Friday, February 26, 2021

प्रवास (भाग 9) आज खरा शेवट

 ही कथा वाचणाऱ्या अनेकांनी मला मेसेज करून सांगितले की कथा अपुरी वाटते वाटते आहे. म्हणून मग थोडा विचार करून शेवट बदलला मी. 


प्रवास

भाग 9 (खरा शेवट)

पवारने भिकुला गाडीत बसवलं आणि गाडी वाड्याकडे वळवली.

भिकू गाडीतून उतरत असताना पवार म्हणाला;"बाकी सगळे सुटणार भिकू.... तुझं तू बघ. कारण जोपर्यंत तू अडकला आहेस; तोपर्यंत ते चौघे सेफ आहेत."

पवारने गाडी वळवली आणि निघून गेला.

वाड्याच्या दिशेने पाऊल उचलत भिकू म्हणाला;"धाकटे मालक.... तुम्ही आणि मी!!!!! आलो मी......"


जाता जाता पवारने भिकू जे बोलला ते ऐकलं होतं. 'येड लागलं बहुतेक या राक्षसाला....' पवारच्या मनात आलं.

***

भिकू शांतपणे चालत होता वाड्याच्या दिशेने. पण त्याचे कान दूर जाणाऱ्या गाडीचा मागोवा घेत होते. गाडी नक्की निघून गेली याची भिकुला खात्री झाली. तो झपझप पावलं उचलत मधल्या दाराने वाड्यात शिरला आणि थेट वरच्या मजल्याच्या दिशेने निघाला. तो वर चढणारच होता इतक्यात...........

.....................आनंद जिन्यावरून खाली आला. आनंदला बघताच भिकुची नजर जमिनीकडे गेली आणि तिथेच खिळली. एकदा त्याच्याकडे करडा कटाक्ष टाकून आनंद दिवाणावर जाऊन बसला. भिकू काहीसं अंतर राखत त्याच्या समोर जाऊन बसला. बराच वेळ दोघे फक्त बसून होते. भिकुची नजर वर उचलली जाणं शक्यच नव्हतं. आनंदची नजर मात्र भिकुवरून तसूभरही ढळली नव्हती. वेळ जात होता आणि हळूहळू भिकू चुळबुळायला लागला. आनंदची नजर त्याला सहन होईनाशी झाली. त्याचं अस्वस्थ होणं आनंदने ओळखलं आणि तो गालातल्या गालात हसला.

आनंद : हम्म... बोल....

भिकू : अगदी तुम्ही सांगितलं होतं तसं बोललो तिथे.

आनंद : हम्म.... पुढे?

भिकू : त्यांना मी वेडा वाटलो.

आनंद : नवीन काहीतरी सांग भिकू. तू जसा आहेस तसाच वाटणार न कोणालाही.

भिकू : पण मालक मी वेडा नाही.

आनंद : मग तू जे काही केलंस ते ठरवून का?

भिकू : मालक, ताबा राहिला नाही हो. माझ्या मनात देखील नव्हतं तसं काही करण्याचं.

आनंद : भिकू, तुझ्या मनात काय आहे त्याच्याशी मला कर्तव्य नाही. तिथे काय झालं तेवढं बोल.

भिकू : मालक, मी त्यांची खात्री पटवून दिली की तुमच्याकडे काहीतरी शक्ती आहे; त्यामुळेच तुम्ही हळूहळू मकरंद सारखे दिसायला लागलात. मकरंद तुम्हाला घाबरायला लागला. तुमच्या शक्तीने तुम्ही त्याला ताब्यात घेतलंत. झोपडीत तुम्हीच होतात....

आनंद : कोणालाही काहीही संशय...??

भिकू : नाही मालक नाही. मी जे जे सांगितलं ते ते खरं वाटलं त्यांना.

आनंद : मी झोपडीत कसा मेलो ते नाही विचारलं त्यांनी?

भिकू : सांगितलं न मालक! मी वेडा आहे याची त्यांना खात्री पटली. त्यामुळे तुम्ही कसे मेलात ते मी काय सांगणार? त्यात इन्स्पेक्टर साहेब म्हणत होते की झोपडीत जो गेला तो कोण ते कळणं आता शक्य नाही.

आनंद : असं का वाटलं त्यांना?

भिकूने थोडावेळ विचार केला आणि म्हणाला;"माहीत नाही. पण म्हणाले झोपडीत कोण होतं आणि गाडीत कोण होतं कळायला मार्ग नाही.

आनंद : हम्म....

भिकू जमिनीवर बसल्या बसल्या जमीन टोकरत होता. त्याच्या हालचाली तो मनातून खूप अस्वस्थ असलेला सांगत होत्या. वेळ जात होता... भिकू अस्वस्थ व्हायला लागला आणि त्याने हलकेच अगदी थोडी... थोडी... मान वर केली आणि पुटपुटल्या सारखा म्हणाला;"मी निघू?"

त्याच्याकडे एकटक बघणाऱ्या आनंदने विचारलं;"कुठे जाणार तू निघून भिकू? तुला माहीत आहे न तू काय केलं आहेस? तुला कुठे थारा मिळणार?

भिकू : मी मुद्दाम नाही केलं ते. प्रसंग तसा होता मालक. तुम्ही देखील जाणता.

भिकूच्या या बोलण्यावर आनंद खळखळून हसला आणि म्हणाला;"भिकू... मी काय जाणतो त्याचा तुला काही उपयोग नाही. कारण आता मी पोलीस रेकॉर्डवर पण मेलो आहे." असं म्हणून आनंद परत एकदा खदखदून हसायला लागला.

भिकूच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. मनातल्या मनात रडत तो तसाच बसून राहिला. त्याच्या मालकाच्या आदेशाची वाट बघत.

काही वेळाने हसू आवरून आनंदने भिकुकडे बघितलं आणि म्हणाला;"तो नक्की मेला होता ना भिकू?"

मान अजूनच खाली घालत भिकूने अगदी बारीक आवाजात 'हो' म्हंटलं.

आनंदने एक सुटकेचा श्वास सोडला आणि म्हणाला;"म्हणजे मकरंद मारला गेला अपघातात. खरं तर तो मुंबईत पोहोचणार त्यावेळी मी या पाच जणांना मारून त्याच्यावर आळ टाकणार होतो. त्या हमशकलला म्हणून तर विष दिलं होतं. एकीकडे ती पाच जणं मेली असती त्याचा आळ मुंबईत पोहोचणाऱ्या मकरंदवर. त्याने कितीही कानी कपाळी ओरडून सांगितलं असतं की खून त्याने नाही मी केले तरी कोण त्याच्यावर विश्वास ठेवणार होतं? एकदा तो गजाआड गेला असता की मग सगळी प्रॉपर्टी विकून मी निघून जाणार होतो परदेशात. पण आयत्यावेळी तो साला अपघातात मेला. एकदम कमजोर मनाचा निघाला साला. तो गाडी चालवायला बसला त्यावेळी मी गाडीत मागच्या सीटच्या खाली लपून बसलो होतो. तो ज्या प्रकारे गाडीत वागत होता त्यावरून त्याला वेड लागलं असावं असं वाटत होतं. गाडी जरा कुठे हळू झाल्यावर बाहेर उडी मारायची असं ठरवलं होतं मी. तसंही गाडीचं दार उघडलं गेलं असतं तरी त्या मूर्खाने घाबरून त्याकडे दुर्लक्ष केलं असतं याची मला खात्री आहे.

त्याच्या अपघाताने माझे सगळे प्लॅन्स बरबाद झाले. तुला इथे झोपडीत सोडलं होतं त्या पाच जणांबरोबर. आतल्या खोलीत तो हमशकल मरायला टेकलेला. पुढे काय करायचं त्याचा विचार करेपर्यंत साला तो इन्स्पेक्टर पोहोचला आणि मला झुडपांमध्ये गायब व्हावं लागलं.

तुला आणि त्या पाच जणांना इन्स्पेक्टरने न्यायचं ठरवलं तेव्हा मला वाटलं होतं आतल्या खोलीत ते जाणार नाहीत. पण तो इन्स्पेक्टर जास्त शहाणा निघाला. तो आत गेला. नशीब तोपर्यंत तो हमशकल मेला होता. नाहीतर सगळंच फसलं असतं.

म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की मकरंद मेला आहे. ज्याला सगळे आनंद म्हणून ओळखतात. हमशकल मेला आहे; ज्याला ते पाच जण आणि इथले पोलीस मकरंद समजतात. भिकू नावाचा एक वेडा आहे; ज्याच्या बोलण्यावर कोणाचाही विश्वास नाही. चला हे ही चालेल.

तसही मुंबईमधले फ्लॅट्स मी कधीच विकून त्याचे पैसे माझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करून टाकले होते. सोनं नाणं देखील विकलं. हा आता हा वाडा आहे. पण कोण येणार इथे? भूतिया वाडा म्हणून ओळखतात या जागेला. त्यामुळे पुढे मागे गरज पडेल तेव्हा येऊन विकिन हे.

आता एकच प्रश्न!!" असं म्हणून आनंदने भिकुकडे बघितलं.

भिकू : मालक, मी माझ्या बायकोचा खून नाही केला. तो एक अपघात होता मालक. ती रोज डोकं खायची पोर हवं म्हणून. त्यादिवशी मी पिऊन आलो होतो. तिला ढकलली तर एकदम मागे जाऊन भिंतीवर ती आदळली आणि एकदम मेलीच. तुम्ही होता की समोर. अपघात होता तो मालक. मी तेव्हाच म्हणत होतो आपण पोलिसात जाऊ. मी जी काही लहान मोठी शिक्षा होईल ती घ्यायला तयार आहे. पण तुम्ही थांबवलंत. म्हणालात की पोलीस मला फासावर लटकवतील. मी पण घाबरलो होतो मालक. तुमचं ऐकलं. पण मग हातून खून झाला आहे या विचाराने मला खूप त्रास व्हायला लागला. तुम्ही म्हणालात वाड्यावर राहा. झोपडीत बायकोच्या आठवणींनी त्रास होत असेल. पण वाड्यावर अजून त्रास व्हायला लागला. मी एकदा झोपडीकडे आलो तर तुम्ही आत काय करत होतात माहीत नाही; पण इतके विचित्र आवाज येत होते की मी घाबरून गेलो. त्यानंतर मी वाड्यावरून बाहेर नाही आलो कधी.

एकदिवस मकरंद आला तर मला वाटलं सुटेन यातून. पण तो कच्च्या मनाचा निघाला. मी अडकत गेलो मालक तुमच्या जाळ्यात."

भिकूच्या बोलणं ऐकून आनंद कुत्सितपणे हसला आणि म्हणाला;"अरे भिकू, आता तर खुश हो. मी कायमचा जातो आहे आता. तू मोकळा झालास आता यासगळ्यातून.

त्यावर कसानुसा चेहेरा करत भिकू म्हणाला;"मालक, मोकळा होऊन मी काय करू आता? लोकांसाठी मी वेडा आहे. वाड्यावर राहू शकत नाही; कारण मी शहाणा आहे. तुमच्या बरोबर येऊ शकत नाही; कारण मी तुम्हाला नको आहे. आत्महत्या करणार नाही कारण मी घाबरट आहे."

आनंद भिकुकडे थंडपणे बघत होता.

अचानक भिकू उभा राहिला आणि आनंदकडे न बघता वाड्याबाहेर पडून भरकटल्या सारखा चालत निघून गेला.

आनंद उठून उभा राहिला आणि एकदा खांदे उडवून वाड्यातून बाहेर पडला..... कायमचा!!!

Friday, February 19, 2021

प्रवास (भाग 8) (शेवटचा)

 प्रवास


भाग 8

पोलीस स्टेशनमध्ये शिरताच राठींनी भिकुला लॉक अप मध्ये टाकले आणि अनघा-मनाली-मंदार-नवीन यांना घेऊन ते त्यांच्या केबिनमध्ये आले. त्यांनी एका हवालदाराला या मुलांसाठी पाणी आणायला संगितले आणि त्यांना समोर बसवत म्हणाले;"तुम्हाला जे माहीत आहे ते सगळं सांगा आता."

नवीन बोलायला सुरवात करणार होता; इतक्यात अनघाने इन्स्पेक्टर राठींना विचारलं;"इन्स्पेक्टर, आनंद कुठे आहे? मला एकदा त्याला बघायचं आहे."

राठी शांतपणे म्हणाले;"तुम्ही अनघा न? आनंद...."

राठींना बोलू न देता मनाली एकदम म्हणाली;"इन्स्पेक्टर, त्यानेच तुम्हाला पाठवलं नं आमच्यासाठी. मला वाटलंच. त्याला आम्ही झोपडीतून सोडवून आणलं तेव्हाच माझ्या मनात आलं होतं की हा भिकूच ते सगळं घडवत होता. म्हणूनच मी सारखी घाई करत होते निघायची. पण आम्ही सगळे दुपार नंतर उठलो होतो आणि एका मागोमाग एक असं इतकं काही घडलं की आम्हाला निघायला उशीरच होत गेला. खरंतर माझा आनंदवर देखील काडी इतका विश्वास उरलेला नाही. पण...."

तिचं वाक्य तोडत नवीन म्हणाला;"मनाली, उगाच काहीतरी बोलू नकोस."

त्यावर नविनकडे रागाने बघत मनाली म्हणाली;"उगाच काहीतरी बोलते आहे का मी नवीन? अरे तो गेले दोन दिवस जे काही वागत होता ते काय फार नॉर्मल होतं का? मध्येच बोलणं बंद करून फक्त निरीक्षण करणं; अनघाकडे दुर्लक्ष करणं.... अगोदर कोल्हेकुई झाली होती तेव्हा तो देखील घाबरला होता आपल्यासारखा. पण मग दुसऱ्या वेळी किती थंड होतं त्याचं वागणं. नवीन.... तुला अनघा आवडते हे बाजूला ठेवलंस तरी देखील तू मान्य करशील की आनंदचं वागणं विचित्र होतं."

