Friday, February 22, 2019

लिव इन आणि समाजाची मानसिकता  

  लिव इन आणि समाजाची मानसिकता

 "अग ते माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहायला आलेलं जोडपं आहे ना त्याचं लग्न नाही झालेलं."

 "काय सांगतेस काय? तुला बऱ्या असल्या बातम्या मिळतात."

 "अग, काल मी घरी येत असताना ती भेटली जिन्यात. मी विचारलं तुझा नवरा काय करतो? म्हणाली तो माझा नवरा नाही काही. आम्ही अजून लग्न नाही केलेलं असंच राहातो. कमाल आहे न? काय बोलणार यावर? मी आपली गपचूप घरात शिरले माझ्या."

"काय सांगतेस? स्पष्ट सांगितलं तिने?"

 दोन मैत्रिणी बागेत आपापल्या मुलांना खेळायला सोडून गप्पा मारत बसल्या होत्या. मी नेमकी त्यांच्या बाजूच्याच बाकावर बसले होते त्यामुळे त्यांचा संवाद एकू आला आणि मनात विचार आला.. हे लिव इन नातं इतक का बरं अस्वीकारार्ह्य असावं अजूनही? या दोघींची मुलं लहान आहेत म्हणजे या देखील जेमतेम पस्तिशीच्या आतल्या असणार. ती नवीन आलेली शेजारीण देखील साधारण तिशीच्या वयातली असू शकते. म्हणजे तसा वयात फार फरक नसावा. मग तरीही तिची इच्छा म्हणून ती अशी लिव इन मध्ये राहात असावी; असा विचार या का नाही करत. थोडे नकारार्थी विचार का आहेत यांचे?

समजा एक मुलगा आणि एक मुलगी यांनी लग्न न करता रहायचे ठरवले तर त्या बाबतीत एकूणच समाजाची सर्वसाधारणपणे नकारार्थी भावना का असावी? अर्थात त्यांच्या या निर्णयात त्या मुलांच्या पालकांचे मत खूपच महत्वाचे असणार. पण मग तो त्या दोन कुटुंबांचा प्रश्न ठरतो. अनेक सोसायटीजमध्ये लिव इन नातं असणाऱ्या जोडप्याला घर भाड्याने द्यायला कोणी तयार नसते. अस का असावं? जर ते जोडपं सभ्यता पूर्वक रहात असेल तर त्या जोडप्याचा लग्न झालं आहे किंवा नाही याविषयी इतरांना हरकत घेण्यासारखं काय असाव?

 एक महितीतली घटना... एका मुलीने प्रेम केलं आणि वर्षभरातच लग्न केलं. तीन वर्ष झाली असतील-नसतील आणि तिचं आणि तिच्या नवऱ्याच पटेनास झालं. अगदीच सतत आणि टोकाची भांडण व्हायला लागली तेव्हा तिने घटस्फोट घेण्याचं ठरवलं. तशी ती चांगल्या कंपनीमध्ये काम करत होती आणि भरपूर पगार देखील होता. पण खुद्द तिच्या आई-वडिलांनी सांगितलं अग अस एकदम घटस्फोट नको घेउस. सुधरेल तो हळूहळू. लग्न केलं आहेस न? मग थोडं सहन करायला शिक. तिच्या निर्णयात तिला फक्त मानसिक बळ हवं होत. पण तिच्या बाजूने तेव्हा कोणीच उभं राहिलं नाही. पुढे मुलगा झाला त्यांना. आज तिच्या लग्नाला चौदा वर्ष झाली आहेत. दहा वर्षाचा मुलगा आहे. ती आणि नवरा एकमेकांशी अजिबात बोलत नाहीत. मात्र केवळ लग्न केलं आहे म्हणून एका छताखाली रहातात. ती अनेकदा म्हणते की जर त्याच्या बरोबर लग्नाअगोदर राहात असते तर कदाचित लग्नच नसत केलं अशा माणसाबरोबर.

 एक अजून घटना... दोघ मुलगा-मुलगी एकमेकांच्या प्रेमात होते. मुलगी अजून शिकत होती त्यामुळे त्यांना तितक्यात लग्न करायचं नव्हतं. मात्र कुटुंबाच्या आग्रहामुळे दोघांनी लग्न केलं. शिक्षण चालू असेपर्यंत मुलीने पुढे काय करायचं याचा फारसा विचार केला नव्हता. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी तिने एका जाहिरात कंपनीत इंटरव्ह्यू देला आणि तिला खूप चांगली नोकरी मिळाली. तिचा performance इतका चांगला होता की तिला तिच्या कंपनीने वरची पोस्ट दिली. मात्र त्यासाठी तिला दुसऱ्या शहरात जावं लागणार होतं. मात्र सासरच्यांनी नाही म्हंटल त्यामुळे तिला ती ऑफर घेता आली नाही.

 अशा काही घटना पहिल्या किंवा ऐकल्या की वाटत की लग्नाअगोदर एकमेकांना समजून घेण कितीतरी महत्वाचं असत. दोघांचे स्वभाव, आवडी-निवडी, पुढील करीयर प्लान्स सगळ समजून घेण आवश्यक असत. केवळ 'आवडला/आवडली' म्हणून लग्न करून टाकलं; हे अलीकडच्या काळात थोडं अवघड आहे.

अर्थात इतकं प्रक्टीकल असावं का? हा देखील चर्चेचा विषय होऊ शकतो. लिव इन मधील मुला-मुलीच्या पालकांचा याबद्दल विचार/मत देखील महत्वाच आहे. मुख्य म्हणजे लिव इन म्हणजे 'लग्न न करता एकत्र राहाण'. मग जर पुढे पटलं नाही तर मग दुसरा पार्टनर का? एखादं जोडपं लिव्ह इन पार्टनर्स नसतील कदाचित पण प्रेम असेल एकमेकांवर आणि प्रेमाच्या आणा-भाका झाल्या; कदाचित दोघे शरीराने जवळ आले आणि समजा पुढे नाही पटलं म्हणून त्यांनी विचारपूर्वक नातं संपवलं; त्यानंतर त्या दोघांनाही दुसरे कोणीतरी मिळाले; तर केवळ ते दोघे एका घरात लिव्ह इन सारखे राहात नव्हते म्हणून त्यांचे 'break up' मान्य कारायचे का? अर्थात हा विचार देखील व्हायला हवा की पटेपर्यंत किती लिव्ह इन नाती जोडायची आणि तोडायची? अनेक प्रश्न उभे राहू शकतात. अलीकडे pre-marrage councelling देखील असतंच.

पण  'अलीकडची पिढी' अस म्हंटल तरी  या मुलांना देखील मन-भावना असतातच न. त्यामुळे जर पालकांनी थोडा विश्वास दाखवला तर ही मुलं सतत धरसोड वृत्तीने नक्कीच वागणार नाहीत. त्यामुळे लिव इन नात्याकडे नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये अस मला वाटत.

अर्थात लिव्ह इन नात्याची चर्चा करताना एकूण सूर समाज व्यवस्था, भारतीय संस्कृती याला धक्का लागेल; आपल्याकडे स्वीकारणार नाहीत; असा असतो.

समाज व्यवस्था म्हणजे नक्की काय? कोणी ठरवली ती? जर समाज व्यवस्था आहेच तर त्या नियमांनुसार extra marital affairs देखील चूक आहेत. मग अशा affairs चे प्रमाण अलीकडे वाढले आहे अशी ही एक चर्चा आहेच. मात्र तो त्या दोन व्यक्तींचा वयक्तिक प्रश्न आहे; अस म्हणून आपण बाजूला जातोच न? हे so called affair संपले की आपल्या संसाराकडे ते परत येतात; आणि त्यांचे येणे तिने/त्याने स्वीकारावे असं आपलाच समाज म्हणतो न? सुबह का भुला.... अग अग म्हशी... अशा म्हणी यावरूनच पडल्या असतील का? मग तसेच काहीसे लिव्ह इन नात्याकडे पाहिले तर काय हरकत आहे?

