Friday, March 29, 2019

एक शोध.... एक गुण!

एक शोध..... एक गुण!

विजय, प्रकाश, प्रसाद आणि राजेश लहानपणापासूनचे मित्र. अगदी शाळे पासूनचे. ज्या वयात मैत्री फक्त मैत्रिसाठी असते. तिला कोणतेही कारण किंवा मतलबीपणा चिकटलेला नसतो; त्यावयातले मित्र. १९८७-८८ मध्ये एकत्र दहावी पास झाले होते सगळे. पुढे जरी चौघांचेही मार्ग बदलले तरी ही शाळेतली मैत्री अतुट राहिली होती.

विजयने कायद्याचा अभ्यास केला आणि वेगवेगळ्या परीक्षा देत खूपच लवकरच्या वयात हायकोर्टात जज्ज झाला. प्रकाशने सी. ए. पूर्ण करून स्वतःचा व्यवसाय सुरु केला होता; त्याने आश्चर्यकारक रीतीने प्रगती करत सरकार दरबारी वशिले लावत सरकारचेच अकाउंट्स बघण्याचे काम मिळवले होते. मोठ्या पोस्टवर होता तो. मंत्रालयात त्याचे स्वतःचे केबिन होते. प्रसादने बराच प्रयत्न केला शिक्षण घेण्याचा. पण त्याला शिक्षणात गोडी नव्हती. शेवटी त्याने त्यांच्या कुटुंबाच्या लोणावळयाच्या घराचा कायापालट करून तेथे लॉजिंग-बोर्डिंग सुरु केले होते. सुरवात लहान असली तरी गेल्या काही वर्षात त्याने त्याजागी मोठे हॉटेल उभे केले होते. राजेश या चौघांमधला खूपच हुशार मुलगा होता. खर तर तो अनाथ होता. पण अनाथालयात राहून आणि खूप मेहेनत करून त्याने  आय. आय. टी. मध्ये प्रवेश मिळवला होता. त्यामुळे त्याच्याकडून या सर्वांनाच् खूप अपेक्षा होत्या. शिक्षण संपल्यावर त्याने एका मल्टिनॅशनल कंपनीमधे खूप मोठ्या पगारावर काही वर्ष नोकरी देखिल केली होती. पण मग अचानक त्याच्या डोक्यात काहीतरी खुळ शिरलं आणि नोकरी सोडून, सगळ्यांशी फारकत घेऊन तो साताऱ्याला निघून गेला. त्याने तिथे एक घर भाड्याने घेतलं आणि एकटाच रहायला लागला.

विजय, प्रकाश, प्रसाद यथावकाश विवाहित होऊन संसाराला लागले. ते तिघे महिन्या-दोन महिन्यातून कोणा एकाच्या घरी भेटायचे आणि थंडगार बियरच्या ग्लास बरोबर जुन्या नव्या गप्पा मारायचे. प्रत्येक भेटित राजची आठवण काढायचे आणि पुढच्या महिन्यात मुद्दाम वेळ काढून त्याला भेटण्याचा प्लॅन करायचे. मात्र जेऊन निघेपर्यंत तो प्लॅन त्यांच्यासारखाच् ढगात गेलेला असायचा. मग एखाद-दोन दिवसांनी फोनवरून गप्पा झाल्या की परत एकदा राजची आठवण निघायची .... बास!

मात्र त्या तिघांच्या आयुष्यात एक दिवस खूप वेगळा उगवला. तो जून महिन्यातला शुक्रवार होता. ढगाळ वातावरण होत. विजयला वीक एन्डचा फील आला होता. तो प्रकाशला फोन करून प्रसादकडे जाऊ या का अस विचारण्याच्या मूड मद्दे होता आणि प्रसादचाच फोन आला.


"हॅलो विजय? लगेच निघ. मी प्रकाशलासुद्धा सांगितलं आहे. दोघे एकमेकांशी बोलून घ्या आणि 2 तासात माझ्याकडे पोहोचा." प्रसादने विजयला विचारही करायला वेळ न देता घाईघाईत सांगितले. त्याच्या आवाजातली अस्वस्थता विजयला समजलीच नाही. तो स्वतःच्याच् धुंदीत होता. "इसको केहेते हे दोस्त। अरे मी पण तुझ्याकडेच यायचा विचार करत होतो. बायकोला काय कारण सांगू हाच विचार करत होतो आणि प्रकाशला फोन लावायला मोबाईल उचलला तेवढ्यात तुझा फोन आला. चल छान झालं. म्हणजे आपण भेटतो आहोत तर. बरं! बोल मी काही स्पेशल घेऊन येऊ रात्री बसण्यासाठी की तू आणून ठेवशील?" विजयने हसऱ्या आवाजात विचारले.


"विजय, तुला कळतं आहे का मी काय म्हणतो आहे? अरे इथे इमर्जन्सी निर्माण झाली आहे. त्यामुळे मी तुला ताबडतोब निघुन यायला सांगतो आहे. प्रकाशला घे आणि ताबडतोप निघ." प्रसादचा आवाज भलताच गंभीर होता. आत्ता कुठे विजयला प्रसादच्या आवाजातला बदल लक्षात आला.

 "प्रसाद? काय झालं? सगळं ठीक ना? वाहिनी बरी आहे ना?" विजयने काळजी वाटून विचारले.

"ती ठीक आहे रे तिला काय धाड भरणार आहे? कधी काही झालच तर मलाच होईल. बर ते राहुदे.... ऐक मी काय सांगतो आहे. विजय... राजेश.... आपला राज... माझ्याकडे आला आहे. आत्ता इथे माझ्यासमोर बसला आहे. बस. इतकंच. याहून जास्त मी तुला फोनवरून काहीच सांगणार नाही. किंबहुना सांगूच शकत नाही. तू अन् प्रकाश लगेच इथे निघून या. बाकी तुम्ही इथे आलात की मग बोलू." अस म्हणून प्रसादने फोन ठेवला.

 विजयने प्रसादचा फोन ठेवला आणि तो विचार करायला लागला. तेवढ्यात त्याला मोबाईलवर प्रकाशचा फोन आला. "तुला प्रसादचा फोन होता का विजय?" प्रकाशने काळजीभरल्या आवाजात विचारले.

"हो. राज आला आहे प्रकाश! मुख्य म्हणजे मला प्रसादचा आवाज नीट नाही वाटला. तू बोल! किती वाजेपर्यंत तू निघु शकतोस? माझा काहीच प्रॉब्लेम नाही. मी घरी फोन करून सांगेन. तसंही माझी बायको माहेरी जाणार आहे दोन दिवसांसाठी. त्यामुळे माझा काहीच प्रश्न नाही." विजय म्हणाला.

"ठिक. मीदेखील घरी फोन करून कळवतो. बायको थोडी वैतागेल. पण तशी तिला सवय आहे माझ्या अचानक बाहेरगावी जाण्याची. त्यामुळे माझाही काही प्रश्न नाही. तू मला माझ्या ऑफिसमधून घे. तू येईपर्यंत मी आवाराआवर करतो कामाची. तसच जाऊ पुढे." प्रकाश म्हणाला.


"ठीक. अर्ध्या तासात पोहोचतो मी." विजय म्हणाला. त्याने ड्राईवरला गाडी काढायला सांगितली. लोणावळयाला जायचं आहे याची कल्पना त्याला दिली. घरी कळवले आणि निघाला. प्रकाश ऑफिसच्या खालीच येऊन उभा होता. तो गाडीत बसला आणि गाडी लोणावळयाच्या दिशेने निघाली. दोघेही अस्वस्थ होते. पण दोघेही एकमेकांशी बोलण्याच्या मनस्थितिमधे नव्हते.

तीन तासात विजय आणि प्रकाश दोघे लोणावळ्याला प्रसादच्या हॉटेलवर पोहोचले; इथे तिथे न थांबता ते दोघे तडक प्रसादच्या स्पेशल रूमवर जाऊन थडकले. दरवाजा  वाजवण्याची  गरजच नव्हती; तो उघडाच होता आणि समोरच्या सोफ्यावर राजेश...... त्यांचा बालपणीचा मित्र राज बसला होता. त्याच्या हातात बिअरचा ग्लास होता आणि त्याचा चेहेरा शांत होता. तिथेच त्याच्या शेजारी प्रसाद बसला होता. तो मात्र डोक्याला हात लाउन दाराकडेच बघत होता. विजय आणि प्रकाशने प्रसादकडे बघितलं. पण त्याची नजर जरी अस्वस्थ असली तरी एकूण परिस्थिति कंट्रोलमधे असावी अस दिसत होत. दोघांनी नकळत एक निश्वास टाकला आणि खोलीत प्रवेश केला.


"साल्या प्रसाद घाबरवून टाकलस न आम्हाला. मला तर वाटलं राज शेवटचा श्वास घेतो आहे. अरे जोराची लागली होती तरी गाडी थांबवली नाही. थेट मारली आणि इथे आलो. बघतो तर काय हा राज एखाद्या बादशहा सारखा मस्त बसून गार बियर मारतो आहे आणि तू काही कारण नसताना डोक्याला हात लावून बसून आहेस. साल्या बुकलुन काढू का तुला? पण ते नंतर... थांब आलोच." वैतागलेला विजय बाथरूमकडे जात चिडून म्हणाला.

प्रकाशसुद्धा वैतागला होता एकूण परिस्थिति बघुन. राज आणि प्रसादचा आपल्याला मुद्दाम त्रास देण्याचा प्लॅन असावा असा विचार त्याच्या मनात आला. कदाचित फक्त 'राज आला आहे'; असं प्रसादने सांगितलं असतं आणि आपल्याला काही महत्वाचं काम असतं तर आपण आता आलो तसं धावत आलो नसतो, म्हणून या दोघांनी मिळून हा प्लान केला असावा असं प्रकाशला वाटलं.

 "नाही. असा आमचा कोणताही प्लॅन नाही." राज हसत म्हणाला.

प्रकाश अवाक्..."काय?"

 प्रसाद हताशपणे...."तू आत्ता मनात याच्याबद्दल काही विचार आणालास का प्रकाश?" "नाही..... म्हणजे... हो.... मला आणि विजयला त्रास देण्याचा तुझा आणि राजचा प्लॅन असावा असं आलं माझ्या मनात. का? काही गडबड आहे का? काय हा लफडा आहे साल्यानो?" प्रकाशने गोंधळत विचारले.


 "नाही..... म्हणजे... हो.... मला आणि विजयला त्रास देण्याचा तुझा आणि राजचा प्लॅन असावा असं आलं माझ्या मनात. का? काही गडबड आहे का? काय हा लफडा आहे साल्यानो?"


प्रकाशने गोंधळत विचारले. "बस... सांगतो... विजयला येऊ दे." प्रसाद शांतपणे म्हणाला.

 "वा! आत्ता कुठे मोकळं वाटलं मला!" विजय बाहेर येत म्हणाला. "बोला दोस्तानो. काय प्रसाद.... हे असं अचानक का बोलावून घेतलंस? म्हणजे राज आला आहे हे खूपच खास कारण आहे तुझ्याकडे यायला. पण तुझ्या आवाजात आनंद कमी आणि काळजी जास्त होती. म्हणून विचारतो आहे." विजय प्रसाद समोर बसत म्हणाला.


"बस विजय. प्रकाश तुही बस." प्रसाद म्हणाला. "राज... बाबा... आता तूच बोल. माझ्याकडे शब्द नाहीत."

"काय रे राज? काय स्टोरी आहे? पळून जाऊन लग्न केलं आहेस की लग्न न करताच सगळं केलं आहेस? कोर्ट मॅटर आहे का?" विजयमधला वकील जागा झाला.

"नाही रे. आणि हा प्रसाद जितका बाऊ करतो आहे तितकं ते विचित्र किंवा भयानक नाहिये. त्यामुळे तुम्ही इतके घाबरून जाऊ नका. मस्त बियर उघडा. खर तर मी तुम्हाला एक झक्कास बातमी द्यायला आलो आहे.  मी एक शोध लावला आहे आणि अनेक प्रकारे प्रयोग करून खात्री केली आहे. माझा शोध फुल प्रुफ आहे. म्हणूनच ही माहिती तुमच्याशी शेयर करायला आणि पुढे काय करू शकतो ते बोलायला आलो आहे; कारण तुम्ही तिघे सोडलात तर माझं या जगात कोणीही नाही आहे. इतकंच." राज म्हणाला.


'राज म्हणतो इतकंच असेल का हे? मग प्रसाद का इतका चिंतेत दिसतो आहे?' प्रकाशच्या मनात आलं.

"हो इतकंच रे.... पुढे काय विचार केलास? फ़क्त माझ नाव  घे मनात आणि तेच वाक्य रिपीट कर नं. दुसऱ्याच नाव घेतलं की लिंक तुटते." राज म्हणाला.

प्रकाश दचकला. विजय गोंधळाला. आणि प्रसाद डोक्याला हात लावून खुर्चीला मागे टेकला.


"राज जरा नीट समजावशील आम्हाला?" प्रकाश म्हणाला.


