Friday, January 25, 2019

  मेनोपॉज.... एक संक्रमण!

 स्त्री साधारण चाळीशीच्या पुढे सरकली की तिच्यात अनेक बदल व्हायला लागतात. मुलं स्वतःचं शाळा/कॉलेज स्वतःच सांभाळायला लागलेली असतात. नवरा नोकरी/धंद्यात सेट झालेला असतो. ती स्वतः नोकरी करत असली तर ती देखील काम, पगार आणि होणारी धावपळ यात adjust झालेली असते. नोकरी नसली तर घर सांभाळत तिने स्वतःला थोडं बिझी केलेलं असतं. सासू-सासरे असले तरी आता एकमेकांचं काय पटत आणि काय नाही ते एकमेकांना बरोबर माहीत असतं. त्यामुळे एक सुखी-संसारी स्त्री तिच्या अंगा-प्रत्यांगातून आणि वागण्या-बोलण्यातून दिसायला लागलेली असते.

 पण मग या सुखात देखील तिला काहीतरी खुपायला लागतं. ते नक्की काय असत ते तिला देखील कळत नाही. पण वयात येणाऱ्या मुलांनी कधीतरी थोडसं जरी उलट उत्तर दिलं तरी तिच्या डोळ्यात पाणी उभं राहतं. ती नेहेमीप्रमाणेच मनापासून काहीतरी सांगत असते आणि नवरा देखिल नेहेमीप्रमाणेच दुर्लक्ष करतो आणि तिला वाटायला लागतं 'याला मी नकोशी झाले आहे.' हिने ठरवलेला मेनू सासूने बदलला आणि त्या बदललेल्या मेनूचं घरात सगळ्यांनी कौतुक केलं की तिला वाटत आता आपली गरजच संपली आहे.

तिला हे बदल मनातून जाणवत असतात; कळत असतात. त्याची कारणं कदाचित ती समजत देखिल असते. शरीरात होणारे बदल तिला जाणवत असतात. दर महिन्याला येणारी पाळी अलीकडे स्वतःच्या मनाप्रमाणे तारखा बदलायला लागलेली असते. कधी स्त्राव जास्त; तर कधी फारच कमी झाल्याने अजून गोंधळ माजलेला असतो मनात. वाढत्या वयाची जाणीव व्हायला लागलेली असते. अलीकडे आरशासमोर थोडा जास्त वेळ ती उभी राहायला लागते. वाढणारं वजन आणि चेहेऱ्यावरच्या इतराना न कळणाऱ्या सुरकुत्या तिला मात्र जाणवायला लागलेल्या असतात. एरवी 'घाई आहे';  म्हणून जेमतेम पावडर-टिकली आणि लिपस्टिक लावणारी ती आवर्जून एखादं क्रीम आणते स्वतःसाठी. मनात होणारी खळबळ तिला कळत असते देखील आणि नसते देखील.

'मेनोपॉज सुरु झाला असेल का ग?' अस्वस्थ मनाने मैत्रिणीला प्रश्न विचरला जातो. 'अग, याला प्रि-मेनोपॉज म्हणतात. मी वाचलं आहे इंटरनेटवर.' मैत्रिणीचं उत्तर. मग रात्री काम आटोपल्यावर आणि घरातले सगळे झोपल्यावर गूगलबाईला जागं करून ती देखील या 'प्रि-मेनोपॉज आणि मेनोपॉज'बद्दल माहिती गोळा करायचा प्रयत्न करते. होणारे बदल... घ्यायच्या काळज्या... गायनॉकॉलॉजीस्टची भेट घेण... सुरू होतं; आणि हे सगळं ती आपलं आपण करत असते. अस्वस्थ मनातला एक कोपरा तिला सांगत असतोच,'तू उभी राहिलीस तर घर उभ राहील. त्यामुळे मनातून अस्वस्थ असलीस तरी त्याचा त्रास करून घेऊ नकोस.' आणि तरीही...... ती मनातून खूप घाबरलेली असते आणि एकटी देखिल असते. या एकटेपणात नवऱ्याच्या एका प्रेमळ कटाक्षासाठी तिचे डोळे आसुसलेले असतात. एक हात मुलांना जवळ घेण्यासाठी अस्वस्थ असतो; तर दुसरा हात संसार हातातून सुटत तर नाही न या भितीने सगळं घट्ट जवळ ओढत असतो. एकाच वेळी तिला सगळ हवं देखिल असतं आणि नको देखील.