समाज व्यवस्थे आंतर्गत घटस्फोट देखील फार स्वीकारार्हय नाहीत. तरीही घटस्फोटाचे प्रमाण किती टक्के आहे हे सर्वश्रुत आहेच. जर आपल्या जवळच्या नात्यातली मुलगी दुर्दैवाने(?) घटस्फोटित असली तर आपण तिच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करत नाही का? जर तिला पहिल्या लग्नापासून मुल असेल तर त्या बाळाचा विचार मुलाचे किंवा मुलीचे आई वडील करत नाहीत का?

म्हणजे आपण लिव इनचा विचार करून एकत्र राहणाऱ्या तरुणांना नावं ठेवताना वरच्या दोन मुद्यांचा विचार करायला हवा का? बरं, अशा नात्यात राहणाऱ्या मुलांमध्ये भावनिक गुंतवणूक नसतेच... ते केवळ सोय किंवा काही ठराविक गरज म्हणून आणि खर्चात भाग उचलणारा सोबती मिळतो म्हणून एकत्र राहतात असा विचार जर आपण केला तर तो त्यांच्यावर अन्याय नाही का? लग्नाबाहेरील संबंधांकडे दुर्लक्ष करणे, घटस्फोट चालेल, remarrage चालेल पण लिव इन नाते समाजाला घातक आहे; हा विचार कितपत योग्य आहे? ज्यांना लिव इन मध्ये राहायचे आहे त्यांच्या पालकांनी जर या मुलांशी संवाद साधला तर त्यांची ही निवड योग्य आहे की नाही हे त्यांना ठरवणे सोपे जाईल. त्यातून होणारे मानसिक त्रास कमी होतील.

त्याव्यतिरिक्त...... तरुण वय हे बंडखोर असते. जर आपण त्यांचे विचार सरसकट नाकारले तर ते बंड करतात. आपणही आपल्या तारुण्यात काही ना काही बंड केलेच असते/ किंवा निदान विचार तरी केलेला असतोच न? जर आपण या नवीन पिढीशी मोकळेपणी बोलण्याची भावना मनात ठेवली; आणि त्यांच्या मनात तसाच विश्वास निर्माण केला तर कदाचित हट्ट म्हणून लिव इन नात्यात राहण्याअगोदर ही मुलं नक्कीच आपल्याशी बोलून सारासार विचार करण्याच्या मानसिकतेत येतीलच न! अजूनही एक मुद्दा आहे; लिव्ह इन नात्याला कायदेशीर मदत आहे की नाही? लिव्ह इन नात्यामध्ये जर:

1. दोघांमधील नाते पती-पत्नीच्या नात्यासारखे असेल;

2. दोघेही कायदेशीर लग्नाच्या वयाचे असतील;

3. त्यांचे अगोदरचे वैवाहिक जोडीदार नसतील;

4. दोघेही स्वेच्छेने आणि दीर्घकाळ एकत्र राहात असतील;

5. आणि मुख्य म्हणजे एकाच घरात एकत्र राहत असतील

आणि वरील सर्व गोष्टी सिद्ध करता येत असतील तर स्त्रियांना कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याचे संरक्षण मिळू शकते. त्यामुळे दोन सज्ञान व्यक्तींना स्वच्छेने एकमेकांबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास आता पुढाररलेल्या समाजात प्रततिबंध असण्याचे कारण नाही. अर्थात हे माझे विचार आहेत. आपल्याला याविषयी काय वाटते ते नक्की खालील कंमेंट्स कॉलममध्ये जरूर लिहावेत ही विनंती.   

Friday, February 15, 2019

भ्याड हल्ल्याच्या शाहिदांनो.... 

काल 14 फेब्रुवारी रोजी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील लेथपोराजवळ श्रीनगर-जम्मू महामार्गावर जहालवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांच्या बसला लक्ष्य केलं.

या हल्ल्यात शाहिद झालेल्या आपल्या प्रिय जवानांना हा निरोप......

भ्याड हल्ल्याच्या शाहीदांनो....


आसवांच्या लाटा ना देऊ सोबत...
अग्नीचा दाह घेऊन जा...
भ्याड हल्ल्याच्या शाहिदांनो...
निरोप आमचा घेऊन जा!

म्हणावे त्या अल्लाला...
थोडा धीर धर तुझ्या हृदयी...
पोहचतील नरकात तुझे कैवारी...
धार इतकी आमच्या तलवारी!

बेचिराख करून त्यांचे मनसुबे...
गलितगात्र त्यांना करू आम्ही...
जन्म का घेतला भूतली आम्ही....
प्रश्न विचारतील नरकात पोहोचूनी!

बदला नसे हा; शिक्षा यमसदनाची...
ठोठावली असे त्यांच्या भाळी...
नेस्तनाबूत करू अस्तित्व तयांचे...
हीच श्रद्धांजली तुम्हा शाहिदां चरणी!!!    

Friday, February 8, 2019

सोबतीण

  सोबतीण

 अपर्णा आणि पृथा एकाच ऑफिस मध्ये होत्या. दोघी एकत्रच जायच्या ऑफिसला. अपर्णाने ऑफिस अगोदर जॉईन केल त्यानंतर पृथाने. पृथाने जॉईन केल आणि तिच्या बडबड्या स्वभावामुळे तिची अपर्णाशी पटकन दोस्ती झाली. तशी अपर्णा अबोलच होती. त्यामुळे तिची आणि पृथाची मैत्री झालेली बघितल्यावर ऑफिसमधल्या इतरांनी अपर्णाच्या अपरोक्ष पृथाकडे आश्चर्य व्यक्त केल होत.

"कमाल आहे हा पृथा तुझी. आम्ही अपर्णाला तुझ्या अगोदर पासून ओळखतो. पण आजवर तिने कधी आमच्याशी गप्पा नाही मारल्या. अग, लंचलासुद्धा ती आमच्याबरोबर नाही बसत. तुझ्याशी मात्र मस्त मैत्री झाली आहे. काय जादू केलीस ग तिच्यावर." एकाने पृथाला विचारल होत.

पृथाला याच उत्तर माहित नव्हत. तिने इतकंच म्हंटल,"मला माहित नाही कशी झाली आमची दोस्ती. पण मी तिच्याशी बोलायला लागले आणि ती सुद्धा बोलली माझ्याशी... इतकंच."

 प्रत्येकानेच तिला अपर्णाच्या अबोल स्वभावाबद्धल सांगितले होते. काही दिवसांनी पृथाच्या देखिल लक्षात आले की अपर्णा इतरांशी फारशी बोलत नाही. त्यामुळे पृथाच्या मनात सुद्धा आले, कशी काय आपल्याशीच दोस्ती झाली अपर्णाची. पण पृथाला स्वतःचा बडबडा स्वभाव माहीत होता; त्यामुळे कदाचित आपण बोलतो म्हणून अपर्णा देखिल बोलते, असे तिने स्वतःला समजावले.

मात्र एक दिवस पृथाने ऑफिसमधून निघाल्यावर स्टेशनला जाताना अपर्णाला प्रश्न विचारलेच की 'तू फक्त माझ्याशी का बोलतेस ग?' अपर्णा यावर फक्त हसली आणि म्हणाली,"सांगीन एकदिवस."  असेच दिवस जात होते.