"ओके. सांगतो. तुमच्या लक्षातच असेल मी आय. आय. टी. नंतर झकास जॉब करत होतो. पण तिथे प्रचंड पॉलिटिक्स होत यार. माझ्या प्रत्येक नवीन कल्पना एकतर चोरीला जायच्या किंवा रिजेक्ट व्हायच्या. मी खूप प्रयत्न केला टिकायचा. पण माझे शत्रूच् जास्त होते तिथे. आणि सतत माझ्याविरुद्ध कट करत होते. बर वरिष्ठांशी बोलावं तरी पंचाईत. कारण रोज तर सोबतच्या लोकांबरोबरच राहायचं होत नं. शेवटी कंटाळून मी ती नोकरी सोडली. त्याचवेळी मनात विचार आला की माझ्याबद्दल सतत कट करणा-यांच्या मनात माझ्याबद्धल काय विचार चालु आहेत हे कळले तर मी त्यावर काहीतरी करू शकेन. आणि मग मी कामाला लागलो. खूप विचार केला... खूप प्रयोग केले. कमावलेले सगळे पैसे आणि आजवरचं सगळं आयुष्य या प्रयोगावर खर्च केले आणि स्वतःच्या हिमतीवर मी माझा प्रयोग तडीला नेला आहे..... मी असं एक मशिन बनवलं आहे की जे मला समोरची व्यक्ति माझ्याबद्दल काय विचार करते ते सांगत. फ़क्त त्या व्यक्तिने माझं नाव घेणं आवश्यक आहे विचार करताना. प्रकाश, तू आत्ता विचार केलास ना की हे इतकंच असेल का? ते मला लगेच समजलं. पण मग पुढच वाक्य ऐकायच्या अगोदर माझी लिंक तुटली. नाहीतर ते पण कळलं असतं." मग तो विजयकडे वळत म्हणाला,"विजय, विचार कर... तू तर जज्ज आहेस. तुला जजमेंट देताना या मशीनचा कितीतरी उपयोग होईल की नाही? प्रकाश तुला तुझा क्लायंट किती इनकम सांगतो आहे आणि किती लपवतो आहे हे समजलं तर चांगलंच आहे न?" राज बोलायचा थांबला.

विजय आणि प्रकाशने न बोलता प्रसादकडे बघितले. "दोस्तानो तो खर बोलतो आहे. ते मशीन हरभ-याच्या दाण्या एवढं आहे... त्याच्या कानात. मी बघितलं आहे ते. त्यामुळे त्याला वेड लागलेलं आहे असं समजू नका." प्रसाद म्हणाला.

प्रसादचं बोलणं ऐकून विजयने त्याचा मोर्चा राजकडे वळवला. "राज तुझा शोध खरच खूप मोठा आहे. त्याचा आवाका खूपच मोठा आहे. पण मला अजूनही एक कळलं नाही की आता पुढे तू काय करायचं ठरवलं आहेस?"

"माझ्या मनात एक विचार आला विजय. तुमच्या दोघांच्याही सरकार दरबारी मोठ्या मोठ्या ओळखी आहेत. मुख्य म्हणजे माझ्या या शोधाचा उपयोग आपल्या सरकारला खूपच होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही दोघेही माझी ओळख योग्य चॅनेल मधल्या योग्य व्यक्तिशी करून द्या. बाकी माझ्या या प्रयोगाबद्दल कसं आणि काय सांगायचं ते मी बघतो." राज विजय आणि प्रकाशकडे बघत म्हणाला.

"राज अरे तुला वाटतं तितकं हे सोप नाही आहे. अरे....."प्रकाश पुढे काही बोलायच्या आत राजने त्याला थांबण्याचा इशारा केला.

"हे बघा मित्रानो, मी तुम्हाला भेटायला आलो आणि मदत मागतो आहे कारण तुम्ही माझे लहानपणापासूनचे मित्र आहात. तसं बघायला गेलं तर माझे आप्त... माझे नातेवाईक आहात तुम्ही... त्यात आता चांगल्या पोस्ट वर आहात. त्यामुळे माझ काम लवकर होईल इतकंच. मात्र तुम्ही जर मला मदत न करता इथे बसून बोधामृत पाजणार असाल तर मी निघतो कसा. मला माझे मार्ग शोधता येतिल. एकच सांगतो... आज मी एक काळाच्या पुढचा शोध लावला आहे हे खरं आहे. आज दुसऱ्याच्या मनातले विचार समजणं म्हणजे एक गुन्हा किंवा खूप काही चुकीची गोष्ट वाटू शकते. पण खरच सांगतो दोस्तानो, मी यावर खूप अभ्यास केला आहे आणि  जर मी केलेला अभ्यास खरा असेल तर पुढे येणारी पिढी उपजत हे आणि असेच काही गुण घेऊन येणार आहे. मानवी पिढी आता अजून प्रगत होते आहे. पूर्वी प्रत्येक घरात फोन नसायचा आणि आज लहान मुलांच्या हातात देखील मोबाईल असतो. त्या एवढ्याश्या माशीनमधून लोक संपूर्ण व्यवसाय सांभाळतात. तरीही अजूनही आपल्याला अनेक कामांसाठी अनेक इक्विपमेंट्स वापरावी लागतात. पण पुढे ही मशिन्स कमी होतणार आहेत. त्यांची गरजच पडणार नाही आहे. आपल्या मनातले विचार सामोरच्याला सांगणे किंवा एकादी गोष्ट हवी असल्यास विचार प्रवाहाने ती मिळवणे हे सर्व उपजतच असणार आहे पुढच्या पिढीकडे. त्यामुळे आज तुम्ही मला थांबवाल... पण मग तेव्हाच काय?" राज आवाज चढवून म्हणाला.


राजचं बोलण एकून विजय आणि प्रकाशचे चेहेरे विचारी झाले. ते बघून प्रसाद पटकन म्हणाला,"अहं... विजय... प्रकाश..... मनात कोणताही विचार आणु नका. तो ते विचार ऐकतो आहे. फक्त हे ठरवा की तुम्ही मदत करणार की नाही. कारण आत्ता तुम्ही चांगल्या मनाने कोणताही विचार केलात तरी राज तुमचे विचार समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही. मी प्रयत्न करून बघितला आहे. राजला फक्त विचार ऐकता येतो... त्यामागची चांगली-वाईट भावना नाही समजत. राज तू आत्ता जे सांगितलंस ते सगळ मान्य आहे मला. पण तूदेखील समजून घे की विचाराच्या मागे काही भावना असते आणि ती अनेक अनुभवातून निर्माण झालेली असते. ती समजून घेण्याची शक्ती तुझ्या प्रयोगात नाही. हा... कदाचित् पुढच्या पिढीला ते समजू शकेल. पण तुला नाही."

"खरं आहे तुझं प्रसाद." विजय म्हणाला. मग राजकडे वळत तो म्हणाला,"ओके... राज... मी तुला मदत करतो. कितीही म्हंटलं तरी प्रकाश सरकारी नोकर आहे. त्यामानाने माझा हुद्दा मोठा आहे. एक काम कर, तू सोमवारी माझ्या घरी ये. मी उद्याच्या दिवसात जिथे बोलायचे तिथे बोलून ठेवतो. पण एकदा तुझी गाठ घालून दिली की मग तुझ तू बघायचं. ठीके?"


राज खुश झाला. "ये हुई ना बात दोस्त. प्रसाद मला तुझ म्हणणं पटतं आहे. चला,  मला माझ्या पुढच्या प्रयोगाला विषय मिळाला. कारण एकदा हा प्रयोग आपल्या देशातल्या योग्य व्यक्तींच्या हातात दिला की मी परत रिकामाच होणार आहे. तेव्हा पुढचा प्रयोग याविषयातला असेल. बर, आता सोडा हा विषय. हे बघा मी हे यंत्रसुद्धा काढून ठेवतो कानातून. आता माझ्या प्रयोगाच्या विजया प्रीत्यर्थ आपण मस्त थंडगार बियर पिउया." तो हसत म्हणाला.

राजने कानातून त्याचे संशोधन केलेले यंत्र काढून ठेवले आणि ते चौघे मित्र जुन्या गप्पात रंगून गेले. त्यानंतर थोडावेळ थांबून विजय आणि प्रकाश निघाले. मात्र गाडीत बसता क्षणी प्रकाश भडकुन विजयला म्हणाला,"साल्या विज्या काय आहे तुझ्या मनात? तो राज मुर्ख आहे; पण तुला काही अक्कल आहे की नाही? अरे भले त्या राजचा शोध मोठा आहे आणि आपल्या सरकारसाठी मोठा आहे; पण तुला आपलं सरकारी काम आणि सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता माहीत नाही का? अरे ते लोक राजला उभं तरी करतील का? उगाच का त्याला नको ती आशा लावली आहेस?"


विजय शांत होता. तो म्हणाला,"प्रकाश, अरे, तूच विचार कर. आपण मदत केली नाही तर राज गप्प बसणार आहे का? तो स्वतः प्रयत्न करणार म्हणाला न? म्हणजे तो करणारच्. अरे निदान आपण त्याला योग्य ओळख लावून त्यामानाने चांगल्या लोकांसोमोर उभं करू शकतो. तो बोलायच्या अगोदरच त्याचा आवाज दाबला जाऊ नये एवढी मदत तर आपण मित्र म्हणून करू शकतो न? आणि कोणी सांगावं? त्याचा शोध स्वीकारलाही जाऊ शकतो. उगाच का सुरवातीलाच नकारात्मक भूमिका घ्यायची?"

प्रकाशला ते फारसे पटले नाही. पण तो शांत झाला. विजयने राजला शब्द दिला आहे म्हणजे त्याने काहीतरी विचार केलाच असेल अस मनात म्हणत तो गप बसला.


सोमवारी राज उत्साहाने विजयकडे आला. विजयने अगोदरच बोलणं करून ठेवलं होतं. त्यामुळे त्याने स्वतः त्याच्या बरोबर जात त्याला योग्य व्यक्तिशी गाठ घालून दिली. मीटिंग खूपच चांगली झाली. अगदी अपेक्षेबाहेर! राज आणि विजय खुश होते. दोघे बाहेर पडले आणि खुशीत विजयने प्रकाशला फोन लावला. राज बाजूलाच उभा होता. पण आतून एक कारकून आला आणि त्याने  राजला परत आत बोलावलं आहे असं सांगितलं. फोनवरचं बोलणं क्षणभरासाठी थांबवत विजय म्हणाला," जा रे तू आत. आता तू काय मोठा माणूस होणार. सगळीकडे तुला एकट्यालाच बोलावणार. चल! मी निघतो. संध्याकाळी घरी ये. मी प्रकाश आणि प्रसादला पण बोलावून घेतो. आता खरं सेलिब्रेट करू. बाय"

राजेश देखील खुश होता. "हो रे दोस्ता. आता मागे वळून बघायची गरज नाही मला. चल मी जातो आत. संध्याकाळी भेटू." राज म्हणाला आणि परत आत वळला.


विजय गाडीत बसताना परत एकदा मागे वळला आणि त्याने आत जाणाऱ्या त्याच्या मित्राकडे प्रेमाने आणि अभिमानाने बघितले आणि निघाला.

2050......

 ]विजय, प्रकाश आणि प्रसाद आज भेटले होते........ प्रसादच्या लोणावळ्यातल्या हॉटेलच्या शेजारीच बांधलेल्या वाडयाच्या गच्चित बसले होते. वयाची साधारण पंचाहत्तरी सर्वांनीच सेलिब्रेट केली होती. त्यावेळी देखील ते भेटले नव्हते. आता मात्र तिघे अनेक वर्षानंतर भेटले होते. मुद्दाम ठरवून. प्रसाद अलीकडे सारखा आजारी पडायला लागला होता. त्यामुळे त्याने आग्रह करून विजय आणि प्रकाशला बोलावून घेतले होते. कारण राजच्या अचानक गायब होण्यानंतर त्या तिघाना एकमेकांना भेटायची इच्छा उरली नव्हती; किंवा कदाचित् त्यांनी एकमेकांना टाळलं होतं... असं म्हंटल तरी चालेल.त्याचं कारणही तसच होत.............

.................राज विजयला "बाय" म्हणून जो परत आत गेला तो कधीच बाहेर आला नव्हता. तो विजयलाच काय पण इतर कोणालाही कधीच भेटला नव्हता. 2 दिवस वाट बघुन विजयने माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. पण विजयला त्याबद्दल काहीच कळले नव्हते. उलट त्याला गप्प बसवण्यात आले होते. परत राजचे नावही घेऊ नये असे विजयला सांगण्यात आले होते आणि विजयदेखिल गप बसला होता.

आज अनेक वर्षांनी तिघे परत भेटले होते आणि फक्त तिघेच असल्याने त्यांच्यात राजचा विषय निघाला होता. "काय झालं असेल रे राजच?" प्रसादने बियरचा घोट घेत विजयला विचारलं होतं.


