागितली आणि महाराजांनी तात्काळ त्यावर निर्णय दिले.

हळूहळू राजदरबाराची वेळ संपत आली. अजूनही महाराजांच्या नजरेतला शोध संपला नव्हता. भगवान शंकरांनी दिलेल्या संकेतानुसार आज कोणीतरी भेटणे आवश्यक होते. मात्र अजूनही कोणीच समोर आले नव्हते. सरते शेवटी महाराजांनी खुणेचा दंड उचलण्याची खुण केली; दंड उचलला जाणार इतक्यात राजदरबाराच्या मध्यावधी द्वारातून एक स्त्री पुढे येताना महाराजांना दिसली. महाराजांनी दंड उचलण्याची प्रक्रिया थांबवली आणि अत्यंत उत्सुकतेने त्यांनी समोरून येणाऱ्या स्त्रीचे स्वागत केले.

"महाराज, मला आपणास एकांतात भेटायचे आहे." धीरगंभीर आवाजात आणि अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये त्या स्त्रीने मनीची इच्छा बोलून दाखवली. क्षणभर महाराजांनी विचार केला आणि होकारार्थी मान हलवली. तत्क्षणी मानाचा दंड उचलला गेला आणि राजदरबार बरखास्त झाला.

महाराजांच्या विशेष कक्षामध्ये महाराज येऊन बसले. त्यांच्या सोबत राज्याचा प्रामाणिक सुमंत आणि त्यांचा परम मित्र देखील होता. ती स्त्री विशेष कक्षात प्रविष्ट झाली. अत्यंत तीक्ष्ण नजरेची ती स्त्री तिच्या प्रत्येक पावलागणिक तिच्यातील आत्मविश्वासाची जाणीव करून देत होती. ती महाराजांसमोर येऊन उभी राहिली. महाराजांनी तिला आसन ग्रहण करण्याची विनंती केली; त्याप्रमाणे तिने आसन ग्रहण केले. मात्र ती एकही शब्द बोलण्यास तयार नव्हती. महाराजांनी काही क्षण वाट बघून सुमंतांना खुण केली आणि सुमंतांनी तिला तिच्या येण्याचे प्रयोजन विचारले. तिने थेट महाराजांकडे बघितले आणि त्याच त्या धीरगंभीर आणि स्पष्ट आवाजात ती म्हणाली; "महाराज, विषय अत्यंत महत्वाचा; म्हंटले तर नाजूक आणि तुमच्या दृष्टांतासंदर्भातील आहे. त्यामुळे मी एकांतात तुमच्याशी बोलू इच्छिते......."

...................मही बोलण्याचा थांबला. त्याच्या कथेमध्ये गुंतून गेलेले गोविंद, जस्सी, शेषा आणि संस्कृती तो अचानक का थांबला म्हणून त्याच्या तोंडाकडे बघायला लागले.

"पुढे?" न राहून गोविंदने विचारले.

................................"पुढे? महिला.........." संस्कृती बोलणार इतक्यात गोविंद झपकन पुढे झाला आणि सर्वांसमोर त्याने तिला दोन्ही खांदे धरून घुसळले.

"शांत रहा संस्कृती!!!" अत्यंत तीव्र शब्दात गोविंद म्हणाला.

"तू??? तू हिम्मत कशी केलीस मला स्पर्श करण्याची?" संस्कृतीचा अवतार अचानक इतका बदलला होता की मही, जस्सी, शेषाच काय गोविंद देखील दचकला आणि मागे हटला. क्षणात गोविंदला दूर लोटत संस्कृती फणकाऱ्याने उठली आणि समोरच्या गुंफेच्या दिशेने निघाली.

क्रमशः



Friday, March 4, 2022

अनाहत सत्य भाग 14

 अनाहत सत्य

भाग 14

गोविंद, जस्सी, शेषा आणि संस्कृती चौघेही समोरच दिसणाऱ्या शंकराच्या मंदिरासमोर उभे होते. चौघेही आपल्याच तंद्रीमध्ये त्या प्रचंड मोठ्या मंदिर असलेल्या लेण्याकडे बघत उभे होते. मही मागून येऊन त्यांच्या सोबत उभा राहिलेला त्यांना चौघांनाही कळला नाही.

"चला, एका वेगळ्या काळ सफरीला." महिचा आवाज ऐकून चौघेही तंद्रीतून जागे झाले आणि दचकून त्याच्याकडे बघायला लागले.

"काळ सफर? नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला?" शेषाने विचारलं.

महिने शेषाकडे बघितलं पण त्याच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत त्याने एक पाऊल पुढे टाकलं. गोविंदला ते अजिबात आवडलं नाही.

"शेषा काहीतरी विचारतो आहे." गोविंदचा आवाज काहीसा कठोर होता. गोविंदच्या त्या वाक्याने शेषा, संस्कृती आणि जस्सीने देखील गोविंदकडे थोडं आश्चर्याने बघितलं. आजवर गोविंदच्या आवाजात असा कठोरपणा त्यांना कधीच जाणवला नव्हता. जस्सी आणि संस्कृतीने एकमेकांकडे बघितलं. शेषा मात्र गोविंदकडे एकटक बघत होता, त्याला गोविंदच्या त्या बोलण्याने आतून खूपच बरं वाटलं. पुढे जायला निघालेला मही मात्र तटकन थांबला. त्याने गर्रकन वळून गोविंदकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात एकप्रकारचं आश्चर्य होतं. तो क्षणभर थांबला आणि मागे येत म्हणाला; "अरे तुम्ही तर एकदम रागावलात. तुमच्या मित्राच्या प्रश्नामध्ये काही अर्थ नाही असं वाटलं मला; म्हणून उत्तर नाही दिलं. अहो काळ सफर म्हणजे ही लेणी आणि त्यांची कथा.... त्या सफरीवर चला इतकंच म्हणत होतो मी." मही म्हणाला.

"ओह! आम्हाला सगळ्यांना वाटलं तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे की वेगळ्या काळामध्ये चला." काहीसं तापलेलं वातावरण हलकं करण्यासाठी संस्कृती हसत म्हणाली.

"मॅडम, तुम्हाला काहीही वाटू शकतं. पण ते तसंच असतं किंवा होतं असं नाही न." मही बोलला. त्याची नजर कुठेतरी लांब लागली होती. तो संस्कृतीकडे अजिबात बघत नव्हता. का कोण जाणे पण संस्कृतीला वाटलं महिला तिच्याशी बोलण्याची इच्छा नाही. पण अजून वाद वाढू नयेत म्हणून ती शांत राहिली.

"बरं महिजी, तुम्ही आम्हाला या लेण्यांच्या सफरीवर घेऊन चला बघू." जस्सी त्याचा कॅमेरा सावरत म्हणाला आणि सगळेच निघाले.

"वेरूळ लेणी ही अत्यंत खास लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण चौतीस लेणी आहेत. यामध्ये सुरवातीची बारा लेणी बौद्ध स्थापत्याची आहेत; नंतरची सतरा लेणी हिंदू संस्कृती बद्दल माहिती देतात आणि ही डाव्या बाजूची शेवटची पाच जैन लेणी आहेत. इसविसन १९५१ साली भारत सरकारने या लेण्याला 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून घोषित केलं आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपवण्यात आली आहेत. युनेस्कोने इसविसन १९८३ मध्ये वेरूळ लेण्यांचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला. आपल्याला हे समोर जे दिसतं आहे ते कैलास मंदिर. हे या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रामधलं सर्वात अदभुत आहे. तुम्ही जर पृथ्वी बाहेरील सॅटेलाइट मधून पृथ्वीकडे बघितलंत तर काही ठळक खुणा दिसतात. त्यामध्ये या कैलास मंदिराच्या वरच्या भागाचा समावेश आहे." मही बोलत बोलत मंदिराच्या दिशेने चालत होता.

गोविंद, संस्कृती, जस्सी आणि शेषा महिच्या मागे चालत होते. त्यांची नजर समोरच्या कैलास मंदिरावर होती आणि कान मही जे सांगत होता त्याकडे होते. पण तरीही प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चाललं होतं.

"या लेण्यांची खासियत अशी आहे की संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरून ही लेणी निर्माण केलेली आहेत. आपल्याला समोर हे जे कैलास मंदिर दिसते आहेत ते द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले आहे. एकूण two senventy six फूट लांब, one fifty four फूट रुंद असं हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधलेलं आहे. त्याहूनही महत्वाचं म्हणजे सर्वसाधारणपणे कोणतंही बांधकाम हे पायापासून कळसाकडे जातं. पण हे मंदिर वरपासून खालपर्यंत तयार केलेलं आहे. ते बांधण्यासाठी, खडकातून सुमारे चाळीस हजार टन दगड काढला गेला असा अंदाज आहे. पहिल्या भागात हा एकूण पर्वत बांधकामासाठी वेगळा करण्यात आला. म्हणजे लेण्यांसाठी हीच जागा योग्य आहे; हे ठरल्यानंतर संपूर्ण पर्वताची लांबी रुंदी मोजली गेली. मग हा भाग संपूर्ण पर्वतापासून वेगळा केला गेला. त्यानंतर मंदिरासाठी हा पर्वत भाग आतून कापला गेला आणि नव्वद फूट उंचीच हे कैलास मंदिर बांधण्यात आलं. याची वेगळी बाजू म्हणजे हे मंदिर बाहेरील बाजूने मूर्तींनी भरलेले आहे. विशेष म्हणजे या मंदिराची महल तीन बाजूंच्या वर होती, जी मंदिराच्या वरच्या भागाला जोडलेली होती. आता ते पुल पडले आहेत. पण त्यावेळचा नजरा डोळे दिपवणाराच होता. खुल्या मंडपात समोर नंदी आणि विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत. हे काम भारतीय स्थापत्य शास्त्र कौशल्यांचा एक अद्भुत नमूना आहे." मही तंद्री लागल्यासारखा बोलत होता; जणूकाही त्याला ते मंदिर बांधलं जात असताना दिसत होतं. तो स्वतःच्या नादात हळूहळू मंदिराच्या दिशेने चालत होता. मागून गोविंद, संस्कृती, जस्सी एका वेगळ्याच ओढीने चालत होते.

त्यांच्यातला शेषा मात्र महिच्या बोलण्यामध्ये फार गुंतला नव्हता. त्याचं लक्ष इतर लोकांकडे देखील होतं. तो गोविंदच्या मागून चालत होता. दोन पावलांचं अंतर ठेऊन. अर्थात तो जरी महिच्या माहितीमध्ये गुंतला नव्हता तरी त्याचं पूर्ण लक्ष होतं त्याच्या बोलण्याकडे.

"लांबी, रुंदी मोजायला तुम्ही होतात का?" शेषाने अचानक प्रश्न केला आणि सगळ्यांनीच त्याच्याकडे वळून बघितलं. खांदे उडवत शेषा हसला. काही वेळापूर्वीच्या अनुभवामुळे यावेळी त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता महीनेच उलट प्रश्न विचारला; "का? तुला का असं वाटलं?" हसत हसत शेषा म्हणाला; "अहो, तुम्ही जे वर्णन करता आहात ना... त्यावरून तर असं वाटतं की तुम्हीच ही जागा ठरवलीत, हे पर्वत मोजलेत आणि....."

"आणि?" संस्कृतीने आवाज थोडा मोठा करत विचारलं.

तिच्या त्या प्रश्नामुळे शेषा बोलायचा थांबला. "आणि काही नाही." तो तिच्याकडे बघत म्हणाला.

"काही नाही न? मग ठिक. चला, आपण हे मंदिर बघूया." संस्कृती म्हणाली आणि सगळेच मंदिराच्या दिशेने निघाले.

नेहेमीच्या सवयीमुळे असेल पण मही काहीसा भरभर चालत पुढे निघाला. गोविंद आणि जस्सीने देखील त्याला गाठण्यासाठी वेग वाढवला. तेवढी संधी साधून संस्कृती शेषाकडे आली आणि म्हणाली; "मला माहीत आहे तुला या सगळ्यामध्ये फारसा इंटरेस्ट नाही. पण म्हणून प्रत्येकवेळी त्या महिला उलट प्रश्न विचारून डिस्टर्ब करू नकोस. कळलं?"

हसत हसत शेषाने बरं म्हणून मान हलवली आणि ते दोघे देखील मंद हसत मंदिराच्या दिशेने निघाले.

पुढे गेलेल्या गोविंदचं संपूर्ण लक्ष महिला गाठण्यामध्ये होतं; आणि अचानक त्याला जाणवलं की कोणीतरी लहानग्याने खिदळत येऊन त्याच्या पायाला येऊन मिठी मारली आहे. पायाला ओढ जाणवून गोविंद एकदम थांबला आणि त्याची नजर खाली वळली. पण त्याच्या पायाजवळ कोणीच नव्हतं. आता पायाला ओढ देखील जाणवत नव्हती. क्षणापूर्वी त्याची शंभर टक्के खात्री होती की लहानसं बाळ... कदाचित तीन-चार वर्षांचं असेल; त्याच्या पायाला मिठी मारून हसत होतं. पण पायाजवळ कोणीच नाही बघून तो पूर्णपणे गोंधळून गेला. तोपर्यंत काहीसे मागे राहिलेले शेषा आणि संस्कृती त्याच्या जवळ आले आणि संस्कृतीने नजरेनेच त्याला काय म्हणून विचारलं. गोविंदने देखील काही नाही असं मानेनेच सांगितलं आणि ते तिघे पुढे गेलेल्या जस्सी आणि महिच्या दिशेने निघाले.

जस्सी काहीसा मोठ्या ढांगा टाकत महिला गाठायचा प्रयत्न करत होता.... आणि अचानक त्याला जाणवलं की त्याच्या आजूबाजूला खूपशी गर्दी आहे. घामाचा दर्प त्याला जाणवत होता. तो थांबून आजूबाजूला बघायला लागला. कोणीच नव्हतं त्याच्या बाजूला. त्याला देखील ते कळत होतं. पण तरीही ती गर्दी त्याला जाणवत होती. अगदी स्पष्टपणे! पण ती जी भावना होती त्यावर काही विचार मनात येण्याअगोदरच गोविंद, शेषा आणि संस्कृती त्याच्या शेजारी आले. जस्सीने त्यांच्याकडे बघितलं; आणि क्षणभरापूर्वी झालेला भास मनाच्या मागे टाकून तो देखील पुढे निघाला.

"अरे तुम्ही मागे राहिलात. मी आपला एकटाच बोलत होतो." मागे वळून हसत मही म्हणाला.

"हो! ते जरा फोटो काढत होतो मी संपूर्ण लेण्यांच्या परिसराचे." जस्सी मोघम म्हणाला.