आणि तिचं मन! ते मात्र एकूणच संक्रमणात अडकलेलं असत. तरीही या संक्रमाणाला सामोरं जाण्याची तिने तिच्या मनाची तयारी केलेली असते. अर्थात हे सगळं तिला कोणालातरी सांगायचं असतं; आणि तिला तिच्या आपल्यांनी फक्त इतकंच म्हणायला हव असतं.... "मला कळतय ग... तू बोल मनातलं! मी घेईन समजून."   

Friday, January 18, 2019

  अँड्रॉपॉज एक दुर्लक्षित विषय!

 ('अँड्रॉपॉज' म्हणजे नक्की काय? ते सांगते आणि माझ्या लेखाला सुरवात करते. ज्याप्रमाणे महिलांना चाळीशी-पंचेचाळिशीमध्ये थोडे शारीरिक बदल आणि मानसिक बदलांना सामोरं जावं लागतं; त्याप्रमाणे पुरुषांमध्ये देखिल असेच बदल होत असतात; त्यालाच 'अँड्रॉपॉज' असं म्हणतात.)

 अलीकडच्या काळात किमान शहरांमध्ये मेनोपॉजबद्दल हळूहळू चर्चेला सुरवात झाली आहे. स्त्रियांच्यात साधारण चाळीशी नंतर होणारे बदल; त्यांचे ऋतुचक्र बदलणे आणि त्यामुळे त्यांच्यात होणारे शारीरिक आणि मानसिक बदल याची अलीकडे काही प्रमाणात दखल घेतली जात आहे; आणि हे चित्र समाधानकारक आहे यात प्रश्नच नाही. पण ज्याप्रमाणे मेनोपॉजबद्दल मोकळेपणी बोलले जाते त्याचप्रमाणे अँड्रॉपॉज देखील थोडी चर्चा झाली पाहिजे. कारण स्त्रियांप्रमाणेच पुरुषदेखील या विशिष्ट शारीरिक आणि मानसिक संक्रमणातून जात असतात.

अँड्रॉपॉजचे कारण पुरुषांमधील hormone testosterone कमी होणे हे असते. अर्थात हे टेस्टोस्टेरोन कमी होणे हा वाढत्या वयात शरीरात होणारा नैसर्गिक बदल असतो. काही मतांप्रमाणे हे टेस्टोस्टेरोन साधारणपणे वयाच्या तिशीनंतर प्रत्येक दशकात दहा टक्यांनी कमी होत असते. काही अभ्यासकांच्या मते साधारणपणे वयाच्या पन्नाशीमध्ये तीस टक्के पुरुष कमी होणाऱ्या टेस्टोस्टेरोनच्या प्रमाणामुळे अँड्रॉपॉज अनुभवतात. यामुळे अनेकजण शारीरिक आणि मानसिक बदल अनुभवतात. अँड्रॉपॉजचा परिणाम अनेक प्रकारे होऊ शकतो. शक्ति कमी होणे, mood swings, चीडचीडेपणा, hot flashes, अस्वस्थपणा, depression, अतिरिक्त वजन वाढणे (पोट सुटणे), स्मरणशक्ती कमी होणे, केस गळणे आणि शरीरसुखाची इच्छा कमी होणे असे काही ठळक बदल पुरुषांना जाणवतात. टेस्टोस्टेरोन  कमी होण्यामुळे हृदयविकाराचा झटका येणे किंवा हाडांची ठिसूळता वाढणे हे काहीसे सिरीयस त्रास देखील होऊ शकतात.  यावर योग्य प्रमाणात व्यायाम करणे, योग्य आहार घेणे हे उपाय प्रत्येक डॉक्टर सांगतात. त्याशिवाय डॉक्टर्सच्या सल्ल्याने टेस्टोस्टेरोन replacement देखील करता येते.

अर्थात हे सगळे उपाय आपण विविध माध्यमातून वाचू किंवा समजून घेऊ शकतो.  मात्र मेनोपॉज काय किंवा अँड्रॉपॉज काय हे स्त्री आणि पुरुषांमध्ये होणारे शारीरिक आणि पर्यायाने मानसिक बदल आहेत. जे वयापरत्वे होणारच आहेत. यावर डॉक्टर्सकडून मदत घेणे, योग्य व्यायाम आणि योग्य आहार घेणे हे उपाय तर आहेतच. पण त्याचप्रमाणे एक चांगली lifestyle सुरु करणे हे आहे. कारण जर सुदृढ मन असेल तर शरीरात होणारे बदल आणि त्यामुळे होणारे त्रास सहन करणे कदाचित् थोडे सोपे जाईल. 

