Friday, August 30, 2019

श्रावणातल्या कहाण्या

श्रावणातल्या कहाण्या


लहानपणी श्रावणामध्ये घरच्या देवांची पूजा झाल्यानंतर आजी दर शुक्रवारी जीवत्यांची पूजा करून त्यांची कहाणी वाचायची; आणि रविवारी आदित्यराणूबाईची कहाणी वाचायची. या कहाण्या ऐकायला  घरात असणाऱ्या सर्वांनी बसलंच पाहिजे असा तिचा नियम होता. मी, भाऊ, बाबा, आई एवढंच नाही तर अगदी आमचे माळी मामा, ड्रायव्हर दुबेजी, घरी कामाला येणाऱ्या लक्ष्मीबाई सर्वांना हातावर तांदळाचे तीन दाणे घेऊन देवासमोर बसायला बोलावलं जाई. त्यावेळी कहाणी ऐकणं म्हणजे काहीतरी वेगळं करतो आहोत म्हणून मस्त वाटायचं आम्हाला. मी आणि माझा भाऊ जसजसे मोठे झालो तसे ही कहाणी आम्ही आवडीने वाचायला लागलो होतो. आजी या कहाण्या एका वेगळ्याच ताला-सुरात वाचायची. मग पुढे जेव्हा आम्ही वाचायला लागलो त्यावेळी आम्ही देखील तसंच वाचायला लागलो. एक वेगळीच मजा वाटायची या कहाण्या वाचताना.

शुक्रवारची जीवत्यांची पूजा ही प्रामुख्याने आपल्या घरातल्या पोरा-बाळांसाठी केली जाते. या जीवत्यांची आरती करताना निरांजनासोबत पिठीसाखरेची आरती ताम्हणात असते. म्हणजे पिठीसाखर तुपात भिजवून त्याची लांब लडी करून ती ताम्हणात ठेवायची; आणि मग बोटांनी त्यात खळगे करायचे. जणूकाही त्यात गोड दिवे लावले आहेत. आरतीच्या अगोदर मात्र कहाणी वाचली जाते. जीवत्यांची कहाणी देखील खूपच बोधपूर्ण आहे. एका गरीब ब्राम्हणीचा भाऊ सहस्त्र भोजन घालतो. मात्र बहिणीला बोलवत नाही कारण ती गरीब असते. मात्र 'भाऊ विसरला असेल' असा विचार करून ती सहस्त्र भोजनास मुलांबरोबर जाते. तेथे भाऊ तिचा अपमान एकदा नव्हे तर तीन वेळा करतो. बहिणीला वाईट वाटतं आणि ती तिच्या मुलांना घरून तिथून निघते. पुढे तिला आर्थिक सुबत्ता लाभते. तिच्या श्रीमंतीची डोळे दिपलेला भाऊ स्वतः तिला जेवणाचं आमंत्रण करतो. ती आमंत्रण स्वीकारून जेवणाला जाते; मात्र तिथे गेल्यावर आपली उंची वस्त्र आणि दागिने पाटावर मांडून त्यांच्यावर अन्न ठेवते. भाऊ तिला विचारतो 'ताई, तू हे काय करते आहेस?' ती उत्तर देते 'तू ज्यांना जेवायला बोलावलं आहेस त्यांना जेवायला घालते आहे.' भाऊ या उत्तराने काय ते समजतो आणि माफी मागतो. बहीण देखील मोठ्या मनाने माफ करते.

लहानपणी ही कथा वाचून झाली की आई नेहेमी सांगायची; आहे त्यात समाधान मानावं आणि कधीच कोणालाही पैशांनी तोलू नये. त्यावेळी तिचं ते सांगणं आम्ही फक्त ऐकायचो. कारण त्यावेळी सगळं लक्ष त्या पिठीसाखरेच्या दिव्यांमध्ये असायचं. मलाच जास्त दिवे मिळाले पाहिजेत हा प्रयत्न! पण आईचे ते शब्द नकळत मनात रुजले होते; हे आता लक्षात येतं. आज एक जवाबदार व्यक्ती म्हणून जगताना जेव्हा जेव्हा ही कहाणी आठवते त्यावेळी आईचे शब्द मनात उमटतात. या कहाणीमधील अजून एक विचार देखील स्पष्टपणे मनाला भिडतो. ज्याप्रमाणे भावाने माफी मागताच बहिणीने त्याला माफ केले; त्याप्रमाणे आपण देखील कोणी माफी मागितली असता मनात किल्मिश न ठेवता विषय संपवला पाहिजे. महत्व समोरच्या व्यक्तिला त्याची/तिची चूक आपणहून कळणे याला आहे. उगाच शत्रुत्व मनात ठेऊन सतत भांडत राहाणं हा उपाय नाही कोणत्याही वादाचा.