"ती संध्याकाळ मी आयुष्यभर मानत घोळवली आहे. आमची मीटिंग खरच खूप छान झाली होती. मी आणि राज खूप खुश होतो. दोघे बाहेर पडलो. मी प्रकाशला फोन लावला होता आणि त्याच्याशीच बोलत होतो, तेवढ्यात राजला परत आत बोलावलं. खर तर मीसुद्धा गेलो असतो आत. पण फक्त त्यालाच बोलावलं होतं. एकूणच तिथे बंदोबस्त आणि शिस्त खूप कडक होती. त्यामुळे त्याला बोलावलं म्हणजे फक्त तोच; हे मला माहित होतं. म्हणून मी त्याला आत जायला सांगितलं. त्यावर मी त्याची थोडी चेष्टा देखील केली. आणि तो आत गेला. संध्याकाळी तुम्हाला दोघांना मी घरी बोलावतो आहे अस मी त्याला सांगितलं होत. आणि मीटिंग आटपून माझ्या घरीच यायला सांगितल होत त्याला. त्यानंतर  गेली पस्तीस वर्ष मीसुद्धा फ़क्त हाच विचार करतो आहे की माझं नक्की कुठे आणि काय चुकलं." विजय म्हणाला.

प्रकाश आणि प्रसाद शांतपणे विजयचं बोलणं ऐकत होते. तिथेच एका बाजूला प्रसादचा सहा वर्षांचा नातू अमेय त्याच्या इलेक्ट्रोनिक गाडीने खेळत बसला होता. तो अचानक विजयकडे वळला आणि म्हणाला,"काय विजय आजोबा खोटं बोलता आहात तुम्ही. मी कुठे आणि काय चुकलो हा विचार करताना... सुटलो रे बाबा त्या मृत्युच्या सापळ्यातून... असा विचार देखील तुमच्या मनात येतोच नं? तुम्हाला माहित नाही राजचं  काय झालं; हे जितकं खरं आहे तितकंच हे देखील खर आहे नं की तुम्ही आत्तासुद्धा हाच विचार करता आहात की तुम्ही स्वःतच वजन वापरून परत राज आजोबांबरोबर आत नाही गेलात ते बरं झालं?" अमेयच बोलणं एकून विजयचा चेहेरा शॉक बसल्यासारखा झाला होता. प्रकाश आणि प्रसाद मात्र अवाक होऊन एकदा विजयकडे आणि एकदा अमेयकडे बघत होते. मात्र आपलं बोलणं संपवून लहानगा अमेय शांतपणे तिथून निघून गेला होता. त्याच्या गावीही नव्हतं की त्याने विजयच्या मनातले खोल दडून बसलेले विचार बोलून दाखवले होते.


विजय... प्रकाश... प्रसाद.... निःशब्द होऊन अमेय गेलेल्या दिशेने बघत बसले. तिघांच्याही मनात राजचे शब्द फिरत होते...........

राज चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वीच म्हणाला होता,"खरच सांगतो दोस्तानो, मी यावर खूप अभ्यास केला आहे आणि  जर मी केलेला अभ्यास खरा असेल तर पुढे येणारी पिढी उपजत हे आणि असेच काही गुण घेऊन येणार आहे. मानवी पिढी आता अजून प्रगत होते आहे. पूर्वी प्रत्येक घरात फोन नसायचा आणि आज लहान मुलांच्या हातात देखील मोबाईल असतो. त्या एवढ्याश्या माशीनमधून लोक संपूर्ण व्यवसाय सांभाळतात. तरीही अजूनही आपल्याला अनेक कामांसाठी अनेक इक्विपमेंट्स वापरावी लागतात. पण पुढे ही मशिन्स कमी होतणार आहेत. त्यांची गरजच पडणार नाही आहे. आपल्या मनातले विचार सामोरच्याला सांगणे किंवा एकादी गोष्ट हवी असल्यास विचार प्रवाहाने ती मिळवणे हे सर्व उपजतच असणार आहे पुढच्या पिढीकडे. त्यामुळे आज तुम्ही मला थांबवाल... पण मग तेव्हाच काय?"

------------------------------------------------------

Friday, March 22, 2019

डायरी (लघु कथा)

डायरी (लघु कथा)


शनिवार

तो....

नेहमीच्या सवयीने घरी येताना बागेतल्या नेहमीच्या वळणावर उभा होतो. त्या वळणावरचा काळ माझ्यासाठी गेली कित्तेक वर्ष तसाच थांबला आहे. आणि त्याची आता सवयही झाली आहे. रोज जस गणपति-मारुती स्त्रोत्र म्हणतो; तेव्हा पूर्ण तल्लीन होऊन जातो; तस रोज त्या वळणावर मी काही क्षणांसाठी फ़क्त माझा उरतो.

पण आजचा दिवस वेगळा आहे. आज ती दिसली. तोच जुना वड... तेच जुन बाक... आणि ती देखिल तशीच! काळजाचा ठोका चुकला. गडबडलो... आणि तिच्याशी बोलायची उफाळून आलेली उर्मि दाबून घरी आलो.

 माझ्या मनाचा भास? की सत्य?

 -----------

ती....

10 वर्ष पूर्ण झाली हे शहर सोडून. त्यानंतर कधी मागे वळून नाही पाहिल. पण कंपनीने या ब्रांचची जवाबदारी दिली आणि परत एकदा या शहरात आले.

 त्या वडाखालिसुद्धा गेले होते आज. तो वड आणि ते बाक तसंच आहे... बस! बाकी सगळच बदलल आहे.

जाऊ दे. काही गोष्टींचा विचार न केलेला बरा.

----------


रविवार

तो...


ती खरच होती तिथे काल संध्याकाळी की मला झालेला भास्? वर्षानु वर्षांच wishfull thinking अचानक समोर साकार झाल होत... की तिने मार्ग बदलला आहे? का कुणास ठाऊक... आज गेलोच नाही तिथे. गेल्या 10 वर्षात पहिल्यांदा!

----------------

ती....

आजदेखिल गेले होते त्या वडाखाली. काय शोधते आहे मी? काही वर्षांपूर्वी जे हट्टाने नाकारल ते? की आता फ़क्त आठवणी... ज्या मधल्या काळात धूसर झाल्या होत्या... त्यांना जागवते आहे? की काहीतरी घडाव अस वाटत आहे? की पुढच्या आयुष्याच्या काही निर्णयांच्या अगोदर जुन्या धूसर आठवणी संपूर्ण पुसून टाकल्या आहेत का हे स्वतःला तपासून खात्री करून घेते आहे?

आज परत कॉलेजचा annual day आठवतो आहे. रवि आणि माझी ओळख या annual day च्या निमित्तानेच झाली. लाजरा, अबोल रवि पण त्याचा आवाज एकत राहावा असा आणि हिंदी गाणी आणि त्यांच्या विषयीचा अभ्यास सुद्धा दंडगा. म्हणून तर साने सरांनी त्याला माझ्या बरोबर सूत्रसंचालन करायला सांगितल. आणि रविशी बोलल्यानंतर मला ही पटल की तो आणि मी धमाल उडवून देऊ. नाहीतर मी कधीच कोणालाही माझ्या बरोबर उभ केल नव्हत. झाल देखिल माझ्या एस्पेक्टशन्स प्रमाणे. अप्रतिम रंगला एनुअल डे आणि स्पेशली शेवटचा गायनाचा कार्यक्रम. आयुष्यात प्रत्येक गोष्ट कशी परफेक्ट असावी अस मला कायमच वाटत आल आहे. तसच झालं. अगदी दृष्ट लागण्यासारखा झाला होता कार्यक्रम... अगदी माझ्या मनासारखा. सर्वानी खूप कौतुक केल आमच दोघांच.

त्यानंतर खर तर इंजिनीअरिंगच शेवटच वर्ष असल्याने अभ्यासाला लागण अपेक्षित होत. पण माझ्या आणि रविच्या भेटी आणि गप्पा अचानक वाढल्या. अगोदर 15 दिवस एनुअल च्या निमित्ताने रोज एकत्रच होतो. आता कारण संपल होत आणि तरीही दोघांनाही भेटायची आणि बोलायची ओढ़ लागली होती.

माझे माझ्या करियरचे आणि पुढच्या आयुष्याचे प्लान्स पूर्ण ठरले होते. म्हणूनच मी कधीच इतर कुठल्याही गोष्टींकडे वळले नव्हते.पण रविचं नाव घेतलं की अलीकडे मन हळवं होत होतं. त्याच्या सानिध्यात कस निवांत वाटायच. मुळात आमचे जरी स्वभाव दोन टोकाचे असले तरी त्याच्या माझ्या आवडी-निवड़ी खूप सारख्या होत्या. वाचन, निसर्ग, साइकलिंग, स्विमिंग आणि मुख्य म्हणजे दोघांनाही अभ्यासाची असलेली आवड. त्यामुळे annual मुळे झालेली ओळख पुढे मैत्रीत बदलली.


मात्र या मैत्रिने ते ख़ास वळण कधी घेतल ते मला तेव्हा समजलच नाही. खूप आवडायचा रवि मला. म्हणूनच जेव्हा त्याने प्रपोज़ केल तेव्हा मी खूप खूप खुष झाले होते. I found my Mr. Right of life! अस वाटल होत मला. पण त्याने प्रपोजल बरोबर जे  सांगितल; ते ऐकून मी हबकलेच. इथेच याच शहरात त्याच्या जॉइंट फॅमिलीमधे राहायच? मी रविला खूप खूप समजावल. माझे करियर प्लान्स त्याला माहीत होते. माझा स्वभाव.. माझे विचार... घरातल मोकळ वातावरण... माझ्या आयुष्यातले सगळेच निर्णय मी स्वतःच घेते.... सगळ सगळ माहीत असूनही त्याने अशी इच्छा ठेवावी माझ्याकडून? कस शक्य होत ते मला?

जाऊ दे! काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत.... आपण स्विकारायला शिकल पाहिजे.

----------------------


बुधवार

तो....

गेले 3 दिवस त्याच वळणावर उभा आहे. मुद्दाम लवकर पोहोचतो आहे आणि जास्त वेळ थांबतो आहे. आज आईने विचारल देखिल... उशीर का होतो आहे अलीकडे म्हणून... मी डिस्टर्ब वाटलो तिला. आणि मी कायम जो विषय टाळतो; तेच नेमकं तिने विचारल. "रवि, ती भेटली की काय परत तुला?" आता काय सांगू आईला? ती माझ्या मनातून कधीच दूर गेली नव्हती मग परत भेटायचा प्रश्न येतोच कुठे? आणि प्रत्यक्ष म्हणायच तर मीच गोंधळून गेलो आहे. शनिवारी मी तिला खरच पाहिल का? गेले 3 दिवस अपेक्षेने उभा आहे पण ती परत नाही दिसली... म्हणजे भासच असावा...

ती सोडून गेली त्यावेळी देखिल असेच भास् नव्हते का होत. का केल तिने अस? आमचे स्वभाव दोन टोकाचे होते हे मान्य. पण आवडी-निवडी तर किती सारख्या होत्या. तिला वाचायला आवडायच... कित्ती भटकलो होतो आम्ही दोघे... शहरात आणि शाहराबाहेर देखिल. ती कुठेही कधीही यायची माझ्याबरोबर. कधी तिच्या वडिलांनी अडवलं नाही तिला. आईने हरकत घेण्याचा प्रश्नच नव्हता... कारण तिच्या लहानपणीच तिची आई देवाघरी गेली होती.

 त्या वेळी फ़क्त एकदाच भेटले होते तिचे वडील मला; पण तेव्हाच त्यानी मला सांगितल होत की त्यांचा त्यांच्या मुलीवर आणि तिच्या निर्णयांवर पूर्ण विश्वास होता. मी तिला लग्नासाठी विचारल होत त्या अगोदर मी तिच्या वडिलांना भेटलो होतो. त्यांच्या घरातल मोकळ वातावरण आणि आमच्या घरातल थोड़ जुन्या विचारांचा पगडा असलेल वातावरण हे तिच्यापेक्षा तिच्या वडिलांना समजेल आणि ते तिला समजावतील अस वाटल होत मला. त्यांना माहीत होत की त्यांची लेक माझ्यावर खूप प्रेम करते; पण तरीही त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितल की ती जो निर्णय घेईल तो त्यांना मान्य असेल. ते तिला काही समजावायला किंवा ती घेईल त्या निर्णयात काही बदलायला जाणार नाहीत.


का नाही समजावल त्यांनी त्यांच्या लेकिला? माझी घालमेल... तिच्या दूर जाण्याने होणा-या यातना त्यांना कधी समजल्याच् नाही का? की ती माझ्यात कधी गुंतलीच नव्हती? आणि ते त्यांना माहित होत? आजही मी फोन केला की खूप छान बोलतात ते माझ्याशी. पण मग त्यावेळी त्यांनी असा पवित्रा का घेतला होता?