मनालीच्या शेवटच्या वाक्याने अनघा एकदम कणकोंडी झाली आणि नवीन देखील एकदम बावचळला. एकूण परिस्थिती लक्षात येऊन मंदारने सगळी सूत्र हातात घेतली आणि मनालीला म्हणाला;"हे बघ मनाली; पोलिसांना आपण काय घटना घडल्या ते सांगायचं असतं आणि जर त्यांनी विचारलं तरच आपलं मत द्यायचं असतं. पोलिसांना पूर्वग्रहदूषित राहून चालत नाही. त्यामुळे तुला काय वाटतं यापेक्षा काय काय झालं ते त्यांना सांगणं योग्य."

मनालीला मंदारचं म्हणणं पटलं. मान डोलवत ती म्हणाली;"You are right. तूच सांग मंदार सगळ्याच घटना. कोणीतरी एकानेच सांगितलेलं बरं. त्यात तू अगदी योग्य आहेस. कारण अनघा आणि नवीनमध्ये काही नसून काहीतरी आहे.... आणि मला काही माझी मतं न सांगता घटना सांगता येणार नाहीत."

अनघाला ती जे बोलली ते आवडलं नव्हतं. पण ती काहीही बोलली नाही. मंदारने एकदा नविनकडे बघितलं आणि बोलायला सुरवात केली.

"इन्स्पेक्टर, आम्ही पाचही जण कॉलेज पासूनचे मित्र-मैत्रिणी आहोत. मी माझ्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करतो. नवीन आणि मनाली नोकरी करतात. अनघा अजून तरी काही करत नाही. अर्थात नोकरी करायची तिची इच्छा नाही सध्या म्हणून. नाहीतर ती आमच्या कॉलेज मधली सर्वात हुशार आणि सर्वात सुंदर मुलगी होती आणि अजूनही आहे. आनंद बद्दल मी वेगळं काही सांगायला नकोच. तुम्ही त्याला भेटलाच आहात. त्यात तो ऍक्टर आहे त्यामुळे तसाही माहितीतला चेहेरा आहे त्याचा. तर... आम्ही सगळेच कॉलेज नंतर खूप बिझी झालो होतो. त्यात या लॉक डाऊन काळात तर अजिबातच भेटणं झालं नव्हतं. सतत विडिओ कॉल्स करून कंटाळलो होतो. मुंबईत भेटायचं तर अजूनही नियम कडक आहेत. अकरा नंतर बाहेर पडायला परवानगी नाही. हॉटेल्स पण बंद होणार. म्हणून मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आनंदच्या लोणावळ्याच्या वाड्यावर जायचं. आम्ही इथे यायला निघालो ते आनंदच्याच गाडीतून. अनघा आणि आनंदने आम्हाला पिक-अप केलं आणि आम्ही वाड्यावर आलो.

इथे थोडी वेगळी माहिती देतो मी इन्स्पेक्टर साहेब, आनंदला अनघा आवडते. दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. लॉक डाऊनच्या काळात आनंदने मला अनेकदा फोन केला होता. आम्ही एक-दोन वेळा भेटलो देखील होतो. त्याला अनघाला प्रपोज करायचं होतं. काय करावं-कसं करावं याची चर्चा तो माझ्याशी करत होता. अर्थात आम्ही यात नविनला सामील केलं नाही; कारण आनंदचं मत होतं की नविनला देखील अनघा आवडते. त्यामुळे उगाच हा विषय त्याच्याशी नको बोलायला.

आम्ही वाड्यावर येताना मध्ये ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो त्यावेळी मी आनंदला विचारलं देखील होतं की त्याने प्रपोज करण्याबद्दल काय विचार केला आहे. पण त्याने मला काहीच उत्तर दिलं नाही. एरव्ही सतत याविषयी बोलणारा आनंद एकदम गप होता तेव्हा. आम्ही गाडीकडे निघालो पण त्यावेळी आनंद आमच्या सोबत नव्हता. त्याला शोधण्याच्या नादात अनघा धडपडली. तसं थोडं तिला लागलं देखील होतं. पण आनंदने काहीसा बेफिकीरीपणा दाखवला होता त्याविषयी तेव्हा."

मंदार एक एक प्रसंग शांतपणे सांगत होता. अचानक त्याचं बोलणं तोडत अनघा म्हणाली;"मंदार, विषय भिकुचं वागणं हा आहे. तू हे काय संगतो आहेस? यासगळ्याचा काय संबंध?"

त्यावर इन्स्पेक्टर राठी म्हणाले;"हे बघा मॅडम, मंदार अगदी योग्य करतो आहे. तुम्ही थोडं शांत राहा. इथे कोणालाही वाईट वाटावं म्हणून किंवा दुखवावं म्हणून तो बोलत नाही आहे. तर आम्हाला सगळं समजावं; जेणे करून आम्ही तुमची सर्वांची मदत करू शकू; म्हणून तो बोलतो आहे. बोल मंदार!"

राठींचं बोलणं ऐकून अनघा शांत झाली. मंदारने एकदा अनघाकडे बघत खुणेनेच सॉरी म्हंटलं आणि तो परत बोलायला लागला.

"आम्ही वाड्यावर पोहोचलो. गाडीतून आम्ही उतरलो तर आनंद म्हणाला आपण मधल्या दाराने घरात जाऊया. त्यावर अनघा त्याला म्हणाली की 'तुला तो दरवाजा उघडलेला आवडत नाही न.' त्यावर हसत त्याने म्हंटलं की आता असल्या अंधश्रद्धांवर त्याचा विश्वास नाही. त्यामुळे तो दरवाजाच काय तिथल्या दोन खोल्या; ज्या त्याने बंद ठेवल्या होत्या; त्या देखील त्याने उघडून वापरायला सुरवात केली होती. आम्ही कोणीही यावर काही बोललो नाही. आत शरताच आनंद एकदम मोठ्याने ओरडला 'मी आलो' असं. मनालीने त्याला विचारलं 'कोणाला सांगतो आहेस? वाडा तर रिकामा आहे न?' त्यावर तो म्हणाला 'You never know.' त्याच्या या बोलण्याने मनाली थोडी नाराज झाली. कारण तिला नवीन जागेविषयी थोडी भीती आहे. आम्ही सगळेच आत आलो. तसे आम्ही सगळेच पूर्वी देखील वाड्यावर गेलो होतो त्यामुळे आम्हाला वाडा नवीन नव्हता. आम्ही कोणती खोली वापरू ते देखील काहीसं ठरलेलं होतं. पण आत आल्यावर आनंदने समोरची खोली स्वतःसाठी घेणार असल्याचं सांगितलं. खरं तर आजवर ती खोली त्याने कधीच वापरली नव्हती. पण अर्थात तो वाडाच त्याचा आहे म्हंटल्यावर तो कोणीही खोली घेऊ शकणार होता. त्याच्या शेजारची खोली मी आणि नविनने घेतली आणि अनघा आणि मनाली थोड्या पलीकडच्या खोलीत शिरल्या. आम्ही सगळेच आरामात दुपारी उठलो. अनघा आणि मनालीने भिकुला जाऊन रात्रीच्या जेवणाबद्दल सांगितलं आणि मग आम्ही सगळे पत्ते खेळत बसलो.

किती वेळ गेला ते कोणालाच कळलं नाही. अचानक भिकुची हाक आली ऐकू. तो जेवण घेऊन आला होता. आम्ही बिअरच्या बाटल्या उघडल्या आणि मस्त गप्पा मारत जेवलो. जेवणं आटपली आणि आम्ही सगळेच बाहेर पुढच्या अंगणात गप्पा मारत बसलो. कसं कोणजाणे पण गप्पा भुताच्या विषयावर वळल्या. अचानक घरातून काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि आम्हाला थांबायला सांगून आनंद आत गेला. तेवढ्यात वीज पण गेली आणि एकदम अंधार जास्तच जाणवायला लागला. आम्हाला तर भास व्हायला लागला की कोणीतरी येतं आहे गेटकडून चालत. पण मग एकदम दिवे आले आणि आनंद फुगा फोडत HAPPY NEW YEAR ओरडला. सगळेच हसलो आणि मग घरात गेलो. पण आनंद आमच्या सोबत नाही आला. नवीन सगळ्यात शेवटी आत आला होता. त्याचा चेहेरा देखील काहीसा अस्वस्थ होता. पण कारण नाही कळलं आम्हाला. आनंद आला नव्हता म्हणून अनघा परत बाहेर निघाली तर नविनने तिला थांबवलं. अचानक त्याचवेळी कोल्हेकुई सुरू झाली. आम्ही सगळेच एकदम घाबरून गेलो. त्याचवेळी आनंद देखील बाहेरून धावत आत आला. तो आणि अनघा एकमेकांवर धडकले आणि घरात पडले. त्याचवेळी तो आवाज देखील बंद झाला.

आम्ही सगळेच परत एकदा दिवाणखान्यात बसून गप्पा मारायला लागलो. भिकूने आम्हाला बिअर आणून दिली. त्याला बघून अनघाला आश्चर्य वाटलं. तिने आनंदला विचारलं 'तू थांबवलं आहेस का भिकुला?' तर तो 'हो' म्हणाला. तसे आम्ही सगळे बसलो होतो एकत्र; पण सगळ्यांच्या मनात काही ना काही चालू होतं. त्यामुळे गप्पा अशा होत नव्हत्या. अचानक आनंदने बोलायला सुरवात केली...."

असं म्हणून मंदार क्षणभर थांबला आणि मग म्हणाला;

"इन्स्पेक्टर साहेब, मी खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे फक्त घडलेले प्रसंग सांगायचा. पण इथे मात्र मी जे सांगणार आहे ते माझं मत आहे... आणि माझी खात्री आहे की ते या तिघांचं देखील नक्कीच आहे."

त्याचं बोलणं ऐकून राठींच्या कपाळावर आठ्या आल्या. ते पाहून मंदार पटकन म्हणाला;

तसं काही नाही साहेब; पण आम्ही सगळेच काही ना काही विचार करत होतो आणि अचानक आनंद बोलायला लागला ते आम्ही जो विचार करत होतो त्याला अनुसरूनच होतं. जसं काही त्याने आमच्या मनातले विचार वाचले होते. थोडं विचित्र वाटलं ते मला. अर्थात आम्ही कोणीही याविषयी एकमेकांकडे बोललो नाही. पण सगळ्यांच्या चेहेऱ्यावरचे बदलते भाव मी बघत होतो; आणि अर्थात माझा स्वतःचा अनुभव. यावरून मी हे सांगतो आहे.

मंदारचं म्हणणं ऐकल्यावर राठींनी अनघा, मनाली आणि नविनकडे बघितलं. त्यासर्वांनीच मानेने होकार दिला. त्यावर मान डोलावत राठींनी मंदारला पुढे बोलायची खूण केली. एकदा सगळ्यांकडे बघून मंदार पुढे बोलायला लागला;

"साहेब, आम्ही सगळेच झोपायला म्हणून उठलो आणि आमच्या खोल्यांकडे गेलो. तर अचानक परत एकदा कोल्हेकुई ऐकू यायला लागली. साहेब, तो वाडाच एकूण जंगलात आहे. आम्ही पूर्वी गेलो आहोत; पण तरीही सगळं नवीनच की हो आमच्यासाठी. त्यामुळे आम्ही सगळेच घाबरलो आणि धावत बाहेर आलो. दिवाणखान्यात येऊन बघतो तर आनंद शांतपणे बिअर पीत होता. थोड्याच वेळापूर्वी कोल्हेकुई सुरू झाल्यावर बाहेरून धावत आलेला आनंद आणि समोर बसलेला आनंद दोन टोकं होती साहेब वागण्यात. त्याचं ते वागणं बघून अनघा वैतागली आणि त्याच्यावर ओरडायला लागली. पण तरीही तो तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. त्यामुळे अनघा चिडून किंवा वाईट वाटून घेऊन खोलीत गेली. नवीन तिची समजूत काढायला तिच्या मागे गेला. ते दोघे गेले आणि आनंद देखील त्याच्या खोलीत गेला. मी आणि मनाली दोघेच होतो दिवाणखान्यात. त्यावेळी मनालीने मला सांगितलं की आनंदने अनघाला वाड्यातच नुकतंच प्रपोज केलं होतं. ते ऐकून मला इतका राग आला आनंदचा... तो मला सतत भेटून कसं प्रपोज करू म्हणून एकीकडे विचारत होता आणि एकीकडे त्याने अनघाला प्रपोज करून देखील टाकलं होतं. अर्थात तो त्याचा प्रश्न! पण किमान मला सांगावं की नाही त्याने... हा विचार माझ्या मनात आला. त्याचवेळी आनंद परत बाहेर आला. त्याला बघून मनाली तिच्या खोलीकडे गेली. पण नवीन अजूनही आत होता; त्यामुळे ती तिथेच बाहेर थांबली. मी मात्र आनंदला जाब विचारण्यासाठी त्याच्या जवळ गेलो............. साहेब; त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दुपारी... म्हणजे 1 जानेवारीला जागा झालो.... "

मंदारच्या शेवटच्या वाक्याचा धागा पकडत नविनने बोलायला सुरवात केली. तो राठींकडे वळला आणि म्हणाला;

साहेब, मी खोलीतून बाहेर आलो आणि मनाली आत गेली. मनालीकडे बघताच मला लक्षात आलं होतं की मी अनघाशी जे बोललो ते तिने ऐकलं होतं. पण मुळात मला त्यात काहीच लपवण्यासारखं वाटलं नाही. त्यामुळे तिने ऐकलं तरी माझी हरकत नव्हती. मी बाहेर आलो तर आनंद समोरच उभा होता. तो अनघाशी इतका बेफिकीरीने का वागतो आहे; याचा जाब विचारण्यासाठी मी त्याच्या समोर जाऊन उभा राहिलो.... आणि साहेब, माझी देखील आठवण इथेच थांबते. त्यानंतर मंदार म्हणतो आहे तसा मी देखील त्याच्या सोबत जागा झालो. ते देखील मुलींनी हाका मारल्या म्हणून."

