Saturday, July 30, 2022

माझी पहिली web film


https://youtu.be/s-663jmnfbo


मी लिहिलेल्या गूढ कथांवर आधारित एक खूप वेगळी निर्मिती आज सादर करते आहे. Epilogue  नावाची हिंदी web film जी  कृणाल राणे या तरुण दिग्दर्शकाने दिग्दर्शित केली आहे. माझ्या सोबत राहुल अगस्ती या ख्यातनाम फॅशन डिझायनर यांनी देखील निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. नक्की ही फिल्म बघा, लाईक करा आणि शेअर करा.


ज्योती अळवणी

Right Brain production


Friday, July 22, 2022

नातेदारी

 नातेदारी


1

मृदुला कॉलेजच्या गेट बाहेर पडते आहे. शाम त्याची बाईक तिथे पार्क करतो आहे. मृदुला त्याला बघून थबकते. तिच्या डोळ्यात त्याच्याबद्दल उत्सुकता आहे. शामचं तिच्याकडे लक्ष नाही. तो बाईकवरून उतरत असताना अचानक त्याचा पाय चिखलात जातो. शाम वैतागतो. मृदुलाला हसायला येतं. ती तिच्या बॅगमधून पाण्याची बाटली काढते आणि शाम जवळ जाऊन त्याला ती बाटली देते. तिला बघून शाम एकदम स्थब्द होतो. त्याचं संपूर्ण लक्ष तिच्या चेहऱ्याकडे आहे. तिच्या हातातली पाण्याची बाटली त्याला दिसत नाही. मृदुला हसते आणि टिचकी वाजवते. शाम ओशाळतो. मृदुला पाण्याची बाटली पुढे करते; शाम ती बाटली घेऊन त्याच्या सँडल्सवर पाणी घालायला लागतो. चिखल साफ करून शाम वर बघतो. मृदुला लांब चालत जाताना दिसते. तो आजूबाजूला बघतो. एक नवीन बाटली विकत घेतो.

मृदुला चालते आहे आणि शाम तिच्या शेजारी येऊन तिला थांबवत तिच्या हातात पाण्याची नवीन बाटली ठेवतो.

शाम : शाम...

मृदुलाचा आवाज चेष्टेचा आहे

मृदुला : अहं.... टळटळीत दुपार

शाम मिश्किल आवाजात म्हणतो : टळटळीत दुपार.... हे नाव थोडं ऑड नाही का?

मृदुला हसत : very funny

शाम : हे तर अजून विचित्र

मृदुला हसत शेक हॅन्ड साठी हात पुढे करते : हाय. मृदुला. MBA लास्ट सेम.

शाम : ओह.... मी पण. अरे? पण कधी बघितलं नाही.

मृदुला : कारण दीड वर्ष on line कॉलेज होतं.

शाम एकदम ओशाळतो आणि हसतो. एव्हाना दोघे एकत्र चालायला लागले असतात. मृदुला एका इमारतीजवळ थांबते.

शाम : इथे?

मृदुला : राहाते मी.

शाम : ओह...

वळून इमारतीकडे बघतो.

मृदुला हसत : चौथा मजला.

शाम हसत : hmmm....

मृदुला : आणि तू?

शाम : इथे नाही.

मृदुला : ते माहीत आहे... पण मग माझ्या सोबत इथे?

शाम : उद्या pick करायला यायचं तर बिल्डिंग नको का माहीत असायला?

मृदुला : तुमच्यात इतकं लगेच अँप्रोच करतात का दोस्तीसाठी?

शाम : अंह. पण ही केस वेगळी आहे.

मृदुला : अच्छा? काय आहे वेगळं?

शाम : हमारा इरादा सिर्फ दोस्ती का नही है.

मृदुला गोड हसते. शाम देखील. मृदुला जायला निघते.

शाम : उद्या मी वाट बघू न?

मृदुला मागे वळून बघते हसते आणि बिल्डिंगच्या आत शिरून दिसेनाशी होते. शाम गोड हसतो; एकदा इमारतीकडे वर बघतो आणि मागे वळतो.

***
2

सकाळची वेळ आहे. मृदुला इमारती बाहेर येते. समोरच शाम बाईक घेऊन उभा आहे. ती त्याच्याकडे बघून हसते आणि त्याच्या जवळ येते.

मृदुला : हाय... इथे?

शाम : कॉलेजकडे जायचा रस्ता इथूनच आहे.

मृदुला : पण तू जात नाही आहेस. थांबला आहेस.

शाम : अं... हो! वाट बघतो आहे.

त्याचं बोलणं ऐकून मृदुला हसते.

मृदुला : OK बाय.

आणि चालायला लागते. शाम एकदम गोंधळतो आणि बाईक ढकलत तिच्या सोबत चालायला लागतो.

शाम : फारच खडूस बुवा तू.

मृदुला हसत : हो का? आणि काही?

शाम : आणि खूप सुंदर.

मृदुला : माहीत आहे मला. आणि?

शाम : तू तुझ्या दिसण्याबद्दल म्हणते आहेस का?

मृदुला एकदम थांबते आणि त्याच्याकडे वळून बघते.

मृदुला : मग तू कोणत्या सौंदर्याबद्दल म्हणत होतास?

शाम : मनाच्या!

मृदुला : ओहो! आणि तुला कसं कळलं माझं मन?

शाम : अहं! अजून मन नाही कळलं. पण मनाचं सौंदर्य दिसलं.

मृदुला : ओह! That's too cheezy.

शाम : I don't think so.

मृदुला : What do u mean?

शाम : तू काल मला आपणहून तुझी पाण्याची बाटली देऊ केलीस. म्हणून म्हंटलं तू मनाने सुंदर आहेस.

मृदुला गाल उडवते आणि चालायला लागते. परत शाम त्याची बाईक ढकलत तिच्या सोबत चालायला लागतो.

मृदुला : गाडीत पेट्रोल नाही का?

शाम : आहे की. पण तुला चालायचं आहे न.

मृदुला शामकडे बघून हसते आणि त्याच्या मागे बसते. शाम तिला घेऊन निघतो.

***
3

शाम गेटजवळ उभा आहे. तो सतत घड्याळ बघतो आहे. त्याला समोरून मृदुला येताना दिसते.

शाम : अग, होतीस कुठे? सतत फोन लावतो आहे तर तुझा फोन बंद. मला वाटलं कॉलेजमध्ये आली असशील म्हणून थांबलो नाही तुझ्या बिल्डिंग जवळ. थेट इथे आलो. तर तू कॉलेजमध्ये पण नाहीस.

मृदुला : अरे काय सांगू? माझी सुपर मिनू म्हणजे न....

शाम : तुझ्याकडे मांजर आहे?

मृदुला : काय? कोणी सांगितलं?

शाम : मिनू हे नाव usually मांजरीचं असतं.

मृदुला : फालतू जोक करू नकोस. मिनू माझ्या आजीचं नाव आहे.

शाम : आणि तू तिला चक्क नावाने हाक मारतेस?

मृदुला : हो! तू भेटलास की लक्षात येईल तुझ्या. ती कोणत्याही अँगलने आजी नाहीय.

शाम : बरं! तर...... मिनूने काय केलं?

मृदुला एकदम उत्साहात येऊन सांगायला लागली.

मृदुला : अरे ती रोज सकाळी walk ला जाते तिच्या काही मैत्रिणींबरोबर. त्यातल्या एकीच्या गळ्यातली चेन आज सकाळी एका चोराने खेचली आणि पळायला लागला. मिनूने चक्क अचानक त्याला खेचला आणि खाली पाडला.

शामला ते ऐकून धक्का बसला. तो मोठे डोळे करून म्हणाला : मग?

मृदुला : मग काय? सगळ्या जणींनी मिळून धु धु धुतला त्याला आणि मग पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्या. हिने मला स्टेशन मधून फोन केला आणि सांगितलं सगळं.

शाम : मग?

मृदुला : मग मी धावले पोलिस स्टेशनला. तिथे जाऊन बघते तर त्या स्टेशन इनचार्जलाच हिने फैलावर घेतलं होतं. बागेत सकाळच्या वेळी पोलीस गस्त नसते म्हणून.

शाम : मग?

मृदुला : त्या इन्स्पेक्टरने तरी गप्प बसून ऐकून घ्यायचं न तिचं. नेमकं त्याने बोलायला सुरवात करताना तिला आजी म्हंटलं.

शाम : मग?

मृदुला : मग? मग जे झालं ते बघायला तू प्रत्यक्ष असायला हवा होतास.

शाम : मग?

आता मृदुला वैतागते.

मृदुला : हे मग मग काय लावलं आहेस? सगळं निस्तरला मी. त्या गोंधळात फोन switch ऑफ ठेवला होता तो तसाच राहिला होता. म्हणून तुला फोन लागत नव्हता.

शाम : सॉलिड आहे यार तुझी आजी.

मृदुला कपाळाला हात लावते आणि म्हणते : आजी नाही शाम.... मिनू... मिनू म्हणायचं तिला.

शाम : ओह सॉरी. सॉलिड आहे तुझी मिनू.

दोघे हसतात आणि कॉलेजच्या आत जातात.

***
4

मृदुलाला आज थोडा उशीर होतो कॉलेजमध्ये पोहोचायला. तिचं आणि शामचं कॉलेजच्या लायब्ररी जवळ भेटायचं ठरलं असतं. ती लायब्ररीच्या दारात येते आणि तिला दिसतं की शाम एका गोड मुलीशी एकदम मोकळेपणी गप्पा मारतो आहे. ते बघून मृदुला थोडी डिस्टर्ब होते. ती पटकन मागे वळते आणि लेक्चरला जायला निघते. इतक्यात शाम तिला बघतो आणि त्या मुलीला बाय म्हणून पटकन मृदुलाच्या दिशेने येतो.

शाम : हाय

मृदुला : हाय....

शाम : किती उशीर केलास? मी वाट बघत होतो.

मृदुला : हो दिसलं मला ते.

शाम : काय ग?

मृदुला : काही नाही. उशीर झालाय न? मग उगाच गप्पा नको मारुस. चल.

दोघेही क्लास च्या दिशेने जातात.

****
5

मृदुला कॉलेजजवळ पोहोचते. ती शामला शोधते आहे. तिचं लक्ष जातं तर शाम परत एकदा त्याच मुलीसोबत चहावाल्या जवळ उभा आहे. मृदुला एकदम थबकते. तिच्या चेहेऱ्यावर थोडं दुःख आहे. ती पटकन मागे वळते. यावेळी शामचं लक्ष जात नाही. मृदुला तिथून निघून जाते.

***
6

संध्याकाळची वेळ आहे .शाम मृदुलाची वाट बघत तिच्या इमारती खाली उभा आहे. एक रिक्षा येते आणि आजी खाली उतरते.

आजी रिक्षावाल्याला : हा नंबर बोल तुझा.

रिक्षावाला गोंधळतो.

रिक्षावाला : तुम्हाला माझ्या रिक्षाचा नंबर का हवाय आजी?

आजी : आजी? तुला मी आजी वाटले का रे?

रिक्षावाला एकदम गडबडून जातो.

रिक्षावाला : मग? काय म्हणू?

आजी : काही म्हणू नकोस. तुझ्या रिक्षाचा नंबर नाही; मोबाईल नंबर दे. GPay करणार आहे मी. सुट्टे नाहीत माझ्याकडे.

रिक्षावाला : अरे देवा. माझ्याकडे नाही तुमचं pay.

आजी : असा कसा रे तू? आता पैसे कसे देऊ?

शाम हे सगळं बघत असतो. तो पुढे होतो आणि खिशातून पैसे काढून रिक्षावाल्याला देतो.

आजी : अरे अरे तू का देतो आहेस?

शाम : तुझ्याकडे सुट्टे नाहीत आणि त्याच्याकडे Gpay नाही. म्हणून हा मधला मार्ग काढला आहे. मी आत्ता देतो... तू मला तुझे सुट्टे झाले की दे किंवा Gpay कर.

आजी : सांग बघू नंबर.

शाम नंबर सांगतो. आजी तो फीड करून घेते आणि लगेच त्याला Gpay करते. दोघे एकमेकांकडे बघून हसतात.

आजी : हं चल.

शाम : अं?

आजी : अरे चल न. इतकी मदत केली आहेस तर चल मस्त कोकम सरबत देते तुला. का? उशीर होतो आहे का?

शाम एकदा त्याच्या बाईककडे बघतो... मग आजीकडे बघून हसतो.

शाम : अंहं.

***
7

लिफ्ट मधून आजी आणि शाम बाहेर पडतात.

शाम : चौथा मजला न हा.

आजी : हो! इथेच राहाते मी. का?

शाम : अंहं

आजी : अरे अंहं... ये छान सरबत करून देते तुला...

शामला कळत नाही आजी काय म्हणते आहे. आजी किल्लीने दार उघडणार इतक्यात घराचं दार उघडतं आणि मृदुला दारात उभी असते. ती शाम आणि आजीला एकत्र बघून गोंधळते. आजी हसून मृदुलाकडे बघते.

आजी : अग मृदुला, हा अं... अंहं.... आणि अंहं... ही माझी नात मृदुला.

शाम एकदम मोठ्याने हसतो.

शाम : तरीच! हिला पण पहिल्याच ओळखीत फिरक्या घ्यायची सवय आहे.

आजी : म्हणजे?

मृदुला : अग मिनू हाच तर शाम! आणि शाम....

शाम : ही मिनू. मी ओळखलं. रिक्षावाल्याशी ज्या प्रकारे तू बोलत होतीस न मिनू..... तू आजी असणं शक्यच नाही हे लगेच लक्षात आलं माझ्या.

तिघेही हसतात आणि घरात जायला वळतात.

***
8

मृदुला घराची बेल वाजवते. तिला दोन-तीन वेळा बेल वाजवायची सवय आहे हे लक्षात येतं. आतून आजीचा आवाज येतो.

आजी : अग धीर धर ग... आलेच!

आजी दार उघडते. मृदुला आत येते. आत शाम किचनच्या दारात उभा आहे आणि त्याच्या हातात कलथा आहे.

मृदुला : हे काय? तू इथे काय करतो आहेस?

शाम : ट्युशन घेतो आहे.

मृदुला : मिनूकडून? कसली ट्युशन?

आजी हसत : अग त्याला माझा केक करायला शिकायचं आहे. त्याच्या आईला सरप्राईज द्यायचं आहे म्हणे.

शाम : हो ग मिनू. ही परवा आली होती त्यावेळी तिने तुझ्या हातच्या केकचं इतकं कौतुक केलं की आई माझ्या मागे लागली काल youtub वरून रेसिपी शोधून दे म्हणून. अग, गंम्मत म्हणजे आईचा आजच वाढदिवस आहे; तर माझ्या मनात आलं रेसिपी शोधून देण्यापेक्षा मीच करतो केक तिच्यासाठी.

आजी हसते आणि म्हणते : बरं बरं... शंभराव्यांदा सांगितलं आहेस हे. आता ओव्हन मधून ते भांड बाहेर काढ आणि आणून इथे टेबलवर ठेव पंख्या खाली.

शाम एका नॅपकिन मध्ये परात धरून बाहेर आणून पंख्याखाली ठेवतो. आजी आणि शाम त्या केकवर चॉकलेट चिप्स लावायला लागतात. दोघे हसत काहीतरी बोलत काम करत असतात. मृदुला अगोदर ते कौतुकाने बघत असते. पण मग ती शामकडे बघते आणि त्याच्या अस्तित्वात हरवून जाते.

