Friday, August 26, 2022

वासंतीचं स्वप्न (भाग 1)

 वासंतीचं स्वप्न

भाग 1


वासंतीचं स्वप्न

वासंतीचा जन्म तिच्या आई-वडिलांच्या उतार वयातला. खरंतर अनावधानाने दिवस राहिले होते तिच्या आईला. त्यामुळे तिचा मोठा भाऊ तिच्याहून तसा बराच मोठा होता. वासंती जेमतेम सात आठ वर्षाची असतानाच तिच्या भावाचं लग्न झालं होतं. त्याच वेळी वडील रिटायर्ड झाले होते. वासंतीच्या आईने घरामागे हौसेने अनेक आंब्याची आणि नारळी पोफळीची कलमं अनेक वर्षे झटून लावली होती. आता वासंतीचे वडील त्या झाडांना येणारी फळं विकण्याचा व्यवसाय करायला लागले होते. त्यांचा प्रामाणिकपणा माहीत असल्याने आजूबाजूच्या अनेक लोकांनी त्यांची फळं देखील वासंतीच्या वडिलांवर सोपवायला सुरवात केली होती. त्यामुळे येणारी पेन्शन आणि हे उत्पन्न यात त्यांचं बरं चालत होतं. वासंतीचा भाऊ तसा आळशी होता. पण लग्न झाल्यानंतर बायकोच्या कटकटीमुळे त्याने घराच्या पुढच्या भागात एक जनरल स्टोर चालू केलं होतं. त्यातून येणार उत्पन्न मात्र तो घरात देत नव्हता. वासंती बारा वर्षांची असताना तिच्या भावाला पहिला मुलगा झाला आणि ती सोळा वर्षांची असताना दुसरा.

वासंती हुशार होती. शाळेत नेहेमी पहिला नंबर असायचा. तिला खूप शिकायचं होतं. खरं तर वासंतीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती आता इतकी नव्हती की ते तिला खूप काही शिकवू शकतील. पण वासंतीची आवड लक्षात घेऊन; त्यांनी तिला बारावी पर्यंत शिकवलं. बारावीनंतर कॉम्प्युटरचा एक कोर्स देखील तिने केला. त्यानंतर मात्र तिचं शिक्षण थांबलं; कारण तिचे दोन्ही भाचे शाळेत जायला लागले होते. वासंतीचे वडील त्यांना जमेल तसे पैसे त्यांच्या नातवंडांच्या शिक्षणासाठी देत होते. त्यामुळे वासंतीचं पुढचं शिक्षण आता त्यांना परवडणार नव्हतं.

वासंतीला लहानपणापासून वाचनाची आवड होती. मग तिने ती आवड जोपासायला सुरवात केली. गावामध्ये एक खूप चांगलं ग्रंथालय होतं; त्याचा वासंतीने पुरेपूर उपयोग केला. केवळ मराठी पुस्तकं, कादंबऱ्या, कथा एवढेच नाही; तर इंग्रजी मधल्या अनेक चांगल्या पुस्तकांचा तिने अक्षरशः फरशा पडला होता. तिची वाचनाची आवड बघून वाचनालय सांभाळणाऱ्या काकांनी मुद्दाम वेगवेगळ्या ठिकाणहून पुस्तकं मागवून वासंतीला वाचायला देण्याचा सपाटाच लावला होता. आता वासंतीचे दिवस छान जात होते. रोज सकाळी उठून आईला मदत करायची आणि नंतर ग्रंथालयात जाऊन बसायचं असा तिचा दिनक्रम झाला होता.

वासंती 19 वर्षाची झाली आणि तिच्या भावाने आणि वहिनीने तिच्या लग्नाचा घाट घातला. वासंतीच्या वहिनीच्या माहेरच्या गावातल्या एका सधन कुटुंबामध्ये वासंतीचं लग्न ठरवण्यात आलं. खरंतर वासंतीची एवढ्यात लग्न करायची इच्छा नव्हती; पण तिचं स्वतःचं मत कोणीच विचारलं नाही. वासंतीचे आई-वडीलही तसे वृद्ध झाले होते; त्यामुळे त्यांनी देखील काही बोलण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या मुलाने ऐकलं नाही. बरं नाही म्हणावं; तर मुलांमध्ये वाईट काहीच नव्हतं. उत्तम इंजीनियरिंग शिकलेला होता. मुंबईला नोकरी होती. एक धाकटा भाऊ होता. तो देखील चांगला हुशार होता. गावाला त्यांचं छान घर होतं, शेती होती. मुलांचे वडील दोन वर्षांपूर्वी गेले होते. त्यामुळे वासंतीच्या आई-वडिलांना देखील वाटलं की आपल्या डोळ्यासमोर वासंतीचं लग्न करून द्यावं.