राठींनी नविनवरची नजर उचलून अनघाकडे बघितलं आणि अनघाच्या लक्षात आलं की पुढे काय झालं ते तिने सांगावं अशी राठींची इच्छा आहे. त्यामुळे तिने मान डोलावली आणि बोलायला सुरवात केली;

"सर, सकाळी... म्हणजे जवळ जवळ दुपारीच आम्हाला जाग आली. मनाली सगळ्यात अगोदर उठली होती. तिने मला उठवलं आणि आम्ही दोघींनी मंदार आणि नविनला हाका मारल्या. वाड्यावरची वीज गेली होती. त्यामुळे आमचे सगळ्यांचे मोबाईल बंद पडले होते. खरं तर रात्री बराचवेळ कोल्हेकुई होत होती. त्यामुळे आम्हाला दोघींना झोप नव्हती. पण त्याबद्दल या दोघांना आम्ही सांगितलं तर त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी कोल्हेकुई ऐकलीच नव्हती. ते थोडं विचित्र होतं. पण मंदार आणि नवीन आमच्याशी खोटं बोलणार नाहीत याची मला खात्री होती. ते दोघे उठले आणि फ्रेश होत होते त्यावेळी आम्ही दोघी स्वयंपाकघराकडे गेलो. आम्ही चहा घेऊन आलो तर मंदार, नवीन आणि आनंद दिवाणखान्यात बसले होते. आम्ही सगळ्यांनी चहा घेतला. मी म्हंटलं भिकुला जेवण करायला सांगते; आपण जेऊ आणि लगेच निघू. तर आनंद म्हणाला भिकू दारू पिऊन टाईट होऊन पडला असेल. त्यामुळे तोच बाहेर जाऊन काहीतरी घेऊन येईल. ते खाऊन तयारी करून निघू. सगळ्यांनाच हा प्लॅन पटला आणि आनंद घराबाहेर पडला.

आनंद गेला आणि भिकू मागच्या दाराने आत आला. तो कसा काय आला ते आम्हाला कोणालाही कळलं नाही. पण त्याचा रागरंग सरळ नव्हता वाटत. मात्र तो माझं ऐकतो. त्यामुळे मी त्याला सांगितलं की मालक नाहीत... तो आनंदचा उल्लेख कायम फक्त मालक म्हणूनच करतो.... म्हणूनच मी देखील त्याच्याशी बोलताना आनंदचा उल्लेख मालक म्हणून करते. तर मी त्याला संगीतलं की मालक नाहीत. तू नंतर ये.

सर, इथे मला थोडी माहिती द्यायची आहे. खरंतर आनंदला भिकू फारसा आवडायचा नाही. हे खरं आहे की भिकुचं लग्न आनंदने लावून दिलं. पण तरीही आनंदला तो फार पटायचा नाही; हे मला माहीत आहे. त्यामुळे आदल्या रात्री भिकू आम्हाला जेवण आणून देत होता; बिअर देत होता; आम्ही गप्पा मारत असताना घरात काहीतरी पडलं तर आनंद आत गेला; त्यावेळी माझ्या मनात देखील आलं की भिकू आत आहे... आता आनंद अजून वैतागेल. पण तसं काहीच झालं नाही. या ट्रिप दरम्यात माझ्या लक्षात आलं की आनंद आणि भिकुमध्ये काहीतरी बदललं आहे. अर्थात; हे माझं मत झालं.

माझं आणि भिकुचं मात्र पटायचं पहिल्यापासून. तो मला अनेकदा म्हणाला आहे... तुम्ही वेगळ्या आहात ताई; तिच्यासारख्या! पण कोणासारखी ते विचारलं तर कधी सांगितलं नाही. अर्थात, सर, ही देखील एक माहिती आहे तुमच्यासाठी. तर...

भिकुला मी म्हंटलं तू नंतर ये. त्याने ते मान्य केलं आणि तो परत जायला निघाला. पण अचानक असं काय घडलं माहीत नाही; तो मागे फिरला आणि मंदारच्या अंगावर धावून गेला. आम्ही सगळेच तिथेच होतो. त्यामुळे आम्ही चौघांनी मिळून त्याला थोपवला. एकूण झटापटीमध्ये आम्हाला तर लागलंच; पण भिकू बेशुद्ध पडला. आम्ही ठरवलं की त्याला त्याच्या झोपडीत नेऊन टाकायचं आणि आनंद आला की लगेच निघायचं. त्याप्रमाणे आम्ही भिकुला घेऊन त्याच्या झोपडीत गेलो; तर आम्हाला तिथे आनंद दिसला. भिकूने त्याला बांधून ठेवलं होतं. हे खरंच अशक्य होतं माझ्या दृष्टीने. कारण एक तर भिकुला आनंद बद्दल एक आदरपूर्ण भीती होती. तो कधीच आनंदकडे डोळे उचलून देखील बघायचा नाही. आनंद समोर त्याच्या तोंडून मोठ्या आवाजात एकही शब्द बाहेर पडलेला मी बघितला नव्हता. अशा भिकूने आनंदला बांधून ठेवलं होतं. आनंदने आम्हाला सांगितलं की तो जेवण आणायला निघाला होता; इतक्यात भिकूने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला झोपडीत आणून बांधून ठेवलं होतं. आमचा त्यावर लगेच विश्वास बसला. कारण भिकूने आमच्यावर देखील कारण नसताना हल्ला केलाच होता. त्यामुळे आम्ही भिकुला तिथे बांधून ठेवलं आणि आनंदला घेऊन बाहेर पडलो झोपडीच्या.

आम्ही वाड्यावर आलो आणि सगळ्यांनी लगेच निघायची तयारी केली. एक एक करत आम्ही गाडीजवळ पोहोचत होतो. पण आमच्याही नकळत त्या भिकूने आम्हाला सगळ्यांना झाडांमध्ये ओढून घेतलं अचानक आणि त्याच्या झोपडीत नेऊन बांधून ठेवलं. सर, त्याने असं का केलं आम्हाला माहीत नाही. त्याने तर या तिघांची तोंडं पण बांधून ठेवली होती. मला का नव्हतं तसं केलं कोण जाणे. पण तो माझ्याशी बोलत होता. बोलत काय होता... सारखा म्हणत होता की आनंद सैतान आहे..... त्याच्यापासून वाचवण्यासाठीच त्याने आम्हाला त्याच्या झोपडीत आणून ठेवलं होतं. अर्थात आमचा त्याच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. मुख्य म्हणजे आनंद बाहेर मोकळा होता. त्यामुळे आम्हाला धीराने घेऊन भिकू कोणतीही भयंकर हालचाल करणार नाही याची काळजी घ्यायची होती. आमची सगळ्यांचीच खात्री होती की आनंद नक्की मदत घेऊन येणार होता आम्हाला सोडवायला... आणि झालं देखील तसंच! तुम्ही आलातच नं आम्हाला सोडवायला.

तर, सर, एकूण असं सगळं झालं आहे गेल्या दोन दिवसात. आम्ही सगळं सांगितलं आहे तुम्हाला. आता माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्याल का? माझा आनंद कुठे आहे सर? इतका वेळ आम्ही इथे आहोत; आपण बोलतो आहोत; पण तुम्ही त्याला अजून बोलावलं नाहीत. किंवा तो देखील इथे आलेला नाही. असं कसं? सर, माझा जीव कासावीस झाला आहे हो... प्लीज आनंदला बोलवा. माझी खात्री आहे तो इथेच आहे कुठेतरी आणि नीट आहे. आपण जी डेड बॉडी बघितली भिकूच्या झोपड्यात ती आनंदची नाही. असूच शकत नाही. कारण जर तो आनंद असेल आमची माहिती कळून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलातच कसे?"

अनघाचं बोलणं ऐकून राठींनी एक निश्वास सोडला. ते काहीतरी बोलणार इतक्यात केबिन बाहेर एकदम आरडाओरडा सुरू झाला. त्यामुळे राठी बाहेर धावले. त्यांच्या पाठोपाठ अनघा, मनाली, नवीन आणि मंदार देखील धावले. बाहेर येऊन बघतात तर भिकू लॉक अपच्या बाहेर येऊन उभा होता. तीन-तीन हवालदारांनी त्याला धरला होता पण त्यांच्याच्याने तो आवरत नव्हता. तो बाहेर कसा आला कोणालाही कळलं नव्हतं. पण तो मोठमोठ्याने ओरडत होता... तुम्ही कोणीही वाचणार नाही. तो येणार. मला सोडा. मला पळून जायचं आहे. सोडा ..... मला सोडा....

भिकुचं ओरडणं वाढलं आणि अचानक अनघा त्याच्या अंगावर ओरडली.

भिकू; काय लावलं आहेस हे? का ओरडतो आहेस तू? कोणाला सैतान म्हणतो आहेस? ज्याने तुला खायला घातलं आणि आजवर पोसलं त्याला? लाज नाही वाटत? गप बस् एकदम.

अनघाचा आवाज ऐकून भिकू एकदम शांत झाला. त्याने अनघाकडे एकदा बघितलं आणि तो खाली जमिनीवर एकदम फतकल घालून बसला. तो बसताच हवालदार पुढे झाले आणि त्यांनी त्याला बांधायला सुरवात केली. त्यासरशी भिकूने एकदम उसळी मारली आणि परत एकदा ओरडला; तो येणार... तो येणार!!!

अचानक राठी पुढे झाले आणि त्यांनी भिकूच्या कानशिलात एक भडकावून दिली आणि एकदम मोठ्याने ओरडले;"गप बस् मूर्खां. कोण येणार? तो आनंद? तो मेला आहे कधीच. तुझ्या झोपड्यात नाही.... गाडीच्या अपघातात. तो आता कधीच येणार नाही आहे. समजलं? तेव्हा आता एकदम गप बस्."

राठींचं बोलणं ऐकलं आणि भिकूने एकदम दचकून मान वर करून राठींकडे बघितलं. त्याच्या त्या अवस्थेचा फायदा उठवत हवालदारांनी त्याला बांधून परत एकदा लॉक-अप मध्ये टाकलं.

राठींनी मागे वळून बघितलं तर अनघा एकदम शॉकमध्ये गेली होती. मनाली तिच्या जवळ जाऊन तिला आधार देत उभी होती. मंदार आणि नवीन देखील एकदम हबकले होते. त्या सगळ्यांना तिथेच बसवून राठींनी एक खुर्ची ओढून घेतली आणि बोलायला लागले.

हे बघा. मला तुमच्या पासून काहीही लपवून ठेवायचे नाही. त्यामुळे मी तुम्हाला स्पष्टच सांगतो आहे. आनंदचा अपघात झाला आहे हायवे जवळ. आम्हाला ही माहिती एका गाडीवाल्याने दिली. त्याने तो अपघात बघितला आणि इथे पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगितलं. अपघाताबद्दल कळल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. गाडीत एकच व्यक्ती होती. चेहेरा बघताच तो ऍक्टर आनंद आहे हे आमच्या लक्षात आलं. गाडीत अजून काही बॅग्स आहेत हे बघितल्यावर इथेच लोणावळ्यात आनंद आणि त्याच्यासोबतचे लोक आले असतील असा कयास बांधून आम्ही चौकशी करत होतो. त्यावेळी या वाड्याबद्दल आणि आनंदच वाड्याचा मालक असल्याबद्दल कळल आणि आम्ही तिथे पोहोचलो. सगळी पोलीस कुमक येईपर्यंत मी झोपदीपर्यंत पोहोचलो आणि आत जे काही चालू आहे ते ऐकलं. त्यापुढे काय घडलं ते तुम्हाला माहीतच आहे.

तर मुख्य मुद्दा आता हा राहातो की झोपदीमधली ती डेड बॉडी कोणाची? कारण चेहेरा लांबून आणि त्या अपुऱ्या उजेडात आनंद सारखाच वाटला. अर्थात आता पोस्टमार्टेम मध्ये सगळं कळेलच." राठी पुढे देखील बोलणार होते पण अचानक भिकू जेलच्या गजांकडे आला आणि अनघाकडे बघत म्हणाला, ताई अपघात आनंदचा नाही झाला....

भिकूने असं म्हणताच हवालदार पवार पुढे झाला आणि गजांवर काठी आपटत म्हणाला;"ए भाड्या... गपतो का आता? आम्ही आमच्या डोळ्यांनी जे बघितलं आहे ते सांगतो आहोत. तू काय आता पोलिसांना खोटं ठरवणार का साल्या?" पवार अजून देखील काही बोलला असता पण त्याला थांबवत राठी म्हणाले;"तो आनंद नव्हता भिकू? मग तो कोण होता? तुला काय माहीत आहे? नीट बोलणार असलास तर आम्ही ऐकायला तयार आहोत."

भिकूने अनघाकडे बघितलं आणि म्हणाला;"ताई, मी का नाही बोलणार? सगळं सांगेन मी. पण तुम्ही लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे.

ताई, गाडी मकरंद चालवत होता. मकरंद म्हणजे मालकांचा भाऊ. मोठ्या साहेबांचा मुलगा. पण तिच्यापासून झालेला.

पवारला अचानक उत्सुकता वाटली. त्याच्या मनात आलं मकरंद म्हणजे नक्की त्या ठेवलेल्या बाईचा मुलगा असणार. त्यामुळे त्याने न राहून विचारलं;"तिच्यापासून म्हणजे ती ठेवलेली होती तिच्यापासूनचा ना?"