ज्याप्रमाणे शुक्रवारी जीवत्यांची कहाणी वाचली जायची; त्याच प्रकारे रविवारी आदित्यराणूबाईची कहाणी वाचली जायची. ही मुळात सूर्यनारायणाची उपासना आहे. ही कहाणी थोडक्यात सांगायची तर.... एका ब्राम्हणाच्या दोन उपवर कन्यांचे लग्न होत नसते; म्हणून तो दुःखी असतो. त्याला नागकन्या, देवकन्या एक व्रत सांगतात. ते व्रत तो ब्राम्हण करतो; त्यानंतर त्याच्या एका मुलीच लग्न राजाशी आणि दुसऱ्या मुलीच लग्न प्रधानाशी होत. नंतर ब्राम्हण मुलीचा समाचार घेण्यासाठी जातो. अगोदर राजाच्या राणीकडे जातो. तिला म्हणतो 'मला कहाणी सांगायची आहे ती तू ऐक.' पण 'राजा पारधीला जाणार आहे'; अस सांगून ती नाकारते. ब्राम्हण रागावून प्रधानाच्या राणीकडे जातो. तिथे तो कहाणी 'मनोभावे सांगतो' आणि ती 'चीत्तभावे ऐकते'. पुढे राजाची राणी दरिद्री होते आणि प्रधानाच्या राणीचं चांगलं होत. मग राजाच्या राणीची चारही मुलं एक एक करत मावशीकडे जातात. मावशीच्या घरी त्याचं चांगल आदरातिथ्य होतं. पण तिने दिलेले पैसे मात्र ती मुले स्वतःच्या घरी घेऊन जाऊ शकत नाहीत. शेवटी स्वतः राजाची राणी जाते बहिणीकडे. मग बहिण तिला रागावते आणि वडिलांनी केलेलं व्रत सांगते. पुढे राजाची राणी ते व्रत करते.... त्यावेळी ती कहाणी ऐकण्यासाठी मोळीविक्या, माळी, एक दु:खी म्हातारी, आणि एक विकलांग यांना बोलावते. कहाणी ऐकल्यानंतर हे सर्व देखील व्रत करतात आणि यासर्वांच भलं होत.


या कहाणीमधून हे स्पष्ट होतं की; देव आणि व्रत-वैकल्य सर्वांसाठीच सारखी असतात. देवपूजा ही कोणा जात-धर्माची मक्तेदारी नाही. 'तुम्ही जे काही कराल ते मनोभावे प्रामाणिक प्रयत्नातून करा; म्हणजे त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळेल'; हा विचार महत्वाचा. या कहाणीमुळे त्या शाळकरी वयातच मला हे स्पष्ट कळल होतं की कोणाच्या कामावरून किंवा जाती वरून त्याव्यक्तीचं अस्तित्व ठरवणं चूक आहे. मुख्य म्हणजे एरवी इथे हात नको लाऊस... हे सोवळ्यातलं आहे.... तू पारोशी आहेस.... असं सांगून सारखं थांबवणारी आजी ज्यावेळी आमच्या सोबत आमच्या मांडीला मांडी लावून काम करणाऱ्या सर्वांना कहाणी ऐकायला बसवायची; त्या तिच्या धोरणातून देखील एक मोठा विचार मनात रुजला होता त्या कोवळ्या वयात.


आज मी या श्रावणातल्या कहाण्या वाचत नाही किंवा कोणतंही व्रत देखील करत नाही. मात्र श्रावण सुरु झाला की मला हमखास शुक्रवारची जीवत्यांची कहाणी आणि रविवारची आदित्याराणुबाईची कहाणी आठवते; आणि त्यातून जो विचार मनात रुजला आहे त्याचे समाधान वाटते. 

Saturday, August 24, 2019

श्रीकृष्णायनम:!


श्रीकृष्णायनम:!