"लेणी सुरू होतात उजवीकडून. त्या तिथल्या पहिल्या लेण्यापासून. अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे साधारण स्थापत्य सांगायचं तर ती उजवीकडची पहिली बारा लेणी बौद्ध पद्धतीची आहेत, त्यानंतरची सतरा हिंदू आणि नंतरची या बाजूची शेवटची पाच जैन लेणी आहेत. हे फरक कसे तर आतील मूर्ती आणि बांधकाम स्थापत्यावरून केलेले आहेत. मात्र सर्वसाधारण लोक या कैलास मंदिरापासून सुरवात करतात. पहिली काही लेणी तर लोक बघत देखील नाहीत. एकदम त्या नवव्या लेण्यापासून सुरवात करतात बघायची. तसं पहिल्या लेण्यांमध्ये बघण्यासारखं वेगळं असं काहीच नाही." आता महिमधला टिपिकल गाईड जागा झालेला दिसत होता.

"आम्हाला सगळंच नीट बघायचं आहे." पुढे होत संस्कृती म्हणाली.

"वाटलंच मला." मही काहीसा रुक्ष स्वरात म्हणाला. पण आपल्या आवाजातला बदल लगेच लपवत पुढे म्हणाला; "अरे वा! नक्की बघा. मला पण आवडेल सगळं नीट दाखवायला. पण सुरवात कुठून करणार?"

संस्कृतीने मागे वळून गोविंद, जस्सी आणि शेषाकडे बघितलं. ते तिघे शांत उभे होते. त्यामुळे तिनेच निर्णय घेतला आणि म्हणाली; "आपण त्या पहिल्या लेण्यापासून सुरवात करू."

"चला तर मग. आपण त्यादिशेने चालायला लागुया." मही म्हणाला आणि उजवीकडे वळून चालायला लागला.

"तिथे पोहोचेपर्यंत इथल्या एकूण इतिहासाची थोडी कल्पना द्याल का?" जस्सी फोटो काढत म्हणाला. चालताना देखील त्याच्या हाताल्या कॅमेराला क्षणभराची देखील उसंत नव्हती.

"नक्कीच. पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात निर्माण झालेल्या या लेण्यांमधलं प्रसिद्ध कैलास मंदिर हे बारा जोतिर्लिंगांपैकी एक आहे. घृष्णेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जातं हे मंदिर. त्याची निर्मिती पहिल्या राष्ट्रकूट माहाराजांनी केली. त्याचं नाव पाहिले कृष्ण महाराज!" मही माहिती देत चालत होता. बोलताना त्याने गोविंदकडे बघितलं आणि हसला. गोविंद देखील महिकडे बघत सहज हसला. महिच्या कपाळावर हलकीशी आठी आली असावी असं त्याला वाटलं. पण त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि पुढे चालायला लागला. मही पुढे बोलायला लागला; "या लेण्यापैकी १० क्रमांकाच्या गुहेतील मागच्या भिंतीवर राष्ट्रकूट महाराज दंतीदुर्ग याचा शिलालेख आहे. पहिले कृष्ण महाराज हे दंतीदुर्ग महाराजांचे चुलते होते. इसवी सनाच्या ७५३ ते ७५७ या काळातील हा लेख आहे. यावरून कैलास मंदिर लेण्याची निर्मिती ही इसवी सनाच्या ७५७ ते ७८३ या काळातील असावी असा अंदाज केला जातो.

हा लेणीसमूह व्यापारी मार्गावर असल्याने तत्कालीन समाजाच्या दृष्टिपथात कायम राहिला. विविध राजघराण्यातील व्यक्ती आणि उत्साही अभ्यासू प्रवासी यांनी या लेण्यांना वेगवेगळ्या काळांमध्ये भेटी दिल्या आहेत. दहाव्या शतकात अरब प्रवासी अल-मस-उदी याने देखील इथे भेट दिली आहे. बहामनी सुलतान गंगू याने इथे आपला तळ ठोकला होता आणि ही लेणी आतून बाहेरून पूर्णपणे पाहिली. फिरिस्टा, मालेट यांसारख्या परदेशी प्रवासी अभ्यासकांनी इथे भेट दिल्या आहेत. ही लेणी काही काळ हैदराबादच्या निजामाच्या नियंत्रणात देखील होती. त्याला मात्र या लेण्यांबद्धल मुळीच आस्था नव्हती. त्याने त्याच्या एका सरदाराला इथे तळ ठोकून या लेण्यांची नासधूस करण्याचे फर्मान सोडले होते. त्या सरदाराने खूप प्रयत्न केला. असंख्य मजूर लावले होते त्याने ही लेणी फोडण्यासाठी..."

"इतकं सोपं नाही या लेण्यांना हात लावणं. लेण्यांची सुरक्षा हा अत्यंत महत्वाचा आणि मूलभूत प्रश्न दुर्लक्षित कसा असेल?" जस्सी म्हणाला. खरं तर फोटो काढण्यात गुंतला होता. त्याचं महिच्या बोलण्याकडे लक्ष होतं की नाही ते कळणं देखील अवघड होतं. इतका तो कॅमेऱ्यामध्ये गुंतला होता. त्यामुळे त्याच्या बोलण्याने सगळेच चमकले.

"खरंय! तुला काय वाटतं? निजामाच्या सरदाराला इतका प्रयत्न करूनही का नसेल फोडता आली ही लेणी?" महिने जस्सीकडे वळत विचारलं.

"कारण ज्यांनी ही लेणी बांधली असतील त्यांनी त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था केलीच असेल न?" जस्सी म्हणाला. अजूनही त्याचा डोळा कॅमेऱ्याच्या लेन्सला लागलेला होता आणि चेहेरा कॅमेऱ्याच्या मागे लपला होता.

"हो न. तूच होतास न सगळी व्यवस्था बघायला आणि सूचना द्यायला." शेषा थट्टेच्या सुरात म्हणाला आणि परत एकदा वादाला तोंड फुटेल असं वाटून संस्कृती मध्ये पडली.

"यार आपण शांतपणे लेणी बघणार आहोत की सतत फालतू बडबड करून सगळ्यांचा वेळ वाया घालवणार आहोत?" तिच्या काहीशा रागावलेल्या आवाजाचा अंदाज येऊन जस्सी आणि शेषा गप्प बसले आणि सगळेच परत एकदा चालायला लागले.

जस्सीचा कॅमेरा फटाफट क्लीक आवाज करत फिरत होता. अचानक जस्सीला दूर काहीतरी वेगळं वाटलं. त्याने कॅमेरा डोळ्यापासून लांब केला आणि अंदाज घेतला. त्याची नजर इतरांकडे वळली. पण सगळेच पुढे चालत होते. परत एकदा कॅमेराच्या लेन्समध्ये बघत त्याने त्या जागी फोकस केलं. "च्यायला....." त्याच्या तोंडून एक कचकचीत शिवी बाहेर पडली. "ही इथे?" त्याने हलकेच स्वतःशी म्हंटलं आणि पटकन दोन तीन फोटो क्लीक केले. डोळ्यापासून कॅमेरा लांब करत त्याने परत एकदा त्या दिशेने बघितलं आणि त्याचे डोळे विस्फारले गेले.

त्याला लांब एका दिशेने नैना दिसली होती. म्हणूनच आश्चर्य वाटून त्याने पटकन फोटो काढले होते. पण कॅमेरा डोळ्यापासून लांब करून त्या दिशेने बघितल्यावर तिथे कोणीच नाही हे त्याच्या लक्षात आलं. तसा तो भाग पहिल्या लेण्यांच्या बाजूला होता. तिथे अजून कोणीच नव्हतं आणि इथून लांबून तरी लपण्यासाठी काही जागा असेल असं वाटत नव्हतं... अर्थात ती खरंच नैना असली आणि यांना बघून लेण्याच्या आत गेली असली तर अचानक गायब होण्याचा अर्थ कळला असता. फोटो काढला असूनही जस्सीला खात्री नव्हती की त्याने नैनाला बघितलं... दुसरं म्हणजे त्याला उगाच नको ते वाद आत्ता तरी निर्माण करायचे नव्हते. त्यामुळे तो काही एक न बोलता चालायला लागला.

"१९व्या शतकात भारतात ब्रिटीश राजवट असताना वेरुळ लेणी पूर्णपणे दुर्लक्षित होती. आक्रमकांमुळे किंवा काळाच्या ओघात मूर्तींचेही नुकसान झालं होतं हे खरं. ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडेफार प्रयत्न केले; कारण या लेण्यांच्या ऐतिहासीक महत्वाची त्यांना कल्पना होती. मात्र त्यांचे ते प्रयत्न अगदीच सुरवातीच्या काळातले आणि वरकरणी होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९६०च्या दशकात या लेण्यांची काळजी घेण्याचा खरा प्रयत्न सुरू झाला. याच काळात अजिंठा-वेरूळच्या लेण्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटनस्थळे म्हणून प्रसार सुरू झाला आणि मग ही लेणी बघण्यासाठी प्रवाशांची रीघ लागली. आमच्या सारख्या गाईड्सच्या पोटापाण्याची सोय झाली." मही माहिती देत होता.

बोलता बोलता ते सगळे पहिल्या लेण्याजवळ पोहोचले. मही पहिल्या लेण्याच्या आत प्रवेश करत म्हणाला; "सर्वसाधारण प्रवासी या लेण्यांपर्यंत येत नाहीत कारण इथली रचना फारशी आकर्षक नाही."

"आठ खणी स्तूप रचना आहे ही. बाहेर कडाक्याची थंडी असो किंवा उन्हाळा आतलं वातावरण कायमच समतोल असतं. साहजिक आहे... वयोवृद्ध राहणार तर त्याप्रमाणे रचना असणं आवश्यक नाही का?" संस्कृती म्हणाली. ती काहीशी वेगळी उभी होती इतरांपासून आणि टक लावून बघत होती त्या गुहा सदृश खोली किंवा स्तूप जे काही होतं त्याकडे.

"चल, आत जाऊया का?" गोविंद हलकेच तिच्या खांद्याला स्पर्श करत म्हणाला. संस्कृती काहीशी दचकली आणि त्याच्या लक्षात आलं की तिची तंद्री लागली होती. "ये तू थोड्या वेळाने आत किंवा थांब इथेच. आम्ही आत जाऊन येतो." तो अगदीच समजूतदार प्रेमळ आवाजात म्हणाला आणि जस्सी, शेषाला त्याने खूण केली. मही अगोदरच आत गेला होता. गोविंद, जस्सी आणि शेषा देखील आत गेले. संस्कृतीची नजर अजूनही त्या लेण्याच्या वरच्या बाजूला लागली होती. तिची खात्री होती की तिने तिथे नैनाला बघितलं होतं. नैनाची उंची आणि तिची तीच ती केशभूषा! सगळे केस एकत्र घेऊन घट्ट बांधलेला बो आणि त्याला खाली घातलेली लांबलचक वेणी. ती नैनाच होती.... पण आता याती तिथे दिसत नव्हती. नजर खाली करत संस्कृती आत जाणार इतक्यात तिला लाहान बाळ खिदळण्याचा आवाज आला. तिने मागे वळून बघितलं तर एक तीन-चार वर्षांचा मुलगा मोठ्याने हसत एका झुडपाकडे बघत होता.

'अरे? इथपर्यंत कोणी येत नाही. इतर कोणी मोठे दिसत नाहीत; मग हा एकटा लहानगा काय करतो आहे इथे?' संस्कृतीच्या मनात आलं. तिला एकदम त्या बाळाची काळजी वाटायला लागली. अचानक तिला आतून शेषाने हाक मारली.

"संस्कृती ये न आत. बघ इथे इतकं मस्त वाटतं आहे ग." तो म्हणाला. तिने वळून शेषाकडे बघितलं आणि 'आलेच' अशी खुण करून परत समोर बघितलं तर ते लहान बाळ तिथे नव्हतं. तिच्या कपाळावर आठ्या आल्या. पण काही एक न बोलता ती आत गेली.

"ओह! मी जशी कल्पना केली होती तसंच आहे इथलं वातावरण अजूनही." आत जाताच ती म्हणाली.

"हम्म! हा मधला हॉल आहे. हे इथे बुद्ध देवांची मूर्ती कोरली आहे आणि ही पहा तारा बोधिसत्व मूर्ती. समोर चौथरा आहे तो निवांत बसून ध्यान करावं किंवा गप्पा मारण्यासाठी बसण्याची सोय आहे. या दोन्ही बाजुंनी खोल्यांसारखे खण आहेत; तिथे बौद्ध भिक्खू राहायचे." मही सांगत होता.

"ते खूप नंतर....." संस्कृती म्हणाली आणि गोविंदने तिचा हात धरून हलकेच दाबला. तसा आत अंधार होता त्यामुळे इतरांच्या ते लक्षात आलं नाही.

"बरं! इथे अजून काही बघण्यासारखं नाही. पुढच्या लेण्यात जाऊया का?" काही क्षण शांत राहून मही म्हणाला आणि इतर कोणी काही म्हणायची वाट न बघता तिथून बाहेर पडत पुढच्या लेण्याकडे वळला. जस्सी आणि शेषा देखील बाहेर पडले आणि ती संधी साधून गोविंद संस्कृतीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला; "संस्कृती, मला देखील जाणवतं आहे की इथे काहीतरी वेगळं आहे. पण ते कदाचित तुला आणि मला... इतकंच मर्यादित आहे. त्यातल्या त्यात जस्सी आणि शेषा समजून घेतील ग आपल्याला. पण हा महिरक्षक.... उगाच काहीतरी वाटेल त्याला. त्यामुळे जे काही वेगळं वाटतं आहे किंवा दिसतं आहे; ते मनात साठव. हॉटेलवर गेल्यावर बोलू आपण." त्या अर्धवट उजेड असलेल्या स्तूप सदृश खोलीमध्ये देखील संस्कृतीला गोविंदचे प्रेमाने ओथंबलेले डोळे समजले. मंद हसत तिने मानेनेच 'हो' म्हंटलं आणि ते दोघे तिथून बाहेर पडले.

"ही दुसरी आणि तिसरी लेणी. अगदी पहिल्या लेण्याप्रमाणेच आहे रचना यांची. आतून बघणार का हे पण?" मही दुसऱ्या लेण्याच्या बाहेर उभं राहून म्हणाला.

"नको.... आपण पुढे जाऊ चला." गोविंद म्हणाला.

"पण मला आत जाऊन बघायचं आहे काही वाट लागली आहे का आतून." जस्सी म्हणाला.

"मग तू आत जाऊन बघून ये आणि पुढे येऊन आम्हाला भेट. गोविंदजी म्हणाले ना पुढे जायचं... मग झालं तर." मही म्हणाला आणि पुढे चालायला लागला.


यावर शेषा काहीतरी बोलणार होता पण जस्सीने त्याला थांबवलं आणि 'चल पुढे जाऊ;' अशी खुण केली. सगळेच शांतपणे पुढे निघाले. गोविंदच्या मागे दोन-तीन पावलांचं अंतर ठेऊन शेषा चालत होता. त्याची नजर सगळीकडे फिरत होती. अचानक त्याला मागून कोणीतरी चालत येत असल्याचा भास झाला आणि थांबून तो मागे वळला. त्याच्या समोर नैना उभी होती.