तुझे नि माझे नाते कसले
नजरेतुनि जरि मला न कळले
भाव फुलांच्या वेली वरुनि
हळूच माझ्या मनात विरले

स्पर्शा वाचुनि भाव उमजले
शब्दा वाचुनि मनही कळले
अस्ताच्या किरणांतुन अलगद
आपले तुपले नाते कथिले

धुंद मधुमति वाटेतुन फुलवत
मोहाच्या गंधातून फिरवत
तू मजला मी तुझला टिपले
तुझे नि माझे नाते असले

***

9

घराची बेल जोरात वाजते आहे. आतून आजी हॉलमध्ये येते. तिच्या हातात गरम कढई आहे. आजी कढई टेबलवर ठेवते आणि दरवाजाकडे जाते.

आजी : हो.. हो... अग आले... किती घाई...

आजी दरवाजा उघडते. मृदुला धाडकन आत येत आजीला मिठी मारते.

मृदुला : मीsssss नूsssssss माझा रिझल्ट लागला. सेकेंड ग्रेड मिळाली. इंटरव्ह्यू चा कॉल पण आहे दोन-तीन कंपनीज मधून.

आजी एकदम खुश होते. मृदुलाला मिठीत घेते.

आजी : आहेच माझी नात एकदम हुशार. दृष्ट काढायला हवी ग बाई तुझी.

दोघी हसतात. तितक्यात मागून आवाज येतो.

शाम : मी पण आहे इथे. आणि मला 1st क्लास मिळाला आहे. पण माझं कोणालाच कौतुक नाही.

आजी मागे वळून बघते आणि शामकडे बघून हसते.

आजी : अरेच्या तू पण आला आहेस? माझ्या लक्षातच आलं नाही.

शाम : बरोबर आहे. लाडक्या नातीपुढे तुला दुसरं कोणी दिसतं का मिनू?

मृदुला : हो.. आहेच मी लाडकी नात...

शाम : तू असशील ग नात... पण मी बॉयफ्रेंड आहे...

शामचं बोलताना टेबलवर ठेवलेल्या कढईकडे लक्ष जात. तो ती उघडून बघतो आणि हसतो.

शाम : मृदुला... तू लाडकी असशील... पण मिनूने माझा लाडका गाजर हलवा केला आहे.

आजी शामला एक हलकासा फटका मारते आणि हसत म्हणते...

आजी : उगाच तिला चिडवू नकोस ह शाम... तिचे आवडते रसगुल्ले मी मागवले आहेत. येतीलच इतक्यात.

आणि सगळे हसतात.

****
10

शाम हॉटेलच्या बाहेर उभा आहे. तो एकदा रस्त्याकडे बघतो आणि फोन करतो.

शाम : हॅलो... कुठे आहेस मृदुल? कधीपासून वाट बघतो आहे. माझा इंटरव्ह्यू? एकदम झकास... तू ये तर.... सांगतो.

इतक्यात रिक्षा थांबते आणि मृदुला उतरते. ती धावत शामकडे येते आणि त्याचे दोन्ही हात धरून त्याला गोल फिरवते.

मृदुला : I creaked it sham. I just creaked it.

शाम : म्हणजे?

मृदुला शेक हॅन्ड करण्यासाठी हात पुढे करते. शाम तिला शेक हॅन्ड करतो आणि तिच्याकडे बघतो.

मृदुला : हॅलो. Am mrudula. असिस्टंट टू HR.

शाम एकदम खुश होतो आणि मृदुलाला उचलून गोल फिरवतो. दोघे हसतात. मग एकदम कॉन्शस होतात. शाम तिला खाली ठेवतो. क्षणभर दोघे शांत होतात.

शाम : मॅडम may i know the company name.

मृदुला : नाम मे क्या रखा है. हमारा achievemnet देखो. ते जाऊ दे. तुझ्या इंटरव्ह्यू च काय झालं?

शाम तिच्यापुढे शेक हॅन्डसाठी हात करतो.

शाम : हॅलो. Am शाम. मॅनेजर at Systeem Approchers Compay Ltd.

मृदुलाचे डोळे एकदम मोठे होतात.

मृदुला : काय सांगतोस? इतक्या मोठ्या कंपनीचा इंटरव्ह्यू क्रॅक केलास? झकास रे. आता तर मला तुझ्याकडून दोन पार्ट्या हव्यात.

शाम : दोन?

मृदुला हसते

मृदुला : हो. दोन. एक मला जॉब मिळाला म्हणून आणि एक तुला मिळाला म्हणून.

दोघे हसतात.

शाम : त्याचीच तयारी केली आहे. चल...

मृदुला : तयारी?

शाम : म्हणजे पार्टीची ग. चल न आत...

मृदुला : पार्टीची तयारी म्हणजे?

शाम हसतो आणि म्हणतो : तुझी कोणाशीतरी ओळख करून द्यायची आहे ग. चल न.

मृदुलाचा चेहेरा एकदम गोधळलेला होतो. पूर्वी एक दोन वेळा ज्या मुलीला शाम बरोबर बघितलं असतं ती मृदुलाला आठवते. मृदुला थबकते. शाम दोन पावलं पुढे गेला असतो; तो मागे वळून बघतो आणि हसतो.

शाम : ए चल न...

मृदुला : हम्म...

दोघे रेस्टरन्ट च्या आत जातात.

****
11

दाराची घंटा एकदाच वाजते. आजी स्वतःशीच बोलते.

आजी : रसगुल्ले आले वाटतं. बरं झालं मृदुल यायच्या आत आले.

आजी दरवाजा उघडते. दारात मृदुला असते. आजीला आश्चर्य वाटतं.

आजी : अरे तू आहेस होय? एकच बेल वाजली तर मला वाटलं रसगुल्ले घेऊन आला. ये. काय झालं ग इंटरव्ह्यूमध्ये? अशी एकदम शांत का?

मृदुला एकदम चेहऱ्यावर हसरे भाव आणते आणि म्हणते

मृदुला : शांत आणि मी? Guess what? मला जॉब मिळाला. मिनू मी असिस्टंट to HR झाले आहे.

आजी : अरे वा... माझी लाडकी बेटी.

मृदुला एकदम आजीला मिठी मारते.

आजी : का ग शाम नाही आला तुझ्यासोबत?

मृदुला अजूनही आजीला मिठी मारून आहे. त्यामुळे तिचा चेहेरा आजीला दिसत नाही.

मृदुला : अग मिनू त्याला पण मस्त जॉब मिळाला आहे. थेट बेंगलोरला. त्याला लगेच जॉईन करायचं आहे. म्हणून तो नाही आला. नंतर फोन करेल म्हणाला आहे.

आजी : असं होय? बरं!

मृदुला : हम्म. तुला माहीत आहे का.... मला नव्या नोकरी बरोबर नवीन फ्लॅट पण मिळाला आहे. आपल्याला लगेच शिफ्ट पण व्हायचं आहे.

आजी : हे काय ग आता?

मृदुला : अग, ते घर माझ्या ऑफिस पासून जवळ आहे. त्यामुळे सोपं होईल मला. मला माहीत आहे एकदम सगळं बदललं तर तुला त्रास होईल...

आजी : छे! मला कसला त्रास? अग उलट अजून नवीन मैत्रिणी मिळतील. मृदुल तुला शिफ्ट व्हायचं आहे न? मग मी आहे तुझ्या सोबत.

आजीचं बोलणं ऐकून मृदुला आजीला मिठी मारते. मृदुलाचे डोळे भरून आलेले असतात; पण ते आजीला दिसत नाही. आजीच्या चेहेऱ्यावर आठ्या असतात. तिचा चेहेरा गंभीर झालेला असतो.... पण ते मृदुलाला दिसत नाही.

***
12

शाम खिडकीत उभा आहे. त्याचे डोळे पाण्याने भरले आहेत. त्याच्या मनात जुन्या आठवणी रुंजी घालत आहेत.

शब्द सुटले
मन हे तुटले
शांत झाल्या दिशा

नि:शब्द घन हे
नि:शब्द वन हे
शांत झाली धरा

मृदुला एकटी खिडकीत उभी आहे. तिला वाटतं आजी झोपली आहे. तिला शाम सोबत घालवलेले क्षण आठवत आहेत. तिचे डोळे भरून येत आहेत. आजी हलकेच डोळे उघडून तिच्याकडे बघते. आजीचा चेहेरा दुःखी होतो. ती परत डोळे मिटून घेते.

अजुनी सागराच्या
का गर्जती भावना
अजुनी प्रेमिकांच्या
का गूंजती कल्पना

शाम त्याच्या पलंगावर आडवा पडला आहे. त्याची नजर गोल फिरणाऱ्या पंख्यावर लागली आहे. डोळ्यातून पाणी ओघळतं आहे.

भाव सुटले
तरी अडकल्या
लोचनांच्या दिशा

कंठ दाटले
भान हरपले
दाटु आल्या कडा

संध्याकाळची वेळ आहे. मृदुला टेबलवर बसली आहे आणि तिच्या समोर तिचा लॅपटॉप उघडा आहे. तिचं कामात लक्ष नाही. आजी कॉफी आणून देते. बिस्कीट हवं का विचारते. मृदुला हसून नाही म्हणते. तिचा उदास चेहेरा आजीच्या लक्षात येतो. ती तिच्या चेहेऱ्यावरून हात फिरवते. काही बोलत नाही. हसते आणि आत जाते. आत जाताना दारात उभी राहून मागे वळून मृदुलाकडे बघते. मृदुला परत लॅपटॉपमध्ये बघते आहे. आजीला तिचं ते रूप बघून खूप वाईट वाटतं आहे.

दूर जाता निशा
आठव गूंजी जिवा
प्रेम भरल्या मना
फ़क्त उरल्या खुणा

शाम ऑफिसला जायला तयार होऊन बाईक स्टार्ट करतो आहे. त्याला समोर एक मुलगी एका मुलाच्या मागे बसताना दिसते आणि भास होतो की मृदुला त्याच्या मागे बसते आहे. तो मागे वळून बघतो तर मागे कोणीच नाही.

शब्द सुटले
मन हे तुटले
अस्वस्थ या भावना

नि:शब्द घन हे
नि:शब्द वन हे
अशांत काहूर मना

शाम बाईक थांबवून हेल्मेट काढतो आणि ढसाढसा रडतो.

***

13

आजी आणि नीलाताई दोघी बागेमध्ये walk घेत आहेत.

नीलाताई : मिनू बसूया ग आता. तुला भारी उत्साह आहे. पण मी दमले.

दोघी एका बेंचवर बसतात. आजी मोबाईल बाहेर काढते आणि तिचं FB चेक करायला लागते.

नीलाताई : सतत काय ग बघत असतेस?

आजी : अग FB चेक करत होते. काल आपला फोटो टाकला होता ना आपण आसनं करत होतो न त्याचा. त्याला किती likes आल्या आहेत ते बघत होते.

नीलाताई : काय बघत होतीस?

आजी मोबाईल निलाताईला दाखवते.

आजी : हे बघ. हे FB म्हणजे face book. इथे आपण आपले जुने मित्र मैत्रिणी शोधू शकतो. नातेवाईक भेटतात. प्रत्यक्ष भेटणं अवघड. पण इथे फोटोंवरून आपल्याला सगळं दिसतं त्यांचं काय चाललं आहे. त्याशिवाय आजकाल जगात काय चाललं आहे... नवीन काय आहे हे सगळं कळतं.

नीलाताईना एकदम आठवतं त्यांचा नातू देखील सतत FB वर काहीतरी बघत असतो.

नीलाताई : अगोबाई. हे म्हणजे आमचा अंगठ्याएवढा सुजय जे बघत असतो ते होय?

आजी हसते.

आजी : हो! तेच ते.

नीलाताई: अग... माझ्या फोनमध्ये पण दे न करून हे सगळं. मिनू मला तर अलीकडे इतका कंटाळा येतो न घरी. सगळ्या कामांना मशीन तरी आहे किंवा नोकर. काय करायचं कळत नाही.

आजी : अग एकदा FB वर आलीस की घरातले हाक मरतील तरी तुला कळणार नाही. खरं सांगू का? हे सगळं बरोबर की चूक माहीत नाही ग. पण आजच्या जगात हे सगळं माहीत असणं गरजेचं. बघ न.... माझी मृदुल इतकी बिझी झाली आहे की तिला घरी असताना देखील माझ्याशी बोलायला वेळ नसतो.

आजीचा आवाज एकदम मऊ... दुःखी होतो. नीलाताई तिच्या खांद्यावर हात ठेवतात.

नीलाताई : मिनू... तूच म्हणत होतीस न... की ती इतकी बिझी नसते; पण त्या शामच्या विचारांपासून दूर राहायला सतत कामात गाढुन घेतलं आहे तिने.

आजी : हो ग. काय करू ते सुचत नाहीय मला. मृदुलला किमान दहा वेळा तरी विचारलं. पण ती टाळतेच आहे त्याचा विषय. काय करू सुचत नाहीय.

नीलाताई : सांगू का? एकदा हटकून बघ. नाहीतर सरळ तूच फोन लाव त्या शामला.

आजी : नीला अग अलीकडच्या या मुलांच्या बाबतीत असं करून चालत नाही. माझ्या पर्सनल स्पेसमध्ये दखल देऊ नकोस असं मृदुल म्हणाली तर?

नीलाताई : कसली पर्सनल स्पेस ग मिनू? तू न एकदा तिला विचारून बघ. जर नीट उत्तर दिलं तर ठीक नाहीतर तू सरळ फोन करून बोल बघू! कदाचित तो शाम इथेच असेल. काय ते बेंगलोर बिंगलोरला गेलाच नसेल.

आजी थोडावेळ विचार करते. तिचा चेहेरा खुलतो ती निलाताईला डोळा मारते.

आजी : ही आयडिया बेस्ट आहे ग. बघते मी. बरं! तुझा मोबाईल काढ बघू बाहेर. तुला एकदा FB इन्स्टॉल करून; चालू करून देते.

नीलाताई फोन काढतात. आजी तो घेते आणि तिला समजावायला लगते.
***

14

मृदुला लॅपटॉप वर काम करत असते. आजी बाजूला बसून मोबाईलमध्ये काहीतरी करते आहे.

आजी : अग मृदुला तुला गम्मत माहीत आहे का... त्या पलीकडच्या विंग मधल्या नीलाताई आहेत न, त्यांना मी आज फेसबुक शिकवलं.

मृदुला कामातून डोकं वर करते.

मृदुला : अरे वा! म्हणजे इथे देखील सुरू केलेस वाटतं तू तुझे क्लासेस?

मृदुलाचा आवाज एकदम शांत आहे. त्यात कोणतीही एकसाईटमेंट नाही. आजीला ते जाणवतं. पण ती काहीच बोलत नाही.

आजी : हो अग. नवीन सोसायटीत आल्यामुळे मला बरं झालंय. रोज सगळ्या नवीन मैत्रिणींना गोळा करते. कधी walk ला जातो... कधी भेळ खातो. मस्त मजा करत असते मी. पण बेटा, तू फारच बिझी झाली आहेस. त्या शामचा देखील काहीच पत्ता नाही. पठ्ठ्याने फोन देखील केला नाहीय मला. फारच राबून घेतात अलीकडे.

मृदुला शामच्या उल्लेखाने दचकते. आजीच्या ते लक्षात येतं पण ती ते मृदुलाला कळू देत नाही. स्वतःच्याच नादात असल्यासारखं दाखवत आजी पुढे म्हणते...

आजी : काही फोन होता का ग त्याचा?