पण तिचं लग्न ठरलं आणि तीनच महिन्यात दुर्दैवाने एका लहानशा आजाराचं कारण होऊन तिचे वडील वारले. वडिलांच्या मृत्यूनंतर एका वर्षाच्या आत लग्न झालंच पाहिजे; असा आग्रह गुरुजींनी धरला त्यामुळे वासंतीची कुठलीही मतं विचारात न घेता तिचं लग्न करून दिलं गेलं. लग्न होऊन वासंती सासरी आली आणि दुसऱ्या दिवशीच्या सत्यनारायणाच्या पूजेनंतर तिचा नवरा सचिन लगेच मुंबईला निघून गेला. जाताना घराची सोय झाली की वासंतीला घेऊन जातो; असं तो म्हणाला. बिचारी वासंती पूर्ण गोंधळून गेली होती.

सचिन गेल्यानंतर वासंतीने स्वतःला घर कामामध्ये पूर्ण अडकवून घेतलं. फावल्या वेळात मात्र वासंती खूप खूप वाचायची. या नवीन गावात देखील ग्रंथालय होतच. तिची वाचनाची आवड लक्षात घेऊन तिचा दीर देखील तिला खूप पुस्तकं आणून द्यायला लागला. हळूहळू वासंती त्या घरात रुळायला लागली. तिची तिच्या दिराशी छान मैत्री देखील झाली. दोघे बसून अनेक विषयांवर बोलायचे. कधी कधी तर त्यांचे वाद देखील व्हायचे. वासंतीला ग्रंथालयामध्ये एक मैत्रीण भेटली होती. अनघा! अनघा तिच्यासारखीच लग्न होऊन इथे आली होती. अनघाचा नवरा गावाच काम करायचा. खरं तर अनघाला वाचनाची फारशी आवड नव्हती. पण घरातून बाहेर पडायचं हे कारण मस्त होतं; त्यामुळे ती अगदी रोज येऊन बसायची तिथे. तशीच मैत्री झाली होती वासंती आणि अनघाची. वासंतीची सासू देखील तशी चांगली होती. वासंती एरवी घरातली सगळी कामं मन लावून करायची. त्यामुळे त्यांची तिच्याबद्दल काहीच तक्रार नव्हती. त्या फारशा शिकलेल्या नसल्याने त्यांना वासंतीच्या वाचनाच्या नादाचं कौतुक होतं.

सचिन अधून मधून एखाद दिवसासाठी यायचा; पण लगेच मुंबईला निघून जायचा. तो आला की मात्र वासंतीने दुसरं काही केलेलं तिच्या सासूला चालत नसे. नवरा असला की बायकोने त्याच्या मर्जीनुसार वागावं हे त्या तिला सतत सांगत असत. वासंतीला सचिनचं हे कधीतरीच येणं आणि मग तिने सतत त्याची सेवा करणं काहीसं पटत नव्हतं; पण तिचं हे दुःख कुणाकडे सांगावं हे तिला कळत नव्हतं.