 मला मान्य आहे माझ्या आई वडिलांनी खूपच स्वच्छ आणि ठाम पवित्रा घेतला त्यावेळी. पण तिने देखिल अज्जिब्बात एकल नाही. प्रेमाखातर तरी तिने थोड़ पडत घ्यायला हव होत न!  मी नंतर सावकाश आई-बाबांना समजावल असतच न. पण तिने मला वेळच् दिला नाही. एक घाव दोन तुकडे असाच स्वभाव होता तिचा कायम.... पहिल्यापासूनच! आणि म्हणूनच जेव्हा मी तिला सांगितल की आपण आई-बाबांना हळूहळू समजाऊ निदान तोपर्यंत तरी त्यांच्या बरोबर इथे राहु.. तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला. तिने कायमच मला तिची भविष्याची स्वप्न सांगितली होती. तिला परदेशात जायच होत; स्वतःच्या जीवावर! आणि म्हणूनच वडिलांची आर्थिक परिस्थिति जेमतेम आहे हे ओळखून तिने खूप मेहेनत घेतली होती शिक्षणात. कायम 1st class मिळवला. कायम स्कॉलरशिप्स मिळवल्या. सगळ सगळ मला मान्य.. पण मग करीयर म्हणजे आयुष्याच सर्वस्व कस असू शकत? आणि लग्नानंतर मी आई-बाबांची समजूत काढल्यावर त्यांनी पाठवलच असत न आम्हाला? पैशाचा प्रश्न कधी नव्हताच. का नाही तिला हे पटल कधी?



मी आजही तिची वाट पाहतो आहे... आजही बाबा ऑफिसमधे पोहोचायच्या अगोदर जाऊन मी तिचे फेसबुक अकौंट बघतो... तिचे ब्लॉग्स... तिचा यशाचा आलेख रोज पाहतो आहे. म्हणूनच तर गेल्या आठवद्यातल्या तिच्या 'back to old memories' या स्टेटसने आणि शनिवारच्या भासामुळे मी अस्वस्थ आहे.

भास्? की.....?

------------------

ती....


गेले 3 दिवस मान वर करायला वेळ मिळत नव्हता. रोज रात्रि 11 वाजून जात आहेत. बाबांना सांगितल थांबू नका जेवायला पण ते एकत नाहीत. तू किती दिवस असशील सांगता येत नाही. डिनरच्या निमित्ताने तरी भेटतेस अस म्हणून हट्टाने थांबतात. पण बर आहे... त्यामुळे तरी ऑफिस मधून निघता येत.

आज मात्र बाबांनी गुगली टाकला. "पुढे काय ठरवल आहेस बेटा?" त्यांच्या या प्रश्नाने थोड़ी गड़बडले. काही कळलच नाही अस दाखवत 'अगोदर ऑफिस सेट तर होऊ दे; मग इथेच राहायच की कंपनी परत बोस्टन ला बोलावते ते पाहू.' अस भलतच उत्तर देऊन मी विषय टाळला. बाबांना कळल. ते काहीच बोलले नाहीत. तस ते कधीच काहीच बोललेले नाहीत मला. पण मला माहीत आहे ते नक्की परत हा विषय काढणार. आजवर त्यानी कधीच माझा कुठलाही निर्णय खोडला नाही. पण अलीकडे त्यांच् वय झाल आहे आणि माझ्या भविष्याची... भविष्याची पेक्षा माझ्या लग्नाची काळजी त्यांना आहे; हे मला कळत आहे.


लग्न! आज परत एकदा त्या भुतकाळातल्या आठवणी जाग्या झाल्यात. मी रविला नाही म्हणाले आणि घरी आले. खूप खूप रडले होते त्या दिवशी बाबांच्या कुशीत शिरून. ज्याच्यावर मनापासून प्रेम केल... ज्याच्याबरोबर संपूर्ण आयुष्य जगायची स्वप्न बघितली होती; त्याला नाकारुन मी घरी परतले होते. बाबांनी आईच्या मायेने मला जवळ घेतल होत. मला कधीच आईची उणीव जाणवली नव्हती आणि त्यादिवशी देखिल मी त्यांच्या कुशीत हुंदके देऊन रडले होते. ते फ़क्त मला थोपटत राहिले.


मी पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जाणार हा निर्णय मी त्यांना सांगितला तेव्हा ते रविबद्दल विचारतील अस मला वाटल होत; पण त्यांनी नाही विचारल. बस! निर्णय घेतला आणि भराभर फॉर्म्स भरून मी तडकाफडकी बोस्टन युनिवर्सिटीमध्ये अडमिशन घेऊन निघून गेले. मी पोस्ट ग्रेजुएशन नंतर तिथेच जॉब घेतला आणि सिटीझनशिप देखिल; तरीही त्यांच काहीही म्हणण नव्हत. अधुन मधुन तेच येत राहिले मला भेटायला. पण आता मला येऊन जेमतेम 10 दिवस झाले आहेत आणि मला त्यांच्या डोळ्यात अनेक प्रश्न दिसत आहेत. फार दिवस बाबांना टाळता येणार नाही हे मला लक्षात आल आहे. पाहू!

 ----------------------

बाबा....

छोकरी खरच खूप मोठी झाली. आज पहिल्यांदा तिने सरळ प्रश्नाच् उत्तर सरळ दिल नाही. तिलाही समजल आहे माझा रोख कुठे होता; पण तिने विषय टाळला. ठिक आहे. बोलेन थोड्या दिवसानी. येऊन 10 दिवस झाले आहेत पण तिने अजुन रवि बद्दल एक अवाक्षर काढलेल नाही. काय असेल तिच्या मनात? आई निराळी पोर म्हणून कायम तिचे लाड केले. जसे आणि जितके शक्य होते तसे. पण पोर पण समजुतदार आहे. कधी कुठला हट्ट नाही केला. कदाचित तिच्या बापाचा आवाका तिने लहान वयातच जोखला होता. खूप लवकर स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागली. अगोदर थोड़ा त्रास झाला तिच्या अशा लवकर स्वतंत्र होण्याचा. पण ती तिच्या आईसारखी आहे; हे लक्षात आल आणि शांत झालो. तिचे विचार खूप स्वच्छ असतात हे मी बघितल आहे. मुख्य म्हणजे एकदा घेतलेला निर्णय ती कधीच बदलणार नाही; याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे मी कधी प्रयत्न देखिल केला नाही तिचे निर्णय बदलायचा. अर्थात तिने कधी चुकीचा मार्ग नाही घेतला... पण तरीही ज्या दिवशी ती रविला नकार देऊन घरी आली होती त्यादिवसशी तिला समजावायची खूप इच्छा झाली होती; की अस स्थळ शोधून सापडणार नाही. साठे इंडस्ट्रीजच नाव खूप मोठ आहे. तुला परदेशात जायचच आहे तर लग्नानंतर थोड्या दिवसांनी रविबरोबर जाशीलच... रविने मला मुद्दाम अगोदर भेटून हे सांगितल होत. पण मी माझ्या लेकीला चांगलच ओळखतो. तिच्या स्वाभिमानी स्वभावाला हे कधीच पटल नसत... आणि म्हणूनच ओठांपर्यंत आलेले शब्द गिळून मी तिला फ़क्त थोपटत राहिलो.


आज तिने तिला जे हव ते मिळवल आहे आणि त्याच समाधान तिच्या डोळ्यात दिसत आहे मला. पण या सगळ्या धावपळीत ती काहीतरी खूप महत्वाच् मिस करते आहे... अस माझ मत आहे. 

आजही रवि मला फोन करतो. कधीतरी भेटूनही जातो. सांगू का तिला की त्याने अजूनही लग्न केलेले नाही. तिची वाट पहातो आहे तो. काय आहे हिच्या मनात? एकटयाने संपूर्ण आयुष्य जगण अवघड असत. आप बिती तिला कशी समजाऊ... हम्... येत्या काही दिवसात बोलल पाहिजे परत एकदा.

--------------


शनिवार

ती...

आज खूप दिवसानी निवांत वेळ मिळाला आणि परत त्या बागेतल्या बाकावर जाऊन बसले. तेच जूने दिवस आठवत होते. आयुष्य किती वेगळ होत. त्यावेळी कितीतरी स्वप्न होती मनात. आज मी खरच समाधानी आहे. मी जे ठरवल होत ते मी मिळवल आहे.... स्वमेहिनतीने! काहीतरी सुटत गेल या धावपळीत... मान्य आहे! जर रविशी लग्न केल असत तर आज आहे त्यापेक्षा जास्त आरामाच आयुष्य असत. पण ते माझ नसत... ते आयुष्य मिसेस रवि साठेच असत. मला माझ्यातली 'मी' शोधायची होती. आज ती गवसली आहे. आज मी खूप खुप समाधानी आहे.

आज मी बाबांच्या प्रश्नाच उत्तर द्यायला तयार आहे! --

--------------------

तो....

ती तिच आहे... इथे आली आहे. कायमची असेल का? आज पाहिल तिला त्याच बाकावर! निवांत चणे खात बसली होती. माझा विचार करत असेल का ती कधीतरी? जाऊ का समोर तिच्या? सांगू का की मी अजूनही तिचीच वाट पहातो आहे?

त्यादिवशी मी तिला प्रपोज़ केल तेव्हा ती किती खुष होती. मला तर आभाळ दोन बोट उरल होत. पण मग जेव्हा मी तिला आई-बाबांची इच्छा सांगितली तेव्हा ती अगोदर एकदम गप्प झाली. आणि मग सतत तिचे प्लान्स सांगत आणि मला समजावत राहिली. अगदी मला राग येईपर्यंत.  मी काही तिला तिचे प्लान्स बदलायला सांगत नव्हतो. फ़क्त थोड्या दिवसांसाठी पुढे ढकलुया अस म्हणण होत माझ. पण तिने ठामपणे नाही म्हंटल. शेवटी 'रवि माझे विचार आणि प्लान्स माहीत असूनही तू अस बोलतो आहेस याचच वाईट वाटत;' अस म्हणून ती उठली आणि मी काही बोलायच्या आत निघुनही गेली. मी सुन्न होऊन बसलो. त्यानंतर ती कधीच भेटली नाही. मला माहीत होत तिने पुढच्या कोर्सचे पेपर्स फॉरवर्ड केले आहेत, पण ती इतक्या झटपट निर्णय घेईल आणि निघुन जाईल अस वाटल नाही. मी सावरून तिला भेटण्याचा-बोलण्याचा प्रयत्न केला तोवर ती निघुनही गेली होती.

तो दिवस आणि आज.... किती वेडापिसा झालो होतो मी तिच्यासाठी. ते depression चे दिवस आठवले तरी आजही अंगावर काटा येतो. आईचं सतत लग्नासाठी मागे लागण आणि माझ तिच्या आठवाणींमधे जगण.... पण मग डँड मधे पडले आणि त्यांनी स्पष्ट सांगितल की यापुढे रवि जोपर्यंत स्वतःहुन बोलत नाही तोपर्यंत त्याच लग्न हा विषय संपला.

आज 10 वर्ष झाली... पण त्यानंतर कधीच कोणीही मला माझ्या लग्नाबद्दल विचारल नाही आणि माझ्या मनात देखील तो विषय कधी आला नाही.


आज मात्र तिला बघितल आणि परत आशा पल्वलित झाल्या. आज बाबांना गाठलच्. ते म्हणाले आहेत की त्यांच्याही मनात तिच्याकडे तिच्या लग्नाचा विषय काढायचा अस आहे आणि ते आजच तिच्याशी बोलणार आहेत. त्यांनी मला उद्या संध्याकाळी बोलावल आहे.


देवा! बस ती हो म्हणू दे आता! Waiting for tomorrow evening...

-----------------------------

बाबा...

थोड़ी लवकर आली आज. म्हणाली जुन्या बागेत गेली होती. पण डिस्टर्ब नाही वाटली. उलट खुश होती. जेवताना मुद्दाम स्पष्ट लग्नाचा विषय काढला मी... तिने टाळाटाळ देखिल केली नाही. म्हणाली 'मला देखिल तुमच्याशी या विषयावर बोलायच आहे.  बाबा आता मी लग्नाला पूर्ण तयार आहे. मला मान्य आहे माझ्या बरोबरीच्या मुलींच्या पेक्षा माझ लग्न उशिरा होईल पण मला त्यात वावग काहीच वाटत नाही. कारण आज मी पूर्ण समाधानी आहे. माझ्या मनात माझ करियर कस असाव याच चित्र होत, ते पूर्ण झाल आहे... त्यामुळे आता मी लग्न करून संसारात रामणार आहे.'

 तिला मी उद्या घरीच थांबायला संगीतल आहे. तिने कारण नाही विचारल. म्हणाली 'मलाही तुमच्याशी बोलायच आहे.' कदाचित् परत जाण्याचा विचार असेल का? कोण जाणे! मात्र उद्या रवि येणार आहे संध्याकाळी. मीच बोलावल आहे त्याला. दोघांनी समोर बसून बोलाव अशी माझी इच्छा आहे. तिला मात्र तो येतो आहे याची कल्पना नाही दिलेली.  तिचा बाप असूनही तिच्या मनातल ओळखण मला कधी जमलच नाही. पण तिने घरी थांबायच कबूल केल आहे. बाकी उद्याच् उद्या पाहू.

-------------------


............रविवार संध्याकाळ. 4 ची वेळ. बाबा थोड़े अस्वस्थ होते. तिचा स्पष्ट आणि थोडा हट्टी स्वभाव ते जाणून होते. त्यामुळे अचानक रविला तिच्या समोर उभ करून ते चूक नाही न करत आहेत या विचारात ते सकाळपासून होते. पण आज तिचा मूड सकाळपासूनच छान होता. कित्ती तरी दिवसानी ती आज गाणं गुणगुणत होती. कितीतरी दिवसानी संपूर्ण स्वयंपाक तिने स्वतः केला होता आणि आत्तासुद्धा तिची स्वयंपाक घरात काहीतरी खुडबुड़ चालु होती. त्यामुळे तेसुद्धा relaxed मूड मधे होते.