पृथाच्या वडिलांची आई, तिची आजी कोकणात राहायची. एकदा गावाकडून फोन आला की आजीची तब्बेत बरी नाही. आजीचा पृथावार खुप जीव होता. त्यामुळे तिला पृथाला बघायची... भेटायची... खूप इच्छा होती. म्हणून मग पृथा ऑफिसमधून सुट्टी घेऊन आई-वडीलांबरोबर कोकणात आपल्या गावी गेली. दोन दिवसातच तिचा ऑफिसमध्ये फोन आला की तिची आजी वारली. आणि म्हणून मग तिने सुट्टीदेखील थोडी वाढवून घेतली.

दहा-बारा दिवसांनी पृथाने परत ऑफिस जॉईन केल. ती आली तिच थोडी शांत होती. शनिवार असल्याने सगळे रविवारच्या मूडमध्ये होते. त्यामुळे इतरांच्या ते फारस लक्षात नाही आल. पण अपर्णाला लगेच लक्षात आल. तिला वाटलं की आजी गेल्याच दु:ख असेल. त्यामुळे तिनेदेखील पृथाला छेडले नाही. संध्याकाळी दोघी एकत्रच निघाल्या. पृथा गप्पा मारत होती पण तिच फारस लक्ष नव्हत गप्पात. शेवटी अपर्णाने तिला विचारलच.  "काय झाल पृथा? आजीची आठवण येते आहे का? तू बोलते आहेस ग... पण तुझ गप्पात लक्ष नाही आहे; आलाय माझ्या लक्षात."

 पृथाने एकदा तिचाकडे बघितल आणि तिला विचारल,"अपर्णा तुझा भूतावर विश्वास आहे का ग?" चालता-चालता अपर्णा ब्रेक लागल्यासारखी थांबली आणि मोठे डोळे करून तिने पृथाला विचारल,"का पृथा? आणि अचानक हे भूत का आल तुझ्या मनात?" "अपर्णा.... अस म्हणतात की कोकणात भूत असतात... तुला पण अस वाटत का?" तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत पृथाने स्वतःच म्हणण पुढे ढकलल.  आता मात्र अपर्णाने पृथाचा हात धरला आणि तिला बाजूच्याच बागेत घेऊन गेली. शनिवार असल्याने ऑफिस अर्धा दिवस होतं. अजून जेम तेम चार वाजले होते. बागेत थोडी लहान मुलं खेळत होती आणि त्यांच्या आया गप्पा मारत बसल्या होत्या.  एका बाकावर बसवत अपर्णा पृथाला म्हणाली,"बस पृथा. आणि आता सांग मला नक्की काय झालय? तुला तुझी आजी दिसली आहे का वारल्यानंतर?" "नाही अपर्णा. पण मला वेगळाच अनुभव आला आहे ग. विश्वास ठेऊ की नको अस वाटत आहे ग." पृथा विषण्ण आवाजात म्हणाली. "पृथा माझा विश्वास आहे भूतावर. माझ मत आहे की भूतं असतात. खरंच! तुला बर वाटावं म्हणून नाही म्हणत मी. मला अनुभव आला आहे. पण माझ राहुदे. तू कोकणात काय झाल ते सांग पाहू मला." अपर्णा म्हणाली.

"तुला अनुभव आला आहे? म्हणजे काय अपर्णा? आणि तू मला कधीच का बोलली नाहीस याबद्धल?" आपला विषय बाजूला ठेवत पृथा आश्चर्याने म्हणाली. 

 "सांगीन मी माझा अनुभव नंतर. अगोदर तू सांग काय झालंय ते." अपर्णा म्हणाली. "एक मिनिट ह. घरी फोन करून सांगते मला उशीर होईल म्हणून." आपला मोबाईल काढत पृथा म्हणाली. "तू पण कळव तुझ्या घरी." "हम! तू कळव." अपर्णा म्हणाली. आणि मेसेज करायला तिने मोबाईल उघडला.

 "हॅलो आई... मी अपर्णा बरोबर आहे ग. थोडा उशीर होईल बहुतेक मला. काळजी करू नकोस. हो... हो... आम्ही एकच ट्रेन घेतो. त्यामुळे एकत्रच असू. चालेल. स्टेशनवर दादाला पाठव मला घ्यायला. मी ट्रेनमध्ये बसले की फोन करतेच." पृथाने आईशी बोलून फोन ठेवला आणि अपर्णाकडे बघितलं. अपर्णाने काही न बोलता नजरेनेच तू बोल अशी तिला खुण केली.

 "अपर्णा मी न थोडी गोंधळले आहे आणि थोडी घाबरले पण आहे. खर सांगू का.. माझा न गावाला जाईपर्यंत भूतावर विश्वास नव्हता ग. खर तर माझी आजी आमच्याकडेच रहायची गेली अनेक वर्ष. पण दोन वर्षांपूर्वी आजोबा गेले. मग तिच मन इथे रमत नव्हतं. तिने बाबांना म्हंटल की ती गावच्या घरी जाऊन राहू इच्छिते. अगोदर बाबांनी खूप समजावलं की काही लागलं-खुपलं किंवा तू आजारी पडलीस आणि काही मदत लागली तर आम्हाला गावाला वेळेत पोहोचणं अवघड आहे. पण ती म्हणाली की बर नसेल तर ती इथे येईल. पण इथे आता तिच मन रमत नाही. तिने कोणाचही एकलं नाही. हट्टाने गावाला गेली. बाबा पंधरा दिवस सुट्टी काढून गेले होते. आणि आमचं गावचं घर दुरुस्त करून घेऊन सगळ्या सोई तिला करून देऊन परत आले. आमची आमराई आहे तिथे. ते बघायला दगडू आणि त्याची बायको आहेत. त्याला लहानपणापासून आजी-आजोबांनीच वाढवला. त्यामुळे त्याने बाबांना शब्द दिला की तो आजीची चांगली काळजी घेईल. त्यामुळे मग बाबांना पण हायसं वाटलं. तसा तो बारावी शिकला आहे.

 आजीला मोबाईल वापरता यायचा. आम्ही रोज तिच्याशी फोनवर बोलायचो. दिवसभरात प्रत्येकाने तिला किमान २-३ वेळा फोन करायचा अशी आम्ही सगळ्यांनी सवयच लावून घेतली होती. आई, दादा, मी आणि बाबा. त्यामुळे तिच कसं आहे ते आम्हाला माहित असायचं. त्यात आई-बाबा पण दगडूशी रोज बोलायचे. आजी खूप खुश होती गावाला. पण गेले सहा महिने मात्र तिने आमच्याशी बोलण कमी केल होतं. म्हणजे ते आता आम्हाला लक्षात येतं आहे. तेव्हा मात्र नाही कळलं. मी किंवा दादाने फोन केला की ती आम्हालाच प्रश्न विचारायची. तिच्याबद्दल बोलण मग राहूनच जायचं. आई-बाबांना ती दगडू बद्दल सांगत रहायची. मात्र तिच्या बोलण्यात आमराईमधल्या माडाच्या झाडाचा कायम उल्लेख असायचा."

 "माड म्हणजे काय ग पृथा?" अपर्णाने तिची लिंक तोडत तिला विचारले. 

 "अग माड म्हणजे नारळ. नारळाच झाड ग." पृथा म्हणाली.

 "ओह... ओके... मग?" अपर्णा हसून म्हणाली.