आई-वडिलांच्या आग्रहावरून एकदा सचिन तिला घेऊन मुंबईला गेला होता. सचिन अजून दोन मुलांसोबत एका फ्लॅटमध्ये राहात होता. तिथे गेल्यावर त्या सड्या मुलांनी घराची जी परिस्थिती केली होती ती बघून वासंतीला हसायलाच आलं. सगळे ऑफिसला गेल्यावर तिने घर छान आवरून ठेवलं आणि स्वतः खाली उतरून जाऊन सामान आणून त्यांच्यासाठी छान स्वयंपाक देखील केला. सचिन संध्याकाळी आला आणि घराचं बदललेलं रूप बघून खुष झाला. चविष्ट जेवण बघून त्याचे मित्र देखील खुश झाले. जेवण झाल्यावर वासंती स्वयंपाक घरात आवराआवर करत होती त्यावेळी सचिनच्या एका मित्राने त्याला म्हंटलं; "यार सचिन, वहिनीला इथेच घेऊन ये रे. बघ न एका दिवसात आपण उकिरड्यावरून घरात राहायला आल्यासारखं वाटतं आहे." वासंती आतून ते ऐकत होती. तिला सचिनच्या मित्राचं बोलणं ऐकून हसू आलं. इतक्यात सचिनचा आवाज तिला ऐकायला आला. काहीशा मोठ्या आवाजात सचिन म्हणाला; "साल्या माझी बायको आहे ती. मोलकरीण नाही. तिला मुंबईत आणीन तर माझं घर घेतलं की. तुला वाटतंय की ती छान जेवण बनवते; पण मला माहित आहे की ती त्याहूनही चांगलं खूप काही करू शकते." सचिनचं बोलणं आतून ऐकणाऱ्या वासंतीच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं.

वासंतीचा पहिला सण आला आणि आईच्या आग्रहावरून तिचा भाऊ तिला घ्यायला आला. वासंती खूप खुश झाली आणि आनंदाने दोन दिवसासाठी माहेरी गेली. रात्र झाली; सगळं काही आवरून सगळे झोपायला गेले. वासंती तिच्या आईजवळ आडवी झाली.

वासंतीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत तिच्या आईने तिला विचारलं; "कसं चालू आहे बेटा?"

आईच्या त्या एका प्रश्नाने वासंतीचा बांध फुटला ती मुसमुसून रडायला लागली. आईला कळेना अचानक वासंतीला रडायला काय झालं. उठून बसत वासंतीचे डोकं तिने मांडीत घेतलं आणि तिचे डोळे पुसून तिला विचारलं; "बेटा काय झालं काही त्रास होतो आहे का? सचिन चांगलं नाही का? सासू बरोबर काही भांडण होतं का?" आईच्या प्रत्येक प्रश्नाला वासंती नाही नाही म्हणून मान हलवत होती. आईला कळेना असं काय झालं आहे की वासंती रडते आहे; पण बोलत नाही. पण मग तिला थोडं मोकळं होऊ दिलं आईने. रडण्याचा भर ओसरला आणि वासंती उठून बसली.

"आई, कसं सांगू ग? दुःख काहीच नाही. सगळे चांगले आहेत तिथे. पण तरीही मला सतत वाटत राहात की आयुष्याला काहीच अर्थ राहिला नाही आहे." वासंती म्हणाली.

तिच्या आईला वासंतीचं म्हणणं कळत नव्हतं.

"तुला नक्की काय म्हणायचं आहे बेटा? मला कळेल असं सांगशील का?" आई म्हणाली.

"आई.... सचिनने मला प्रॉमिस केलं आहे की मुंबईमध्ये घर मिळालं की लगेच तो मला नेईल. आई, अग आपल्याला वाटतं तितकं मुंबईमध्ये घर मिळणं सोपं नसतं. एकदा जाऊन आले मी सचिन सोबत. पण आत्ता तो त्याच्या दोन मित्रांसोबत राहातो. तिथे तर मी राहू शकत नाही; त्यामुळे एकाच दिवसात मी परत आले." वासंती म्हणाली.

"होतं ग असं पोरी." तिला थोपटत तिची आई म्हणाली.

"अग पण माझी याबद्दल तक्रारच नाही." वासंती म्हणाली.

"मग? सासुशी पटत नाही का? सासरे कसे आहेत? तुझा तो दिर??? तुला काही वावग वाटलं का वासंती? तसं असेल तर मोकळेपणी सांग मला." तिची आई काळजी भरल्या आवाजात म्हणाली.

"नाही ग आई. तसं काहीच नाही. सगळेच चांगले आहेत. म्हंटलं न मी." वासंती आता पूर्ण सावरली होती.

"अग पण मग आत्ता अशी रडायला का लागलीस?" आई आता पूर्ण गोंधळून गेली होती.

वासंती आईच्या डोळ्यात बघत म्हणाली; "सगळं चांगलं असूनही आई.... मला समाधानी वाटत नाही ग."

