Friday, April 29, 2022

अनाहत सत्य (भाग 22)

 अनाहत सत्य


भाग 22

तीक्ष्णाने भिमाकडे आणि अपालाकडे निरखून बघितलं आणि ती मागे फिरली. तीक्ष्णाने ज्यांचा भूतप्रमुख म्हणून उल्लेख केला होता त्या सोनेरी दंडक हाती धरलेल्या बुरखाधारी उंच व्यक्तींनी अपालाच्या दिशेने मान फिरवली. त्यांचे डोळे दिसत नव्हते; पण तरीही अपाला जे समजायचं ते समजली आणि भिमाकडे किंवा गोविंद, नाथाकडे एकदाही न बघता ती त्यांच्या दिशेने चालू पडली. ते सगळेच तिथून गेले आणि भीमाने गोविंद आणि नाथाकडे बघितलं. गोविंद देखील भिमाकडे बघत होता.

"हे काय घडत होतं नक्की भीमा?" गोविंदने अत्यंत शांत आवाजात विचारलं.

"कुठे काय?" भीमाने आवाजावर काबू आणत म्हंटलं. त्याला खात्री होती की गोविंदला काहीच आठवत नसणार आहे. कदाचित केवळ काही क्षण गेले असल्याने तो धुसंर असं जे आठवतं आहे त्यावरून काहीतरी विचारतो आहे.

नाथ देखील त्याच्या अवस्थेतून जागा होत होता; त्याने गोविंदचा प्रश्न ऐकला होता. त्यामुळे गोंधळून त्याने गोविंदला विचारलं; "राजकुमार, आपण कशाबद्दल बोलता आहात?"

नाथाकडे बघत गोविंद शांतपणे म्हणाला; "आत्ता इथे जे काही घडलं त्याबद्दल विचारतो आहे मी नाथा."

"काय घडलं इथे?" नाथाने अजूनच गोंधळात विचारलं. गोविंदने त्यांच्याकडे नजर उचलून बघितलं आणि म्हणाला; "नाथ, कुंजर कुठे आहे ते बघतोस का? अपाला देखील दिसत नाहीय इथे. तिच्या सोबत असला तर ठीक.... पण तुला माहीत आहे; तो म्हणजे एक वावटळ आहे. कुठेतरी भिरभिरत जाईल आणि कळणार देखील नाही आपल्याला." गोविंदचं बोलणं ऐकून नाथा हसला आणि म्हणाला; "खरं आहे तुमचं राजकुमार. शेवटी तुमचं रक्त आहे त्याच्यात. आणतो शोधून त्याला." एवढं बोलून नाथाने भिमाकडे हसून बघितलं आणि तिथून निघाला. नाथ तिथून जाताच गोविंदने त्याचा पाय भीमाच्या दिशेने वळवला.

"राजकुमार! आपल्या पायाला मोठीच जखम झाली आहे. आपण बसा. मी उपाय करतो." असं म्हणत भीमाने गोविंदला बसायला मदत केली आणि त्याच्या जखमेचा अंदाज घ्यायला त्याच्या पायाजवळ बसला.

"भीमा, आत्ता जे काही घडलं त्यातला एकही क्षण मी विसरलेलो नाही." गोविंद अजूनही शांतच होता. मात्र त्याच्या या वाक्याने भीमा खरोखरच दचकला आणि त्याने झटकन गोविंदकडे बघितलं.

"तुझ्या अजूनही लक्षात नाही आलेलं; भीमा... तीक्ष्णा येण्याच्या अगोदर आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलत होतो. तुमचं सत्य तुम्ही मला आणि नाथाला सांगितलंत अर्थात.... जितकं तुमची इच्छा आहे तितकंच आणि मला जेवढं झेपेल तेवढंच. पण त्यातूनही जे समजायला हवं ते मी समजलो होतो. त्यामुळे तीक्ष्णा आली त्यावेळी तिच्या मागे उभ्या त्या व्यक्तींना बघितल्या क्षणी मी समोरच्या एका अणुकुचीदार दगडावर पाय रोवला. मला खात्री होती आता इथे असं काही घडणार जे मी किंवा नाथाने बघितलं किंवा ऐकलं नाही पाहिजे. म्हणजेच कदाचित आम्ही बघत असूनही आणि ऐकत असूनही आमची मती गुंग होऊन जाईल आणि नंतर आम्हाला काहीही आठवणार नाही. जर माझ्या शरीराला जखम झाली तर माझं लक्ष विचलित राहील आणि कदाचित जे घडतं आहे ते मी जाणिवेच्या आत राहून समजून घेऊ शकेन; असा मला अंदाज होता. म्हणून मग त्या अणुकुचिदार दगडावर पाय रोवून मी जखम करून घेतली." गोविंद काहीसं हसत म्हणाला.

"राजकुमार, तुमचा अंदाज अगदी योग्य होता. हे खरंच आहे की इथे जे काही घडलं आणि बोललं गेलं ते आता नाथाला कधीच आठवणार नाही; आणि तुम्ही कधीच विसरणार नाही." भीमा देखील गोविंद सोबत हसत म्हणाला.

"भिमा.... काय आहे हे सगळं नक्की? मला सांगशील का?" गोविंदने भीमाचा हात हातात घेत विचारलं.

"राजकुमार गोविंद, तुम्ही असं काही कराल असा विचार देखील माझ्या मनात नव्हता आला. परंतु आता जेव्हा तुम्ही मला हे सगळं सांगता आहात तेव्हा मला पटतं आहे की संपूर्ण सत्य समजून घेणं हा तुमचा अधिकार आहे. राजकुमार, तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला देतो. भागीनेय तीक्ष्णा आणि अपाला यांच्यामध्ये सतत उडणारे खटके तर तुम्ही बघतच आहात. त्यामागचं एक अत्यंत महत्वाचं कारण हे आहे की भागीनेय तीक्ष्णा या अपालाच्या मार्गदर्शक राहिल्या आहेत. त्यामुळे गेल्या हजारो वर्षांमध्ये दोघींमध्ये एक आंतरदुवा निर्माण झाला आहे. त्या दोघींनाही एकमेकींचे विचार समजतात. याचा उपयोग त्यांनी विविध कामांमध्ये कायम केला आहे. त्यांच्या कृती एकमेकांना पूरक राहिल्या आहेत कायम. म्हणूनच इथल्या नक्षत्र जोडणीचं काम भागीनेय तीक्ष्णाच्या हाती सुपूर्द करताना भूगर्भातील आमच्या नगराच्या वायुवीजनाची जवाबदारी आमच्या भूतप्रमुखांनी अपालाकडे दिली. तुम्ही येईपर्यंत काम अत्यंत योग्य प्रकारे झाले. त्यानंतर आपण इथे आलात राजकुमार...."

"हो! पण मी इथे यावं ही तीक्ष्णाची इच्छा होती. तसं तिने महाराजांकडे बोलून दाखवलं होतं. तीक्ष्णाच्या इच्छेचा मान ठेऊन महाराजांनी मला इथे पाठवलं होतं." गोविंद म्हणाला.

"हो! कारण तो आमच्या प्रमुखांचा निर्णय होता. सुरवातीला भागीनेय तीक्ष्णाला देखील हरकत नव्हती. पण तुम्ही आलात आणि हळूहळू अपाला आणि तुमच्यात वेगळे बंध निर्माण व्हायला लागले. भागीनेय तीक्ष्णा यांनी त्याकडे देखील दुर्लक्ष केलं. कारण आम्ही आता अशा मानसिक स्थितीला पोहोचलो आहोत की भावनिक गुंतवणूक हा भाग आमच्या मनात येत नाही. मात्र शारीरिक गरजा आमच्या देखील आहेतच. त्यामूळे जर कधी असे कोणी जवळ आले तर आमची हरकत नसते. मात्र अपाला हळूहळू तुमच्यामध्ये गुंतायला लागली. तिने कुंजरला जन्म दिला. त्यानंतर भागीनेय तीक्ष्णा यांच्या लक्षात आलं की अपाला भावनिकतेच्या आहारी जाऊन काही वेगळे निर्णय घेऊ शकते." भीमा बोलत होता. त्याला थांबवून गोविंदने विचारलं; "वेगळे निर्णय? तुला नक्की काय म्हणायचं आहे भीमा. तू मला गेली काही वर्ष ओळ्खतोस. मी कधीही अपालाच्या कामआड़ आलो का?"

"राजकुमार, विषय तिच्या कामाचा नाही. अपाला कधीच तिच्या कामात कुचराई करणार नाही याची सगळ्यांनाच कल्पना आहे. उलट तिने जे काम केलं आहे ते अत्यंत योग्य आहे. राजकुमार तुम्हाला सांगितल्या प्रमाणे.... या ठिकाणाच्या खालीच आमचं नगर वसलेलं आहे. आमच्या नगराचं वायुवीजन अयोग्य झाल्यामुळे अनेकांना शारीरिक व्याधी निर्माण व्हायला लागल्या आहेत..." भीमा सांगत होता.

"अरे पण थोड्याच वेळापूर्वी तुम्ही मला म्हणालात की तुम्हाला मृत्यू नाही." गोविंदने गोंधळलेल्या आवाजात विचारलं.

"खरंय! आम्हाला मृत्यू नाही. पण म्हणून शारीरिक व्याधी नाहीत असं नाही. राजकुमार उलट असा विचार करा की एका शरीराला मृत्यू नाही; पण शारीरिक व्याधी आहे. हे किती जास्त त्रासदायक होईल." भीमा म्हणाला. मान हलवत गोविंदने होकार दिला. "खरंय रे. असं जगणं कोणालाही नकोसं होईल." गोविंद म्हणाला.

"म्हणूनच अनेक स्थापत्य दुरुस्त्या करणं आवश्यक होतं. कदाचित तुम्ही म्हणाल आम्ही असं भूगर्भात का राहातो? त्याचं कारण देखील तितकंच महत्वाचं आहे राजकुमार. या सुंदर शामल आणि मोहक भूमीवर राहिलं की हळूहळू अनेक इच्छा निर्माण व्हायला लागतात. हळूहळू इच्छांचं रूपांतर प्रत्येक गोष्ट हक्काची किंवा मालकीची व्हावी याकडे होतं. हा प्रवास अंतहीन असतो... किंवा स्वतःचा अंत झाल्यानंतरच थांबणारा असतो. त्यामुळे या इच्छा-आकांशांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी आम्ही भूमिगत असणं जास्त योग्य मानतो." भीमा म्हणाला.

"पण इच्छा, आकांशा, भावना असणं वाईट नाही न?" गोविंद म्हणाला.

"नाहीच. वाईट नाहीच. पण अतिरेक वाईट. दुर्दैवाने मानवाला याची जाणीव नाही. कारण इतर कोणत्याही सजीवाकडे जे नाही ते आपल्याकडे आहे. विकसित बुद्धी. त्या बुद्धीचा आपण जितका जास्त वापर करतो तितकी मानवीय संस्कृती प्रगत होते... प्रत्येक प्रगतीचा एक परमोच्च बिंदू असतो आणि मग अधोगती असते. त्याप्रमाणे मानवाची अधोगती होते. हे चक्र या धर्तीच्या निर्मितीपासून सुरू आहे. पण अधोगती नंतर पूर्ण ह्रास होतोच. त्या ह्रासानंतर परत एकदा मानव निर्माण होतोच. त्याकाळात त्याला परत एकदा मार्गावर आणण्याचं काम आम्ही करतो." भीमा गोविंदच्या प्रश्नांना खूप शांतपणे उत्तरं देत होता.

"मग मी इथे यावं यामागे देखील काहीतरी कारण असेलच न?" गोविंदने विचारलं.

"हो! राजकुमार आपण चाणक्य आणि चंद्रगुप्त यांच्याबद्दल काही माहीत आहे?" भीमाने विचारलं.

"अर्थात भीमा. आदरणीय चाणक्य यांच्याविषयी माहिती नसणारे राजघराणे मला तरी माहीत नाही." गोविंद म्हणाला.

"किमान हजार वर्षांपूर्वीचा काळ असल्याने मी विचारलं." भीमा म्हणाला.

गोविंदने काही क्षण विचार केला आणि थेट भीमाच्या डोळ्यात बघत म्हणाला; "भीमा, तुला बरंच काही माहीत आहे. मी समजून घ्यायला उत्सुक आहे. योग्य आहे की नाही ते तू ठरव आणि मला सांग."