"बाबा" अचानक तिने हाक मारली. "मी कोथिंबीर वड़ी केली आहे. येऊन बघता का नीट जमली आहे का?" बाबा तिच्या उत्साही आवाजाने खुश झाले. स्वयंपाक घराकडे जातच होते तेवढ्यात बेल वाजली.

"मी बघते. तुम्ही चव बघा न." ती म्हणाली. आणि बाबा काही म्हणायच्या आत तिने दरवाजा उघडला. दारात रवि होता. बाबा आत जाताना थबकले. ती देखिल स्तब्ध झाली होती. रविची नजर तिच्या   चेह-यावर खिळली होती. ती मिनीटभराने भानावर आली आणि दारातून बाजूला झाली; रविला आत येण्यासाठी मार्ग मोकळा व्हावा म्हणून.


बाबांनी रविचे हसून स्वागत केले. "ये रवि. कितीतरी दिवसानी दिसतो आहेस. कसा आहेस?" " मी मजेत बाबा." रवि म्हणाला आणि सोफ्यावर बसला. ती देखिल तिथेच सॉफ्यावर बसली होती. शांत हसरा चेहेरा होता तिचा. सगळेच थोड़े अवघडले होते. शेवटी तिनेच पेच सोडवला. "कसा आहेस रवि? कितीतरी वर्षानी दिसतो आहेस.  काय करतोस आजकाल?" तिने विचारले. "जगतो आहे! तुला माहित आहेच की बाबांचा गारमेंट्स एक्स्पोर्टचा व्यवसाय होता. मी त्याना त्यांच्या ऑफिस जातो. आता वयापरत्वे त्याना झेपत नाही. त्यामुळे आता तर संपूर्ण business मिच बघतो. ते फ़क्त सकाळी 2 तास येतात. माझ राहुदे ग! तू सांग... बाकी तू कशी आहेस?" त्याने उत्तर दिल.



"Am on the top of the world. Have achieved everything that i had dreamed. हव तस शिक्षण आणि मग best नोकरी. Am really very happy and satisfied. Now is the time to take a break and think of future in a different way."

 
"मग काय ठरवल आहेस बेटा? खर सांगू मीच आज रविला बोलावल आहे. तुमच्याशी दोघांशी एकाच वेळी बोलावे अस ठरवल आहे मी." तिचा उत्साही आवाज एकून बाबा म्हणाले.


तिने मात्र आश्चर्य वाटून विचारल; "बाबा, आमच्याशी एकाच वेळी बोलाण्यासारख काय आहे?"


रविने तिच्याकडे चमकून पाहिल. "मी अजुन लग्न नाही केलेल. तुझे फेसबुक updates, तुझे ब्लॉग्स, तुझ्या achievements... तुझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मी उत्सुकतेने रोज वाचतो. आणि तरीही तुला अस वाटत नाही की आपण दोघांनी एकदा भेटल पाहिजे? बोलल पाहिजे?" रविने काकुळतिला येऊन विचारल.


"आता इतक्या वर्षांनंतर आपण का भेटाव? का बोलाव? आणि तू आता तुझ्या आयुष्यात काय करतोस ते मला का माहीत असेल?" तिने रविकडे वळुन विचारल.


"अग! का म्हणून काय विचारतेस. माझ तुझ्यावर प्रेम होत आणि अजूनही आहे. अगदी मनापासून. तू अचानक मला न सांगता निघुन गेलीस. नंतर कोणताही contact देखिल ठेवला नाहीस. मला मान्य आहे की तुझे प्लान्स खूप क्लियर होते. तुला परदेशात शिकायला जायच होत. तिथे नोकरी करून स्वतःला सिद्ध करायच होत. अग, पण लग्नानंतर देखील आपण जाऊ शकलो असतोच न. दोघेही एकत्र. मला हे देखिल मान्य आहे की माझे आई-वडील तेव्हा तयार नव्हते माझ्या परदेशात जाण्याला. त्यांना घर सांभाळणारी, सुंदर, सुशिक्षित अशी त्यांच्या नियमांमध्ये बसणारी सुन हवी होती.   ते थोड़े जुन्या विचारांचे आहेत मान्य; पण दुष्ट नाहीत. मी त्यांना समजावल असत. आणि एक-दोन वर्षात ते तयार देखिल झाले असते. पण तू मला थोड़ा देखिल वेळ दिला नाहीस. अचानक निघुन गेलीस मला न सांगता. परत कधी वळूनही बघितल नाहीस तू. प्रेम केल होतस न माझ्यावर? मग कधी वाटल नाही मी जगलो की मेलो ते बघाव? तू अशी कशी अचानक निघुन गेलीस? मी तुझ्यासाठी वेडापिसा झालो. सुरवातीला आईने माझ लग्न लावायचा खूप प्रयत्न केला. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. मी एवढ्यात लग्न करणार नाही; हा विषय परत काढायचा नाही.. अस मी घरात ठामपणे सांगितल. तुला माहीत नाही, but i faced serious depression syndromes too. Was on medication for nearly a year. सतत तुझाच विचार. M. B. A. करणार होतो, पण अभ्यासात कधी लक्षच लागल नाही. मला विश्वास होता की तू परत येशिल एक दिवस. माझी तपश्चर्या नक्की फळाला येईल एक दिवस. मी नेहमी तुझ्या बाबांच्या contact मधे होतो. कायम फ़क्त तुझ्याबदद्लच प्रश्न! ती कशी आहे? कधी येणार आहे? माझ्याबद्दल कधी काही विचारते का? गेली 10 वर्ष फ़क्त आणि फ़क्त तुझाच विचार केला आहे. श्वास घेतो म्हणून जगतो आहे एवढच. ध्यानिमनि फ़क्त तूच असतेस. business सेट आहे... तो नीट चालवतो आहे... त्यामुळे बाबा काही म्हणत नाहीत. पण आता तू आली आहेस.. तूच म्हणालीस आत्ता की तुला आयुष्यात जे achieve करायच होत ते केल आहेस. मग आता तर आपल्या लग्नाला काही प्रोब्लेम नाही न? तू हो म्हणालीस तर मी आई-बाबांशी बोलेन. ते आता नाही म्हणणार नाहीत. आता बस हो म्हण आणि माझ्या 10 वर्षांच्या तपश्च् र्येच फळ माझ्या पदरात घाल." रवि काकुळतीला येऊन बोलत होता, तो थांबला.


 ती स्तब्ध होती. शांत होती. कोणतीही reaction तिच्या चेहे-यावर नव्हती.

"बेटा, बोल न काहीतरी. तो बोलतो आहे ते खर आहे. तो खरच गेली 10 वर्ष तुझी वाट पाहतो आहे. आठवद्यातुन एकदा तरी तो मला फोन करून तुझ्याबद्दल बोलायचा.. सगळ मान्य आहे मला. पण मला तुझ्या मनात काय आहे ते जाणून घ्यायच आहे. आजही जरी मीच त्याला बोलावलं असलं तरी मी कायम तुझ्या निर्णयात तूझ्या बरोबर आहे, हा विश्वास ठेव." बाबा तिच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाले.

तिच्या डोळ्यात टचकन पाणि उभ राहील. "खूप त्रास दिला न बाबा मी तुम्हाला? खरच तुम्ही कायम माझ्या निर्णयात माझ्या बाजूने ठाम उभे राहिलात." ती म्हणाली.

 "बेटा, तुझी आईसुद्धा अशीच ठाम होती ग. विचारी, करियर घडवायची इच्छा असलेली, शांत! माझ शिक्षण ... मी आयुष्यभर केलेली नोकरी... सर्वकाही तिच्यामुळे. माझे असे काही आयुष्याचे प्लान्स नव्हतेच्. तिच्यावर प्रेम केल बस. तिने मात्र सगळ कस छान ठरवून केल होत. तू 14 वर्षाची असताना.. तुझ्या नववित.. ती अचानक साधा ताप येण्याच्या निमित्ताने गेली; आणि मी मोडून पडलो. त्यानंतर मी अनेक वर्ष माझ्याच दुःखात होतो. आणि तू ठामपणे तुझ्या आयुष्याचा दोर धरून पुढे जात होतिस. मी तुझ्या पाठीशी उभा आहे अस आपल् म्हणायच. खर तर मी तुझ्या आईसारखा... तुझ्यासारखा strong minded नाही, हे सत्य आहे. त्यामुळे ती गेली आणि मी मनाने कमकुवत झालो. मग तुझ्यात तुझ्या आईला शोधत राहिलो. म्हणूनच कदाचित् रविमधे मी स्वतःला बघतो ग. आणि म्हणूनच मी जरी आज रविला इथे बोलावल असल तरी तू जो निर्णय घेशील तो योग्य असेल असा माझा विश्वास आहे. Am always with u बेटा." बाबा म्हणाले.


ती बाबांचा हात हातात घेऊन हसली. ती काहीतरी बोलणार तेवढ्यात बेल वाजली. तिने पुढे होऊन दार उघडल. दारात एक स्मार्ट दिसणारा पुरुष उभा होता.


"हाय! come in भास्कर." आणि ती बाबांकडे वळत म्हणाली, "बाबा हा तुमचा होणारा जावई आहे."


"आज मी मुद्दाम त्याला इथे बोलावल आहे. मला खात्री होती की तुम्ही माझ्या लग्नाचा विषय काढणार आज. म्हणूनच मी भास्करला बोलावून घेतल. मात्र रवि येईल अस वाटल नव्हत. रवि... मला माहीत आहे तुझ्या मनात खूप प्रश्न असतील. आज तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देते. माझ खरच तुझ्यावर खूप प्रेम होत. पण त्याहुनही जास्त मला माझा आत्मसन्मान मोठा होता आणि आहे. तू म्हणतोस की तु तुझ्या आई-वडीलांना समजावल असतस आणि ते तयार देखील झाले असते आपल्या लग्नाला आणि कदाचित् पुढे आपण परदेशात जाऊ त्या गोष्टीला, मान्य! ते दुष्ट आहेत अस माझ म्हणण मुळीच नाही. पण मग त्यांनी आयुष्यभर मला हे जाणवून दिल असत की केवळ त्यांच्यामुळे मी माझ स्वप्न पूर्ण करू शकले. माझ्यासारख्या स्वाभिमानी मुलीला हे कधीच मान्य झाल नसत. अरे मी माझ संपूर्ण शिक्षण स्कोलरशिप्स मिळवून केल; माझ्या बाबांना देखील कधी माझ्या शिक्षणाचा खर्च करू दिला नाही; मग मी तुझ्या पालकांकडून काही घेतल असत का? आणि माझा हा independent स्वभाव तुझ्या घरातल्याना झेपला असता का? मी तुला न सांगता गेले अस म्हणतो आहेस. पण तुला चांगलच माहीत होत की मी पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जाणार होते आणि त्याची तयारी करत होते. तू मला प्रपोज़ करायची घाई केलीस. आणि त्यात तू तुझ्या अटी सांगितल्यास. मी तुला त्यावेळी देखील म्हणाले होते की आपण अजुन थांबू आणि विचार करुया. पण तू एकायलाच तयार नव्हतास. माझ तुझ्यावर प्रेम होत रवि, पण प्रेमाचा हक्क आणि possessiveness यातला फरक तुला कधी समजलाच नाही. आणि आजही तू मला तुझी तपश्चर्या... तुझ वाट पहाण.. सांगतो आहेस; यातही मला मी कुठेच् दिसत नाही. जर आजही आपण लग्न केलं तर  गेली १० वर्ष तुझ माझ्यासाठी थांबण... तुझ दुःख.... या pressure खाली मी जगायच? मला हे अमान्य आहे. तो माझा स्वभाव नाही रवि. Infact रवि तुला मी कधीच समजले नाही. तू कायम तुझ्या विश्वात जगलास. तू म्हणतोस मी तुझ विश्व आहे; but the fact according to me is,am just a small part of ur world.



 हा भास्कर. तुला आठवतो का हा? आपल्या कॉलेज मधे नव्हता. पण प्रत्येक डिबेट कॉम्पिटिशन मधे त्याच्या कॉलेज मधून असायचा. आम्ही अनेकदा गप्पा मारायचो. नंतर कॉलेज संपल, आणि मी परदेशात शिक्षणासाठी गेले तरी आमचा संपर्क काही ना काही कारणांनी होता. कायम एकमेकांचे updates आम्ही एकमेकांना द्यायचो. गप्पा व्हायच्या त्यादेखिल करियर आणि काम आणि अशा विषयांच्या. आणि मग माझ्या लक्षात येत गेल की जरी मला तू आवड़ायचास आणि आपल्या आवडी-निवडी सारख्या होत्या तरी आपले स्वभाव खूप वेगळे होते. पण आयुष्य जगताना स्वभाव जुळण जास्त आवश्यक असत हे मला भास्करला भेटल्यानंतर लक्षात आल. आपल्या दोघांच्या आयुष्याकडून अपेक्षा देखिल वेगळ्या होत्या. मी तुला दोष नाही देत रवि. कस जगाव हां प्रत्येकाचा आपापला choice असतो. तू खूप भावनिक आहेस, मी तुझ्यासाखी नाही. U always made me feel special. But that feeling never remains forever. Eventually आपले खूप खटके उड़ाले असते. I respect that u really waited for me. But according to me... आयुष्य कधी थांबत नाही. also life can't b lived under any pressure. आपल कधी जमल नसत रवि. Am really very sorry for everything. पण मी शिक्षणासाठी हा देश सोडला तेव्हा सर्वच मागे सोडून गेले. आणि तू अजूनही 10 वर्षांपूर्वीच्या दिवसांमधे अडकला आहेस. इथेच आपल्या दोघांच्या स्वभावातला फरक लक्षात येतो.  I see my  future with Bhaskar."