 "तर... आजी म्हणायची की आमराईच्या एका कडेला दोन माड आहेत ते तोडले पाहिजेत. अगोदर ती सहज म्हणते आहे अस वाटायचं. मग मात्र तिच ते फक्त मत राहील नाही तर ती त्या बाबतीत आग्रही झाली.  शेवटी बाबांनी दगडूला फोन केला आणि विचारल,"दगडू बाबा काय प्रकार आहे. आई ते माड तोडायचं म्हणते आहे. का रे?" दगडू अगोदर बोलायला तयार नव्हता. पण मग बाबांनी आवाज चढवल्यावर म्हणाला,"दादा काही दिवसांपूर्वी काशा त्या झाडावरून पडून मेला. तो माड चोरायला हळूच चढला होता. माईंनी त्याला चढताना बघितला. त्यावेळी त्या लांब होत्या. कोणीतरी चढत आहे एवढच त्यांना लक्षात आलं. म्हणून खरच कोणी आहे का याची खात्री करायला त्या तिथे गेल्या. कोणीतरी खरच वर चढत आहे हे बघून त्या मोठ्या आवाजात ओरडल्या... कोण रे? खर तर दादा, माईंना त्याला ओरडायच नव्हत. घेतले माड तर घेतले, मला कशाला लागतात. अस त्या नेहेमी म्हणायच्या. पण त्यांच्या आवाजाने अगोदरच मनात भिती असलेला काशा दचकला आणि त्याचा हात सुटला आणि तो खाली पडला. मी पण माईंचा आवाज एकून तिथे पोहोचलो होतो. काशा खाली दगडावर आपटला आणि त्याच डोक फुटलं. त्याच्या डोळ्यात रक्त उतरल. माई घाबरल्या. मला म्हणाल्या दगडू उचल त्याला आणि घराकडे घे. डॉक्टरला बोलाव. पण काशा नाही नाही म्हणत राहिला. मला माड हवेत.. अस म्हणाला आणि त्याने प्राण सोडला."

 बाबांना कळेना या गोष्टीचा आणि माड तोडण्याचा काय सबंध. त्यांनी तस दगडूला विचारले. दगडू म्हणाला,"दादा.... तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. का मला गरिबाला भरीस पाडता. तुम्ही माईंनाच विचारा ना." मग मात्र बाबा रागावले. म्हणाले,"अरे दगडू ती काही सांगत नाही म्हणून तुला विचारतो आहे ना? तुला तिची काळजी घ्यायला ठेवलं आहे ना? अरे मी तिथे नसताना तूच ना तिला माझ्या जागी. सांग बघू काय आहे तिच्या मनात." तेव्हा दगडू म्हणाला,"दादा माईंच्या मनाने घेतले आहे की काशा त्या माडावर आहे. त्या तेव्हापासून आमराईमध्ये येत सुद्धा नाहीत." हे एकून बाबा एकदम चक्रावले.

अपर्णा खर सांगू का माझी आजी न खूप शिकलेली होती. त्याकाळातली दहावी पास आहे ग. खूप हुशार आणि समजूतदार. त्यामुळे ती असा काही विचार करेल अस बाबांना खर वाटेना. म्हणून मग त्यांनी तिला फोन करून विचारले. बाबांनी विषय काढला आणि आजीचा आवाजच बदलला ग. तिचा आवाज रडवेला झाला. म्हणाली,"मला ते माड नकोत आमराईमध्ये." बाबांनी तिला शांत केल. म्हणाले,"मी दगडूला सांगतो लगेच ते माड तोडायला. तू काळजी करू नकोस." आणि मग बाबांनी दगडूला ते माड पाडायला सांगितल.

 "मग? अग आजीला काशा तिथे आहे वाटत होत म्हणून तू इतकी अस्वस्थ झालीस का पृथा? कमाल आहे ह तुझी." अपर्णा पृथाची लिंक तोडत म्हणाली. अपर्णाकडे बघत पृथा म्हणाली,"नाही अपर्णा. ऐक. बाबांनी सांगितल खर दगडूला ते माड तोडायला. पण दुसऱ्याच दिवशी दगडूचा फोन आला. म्हणाला,"माई म्हणतात माड नाही तोडायचा." आता मात्र बाबा वैतागले. त्यांनी आजीला फोन लावला आणि माड न तोडण्याचे कारण विचारले. तिने उत्तर नाही दिले ग. इतकंच म्हणली की माड नाही तोडायचे. आता जे काही आहे ते माझ्याबरोबरच जाईल. बस." पृथा बोलता बोलता थांबली आणि शून्यात नजर लावून बसली.

 ------------------------------------------------------------------

 क्षण दोन क्षण वाट बघून अपर्णाने तिला हलवले."पृथा काय झाल ग? बोल की."

 पृथाने गोंधळून अपर्णाकडे बघितल आणि म्हणाली,"अपर्णा आपण या बागेतून निघूया का?" आता फक्त पाच वाजले होते. पण आजूबाजूला आता मुलांची खूपच गर्दी झाली होती. ओरडा-आरडा चालू होता. कोणी पडून रडत होत... कोणी मोठ्याने हसत होत... कोलाहल होता बागेत. त्यामुळे अचानक पृथाला बागेतून निघायची घाई का झाली ते अपर्णाला कळेना. "का ग? काय झाल पृथा?" तिने गोंधळून पृथाला विचारलं.

 "अपर्णा मलाना गावाहून आल्यापासून झाडांच्या बाजूला जावस पण वाटत नाही ग. त्यात आता अंधार व्हायला लागला आहे. चल न. प्लिज. आपण स्टेशनवर जाऊन बसू. चालेल न तुला?" पृथा म्हणाली.

 अपर्णा हसत म्हणाली. "हो चालेल की. स्टेशन म्हणजे माझ दुसर घरच आहे ग. चल."  आणि दोघी स्टेशनवर आल्या. लेडीज डबा जिथे येतो तिथे दोघी एका बाजूच्या बाकावर बसल्या. तोवर पृथा पण सावरली होती. त्यामुळे बसल्यावर अपर्णाने विचारायच्या अगोदर तीच बोलायला लागली. "अपर्णा कोकणात इतकी झाड असतात न आणि तीसुद्धा मोठी मोठी की आता मला झाड नकोशी झाली आहेत."

 "पृथा माझ्याशी नको खोट बोलूस. काय आहे ते खर सांग बघू. आपली मैत्री अलीकडची असेल. पण मी तुला थोड तरी ओळखायला लागले आहे. समजल?" अपर्णाने पृथाचा हात धरला आणि प्रेमाने थोपटत म्हणाली. मग मात्र पृथाचा बांध तुटला. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.

अपर्णाचा हात घट्ट धरत ती म्हणाली,"अपर्णा आम्ही गावाला पोहोचलो ना तेव्हा आजीची तब्बेत खूप खालावली होती. तिचा माझ्यावर खूप जीव होता ग. त्यामुळे तिने मला बघायचा ध्यास घेतला होता. आम्ही पोहोचलो तेव्हा अशीच संध्याकाळ झाली होती. मी तिच्याच जवळ होते. रात्री तिच्याजवळ झोपले होते.  रात्री कधीतरी मला जाग आली तर आजी जागीच होती. मी तिला विचारलं,"काय झाल आजी? झोप नाही येत का तुला?" त्यावर ती म्हणाली,"पिटू माझ एक काम करशील?" तिच्या आवाजात आर्जव होत. मी म्हणाले,"आजी अस काय विचारतेस? हक्काने सांग की." 

 ती म्हणाली,"नाही मी विचारते त्याच उत्तर दे." मी हसून म्हानले,"सांग आजी. तू म्हणशील ते काम करेन मी." तिला एकदम हायसं झाल अस मला वाटल. तिचा चेहरा उजळला. खोलीतल्या त्या कमी प्रकाशातसुद्धा मला ती हसली ते दिसलं ग. ती म्हणाली,"पिटू आपल्या आमराईमध्ये ते दोन माड आहेत न, तिथे जाऊन एक असोला नारळ ठेवशील का? आणि म्हणावं मी मुद्दाम काही केलं नाही. माडसुद्धा तोडणार होते ते माझ्या भीतीमुळे. कोणाला त्रास द्यायचा हेतू नव्हता माझा. पण आता जे काही आहे ते माझ्याबरोबरच जाऊ दे. माझ्या मुला-नातवंडाना त्याचा त्रास नको.... करशील एवढ?" 