नमस्कार,

कालचा पहिला शुक्रवार की मी माझ्या ब्लॉगवर काही पोस्ट केलं नाही. रात्री बारा वाजून गेले आणि माझ्या लक्षात आलं की आजची पोस्ट राहिलीच. खूप चिडले मी स्वतःवर. पण मग विचार केला; काही हरकत नाही. लेख तर तयार आहे... नृत्यांगना.... अहं... चा भाग 3. सकाळी लवकर पोस्ट करून टाकू. रात्री झोपायला तसा बराच उशीर झाला होता. श्रीगोपाळाच्या जन्मोत्सवाला गेले होते ना. घरी येताना त्याचेच विचार मनात घोळत होते. गंमत म्हणजे झोपेत देखील तोच मनात पावा वाजवत होता. सकाळी उठले आणि मनात आलं आज त्या सर्वस्व व्यापून असणाऱ्या गोपाळ... किसन.... कृष्ण... श्रीकृष्ण... भगवान.... आणि तरीही अपल्यातलाच एक बनून राहिलेल्या मनमोहनाबद्दल काहीतरी लिहावं.

तसं लहानपणापासून कृष्णाच्या कथा आपण सर्वांनीच ऐकलेल्या आहेत. त्याचा जन्म.... त्याचं लहानपण... गोपिकांबरोबरचा रास.... गाई चरायला नेणं.... कंस वध... द्वारका वसवणं.... अष्ट पत्नी मिळवणं.... हे त्याचं वयक्तिक आयुष्य.... आणि पांडवांसोबत किंवा असं म्हणावं का.... की पांडवांना पुढे करून महाभारत घडवणं... म्हणजे श्रीकृष्ण!

श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार! देवत्व असूनही श्रीकृष्णाने अनेकदा त्याचं मानव असणं अधोरेखित केलं. त्याला रणाछोड... भागोडा म्हणतात, कारण जरासंध सतत आक्रमण करत होता. त्या आक्रमणांना प्रतिउत्तर देणं थांबवून कृष्ण तिथून निघून गेला आणि त्याने सर्व जनतेला घेऊन द्वारका वसवली. तो देव होता; तरीही त्याने द्युतक्रीडा होऊ दिली. ज्यावेळी धर्मराज पांचालीला द्यूतात हरला त्यावेळी त्याने तिला भर राजसभेमध्ये वस्त्र पुरवली. परत एकदा द्यूत खेळून धर्मराजाने बंधू आणि सपत्नीक बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास स्वीकारला. देवेश्वर श्रीकृष्ण हे सर्व थांबवू शकला नसता का? श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने बोलणी करण्यासाठी कौरवांकडे गेला. शब्दच्छल जाणणारा.... किंबहुना शब्दच्छल निर्माण करणारा तो निर्माता महाभारतीय युद्ध थांबवू शकला नसता का?

मात्र त्याने असं काहीही केलं नाही. त्याने भागोडा.... पळपुटा.... म्हणवून घेणं स्वीकारलं; कारण त्यावेळी त्याच्या मनात युद्ध जिंकण्यापेक्षा देखील सर्वसामान्य जनताने सुरक्षित आणि सर्वसामान्य आयुष्य सुखाने जगले पाहिजे ही त्याची इच्छा होती. द्यूत होऊ दिलं.... पांचालीचा अपमान, वनवास, अज्ञातवास हे सर्व तो दुरून पाहात राहिला; त्याने माहाभारत घडू दिलं.... कारण त्याला माहीत होतं की पुढे येणाऱ्या प्रत्येक युगामध्ये त्याच्या या सर्व वागण्याचा आदर्श ठेवला जाणार आहे.

तो अवतार होता. त्या युगामधील त्याचं कार्य करायला जसा तो आला होता; तसाच तो पुढे येणाऱ्या युगांसाठी आदर्श असणार होता. त्यामुळे 'आपल्या कर्माची फळं आपल्याला इथेच याच जन्मात भोगावी लागतात; त्यापासून सुटका नाही;' हेसार्वभौम तत्व प्रस्थापित करणं ही देखील त्याची जवाबदारी होती.

कदाचित म्हणूनच त्याचं अवतार कार्य संपवताना त्याने एका व्याध्याच्या य:किंचित बाणाने घायाळ होऊन मृत्यू स्वीकारणं मान्य केलं!

मी आदर्श निर्माण करताना अनेक अयोग्य... असत्य.... घटना घडू दिल्या. त्यामुळे मी देखील पापाचा धनी झालो... आणि म्हणूनच मानवी आयुष्य संपवताना कोणताही दैवी चमत्कार न करता माझा मृत्यू हा देखील आदर्श असावा या दृष्टीने मी एक दरवसामान्य मानवीय मृत्यू स्वीकारतो आहे;' हेच सांगायचं असेल का त्याला?

आपण खरंच हा विचार करून काही शिकू का त्या जगद्नियंत्याकडून?

