Friday, December 31, 2021

अनाहत सत्य (भाग 5)

अनाहत सत्य

भाग 5

निर्मिती आत शिरली आणि तिच्या लक्षात आलं की सर जागेच आहेत.

"सर? जागे आहात तुम्ही?" तिने काहीसं अवघडून सरांना विचारलं.

"हो! म्हणजे थोड्या वेळापूर्वी जाग आली. तू आत येत होतीस आणि परत मागे वाळलीस न तेव्हा..." सर शांतपणे म्हणाले.

"अरे!? मग तुम्ही बाहेर का नाही आलात?" निर्मितीने आश्चर्याने विचारलं.

"मी आलो असतो तर कदाचित मिठठू बोलायचा थांबला असता आणि सगळंच माझ्यावर सोडून निघून गेला असता. खरं तर माझी इच्छा होती की त्याने तुला स्वीकारावं. फक्त त्यानेच नाही तर... त्यासर्वांनीच." सर उठून बसत म्हणाले.

"सर्वांनी म्हणजे या कबिल्यातल्या सर्वांनी न सर?" निर्मितीने विचारलं.

"अहं! हा कबिला आणि त्यांचा मुखीया हे केवळ नाममात्र ग. खरे ते कोणी वेगळेच आहेत." सर शांतपणे म्हणाले.

निर्मितीला काही कळत नव्हतं सर काय म्हणत आहेत.... त्यामुळे ती काही एक न बोलता सर जे बोलत होते ते ऐकत होती.

"निर्मिती.... मिठठू जे बोलत होता ते काही तंद्रीमध्ये किंवा झोपेत नाही.... तो जाता-जाता म्हणाला ना की तो परवानगी घ्यायला जातो आहे.... मला तेच अपेक्षित होतं." सर जे बोलत होते ते अजूनही निर्मितीला कळत नव्हतं. "सर, मला काहीही कळत नाही आहे. नीट फोड करून सांगाल का प्लीज." निर्मिती म्हणाली आणि सर हसले.

"अग, मला देखील नक्की माहीत नाही. पण जे कळतंय ते सांगतो. मला हे देखील माहीत आहे की मी तुला जे सांगणार आहे ते कदाचित तुला पटणार देखील नाही.... पण आता इथवर आल्यानंतर तुला काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे. निर्मिती... बेटा.... आपण जे देऊळ बघायला जाणार आहोत ते फक्त पुराण वास्तु इतकंच नाही तर त्याहूनही खूप काही जास्त आहे." सर सावरून बसत म्हणाले.

"खूप काही जास्त? म्हणजे नक्की काय सर?" निर्मिती पूर्ण बुचकळ्यात पडली होती.

"निर्मिती.... ते मंदिर म्हणजे एका वेगळ्या जगाचा मार्ग आहे... किंवा सुरवात आहे.... किंवा... असंच काहीतरी आहे. मला देखील नक्की सांगता येणार नाही. कारण अजून मी देखील चाचपडतो आहे. तुला आठवतं का या मंदिरासंदर्भात माहिती सांगताना तुला मी सांगितलं होतं की ते जे काही मंदिर सदृश आहे तिथून एका गूढ अस्तित्वाची सुरवात आहे. तिथे पूर्वी कदाचित् अनेक युगांपूर्वीची संस्कृती नांदत असावी असा माझा कयास आहे. परंतु अजूनही मी याविषयी खूपच शाशंक असल्याने कोणाकडेही फारसं बोललेलो नाही.  हा परिसर घनदाट झाडांनी आच्छादलेला आहे. त्यामुळे भर दिवसा देखील तिथे फारसा उजेड नसतो. त्यात तिथेल्या आदिवासींमध्ये असा समाज आहे की तो एकूण भाग  शापित  आहे. मी हळूहळू त्या लोकांचा विश्वास मिळवून त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा मला समजलं की त्या आदिवासींचा अनुभव असा आहे की तिथे येणाऱ्या आपल्यासारख्या बाहेरच्या लोकांना वेड लागतं किंवा मग ते अचानक गायब होतात . अर्थात तिथल्या स्थानिकांना मात्र कधी हा त्रास झालेला नाही. त्यामुळे त्यांचा त्या भागातला वावर अगदी सहज असतो. निर्मिती.... प्रश्न हा आहे की इथल्या लोकांना तिथे जाताना काहीही त्रास होत नाही; मग बाहेरून येणाऱ्यांना तो भाग स्वीकारत का नाही? या प्रश्नाचं उत्तर अगोदर मिळवणं आवश्यक वाटल्यामुळेच मी स्वतः इथे अनेकदा येऊन माझ्या अस्तित्वाची तिथे ओळख निर्माण केली. मला यांच्यातलाच एक असल्याप्रमाणे स्वतःची ओळख निर्माण करायची होती... आणि त्याचवेळी असं कोणीतरी माझ्या सोबत हवं होतं जे या जागेसाठी नवीन असेल पण या विषयासंदर्भात नवीन नसेल." सर म्हणाले आणि निर्मितीला एक मोठ्ठा धक्का बसला.

"सर, मला तुम्ही गिनीपिग म्हणून आणलं आहात?" अत्यंत दुखावलेल्या आवाजात निर्मिती म्हणाली.

"निर्मिती, उगाच काहीतरी शब्द वापरू नकोस. तुला मी गिनीपिग करेन का? तू इथे माझ्या सोबत आहेस कारण तुला ऐतिहासिक.... पौराणिक विषयांमध्ये रस आहे. त्याच सोबत तुझा अभ्यास देखील खूप प्रामाणिक आणि फक्त पुस्तकांच्या आतला नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे जर काही वेगळं नवीन असेल तर तू लगेच ते नाकारणार नाहीस... अशी मला खात्री आहे." सर म्हणाले.

"सर, वेगळं.... नवीन.... नक्कीच नाकारणार नाही. पण अतिरंजित किंवा काहीतरी अंधश्रद्धा असली तर मात्र मी नाही स्वीकारणार." निर्मिती काहीशा स्थिर आणि गंभीर आवाजात म्हणाली.

"निर्मिती, तुला वाटतं का की काहीतरी अतिरंजित असं मी तुला सांगेन? बेटा... अंधश्रद्धा असली तर मी देखील ते मान्य करणार नाही. इथे काहीतरी वेगळं आहे. ते आपल्या नेणिवेच्या जाणिवेपलीकडे आहे." सर शांतपणे म्हणाले.

"सर.... नेणिवेच्या जाणिवेपलीकडे म्हणजे नक्की काय?" निर्मितीने विचारलं.

"निर्मिती... कधी कधी आपण विचारात गढलेले असतो किंवा तंद्रीमध्ये असतो आणि अचानक आपल्याला कोणीतरी हाक मारल्यासारखं वाटतं. म्हणजे... खरंच हाक मारली आहे असं वाटतं आणि आपण वळून बघतो; पण मग लक्षात येतं की कोणीच नाही... आणि मग आपल्याला भास झाला अशी स्वतःची समजून काढतो आपण. पण कल्पना कर... की खरंच त्यावेळी त्या व्यक्तीने आपल्याला तीव्रतेने आठवलं असेल... किंवा हाक मारली असेल तर?..." सरांना मध्येच थांबवत निर्मिती म्हणाली; "सर, होतं की असं कधी कधी.... कोणीतरी सांगतं आपल्याला की अग परवाच तुझी आठवण काढली... आणि आपल्याला आठवतं की आपल्याला देखील त्या व्यक्तीने हाक मारल्यासारखं वाटलं होतं... किंवा ती व्यक्ती अगदी तीव्रतेने आठवली होती त्याक्षणी. पण त्याचा इथे काय संबंध सर?"

"निर्मिती.... तुझ्या उदाहरणामध्ये आपल्या माहितीमधल्या व्यक्तीने आपली आठवण काढलेली असते किंवा आपल्याला हाक मारली असते असं म्हणते आहेस. मी त्याहूनही वेगळं काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो आहे. समज.... तू ओळखत नाहीस... आणि तरीही एखादी व्यक्ती किंवा एखादं अस्तित्व तुला बोलावायला लागलं तर तू काय म्हणशील त्याला?" सर निर्मितीकडे एकटक बघत म्हणाले.

सरांच्या नजरेने निमिर्ती अस्वस्थ झाली आणि त्यांची नजर चुकवत म्हणाली; "सर, हे काहीतरी विचित्र आहे. म्हणजे तुमचा प्रश्नच मला कळला नाही आहे. जर मला ओखत नाही तर का कोणी मला हाक मारेल?"

"निमिर्ती तुला कळलं नाही आहे मी काय म्हणतो आहे.... तू ओखत नाहीस.... पण जर ती व्यक्ती..... ते अस्तित्व तुला ओळखत असेल तर? एका वेगळ्याच मितीमध्ये तुला हाक मारली असेल त्या अस्तित्वाने तर? तू तुझ्याही नकळत ओ दिली असलीस तर?" सर अजूनही निर्मितीकडे एकटक बघत बोलत होते.

"सर.... मी ओखत नाही.... पण तरीही जर कोणी मला हाक मारत असेल तर कदाचित मी उत्तरच देणार नाही. हे झालं सर्वसाधारणपणे सर्वसामान्य परिस्थितीतलं माझं वागणं. पण मला कळतंय की तुम्ही सर्वसामान्य परिस्थितीबद्दल बोलत नाही आहात. तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते मला नीट फोड करून सांगाल का सर? कारण तुमच्या या बोलण्याने मी अस्वस्थ होते आहे... आणि खूपच गोंधळून गेले आहे. मुळात मला असं वाटायला लागलं आहे की तुम्ही आणि मिठठूने मिळून मला मुद्दाम इथे आणलं आहे. सर, माझा तुमच्यावर विश्वास आहे... अगदी डोळे मिटून मी तुमच्या सोबत कधीही कुठेही येईन. पण तरीही आत्ता आपल्यामध्ये जो संवाद होतो आहे... त्यामुळे मी खूप अस्वस्थ होते आहे." निमिर्ती स्पष्टपणे बोलली.

तिचं बोलणं ऐकून सर मनापासून हसले आणि म्हणाले; "निर्मिती तुझा माझ्यावर विश्वास आहे हे मला माहीत आहे. मुळात तुला अस्वस्थ करण्याचा किंवा गोंधळवून टाकण्याचा माझा उद्देश नाही; पण खरं सांगू का? मला देखील कल्पना नाही की नक्की काय सांगावं तुला. माझे त्या भागाविषयीचे अनुभव हे केवळ माझ्या आतेंद्रियांना जाणवणारे आहेत. काहीतरी वेगळं आहे तिथे. म्हणजे कसं ते सांगतो.... कधी कधी आपण सरळ समोर बघत असतो; पण डोळ्यांच्या कडेला काहीतरी हालचाल जाणवते आपल्याला जी आपल्या मागे किंवा अगदी दूर झालेली असते. अनेकदा आपला त्या हालचालीशी संबंध देखील नसतो; पण केवळ आपल्याला डोळ्यांच्या कडांकडून जाणवत आणि आपण वळून बघतो... पण आपण वळलो की आपला संबंध नाही त्याच्याशी. त्या भागात गेलं की असं काहीसं जाणवत राहातं मला. काहीतरी असतं तिथे... जे घडत असतं. मला जाणवतं देखील... पण तरीही मी त्यातला भाग नसतो... किंवा अजून तरी नाही. पण तरीही मी तिथे असावं; किंवा असं म्हणूया की माझं अस्तित्व तिथे असलंच पाहिजे अशी त्या डोळ्यांच्या कडांकडच्या हालचाली करणाऱ्यांची इच्छा असावी."

सरांचं बोलणं निर्मिती मनापासून ऐकत होती. ते बोलायचे थांबले तशी ती म्हणाली; "सर, म्हणजे तुमचा sixth sence तुम्हाला जाणवतो का तिथे गेल्यावर?"

"Excatly निर्मिती! मी तिथे असण्यात त्यांना काही प्रॉब्लेम नाही; पण माझं असणं हे केवळ कार्यकारण भाव आहे; असं देखील मला जाणवतं ग." सर म्हणाले.

"म्हणजे काय सर?" निर्मितीने नकळून विचारलं.

"अग, म्हणजे त्यांना माझ्याकडून काहीतरी अपेक्षा आहे; म्हणून माझं तिथे असणं ते स्वीकारत आहेत; असं मला जाणवतं सतत." सर म्हणाले.

"सर पण हे ते जे कोणी आहेत... ते कोण? ते तर सांगा न. मी अजूनच गोंधळून जाते आहे." निर्मिती न राहून म्हणाली.

सर उठून तिच्या जवळ येऊन बसले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले; "बाळ निर्मिती, मला देखील अजून ते कळलेलं नाही. पण हे नक्की की मला आतून असा एक संकेत जाणवला की मी तुला घेऊन आलं पाहिजे इथे. म्हणूनच मी तुला विचारलं. अर्थात तू जर नाही म्हणाली असतीस तर मी तुला आग्रह केला नसता. पण का कोण जाणे मला खात्री होती की तू नाही म्हणणार नाहीस. निर्मिती, कदाचित मी तुला इथे आणण्याचा एक दुवा असेन. किंवा आपण दोघांनी एकत्र इथे असणं ही त्यांची गरज असेल."