उंच बांधलेली लांबलचक वेणी, काळे कपडे, डोळ्यांमध्ये असलेल्या काजळामुळे तिचे मूळचे तीक्ष्ण डोळे शेषाच्या काळजाचा वेध घेत होते. मुळात उंच असलेली नैना आत्ता मूळ उंचीपेक्षा देखील खूप जास्त उंच वाटत होती. शेषाची नजर नैनाच्या नजरेत गुंतली होती आणि त्याचं स्थळ काळाचं भान हरपलं होतं.

क्रमशः


Friday, February 25, 2022

अनाहत सत्य (भाग 13)

 अनाहत सत्य

भाग 13

गोविंदने संध्याकाळी त्याच्या वडिलांच्या ऑफिसमधल्या प्युनला पाठवून संस्कृतीला निरोप दिला होता; 'सकाळी चार वाजता गेट जवळ ये. लवकरचं विमान आहे.'

नैना हॉस्टेलवर पोहोचली तेव्हा संस्कृती तिची बॅग भरत होती. नैना खोलीत आली तरी संस्कृतीने तिची दाखल घेतली नाही; कारण संस्कृतीला कोणताही वाद नको होता. नैना खोलीत आली आणि शांतपणे आपल्या पलंगावर बसून संस्कृतीचं निरीक्षण करायला लागली. संस्कृतीने बॅग भरली आणि एका बाजूला केली. एककीकडे हात काम करत होते आणि संस्कृतीच्या मनात नकळत वादळ सुरू होतं. तिने वॉर्डनला 'वडिलांकडे जाते आहे'; असं सांगितलं होतं. जर काही विषय निघाला तर तेच कारण नैनाला सांगायचं तिने मनात ठरवलं होतं. गोविंदने सकाळी चारला तयार राहायला सांगितलं होतं; त्यामुळे संस्कृती लवकर झोपण्याची तयारी करत होती. बराच वेळ झाला तरी नैना काही एक न बोलता संस्कृतीकडे बघत बसली होती. का कोण जाणे पण नैनाचं असं बघणं संस्कृतीला अस्वस्थ करायला लागलं होतं. दुर्लक्ष करायचं कितीही ठरवलं तरी संस्कृतीला ते अवघड व्हायला लागलं. शेवटी स्वतःच्या पलंगावर बसत तिने नैनाकडे थेट बघितलं आणि विचारलं; "असं का बघते आहेस तू माझ्याकडे?"

"संस्कृती, तुला वेरूळ लेण्यांना जायचं आहे न; चल... मी घेऊन चालते तुला. पण गोविंद बरोबर नको जाऊस." नैनाने एकदम बॉम्बच फोडला संस्कृतीच्या डोक्यावर.

"तुला कोणी सांगितलं मी गोविंद बरोबर वेरूळ लेणी बघायला जाते आहे?" संस्कृतीने नकळत मान्यच करून टाकलं नैनाकडे.

"कोणी सांगितलं हे महत्वाचं नाही सांस्कृती... तू गोविंद सोबत जाते आहेस आणि ते योग्य नाही; असं माझं मत आहे." नैना अत्यंत निर्विकार चेहेऱ्याने पण गंभीर आवाजात म्हणाली.

"नैना! हे अति होतं आहे बरका. मला माझे वडील देखील सांगत नाहीत मी कुठे, कधी आणि कोणासोबत जायचं ते. मग तू कोण मला सांगणारी? मला जे हवं ते करीन मी." संस्कृती तावातावाने म्हणाली.

"मी कोण.... तू कोणाचं एकतेस किंवा नाही ऐकत... तुझ्या वडिलांचा तुझ्या आयुष्यातला नक्की रोल काय आहे... हे सगळं एका पॉइंटला क्षुल्लक आहे संस्कृती. आत्ता सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की तू वेरूळ लेण्यांकडे गोविंद सोबत जाणं बरोबर नाही." अजूनही नैना त्याच त्या गंभीर आवाजात बोलत होती.

मात्र नैनाच्या त्याच त्या बोलण्याने संस्कृतीचा पारा चढत होता. "बरं! जर तुझं मत आहे की मी गोविंद सोबत तिथे जाऊ नये तर मला कारण सांग. ते कारण पटलं तरच मी तुझं एकेन. केवळ तुला वाटतं म्हणून मी तुझं ऐकायला मी तुझ्या हाताखाली काम करत नाही. माझं स्वतःचं असं अस्तित्व आहे तिक्ष्णा." संस्कृतीच्या तोंडून फटाके फुटल्यासारखे शब्द बाहेर पडत होते.

संस्कृतीचं शेवटचं वाक्य ऐकून नैना एकदम ताठ झाली. तिचे मुळात मोठे असलेले डोळे खूपच मोठे झाले. तिने तिच्या पलंगाची गाडी घट्ट धरून ठेवली.... एकटक संस्कृतीकडे बघत नैना बसून राहिली. असेच अत्यंत तंग वातावरणातले काही क्षण गेले आणि संस्कृती भानावर आली. तिला नैनाचा खूपच राग आला होता. त्यामुळे एकही अक्षर न बोलता ती नैनाकडे पाठ करून पलंगावर आडवी झाली आणि तिने डोळे मिटले. संस्कृतीला वाटलं होतं की झालेल्या चिडचिडीमुळे तिला झोप लागणार नाही. पण काही क्षणातच संस्कृती गाढ झोपली होती. संस्कृतीला नक्की झोप लागली आहे याची खात्री करून घेत नैनाने खोलीचा दिवा बंद केला आणि दार ओढून घेत ती खोलीच्या बाहेर आली.

नैना परत एकदा कालच्याच खिडकीजवळ जाऊन उभी राहिली.

"हो! तिने मला तिक्ष्णा म्हणून हाक मारली." नैना बाहेर बघत बोलत होती. पण ती कोणाशी बोलत आहे ते मुळीच कळत नव्हतं. तिची मान मात्र वर होती. "मला मान्य आहे की हे योग्य नाही. पण तिला कोणीही काही सांगून ती ऐकत नाही; तुम्हाला देखील ते चांगलंच माहीत आहे...... मला ही असंच वाटतंय की तिला काहीतरी आठवतं आहे. पण ती अजूनही एकूण सत्यापासून खूप दूर आहे...... हो.... मी तिच्या घड्याळच बंद करून टाकलं आहे. त्यामुळे तिला इतक्या लवकर जाग येणार नाही आणि तो इथे या इमारतीच्या आत येऊ शकत नाही. त्यामुळे किमान एका दिवसासाठी तरी मी तिचं जाणं टाळू शकते...... मान्य आहे की हा कायमचा उपाय नाही. पण मला सत्य माहीत आहे; त्यामुळे प्रत्येक पाऊल उचलताना मला विचार करावा लागतो. तिला काहीच कल्पना नसल्याने ती केवळ संस्कृती म्हणून विचार करते आहे..... हो! मी यावर कायमस्वरूपी उत्तर शोधून काढीन." नैना बोलायची थांबली आणि मागे वळली. त्यावेळी तिथे एकही मुलगी नव्हती हे नैनाचं नशीब होतं. नाहीतर नैनाचं ते रूप बघून त्या मुलीने घाबरून किंकाळी फोडली असती किंवा बेशुद्ध देखील पडली असती. अत्यंत ताठ मानेने आणि सरळसोटपणे चालणाऱ्या नैनाचे डोळे पारदर्शक काचेप्रमाणे चमकत होतेआणि तिची लांबलचक वेणी जिवंत असल्याप्रमाणे तिच्या पाठीवर वळवळत होती.

नैना एका क्षणासाठी देखील झोपली नव्हती. तिने संस्कृतीचा फक्त गझर बंद केला होता असं नाही तर तिने तिचं घड्याळ देखील बंद करून टाकलं होतं. त्यामुळे संस्कृतीला जाग येणं शक्यच नव्हतं. तरीही संस्कृतीला आपसूक जाग आली तर तिला जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी नैना तिच्या पलंगावर ताठ बसून होती.

साडेतीन वाजण्याच्या सुमाराला अचानक त्यांच्या खोलीच्या दारावर थाप पडली. वेळ इतकी शांततेची होती की तो आवाज खूपच मोठा झाला. अनपेक्षितपणे खोलीचं दार वाजल्याने नैना क्षणभरासाठी गोंधळून गेली. उठून दार उघडून कोण आहे हे बघण्याच्या अगोदरच नैनाला बाहेरून वॉर्डनचा आवाज आला.

"संस्कृती.... ए संस्कृती.... उठलीस का ग? तुला निघायचं आहे न?" वॉर्डनच्या त्या मोठ्या आवाजाने संस्कृतीला जाग आली. ती पटकन पलंगावर उठून बसली. नेहेमीची सवयीची वेळ नसल्याने संस्कृती पूर्ण गोंधळून गेली होती. इतक्यात परत एकदा खोलीचं दार वाजलं आणि पाठोपाठ वॉर्डनचा आवाज; "अग नैना... तुला तरी हाका ऐकू येता आहेत का? त्या संस्कृतीला उठव बघू... ती आज तिच्या वडिलांकडे जायला निघणार आहे. खूप लवकरचं विमान आहे तिचं." वॉर्डनच्या आवाजाने आजू बाजूच्या खोल्यांमधल्या मुली देखील जाग्या झाल्या होत्या बहुतेक. संस्कृतीला तर पूर्ण जाग आली होती. झटकन पलंगावरून खाली उतरत तिने खोलीचं दार उघडलं. समोर वॉर्डन हसत उभी होती. "अग अलार्म लावायला विसरली होतीस की काय? बरं झालं न मला उठवायला सांगितलं होतंस ते. मला रात्रीची झोपच नसते ग धड. त्यामुळे तीन वाजल्या पासून माझं घड्याळाकडे लक्ष होतं. साडेतीन झाले आणि आले इथे तुला उठवायला. बरं; आता पटकन आवर आणि निघ. तसही आत्ता मेस बंद आहे; त्यामुळे तुला चहा देखील मिळणार नाही आहे... काय?" वॉर्डन तिच्या नेहेमीच्या मोकळ्या बाडबडण्याच्या सवयीप्रमाणे बोलायला लागली. तिला अडवत संस्कृती हलक्या आवाजात म्हणाली; "Thank you very much madam. खरंच गाढ झोप लागली होती मला. तुम्ही उठवलंत ते बरं झालं." त्यावर हसत वॉर्डन म्हणाली; "तू म्हणाली होतीस उठवा जमलं तर... मी म्हंटलं न जमायला काय? उठवते! बरं आवर तुझं आणि निघ हो."

वॉर्डन गेली आणि संस्कृती खोलीचं दार लावून घेत मागे वळली. तिने एकदा तिच्या घड्याळाकडे बघितलं. संस्कृतीचं घड्याळ बंद होतं. ते नक्कीच नैनाने बंद केलं असणार हे संस्कृतीच्या लक्षात आलं. पण तिला नैनाशी वाद घालायचा नव्हता. तिने पलंगावर ताठ बसलेल्या नैनाकडे बघितलं आणि पटकन स्वतःचं आवरून बॅग उचलून ती खोली बाहेर पडली.

संस्कृती खोलीबाहेर गेली आणि नैनाने अस्वस्थ होत डोळे मिटले... 'यापुढच्या घटनांवर माझा ताबा नाही...' तिने मानत म्हंटलं. अचानक तिच्या मानत आवाज उमटला.... 'त्यावेळी तरी होता का? तिक्ष्णा; एखाद्याचे विचार दाबण्यापेक्षा बदलण्याचा प्रयत्न कर; उत्तर सापडेल. दाबल्याने ज्वालामुखी अजून भडकतो आणि वाट करून दिली तर लाव्हा शांतपणे ओघळून जातो...' नैनाने खाडकन डोळे उघडले. परत एकदा तिचे डोळे चमकत होते... आणि खोली एका निळसर प्रकाशाने भरून गेली होती.

***

"अग, उशीर केलास न. मला वाटलं झोप लागली तुला. आत येणं शक्य नाही आणि तुला बोलावण्याचं दुसरं एकही साधन नाही... अशा कात्रीत सापडलो आम्ही तिघे." संस्कृतीला बघताच तिच्या हातातून बॅग घेत गोविंद म्हणाला.

"झोपच लागली होती. वॉर्डनला सांगून ठेवलं होतं ते बरं झालं. नाहीतर काही खरं नव्हतं." गाडीत बसत संस्कृती म्हणाली.

"मला वाटलं नैनाने अडवलं की काय..." खिदळत शेषा म्हणाला.

"गप रे.... तिला गोविंद आवडत नाही म्हणून ती संस्कृतीला अडवेल असं मला वाटत नाही." जस्सी म्हणाला. यावर गोविंद, शेषा आणि जस्सी काहीतरी बोलायला लागले. गाडीच्या मागच्या काचेतून संस्कृतीने मागे वळून हॉस्टेलकडे बघितलं. तिच्या खोलीतून परावर्तित होणारा निळसर उजेड तिला दिसला.... गाडी पुढचं वळण घेतलं आणि हॉस्टेल संस्कृतीच्या नजरेआड झालं.

***

"यार गोविंद, इतकं पॉश हॉटेल? यार मी इतके पैसे नाही आणलेले... म्हणजे नाहीचेत माझ्याकडे." हॉटेलच्या दारात पोहोचल्या पोहोचल्या गोविंदला एका बाजूला घेत जस्सी म्हणाला.

"जस्सी, फलतुपणा करू नकोस. मी तुझ्याकडे पैसे मागितले का? चल आत. पटकन आवरून निघायचं आहे आपल्याला." गोविंद जस्सीला म्हणाला आणि संस्कृती, शेषा सोबत हॉटेलमध्ये शिरला. क्षणभर थांबून जस्सीने खांदे उडवले आणि तो देखील हॉटेलमध्ये शिरला.

"दोन रूम्स फक्त? गोविंद.....???" संस्कृती गोविंद सोबत रिसेप्शन जवळ उभी होती. दोन रूम्सच्या किल्ल्या गोविंदने घेताच तिने गोंधळून गोविंदला विचारलं.

"संस्कृती त्या जस्सीने हॉटेलच्या बाहेर मुक्ताफळं उधळली आहेत; आता तू सुरू होऊ नकोस. एक single occupency आहे आणि दुसरी tripal occupency आहे." गोविंद म्हणाला. मागून आलेला शेषा म्हणाला; "हो! Internally connected."

"शेषा...." गोविंदने काही म्हणायच्या अगोदर संस्कृतीच म्हणाली; "हो का? बरं झालं बाई... मला एकटीला झोप नाही येत. मधलं दार उघडं ठेऊ रात्री झोपताना." यावर गोविंद आणि जस्सी फसकन हसले आणि शेषाने खांदे उडवले. सगळे लिफ्टच्या दिशेने निघाले. पण थांबत गोविंद परत एकदा मागे वळला आणि त्याने रिसेप्शनला जाऊन चौकशी केली; "आम्हाला वेरूळ लेणी बघायला जायचं आहे. गाडीची सोय होऊ शकेल का? आणि एखादा चांगला जाणकार गाईड देखील."