भिकूने एकदा पावरकडे बघितलं आणि परत बोलायला लागला;

ताई, विश्वास ठेवा.... ठेवलेली होती ती मुंबईची. लग्न झालेली वाड्यावरची. मालकीणबाई खूप खूप सुंदर होत्या. अगदी शांत स्वभावाच्या. मनमिळावू. मोठ्या मालकांना त्यांच्या या रूपाची आणि स्वभावाची भिती होती. का कोण जाणे... पण होती. ते नेहेमी मालकीण बाईंना म्हणायचे की इतकी चांगली आहेस की खरी नाही वाटत तू. मालकीण बाईंनी लग्नानंतर त्यांच्या माहेराहून एक सोबतीण आणली होती. ती मालकांचं हे वाक्य नेहेमी ऐकायची. हळूहळू तिने मालकांच्या मनात विष कालवायला सुरुवात केली. मालकीण बाई चेटूक करतात; असं तिने त्यांच्या मनात भरून दिलं. कधीतरी मालकांनी मालकीण बाईंना मुंबईला नेणं सोडलं आणि हिलाच न्यायला लागले. ताई, मी वाड्यावरच मोठा झालो आहे. त्यामुळे खरी कोण आणि खोटी कोण मला माहीत आहे. या पवारला देखील विचारा. तो यायचा की लहानपणी मालकीण बाई गोळ्या वाटायच्या तेव्हा. पण जेव्हापासून ती जायला लागली मुंबईला आणि मालकीण बाई अडकल्या वाड्यात तेव्हापासून हे सगळं बंद झालं. वाड्याकडंचं वातावरणच बदलून गेलं.

त्यातच मालकीण बाईंना दिवस राहिले. त्या बाईने देखील मालकांकडून स्वतःला पोर करून घेतलं. दिवस जात होते. मालकीण बाईंचं मन खचत होतं. त्या त्यांच्या खोलीतून बाहेर पडत नव्हत्या. त्यांनी त्यांचं फिरणं दोन खोल्या आणि बाजूला असलेला मधला दरवाजा इतकंच करून टाकलं. पुढे पुढे तर त्यांनी मालकांना भेटणं बंद केलं. मालक त्यांच्या मोठ्या खोलीत राहायचे. ते अधून मधून मकरंदला घेऊन यायचे. मालक आले की मालकीण बाई आनंदला त्यांच्या खोल्यांमध्ये अडकवून ठेवायच्या. धाकट्या मालकांना ते आवडायचं नाही. त्यातूनच धाकटे मालक एककल्ली व्हायला लागले. हळूहळू ते क्रूर व्हायला लागले. अगदी लहान लहान वागण्यातून मी ते बघत होतो. कारण मालकांचा एकुलता एक सवंगडी मीच होतो. मालक फुलपाखरू पकडायचे आणि त्यांचे पाय कात्रीने कापून त्यांना सोडायचे. फुलपाखरं उडायची पण फुलावर बसताना कोसळायची. ते बघून धाकटे मालक मोठमोठ्याने हसायचे. धाकट्या मालकांचे खेळ असेच दुष्टपणाचे झाले होते. हे सगळं कधीतरी येणारा मकरंद बघायचा. त्यामुळे तो धाकट्या मालकांना आनंदला घाबरायचा.

अर्थात मालकीण बाई असल्याने धाकटे मालक मकरंदला काही करू शकत नसत. असेच दिवस जात होते. हळू हळू मोठ्या मालकांना खरी परिस्थिती लक्षात आली. त्यांना मालकीण बाईंची माफी मागायची होती. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मोठे मालक रोज मालकीण बाईंच्या खोलीच्या बाहेर येऊन बसायचे. ते काही बोलायचे नाहीत... आणि मालकीण बाई दार उघडायच्या नाहीत. मकरंद हे सगळं बघायचा. कधीतरी मकरंद यायचा थांबला आणि मालक मुंबईला जायचे थांबले.

धाकटे मालक हे सगळं बघत होते. त्यांनी नक्की काय केलं... कसं केलं माहीत नाही मला; पण मोठे मालक त्यांच्या खोलीतून मालकीण बाईंच्या खोलीपाशी रोज येतच राहिले. पुढे पुढे मोठ्या मालकांच्या डोळ्यात मला धाकट्या मालकांसाठी भिती दिसायला लागली होती. जर कधी मोठे मालक मालकीण बाईंच्या खोलीकडे यायला उशीर करायचे तर धाकटे मालक दिवाणखान्यात येऊन शीळ घालायचे....

ताई..... तुम्ही कोल्हेकुई ऐकलीत ना??? तीच शीळ शिकले होते धाकटे मालक. दिवस जात होते... अचानक कधीतरी मालकीण बाई बाहेर आल्या त्यांच्या खोलीतून आणि त्यांनी मालकांना मधला दरवाजा उघडून दिला. मोठे मालक त्यातून बाहेर पडले ते कधीच परत आले नाहीत. हळू हळू मालकीण बाई देखील झिजून झीजून गेल्या.

मी आणि धाकटे मालक उरलो फक्त. ताई.... तोपर्यंत मी धाकट्या मालकांच्या कह्यात गेलो होतो पुरता. घाबरायला लागलो होतो मी त्यांना. ते सांगतील ते सगळं ऐकायला लागलो होतो. त्यांनी मला वाड्यावर राहायला सांगितलं आणि ते माझ्या झोपड्यात राहायला गेले. मी दिवस दिवस वाड्याच्या बाहेर पडत नसे.

एकदिवस अचानक मकरंद आला वाड्यावर. त्याने दार उघडलं तर मी दिवणाजवळच पडलो होतो. त्याला बघितलं तर मला वाटलं धाकटे मालक आले. तो पुढे आला आणि माझ्या शेजारी बसला आणि म्हणाला;"भिकू ना रे तू?"

मी मानेनेच होकार दिला. त्याबरोबर माझा हात धरत तो म्हणाला;"भिकू, मी देखील अडकलो आहे अचानकपणे यात. आई-बाबा गेले. मला मान्य आहे माझ्या आईच्या धोक्यामुळे त्याची आई हालहाल होऊन गेली. पण आता त्याचा सूड तो माझ्यावर घेतो आहे. भिकू... तो आता एकदम माझ्यासारखा दिसायला लागला आहे. हे कसं झालं माहीत नाही. पण तो आता मुंबईला येऊन मी जिथे जातो तिथे जायला लागला आहे. अरे त्याने तर माझ्या गर्ल फ्रेंडला देखील भेटायला सुरवात केली आहे. भिकू.... त्याच्या भितीने मी माझ्या स्वतःच्या घरात राहाणं सोडलं आहे.

पण आता मात्र पाणी डोक्यावरून जातं आहे. या लॉक डाउनच्या काळात तो अनघाला भेटला आणि त्याने तिला इथे आणलं आहे. तुला तर माहीतच आहे ते.

मी मान हलवत म्हणालो 'हो.. ताई एकदम चांगल्या आहेत. मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला. पण त्या या सगळ्यांपासून लांब असल्याने त्या माझ्याकडे बघत देखील नाहीत. किंवा त्यांना समजत देखील नाही मी काय म्हणतो ते.' मी असं म्हणताच मकरंदने मला मिठी मारली आणि रडत म्हणाला... भिकू सोडव रे मला याच्या जाळ्यातून. मला जिथे जाईन तिथे आता तोच दिसतो. मी वेडा व्हायला लागलो आहे. त्याचं अस्तित्व जाणवलं की मी माझा राहात नाही. हे म्हणजे कोणालाही सांगू शकत नाही असं दुःख आहे माझं.

मकरंद रडत होता... पण मी तरी काय करणार होतो? मी देखील त्याच्या जाळ्यातलं एक पाखरुच होतो नं. आणि मग एक दिवस तुम्ही सगळे आलात. धाकटे मालक फिरत होते सगळीकडून. पण तुम्ही सगळे आपल्याच नादात होतात. मकरंदला कळत होतं; पण तो काही करूच शकत नव्हता. मला त्याच्या थंड डोळ्यातली भिती दिसत होती. पण मी तरी काय करणार?

तुम्ही निघालात आणि धाकट्या मालकांनी मला झोपडीजवळ बोलावून घेतलं. त्यांनी मला वाड्यावर जाऊन तमाशा करायला सांगितलं आणि स्वतःला झोपडीत बंद करून घेतलं. मी वाड्यावर आलो. आपली झटापट झाली. त्यात मी बशुद्ध झालो. जेव्हा जाग आली तेव्हा मी झोपडीत होतो. माझा जीव घशापर्यंत आला. मी धपडत बाहेर आलो. तुम्ही सगळे निघायची तयारी करत होतात. काय झालं कोण जाणे... पण मी तुम्हाला सगळ्यांना एक एक करत झोपडीत आणून ठेवलं. मला खरंच तुम्हाला सगळ्यांना वाचवायचं होतं ताई.

त्यानंतर काय झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे."

भिकू बोलायचा थांबला आणि सगळेच एका स्वप्नातून जागे झाल्यासारखे झाले. राठींनी पावरकडे बघत विचारलं;"तो पोस्टमार्टेम रिपोर्ट कधी येणार पवार? त्याचं DNA आपण ज्याला आनंद म्हणायचो त्याच्याशी मॅच होतं आहे का बघितलं पाहिजे. अर्थात, कोण गाडीत होतं आणि कोण झोपडीत होतं कळणं अशक्य आहे. भिकू तू जे सांगतो आहेस त्याला तुझ्याकडे काही पुरावा असणं शक्यच नाही. त्यामुळे मी तुला असा सोडणार नाही आहे हे लक्षात घे."

त्यानंतर अनघा, मनाली, नवीन आणि मंदारकडे वळत राठी म्हणाले;"प्रायमाफेसी तुम्ही कोणीही काहीही केलेलं नाही हे सिद्ध होतं आहे. कारण भिकुचं सगळं मान्य करतो आहे. त्यामुळे तुमची सगळी माहिती द्या. त्यानंतर तुम्ही इथून निघालात तरी चालेल."

राठींचं बोलणं ऐकून पवार पुढे झाला. त्याने त्या चौघांनाही खूण केली आणि बाहेर नेलं. पवारने एकेकाला समोर बसवत त्याची सगळी माहिती लिहून घेतली.

अनघा, मनाली, नवीन आणि मंदार पोलीस स्टेशन बाहेर आले त्यावेळी चांगलंच उजाडलं होतं. अनघाचे डोळे रडून रडून सुजले होते. मनाली पूर्णपणे सुन्न झाली होती. मंदार आणि नवीन देखील फारच वाईट मनस्थितीत होते. चौघेही हळूहळू चालत थोडे पुढे गेले आणि समोरच एक टपरी दिसली तिथे एकमेकांना न सांगताच थांबले.

नविनने पुढे होऊन चहासाठी ऑर्डर दिली आणि तो मागे वळला. मंदारने खुणेने त्याला जवळ बोलावलं आणि बोलायला लागला....

हे बघा... जे काही झालं ते फारच वाईट होतं. असं काही असेल आणि आनंद... मकरंद... जो कोणी होता तो आपला मित्र होता की नव्हता त कळायला मार्ग नाही. मकरंदने आनंदचं नाव का घेतलं होतं? आनंद झोपडीत कसा गेला? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत... पण मला वाटतं आपण सगळ्यांनी याविषयी फार विचार न करता आपलं आयुष्य पुढे सुरू केलं पाहिजे. सर्वात जास्त अनघाला ते अवघड जाणार आहे. पण अनघा आम्ही तुझ्या सोबत आहोत; हे विसरू नकोस."

मंदार बोलत असताना चहा आला. तो सगळ्यांनी घेतला. नविननेच पुढे होत कोपऱ्यावर एका टॅक्सीला हात केला आणि चौघेही न बोलता टॅक्सीमध्ये बसून मुंबईच्या दिशेने निघाले. त्यांच्या मागावर असलेल्या पवारने पोलीस स्टेशनला येऊन ते चौघे गेल्याची माहिती राठींना दिली.

****

राठींनी भिकुला लॉक अप मधून बाहेर काढलं आणि समोर उभं केलं. त्याला एकदा वरपासून खालपर्यंत निरखून राठींनी पावरला हाक मारली आणि म्हणाले;"सोडून ये याला वाड्यावर. तो तिथेच चांगला." आणि मागे वळून ते केबिनमध्ये गेले.

पवारने भिकुला गाडीत बसवलं आणि गाडी वाड्याकडे वळवली.

भिकू गाडीतून उतरत असताना पवार म्हणाला;"बाकी सगळे सुटणार भिकू.... तुझं तू बघ. कारण जोपर्यंत तू अडकला आहेस; तोपर्यंत ते चौघे सेफ आहेत."

पवारने गाडी वळवली आणि निघून गेला.

वाड्याच्या दिशेने पाऊल उचलत भिकू म्हणाला;"धाकटे मालक.... तुम्ही आणि मी!!!!! आलो मी......"


समाप्त




Friday, February 12, 2021

प्रवास भाग 7

 प्रवास


भाग 7


प्रवास

भाग 7

"काय वाटतं पवार... काय रहस्य असणार या वाड्याचं?" वाड्याच्या दिशेने निघाल्या नंतर राठींनी पावरला विचारलं.

पवार देखील तोच विचार करत होता. रस्त्यावरची नजर ढळू न देता तो बोलायला लागला;"साहेब, काही कळत नाही. तो आनंद एकटा आला नव्हता हे नक्की. त्याच्या गाडीतल्या सॅक्स वरूनच ते कळतं. त्यात गर्ल फ्रेंड असताना थर्टीफस्टला कोणी एकटं का येईल? पण पाच जण होते... म्हणजे एकटं जोडपं नाही. याचा अर्थ जोडप्यामध्ये होणारी भांडणं झालेली नाहीत. मग मित्र कोण होते? सिनेमावाले असतील की अजून कोणी? दिनू म्हणाला कोणीतरी मुलगी... याचा अर्थ आनंदची मैत्रीण सिनेमावाली नाही. नाहीतर दिनूने ओळखली असतीचं. जर मैत्रीण दुसरी कोणीतरी तर मग सोबत आलेले सगळे सिनेमावले नसणार. जर तसं असेल तर हे जुने मित्र-मैत्रिणी पूर्वी पण आले असतील कदाचित. दिनूला लक्षात आलं नसेल.... जुने मित्र म्हणजे जुन्या विषयांवर भांडणं असू शकतात न साहेब. त्यावरून त्या आनंदला मुद्दाम अपघात घडवला. आणि बाकी पळून गेले. असं तर नसेल न झालं?"