मृदुला : अं? नाही... म्हणजे हो! हो अग. फोन होता. अग तो खूप बिझी आहे. म्हणाला त्याला फोन करायला पण वेळ नाही. इथे आला की येईल भेटायला.

आजी : मृदुल तो नक्की बंगलोरला आहे का? की त्याच्या गर्ल friend ला डीच करतोय तो?

आजीच्या त्या वाक्याने मृदुला एकदम चमकते आणि आजीकडे बघते

मृदुला : काय? कोणाला डीच करतोय?

आजी : अग girl friend ला....

मृदुला : तुला माहीत आहे?

आजी तिच्या प्रश्नाने सावध होते.

आजी : काय?

मृदुला : त्याची girl friend?

आजी : हो!

मृदुला : कोण?

आजी : अग मी!!!! मीच नाही का त्याची girl friend. मला डीच करून दुसरी कोणीतरी तर नाही ना त्याने शोधली?

मृदुला आजीच्या त्या एक्सप्लॅनशन ने काहीशी hurt होते.

मृदुला : काहीही काय ग? मला नाही माहीत काही.

इतकं बोलून मृदुला तिथून उठून जाते. ती जाताना डोळे पुसते ते आजी बघते.

***

15

आजी एका रेस्टॉरंटमध्ये बसली आहे. रेस्टॉरंटचा दरवाजा उघडतो आणि शाम आत येतो. तो आजीला बघतो आणि हात वर करून तिला हाय करतो आणि तिच्या जवळ येऊन बसतो आणि आजीकडे बघून हसतो. पण त्याचे उदास डोळे आणि उतरलेला चेहेरा आजीच्या लक्षात येतो.

आजी : कसा आहेस?

शाम आजीकडे बघतो आणि त्याचे डोळे पाण्याने भरून येतात. आजी त्याच्या हातावर हात ठेवते आणि शाम बोलायला लागतो.

शाम संपूर्ण प्रसंग सांगतो. तो आणि मृदुल रेस्टरन्टच्या आत जातात. एका कोपर्यंतलं टेबल खूप छान सजवलेलं असतं. मृदुला त्याच्या सोबत तिथपर्यंत जाते. टेबलावर एका गोड टेडीच्या हातात एक बॉक्स असतं. शाम तो टेडी मृदुलाला देतो. ती तो घेते आणि बॉक्स उघडून बघते. त्यात अंगठी असते. ती अंगठी बघून मृदुला एकदम स्तब्ध होते. शाम गुडघ्यावर बसून तिच्याकडे हात पुढं करतो. मृदुला तरीही स्तब्धच असते.... अचानक तिचे डोळे भरून येतात. शामने पुढे केलेल्या हातात ती तो बॉक्स हातात धरलेला टेडी ठेवते आणि झटक्यात गर्रकन मागे फिरून निघून जाते.

शाम : का गेली ग ती मला अशी अचानक सोडून? दोघांना नोकरी नक्की लागणार याची खात्रीच होती मला; दोघांनी इंटरव्ह्यू क्रॅक केले. मिनू.... त्याच दिवशी मी तिला प्रपोज केलं आणि काहीही न बोलता ती निघून गेली. मला ब्लॉक केलं तिने सगळीकडे. मी घरी गेलो तर तुम्ही दोघी निघून गेला होतात. मला कळेना की मी तुला फोन करावा की नाही. रोज ऑफिसला जातो ग... पण मनातून मी मोडून गेलो आहे.

आजी : मला वाटलंच होतं काहीतरी बिनसलं आहे. शाम... काळजी करू नकोस. ती असं का वागते आहे ते मला माहीत आहे.

असं म्हणून आजी थोडावेळ विचार करते. तिच्या चेहेऱ्यावर एकदम एक मिश्किल हास्य येतं.

आजी : उद्या रविवार आहे. संध्याकाळी काय करतो आहेस?

शाम उदासपणे म्हणतो : काय करणार?

आजी पर्समधून एक कागद काढते आणि त्यावर एक पत्ता लिहिते आणि तो शामला देते.

आजी : या पत्यावर ये.

शाम पत्ता वाचतो : कोण राहातं इथे?

आजी हसते आणि म्हणते : तुझी girl friend.

शामचा चेहेरा बदलतो. दोघेही एकमेकांकडे बघून हसतात.

***

16

मृदुला काम करत बसली आहे. आजी खिडकीशी उभी राहून बाहेर बघते आहे. एकदम आजीचा चेहेरा खुलतो आणि मृदुलाच्या शेजारी येऊन बसते.

आजी : मृदुला, मला न तुला एक न्युज द्यायची आहे.

मृदुला आजीकडे बघते. इतक्यात बेल वाजते.

आजी : अरे आला वाटतं.

मृदुला : कोण?

आजी : बघ तूच.

मृदुलाच्या कपाळावर आठ्या येतात. ती उठून दार उघडते. दारात शाम असतो. मृदुला एकदम गोंधळून जाते. आजी आतूनच शामला हाक मारते.

आजी : येरे आत ये.

शाम मृदुलाच्या बाजूने पुढे होत आत येतो. मृदुला दार लावून आत येते.

आजी : मृदुला हा शाम. मी याच्याशी लग्न करते आहे.

मृदुला : काय?

आजी : अग, तू त्याच्याशी लग्न करायला तयार नाहीस न. मग मी तरी करते.

मृदुला पूर्ण गोंधळून एकदा आजीकडे बघते आणि मग शामकडे बघते. शाम पुढे होतो आणि मृदुलाच्या समोर बसतो. तिचा हात हातात घेतो.

शाम : मृदुल... आपल्याला दोघांना जॉब मिळाला त्याच दिवशी मी तुला प्रपोज केलं पण तू एकदम काही एक न बोलता निघून गेलीस. तुला थांबवायची इच्छा असूनही मी थांबवू शकलो नाही इतका मोठा धक्का होता तो माझ्यासाठी. कसंबसं स्वतःला सावरून मी तुमच्या घरी गेलो तर घराला मोठं कुलूप... शेजाऱ्यांना पण माहीत नव्हतं तुम्ही दोघी अशा अचानक कुठे गेलात. तू मला ब्लॉक करून टाकलं होतंस. तुला कुठे आणि कसं शोधू ते कळत नव्हतं मला.... पार मोडून गेलो होतो मी. आणि एक दिवस अचानक मला मिनूचा फोन आला.

असं म्हणून त्याने आजीकडे बघितलं. आजी त्या दोघांकडे प्रेमळपणे बघत होती.

आजी : मृदुला... बाळा.... तुम्ही मला नावाने हाक मारलीत म्हणून मी तुमच्या वयाची होत नाही ग. सगळं कळत होतं मला. अर्थात तुझ्या अशा वागण्याचं कारण देखील मलाच माहीत आहे. तुला वाटतं तुझे बाबा आणि आई तुझ्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती तुला घेऊन US ला गेले. पण बेटा; विजयला... तुझ्या बाबाला... तिथे चांगली नोकरी मिळाली होती. तिथे खूप चांगले प्रॉस्पेक्ट्स होते. पण तुला माझ्याच जवळ राहायचं होतं. त्याने मला देखील चालण्याचा खूप आग्रह केला होता. पण मला तिथलं ते शांत आयुष्य जमलं नसतं. म्हणून मी नकार दिला. तुला मात्र माझ्याच सोबत राहायचं होतं. म्हणून तिथलं शिक्षण संपल्यानंतर तू इथे आलीस... माझ्याकडे. MBA ला ऍडमिशन घेतलीस. तिथे तुला शाम भेटला आणि तू त्याच्या प्रेमात पडलीस. पण त्याने तुला लग्नाचं विचारलं आणि एकदम तुला जाणवलं की तुला परत मला सोडून जावं लागेल. म्हणून त्याला काहीही उत्तर न देता तू निघून आलीस. तुला सगळे संबध तोडायचे होते म्हणून एकदम घर देखील बदलायचं ठरवलंस. सुरवातीला मला ते लक्षात आलं नाही. वाटलं तुमच्यात काहीतरी लहान सहान वाद असेल. पण तुझं हे रोज झुरणं मला बघवत नव्हतं ग बेटा.

शाम : मृदुल... अग तुझ्या मनात असं काही होतं तर मला सांगायचं न.

मृदुलाचे डोळे भरून येतात.

शाम : अग मृदुला... तू इथे भाडं देऊन राहाते आहेस आणि मी पण आई बाबांसोबत भाडं देऊनच राहातो आहे. जर आपण दोघांनी आपले पैसे एकत्र केले तर मोठ्या घराचं भाडं देखील आपण affort करू शकतो न. मग तर आपल्या सोबत माझे आई-बाबा आणि तुझी मिनू देखील राहू शकते.

मृदुलाचे डोळे पाझरायला लागतात. शाम तिचे डोळे पुसतो.

मृदुला : ओह... शाम... हे इतकं सोपं होतं?

आजी : हो! इतकं सोपंच होतं. म्हणूनच मी शामला इथे बोलावून घेतलं होतं. बरं, आता मी निघते. नीलाताईंकडे जायचं आहे मला. येताना रसगुल्ले घेऊन येते ह.

असं म्हणून आजी घराबाहेर पडते आणि मृदुला हसत शामला मिठी मारते.

समाप्त

Friday, July 15, 2022

काळ

 काळ



जुनी अँबॅसिडर/फियाट गाडी हायवे वरून धावते आहे. गाडीमध्ये ड्राईव्हरच्या शेजारच्या सीटवर वासंती बसली आहे. तिचा चेहेरा खूप आनंदी आणि हसरा आहे. मागच्या सीटवर वासंतीची आई आणि ड्राईव्हरच्या मागे तिचे बाबा आहेत. बाबांना झोप लागली आहे आणि आई पुस्तक वाचते आहे. वासंती गाडीच्या बाहेरच्या बाजूच्या आरशात स्वतःला बघत गोड हसते आहे. ती आत गाडीमध्ये मान वळवते. एकदा मागे वळून आई-बाबांकडे बघते आणि मांडीमधली पर्स उघडून त्यातून एक फॉर्मल envelop काढते आणि उघडून आतलं पत्र वाचायला लागते. तिचा चेहेरा हसरा आहे. आणि voice over सुरू होतो...

बॉस : हे घे letter वासंती....

वासंती : काय आहे हे सर?

बॉस : तुझं ट्रान्सफर letter pramotion सकट.... congratulations वासंती. You are been appointed as the manager at our Nashik branch.

वासंती : पण सर....

बॉस : No किंतु परंतु.... अग तुझा performance आणि unic कामाची पद्धत बघूनच हा निर्णय घेतला गेला आहे. आम्हाला खात्री आहे की तू ती नवीन ब्रँच उत्तम प्रकारे establish करशील.

वासंती : yes sir. of course sir. I won't let u down. Trust me.

बॉस : once again... congratulations.

वासंती : Thank you very much sir.

वासंती हसते आहे.

***

एका साध्या बंगल्यासमोर थांबते. वासंतीचे आई आणि बाबा गाडीतून खाली उतरून बंगल्याकडे बघत आहेत. वासंती खाली उतरून ड्राईव्हरला पैसे देते. मागे वळताना तिला तिचा चेहेरा ड्राईव्हरच्या बाजूच्या आरशात दिसतो. एकदा स्वतःकडे बघून ती तिचे केस नीटनेटके करते आणि वळून बंगल्याकडे बघते. आता तिघेही बंगल्याकडे बघत असतात आणि आतून एक तरुण बाहेर येतो. वासंतीला बघून पुढे होत तिच्या हातातून बॅग घेतो आणि तिला शेकहॅन्ड करायला हात पुढे करत म्हणतो...

कलीग : नमस्ते मॅडम. मी राजेश. आपलं बोलणं झाल्याप्रमाणे मी संपूर्ण घर लावून घेतलं आहे.

वासंती त्याच्याकडे बघत हसते आणि त्याला शेकहॅन्ड करत म्हणते...

वासंती : हॅलो राजेश. thank you very much. you really helped me a lot. By the way these are my parents. माझे बाबा आणि ही माझी आई.

असं म्हणून आपल्या आई वडिलांची ओळख करून देते. राजेश आई आणि वडिलांना हात जोडून नमस्कार करतो आणि म्हणतो...

राजेश : नमस्कार काका-काकू. तुम्हाला काहीही मदत लागली तर मला सांगा. मॅडमकडे माझा नंबर आहेच. आत्तासुद्धा हॉटेलमधून चहा आणि नाश्ता मागवला आहे मी. म्हणजे अगदी लगेच स्वयंपाकाला लागायला नको. काकू इथे पुढेच वाण्याचं दुकान आहे. त्याला मी सांगून ठेवलं आहे. त्याच्याकडे सामानाची लिस्ट दिली की तो घरपोच सामान आणून देतो. फळं-भाजी इथे जवळ मिळते. पण अगदी छान ताजी हवी असेल तर मंडईत जाऊन आणू शकता. इथून रिक्षाचे फक्त पंधरा रुपये होतात. आणि तुम्ही सांगितलं तर हे रिक्षावाले थांबतात आणि परत पण आणतात.

राजेश अगदी अगत्याने सगळी माहिती देतो. आई त्याच्याकडे हसत बघत सगळं ऐकून घेते. बाबा देखील त्याला शेकहॅन्ड करतात आणि म्हणतात...

बाबा : अरे तू ये न आत. तूच मागवलेला चहा घे आणि मग निघ.

बाबांचं बोलणं ऐकून सगळेच हसतात. राजेश म्हणतो...

राजेश : आज नको काका. थोडी कामं आहेत. मॅडम पहिल्यांदाच ऑफिसमध्ये येणार. तिथली देखील तयारी करायची आहे मला.

त्याच्याकडे हसत बघत आई विचारते...

आई : राजेश तुझं लग्न झालंय का?

तिच्या त्या प्रश्नाने वासंती काहीसे रागीट आणि मोठे डोळे करून आईकडे बघते. राजेशचे वासंतीकडे लक्ष नाही. तो आईकडे हसत बघत म्हणतो...

राजेश : हो काकू. नुकतंच लग्न झालंय. इथलीच आहे माझी बायको.

आई काहीशी हिरमुसली आहे. पण ते जाणवून न देता ती अगदी सहज आवाजात म्हणते...

आई : वा. छान... घेऊन ये एकदा ओळख करायला. ती मला तुमचं शहर पण दाखवेल.

राजेश : हो हो नक्की.

मग वसंतीकडे वळून म्हणतो...

राजेश : मॅडम तुम्ही कधी येणार ऑफिसला? आज आराम करून उद्यापासून आलात तरी चालेल. इथून डावीकडून चालत जेमतेम दहा मिनिटं लागतील. पण सहसा कोणी याबाजूचा रस्ता वापरत नाहीत असं मला घर मालक म्हणत होते. त्याबाजूने फारशी रहदारी देखील नसते. उजवीकडून चालत अर्धा तास लागतो.

वासंती : Thank you for the information Rajesh. पण मी असल्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवत. बरं, मी थोड्याच वेळाने येते आहे ऑफिसला. इथे येताना आम्ही गाडीने आलो आहोत त्यामुळे त्यात काही दगदग नव्हती. आणि कसं यायचं ते मी बघून घेईन. address आहे माझ्याकडे.

राजेश आणि वासंतीचं बोलणं आई, बाबा ऐकत आहेत. त्यांचं बोलणं होतं आणि वासंती घराच्या आत जातात आणि राजेश गेटच्या बाहेर जातो आणि एकदा डावीकडे बघून; उजवीकडे वळतो आणि निघून जातो.