"राजकुमार, तुम्ही अत्यंत योग्य आहात याची मला खात्रीच आहे. म्हणूनच मी तुम्हाला म्हंटलं की अत्यंत महत्वाची अशी माहिती देतो. राजकुमार, चाणक्य हे आमच्यापैकीच एक होते. आमच्यामधील एक महान प्रमुख त्याकालामध्ये भूतलावर मानवीय जीवन विकासासाठी आले होते. त्यांच्यामध्ये आणि त्याकाळातील एका अत्यंत प्रगल्भ बुद्धीच्या स्त्रीमध्ये संकर झाला आणि विष्णुगुप्त जन्माला आले. त्यांनी निर्माण केलेला इतिहास हा अजरामर आहे. त्यांच्यापासून सुरू झालेली मानवीय जीवनाची प्रगती आजही योग्य दिशेने होते आहे. मात्र आता त्याला काही वेगळे वळण असणे आवश्यक आहे. त्यासाठीच योग्य व्यक्तीचा शोध आम्ही घेत आहोत. राजकुमार, तुम्हाला माहीत असलेला हा प्रदेश आणि ही भूमी.... याहूनही खूप जास्त विस्तार आहे तिचा. हा शोध केवळ इथेच नाही तर या भूतलावर विविध ठिकाणी घेण्यात येत आहे. गरज आहे ती काळाची. या शोधांतर्गत भागीनेय तीक्ष्णाने तुमच्या बद्दलची माहिती आमच्या भूतप्रमुखांना दिली. त्यांनी सर्वात्मक विचार करून तुमची निवड करण्यासाठीची चाचणी घेण्यास भागीनेय तीक्ष्णाला सांगितले. मात्र तुम्ही इथे आलात आणि अपालाच्या प्रेमात पडलात. तुम्ही कर्तव्य आणि भावना यामध्ये भावनेला निवडलंत आणि इथेच सगळं बदलून गेलं.

मी सांगितल्याप्रमाणे भागीनेय तीक्ष्णा ही अपालाची मार्गदर्शक आहे. दोघींनी आजवर अनेक उत्तम कामे सहज पार पाडली आहेत. मात्र आता अपालाच्या मनात तुमच्या सोबत मानवीय आयुष्य जगण्याचा विचार आहे. तिला मृत्यू नसल्याने कदाचित एका काळानंतर ती कोणत्यातरी मार्गाने परत एकदा आमच्याकडे परत येईल. परंतु तोपर्यंत ती तुमच्या आयुष्यात नाही याबद्दलची तुमच्या मनाची तयारी झालेली असेल; याची ती काळजी घेईल. हा अपालाच्या मनातील विचार भागीनेय तीक्ष्णाच्या लक्षात आला. ते तिला मान्य नाही. अपालाने परत आमच्यासोबत जाणेच योग्य असं तिचं मत आहे. अपाला ते मान्य करत नाही आहे. जर भागीनेय तीक्ष्णाने आग्रह धरला तर अपाला काहीतरी असं पाऊल उचलेल की ज्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतील. हे आमच्या भूतप्रमुखाना लक्षात आल्याने कदाचित त्यांनी इथले काम पूर्णत्वास नेण्यासंदर्भात आग्रह धरला आहे. तुम्ही काही वेळापूर्वी जो संवाद ऐकलात तो याविषयीच होता." भीमा बोलायचा थांबला आणि गोविंद विचारात पडला.

हे सगळेच आपल्यापेक्षा वेगळे आहेत हे निश्चित. पण अपाला नक्की वेगळी आहे. आपली निवड यांनी ज्यासाठी केली ती ऊर्जा आपल्यात नाही हे देखील यांच्या लक्षात आतापर्यंत आले असेल. याचाच अर्थ त्यांना आता आपली गरज नाही. त्यांचं काम पूर्ण होत आलं आहे म्हणजे महाराजांची देखील त्यांना गरज उरलेली नाही. याचा अर्थ भावनांवर विजय मिळवून भावनाहीन आयुष्य जगणारे हे मानव.... परत एकदा त्यांच्या त्या निरस आयुष्यात परत जाण्याचा विचार करत आहेत. गोविंदच्या मनातील विचार हळूहळू स्पष्ट व्हायला लागले होते. एका क्षणी त्याच्या लक्षात आलं.......... हे मानव परत जाण्याचा विचार करत आहेत. म्हणजेच आपली अपाला आपल्यापासून दूर होतंर आहे. हा विचार मनात आल्याक्षणी गोविंद एकदम गडबडून गेला आणि त्याच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं.

"राजकुमार, तुम्ही योग्य विचार करत आहात. येत्या काळामध्ये अनेक घटना वेगाने घडणार आहेत. त्यासाठी तुम्ही तुमच्या मनाची तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे." भीमाने गोविंदचा हात हातात घेत म्हंटलं.

त्याचा हात घट्ट धरत गोविंद म्हणाला; "भीमा.... खूप काही घडणार आहे ते मला दिसतंच आहे. एक सांग तू कोणाच्या बाजूने उभा आहेस?"

"राजकुमार, अपालासाठी मी काहीही करीन." भीमा म्हणाला.

त्यादोघांमध्ये होणारा संवाद मागील झाडामागे उभं राहून ऐकणारा नाथ एकदम ताठ झाला आणि मागल्या पावली झपाझप निघाला.

क्रमशः

Friday, April 22, 2022

अनाहत सत्य (भाग 21)

 अनाहत सत्य


भाग 21

"भीमा!!!" नाथाला एका क्षणात सगळाच उलगडा झाल्यासारखं झालं. "तुम्ही जसे आलात तसेच आहात." असं म्हणाला आणि थांबला नाथ. "काय झालं मित्रा?" भीमाने हसत त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं.

"भीमा, तुम्ही सगळेच इथे आलात त्यावेळेपासून जसे दिसता आहात तसेच राहिला आहात; तर हे तुमचं वेगळेपण आजवर कोणाच्याही लक्षात का नाही आलेलं?" नाथाने विचारलं.

"कारण आम्ही इथे आलो तेव्हापासून आम्हाला कोणीही बघितलेलं नाही नाथा. गेल्या सहा-सात वर्षांमध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांना इथवर येण्यास मुभा दिली. ज्यावेळी आमचं मुख्य उद्दिष्ट पूर्ण होत आलं." हसत अपाला म्हणाली.

"मुख्य उद्दिष्ट पूर्ण नाही झालेलं अपाला." मागून तीक्ष्णाचा आवाज आला आणि नाथ, भीमा आणि अपाला तिघांनाही मागे वळून बघितलं.

"म्हणजे?" भीमाच्या आवाजात आश्चर्य होतं. नाथाला तर काय बोलावं ते सुचणं अशक्य होतं. अजून तर त्याने समजलेलं सत्य स्वीकारून पचवलं नव्हतं. त्यात अचानक अत्यंत धारदार व्यक्तिमत्वाची आणि स्वभावाची तीक्ष्णा त्याच्या समोर होती. त्यामुळे नाथामान खाली घालून उभा राहिला.

"मान्य आहे भागीनेय तीक्ष्णा. माझी जवाबदारी अजूनही पूर्ण नाही करू शकले मी. पण तुला देखील त्याचं कारण माहीत आहे." अपाला अत्यंत शांत पण आत्मविश्वासपूर्ण आवाजात म्हणाली.

"दुसरं काय कारण असू शकतं भागीनेय अपाला? ज्यादिवशी तू राजकुमार गोविंद आणि कुंजर यांना बाजूला ठेऊन केवळ मानवीय संस्कृती जतन आणि संवर्धन यासाठी विचार करायला लागशील त्यादिवशी तू यशाची पायरी चढशील." तीक्ष्णा अत्यंत तीव्र आवाजात म्हणाली.

"तीक्ष्णा.........." तिच्या दिशेने एक पाऊल उचलत अपाला रागाने ओरडली.

अपालाचं ते रूप नाथाने कधीच बघितलं नव्हतं. अनेकदा राजकुमार गोविंद अपालाशी बोलताना रागावायचे. त्यावेळी देखील अपाला शांतपणे बोलत होती. त्यामुळे तिचं ते रागावणं त्याच्या समजण्यापालिकडे गेलं. अर्थात राजकुमार आणि कुंजर यांच्या विषयी ती कोणाकडूनही ऐकून घेणार नाही; हे समजून त्याचं मन सुखावलं.

"अपाला....." तीक्ष्णाचा आवाज देखील चढला आणि आपण इथे थांबणं योग्य नाही याची नाथाला जाणीव झाली.

दोन पावलं मागे जात तो तोंडातल्या तोंडात म्हणाला; "येतो मी." आणि तसाच मागच्या पावलाने तिथून निघून गेला.

"भागीनेय तीक्ष्णा.... अपाला.... मी माझ्या कार्यक्षेत्राच्या बाहेर काहीतरी बोलतो आहे असं तुम्ही दोघी मानू शकता. पण या विशिष्ट कामाच्या यशस्वीतेसाठी आपल्याला प्रत्येकाला एक जवाबदारी नेमून दिली आहे. त्यामुळे माझं हे कर्तव्य आहे की मी तुम्हाला काही बाबींची जाणीव करून द्यावी." दोघींच्याही मध्ये पडत भीमा म्हणाला. "मूलतः तुमच्या दोघींच्याही हे लक्षात येतं आहे का की तुम्ही दोघी भावनांच्या आहारी जात आहात. राग ही एक भावना आहे. ही भावना तुमची दोघीही एकमेकींसाठी तीव्र करता आहात. त्यामुळे कदाचित तुम्ही दोघीही आपापल्या जवाबदारी पासून दूर जाता आहात. भागीनेय तीक्ष्णा, तुमचा आरोप मला देखील मान्य नाही. गोविंद किंवा कुंजर हे अपालाच्या कामाच्या मध्ये येत नाही आहेत. तर तिने सुचवलेले उपाय तुम्ही आपल्या वरिष्ठांना वेळेत पोहोचवले नाहीत; आणि त्यामुळे त्यांनी ते स्वीकारले आहेत हे कळण्यास विलंब झाला आहे. अर्थात आता त्यांच्याकडून अपालाने सांगितलेले उपाय मान्य झाल्यानंतर ते पूर्ण करण्यास तिला फार वेळ लागणार नाही हे सत्य आहे. पण भागीनेय तीक्ष्णा, मंदिर पूर्ण होण्या अगोदर अपाला तिची जवाबदारी पूर्ण करून राजकुमार गोविंद आणि कुंजर सोबत नगर प्रवेश करेल; या तुमच्या मनातील एका विचारामुळे तुम्ही अपालाला मार्गदर्शन आणि मदत करणं थांबवलंत. त्यामुळे अपालाच्या वागण्यात काही बदल झाला नाही हे पाहून तुम्ही खरं तर तिच्या बाजूने आश्वस्त व्हायला हवं होतं. पण तुमची अस्वस्थता इतकी वाढली की त्यातून तुम्ही भावनिक व्हायला लागलात; हे तुमच्या लक्षात आलं आहे का? भागीनेय तीक्ष्णा, अपालाने प्रेम केलं; कुंजरला जन्म देखील दिला. पण तरीही कमलदलावरील पाण्याप्रमाणे ती अलिप्त राहिली."

भीमाच्या बोलण्यामुळे संतापलेली तीक्ष्णा काहीशी शांत झाली. तिने एक तीव्र कटाक्ष भिमाकडे टाकला आणि ती तिथून निघून गेली.

"भीमा! खरंच तू माझा खरा मित्र आहेस." भीमाच्या जवळ जात त्याचा प्रचंड मोठा हात स्वतःच्या हातात घेत मंद हसत अपाला म्हणाली.