 सर्वसाधारणपणे वयाच्या चाळीशी किंवा पंचेचाळीशीपर्यंत स्त्री-पुरुष दोघांनी त्यांच्या एकूण करियरमध्ये बऱ्यापैकी जम बसवलेला असतो. मुलं देखील तशी मोठी झालेली असतात. पण तरीही सतत पुढे पळण्याची इच्छा प्रत्येकातच असते. मग अजून चांगले काम... पुढची पोस्ट मिळवण्यासाठीची मेहेनत... यामुळे एक चांगले आयुष्य जगण्याचे राहून जाते आहे हे मात्र कोणाच्या लक्षात येत नाही. लग्नानंतरचे गुलाबी दिवस सगळेच अनुभवतात. मग कधीतरी मुलं होतात आणि प्रपंच वाढतो. करीयरची घोडदौड आणि घरच्या वाढत्या जवाबदाऱ्या यामुळे जगणे मात्र राहून जाते. वर्षातून एकदा कुटुंबाला एक झकास टूर करून आणली की जवाबदारी संपली असा काहीसा दृष्टीकोन होतो.  हळूहळू वाढत्या वयाबरोबर मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रोल वाढणे हे जगजाहीर आजार दोस्ती करायला लागतात. एकूणच वाढणाऱ्या ताणामुळे चिडचिड, अस्वस्थता वाढते. यातून एकमेकांना समजून घेणे कमी होते आणि मग संसार चालू राहातो पण मनं कायमची दुखावली जातात. याचं एक महत्वाच कारण म्हणजे मेनोपॉज आणि/किंवा अँड्रॉपॉज हे देखिल आहे; हा विचार मात्र कोणी करत नाही.

पण जर खरच चाळीशी नंतर आपल्यात होणारे बदल आपण समजून घेऊन आपल्या साथीदाराबारोबरचा संवाद वाढवला आणि लहान लहान गोष्टींमधून आयुष्यातला आनंद मिळवायला लागलो तर कदाचित् आयुष्य जास्त सुंदर आणि परिपूर्ण असेल. त्यामुळे एकमेकांबरोबर वेळ घालवणे, थोड्या अवांतर गप्पा मारणे जास्त महत्वाचे आहे. आपण तरुण वयात आठवणीने एकमेकांच्या आवडी लक्षात ठेऊन एकमेकांना गिफ्ट्स देतो. तेच वयाच्या पंचेचाळीशीनंतर करायला काय हरकत आहे. surprise काय फक्त तरुणांना आवडते? मुरलेल्या नात्याला देखिल नव्हाळीचे गोड भाव आवडतात.

म्हणून एक प्रेमळ सल्ला देते! पत्नीला/पतीला I LOVE YOU चाळीशी नंतरच्या वयात म्हणून तर बघा... मुरलेल्या लोणच्या प्रमाणे त्याची चव ओठांवर रात्रभर रेंगाळेल.     

Friday, January 11, 2019

नमस्कार,

गेल्या शुक्रवारी मी माझ्या मनस्पंदन या ब्लॉगची सुरवात केली. तुमच्यासारख्या रसिक वाचकांचा माझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद लाभला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! यापुढे दर शुक्रवारी एखादी कविता किंवा एखादा लेख किंवा कथा या ब्लॉगवर लिहिण्याचा मानस आहे.

खरंतर लिहायला कधी लागले ते आठवत नाही; पण साधारण 2013च्या सुमारास जे काही लिहीत होते ते save करून ठेवायला लागले. साधारण त्याचकाळात ही कविता लिहिली. आपल्याला सर्वांनाच आपल्या शाळा-कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी प्रिय असतात. पण एकदा संसाराला लागलं की हीच दोस्त मंडळी अचानक भेटली की घर किंवा ऑफिस आठवून आपण उगाच उडत काहीतरी बोलून पळ काढतो. असं मनात असूनही थांबून बोलता येत नसल्याची खंत मनात बाळगणाऱ्या सर्वांसाठी ही कविता....