"पोरी, बाईचा जन्मच असा असतो ग. आपल्याला काय हवं आहे हे महत्वाचं नसतं हे लक्षात ठेव. आपला नवरा आणि त्याच्या घरचे यांच्या डोळ्यातलं समाधान; आपलं समाधान असतं." आई वासंतीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

"पण नवऱ्याला आणि त्याच्या घरच्यांना आनंदी ठेऊनही मी मला हवं ते करू शकते न आई." वासंतीने आईच्या कुशीत शिरत विचारलं.

आईने एक हलकासा उसासा सोडला आणि वासंतीला थोपटत म्हणाली; "हो बाळा. करू शकतेस न. फक्त ही तारेवारची कसरत सगळ्यांना जमतेच असं नाही ग" वासंतीने मान वर करून आईकडे बघितलं आणि विचारलं; "मी प्रयत्न करू? तू राहाशील सोबत?"

वासंतीला कुशीतून थोडं दूर करत तिच्या आईने तिच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाली; "वासंती, काही लढाया आपल्या आपण लढायच्या असतात. मी तुझ्या सोबत राहीन असं म्हंटलं तरी बेटा तू तिथे तुझ्या सासरी आणि मी इथे. त्यात आता तुझे बाबा नाहीत. लेकाच्या सोबत त्याची आश्रित म्हणून राहाते आहे; हे तुला माहीत नाही का?"

आईचं बोलणं ऐकून वासंती उठून बसली. आपलं दुःख बाजूला ठेवत ती आईला म्हणाली; "पण आई हे घर तुझं आहे.... मागची लहानशी बाग तू वाढवली आहेस. त्यातून जे उत्पन्न येतं त्यात तुझं भागूच शकतं न. मग तू कशी ग आश्रित?"

"तेच तर सांगते आहे बेटा, ही तारेवरची कसरत असते. सगळ्यांना जमतेच असं नाही; आणि न जमणाऱ्या समाजातली मी एक आहे ग." तिची आई दुसऱ्या कुशीवर वळत म्हणाली.

"पण आई...." वासंतीने बोलायचा प्रयत्न केला. पण तिच्या आईने डोळ्यावर पदर ओढून घेतला आणि म्हणाली; "झोप वासंती; उद्या तुझा दादा तुला सोडून येणार आहे. उठायला उशीर नको व्हायला."

वासंतीचे डोळे भरून आले. आडवी होत तिने डोळे मिटले.

वासंती दुसऱ्या दिवशी परत तिच्या सासरी आली. आईने दिलेली साडी ती सासूबाईंना दाखवत होती. लाल रंगाची जरीबुट्टीच्या साडीचं सासूबाई कौतुक करत होत्या. इतक्यात वासंतीचा दिर धावत आला.

"आई......... आई...... सचिन दादा..... आई...." नंदन हमसून हमसून रडत होता.

वासंती आणि तिची सासू काही न कळून उभ्या होत्या. वासंतीच्या सासूने नंदनला बसवलं; वासंती आतून त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. आईने दिलेली लाल साडी अजूनही तिच्या खांद्यावर होती. तिच्याकडे बघून नंदन परत रडायला लागला.

"वहिनी....." काय बोलावं नंदनला सुचत नव्हतं.

"नंदन असं काय झालं आहे? का रडतो आहेस तू इतका? प्लीज काय ते सांग. माझा आणि आईंचा जीव आता टांगणीला लागला आहे." त्याच्या जवळ बसत त्याच्या हातावर हात ठेवत वासंती म्हणाली.

तिचा हात हातात घेत नंदन म्हणाला; "वहिनी, सचिन दादाचा अकॅसिडेंट झाला आहे. तो...." नंदन जे बोलला ते ऐकून वासंती एकदम दचकली आणि मागे सरली. मात्र तिच्या सासूने मोठ्याने एक हंबरडा फोडला आणि ती ओक्साबोक्शी रडायला लागली. वासंतीने तिच्याकडे एकदा बघितलं आणि परत नंदनकडे बघितलं.

क्रमशः

Friday, August 19, 2022

सँडविच पिढी

 हो! सँडविच झालेली पिढी आज भारताच्या प्रत्येक घरात आहे. मला नक्की काय म्हणायचं आहे ते उदाहरणासाहित देते.