पावरचं बोलणं राठी शांतपणे ऐकत होते. त्याच्या खांद्यावर थोपटत ते म्हणाले;"पवार, आजकाल तुझी लिंक चांगली लागते आहे. पाच जण होते. त्यातला एक आनंद स्वतः... दुसरी त्याची गर्ल फ्रेंड. म्हणजे अजून तीन जण. सिनेमावले नाहीत हे तुझं लॉजिक देखील लागू होतं. जुने मित्र म्हणजे जुनी भांडणं हे पण बरोबर. पण अरे आनंदला मारण्याचा त्यांचा प्लॅन असेल तर स्वतःच्या बॅग्स त्याच गाडीत ते कसे सोडतील? त्यात त्याची गर्ल फ्रेंड देखील असणार. तीच जर मारण्याचा प्लॅन करणारी असेल तर गोष्ट वेगळी... पण जर तिचं खरं प्रेम वगैरे असेल आनंदवर तर ती विरोध करेलच न? सर्वात मुख्य मुद्दा हा की गाडीचा अपघात झाला आहे. याचा अर्थ आलेल्या लोकांनी मारलेl नाही आनंदला. पण काहीतरी गडबड नक्की आहे."

राठींचं बोलणं ऐकून पवारने मान डोलावली आणि म्हणाला;"बरोबर साहेब. पण मग जर अपघातच आहे तर मग पुढे काय?"

त्यावर पवारच्या डोक्यात टप्पल मारत राठी म्हणाले;"अरे भाड्या.... पाच सॅक्सचं कोडं आहे ना अजून!"

डोक्यावर चोळत पवार म्हणाला;"हा ते ही खरंच साहेब. आणि त्या निमित्ताने त्या रंभा उर्वशी बद्दल पण कळलंय न. ते देखील समजून घ्यावं लागेल न."

विचार करत राठी म्हणाले;"पवार, खरी गोम तिथेच आहे. ती रंभा... तो भिकू... तो मकरंद आणि आनंद..... यात खरं गौडबंगाल आहे. बरं मला एक सांग; हे इतकं मोठं प्रकरण आहे या गावातलं आणि तुला काहीच कसं माहीत नाही? साल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या खबरा तुला तुझ्या पणज्या पासूनच्या माहीत आणि इथली माहिती नाही असं होऊच शकत नाही."

एकदा राठी साहेबांकडे बघून परत नजर रस्त्याकडे वळवत पवार म्हणाला;"साहेब, सगळं माहीत आहे मला. पण दिन्या म्हणाला ते खरं आहे. त्या वाड्याबद्दल बोललं तरी आपल्या घरावर बालंट येतं असं माझी आई बोलायची. अर्थात आता मी तुम्हाला सगळं सांगितलंच असतं; पण दिन्या बोलत होता तर म्हंटलं त्याला काय ते सांगू दे; जर त्याच्याकडून काही राहिलं तर आपण सांगूच. पण साहेब त्याने जे सांगितलं मला देखील तितकंच माहीत आहे. मी पण विचार करायचो की आनंद आला की मकरंद का गायब होतो? आणि गायब होतोच तर तो कुठे जातो? एरवी कोणालाही उभा न करणारा तो भिकू आनंदला का घाबरतो? काहीतरी रहस्य आहे त्या वाड्याचं. चला आता या निमित्ताने कळणार आपल्याला."

राठींनी एकदा पवारकडे बघितलं आणि परत ते रस्त्याकडे बघायला लागले. वाडा फारसा दूर नसल्याने त्यांची गाडी लगेच पोहोचलीच. वाडा एकदम अंधारात होता. त्यामुळे आता काय करावं असा प्रश्न राठींना पडला. एक पिस्तुल आणि लाठी घेतलेला हवालदार इतक्या तयारीने जावं का वाड्याकडे असा प्रश्न पडला राठींना पडला होता. पवार देखील राठी साहेबांच्या मनातलं वाचल्या सारखं तेच म्हणाला;"साहेब, आपण दोघेच जायचं का? म्हणजे मी भीत नाही... पण पूर्ण अंधार आहे वाड्यावर. भिकू देखील वाड्यावर नसतो... त्याचं झोपडं कुठेतरी मागे आहे असं म्हणतात. पण मला ते देखील माहीत नाही."

थोडा विचार करून राठी म्हणाले;"परत जाऊ पवार आणि सगळ्यांना घेऊनच येऊ." पवारने मान डोलावली आणि गाडी चालू करून यु टर्न घेतला. पवार गाडी पुढे काढणार एवढ्यात राठींना बाजूच्या झाडीमधून कोणीतरी पळत असताना दिसलं आणि पवारच्या लक्षात यायच्या अगोदरच राठी गाडीतून उतरून त्या व्यक्तीच्या आज धावले होते.

गाडी बंद करून गाडीला वळसा घालून त्या झाडीपर्यंत पवार पोहचला तोपर्यंत राठी दिसेनासे झाले होते. पवार देखील झाडीत शिरणार होता. पण तो थबकला. त्याच्या मानत विचार आला की साहेब निदान रिव्हॉल्वर घेऊन आहेत. आपल्याकडे काहीच नाही. त्यात साहेबांनी काहीतरी बघितलंय. आपल्याला तर माहीत देखील नाही कशाच्या मागे धावायचं आहे. तेव्हा शहाणपणा यात आहे की लगेच कुमक मागवून सगळ्यांच्या सोबत या रानात शिरावं. हा विचार मनात येताच पवार मागे वळला आणि त्याने मोबाईल हातात घेतला. गाडीत बसत त्याने पोलीस स्टेशनवर फोन लावला. नीट रेंज नसल्याने फोन कोणी उचलला आहे ते पवारला कळेना. तो ओरडून ओरडून सांगायला लागला...

अरे मी आणि राठी साहेब भूतिया वाड्याकडे आहोत. हो हो... भूतिया वाड्याबद्दलच बोलतो आहे रे. आं... काय बोलतो आहेस तू ते कळत नाही. तुझं सोड. सगळी कुमक घेऊन या इथे तांबडतोप. राठी साहेब गायब झालेत. अबे.... तुला जे सांगतो आहे ते कर. हो! सगळे या... लगेच! मी इथेच थांबतो आहे. साल्या मला नको अक्कल शिकवूस. गाडीजवळ आहे मी. या लवकर."

असं म्हणून पवारने फोन बंद केला. परत एकदा गाडीतून उतरावं असा विचार पवारच्या मनात आला. पण अचानक त्याला कोल्हेकुई ऐकू यायला लागली. थोडं नीट लक्ष दिल्यावर गाडीच्या मागून आवाज जवळ येतो आहे असा भास झाला पवारला. त्याला एकदम जोराची लागली आणि काहीही विचार करायच्या अगोदर त्याने गाडी चालू करून फुल्ल स्पीडमध्ये तिथून पळ काढला. पवारची गाडी गेली आणि कोल्हेकुई बंद झाली.

राठी.............. कोणाला बघून धावले होते राठी? कोल्हेकुई कुठून सुरू झाली होती अचानक? गाडी पुढच्या वळणावर थांबवून पवार विचार करत होता. आता परत एकदा एकट्याने मागे वाड्यावर जायची त्याची हिम्मत नव्हती. त्यामुळे इतर सगळे येइपर्यंत तिथेच थांबायचा निर्णय त्याने घेतला. त्याच्या अंदाज बरोबर होता. पोलीस स्टेशनमधले सगळेच दोन तीन जिप्स काढून निघाले आणि त्याच्या गाडीजवळ येऊन थांबले. त्यांना बघताच पवारच्या जीवात जीव आला आणि दोघा-तिघांना स्वतःच्या गाडीत घेत त्याने सगळ्यांना खूण केली आणि गाडी परत वाड्याकडे वळवली.

आता पोलिसांचा मोठा सायरन वाजवत जास्तीचे फ्लड लाईट्स लावलेल्या सगळ्या गाड्या वाड्याकडे पोहोचल्या आणि.....

गाड्यांच्या समोरच राठी साहेब दोन मुली आणि दोन मुलांसोबत उभे होते. बाजूलाच आडदांड भिकू जमिनीवर बसला होता.

तो प्रकार बघून पवार गोंधळून गेला. गाडीतून उतरत तो राठींकडे धावला आणि त्यांच्या पायावर लोळण घेत म्हणाला;"साहेब... मला माफ करा साहेब. मी तुमच्या मागे येणारच होतो. पण... साहेब... कबूल करतो... मी खूप घाबरलो. एकतर हा वाडा... कधी चांगलं नाही ऐकलं या वाड्याबद्दल. त्यात इतका अंधार... तुम्ही दिसतसुद्धा नव्हता... एक लाठी घेऊन मी कुठे शिरणार होतो त्या रानात. म्हणून मी आपल्या लोकांना बोलावलं आणि आता तुमच्या मागावरच येणार होतो. साहेब.... " पवार रडत होता आणि राठींचे पाय सोडत नव्हता.

त्याला खांद्याला धरून उठवत राठी म्हणाले;"पवार, अरे... आवर स्वतःला. माझं काहीही म्हणणं नाही. मी खरंच समजू शकतो. अरे तुला कल्पना न देताच मी गाडीबाहेर पडलो आणि पळालो. तुला काही कळायच्या आत सगळं घडलं होतं. तू योग्यच केलं आहेस. तुझ्याकडे कोणताही दोष जात नाही. त्यामुळे हे रडणं आवर आणि या पोरांना गाडीत घालून गाडी स्टेशनकडे घे. भिकुला देखील सोबत घे.... दुसऱ्या गाडीतून." अस म्हणून राठी सब इन्स्पेक्टरकडे वळले आणि म्हणाले;"हे बघ दिघे, मी पोलीस स्टेशनकडे जातो आहे. तू वाड्याची पूर्ण तलाशी घे. प्रत्येक कोपरा नीट बघ तू स्वतः आणि आता नीट ऐक! वाड्याच्या मागल्या अंगाला विहिरीच्या बाजूने पुढे गेलास की भिकुचं झोपडं आहे. तिथे एक डेड बॉडी आहे. ती पोस्टमार्टेमला पाठवायची सोय कर. आणि मगच पोलीस स्टेशनकडे ये."

त्या पोरांना गाडीमध्ये बसवत असलेल्या पवारने राठी साहेबांचं शेवटचं वाक्य ऐकलं आणि तो एकदम गर्रकन वळला. "साहेब? डेड बॉडी? कोणाची? या भिक्याच्या झोपड्यात? कोणाला मारलं आहे या राक्षसाने?"

एकदा भिकुकडे बघून मग पवारकडे बघत राठी म्हणाले;"पवार स्टेशनकडे घे गाडी. सगळं कळेल तुला."

एकदा भिकुकडे बघून मग मान हलवत पवारने त्या पोरांना गाडीत बसवलं. अजून दोन हवालदार देखील गाडीत बसले. बाकी सगळे वाड्याच्या दिशेने गेले. पवारने गाडी चालू केली आणि पोलीस स्टेशनच्या दिशेने वळवली.

पवारच्या मनात अनेक प्रश्न होते; पण आत्ता काहीही बोलणं योग्य नाही हे माहीत असल्याने तो शांतपणे पण जितक्या फास्ट जमेल तितक्या फास्ट गाडी पोलीस स्टेशनकडे पळवत होता. गाडीमध्ये एक विचित्र शांतता होती.

अनघा-मनाली-नवीन आणि मंदार!!! चौघेही एकमेकांकडे बघत अस्वस्थपणे गाडीमध्ये बसले होते.

राठींची नजर रस्त्यावर स्थिरावली होती. पण त्यांच्या मनात नुकतेच घडलेले प्रसंग एखाद्या सिनेमप्रमाणे झरझर जात होते.....

***

हालचाल जाणवल्यामुळे गाडीतून झटकन उतरून राठी झाडीकडे धावले होते. जी कोणी व्यक्ती होती ती भलतीच वेगात धावत होती. पण राठींनी त्याची पाठ सोडली नाही. एका क्षणी मात्र समोर कोणीही नव्हते आणि अचानक राठींना समोर एक झोपडं दिसलं. अर्थात तिथे झोपड्यासारखं काहीतरी आहे; हे लक्षात आलं तेच मुळी आतमधल्या मिणमिणत्या दिव्यामुळे. राठींनी क्षणभर थांबून एक दीर्घ श्वास घेतला आणि धपापणारी छाती शांत करून ते सावकाश त्या झोपड्याकडे गेले. राठींना आतून बोलण्याचे आवाज येत होते....

"माझ्यावर विश्वास ठेवा पोरांनो... तुम्हाला वाचवलं आहे मी त्याच्या विळख्यातून. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचं काही खरं नाही. तुम्ही कुठेही पळा... तो येणार तुमच्या मागावर. माणूस नाही समंध आहे तो. अरे माझ्यासारखा माणूस जर त्याला घाबरतो तर त्याच्यात काहीतरी असेल न? अरे.... तुम्हाला वाचवलं आहे मी त्याच्यापासून. कसं कळत नाही तुम्हाला?"

कोण बोलत होतं ते राठींना कळलं नाही. पण त्याचं सांगणं पोटतिडकीचं होतं हे जाणवत होतं. राठी पुढे जाणार होते इतक्यात एका मुलीचा आवाज आला त्यांना आणि ते थबकले.