"नक्की सर. किती वाजता निघणार आहात? त्याप्रमाणे गाडी बोलावून ठेवतो. तसे तिथे अनेक गाईड असतात. पण आमच्या हॉटेलमध्ये रजिस्टर्ड गाईड्स आहेत. त्यातला कोण आता आहे ते बघतो आणि त्याला देखील बोलावून घेतो. म्हणजे जाताना गाडीतच तो तुम्हाला माहिती सांगायला सुरवात करेल."

"That's great. लगेच निघू आम्ही. अगदी पंधरा मिनिटात." गोविंद हसत म्हणाला आणि लिफ्टच्या दिशेने निघाला.

चौघेही तयार होऊन आले. रिसेप्शनवरच्या मुलीने त्यांना गाडीचा नंबर दिला आणि म्हणाली; "सर, गाईड तुम्हाला लेण्यांजवळ येऊन भेटेल."

बरं म्हणून मान हलवत गोविंद हॉटेल बाहेर आला. त्याने तिघांना खुणेने समोरची गाडी दाखवली आणि चौघेही गाडीत जाऊन बसले.

"साब... क्या देखनेका पैले आपकु?" चौघेही गाडीत बसताच ड्रायव्हरने विचारले.

"मतलब?" शेषाने नकळून प्रश्न केला.

"सर, इधर बोहोत कूच है ना देखने जैसा. तो आप को पैले क्या देखना करके पुछा." ड्रायव्हर गाडी सुरू करत म्हणाला.

"सिधा एलोरा केव्हस लेना." चर्चेला संपवत गोविंद म्हणाला.

"हा साहाब." असं म्हणत ड्रायव्हरने गाड़ी हॉटेल बाहेर काढली.

"साहाब, हम पोहोच गये." ड्रायव्हरच्या आवाजाने चौघांनाही जाग आली. अवेळी उठून प्रवास केल्याने तसे चौघेही दमले होते. त्यामुळे गार हवा लागताच त्यांना झोप लागली होती. गाडी खाली उतरत त्यांनी आळस दिला.

"साहाब, उधरसे अंदर जानेका. उधर तिकीट मिलता है." ड्रायव्हरने माहिती दिली आणि चौघेही निघाले.

ड्रायव्हरने मागून हाक मारली आणि म्हणाला; "साहाब, कितना टाइम लगेगा?"

"अरे? अभि तो आये है.. क्या मालूम कितना टाइम लगेगा." शेषाने उत्तर दिलं.

"साहाब, मेरा भांजा इधर को एक साडी के दुकान मे काम करता है. तो सोचा उस्को जाके मिलके आता हु." ड्रायव्हर अजिजीने म्हणाला.

"हां. ठीक है. जाओ. बोहोत टाइम लगेगा इनको." तो आवाज ऐकून संस्कृती, गोविंद, जस्सी आणि शेषाने आश्चर्याने त्या दिशेने बघितलं.

एक उंचापुरा गोरासा मनुष्य त्यांच्या पासून चार फुटावर उभा होता. त्याचे घरे डोळे भेदक होते. चेहेऱ्यावर डाव्या गालावर एक मोठा व्रण होता. "तुमचीच वाट बघत होतो गोविंदजी." चौघांच्या दिशेने चालत येत तो म्हणाला.

"तुम्ही?" गोविंदने विचारलं.

"गाईड हवा होता ना तुम्हाला?" तो हसत म्हणाला.

"ओह! बरोबर !हॉटेलच्या रेसेप्शनमध्ये सांगितलं होतं मी. हॅलो. मी गोविंद." गोविंद हसत म्हणाला.

"हो! मी इथे पोहोचलो होतो आणि मग मला फोन आला. नमस्कार मॅडम." संस्कृतीकडे वळत तो म्हणाला.

"हाय." संस्कृती हसत पुढे येत म्हणाली. पण तिच्याकडे काहीसं दुर्लक्ष करत त्याने शेषाकडे बघत अगदी ओळखीचं हास्य केलं.

गोंधळलेल्या चेहेऱ्याने शेषाने त्याच्याकडे बघितलं. जस्सी काहीसं मागे उभं राहून होणाऱ्या ओळखी बघत होता. तो काहीसा अलिप्तच होता त्यासागळ्यांपासून. आपला कॅमेरा सावरत लेन्स चेक करत होता तो.

"साहाब?!" ड्रायव्हरने हाक मारली.

"हां हां! जाओ तुम." गोविंद त्याच्याकडे वळत म्हणाला.

"चला, तुमची तिकिटं काढून ठेवली आहेत मी." गाईड म्हणाला.

"तुमचं नाव काय म्हणालात?" शेषाने त्याला विचारलं.

"मही...." आपले भेदक डोळे शेषावर रोखत तो म्हणाला.

"मही? म्हणजे?" संस्कृतीने विचारलं.

"मही... महिरक्षक नाव आहे माझं. नावाचा अर्थ राजाचा रक्षक. अर्थात आता रक्षकांची गरजच नाही कारण आता राजेच राहिले नाहीत." मही... महिरक्षक बोलत होता. पण त्याच्या आवाजातून तो गम्मत करतो आहे की काहीतरी गंभीर सांगतो आहे ते कळत नव्हतं. संस्कृतीला एकूणच त्याचं व्यक्तिमत्व फारसं आवडलं नाही. त्यामुळे काही न बोलता ती चालायला लागली.

संस्कृती सोबत जस्सी देखील चालायला लागला. गोविंद आणि मही एकत्र निघाले आणि सर्वात शेवटी शेषा... आजूबाजूचा निसर्ग न्याहाळत निघाला.

ही मंडळी निघालेली बघून ड्रायव्हर गाडीकडे आला. आता गाडीत बसून तो निघणार एवढ्यात एक माणूस त्याच्याकडे आला आणि म्हणाला; "किधर है साहाब लोग?"

"क्या? कौन लोग?" ड्रायव्हरने आश्चर्याने विचारलं.

"अरे ये देख. मेरेको तुम्हारी गाडी का नंबर दिया था होटलसे. बोला साहाब लोग आये है अपना केव्हज देखनेको. तो मै आया. गाइड हूं ना." तो माणूस गोंधळून ड्रायव्हरकडे बघत म्हणाला.

"अरे? तू गाईड है? तो वो कौन था? साहाब लोग तो उसके साथ अंदर भी गये." ड्रायव्हर म्हणाला.

"साला... कौन था यार? मेरा पैसा मार गया?" गाइड म्हणाला. "देखता हूं अंदर जा के." असं म्हणून तो गाईड गेला.

नक्की काय झालं ते ड्रायव्हरला कळलं नाही. पण आता तर त्याच्यासोबत आलेले साहेब लोक आत गेले होते आणि त्यांना यायला वेळ लागेल हे नक्की होतं. त्यामुळे परवानगी घेतल्या प्रमाणे गाडी घेऊन तिथून निघाला.

लांबवर लेण्यांच्या दिशेने गोविंद, संस्कृती, जस्सी आणि शेषा सोबत आत जाणाऱ्या महिने एकदा मागे वळून बघत गाडी गेल्याची खात्री केली. त्याच्या चेहेऱ्यावर एक मंद हास्य पसरलं होतं.... मात्र ते या चौघांच्या गावी देखील नव्हतं.

क्रमशः





Friday, February 18, 2022

अनाहत सत्य (भाग 12)

 अनाहत सत्य

भाग 12

नैनाने बोलणं बंद केलं पण संस्कृतीचा मेंदू मात्र विचार करायला लागला. "सामंतच्या मनात काय होतं ते बोलत होता का शेषा?" या नैनाच्या प्रश्नामागे काय अर्थ असेल? कोण सामंत? शेषाला का माहीत असेल त्याच्या मनात काय आहे? संस्कृती विचारांमध्ये गाढली होती. तिचे डोळे बंद होते; पण झोप नव्हती लागली तिला.... आणि अचानक तिला जाणवलं की नैना उठली आहे. संस्कृतीने डोळे किलकिले करून बघितलं. खोलीत अंधार होता; खिडकीमधून रस्त्यावरच्या दिव्याचा जो काही हलकासा उजेड येत होता तेवढाच काय तो उजेड. त्यामुळे संस्कृतीला नैनाचा चेहेरा दिसत नव्हता; साहजिक होतं की नैनाला देखील संस्कृती जागी आहे हे कळणार नव्हतं. तरीही संस्कृतीला जाणवलं की नैना पलंगावर उठून बसून संस्कृतीच्याच दिशेने बघत होती. तिचं ते अत्यंत स्थिर बसून संस्कृतीकडे बघणं संस्कृतीला अस्वस्थ करत होतं. पण तरीही कोणतीही हालचाल न करता संस्कृती तशीच पडून राहिली. असाच काही वेळ गेला आणि नैना पलंगावरून खाली उतरली. अजिबात आवाज होऊ न देता नैना हलकेच खोलीबाहेर गेली. नैनाचं हे असं अचानक खोली बाहेर जाणं संस्कृतीला खटकलं. त्यामुळे थोडा वेळ जाऊ देऊन संस्कृती देखील उठली आणि अगदीच हलकी पावलं टाकत तिने देखील दरवाजा गाठला आणि हळूच उघडून तिने बाहेर डोकावून बघितलं.

त्यांची खोली दुसऱ्या मजल्यावर होती... त्यामुळे व्हरांड्याच्या एका बाजूला पायऱ्या आणि दुसऱ्या बाजूला आवाराच्या मागच्या बाजूला उघडणारी खिडकी होती. संस्कृतीला दिसलं की नैना व्हरांड्याच्या एका टोकाला जाऊन उभी होती; जिथे खिडकी होती! नैना खाली उतरलेली नाही हे बघून संस्कृतीला आश्चर्य वाटलं आणि त्याहूनही मोठा धक्का बसला तिला खिडकीच्या बाजूला बघून. नैनाने खिडकी उघडली होती आणि ती खिडकी बाहेर बघत होती. मागून बघत असूनही संस्कृतीला लक्षात आलं की नैना खिडकीच्या बाहेर बघत होती.... पण खाली नाही तर वर! आता मात्र संस्कृतीला सगळंच विचित्र वाटायला लागलं. तिची उत्सुकता पराकोटीची ताणली गेली. पायांचा आवाज होऊ न देता ती नैनाच्या मागे जाऊन उभी राहिली.

नैनाने तिचे दोन्ही हात खिडकी बाहेर पसरले होते. ती वर आकाशाच्या दिशेने बघत काहीतरी पुटपुटत होती. संस्कृती नकळत अजून थोडी पुढे सरकली; तिला समजून घ्यायचं होतं नैना नक्की काय बोलते आहे.... आणि कोणाशी?

"होय! विचारलं मी गोविंद काय म्हणाला. पण ती म्हणाली; तो काहीच म्हणाला नाही. याचा अर्थ त्याला अजूनही काही माहीत नाही. अहं! मला खात्री आहे तोच आहे... गोविंद! नाही.... अपाला अजूनही...." आणि अचानक बोलणं थांबवून नैना गर्रकन मागे फिरली. तिचं असं मागे फिरणं संस्कृतीला अगदीच अनपेक्षित होतं. ती अगदीच बेसावध होती. संस्कृतीने नैनाकडे बघितलं. नैनाचे डोळे आग ओकत होते.

"तू इथे काय करते आहेस?" नैनाने संस्कृतीला प्रश्न केला. नैनाचा आवाज अगदीच वेगळा वाटला संस्कृतीला.

पण एकदम स्वतःला सावरून घेत संस्कृती म्हणाली; "मी? मी तुझ्या मागे आले. मला जाग आली तर तू नव्हतीस तुझ्या पलंगावर. अचानक कुठे गेलीस ते बघायला मी खोलीबाहेर डोकावले तर तू पॅसेजच्या या टोकाला दिसलीस. इथे खिडकीकडे काय करते आहेस याचं आश्चर्य वाटलं म्हणून आले इथे. तूच सांग तू काय करते आहेस इथे? ही तर हॉस्टेलची मागची बाजू आहे. कोण आहे बाहेर नैना? कोणाशी बोलते आहेस तू? ते ही वर बघत!"

संस्कृतीचं बोलणं ऐकून नैना एकदम स्तब्ध झाली. तिने संस्कृतीकडे स्थिर नजरेने बघितलं आणि तिला कोणतेही उत्तर न देता चालू पडली. संस्कृती देखील तिच्या सोबत निघाली. नैना खोलीमध्ये शिरली आणि स्वतःच्या पलंगावर जाऊन आडवी झाली. तिने संस्कृतीकडे पाठ केली होती; त्यामुळे तिच्या सोबत खोलीत येताना 'खिडकीबाहेर कोणाशी बोलत होतीस?' हा प्रश्न नक्की विचारायचा असं जरी संस्कृतीने ठरवलं होतं तरी तिला काहीच बोलता आलं नाही.

संस्कृती काही वेळ तिच्या पलंगावर बसून राहिली. पण नैनाने कोणतीही हालचाल केली नाही. शेवटी संस्कृती आडवी झाली आणि थोड्या वेळाने तिला झोप लागली.

सकाळी संस्कृती जागी झाली आणि तिची नजर नैनाच्या पलंगाकडे गेली. नैना पलंगावर नव्हती. संस्कृतीला ते काहीसं अपेक्षितच होतं. तिने उठून पटापट आवरलं आणि ती गोविंदला भेटायचं ठरवून होस्टेलच्या बाहेर आली. तिची नजर गेटकडे गेली आणि तिला एकदम आश्चर्य वाटलं. गेटजवळ गोविंद, जस्सी आणि शेषा उभे होते.

"कमाल आहे! सकाळी सकाळी इथे काय करता आहात तुम्ही?" त्यांच्या दिशेने चालत येत संस्कृती म्हणाली.

"चल! काहीतरी खूप महत्वाचं सांगायचं आहे तुला." गोविंद तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत म्हणाला. तिला त्याच्या घाईचं एकदम आश्चर्य वाटलं. तिने जस्सीकडे बघत भुवया उडवत काय म्हणून विचारलं. जस्सीचा चेहेरा देखील चांगलाच गंभीर होता. त्याने डोळ्यांनीचं तिला 'चल' अशी खूण केली. चौघेही एकत्र चालायला लागले.

इडली, मेदूवडा आणि फिल्टर कॉफी अशी ऑर्डर देऊन संस्कृतीने प्रश्नार्थक नजरेने गोविंदकडे बघितलं.

"You got to know this!" गोविंद म्हणाला.

"I know. But for that u need to tell me your 'this'!" संस्कृती गंभीर चेहऱ्याने पण मिश्किल आवाजात म्हणाली.

"जोक नाही संस्कृती." गोविंद म्हणाला.

मग मात्र संस्कृतीने चेहेरा अगदीच गंभीर करत शांतपणे काय म्हणून मान हलवली.

"जस्सीच्या काकांचा काल रात्री उशिरा मला फोन होता." गोविंद म्हणाला आणि संस्कृती सावरून बसली.

"काय म्हणाले ते गोविंद? इतकं सिरीयस का झाला आहेस तू.... in fact तुम्ही तिघेही?" संस्कृतीने विचारलं.