 मी चक्रावून गेले होते. पण तिचा स्वर इतका आर्जवी होता की मी हो म्हणाले. म्हंटल,"आजी उद्या सकाळीच जाईन मी तिथे." त्यावर ती म्हणाली,"उद्या कोणी बघितला आहे ग? तुझ्याचसाठी थांबले आहे मी. आत्ताच जातेस का?" मी सहज घड्याळाकडे बघितलं. तर तिने विचारलं,"भिती वाटते आहे का?" मी हसले. म्हणाले,"नाही ग. पण मला कुठे माहित आहे माड कुठे आहेत. म्हणून विचार करत होते सकाळी दगडू बरोबर जाईन."

 "नको नको. तू आत्ताच जा. अग जवळच आहे. मागच्या दारातून बाहेर पड आणि सरळ जा. पंधरा पावलांवर आहेत ते माड." ती आग्रही सुरात म्हणाली.

 मी म्हणाले,"आजी अग तू म्हणतेस असोला नारळ ठेव तिथे. इतक्या रात्रि मी असोला नारळ कुठे शोधु ग?"

 त्यावर तिने म्हंटल,"या खोलीच्या दाराच्या मागे मी आज सकाळीच ठेऊन घेतला आहे. पिटू, कर ग एवढं माझ्यासाठी." तिचा आवाज इतका आर्जवि होता की मला नाही म्हणावेना. 

 "बर." म्हणून मी उठले आणि तो दारामागचा असोला नारळ घेऊन मागिल दाराशी आले. एकुलता एक मिणमिणता दिवा दारावर होता. मी हळूच दार उघडलं. पण ते जून दार कुरकुरलच. मी दचकून अंदाज घेतला. पण आई आणि बाबा खूप दामले होते. त्यामुळे कोणालाच जाग आली नाही. बाहेर गार वारं सुटल होतं. बाहेर येऊन मी मागे दार ओढून घेतल आणि आमराईमद्धे शिरले. आजी म्हणाली होती सरळ जायचं. जेम-तेम पंधरा पावलं. मी सरळ चालायला लागले. आणि खरच मोजून पंधरा पावलांवर दोन माड उभे होते. त्यांच्या खोडाला आलेला बाक असा विचित्र होता की जणूकाही कोणीतरी कमरेत वाकून नमस्कार करते आहे असे वाटेल. पण मग मी फार विचार करत उभी नाही राहिले. कारण जरी माझा भूतावर विश्वास नव्हता तरी अंधाऱ्या रात्री एकटीने अशा झाडांमध्ये उभं राहायची हौस देखील नव्हती. 

 मी त्यातल्या एका माडा जवळ गेले आणि हातातला नारळ खाली ठेवला. मग आजीने जे म्हणायला सांगितलं होतं ते आठवत तसच मनात म्हणायचा प्रयत्न केला. म्हंटल,'माझी आजी एक सरळ साधी स्त्री आहे. तिने आयुष्यात कधीच कोणालाही दुखावलं नाही. तर मग या वयात येऊन ती का कोणाला त्रास देईल मुद्दाम. तरीही तिच्या हातून जर कोणी दुखावलं गेल असेल तर मी तिच्या बाजूने माफी मागते. तिच म्हणण आहे की जे काही आहे ते तिच्याबरोबर जावं.' मग मला अजून काही सुचल नाही आणि मी मागे वळले आणि चालू लागले. मी चार-पाच पावलं पुढे गेले असेन आणि अचानक मला मागून काहीतरी सळसळल्याचा आवाज आला; म्हणून मी  मागे वळून बघितलं. वाटलं त्या माडाला टेकून कोणीतरी उभं आहे. त्या जाणीवेने माझी गाळण उडाली ग अपर्णा.... खूप घाबरले मी. तशीच वळून घराकडे पाळायला लागले... पण तेवढ्यात मला आवाज आला "जोवर माड पडणार नाहीत तोवर कोणालाही काही होणार नाही; माईला निरोप द्या..... माझा."

त्यानंतरच मला काही आठवत नाही ग." "बापरे! एकूणच थरारक प्रकार आहे हा. मग? पुढे?" अपर्णाने पृथाला विचारले. "मग पुढे काय.... मला जाग आली तेव्हा मी घरात होते. आई, बाबा आणि दादा माझ्या बाजूला होते. मी जागी झालेली बघितल्यावर आईने पाणी दिल आणि विचारलं,"तू अशी रात्री बेरात्री बाहेर का गेली होतीस? काही साप-विंचू चवलं असत तर? आणि ओरडलीस का अशी मोठ्याने? आम्हाला तर कळलंच नाही काय झालं ते. तुझा आवाज होता म्हणून आजीच्या खोलीत गेलो; तर आजी म्हणाली तू बाथरूमला जाते म्हणून बाहेर पडलीस. तुला शोधायला लागलो तेव्हा दादाला तू घराबाहेर बेशुद्ध पडलेली दिसलीस. त्यानेच आत आणलं हो तुला. काय झाल ग पिटू?" 

 सगळे आजीवर रागावतील म्हणून मी काहीच बोलले नाही. म्हंटल,"मला साप दिसला आणि घाबरून बेशुद्ध पडले. दमले आहे; झोपते." आई, बाबा आणि दादा पण दमलेलेच होते. मग फार चर्चा न करता आम्ही सगळे झोपलो. मी आईजावळच झोपले. सकाळी आम्ही उठलो आणि आजीच्या खोलीत गेलो तर आजी गेली होती."

एवढ सांगून पृथा बोलायची थांबली. अपर्णा पृथाकडे बघत बसली होती.

ती काहीच बोलेना तेव्हा न राहून पृथाने म्हंटल,"अपर्णा तुला मी खोट सांगते आहे अस वाटत का?"

 त्यावर अपर्णा लगेच म्हणाली,"नाही पृथा. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे."

 "थँक्स अपर्णा. खर सांगू मी हा माझा अनुभव कोणालाच सांगू शकत नव्हते ग. आईला सांगितला असता तर ती घाबरली असती. बाबांनी आणि दादाने विश्वास ठेवला नसता. त्यामुळे माझी फार फार कुचंबणा होत होती ग. तुझ्याशी बोलून खूप बरं वाटल मला. पण ते काय असेल ग अपर्णा?"

 "ते म्हणजे काय पृथा?" अपर्णाने विचारले. "तेच ग. मला ते जे काही दिसलं ना त्या माडाजवळ. काय असेल ते?"

पृथाने मनात उत्तर माहित असूनही विचारले. अपर्णाने क्षणभर पृथाकडे निरखून बघितले आणि म्हणाली,"पृथा तुला माहित आहे ते काय होत. तरीही सांगते... तो काशाच होता. तो तिथे नारळाच्या आशेने आला होता आणि अचानक त्याचा मृत्यू ओढवला. त्यामुळे त्याचा आत्मा तिथेच त्या माडाखाली अडकला आहे. तुझ्या आजीच्या ते लक्षात आलं म्हणा किंवा काशाने त्याची जाणीव करून दिली असेल म्हणा... पण म्हणूनच तुझ्या आजीने ते माड तोडू दिले नाहीत. आणि तू आजीतर्फे माफी मागितल्यावर त्यानेही सांगून टाकले की त्याचा राग तुमच्या कुटुंबावर नाही. पण जीव मात्र त्या माडात अडकला आहे. त्यामुळे जोवर ते माड आहेत तोवर काही प्रश्न नाही."