एकदा एका वळणावर;
जुनी मैत्री भेटली...
आठवणी घेउन थांब ना... ऐक ना...
हट्ट धरून बसली!

ऑफिसची वेळ; नव-याचा डबा...
पोरांची शाळा; बॉसचा चेहरा..
आठवल क्षणात सारं;
अन् पाठ केली तिच्याकड़े...

थोड़ी हिरमुसली-थोड़ीशी फुगली...
निघून गेली दुसरीकडे...
जाणवलं तिच हिरमुसणं फुगणं...
पण वेळ नव्हता मला...
मनात होत ऑफिसला वेळेत पोहोचणं!

संध्याकाळी परत ट्रेनच्या डब्यात दिसली..
ओळख दाखवू की नको... या कन्फ्युजनमध्ये होती;
मी हसले... तशी ती पण हसली...
पटकन् जवळ येउन कुशीत शिरली..

'कळत ग मला तुझ्या असण्याच महत्व...
सुटत नाही पण हे संसाराच देण..’
तिला मिठीत घेउन मी मनातच म्हंटल;
स्टेशन आलं म्हणून स्वतःला आवरलं.

ती हसली ... समजूतदार आहे पठ्ठी;
तिच हो ती.......
कुमारी मैत्री विश्वास आठवणी!!!

(कविता कशी वाटली ते प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रियांनी लेखनाचा हुरूप येतो)

Friday, January 4, 2019

पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने



9 डिसेंबरला माझ्या पहिल्या वहिल्या पुस्तकाचे 'कथा विविधा'चे प्रकाशन झाले. आत्मस्तुतिची चेष्टा स्वीकारून मनापासून सांगते; प्रकाशनाचा कार्यक्रम दृष्ट लागण्यासारखा अप्रतिम आणि आगळा-वेगळा झाला. कथा संग्रहातल्या 'एक रेड वाईन नातं' या कथेचे अल्प अभिवाचन प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमीतने केले; तर 'तो आणि ती...' या पौराणिक नाट्य कथेतील श्रीकृष्णचे मनोगत चिन्मय मांडलेकर यांनी नाट्य स्वरूपात सादर केले. 'लाली' या सामाजिक कथेवर एक शॉर्ट फिल्म देखील आम्ही सादर केली. काहीसा भावनिक आणि मन:स्पर्शी कार्यक्रम झाला एकूणच.

खर सांगायचं तर आजवर एकूण तेवीस कथा मी लिहिल्या आहेत. काही हिंदी आणि मराठी कविता देखील केल्या आहेत. मनाला स्पर्शून जाणाऱ्या विषयांवर लेखही लिहिले आहेत. त्यामुळे पुस्तक प्रकाशन करताना यातील काय प्रकाशित करायचं यावर मी बराच विचार केला. पण मग कधीतरी एका क्षणी माझ्या मनानेच मला जाणवून दिलं की माझी कोणती ओळख झालेली मला जास्त भावेल; ते लेखन प्रकाशित झालं पाहिजे. आणि मग मी ठरवलं की 'कथा लेखिका' म्हणून जर ओळख हवी असेल तर विविध विषयांवरच्या माझ्या कथांचं प्रकाशन 'कथा विविधा' या नावाने करायचं. हेच नाव का? तर यातून पुस्तक 'कथां'चं आहे हे लक्षात येत.... त्यात 'विविध' प्रकारच्या कथा आहेत; हे प्रेरित होतं आणि एक थोडं आपुलकीचं कारण म्हणजे परागने (माझा नवरा) हे नाव सुचवलं!

 खरं म्हणजे माझ्या भावाला (अभयला) वाचनाची खूप आवड. तो जे पुस्तक वाचायचा ते मी देखील वाचलंच पाहिजे असा त्याचा आग्रह असायचा. त्यामुळे तो देईल ते वाचायची सवय लागली आणि पुढे वाचनाचं वेडच लागलं. चांदोबापासून झालेली ही सुरवात मग थांबलीच नाही. अभयमुळेच गूढ, रहस्य, भय, विज्ञान कथा वाचायला लागले आणि मग त्या देखील  खूप आवडायला लागल्या. रत्नाकर मतकरी, नारायण धारप, सुहास शिरवाडकर आवडते लेखक. विनोदी शैलीतील पु. लंची व्यक्तिचित्रणं हसता-हसता जगायला शिकवून गेली. व. पु. च्या कथांमधला भावनिक स्पर्श आवडायला लागला... ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबऱ्या वाचताना तर वेळेचं भान देखील राहायचं नाही. रणजीत देसाई, शिवाजी सावंत, द. मा. मिरासदार, वी. स. खांडेकर सगळ्याच प्रतिभाशाली लेखकांच्या कादंबऱ्या वाचल्या. थोडं मोठं झाल्यानंतर दर्जेदार विषयांची भाषांतरित पुस्तकं देखील वाचायला लागले.