"संस्कृती;" जस्सी एकदा गोविंदकडे बघून बोलायला लागला. "काकांनी घरी पोहोचल्या पोहोचल्या काही जुने ग्रंथ, वेद चाळून बघितले. ते म्हणाले तो श्लोक त्यांना खूपच अस्वस्थ करत होता. कारण जरी त्या श्लोकाची भाषा प्राकृत असली तरी त्यात खूप गहन अर्थ आहे असं त्यांना सारखं वाटत होतं. त्यामुळे न राहवून त्यांनी त्या श्लोकाची भाषा शोधण्या अगोदर त्या श्लोकासंदर्भात इतर काही रेफरन्स मिळतात का ते बघितलं. बराच वेळ काही मिळालं नाही; म्हणून मग त्यांनी मूळ प्रश्नाला; म्हणजे श्लोकामध्ये वापरलेली प्राकृत भाषा नक्की कोणत्या ठिकाणची आहे; ते शोधायला घेतलं. ते मात्र त्यांना पटकन मिळालं. अग, या प्राकृत भाषेला महाराष्ट्री म्हणतात. हिचा वापर महाराष्ट्रात साधारण इसवीसन 757 मध्ये होत असे. लिखित स्वरूपात फार नाही मिळत ही भाषा. पण तात्कालीन हिंदू, बौद्ध आणि जैन संतांनी प्रयत्नपूर्वक थोडसं स्क्रिप्ट तयार केलं होतं. त्याचाच वापर करून हा श्लोक लिहिला आहे. ही महाराष्ट्री भाषा राष्ट्रकूट घराण्यातील राजांनी - विशेषतः कृष्ण राष्ट्रकूट पहिला याने - वेरूळ लेण्यांमधलं शंकर मंदिर बांधायला घेतलं त्यावेळी वापरली आहे. त्या लेण्यांमधल्या एका लेण्यांमध्ये कृष्ण राष्टक्त पहिला याच्या चुलत्याच्या; तो स्वतः राजगाडीवर असतानाचा; काळातील एक शिलालेख देखील आहे."

संस्कृती शांतपणे जस्सी जे सांगत होता ते ऐकत होती. जस्सी बोलायचा थांबला आणि तिने परत एकदा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितलं. तिघेही तिच्याकडे बघत होते; पण बोलत कोणीच नव्हतं. त्यामुळे तिला काहीच कळेना.

"जस्सी, महाराष्ट्री प्राकृत भाषा राष्टकुट राजाच्या काळात; विशेषतः वेरूळ लेणी बांधली गेली त्यावेळी; म्हणजे इसविसन 757 या काळात बोलली आणि लिहिली जात होती. कळलं मला! पण यामध्ये इतकं गंभीर होण्यासारखं काय आहे?" संस्कृतीने काहीसं वैतागत विचारलं.

"संस्कृती, गंभीर होण्यासारखा विषय पुढे आहे." गोविंद म्हणाला.

"आणि तो काय ते मला सांगाल का कोणी? नमनाला घडाभर तेल झालं आहे ओतून...." संस्कृतीने शांत आवाजात म्हंटलं.

"काकांना एकदा लिंक लागल्या नंतर त्यांनी श्लोकाचा गाभा शोधायला सुरवात केली." जस्सी म्हणाला.

"बरं मग?" अजूनही संस्कृतीला कळत नव्हतं की ते तिघे इतके सिरीयस का आहेत.

"संस्कृती, तुला आठवतं काका म्हणाले होते; त्या 'स्व' ची काहीतरी निर्मिती करण्याची इच्छा आहे आणि ती कोणीतरी पूर्ण करतं आहे. पण पुढच्या संपूर्ण श्लोकामध्ये त्या इच्छा पूर्ण करणाऱ्यांचा उल्लेख नाही. त्या नरेशाला त्याच्या आप्तांकडून धोका झाला आहे; आणि तरीही त्याने त्याच्या जवळच्यांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे." गोविंद म्हणाला. "हो! आठवतं. मग? त्याचं काय?" संस्कृतीने विचारलं. "काका म्हणाले होते; त्या नरेषाच्या इच्छेप्रमाणे निर्मिती करणारे ते कोण हे जास्त महत्वाचं आहे. ते असं का म्हणाले होते ते आपल्याला कळलं नव्हतं. पण काकांच्या मनात तो प्रश्न सतत घोळत होता. त्यामुळे एकदा ती भाषा कुठली आणि कोणत्या काळातली हे कळल्यावर काकांनी त्या श्लोकाचा अर्थ अजून समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि...." गोविंद बोलायचा थांबला.

आता मात्र संस्कृती वैतागायला लागली. "गोविंद, हा सस्पेन्स संपव बघू. काय आहे ते पटकन सांग." तिच्या आवाजतला अस्वस्थ वैतागलेपणा गोविंदला जाणवला. पण तरीही तो शांत होता.

"संस्कृती, काकांना काहीतरी मिळालं... अर्थ लागला.... आणि त्यांनी रात्री खूप उशिरा; खरं तर अगदी पाहाटे; मला फोन केला. त्यांनी मला जे सांगितलं ते जर नीट विचार केला तर खूपच महत्वाचं आहे. काकांनी अगोदर मला माझा अनुभव परत एकदा सांगायला सांगितलं. मी त्यांना सगळं अगदी नीट आठवून परत एकदा सांगितलं. 'तू त्या गुहेतून बाहेर पडल्या नंतर परत तुला ती गुहा परत सापडली नाही न?' काकांनी विचारलं. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की तिथले फॉरेस्ट ऑफिसर म्हणाले तिथे अशी कोणतीही गुहाच नाही. त्यानंतर काही वेळ काका काहीच बोलत नव्हते. मला काही कळेना... आणि मग अचानक काका बोलले.... गोविंद; हा श्लोक तुझ्यासाठी लिहिला गेला आहे. फक्त तुझ्याचसाठी! मला काहीच कळेना; काका अचानक असं काय म्हणत होते. असेच काही क्षण शांततेत गेले आणि काकांनी मला सांगितलं; 'गोविंद मला वाटतं तू एकदा वेरूळ लेण्यांना भेट देऊन ये.' मला कळेना काका असं का म्हणत होते. मी त्यांना कारण विचारलं. त्यावर ते जे म्हणाले त्यामुळे मी एकदम गंभीर झालो... कधी एकदा सहा वाजतात आणि बाहेर पडून तुम्हाला गाठतो असं झालं मला." गोविंद म्हणाला.

"काय म्हणाले काका?" संस्कृतीने विचारलं. तिला एव्हाना लक्षात आलं होतं की जस्सी आणि शेषाला गोविंदने सगळं सांगितलं आहे. त्यामुळे ती त्यांच्याकडे बघत देखील नव्हती.

"संस्कृती, काका म्हणाले.... तो श्लोक केवळ माझ्यासाठीच लिहिला गेला होता; म्हणूनच तो केवळ मला दिसला. म्हणूनच तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्यांच्या मनातला प्रश्न.... त्या नरेषाच्या इच्छेप्रमाणे निर्मिती करणारे ते कोण हे जास्त महत्वाचं आहे! कारण.... तो श्लोक जरी महाराष्ट्री प्राकृत भाषेत लिहिला असला तरी तो कोणा समकालीन व्यक्तीने लिहिलेला नाही. तो श्लोक नरेषाच्या इच्छेप्रमाणे निर्मिती करणाऱ्या त्या ज्या कोणी शक्ती होत्या... त्यांनी लिहिला होता; नरेषासाठी." गोविंद बोलायचा थांबला आणि संस्कृती अवाक होऊन त्याच्याकडे बघायला लागली.

"तू काय बोलतो आहेस ते तुला कळतं आहे का गोविंद? तू अगोदर म्हणालास की काकांनी तुला सांगितलं की तो श्लोक केवळ तुझ्यासाठीच लिहिला गेला होता.... आणि मग ते म्हणाले की तो श्लोक वेरूळ लेणी बनवणाऱ्या व्यक्तींनी..... सॉरी शक्तींनी..... लिहिला आहे..... आणि.... आणि म्हणून तू वेरूळ लेण्यांना जाऊन भेट देऊन आलं पाहिजेस! काय मूर्खपणा आहे हा सगळा?" संस्कृती म्हणाली आणि त्याक्षणी शेषाने मोठा निश्वास सोडला. सगळेच त्याच्याकडे बघायला लागले. तसा तो म्हणाला; "यार, जस्सी, राग मानू नकोस... पण गोविंदने सकाळी आपल्याला हे सगळं संगीतल्यापासून मला हे सगळं म्हणजे काहीतरी तथाकथित मूर्खपणा वाटत होता. पण मी असं म्हंटलं असतं तर तुम्ही सगळे वैतागला असतात. म्हणून मी गप होतो. पण आता संस्कृतीला देखील तसंच वाटतं आहे हे ऐकून बरं वाटलं. हे बघ; तुझे काका खरंच ग्रेट आहेत. त्यांनी एका क्षणाची उसंत न घेता त्या श्लोकाची भाषा; तिचा वापर असलेला भाग शोधला. पण हा श्लोक केवळ गोविंदसाठीच बनला होता हे त्यांना कसं कळलं? त्याहूनही मोठी गोष्ट.... यार वेरूळ लेणी बनवणाऱ्या लोकांनी आसामच्या खोऱ्यात जाऊन एका गुहेमधल्या वाहत्या पाण्याच्या तलावाच्या भिंतीवर हा श्लोक का लिहिला? अगदीच अशक्य आणि अतर्क्य आहे यार हे. यार, त्या श्लोकाचा अर्थ आणि त्याची भाषा शोधण्याच्या नादात तुम्ही हे तर नाही न विसरलात की आपल्याला मुळात तो श्लोक आसामच्या खोऱ्यात एका गुहेत दिसला होता.... I mean.... फक्त गोविंदला दिसला होता."

"शेषा, मला माहीत आहे की तो श्लोक आसामच्या खोऱ्यात एका गुहेत मला दिसला होता. ऐका सगळे.... काकांनी मला सांगितलेली माहिती! भाषेचा शोध लागला तरी काकांचं समाधान झालं नव्हतं. त्यामुळे त्यांनी परत एकदा आपण सांगितलेली माहिती आठवली. त्यावेळी आसाम मधल्या एका गुहेत हा श्लोक केवळ मला दिसला हे सांगितलेलं त्यांना आठवलं. त्यावरून त्यांनी भारतीय इतिहासातील वेगवेगळ्या काळांच्या संदर्भातली आसांमधली माहिती वाचायला सुरवात केली. एक एक करत ते मागच्या कालांचे वाचन करत होते. पुराण काळ, महाभारत काळ, रामायण काळ, उपनिषद काळ, ब्राम्हण ग्रंथ काळ आणि वैदिक काळ. प्रत्येक काळामध्ये आसाम खोऱ्याचे संदर्भ आहेत. विशेषतः उपनिषद, रामायण आणि महाभारत काळात तर आहेतच. त्याकाळात तिथे एक सुबक मंदिर बांधण्यात आल्याचा उल्लेख आहे. जगद् द्वार असा काहीसा उल्लेख आहे त्या मंदिराचा. त्यानंतर त्यांनी अलीकडच्या काळात त्या मंदिराचा उल्लेख कुठे आहे का बघितलं. त्यावेळी आसाम खोऱ्यात एक मंदिर आहे; जे नरभक्षक मनुष्यवस्तीमध्ये आहे; अशी माहिती त्यांना मिळाली. या मंदिराजवळ कोणीही जाऊ शकत नाही. जर गेलं तर ती व्यक्ती एकतर नाहीशी होते किंवा तिला वेड लागतं अशी माहिती त्यांना मिळाली."

"या सगळ्या माहितीचा श्लोकाशी काय संबंध गोविंद?" शेषाने अत्यंत थंड आवाजात प्रश्न केला.

"शेषा.... मी ज्या गुहेत होतो ती गुहा त्या मंदिराच्या आजूबाजूलाच असावी असा काकांचा अंदाज आहे. याचा अर्थ ते मंदिर ज्या कोणी बांधलं त्यांनी तो श्लोक लिहिला आणि.... त्यांनीच वेरूळ लेणी साकारली असा देखील होऊ शकतो; असा काकांचा अंदाज आहे." गोविंद म्हणाला.

"अरे गोविंद, किती काहीही सांगतो आहेस तू. यार, मला जस्सीच्या काकांबद्दल आदर आहे. प्लीज तुम्ही कोणी गैरसमज करून घेऊ नका. पण यार हे किती व्हेग आणि अनबिलिव्हेंबल आहे यार." शेषा वैतागत म्हणाला.

"हो हे खूपच व्हेग आणि अनबिलिव्हेंबल आहे; पण तरीही माझा विश्वास बसला आहे. गोविंद! मी येणार आहे तुझ्या सोबत औरंगाबादला. बोल कधी जायचं?" संस्कृती अत्यंत गंभीर आवाजात म्हणाली.


'संस्कृती....???" शेषाला काय बोलावं कळेना.

"शेषा, कदाचित तुला आणि जस्सीला हा सगळा मूर्खपणा वाटत असेल. पण मला नाही वाटत. हो! मीच काही मिनिटांपूर्वी म्हंटलं हे मान्य आहे मला. तरीही.... मला माहीत आहे गोविंद नक्की जाणार आहे औरंगाबादला आणि मी देखील जाणार आहे त्याच्या सोबत. का विचारू नका. मला जायचं आहे. बरं! जाता जाता तुमच्या अतर्क्य घटनांच्या लिस्टमध्ये अजून एक घटना ऍड करा...." असं म्हणून संस्कृतीने आदल्या रात्री नैना आणि तिच्यामध्ये झालेलं बोलणं आणि त्यानंतर नैनाचं वागणं त्या तिघांना सांगितलं.

"अबे ये तो और भी कॉम्प्लिकेटेड होता जा रहा है यार।" शेषा परत एकदा वैतागत म्हणाला.

इतकावेळ सगळं शांतपणे ऐकणारा जस्सी मात्र एकदम ताठ बसत म्हणाला; "गोविंद, संस्कृती मी पण येणार तुमच्या सोबत औरंगाबादला. मला वाटतं तिथे काहीतरी नक्की आहे. शेषा... हे कॉम्प्लिकेटेड आहे; अतर्क्य आहे; कदाचित सगळं एकदम खोटं देखील आहे.... पण तरीही मी जाणार गोविंद सोबत. का माहीत आहे? कारण त्या श्लोकामध्ये म्हंटलं आहे की; तुझ्या जवळच्या लोकांची सोबत तुझ्या बरोबर असेल तर तुझे आयुष्य बदलून जाईल. पण जर काही कारणाने ही तुझ्या जवळच्या लोकांची सोबत तुला नाही लाभली; तर सगळंच अर्थहीन होईल. त्यामुळे त्यांचा विश्वास तुला कायम समजून घ्यावा लागेल. आपण तिघे आणि काका सोडले तर या श्लोकाबद्दल माहीत असणारं कोणी नाही. काकांना आपण मदत म्हणून हा श्लोक सांगितला. म्हणजे काकांचा गोविंदशी तसा डायरेक्ट संबंध नाही. याचा अर्थ सध्या आपण तिघेच गोविंदच्या जवळचे आहोत; आणि म्हणून आपण त्याची साथ दिली पाहिजे. अर्थात हे माझं मत आहे. तुला जर यायचं नसेल तर नको येऊस."