"अपाला, मी तुझा मित्र आहे यात वादच नाही. आत्ता मी जे बोललो ते देखील अगदी खरं आहे. पण त्यामुळे तुझ्या हातून देखील चूक झालेली नाही असं नाही. अपाला, आत्ता नाथाला आपण दोघांनी मिळून जे सांगितलं त्यात एक सत्य सांगणं तू टाळलंस असं नाही का तुला वाटत? अपाला, मूलतः ज्यावेळी आपण त्या गोठवून घेण्याच्या क्षणाला सामोरे जात होतो; त्यावेळी आपण सर्वांनीच एकत्रित रित्या हे स्वीकारलं होतं की प्रेम या भावेनेमध्ये आपण कधीच गुंतायचं नाही. कारण त्यापासूनच पुढे इतर भावनांचा जन्म होतो. तरीही तू गोविंदच्या बाबतीत मनावर ताबा ठेऊ शकली नाहीस. अर्थात मी तुला चांगला ओळखतो त्यामुळे मला खात्री होती आणि आहे की तू त्याच्यात गुंतून तुझ्या जवाबदरीपासून दूर जाणार नाहीस. पण अपाला, यामुळे तू गोविंद आणि कुंजर यांच्यावर अन्याय नाही का करत आहेस?" भीमा बोलायचा थांबला. त्याने अपालाकडे बघितलं. तिचे डोळे भरून आले होते.

"हीच भावनिकता अपाला! कदाचित तू नाही कमकुवत पडणार अपाला. पण तुझ्या या कृतीमुळे तीक्ष्णा, मी आणि आपल्यातले इथे असलेले अनेक अस्वस्थ झाले आहेत. त्याची जवाबदरी देखील तू घेणार आहेस का?" भीमाने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं.

भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत अपालाने बोलण्यासाठी तोंड उघडलं खरं. पण मग त्याचा हात दूर करत मान खाली घालून ती तिथून निघून गेली.

***

"अपाला, काय झालं आहे? तू इतकी गप्प का आहेस?" मिठीतल्या अपालाला प्रेमाने कुरवाळत गोविंदने म्हंटलं.

"राजकुमार... मी जर काही सांगितलं तर तुम्ही रागावणार तर नाही ना माझ्यावर? निघून नाही ना जाणार?" अपालाने गोविंदला अजूनच घट्ट मिठी मारत विचारलं.

"अग?! काय झालं अपाला? तुला मी इतकं अस्वस्थ कधीच बघितलेलं नाही. तुझ्यामध्ये आणि तीक्ष्णामध्ये काही वाद झाला आहे का?" तिची हनुवटी उचलून तिचा चेहेरा स्वतःकडे वळवत गोविंदने अत्यंत मऊ आवाजात तिला विचारलं.

"अहं! नाही. पण भीमा असं काहीतरी बोलून गेला की एक वेगळंच सत्य माझ्या समोर येऊन उभं राहिलं आहे. राजकुमार; नकळत मी फक्त माझ्या दृष्टिकोनातून योग्य-अयोग्य याचा विचार करत होते. पण प्रत्येक कृतीचे आणि घटनेचे अनेक आयाम असतात; हे काही काळासाठी माझ्या विस्मृतीत गेलं होतं." अपाला काहीसं गोविंदशी आणि बरचसं स्वतःशी बोलत होती.

"अपाला.... काय झालं? मला नाही का सांगणार?" गोविंदने तिला अजूनच जवळ ओढत म्हंटलं.

"गोविंद.... काहीतरी सांगायचं आहे तुला." अचानक अपाला म्हणाली.

"ओह! नक्कीच काहीतरी खास आहे ते." हसत गोविंद म्हणाला. "नाहीतर तू मला केवळ माझ्या नावाने हाक मारणं शक्यच नाही. बोल अपाला. मी सगळं स्वीकारायला तयार आहे."

"गोविंद स्वीकारशील तू. कारण त्याला पर्याय नाही. पण मी आत्ता जे सत्य सांगणार आहे ते पचवणं तुला कितपत शक्य होईल मला माहीत नाही. पण मला हे कळत आहे की याहून जास्त मी जर हा भार माझ्या मनावर ठेवला तर त्याच्या ओझ्याखाली माझ्या सोबत मी तुला आणि कुंजरला देखील ओढीनं." उठून बसत अपाला म्हणाली.

अपालाच्या त्या बोलण्याने गोविंद देखील गंभीर झाला. तिच्यापासून काहीसा दूर होत तो म्हणाला; "अपाला, तुझ्यावर प्रेम करताना मला कल्पना होती की हे शिवधनुष्य आहे. पेलवणं शक्य नाही... आणि तरीही मी ते स्वीकारलं. त्यामुळे तू अत्यंत मोकळ्या मनाने मला सगळं सांग. अपाला माझा विश्वास आहे की समोर येणाऱ्या कोणत्याही प्रश्नाला आपण दोघे मिळून सामोरे गेलो तर नक्की तो प्रश्न सुटेल."

"गोविंद, तुला वाटतं आहे तितकं ते सोपं नाही." एक मोठा निश्वास टाकत अपाला म्हणाली. तिने काही क्षण स्थिर नजरेने गोविंदकडे बघितलं आणि मग बोलायला सुरवात केली.

"राजकुमार गोविंद, मी आणि माझ्या सोबत इथे आलेल्या सगळ्यांचंच अस्तित्व खूप वेगळं आहे. राजकुमार, आम्हाला मृत्यू नाही. तो क्षण ज्यावेळी आम्ही त्या स्थिरत्वाला पोहोचलो त्यावेळी आमच्यातल्या ज्यांचं जे वय होतं, त्या वयाला आम्ही स्थिरावली. राजकुमार, हे का आणि कसं झालं यामागे खूप मोठं विश्लेषण आहे. संगीनच मी तुला. पण माझं हे सत्य तुला आत्ता सांगण्यामागचं कारण जास्त महत्वाचं आहे. राजकुमार, आम्ही इथे आलो आणि हे श्रीशिवमंदिर निर्मित केलं त्यामागे देखील एक कारण आहे. मूलतः आमचं नगर इथेच आहे.... या पर्वताखाली. आमचं तिथलं अस्तित्व काही नैसर्गिक व्याधींमुळे धोक्यात आलं होतं. त्या व्याधी दूर ठेवण्यासाठी आमच्या नगराचं वायुविजन वाढवणं आवश्यक होतं. त्याशिवाय आमच्याप्रमाणे आयुष्याला गोठवून जगणारे आमच्यातले अनेक जे या वसुंधरेवर इतर ठिकाणी आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याची आमची साधनं अलीकडे नीट काम करत नव्हती. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकत नव्हतो. म्हणून मग आमच्यातील काहींनी नक्षत्र आणि ग्रह ताऱ्यांच्या मदतीने त्यांच्याशी संपर्क करण्यासाठीची प्रणाली शोधून काढली. तिची निर्मिती देखील इथेच होणे आवश्यक होते. यासाठी आम्ही परत एकदा धरतीवर आलो. महाराज कृष्णराज यांच्या मदतीने आम्ही इथे कामाला सुरवात केली. राजकुमार, तुझ्या माहितीसाठी.... गेली अनेक वर्ष आम्ही इथे काम करतो आहोत. तू अगदी लहान असल्यापासून. तरीही तू तारुण्यात पदार्पण केलंस आणि इथे आलास तेव्हा देखील मी तशीच होते जशी आज आहे.... कदाचित माझ्यावरील प्रेमामुळे तुला ते लक्षात आलं नसेल....."

"अपाला, मला ते लक्षात आलं होतं... कधीच. पण मी ते बोललो नाही. अर्थात त्याचं कारण माझं तुझ्यावरचं प्रेम." गोविंदने तिला थांबवत म्हंटलं. त्याच्या त्या वाक्याने अपालाला आश्चर्य वाटलं. गोविंद हसला आणि बोलायला लागला; "अपाला, मी एक राजाचा मुलगा आहे. हे खरं आहे की मी माझी जवाबदारी बाजूला ठेऊन केवळ तुझ्या प्रेमासाठी इथे थांबलो आहे. पण त्यामुळे माझं अस्तित्व संपत नाही. अपाला, इथे जे घडतं आहे आणि त्यात जे वेगळेपण आहे ते मला कळलं आहे. फरक इतकाच की मी त्या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न नाही केला. मला खात्री होती तू कधीतरी मला सगळं सांगशील."

"राजकुमार..." अपाला काहीतरी बोलणार होती. पण तिला थांबवून गोविंद म्हणाला; "थांब अपाला. मी काय सांगतो आहे ते ऐक. कारण माझं मन मला सांगतं आहे की जर तू आत्ता बोललीस तर कदाचित तो संवाद आपल्यातला शेवटचा संवाद ठरेल. मला तसं होऊ द्यायचं नाहीय. म्हणून तू ऐक. अपाला, तू कुठून आलीस, का आलीस... तुझं अस्तित्व... तुझं स्वतःला गोठवून घेणं.... याच्या पलीकडे जाऊन माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला हे देखील माहीत आहे की तू कोणत्याही भावेनेमध्ये अडकणार नाही आहेस. कदाचित त्यामुळेच तू अचानक एक दिवस निघूनही जाशील. पण अपाला, तुझं माझ्या आयुष्यातून जाणं म्हणजे जिवंतपणी मृत्यूला स्वीकारण्यासारखं होईल मला." असं म्हणून गोविंद थांबला. त्याने अपालाच्या डोळ्यात खोल बघितलं. तिच्या थंड नजरेकडे आणि भावना राहात चेहेऱ्याकडे बघून गोविंद हादरला. "अपाला, काहीही कर, पण मला सोडून जाऊ नकोस. असा कोणताही निर्णय घेऊ नकोस ग; ज्यामुळे तू, मी आणि कुंजर आपल्या तिघांचे आयुष्य विखरून जाईल." गोविंदच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. आता मात्र अपालाचं हृदय देखील हललं. ती पटकन पुढे झाली आणि गोविंदच्या कुशीत शिरत म्हणाली; "गोविंद, हा माझा शब्द आहे; मी आणि कुंजर तुझ्यापासून कधीही दूर जाणार नाही." तिला मिठीत घेताना गोविंदच्या चेहेऱ्यावर जग जिंकल्याचा आनंद होता.

दूरवरून त्यांच्याकडे बघण्याच्या तीक्ष्णाचा चेहेरा मात्र कठोर झाला होता.

***

"मी काय मदत करू शकतो गोविंद? मी केवळ इथला संरक्षक प्रमुख आहे. माझ्या हातात काहीच नाही." भीमा अत्यंत गंभीर आवाजात बोलत होता. त्याच्या समोर गोविंद, नाथ आणि अपाला बसले होते.

"तू काय करू शकतोस ते तुला आणि अपाला या दोघांना चांगलंच माहीत आहे भीमा. तुमचं सत्य कळल्यापासून तर मी निःशब्द झालो आहे." गोविंद म्हणाला.

"भीमा...." अपाला काहीतरी बोलणार होती पण भीमाने तिला थांबवलं. "भागीनेय तीक्ष्णा. काही काम होतं का? मला बोलावून घ्यायचंत न." उठून उभं राहात भीमा म्हणाला. गोविंद, नाथ आणि अपालाने चमकून मागे वळून बघितलं. मागे तीक्ष्णा उभी होती. पण ती एकटी नव्हती. तिच्या सोबत... पण थोडं लांब तीन व्यक्ती उभ्या होत्या. तीक्ष्णापेक्षा देखील उंच अशा त्या व्यक्तींनी गळ्यापासून पायापर्यंत अंगरखा पांघरला होता आणि त्यांच्या डोक्यावर चेहेरा अर्धा झाकेल अशी टोपी होती. तिघांच्याही हातात एक उच लाकडी दंडक होता आणि त्या दंडकाचं वरचं टोक सोनेरी धातूने चमकत होतं. त्या तिघांकडे नजर जाताच भीमा आणि अपालाचा चेहेरा बदलला. पण ते गोविंद किंवा नाथाच्या लक्षात येणं शक्यच नव्हतं. कारण ते दोघेही मंत्रमुग्ध झाल्यासारखे एकदा त्या तीन व्यक्तींकडे आणि एकदा तीक्ष्णाकडे बघत होते.

"भीमतटरक्षक मी आपणास बोलावून घेणं योग्य झालं नसतं. ज्याप्रमाणे मी इथे या मंदिर निर्मितीसाठी आहे आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे मंदिर कळासावरील नक्षत्र क्षेपणासाठी योग्य रचनेच्या निर्मितीसाठी ज्याप्रमाणे माझी नेमणूक केली गेली; आपल्या नगरासाठी योग्य वायुविजन प्रणाली निर्माण करण्यासाठी अपालाची नेमणूक झाली त्याचप्रमाणे यासंपुर्ण निर्मितीचं वर्तमान आणि भविष्यात देखील योग्य संरक्षण व्हावं यासाठी तुमची नेमणूक झाली आहे. तुम्हाला माहीतच आहे की श्रीशिव मंदिराची निर्मिती पूर्ण होत आली आहे. केवळ एक माह इतकेच काम आता राहिले आहे. अपालाने वायुवीजनासाठी सांगितलेली उपाययोजना देखील कार्यान्वयीत झाली आहे. ते काम देखील येत्या माहामध्ये पूर्ण होईल; याबद्दल मला संदेह नाही. त्यामुळे आता येता संपूर्ण माह तुम्हालाच सर्व बाजूनं रक्षक तट निर्माण करणे आवश्यक आहे. आपल्याला आपल्या कामाची जाणीव आहे याबद्दल मला खात्री आहे." तीक्ष्णा बोलायची थांबली.