***

आई बाबा आणि वासंती हॉलमध्ये बसले आहेत. समोरच्या सेंटर टेबल वर काही कागदी पॅकेट्स आहेत आणि त्याच्या बाजूला एक थर्मास आहे. कप बशी, प्लेट्स असं देखील आहे. तिघांचं खाणं चालू आहे.

आई : नीट लावलं आहे ग घर राजेशने. लग्न झालं की एकूणच संसाराचं भान येतं प्रत्येकाला.

आईचं बोलणं ऐकून वासंतीचा चेहरा काहीसा रागावलेला होतो आणि ती म्हणते..

वासंती : काहीही आपलं तुझं. आणि आई त्याचं लग्न झालंय किंवा नाही याच्याशी आपल्याला काय देणं घेणं?

आई : अग तुझ्याच वयाचा आहे. लग्न झालंय मुलगा असून. आणि तू...

आईचं वाक्य अर्धवट तोडत वासंती म्हणते...

वासंती : आई, सध्या मला फक्त माझं काम दिसतं आहे. खूप विश्वासाने मला इथे पाठवलं आहे सरांनी. त्यामुळे सध्या इतर कोणताही विषय नको ग. बरं, मी काही दमलेले नाही. त्यामुळे जरा फ्रेश होऊन ऑफिसला जाऊन येते. आज ओळखी वगैरेचा फार्स झाला की उद्यापासून लगेच कामाला लागता येईल न मला. तुम्हाला माहीत आहे न माझ्या कामाच्या पद्धतीमुळेच तर मला इथे पाठवलं आहे. मग तसाच performance इथे पण नको का?

आई-बाबा तिच्या या बोलण्यावर काहीच म्हणत नाहीत. वासंती उठते आणि तिची बॅग घेऊन आत जाते.

***

वासंती वेगळा पंजाबी ड्रेस घालून बाथरूम मधून चेहेरा पुसत बाहेर येते आणि खोलीतल्या आरशासमोर उभी राहाते. एकदा स्वतःकडे बघते आणि आरशाच्या जवळ जात कपाळाला लावलेली टिकली नीट करते. स्वतःकडे बघून छानसं हसते आणि पलंगावरची पर्स उचलून खोली बाहेर पडते.

***

वासंती गेटच्या बाहेर उभी आहे. एकदा ती उजवीकडच्या रस्त्याकडे बघते आणि मग डावीकडच्या रस्त्याकडे बघते. स्वतःशीच हसते आणि डावीकडचा रस्ता घेऊन चालायला लागते.

वासंती डावीकडे वळते त्यावेळी तिच्या उजवीकडे पण थोडं लांब एक स्त्री उभी आहे. ती वासंतीला डावीकडे वळताना बघते. तिचे डोळे खूप मोठे होतात. ती वासंतीच्या दिशेने पाऊल उचलते आणि मग परत गप बसते. इतक्यात एक बारा-तेरा वर्षांचा मुलगा शाळेचे कपडे आणि पाठीवर बॅग असा उजवीकडून येतो. त्याला बघून ती बाई हात करते आणि तो जवळ येताच त्याला घेऊन तिच्या मागच्या गेटच्या आत जाते.

***

वासंती काहीशी रमत-गमत चालते आहे. मधलं एक घर सोडून पुढे जाते तर तिला एक काहीसा जुना बंगला दिसतो. बाहेर लहानशी बाग आहे आणि बागेमध्ये एक साधारण सहा-सात वर्षांचा मुलगा बॉलने टप्पी टप्पी खेळतो आहे. बाजूला एक झोपाळा आहे आणि त्यावर त्याची आजी बसली आहे. ती बहुतेक काहीतरी वाचते आहे... किंवा डुलक्या घेते आहे... वासंती ते दृश्य बघून मनात हसते बंगला काहीसा जुन्या पद्धतीने बांधलेला असल्याने वासंतीला तो आवडतो. पण फार उत्तम निगा राखलेली दिसत नसते. वासंती चालता-चालताच वाड्याकडे कौतुकाने बघत पुढे जाते.

***

दुसरा दिवस

सकाळची वेळ

वासंती तिच्या खोलीतल्या आरशात बघून ड्रेसला मॅचिंग असणारी टिकली नीट करते आणि खोलीबाहेर येऊन पायात चपला अडकवते. मुख्य दार उघडते आणि आईला हाक मारते...

वासंती : आई येते ग.

आईचा यातूनच 'बरं बरं' असा आवाज येतो आणि वासंती दारातून बाहेर पडते.

***

वासंतीगेट बाहेर उभी. एकदा ती उजवीकडच्या रस्त्याकडे बघते आणि मग डावीकडच्या रस्त्याकडे बघते. स्वतःशीच हसते आणि डावीकडचा रस्ता घेऊन चालायला लागते.

वासंती डावीकडे वळते त्यावेळी तिच्या डावीकडे पण थोडं लांब तीच आदल्या दिवशीची स्त्री उभी आहे. ती वासंतीला डावीकडे वळताना बघते आणि परत तिचे डोळे परत खूप मोठे होतात. तिच्या सोबत तिचा मुलगा शाळेत जाण्याच्या तयारीत दिसतो आहे. तो देखील वासंती जाते त्याबाजूला बघून आईकडे बघून काहीतरी बोलतो आहे आणि आई त्याला काहीतरी कडक शब्दात समज दिल्यासारखं बोलते आहे. 'बर' अशी मान हलवून एकदा परत वासंती गेली त्या दिशेने बघून तो मुलगा विरुद्ध दिशेने चालायला लागतो आणि त्याची आई गेटच्या आत जाते.

वासंती आज पहिला दिवस असल्याने झपाझप चालत निघाली आहे. परत एकदा त्याच जुन्या बांधकामाच्या बंगल्यावरून चालताना तिचं लक्ष आत जात. परत एकदा तो लहानगा बॉलने टप्पी टप्पी खेळतो आहे आणि आजी झोपाळ्यावर बसली आहे हेच दृश्य तिला दिसतं. ती ते बघून हसते आणि पुढे जाते.

***

संध्याकाळची वेळ.

काहीसा अंधार पडला आहे. रस्त्यावर खूपच कमी उजेड आहे कारण रस्त्यावर विजेचे खांब खूप अंतरावर आहेत आणि त्यावर मिणमिणता दिवा आहे. चालताना वासंतीचं लक्ष या खांबांवर देखील जातं. आणि कमी उजेड तिने notice केला आहे हे तिच्या चेहेऱ्यावरून कळतं.

वासंती घराच्या दिशेने येते आहे. तिचं लक्ष परत एकदा त्या वाड्याकडे जातं. आत्ता सुद्धा जेमतेम उजेडात तो मुलगा बॉलने टप्पी टप्पी खेळतो आहे आणि आजी बसली आहे. तेच ते दृश्य बघून वासंतीला आश्चर्य वाटलं आहे. ती एकदा मनगटातल्या घड्याळाकडे बघते आणि तशीच चालत तिच्या घराकडे येते; गेट उघडते आणि आत जाते.

लांब तीच ती स्त्री भाजीची पिशवी घेऊन उभी आहे. ती वासंतीला जुन्या बंगल्याच्या दिशेने येताना बघते. वासंती तिच्या घराच्या गेटच्या आत जाताच ती स्त्री देखील तिच्या घराच्या गेटच्या आत जाते.

***

सकाळची वेळ

वासंती चपला घालते आहे. इतक्यात आई आतून येते आणि तिच्याकडे बघते. वासंतीच्या कपाळावर टिकली नाही आहे. ते बघून आई तिला म्हणते..

आई : अग टिकली विसरलीस की काय?

वासंती कपाळाला हात लावून बघते. टिकली नाही हे तिच्या लक्षात येतं आणि ती हसते आणि म्हणते..

वासंती : अय्या राहिली वाटतं.

असं म्हणून वासंती पर्स उघडून त्यातून कॉम्पॅक्ट पावडरची डबी आणि टिकलीचं पाकीट काढते. टिकली काढून आरशात बघत ती लावते आणि पावडरची डबी आत ठेऊन आईला 'अच्छा' म्हणून बाहेर पडते.

***

वासंती गेट बाहेर उभी. डावीकडचा रस्ता घेऊन चालायला लागते. वासंती डावीकडे वळते त्यावेळी तिच्या उजवीकडे पण थोडं लांब तीच नेहेमीची स्त्री उभी आहे. ती वासंतीला डावीकडे वळताना बघते. परत एकदा तिचे डोळे परत खूप मोठे होतात. तिच्या सोबत तिचा मुलगा शाळेत जाण्याच्या तयारीत दिसतो आहे.

***

वासंतीचं लक्ष त्याच जुन्या बांधकामाच्या बंगल्यावरून चालताना आत जातं. परत एकदा तो लहानगा बॉलने टप्पी टप्पी खेळतो आहे आणि आजी झोपाळ्यावर बसली आहे हेच दृश्य तिला दिसतं. आता तिला त्या दृश्याची सवय झाली असल्यासारखी ती ते बघून हसते आणि पुढे जाते.

***

सकाळीची वेळ

वासंतीची ऑफिसला जाण्याची वेळ आणि समोरचा मुलगा शाळेत जाण्याची वेळ एक आहे हे आतापर्यंत establish झालं आहे. वासंती आता सहज सवयीने डावीकडे वळून चालायला लागते. तो मुलगा शाळेत जायला निघतो. तो पुढे गेल्या नंतर ती स्त्री वासंतीच्या घराच्या दिशेने येते. क्षणभर गेटजवळ घुटमळते आणि मग गेट उघडून आत जाते. मुख्य दरवाजाची बेल वाजवते.

वासंतीची आई दार उघडते. अनोळखी स्त्री असल्याने तिच्या चेहेऱ्यावर अनोळखी आणि गोधळलेले भाव आहेत. ती स्त्री हात जोडून नमस्कार करते आणि म्हणते..

स्त्री : नमस्कार काकू... मी मिसेस काळे. तुमच्या समोरच्या त्या बिल्डिंगमध्ये राहाते.

वासंतीची आई हसत नमस्कार करते आणि मिसेस काळेला घरात घेते.

****

संध्याकाळची वेळ

वासंती घराच्या दिशेने येते आहे. कालच्या प्रमाणे आजही रस्त्यावर खूपच कमी उजेड आहे कारण रस्त्यावर विजेचे खांब खूप अंतरावर आहेत आणि त्यावर मिणमिणता दिवा आहे. कमी उजेड वासंतीने notice केला आहे हे तिच्या चेहेऱ्यावरून कळतं. वासंती पुढे येते आणि तिचं लक्ष परत एकदा त्या वाड्याकडे जातं. आत्ता सुद्धा जेमतेम उजेडात तो मुलगा बॉलने तोच तो टप्पी टप्पी खेळ खेळतो आहे आणि आजी बसली आहे. तेच ते दृश्य बघून वासंतीच्या कपाळावर हलकीशी आठी येते. ती घड्याळाकडे बघते आणि 'कमाल आहे' असा चेहेरा करून तशीच चालत तिच्या घराकडे येते; गेट उघडते आणि आत जाते.

***

रात्रीची जेवायची वेळ आहे. वासंती घरगुती टी शर्ट आणि ट्रॅक पँट घालून आतल्या खोलीतून बाहेर येते. बाबा सोफ्यावर बसून टी व्ही बघत आहेत. त्यांच्याकडे एकदा बघून डायनींग टेबलाच्या दिशेने येते. आईने जेवणाची पूर्ण तयारी केली आहे. तीन ताटं, वाटी पाण्याचं भांड तयार आहेत. समोर गरम जेवण आहे. भात, डाळ, पोळी, भाजी अशी मोठी भांडी दिसत आहेत. पाण्याची बाटली आहे. ती तयारी बघून वासंती आईकडे बघून हसते आणि म्हणते..

वासंती : तू सगळंच करून ठेवतेस ग. इथे आल्यापासून माझी तुला काहीच मदत नाही आहे घरकामात. पण काय करू ग. ऑफिसमध्ये इतकं काम आहे की नेहेमीच्या वेळेपेक्षा देखील जास्त वेळ थांबावं लागतं आहे. पण आता थोडं वेळेत निघू शकेन आणि अगदी संध्याकाळी दिवे लागणीलाच येईन घरी.

वासंती बोलत असताना तिची आई हसत असते. पण तिच्या शेवटच्या वाक्यासरशी ती काहीशी दचकते आणि पटकन नवऱ्याच्या दिशेने बघते. वासंतीचे वडील देखील बायकोकडे बघतात. वासंतीची वडिलांकडे पाठ आहे. त्यामुळे वडिलांचा चेहेरा तिला दिसत नाही आहे. याचा फायदा घेऊन वडील ओठांवर बोट ठेऊन 'काही बोलू नकोस' अशी खूण बायकोला करतात. बायकोला ते फारसं पटलेलं दिसत नाही. पण ती काही म्हणत नाही.

वासंती आपल्याच नादात आहे. त्यामुळे ती पुढे बोलते..

वासंती : खूप भूक लागली आहे ग आई. चला जेवायलाच बसूया न? बाबा या बघू.

बाबा टी व्ही बंद करतात आणि एका ताटावर येऊन बसतात. आई देखील तिसऱ्या ताटावर बसते आणि सगळे स्वतःला वाढून घेऊन जेवायला सुरवात करतात.

वासंती पहिला घास तोंडात घालते आणि गप्पांना सुरवात करत म्हणते..

वासंती : काय आई, काही ओळखी पाळखी झाल्या की नाही तुझ्या आजूबाजूला. तसं हे लहान शहर आहे त्यामुळे लोक पण मोकळ्या स्वभावाची आणि ample free time असलेली असणार. किती मैत्रिणी गोळा केल्यास.

असं म्हणून हसते. आई काही बोलायच्या अगोदर परत पुढे बोलते..

वासंती : अग, तो आपल्या घराच्या डाव्याबाजूला पलीकडचा तो जुन्या बांधकामाचा बंगला आहे न.... कोण राहातं तिथे काही कळलं का ग? मी रोज जाते त्या वाड्यावरून... एक लहानगा मुलगा खेळत असतो बॉलने एकटाच आणि आजी झोपाळ्यावर डुलक्या घेत असते. बाकी कोणी दिसत नाही.

आता मात्र आईला राहावंत नाही. ती एकदा बाबांकडे बघते आणि त्यांनी 'बोलू नकोस' अशी खूण करूनही बोलायला लागते..

आई : वासंती तू त्या वाड्यावरून जाणं-येणं बंद करून टाक बघू...

आईचा आवाज जरा शार्प आहे आणि आवाजात थोडी नाराजी देखील आहे. वासंती तोंडात घास घालताना आश्चर्याने आईकडे बघते. आईचा चेहेरा काहीसा not so happy असा दिसतो आहे. ते पाहून वासंती वडिलांकडे बघून भुवया उडवते. वसंतीकडे बघत असलेले वडील थोडंसं हसतात आणि म्हणतात..

वडील : अग पलीकडच्या बिल्डिंग मधल्या काळे वहिनी आजच आल्या होत्या. अगदी सहज ओळख करून घ्यायला ग. तर गप्पांच्या ओघात त्या म्हणाल्या की तो वाडा काही चांगला नाही. तुमच्या मुलीला सांगा त्या बाजूचा रस्ता नको वापरू. आम्ही देखील नाही वापरत; असं म्हणत होत्या. खरं तर त्यांच्या मुलाची शाळा डावीकडून गेलं तर पलीकडच्याच गल्लीत आहे. पण तरीही त्या त्याला उजव्या बाजूने जायला लावतात. त्या म्हणाल्या थोडा long cut पडतो रोजच. पण तरीही...