निर्मिती सरांच्या बोलण्याने काहीशी अस्वस्थ झाली होती. सरांच्या ते लक्षात आलं. परत एकदा स्वतःच्या बिछान्याकडे वळत सर म्हणाले; "आत्ता फार विचार नको करुस निर्मिती. कदाचित मी देखील तुला नीट समजावू शकत नाही आहे. मिठठू जाताना काय म्हणाला ते आठव... तो परवानगी घेऊन येतो म्हणून सांगून गेला आहे न. याचा अर्थ कदाचित मी जे माझा sixth sence म्हणतो आहे... माझ्या अतींद्रिय जाणिवा..... ते खरं असेल. त्या मंदिराच्या जवळ जे काही आहे... ते इथल्या लोकांना माहीत आहे; जाणवतं आहे किंवा कदाचीत त्यांचा त्याच्याशी सहज संपर्क देखील आहे. त्या आपल्याला माहीत नसलेल्या कशाची तरी.... आपल्या सोयीसाठी आपण त्याला अकल्पित शक्ती म्हणू.... तिची परवानगी घ्यायला गेला आहे मिठठू. म्हणजे नक्की कसली परवानगी हे मला विचारू नकोस... कारण मला देखील ते माहीत नाही. पण बेटा एक नक्की की आपण एका वेगळ्या परिस्थितीमध्ये शिरतो आहोत. मात्र माझ्यावर एक विश्वास ठेव निर्मिती; मी तुला कोणत्याही अडचणीत टाकणार नाही."

खूप शांत आणि हसऱ्या आवाजात निर्मिती म्हणाली; "सर, मी मगाशीच म्हंटलं की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला स्वतःची कोणतीही काळजी नाही. फक्त सत्य आणि अतिरंजित यामध्ये आपण सत्याचा स्वीकार कायम केला पाहिजे हा माझा आग्रह आहे आणि राहील."

तिच्याकडे बघत मोकळेपणी हसत सर म्हणाले; "अगदी मान्य निर्मिती. माझं देखील कायमच हे म्हणणं राहिलं आहे. बरं, आता थोड्यावेळ पड बेटा तू. घड्याळात बघितलंस तर पाहाट होण्याची वेळ झाली आहे हे तुझ्या लक्षात येईल. पण इथे तसही खूप उजाडलं असं होत नाही.... अगदी दिवस वर येईपर्यंत. एकतर तुझं पूर्ण रात्र जागरण झालं आहे; जे एका अर्थी बरं झालं... पण आता तसही मिठठू परत येइपर्यंत आता आपल्याला करण्यासारखं काहीही नाही. त्यामुळे आपण दोघेही परत एकदा झोपुया. इथून निघाल्यानंतर पुढे काय काय घडणार आहे ते आपल्या हातात नाही; किंबहुना आपल्याला माहीत नाही किंवा आपण कल्पना देखील करू शकणार नाही. त्यामुळे आपलं मन आणि शरीर फ्रेश असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे झोप तू. मी पण परत एकदा झोपतो आहे."

असं म्हणून सर परत एकदा आडवे झाले आणि त्यांनी डोळे मिटून घेतले. सरांकडे एकदा एकटक बघून निर्मिती देखील तिच्या अंथरुणावर जाऊन पडली. विचार करता करता नकळत निर्मितीला झोप लागली... अगदी गाढ!

क्रमशः

Friday, December 24, 2021

अनाहत सत्य (भाग 4)

 अनाहत सत्य

भाग 4



भाग 4

"दीदी....." परत एकदा मागून मिठठू ची हाक ऐकून निर्मिती बाहेर आली.

"क्या हुवा मिठठू?" त्याच्याकडे बघत तिने विचारलं.

"दीदी, तुम्हाला प्रश्न पडला असेल नं की मला इतकी माहिती कशी? मी मराठी कसं बोलू शकतो? असंही वाटत असेल की सरांना यातील काहीही माहीत नाही? दीदी, एक सांगू.... सरांना सगळं माहीत आहे. माझी तर खात्रीच आहे की त्या मंदिराचं गूढ देखील त्यांनी शोधलं आहे. किंवा किमान त्यांना अंदाज आला आहे; तिथे नक्की काय आहे त्याचा." मिठठू परत एकदा जवळच्या दगडावर बसत म्हणाला.

निर्मितीच्या लक्षात आलं की आज मिठठू मनातलं सगळं बोलून टाकायच्या मनस्थितीत आहे. तिला देखील अनेक गोष्टी समजून घ्यायची इच्छा होती. त्यामुळे ती देखील त्याच्या समोर बसली आणि म्हणाली; "मिठठू, हे खरं आहे की तू इतकं चांगलंमआराठी कसं बोलू शकतोस; हा प्रश्न मला सतावतो आहे. पण तुला इतकी सगळी माहिती कशी... हा प्रश्न नाही आला मनात. उलट कौतुक वाटलं. तू ज्या परिस्थितीमधून पुढे आला आहेस; त्याचा बाऊ न करता तू जिद्दीने अभ्यास करतो आहेस हेच सिद्ध होतं तुझ्याकडे असणारी माहिती ऐकून."

".... आणि दीदी, मी जर तुम्हाला म्हंटलं की माझ्याकडची माहिती मी पुस्तकातून नाही वाचलेली; तर?" स्थिर आवाजात मिठठू म्हणाला. निर्मितीला त्याचा चेहेरा चांदण्यामध्ये अगदीच अस्पष्ट दिसत होता. तरीही त्याचे चमकणारे डोळे तिला काहीतरी वेगळी जाणिव करून देत होते.

"मिठठू थोड्या वेळापूर्वी तर तू म्हणालास की तू मला जरुरी पेक्षा जास्त माहिती दिली आहेस... आणि तरीही तू परत एकदा मला स्वतः हाक मारून बोलतो आहेस. असं काय आहे की जे तुझ्या ओठांपर्यंत येतं आहे पण तू मागे ढकलतो आहेस? तू जर बोललास तर कोणी तुला शिक्षा करेल अशी भीती आहे का तुला?" निर्मितीने त्याला विचारलं.

"भिती का मतलब हम कोई भी नही जानते दिदी. हम हमारे आजूबाजू की इस खूबसुरत दुनिया के साथ मिलजुलकर रेहेना जानते है... और चाहते भी है. हमरा बस चले तो यहा किसींको भी न आने दे हम." मिठठू तंद्रीमध्ये बोलत होता.

"पण तू स्वतःच तर सरांना बोलावून घेतलं आहेस न...." निर्मितीने त्याला अचानक प्रश्न केला.

"वो संकेत मुझे मिला और फिर मैने मुखीया को समझाया... वो मान गाये और मैने सर से बात की. मुझे..." मिठठू त्याच तंद्रीत बोलून गेला आणि बोलता बोलता थांबला.

"दिदी....."

"मिठठू, आत्ता तू मला जे जे सांगशील ते फक्त तुझ्या माझ्यात राहील हा शब्द देते मी तुला. पण मोकळेपणी बोल. एक लक्षात घे की तुझी माहिती कदाचित आम्हाला उद्या ते मंदिर बघताना उपयोगी पडेल." त्याच्या जवळ सरकून त्याचा हा अत्यंत प्रेमाने हातात घेत अगदी मऊ शब्दात निर्मिती म्हणाली.

"दिदी.... मुझे मालूम था की एक दिन आप आओगे. म्हणजे तुम्ही.... निर्मिती.... येणार असं नव्हतं माहीत. पण मला जो संकेत मिळाला होता... त्यात दोन व्यक्ती अपेक्षित होत्या. अनेक महिने एकटे सर येत होते... त्यामुळे मी अलीकडे अस्वस्थ झालो होतो. मला संकेत कळला नाही की काय; असं वाटायला लागलं होतं. पण तुम्हाला बघितलं आणि लक्षात आलं की तुम्हीच ती दुसरी व्यक्ती आहात. दिदी, मला फार काही माहीत नाही.... पण तुमचं आयुष्य नक्की बदलणार आहे इथून जाताना; हे मला माहीत आहे. मुख्य म्हणजे इथून तुम्ही वेड न लागता जाणार आहात याची मला खात्री आहे." मिठठू म्हणाला. त्याच्या बोलण्याने निर्मिती थोडी दचकली आणि तिने मिठठूला विचारलं; " तू नक्की काय म्हणतो आहेस मिठठू?"

"दिदी, तुम्हाला सरांनी सांगितलं नाही का मंदिराचं सत्य? मला माहीत आहे; नक्की सांगितलं असेल. कारण प्रोफेसर सर कोणालाही इथे फसवून आणणार नाहीत. ते तसे आहेत; म्हणूनच तर मी त्यांनाच कॉन्टॅक्ट केलं. नाहीतर आज त्यांच्याहूनही जास्त शिकलेले आणि माहिती असलेले अनेक तरुण प्रोफेसर्स आहेत की. पण ते मंदिर बघताना हुशारी आणि माहिती असणं जसं आवश्यक आहे तसच भावनिकता देखील महत्वाची आहे. मुळात आम्ही इथे राहाणारे सगळे आदिवासी आजही केवळ भावनिकतेवरच तर जगतो आहोत. " मिठठू म्हणाला.

निर्मितीला त्याच्या बोलण्याचा काहीच अर्थ लागला नाही. "काय म्हणतो आहेस तू मिठठू? मंदिराचं सत्य? नाही रे! सरांनी मला असं काहीच वेगळं सांगितलं नाही." निर्मिती गोंधळून म्हणाली.

"दिदी, नीट आठवा.... सरांनी तुम्हाला सांगितलं असेल की इथे येणारे लोक एकतर वेडे होतात किंवा गायब होतात."

"हो! हे त्यांनी सांगितलं होतं मला. पण हे सगळं इथल्या लोकांनी पसरवलेलं असेल न. त्या देवळापाशी सहसा कोणी जाऊ नये म्हणून." निर्मिती अजूनही गोंधळलेलीच होती.

"होय दिदी! थोडं पसरवलेलं आहे. पण मुळात काहीतरी असेल म्हणून तर धूर काढू शकतो आहोत आपण." मिठठू म्हणाला.

"मिठठू, तू कोड्यात बोलणं बंद करशील का जरा? नीट काय ते सांग मला." निर्मिती काहीशी वैतागत म्हणाली.

"दिदी, मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला म्हंटलं न की या भागात जे होमो सेपियन्स आले आणि मग नाहीसे झाले.... ते जर नाहीसे झालेच नसतील तर?" मिठठू म्हणाला.

निर्मिती क्षणभर शांत राहिली आणि मग बोलायला लागली; " मिठठू, तू उगाच माझ्या मनात साशंकता निर्माण करतो आहेस असं आता मला वाटायला लागलं आहे. कारण तू जे म्हणालास की होमो सेपियन्स इथे आले आणि मग गायब झाले... तर ते तसं फारसं खरं नाही. कारण... तू इथेच राहातो आहेस. तुमच्या या कबिल्याप्रमाणे इथे अनेक कबिले आहेत.... अगदी नरभक्षक देखील आहेत खोल जंगलात. हे कोण आहेत असं तुला वाटतं? अरे आपण सगळेच त्या होमो सेपियन्सचे वंशज आहोत. हे बघ मिठठू..... होमो सेपियन्सची उत्पत्ती तू थोड्या वेळापूर्वी मला सांगत होतास न तेव्हा मला तुझं खूप कौतुक वाटत होतं. म्हणून मी तुला अडवलं नाही. पण अरे माझा अभ्यासाचा विषयच मानव जन्म आणि आपला इतिहास हा आहे.

मिठठू, साधारण 13.5 बिलियन वर्षांपूर्वी एक माहास्फोट झाला आणि वेळ, ऊर्जा, अवकाशआणि पदार्थ अस्तित्वात आले. त्यानंतर देखील साधारण चार बिलियन वर्षांपूर्वी आपल्या या ग्रहावर काही विशिष्ठ रेणू विशिष्ठ ऊर्जेच्या संपर्कात आले आणि त्यातून सजीव निर्माण झाले. मग कधीतरी साधारण 70000 वर्षांपूर्वी या सजीवांमधल्या होमो सेपियन नावाच्या एका प्रजातीने अजूनच गुंतागुंतीची आणि विस्तृत रचना तयार केली, तिला संस्कृती म्हटलं जातं, या संस्कृतींचा अभ्यास म्हणजे इतिहास. अर्थात हा एक सिद्धांत आहे. सिद्धांत म्हणजे नियम नाही... एखाद्या निरीक्षकाच्या अनेक निरीक्षणांचा तपासून सिद्ध करता येईल असा संच म्हणजे सिद्धांत. आपले पूर्वज.. ज्यांचा उल्लेख तू केलास... होमो सेपियन्स... ते होमो सेपियन्स निर्माण होण्या अगोदर अनेक संक्रमणं झाली हे तुला माहीत आहे का?

होमो सेपियन्सचे चुलत भाऊ... म्हणजे होमो सेपियन्स मधील नर किंवा मादी आणि अजून एक प्रजाती यांच्या संक्रमणातून हे चुलत भाऊ निर्माण झाले होते. त्यांना होमो निअंडरथल म्हणतात. आपल्याहून ताकदवान, मोठा मेंदू असणारे मानव होते ते. अगदी तीस हसज वर्षांपूर्वीपर्यंत ते आपल्या सोबत या ग्रहावर नांदत होते. त्याच्या प्रमाणेच होमो सेपियन्सचे अनेक इतर भाऊ.... म्हणजे होमोच्या प्रजाती होत्या. होमो फ्लोरिसीएनसिस, होमो हबिलीसहोमो, हैडेलबेग्रेसीस, होमो नालेंदी, होमो निअंडरथलेसिस असे अनेक होते. आपण मुळात माकडांपासून नाही बनलो; तर माकड सदृश प्राण्यापासून उत्क्रांत झालो आहोत. त्या प्राण्यापासून एक शाखा मानव बनली आणि दुसरी माकड.