 ही पुस्तकं वाचताना माझं असं एक विश्व तयार व्हायचं. त्या विश्वात ते पुस्तक आणि त्यातल्या घटना मी अक्षरशः जगायचे. पुस्तक वाचून संपलं तरी पुढचे कित्येक दिवस मी त्याच विश्वात असायचे. मग कधीतरी नकळत मनातल्या मनात माझी अशी एक गोष्ट तयार करायला लागले. काहीसं वाचलेल्या कथेतलं आणि काहीसं माझ्या मनातलं. खूप मजा यायची मला अशा कल्पनांच्या राज्यात रमायला. त्यावेळी कधी कधी वाटायचं की आपण हे  असं फक्त कल्पनांच्या राज्यात रमण्यापेक्षा मस्त लिहील पाहिजे. ही लेखनाची हौस मी शाळेत आणि कॉलेजमध्ये  कथा कथन, वाद-विवाद स्पर्धा आणि निबंध स्पर्धेत भाग घेऊन पूर्ण करायचे. कधी कधी बक्षीसं देखील मिळाली आहेत. पण मग शिक्षण संपल आणि अस काही लिखाण करण देखील संपल.

त्यानंतर अनेक वर्षांनी कधीतरी माझ्या शाळेतल्या मित्राशी (प्रदीपशी) गप्पा मारताना मनातल्या एका कथेची कल्पना त्याला सांगितली आणि त्याने आग्रह केला म्हणून ती कथा लिहून त्यालाच पाठवली. कथा छान जमली आहे असा त्याचा अभिप्राय आला आणि मग मात्र लेखनाचा उत्साह आला. त्यानंतर मात्र मला जे विषय भावले किंवा मनाला स्पर्श करून गेले किंवा जे अनेक विषय बरीच वर्षे मनात घोळत होते त्यावर लिहायला लागले.

 माझ्या कथांविषयी सांगण्यासारखा अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे माझ्या कथांमधील मध्यवर्ती व्यक्तिमत्व स्त्रीचंच असतं. त्याचं कारण देखील तसंच महत्वाचं आहे. अनेक स्त्रियांप्रमाणे मला देखील माझ्या स्त्री जन्माचा आदरयुक्त अभिमान आहे. शिवाय अनेक वर्षे भारतीय स्त्रीशक्तीचं काम केल्याने या अभिमानाला विचारांची बैठक मिळाली आहे. हा माझ्या स्वभावातला विशेष या स्त्रीपात्रांतून दिसतो.  या कथा मासिकांना पाठवाव्यात किंवा पुस्तक प्रकाशित करावं असं कधी वाटलं नव्हतं. आवडतं आणि मजा येते म्हणून लिहायचे आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींना आणि सदृदांना पाठवायचे. पण मग पराग (माझा नवरा) आणि विनीत (मित्र) यांच्या आग्रहामुळे पुस्तक प्रकाशन करण्याचा विचार पक्का केला. रहस्य, गूढ, सामाजिक, राजकीय, विज्ञान, भावनिक आणि पौराणिक अशा सात वेगवेगळ्या विषयांवरच्या कथा या पुस्तकात आहेत.

कथा प्रकाशनाचा माझा पहिलाच प्रयत्न असूनही 'ग्रंथाली' सारख्या नामावन्त प्रकाशन संस्थेने आस्थेने माझ्या कथा संग्रहाचे प्रकाशन केले त्याबद्दल मी त्यांची मनापासून ऋणी आहे. आपले अभिप्राय समजून घेण्याची खूप खूप उत्सुकता आहे. तुमच्यासारखे सुजाण वाचक 'कथा विविधा' हा माझा कथा संग्रह वाचतील आणि त्यांची प्रामाणिक मते माझ्यापर्यंत पोहोचवतील अशी आशा आहे.