वासंती वडिलांचं वाक्य अर्धवट तोडते आणि म्हणते..

वासंती : oh come on baabaa. Do u believe all this? हे लहान शहरातले लोक न काहीही बोलत असतात. just ignor it. अहो, आपण आता विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर आहोत. तरीही हे भुतं-खेतं आणि झपाटलेलं वगैरेवर आपण विश्वास ठेऊन कसं चालेल? मला मान्य आहे ते घर जुनं आहे आणि फार चांगलं mentain केलेलं नाही. पण म्हणून लगेच घर चांगलं नाही... लोक चांगले नाहीत असं आपण judge करून कसं चालेल?

आई मध्येच वासंतीचं बोलणं थांबवत म्हणते...

आई : वासंती पण मी काय म्हणते... तुला उजवीकडून जायला काय अडचण आहे? जर कोणी नको म्हणतं तर ऐकावं न. काळे वाहिनींचं कुटुंब गेली 20 वर्ष... अगदी साठीच्या दशकापासून इथे राहातं. त्या दहा वर्षांपूर्वी लग्न होऊन इथेच आल्या. आता मुलगा आठवीत आहे. त्या म्हणाल्या गेल्या दहा वर्षात इथे राहणारे कोणीही त्या बाजूने गेलेले त्यांनी देखील बघितले नाहीत. तुमच्या मुलीला सुद्धा सांगा; असं म्हणत होत्या. मी अजून काही विचारायला गेले तर म्हणाल्या आम्ही त्याबद्दल बोलत देखील नाही.... अग...

आई अजूनही काहीतरी बोलणार असते. पण वासंती तिला हातानेच थांबवते आणि म्हणते...

वासंती : आई please हे असलं काही मला सांगू नकोस. तुला माहीत आहे माझा यावर विश्वास नाही.

आई परत बोलायचा प्रयत्न करते

आई : अग... पण...

वासंती परत आईचं बोलणं तोडत म्हणते..

वासंती : जाऊ दे न आई. आपण तो विषयच सोडून देऊ. ऐक न! तू एकदम खुश होशील असं काहीतरी सांगू?

वासंती विषय बदलत म्हणते. आईच्या कपाळावर आठ्या येतात. ती भुवया वर करत 'काय' अशी म आन हलवते.

वासंती : आई-बाबा माझं सुरुवातीचं ब्रँच मार्गी लावायचं काम झालं आहे. म्हणून तर आईला म्हंटलं उद्यापासून लवकर येऊ शकेन.... आणि आई.... आता हवं तर तू माझ्यासाठी नवरा शोधू शकतेस.

आई : अग... काय सांगतेस काय वासंती?

वासंती हसत म्हणते...

वासंती : हो ग आई. खरंच! बरं... मी झोपायला जाऊ का? खूप दमले आहे. त्यात उद्या अगदी वेळेत जायचं आहे. पण उद्यापासूनच तिन्हीसांजेपर्यंत यायला सुरवात करीन हं. म्हणजे तुमच्या सोबत वेळ मिळेल मला.

वासंतीचे आई बाबा वसंतीकडे बघत खुशीत हसत म्हणतात...

बाबा : जा बाळा झोपायला तू. दमलेली दिसतेच आहेस.

यावर वासंती बाबांकडे हसत बघते आणि टेबलवरून उठते 'good night' म्हणते आणि आत जाते. ती तिच्या खोलीतल्या बाथरूममध्ये जाऊन रात्रीचा ब्रश करायला लागते. त्यावेळी ती नकळत स्वतःच्या चेहेऱ्याचं निरीक्षण करते आहे आरशात.

***

सकाळची वेळ.

वासंती तयार होऊन खोलीतून बाहेर येते आणि चपला घालत असते. इतक्यात आई बाहेरच्या दारातून आत येते. आईच्या हातात गजरा आहे. ती त्याची शेवटची गाठ बांधते आहे. दाताने दोरा तोडते आणि वसंतीकडे बघून म्हणते...

आई : ए आपल्या बागेतल्या मोगऱ्याचा गजरा आहे. मुद्दाम तुझ्यासाठी तयार केलाय.

असं म्हणून वासंतीला पाठ करायला सांगते आणि तिच्या वेणीवर तो गजरा माळते. समोरच आरसा आहे. वासंती त्यात बघत असते. आई गजरा माळून थोडं डावीकडे सरकत वासंती प्रमाणेच आरशात बघते आणि तिच्या हनुवटीला हात लावून म्हणते...

आई : गोड दिसते आहेस ग बेटा.

वासंती हसते. आई बाजूला होते आणि वासंती चपला घालून बाहेर पडते.

***

संध्याकाळची अगदी तिन्हीसांजाची वेळ. पूर्ण सूर्यास्त झालेला नाही.

वासंती निवांत चालत घराकडे येते आहे. ती त्या बंगल्याच्या बाजूने चालताना तिची चाल मंदावते. त्या बंगल्याच्या बाहेरच असणाऱ्या रस्त्यावरच्या दिव्याकडे ती एकदा मान वर करून बघते आणि 'नाही नाही' अशी मान हलवते. ती आता सवयीने आत नजर वळवते तर तोच तो मुलगा आत गेटपासून थोडा आतल्या बाजूला उभा आहे. त्याच्या डोळ्यात पाणी तरळतं आहे. त्याच्या डोळ्यातलं पाणी वासंतीला दिसतं आणि त्याच्या दिशेने गेटकडे जाते. वासंती गेटकडे जाताना तिच्या पावलांवर कॅमेरा आहे. त्यामुळे जुना फारशी उखडलेला फुटपाथ दिसतो आहे. एका फरशीला अडखळून वासंती धडपडते आहे. (फुटपथची वाईट स्थिती लक्षात येईल अशाप्रकारे highlight झाली पाहिजे) त्यावर ती काहीशी वैतागली देखील आहे. पण त्या मुलाच्या डोळ्यातलं पाणी बघून ती स्वतःच्या धडपडण्याकडे दुर्लक्ष करते आणि ती अगदी मऊ आवाजात त्याला विचारते

वासंती : काय झालं बाळा? तू का रडतो आहेस?

वसंतीकडे डबडबलेल्या डोळ्यांनी बघत तो म्हणतो..

मुलगा : ताई तू एकटीच रोज जातेस न आमच्या घरावरून. मी तुला रोज बघतो.

त्याच बोलणं ऐकून वासंती हसते आणि म्हणते...

वासंती : हो... अरे माझं ऑफिस आहे न इथून पुढे गेलं की म्हणून मी रोज जाते. पण तू का रडतो आहेस. काय झालं?

मुलगा : ताई.. माझ्या घरातले सगळेच हरवले आहेत.

त्याच बोलणं ऐकून क्षणभर वासंती गोधळते पण मग काहीसं हसत म्हणते..

वासंती : अरे असे कसे हरवतील सगळे. असतील घरातच. तू नीट बघितलंस का?

तो मुलगा आता अजून रडवेला झालेला आहे. तो म्हणतो..

मुलगा : हो ग ताई.. मला पण वाटतं ते घरातच असतील पण कोणीच नाहीय न. आई , बाबा, दादा... सगळ्यांना कधीपासून शोधतो आहे मी. पण मिळतच नाहीत न मला.

त्याच बोलणं ऐकून एकीकडे वासंतीला हसू येतं आणि एकीकडे त्याची कीव पण येते. ती त्याला म्हणते..

वासंती : अरे तुझी गंमत करत असतील सगळे. लपाछपी खेळत असतील तुझ्या सोबत. तू घरात जाऊन बघितलंस का?

तिच्याकडे क्षणभर टक लावून बघितल्यासारखं करत तो म्हणतो..

मुलगा : मला न घरात एकट्याने जायची भिती वाटते आहे.

त्याच्या डोळ्यातले अश्रू आता ओघळायला लागले आहेत. वासंतीला ते बघून वाईट वाटतं. ती गेट उघडून आत जाते आणि त्याच्या समोर वाकते... आणि त्याचे डोळे पुसत ती म्हणते...

वासंती : किती बावरला आहेस तू. मी येऊ का तुझ्या सोबत तुझ्या घरातल्या सगळ्यांना शोधायला?

ते ऐकून त्या मुलाचा चेहरा खुलतो आणि तो म्हणतो...

मुलगा : तू येशील आत? चालेल तुला? घाबरणार नाहीस न?

वासंती हसत त्याच्याकडे बघते मग मनगटातल्या घड्याळाकडे आणि म्हणते..

वासंती : नाही घाबरणार मी. येते चल...

वासंती असं म्हणताच तिला मागे गेट पटकन लावलं गेल्याचा आवाज येतो. ती मागे वळून बघते तर गेट बंद झालेलं असतं. तिला ते थोडं वेगळं वाटतं; पण तो लहान मुलगा रडतो आहे हे तिच्या मानत असल्याने ती बंद गेटकडे बघून परत पुढे बघते तर तो मुलगा आता तिच्या शेजारी नसतो. तिला आश्चर्य वाटतं. ती घराच्या दिशेने बघते तर तो तिथे पायऱ्यांपाशी उभा असतो. मुख्य दाराजवळ अंधार असतो. त्यामुळे त्या मुलाची आकृती फक्त तिला दिसते. वासंती पुढे होते आणि त्याच्या जवळ जाऊन उभी राहाते आणि म्हणते...

वासंती : अरे इथपर्यंत आला आहेस तर मग घरात पण जायचं न. बरं, चल आत जाऊया.

वासंती आता त्या मुलाचा हात धरते आणि दाराजवळ येते. ती दार वाजवते. पण कोणीच दार उघडत नाही. त्यामुळे ती परत एकदा जरा जास्त जोराने दार वाजवते. पण तरीही कोणीही दार उघडत नाही. आता वासंतीच्या चेहेऱ्यावर आश्चर्याचे भाव आहेत. ती एकदा परत त्या मुलाकडे बघते. तो वासंतीकडेचं बघतो आहे. तिची नजर त्याच्याकडे वळताच तो तिला म्हणतो..

मुलगा : अग, सगळे हरवले आहेत तर मग दार कोण उघडणार ग?

वासंती परत समोर दाराकडे बघते आणि एकदा 'नाही-नाही' अशी मान हलवते आणि हलकेच दाराला धक्का देते. दार आतल्याबाजूला उघडतं. दार उघडलं जाताना सहसा वापरात नसलेल्या दारातून जसा आवाज येईल तसा आवाज येतो. आत अंधार आहे. काळोखात वासंती त्या मुलाचा हात धरून दाराच्या फ्रेममध्ये उभी आहे हे दिसतंय. वासांतीने एक पाऊल पुढे टाकल्या क्षणी आतमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज येतो. आत खरं तर अंधार आहे. त्यामुळे वासंतीची shadow दिसते आहे. आत काहीतरी पडल्याच्या आवाजामुळे वासंती दचकते आहे. पण मुलाची shadow शांत स्वस्थ उभी आहे हे लक्षात येतं. आतमध्ये वासंतीचा आवाज घुमतो..

वासंती : कोणी आहे का घरात? तुमचा मुलगा घाबरला आहे.

आतून कोणताही आवाज येत नाही. आता वासंतीची आकृती भिंतीवरचं दिव्याचं बटण शोधते आहे. ते सापडत आणि वासंती दिवा लावते. पण फार लक्ख प्रकाश नाही आहे. जुना पिवळसर दिवा चालू होतो. वासंती मान उचलून समोर बघते आणि एकदम दचकते. समोर मोठ्ठा गोल आरसा असतो. ज्यात तिला तिचं स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. आपणच आहोत हे लक्षात येऊन मग मात्र तिला काहीसं हसायला येतं.

आता वासंती परत एकदा त्या मुलाकडे बघते. त्याचा चेहेरा आता शांत आहे. तिला त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव बघून थोडं वेगळं वाटलं आहे. ते तिच्या चेहेऱ्यावर दिसतं. ती त्याच्याकडे वळून म्हणते..

वासंती : अरे तू हाक मारून बघ बघू. कदाचित तुझा आवाज ऐकून तुझी आई किंवा बाबा बाहेर येतील.

वासंतीचं बोलणं ऐकून मुलगा तिच्याकडे शांतपणे बघतो आणि नाही नाही अशी मान हलवत म्हणतो..

मुलगा : अग ताई, तुला म्हंटलं न. मी कधीपासून शोधतो आहे. पण ते कोणी सापडतच नाहीत न. हरवले आहेत ते सगळे.

आता वासंतीला त्याचं उत्तर आवडत नाही आहे. तरीही तिचं मन त्याला तिथे एकटं सोडून जायला तयार नाही आहे हे तिच्या चेहेऱ्यावरून कळतं आहे. ती एकदा घड्याळाकडे बघते आणि परत त्या मुलाचा हात धरते आणि म्हणते..

वासंती : चल आपण आतल्या घरात जाऊ. कदाचित आपला आवाज त्यांना ऐकू गेला नसेल.

आता वासंती आणि तो मुलगा पुढची खोली पार करून स्वयंपाक घरात येतात. तिथे सगळं कसं व्यवस्थित मांडून ठेवलेलं दिसतं आहे. पण ते अनेक दिवसात वापरलेलं नाही असं वाटतं आहे. वासंतीला आश्चर्य वाटतं की आपण इतके आत आलो तरी कोणीच कसं दिसत नाही आहे. तसं ती त्याला बोलून दाखवते..

वासंती : अरे आपण स्वयंपाक घरात आलो तरी कोणीच कसं समोर येत नाही.

तो मुलगा आता काहीच बोलत नाही. तो आता स्थिर नजरेने वसंतीकडे बघत उभा आहे. वासंतीला त्याची नजर आवडत नाही. तिच्या कपाळावर आठी निर्माण होते. ती इथे तिथे बघते. तिला झाकून ठेवलेला पाण्याचा माठ दिसतो आणि तिला स्वतःला तहान लागल्याची जाणीव होते. ती तिचा हात गळ्याकडे नेते आणि काहीसं खकरल्यासारखं करते. वासंती पाण्याच्या माठाकडे जाते आणि त्याचं झाकण उघडून बाजूला असलेलं भांडं त्यात बुडवते. तिचा हात आत-आत जातो... पण पाणी हाताला लागत नाही. ते तिच्या आश्चर्यचकित चेहेऱ्यावरून कळतं आहे. शेवटी तिचा हात पूर्ण आत जातो आणि माठाच्या तळाला भांडं अपटल्याचा आवाज येतो. आता वासंतीचा चेहेरा पूर्णपणे आश्चर्यचकित झालेला आहे. ती हात बाहेर काढते आणि त्या मुलाकडे वळून म्हणते..

वासंती : अरे यात अजिबात पाणी नाही. तुम्ही प्यायचं पाणी कुठे भरून ठेवता?

वासंतीच्या बोलण्यावर काही क्षण तो मुलगा काही बोलत नाही. दोन पावलं मागे सरकून तो भिंतीला टेकून उभा राहातो आणि हातातल्या बॉलने टप्पी टप्पी खेळायला लागतो. त्याची ही कृती थोडी confident मुलासारखी आहे. तो शांतपणे वासंतीकडे बघतो आणि मग एकदा मान खाली घालतो. तो काहीतरी बोलेल याची वासंती वाट बघते आहे. तो मुलगा खटकन वर बघतो. आता त्याची नजर अगदी स्थिर आहे. तो अत्यंत शांत आवाजात वासंतीला म्हणतो..