समजा :

एका मुलीचं साधारण एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाकडे लग्न झालं. नवरा उत्तम कंपनीत चांगल्या पगारावर होता. त्याच्या आई-वडिलांचा 2BHK फ्लॅट होता. एकुलता एक असल्याने तो फ्लॅट पुढे त्यांनाच मिळणार होता. वेगळं राहण्याचा प्रश्नच नव्हता. पुढच्या चार वर्षात तिला त्या काळच्या पद्धती प्रमाणे दोन मुलं झाली. मोठी मुलगी आणि धाकटा मुलगा. म्हणजे साधारण पंचविशीत ती दोन मुलांची आई; सासू-सासरे, नवरा आणि सण-समारंभ सांभाळत नोकरी करत होती. तिच्या आई-वडिलांनी तिला चांगलं शिक्षण दिलं होतं. चांगली ग्रॅज्युएट होती आणि मग कंपनी सेक्रेटरीचं शिक्षण देखील घेतलं होतं. त्यामुळे नोकरी अगदी उत्तम होती.

साधारण 1998 च्या सुमारास पेजर आला. आठवतं तुम्हाला? कोणीही कुठूनही स्वतःचा नंबर आणि नाव पाठवू शकत होतं त्या पेजरवर किंवा थोडा महाग घेतला तर चार ओळींचा मेसेज पाठवणं शक्य होतं. तिच्या नवऱ्याने स्वतःसाठी पेजर घेतला. एव्हाना घरचा कर्ता पुरुष झाला होता तो. आई-वडील रिटायर्ड होते. मुलं लहान होती. त्यामुळे जर काही धावपळ करायची वेळ आली तर त्याला कळवण सोपं जावं म्हणून केलेली सोय.

एक दिवस संध्याकाळी तिला तिच्या घरून फोन आला. तिचे सासरे अचानक कोलप्स झाले होते; मुलांनी फोन केला होता. तिने घाई घाईने नवऱ्याला पेजरवर मेसेज टाकला, हॉस्पिटल ला फोन करून ॲम्बुलन्स घरी पाठवली आणि घरी पोहोचली. ती घरी पोहोचली तोपर्यंत ॲम्बुलन्स देखील आली होती. तिने सासऱ्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं; घरी येऊन मुलांची आणि सासूबाईंच्या जेवणाची सोय केली आणि परत हॉस्पिटलमध्ये गेली. रात्री उशिरा तिचा नवरा हॉस्पिटलमध्ये आला. त्याने पेजर वरचा मेसेज उशिरा बघितला होता त्यामुळे त्याला घरी यायला उशीर झाला असं त्याने सांगितलं. दुर्दैवाने त्या आजारामध्ये तिचे सासरे निवडले सासु सोबत सांभाळून घेत मुलांना मोठं करण्याच्या रेसमध्ये तिने धावायला सुरुवात केली. मुलं मोठी होत होती; त्याच वेळेला तिची ऑफिसमधली जबाबदारी देखील वाढत होती. नवऱ्याचं देखील खूप चांगली प्रगती होत होती. आर्थिक परिस्थिती कौतुकास्पद परिस्थितीने वाढत होती.

मात्र वाढत्या वयातली मुले आणि जुन्या विचारांची सासू या मधला बॅलेन्स सांभाळणं तिला हळूहळू खूप अवघड व्हायला लागलं होतं. उच्च शिक्षणासाठी मुलांना वेगवेगळ्या क्लासला जावं लागत होतो त्यामुळे हळूहळू त्यांचं घरी येण्याची वेळ नक्की राहिली नाही मुले खूप उशिरा घरी यायची यावरून तिची सासू नाराज राहायची. कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी तिच्या सासूला ते पटत नव्हतं सासू आणि मुलांमध्ये वाद होऊ नये; म्हणून ती सतत मुलांची बाजू घेऊन सासूला समजावायची आणि सासूची बाजू मुलांना सांगायचा प्रयत्न करायची. अनेकदा तिने तिच्या नवऱ्याला या विषयांमध्ये लक्ष घालायला सांगितलं पण अशा लहान विषयांमध्ये उगाच फार विचार करायची गरज नाही असाच तो नेहमी म्हणत राहिला.