Friday, August 16, 2019

नृत्यांगना..... अहं...... !!! (भाग 2)

नृत्यांगना..... अहं...... !!! (भाग 2)

मागील शुक्रवारी मी 'प्यार किया तो डरना क्या....' या गाण्यामधून सिनेसृष्टीच्या all time लावण्य सम्राज्ञी मधुबालाबद्दल आणि त्या अजरामर गाण्याबद्दल लिहिलं होतं. आज अशाच एका भाव सम्राज्ञी नूतनबद्दल थोडंस.... आणि एका कदाचित फारशा परिचित नसलेल्या गाण्याबद्दल..... ज्यामध्ये तिने नृत्य न करूनही काही क्षण मोहक आणि अर्थपूर्ण पदन्यास दाखवले आहेत.... आणि संपूर्ण गाणं भावविभोर नेत्रांमधून संयत प्रणय व्यक्त करत गाण्याच्या प्रत्येक शब्दला न्याय दिला आहे.



'मोरा गोरा अंग लैले.... मोहे शाम रंग दैदे.... छुप जाऊंगी रात ही मे.... मोहे पी का संग दैदे....'

उगाच सुरवातीला वाद्यांच्या तुकड्यांची रांग न लावता नूतनच्या अदाकारीवर संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मनजींनी पूर्ण विश्वास टाकला आहे हे लक्षात येतं. कारण गाण्याची सुरवात शब्दांनीच सुरू होते. तिरप्या नजरेने बघणाऱ्या नूतनच्या नजरेत एक निरागस हास्य आहे; आणि तरीही 'लैले' म्हणताना एक शामल लाज तिच्या डोळ्यात उतरलेली दिसतेच. तिचं ते शाम रंग 'दैदे' म्हणताना लाजणं तर काळजाला हात घालतं. 'छुप जाऊंगी रात ही मे....' तिने नजर उचललेलीच नाही.... काळजाला घातलेला हात जणू काही आपलं मन कुरवाळतो आहे; असं वाटतं. (नक्की बघा तो तुकडा.... तुमच्याही नकळत तुमच्या चेहेऱ्यावर एक मंद हसू फुलेल.) आता खऱ्या गाण्याला सुरवात होते. 'मोरा गोरा अंग लैले... मोहे शाम रंग दैदे...' नजर एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे..... 'छुप जाऊंगी रात ही मे....' म्हणताना ती चंद्राच्या चांदण्यातून झाडाच्या हलक्याशा सावलीत येते... किती मोहक प्रतिकात्मक 'लपली' आहे ती.... का? तर 'मोहे पी का संग दैदे....' यासाठी. त्याच्या सोबतीसाठीचा पुढचा सगळा अट्टहास आहे; हे ती इथेच व्यक्त करते.

मग वाद्यांचा एक सुंदर तुकडा आहे. त्यावेळी तीचं पाण्यातलं शामल रूप आणि उजळ चेहेरा.... 'गोरा अंग' आणि 'शाम रंग' स्पष्टपणे आपल्या समोर येतो. हे जितकं खरं तितकंच त्या उजळ चेहेऱ्याची नूतन देखील मनाला भावते.

'एक लाज रोके पैयां... एक मोह खिंचे बैया... हाssय...' ते 'हाssय...' बघून काळीज परत एकदा उचललं जातं. म्हणजे कसं सांगू का? आपण छान गाडी चालवत असतो; समोरच्या गतिरोधकावरून गाडी जाते... आणि मग आपल्याला जाणवतं की आपण गतिरोधक पार केलाय. तसं आहे ते 'हाssय...' तिचं व्यक्त करून झाल्यावर एका क्षणानंतर आपल्या काळजाला जाऊन भिडतं ते. त्या 'हाय...' मधून आपण बाहेर पडतो तोवर ती मात्र तिचा झाडात अडकलेला पदर सोडवून झुकलेल्या नजरेने पुढे आलेली असते. 'जाऊं किधर न जानु...' किती ते आर्जव.... संपूर्ण चेहेऱ्यावरचं. 'हम का कोई बताई दे.....' एक वेगळंच आव्हान आहे त्या नजरेत. मी येऊ का तिथे तुझ्याजवळ? असं म्हणायला लावणारं.

त्यानंतरचं 'मोरा गोरा अंग लैले... मोहे शाम रंग दैदे... छुप जाऊंगी रात ही मे... मोहे पी का संग दैदे....' यातलं 'छुप जाऊंगी रात ही मे...' म्हणताना तिची नजर 'छुप'ते आहे हे जाणवतं आपल्याला.