"भिकू.... काय बोलतो आहेस तू? तुझे मालक ना ते? अरे तुला राहायला छत दिलं... तुझं लग्न लावून दिलं... त्यांच्या जीवावर जगतो आहेस आणि असं काहीतरी बोलतो आहेस? बरं तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा आम्ही? हे असं बांधून ठेवलं आहेस आम्हाला. यांच्या सगळ्यांच्या तोंडात बोळे कोंबले आहेस. मला काय ते बोलू देतो आहेस....."

"अनघा ताई.... तो येणार! नक्की येणार.... यांना बांधलं आहे ते त्यांच्या भल्यासाठी. नाहीतर ते धावत सुटतील आणि त्याच्या हातात आयते पडतील. अनघा ताई मला समजून घ्या. तुमच्यासाठीच सांगतो आहे मी."

"भिकू... अरे हे काय अचानक लावलं आहेस तू? तो जर असा कोणीतरी भयंकर आहे तर मला कधीच कसं कळलं नाही? अरे त्याच्या सोबतच आहे मी गेले अनेक महिने. मुख्य म्हणजे तो जर असा कोणीतरी आहे तर तू मला याअगोदर कधीच कसं काही बोलला नाहीस?"

"ताई... कितीतरी प्रयत्न केले मी तुम्हाला सांगायचे. पण तो तुम्हाला एकटं सोडायचा नाही आणि तुम्ही त्याची पाठ सोडायचा नाहीत."

"भिकू.... अरे असं काय केलंय त्याने? बरं त्याने जे केलं ते केलं... तू हे असं आम्हाला बांधून काय मिळवतो आहेस? सोडव रे आम्हाला."

"ताई.... ताई.... अहो माझ्यासारखा धटिंगण त्याला बघून गोगलगाय होतो यात सगळं नाही का आलं? अहो... तो समोर असला की माझं काय होतं तुम्ही पाहिलं आहात ना? तरीही तुम्ही असं विचारता आहात?"

"भिकू... मला कायम वाटत आलं की तुला तुझ्या मालकांबद्दल इतका आदर आहे की त्यांच्या समोर तू नजर देखील वर उचलत नाहीस."

"ताई... तो काय विचार करतो सांगता येत नाही. तो भयंकर आहे. तुम्हाला मी कधीपासून सांगतो आहे... माझ्यावर विश्वास ठेवा."

"भिकू आधी माझ्या या मित्रांना आणि मैत्रिणीला सोडव बघू. माझे बांधलेले हात देखील सोडव. अरे अंग आंबून गेलं आहे आमचं. कसं कळत नाही तुला? मी शब्द देते आम्ही कुठेही पळून जाणार नाही किंवा काहीही करणार नाही. सोडव रे आम्हाला. प्लीज."

त्या मुलीचा आवाज खूपच आर्जवी होता. आतल्या बोलण्यावरून राठींच्या लक्षात आलं की आत दोन मुली आणि कदाचित दोनपेक्षा जास्त मुलगे आहेत आणि मुख्य म्हणजे तो भिकू आहे. ही मुलं बांधलेली आहेत आणि सगळ्या नाड्या त्या भिकूच्या हातात आहेत. एकूण आतला प्रकार लक्षात आला आणि राठींनी क्षणात निर्णय घेतला.

झोपड्याचा तकलादू दरवाजा धाडकन लाथेने उघडत राठी हातातले पिस्तुल भिकुवर रोखत झोपड्यात शिरले.

अचानक झालेल्या या प्रकाराने भिकू एकदम हबकून गेला. तो मागे मागे जात भिंतीवर आदळला आणि तसाच खाली बसला. राठींनी त्याच्याकडे पिस्तुल रोखून धरत समोर असलेल्या मुलीचे हात सोडवले. हात सुटताच तिने स्वतःचे पाय सोडवून घेतले आणि ती बाजूच्या तिच्या मैत्रिणीकडे धावली. दुसरी मुलगी बंधनातून सुटताच त्या दोघींनी बाजूला असलेल्या दोन्ही मुलांचे हात पाय सोडवले. हे सगळं होत असताना राठी भिकुवर पिस्तुल रोखून उभे होते. चारही मुलं सुटलेली बघितल्यावर राठी म्हणाले;"तुम्ही नक्की कोण आहात मला माहीत नाही. पण माझ्या मताप्रमाणे तुम्ही आनंदचे मित्र आहात."

राठींचं बोलणं ऐकून चौघांनीही मान डोलावली. त्यातला एक मुलगा पुढे झाला आणि म्हणाला;"साहेब, गेले काही तास आम्ही इथे असे बांधलेल्या अवस्थेत आहोत. या भिकूने आम्हाला एकएक करत इथे आणून बांधून ठेवलं आहे. अर्थात त्याने असं का केलं आहे ते त्याचं त्यालाच माहीत. कारण आम्हाला तर बोलूच दिलं नाही त्याने. ही अनघा तेवढी बोलत होती त्याच्याशी. खरं तर आम्ही आज परत जाणार होतो मुंबईला. पण हे सगळं काहीतरीच घडून बसलं आहे."

तो मुलगा अजूनही काहीतरी बोलणार होता तेवढ्यात भिकू उभा राहायचा प्रयत्न करत म्हणाला;"तो तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. त्याला तुमचा संशय आलाय. तो मारणार तुम्हाला...." भिकुचा आवाज चढायला लागला तसा राठींनी पिस्तूलाचा मागचा चाप ओढला आणि पिस्तुल झाडायला तयार झाले. हे बघताच अनघा मध्ये पडत म्हणाली;"इन्स्पेक्टर साहेब तो फक्त दिसायला आडदांड आहे. तो काहीही करणार नाही. नाही ना रे भिकू तू काही करणार?" त्यावर तिच्याकडे बघत भिकू म्हणाला;"मी कशाला काही करायला पाहिजे. तो येणार म्हणजे येणार!"

त्याचं ते असंबंध बोलणं ऐकून राठी वैतागले. हे लक्षात येऊन परत एकदा मध्ये पडत अनघा म्हणाली;"इन्स्पेक्टर साहेब, हवं तर आपण याला बांधू. पण कृपा करून गोळी नका चालवू. तो खरंच काही करणार नाही." असं म्हणत ती तिच्या मित्रांकडे वळली आणि म्हणाली;"नवीन-मंदार मला मदत करा. आपण भिकुला बंधुया." असं म्हणून ती भिकुकडे वळत म्हणाली;"भिकू त्रास न देता तू बांधून घे स्वतःला. ते तुझ्यासाठी आणि आमच्यासाठी देखील चांगलं आहे. तुला जे काही सांगायचं आहे ते सांग. तुझं तोंड कोणीही बांधत नाही आहे. पण तुझ्याकडे बघून तुला आवरता येईल असं वाटत नाही. त्यामुळे तुला बांधणं आवश्यक आहे."

अनघाचं बोलणं ऐकून भिकूने मान हलवली आणि नवीन-मंदारने भिकुला बांधलं. त्याला बंधताक्षणी मनालीने तोंड उघडलं आणि म्हणाली;"इन्स्पेक्टर साहेब, हा माणूस वेडा आहे. याने आम्हाला सगळ्यांना अचानक झाडीत खेचून बांधून या झोपड्यात आणून टाकलं. आमचा मित्र आनंद.... तो आम्हाला शोधत असेल. हा राक्षस मात्र आम्हाला इथून हलू देत नव्हता. आम्हाला बांधून तोंडात बोळे घालून ठेवलं होतं... का तर म्हणे आम्हाला आनंदपासून वाचवायला. अहो... हा धटिंगण आमच्यावर चालून आला होता आज दुपारी. आम्ही चौघेही एकत्र होतो म्हणून स्वतःला कसतरी वाचवू शकलो. त्या हाणामारीत तो बेशुद्ध पडला तेव्हा त्याला घेऊन आम्ही इथे आलो.... तर.... तर.... साहेब, इथे आनंदला बांधून ठेवलं होतं याने. आम्ही सोडवलं आनंदला.... आता हा म्हणतो आहे की ज्या आनंदला याने बांधून ठेवलं होतं तोच आम्हाला मारायचा प्लॅन करतो आहे. कसा विश्वास ठेवणार आम्ही याच्यावर?"


राठींनी तिचं सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि मग प्रश्नार्थक नजरेने अनघाकडे बघितलं. अनघाच्या लक्षात आलं की इन्स्पेक्टरला काहीही कळलेलं नाही. त्यामुळे तिने मनालीला शांत करत बोलायला सुरवात केली;

"इन्स्पेक्टर साहेब, आम्ही पाच जण... म्हणजे मी... अनघा, ही मनाली, नवीन, मंदार आणि आमचा मित्र आनंद... जो या समोरच्या वाड्याचा मालक आहे... आम्ही जुने कॉलेजचे मित्र-मैत्रिणी आहोत. आम्ही इथे थर्टीफस्टसाठी आलो होतो. इथे आल्यापासूनच काही ना काही विचित्र घटना घडत होत्या. त्यामुळे आम्ही तसे सगळेच मनातून धास्तावलेले आणि अस्वस्थ होतो. आम्ही आज परत निघणार होतो...

दुपारी आमचा मित्र आनंद आमच्यासाठी जेवण आणायला गेला असताना अचानक हा भिकू वाड्यावर आला आणि त्याने आमच्यावर हल्ला केला. खरं तर हा दिसायला तसा धटिंगण असला तरी असा अचानक कधीच कोणावरही जात नाही. मला हे माहीत आहे कारण मी आनंद बरोबर या वाड्यावर याअगोदर देखील आले आहे. फक्त मी आणि आनंद असे इथे एखाद-दोन दिवस राहिले देखील आहोत. त्यावेळी हा भिकुच सगळं करायचा आमच्यासाठी.... पण हे देखील खरं की याने आमच्यावर हल्ला केला आज दुपारी. आम्ही सेल्फ डिफेन्समध्ये त्याच्यावर उलट हल्ला केला. त्यात तो बेशुद्ध पडला. त्याला घेऊन आम्ही इथे आलो त्याच्या झोपड्यात. तर आमच्यासाठी जेवण घ्यायला गेलेला आनंद इथे बांधून पडलेला दिसला आम्हाला. आम्ही पूर्ण चक्रावले होतो. भिकू बेशुद्ध होता. आम्ही आनंदला सोडवला. त्याने आम्हाला सांगितलं की भिकूने त्याला गाडीतून खेचून आणून इथे बांधून ठेवलं होतं. आम्हाला ते खरंच वाटलं. मग आनंदच्या सांगण्यावरून आम्ही भिकुला बेशुद्ध अवस्थेतच बांधून ठेवलं आणि लगेच वाडा सोडायचं ठरवलं.

त्याप्रमाणे आम्ही आमच्या बॅग्स भरून गाडीजवळ पोहोचलो. पण आम्हाला एकएक करत झाडीत ओढून घेत भिकूने इथे आणून बांधून ठेवलं. इथे आणल्यापासून हा एकच सांगतो आहे की त्याचा मालक एक दुष्ट माणूस आहे आणि तो आम्हाला चौघांनाही मारून टाकणार आहे. त्याच्यापासून वाचवायला त्याने आम्हाला इथे आणून ठेवलं आहे. मी त्याला अनेकदा समजावलं की आनंद असं काहीही करणार नाही. पण हा ऐकायलाच तयार नाही.

मला तर हे कळत नव्हतं की आम्ही गाडीजवळ नाही हे लक्षात आल्यानंतर आनंद अजूनही इथे कसा आलेला नाही? पण आता तुम्हाला बघितल्यावर लक्षात आलं की तो पोलिसांची मदत घ्यायला गेला होता. तुम्हाला इथली परिस्थिती समजावून घेऊन आला आहे ना तो? पण मग तो नाही का आला तुमच्या सोबत ही झोपडी दाखवायला?"

राठी अनघाचं बोलणं शांतपणे ऐकत होते. अजूनही त्यांचं पिस्तुल त्यांनी भिकुवर रोखलेलं होतं. अनघाच्या शेवटच्या प्रश्नाने त्यांची नजर थंड झाली. तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता ते म्हणाले;"हे पहा... आपण सगळे अगोदर इथून बाहेर पडुया. माझी पोलिस कुमक येईलच काही क्षणात. आपण पोलीस स्टेशनवर जाऊ आणि मग सगळं नीट बोलूया. ठीक?"

राठींचं बोलणं ऐकून भिकू उभा राहिला आणि म्हणाला;"तो मारणार यांना... तुम्हालासुद्धा.... मी म्हणतो ना तो मारणार!!! आता तर मी पण मरणार. तुम्ही आलात ना म्हणजे त्याला कळलं मी काय करतो आहे. आता आपण सगळे मरणार."

भिकुचं बोलणं ऐकून मंदार एकदम वैतागला आणि त्याच्यावर ओरडला;"ए राक्षसा गप बस्. तू आनंदला बांधून ठेवलं होतंस. जे काही केलं आहेस ते तू केलं आहेस. त्यात त्याचा काही दोष नाही. आम्हाला देखील तूच बांधून ठेवलंस आणि आळ त्याच्यावर घेतो आहेस. शेवटी त्यानेच या इन्स्पेक्टर साहेबांना पाठवलं आहे आमच्यासाठी. आनंद थोडा विचित्र वागत होता गेले दोन दिवस हे मान्य करतो मी. पण म्हणून तो आम्हाला मारेल असं मला वाटत नाही."

नवीन देखील राठींकडे वळला आणि म्हणाला;"साहेब, आनंद कुठे आहे? त्याने जर तुम्हाला पाठवलं आहे तर मग तो कुठे आहे?"

राठींनी एकदा सर्वांवरून नजर फिरवली आणि म्हणाले;"चला आपण इथून बाहेर पडुया अगोदर. मग तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या."