"बस् क्या यार? इतना ही गिनते हो ना मुझे? साला.... मला हे सगळं पटत नाहीय हे खरं आहे. पण तरीही मी येणार. तुमच्या सोबत म्हणून. यार, त्या निमित्ताने वेरूळ लेणी बघून घेईन. बाकी तुम्ही शोधा त्या श्लोकाचाअर्थ जो शोधायचा आहे तो." शेषा म्हणाला आणि चौघेही हसले.

"बरं! कधी निघुया?" संस्कृतीने विचारलं.

"शुभस्य शीघ्रम्!" हसत हसत गोविंद म्हणाला. "मी बाबांच्या बुकिंग ऑफिसरला सांगून आपली विमानाची तिकिटं आणि हॉटेलचं बुकिंग करून घेतो. उद्याच निघू. किती वाजताचं विमान असेल ते आज संध्याकाळपर्यंत कळेल. काय?"

यावर सगळेच हसले आणि कॉफीचा शेवटचा घोट घेऊन उठले.

ही चौकडी बाहेर पडली आणि आपापल्या दिशांना पांगली. पण त्या कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं की ते सगळे गप्पांमध्ये गढले असताना त्यांच्या जवळच्याच टेबलवर नैना येऊन बसली होती. त्यांच्याकडे पाठ करून बसलेली नैना त्या उडप्याच्या हॉटेलमध्ये इडली खायला तर नक्कीच आली नव्हती....

क्रमशः





Friday, February 11, 2022

अनाहत सत्य (भाग 11)

 अनाहत सत्य


भाग 11

जस्सी काकांना सोडायला जाणार असल्याने थांबला आणि गोविंद, शेषा आणि संस्कृती मात्र निघाले.

"चला. आता जस्सीचे काका अर्थ सांगेपर्यंत हरी हरी करत बसायचं." शेषा हसत म्हणाला.

मात्र संस्कृती अजूनही गंभीर होती. तिने एकदा शांतपणे शेषाकडे बघितलं आणि मग गोविंदकडे वळून म्हणाली; "आपण परत एकदा संपूर्ण श्लोकाचा अभ्यास आपल्यापरीने करूया का?" तिचा गंभीर चेहेरा बघून शेषाने चेष्टेसाठी उघडलेलं तोंड बंद केलं.

"तुला गरज वाटते आहे का संस्कृती?" गोविंदने विचारलं.

"हो गोविंद. काका आपल्याला अर्थ आणि या श्लोकामध्ये वापरलेली प्राकृत भाषा भारताच्या नक्की कोणत्या भागात प्रचलित होती हे सांगणार आहेत. पण तरीही मला वाटतं आपण तो श्लोक समजून घेण्याचा आपल्या परीने देखील प्रयत्न करूया." संस्कृती म्हणाली.

"चालेल." असं म्हणून गोविंद शेषाकडे वळला आणि म्हणाला; "शेषा, तुला कंटाळा आला असला तर तू निघ. काहीच हरकत नाही. आमचं जे काही बोलणं होईल ते तुला नंतर कळवतो मी."

"यार काय करू निघून आणि घरी जाऊन? मला दुकानावर नाही जायचं. मी येतो तुमच्याबरोबर." शेषा म्हणाला.

"शेषा, तिथे येऊन जर चेष्टा करणार असलास तर नको हं येऊस." संस्कृती शांतपणे म्हणाली.

"नाही माझे आई. तुम्ही दोघे बोला. मी फक्त ऐकण्याचे काम करेन." शेषा हसत तिच्यासमोर हात जोडत म्हणाला. त्याच्या त्या एका कृतीने देखील तिघे हसायला लागले.

उडप्याकडे जाऊन बसल्यानंतर संस्कृतीने बॅगमधून एक वही काढली आणि लिहायला सुरवात केली. "ए, तू म्हणाली होतीस आपण एकत्र अर्थ शोधायचा आहे. तू जर एकटीच लिहीत बसणार असलीस तर आम्ही काय तुझं तोंड बघत बसू? बरं! एकवेळ गोविंदला आवडेल ते करायला.... माझं काय?" शेषाने तोंड उघडलंच.

"चालता हो बघू तो शेषा." वैतागत संस्कृती म्हणाली. दोघांच्या मध्ये पडत गोविंद म्हणाला; "भांडू नका यार. शेषा, गप ना साल्या. चर्चा करण्या अगोदर आपल्याकडे तो श्लोक नको का? संस्कृती तो श्लोक लिहिते आहे. कारण कागद काकांकडे आहे. आणि ते एका परीने योग्य देखील आहे. नाहीतर आपल्याला परत एकदा नैनाचे पाय धरायला लागतील; श्लोक आणि त्याचा अर्थ.... दोन्हीसाठी."

"आयला! मला काय माहीत ही श्लोक लिहिणार आहे ते. मी आपलं सहज बोललो." शेषा गोविंदला डोळा मारत म्हणाला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून संस्कृतीने लिहिण्यास सुरवात केली.

सृष्टी निर्माता नच जरी स्व हा।
तुझी कामना पूर्त विश्वात।
निर्मिती नष्ट दुष्ट प्रकृती करिती।
शोध घे तू मानवात।
सोबत सोबतांची तुजसवे असता।
आयुष्य बदलते सर्वस्व।
नच सोबत अर्थहीन मग।
समजून घे तू विश्वास।
तू नच नर - नरेश तु।
फलप्राप्ती तुज इष्ट।

लिहून झालं आणि गोविंद आणि शेषाला ऐकायला येईल अशा आवाजात संस्कृतीने तो श्लोक वाचला.

"यार, अर्थ पण सांग न." शेषा बोललाच. गोविंदने त्याच्या टपलीत मारली आणि संस्कृतीने पाठीत चापाटी.

"गप रे शेषा. थोडा धीर धर न." संस्कृती हसत म्हणाली. ती हसते आहे हे बघून गोविंदलाच हायसं वाटलं. संस्कृतीने वही समोर ओढली आणि ती अर्थ लिहायला लागली.

सृष्टी निर्माता नच जरी स्व हा।
तुझी कामना पूर्त विश्वात।
हा श्लोक ज्याच्यासाठी आहे तो (स्व) तो जरी सृष्टी निर्माता नाही; तरी तुझी (या स्व ची) (कामना) इच्छा याच विश्वात पूर्ण होईल आणि त्याने इच्छा केलेली निर्मिती होईल.

निर्मिती नष्ट दुष्ट प्रकृती करिती।
शोध घे तू मानवात।
ही निर्माण झालेली निर्मिती दुष्ट प्रवृत्तीचे लोक नष्ट करतील. तू त्यांचा शोध मानवांमध्येच घे.

सोबत सोबतांची तुजसवे असता।
आयुष्य बदलते सर्वस्व।
तुझ्या जवळच्या लोकांची सोबत तुझ्या बरोबर असेल तर तुझे आयुष्य बदलून जाईल.

नच सोबत अर्थहीन मग।
समजून घे तू विश्वास।
पण जर काही कारणाने ही तुझ्या जवळच्या लोकांची सोबत तुला नाही लाभली; तर सगळंच अर्थहीन होईल. त्यामुळे त्यांचा विश्वास तुला कायम समजून घ्यावा लागेल.

तू नच नर - नरेश तु।
फलप्राप्ती तुज इष्ट।
तू केवळ एक नर (सर्वसामान्य माणूस) नाहीस तर नरेश म्हणजे राजा आहेस; हे विसरू नकोस. तू जर हे कायम लक्षात ठेवलेस तर तुला इष्ट ती फलप्राप्ती होईल.

लिहून झालं आणि संस्कृतीने मोठ्याने वाचलं परत एकदा.

"मी बोलू का?" गोविंद म्हणाला. "यार गोविंद परवानगी घेऊन तू कधीपासून बोलायला लागलास रे? बर, चल बोल." शेषा म्हणाला.

"शेषा, जस्सीचे काका म्हणाले होते की तो जो कोणी राजा आहे त्याने काहीतरी निर्माण करायची इच्छा केली. पण निर्मिती दुसऱ्याच कोणीतरी केली. तर ते कोण होते ते समजून घेतलं पाहिजे. पण काकांचं हे म्हणणं थोडं विचित्र नाही का वाटत? अरे यार, कोणत्याही राजाने काहीतरी निर्माण करायचं ठरवलं तर तो स्वतः थोडीच ते तयार करतो? म्हणजे ताज महाल काय शहाजहानने स्वतः थोडीच बांधला? त्याने तो कामगारांकडून बांधून घेतला ना? तसंच या श्लोकातल्या त्या राजाने इच्छा केली आणि ती कामगारांकडून पूर्ण केली... मग त्या नरेषाच्या इच्छेप्रमाणे निर्मिती करणारे ते कोण हे जास्त महत्वाचं आहे; असं काका का म्हणाले?" गोविंदने शंका व्यक्त केली.

त्यावर शेषा गोविंदच्या शंकेने एकदम खुश झाला आणि म्हणाला; "मी बोलू का?"

त्याच्या त्या विधानाने गोविंद आणि संस्कृतीने एकाचवेळी त्याच्याकडे वैतागून बघितलं. "यार नेहेमी चेष्टा नाही करत मी. मी गोविंदची नक्कल नाही करत. मला काहीतरी सुचलंय गोविंदची शंका ऐकून. एका तर खरं." शेषाचा आवाज थोडा गंभीर होता. त्याच्या आवाजातला बदल समजून गोविंद म्हणाला; "बोल." शेषा शांतपणे बोलायला लागला; "गोविंद, मला कळणारं लॉजिक सांगतो... शहाजहानने इच्छा केली आणि काय कामगारांना सांगितलं.... जा रे बांधा माझ्या मनातला ताज? मूर्ख कुठला! अरे, शहाजहानने मनातील इच्छा 'त्याच्या प्रिय पत्नीची आठवण म्हणून काहीतरी भव्य-दिव्य बांधाव;' असं त्याच्या सामंतला बोलून दाखवल असेल. मग सामंताने असं काहीतरी भव्य काय असू शकतं याचा विचार इतर प्रमुख सरदार किंवा विचारवंतांशी केला असेल. सगळ्यांनी मिळून एक दोन ऑप्शन्स ठरवले असतील. मग ते राजाला सांगितले असतील. त्यातली एक कल्पना राजाने पास केली असेल. मग त्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्याचा आराखडा तयार केला करण्यासाठी कोणीतरी आर्किटेक्ट सामंताने शोधला असेल. त्या आर्किटेक्टने तयार केलेलं प्रारूप जर राजाला आवडलं असलं तर मग त्याने त्यावर होणारा खर्च विचारला असेल. तो त्याला पटल्यानंतरच राजाने काम सुरू करायला सुरवात परवानगी दिली असेल. त्यानंतर जागा ठरवणं, लागणारा कच्चा माल आणण, कारागीर; जे मूर्तींचं, मंदिराचं काम करतील ते; आणि कामगार जे मजुरीचं काम करतील असे यांना शोधूलं गेलं असेल. त्यांना एकत्र केल्यानंतर काम सुरू झालं असेल. ज्या आर्किटेक्टला ही संपूर्ण जवाबदारी दिली असेल तो तर कदाचित सामंतला उत्तरदायी नसेलसुद्धा. थेट राजाशीच त्याचं बोलणं होत असेल. त्यामुळे कदाचित सामंताचा राग होत असेल. कदाचित सामंताने स्वतःची माणसं नेमली असतील. सामंत प्रामाणिक आहे राजाशी. पण अचानक आर्किटेक्ट आणि राजा गुप्तपणे भेटायला लागले असल्याने तो पूर्ण गोंधळून गेला आहे. या भेटींचं रूपांतर नक्की कशात होतार याबद्दल तो शशांक आहे. म्हणूनच कदाचित त्याने त्याचा विश्वासू माणूस...." शेषाची बोलताना तंद्री लागली होती.

पण आता गोविंद आणि संस्कृती गोंधळून गेले. सुरवातीला शेषा शहाजहान आणि ताज बद्दल बोलत होता. पण मग त्याची गाडी अचानक राजा-सामंत करत कुठेतरी घसरायला लागली. तो नक्की काय बोलतो आहे; ते दोघांनाही कळेनासं झालं होतं. शेवटी संस्कृतीने शेषाचा हात जोरात हलवला आणि त्याला भानावर आणत म्हणाली; "शेषा.. ए.... अरे काय बोलतो आहेस तू? कोण राजा? तू शहाजहान वरून अचानक कोणत्या राजावर सरकलास?"

"अं... काय?" शेषा तंद्रीतून जागा झाला. पण त्याची नजर हरवून गेली होती. संस्कृतीने त्याला परत एकदा हलवलं. "ए.... शेषा!" "अं?! ओह! काय? काय झालं ग?" संस्कृतीकडे बघत शेषा म्हणाला. त्याच्या नजरेत आता ओळख आली होती.

"तू नक्की काय सांगतो आहेस शेषा?" संस्कृतीने त्याला परत एकदा विचारलं.

"काय सांगत होतो मी?" शेषानेच संस्कृतीला विचारलं.

"शेषा, आपण तिघे इथे आपल्याला मिळालेल्या श्लोकाचा अर्थ वाचायला आणि समजून घ्यायला बसलो आहोत. त्यात गोविंदने एक सरळ साधा प्रश्न विचारला की जस्सीचे काका असं का म्हणाले की निर्मिती कोणी केली ते समजून घेतलं पाहिजे. त्यावर तू ताज महाल आणि शहाजहानचं उदाहरण देत समजावायला लागलास. पण मग तुझी गाडी कुठेतरी वेगळीकडेच घसरली. तू काय म्हणत होतास ते आम्हाला मुळीच कळलं नाही." संस्कृती म्हणाली.

"अं... हो! म्हणजे मी माझं लॉजिक सांगत होतो; पण खरं सांगू का.... मध्ये मला कळलंच नाही की मी काय बोलत होतो. काय बोलत होतो मी?" शेषा म्हणाला.

"साल्या, परत चेष्टा ना?" गोविंद वैतागत म्हणाला.

"नाही यार गोविंद. खरं सांगतो. मला कळलंच नाही तंद्री कशी आणि कधी लागली. काय बोललो ते सांगतोस का?" शेषा म्हणाला. तो खरं बोलतो आहे हे गोविंद आणि संस्कृतीच्या लक्षात आलं. शेषाने टेन्शन घेतलं आहे हे देखील गोविंदच्या लक्षात आलं आणि शेषाच्या खांद्यावर थोपटत तो म्हणाला; "काही नाही रे. शहजहांचा उल्लेख तू राजा म्हणून करत होतास. साला आपल्याला सवय नाही ना असं ऐकायची. म्हणून आम्ही गोंधळलो. बाकी तुझी नेहेमीचीच बडबड चालू होती. म्हणून तर तू चेष्टा करतो आहेस असं वाटलं आम्हाला." शेषाला गोविंदचं म्हणणं फारसं पटलं नाही; पण तो काहीच बोलला नाही. एकदम शांत होत मान खाली घालून बसला तो.