तीक्ष्णा इतक्या स्पष्ट सगळंच बोलेल याची भीमा आणि अपाला दोघांनाही कल्पना नव्हती. त्यामुळे ते दोघे एकमेकांकडे बघायला लागले. त्यांच्या नजरेतील प्रश्न ओळखून तीक्ष्णा क्षणभर हसली आणि तिने अत्यंत अर्थपूर्ण नजरेने तिच्या मागे उभ्या असलेल्या तिघांकडे बघितलं. भीमा अजूनही गोंधळलेलाच होता. पण अपालाच्या लक्षात सगळंच आलं.

खालील नगरातून या तीन प्रमुखांचं याठिकाणी येणं म्हणजे तीक्ष्णाने इथल्या कामाला आवरतं घेण्यास सुरवात केली आहे; हाच अर्थ होत होता. त्यात देखील गोविंद आणि नाथ असूनही सगळंच स्पष्टपणे बोलली होती ती.... याचा अर्थ तिने तिचा शेवटचा डाव पुढे केला होता. कारण यासर्वांसमोर असूनही; घडणाऱ्या आणि बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दाला साक्ष असूनही.... गोविंद आणि नाथ आत्ता जे घडत होतं ते सगळं विसरून जाणार होते.

क्रमशः

Friday, April 15, 2022

अनाहत सत्य (भाग 20)

 अनाहत सत्य

भाग 20

भीमा आणि अपाला यांच्या बोलण्याचा आणि वागण्याचा वेगळा परिणाम नाथावर झाला. "अपाला, माझा असा समज होता की तुझं केवळ राजकुमार गोविंद यांच्यावर प्रेम आहे." अत्यंत दुखावलेल्या आवाजात नाथ म्हणाला.

नाथाकडे वळत अपाला म्हणाली; "नाथ, तुझा समज होता म्हणजे? माझं केवळ राजकुमार गोविंद यांच्यावर प्रेम आहे आणि ते कायम राहील. हे अबाधित सत्य आहे."

"अपाला, जर तुझं राजकुमार गोविंद यांच्यावर प्रेम आहे तर मग तुझं भीमाच्या जवळ त्याच्या मिठीत स्वतः जाणं कितपत योग्य वाटतं तुला?" नाथाने स्पष्ट शब्दात अपालाला प्रश्न केला.

"इथेच तुम्ही चुकता नाथ." अत्यंत गंभीर स्वरात अपाला म्हणाली.

"म्हणजे?" आश्चर्य वाटून नाथा म्हणाला.

"नाथा, माझं प्रेम आहे गोविंदवर. अगदी मनापासून! त्याच्याबद्दल माझ्या मनात ज्या भावना आहेत त्या इतर कोणाही बद्दल कधीच येणार नाहीत. माझ्या आजवरच्या जीवनाच्या कालखंडामध्ये गोविंद इतकं प्रिय असं कोणी मला भेटलंच नाही. अनेक पुरुष येऊन गेले आयुष्यात. पण ती भावनिक गुंतवणूक नव्हती. अनेकदा काही क्षण, काही काळ इतकीच मर्यादा होती. कधीतरी तर केवळ गरज होती त्यात्यावेळची. भीमाबद्दल सांगायचं तर ते देखील असंच शब्दांपालिकडे आहे न. भीमा आणि मी एकत्र आहोत ती कालगणना तुला करताच येणार नाही. आम्ही खूप काही एकत्र बघितलं आहे; अनुभवलं आहे. आमचं एकमेकांना समजून घेणं एका वेगळ्या पातळीवरचं आहे. माझं प्रेम आहेच भिमावर! पण गोविंदच्या बाबतीत जी भावना आहे तसं ते नाही." अपाला बोलत होती. मात्र नाथा अजूनच गोंधळत होता.

"अपाला, काय बोलते आहेस? तुझं राजकुमार गोविंदवर प्रेम आहे. ते इतकं आहे की तुला त्यांच्या पासून कुंजर झाला. तरीही तुझ्या आयुष्यात अनेक पुरुष येऊन गेले आहेत. तुझं भिमावर देखील प्रेम आहे. अपाला, माझ्या मतीला हे सगळं समजेनासं झालं आहे ग." नाथ म्हणाला. त्याच्या बोलण्यावरून तो गोंधळलेला तर वाटतच होता; पण त्याहूनही जास्त दुखावलेला होता; हे कळत होतं. अपालाच्या आयुष्यात आपल्या प्रिय राजकुमारा व्यतिरिक्त अनेक पुरुष येऊन गेले आहेत; हे ऐकून तो अस्वस्थ झाला होता.

"नाथा, तू गोंधळून किंवा दुखावून जाऊ नकोस. मी तुला नीट सांगतो. समजून घे. मला कळतं आहे की तुला हे समजणं अवघड आहे. तरीही....." भीमा म्हणाला.

"एक अक्षरही बोलू नकोस भीमा. तू..... मला वाटलं होतं की तू देखील राजकुमार गोविंद यांचा खरा मित्र आहेस. मात्र तू राजकुमारांच्या प्रिय स्त्रीवर प्रेम करतो आहेस. कितीतरी मोठा धोका आहे हा राजकुमारांसाठी." अचानक नाथा चिडला आणि त्याने भिमावर तो राग काढला.

"नाथा, उगाच काहीतरी बोलू नकोस. तुला वाटतं आहे तसं काही नाही. शांतपणे ऐकलंस तर कळेल तुला देखील." भीमा आवाज चढवत म्हणाला.

"अजून काही बाकी आहे का सांगायचं?" नाथ अजूनच चिडत म्हणाला.

"हो! खूप काही बाकी आहे नाथा. ऐकून घे." भीमा म्हणाला. तरीही नाथ तिथून निघून जाण्यासाठी उभा राहिला.

"थांब नाथा. विषय पूर्ण समजून घेतल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही." त्याला अडवत अपाला शांतपणे म्हणाली. नाथाने चिडून तिच्याकडे बघितलं. पण तिच्या नजरेतील बदल त्याला लक्षात आला. काय झालं ते नाथाला नक्की कळलं नाही; पण तो अचानक शांत झाला आणि खाली बसला.

"नाथा, माझं कोणावर प्रेम आहे किंवा नाही यापेक्षा देखील अगोदर तुला हा प्रश्न नको का पडायला की तीक्ष्णा, भीमा आणि मी.... आम्हाला तिघांनाही मृत्यू नाही." एवढंच बोलून अपाला थांबली आणि नाथाच्या अचानक मनात आलं की केवळ भीमा आणि अपाला एकमेकांच्या जवळ गेले आणि आपल्या मनात वेगवेगळ्या शंका उत्पन्न झाल्या. पण त्यामुळे अपालाने जे एक मोठं सत्य सांगितलं ते आपण क्षणात विसरलो. खरंच हे जाणून घेणं जास्त महत्वाचं ठरतं की तीक्ष्णा, अपाला आणि भीमा यांना मृत्यू नाही म्हणजे नक्की काय?

नाथाच्या मनातले विचार अपालाच्या लक्षात आले. ती त्याच्या समोर जाऊन बसली आणि म्हणाली; "नाथा, मी आता जे सांगते आहे ते शांतपणे ऐक आणि समजून घेण्याचा प्रयत्न कर."

"अपाला, तुझं भीमाच्या जवळ जाणं इतकं सहज होतं की तू काय बोलत होतीस ते एका क्षणात मी विसरून गेलो. पण हे सत्य आहे की जर खरंच मृत्यूवर तुम्ही विजय मिळवला असेल तर ते मला समजून घ्यायला आवडेल." नाथ म्हणाला.

"आम्ही मृत्यूवर विजय नाही मिळवलेला नाथा.... आम्हाला मृत्यू नाही!" भीमा देखील समोर येऊन बसत म्हणाला.

"म्हणजे? मी खरंच नाही समजलो." नाथ गोंधळून जाऊन म्हणाला.

"नाथा, ऐक! मी इथे येण्या अगोदर भीमा तुला मानव जन्म, उत्क्रांती आणि मानवीय संस्कृती याबद्दल सांगत होता. हो न?" अपाला अत्यंत समजूतदार आवाजात म्हणाली.

"हो!" मान हलवत नाथ म्हणाला.

"भीमाने तुला सांगितलं की इथे काम करणारे आम्ही सगळेच वेगळे आहोत. ते कसे हे समजून घेण्यासाठी त्याअगोदर तुला बरंच काही समजून घ्यावं लागेल. मंदिर निर्मितीसाठी काहीसा आड बाजूचा जंगलातील डोंगरकडा आम्ही का निवडला? या मंदिराचं गेल्या आठ वर्षातील काम तू स्वतः बघतो आहेस नाथ. तुला काहीच प्रश्न पडले नाहीत का?" अपालाने नाथाच्या डोळ्यात खोल बघत विचारलं.

"अपाला, प्रामाणिकपणे सांगायचं तर मनात खूप प्रश्न आहेत. पण मला प्रश्न विचारण्याची परवानगी नाही. मी केवळ दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी इथे आलो आहे." नाथाने मान खाली घालत म्हंटले.

"नाथ, आत्ता इथे भीमा, तू आणि मी; फक्त आपण तिघे आहोत. तू मनात असणारे सगळे प्रश्न विचार नाथा. तुला सगळी उत्तरं देईन मी. अगदी सगळी." अपाला म्हणाली. "अपाला???" भीमा काहीतरी बोलणार इतक्यात अपालाने त्याला थांबवलं. "भीमा, सगळं समजून घेण्याचा हक्क आहे तो केवळ दोघांना. गोविंदला आणि नाथाला. अर्थात महाराज कृष्णराज यांना देखील तितकाच अधिकार आहे. मात्र मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही; किंवा त्यांच्या मनात असे काही प्रश्न आहेत तरी का हे देखील मला माहीत नाही. पण हे मी नक्की सांगू शकते की नाथाला खूप काही जाणून घ्यायचं आहे. मी ती उत्सुकता त्याच्या डोळ्यात कायम बघितली आहे. त्यामुळे आत्ता जर आपण यावर बोलतो आहोत; तर नाथाने सगळंच समजून घेणं योग्य ठरेल." अपाला म्हणाली.

"जसं तू योग्य समजशील तसं अपाला. तुला देखील माहीत आहे की जरी भागीनेय तीक्ष्णा हिने सांगितलेलं काम पूर्ण करणं आणि या उच्चतम निर्मितीचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य असलं तरीही मी तुझ्या तुझ्या इच्छेबाहेर नाही." भीमा म्हणाला.

"अपाला, मग तूच मला सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊन तू सुरवात कर. हीच जागा का?" नाथाने विषयाला सुरवात केली.

"ही जागा!" एक दीर्घ सुस्कारा सोडत अपाला बोलायला लागली. "नाथा, हीच जागा कारण या पर्वतमाळांचं आयुष्य कोणालाही माहीत नाही."

"पर्वताचं देखील आयुष्य असतं का अपाला?" नाथाने आश्चर्याने विचारलं.

"नाथा, आयुष्य सगळ्यांना असतं. नाथा, तू आत्ता जिथे राहातोस ते नगर, तुमचे महाराज कृष्णराज, हे राज्य, त्यापुढे जाऊन अनेक राज्ये आणि असं करता करता ही संपूर्ण वसुंधरा... आणि या वसुंधरेतील प्रत्येक अंश सगळ्यांना आयुष्य आहे. तर... या पर्वतांचं स्वतःचं एक आयुष्य आहे. जे तू किंवा मी कोणीही मोजू शकणार नाही; इतकं पुरातन आहे. या जगाच्या निर्मिती सोबत आपोआप निर्मित झालेले आहेत हे पर्वत. संपूर्णपणे निसर्ग निर्मित आणि निसर्गाने अत्यंत प्रेमाने जोपासलेले हे पर्वत आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. कारण याच पर्वताच्या... विशेषतः हे मंदिर जिथे निर्मित होत आहे त्याच्या खाली आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात; या डोंगरकड्यांच्या खाली आमचं नगर वसलेलं आहे. आमची संस्कृती आहे इथे.