मुलगा : कोण भरणार पाणी ताई? सगळे हरवले आहेत नाही का? तुला मी सारखं सांगतो आहे की सगळे हरवले आहेत आणि तरी तुला वाटतंय हाक मारली की ते येतील. अग कोणीच तर नाही ना घरात. म्हणून तर मला एकट्याला आत यायला भिती वाटते म्हणून तर मी या बॉलने सारखा बागेतच खेळत असतो न.

मुलाचा आवाज अत्यंत स्थिर आणि शांत आहे. आता त्याच्या आवाजातला अस्वस्थपणा संपला आहे. वासंतीला आता त्याच्याकडे बघायची इच्छा नाही आहे. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते. ती स्वयंपाक घरातून बाहेर पडण्याच्या विचाराने दाराच्या दिशेने जाते. मुलगा दाराजवळच आहे. तो एकदम तिच्या मध्ये येतो आणि तिला म्हणतो..

मुलगा : काय झालं ताई? तू मला शोधायला मदत करणार होतीस न?

वासंती त्याच्याकडे बघते आणि थांबून म्हणते..

वासंती : मी तर तुझ्या घरातल्या कोणालाही ओळखत नाही. कसं शोधणार मग मी त्यांना? मला वाटलं होतं हाक मारली की कोणीतरी येईल पुढे. पण कोणीच आलं नाही.

असं म्हणून ती एकदा हातातल्या घड्याळाकडे बघते आणि मग त्या मुलाकडे बघत परत बोलायला लागते..

वासंती : हे बघ, आता मात्र मला उशीर होतो आहे. बघ; आले तेव्हा जेमतेम सहा वाजले होते. तिन्हीसांजेची वेळ होती. आता मात्र सात वाजले आहेत. एक तास कसा गेला ते कळलं पण बाही. तुझ्या घरातले सगळे हरवले आहेत... माझ्या घरातले नाही. माझे आई आणि बाबा माझी वाट बघत असतील. मला आता घरी गेलंच पाहिजे.

असं म्हणून वासंती त्याला एका हाताने बाजूला करते आणि स्वयंपाक घराच्या बाहेर पाऊल टाकते. ती एकटीच पुढे जात आहे. मुलगा स्वयंपाक घराच्या दाराच्या फ्रेममध्ये उभा आहे. वासंती पुढचं पाऊल टाकते आणि तिला मागून त्या मुलाचा आवाज ऐकायला येतो...

मुलगा : ताई नक्की हरवले नाहीत न तुझ्या घरातले तुझे आई-बाबा?

वसांतीला तो प्रश्न ऐकून एकदम राग येतो. ती गर्रकन मागे वळते... पण आता स्वयंपाक घराच्या दाराच्या फ्रेममध्ये तो मुलगा नाही आहे... मात्र वसांतीला परत त्याचा आवाज ऐकायला येतो...

मुलगा : नक्की ना ताई.....

आता मात्र वासंतीच्या चेहेऱ्यावरचा राग जाऊन तिथे थोडा गोंधळला भाव येतो... त्याला काहीशी घाबरलेल्या भावनेची किनार आहे. वासंती स्वयंपाक घराकडे पाठ करते आणि त्या घराच्या बाहेर जायला सुरवात करते.

***

कॅमेरा वासंतीच्या पायांवर आहे. वासंती भराभर चालत त्या घरातून बाहेर पडते आहे... तिची भरभर पुढे पडणारी पावलं दिसत आहेत. वासंती घराच्या बाहेर येताच मुख्य दरवाजा खटकन बंद होतो. वासंतीची पावलं पायऱ्या उतरून खाली येतात आणि गेटच्या दिशेने भराभर पडत आहेत. गेट उघडलं गेलं आहे आणि वासंतीची पावलं गेटच्या बाहेर आली आहेत. तिची पावलं ज्या फुटपाथवर आहेत तो अत्यंत नवीन आहे आणि छान बांधलेला आहे. (हा एक मोठा फरक highlight होणं आवश्यक आहे) बाहेर संध्याकाळीच वेळ आहे. पण आता प्रेक्षकांना लक्षात येतील असे रस्त्यावरचे दिवे भरपूर उजेड देत आहेत.

कॅमेरा वासंतीच्या पावलांवर आहे. वासंतीची पावलं काहीशी अडखळलेली आहेत. पण तशीच पटापट पुढे जातात आणि तिच्या घराच्या गेटच्या जवळ येऊन थांबतात. आता कॅमेरा गेटवर येतो. ते गेट वासंतीच्या घराच्या गेटसारखं नाही. ते बदललेलं आहे. त्यावर सुंदर रंगाच्या काचा आणि आरसे लावले आहेत. पण आत्ता फक्त गेट दिसतं आहे. अजूनही वासंती दिसलेली नाही. त्या गेटजवळ एक watchman उभा आहे तो मोबाईलवर बोलतो आहे. वासंती त्याच्या दिशेने वळते आणि वासंतीचा प्रश्न त्याला ऐकू येतोय..

वासंती : watchman हे गेट कोणी बदललं? पाहिलं गेट कुठे गेलं?

watchman च्या चेहेऱ्यावर खूप आठ्या आहेत. तो एकदा उद्धट-उर्मटपणे क्या है अशी मान हलवतो. परत वासंतीचा आवाज येतो. आता ती हिंदीमध्ये प्रश्न विचारते आहे.

वासंती : अरे हे गेट किसने बदल दिया? पहिलं गेट किधर है? तुमको किसने watchman करके रखा?

watchman तिच्या प्रश्नांनी वैतागला आहे हे त्याच्या चेहेऱ्यावरून कळतंय.

watchaman : ओ मावशी... तुमी कुनाला शोधून राहिलात? गेट हवं हाय की मानुस?

वासंतीचा चिडलेला आवाज ऐकायला येतो आहे...

वासंती : ए आगाऊ... मावशी कोणाला म्हणतोस रे?

आता watchman च्या चेहेऱ्यावरचा उर्मटपणा खूपच जास्त झाला आहे. तो अत्यंत उद्धटपणे चढलेल्या आवाजात म्हणतो...

watchman : ए म्हातारे... मंग काय तुला तरणी पोर म्हनू काय? ऑ? म्हातारी हायसं म्हनून उभं तरी केलं हितं....

watchman चा आवाज background वर येतो आहे. तो अजूनही बडबड करतो आहे. आणि अचानक वासंतीचा चेहेरा गेटवर decoration साठी लावलेल्या आरशात दिसतो. वासंती आता स्वतःकडे बघते आहे. ती स्वतःला निरखायला पुढे आली आहे. आणि आता तिचा चेहेरा त्या आरशात स्पष्ट दिसतो आहे. तिचे केस पिकलेले आणि पिंजारलेले आहेत... डोळे खोल गेले आहेत... चेहेऱ्यावर वयाच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. ते बघून वसांतीला धक्का बसला आहे ते आरशात दिसतं.

आता कॅमेरा संपूर्णपणे वासंतीला फोकस करतो आहे. वासंतीला बसलेला धक्का तिच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसतो आहे. ती एक एक पाऊल मागे जाते आहे... बाजूला watchman अजूनही बडबडतो आहे.... सौंदर्यीकरण केलेल्या फुटपाथच्या कडेला असलेल्या कर्ब स्टोनवरून वासंती धडपडते आणि एकदम रस्त्यावर कोसळते. ते बघून watchman एकदम 'अरे अरे... सांभाळा मावशी' असं म्हणत पुढे येतो.... पण तेवढ्यात मागून एक मोठी गाडी येते आणि करकचून ब्रेक लागल्याचा आवाज हेतो... गाडी थांबली आहे... वासंती पालथी पडली आहे.. तिच्या कपाळावरून रक्ताचा ओघळ आला आहे... तिचे डोळे मिटत आहेत... त्यावेळी तिला दूरवर त्या जुन्या वाड्याच्या गेट जवळ तोच तो लहान मुलगा दिसतो आणि वासंती म्हणते....

वासंती : आई-बाबा कुठे आहात? तुम्ही हरवलात की .....

आणि वासंतीचे डोळे मिटतात... कॅमेरा त्या मुलाच्या दिशेने जातो... तो मागे वळून बॉलने टप्पी टप्पी खेळायला सुरवात करतो. बॉल bounce होतो आणि वर येतो त्यावेळी समोरच्या झोपाळ्यावर वय झालेली वासंती बसलेली दिसते.

समाप्त

Friday, July 8, 2022

गच्ची (गूढ कथा)

 गच्ची (गूढ कथा)

गच्ची

"साब आप रोज टेरेसपे क्यो जाते है?" गंगारामने जिना चढणाऱ्या पुनीतला प्रश्न केला. त्याच्याकडे बघत डोळा मारून पुनीत म्हणाला; "वर्जिश करने को गंगा. और क्यो जाऊंगा?" त्याचं उत्तर ऐकून हसत हसत गंगाराम जिना उतरून गेला. एकदा तो गेला त्या दिशेने बघून पुनीतने गच्चीचा दरवाजा उघडला.

आत पाऊल टाकल्या टाकल्या त्याने प्रीतकडे बघितलं; तिने देखील त्याच्याकडे बघितलं. दोघेही एकमेकांकडे बघून ओळखीचं हसले. शोर्ट्स, क्रॉप टॉप घातलेली प्रीत आज तर बेफाम सुंदर दिसत होती. तिने तिचे उडणारे केस गोल फिरवून क्लीपने वर बांधले होते. हातात सिगरेट आणि समोर बिअरचा ग्लास ठेऊन तिने लापटॉपमध्ये डोकं खुपसलं होतं. पुनीतने हातातले डंबेल्स एकदा तोलले आणि व्यायामाला सुरवात केली.

पुनीतला त्या multi-stored इमारतीमध्ये रहायला येऊन जेमतेम पंधरा दिवस झाले होते. तो त्याच्या मित्राच्या फ्लॅटमध्ये राहात होता. पुनीतची इथे बदली झाली तेव्हा कुठे राहायचं हा मोठा प्रश्न होता त्याला. त्याने त्याच्या मित्राला फोन केला होता कुठेतरी भाड्याने घर मिळेल का विचारायला. तर मित्र म्हणाला त्याचा स्वतःचा फ्लॅट रिकामा होता. त्याला तो विकायचाच होता... जोपर्यंत विकला जात नाही तोपर्यंत पुनीतने रहायला हरकत नाही असं तो म्हणाला. एकदा तिथे पोहोचलं की घर शोधता येईल असा विचार करून पुनीतने फारसे आढेवेढे न घेता मित्राच्या फ्लॅटमध्ये राहायचं मान्य केलं.

फ्लॅट फर्निश होता आणि पुनीत एकटाच होता... त्यामुळे तसा काहीच प्रश्न नव्हता. ज्या दिवशी तो राहायला आला त्याच दिवशी त्याने प्रीतला बघितलं होतं. त्याच्याच मजल्यावर बाजूच्या फ्लॅटमध्ये ती राहात होती. तिच्याकडे बघूनच लक्षात येत होतं की एकदम बिनधास्त मुलगी असावी ती. पाहिले काही दिवस तर ती पुनीतकडे बघायची देखील नाही. पण मग एकदा ऑफिसमधून परत येऊन पुनीत त्याच्या फ्लॅटचं दार उघडत होता त्यावेळी त्याला प्रीत गच्चीच्या दिशेने जाताना दिसली. अंदाज घेण्यासाठी तो पटकन फ्रेश होऊन गच्चीत गेला.

प्रीत गच्चीत एका बाजूला बसली होती. समोर एक पेग भरलेला होता. शोर्ट्स आणि टी शर्ट घातलेली हातात सिगरेट असलेली प्रीत संध्याकाळच्या उतरत्या उन्हात अप्रतिम सुंदर दिसत होती. डोळ्याच्या एका कोपऱ्यातून तिच्याकडे बघत पुनीत उगाच इकडे तिकडे फिरत राहिला. प्रीतने एक-दोनदा मान वर करून त्याच्याकडे बघितलं. पण कोणताही रिस्पॉन्स दिला नाही. थोड्यावेळ timepass करून पुनीत खाली उतरला. थोड्या वेळाने जिन्यात पायांचा आवाज आला म्हणून पुनीतने फ्लॅटचा दरवाजा उघडला तर गंगाराम वॉचमन गच्चीचा जिना उतरून खाली येत होता.

"अरे गंगाराम तू क्या कर रहा था उपर?" पुनीतने गंगारामला विचारलं.

"हम क्या करेंगे साब? पानी का टाकी भर गया था. वो ऑटोमॅटिक पंप बंद पड गया है ना तो पंप बंद करने को उपर गया था. वैसे मुझे भी उपर जाने को अच्छा नही लागता. लेकीन क्या करने का? अपना तो नौकरी ही ऐसा है ना!" गंगाराम म्हणाला.

"क्यो रे. क्यो अच्छा नही लगता?" पुनीतने गंगारामला विचारलं. त्याला प्रीत बद्दल माहिती घ्यायची होती. पण डायरेक्ट कसं विचारायचं असा विचार करून त्याने आड मार्गाने प्रश्न करायला सुरवात केली.

"अरे साब. अब क्या बोलू? वो आपके बाजूवाले फ्लॅट की मॅडम के कारण ही तो ना..... पेहेले तो शाम को बच्चे भी खेलने को जाते थे. अब किसिकी मम्मी लोग नही भेजती उप्पर. दादा लोग तो सिर्फ मॅडम को देखने को जाते थे. लेकीन फिर एक बार प्रीत मॅडम के husband ने इतना तमाशा किया के सब लोग उपर जाना छोड दिये." गंगाराम खिशातून सिगरेट काढून शिलकवत म्हणाला.

"क्या बात कर रहे हो यार? शादी होगयी है क्या उसकी?" प्रीतच्या नवऱ्याचा उल्लेख ऐकून एकदम सरळ उभं राहात पुनीत म्हणाला.

"अभि क्या बताउं साब? रोज पिके आता था. फिर वो ही गालिगलोच, झगडा. फिर मॅडम उपर जाके बैठ जाती थी. सिगरेट मेरेसे ही मंगवाती थी ना. अच्छी खासी उपर की कमाई होती थी. उनके कारण ही तो ये ब्रँड की सिगरेट की आदत पड गयी. " गंगाराम म्हणाला.

"तो अब?" पुनीतने अंदाज घ्यायला विचारलं.

"अब क्या साब? अब फोन नही आता... और ये आदत नही जाती." अर्धी सिगरेट बुझवून खिशात ठेवत गंगाराम लिफ्टच्या दिशेने वळला.

अजून काही प्रश्न विचारला तर आगाऊपणा वाटेल म्हणून पुनीतने फ्लॅटचं दार लावून घेतलं.

त्याच दिवशी रात्री पुनीतला झोपेतून जाग आली. शेजारच्या घरातून जोरजोरात भांडल्याचा आवाज येत होता. पुनीतने काय बोलणं चाललं आहे ते समजून घ्यायचा खूप प्रयत्न केला. पण प्रीत आणि तिचा नवरा नक्की काय बोलत होते ते त्याला कळलं नाही. थोड्या वेळाने त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा जोरात आपटल्याचा आवाज आला त्याला. पुनीत घाईघाईने त्याच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजा जवळ गेला. त्याला गच्चीच्या दिशेने पावलं वाजलेली कळली. तो दार उघडणार होता इतक्यात परत बाजूच्या फ्लॅटचा दरवाजा वाजला आणि पुनीत थबकला. 'आत्ता उगाच रिस्क नको' असा विचार करून तो मागे वळला आणि जाऊन झोपून गेला.