यावर सर्वांनीच मान डोलावली आणि सगळे बाहेर पडायला लागले. राठींनी एकदा झोपड्यावर नजर फिरवली. त्यांच्या लक्षात आलं की झोपडीला अजून एक खोली आहे. बाहेर पडण्याअगोदर एकदा आतल्या खोलीत डोकावावं असं त्यांच्या मनात आलं आणि ते आतल्या खोलीमध्ये गेले. आत मिणमिणत्या दिव्यामध्ये एका बाजूला घोंगडीवर कोणीतरी होतं. ते पाहाताच राठींनी परत एकदा त्यांची पिस्तुल त्या व्यक्तीवर रोखली आणि ते मोठ्याने म्हणाले;"हे इथे कोण झोपलं आहे ते तुमच्यापैकी कोणाला माहीत आहे का?"

इन्स्पेक्टरच्या आवाजाने बाहेर पडणारे सगळेच मागे वळले आणि आतल्या खोलीत दाखल झाले. थोडं पुढे होत मंदारने घोंगड्यावरच्या व्यक्तीकडे निरखून बघितलं आणि तो धडपडत मागे सरकला. त्याच्या चेहेऱ्याकडे बघून नविनच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. तो पुढे झाला आणि त्याने देखील झोपलेल्या व्यक्तीकडे बघितलं....

घोंगड्यावर आनंद होता!!!! आनंद??? नवीन सोबत अनघा आणि मनाली देखील पुढे सरकल्या होत्या. तिथे आनंदला बघून त्या दोघीही एकदम किंचाळल्या. हात-पाय बांधलेल्या अवस्थेतील बाहेरच्या खोलीतला भिकू पुटपुटत होता...

"तो मारणार सगळ्यांना!!! तुम्हाला आणि मला देखील."

परिस्थिती हाताबाहेर जाते आहे हे लक्षात येऊन राठींनी चौघांनाही त्या खोलीतून बाहेर आणलं आणि म्हणाले;"हे बघा.... तो आनंद नाही. तो जो कोणी आहे... तो जिवंत देखील नाही. त्यामुळे आता आपण सगळे इथून अगोदर बाहेर पडू आणि मग काय करायचं ते मी बघतो."

अनघा, मनाली, नवीन आणि मंदार चौघांच्याही शरीरातले प्राण आता संपले होते. त्यामुळे राठी जे म्हणतील ते ऐकण्यापलीकडे त्यांना काही सुचणे शक्य नव्हते.

सगळे बाहेर आले आणि वाड्याच्या पुढच्या बाजूला पोहोचले. त्याचवेळी पवार देखील सगळ्यांना घेऊन पोहोचला होता.

राठींनी भूतकाळातून बाहेर येत परत एकदा रस्त्यावर नजर वळवली. गाडी पोलीस स्टेशनमध्ये शिरत होती.

क्रमशः



Friday, February 5, 2021

प्रवास भाग 6

 प्रवास


भाग 6

नविनने हाक मारल्या बरोबर अनघा आत जायला वळली पण तिचा हात धरत मनाली म्हणाली;"नको ग अनघा. आत अजून काहीतरी असेल. मला आता याहून जास्त धक्के सहन होणार नाहीत ग. त्यांना तू बाहेर बोलावं बघू. जे काही आहे ते असुदे आतच. आता आपण इथून लगेच निघुया." तिच्या हातावर थोपटत अनघा म्हणाली;"मनाली वेडेपणा नको करुस. त्याने आत बोलावलं आहे तर आपण जायलाच हवं. जे काही आहे त्याची जवाबदारी आपल्या चौघांवर आहे. तू इतकी का घाबरते आहेस? जे काही आहे ते आपण सांभाळून घेऊ. तशीच वेळ आली न तर पोलिसांकडे जाऊया आपण. हे बघ! भिकू तुझ्यावर आणि माझ्यावर धावून आला म्हणून आपण self defence म्हणून त्याला मारलं हे आपण सांगूच शकतो. त्यामुळे जर असंच काही असेल तर आपण लगेच पोलिसांकडे जाऊ. पण आत्ता आत गेलं पाहिजे. नवीन आणि मंदारवर सगळं सोडून नाही चालणार."

अनघाचं बोलणं मनालीला फार पटलं असं नव्हतं. पण तरीही जवाबदारी चौघांची आहे हे तिला मान्य होतं. त्यामुळे ती अनघाचा हात घट्ट धरून तिच्या सोबत आत गेली.

काही क्षणातच भिकूच्या खोलीतून सगळे बाहेर आले. नवीन, मंदार, मनाली, अनघा आणि..... आणि सर्वात शेवटी आनंद!!! आनंद देखील होता त्यांच्या सोबत. काहीसा मरगळलेला... अस्वस्थ... आजारी वाटणारा आनंद देखील भिकूच्या खोलीतून बाहेर आला आणि त्याने त्याच्या मागे खोलीची कडी लावून घेतली. तोंडावर बोट ठेवत कोणी बोलू नका अशी खुण करून आनंद वाड्याच्या दिशेने चालायला लागला. बाकीचे सगळे देखील त्याच्या मागे वाड्याकडे निघाले.

***

पाचहीजण दिवाणखान्यात बसले होते. आनंदचं बोलून झालं होतं आणि त्याच्या प्रत्येक वाक्याने नवीन-मंदार, मनाली आणि अनघा यांना धक्का बसला होता. सगळे असेच काहीवेळ बसून राहिले. बसलेल्या धक्यातून नवीन पहिल्यांदा सावरला आणि म्हणाला;"एकूण असं आहे तर हे सगळं. एका अर्थी बरं झालं भिकुला आपण मारलं आणि त्याच्या खोलीकडे सोडायला गेलो. त्यामुळे सत्य समोर आलं आपल्या. पण आता मात्र इथे थांबण्यात काही अर्थ नाही. निघालं पाहिजे आपण सगळ्यांनी ताबडतोप."

नवीनचं म्हणणं सगळ्यांनाच पटलं आणि सगळे आपापल्या बॅग्स आवरायला निघाले. मनाली एकदम वळून म्हणाली;"अरे आपण निघालो खरे पण.... गाडी? गाडीचं काय करणार आहोत? इथून बाहेर पडण्यासाठी फक्त आणि फक्त एकच उपाय आहे; तो म्हणजे स्वतःची गाडी." तिचं बोलणं ऐकून सगळेच थबकले आणि एकमेकांकडे बघायला लागले. काय करावं कोणालाही सुचत नव्हतं; आणि तेवढ्यात अनघाचं लक्ष खिडकीबाहेर गेलं. अनघा एकदम आनंदने ओरडलीच;"अरे यार.... गाडी तर जागेवरच आहे. असं कसं झालं?"

सगळ्यांनी खिडकी बाहेर बघितलं तर खरंच आनंदची गाडी जागेवरच होती. ते बघून सगळ्यांनी एकमेकांना टाळ्या दिल्या आणि हसायला लागले. आनंद म्हणाला;"चला आता फार time pass नको. निघुया."

सगळ्यांनाच आनंदचं म्हणणं पटलं आणि सगळे आपापल्या खोलीकडे पाळले. सर्वात अगोदर आनंद त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि गाडीच्या दिशेने गेला. त्याने ड्रायव्हिंग सीटकडचं दार उघडतं आहे का याचा अंदाज घेतला. दार उघडलं गेलं. गाडीच्या किल्ल्या आतच होत्या सीटवर. त्या आनंदने ताब्यात घेतल्या आणि वाड्याच्या दिशेने बघत म्हणाला...

आनंद: यार आटपा आता.........

(भाग 1 मधील घडताना घडल्या... https://jyotijinsiwalealavani.blogspot.com/2021/01/blog-post.html)

****

रात्री उशिरा इंस्पेक्टर राठी आणि त्यांची टीम अपघात झालेल्या जागेवर पोहोचले. गाडी रस्त्याच्या बाजूला एका खड्ड्यात पडली होती. लॉरी मात्र कुठेच दिसत नव्हती. इंस्पेक्टर राठींचा वाँकीटॉकी वाजला आणि त्यांनी तो ऑन केला...

इंस्पेक्टर राठी : होय साहेब. बातमी खरी आहे. जबरदस्त अपघात आहे. गाडीची पूर्ण वाट लागली आहे. काय साहेब? काय? नाही....... नाही....... साहेब!!! इथेच गाडीसमोर उभा आहे मी. फक्त ड्रायव्हिंग सीटवर एक मुलगा आहे. बाकी कोणी नाही आत!!!

इन्स्पेक्टर राठी त्यांच्या साहेबांना रेपोर्टिंग करत होते तेवढ्यात हवालदार पवार पुढे झाला आणि स्टीअरिंग व्हीलवर झुकलेल्या बॉडीला त्याने सरळ केले. त्याचे डोळे विस्फारले गेले आणि तो इन्स्पेक्टर राठींकडे वळत म्हणाला;"साहेब हा कोण आहे ओळखत का?" वॉकीटॉकी बंद करत राठी पुढे झाले आणि पावरला ओरडले;"अरे हात कशाला लावतो आहेस बॉडीला? हातातली काठी तरी वापर रे. तुला सगळ्याचीच घाई." त्यांनी ड्रीविंग सीटवरील मृत व्यक्तीकडे बघितलं. तो कोण आहे ते त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे अजूनच वैतागत ते पावरला म्हणाले;"तू काय स्वतःला प्रद्युम्न समजतोस का रे? कोडी नको टाकुस. काय ते नीट सरळ सांग."

त्यावर आपल्या साहेबाला काहीही कळत नाही आणि आपण किती ग्रेट आहोत असे भाव डोळ्यात आणत हवालदार पवार म्हणाला;"साहेब याचं नाव आनंद. हा ऍक्टर आहे. ते नवीन सिरीयल आहे ना वह कौन था? त्याचा हिरो आहे हा. सॉलिड आहे सिरीयल. अशा वळणावर आहे की आता खरा व्हिलन कोण आणि खरा हिरो कोण ते कळेल." इतकं बोलून हवालदार पवार विचारात पडला. त्याला विचारात पडलेलं बघून राठींनी प्रश्न केला;"का रे. विचारात का पडला आहेस? हा तोच ऍक्टर आहे न? की आता हा दुसराच कोणी आहे असं म्हणायचं आहे तुला?"

त्यावर गोंधळलेल्या चेहेऱ्याने पवार म्हणाला;"साहेब, हा आनंद जर इथे मरून पडला आहे तर मग आता सिरियलमधलं गूढ कसं कळणार?"

पावरला पडलेल्या प्रश्नाने मात्र राठी प्रचंड भडकले आणि त्याच्यावर ओरडत म्हणाले;"अरे गाढवा आपण काय सिरीयल मधली गूढं उकलायला आलो आहोत का इथे? मूर्खासारखं बोलणं बंद कर आणि खरी माहिती घ्यायला सुरवात कर." असं म्हणून राठींनी स्वतःच एका मागोमाग एक फोन करायला सुरवात केली. एकीकडे फोटोग्राफरने त्याचं काम करायला सुरवात केली होतीच. थोड्यावेळाने फोन ठेवून राठी परत एकदा गाडीजवळ येऊन उभे राहिले. आतापर्यंत हातात ग्लोव्हज घालून प्रत्येकाने आपापलं काम सुरू केलं होतं. पावरकडे बघत राठींनी विचारलं;"काय रे काही मिळालं का?"

पवारने गाडीच्या बाहेर उतरवून ठेवलेल्या पाच सॅक्स दाखवल्या आणि म्हणाला;"साहेब, गाडीत या पाच सॅक्स मिळाल्या आहेत. पण बाकी आत कोणीच नाही. याचा अर्थ यांच्या सोबत अजून काहीजण होते. बहुतेक अपघात झाल्यावर हा मेलेला बघून पळून गेले."

पवारचे बोलणे ऐकून राठींनी नाही नाही अशी मान हलवली आणि म्हणाले;"पवार गाडीत एकटा आनंद होता. बाकी कोणीच नव्हतं."

आता आश्चर्य वाटायची पाळी हवालदार पवारवर होती. पवारच्या चेहेर्यावरचे भाव बघून राठींना हसू आलं. ते म्हणाले;"अरे आपण इथे कसे पोहोचलो ते विसरलास का? ज्याने हा अपघात बघितला तो पोलीस स्टेशनला स्वतः आला होता न! त्यानेच मला सांगितलं की एक मुलगा एकटाच गाडी चालवत होता." राठींचं बोलणं ऐकून पवारने मान डोलावली आणि म्हणाला;"मग साहेब, या पाच बॅग्स कोणाच्या असतील?"

राठी : अरे बहुतेक थर्टीफस्टची मजा करायला आलेला ग्रुप असेल हा सिनेमा वाल्यांचा. पण बॅग्स या गाडीत टाकून सगळे दुसऱ्या गाडीने जाणं शक्य नाही. त्यामुळे काय आहे मामला ते बघायलाच हवं. चल थोडी चौकशी करूया गावात." अरे म्हणून राठी सबइन्स्पेक्टर शेंडेंकडे वळले आणि म्हणाले;"मी जरा गावात जाऊन चौकशी करून येतो शेंडे. तुम्ही तोपर्यंत इथलं सगळं उरकून बॉडी पोस्टमार्टेमसाठी पाठवून द्या. अपघातच दिसतो आहे; पण इतकंच नाही. यात अजूनही काहीतरी आहे; असं मला वाटतं." शेंडेंनी मान डोलवत राठींना सॅल्युट ठोकला आणि राठी त्यांच्या गाडीत जाऊन बसले. पवारने गाडी चालू केली आणि गावाच्या दिशेने वळवली.