नाथा, काही एक न बोलता ऐक. हो! मी, भीमा आणि तीक्ष्णा आम्ही मानवीय उत्क्रांतीच्या सुरवातीच्या काळातील आहोत. भीमाने तुला सांगितलं की इथे हे अत्यंत अवघड आणि शक्तीचं काम करणारे कोण आहेत. त्याचप्रमाणे आम्ही त्यांच्याहुन थोडे वेगळे पण त्यांच्याच प्रमाणे मानवीय उत्क्रांतीमधील एका टप्यातले आहोत. आम्ही म्हणजे एका मानवीय उत्क्रांती टप्प्यातील संपूर्ण समूहातील काही 'आम्ही'. याच टप्प्यातील काही वसुंधरेच्या इतर भागामध्ये स्थायिक झाले. हळूहळू आम्ही जिथे स्थायिक झालो तिथल्या वातावरणात रमून गेलो. मात्र वसुंधरेतील इतर ठिकाणी देखील 'आम्ही' होतोच.

नाथा, इथे हे समजून घेणं तुला अत्यंत आवश्यक आहे की केवळ बौध्दिकतेला महत्व देऊन भावनिकता दूर सारत या निसर्गसुंदर वसुंधरेला जपणारे असे 'आम्ही' आहोत. उत्क्रांतीच्या उच्चतम बिंदूला पोहोचल्यानंतर स्वतःचा ह्रास होऊ न देता त्या उच्चतम बिंदूवर स्वतःला गोठवून टाकणारे 'आम्ही' आहोत. आम्ही उत्क्रांतीची सुरवात आहोत. आम्ही परमोच्च बिंदूवरील अत्यंत प्रगत मानव आहोत नाथा. आम्ही अनेक संस्कृती बघितल्या आहेत आणि बघणार आहोत." अपाला बोलताना थांबली.

तिच्या लक्षात आलं की नाथाला हे काहीही लक्षात येत नाही आहे. त्यामुळे तो दबून जातो आहे. ती हसली आणि नाथाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली; "नाथा, केवळ उत्क्रांती हा शब्द नाही... ती एक स्थिती आहे. त्या स्थितीला पोहोचण्यासाठी अनेक सहस्त्र आयुष्यांचा काळ जावा लागतो. आमच्यामध्ये अशी काही गुणसूत्र निर्माण झाली की ज्यामुळे आम्ही भावनांपासून दूर गेलो. परंतु त्यामुळे आम्ही कोणत्याही विषयांच्या गर्भापर्यंत पोहोचू शकलो. त्यातूनच ग्रह-तारे, हे विश्व, ही वसुंधरा आणि तिच्या पोटातील अनेक गुपितं याविषयीचं ज्ञान आम्हाला उमगलं. त्यासोबतच निर्मिती आणि जपवणुक यांचं महत्व समजलं. आमच्या सोबत अनेक मानवीय प्रजाती निर्माण झाल्या होत्या. त्या मात्र भावनिकता, मोह, राग, मत्सर या भावनांमध्ये अडकत गेल्या. त्यामुळे जरी त्या त्यांच्या वेगाने प्रगत झाल्या तरी त्यांचा ह्रास होणं अपरिहार्य होत. दुर्दैवाने हे मानव स्वतःचा ह्रास करून घेताना या वैविध्यपूर्ण वसुंधरेला देखील संपवून टाकतील हे सत्य आमच्या मानवीय प्रजातीला लक्षात आलं; आणि म्हणून मानवीय जीवन शृंखला अविरत पुढे सरकण्यासाठी आम्ही मानवाचे रक्षक होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय झाल्यानंतर आमच्या या मानवीय प्रजातीमधील काही प्रमुखांनी निर्णय घेऊन आमच्यात गट बनवले आणि आत्ताच तुला सांगितल्याप्रमाणे वसुंधरेच्या विविध प्रदेशात आम्ही विखरून राहू लागलो. आम्ही स्वतःला या विविध मानव प्रजातींपासून आणि त्यांच्या विकसित होत जाणाऱ्या संस्कृतींपासून वेगळं ठेवलं. जेणेकरून कोणत्याही भावणीकतेला बळी न पडता पुढील संस्कृतीसाठी निर्मिती करत राहाणं आम्हाला शक्य होईल. आमचे जे समूह विविध ठिकाणी होते; त्या आम्ही सर्वांनी ग्रहांच्या आणि ताऱ्यांच्या मदतीने एकमेकांशी संपर्क ठेवला. गेली अनेक आयुष्य आमच्या संपर्काचे ठिकाण भारतवर्षाच्या उत्तरेकडे होते. मात्र काही कारणांमुळे आम्हाला ते बदलणे आवश्यक झाले. नाथा कदाचित तुझा विश्वास बसणार नाही; पण हे ठिकाण बदलणे आवश्यक आहे हे आम्हाला समजून देखील सहस्त्र आयुष्यांचा काळ लोटला आहे. त्याचवेळी आमच्यातील काहींनी त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीने हे ठिकाण योग्य आहे हे जाणले. आम्ही इथे आलो. परंतु त्यावेळेपर्यंत तुम्ही इथे तुमची संस्कृती निर्माण केली होती. एक अत्यंत मोठे असे महाभारतीय युद्ध त्यावेळी घडत होते. ह्रास थांबवण्याची वेळ आमच्या हातातून गेली आहे हे आमच्या लक्षात आलं. त्यामुळे काही काळ - म्हणजे काही सहस्त्र काळ आम्हाला थांबणं आवश्यक झालं. म्हणून मग आम्ही आमचं नगर या निसर्गनिर्मित अत्यंत परिपूर्ण अशा डोंगरकाढ्याच्या गर्भात वसवलं. त्यानंतर आम्ही तिथेच होतो. मात्र काही काळापासून आमच्या नगरातील काही त्रुटींमुळे आम्हाला काही व्याधीं होतील हे लक्षात आलं. त्यासाठी आमच्या नगराचं वायुविजन योग्य करणं आवश्यक होतं. त्यामुळे परत एकदा वसुंधरेच्या पृष्ठभागावर येऊन आम्हाला काही निर्मिती आणि काही बदल करावे लागणार होते. म्हणून मग तुमच्या महाराज कृष्णराज यांना काही संकेत पाठवून आम्ही आमच्या इथल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आणि त्यांच्या परवानगीने इथे आम्हाला आवश्यक असे काम सुरू केले." अपाला बोलत होती. त्याचवेळी तिच्या लक्षात आलं की नाथाच्या चेहेऱ्यावरील भाव अचानक बदलले आहेत. त्यामुळे बोलणं थांबवून तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं.

"अपाला, एक प्रश्न मला सतत सतावतो आहे... जर तुमची मानवीय प्रजाती इतकी प्रगत होती तर तुम्हाला या वसुंधरेच्या पृष्ठभागावर येताना किंवा काहीही बदल करताना इतर कोणत्याही मानवीय संस्कृतीची परवानगी का हवी होती?" नाथाने स्पष्ट शब्दात तिला प्रश्न केला.

"नाथा, आम्ही प्रगत आहोत... या तीन शब्दांमध्येच त्याचं उत्तर आहे. तरीही तुझ्या मतीला पटेल अशा प्रकारे सांगते. हे बघ, जरी आम्ही प्रगत असलो तरी आम्ही वसुंधरेच्या पृष्ठावर राहण्याचा आमचा हक्क सोडला आहे. त्यामुळे आत्ता जी संस्कृती वास करते आहे त्या संस्कृतीला कोणतीही ठेच पोहोचू न देता आम्ही आमचे कार्य करणे योग्य ठरते." हसत अपाला म्हणाली.

"मान्य अपाला. तरीही...." नाथाला थांबवत भीमा म्हणाला; "हो आम्ही मनात आलं तर काहीही करू शकतो; तरीही... मूलतः आम्ही नष्ट करणे, हक्क सांगणे, हिसकावून घेणे या प्रकारच्या कृत्याचा निषेध करत असल्याने इथे प्रकट होताना परवानगी असणे आवश्यक वाटले आम्हाला. नाथा.... अरे तुला अजूनही एक गोष्ट लक्षात नाही का आली की आम्ही जसे आहोत तसेच आहोत?"

"भीमा तू जसा आहेस तसाच असणार ना?" नाथाने नकळून भीमाला प्रश्न केला. त्यावर मंद हसत भीमा म्हणाला; "अरे, आम्ही आत्ता हे मंदिर निर्माण करतो आहोत... तू गेल्या सात वर्षातील काम बघतो आहेस..... मात्र आम्ही इथे गेली वीस वर्ष काम करतो आहोत... हे सत्य तर तुला माहीतच आहे. नाथा... गेली वीस वर्ष तीक्ष्णा, अपाला आणि मी इथे आहोत... तुझ्या समोर जसे आहोत तसेच!!!"

भीमाचा रोख लक्षात येऊन नाथा विचारात पडला आणि भीमा नक्की काय म्हणतो आहे हे कळून एकदम गडबडून गेला. त्याच्या चेहेऱ्यावरील होणारे बदल बघत भीमा आणि अपाला मंद हसत होते.

क्रमशः

Friday, April 8, 2022

अनाहत सत्य (ग 19)

 अनाहत सत्य

भाग 19

"गोविंद तुला देखील माहीत आहे हे दोन्ही शक्य नाही." अत्यंत स्थिर आवाजात भीमा म्हणाला.

"का? का शक्य नाही?" गोविंदच्या ऐवजी नाथानेच प्रश्न केला.

भीमा काही क्षण नाथाकडे स्थिर नजरेने पहात राहिला. सर्वच सत्य नाथा समोर उघडं करावं किंवा नाही याबद्दल तो मनात विचार करत होता. पण मग त्याला जाणवलं की नाथाला संपूर्ण सत्य माहीत नसलं तरी आतापर्यंत काहीतरी वेगळं आहे याची कल्पना आणि नाथाला जरी सुमंत कल्याण यांनी काही उद्दिष्टाने पाठवलं असलं तरी तो दोन्ही बाजू समजून घेऊ शकेल... एकदा मनातला विचार पक्का झाल्यानंतर भीमा शांतपणे बोलायला लागला;

"नाथा, तुला आतापर्यंत हे लक्षात आलं आहे की मी, अपाला, तीक्ष्णा आणि आमच्या सोबत सुरवातीपासून इथे काम करणारे सगळेच थोडे वेगळे आहोत. मात्र ते वेगळेपण नक्की काय ते कदाचित तुला कळलं नसेल. गोविंदला कदाचित अपालाने सगळंच संगीतलेलं असू शकतं. त्यामुळे आज मी तुला एक वेगळं सत्य सांगतो आहे.... आजवर कोणालाही माहीत नसलेलं... आणि भविष्यात देखील कोणालाही कळणार नसल्याने; हे सत्य कायमच अस्पर्श अनाहत राहणार आहे. मी जे सांगणार आहे ते माझं आणि माझ्यासारख्यांच सत्य असल्याने ते तू मान्यच करशील. परंतु तू जर कधी कोणालाही याबद्दल सांगायला गेलास तर तुला वेड्यात काढून लोक दूर ढकलतील हे लक्षात ठेव....

तर... नाथा.... गोविंद.... आम्ही सृष्टी निर्माते आहोत. परंतु देव नाही. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर या पृथ्वीची निर्मिती झाली आणि त्यानंतर इथे सजीव निर्मित झाले. त्यांच्यातील विविध बदल आणि वेगवेगळ्या सजीवांमधील संकरांमधून वेगवेगळे जीव निर्मित होत गेले. त्याच प्रमाणे मानवाचा देखील जन्म झाला. सर्वसाधारणपणे तुम्ही मानता की मानव निर्मिती ही माकडांपासून सुरू झाली. परंतु नीट विचार कर नाथा; जर मानव माकडापासून निर्माण झाला तर मग माकड कसं अजूनही अस्तित्वात असेल? म्हणजे जर माकडापासून मानव विकसित झाला तर मग त्याचं माकडपण असणं खरं तर संपलं पाहिजे न? पण तरीही माकड आजही आहेच की. त्यामुळे माकड हा एकच प्राणी नाही मानवाच्या निर्मितीमध्ये. माकडाच्या मादीचा इतर कोणत्यातरी प्राण्यासोबत संकर होऊन मानव निर्मिती झाली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर एका माकड मादीचा संकर एकदा नर माकडाशी झाला आणि एकदा इतर कोणत्या तरी प्राण्याशी झाला. इतर कोणत्या तरी प्राण्यापासून जे मूल झालं तो म्हणजे पहिला मानव. आणि तिचा नर माकडाशी संकर झाल्याने जे मूल झालं ते मात्र माकडच राहिलं.