ती बोलायची थांबली आणि रवि भानावर आला. सर्वकाही समजल्या सारख त्याने मान हलवली.

"तुझ खर आहे. We always lived in different worlds. I agree." तो म्हणाला.

  "All the best Bhaskar. U have got the world's best lady in ur life. All the best to both of u." रवीने तिच्याकडे बघितल. पण तिच लक्ष भास्करकडे होत. तिच्या चेहेऱ्यावर शांत आणि समाधानी हसू होत. ते पाहून रविच्या लक्षात आल की ती कधीच त्याच्यातून बाहेर पडली होती. त्याने स्वतःला अडकवून... बांधून ठेवाल होत. मात्र आज त्याने सत्य स्वीकारलं आणि आपली पावल बाहेरच्या दिशेने वाळवली.



------------------समाप्त-------------------------







































Friday, March 15, 2019

माझा... आणि शोधलास तर कदाचित तुझा देखील.... कृष्ण!!!

माझा... आणि शोधलास तर कदाचित तुझा देखील.... कृष्ण!!!

असंच कधीतरी एकदा एक कविता whatsapp वर वाचली. फारच भावस्पर्शी आहे ही कविता. वाचली आणि अगदी खोल मनाला स्पर्शून गेली; आणि मग मनात घोळत राहिली. वाटलं या कवितेनंतर मनात आलेले विचार तुमच्यासोबत शेअर केलेच पाहिजेत....

(कविता.....

कृष्ण भेटायलाच पाहिजे. 
आयुष्यात प्रत्येक वळणावर 
कृष्ण भेटायलाच पाहिजे.

मनातलं बोलायला, 
लिहिलेलं वाचायला, 
रेखाटलेलं दाखवायला, 
अन् कधी गायलेलं ऐकवायला ....
हक्काचा सवंगडी पाहिजे
आणि म्हणूनच प्रत्येकाला 
एक कृष्ण भेटायलाच पाहिजे

मुळात नात्यांच्या पलिकडचे 
भावबंध जोडणारा
एक हक्काचा  सवंगडी पाहिजे.....
लहानपणापासून जपलेल्या 
अनेक नात्यांचीही  वयं वाढत असतात
त्या नात्यांचे काळाप्रमाणे 
अर्थ बदलंत असतात
तस्संच....ते...पूर्वीचं...निर्व्याज.... अबोध नातं 
पुन्हा जमायला पाहिजे
आणि याकरताच 
आयुष्यात कृष्ण भेटायला पाहिजे......

"तो" कृष्ण "ती" ही  असु शकते. 
आपल्या मनातलं  सारं जाणणारी ती असते
कधीही आपलं खोलवर मन 
रीतं करता आलं पाहिजे
असा हक्काचा...विश्वासाचा 
कृष्ण भेटलाच पाहिजे........

आपल्या आजुबाजुला  तो सापडेलंच
असं नाही
जोडीदारामध्ये तो गवसेलंच
असंही नाही
कुणीतरी जवळचं कृष्ण असण्याची भावनाही
उर्मी देणारी पाहिजे
मात्र कधी मनाचा पेंद्या 
झाला नाही पाहिजे....

सुंदर विचारांची 
रम्य मुरली छेडणारा तो......
आयुष्यात प्रत्येकाला 
कृष्ण भेटला पाहिजे.

खरंच त्या मुरलीधराकडे 
मुरली होती का?
की अनेकांच्या मनात रुंजणारी 
त्याची ती आश्वस्त  मैत्री होती का?
त्याच्या अस्तित्वाने
अनेक मनांतून उमटत असाव्या आनंदलहरी
आणि त्यांचीच ऐकु येत असावी
रुंजणारी मुरली...

अनेकांच्या मनामधे मुरणारा 
तो मुरलीमनोहर 
प्रत्येकाला भेटायला पाहिजे
आयुष्यात प्रत्येक वळणावर 
कृष्ण भेटायला पाहिजे......


कवी कोण आहे ते मला माहित नाही)


ही कविता वाचली आणि वाटलं.....उगाचंच आपणच निर्माण केलेल्या बांधनांमधून मन मोकळं करून थोडं इकडे-तिकडे बघितलंत तर असा कृष्ण तुम्हाला भेटू शकतो. तसं बघितलं तर तो त्याच्या संसारात सुखी असतो आणि तुम्ही तुमच्या... आणि मग कधीतरी अचानक एखाद्या नाजूक, भावनिक वळणावर किंवा अगदी सहज मारलेल्या गापांमधून कसाही पण तो तुम्हाला भेटतो... त्याच्या सोबत तुम्ही बोलत असता... हसत असता... तुमच्या नकळत आनंदी होत असता... पण तरीही तुम्हाला माहीत नसतच की हाच तुमचा कृष्ण आहे. आतून काहीतरी वेगळं जाणवत असत... जे तुमच तुम्हाला देखील सांगता येत नाही...... मग तुमच्याही नकळत तुम्ही त्याच्याकडे व्यक्त व्हायला लागता. हे व्यक्त होणं कायमच भावनिक असत असं नाही; किंवा सांसारिक-व्यवहारिक अडचणी तुम्ही सांगता अस तर मुळीच नाही. उलट त्याच्याकडे/तिच्याकडे (तुमच्या त्या कृष्णकडे) तुम्ही तुमच्या अमूर्त कल्पना.... अवघड वाटणारी तरीही मनात जपलेली स्वप्न मनमोकळेपणी सांगायला लागता.

नदी किनारी पाण्यात पाय सोडून समोरच्या हिरवळीकडे बघत बसावं; किंवा सूर्यास्ताच्या किरणासोबत सागर लाटातून पाय भिजवत चालावं; अगदी एखादा मस्त पेग हातात घोळवत बर्फाळ डोंगरमाथ्याच्या सोनपिवळ्या रंगाकडे टकलावून बघावं.... उबदार सूर्य किरणात लांबवर पसरलेल्या कुरणातून चालावं... अशी एरवी कधीही न बघितलेली स्वप्न देखील मग तुम्ही बघायला लागता. लता-आशा-रफी-नौशाद.... ज्यांचं नाव घ्याल ते तुमच्या मोबाईलच्या किंवा टेपच्या तबकडीवर मग तुम्हाला रिझवायला लागतात. तो/ती (तुमचा तो कृष्ण) तुमच्या नकळत तुमचा जीवाभावाचा सखा होऊन जातो/जाते. अगदी कवितेत म्हंटल्यासारखं. मग कधीतरी तो देखील व्यक्त व्हायला लागतो तुमच्याकडे.... त्याच्या आणि तुमच्याही नकळत. तो तुमचा कृष्ण होतो आणि तुम्ही त्याचे कृष्ण होता....


काय आहे हा कृष्ण? माझ्या मते ते एक निर्व्याज नातं आहे! शब्दांच्या पलीकडचं! तुमचं सर्वस्वाने व्यक्त होणं समजतो तो... आणि त्याच्या अव्यक्त भावना तुम्हाला देखील समजायला लागतात. कवितेत म्हंटल्या प्रमाणे, या नात्यात अपेक्षा नसतात; त्यामुळे अपेक्षाभंग नसतो.... म्हणूनच कदाचित मग दुःखाला जागा नसते. मान-अपमान नसतो. एक निर्व्याजता असते... भेटता-भेटता राहिलं म्हणून नाराजी नसते... आणि भेटल्यानंतर वेळेची मोजणी नसते! असं नातं समजून घेण्याची आणि ते जपण्याची मन:शक्ती ज्यांच्याकडे असते; ते स्वतः कृष्ण होतात आणि कोणालातरी कृष्ण करतात...

कुणीतरी जवळचं कृष्ण असण्याची भावनाही
उर्मी देणारी पाहिजे
मात्र कधी मनाचा पेंद्या 
झाला नाही पाहिजे....


या चार ओळी खूपच महत्वाच्या वाटतात मला. हे जे कृष्ण रुपी नातं आहे हे आयुष्यभर कृष्ण रूपातच जपता आलं पाहिजे; हे समजून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कृष्ण असतो आणि असावाच... पण त्याच्यावर अवलंबून नसलं पाहिजे आपण. एक ऊर्जा... उर्मी... देण्याइतकच असतं हे कृष्णनातं! श्रीकृष्णाच्या मागे आंधळेपणाने फिरणारा आणि तो म्हणेल ते मान्य करणारा पेंद्या आपण होऊ दिला नाही पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर हे नातं तुमच्या जीवनात अडचण होऊ न देणं ही तुमची जवाबदारी असते.


असा कृष्ण आयुष्यात आला की मग आयुष्य सोपं होऊन जातं. मग लहानपणापासून ज्या नात्यांच्या बरोबरीने आपण मोठे होत असतो आणि अपेक्षा वाढवत असतो... त्या अपेक्षाच थांबतात. आयुष्य कसं सोपं वाटायला लागत. जवाबदाऱ्यांना आणि बंधनांना कंटाळलेले आपण त्या कृष्णाच्या सानिध्यातल्या काही क्षणात स्वतःला परत उर्जित करून घेतो.... मग रोजच्या जवाबदऱ्या आणि नात्यांमधील बंधनं जड वाटत नाहीत. एकटे असताना देखील आपण लहानपणी पाहायचो तशी छानशी स्वप्न परत बघायला लागतो.... त्याच्याकडे व्यक्त करण्यासाठी काहीतरी हवं या भावनेतून मनाला रोजच्या त्याच त्या रुटीनमधून मोकळे करतो..... थोडक्यात आपणच आपलं आयुष्य सप्तरंगी करून टाकतो........  म्हणूनच.............

अनेकांच्या मनामधे मुरणारा 
तो मुरलीमनोहर; 
प्रत्येकाला भेटायला पाहिजे!
आयुष्यात प्रत्येक वळणावर  कृष्ण भेटायला पाहिजे......

खरच शोधून तर बघा असा कृष्ण. कदाचित तुमच्या आजूबाजूलाच तुमचीच वाट बघत थांबला असेल तो. थोडं बघा की शोधून... कदाचित तो देखील तुम्हालाच शोधत असेल.

-------------



Friday, March 8, 2019

हृदयाची हाक!

आज महिला दिन.... ही कवीता प्रत्येक 'तिच्या'साठी; जी जन्मापासून मुलगी, पत्नी, उत्तम गृहिणी, माता, करियर सांभाळणारी अशी सशक्त स्त्री असते.... तिच्यात एक छानशी मैत्रीण देखील असते. या सगळ्या भूमिका ती आपणहून मनापासून जपते... enjoy करते... सुखावते.... आणि मग ती हे विसरते की तिच्यातल्या स्त्रीत्वाला तिच्या हृदयाच्या साथीने मोकळा श्वास घ्यायचा असतो.... आपला छंद... आपली हौस... नकळतपणे फक्त स्वतःसाठी बघितलेलं एखादं स्वप्न जोपासायच असतं....

हृदयाची हाक!

ऐ चल.... थोडसं भटकू...
थोड़ी गाणी ऐकू...
थोड़े हसू... थोड़े आसू..
हातात हात घालून एकमेकांचे पुसू;

थोड लांब पळु...
एखादा डोंगर चढू;
दमल्यानंतर मात्र...
हिरवळीत सोबतिन बसु!

मग... गेलेल्या वर्षांच्या....
मनातल्या आठवणी....
अनुभवलेले क्षण....
विश्वासाच्या किनारी;

ऐ चल समुद्र किना-यातुन...
तळव्याना स्पर्श करणा-या...
नाजुक लाट़ातुन...
तारे मोजु वाळुच्या कुशीत पडून

ऐ....चल न....
ते सगळ सगळ करू
आणि मग?
हातात हात अन् खुप सारं हसू!!!

Friday, March 1, 2019

औरंगाबाद येथील वेरुळ लेणी


औरंगाबाद येथील वेरुळ लेणी

औरंगाबाद जवळील अजंता आणि वेरुळ लेणी पाहावीत हे स्वप्न मनात गेली अनेक वर्ष जपलं होतं. कोणाची तरी सोबत असली की गप्पा खूप होतात आणि मग आपलं मन इच्छा असूनही आपल्याशी बोलत नाही; असं मला नेहेमी वाटतं. म्हणूनच मला ही लेणी एकटीने पहायची होती. बहुतेक माझी ही दुर्दम्य इच्छा ईश्वर चरणी रुजू झाली; आणि अगदी अचानक औरंगाबादला जाण्याचा योग आला. त्यात देखिल एकटीने लेणी बघू शकणार होते. हे म्हणजे "आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन!'' अस झालं. पण एकच दिवस मिळणार होता. वेरुळ लेणी औरंगाबादपासून साधारण तीस किलोमीटरवर आहेत; मात्र अजंता खूपच लांब आहेत. म्हणून मग केवळ वेरुळ लेणी बघायचं असं ठरवलं.