आणि त्यानंतर........ अहाहा.... तिची आकाशाला भिडलेली नजर! मनासारखं झालं तर आहे; पण ते तसंच राहणार आहे का? हे विचारणारी. काहीशी गोंधळलेली; थोडीशी तक्रार असलेली आणि होणाऱ्या बदलाचा आनंदाचं घेणारी. त्यावेळीच ढगाआडून चंद्र बाहेर येतो आणि पाण्यावर उठणाऱ्या लहरींवर चांदणं विराजमान होऊन पुढे धावतं. खरं तर किती विलोभनीय दृश्य. पण दुसऱ्याच क्षणाला दिसणारा नूतनचा तक्रारीने भरलेला चेहेरा त्याहूनही जास्त विलोभनीय वाटतो. 'नको असताना आलास? काय म्हणावं तुला?' गाल फुगवून दिलेला एक हलकासा उसासा हे सगळं सांगून जातो; आणि ती म्हणते 'बदरी हटा के चंदा.... चुप के से झाके चांदा...' कसा लोचटासारखा बघतो आहेस; हे सांगते ती तिच्या काहीशा रागावलेल्या नजरेतून. आणि दुसऱ्याच क्षणी नजर झुकवताना तिच्या नजरेत प्रेमळ तक्रार उभी राहाते. 'तोहे राहू लागे बैरी....' (इथे मात्र खरी दाद द्यावीशी वाटते ते संगीतकाराला. त्याने 'राहू'ला 'बैरी' म्हंटल आहे. एका क्षणात आकाशमंडल नजरेसमोर उभं राहातं.) पण नूतन मात्र स्वतःकडंच लक्ष मुळीच ढळू द्यायला तयार नाही. 'मुस्काये जी जलाई के...' एक लाडिक चंबू आणि मोहक हास्य पेरून ती परत तिच्यात गुंतायला आपल्याला भाग पाडते. 'मोरा गोरा अंग लैले... मोहे शाम रंग दैदे...छुप जाऊंगी रात ही मे..मोहे पी का संग दैदे....' चेहेऱ्यावरची मोहकता आता अजून लाजरी झालेली असते.

आता दुसऱ्यांदा वाद्यांचा तुकडा आपल्या समोर येतो. यावेळी तिची पावलं चांदण्याला स्पर्श करत आणि पैंजणांशी गुज करत पुढे सरकतात. किती हलकासा पदन्यास; जाणवेल न जाणवेल असा! ती आता कुपणाशी पोहोचली आहे.


'कुछ खो दिया है पाइ के.... कुछ पा लिया गवाई के...' जो पा लिया हे वो नूतन की आंखो मे झलकता हे! 'कहां ले चला है मनवा... मोहे बांवरी बनाइ के....' 'पी' च्या प्रेमात सर्वस्व हरवताना आणि खूप काही वेगळं मिळवताना मी स्वतःमध्ये देखील उरलेले नाही... तिचा चेहेरा हेच तर सांगत नाही ना?

'मोरा गोरा अंग लैले... मोहे शाम रंग दैदे...छुप जाऊंगी रात ही मे..मोहे पी का संग दैदे....' हे ऐकताना केवळ आणि केवळ तिची नजर! बस! त्याचवेळी कुपणापलीकडच्या घराची खिडकी उघडली जाते आणि एक हलकीशी सावली दिसते; त्याच्या सोबतीसाठीचा आपण केलेला हा सगळा अट्टहास आहे; हे विसरून ती बावरी, स्वतःतच हरवलेली प्रेयसी तिथून पळून जाते. स्वतःच्या घराच्या दरवाजातून आत शिरताना ' मोरा गोरा अंग लैले... मोहे शाम रंग दैदे...' म्हणते आणि पुढेचे शब्द गुणगुणत असताना ती तिचे डोळे मिटून घेते.... गाणं इथे संपतं. पण एक सांगू? तुम्ही देखील क्षणभर डोळे मिटा तिच्या बरोबर! तुम्ही आयुष्यभर मनात जपलेला तो मोहक चेहेरा... ज्याच्यावर तुम्ही मनापासून प्रेम केलं असेल; उभा राहीलच! My guarantee!!!

नूतन आपल्या सिनेसृष्टीला लाभलेली एक अत्यंत गुणी आणि अभिनय संपन्न भाव सम्राज्ञी! तिच्याबद्दल जितकं सांगीन तितकं कमीच!

Friday, August 9, 2019

नृत्यांगना.................... अहं........ नेत्रांगना!!!