मिठठू, अरे विचार कर, जर आपण फक्त माकडापासून उत्क्रांत झालो असतो तर माकडं आज असती का? त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की; जेंव्हा एखादी नवीन स्पिसिज या भूतलावर येते तेंव्हा काही हजार/ लाख वर्ष ती ज्या प्रजातीपासून फुटून वेगळी झालीय ती प्रजातीही या जगात असते, त्या काळात हि नवीन तयार झालेली प्रजाती आपल्या मूळ प्रजातीबरोबर सतत संकर करत असते कारण त्यांची गुणसूत्र जवळ जवळ सारखी असतात, आणि अशा कित्येक प्रजाती तयार होत असतात. काही काळात जर हि नवीन प्रजाती मूळ प्रजातिपेक्षा जगण्याच्या शर्यतीत यशस्वी ठरली तर ती जुन्या प्रजातीत आपले सगळे जीन्स पसरवून टाकते आणि जुनी प्रजाती नामशेष होते.

तसे आपल्यातले जे होमो जुळवून घेऊ शकले नाहीत ते नष्ट पावले आणि ज्यांनी बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये स्वतःला बदललं ते त्यांची उत्क्रांती होत राहिली. होमो सेपियन... म्हणजे आपला पूर्वज हा इतर सर्व प्रजातीपासून वेगळा झाला कारण त्याने बदलत्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार स्वतःच्या जनुकीय उत्पत्ती मध्ये केला. आपल्या पूर्वजासोबत ज्या इतर जाती होत्या किंवा असं म्हणू की जे होमो होते त्यांनी होणारे बदल एकतर स्विकारले नाहीत किंवा त्यांच्यात जनुकीय बदल टिकले नाहीत; किंवा हे बदल काही प्रजातींना झेपले नाहीत. त्यामुळे पुढे कालौघात या जाती नष्ट पावल्या .

पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की Nature is enormous but not intelligent. त्यामुळे सर्वसाधारणपणे जगण्यासाठीचे बदल हे आपोआप होत गेले. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर... आपल्या हाताच्या अंगठ्याचे बोटं इतर चार बोटांपेक्षा दूर असले तर आपली पकड अजून मजबूत होईल हे आपल्या पूर्वजाला माहीत नव्हतं, पण अपघाताने असा एखादा जन्माला आला, मग या सोयीमुळे तो जास्त जगला, त्याला जास्त मुलं झाली आणि हळूहळू आपल्या सगळ्यांचे अंगठे माकडांना ठेंगा दाखवण्या इतपत बदलले." निर्मिती स्वतःच्याच तंद्रीमध्ये बोलत होती. पण अचानक तिला भान आलं आणि बोलायचं थांबवून तिने मिठठूकडे बघितलं.

"कंटाळलास ना मिठठू? मी पण बघ न कुठे तुला काहीसा कंटाळवाणा इतिहास... माहिती देत बसले आहे." हसत निर्मिती म्हणाली.

"दिदी, असं नका म्हणू. ही सगळीच माहिती माझ्यासाठी नवीन नाही. पण तरीही तुम्ही ती ज्या पद्धतीने समजावता आहात न... त्यातून मला काही वेगळेच अर्थ लागायला लागले आहेत. दिदी, तुम्ही इतक्या मनापासून आणि मोकळेपणी बोलता आहात की वाटतं तुमच्याशी असंच बोलत राहावं. खर सांगू का? माझ्या मनात खरंच खूप काही आहे... जे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं आहे. सर माझ्याहून वयाने खूपच मोठे आहेत. त्यामुळे इच्छा असूनही त्यांच्याशी बोलताना एक दडपण येतं... आणि माझ्या सोबतचे इथले जे आहेत... त्याच्या स्वतःच्या अशा काही कल्पना आहेत... विचार आहेत... त्यामुळे ते मला समजून घेऊ शकत नाहीत; असं मला वाटतं. दिदी; इथली काही सत्य आहेत... जी मी तुम्हाला सांगणार आहे.... पण त्यासाठी मला वेगळी परवानगी घ्यावी लागेल. त्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. तुम्ही असं काही करू शकता का... की आपण उद्याच्या ऐवजी परवा जाऊ मंदिराकडे?" मिठठू अगदी मनापासून बोलतो आहे हे निर्मितीच्या लक्षात आलं. त्याच्याकडे बघत हसत निर्मिती म्हणाली; "अरे अगदी सोपं आहे. तू उद्या नको येऊस आम्हाला घ्यायला... म्हणजे तुझी वाट बघत आम्ही थांबून राहू आणि उद्याचा दिवस टाळता येईल."

तिचं बोलणं ऐकून मिठठू हसला आणि म्हणाला; " दिदी, तुम्ही अजून सरांना ओळखलं नाही वाटतं? त्यांना माझी गरज नाही देवळाकडे जायला. इथवर येण्यासाठी देखील... मी म्हणजे एक सोबत असतो... वाटाड्या नाही. दिदी, एक सांगू? सरांनी काहीतरी नक्की शोधून काढलं आहे... पण ते अजून त्यावर काही बोलत नाही आहेत. कदाचित त्यांना स्वतःची खात्री करून घ्यायची असेल... कदाचित म्हणूनच त्यांनी तुम्हाला इथे आणलं असेल. म्हणूनच म्हणतो आहे; की त्यांना माझी गरज नाही आहे... त्यात एकदा सरांनी स्वतःचं शेड्युल ठरवलं की ते कोणाचंही ऐकणार नाहीत. म्हणून विचारलं तुम्हाला की अगदी त्यांना पटेल असं कारणच सांगावं लागेल त्यांना. तुम्हाला बरं वाटत नाही असं काही सांगू नका... ते त्यांना पटणार नाही. किंवा मग तुम्हाला सोडून ते निघतील." एका दमात मिठठू बोलला.

निर्मितीला त्याचं म्हणणं पटलं आणि ती देखील हसली. काही क्षण विचार करून ती मिठठूला म्हणाली; "मिठठू, खोटं बोललेलं कायमच पकडलं जात आणि त्याचे परिणाम फार वाईट होतात.... आणि खरं सांगितल्याने कदाचित समोरची व्यक्ती दुखावली जाते किंवा नाराज होते... पण आपण समजून काढू शकतो. त्यामुळे मला वाटतं उद्याचा एक दिवस थांबून आपण परवा देवळाकडे जायला निघुया हे सत्य आपण सरांना सांगितलं पाहिजे. मला खात्री आहे... त्यांना हे पटेल. कोणतीही रिस्क घेऊन ते काही करणार नाहीत."

मिठठूला देखील निर्मितीचं म्हणणं पटलं आणि त्याने हसून मान डोलावली. असेच काही क्षण गेले आणि मिठठूने निर्मितीला विचारलं; "दिदी, आपले पूर्वज होमो सेपियन्स होते... म्हणजे आपली जनुकं त्यांच्यातील बदलांमुळे निर्माण झालेली आहेत. पण मला हे कळत नाही की तुम्ही आत्ता जी नावं संगीतलीत ते सर्व होमो म्हणजे मूलतः एकच तर होते. मग हे असे बदल कसे होत गेले?"

त्याच्या प्रश्नाचं निर्मितीला कौतुक वाटलं. तिला वाटलं होतं की एव्हाना मिठठूला कंटाळा आला असेल तिच्या या माहितीपूर्ण बदबडीचा... त्यामुळे हसून ती म्हणाली; "अरे अगदी सोपं आहे हे समजायला... हे बघ; एकत्र कुटुंबातून जेंव्हा एखादं जोडपं वेगळं निघून स्वतःच घर करतं, तेंव्हा त्याचे काही टप्पे असतात, सुरवातीला झोपायची खोली वेगळी होते, मग वस्तू वेगळ्या होतात, हळूहळू चूल वेगळी होते आणि मग ते कुटुंब वेगळं घर म्हणून ओळखलं जातं. निसर्गात जेंव्हा एखादी नवीन प्रजाती तयार होते, तेंव्हा अर्थातच ती एकदम अवतीर्ण होतं नाही. तिचे कुणीतरी पूर्वज असतात, या पूर्वजांपासून एकाच वेळी अनेक प्रजाती फुटून जगात येण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थातच या सगळ्या प्रजाती आपल्या पूर्वजाशी आणि एकमेकांशी अत्यंत सारख्या असतात. त्या एकमेकांशी सहजपणे संकर करू शकतात, त्यांना अपत्य होऊ शकतात आणि त्या अपत्यांनाही पुढे संतती होते. उत्क्रांतीचा हा प्रवाह असा एखाद्या पाण्याच्या अनिर्बंध लोंढ्यासारखा ज्या दिशेने वाट मिळेल तिकडे सुसाटत पुढे जात असतो. पण एक लक्षात घे की ही प्रक्रिया लाखो वर्ष घडत असते. आपल्याही नकळत.... पण उत्क्रांती होत असते.

ही उत्क्रांती कशी होते हे जर तुला समजून घ्यायचं असेल तर तुला गेली अब्जावधी वर्ष कसे बदल होत गेले हे समजून घ्यावं लागेल. हे बघ.... मानवी कळपात आणि माकडांच्या/लांडग्यांच्या कळपात लाखभर वर्षांपूर्वीपर्यंत फक्त एक महत्वाचा फरक होता, तो म्हणजे मानवाने आगीवर नियंत्रण मिळवले होते.

काही काळानंतर बहुदा मानवाने स्वतःहून जंगलांना आगी लावायला सुरवात केली. जाळलेलं जंगल म्हणजे जणू मानवाचं पहिलं स्वयंपाकघर होतं. जमिनीत गाडलेली अनेक कंदमुळं, बिळात लपलेले प्राणी हे जंगल पेटताच आयती शिकार होऊन मानवाच्या हाती सापडू लागले. पण आगीने अजून महत्वाची गोष्ट केली जी अन्यथा शक्य नव्हती. जे अन्न मानव कच्च खाऊ शकत नव्हता, तेही त्याला भाजून खाणं शक्य झालं.

अग्नीचे नियंत्रण करू शकणारा मानव आणि इतर प्राणी यांच्यात हळू हळू एक दरी तयार होतं गेली. बहुतेक प्राणी त्यांच्या जीवितासाठी स्वतःच्या शक्तीवर अवलंबून राहतात पण मानव मात्र बाहेरची साधनं वापरू लागला, अगोदर अग्नी आणि मग हत्यारं..

अनेक शास्त्रज्ञांच्या मते, अग्नीने अजून एक महत्वाचा बदल मानवी शरीरात घडवला, भाजलेले आणि पचायला हलके अन्न खायला लागल्यावर मानवाला खूप मोठ्या आतड्याची गरज उरली नाही. त्यामुळे मानवाचं आंतडं हळूहळू आकसायला लागलं. शरीरातल्या दोन अवयवांना खूप जास्त ऊर्जा लागते, एक म्हणजे आतडी, दुसरा मेंदू. आतडी लहान व्हायला लागली तशी हि वाचलेली ऊर्जा मेंदूकडे वळवली गेली, या उपलब्ध फ्री ऊर्जेमुळे हळूहळू मानवी मेंदूचा आकार वाढायला लागला. मानव एका वेगळ्या वाटेवर चालायला लागला.

मिठठू कदाचित तुला हे समजणं सोपं जाईल की ;मोठ्या मेंदूमुळे सगळ्यात जास्त नुकसान सुरवातीच्या काळातल्या स्त्रियांचं झालं. कारण आजही अनेक आदिवासी जातींमध्ये मोठ्या डोक्याची अर्भक जन्मतात. तू अशी अनेक उदाहरणं बघितली असशील. यात आपण एक समजून घेणं आवश्यक आहे की एकतर मनुष्य हा दोन पायांवर चालणार प्राणी, त्यामुळे मनुष्य प्राणाच्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा आकार मर्यादित, त्यात लहान कटीभाग. या छोट्या जागेत या स्त्रियांना अशी बाळं वाढवायची होती ज्यांचा मेंदू सतत मोठा होतं होता आणि मेंदू बरोबरच डोकं.. हे मोठं डोकं असलेली मुलं शरीराबाहेर काढणं हे मानवी स्त्रीसाठी प्रचंड कठीण काम आहे. आजही मानवी स्त्रीइतक्या प्रसववेदना प्राणीजगतातली कोणतीही मादी बहुदा सहन करत नाही. त्या सुरवातीच्या काळात बहुदा कित्येक मुलं आणि स्त्रिया बहुदा अशाच मेल्या असाव्या.

या समस्येवर उत्क्रांतीच्या चक्रात एक तोडगा मिळाला, अशा स्त्रिया, ज्यांची मुलं अपुरी वाढ झालेली असतानाच जन्माला यायचे, त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या जगण्याची शक्यता वाढली. भले अपुरी वाढ झाली असल्याने बऱ्याच मुलांचे बालमृत्यू होतं असतील पण आईचा मृत्यू होण्यापेक्षा हे चांगलं. त्यामुळेच बाळाचा मेंदू आणि डोकं लहान असतानाच मानव प्राणी त्याला जन्म देऊ लागला. आजही आपण तुलना केल्यास मानवी बाळं खूप जास्त काळ आपल्या आई वडिलांवर अवलंबून असतं, याच साधं कारण हे आहे की ते मुळातच अविकसित अवस्थेत जन्माला येतं.