वेरुळ लेणी पाहाताना मनात अनेक विचार येत होते. कसं असेल त्या काळातलं समाज जीवन? अनेक ठिकाणी असा उल्लेख सापडतो की प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी व मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. म्हणजे या वेरुळ लेण्यांना बांधणाऱ्या लोकांना/कलाकारांना राजाश्रय, धर्माश्रय आणि लोकाश्रय नक्कीच असेल. म्हणून तर कदाचित वर्षानु वर्ष आणि पिढ्यांनपिढ्या या लेण्यांमधील अप्रतिम कोरीव काम करणे शक्य झाले असेल. वेरुळ लेणी साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेली लेणी आहेत. इतकी वर्षे या लेण्यांमधील काम चालू होते; म्हणजे इथे कायम स्वरूपी राहाणारे कलाकार असतीलच न. त्यांचे रोजचे व्यवहार कसे असतील?

 मी उजवीकडून म्हणजे पहिल्या लेण्यांपासून सुरवात केली. साधारण एक ते नऊ लेणी सारखीच आहेत आतून. साधारण एक मोठा सभा मंडप आणि दोन्ही बाजूनी लहान खोल्या अशी यांची रचना आहे. मात्र आतलं दगडातील कोरीव काम अप्रतिम सुंदर आहे. या गुंफा बघताना माझ्या मनात सारखं येत होतं की कोणत्याही हवामानात सहज राहाता येईल अशी या खोल्यांची रचना वाटते आहे. सभागृहात आणि त्याला लागून असणाऱ्या त्या खोल्यांमध्ये आतवर सूर्यप्रकाश पोहोचणे शक्यच नाही. पण आत जाऊन बघितले तर छानसे कोनाडे आहेत. कदाचित त्याकाळात या कोनाड्यांमध्ये मोठे तेल दिवे ठेवत असतील. या खोल्यांच्या भिंती इतक्या जाड आहेत की उन्हाचा किंवा थंडीचा तडाखा आत जाणवू नये. मनात आलं कोण वापरत असेल या खोल्या त्या काळात? या सुरवातीच्या काही गुंफा या वयोवृद्धांसाठी असाव्यात का? सुखी सांसारिक आयुष्य जगून झाल्यानंतर आणि आपल्या सर्व जवाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर विधात्याच्या प्रार्थनेत उरलेले आयुष्य व्यतीत करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी तर या सुरवातीच्या गुंफा नसतील ना? पुढच्या काही लेण्यांमध्ये एक-दोन-तीन मजली लेणी आहेत. तिथे पाण्याचे जवळच आणि उत्तम साठे आहेत. अनेक खण असलेल्या एक किंवा दोन गुंफा आहेत. खण असलेल्या गुंफा म्हणजे स्वायंपाक घर असेल का? धान्य साठवण्यासाठी बांधलेल्या खणाचे स्वयंपाकघर! सामोरच मोठे सभागृह! त्याचा उपयोग भोजनालय म्हणून होत असेल का? मधील काही मजली गुंफा या राहण्यासाठी असाव्यात कदाचित. अशा प्रकारच्या स्थापत्या मधून एकत्रित कुटुंबाची कल्पना मनात येते. महिला कदाचित एकत्रितपणे सर्वच कुटुंबांचा स्वयंपाक करत असतील. पुरुष मंडळी गुंफांमधून खोदकाम करून सुंदर कोरीव शिल्प तयार करत असतील. लाहान मुले शिल्प कला आणि त्या अनुषंगाने धर्म ज्ञान शिकत असतील; आणि मोठे होऊन पुढील गुंफांमधील शिल्प लेणी करत असतील.

वानप्रस्थाश्रम स्वीकारलेली वृद्ध मंडळी पहिल्या काही गुंफांमधून राहात असतील आणि दिवसातील अधिक वेळ प्रार्थना करणयात घालवत असतील. मधल्या दोन-तीन मजली गुंफांमधून सर्वसाधरण लोक; म्हणजे कलाकार/शिल्पकार आपल्या कुटुंबा सोबत राहात असतील. तेच या वृद्धांना रोजचा आहार देत असतील आणि त्याबदल्यात ही मंडळी त्यांच्या मुलांना शिक्षण देत असतील. मुळात वानप्रस्थाश्रम स्वीकारलेली ही मंडळी कलाकार/शिल्पाकर असल्याने ती मंडळी धर्माच्या ज्ञाना बरोबरच पुढील पिढीला शिल्प कला शिकवत असतील. तरुण वयात शिल्प कोरताना आपण काय निर्माण करतो आहोत याचा देखील ते अभ्यास करत असावेत. परिणामी ते धर्म ज्ञान शिकत गेले असतील; जे ते पुढच्या पिढीला शिकवत असतील. प्राप्त झालेल्या राजाश्रयामुळे आणि येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरू-व्यापाऱ्यांमुळे देखील त्यांचे रोजचे जीवनमान सुकर होत असेल. मुळात आयुष्याकडून फार मोठ्या अपेक्षा नसल्याने देखील तिथे राहणारी कुटुंब शेकडो वर्षे सुखाने राहिली असतील.

अशाप्रकारे कदाचित अनेक पिढ्या तिथेच कायमस्वरूपी राहिल्या; संसार थाटले; लेणी कोरत असताना त्याच लेण्यांचा वापर केला; म्हणूनच शेकडो वर्षे या गुंफांमधील लेण्यांची निर्मिती होऊ शकली असेल. नाहीतर यासर्व लेण्यांमधील काम करण्यासाठी आज-कालच्या माथाडी कामगारांप्रमाणे रोज त्याठिकाणी ये-जा करणे तसे अवघडच. त्याकाळी त्यापरिसरतील मानवी जीवन कदाचित असे असेल; असा एक विचार मनात येत होता ही लेणी पाहताना. तसाच अजून एक विचार मनात सतत येत होता.

या लेण्यांची रचना १२ बौद्ध (लेणे क्र. १ - १२), १७ हिंदू (लेणे क्र. १३ - २९) आणि ५ जैन (लेणे क्र. ३० - ३४) अशी आहे; आणि जरी या सर्व लेण्यांना तीन धर्मात विभागले असले आणि यांचे खोदकाम विविध काळात झाले असले तरी सर्व लेण्यांमध्ये एक समान सूत्र आहे; असे वाटते. एक ते चौतीस लेण्यांमधील काही शिल्पाकृती सारख्याच आहेत. साहाव्या गुंफेत दगडात कोरलेली सरस्वतीची मूर्ती आहे. तशीच काहीशी मूर्ती जैन लेण्यांमध्ये देखील दिसते. त्याचबरोबर अजूनही काही देवींच्या मूर्ती आहेत सहाव्या गुंफेत. कदाचित त्या मूर्ती नद्यांच्या असाव्यात. कारण त्या मूर्तीच्या रचनेत वाहत्या पाण्याची कल्पना केली आहे. हिंदू आणि जैन धर्मात देखील जल हे जीवन आहे आणि नद्यांना देवत्व दिलेले आहे. नवव्या लेण्यांमध्ये तारा देवीची मूर्ती आहे. जिला बौद्ध धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. तसेच जैन धर्मात देखील तिला पुजले जाते; असे म्हणतात. अर्थात त्या धर्मात तिचे नाव वेगळे असावे. त्यासोबत अनेक प्राण्यांची शिल्प देखील सर्वच गुंफांमधून दिसतात. अकरावे लेणे दोन मजली असून या लेण्यांमध्ये अनेक हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत. गणपती, महिषासुर मर्दिनी, यक्ष या मूर्ती सहज ओळखता येतात. इतक्या वर्षांनंतर देखील त्यांचे सौंदर्य डोळे दिपवते. बारावी लेणी तीन मजली आहे. मला हे लेणं खूपच विशेष वाटलं; कारण या गुंफेतील मूर्तींमध्ये खुप विविधता आहे. इथे सुखी कुटुंबाची प्रतिमा आहे; आई-वडील-मुलगा-मुलगी असे एकत्र दिसतात. तसेच दोन स्त्रिया एकक पुरुष आणि 4 मुले असे 'कुटुंब' देखील मला दिसले. म्हणजे त्याकाळात देखील साधारण कुटुंब; द्विभार्या पद्धती होती का? अशी कुटुंब या लेण्यांमध्ये शिल्प कोरत राहात होती का?

 हिंदू लेणी तेराव्या गुंफेपासून सुरू होतात. तेराव्या लेण्यामध्ये विशेष असे काही वाटले नाही. मात्र चौदाव्या लेण्यांमध्ये अतिचर्चित रावण कैलास पर्वत उचतलतानाचे आणि कैलासावर शंकर-पार्वती बसलेले असल्याचे शिल्प पाहायला मिळते. इथे गणेश मूर्ती देखील आहे. इतर अनेक देवतांच्या मूर्ती देखील आहेत पण ते नक्की कोणते देव आहेत ते ओळखता येत नाही. मात्र गम्मत म्हणजे ही न ओळखता येणाऱ्या देवांची शिल्प बौद्ध गुंफांमध्ये देखील होती. जैन लेण्यांमधून चौमुखी/त्रिमुखी देव-देवतांची शिल्प दिसतात. अशी दैवत तर हिंदू धर्मात अनादी-अनंत काळापासून आहेतच की. म्हणजे त्या काळात सर्वच धर्मांची आराध्य दैवतं दिसायला काही प्रमाणात सारखीच तर नव्हती?

माझ्या मनात येणारी एक संकल्पना म्हणून फक्त सांगते; की ही लेणी असंख्य वर्षे बनत होती; कदाचित शिल्पकार सहकुटुंब तिथेच राहून संसार करत या लेण्यांची निर्मिती करत होते. नवीन पिढीला धर्म आणि कला या दोन्हीचे ज्ञान देत होते. या धर्म ज्ञात स्वधर्माची माहिती असूनही त्यांच्यात एक समधर्मीय सुसूत्रता होती कदाचित. बौद्ध, हिंदू किंवा जैन कोणताही धर्म असो; या सर्व धर्मांमधून एकच विचार प्रेरणा होती का.... शांत संसार सुख घेऊन त्याच बरोबर परोपकार करत आणि इष्ट देवतांची आराधना करत शेवटी सर्व जवाबदाऱ्या संपवून परमात्म्याशी (निसर्गाशी) तादम्य पावणे हा मानव धर्म आहे.

वरती मांडलेले मुद्दे हे माझ्या मनात सतत घोळत होते वेरुळ लेणी पाहाताना. ते तुमच्या समोर मांडले आहेत. त्याव्यतिरिक्त आंतरजालावरून (interrnet) मिळवलेली माहिती देखील इथे देते आहे.

वेरुळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यातले गाव पाषाणातील कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. ही लेणी वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात निर्माण झाली. ही लेणी त्यांच्यातील स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. सुमारे एक हजार वर्षेपर्यंत या ठिकाणी बौद्धांचे एक महत्त्वाचे केंद्र होते असे मानले जाते. इ.स. १९८३ साली वेरूळ लेणी 'युनेस्को जागतिक वारसा स्थळ' म्हणून घोषित केली गेली. सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेली अशी ही एकूण ३४ लेणी आहेत. यामध्ये १२ बौद्ध (लेणे क्र. १ - १२), १७ हिंदू (लेणे क्र. १३ - २९) आणि ५ जैन (लेणे क्र. ३० - ३४) अशी रचना आहे.

पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात निर्माण झालेल्या या लेणीतील प्रसिद्ध अशा कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण (प्रथम) याच्या काळात झालेली आहे. या लेण्यापैकी १० व्या लेण्यात मागच्या भिंतीवर राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याचा शिलालेख आहे. इसवी सनाच्या ७५३ ते ७५७ या काळातील हा लेख आहे. 12 व्या कैलास लेणे निर्माण करणारा राजा कृष्ण (पहिला) हा दंतीदुर्ग राजाचा काका होता. कैलास लेण्याची निर्मिती ही इसवी सनाच्या ७५७ ते ७८३ या काळातील असावी असे यावरून समजते. कैलास लेणे हे स्थापत्य आणि शिल्पकलेचा मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा अतिउच्च नमुना आहे असे म्हणता येईल. ‘आधी कळस, मग पाया’ ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे. हे लेणे एका सलग पाषाणखंडात कोरलेलं अतिशय भव्य आणि विस्तारित मोठे लेणे आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेले आहे. कैलासावर शिव-पार्वती बसलेले असून रावण खालच्या बाजूने कैलास पर्वत उचलून हलवितो आहे अशा शिल्पाच्या येथील अंकनामुळे या लेण्याला "कैलास" लेणे असे म्हटले जाते. पुरातत्त्वाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक कै. म. के. ढवळीकर यांनी या लेण्याबद्दल नोंदविले आहे की या मंदिराचा महत्वाचा भाग कृष्ण (पहिला) या राजाच्या काळात पूर्ण झाला असावा. गोत्झ या अभ्यासकाने नोंदविल्याप्रमाणे मंदिराचा उर्वरित भाग नंतरच्या काळात पूर्ण झाला असण्याची शक्यता आहे. दक्षिणेत प्रचलित असलेल्या तत्कालीन मंदिर स्थापत्य शैलीपेक्षा या मंदिराची प्रक्रिया निराळी आहे. पटडक्क्ल (कर्नाटक) येथील विरुपाक्ष मंदिर आणि कांची येथील कैलास मंदिराच्या स्थापत्य शैलीचा प्रभाव या मंदिरावर जाणवतो.