लोणावळा तसं मुंबई जवळचं थंड हवेचं ठिकाण असलं आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये गर्दीचं ठिकाण असलं तरी हाम रस्ता सोडला तर अजूनही ते गावंच होतं. पवार तर इथेच लहानाचा मोठा झाला होता. त्यामुळे त्याने शिताफीने गाडी गावाच्या आतल्या अंगाला वळवली. थोडं पुढे जाऊन त्याने त्याच्या नेहेमीच्या पानवाल्याच्या ठेल्यापाशी गाडी थांबवली आणि त्याला हाक मारली. पवरला बघताच गादी सोडून तो गाडीजवळ आला.

पवार : दिन्या, एक अपघात झालाय मेन रोडकडे. गावात काही चर्चा?

राठींना पवारने केलेली सुरवात आवडली नाही. पण त्यांना खात्री होती की पवार योग्य ती माहिती काढेल. त्यामुळे ते गप बसले. एकदा राठी साहेबांकडे बघत दिन्याने नाही अशी मान हलवली. त्यावर पवार वैतागला.

पवार : उगा नाटक नको करुस. तुला नाही नेत धरून. फक्त विचारतो आहे. आन तुला माहीत नाही तर अपघातच झाला नाही असं म्हणावं लागेल. त्यामुळे तोंड उचकट आणि बोल बघू.

पावरचं बोलणं ऐकून दिन्या कसंनुसं हसला आणि म्हणाला;"त्या मकरंद भाऊंचा अपघात झालाय त्याबद्दल तर नाही ना विचारत तू?"

दिन्याच्या बोलण्याने पवार चिडला आणि म्हणाला;"भाड्या मी काय सायकल आपटून पडलेल्या पोराबद्दल विचारतो आहे का? कळत नाही साहेब आहेत? गंम्मत करतो का माझी? कोण मकरंद? मी त्या हिरो आनंद बद्दल विचारतो आहे. त्याच्याबद्दल काही माहीत आहे का तुला?"

दिन्यासुद्धा आता पेटला. त्याच्या माहिती खात्याला पवार आव्हान देत होता. त्यामुळे तो देखील स्पष्टपणे म्हणाला;"तोच तो रे. तुम्ही आनंद म्हणा आणि गाव त्याला मकरंद म्हणतंय. समजलं? या मागल्या गल्लीमधून आत गेलास की झाडी संपून जो वाडा दिसतो ना तो त्याचा आहे. त्याचा तो भिकू पडला असेल तिथेच मागल्या झोपडीत पिऊन. साला इतका मारायचा बायकोला की पळून गेली ती. हा आणि तो मकरंद त्याचंच शंका येईल असं गुळपीठ...."

दिन्याच्या एकदम लक्षात आलं की साहेब देखील आहेत आणि त्याचा आवेश कमी झाला. साहेबांना सलाम करत तो म्हणाला;"साहेब, मकरंद भाऊ बद्दल गावात कोणी काही सांगणार नाही. त्याचं कोणाशीही चांगलं नव्हतं. मोठ्या साहेबांनी वाड्यावर यायचं सोडलं आणि मग मकरंद भाऊंच्या आईचंच राज्य सुरू झालं न. सगळं बदलून गेलं मग."

राठींच्या कपाळावरच्या आठयांचं जाळं खूपच वाढलं. ते एकदम गाडी खाली उतरले. त्यांना उतरलेलं बघून दिन्या एकदम घाबरून गेला. पावरकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत तो म्हणाला;"साहेब, मला इतकंच माहीत आहे हो. मला कशाला नेता पोलीस स्टेशनात? माझं वय तर बघा.... मी तर जन्मलो पण नव्हतो ते लफडं झालं तेव्हा. सगळी ऐकीव माहिती हो मला. पवार म्हणाला ना आत्ता.... इथे माझ्या गादीवर सगळे येतात आणि गप्पा मारतात. ते ऐकून मी पावरला माहिती देतो. माझा काही संबंध नाही हो बाकी."

त्याची घाबरगुंडी बघून राठींना मजा वाटली. गाडीला वळसा घालून ते त्याच्या जवळ जाऊन उभे राहिले आणि म्हणाले;"दीनुभाऊ मी का तुम्हाला नेईन पोलीस स्टेशनमध्ये? मी तुमच्याशी नीट गप्पा मारायला म्हणून खाली उतरलो. बोला बघू. काय प्रकार आहे या आनंद म्हणा मकरंद म्हणा याचा?"

राठींच्या आवाजातल्या सलगीमुळे दिन्या थोडा स्थिरावला आणि बोलायला लागला.

दिन्या : साहेब, मकरंद भाऊंचे वडील म्हणजे इथलं मोठं प्रस्थ होतं बरं का. त्याची बायको म्हणजे वहिनी देखील माहेरच्या थोरामोठ्यांकडच्या. वहिनी तर खूप खूप प्रेमळ होत्या. मला अजून आठवतं मी लहान असताना माझ्या मोठ्या भावाबरोबर जायचो त्यांच्या वाड्यावर. मोठे मालक आणि वहिनी येणार असले की सगळी पोरं-टोरं बरोबर जमायची तिथे. वहिनी सगळ्यांना मुंबईहून आणलेल्या गोळ्या-चॉकलेटं द्यायच्या. साहेब आता हे लोणावळा म्हणजे थंड हवेचं ठिकाण झालं. पूर्वी कुठे काय होतं हो? आणि त्यात आमच्या सारख्या गरीब पोरांना तर आईकडून पाच-धा पैसे मिळायचे कधीतरी... त्याच्यात त्या मिंट गोळ्या यायच्या न फक्त. त्यामुळे वहिनींच्या येण्याकडे सगळ्यांचं लक्ष असायचं. आम्ही वाड्याच्या मागे जमायचो आणि तिथून गोळ्या घेऊन पसार व्हायचो. आमचे खूप लाड करायच्या वहिनी पण एक नियम होता त्यांचा.... वाड्याच्या मधल्या दाराकडे नाही जायचं कोणी. आम्हाला खूप कुतूहल वाटायचं तेव्हा. वय पण असं होतं न की नाही म्हंटलं की जावंसं वाटतंच. मग कधीतरी आम्ही मुद्दाम त्या अंगाकडून बाहेर पडायला बघायचो. पण तो राक्षस भिकू असायचा आमच्या मागावर. तो असा काही कर्दनकाळासारखा उभा राहायचा की आम्ही गपचूप रस्ता बदलून नेहेमीच्या मार्गाने बाहेर पडायचो. मग कधीतरी फक्त मालक यायला लागले. त्यामुळे आमचं पोरांचं जाणं बंद झालं वाड्याकडे.

मोठे झालो थोडे आणि मग मात्र त्या अर्ध्या वयात त्या वाड्याबद्दल बोलायला आणि ऐकायला मजा यायला लागली." असं म्हणून दिन्याने एकदम जीभ चावली. बोलायच्या नादात आपण इन्स्पेक्टर राठींच्या समोर उभे आहोत ते तो विसरला होता. समोर कोण आहे याची जाणीव झाली आणि तो एकदम गप झाला. त्याच्या खांद्यावर हात ठेवत राठी म्हणाले;"दिनू भाऊ, मला सगळं सांगा. मी शब्द देतो; तुम्ही मला काही सांगितलं आहे ते कोणाला बोलणार नाही. काय पवार?"

आतापर्यंत पवार देखील गाडीबाहेर येऊन उभा होता. तो मनात आश्चर्य करत होता की त्याला हे सगळं कसं माहीत नाही. खरं तर तो देखील तिथलाच तर होता. राठी साहेबांचा प्रश्न येताच तो म्हणाला;"अरे साहेब, मी या दिन्याला नेहेमी सांगतो की तुमची कामाची पद्धत वेगळी आहे. बोल रे दिन्या तो बिनधास्त. पण एक सांग साल्या, आपण दोघे एकत्र वाढलो आणि मला यातलं काही कसं माहीत नाही?"

त्याच्याकडे बघत दिनू म्हणाला;"तू आमच्या टवाळक्यांमध्ये कधी होतास का? साला तुझा बाप त्या वाड्याकडे बघून मुतायला तरी द्यायचा का तुला? मग तुला कसं माहीत असेल काही?"

दिन्याचं बोलणं ऐकून पावरला राग आला. पण राठींकडे बघत तो गप बसला. राठींनी दिन्याच्या गाडीला परत चालना देत म्हंटलं;"त्याचं सोडा हो दीनुभाऊ तुम्ही. त्या भिकू बद्दल आणि वाड्याबद्दल बोला."

पवार समोर मिळालेलं महत्व दिनूला सुखावून गेलं. तो पोपटासारखा बोलायला लागला.

दिनू : साहेब, मालक पण खूप चांगले होते हो. पण ती होती न अवदसा. तिच्या कह्यात गेले आणि मग सगळं बदलून गेलं.

पवार : कोणाबद्दल बोलतो आहेस तू?

दिनू : अरे असं काय करतोस.... तुझा आन माझा बाप नाही का म्हणायचा ती रंभा-उर्वशी दिसली म्हणून...

पावरला एकदम आठवलं... त्याचा बाप खरंच असा उल्लेख करायचा कोणाचातरी. त्याने होकारार्थी मान हलवताच दिनूला परमानंद झाला. त्याच्या बोलण्याला आता पुष्टी मिळाली होती. त्याच उत्साहात तो बोलायला लागला.

दिनू : तर साहेब, एक होती. ती खरं तर आली होती वहिनींच्या माहेराकडून. इथे वाड्यावर ठेवली होती वहिनींनी तिला. जबरदस्त बाई होती. एकटी राहायची इथे. इतका थोरला वाडा पण कधी घाबरली नाही. दिसायला तर अशी लाजावाब होती की बोलायची सोय नाही. पण म्हणूनच मोठे मालक कधीतरी घसरले. तिने पण हवा दिली असेल... कुणास ठाऊक? पण मुंबईकडे वहिनी गरवारशी होत्या तेव्हाच ती पण राहिली पोटुशी इथे. वहिनींना कळलं बहुतेक. कारण त्यानंतर त्या कधीच इथे आल्या नाहीत. पण मालक इथे यायचे. अधून मधून येताना आनंद भाऊंना पण घेऊन यायचे. मकरंद आणि आनंदभाऊ एकत्र वाढत होते. पण आनंद भाऊ कधीच मकरंदशी बोलले नाहीत. थोडे मोठे झाले आणि मग आनंद भाऊ पण यायचे बंद झाले. पुढे पुढे तर मालकांनी मुंबईला जायचंच सोडलं.

असेच दिवस जात होते..... आणि एक दिवस आम्हाला कळलं की मालक मुंबईला गेले.... आणि गेलेच ते!! म्हणजे एकदम ढगात गेले. मकरंद भाऊ गेले होते त्यांच्या आईला घेऊन म्हणे. पण मग.... काहीतरी राडा झाला असणार. ते आले परत. हळूहळू सगळे वाड्याकडे जायचं टाळायला लागले. का ते मला कधी कळलं नाही. कारण आम्हा मुलांसमोर काही बोलायचे नाहीत वडील माणसं. पुढे तिथे जंगल वाढलं. तो राक्षस भिकू.... ती रया गेलेली रंभा आणि मकरंद भाऊ असे राहायचे. काय खायचे... कसे जगायचे... कोणालाही माहीत नाही.

अशी वर्षं गेली आणि अचानक आनंदभाऊ यायला लागले. इथूनच जायचे न माझ्या गादीवरून. कोल्ड्रिंक्स न्यायचे इथूनच...."

राठींनी हसत विचारलं;"कोल्ड्रिंक्स ठेवतोस का?"

त्यावर जीभ चावत दिनू म्हणाला;"साहेब, गरीब आहे. गरज आहे. बिअर ठेवतो मी. पण ओळखिच्यांनाच देतो ना. तर आनंद भाऊ इथूनच न्यायचे. एरवी अंगावर धावून येणारा तो भिकू आनंद भाऊ आले की एकदम गोगल गाय होऊन जायचा. त्याचं लग्न पण आनंदभाऊंनी लावून दिलं होतं. पण त्याने नाही टिकवल. आनंद भाऊ आले की मकरंद नाहीसा व्हायचा. आम्हाला ते कोडं कधीच कळलं नाही. मग ती म्हातारी रंभा पण गेल्याचं कळलं. मध्ये हा करोना आला. तर आनंद भाऊ येत नव्हता. मग गेले दोन-चार महिने यायला लागला. आनंद भाऊंबरोबर एक मुलगी पण यायला लागली होती अलीकडे. बस्.... साहेब मला इतकंच माहीत आहे."

असं म्हणत दिनू गप बसला. राठींनी खात्री करून घ्यायला एकदा पावरकडे बघितलं. पवारने डोळ्यांनीच खूण केली की दिनूने सगळंच सांगितलं आहे. राठींनी दीनुकडे हसत बघितलं आणि म्हणाले;"चल दिनू येतोस का वाड्यावर?"

राठी साहेबांचा प्रश्न ऐकून दिनू एकदम चरकला आणि म्हणाला;"साहेब, मला पोलीस स्टेशनात नेऊन लॉक अप मध्ये टाका. चालेल. पण मी नाही येत त्या बाजूला."

राठींच्या लक्षात आलं की दिनू येणार नाही. त्यामुळे त्याच्याशी बोलण्यात वेळ न घालवता त्यांनी पावरला खूण केली आणि गाडीत जाऊन बसले.पवार देखील गाडीत बसला. त्याच्याकडे बघत राठी म्हणाले;"पवार किती घबरतोस?"

पवार देखील आता राठींसोबत काम करून सरावला होता. हसत म्हणाला;"चला साहेब...." आणि गाडीबाहेर डोकं काढत दिनूला म्हणाला;"येतो रे. वाड्यावर जातो आहोत आम्ही. पण बोलू नकोस कुठे."

गाडी पुढे गेली आणि राठींनी पवारांच्या खांद्यावर मारलं आणि दोघेही हसले. आता गावात सगळ्यांना कळणार होतं की राठी साहेब आणि पवार वाड्यावर गेले आहेत.

क्रमशः