प्राण्याचे अन्नसाखळीतील स्थान तो हि ऊर्जा आपल्या शरीरात कोणत्या टप्प्यावर ग्रहण करतो, आणि त्याच्या कडून हि ऊर्जा कोण काढून घेते यावर ठरते. वाघ सिंहासारखे मांसाहारी प्राणी या पृथ्वीवर आल्यापासून या अन्नसाखळीत सर्वोच्च स्थानी आहेत. हरीण, माकडं, म्हशी असे प्राणी पहिल्यापासूनच मधल्या स्थानावर आहेत. मानव हा एकमेव असा प्राणी आहे ज्याचं अन्नसाखळीतील स्थान बदललंय. माकड आणि हरिणांबरोबर लाखो वर्ष अन्नसाखळीत मधल्या स्थानी राहिल्यावर काही हजार वर्षात मानवाने अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थान व्यापले.

आता तुझ्या लक्षात आलं का... म्हणूनच मधमाशीचं पोवळ, हरणं - म्हशी -झेब्रा यांच्या झुंडी आणि हत्ती माकडं रानडुक्कर यांचे कळप असतात...."

निर्मिती अजूनही बोलत राहिली पण तिला अडवत मिठठू म्हणाला; "दिदी, जर एकूणच उत्क्रांती सगळ्याच होमोज मध्ये होत होती... तर केवळ होमो सेपियन्स कसे शिल्लक राहिले?"

मिठठूकडे बघत निर्मिती म्हणाली; "मिठठू, तू खरंच अगदी मनापासून ऐकतो आहेस हे कळलं मला. नाहीतर अगदी योग्य प्रश्न योग्य वेळी तू विचारला नसतास. या प्रश्नच उत्तर तसं म्हंटलं तर अगदी सोपं आणि लहानसं आहे... होमो सेपियन्स जगले आणि उत्क्रांत होत गेले... कारण इतर कोणत्याही होमोंमध्ये जे विकसित झालं नाही ते होमो सेपियन्सनी विकसित केलं होतं. एकमेकांमधील संवाद! भाषा!! इतर सर्व होमोजपेक्षा वेगळी अशी स्वतःची भाषा निर्माण केली होमो सेपियन्सनी. त्यामुळे विचारांची देवाण-घेवाण आणि होणाऱ्या प्रत्येक बदलाचा एकमेकांना सांगून केलेला स्वीकार... यामुळे होमो सेपियन्स अब्जावधी वर्षांनंतर देखील आजही आहेत आणि त्यांच्यात उत्क्रांती होत आहे."

"अगदी खरं दिदी. And here I differ with my opnion. आपली उत्क्रांती आजही होत आहे.... अंह! आता आपण अधोगतीला लागले आहोत.... आणि ही घसरणीला लागलेली गाडी त्यांच्या लक्षात आली आहे; म्हणूनच आज तू आणि सर इथे आला आहात." मिठठू खोल अंधारात बघत म्हणाला.

बहुतेक तंद्रीमध्ये किंवा झोप आली असल्याने मिठठू काहीतरी बोलतो आहे असं निर्मितीला वाटलं... तिने त्याला हाक मारली... "मिठठू... काय बोलतो आहेस तू?"

अगदी शांतपणे निर्मितीकडे नजर वळवून मिठठू म्हणाला; "दिदी, जा झोपायला. सरांना माझा निरोप दे... मी परवानगी घ्यायला जातो आहे. एक दिवस थांबा म्हणून सांग...."

इतकं बोलून मिठठू एकदम उठला आणि अंधारात सर्रकन चालत निघून गेला. काहीही कळायच्या आत निघून गेलेल्या मिठठूच्या दिशेने बघत गोंधळलेली निर्मिती तशीच बसून राहिली काही वेळ... आणि मग तो नक्की परत येत नाही हे लक्षात आल्यावर उठून झोपण्यासाठी वळली.

क्रमशः

Friday, December 17, 2021

अनाहत सत्य (भाग 3)

 अनाहत सत्य 

भाग 3

मिठ्ठुने थोड्याच वेळात प्रोफेसर आणि निर्मिती यांच्यासाठी जेवण आणलं आणि त्याचबरोबर सोबतीला एका मुलाला घेऊन आला. दोघांनी मिळून खोलीच्या मध्ये बांबूच्या सहाय्याने आडोसा केला. त्यामुळे आता त्या एका खोलीचे दोन भाग झाले होते. निर्मितीने शांतपणे तिचं समान उचललं आणि ती आतल्या बाजूला गेली. कपडे बदलून आणि जेवून घेऊन प्रोफेसर राणे आणि निर्मिती आडवे झाले. वयापरत्वे आणि झालेल्या दगदगीमुळे प्रोफेसरना लगेच झोप लागली. झोपडीच्या बाहेरून वेगवेगळे प्राण्यांचे आणि किड्यांचे आवाज येत होते. बदललेली जागा आणि दुसऱ्या दिवशी सुरु करायच्या कामाबद्दलची उत्सुकता यामुळे निर्मितीला दमली असूनही झोप येत नव्हती. तिच्या मनात विचारांची आवर्तन उठत होती.

'सर इथे गेले काही महिने येत आहेत. तरीही त्यांच्या मते फारशी प्रगती नाही झालेली. अस का बरं? सरांच्या अनुभवाचा विचार करता अजून काही मिळत नसूनही ते इथे येत आहेत म्हणजे नक्कीच त्या मंदिरात काहीतरी आहे.' विचार करता-करता निर्मितीच्या लक्षात आलं की ते मंदिर कोणत्या देवतेचं आहे किंवा कोणत्या काळातलं आहे; याबद्दल आपल्याला सरांनी काहीच सांगितलं नाही. मग तिच्या लक्षात आलं की मुद्दामच सरांनी तिला फारशी माहिती दिली नव्हती; आणि तसं त्यांनी इथे पोहोचल्यावर तिला सांगितलं होतं.

प्रोफेसर गाढ झोपले हे त्यांच्या लयीत घोरण्यावरून निर्मितीच्या लक्षात आलं आणि ती हळूच उठून दार उघडून बाहेर आली. बाहेरच्या सुंदर, शांत आणि रात्रीच्या निसर्गाने आच्छादित आकाशाकड निर्मितीचीे नजर गेली आणि ती मंत्रमुग्ध होऊन त्या शुभ्र आकाशगंगेकडे बघत उभी राहिली.

"आस्मान से चांदी बरस रही है ना बीबीजी?"

मिठठू निर्मितीच्या शेजारी कधी येऊन उभा राहिला होता ते तिला कळलंच नव्हतं. त्यामुळे त्याच्या आवाजाने ती एकदम दचकली आणि मग हसून तिने मान डोलावली. "मिठठू मै भी एक गांव मे ही पली बडी हूं. फिर भी मैने इतना सुंदर आस्मान कभी नही देखा." मिठठू हलकस हसला आणि त्याने तिला सोबत चलण्याची खुण केली आणि तो तिच्याकडे पाठ करून लगोलग चालू पडला. एकदा मागे वळून बघून मग निर्मिती देखील तिच्यामागून निघाली. फर्लांगभर चालून गेल्यावर तिच्या लक्षात आलं की रस्त्याला थोडा चढ आहे. तिचा श्वास फुलायला लागला... आणि अचानक मिठठू थांबला. तो थांबला म्हणून ती देखील थांबली. रात्रीची वेळ आणि अनोळखी प्रदेश असल्याने निर्मिती पूर्ण वेळ खाली बघत चालत होती. थांबल्यावर तिची नजर मिठठूकडे वळली. तो समोर एकटक बघत होता... आणि रात्रीची वेळ असूनही आणि मिठठू सावळा असूनही त्याच्या चेहेऱ्यावरचे मंत्रमुग्ध भाव तिला दिसले... रात्रीच्या वेळी मिठठूच्या चेहेऱ्यावरचे भाव दिसले... तिचं तिलाच हसू आलं तिच्या मनातल्या वाक्याचं. पण ते किती खरं आहे हे देखील तिला समोरच दिसत होतं. अर्ध्या सेकंदामध्ये आलेले हे सगळे विचार तिच्या मन:पटलावरून एका क्षणात पुसले गेले; कारण जिथे मिठठू बघत होता तिथे तिची नजर वळली होती.

समोर लाल, निळ्या, पिवळ्या आणि पांढरऱ्या नाजूक लहान दिव्यांच्या उजेडाने एक मोठ्ठ झाड... कदाचित वडाच असावं.... भरून गेलं होतं. ते दिवे इथे तिथे उडत होते पण झाडापासून लांब जात नव्हते. त्यामुळे टेकाडावरचं ते झाड झमझम चमकत होतं. त्या उजेडाने आजूबाजूचा परिसर व्यापून गेला होता. तोच उजेड मिठठूच्या चेहेऱ्यावर पडला होता.

"मिठठू... इस कुदरत की कमाल का वर्णन मै नही कर सकती. स्वर्ग तो यही है." निर्मिती स्थिर नजरेने त्या झाडाचं सौंदर्य मनात आणि डोळ्यात साठवत म्हणाली.

"बीबीजी, ये तो कूच भी नही है. आप जो मंदिर देखने आई हो... ऊस मंदिर के पास पोहोचते पोहोचते तो आप होश ही गवा बैठोगी. आप कुदरत का जो रूप यहा देखोगी वो कही और आप नही देख पाओगी. वैसे मैने पढा है के आस्ट्रेलिया मे भी गहरे जंगल है. लेकिन फिर भी इधर की बात कूच और है. ये मेरा प्यार नही बोल रहा है बिबीजी... यह सच्चाई है. जो इतिहास भारत का है; विशेषतः इस भगवान की भूमी का है; वह इतिहास आप को पुरी धरती पर कही नही मिलेगा. मैने पढा है के हमारे पूर्वज... मतलब होमो सेपियन्स, जो केवल बंदर की उत्पत्ती नही थे, तो किसी और दो जानवरो के संगम से बने थे; वह पैसठ हजार वर्ष पाहिले, आफ्रिका से भारतीय उपमहाद्वीप पाहुचे थे. वह पुरे भारत मे विविध क्षेत्रोमे बखर गए. जो होमो सेपियन्स यहा आए वो एक काल के बाद जैसे गायब हो गए. मात्र जो सिंधू घाटी मे, दक्षिण एशिया मे विकसित हुवे उहोने धीरे धिरे अपनी संस्कृती विकसित की. और फिर गावं और शहर की और हम चल पडे. धिरे धिरे मकान, कपडा... फिर लकडे का इस्तमाल... फिर धातू.. फिर हम तन कपडेसे ढकने लगे. फिर आई बोलने - खाने - पीने की संस्कृती. और फिर हमने.... मतलब के होमो सेपियन्स ने कभी मूड के नहीं देखा. बस प्रगती करते ही चले गये.

ऐसी संस्कृती फिर धरती के और भी भागो मे विकसित होती गयी. और फिर धिरे धिरे... बिबीजी... जैसे आप ये भूल गये हो के मैने कहा के जो होमो सेपियन्स यहा आये वो गायाब हो गये... वैसेही वो प्रगतीके नाम पे जो आगे निकल गये वो ये भूल गये की इन जंगलो मे भी उनके भाई आये थे. और अब वो नही है."

त्याचं बोलणं मन लावून ऐकताना त्याला माहीत असणाऱ्या माहितीचं मनात आश्चर्य करणारी निर्मिती त्याच्या शेवटच्या वाक्याने एकदम चमकली. त्याने केलेला उल्लेख तो बोलत असताना लक्षात आला असूनही पुढच्या त्याच्या बोलण्याच्या ओघात आपल्या मनातून एकदम निघूनच गेला की. मिठठूने आठवण करून दिल्या नंतर तिच्या लक्षात आलं ते!

त्याचा हात धरून त्याला एका दगडावर बसवत ती देखील खाली बसली. त्याच्याकडे एक टक बघत होती निर्मिती. "मिठठू... तुम्हारे मन मे एक अलग ही घुस्सा है ना? कूच केहेना तो चाहते हो लेकिन हर वक्त खुद को खिंच ले रहे हो न?" त्याच्या हातावर थोपटत निर्मिती म्हणाली. आजूबाजूला तसा अंधार होता. दूरवर चमकणारं ते जादुई झाड आणि आकाश गंगेतून बरसणारा तो चंदेरी प्रकाश! रातकिड्यांची आणि त्याच सोबत असंख्य अशा किड्यांची आणि न जाणे कोणकोणत्या जनावरांच्या आवाजाची भर... पण त्याक्षणी निर्मितीला हे काहीही जाणवत नव्हतं. त्या धूसर उजेडात मिठठूच्या चेहेऱ्यावरचे भाव समजून घेण्याचा प्रयत्न ती करत होती.

"दिदी, घुस्सा नहीं है, दुख है." अत्यंत स्थिर आवाजात मिठठू म्हणाला.

"कसलं दुःख?" निर्मितीने ओल्या आवाजात पण नकळतपणे मराठीत त्याला प्रश्न केला.

"दिदी, हे जंगल आणि इथे राहाणारे हे आदिवासी... यांना so called शहरी लोक विसरून गेले आहात; हे दुर्दैवाने सत्य आहे. ज्यांना आमच्याबद्दल काही भावना आहेत; त्या म्हणजे फक्त अशिक्षित, जंगली लोक अशाच आहेत. पण दिदी, कोणाच्याही मनात हे नाही आलं की आम्ही अजूनही हे असं इथे जंगलांमध्ये प्रगती पासून दूर स्वतःच्या इच्छेने राहात असू का?" मिठठू बोलत होता. त्याच्या अस्खलित मराठी बोलण्याचं आश्चर्य वाटून घ्यायचं की त्याच्या वयाहूनही जास्त समंजसपणे बोलण्याचं हे निर्मितीच्या लक्षात येत नव्हतं.

निर्मिती काही बोलायच्या अगोदरच मिठठूने तिला थांब अशी खुण केली आणि पुढे बोलायला लागला...