जो पहिला मानव झाला; तो स्वतःला जगवू शकला. मग त्याने इतर कोणाशीतरी संकर केला. अजून एक मानवीय जीव निर्माण झाला. तो जगला. अशा प्रकारे मानव उत्पत्ती आणि वाढ व्हायला लागली. सुरवातीला मानव देखील इतर प्राण्यांप्रमाणे जंगलातून राहात होता. त्याच्याहुन कमी ताकदीचे प्राणी मारून खात होता. मूलतः त्याच्यात माकडाचा अंश असल्याने हळूहळू त्याने स्वतः सारखे इतर शोधले आणि तो झुंडीतून राहायला लागला. त्याने त्याची प्रजा वाढवली. माकडांप्रमाणे त्यांच्यामध्ये एक प्रमुख नर आणि इतर त्याचे अनुयायी असे त्यांचे जीवन होते."

भीमा स्वतःच्या तंद्रीमध्ये बोलत होता. नाथा आणि गोविंद मन लावून ऐकत होते. नाथाने भीमाला थांबवत म्हंटलं; "भीमा, एक प्रश्न विचारू?"

तंद्रीतून जागा होत भीमाने नाथाकडे बघितलं.

"आपण इतर प्राण्यांप्रमाणे होतो तर मग आपण इतके वेगळे कसे झालो?" नाथाने विचारलं.

भीमा मनापासून हसला आणि म्हणाला; "नाथा, भाषा! आपण बोलतो. तू इतर कोणताही प्राणी बोलताना बघितला आहेस का?"

"त्यांची भाषा असणारच न भीमा?" नाथाने भाबडेपणाने म्हंटलं.

"नक्कीच. पण त्यांची भाषा म्हणजे मादीला भुलवणे आणि धोका असल्यास इतरांना सावध करणे इतकीच मर्यादित असते नाथ. आपण मात्र भाषा या बाबतीत खूप पुढे गेलो आहोत. आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपण आपल्याला मिळालेली माहिती संकरित करतो. आपण त्याला ज्ञान म्हणतो. असं काही इतर कोणत्याही प्राण्यांमध्ये होतं का? नाथा, केवळ आपण बोलतो ती भाषा इतकाच का भाषेचा अर्थ रे? भाषा म्हणजे संस्कृती... प्रकृतापासून सुरू होऊन आज तुम्ही बोली भाषा म्हणून वापरता आहात त्या सर्वसमावेशक संवादाबद्दल मी बोलतो आहे." भीमा म्हणाला.

"अगदी बरोबर आहे भीमा. नाथ, मला देखील या संपूर्ण काल प्रवाहाबद्दल अपाला सांगायचा प्रयत्न करते. पण अजूनही काही गोष्टी माझ्यासाठी अगम्यच आहेत." गोविंद म्हणाला. "पण भीमा, तू सांग. तुझ्याकडून देखील समजून घ्यायला आवडेल मला."

"आणि मला देखील. अर्थात मानवीय इतिहासाबद्दल आणि मानव निर्मिती बद्दल.... आणि भीमा, मुळात हे माहीत करून घ्यायला आवडेल की तू कोण आहेस! अपाला, तीक्ष्णा आणि ही सर्वच कामकरी कोण आहेत? " हसत नाथ म्हणाला.

"ठीक नाथा! सगळं सांगतो. मला जमेल तितकं सोपं करून. अर्थात त्यावर विश्वास ठेवायचा किंवा नाही हा तुमचा प्रश्न उरतो. कारण तू हे जरी इतर कोणालाही सांगायला गेलास तरी कोणीही ते खरं मानणार नाही. असो! तर... मानव उत्पत्ती मी तुला सांगितली. हळूहळू मानव वाढत होता. त्याच्या शरीरात आणि त्याचवेळी पृथ्वीतलावर बदल होत होते. या सर्वच बदलांना जे सहन करू शकले ते जगत गेले. स्वतःत बदल घडवत मानव हळूहळू उत्क्रांत होत होता. या सुंदर वसुंधरेतील विविध प्रांतात तो विखरत होता..... आणि या उत्क्रांतीच्या प्रवासात मानवामधील होणारे बदल अनेक स्तरांवरचे होते. इथेच जे एक वेगळेपण निर्माण झाले ते म्हणजे तुम्ही आणि आम्ही नाथा." इतकं बोलून भीमा थांबला. त्याने स्थिर नजरेने नाथाकडे आणि गोविंदकडे बघितलं.

"तुम्ही आणि आम्ही? काय आहे वेगळेपण भीमा? जर असं म्हंटलं की तू खरंच भीमकाय आहेस; तर आमचे सेनापती आणि त्यांचा पुत्र देखील तुझ्या तोडीचे आहेत. तू 'तुम्ही आणि आम्ही' म्हणतो आहेस. याचा अर्थ तू एकटा नाहीस. मग तुमच्या सोबत आलेले; अपाला आणि तीक्ष्णाच्या हाताखाली काम करणारे हे सर्व तर पूर्णपणे वेगळे दिसतात भीमा. बुटके, कमी वजनाचे, भाषिक ज्ञान कमी असलेले, बुद्धीची पोहोच कमी असलेले... मुळात गुलाम वाटतील असे. मग हे 'तुम्ही आणि आम्ही' काय आहे?" गोविंदने विचारलं.

"सांगतो." भीमा शांतपणे म्हणाला. "गोविंद, हे खरं आहे की इथे दगड उचलणारे हे सगळेच दिसायला अत्यंत किरकोळ आणि शक्तीहीन वाटतात. पण तुला त्यांच्या शक्तीची कल्पना आलीच असेल आतापर्यंत. अगोदर त्यांच्याबद्दल माहिती देतो. म्हणजे तुमच्या मनातील शंका कमी होईल. हे मानवीय इतिहासातील आश्चर्य आहेत. यांचे पूर्वज कधीतरी एका बेटावर गेले. अचानक आलेल्या सागर वादळामुळे ते तिथे अडकले. सुरवातीस पाण्यावर तरंगायची कला येत नसल्याने ते तिथेच राहिले आणि वाढले. तो जमिनीचा तुकडा असा काही फार मोठा नव्हता. त्यामुळे तिथे मिळणारे अन्न खूप कमी होते. त्यातून ज्या मानवाने तो बदल स्वीकारला आणि तग धरू शकला तो हा. कमी अन्न आणि तिथे राहण्यास योग्य असे बदल होत हे सगळे जेमतेम आपल्या कंबरेपर्यंत येतील इतके वाढले आणि मी एका हाताने उचलू शकेन इतक्याच वजनाचे राहिले. सतत बदलणाऱ्या वातावरणात टिकण्यासाठी ते चपळ झाले. पण या सगळ्या बदलांना सामोरे जाताना दुर्दैवाने त्यांच्या मेंदू फार विकसित झाला नाही. त्यामुळे भरपूर शक्ती, कमी आहारात देखील सतत आणि खूप जास्त काम करण्याची ऊर्जा त्यांच्यात निर्माण झालीय. बुद्धी कमी असल्याने सांगितलेले काम विचार न करता प्रचंड गतीने आणि शक्तीने ते पूर्ण करतात."

"ठीक... अगदी मान्य. मग हे 'आम्ही आणि तुम्ही' मधले तुमच्यतले कसे?" नाथाने संभ्रमित होत विचारलं.

"ते देखील सांगतो. आता 'आम्ही' बद्दल अजून थोडं. तर हे कामकरी झाले. थोडं मी आणि अपाला यांच्याबद्दल." भीमा म्हणाला.

"म्हणजे?" गोविंदने भीमाला थांबवत विचारलं; "तू आणि अपाला? फक्त? मग तीक्ष्णा? ती?"

"मी सगळं सांगतो आहे गोविंद. थोडा धीर धर." हसत भीमा म्हणाला.

"तर मानवामध्ये जे एक वेगळेपण निर्माण झाले ते म्हणजे तुम्ही आणि आम्ही; हे मी म्हणालो त्या आम्ही मध्ये देखील अनेक स्तर आहेत गोविंद. मुळात अगोदर तुम्ही म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून कोण ते सांगतो. भावनिकता, नात्यात गुंतणे, अधिकार गाजवणे, द्वेष करणे, मोहात गुंतणे... अशा सगळ्याच भाव भावनांचे मिश्रण असलेली मानसिकता घेऊन उत्क्रांत होत गेलात ते तुम्ही. केवळ बौध्दिकतेला महत्व देऊन भावनिकता दूर सारत या निसर्गसुंदर वसुंधरेला जपत मानवाची उत्क्रांती आणि ह्रास यांच्या मधला दुवा म्हणजे आम्ही. आमच्यामध्ये भावना कमी आहेत गोविंद. आम्हाला नातं निर्माण करायला आवडतं. पण त्यात आम्ही गुंतत नाही. मोह, राग, प्रेम हे आमच्यात देखील आहेत; पण अत्यंत कमी प्रमाणात. गोविंद, म्हणूनच तुझा प्रेमळ स्वभाव अपालाला आवडतो; पण ती फक्त तुझ्यात गुंतलेली नाही. ती तिचं काम आणि जवाबदरी याचं देखील पूर्ण भान ठेऊन आहे. तू मात्र नगरात परत जाण्याची तुझी जवाबदरी विसरून इथे तिच्यासाठी थांबलेला आहेस." भीमा अत्यंत गंभीरपणे बोलत होता.

भिमाचं बोलणं ऐकून गोविंदला धक्का बसला. त्याची नजर पाणावली. "भीमा, म्हणजे तुला म्हणायचं आहे की अपाला माझ्या सोबत कधीच येणार नाही?"

गोविंदकडे मान वळवत थंड नजरेने भीमाने नकारार्थी मान हलवली. त्याक्षणी गोविंद मनातून हलला. तो धडपडून उभा राहिला आणि मागे वळूनही न बघता चालू पडला. नाथा देखील त्याच्या मागे निघाला. पण भीमाने नाथाचा हात धरून त्याला थांबवलं.

"जाऊ दे त्याला नाथा. काही सत्य एकट्यानेच स्वीकारावीत. त्याक्षणी जर सांत्वनाचा खांदा मिळाला तर बुद्धी काम करेनाशी होते." भीमा शांतपणे म्हणाला.

"तुला नक्की काय म्हणायचे आहे भीमा? मला कळलं नाही." नाथा थांबत आणि परत बसत म्हणाला.

"गोविंदला हे स्वीकारणं खूप जड जाणार आहे की अपाला त्याच्या सोबत नगर प्रवेश करणार नाही. पण त्याचं कारण भावनिकता कमी आहे हे नाही." भीमा म्हणाला.

भिमाकडे गर्रकन नजर वळवत नाथा आश्चर्याने म्हणाला; "अरे! मग? मग काय कारण आहे? आणि जर तुला हे माहीत आहे तर तू ते गोविंदला सांगायला नकोस का? त्याला जर कळलं की त्याने अपालाला भावनिक हाक दिली तर ती त्याच्या सोबत थांबेल; तर तो त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागेल न."

"हो. खरं आहे तुझं म्हणणं नाथा. पण एक लक्षात घे. हे मी सांगितल्या नंतर पुढे गोविंदने काय करावं हे देखील तो मलाच विचारेल. त्यामुळे तो त्याच्या मनातील खरी भावना शोधणार नाही; पुढे जाऊन जर त्याचा निर्णय चुकला तर तो आयुष्यभर एकच म्हणत राहील की त्याने भिमाचं ऐकून निर्णय घेतला; आणि सगळं चुकीचं घडलं. हाच अजून एक मोठा फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात नाथा. तू बघतो आहेस की अपाला आणि तीक्ष्णा दोघींमध्ये सतत वाद होत आहेत. पण तरीही एका क्षणी अपाला जेव्हा तिच्या निर्णय क्षमतेबद्दल बोलते त्यावेळी तीक्ष्णा वाद थांबवून तिथून निघून जाते. कारण तीक्ष्णाला माहीत आहे की निर्णय अपालाने घ्यायचा आहे. या निर्णयापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात तीक्ष्णाचा हस्तक्षेप योग्य नाही." भीमा म्हणाला.