नृत्यांगना.................... अहं........ नेत्रांगना!!!


खरं सांगू का माझं नृत्यकलेवर खूप खूप प्रेम आहे. त्यामुळे कोणत्याही चित्रपटातील कलात्मक नृत्याविष्कार मला आकर्षित करतो. मला असं वाटतं की नृत्य म्हणजे केवळ पदंन्यास किंवा हस्ताविष्कार किंवा चेहेऱ्यावरील भाव दाखवणे नाही; तर केवळ एखाद्या बोलक्या डोळ्यांच्या अभिनेत्रीकडून फारशी नृत्यकला अवगत नसताना देखील एक अजरामर गीत आपल्याला मिळतं. हिंदी चित्रपटांमध्ये अशी अनेक अजरामर गाणी आणि मास्टर पिस आहेत की जे कधी त्यातील नृत्यामुळे तर कधी नृत्यांगनेमुळे सर्वश्रुत आहेत. अगदी आजच्या पिढीतील अनेक तरुणांना देखील या गाण्यांनी आणि त्यातील नृत्याने भुरळ घातली आहे. असच जबरदस्त नावाजलेलं आणि All time hit गाण म्हणजे 'प्यार किया तो डरना क्या.....' अर्थात हे गाणं इतकं बहुश्रुत आहे की आता यावर नवीन काही सांगण्यासारखं असूच शकत नाही; हे मला मान्य आहे. 'मधुबाला' आणि 'अनारकली' एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात अस वाटण्याइतकं मधुबालाने हे गाणं जिवंत केलं आहे.

मला नृत्यविषयाची आवड असल्याने, मी या गाण्यातील तिच्या नृत्यासंदर्भात बरेच वाचन केले. हे गाणं मी किमान हजारवेळा तरी बघितलं असेल. या गाण्यात तिने जे नृत्य केलं आहे; याचे एकतर long shots आहेत किंवा colse shots मध्ये केवळ पदन्यास दाखवले आहेत. याचं कारण मधुबाला ही काही नृत्यांगना नव्हती. त्यामुळे सुरवातीला तिने संपूर्ण नृत्यसभेला मारलेल्या २७ गिरक्या, त्यानंतरचा पदन्यास, नंतरच्या एका पायाच्या ९ गिरक्या हे सर्व कोणा उत्तम नृत्यांगनेकडून करून घेतले असणार असे वाटते.


यातील नृत्य बाजूला ठेऊन आपण हे गाणं जर मनापासून बघितलं तर संपूर्ण चित्रपटाची कथा या एका गाण्यात मधुबालाने तिच्या डोळ्यांमधून सांगितली आहे; हे दिसेल. ज्या ज्या वेळी तिने 'प्यार का इजहार' केला आहे त्या त्या वेळी तिने शेहेजाद्याकडे आर्त... प्रेमळ... आव्हानात्मक... आणि स्वतःच्या प्रेमावर असलेल्या विश्वासाने बघितले आहे. त्यावेळेस तिच्या नजरेतलं 'दर्द भरा इश्क' प्रत्येक 'डोळस' माणसाला दिसल्याशिवाय राहाणार नाही.


गाण्याची सुरुवात होताना ती म्हणते 'इन्सान किसीसे दुनिया मे एक बार मोहोब्बत करता हे... इस दर्द को लेकर जीता हे.....' या दोन ओळींमध्ये तिने शेहेजाद्याला स्पष्ट केलं आहे की माझ तुझ्यावर आणि केवळ तुझ्यावर प्रेम आहे; जे मी आता पूर्णपणे स्वीकारते आहे. त्यामुळे यापुढे  'इश्क' बरोबर जे 'दर्द' येतं ते देखील मी माझ्या मनात साठवून जगणार आहे. त्याच्या पुढच्या ओळीत ती म्हणते  'इस दर्द को लेकर मरता हे...' हे जे काही 'मरता हे...' तिने त्या एका क्षणात बादशहाला नजरेने सांगितलं आहे ते केवळ आणि केवळ अप्रतिम! कारण त्या एका नजरेच्या फटकाऱ्यातून पुढच्या संपूर्ण गाण्यात ती जी भावना व्यक्त करणार आहे त्याचा अंदाज बादशहाला दिला आहे; आणि तरीही मनात असूनही बादशहा त्याक्षणी तरी तिला थांबवू शकत नाही आहे.