***

दुसऱ्या दिवशी पुनीत गच्चीत गेला तर त्याच त्या ठराविक कोपऱ्यात प्रीत बसली होती. तेच शॉर्टस आणि टी शर्ट, बिअर ग्लास, सिगरेट आणि लॅपटॉप. पुनीतच्या लक्षात आलं की ही रोज संध्याकाळी वर येऊन बसते. बहुतेक ही येते त्यावेळी कटकट नको म्हणून इतर कोणीच येत नाही. मग मात्र पुनीतने देखील स्वतःसाठी रुटीन ठरवून टाकलं. ऑफिसमधून आल्यावर तो रोज गच्चीमध्ये व्यायाम करायला जायला लागला. काही दिवसांनी प्रीत आणि पुनीतला एकमेकांच्या गच्चीत असण्याची सवय झाली. दोघेही अधून मधून एकमेकांमडे बघून हसायला लागले.

असेच काही दिवस गेले. अधून मधून शेजारच्या घरातून भांडणाचे आवाज यायचे पुनीतला. पण रात्रीच्या वेळी रिस्क नको म्हणून तो गप राहायचा. मात्र एक दिवस पुनीत हिम्मत करून प्रीत जवळ गेला.

"Hi. Am punit. I stay just the next door." प्रीतच्या दिशेने शेकहॅन्ड करण्यासाठी हात पुढे करत तो म्हणाला.

"I know..." प्रीत हसत म्हणाली.

"What do u know?" गोंधळून पुनीतने विचारलं.

"That u stay next door...!?" अजून काय अशा आवाजात प्रीतने उत्तर दिलं.

"Oh! My bad. I thought you know me even otherwise." ओशाळवाण हसत पुनीत म्हणाला.

असेच काही क्षण गेले. आता पुढे काय?

"Guess you are very health conscious. आपको रोज excercise करते देखती हूं. ऑफिस के बाद भी इतनी energy रेहेती है ये बडी बात है. That's amazing." प्रीत स्वतःच बोलायला लागली. त्यामुळे पुनीतला हायसं वाटलं.

"Yup. I have always been conscious about my work outs. कूच भी हो... exercise तो मै करता ही हूं. That's why have a very strong ......." शेवटचा शब्द मुद्दाम अर्धा सोडला त्याने. लपटॉपमधून मान वर करत प्रीतने त्याच्याकडे बघितलं.

"Strong body....." तो घाबरून पटकन म्हणाला.

"Oh yaah.... I can see that. What else is....." प्रीत देखील तेवढीच स्मार्ट होती. तिने देखील वाक्य अर्ध तोडलं.

"Else....!?" पुनीतचा गोंधळ उडालेला त्याच्या चेहेऱ्यावर पूर्ण दिसत होता. तो बघून प्रीतला हसायला आलं. हसत हसत तिने म्हंटलं; "I was generally asking you... as what else is happining around?"

"Oh... I thought...." पुनीत मोठा निश्वास टाकत म्हणाला.

"You thought?!" तिचा स्वर अजूनही मिश्किल होता.

"Oh! Nothing... nothing..." पुनीत सारवासारव करत म्हणाला.

"If anything more than your body is strong.... I would ......" प्रीत पुनीतची कळ काढायची थांबत नव्हती.

"What... हं???" पुनीत अस्वस्थ होत म्हणाला आणि प्रीत खळखळून हसली.

हसताना प्रीत अप्रतिम सुंदर दिसत होती. तिच्या चेहेऱ्यावर मावळत्या सूर्याची किरणं रंगाळत होती. त्यामुळे तिचे पिंगट डोळे अजूनच मधाळ दिसत होते. पुनीतला स्वतःला कळायच्या अगोदर त्याने प्रीतला एकदम जवळ घेतलं होतं. दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले. असेच काही क्षण गेले आणि पुनीत भानावर आला. त्याची मिठी सैलावली आणि प्रीतने डोळे उघडले.

"Oh... Guess I should get going." पुनीतकडे न बघता प्रीतने तिचं लॅपटॉप उचललं आणि ती निघाली.

ती जेमतेम गच्चीच्या दाराकडे पोहोचली असेल आणि पुनीत म्हणाला; "It's fullmoon today. Having chilled beer in cool breezy terrace is real fun. I love to have one today."

प्रीतने थबकून मागे वळून बघितलं आणि खूप गोड मधाळ हसली ती.

पुनीतला बिअरचा घोट घेताना खात्री होती की प्रीत नक्की येणार गच्चीवर. त्याचा ग्लास अर्धा संपला आणि गच्चीचं दार वाजलं. पांढरा शुभ्र नेटचा गाऊन घालून प्रीत दारात उभी होती. तिला बघून पुनीत हरवून गेला. प्रीतला मिठीत घेण्यासाठी तो एकदम पुढे आला आणि त्याचा हात लांब करत हसत प्रीत म्हणाली; "I thought u had invited me to have beer." आणि पुनीत एकदम ओशाळला.

"Oh! Of course! See this! It's real child. Had kept in fridger for a while to get real chilled." प्रीतसाठी ग्लास भरत तो म्हणाला.

"So? Still work from home?" चिअर्स करताना पुनीतने प्रीतला प्रश्न केला.

"Yah... If u say so." दूर नजर लावत प्रीत म्हणाली आणि तिने एक मोठ्ठा घोट घेतला. "Forget about me. Tell me about you." ती एकदम मोकळेपणी हसत म्हणाली.

"What about me? Got transfered here. Where to stay was a big question. This is my friend's flat; he wants to sell. Till then he allowed me to stay here. So here I am." पुनीत म्हणाला.

बहुतेक प्रीतचं पुनीतच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. "I just love this full moon night. कितना सुकून होता है ना." तिच्या अप्रतिम सौंदर्याकडे बघत पुनीतने केवळ एक हुंकार दिला.

"एक बात पुछु प्रीत?" पुनीतने काहीसं खाकरून तिच्याकडे बघत प्रश्न केला.

"पुछो ना. इतना फॉर्मल क्यो बनते हो." हसत प्रीत म्हणाली.

"प्रीत... मै तुम्हारा और तुम्हारे पती का झगडा रोज सूनता हूं. अगर तुम चाहो तो मुझे बता सकती हो क्या बात है. मै तुम चाहो तो मै तुम्हे मदत कर सकता हूं." पुनीत म्हणाला.

"अब कूच नही हो सकता पुनीत." एक मोठा निश्वास टाकत प्रीत म्हणाली.

"क्यो? क्यो कूच नही हो सकता? प्रीत तुम्हारे जैसे indipendent लाडकी ने एसी बाते नही करनी चाहीये. क्या वो मारता भी है?" पुनीतने तिला हळुवार आवाजात विचारलं.

प्रीतने मानेनेच हो म्हंटलं आणि मान खाली घातली.

"तो फिर क्यो रहती हो उसके साथ?" पुनीतने तिचा हात हातात घेत तिला स्वतःकडे वळवत विचारलं.

प्रीत काही एक न बोलता मान खाली घालून उभी होती. पुनीतने हलकेच तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहेरा वर केला. चांदण्यामध्ये नहाणारं अप्रतिम शिल्प होतं त्याच्या समोर. न राहावून प्रीतचं चुंबन घेण्यासाठी पुनीत पुढे झाला आणि प्रीतने लाजून परत मान खाली घातली. पुनीत मंदसं हसला आणि प्रीत देखील. पुनीतने तिला हलकेच जवळ घेतलं आणि दोघेही बरसणाऱ्या चांदण्यामध्ये नाहात उभे राहिले. असा किती वेळ गेला कोण जाणे... दोघे एकमेकांपासून लांब झाले आणि प्रीत हलकेच उडी मारून गच्चीच्या कठड्यावर बसली.

"Oh. Hey get down please. It's risky." तिचा हात धरून तिला खाली उतरायचा आग्रह करत पुनीत म्हणाला.

खळखळून हसत प्रीतने विचारलं; "क्यो डरते हो क्या?"

तिला खाली उतरवायचा प्रयत्न चालू ठेवत पुनीत म्हणाला; "डरने की बात नही है प्रीत. हम दोनोने बिअर पी रखी है. थोडा इधर उधर हो गया तो....."

खसकन त्याचा टी शर्ट धरून त्याला स्वतःकडे ओढत प्रीत म्हणाली; "थोडा इधर उधर हो गया तो पुनीत?"

तिच्या मधाळ डोळ्यात हरवून जात पुनीत म्हणाला; "तो..... nothing...."

प्रीतच्या डोळ्यात हरवलेला पुनीत त्याच्याही नकळत गच्चीच्या कठड्यावर बसला होता. प्रीत त्याच्या मिठीत होती. स्वर्ग याहून काही वेगळा असूच शकत नाही असं त्याला वाटत होतं.

"प्रीत.... I just can't believe that you are in my arms." तिला अजून घट्ट जवळ घेत पुनीत म्हणाला. प्रीतीचा चेहेरा देखील समाधानाने फुलला होता.

"पुनीत.... मै एक बात पुछु?" मिटल्या डोळ्यांनी समाधानी चेहऱ्याच्या प्रीतने पुनीतच्या मिठीत असताना त्याला प्रश्न केला.

"Now you are being formal my love." पुनीत म्हणाला.

त्याच्या मिठीतुन दूर होत त्याच्या डोळ्यात डोळे घालून प्रीतने त्याला विचारलं; "पुनीत.... शादी करोगे मुझसे?"

............... आणि त्या प्रश्नाने पुनीत पूर्ण घाबरून गेला.

"शादी?" त्याच्या तोंडून कसे बसे शब्द बाहेर पडले.

"हा! शादी!" प्रीत म्हणाली.

"प्रीत.... शादी?" पुनीतला काय बोलावं सुचत नव्हतं.

"क्यो पुनीत? तुम्हे मै पसंद हूं न?" प्रीतचा आवाज थोडा तीव्र झाला होता.

"हा.... पसंद हो प्रीत.... लेकीन शादी?" पुनीत तेच तेच परत परत बोलत होता.

"Exactly.... पुनीत.... शादी का नाम सूनते ही होश मे आए तुम. You too are same like all other men I have seen. तुम लोग लडकी का सिर्फ शरीर जानते हो. And exactly that's what I hate the most." बोलताना प्रीतचा आवाज मोठा व्हायला लागला होता... इतका मोठा की चरकायला लागला.

बिअरची नशा.... भणाणलेला वारा.... आणि प्रीतचं टिपेच्या आवाजातलं बोलणं... पुनीतला काय होतंय कळेनासं झालं....

"बोलो शादी करोगे.... पुनीत बोलो.... बोलो ना.... शादी करोगे...." प्रीत तेच तेच परत बोलत होती.

"No... that's not possible Preet. Am already married." पुनीतच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि त्याच क्षणी प्रीतने त्याला गच्चीवरून ढकलून दिलं......

.......................... पुनीत मोठ्याने ओरडत उठला होता. त्याच्या समोर गंगाराम अर्धी जळालेली सिगरेट पेटवत उभा होता.

"उठो साब. अब समझें इधर कोई क्यो नही आता? जाओ साब.... जाओ अपने रास्ते."

असं म्हणून पुनीतच्या दिशेने एक कुत्सित हास्य फेकून गंगाराम गच्चीचं दार उघडून खाली उतरला.

समाप्त

Friday, July 1, 2022

मेतकूट भात (गूढ कथा)


मेतकूट भात

"काय ग? नुकतीच आलीस वाटतं इथे राहायला?"

भर दुपारची वेळ. नवीन जागा आणि मागून अचानक आलेल्या प्रश्नाने प्रज्ञा एकदम दचकली आणि तिने वळून बघितलं. तसं प्रज्ञाने तिच्या फ्लॅटचं दार उघडायच्या अगोदरच शेजारच्या घराच्या ग्रीलच्या दाराचं पूर्ण निरीक्षण केलं होतं. अगदी जुन्या टिपिकल लहान सळयांच्या ग्रील्स अर्ध्या दारात आणि उरलेलं दार लाकडाचं. मुख्य दरवाजा उघडाच. आता दार बघताना आतमध्ये लक्ष जाणं देखील स्वाभाविक असल्याने प्रज्ञाने आत देखील झरकन नजर फिरवली होती. समोरच्याच सोफ्यावर एक म्हाताऱ्या आजी बसल्या होत्या. हातात काहीतरी विणायला घेतलेलं होतं. शेजारी अनेक मासिकं पडलेली दिसत होती आणि आजीना मात्र डुलकी लागली होती. त्या आजी झोपलेल्या बघितल्या असल्यानेच तर मागून प्रश्न विचारल्याचा आवाज आला तेव्हा प्रज्ञा दचकली होती. तिने वळून बघितलं तर नुकत्याच डुलकी घेणाऱ्या आजी त्यांच्या ग्रीलच्या दारातून प्रज्ञाकडे बघत प्रश्न विचारत होत्या.

"तुमकु मराठी आता है क्या? मी मराठी हूं. तुम आत्ताच आयी का इधर राहायला?" प्रज्ञा उत्तर देत नाही हे बघून आजींना बहुतेक वाटलं की ती हिंदी आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या मराठी मिश्रित हिंदीमध्ये प्रज्ञाला परत प्रश्न केला होता. आता मात्र प्रज्ञाला हसायला आलं. "आजी, मी मराठीच आहे." तिने हसत उत्तर दिलं.

"अग्गोबाई! मग उत्तर का देत नव्हतीस ग पोरी? बरं! मला मालती ताई म्हणतात हं. तू पण तेच म्हणत जा." आजींनी मोठे डोळे करत तिला विचारलं. त्यांच्या जाड भिंगाच्या चष्म्याच्या मागचे त्यांचे डोळे मुळात मोठे वाटत होते. त्यात त्यांनी ते अजून मोठे केल्यावर प्रज्ञाला एकदम अस्वस्थ वाटलं. पण त्याकडे दुर्लक्ष करत ती म्हणाली; "बरं. मालती ताई! आत्ता तर तुम्ही झोपला होतात. त्यामुळे मला अगदीच अनपेक्षित होता तुमचा आवाज."

"अरेच्या असं झालं होय?" हसत मालती ताई म्हणाल्या.

त्यांच्या सोबत हसत प्रज्ञा म्हणाली; "हो! असंच झालं."

आपल्याच टोन मध्ये ही मुलगी उत्तर देते आहे हे ऐकून मालती ताईंना अजूनच हसू आलं आणि दोघीही एकमेकींकडे बघत हसायला लागल्या.

"गोड आहेस ग पोरी." हसणं आवरत मालती ताई म्हणाल्या. "आत्ताच येते आहेस वाटतं?" त्यांनी परत विचारलं.

"हो. हे काय दार उघडते आहे." प्रज्ञा म्हणाली.

"अग मग एकच बॅग?" तिच्या पायाशी असलेल्या बॅगकडे बघत मालती ताईंनी पुढचा प्रश्न केला.

"हो! म्हणजे नाही. मी अगदी आवश्यक वस्तू आणि कपडे घेऊन आले आहे. माझी आई कुरियरने बाकीचं सामान पाठवतेच आहे. उद्यापासून ऑफीस सुरू होतं आहे न. अगदी शॉर्ट नोटीस दिली त्यांनी. या करोनामुळे work from home चालू होतं इतके दिवस. म्हणजे मी जॉईन केलं आणि करोना आला. सुरवातीला तर वाटलं गेला हा जॉब हातातून. पण मला अपॉइंटमेंट लेटर मिळालेलं होतं. त्यामुळे त्यांना मला काढता आलं नाही. इतके दिवस मजा होती. घरूनच काम करत होते. पण अचानक परवाच्या ग्रुप मीटिंगमध्ये माझ्या सिनियरने आमच्या ग्रुपला सांगितलं अगदी एका दिवसात जॉईन करा. मग सगळीच गडबड झाली." प्रज्ञा सगळा वैताग त्या समोरच्या अनोळखी मालती ताई नावाच्या वृद्ध बाईला सांगून मनातून बाहेर काढत होती.