 अपर्णाचं बोलण पृथाला पटल. ती म्हणाली,"किती योग्य प्रकारे अर्थ लावलास ग सगळ्या घटनेचा. मला वाटलं होतं की आता माझ काही खरं नाही. पण आता तू म्हणते आहेस तेव्हा त्या घटनेचा एकूण अर्थ लागतो आहे. पण तुला कसं लक्षात आलं हे?"

 त्यावर अपर्णा हसली. म्हणाली,"तुम आम खाओ पृथा गुटली क्यो गिनती हो?" पृथाला ती काय म्हणते आहे ते नाही कळलं. तिच्या मनावरच ओझ बोलल्यामुळे उतरलं होतं. त्यामुळे ती परत पूर्वीसारखी पृथा झाली होती. ती अपर्णाच्या मागे लागली. "तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय अपर्णा. सांग न मला." अपर्णा  म्हणाली,"तू मागे लागते आहेस म्हणून सांगते हं. तू मला हे सगळ सांगायला सुरवात का केलीस? कारण मी तुला म्हणाले की माझा भूतावर विश्वास आहे. हो की नाही?"

 आता पृथाला आठवलं की मुळात तिने अपर्णाला तिचा अनुभव सांगायला सुरवात केली होती तीच मुळी कारण अपर्णाने म्हंटल तेच होत की तिचा भूतांवर विश्वास आहे. आणि त्याबरोबरच ती म्हणाली होती की तिला त्याचा अनुभव देखील आला आहे. मग मात्र पृथाची उत्सुकता जागी झाली.  ती अपर्णाच्या मागे लागली,"ए तू म्हणाली होतीस की तुला भुताचा अनुभव आला आहे. काय झालं नक्की? सांग न मला." अपर्णा घड्याळाकडे बघत म्हणाली,"पृथा, आज नको. पुन्हा कधीतरी. बघ तरी. सहा वाजलेसुध्दा. आज शनिवार आहे. गर्दी कमी होत गेली आहे. तुला उशीर होईल उगाच. मुख्य म्हणजे माझ्या मनाची अजून तयारी नाही ग झाली तुला हे काही सांगायची. त्याचे काय परिणाम होऊ शकतात ते देखील मला माहित नाही." "होऊ दे उशीर. मी आईला सांगितलं आहे तुझ्याबरोबर आहे ते. सहाच तर वाजले आहेत. एरवीच्या दिवशी आपण यावेळी तर ऑफिस मधून बाहेर पडतो.  आणि दादा येणार आहे मला स्टेशनवर घ्यायला. सांग न मला. आणि तुझ्या अनुभवाचा माझ्यावर काय परिणाम होणार आहे ग? तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस. पण अशी उत्सुकता लावून सोडून देऊ नये ग." अस म्हणून पृथा अपर्णाच्या मागे लागली.

 अपर्णाने मग सांगायला सुरवात केली.

 -----------------------------------------------------

 "पृथा तुला तर पार त्यातिथे कोकणात अनुभव आला. तोसुद्धा रात्रीच्या अंधारात काहीसा आवाज आणि एक धुसर आकृती... ज्याची तुला आत्ता विचारले तर खात्री देता येणार नाही. पण माझा अनुभव या इथे गजबजलेल्या मुंबईमधला आहे. तो अनुभवच इतका जिवंत आहे की त्यापुढे मरण सोप वाटेल," अपर्णा म्हणाली.

 "ए अपर्णा उगाच नमनाला घडाभर तेल अस करू नकोस हा. काय घडलं नक्की सांग बघू मला." पृथा हसत अपर्णाला म्हणाली.

 "तेच सांगते आहे. पण मला मध्ये  मध्ये बोलून माझी लिंक नको ह तोडुस  पृथा." अपर्णाने तिला दम दिला. त्यावर हसत पृथा म्हणाली, "बर बाई. माझी हाताची घडी आणि तोंडावर बोट. एकदम गप्प बसते आता. तूच बोल... हम... कर सुरवात."

 "अपर्णा मी आत्ता गेले काही महिने या ऑफिसमध्ये जॉईन झाले आहे. पण  त्याच्या अगोदर एवढी ग्रजुएट होऊन देखील मला चांगली नोकरी मिळत नव्हती.  तुला मागे मी म्हणाले न; माझ्या बाबांचा एका अपघातात पाय गेला. गेली अनेक वर्ष ते ज्यांच्याकडे ड्रायवर म्हणून काम करत होते, ती माणस चांगली आहेत. त्यांनीच सगळ्या उपचारांचा खर्च केला. नंतर थोडी रक्कम देखील दिली. पण बाबा कायमचे घरी बसले. आता या वयाला दुसर काय काम करू शकणार ते? आई २-३ स्वयंपाकाची काम करत होती. तिने ती कामं वाढवली. पण त्यातून कितीसे पैसे पुरणार. त्यात बाबांच्या औषध-पाण्याचा खर्च तर आहेच ना अजून. म्हणून मग मी येईल ती नोकरी स्वीकारायचे ठरवले.  आईच्या एका मैत्रिणीने एका नामांकित रेडीमेड कपड्यांच्या दुकानात सेल्स गर्ल म्हणून नोकरी आहे असं सांगितल.

मला खरच कामाची खूप आवश्यकता होती, म्हणून मी ती नोकरी काहीही विचार न करता स्वीकारली. पण ते दुकान बांद्रयाला पाली हिल जवळ होतं. त्यामुळे रोज ट्रेनचा प्रवास आणि मग बसने त्या दुकानापर्यंत पोहोचायचं. माझी कामाची वेळ दुपारी ३ ते रात्री ९ पर्यंतची होती. मुळात ते असं दूर एकाकी जागी असणारं दुकान असल्याने कोणी मुली तिथे दुपारच्या शिफ्टला काम करायला तयार नव्हत्या, अस मला सांगितल गेलं.  मी जॉईन झाले आणि तिसऱ्याच दिवशी मला खर कारण लक्षात आलं.

आमच्या दुकानाचा मॅनेजर एकदम लंपट माणूस होता. कारण नसताना तो सारख मला त्याच्या समोर बोलावायचा आणि काही ना काही निरर्थक काम सांगायचा. मला खूप राग यायचा त्याचा. पण मी काय करू शकणार होते. अश्या एका बाजूच्या ठिकाणची नोकरी मी माहित असूनही स्वीकारली आहे म्हणजे मी गरजू आहे एवढं समजण्याइतका तो हुशार होता. बर तो एरिया पण असा की रात्री ८ नंतरच तिकडच्या श्रीमंत बायका शॉपिंगसाठी यायच्या. कामावरून घरी जाताना गाडी थांबवून शॉपिंग करायची आणि मग जायचं. त्यांना काय? ना स्वयंपाक करायचा असतो; ना मुलांची काळजी असते..... अपर्णाची सांगताना तंद्री लागली होती.

पृथाला रहावेना. तिने अपर्णाला टोकलंच. "अपर्णा तू भुताच्या अनुभवाबद्दल सांगते आहेस न? की तुझी नोकरी आणि त्या एरियामधल्या बायकांच वर्णन करते आहेस?" 

 अपर्णा वैतागली. "पृथा चल आपण निघू." ती म्हणाली. "अग काय झाल?" पृथाने गोंधळून विचारलं. "तू जर अस मला सारखी मध्ये बोलुन त्रास देणार असशील तर मी तुला काही सांगणार नाही. मुळात मी तुला सांगावं की नाही याचा विचार करते आहे. खर सांगायचं तर पृथा तुला सांगण्यात रिस्क आहे ग...." परत अपर्णा सांगू की नाही अशा मनस्थितीत गेली. पण आता पृथा एकायला तयार नव्हती. "तू सांग अपर्णा. मला काही होत नाही. आणि काळजी करू नकोस. मी तुला नाही अडवणार आता. तुझी तंद्री लागली होती न बोलताना, त्याची मजा वाटली म्हणून मी तुला डिस्टर्ब केल होत. बोल तू." ती म्हणाली.