त्यानंतर प्रत्येकवेळी ती 'प्यार किया तो....' हे शेहेजाद्याकडे बघून म्हणते. त्यात एक प्रेमळ हास्य आहे. स्वतःच्या प्रेमाची कबुली आहे आणि 'डरना क्या...' हे बादशाहाकडे बघून म्हणते. ज्यात आता यापुढे मला तुमची भिती नाही; केलेल्या प्रेमासाठी मी पुढे येणाऱ्या कोणत्याही प्रसंगाला सामोरी जायला तयार आहे. हेच तिची नजर सांगते आहे. 'आज कहेंगे दिल का फसाना जान भी ले ले चाहे जमाना....' हे म्हणताना तिच्या नजरेत हे स्पष्ट आहे की आता याक्षणी तरी तुम्ही मला थांबवू शकणार नाही आहात; त्यामुळे मी माझ्या भावना इथे भर सभेत व्यक्त करणार आहे. पुढे 'मौत वही जो दुनिया देखे.... घुट घुटकर यु मरना क्या...' हे म्हणताना ती बादशहा आणि शेहेजादा दोघांना हे स्पष्ट सांगते आहे की माझं पुढे काय होऊ शकतं हे मला माहित आहे आणि ते मी स्वीकारलेलं आहे.


'उनकी तमन्ना दिल मे रहेगी.... शम्मा इसी मेहेफील मे रहेगी...' हे म्हणताना तिने शेहेजाद्याला हे सांगून टाकलंय की तुझा आणि माझा 'निकाह' होऊ शकणार नाही आहे. मी एक नृत्यांगना आहे या दरबाराची आणि कायम केवळ नृत्यांगना राहाणार आहे. 'इश्क मे जीना.... इश्क मे मरना...' यावेळी ती बादशहा आणि शेहेजादा दोघांना सांगते आहे की मी लवकरच मारणार आहे; याची आता मला जाणिव आहे. मात्र जोवर जिवंत आहे तोवर मी प्रेम करत राहाणार; आणि पुढे  'और हमे अब करना क्या....' हे म्हणताना तिने कृतीपेक्षा देखील नजरेने बादशहाला आव्हान दिलं आहे की जे करायचं ते कर. हा शॉट एका बाजूने घेतलेला आहे. त्यामुळे खर तर तिच्या डोळ्यातल्या भावना स्पष्ट दिसलेल्या नाहीत. मात्र यावेळी बादशहाच्या चेहेऱ्याकडे बघितलं तर त्याच्या उतरलेल्या चेहेऱ्यात  मधुबालाच्या डोळ्यातल्या भावना आपल्याला दिसतील. त्यापुढची ओळ आहे 'जब प्यार किया तो...' जे तिने बादशहाच्या पुढ्यात उभं राहून आणि शेहेजाद्याकडे हात करून स्पष्ट केलं आहे आणि 'डरना क्या...' हे म्हणताना मी मृत्युला आता घाबरत नाही हे तिच्या मोठ्या बोलक्या डोळ्यांनी सर्वांसमोर दाखवून दिल आहे.


'छुप ना सकेगा इश्क हमारा... चारो तरफ हे उनका नजारा....' यावेळी तिने बादशहाला जाणीव करून दिली आहे की तू मला मारलस तरीही यापुढे अनारकालीच्या 'इश्कची दुहाई' कायम दिली जाणार आहे; आणि पुढे 'पर्दा नाही जब कोई खुदा से... बंदो से पर्दा करना क्या...' म्हणताना तिच्या आर्त डोळ्यांनी बादशहाला त्याच्या मनमर्जी कृतीचे उत्तर कधीतरी त्या 'परवरदिगार'ला द्यावे लागणार आहे हे स्पष्ट केले आहे.


हे गाणं म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील सर्वार्थाने 'मास्टर पिस' आहेच. पण नृत्यांगाना नसूनही केवळ नेत्रांमधून भावना सादर करून मधुबालाने या गाण्याला 'चार चांद' लावले आहेत.... याबद्दल कोणाचेही दुमत नसेल; याची मला खात्री आहे.

अशाच एका नेत्रांगनेबद्दल पुढच्या शुक्रवारी सांगेन.


Friday, August 2, 2019

काही आठवणी कायम मनात राहातात

काही आठवणी कायम मनात राहातात.

माणसाचं मन म्हणजे अनेक भावनांचं, विचार-कल्पनांचं आणि मुख्य म्हणजे अनेक आठवणींचं भांडार असतं. कडू-गोड, दुःखद-आनंदी असे अनेक प्रसंग आपण आपल्याही नकळत आपल्या मनात जपत असतो; आणि कधीतरी काही कारणांनी हेच प्रसंग आठवणींच्या स्वरूपात परत ताजे करतो.