"दिदी, इस जंगल का अपना ही एक राज है. आपले असे नियम आहेत; कायदे आहेत; आणि त्याहूनही जास्त असं स्वतःला जपणं आहे. इथल्या मनुष्य प्राण्याला आता बाहेर काय चालू आहे; ते कळतंय. त्याबद्दल त्याला उत्सुकता आहे; वेगळया प्रगत जीवनाची इच्छा आहे आणि तरीही इथला आदिवासी इथे त्याच्या जन्म जागी... या जंगलाला बदलायला तयार नाही. क्योंकी हमे हमारे बचपनसे एक ही बात समजाई गयी है; के ये जो जंगल की संस्कृती है उसे किसीं भी प्रगत संस्कृती से बचाकर रखना यह हमरा प्रथम कर्तव्य आहे. और आप को क्या लगता है किसने समजाया है हर आदिवासी को ये? दिदी, आमच्या आई-बापाने नाही; याच जंगलाने संगीतल आहे. फक्त आम्हालाच नाही; तर प्रत्येक पिढीला गेली हजारो वर्षं हे माहीत आहे. अर्थात तरीही असे अनेक आहेत की जे हे समजावणं मान्य करत नाहीत... पण मग त्यांच्या बाबतीत हे जंगल देखील योग्य तो निर्णय घेतंच."

मिठठूचं बोलणं ऐकून निर्मिती आश्चर्यचकित तर झालीच पण त्याहूनही जास्त गोंधळून गेली. त्याच्याकडे बघत आणि त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव समजून घेण्याचा प्रयत्न करत निर्मिती म्हणाली; "मिठठू, तू नक्की काय सांगतो आहेस? अरे तू स्वतः शिक्षण घेतो आहेस. तूच स्वतः सरांना फोन करून इथे बोलावलं आहेस; गूढ उकलण्यासाठी. आणि तरीही तू म्हणतो आहेस की इथे या जंगलांमध्ये प्रगतनशीलता स्वीकारली जात नाही. ते ही केवळ हे जंगल तुम्हाला तसं सांगत म्हणून? मला काहीच कळत नाही आहे."

"दिदी, शिक्षण घेणं चुकीचं नाहीच. मात्र ते कशा प्रकारे वापरावं हे समजणं जास्त महत्वाचं असतं; हे आम्हाला या जंगलाने समजावलं. तुम्ही बरोबर बोललात! मी स्वतः शिक्षण घेतो आहे... मीच सरांना इथे बोलावलं आहे... याच शिक्षणामुळे मला हे समजलं की आदिवासी लोकांना हे प्रगत जग एका वेगळ्या नजरेने बघतं. आम्ही नाकारलेली जमात आहोत... मनुष्यप्राण्यांमध्ये. तुम्हाला लक्षात येण्यासाठी म्हणून सांगतो... ज्या प्रमाणे अनेक युरोपियन देशांमध्ये अजूनही भारत म्हंटलं की केवळ जंगलाने अच्छादलेला प्रदेश आणि जादूटोणा - करणी करणारे लोक असं वाटतं न; तसा विचार अनेक शहरातील लोक आमच्याबद्दल करतात. हा विचार बदलावा यासाठी आम्ही शिक्षण घेतो... आमच्या बद्दलचे हे चुकीचे समज बदलण्यासाठी आम्हाला तुमच्यामध्ये येऊन राहाण आवश्यक आहे; आणि हेच कारण आहे की मी सरांना इथे बोलावलं आहे. आम्ही दुष्ट नाही; जादूटोणा करणारे देखील नाही; आमच्यामध्ये अजूनही काही जमाती नरभक्षक असतीलही; पण म्हणून आम्ही सगळेच तसे नाही. हे जर इथे येऊन सरांनी स्वतः बघितलं आणि मग पुढच्या प्रत्येक कॉन्फरन्समध्ये सांगितलं तर कदाचित आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल." मिठठू बोलत होता आणि निर्मिती समजून घेत होती.

मिठठू बोलायचा थांबला आणि काही क्षणांनी निर्मिती उठून उभी राहिली आणि म्हणाली; "मिठठू, तू आत्ता मला जे सांगितलं आहेस त्याहूनही खूप जास्त असं काहीतरी आहे; हे मला जाणवतं आहे. पण मला हे देखील कळून चुकलं आहे की तू मला ते सांगणार नाहीस. त्यामुळे मी आग्रह देखील धरणार नाही. बरं, चल परत फिरू. खूप रात्र झाली आहे आणि उद्या आपल्याला बराच प्रवास आहे."

तिच्या सोबत उठून उभा राहात मिठठू म्हणाला; "दिदी, मला जितकं सांगायची परवानगी होती त्याहूनही जास्त मी बोलून गेलो आहे. त्यामुळे आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे होईल ते पहाणं हेच योग्य आहे. चला; तुम्हाला सोडून मी देखील काही वेळ विश्रांती घेतो."

निर्मिती मिठठू सोबत परत निघाली. पण इथे येताना तिची असलेली मनस्थिती आणि परत फिरताना लागलेली विचारांची तंद्री यात जमीन अस्मानाचा फरक होता.... परत एकदा चंदेरी आकाशगंगेकडे बघून तिने तिच्या कुटीचा दरवाजा उघडला आणि ती आत शिरली.

क्रमशः

Friday, December 10, 2021

अनाहत सत्य (भाग 2)

 अनाहत सत्य


भाग 2



कॉलेजमध्ये निर्मितीने मानवीय जीवन उत्पन्न आणि त्याचा ऱ्हास हाच विषय घेतला. निर्मिती मुळात तशी अबोल स्वभावाची होती. त्यामुळे ती कायम हातात पुस्तक घेऊन काही ना काही वाचत बसलेली असायची. तिला प्रत्येक युगातील मानवी आयुष्याबद्दल जाणून घ्यायची ओढ होती. मानव जन्माला कसा आला असेल? त्याने स्वतःला कसे प्रगत केले असेल? कसे जगत असतील ते लोक त्या काळात? त्यावेळची संस्कृती किती प्रगत झाली होती? कधी ऱ्हास पावली .... त्याची कारणं काय असतील? त्यावेळची भाषा, व्यवहार, धर्म, चाली-रिती...... निर्मितीला सगळ सगळ समजून घ्यायचं होत. तो एकच ध्यास  हळू हळू तिच्या मनाने घेतला होता. त्यामुळे ती सतत तिच्या कॉलेजातल्या प्रोफेसर्सना आणि त्याचबरोबर प्रोफेसर राणेंना भेटून विविध प्रश्न विचारायची आणि त्यांनी सांगितलेली सगळी रेफरन्स बुक्स शोधून वाचून नोट्स तयार करायची. तिचा कॉलेजचा अभ्यास तर चालूच होता पण त्याबरोबरच तिने बरीचशी अवांतर माहिती देखील मिळवली होती.

निर्मिती पदवीधर झाली आणि राणे सरांनी तिला बोलावून घेतलं. तिला समोर बसवत त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे लगेच विषयाला हात घातला आणि तिला विचारलं,"बेटा आता तू पुढे काय करायचं ठरवल आहेस? एम. ए. तर करशीलच आणि मग पी. एच. डी. देखील होईलच. पण नक्की कोणत्या दिशेने तुझा अभ्यास तू करणार आहेस?" निर्मितीने अगदी क्षणभर विचार केला आणि ती हसत हसत म्हणाली,"सर तुम्ही मला हा प्रश्न विचरता आहात म्हणजे तुम्ही नक्कीच माझ्यासाठी काहीतरी विचार करून ठेवलेला असणार. त्यामुळे मी काय ठरवल आहे यापेक्षा तुम्ही माझ्यासाठी काय विचार केला आहे ते समजून घ्यायला मला जास्त आवडेल." तिच उत्तर एकून राणे सर देखील हसले. पण मग थोडं गंभीर होत ते म्हणाले,"हे बघ बेटा, तुला माहीतच आहे गेले काही महिने मी आसामच्या एका खोऱ्यात सतत जातो आहे. तिथे एका खूप जुन्या संसकृतीच अस्तित्व सापडलं आहे. इतक्या दिवसांच्या भेटी नंतर मी इतकीच माहिती सांगू शकतो की ते जे काही मंदिर सदृश आहे तिथूनच खरी सुरवात आहे. कदाचित् अनेक युगांपूर्वीची संस्कृती असावी असा माझा कयास आहे. परंतु अजूनही मी याविषयी खूपच शाशंक असल्याने कोणाकडेही फारसे बोललेलो नाही.  हा परिसर घनदाट झाडांनी आच्छादलेला आहे. त्यामुळे भर दिवसा देखील तिथे फारसा उजेड नसतो. त्यात तिथेल्या आदिवासींमध्ये असा समाज आहे की तो एकूण भाग  शापित  आहे. मी हळूहळू त्या लोकांचा विश्वास मिळवून त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा मला समजल की त्या आदिवासींचा अनुभव असा आहे की तिथे येणाऱ्या आपल्यासारख्या बाहेरच्या लोकांना वेड लागत किंवा मग ते अचानक गायब होतात . अर्थात तिथल्या स्थानिकांना मात्र कधी हा त्रास झालेला नाही. त्यामुळे त्यांचा त्या भागातला वावर अगदी सहज असतो. असाच त्यांच्यातलाच तिथेच खेळत मोठा झालेला; एक मुलगा मिठ्ठू चांगला शिकला. त्याला त्या जागेच महत्व समजल. हे शापित मंदिर काहीतरी खूप महत्वाचं आहे ज्याचा उलगडा अजूनही झालेला नाही हे लक्षात आल्यामुळे त्याने स्थानिकांच्या नकळत त्या जागेची माहिती आपल्या पुरातत्व विभागापर्यंत पोहोचवली आणि तिथल्या स्थापत्याचा आणि त्या अनुषंगाने त्या काळातील मानवी जीवनाचा शोध आणि अभ्यास करायची जवाबदरी माझ्यावर टाकण्यात आली." बोलता बोलताच राणे सरांची तंद्री लागली. निर्मितीला त्यांची ही सवय देखील माहित होती. त्यामुळे ती काही न बोलता बसून राहिली. कारण तिला माहित होत की सरांनी तिला आपणहून बोलावून घेतल आहे याचा अर्थ त्यांच्या मनात काहीतरी नक्की असणार. 

असाच थोडा वेळ गेला आणि सर भानावर आले. त्यांनी निर्मितीकडे बघितल आणि आपली तंद्री लागली होती हे त्यांच्या लक्षात येऊन ते हसले. निर्मितीकडे बघत ते म्हणाले,"अग बेटा माझी बोलता बोलता तंद्री लागली पण तू तरी हाक मारायची न मला." त्यावर निर्मिती हसली आणि म्हणाली,"सर, तुम्ही मला आपणहून बोलावल आहात म्हणजे तुमच्या मनात काहीतरी आहे जे तुम्ही मला नक्की सांगणार आहात. मग मी तुमच्या विचारांची शृंखला कशाला तोडू." तिचा समंजसपणा बघून सरांना बर वाटल. ते उठून तिच्या शेजारच्या खुर्चीत येऊन बसले आणि तिला म्हणाले,"बेटा, मला हा तुझा समजुतदारपणा आणि पेशन्स खरच खूप आवडतो. बर, मी फार मोठं भाषण वगैरे देणार नाही आहे तुला, फक्त इतकच सांगतो की मी त्या जागेचा अभ्यास करण्यासाठी  पुढच्या आठवड्यात तिथे जातो आहे. माझी इच्छा आहे की तू देखील माझ्याबरोबर तिथे चलावस. कारण तुझ वय जरी लहान असलं तरी तुझ्या बुद्धीचा आवाका मला माहित आहे. आणि तुझ्यासाठी तिथे खूप काही शिकण्यासारख आहे बेटा. पण अर्थात तू याव अस जरी मला वाटत असल तरी यायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी तुझाच असणार आहे. मला वाटत एकदा तू तुझ्या आई-वडिलांशी बोलून घे."

राणे सरांचं बोलणं एकून निर्मिती एकदम हरकून गेली. उठून त्यांना नमस्कार करत ती म्हणाली,"सर, तुम्ही माझ्यावर इतका विश्वास दाखवता आहात यातच सगळ आलं. मी नक्की माझ्या बाबांशी आजच बोलून घेते. मला माहित आहे आई बिलकुल तयार होणार नाही मला पाठवायला. पण बाबा तिला समजावतील याचा देखील विश्वास आहे. खर तर मी उद्या संध्याकाळच गावाच तिकीट काढल होत. काही दिवस घरी जाऊन यायचा विचार केला होता. पण ते मी आताच जाऊन रद्द करून टाकते. म्हणजे तुमच्या बरोबर येण्या अगोदर तिथल्या भौगोलिक आणि ऐतिहासिक आणि पुरातन शास्त्राचा थोडा फार अभ्यास करायला मला वेळ मिळेल. सर, मी तुमच्या बरोबर येणार... अगदी नक्की येणार. इतकी मोठी संधी मला सोडायची नाही आहे. सर, एम. ए. आणि पी. एच. डी. तर होत राहील. ते औपचारिक शिक्षण आहे. पण तुमच्या बरोबर तिथे जाऊन जे शिकेन ते मला आयुष्यभर उपयोगाला येणार आहे. मला कायमच मानवी संस्कृतीबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. पूर्वी अनेकदा मानवी संस्कृती प्रगत झाली होती. याची अनेक दाखले आहेत आपल्याकडे. पण मग त्यांचा ऱ्हास झाला. अनेकदा या ऱ्हासाच कारण नैसर्गिक आपत्ति हेच समोर येत. पण का कोणास ठाऊक मला वाटत की निसर्गातल्या त्या सर्वमान्य शक्तिला डोळे आहेत आणि म्हणूनच ती शक्ति ठरवते की ही मानव संस्कृती आता अशा उत्कर्षाला पोहोचली आहे की येथून पुढे जाण्याचा मार्गच नाही. त्यामुळे मग ही प्रगत जमात एकमेकांवर कुरघोडी करायला सुरवात करते. त्यात कदाचित निसर्गाचा आणि पर्यायाने त्या शक्तीचाच नाश होऊ शकतो.  अस होऊ नये म्हणून कदाचित नैसर्गिक आपत्ती निर्माण करून ही शक्ति त्या त्या काळातील मानवीय संस्कृतीचा ऱ्हास करते. पण मग परत मानव जन्मतो..... प्रगती करतो... उत्कार्षाला येतोच... आणि उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचून परत एकदा ऱ्हास..... हे चक्र युगानुयुगं चालूच आहे. 