"तर, जस्सीचे काका म्हणाले होते की तो जो कोणी राजा होता त्याने काहीतरी इच्छा धरली होती आणि ती इच्छा पूर्ण करणारे जे कोणी होते ते कोण होते हे समजून घेणं महत्वाचं आहे." संस्कृतीने परत चर्चेची गाडी श्लोक आणि त्याअनुषंगाने आत्तापर्यंत झालेल्या चर्चेपर्यंत आणून ठेवली.

"बरोबर! पण मला वाटतं की या श्लोकामध्ये वापरलेली प्राकृत भाषा कोणत्या भागातली होती हे कळलं की खूप काही सोपं होईल संस्कृती. कारण ही भाषा साधारण पाचव्या शतकातली आहे; हे काकांनी आपल्याला सांगितलं आहे. जर आपल्याला कोणता भाग कळलं तर त्या भागात असणारी ऐतिहासीक वास्तु कोणती ते शोधणं सोपं जाईल आपल्याला; नाही का?" गोविंद म्हणाला.

अचानक शेषाने मान वर केली आणि गोविंदकडे बघत तो म्हणाला; "आज नाही सतत तुझ्या सोबत राहणार मी. मला देखील काही कारणं शोधून काढावी लागतील. योग्य-अयोग्य आणि चूक-बरोबर यातला फरक माझा मला समजून घेणं आवश्यक आहे. येतो मी." तो काय म्हणाला ते संस्कृती आणि गोविंदला कळायच्या अगोदरच शेषा ताडकन उठून निघून गेला. ते दोघेही अवाक होऊन तो गेला त्या दिशेने बघत राहिले.

थोडा वेळ गेला आणि संस्कृती अगोदर भानावर आली. "गोविंद, काहीतरी गडबड आहे रे. शेषा जे काही बोलला आणि असा ताडकन निघून गेला; नाटक नव्हतं ते. आपण निघुया. तू जरा त्याच्या घरी जा आणि तो ठीक आहे न बघ. पण उगाच त्याच्या घरच्यांना काही संशय येणार नाही याची काळजी घे. काय वाटतं तुला?"

"हम्म! You are right. काहीतरी बिनसलं आहे त्याचं. बघतो मी. तू पण निघ. उशीरच झाला आहे तसा. तुला पण हॉस्टेलमध्ये कटकट नको व्हायला." गोविंद म्हणाला. संस्कृती आणि गोविंद बाहेर पडले आणि दोन वेगळ्या दिशांनी निघाले.

"हाय संस्कृती! आत्ता येते आहेस?" संस्कृतीला बघून नैना म्हणाली.

"हो!" सांस्कृतीने उत्तर दिलं. तिला त्याक्षणी तरी नैनाशी काहीही बोलायची इच्छा नव्हती.

"का ग? बरं वाटत नाही का?" कधी नव्हे तो नैनाचा आवाज थोडा ओलावलेला होता असं संस्कृतीला वाटलं. कदाचित एरवी संस्कृतीला असं काही सुचलं नसतं. पण नैनाने तब्बेतीबद्दल विचारलं आणि संस्कृतीने अजून चेहेरा पाडत म्हंटलं; "हो ग. थोडी दगदग झाली. त्या श्लोकाच्या नादात आम्ही धड काही खाल्लं नाही दिवसभर. त्यामुळे आता डोकं दुखतं आहे माझं. गोळी घेऊन झोपेन म्हणते."

"ओह! बरं झोप. खरं तर मी पण दिवसभर त्याच श्लोकात अडकले होते ग." नैना म्हणाली.

तिच्या त्या एका वाक्याने संस्कृतीचे कान टवकारले गेले. "का ग? अजून काही अर्थ लागला का तुला?" तिने नैनाला विचारलं.

"अहं! मी जो अर्थ सांगितला ना तोच आहे. पण...." नैना बोलताना थांबली. तिचा आवाज काहींसा अस्थिर वाटला संस्कृतीला.

"पण काय नैना?" संस्कृतीने अधीर होत विचारलं.

"गोविंद काय म्हणाला ग तो श्लोक आणि त्याचा अर्थ ऐकून?" नैनाने विचारलं.

नैनाच्या प्रश्नमुळे मात्र संस्कृती परत बंद झाली मनातून. "तो काय म्हणणार? ऐकून घेतला अर्थ." तिने शांतपणे उत्तर दिलं.

"काहीच नाही म्हणाला तो?" नैनाने विचारलं.

"नाही. गोविंद काहीच नाही म्हणाला. तो चक्रम शेषा मात्र काहीतरी बरळला." संस्कृती सहज म्हणाली.

"शेषा? तो काय म्हणाला?" नैनाच्या आवाजात पराकोटीची उत्सुकता होती.

संस्कृतीने हसत हसत घडलेला प्रसंग सांगितला.

"सामंतच्या मनात काय होतं ते बोलत होता का शेषा? की त्याला दुसरा अर्थ अभिप्रेत होता?" नैनाने संस्कृतीला विचारलं. तिच्या प्रश्नाने नकळत संस्कृती सावध झाली. संस्कृतीच्या मनात पाल चुकचुकली. शेषा जे काही बोलला होता ते तंद्रीमध्ये काहीतरी होतं असा संस्कृतीचा समज होता. पण नैनाने विचारलेल्या प्रश्नामुळे संस्कृतीच्या मनात आलं... कदाचित शेषाच्या तोंडून नकळत काहीतरी बाहेर पडलं असेल का? खरं तर नैनाला काहीच माहीत नाही. तरीही तिचा प्रश्न तसा थेट आहे.

संस्कृती विचारात पडलेली बघून नैनाने एकदम बोलणं आवरतं घेतलं आणि उठून स्वतःच्या पलंगाकडे जात म्हणाली; "झोप तू संस्कृती. तुला बरं नाही आणि उशीर देखील खूप झाला आहे. उद्या बोलू. good night." आणि संस्कृती अजून काही बोलायच्या आत ती आडवी झाली आणि तिने डोळे मिटून घेतले.

क्रमशः



Friday, February 4, 2022

अनाहत सत्य (भाग 10)

 अनाहत सत्य

भाग 10

"काय अर्थ आहे या श्लोकाचा?" दहाव्यांदा कागदावरचा अर्थ मोठ्याने वाचून परत तो कागद समोरच्या टेबलावर ठेवत वैतागलेल्या गोविंदने म्हंटलं. जस्सी आणि शेषा तर गप्पच होते. त्यादोघांच्या मख्ख चेहेऱ्याकडे बघून गोविंद अजूनच वैतागला. "अबे... माझं तोंड बघायला आला आहात का तुम्ही?" एकदा जस्सीकडे बघून शेषा म्हणाला; "गोविंद, तू विसरतो आहेस; जरी आम्ही इतकं छान मराठी बोलत असलो तरी; आमची पहिली भाषा मराठी नाही. त्यामुळे श्लोक आणि त्याचा अर्थ जरी समोर असला तरी हे सगळं नक्की काय आहे ते आम्हाला सांगता येणं अवघड आहे." शेषाच्या बोलण्यावर जस्सी म्हणाला; "बरं, काही क्लू तरी असायला हवा न." त्याच्या त्या वाक्याने संस्कृतीला हसायला आलं. "जस्सी, हाच क्लू आहे. यातून आपल्याला शोधायचं आहे." तिने असं म्हणताच जस्सीने जीभ चावली आणि हसला.

शेषाने संस्कृतीकडे बघितलं आणि म्हणाला; "संस्कृती, तू हे सगळं अजून सोपं करू शकतेस का?" क्षणभर त्याच्याकडे बघून संस्कृतीने तो कागद पुढे ओढला आणि परत एकदा तो श्लोक ती मनात वाचायला लागली. थोड्या वेळाने समोर बघत तिने म्हंटलं; "हे बघा, मी मला कळतो आहे तो अर्थ काढला आहे; बरोबर असेलच असं नाही. पण बहुतेक हाच अर्थ असावा... एका राजाने मनात काहीतरी इच्छा धरून कोणती तरी निर्मिती या विश्वात कोणाच्यातरी मदतीने केली आहे. त्या निर्मितीची दुष्ट मनाच्या लोकांकडून नष्ट होऊ शकते किंवा होणार आहे किंवा झाली आहे... ते लोक त्या राजाच्या आजूबाजूचेच असावेत. त्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा शोध तू तुझ्या सोबतच्याच लोकांच्या मदतीने घे. म्हणजे तुला जे जवळचे किंवा विश्वासाचे आहेत त्यांच्या मदतीने... असं असेल. तू एक राजा आहेस हे लक्षात ठेवलेस आणि त्याप्रमाणे योग्य वागलास तर त्या दुष्ट लोकांना शोधून तू तुझी निर्मिती वाचवू शकशील."

संस्कृती बोलायची थांबली आणि गोविंदने परत एकदा तो कागद हातात घेतला. त्याने तो श्लोक आणि त्याचा अर्थ परत एकदा वाचला... तो वाचत असताना संस्कृती एकदम काहीतरी आठवल्यासारखं म्हणाली; "गोविंद, नैनाने अर्थ सांगायच्या अगोदर मला एक विचित्र प्रश्न विचारला होता...."

तिने असं म्हणताच तिघेही सावरून बसले. "म्हणजे?" गोविंदने विचारलं.

"म्हणजे नैनाने अगोदर तो श्लोक वाचला. त्यावेळी मी डोळे मिटून त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. तिचा श्लोक वाचून झाला आणि मी तिला आपणहून सांगितलं की हा श्लोक गोविंदला मिळाला आहे...." असं म्हणत संस्कृतीने तिच्या आणि नैनामध्ये झालेलं सगळं बोलणं सांगितलं.

"तुमचं नातं नक्की काय आहे... या प्रश्नाचा अर्थ काय?" शेषाने विचारलं.

"तू अजून तीच आहेस.... असं का म्हणाली ती? संस्कृती तुमची दोघींची ओळख इथलीच आहे न?" गोविंदने विचारलं.

"हो रे. ती नक्की कुठून आली आहे ते देखील मला माहीत नाही." संस्कृती म्हणाली.

"तुझं माझं नातं काय? तू अजून तशीच आहेस... मला या श्लोकाचा अर्थ तू सांगू नयेस... असं सगळं ती नैना का म्हणाली? काहीतरी कारण नक्की आहे यामागे." गोविंद म्हणाला.

सर्वांचं बोलणं शांतपणे एकणाऱ्या जस्सीने अचानक संस्कृतीला विचारलं; "ए, तू नैनाला म्हणालीस असं का म्हणालीस की तुझं अंतर्मन तुला सांगतंय की या श्लोकाचा अर्थ कळल्या नंतर अचानक सगळं बदलून जाणार आहे. एक मन म्हणतं आहे की अर्थ समजून न घेता हे सगळं विसरून जाणं बरं. त्याचवेळी दुसरं मन मात्र त्या अनादी-अनंत आणि अनोळखी भविष्याकडे ओढ घेतं आहे..."

जस्सीच्या प्रश्नाने संस्कृती अंतर्मुख झाली. तिघेही तिच्याकडे बघत होते. पण तिचं लक्ष त्यांच्याकडे नव्हत. तिची अचानक बोलता-बोलता तंद्री लागली होती. त्याच नादात ती म्हणाली; "माहीत नाही मी असं का म्हणाले. पण खरं सांगू? हा श्लोक मला त्याच्याकडे ओढतो देखील आहे आणि त्याचवेळी यासगळ्यापासून लांब जावं असं देखील वाटतं आहे. तुम्हाला खरं सांगू का? मला वाटतंय की आपण सगळेच या एका वेगळ्याच जगातल्या वेगळ्या घटनांशी जोडले गेलो आहोत; या श्लोकामुळे. काहीतरी ईश्वरी संकेत आहे यात."

"ए, गप ग. कसला ईश्वरी संकेत घेऊन बसलीस? यार तुम्ही सगळेच उगीच फार सिरीयस होता आहात. अरे यार.... कुठली गुहा त्यात लिहिलेला हा कुठला तरी श्लोक आणि त्या चक्रम नैनाने सांगितलेला त्याचा अर्थ! सगळं अजब आहे. सोडा यार हे सगळं. चला फक्कड चहा घेऊ आणि हे सगळं विसरून जाऊ." शेषा म्हणाला आणि गोविंद, जस्सी आणि संस्कृती एकदम स्थब्द होऊन त्याच्याकडे बघायला लागले. त्यांच्याकडे बघून शेषा एकदम वरमला. "म्हणजे मला म्हणायचं आहे की आपण उगाच एका काहीही आकलन न होणाऱ्या श्लोकाच्या मागे लागलो आहोत. बरं, क्षणभर धरून चालू की यात खूप मोठा अर्थ आहे आणि आपण सगळे त्याच्याशी जोडले गेलो आहोत... तर मग हा नरेश कोण? कुठला? त्याने काय निर्माण केलं? कुठे? कोणाच्या मदतीने? त्याची वाट कोणी लावली? जर वाट लावणारे त्याच्या जवळचे होते तर मग श्लोकात असं का म्हंटलं आहे की जवळच्या लोकांची सोबत असेल तरच फलप्राप्ती होईल?" एका दमात शेषा बोलला.

"तेच तर शेषा! या सगळ्या प्रशांची उत्तरं आपण शोधावीत असं मला वाटतंय. म्हणजे एकदा असं वाटतंय की शोधावीत आणि एकदा असं वाटतंय की सोडून द्यावं हे सगळं." संस्कृती म्हणाली.

"संस्कृती..." गोविंदने संस्कृतीला हाक मारली. त्याच्या आवाजातला फरक फक्त संस्कृती नाही तर जस्सी आणि शेषाला देखील जाणवला. " मला वाटतंय की त्या नैनाला काहीतरी माहीत आहे किंवा कळलं आहे या श्लोकातून. पण कदाचित तिला ते मला कळू द्यायचं नाही आहे. त्यामुळे ते ती तुला सांगत नाही आहे." काही क्षण विचार केल्यावर संस्कृतीला देखील ते पटलं. "हे खरं आहे की तिला तू आवडत नाहीस; आणि ती ते लपुनही ठेवत नाहीय. याचा अर्थ तिला माहीत असूनही ती आपल्याला काही सांगणार नाही. मग आता काय करायचं?" संस्कृती म्हणाली.

गोविंद म्हणाला; "संस्कृती, हा श्लोक किती जुना जुना आहे; त्याची भाषा किती जुनी आहे आणि त्या भाषेच्या लहीज्याचा वापर कुठल्या प्रांतात केला जात होता हे जर आपण शोधू शकलो तर कदाचित काहीतरी क्लुल शकेल."

गोविंदचं बोलणं सगळ्यांनाच पटलं. "पण मग कसं शोधणार आपण हा श्लोक कोणत्या काळातला आहे?" जस्सीने उत्साहाने विचारलं.

"कोणी पुरातन भाषातज्ञ शोधावे लागतील." संस्कृती म्हणाली.