"ओह! बरं.... भीमा मला अजून एक गोष्ट सांगशील?" नाथाने थोडं थांबून विचारलं. त्याच्या प्रश्नातच 'विचारू की नको' ही डोलायमानता दिसत होती. भीमाने त्याच्याकडे हसत बघितलं आणि म्हणाला; "तू विचारायची गरज नाही नाथा. जे ऐकण्यासाठी गोविंद थांबला नाही ते तुला समजून घ्यायचं आहे. मघा बोलताना मी केवळ माझा आणि अपालाचा उल्लेख केला; तीक्ष्णाचा नाही. असं का... ते तुला समजून घ्यायचं आहे. खरं न? पण कसं विचारू असा प्रश्न पडला आहे."

भिमाकडे बघत नाथाने हसत मान हलवली.

"तीक्ष्णा! ती खूपच वेगळी आहे नाथा. ती आणि तिच्यासारखे अजून काही. तिच्यामध्ये भावणीकतेचा लवलेश देखील नाही. तिचं काम हेच तिचं आयुष्य आहे. निर्मिती - जपवणूनक - झालेला ह्रास भरून काढणं आणि परत स्वस्थानी जाणं; इतकंच माहीत आहे तिला. आणि.........." असं म्हणून भीमा थांबला.

"आणि?" नाथा नकळत म्हणाला.

"आणि तिला मृत्यू नाही नाथा.... पण हे तुला भीमा सांगणार नाही. कारण हे सत्य त्याचं आणि माझं देखील आहे." मागून अपालाचा आवाज आला आणि नाथाने गर्रकन मागे वळून बघितलं.

"तुझ्या असण्याची जाणीव झाली म्हणूनच मी बोलायचा थांबलो होतो अपाला. मला खात्री आहे की यापुढे जे काही सांगणं आवश्यक आहे ते तू माझ्याहूनही जास्त चांगल्या प्रकारे सांगशील." अपालाकडे बघत प्रेमळ हसत भीमा म्हणाला.

"भीमा... तू तुझ्या नावाला अगदी शोभून दिसतोस. भीमतटरक्षक! सर्वच बाजुंनी तू रक्षण करतो आहेस. माझं... आपलं... आणि या निर्मितीचं!" त्याच्याकडे जाऊन त्याला अत्यंत प्रेमाने मिठी मारत अपाला म्हणाली. तिला जवळ घेत भीमा हसला.

क्रमशः

Friday, April 1, 2022

अनाहत सत्य (भाग 18)

 अनाहत सत्य

भाग 18

"प्रणाम सुमंत." राजवाड्याच्या विशेष कक्षात प्रवेश करताच समोर आलेल्या सुमंतांना वाकून प्रणाम करत तीक्ष्णाने म्हंटले.

तिच्याकडे एक तीव्र कटाक्ष टाकत सुमंतांनी केवळ मान हलवली आणि ते तिथून निघून गेले.

"या भागीनेय तीक्ष्णा." महाराज कृष्णराज यांनी तीक्ष्णाचं स्वागत केलं.

"महाराज, आपण माझा उल्लेख केवळ तीक्ष्णा करावा अशी विनंती मी आपणास अनेकदा केली आहे." अत्यंत आदरयुक्त आवाजात तीक्ष्णा म्हणाली.

"आपण मला अत्यंत आदरणीय आहात तीक्ष्णा. जर मला मोठी भगिनी असती तर ती तुमच्या सारखीच असती; असं नेहेमी वाटतं मला. म्हणूनच आपल्या इतर सहकाऱ्यांप्रमाणे मी देखील आपणास भागीनेय म्हणतो. असो. आपण निरोप पाठवून भेटीची वेळ मागितलीत त्यावेळीच मला लक्षात आलं की आपण मागील भेटीमध्ये सांगितल्या प्रमाणे श्रीशंभो मंदिर निर्मितीचे कार्य पूर्ण झाले असेल." अत्यंत मऊ आवाजात महाराज कृष्णराज बोलत होते.

"आपले अनुमान अत्यंत योग्य आहे महाराज. फारतर एका मासामध्ये मंदिर निर्मिती पूर्ण होणार आहे. त्यानंतर योग्य मुहूर्त बघून आपण मंदिर प्रवेश करावा आणि श्रीशंकर अभिक्षित करून मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करावेत; ही विनंती घेऊन मी आपणाकडे आले आहे." तीक्ष्णा शांतपणे बोलत होती.

"आपला विचार अत्यंत सुयोग्य आहे भागीनेय तीक्ष्णा." महाराज म्हणाले. त्यानंतर काही क्षण विचार करून महाराजांनी थेट तीक्ष्णाकडे बघत प्रश्न केला; "केवळ उत्सुकता म्हणून काही विचारले तर चालेल का?"

"महाराज, असे म्हणून आपण मला लाजवता आहात." हात जोडत तीक्ष्णा म्हणाली.

"हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही तीक्ष्णा." स्थिर आवाज आणि नजरेने महाराज कृष्णराज म्हणाले.

"केवळ उत्सुकता... हा शब्द प्रयोग देखील आपल्याकडून अपेक्षित नाही महाराज." तेवढ्याच स्थिर आवाजात महाराजांच्या नजरेला नजर देत तीक्ष्णा म्हणाली.

महाराजांना तीक्ष्णाचे बोलणे अजिबात पटले नाही. ते मनातून उसळले. मात्र चेहेरा अत्यंत शांत ठेवत ते हसले आणि म्हणाले; "भागीनेय तीक्ष्णा, मला आपल्याला कोणतीही आठवण करून देण्याची गरज नाही. तरीही.... आपल्या प्रथम भेटीमध्ये आपण स्पष्ट उल्लेख केला होता की मला मिळालेल्या दैवी संकेतानुसार आपण मंदिर बांधणार आहात; मात्र त्याव्यतिरिक्त त्या संपूर्ण भागामध्ये काय चालते त्याकडे मी पूर्ण दुर्लक्ष करावे. आपल्या कामामध्ये आमची कोणतीही मदत आपण स्वीकारली नाहीत. आम्ही ऐकून आहोत की आपण निर्माण केलेलीे मंदिर वास्तू आजवर भूतलावर कुठेही अस्तित्वात नाही अशी आहे. आपण मंदिर बांधणी कळासापासून सुरू केलीत असे आम्हास सांगितले गेले आहे.

भागीनेय तीक्ष्णा मूलतः ते ठिकाण म्हणजे संत महात्म्यांच्या निवासाचे असल्याने; त्यात नगरापासून अत्यंत दूर जंगलामध्ये क्रूर आणि हिंस्त्र प्राणांचा सहज वावर असलेले असल्याने यापूर्वी तेथे कोणीही पोहोचले नव्हते. तेथील गुंफांमधून तपस्वी राहात आले आहेत. त्यामुळे तिथे मानव निर्मित काही गुंफा आहेत यापलीकडे तेथील कोणतीही माहिती आमच्याकडे नव्हती. त्यामुळेच आपल्या पहिल्या भेटीमध्ये आपण माझ्या दृष्टांताचा उल्लेख करून त्या गुंफांमध्येच मंदिर निर्मिती संदर्भातील प्रस्ताव जेव्हा आमच्या समोर ठेवलात; त्यावेळी आम्ही पूर्ण गोंधळून गेलो होतो. नगरापासून इतक्या दूर गर्द वृक्षांनी दाटलेल्या आणि क्रूर प्राणी सहज फिरत असणाऱ्या त्या गुंफांच्या रांगांमध्ये सर्वसामान्य कसे पोहोचतील हा एकच प्रश्न मनामध्ये होता. मात्र आपण कामास सुरवात केलीत आणि जणू काही तिथे गावच वसले गेले."

महाराज बोलायचे थांबले आणि तीक्ष्णाच्या चेहेऱ्यावर एक मंद हास्य निर्माण झाले.

"महाराज, आपल्या मनातील उत्सुकतापूर्ण प्रश्न मात्र अजूनही आपल्या मनातच आहे." तीक्ष्णा म्हणाली. तिच्या बोलण्याने महाराज देखील मोकळेपणी हसले आणि म्हणाले; "भागीनेय तीक्ष्णा, आपल्या सोबतच्या प्रत्येक भेटीमध्ये मला आपल्यामधील नवीन गुण पाहायला मिळतो. भागीनेय, माझा प्रश्न अत्यंत सरळ आहे; तो सोपा आहे की नाही ते मात्र आपण ठरवावे."

"महाराज, मला जेवढी माहिती आहे त्याच्या आधारावर मी आपणास सर्वात योग्य ते उत्तर देईन असा शब्द देते." तीक्ष्णा गंभीर आवाजात म्हणाली.

"भागीनेय, आम्ही राज्य चालवतो. त्यामुळे अशी राजकीय भाषा आम्हास शोभते." महाराज हसत म्हणाले.

"महाराज, कदाचित आम्ही देखील असेच काहीतरी चालवत असू...." तीक्ष्णा गूढ हसत म्हणाली.

"भागीनेय आपला रोख नाही कळला." महाराज ताठ बसत म्हणाले.

त्यांच्या बसण्याच्या पद्धतीमध्ये झालेला बदल तीक्ष्णाच्या नजरेतून सुटला नव्हता. स्वतःला सावरत ती मनात म्हणाली; 'सांभाळ तीक्ष्णा! जितके आवश्यक आहे तितकेच बोलले पाहिजे; नाहीतर आपल्याच शब्दांच्या जंजाळामध्ये आपण गुंततो... हा पहिला धडा देताना आर्य चणक्यांनी थेट आपल्याकडे बघितले होते; ते याच क्षणाचा विचार करून तर नव्हे.'

मात्र महाराजांकडे थेटबघत तीक्ष्णा म्हणाली; "काही वेगळा रोख नाही महाराज. आपला प्रश्न समजून घेण्यास मी उत्सुक आहे इतकेच."

"भागीनेय तीक्ष्णा, आपण श्रीमंदिरासाठी अत्यंत दुर्गम जागेचे चयन केलेत. त्यासाठी लागणारी कोणतीही मदत नाकारलीत. मी समजू शकतो की उत्तम काम करणारे कारागीर आपण स्वतःच आणले असतील. मात्र सर्वसामान्य मदत करण्यासाठी लागणारे कामगार देखील आपण नाकारलेत. मागील तेवीस वर्षांमध्ये आपण आम्हास तेवीस वेळा देखील भेटला नसाल. मात्र आम्ही ऐकून आहोत की आपण त्या गुंफा परिसरामध्ये एक लहानसे गावच बसवून टाकले आहे. कारागिरांसोबतच मोठ्या प्रमाणातील कामगार देखील आपण स्वतः घेऊन आलात. अर्थात त्यानंतर उत्तम कारागिरी शकण्याची इच्छा असलेले अनेक सर्वसामान्य लोक अनेक ठिकाणांहून तिथे येऊन दाखल झाले; हे देखील आम्ही जाणून आहोत. आमचा प्रश्न आहे की जर आपण स्वतःहून दाखल झालेल्या सर्वसामान्यांना स्वीकारलेत तर मग आपण आमच्या मदतीला का नाकारलेत?"