सर, अभ्यास करत असताना मी एक लेख वाचला होता. त्यात म्हंटल होत की साधारण चार बिलियन वर्षांपूर्वी, पृथ्वीवर काही विशिष्ठ रेणू, विशिष्ट उर्जेच्या संपर्कात असताना एकत्र आले आणि त्यातून सजिव तयार झाले. पुढे ७०,००० वर्षांनंतर सजीवानंमधल्या होमो सेपियन नावाच्या एका प्रजातीने गुंतागुंतीची आणि  विस्तृत रचना तयार केली ती म्हणजे संस्कृती. या होमो सेपियन्समध्ये एक सब स्पेसीज अस्तित्वात होते. बहुतेक त्यांना होमो सेपियन इडालटू म्हणतात. त्यांचे साधारण पावणे दोन लाख वर्षांपूर्वीचे अवशेष इथिओपियात मिळाले आहेत. त्यानंतर ही प्रजात नष्ट झाली असे त्या लेखात म्हंटले होते. ही जात रूपाने होमो सेपियनपेक्षा वेगळी होती. सर, लेखामध्ये जरी इथिओपियाचा उल्लेख असला तरी ही माहिती वाचल्यानंतर माझ्या मनात एक शंका आली की कदाचित आपल्या इथल्या म्हणजे आजच्या भारतातल्या कोणत्या ना कोणत्या भूभागावर ते सब स्पेसीज अस्तित्वात असू शकतील का? आणि त्याआनुशांगाने मी त्यावर माहिती गोळा करण्याचे ठरवले होते. परीक्षेनंतर मला थोडा वेळ मिळाला होता त्यावेळी मी याविषयावरची पुस्तके कॉलेजच्या लायब्ररीमध्ये शोधून वाचली."

निर्मिती मनापासून बोलत होती आणि  प्रोफेसर राणे ती सांगत असलेली माहिती डोळे मिटून ऐकत होते. त्यांना झोप लागली की काय असं मनात येऊन निर्मिती क्षणभर थांबली. त्याबरोबर डोळे उघडून प्रोफेसर तिला म्हणाले,"काय माहिती मिळाली तुला निर्मिती? मी ऐकतो आहे. तू बोल. अगदी योग्य दिशेने तुझं वाचन चालू आहे... हे मी तुला नक्की सांगतो." 

त्यांच बोलण एकून निर्मिती अजून उत्साहाने सांगायला लागली,"सर, मी जी माहिती वाचली त्याप्रमाणे कदाचित् ही प्रजात अति उष्ण किंवा अति थंड प्रदेशात टिकू शकत नसावी. त्याशिवाय ही प्रजात आजच्या होमो सेपियनपेक्षा जास्त प्रगत असावी. कदाचित् मी अगोदर म्हंटल्या प्रमाणे ही प्रजात अति प्रगत अवस्थेला पोहोचली आणि म्हणूनच कदाचित् नष्ट झाली. अर्थात जर यांचे अस्तित्व इथल्या भूभागात असले तर मग ते कुठे असू शकते याचा विचार मी केला. त्यावेळी माझ्या मनात आले की ब्रम्हपुत्रा नदीचा परिसर हा अति उष्ण नाही किंवा अति थंड देखील नाही. तिथे विपुल प्रमाणात पर्वत, पाणी आणि जीवनावश्यक नैसर्गिक गोष्टी सहज उपलब्ध आहेत. मग कदाचित ही प्रजात तिथेच अस्तित्वात होती का? सर, आपण जर काही प्रमाणात आपल्या पुराणांचा आधार घेतला तर एक गोष्ट लक्षात येते की त्या काळात देखील ब्रह्मपुत्रेच महत्त्व अनन्य साधारण होतं. अर्थात हे सगळे माझ्या मनातले विचार आहेत सर.  यासंदर्भात मला अजून माहिती गोळा करायची आहे. आणि गम्मत बघा न मी जो विषय सहज उत्सुकता म्हणून वाचत होते आणि ज्या प्रदेशाचा विचार करत होते तिथे जाण्याची संधी मला तुमच्यामुळे मिळते आहे. सर, माझ्या मनात अनेक शंका आणि अनेक प्रश्न आहेत. कदाचित् त्यासार्वांची उत्तरं मला तुमच्या बरोबर येऊन मिळतील. त्यामुळे मी तुमच्या बरोबर नक्की येणार." बोलताना निर्मितीचे डोळे उत्साहाने आणि आनंदाने चमकत होते.

तिचा उत्साह बघून प्रोफेसर राणेंना हसू आलं. तिच्याकडे कौतुकाने बघत ते म्हणाले,"निर्मिती मला खात्री होती की तुला एकूण सगळी माहिती दिली की तू नक्की माझ्याबरोबर येशील. मला तुझ्या कॉलेजच्या प्रोफेसर कडून तू या विषयावर आपणहून अभ्यास करते आहेस आणि बरंच वाचन केलं आहेस हे कळल होत. म्हणून तर मी तुला माझ्याबरोबर येण्याबद्दल विचारलं. त्यामुळे मी अगोदरच तुझ्या तिकीटाची सोय देखील करून ठेवली आहे. तू जरूर अभ्यास करून ठेव त्या भागाचा. त्याचा आपल्याला खूपच उपयोग होईल. मी देखील काही नोट्स काढून ठेवल्या आहेत, त्या तुला देऊन ठेवीन. म्हणजे तिथे जाताना तुझ्या मनात कोणताही किंतु-परंतु नसेल. त्याचा तुला आणि मलासुद्धा काम करताना उपयोग होईल." त्यांच्या बोलण्यावर मान डोलावून हसत निर्मितीने त्यांचा निरोप घेतला आणि ती सरांकडून निघाली. 

निर्मिती खरच खूप खुश होती. इतक्या लवकर आणि इतक्या सहज एवढी मोठी संधी आपल्याला मिळेल अस तिला कधीच वाटलं नव्हत. तिने सरांकडून बाहेर पडल्या बरोबर तिच्या वडिलांना फोन लावला आणि सरांबरोबर झालेल्या गप्पांचा पूर्ण वृत्तांत सांगितला. ते सगळ एकून तिच्या वडिलांना देखील आनंद झाला. निर्मितीच्या वडिलांना तिच्या लहानपणीच तिची आवड लक्षात आली होती म्हणून तर त्यांनी तिला शिकायला अस आपल्यापासून दूर ठेवलं होत. पण तिला अशी एवढी मोठी संधी इतक्या लवकर मिळेल अस त्यांना देखील वाटल नव्हत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रोफेसरांनी आपल्या मुलीला इतका मोठी संधी द्यावी याच त्यांना खूप अप्रूप वाटलं. ते निर्मितीला म्हणाले," बेटा, खरच खूप मोठी संधी तुला मिळते आहे आणि मला याचा खूप आनंद झाला आहे. तुझं कौतुक देखिल वाटत आहे. मात्र तुझ्या आवाजातला उत्साहच मला सांगतो आहे की तू उद्या इथे घरी येणार नाही आहेस." त्याचं शेवटच वाक्य एकून मात्र  निर्मिती थोडी वरमली. पण ती काही बोलण्याच्या अगोदर तिचे वडील म्हणाले,"अग, वाईट नको वाटून घेउस. मी समजाविन तुझ्या आईला आणि वहिनीला. तू नक्की जा तुझ्या सरांबरोबर. आमचा सर्वांचा आशीर्वाद आहे तुझ्या बरोबर. फक्त बेटा अधून मधून फोन करत जा मला, आईला आणि वाहिनीला." त्यांच्या बोलण्याने सुखावलेली निर्मिती म्हणाली,"बाबा, मी खरच खूप नशीबवान आहे की मला समजून घेणारे तुमच्यासारखे वडील आहेत. मी नक्की फोन करत जाईन तुम्हाला सगळ्यांना. आई आणि वाहिनीला सॉरी सांगा हं. आता आले की महिना दोन महिने घरी येऊन राहीन म्हणून सांगा त्या दोघींना. बर फोन ठेवू?"

दुसऱ्या दिवसापासूनच निर्मितीने आसामच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि पुरातन शास्त्राचा अभ्यास सुरु केला. त्याच्याच बरोबर ती प्रोफेसर राणेंबरोबर ज्या ठिकाणी जात होती तिथेल्या परिसराला काही ऐतिहासिक किंवा कोणत्याही जुन्या संस्कृतीचा काही वारसा लाभलेला आहे का त्याचा शोध देखील ती घेत होती. तिच्या वाचनात अनेक गोष्टी आल्या. निर्मितीने त्यासर्वांच्या नोट्स बनवून ठेवायला सुरवात केली.

मुळात आसाम म्हणजे ब्रमापुत्रा नदीचे खोरेच. मुबलक निसर्ग सौंदर्य आणि विस्तीर्ण पर्वंत रांगांमुळे अत्यंत कठीण असा हा प्रदेश. त्यात निर्मिती आणि प्रोफेसर राणे जाणार होते तो भाग तर एका खोल दरीमध्ये संपूर्णपणे आदिवासी लोकांच्या वस्तीतला होता. हा भाग आजच्या प्रगत भारताचा भाग आहे असे कोणीही म्हणाले नसते. इतका दुर्गम आणि जंगलाने वेढलेला होता. कधी कोणा एकलकोंड्या डॉक्टरने फिरत फिरत येऊन तिथल्या एका आदिवासी पाड्यात दोन वर्षांसाठी बस्तान बसवले होते. पण मग त्याला देखील तिथे टिकाव धरणे अवघड झाले आणि तो तिथून निघून गेला. पण त्याच्या त्या दोन वर्षांच्या वास्तव्यामध्ये त्या पन्नास घरांच्या पाड्यातल्या एकाच मुलाने आपलं स्वतःच भलं करून घेतलं होत. तोच होता प्रोफेसर राणेंनी सांगितलेला मिठ्ठू! 

निर्मिती आणि प्रोफेसर राणे जेव्हा त्या आदिवासी पाड्यावर पोहोचले तेव्हा त्यांच्या बरोबरच मिठ्ठू होता. तो बारावी पर्यंत शिकून मग नोकरी करत होता. त्यामुळे त्याला हिंदी भाषा येत होती. त्याने प्रोफेसर राणेंबरोबर निर्मितीला बघितल्यावर हरकत घेतली. तो राणेंना एका बाजूला घेऊन म्हणाला,"सर, लडकी नही चलेगी. उसको वापस भेज दो. हमारा लोग उसको आने नही देंगा." त्यावर प्रोफेसरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून थोपटल्या सारखं केल आणि म्हणाले,"देखो वो छोटी दिखती हे लेकीन बहुत पिढी-लेखी लडकी हे. उसकी वजहसे मुझे काम करना आसन हो जाएगा. इसलिये सरकारने उसे मेरे साथ भेजा हे. वो वापस चाली गई तो बहुत नुकसान हो जाएगा." प्रोफेसरांच बोलण एकून मिठ्ठू शांत झाला. पण त्याला मोठी चिंता होती की आपल्या पाड्यावर या मुलीला कोणी स्वीकारले नाही तर काय करायचे. कारण मुळात मिठ्ठुने त्या मंदिराची माहिती बाहेर दिली होती म्हणून त्याच्यावर तिथेले लोक नाराज होते. पण प्रोफेसर ऐकत नाहीत म्हंटल्यावर तो काही न बोलता निर्मितीच आणि प्रोफेसरांच सामान उचलून चालू पडला. 

एका बस मधून उतरून दुसरी बस. मग मोटरसायकल वरून प्रवास आणि त्यानंतर जवळ जवळ तीन तास जंगलातून चालल्यानंतर ही वरात मिठ्ठूच्या पाड्यावर पोहोचली. तोवर संध्याकाळ झाली होती.  जेमतेम सहा वाजले होते पण कीर्र काळोख दाटला होता. थोडे बहुत कंदील-चिमण्या आजू-बाजूच्या खोपट्यामधून दिसत होते. काही खोपट्याच्या बाहेर पलिते खोचलेले होते. त्याच्या उजेडातच निर्मिती आणि प्रोफेसर मिठूठूच्या मागून चालत एका बाजूच्या झोपडीकडे पोहोचले. बाहेर लावलेल्या पालीत्याच्या मदतीने मिठ्ठुने एक कंदील पेटवला आणि त्या झोपडीत प्रवेश केला. एक मोठी ऐसपैस खोली होती ती. समान आत ठेवून मिठ्ठू प्रोफेसरांना म्हणाला,"आप लोग बैठो. में कूच खानेका देखता हु. और फिर इसी कुठी मे बांबू लगाके बिबीजी के लिये अलग जगा बनाता हु." समोर असणाऱ्या घोंगड्यावर बसत दमलेल्या प्रोफेसरांनी बर म्हणून मान डोलावली आणि मिठ्ठू बाहेर गेला. 