"अबे ज्यादा लंबा नही जाना होगा।" जस्सी परत एकदा उत्साहाने खुलला. "म्हणजे?" गोविंद, शेषा आणि संस्कृती तिघांनी एकदमच विचारलं.

"अरे निशिगंध स्वामी यादव!" जस्सी हसत हसत म्हणाला.

"अबे जस्सी के बच्चे.... ये कोन स्वामी लाया तू? हा गोविंद गुहेतल्या दगडावर श्लोक शोधतो; ही त्याचा अर्थ एका चक्रम बाईकडून आणते आणि आता तू स्वामीला आणतोस. हे काय चालू आहे मला जरा कळेल का?" शेषा थोडा वैतागत म्हणाला.

"मित्रांनो.... मला काहीतरी सांगायचं आहे." गोविंद एकदम गंभीर आवाजात म्हणाला. "शेषा, हे बघ; तुला जर हे काही पटत नसेल न तर तू जाऊ शकतोस. आता लगेच अपमान करून घेऊ नकोस. माझं हे सांगणं फक्त तुलाच नाही; तर या दोघांना देखील आहे. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो आहे. तो श्लोक बघितल्या पासून मी मनातून अस्वस्थ आहे. या सगळ्याच्या शेवटापर्यंत जोवर मी पोहोचत नाही; तोवर आता मला शांतता मिळणार नाही आहे. त्यामुळे माझं समाधान होईपर्यंत मी शोध घेत राहणार आहे."

"गोविंद, मला देखील हे सगळं समजून घेण्याची खूप इच्छा आहे. तुझ्याप्रमाणे माझं मन देखील सतत या श्लोकाकडे ओढ घेतं आहे. I am in!" संस्कृती म्हणाली.

फार वेळ न दवडता जस्सी म्हणाला; "हम तो तय्यार है भाई। काहीतरी नवीन आहे. Exciting आहे... आणि सध्या दुसरं करण्यासारखं काही नाही आहे. त्यामुळे मी पण आहे तुमच्या बरोबर."

"फालतू लोक आहात तुम्ही. तुम्हाला सोडून मी कुठे जाणार आहे का? हे सगळं म्हणजे मूर्खपणा आहे...." शेषाने असं म्हणताच तिघेही उसळले. पण त्यांना काहीही बोलू न देताच तो हसत म्हणाला; "पण मी आता असं काहीही म्हणणार नाही आहे. तुम्ही जे काही कराल त्यात मी आहे. आपली मदत झाली तर ठीक; नाहीतर एन्जॉय करणार आपण! बरं, बोला महाराज जगदीश यादव कोण हे स्वामी काढलेत?"

जस्सीला त्याच्या संपूर्ण नावाने हाक मारलेलं आवडत नसे. हे गोविंद आणि शेषाला चांगलं माहीत होतं. तरीही जस्सिची कळ काढण्यासाठी शेषाने त्याचं पूर्ण नाव घेतलं आहे हे गोविंदला लक्षात आलं. त्यामुळे एकदा शेषाकडे वैतागलेली नजर टाकून तो जस्सीला म्हणाला; "लक्ष देऊ नको यार जस्सी त्याच्याकडे. मुद्दाम करतो आहे तो. तू बोल."

खरं तर जस्सीला देखील राग आला होता. पण तरीही शेषाकडे दुर्लक्ष करून तो बोलायला लागला; "निशिगंधस्वामी यादव म्हणजे कोणी स्वामी-बुवा नाहीत. त्यांचं नावच निशिगंधस्वामी आहे. ते पुरातन ते अर्वाचीन म्हणजे नवीन सगळ्याच भाषांचे अभ्यासक आहेत. वाराणसीमध्ये त्यांचा गुरुकुल आहे. ते आपल्याला या श्लोकातील भाषेबद्दल सांगू शकतात."

"जस्सी, यार, शेषा सरळ सरळ चेष्टा करतो आहे. तू काय गोल फिरून करतो आहेस का? एक तर ते जर इतके मोठे गुरुकुल चालवतात तर ते आपल्या या श्लोकाबद्दल आपल्याला माहिती का सांगतील हा पहिला प्रश्न. आणि जर समजा त्यांना आपण विचारायचं ठरवलं तर काय वाराणसीला जायचं का आपण?" गोविंदने विचारलं.

"यार गोविंद, मला काहीतरी कळतं न? अरे, निशिगंधस्वामी यादव माझे काका आहेत." जस्सी म्हणाला आणि गोविंद, शेषा आणि संस्कृती तिघेही धक्का बसून एकदमच ओरडले... "काय? जस्सी?! तू?"

त्यांना जास्त काही बोलू न देता जस्सी बोलायला लागला; "हो! मी वयाच्या सोळा वर्षापर्यंत गुरुकुलात राहून अभ्यास केला. माझे बाबा गणितज्ञ. त्यांची इच्छा होती की मी देखील माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आणि इतर चुलत भावंडांप्रमाणे शिक्षणात लक्ष घालावं. पण माझं मन त्या पुस्तकांमध्ये रमलं नाही. मला नेहेमीच आजूबाजूच्या निसर्गात राहायला आवडायचं. सतत आखाड्यात वर्जिश करायचो. माझ्या बाबांना ते पटायचं नाही. मी यावरून त्यांचा अनेकदा मार खाल्ला आहे. माझ्या काकांना समजत होती माझी कुचंबणा. शेवटी माझे काका निशिगंधस्वामी मध्ये पडले आणि त्यांनी बाबांना समजावलं की मला पुस्तकी शिक्षणात रस नाही तर मग माझ्यावर जबरदस्ती करण्यात अर्थ नाही. त्यांनी बाबांना सांगितलं; जस्सीला हवं ते करू दे. जबरदस्ती करून कदाचित तो इथे राहील आणि आपल्या इतर पोरांप्रमाणे इथे शिक्षक देखील होईल. पण तो चांगला शिक्षक होणार नाही; कारण मुळात त्याला याची आवड नाही. बाबांना ते पटलं; त्यांनी मला वाराणासीमधून बाहेर पडायची परवानगी दिली. मी खुशीने बाहेर पडलो. निघताना काकांना भेटायला गेलो त्यावेळी त्यांनी मला सांगितलं; आयुष्यात कोणतीही नशा करायची नाही आणि आपलं मूळ विसरायचं नाही. कधीही अडचण आली तर मोकळेपणी आपल्या घराकडे वळायचं. त्यानंतर मी इथे आलो; आणि निघाल्यापासून आजपर्यंत काकांशी माझा रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे."

"अरे वा जस्सी. तू तर एकदम छुपारुस्तुम निघालास रे. जबरदस्त आहे की तुझा इतिहास." संस्कृती हसत म्हणाली.

"ते सगळं ठीक. पण तुझ्या काकांना भेटायला जायला लागेल न. ते कसं जमवायचं?" गोविंदने विचारलं.

"यार, आपलं नशीब जोरदार आहे. पौराणिक भाषा आणि त्याचं विश्लेषण याविषयावर बोलण्यासाठी ते सध्या इथे आले आहेत. आत्ता घरीच असतील. चला आत्ताच जाऊया घरी." जस्सी म्हणाला आणि चौघेही उत्साहाने निघाले.

जस्सीने घरी पोहोचताच त्याच्या काकांना गोविंद, शेषा आणि संस्कृतीची ओळख करून दिली आणि त्यांच्या येण्याचं कारण देखील सांगितलं.

"अरे वा! एकदम इंटरेस्टिंग आहे तुमचा सगळाच अनुभव." निशिगंधस्वामी म्हणाले. "बघू बरं तो श्लोक. आणि मला तो गोविंदने काढलेला फोटो देखील दाखवा हं." वेळ न दवडता ते म्हणाले. संस्कृतीने श्लोक लिहिलेला कागद आणि फोटो दोन्ही त्यांच्या हातात दिलं. निशिगंधस्वामी तो फोटो बराचवेळ बघत होते. मग त्यांनी श्लोक लिहिलेला कागद हातात घेतला.

"या श्लोकाचा अर्थ कोणी लिहिला आहे इथे?" त्यांनी वर बघत प्रश्न केला.

"माझी एक मैत्रीण आहे होस्टेलमध्ये. ती पी. एचडी. करते आहे. तिने लिहून दिला तो अर्थ. चुकला आहे का?" संस्कृतीने विचारलं.

"नाही नाही. उलट अगदी बरोबर लिहिला आहे अर्थ. म्हणून तर आश्चर्य वाटलं मला. खरं तर ही भाषा समजायला तशी अवघड. कारण या भाषेला व्याकरण असं नाही." निशिगंधस्वामी म्हणाले.

"म्हणजे?" गोविंदने विचारलं.

"म्हणजे असं या भाषेला प्राकृत भाषा म्हणतात. प्राकृत हा शब्द प्रकृतीवरून आला. प्राकृत म्हणजे जे नैसर्गिक आहे ते. प्राकृत म्हणजे जनसामान्यांची भाषा. या भाषेचा उगम लक्षात घेता तिचे व्याकरण फार समग्र नव्हते. संस्कृतच्या मानाने प्राकृत भाषेतली व्यंजने, व्याकरण हे मर्यादित होतं. बऱ्याच जुन्या संस्कृत नाटकांमध्ये उच्चभ्रू लोकांची भाषा संस्कृत, तर इतर लोकांची भाषा प्राकृत दिसते; त्याचं तात्कालिक कारण देखील प्राकृत भाषेतील व्याकरणातील कमजोरी हे असावं. लेखी आणि कामकाजाच्या भाषेसाठी प्राकृताचा वापर न होता संस्कृत वापरली जात असावी; ते याचमुळे.

इ.स.पूर्व ६व्या शतकात प्राकृत भाषा बोलली गेल्याचे पुरावे आढळतात. तर सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत लेखी प्राकृताचे पुरावे मिळालेले आहेत. प्राचीन व मध्ययुगीन भारतात सुमारे ३८ प्राकृत भाषा बोलल्या जात, असे सांगितले जाते. असे असले तरी तत्कालीन समाजव्यवस्थेमुळे या भाषांना मातृभाषेचा किंवा राज्यभाषेचा दर्जा प्राप्त नव्हता.

प्राकृत भाषेचे प्रमुख प्रकार असे:

वेदकालीन प्राकृत- प्राथमिक अवस्था.
मध्ययुगीन प्राकृत - पाली, महाराष्ट्री, शौरसेनी इत्यादी
महाराष्ट्री- शौरसेनी सारख्या भाषांची अपभ्रंश भाषा

वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश भाषेच्या स्वरूपावरुन प्रत्येक भाषेतील काही वैशिष्ट्ये मराठी भाषेत दिसतात. त्यामुळे मराठी ही वेदपूर्वकालीन भाषेपासून, संस्कृतपासून, पालीपासून, प्राकृत भाषेपासून, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश भाषेपासून तयार झाली असावी असं मानलं जातं.

काही प्राकृत भाषा याप्रमाणे - मागधी, शौरसेनी, पैशाची, महाराष्ट्री भाषा, अर्धमागधी भाषा, अपभ्रंश भाषा, पाली इत्यादी. यापैकी महाराष्ट्री भाषा ही भाषा सातवाहन राज्यकाळातील प्रमुख भाषा गणली जाते. या भाषेत साहित्य लिहिले गेल्याचे पुरावे मिळतात. ख्रिस्तपूर्व काळातील प्राकृत शिलालेखही सापडले आहेत, सातवाहन राजा हलाने प्राकृत कवितांचे संकलन केल्याचे उल्लेख मिळतात. मराठी हे महाराष्ट्री भाषेचे सुधारित रूप आहे.

बरं, हे सगळं झालं प्राकृत भाषेविषयी. यातलं तुमच्यासाठी महत्वाचं म्हणजे या श्लोकामध्ये वापरलेली भाषा. या भाषेचा वापर साधारण इसवीसनाच्या सहाव्या शतकात केला होता. इथे जो अर्थ लिहिला आहे तो देखील बरोबर आहे... पण तुम्ही जो अर्थ काढता आहात तो थोडा चुकतो आहे. बघा श्लोक काय आहे....

सृष्टी निर्माता नच जरी स्व हा।
तुझी कामना पूर्त विश्वात।

म्हणजे;

हा श्लोक ज्याच्यासाठी आहे तो (स्व) तो जरी सृष्टी निर्माता नाही; तरी तुझी (या स्व ची) (कामना) इच्छा याच विश्वात पूर्ण होईल आणि त्याने इच्छा केलेली निर्मिती होईल.

याचा अर्थ; त्या 'स्व' ची काहीतरी निर्मिती करण्याची इच्छा आहे आणि ती कोणीतरी पूर्ण करतं आहे. पण पुढच्या संपूर्ण श्लोकामध्ये त्या इच्छा पूर्ण करणाऱ्यांचा उल्लेख नाही. त्या नरेशाला त्याच्या आप्तांकडून धोका झाला आहे; आणि तरीही त्याने त्याच्या जवळच्यांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. सगळं बरोबर आहे... पण त्या नारेषाच्या इच्छेप्रमाणे निर्मिती करणारे ते कोण हे जास्त महत्वाचं आहे."

काका बोलायचे थांबले आणि मंत्रमुग्ध होऊन त्यांचं ओघवतं बोलणं ऐकणारे गोविंद, संस्कृती, शेषा आणि जस्सी एकदम भानावर आले.

"काय रे पोरांनो, झोपलात का?" काका हसत म्हणाले.

"नाही नाही काका. किती छान माहिती दिलीत तुम्ही. ही प्राकृत भाषा आहे सहाव्या शतकातली आहे... पण नक्की कुठली. म्हणजे कोणत्या भागातली ते कसं कळेल?" गोविंदने विचारलं.

"बेटा, थोडं अवघड आहे. पण नक्की सांगेन. मी आजच वाराणसीला जायला निघतो आहे. रात्री पोहोचेन. ही भाषा माहाराष्ट्रातली नक्की! मात्र कुठल्या भागातली याचा माझ्याकडच्या पुस्तकांमध्ये बघून अभ्यास करतो आणि जस्सीला उद्यापर्यंत कळवतो. ठीक?" काका म्हणाले.

"हो चालेल न." गोविंद म्हणाला.

"बरं, मुलांनो... आता फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. का शोधता आहात तुम्ही हे सगळं?" काकांनी गंभीर होत विचारलं.

"माहीत नाही काका. पण हा श्लोक वाचल्यापासून आम्ही... विषेशतः मी आणि गोविंद खूप अस्वस्थ आहोत. त्यामुळे जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत शोध घ्यायचा असं आम्ही ठरवलं आहे." संस्कृतीने उत्तर दिलं.

"ठीक! All the best. मी माझ्याकडून होईल ती मदत करतोच आहे. अजून काही लागलं तर निःसंकोचपणे विचारा. पण ते पुढे. चला; मला निघायला हवं. माझ्या फ्लाईटची वेळ झाली." असं म्हणून काका उठले.

जस्सीच्या घरून बाहेर पडताना गोविंद, संस्कृती आणि शेषाच्या चेहेऱ्यावर एक समाधान होतं.

क्रमशः