Friday, February 1, 2019

  अपूर्ण भावनांचे परिपूर्ण आयुष्य!



 'तो' निघाला आणि 'ती' वेडीपीशी झाली. तिने आतुर नजरेने त्याच्या डोळ्यात स्वतःला गुंतवले. पण तो बधला नाही; तेव्हा मात्र ती आपणहून बाजूला झाली आणि शांतपणे म्हणाली,"जातोस? जा! तुला अडवणार नाही. तुझ्या शिवायचं माझं हे अर्थहीन... प्राणहीन.... जीवन तुझ्या आठवणींवर कंठेन आणि कधीतरी तुझ्याही नकळत तुझ्यातच विलीन होईन. तुला मात्र  मी आठवेनच... आणि त्यावेळी मात्र......" तिचे पाणीदार डोळे एका तेजाने चमकत होते... पण आता त्यात अश्रू नव्हते. तिने त्याच्याकडे पाठ केली आणि ती चालू पडली. यमुनेच्या काळ्या मऊशार वाळूतून तिची सुकुमार पावलं आपली ओळख उमटवत राहिली...... 

 त्यानंतर देखील ती तिचं जीवन जगलीच. सासू-सासऱ्यांची सेवा, पत्नीव्रताचे पालन आणि मुलांचे संगोपन... तिच्या आयुष्यातल्या जवाबदाऱ्या तिने पूर्ण केल्याच! पण तरीही... ती अपूर्णच राहिली... आयुष्यभर!!!

 त्यानेदेखील निघताना एकदाही मागे वळून बघितले नव्हते. त्याला पूर्ण कल्पना होती की यापुढील आयुष्य हे फक्त आणि फक्त जवाबदाऱ्या आणि कर्तव्य याने भरलेलं असेल. त्यात तिच्या मनात असणाऱ्या प्रेम भावनेसारख्या कोमल भावनांचा आपल्या मनात मागमूसही नसेल. मग का वळून पाहायचं? .........आणि मग कंस मामाचा वध; कौरव-पांडव युद्ध; अशा अनेक विधिलिखित घटना पार पाडत त्याने द्वारका वसवली...... मग मात्र तो विसावला. 

 आज समुद्र किनाऱ्यावर शांत मनाने फिरताना उतरत्या सूर्य किरणांमध्ये त्याच्या मनातली तिची आठवण परत नव्याने जागी झाली होती. आता या निवांत क्षणी त्याला ती हवी होती... त्याची दमदार पावलं समुद्रकिनाऱ्यावरच्या शुभ्र मऊशार वाळूतून स्वतःचं अस्तित्व उमटवत तिला शोधत होती. वाऱ्यावर उडणारं त्याचं गुलाबी उत्तनिय तिची आठवण करून देत होत...... उचंबळून येणाऱ्या लाटा तिच्या खळाळत्या हास्याची आठवण करून देत होत्या आणि परत मागे वळताना तिच्या शेवटच्या भेटीचा क्षण त्याच्या मनात जागवत होत्या. त्याच्या बासरीची आर्त लकेर तिला साद घालत होती.

मात्र आता ती येणार नव्हती... त्याने अगदी हृदयातून साद घातली तरी!!! आणि.... आज त्या शांत समुद्र किनाऱ्यावर त्या जगद्नियंत्या द्वारकाधिशाला 'ति'च्या शेवटच्या अर्ध्या वाक्याचा अर्थ लागत होता......      

22 comments:

  1. सुरेख शब्दांकनातून व्यक्त भावना मानवी स्वभावाचे अनेक तरंग दाखवतात ..खूप भावपूर्ण लिखाण

    ReplyDelete
  2. खुप छान ! वाचताना एकदम हरवून जायला होते !

    ReplyDelete
  3. किती छान लिहिले आहे....मस्तच!!!
    स्मिता तावडे

    ReplyDelete
  4. धन्यवाद स्मिता

    ReplyDelete
  5. हृदय स्परशी लिखाण करता आपण.

    ReplyDelete
  6. शेवट अर्थपूर्ण, आवडली

    ReplyDelete
  7. धन्यवाद सुदर्शनजी

    ReplyDelete
  8. छान मस्त. सुंदर शब्दांकन.

    ReplyDelete
  9. विविध पैलू तुमचा लेखणी मधून मोती समान बाहेर पडतात...
    !
    छान लेख, उत्तम मांडणी...

    ReplyDelete
  10. राधा क्रृष्णाच्या नात्याच तरल वर्णन.

    ReplyDelete
  11. छान आणि सुंदर कथा

    ReplyDelete