तो बाहेर गेल्या बरोबर निर्मितीने प्रोफेसरांच्या शेजारी बसत त्यांना विचारलं,"सर, हा मिठ्ठू तर मला इथे घेऊन यायला तयार नव्हता ना? मग तुम्ही नक्की काय सांगितलत त्याला?" त्यावर हसत हसत प्रोफेसरांनी मिठ्ठुला जे सांगितल होत तेच तिला देखील सांगितल. आपल्यासाठी सर खोटं बोलले या विचाराने निर्मिती ओशाळली. प्रोफेसर राणे तिच्याकडे बघत शांतपणे म्हणाले,"बेटा, तू इथे कशी आलीस हे महत्वाचं नाही; तर इथून पुढे तू काय आणि कशी वागणार आहेस ते महत्वाचं आहे. आपण जेव्हा त्या मंदिराकडे जाणार आहोत आणि एकूणच अभ्यासाला सुरवात करणार आहोत त्यावेळी कदाचित् तुझं हे नवखेपण जास्त उपयोगाच असेल. तू आत्ता येताना केवळ या भागाचा भौगोलिक आणि ऐतिहासिक अभ्यास तो ही केवळ पुस्तकांमधून केला आहेस. त्याव्यतिरिक्त तुला या प्रदेशाची फारशी माहिती नाही. त्याचबरोबर तुझा मानवीय उत्पत्ती यावर देखील फक्त अभ्यास आहे. माझ्या बाबतीत म्हणायचं तर मी या विषयाचा इतका अभ्यास केला आहे आणि त्या निमित्ताने इतकी ठिकाणं फिरलो आहे की कदाचित माझे काही ठोकताळे पूर्वग्रहातून केले जातील. का कोणास ठाऊक पण मला सारखे वाटते आहे की इथे जी माहिती आपल्याला मिळणार आहे ती नक्की मानवीय इतिहासाला वेगळ वळण देणारी असेल. माझ्या आजवरच्या अनुभवाच्या जोरावर मी बांधलेले ठोकताळे कदाचित् इथे उपयोगी पडणार नाहीत. अग इथे मी गेले सहा महिने येतो आहे. पण तरीही  मला अपेक्षित अशी प्रगती होत नाही आहे. कुठेतरी काहीतरी वेगळ आहे; याची जाणीव मला होते आहे. पण काय ते मात्र कळत नाही. म्हणून तर तुला मी मुद्दाम इथे घेऊन आलो आहे. निर्मिती, कदाचित तुझ्या नावाप्रमाणे तू इथे खरच नवीन माहिती शास्त्राची निर्मिती करशील अशी मला आशा आहे. बर ते जाऊ दे. आपण आता आराम करूया. तो मिठ्ठू आपल्यासाठी काहीतरी खाण आणायला गेला आहे. तो आला की खाऊन घेऊन वेळेत झोप. इथे अंधार लवकर पडतो आणि सूर्योदय उशिरा होतो. त्यामुळे आपल्यालाच आपले कामाचे तास ठरवून घेऊन लवकर उठून कामाला लागायचं आहे." 

प्रोफेसर राणेंकडे आदरयुक्त प्रेमाने बघत निर्मिती तिथून उठली.

क्रमशः

Friday, December 3, 2021

शेजारी कथा (शेवटचा भाग)

 शेजारी कथा (भाग शेवटचा)


असेच काही दिवस गेले आणि एक दिवस.....

गेटचा आवाज ऐकून काकू स्वायंपाकघरातून दिवाणखान्यात आल्या. 'दूध आणायला बराच वेळ लागला यांना!' दार उघडताना त्यांच्या मनात आलं. मात्र गेटपाशी दुसऱ्याच कोणाचा तरी आवाज ऐकून काकू सावध झाल्या. परत एकदा दुखावलेल्या मनाने आणि तरीही कर्कश्य आवाजात त्यांनी प्रश्न केला;"कोण आहे ते गेटजवळ? जा बघू परत. उगाच माझ्या घराचं दार वाजवून मला त्रास देऊ नका." इतकं बोलून दार न उघडता त्या परत आत जाऊ लागल्या. इतक्यात त्यांना बाहेरून आवाज आला;"अहो काकू.... दार उघडा. काकांना घेऊन आलो आहे." 'काकांना घेऊन?' काकू हे ऐकून बुचकळ्यात पडल्या आणि त्यांनी घाईघाईने दार उघडले.

दारात एक स्ट्रेचर घेऊन हॉस्पिटलची माणसे उभी होती. स्ट्रेचरवर काका विव्हळत होते. त्यांच्या मागे एक गृहस्थ उभे होते. काकू खूपच गोंधळून गेल्या होत्या. त्या अजूनही दारातच उभ्या होत्या. स्ट्रेचर घेतलेल्यांपैकी एकाने काकूंना भानावर आणत म्हंटले;"अहो आजी बाजूला व्हा. पेशंटला त्रास होतो आहे. आत नीट गादीवर झोपवायला लागेल." ते ऐकून काकू एकदम भानावर आल्या आणि दारातून बाजूला झाल्या. स्ट्रेचर घेऊन आत आलेल्या वॉर्डबॉईजनी काकूंना विचारले;"बेडरूम कुठं आजी?" काकूंनी काही न बोलता त्यांना आतल्या खोलीचा दरवाजा दाखवला. दोन्ही वॉर्डबॉईजनी काकांना आत नेऊन स्ट्रेचरवरून हलकेच पलंगावर ठेवलं आणि ते आले तसे निघून गेले. काकू अजूनही संभ्रमातच होत्या. त्यांनी एकदा आतल्या खोलीच्या दाराकडे बघितले आणि घराचे दार बंद करायला त्या मागे वळल्या. त्यांनी दारात एका व्यक्तीला उभे बघितले आणि त्या परत एकदा थबकल्या. दारातली व्यक्ती आत यावे की नाही याचा विचार करत होती. त्यांच्या हातात काकांची नेहेमीची झोळी होती. काकूंनी त्यांच्याकडे राश्नार्थक नजरेने बघितले. तशी हिम्मत करून एक पाऊल पुढे येत ते म्हणाले;"नमस्कार काकू. मी कॉलनीच्या बाहेरच्या दुकानाचा मालक. आज काका नेहेमीप्रमाणे दूध घेऊन माझ्या दुकानातून निघाले. रस्त्याच्या कडेला काहीतरी काम चालू असल्याने खणून ठेवले होते. काकांच्या ते लक्षात आले नाही आणि त्यांचा पाय खड्यात गेला. कोणी धरायला नसल्याने काका एकदम पडले. त्यांचा आवाज ऐकून आम्ही बाहेर येऊन बघितलं. काका बरेच जोरात पडले होते. म्हणून मग आम्हीच काही जणांनी त्यांना उचलून जवळच्या हॉस्पिटल मध्ये नेलं...."

त्या गृहस्थाचं बोलणं ऐकून काकू एकदम घाबरून घेल्या. त्यांचा आवाज एकदम मऊ झाला. आतल्या दाराकडे बघत त्यांनी हलकेच विचारलं;"काय झाली यांना नक्की? काय म्हणाले डॉक्टर?" काकूंचा बदललेला आवाज आणि मऊ झालेला चेहेरा बघून त्या गृहस्थांना थोडा दिलासा मिळाला. ते आश्वस्त स्वरात म्हणाले;"काळजी करू नका काकु. फार काही नाही झालेलं. घोट्याजवळ अगदी हेअर लाईन फ्रॅक्चर झालं आहे. डॉक्टर म्हणाले साधं क्रेप बँडेज म्हणजे ते गुलाबी बँडेज पण चाललं असतं. पण काकांचं वय लक्षात घेता त्यांनी प्लास्टर घातलं आहे. तीन आठवड्यांचाच प्रश्न आहे. मग काका परत पहिल्यासारखे हिंडू-फिरु शकतील." काकूंना 'तीन आठवडे' हे शब्द एखाद्या जादूच्या कांडीसारखे वाटले. त्यांचं सगळं बोलणं ऐकून काकूंनी त्याच हलक्या आवाजात विचारलं;"फक्त तीन आठवडे म्हणाले का डॉक्टर?" काकूंच्या प्रश्नाचा रोख न काकूंना ते गृहस्थ म्हणाले;"हो. का हो काकू?" त्यांच्या डोळ्यातले आश्चर्य बघून काकूंनी स्वतःला सावरले आणि म्हणाल्या;"अहो, हे आता बाहेर पडू शकणार नाहीत. म्हणजे सगळं मलाच बघावं लागेल न. म्हणून अंदाज घेत होते नक्की किती दिवस हे अंथरुणात पडून राहणार आहेत." त्यावर थोडं हसून ते गृहस्थ म्हणाले;"काळजी करू नका काकू. आम्ही आहोत न. काकांसारख्या सज्जन आणि सगळ्यांशी गोड असणाऱ्या व्यक्तीसाठी कोणीही मदत करेलच." काकूंनी मनात तेच शब्द परत उच्चारले.... 'सज्जन आणि सगळ्यांशी गोड' पण मोठ्याने काहीच म्हणाल्या नाहीत. ते गृहस्थच परत म्हणाले;"निघतो मी काकू. त्यांना झोपेचं औषध दिले आहे. तसे झोपतीलच थोडावेळ. हा घ्या माझ्या दुकानाचा नंबर. काही लागलं तर कधीची फोन करा." नंबर घेत काकूंनी 'हो' म्हणून मान डोलावली आणि ते गृहस्थ काकांची झोळी देऊन निघाले.

ते जाताच काकूंनी घराचे दार लावून घेतले आणि त्या आतल्या खोलीकडे वळल्या. त्यांनी आत जाऊन बघितले तर खरंच काकांना गाढ झोप लागली होती. काकूंनी पंखा चालू केला. त्या बाहेर आल्या आणि दिवणखण्यातल्या सोफ्यावर विचार करत बसून राहिल्या. किती वेळ गेला याचा त्यांना अंदाजच आला नाही. पण अचानक त्यांना काकांनी हाक मारल्याचे ऐकू आले. काकू लगबगीने उठल्या आणि आतल्या खोलीत गेल्या. काका अस्वस्थपणे उठून बसण्याचा प्रयत्न करत होते. काकू पुढे झाल्या आणि काकांना बसायला मदत करायला लागल्या. काकांचा चेहेरा वेदनेने पिळवटून गेला होता. "खूप त्रास होतो आहे का?" काकूंनी काळजीने विचारले. त्यांचा प्रश्न ऐकून काका अजूनच चिडले आणि काकूंवर ओरडले;"अजिबात त्रास होत नाही आहे. ज्याप्रकारे तू मला मदत करते आहेस त्यामुळे बरच वाटतंय." काकूंना कळेना त्यांनी काय केलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी काकांचा हातात असलेला पाय सोडून दिला आणि त्या बाजूला झाल्या. अचानक झालेल्या या हालचालीमुळे काकांना अजूनच वेदना झाल्या आणि ते जीवाच्या आकांताने ओरडले. काकू घाबरून अजूनच मागे झाल्या.

कसेबसे काका बसते झाले आणि काकूंकडे खाऊ का गिळू या नजरेने बघायला लागले. काकूंची नजर खाली झुकलेली होती. त्या काकांकडे बघायला देखील धजावत नव्हत्या. काही क्षण असेच तणावात गेले आणि काकांचा पारा थोडा खाली आला. आवाजावर काबू आणत त्यांनी काकूंना म्हंटल;"मी सकाळपासून फार काही खाल्लेलं नाही. औषध घेण्यापूरतं चहा आणि चार बिस्किटं खाली होती. त्यामुळे मला आता खूप भूक लागली आहे. तू सकाळी जे काही बनवलं असशील ते मला लगेच आणून दे." काकांचं बोलणं ऐकून काकू एकदम कावऱ्या-बावऱ्या झाल्या. त्यांनी काकांकडे बघणं टाळत म्हंटल;"मी सकाळी उप्पीट करणार होते. त्याची तयारी देखील केली होती. पण त्याचवेळी तुम्हाला घेऊन हॉस्पिटलचे लोक आले आणि मी विसरूनच गेले काही करायला." काकुंच बोलणं एकूण काकांचा पारा परत चढायला लागला. त्यांचा रागावलेला अवतार काकूंच्या लक्षात आला आणि काकू पटकन खोली बाहेर जात म्हणाल्या;"पाच मिनिटं लागतील फक्त. उप्पीट लगेच करून आणून देते."

काकांना अजूनही बरच काही बोलायचं होतं; पण काकू समोर उभ्याच राहिल्या नाहीत. त्यांनी पटकन स्वयंपाकघरात जात उप्पीट करायला घेतलं. काकूंनी खरच दहा मिनिटात उप्पीट केलं आणि काकांना प्लेट भरून आणून दिली. काकांनी काही न बोलता खाऊन घेतलं. त्यांच्या हातातली प्लेट घेत काकूंनी पाण्याचा पेला पुढे केला. काकांनी परत एकदा काकूंकडे कडक नजरेने बघताच काकूंच्या लक्षात आलं की काकांच्या सकाळच्या गोळ्या घेणं बाकी आहे. त्यामुळे त्या लगबगीने जेवणाच्या टेबलाजवळ गेल्या आणि काकांची औषधं घेऊन आल्या. काकांनी औषधं घेतली आणि दमून मान मागे टाकली. काकांच्या पायाला फ्रॅक्चर अगदी थोडंच झालेलं असलं तरी ते खूपच जोरात पडले होते. त्यामुळे बराच मुका मार लागला होता. सकाळी डॉक्टरांनी पेन किलर इंजेक्शन दिलेलं असल्याने अजूनपर्यंत फार त्रास झाला नव्हता. पण आता इंजेक्शनचा परिणाम कमी व्हायला लागला असल्याने काकांचं सगळं अंग दुखायला लागलं होतं.