तिची नोकरी देखील सुरूच होती. मुलं शिकली आणि उत्तम नोकरीला लागली. मुलाचं लग्न झाल; तो वेगळा राहिला. मुलीचे देखील नंतर लग्न झालं; ती देखील तिच्या संसारात सुखाने राहायला लागली. तिची सासू आता खूपच वृद्ध झाली होती. त्यामुळे सासूची सेवा करणं आणि नोकरी मधील जबाबदारी पूर्ण करणं ह्यातच तिचे दिवस संपत होते. अलीकडे कधीतरी तिला वाटायचं की थोडं तरी रिलॅक्स व्हावं; कुठेतरी फिरून यावं. मोबाईलच्या आगमनामुळे जुन्या मित्र-मैत्रिणींशी निर्माण झालेले कॉन्टॅक्टस वाढवावेत. पण अजूनही तिची जबाबदारी संपलीच नव्हती. त्यामुळे इच्छा असूनही तिला तिची स्वप्न बाजूला ठेवायला लागली.

कधीतरी तिचा नवरा रिटायर झाला आणि वर्षा दोन वर्षात तिलाही उत्तम पोस्ट वरून रिटायरमेंट मिळाली. मधल्या काळात वृद्ध सासु देखील निवर्तली होती. आता खरं म्हणजे दोघंच जण आनंदाने राहणार असं होतं. तिने नवऱ्याला खूप सांगायचा प्रयत्न केला की आपण कुठेतरी फिरायला जाऊ. पण 'मी नुकताच रिटायर झालो आहे; आता मला माझ्या मित्रांना भेटायचं आहे;' असं तो सतत सांगत राहिला. त्याच वेळेला मुलगी डिलिव्हरीसाठी आली तिला एक गोंडस बाळ देखील झालं. ती परत सासरी गेली; त्याच वेळेला मुलाने देखील त्याची बायको प्रेग्नेंट असल्याची गोड न्यूज दिली. तिला खूप आनंद झाला.

दोन दोन नातवंड आता तिच्या सोबतीला होती. सून आणि मुलगी दोघीही नोकरी करत असल्यामुळे बाळांना बघण्याची जबाबदारी तिच्यावर आली. नातवंडांना सांभाळत मिळेल त्या वेळामध्ये छानशी पुस्तकं वाचणं; वेळ मिळेल तसं मित्र-मैत्रिणींना भेटणं; यातच तिची पंचाहत्तरी कधी आली तिला कळलंच नाही. आता नातवंडं शाळेत वरच्या वर्गात असल्याने तिच्याकडे फारशी येत नसत. तिचा मुलगा आणि लेक अलीकडे तिला सतत सांगत; 'तुला फिरायला आवडायचं ना आई; मग आता का नाही फिरत?' पण आता तिच्या नवऱ्याचं बरंच वय झालं होतं; अनेक शारीरिक व्याधी असल्यामुळे मनाला येईल तसं फिरणं आता त्याला अवघड वाटत होतं. तिची मानसिकता एकटं फिरण्याची नसल्यामुळे; इच्छा असूनही आणि पैशाची अडचण नसताना देखील आजही ती घरीच अडकलेली आहे.

Friday, August 12, 2022

Love in the air

 Love in the air



मिठे सपनो की कुच यादे;
गिली रेत के कुच किस्से हैं...
ठंडी हवा के झोके हैं कुच;
लटो में उलझे कुछ चेहेरे हैं...

निले आस्मा में तपता सूरज...
साहिल ढूंढती एक कश्ती हैं...
गोते खाते कुच अरमान...
और.. दूरतक उठती तरंगे हैं...

कही दूsssर दहाड़ते बादल...
चमकती बिजली की हलचल...
आशा-निराशा की उठती वो लेहेरे...
और जमीन पे उठती सरसराहट हैं...

ये सभी मेरे.. और हम होचुके उनके..
जिन्हें कुछ पता भी नही..
या ये समझे... के सबकुच पता है...
नासमझ होने की उनकी अदा हैं...


Friday, August 5, 2022

एक संध्याकाळ


 


एक संध्याकाळ...

एक संध्याकाळ... सागराची...
वहात्या वाऱ्याची...
ओघवत्या गप्पांची...
ओठावर रेंगाळणाऱ्या... हुरहुरीची...

एक संध्याकाळ सागराची...
गुंतलेल्या बोटांची...
हसलेल्या ओठांची...
वाढलेल्या... ओळखिची...

एक संध्याकाळ... सागराची...
ओल्या वाळुतल्या पावलांची...
मनात उठलेल्या लाटांची...
निघतानाच्या... घालमेलीची...