 "बर! तू काही आता ऐकायची नाहीस." अस म्हणून अपर्णाने सांगायला सुरवात केली. "तर....... या बायका ८ नंतर यायच्या आणि ९ वाजून गेले तरी निघायच्या नाहीत. माझी स्टेशनसाठी बस होती ९.२० ची. ती गेली की मग एकदम ९.४०/४५ ची पुढची बस होती. त्यामुळे उशीर व्हायला लागला की माझा जीव कासावीस व्ह्यायचा. तो मॅनेजर मात्र मुद्धाम त्या बायकांशी बोलत बसायचा. मला उशीर व्हावा म्हणून. म्हणजे मग त्याला मला विचारता येईल न की तुला स्टेशनला सोडू का. पण मी ८.४५ नंतर येणाऱ्या बाईला हळूच कल्पना द्यायचे की ९ ला दुकान बंद होत आणि मी लांब रहाते. बायका पण समजून घ्यायच्या आणि ९ पर्यंत निघायच्या. त्यामुळे त्या मॅनेजरला कितीही प्रयत्न केला तरी मला अडकवता येत नव्हतं.

 गेल्या सप्टेंबर महिन्यातली गोष्ट. सप्टेंबरमध्ये रिटर्न्स फाईल करायचे असतात न... तर ऑडीटच काम सुरु होत. चार्टर्ड अकौंटटकडून दोन इंटरन्स येत होते. चांगले होते बिचारे. तेसुद्धा माझ्याबरोबर निघायचे. खरं तर ते दोघे असल्याने मला थोडा आधारच होता. हळूहळू त्यांच्या कामाचे दिवस संपत आले. एक दिवस त्यांच्यातल्या एकाला ताप आला. त्यामुळे तो दुसऱ्यादिवशी येऊ शकला नाही. मग त्यांच्या बॉसने एका मुलीला पाठवलं. काम फक्त दोन दिवसाचं होत. त्यामुळे तसा काहीच प्रश्न नव्हता.  उषा दिसायला फारच साधीशी होती. सावळा रंग आणि कमालीची बुटकी होती ती. म्हणजे जेमतेम कॉलेजमध्ये जाणारी मुलगी वाटेल अशी. पण तिचे केस मात्र लांबसडक होते. काम करताना ती तिची वेणी गळ्याभोवती गुंडाळायची तर त्याचे दोन वेढे व्हायचे. इतके लांब होते. कामाचा शेवट होता त्यामुळे आमच्या गप्पा काही फार झाल्या नाहीत. पण ती माझीच ट्रेन घ्यायची. त्यामुळे आम्ही एकत्रच जात होतो. शेवटच्या दिवशी थोडा उशीर होत होता त्यांना. पण मग मीसुद्धा थांबले त्यांच्याबरोबर. मुळात मीसुद्धा अकौंटसवाली असल्याने मदतीला थांबले होते. जेणेकरून काम लवकर आटपेल आणि आम्ही निघू.

काम आटपल तेव्हा ९.३० होऊन गेले होते. आम्ही पटापट आमच्या बॅग्स उचलल्या आणि निघालो. उषा निघताना म्हणाली,"अपर्णा तू पुढे हो आणि बस आली तर थांबव. मी आलेच ग. जरा बाथरूमला जाऊन येते. इथल्या A.C. चा मला फार त्रास होतो." मी म्हणाले,"उषा आपण एकत्रच निघू. मी इथेच थांबते." तर ती म्हणाली,"नको. तू हो पुढे. आताची बस चुकली तर मग परत २०/२५ मिनिट थांबायला लागेल."

मलाही ते पटल आणि मी बस थांबवायला पुढे बस स्टॉपकडे गेले. दहा मिनिटं झाली तरी उषा आली नव्हती. मी तिला बोलवायला जाणार तर समोरून बस आली. मला कळेना काय करावं. एवढ्यात उषाने हाक मारल्यासारखं वाटलं. मी मागे वळून बघितलं तर ती दुकानाजवळून जोरजोरात हात हलवून दाखवत होती. मला कळेना तिला काय म्हणायचं आहे. म्हणून मग मी बस सोडून तिच्याकडे जायला वळले. पण तो बरोबरचा मुलगा म्हणाला अग ती जायला सांगते आहे. थांबते आहे ती बहुतेक.  मी गोंधळून परत एकदा उषाच्या दिशेने बघितलं. तर खरच ती बाय करत असल्यासारखा हात हलवत होती. माझी द्विधा मनस्थिती झाली. बस समोर येऊन थांबली होती. त्या मुलाने माझ बखोट धरून मला बसमध्ये चढवलं आणि आम्ही निघालो. 

 दुसऱ्या दिवशी नेहेमीप्रमाणे मी कामाला आले. आजपासून ती ऑडीटची मुलं येणार नव्हती. त्यांच काम आटोपलं होत. पण बरेच दिवास ते येत होते त्यामुळे त्याच्या असण्याची सवय झाली होती. त्यादिवशी संध्याकाळ झाली तरी मॅनेजर आला नव्हता. मला थोड आश्चर्य वाटलं. पण बरच होत ते एका दृष्टीने. म्हणजे मी वेळेत निघू शकणार होते.  मी ९.२० ची बस घेतली आणि स्टेशन ला पोहोचले. नेहेमीची ट्रेनदेखील घेतली. नेहेमी प्रमाणे जेमतेम २-४ बायका होत्या डब्यात.

मी माझ्या नेहेमीच्या कोपऱ्यातल्या जागेवर जाऊन बसले आणि माझ्या पुढ्यातच उषा बसलेली दिसली. मला आश्चर्यच वाटलं. मी तिला विचारल,"तू कशी काय इथे ग?" ती म्हणाली,"तुला सोबतिण म्हणून आले आहे. काल काही तू माझ्यासाठी थांबली नाहीस. म्हंटल आता तुझी सोबत सोडून चालणार नाही." ती हसत म्हणाली. मला कळेनाच. मी म्हणाले,"अग, पण तू तर आम्हाला बाय करत होतीस नं? मला वाटलं की तुला वेळ लागणार आहे म्हणून मग मी निघाले."

 त्यावर तिने माझ्याकडे क्षणभर रोखून बघितले आणि म्हणाली,"अपर्णा मी का थांबीन तिथे? मुख्य म्हणजे तुला माहित नाही का तुमचा मॅनेजर कसा आहे? तरीही तू मला सोडून निघालीस नं?" मला एकदम लक्षात आलं. त्याक्षणी मला फक्त सुटणारी बस दिसत होती. पण आत्ता तिने मॅनेजरची आठवण करून दिल्या नंतर मला वाटलं मी थांबायला हव होतं. पण ती इथे बसली आहे म्हणजे तिला काही प्रोब्लेम नाही झाला. म्हणून मग मी म्हणाले,"उषा, अग तू आलीसच २ दिवसांसाठी. त्यात शेवटचे काम चालू होते त्यामुळे मी तुला सांगायची विसरले ग त्या हलकटाचा स्वाभाव. का तुला निघताना काही त्रास दिला का त्याने? मग तू पुढची बस घेतलीस का? खूप उशीर झाला का ग? सॉरी उषा. तुला सोडून जायचं माझ्या मनात नव्हत ग. पण बस दिसली आणि निघायचा मोह झाला मला; इतकच. अग, तसा आज तो आलाच नव्हता."