काही क्षण काका मान मागे टाकून तसेच बसले आणि मग काकूंकडे बघत सौम्य आवाजात म्हणाले;"माझं अंग खूपच दुखतं आहे ग. डॉक्टरने काही औषधं लिहून दिली होती. पण सकाळी आणणं शक्यच नव्हतं. आता जर दुखणं कमी व्हायला हवं असेल तर त्यांनी दिलेलीऔषधं घ्यायलाच हवीत." काकांचा बदललेला आवाज काकूंच्या लक्षात आला. पण त्या काहीच बोलल्या नाहीत. फक्त मान खाली घालत त्यांनी हळू आवाजात 'हो' म्हंटल. त्या वाट बघत होत्या काकांनी म्हणायची, की जाऊन औषधं घेऊन ये. 'ह्यांच्या परवानगीनेच बाहेर पडायला मिळेल यासारखा आनंद कोणता', काकूंच्या मनात विचार आला. काकांनी काकूंची लागलेली तंद्री बघितली आणि काकूंना हाक मारली;"एकलस का? माझी सकाळची झोळी घेऊन ये." काकू भानावर आल्या. काही न बोलता त्यांनी जाऊन काकांची झोळी आणली. काकांनी झोळी उघडून आतून एक कागद काढला आणि काकूंकडे बघत म्हणाले;"जाऊन फोन घेऊन ये. मला एक फोन करायचा आहे." काकूंना काहीच कळेना. खरं तर काकांना औषध घेणे आवश्यक होते. त्यांना त्रास होत आहे हे काकूंना कळत होते. त्यामुळे काका आपल्यालाच औषध आणायला पाठवतील असा त्यांचा होरा होता. मात्र काकांना काही प्रश्न विचारण्याची त्यांची हिम्मतच नव्हती. त्यामुळे त्यांनी जाऊन फोन आणला आणि काकांकडे दिला. काकांनी कागडाकडे बघत एक फोन फिरवला आणि बोलायला लागले;"नमस्कार भाऊ. मी काका बोलतो आहे. हो, हो! आताच उठलो आणि थोडं खाऊन घेतलं. होय हो! खूपच दुखतंय अंग. हो... हो... तीच विनंती करायला फोन केला होता. सकाळी डॉक्टरांनी जी औषधं लिहून दिली होती ती आपल्याला सकाळी घेणं शक्य झालं नाही. तीच आता घ्यायची आहेत..... अरे! धन्यवाद... अहो खरंच कळत नव्हतं आता काय करु? ही तर.... तुम्हाला माहीतच आहे न. हीच कसं आहे..... बरं बरं! मी वाट बघतो हं. भाऊ परत एकदा मनापासून आभार मानतो तुमच्या मदतीचे." काकांनी असं म्हणून फोन बँड केला आणि नजर उचलून काकूंकडे बघितले.

त्यांच्या चेहेऱ्यावर एक दुष्ट हसू होते. काकूंकडे रोखून बघत काकांनी त्यांना विचारले;"तुला काय वाटलं होतं की आता मी आंथरूणावर आहे तर तुला सगळं रान मोकळं झालं का? मनात येईल तेव्हा.... हवं तिथे भटकायला मोकळी झालीस असा गैरसमज तर नाही न करून घेतलास? एक लक्षात घे काहीही झालं तरी मी तुला लांब होऊ देणार नाही माझ्यापासून.... समजलीस?" असं म्हणून काका खूप मोठ्याने हसले... इतक्या मोठ्याने की त्यांच्या दुखऱ्या पायातून चांगलीच कळ आली. त्यामुळे त्यांचा चेहेरा एकदम वेडा-वाकडा झाला. डोळे घट्ट बंद करून त्यांनी आलेली कळ पचवली आणि डोळे उघडून म्हणाले;"ते दुकानवाले भाऊ जोशी आहेत ते त्यांच्या दुकानातल्या मुलाबरोबर माझी औषधं पाठवत आहेत. त्यांनी देखील डॉक्टरांकडून ही औषधं लिहून घेली होती. त्यामुळे परत औषधांची नावं सांगण्याची गरज नाही. त्यांनी माझ्याकडे त्यांचा नंबर कधीचाच देऊन ठेवला होता. आज उपयोग झाला त्याचा." काकांचं बोलणं ऐकून काकूंच्या मनात निर्माण झालेला एक आशेचा किरण देखील विरून गेला. त्यांनी हताशपणे काकांकडे बघितले आणि स्वयंपाकघरात जायला त्या वळल्या.

ओट्याजवळ उभं राहून काकू विचार करत होत्या. स्वयंपाकघर ही एकच खोली होती की जिथे त्या असल्या तर काका त्यांना काहीच बोलत नसत. नाहीतर इथेच का बसलीस? काय करते आहेस? आता का झोपलीस? असे एक ना अनेक प्रश्न विचारत ते काकूंच्या मागे फिरत. 'का आणि कधी झालं हे सगळं असं? हे असे पहिल्यापासून नव्हते. उलट लग्नानंतर अनेक वर्ष तर मी एकटीनेच काढली की. हे फक्त रात्री जवळ यायचे. एवढंच काय त्याकाळातलं एकमेकांना ओळखणं होतं. बाकी यांचं सगळं बोलणं यांच्या आईशी असायचं. कमावून आणायचे ते देखील आईच्या हातात. मी फक्त घरात राबायला आणि रात्री सुख द्यायला आणलेली होते.... आणि ते मी मान्य देखील करून टाकलं होतं. न मान्य करून काय करणार होते? होतं कोण माझं असं? आठ मुलींमधली मी एक होते माहेरी. एकदिवस हे आले. वडिलांनी आम्हाला सगळ्यांनाच तयार होऊन समोर यायला सांगितलं. आम्हा सगळ्या बहिणींमधून यांनी मला निवडलं... वडिलांना पैसे दिले आणि थेट मंदिरात नेऊन लग्न लावून घेतलं. वडिलांना वाकून नमस्कार करत होते तेवहा वडीलं म्हणाले;"मुली आता तुझ्या अस्थी त्या घरातून बाहेर पडतील हो. आम्ही मेलो आता तुझ्यासाठी कायमचे." अरुण, आमचा एकुलता एक लेक, लहान होता तेव्हा सगळं कसं छान होतं. तो आणि मी असं आमचंच एक विश्व होतं..... आणि अचानक सासूबाई निवर्तल्या. यांनी सासूबाईंनी सगळी कार्य खूपच नीट केली. तेराव्याची जेवणं उरकली आणि नातेवाईक निघाले... त्यारात्रीत सगळं बदलून गेलं.

त्यारात्री त्यांनी मला आतल्या खोलीत बोलावून घेतलं. तोवर अरुण लहान राहिला नव्हता. चांगला बारावीत होता. त्यामुळे मी आत जायला तशी तयारच नव्हते. पण काय मनात होतं यांच्या नकळे... त्याच्या समोर बखोटाला धरून यांनी आत नेलं. आत जो काही छळ केला त्याचा तर आता या वयाला विचारसुद्धा नको वाटतो. त्यानंतर जमते दोन-चार महिने. अरूंचा बारावीचा रिझल्ट लागला आणि यांनीहून आग्रहाने त्याला परदेशाच्या शिक्षणासाठी पाठवून दिल. त्यासाठी त्याकाळी कर्ज देखील काढलं होत त्यांनी. अरुणच्या मनावर त्या कर्जाचा बोजा इतका वाढवून दिला होता त्यांनी की कधी चुकून त्याने इथे येण्याचा विषय काढला तरी फक्त 'कर्ज आहे रे अजून;' हे एक वाक्य पुरायच त्याला तो विचार सोडून द्यायला. अरुण गेला आणि माझं घर म्हणजे तुरुंग आणि आयुष्य म्हणजे शरीरातली कैद झालं. किती वर्ष लोटली त्याला आता गिनती देखील नाही. मला मन आहे.... भावना आहेत.... इच्छा-आकांशा आहेत हेच मुळी मी विसरून गेले होते....

.... आणि मग अरुण आला.... आपल्या गोंडस लेकाला आणि गुणी बायकोला घेऊन आला. येताना पैशाचा डोंगर घेऊन आला होता. त्यामुळे यांचं तोंडच बंद झालं ओत. अरुण आला त्या काळात यांनी मला स्वयंपाकघरात देखील ऐकट सोडलं नाही. तरीही एका क्षणी त्यांच्या नकळत अरुणने मला सांगायचं प्रयत्न केला होता की आता या तुरूंगातून मी माझी सुटका करून घेतली पाहिजे. मलादेखील त्याच्या रूपाने सुटकेचा किरण दिसला होता. पण मग काय झालं ते कळलंच नाही. दोन दिवसांसाठी अरुण बायकोला घेऊन गेला होता. त्याच्या लेकाला आमच्यावर सोडून. यांनादेखील गोंडस लहानग्या नातवाचा लळा लागला होता असं मला वाटत होतं. पण अरुणाला घाईघाईने परत बोलावून घ्यावं लागलं ते त्याच्या बाळाच्या अंतिम विधीसाठीच. काय तोंड दाखवणार होते मी अरुणला आणि त्याच्या बायकोला? यांचा स्वभाव पूर्ण माहीत असूनही मीच आग्रहाने अरूणच्या लेकाला ठेवून घेतलं होत माझ्याकडे. त्यामुळे अरुणने कितीतरी बोलायचा प्रयत्न केला पण मीई त्याच्या समोर जायलाच नकार दिला. शेवटी तो बायकोला घेऊन कायमचाच निघुन गेला आणि मी माझ्या आयुष्यच वास्तव स्वीकारलं.

दोन महिने झाले असतील त्या घटनेला आणि अचानक यांचं झोपेतून दचकून उठणं आणि अरुणच्या लेकाच्या नावाने हाका मारणं सुरू झालं. त्यांच्यातला बदल त्यांनाच लक्षात आला बहुतेक... आणि मग अचानक येऊन म्हणाले हे घर सोडणार आहोत आपण. गावाबाहेर एक बंगल्यांची कॉलनी बांधत आहेत. तिथे एक सुंदर शांत असा बंगला मी बघितला आहे. तुला खूप आवडेल. तस तुला शांतता खूप आवडते न. म्हणून तुझाच विचार करून घेतला आहे तो बंगला. माझ्याशी आयुष्यात कधी बसून दोन शब्दही न बोलता यांना मला काय आवडतं हे कसं माहीत? कधी विचारलं तरी होतं का यांनी मला? हा भर वस्तीमधला अगदी बाजारपेठेतला सुंदर वाडा सोडायला माझं मन तयारच नव्हतं. खिडकीतून येणारी जाणारी लोकं दिसायची तोच काय तो माझ्या शुष्क आयुष्यातला विरंगुळा होता. पण बाळाचे भास वाढायला लागले आणि घाईघाईने निर्णय घेऊन यांनी वाडा सोडला.

हे म्हणतील तसं त्यांचं ऐकत जगायचं याची सवय इतकी झाली होती की मी काहीच म्हंटल नाही. पण इथे आलो आणि माझ्या लक्षात आलं की आता आयुष्य म्हणजे फक्त तुरुंगवास नाही तर साखळदंडांनी बांधलेल्या कायद्याची शिक्षा सुरू झाली आहे. माझं बाहेर पडणच काय पण खिडकीकडे जाणं देखील यांनी बंद करून टाकलं. गावात असतानाच यांनी लोकांना सांगायला सुरवात केली ओटी की मी एकलकोंडी बाई आहे. इथे तर त्यापुढील पायरी गाठली यांनी माझ्या बदनामीची. एकएकदा इतका राग यायचा मनातून. पण अरुणच्या लेकाच्या वेळची घेताना आठवून मी कधीच कोणाशीही बोलायचा प्रयत्न केला नाही.

पण मग अवि आणि सरू त्यांच्या लहानग्या पिल्लाला घेऊन जवळच्याच एका बंगल्यात राहायला आले आणि माझ्या मनाने परत एकदा उचल घेतली. माझ्या मनाने त्या कुटुंबाकडे ओढ घ्यायला सुरवात केली. यांच्या नकळत मी खिडकीतून त्या घराकडे हळूच नजर टाकायचे. मग तर तसा नादच लागला. तो इवलासा छोकरा सतत त्यांच्या आवारात खेळत असायचा. एकदिवस तो दिसला नाही तर मन कावर-बावर झालं आणि गेले बघायला. तर तो लब्बाड मागील दारी होता. मग त्याच्या आईच्या नकळत त्याच्याशी दोन शब्द बोलले आणि पटकन परत आले. माझं हे गुपित माझ्याकडेच राहिलं आणि हळूहळू थोडी हिम्मत वाढली. पण मग एक दिवस सरू तिच्या लेकाला घेऊन आमच्या घरात वादळासारखी शिरली आणि............ आणि मग ते वादळ त्या तिघांच्या मृत्यूनंतरच थांबलं.

त्यानंतर यांच्या व्यतिरिक्त मी कोणाशी बोलेन ही आशाच मी सोडून दिली. पण मनुष्य स्वभाव तरी कसा! हे आज पडले आणि आता तीन आठवड्यांची अंथरुणात अडकले आहेत तर परत एकदा माझ्या जीवाने उचल खाल्ली आहे. बाहेरच्या जगाशी थोडा तरी संपर्क होईल का? ही आशा परत एकदा मनात जागृत झाली आहे.

समाप्त