दहाव्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहेत. त्यांत खिडक्या आहेत. या ठिकाणी चैत्य विहार आणि स्तूप असून स्तूपात बैठी बुद्धमूर्ती आहे. या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. 11 वी लेणी म्हणजे तिमजली मठ आहे.

दहाव्या आणि बाराव्या लेण्यांमध्ये बुद्धा इतकीच महत्वाची अशी एक स्त्रिमूर्ति आहे. महायान तिबेटी बौद्ध धर्माच्या संदर्भातील आर्य तारा ही एक स्त्री बोधिसत्व आहे. वज्रयानबौद्ध धर्मात ही स्त्री बुद्धाच्या रूपात आहे. ती "मुक्तीची जननी" म्हणून मान्य आहे तसेच कार्य व उपलब्धीच्या क्षेत्रात यशाची द्योतक आहे. हिला जपानमध्ये 'तारा बोसत्सु' व चिनी बौद्ध धर्मात 'डुओलुओ पुसा' म्हटले जाते.

जैन धर्मीयांची क्र. ३० ते ३४ अशी एकूण पाच गुहा-मंदिरे येथे आहेत. ३२ ची गुंफा जैनधर्मीयांचा प्रभाव असलेली आहे. या लेण्याच्या छतावर सुंदर कमळाकृती कोरलेली आहे. सिंहारूढ यक्षीचे शिल्पही या गुंफेत आहे. ही गुंफाही दुमजली आहे. त्यात इंद्रसभा, छोटा कैलास आणि जगन्नाथ सभा पाहावयास मिळतात. तत्कालीन बौद्ध-हिंदू लेणी शिल्पकलेचा या जैन लेण्यांवर प्रभाव जाणवतो. या लेण्यांतील छोटा कैलास शिल्पाकृती म्हणजे हिंदू कैलासाची छोटी प्रतिकृती असावी असे वाटते. ही लेणी एक मजलीच असून ती आतून एकमेकांना जोडली आहेत. विशाल आकाराचा हत्ती आणि कलापूर्ण स्तंभासह सूक्ष्म कलाकुसर, आकर्षक तोरणे अशी शिल्पकला येथे पहायला मिळते. २३ वे जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांची विशाल मूर्ती हे येथील वैशिष्ट्य आहे. याशिवाय इंद्र, गोमटेश्वर यांची शिल्पेही येथे पाहावयास मिळतात.

.... आणि आता मी पाहिलेलं शिल्प सौंदर्य देखील सांगते.

दहाव्या लेण्यातील शिल्प काहीसे वेगळे आहेत. दहाव्या गुंफेच्या छताची रचना अजून वेगळी आहे. छतावर लाकडातील साप कोरलेले आहेत आणि जणूकाही ते खांबांना आधार देत आहेत असे वाटते. स्तूपाच्या मध्यभागी बसलेल्या अवस्थेतली बुद्धाची मूर्ती आहे. या स्तुपाला अर्ध वर्तुळाकार झरोके देखील आहेत. पण ते अत्यंत लहान आहेत; म्हणजे घोड्याच्या नालाच्या आकाराचे दिसतात. अकरावे लेणे दोन मजली तर बारावे लेणे तीन मजली आहे. लेण्याच्या दोन्ही बाजूने प्रचंड मोठा पाणी साठा करता येईल अशी सोय आहे. एक बाजूच्या गुंफेत मोठे कप्पे आढळतात. मात्र ते कप्पे राहाण्याइतके मोठे नाहीत. बारावे लेणे हे बौद्ध धर्मीय शेवटचे लेणे.

हिंदू धर्माची ओळख वाटावीत अशी लेणी तेरा पासून सुरू होतात. यातील पंधराव्या लेण्यामध्ये पहिल्या मजल्यावर एक मोठे दालन आहे आणि दुसऱ्या मजल्यावर हिंदू देवी-देवतांची शिल्प आहेत. इथे शिव-पार्वतीच्या विवाह प्रसंगाचे अप्रतिम असे शिल्प आहे. इथे मात्र गणपती बरोबर कार्तिकेय आणि त्याचे वाहन मोर यांचे शिल्प पाहायला मिळते. यानंतर सर्वत जास्त चर्चित आणि माहिती असलेले सोळाव्या गुंफेतील लेणे म्हणजे आधी कळस आणि मग पाया अशा प्रकारे बांधले गेलेले शिवमंदीर. या मंदिराचे वास्तुशिल्प द्राविड वास्तुशिल्पां सारखे आहे. इथे सर्वच देवाचे शिल्प आणि सर्वच पुराण कथांचे चित्रण आहे. ब्रम्हा, विष्णू, महेश, नरसिंव्ह, कालिया मर्दन कथा, विष्णूचे दशावतार, मारुतीच्या खांद्यावरील राम (रामायणातील काही प्रसंगांचे चित्रण), शेषशायी विष्णू आणि नाभीतून जन्मलेले बृहस्पती, महाभारतातील विराट कृष्णरुप (महाभारतातील काही प्रसंगांचे चित्रण), गणपतीच्या विविध कलाकृती. सर्व रस वर्णन करणारी शिल्प (शृंगार, हास्य, करून, रौद्र, वीर, भयानक, भिभत्स, अद्भुत आणि शांत) सर्व कला सांगणारी शिल्प, सूर-असुर कथा, यक्ष कथा..... हे लेणे पाहाणे ही एक पर्वणीच आहे. कमळ पुष्पच्या विविध रचनांमधील शिल्प देखील पाहण्यासारखी आहेत. या लेण्यातून बाहेर पडताना मनात आले की एकसंघ एकाच शिळेतून आधी कळस आणि मग पाया असे शिव मंदिर कसे काय बनवले गेले असेल. विचार करत या गुंफेच्या थोडे दार उभी होते आणि मनात आले; की कदाचित अगोदर बाजूच्या गुंफा/शिल्पाकृती कोरण्यात आल्या असतील. त्यामुळे सहाजीकच मध्ये एकच एक मोठी शिळा तयार झाली असेल; आणि मग या शिळेचे विचारपूर्वक मंदिरात रूपांतर झाले असेल. सतराव्या लेण्याच्या प्रवेशद्वारावर ब्रम्हा आणि विष्णूच्या शिल्पाकृति आहेत. खांबांवर गणपती, दुर्गा यांची शिल्प आहेत; आणि आत शिवलिंग आहे. अठरा, एकोणीस आणि वीस या लेण्यांमध्ये विविधे शिल्प आहेत. परंतु सोळाव्या लेण्यातील शिल्पाकृतीच परत एकदा इथे दिसतात. मात्र एकवविसावे लेणे पाहण्यासारखे आहे. अप्रतिम कोरिव काम आहे इथे. अनेक ठिकाणी पुरातन रंगात रंगवलेले छत दिसते. आता जरी रंग उडून गेले असले तरीही काही ठिकाणचा लाल रंग लक्षात येतोच. इथे एका शिल्पात एक स्त्री मगरीवर स्वार झालेली दिसते. नंतर चौकशी करता मला कळले की ते गंगा नदीचे शिल्प आहेत. हे शिल्प मुद्दाम पहाण्यासारखे आहे. कार्तिकेय, पार्वतीचा हात धरलेले शिव, आणि समोर नृत्य करताना शिवाचे अनुयायी अशी देखील शिल्पाकृती बघायला मिळते. बावीसाव्या लेण्यांतदेखील अनेक देव-देवतांची शिल्प आहेत. ज्यांना शिल्प पाहण्याची आवड आहे त्यांनी या लेण्याला जरूर भेट दिली पाहिजे. मात्र या सर्व शिल्पाकृती तस पाहिलं तर सोळा ते एकवीस या लेण्यातील शिल्पांसारख्याच आहेत. तेविसाव्या लेण्यात ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांची त्रिमूर्ती कोरलेली आहे. चोविसाव्या लेण्यात शिव मंदिर आहे. पंचविसावे लेणे म्हणजे एक विशाल गुंफा आहे. इथे कुबेराची वाटावी अशी मूर्ती आहे. छतावर सूर्य आणि त्याचे सात घोडे असा रथ चित्रित आहे. सव्वीसाव्या लेण्यातील द्वारपाल म्हणून स्त्रि प्रतिमा आहेत. हे एकच वैशिष्टय मला या लेण्यात जाणवले. सत्ताविसाव्या लेण्यात परत एकदा महिषासुर मर्दिनी, ब्रम्हा, विषु, महेश, श्रीकृष्ण आणि अशाच अनेक देवांच्या शिल्पाकृती आहेत. अठ्ठविसाव्याा लेण्यांमध्ये शिवलिंग आणि अष्टभुजा दुर्गेची शिल्पाकृती आहे. माहिती घेतली तेव्हा समजले की पावसाळ्यात या लेण्याच्या वरून मोठा धबधबा वाहातो. एकोणतीसावे लेणे खूपच मोठे आहे. इथे जवळ जवळ 26 खांब आहेत; ज्यावर अप्रतिम कोरीव काम आहे. इथे परत एकदा बुद्ध लेण्यासारखे काम दिसून येते. या लेण्याचे वैशिष्टय मला असे जाणवले की या लेण्यात आतवर सूर्य प्रकाश येत होता. इथे शिव एका असुराला मारत आहे आणि पार्वती हास्य मुद्रेने बाजूला उभी आहे अशी शिल्पाकृती दिसते. त्याशिवाय इथे शिवाची नटराज मूर्ती आणि पद्मासन घातलेली मूर्ती देखील पाहायला मिळते. या लेण्याच्या प्रवेशद्वारावर स्त्री आणि पुरुष असे दोघेही द्वारपाल दाखवले आहेत. इथे हिंदू लेणी संपतात.

 एकतीसव्याा लेण्यांपासून जैन धर्मीय शिल्प दिसायला लागतात. या लेण्यात माहावीर, पार्श्वनाथ आणि गोमटेश्वराच्या मूर्ती आहेत. बत्तीसावी लेणी तीन मजली आहे. पहिल्या मजल्यावर एक मंदिर आहे; ज्याला दोन बाजूने प्रवेशद्वार आहे. इथल्या महाविराच्या शिल्पाचे वैशिष्टय हे की ते चौमुखी आहे. दुसऱ्या मजल्यावर कलात्मक शिल्प आहेत. या गुंफेत गणपतीची शिल्पाकृती राजसिंव्हासनावर बसलेली दाखवली आहे. या लेण्याचे छत पाहण्यासारखे आहे. एक सुंदर कमळाच्या फुलांचे कोरीव काम संपूर्ण छतावर केलेले आहे. तेहेत्तीसावे लेणे दोन मजली आहे. इथे दुसऱ्या मजल्यावर एकच एक मोठे दालन आहे आणि त्याच्या भिंतीवर महाविराच्या शिल्पाकृती आहे. खालच्या मजल्यावर सुंदर कोरीव कामाचे खांब आहेत. चौतीसाव्या आणि शेवटच्या लेण्यामध्ये माहावीर, पार्श्वनाथ आणि गोमटेश्वच्या शिल्पाकृती आहेत. तीस ते चौतीस ही लेणी आतून एकमेकांना जोडलेली आहेत. त्यामुळे तिसाव्या लेण्यांतून आत जाऊन शेवटच्या लेण्यातून तुम्ही बाहेर पडू शकता. ही खरच सुंदर कल्पना आहे; अस मला वाटतं.


बौद्ध गुंफांप्रमाणेच हिंदू धर्मीय गुंफामध्ये देखील राहाण्याची सोय असावी अशी रचना नजरेस पडते. जैन धर्मीय गुंफांमध्ये सुरवातीला सुखी कुटुंबाच्या शिल्प कला पाहायला मिळतात. यातून त्याकाळातील कोणताही धर्म संसार सुखाच्या विरोधात होता असे वाटत नाही. अद्भुत स्थापत्य आणि शिल्पाकृती मधून शांत, सुखी सांसारिक आयुष्य जगण्याचा संदेश देत असतील का ही लेणी? परमात्मा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून तुमच्या मनातील दैवत किंवा तोच तो अगाध निसर्ग असे तर सांगायचे नसेल या सर्व लेण्यांना? सांसारिक जवाबदऱ्या संपल्या नंतर परमार्थ मार्ग स्वीकारून मृत्यू प्राप्त होई पर्यंत धर्म संमत शांत जीवन जगावे; असं तर नसतील न सांगत ही शिल्प?

खरंच यातून आजच्या काळातील मनुष्य काहीच शिकणार नाही का? 







तीन मजली मठ





ही गणेशमूर्ती शिव मंदिरामधली आहे. अशाच प्रकारची मूर्ती अनेक लेण्यांमधून दिसते



खजुराहोच्या शिल्पांप्रमाणे या लेंण्यांमधून देखील अशी शिल्पे