"महाराज, आपली परवानगी हीच सर्वात मोठी मदत होती. त्यानंतर जे काही आम्ही करू शकलो ती तर केवळ आपल्या दृष्टांत इच्छेची अंमलबजावणी आहे. तरीदेखील आपल्या प्रश्नाचे विस्तृत उत्तर देण्यास मला आवडेल. महाराज, आपण उल्लेख केल्याप्रमाणे या गुंफा अत्यंत दाट अरण्यात आहेत. जिथे जंगली श्वापदे सहज फिरत असतात. त्यामुळे सर्वसामान्य कारागीर किंवा कामगार अशा ठिकाणी येण्यास कचरले असते. माझ्या सोबत आलेले सर्वच अशाप्रकारच्या परिस्थितीमध्ये राहण्यास सरावलेले आहेत. त्यामुळे त्याच्या सोबत काम करणे सोपे होते. आमचे काम सुरू झाल्यानंतर तेथून जे प्रवासी जात असत ते आमचे काम पाहण्याच्या मिषाने येत. त्यावेळी त्यांच्याकडील धान्य आणि अत्यावश्यक वस्तूंच्या बदल्यात आम्ही आमच्या कारागिरांनी फावल्या वेळात निर्माण केलेल्या पाषाण मूर्ती त्यांना देत असू. या पाषाण मूर्ती विविध ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांना पाहूनच अनेक कारागीर याठिकाणी आले. एक-एक जोडले गेले आणि आमच्याही नकळत तिथे गाव निर्माण झाले." तीक्ष्णा बोलायची थांबली आणि मग महाराजांकडे थेट बघत मिश्कीलपणे म्हणाली; "मला वाटते या महितीमध्येच आपल्या प्रशाचे संपूर्ण उत्तर आहे."

महाराज हसले आणि क्षणभर विचार करून म्हणाले; "भागीनेय तीक्ष्णा; आपण पहिल्या भेटीमध्ये एक उल्लेख केला होतात.... त्याच ठिकाणी मंदिर का या प्रश्नाचे उत्तर देताना आपण म्हणाला होतात की श्रीमंदिर निर्मितीसोबतच आपल्या संस्कृती जपवणुकीसाठी आवशक असे काही स्थापत्य आपणास तिथेच निर्माण करायचे आहे. परंतु त्या पहिल्या भेटीमधील त्या उल्लेखानंतर आपण सदर स्थापत्य निर्मिती संदर्भात कोणतीही माहिती मला कधीच दिली नाहीत. राजकुमार गोविंद सोळा वर्षांचे झाल्यानंतर आपण जेव्हा आम्हास भेटण्यास आला होतात; त्यावेळी आपण आग्रहपूर्वक गोविंदला त्या गुंफांच्या ठिकाणी पाठवण्यास सांगितलेत. त्यामागे आपला उद्देश अत्यंत योग्य असेल याची खात्री असल्याने आम्ही देखील राजकुमार गोविंदना तिथे पाठवले. मात्र आता आम्ही ऐकून आहोत की राजकुमार तेथे अपाला नामक आपल्या हाताखाली काम करणाऱ्या एका स्त्रीच्या प्रेमात आहेत... त्याव्यतिरिक्त ते तिथे काहीच करत नाहीत."

महाराजांचा रोख तीक्ष्णाच्या लक्षात आला. पुन्हा एकदा तीक्ष्णाच्या मनात अपाला संदर्भातील राग शिगेला पोहोचला. 'या हट्टी अपालामुळे आजून कोणत्या कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे कोण जाणे.' तीक्ष्णा मनात आले.

वरकरणी मात्र महाराजांकडे बघत तीक्ष्णा म्हणाली; "महाराज आपण लक्षात घ्यावेत की केवळ माझाच नाही; तर मी जिथून येते तेथील सर्वच विचारवंतांचा आग्रह होता की राजकुमार गोविंद यांनी काही वर्ष इथे राहून राजकारणातील काही महत्वाचे धडे शिकून घ्यावेत. त्या सोबतच सर्वभौमत्वासंदर्भातील त्यांच्या काही परीक्षा देखील घ्याव्यात असे मनात होते."

"मग काय निर्णय झाला भागीनेय?" महाराजांच्या आवाजात उत्सुकता होती.

"महाराज, राजकुमार गोविंद अत्यंत भावनिक आहेत...." तीक्ष्णाच्या आवाजातील नाराजी लपलेली नव्हती.

"भागीनेय, मी हे जाणून आहे की आपण जेथून येता तेथे भावनीकतेला महत्व नाही. मात्र आपण हे विसरून चालणार नाही की आम्ही सर्वसामान्य मानव केवळ भावनेवर जगतो." तीक्ष्णाचे वाक्य अर्धवट तोडत अत्यंत स्पष्ट शब्दात महाराज कृष्णराज बोलले आणि तत्क्षणी उभे राहिले. "भागीनेय, आम्हाला आता येथून प्रस्थान करणे आवश्यक आहे. मात्र आपण भोजन केल्याशिवाय निघू नये ही आमची विनंती आहे."

महाराजांना आपल्या बोलण्याचा राग आला आहे हे तीक्ष्णाच्या लक्षात आले. आपला अपाला वरील रागाचा उद्रेक महराजांशी गोविंद बद्दल बोलताना झाला आहे हे देखील तिला समजले. परंतु आता त्याबद्दल काहीच करणे शक्य नाही हे तिने जाणले आणि मान खाली घालून तिने महाराजांना प्रणाम केला.

तीक्ष्णाच्या दिशेने एक तीक्ष्ण कटाक्ष टाकून महाराज तिथून बाहेर पडले. महाराज जाताच तीक्ष्णा देखील तिथून निघाली. मात्र सुमंतांनी तिच्या मागे ठेवलेल्या रक्षकांना ती नक्की कुठे गेली ते कळले देखील नाही. मात्र तिथून बाहेर पडताना तीक्ष्णाला दिसत होते की पुन्हा एकदा सुमंतांनी दिलेल्या शिक्षेला सामोरे जावे लागेल या भीतीने रक्षकांचे चेहरे काळवंडले होते.

***

"राजकुमार आपण माझं म्हणणं तर समजून घ्या." गोविंदच्या मागे चालत नाथाने परत एकदा विनवणी केली.

"नाथा तू माझा अत्यंत जवळचा मित्र आहेस. तुला देखील हे माहीत आहे. तरीही मला तुझं काहीही ऐकून घेण्याची इच्छा नाही." गोविंद नाथाकडे दुर्लक्ष करत म्हणाला.

"राजकुमार मी आपल्या आणि कुंजर, अपालाच्या चांगल्यासाठी काहीतरी सांगतो आहे." नाथाचा आवाज विनवणी केल्यागत होता.

"नाही नाथा! तू सुमंतांच्या भितीमुळे बोलतो आहेस." गोविंद त्याच्याकडे न बघताच बोलत होता.

"बरं! तसं तर तसं! हो! मी घाबरलो आहे राजकुमार..." नाथाचं वाक्य मधेच तोडत गोविंद म्हणाला; "मला फक्त गोविंद म्हण नाथा."

"आपण कितीही आग्रह धरलात तरी हे पाप माझ्या तोंडून होणार नाही राजकुमार." नाथाचा आवाज मलूल झाला होता.

त्याच्या आवाजातील दुखावलेपण जाणवून गोविंद तिथेच जवळच्या पाषाणावर बसला आणि त्याने हात धरून नाथाला शेजारी बसवून घेतलं. "बोल नाथा. मी सगळं ऐकून घेईन तुझं. पण असा दुःखी होऊ नकोस." त्याचा हात हातात घेत गोविंद म्हणाला.

"राजकुमार, आपणास नगरामध्ये परत आणण्यासाठीच केवळ माझी नेमणूक झाली होती. आपल्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून आपले मन अपाला विषयी कलुषित करावे; हे देखील मला सांगण्यात आले होते." नाथाचा आवाज देखील फुटत नव्हता.

"नाथा मी सर्व जाणून आहे. तरी देखील माझा तुझ्यावर राग नाही. अरे, मला तर सुमंतांचा उद्देश देखील चुकीचा वाटत नाही रे. मी नगरात परत जाणे आवश्यक आहे हे मी जाणून आहे. महाराज कृष्णराज; माझे पिता; यांच्या मनातील उन्नत उद्देश हा सर्वसमावेशक आहे. सार्वभौमत्व ही त्यांची महत्वाकांक्षा नाही नाथा.... एक राजा म्हणून प्रजेला आपण हे देणं लागतो असं ते मला नेहेमी सांगत आले. एक अंमली राज्य असले की प्रजा जास्त सुखी असते. नाहीतर दोन राजांमधील वितुष्टाचा भुर्दंड प्रजेला युद्धातून आणि युद्धानंतर निर्माण होणाऱ्या दारिद्र्यातून सहन करावा लागतो; असं त्यांचं नेहेमीच म्हणणं राहिलं आहे. त्यामुळे त्यांना येथून सर्वभौमत्वासाठी येथून प्रस्थान करणे आवश्यक आहे; हे मी जाणून आहे. त्यात आता तर श्रीमंदिराचे काम देखील पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे माझे नगरात जाणे आवश्यक आहे. हे सगळेच मान्य करूनही... नाथा.... माझे अपाला वरील प्रेम मला जास्त महत्वाचे वाटते. तिच्या शिवाय आणि कुंजर शिवाय माझं आयुष्य निरर्थक आहे नाथा." शेवटचे वाक्य गोविंदने इतके हळुवारपणे उच्चारले होते की त्यातील वेदना आणि भावना दोन्ही नाथाच्या हृदयाला जाऊन भिडले.

"राजकुमार...." नाथ काहीतरी बोलणार होता. पण त्याला थांबण्याचा हात करून गोविंद तिथून उठला आणि निघून गेला.

***

"मला राजकुमारांचे दुःख बघवत नाही भीमा." भीमाच्या शेजारी बसून शून्य नजरेने नाथा म्हणाला.

"मी जाणून आहे नाथ. मला देखील अपाला आणि गोविंदने एक व्हावे असं वाटतं. पण तुझ्या माझ्या वाटण्याने काही होत नाही. सुमंत आणि तीक्ष्णा एकमेकांचा द्वेष करतात. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात ते दोघेही गोविंद, अपाला आणि कुंजर यांचा विचार देखील करत नाही आहेत." भीमाने नाथाच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटलं.

"नाही रे भीमा. सुमंतांना तीक्ष्णा आवडत नाही हे सत्य आहे. तीक्ष्णाने कधीच सुमंतांवर विश्वास ठेवला नाही. पहिल्या भेटीपासूनच तिने केवळ महाराजांशी बोलणे केले. कदाचित तुमची अशी काही गुपितं असतील जी आमच्या सारख्या सर्वसामान्यांना कळणे योग्य नसेल. पण त्यामुळे सुमंतांच्या मनात तिच्याबद्दल अढी निर्माण झाली. पण तरीही त्यांचा अपालावर राग नाही. मात्र त्यांचा आग्रह आहे की राजकुमारांनी आता त्वरित नगरात परतावे. आता श्रीमंदिराचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे कदाचित महाराजांच्या मनात राजकुमार गोविंद यांच्या राज्यभिषेकाचा विचार असेल. त्यामुळे राजकुमारांनी नगरात परतणे आवश्यक आहे. त्यांच्या सोबत अपाला आणि कुंजर आले तरी सुमंत कल्याण राजकुमारांच्या पाठीशी उभे राहून त्यांची बाजू महाराजांना समजावतील याची मला खात्री आहे. पण अपाला नगर प्रवेशास तयार होत नाही आहे. ती नाही म्हणते आहे त्यामुळे राजकुमार परत फिरत नाही आहेत. मात्र आपल्या या निर्णयामुळे आपण महाराजांना दुखावतो आहोत हे जाणून राजकुमार दुःखी आहेत. सुमंत कल्याण हे राजकारणी असल्याने त्यांना कोणत्याही भावनिकतेच्या पुढे जाऊन विचार करणे आवश्यक आहे." नाथा पोटतिडकीने बोलत होता.

"नाथा, मी समजून घेऊ शकतो तुला काय म्हणायचे आहे. पण अपालाने गोविंद सोबत नगरात प्रवेश करावा आणि त्याच्या सोबत सम्राज्ञी पद स्वीकारावे हा गोविंदचा आग्रह अपाला मान्य करेल असं मला वाटत नाही. अरे अपाला खूप वेगळी आहे आम्हा सर्वांहून. ती अगदी सहज जाऊन भिडते तीक्ष्णाला. तिचे विचार स्वतंत्र आहेत. अगदी तिच्या कामाच्या पद्धतीप्रमाणे. त्यामुळे गोविंदला स्वतः निर्णय घ्यावा लागणार आहे. अपालाला अपेक्षित नाते स्वीकारायचे की तिला दूर करून नगरात परतायचे." भीमा म्हणाला.

"......... आणि जर मला दोन्ही हवे असेल तर?" मागून गोविंदचा आवाज आला. भीमा आणि नाथा एकदम गर्रकन मागे वळून बघायला लागले.

क्रमशः