 माझ सगळ एकून घेतलं उषाने आणि मग म्हणाली,"आज काय तो आता कधीच येणार नाही." मी गोंधळले. म्हंटल,"म्हणजे काय ग?" त्यावर ती म्हणाली,"त्याने मला अडकवून ठेवाल होतं अपर्णा. त्याने माझ्या एकटं असण्याचा आणि कमजोर असण्याचा फायदा घेतला. मी नंतरची काय कुठलीच बस घेऊ शकले नाही. कारण त्याने केलेले अत्याचार मला सहन झाले नाहीत. त्यामुळे समाधान होऊन तो जेव्हा माझ्यावरून दूर झाला ना तेव्हा त्याला लक्षात आल की मी जिवंतच नाही आहे. घाबरला मग तो. मला उचलून गाडीत टाकलं त्याने आणि जवळच्या समुद्र किनाऱ्यावर नेऊन माझं कलेवर ढकलून दिलं गाडीबाहेर. अग माझ्या शरीरातून जीव गेला होता, पण माझा आत्मा तिथेच होता. आणि आत्मा कमजोर नसतो ना. मी तशीच त्याच्याच गाडीत त्याच्याच मागे बसून गेले. तो हलकट माझ्या कलेवराची विल्लेवाट लावून आनंद साजरा करण्यासाठी एका बारमद्धे गेला. एकामागुन एक दारुचे ग्लास रिचवून तो तर्र होऊन बाहेर त्याच्या गाडिजवळ पोहोचला. मी याच क्षणाची वाट बघत होते. त्याने गाडीचे दार उघडले आणि त्याच्या गाडीतून मी बाहेर येऊन त्याच्या समोर उभी राहिले.  मला बघुन त्याची बोबड़ी वळली. त्याला हा धक्का सहन झाला नाही अगोदरच प्रचंड प्यायलेला होता; त्यात मला समोर बघितले आणि हार्ट अटॅक येऊन तिथेच कोसळला."

 एवढं बोलून उषा थांबली. मात्र तिच बोलण एकताना मी थिजुन गेले होते. समोर बसलेली उषा माझी चेष्टा करत होती की ती जे सांगत होती ते खरच घडल होतं; अस माझ्या मनात आल.

पण जर खरच ती म्हणते तस घडललं असेल तर?......तर?.... तो विचार मनात आला आणि चर्र झालं. म्हणजे.... म्हणजे... समोर बसेली उषा? 

 मी धीर करुन तिला हाक मारली,"उषा......?"

 "मी तुला खर तेच सांगते आहे अपर्णा." उषा म्हणाली.

जणुकाही तिला माझ्या मनातले प्रश्न कळले होते. तिचं बोलण ऐकलं आणि माझी घाबरून गाळण उडाली. "उषा... अग... मी... मला... मी काय ग? तू इथे कशी आली आहेस?" मी काय बोलत होते ते मलाच कळत नव्हतं. 

 उषा माझ्याकडे बघुन हसली. पण तिचं हसण मला भेसुर वाटत होत. "अपर्णा तुला हेच विचारायचं असेल न की मी जे काही घडलं ते तुला सांगायला का आले आहे? अपर्णा.... काल जे काही घडल फ़क्त तेवढच तुला सांगायला मी आले नाही. अपर्णा... काल जर तू त्या बसचा मोह सोडून माझ्या सोबतीसाठी थांबली असतीस तर कदाचित्.... पण जाऊ दे. ते कदाचित् आता काही उपयोगाचं नाही. अपर्णा तू काल माझ्यासाठी थांबली नाहीस. पण यापुढे रात्रि 9.20 नंतर मी कायम तुला सोबत करणार आहे." अस म्हणून उषा बोलायची थांबली. ........

अपर्णा बोलायची थांबली. तिने शून्यात खिळवलेली नजर उचलून पृथाकडे बघितले. पृथा थिजून गेलेल्या नजरेने एकदा  अपर्णाकडे बघत होती आणि एकदा मनगटावरच्या घडाळ्याकडे. ती सारखी घडाळ्याकडे का बघते आहे हे लक्षात न आल्याने अपर्णानेसुद्धा घडाळ्याकडे बघितले. रात्रीचे ९.20 झाले होते. 

 अपर्णा आणि पृथाची नजरभेट झाली आणि अपर्णा काही बोलणार तेवढ्यात प्लॅटफॉर्म ला ट्रेन येऊन थांबली............. आणि............... आणि दोघींना ट्रेनमधून एक हाक एकू आली..............

"अपर्णा............ पृथा ......... चढता ना ट्रेनमध्ये???"

--------------------------------------

Friday, February 1, 2019

  अपूर्ण भावनांचे परिपूर्ण आयुष्य!



 'तो' निघाला आणि 'ती' वेडीपीशी झाली. तिने आतुर नजरेने त्याच्या डोळ्यात स्वतःला गुंतवले. पण तो बधला नाही; तेव्हा मात्र ती आपणहून बाजूला झाली आणि शांतपणे म्हणाली,"जातोस? जा! तुला अडवणार नाही. तुझ्या शिवायचं माझं हे अर्थहीन... प्राणहीन.... जीवन तुझ्या आठवणींवर कंठेन आणि कधीतरी तुझ्याही नकळत तुझ्यातच विलीन होईन. तुला मात्र  मी आठवेनच... आणि त्यावेळी मात्र......" तिचे पाणीदार डोळे एका तेजाने चमकत होते... पण आता त्यात अश्रू नव्हते. तिने त्याच्याकडे पाठ केली आणि ती चालू पडली. यमुनेच्या काळ्या मऊशार वाळूतून तिची सुकुमार पावलं आपली ओळख उमटवत राहिली...... 

 त्यानंतर देखील ती तिचं जीवन जगलीच. सासू-सासऱ्यांची सेवा, पत्नीव्रताचे पालन आणि मुलांचे संगोपन... तिच्या आयुष्यातल्या जवाबदाऱ्या तिने पूर्ण केल्याच! पण तरीही... ती अपूर्णच राहिली... आयुष्यभर!!!

 त्यानेदेखील निघताना एकदाही मागे वळून बघितले नव्हते. त्याला पूर्ण कल्पना होती की यापुढील आयुष्य हे फक्त आणि फक्त जवाबदाऱ्या आणि कर्तव्य याने भरलेलं असेल. त्यात तिच्या मनात असणाऱ्या प्रेम भावनेसारख्या कोमल भावनांचा आपल्या मनात मागमूसही नसेल. मग का वळून पाहायचं? .........आणि मग कंस मामाचा वध; कौरव-पांडव युद्ध; अशा अनेक विधिलिखित घटना पार पाडत त्याने द्वारका वसवली...... मग मात्र तो विसावला. 

 आज समुद्र किनाऱ्यावर शांत मनाने फिरताना उतरत्या सूर्य किरणांमध्ये त्याच्या मनातली तिची आठवण परत नव्याने जागी झाली होती. आता या निवांत क्षणी त्याला ती हवी होती... त्याची दमदार पावलं समुद्रकिनाऱ्यावरच्या शुभ्र मऊशार वाळूतून स्वतःचं अस्तित्व उमटवत तिला शोधत होती. वाऱ्यावर उडणारं त्याचं गुलाबी उत्तनिय तिची आठवण करून देत होत...... उचंबळून येणाऱ्या लाटा तिच्या खळाळत्या हास्याची आठवण करून देत होत्या आणि परत मागे वळताना तिच्या शेवटच्या भेटीचा क्षण त्याच्या मनात जागवत होत्या. त्याच्या बासरीची आर्त लकेर तिला साद घालत होती.

मात्र आता ती येणार नव्हती... त्याने अगदी हृदयातून साद घातली तरी!!! आणि.... आज त्या शांत समुद्र किनाऱ्यावर त्या जगद्नियंत्या द्वारकाधिशाला 'ति'च्या शेवटच्या अर्ध्या वाक्याचा अर्थ लागत होता......