कशी गम्मत असते बघा.... आपल्या वाढत्या वयात आपल्याला आई-वडिलांची मतं कधीकधी पटत नाहीत. मग आपण वाद घालतो... माझं म्हणणं कसं बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वेळी कधी त्यांचा राग येतो; तर कधीतरी त्यांचं पटत. पण तरीही आई-वडिलांनी विषय समजावताना बोललेले शब्द आपल्या मनात घर करतात आणि आपण मनातच म्हणतो;'माझ्या मुलांच्या बाबतीत मी नाही अस वागणार.' दिवस जातात... आपण मोठे होतो... संसार-मुलं अस आयुष्य आपलं देखील सुरू होतं.... कधीतरी असा प्रसंग येतो की आपली वयात येणारी मुलं आपल्याशी वाद घालायला लागतात; आणि नकळत आपण आपल्या आई-वडिलांनी वापरलेले शब्दच वापरतो. वाद मिटतो.... पण ती जुनी आठवण मनाच्या पृष्ठभागावर येते. चूक की बरोबर याच्या पुढे जाऊन मला वाटतं की ती आठवण... तो प्रसंग.... कदाचित त्या वयात आपल्याला फार शिकवत नसेलही. पण पालकत्वाच्या या वळणावर मात्र तोच आठवणीतला प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातो.

असेच अनेक प्रसंग शाळेतले! कधीतरी सोबत्यांच्या बरोबर शिक्षकांच्या काढलेल्या खोड्या.... केलेली मस्ती.... एखादी आवडणारी मैत्रीण/ आवडणारा मित्र यांच्याबद्दल दोस्तांमध्ये केलेली चर्चा..... तसं बघितलं तर हे केवळ काही प्रसंग.... पण प्रौढत्वाच्या वळणावर कधीतरी आपला तो शाळेतला जुना वर्ग आठवतो. मग एखाद्या संपर्कातल्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे हे बोललं जातं. कोणीतरी पुढाकार घेतं; आणि परत एकदा तो जुना वर्ग एकत्र येतो. सगळेच मोठे झालेले असतात. आपापल्या आयुष्यात पूर्णपणे अडकलेले असतात. तरीही एकमेकांना बघायला-भेटायला उत्सुक असतात.... आणि मग सोबतीला तेच जुने प्रसंग आठवणींच्या स्वरूपात येतात. शिक्षकांपासून लपवून केलेल्या खोड्या, गृहपाठ केला नाही म्हणून झालेली शिक्षा या तर शाळेला जोडलेल्या आठवणी असतातच पण या वळणावर ते जुने लपवलेले 'क्रश' मोकळेपणी सांगितले जातात. खूप हसतो आपण... खुश होतो... आणि नकळत नवीन आठवणीची पुरचुंडी बांधून घेऊन एकमेकांचा निरोप घेतो.

वाढत्या वयाबरोबर आपल्या आयुष्यात अनेक घटना घडत जातात. कधी अचानक आलेले गंभीर प्रसंग, तर कधी अचानक आलेली सुखद बातमी.... प्रत्येक घटना आपल्या मनातल्या तळ्यात आठवणींचे तरंग बनून विरघळत असते. मात्र या आठवणी कुरवाळत बसायला आपल्याकडे वेळ नसतो. तरुण्यातून प्रौढत्वाकडे आपली घोडदौड सुरू असते. वाढत्या संसाराबरोबर वाढत्या जवाबदाऱ्या आणि कर्तव्यांची यादी वाढतच असते. क्षणभराच्या विश्रांतीच्या वेळी काही प्रसंग हलकेच तरंग उठवतात... पण आपण परत मन झटकून पळायला लागतो.

....आणि मग कधीतरी अचानक आपल्याला लक्षात येतं; अरे आपण आता उगाच इतकं धावतो आहोत. आता वेग कमी करायला हरकत नाही. आपण हळू हळू मोकळे होतो आहोत या जवाबदाऱ्यांमधून. हे लक्षात येईपर्यंत आपण वृद्धत्वाकडे झुकायला लागलेले असतो. आता आपल्याकडे वेळच वेळ असतो..... आणि मग आयुष्यभर घडलेले प्रसंग येतात सोबतीला... आठवणींच्या स्वरूपात.

या आठवणी कायम मनात राहातात........... कारण त्या प्रसंगांमध्ये ज्या व्यक्ती आपल्याला सोबत करतात त्या आपल्यासाठी कायमच खास असतात.