मालती ताई देखील बहुतेक आपल्याच तंद्रीत होत्या. "हो ग बाई. या करोनाने सगळीच गडबड करून टाकली हे खरंय." त्या म्हणाल्या.

"तरी बरं मालती ताई... हा फ्लॅट मिळाला लगेच. आईच्या मैत्रिणीच्या ओळखीतून मिळाला. सध्या कोणीच राहात नाही म्हणून कळलं. येताना चेंबूरला उतरून त्यांच्या नातेवाईकांकडून किल्ली घेतली मी." बडबडी प्रज्ञा बोलणं थांबवायला तयार नव्हती. मालती ताईंच्या ते लक्षात आलं.

"एकटीच आहेस का पोरी? बरं बरं. तुझं सामान आत टाक आणि ये. मी मस्त गरम गरम चहा करते." मालती ताई हसत म्हणाल्या आणि प्रज्ञाला काही बोलायला वेळ न देता त्यांच्या घरात वळल्या. असं आल्या आल्या त्या मालती ताईंनी त्यांच्या घरी बोलावल्यामुळे प्रज्ञा थोडी संकोचली. पण मग तिने विचार केला 'तसंही आपल्याला सगळंच सामान आणावं लागणार आहे. घरात काय आहे... सोई काय आहेत ते बघून सामान आणायचं आणि मग चहा करायचा म्हणजे कितीतरी वेळ जाईल. त्यापेक्षा आत्ता या मालती ताई देतायत तो चहा घेऊया.' एकदा मनात ठरवल्यावर प्रज्ञाने जेमतेम फ्लॅटमध्ये तिची बॅग ढकलली आणि तशीच मागल्या पावलाने मालती ताईंच्या घराच्या दारात येऊन उभी राहिली.

"मालती ताई...." प्रज्ञाने मोठ्याने हाक मारली.

"हळू ग. वरच्या मजल्यावर राहातात त्यांना शांतता लागते. जरा मोठ्याने बोललं तर लगेच वरतून ओरडतात... हळू बोला... त्रास होतोय." ग्रीलचा दरवाजा उघडत मालती ताई म्हणाल्या. "ओह! बरं बरं." असं म्हणत प्रज्ञा फ्लॅटच्या आत गेली.

"घे. गरम गरम चहा." आत येऊन सोफ्यावर बसणाऱ्या प्रज्ञाला त्यांनी चहाचा कप दिला. चहा हातात घेत प्रज्ञा सोफ्यावर बसली. "तुम्ही नाही घेत चहा?" तिने विचारलं.

"घेईन थोड्यावेळाने. माझं सगळं अगदी ठरलेल्या वेळेला असतं ग." मालती ताईंनी म्हंटलं.

चहा घेताना प्रज्ञाने घराचं निरीक्षण केलं. अगदीच साधं होतं घर. हॉलमध्ये एक सोफा. त्याच्या समोर एक टेबल. सोफ्यावर बरीचशी मराठी मासिकं. एका बाजूला विणण्याचं सामान. मालती ताई काहीतरी मोठं विणत असाव्यात हे प्रज्ञाच्या लक्षात आलं. डावीकडे स्वयंपाकघर आणि त्याच्याच शेजारी बेडरूम दिसत होती. घरात बहुतेक अजून कोणी नव्हतं. प्रज्ञाला राहावलं नाही. चहा होताच कप समोर ठेवत तिने आजींना विचारलं; "तुम्ही एकट्याच रहाता का मालती ताई?" तिच्या त्या प्रश्नाने मालती ताई एकदम अस्वस्थ झाल्या सारख्या प्रज्ञाला वाटल्या. "काय झालं तुम्हाला?" तिने उठून त्यांच्या जवळ जात म्हंटलं.

"काही झालं नाही ग. हो! एकटीच आहे मी. म्हणजे माझा मुलगा आणि सून परदेशात कायमचे गेले. मी इथेच राहिले.... एकटी. इतकी एकटी की बोलावसं वाटलं की मी स्वतःशीच बोलते." मालती ताई म्हणाल्या. त्यांचं बोलणं ऐकून प्रज्ञाला वाईट वाटलं.

"आता मी आले आहे न. आपण खूप गप्पा मारू." ती हसत हसत मालती ताईंना म्हणाली. त्यावर मालती ताईंनी देखील हसत मान डोलावली. "बरं आता निघते. थोडं घर लावते आणि आवश्यक सामान आणते. मालती ताई, तुम्ही घरात लागतं ते सामान कुठून आणता? ऑर्डर दिली तर घरी आणून देत असतील ना इथले दुकानदार?" चपला पायात सरकवताना प्रज्ञाने मालती ताईंना विचारलं.

मालती ताई स्थिर नजरेने कुठेतरी दुसरीकडेच बघत होत्या. मग अगदी हळु आवाजात म्हणाल्या; "देत असतील. मला नाही माहीत." मालती ताईंचं ते उत्तर प्रज्ञाला विचित्र वाटलं. तिने वळून त्यांच्याकडे बघितलं. त्यांची हरवलेली नजर तिला लक्षात आली. मुलाच्या आठवणीत मालती ताई हरवल्या की काय असं वाटून ती त्यांच्या जवळ गेली आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली; "काय झालं मालती ताई? मी दुखावलं का तुम्हाला एकट्या रहाता का विचारून?" तिच्या त्या स्पर्शाने मालती ताईंच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या हातावर थोपटत त्या म्हणाल्या; "छे छे अग. असं काही नाही. तशी मी विडिओ कॉल करते की त्यांना अधून मधून. ते लोक सुद्धा करतात हो. हा बघ समोरच आहे माझा लॅपटॉप." असं म्हणून मालती ताई हसल्या. उगाच अजून काही बोलून त्यांना दुखवायला नको म्हणून मग प्रज्ञा तिथून निघाली.

संध्याकाळी प्रज्ञा बाहेरच काहीतरी खाऊन आणि बरंचसं सामान घेऊन परत आली. आत्ता देखील मालती ताईंच्या घराचा मुख्य दरवाजा उघडा होता आणि मालती ताई सोफ्यावर विणत बसल्या होत्या. प्रज्ञाला बघून त्या दाराशी आल्या.

"अरे बरंच सामान घेऊन आलीस की." प्रज्ञाच्या हातातल्या पिशव्या बघून मालती ताई हसत म्हणाल्या.

"हो! उद्यापासून ऑफिस सुरू होतं आहे नं. सकाळी गडबड नको म्हणून सामान घेऊन आले." प्रज्ञाने हसून उत्तर दिलं.

"बरं बरं. चहा हवा आहे का? आणि मी माझ्यासाठी उप्पीट केलं आहे. तुला देऊ का थोडं?" मालती ताईंनी प्रेमाने विचारलं.

"नको मालती ताई. मी खाऊनच आले आहे. आता झोपेनच. उद्या लवकर उठायचं आहे. पहिलाच दिवस आहे ऑफिसचा. सगळं स्वतःच आवरून वेळेत पोहोचायचं म्हणजे दिव्य वाटतं आहे मला." पर्स मधल्या घराच्या किल्ल्या काढत प्रज्ञा म्हणाली. बहुतेक तिचा आवाज वाढला होता. कारण अचानक वरच्या मजल्याच्या मधल्या पॅसेजमध्ये येऊन कोणीतरी तिच्याकडे वाकून बघत होतं. 'बापरे.... मोठ्याने बोलते आहे की काय मी?' प्रज्ञाच्या मनात आलं. त्यांच्या दिशेने हात वर करत ती "सॉरी" म्हणाली. तिच्याकडे थोडं विचित्र नजरेने बघत ते गृहस्थ परत वर गेले.

"खूप मोठ्याने बोलत होते का मी मालती ताई?" तिने आवाज हळू करत हसत मालती ताईंना विचारलं.

"का ग?" ग्रील मधून तिच्याकडे बघत मालती ताईंनी तिला उलट प्रश्न केला.

"आत्ता तिथे वरच्या बाजूला कोणीतरी येऊन माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होतं. बहुतेक तुम्ही दुपारी म्हणालात तसा त्यांना माझ्या आवाजाचा त्रास झाला." प्रज्ञा हसत म्हणाली.

अचानक मुख्य दरवाजा बंद करत मालती ताई म्हणाल्या; "असेल असेल. बरं जा आवर आणि झोप." प्रज्ञा मागे वेळेपर्यंत त्यांनी दार लावून घेतलं होतं. इतक्यात वरून कोणीतरी खाली आलं. आपल्या मोठया आवाजावरून ते काहीतरी बोलतील असं वाटून त्यांच्याकडे लक्षच नाही असं दाखवत प्रज्ञाने तिच्या घराचं दार उघडलं आणि ती आत गेली. त्या गृहस्थांनी एकदा प्रज्ञाच्या दाराकडे आणि एकदा मालती ताईंच्या दाराकडे बघितलं आणि मग ते खाली निघून गेले.

***

सकाळी हातात एक केळं आणि खांद्यावर सॅक घेतलेली एकदम फॉर्मल कपडे घातलेली प्रज्ञा तिच्या घराचं दार लावून निघाली. आता तिने सवयीने मालती ताईंच्या घरात डोकावलं. त्या तशाच सोफ्यावर विणत बसल्या होत्या. "बाय मालती ताई. संध्याकाळी वेळेत आले तर भेटू." जिना उतरत प्रज्ञा म्हणाली. "नक्की भेटू ग." मागून मालती ताईंचा आवाज आला.

***

"बराच उशीर झाला आहे ग तुला." घराचं दार प्रज्ञा उघडत असताना तिला मागून मालती ताईंचा आवाज आला. आता ती दचकली नाही. कारण मालती ताईंना डुलकी लागली असली तरी आपला दार उघडण्याचा आवाज आला की त्या जाग्या होतात ते तिच्या लक्षात आलं होतं. हसत मागे वळत ती म्हणाली; "हो न. पहिलाच दिवस होता. पण इतकं काम होतं न मालती ताई." तिने मालती ताईंकडे बघितलं तर त्यांनी स्वेटर घातला होता. त्यांचा चेहेरा देखील उतरल्या सारखा होता. "अरे! बरं नाहीय का मालती ताई?" त्यांच्या ग्रीलच्या दाराजवळ जात प्रज्ञाने विचारलं.

"हो ग. थोडी कणकण वाटते आहे." त्यांनी आतून म्हंटलं.

"दार उघडा बघू मालती ताई. किती ताप आहे ते मला बघू दे." प्रज्ञाने आग्रह केला. मालती ताईंनी दार उघडलं. प्रज्ञाने आत शिरत त्यांच्या कपाळाला हात लावला. "अरे चांगलाच ताप आहे तुम्हाला. काही औषध घेतलंय का तुम्ही?" त्यांना सोफ्यावर बसवत तिने विचारलं. "हो अग. क्रोसीन घेतली आहे. उतरेल सकाळपर्यंत." अगदी थकलेल्या आवाजात मालती ताई म्हणाल्या.

"ते काही नाही. आडव्या व्हा बघू तुम्ही आत." त्यांचा हात धरत प्रज्ञा म्हणाली.

"इथेच पडते ग. आत नको वाटतंय." सोफ्याकडे जात मालती ताई म्हणाल्या.

"बरं इथे पडा." त्यांना सोफ्यावर बसवत प्रज्ञा म्हणाली. "मालती ताई, औषध घेतलं आहात पण काही खाल्लं आहे की नाही तुम्ही?" तिने त्यांच्या जवळ बसत म्हंटलं.

"भूक नाही ग." अगदीच मलूल झाल्या होत्या मालती ताई. "अरे कमाल करता. तुमच्याकडे कोणी कामाला येत नाही का? ते जाऊ दे. मी काहीतरी पटकन करून देते तुम्हाला. काय करू?" प्रज्ञा स्वयंपाक घराकडे वळत म्हणाली.

"खरंच करशील? मऊ भात आणि मेतकूट. तिथेच एका बाजूला तूप आहे. ते घाल आणि लोणच्याची बरणी दिसेल बघ. थोडं लोणचं. तू काहीतरी करते आहेस म्हणालीस आणि एकदम इच्छा झाली बघ पोरी." मालती ताई मनापासून म्हणाल्या. त्यांच्याकडे बघत हसत प्रज्ञा म्हणाली; "तुम्ही हे असं हक्काने सांगितलंत; बरं वाटलं मला. पटकन करून आणते मऊ भात. तोवर पडा तुम्ही." असं म्हणून प्रज्ञा स्वयंपाकघरात गेली.

प्रज्ञा एका ताटात मऊ भात मेतकूट आणि तूप कालवून आणि लोणचं घेऊन बाहेर आली. तिने समोर बघितलं तर मालती ताईंना गाढ झोप लागली होती. त्यांचा चेहेरा देखील अगदी शांत समाधानी दिसत होता. 'झोप लागली आहे तर डिस्टर्ब करायला नको;' असा विचार करून प्रज्ञाने एक स्टूल सोफ्याच्या जवळ ओढलं आणि त्यावर भाताची ताटली ठेऊन त्यावर झाकण ठेवलं. मालती ताईंना जाग आली की त्यांना समोरच मेतकूट भात दिसेल आणि त्या खातील असा विचार करून प्रज्ञा हलकेच घराबाहेर आली आणि आवाज न करता तिने दरवाजा ओढून घेतला.

***

सकाळी प्रज्ञाला नेहेमीप्रमाणे उशीरच झाला होता. बॅग सावरत तिने तिच्या घराचं दार ओढून घेतलं. तिची नजर मालती ताईंच्या दाराकडे गेली. पण अजूनही त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा बंदच होता. 'बरं नसल्याने त्या उठल्या नसतील;' प्रज्ञाच्या मनात आलं. उशीर होत असल्याने घड्याळाकडे बघत ती भराभर जिना उतरली.

आज प्रज्ञाला फार उशीर झाला नव्हता. जेमतेम आठ वाजले होते. मालती ताईंना हाक मारायची असं ठरवूनच ती आली होती. ती जिना चढुन वर आली. पण आत्ता देखील मालती ताईंच्या घराचं दार बंद होतं. तिला थोडी काळजी वाटली. तिने बेल वाजवली. पण ना आत बेल वाजल्याचा आवाज आला ना काही हालचाल जाणवली. थोडं थांबून तिने परत बेल वाजवली. पण काहीच रिस्पॉन्स नव्हता. इतक्यात एक दहा-बारा वर्षांचा मुलगा खालून जिना चढून वर आला. प्रज्ञाला मालती ताईंच्या दारासमोर उभं बघून तो तिच्याकडे विचित्र नजरेने बघायला लागला. प्रज्ञाने त्याच्याकडे बघितलं मात्र तो पटकन पुढचा जिना चढून निघून गेला. प्रज्ञाने परत एकदा बेल वाजवली. पण काहीच हालचाल नव्हती. आता मात्र तिला मालती ताईंची काळजी वाटायला लागली. तिने हाक मारली "मालती ताई.." पण दाराशी पावलं वाजली नाहीत. प्रज्ञाने आवाज चढवत अजून मोठ्याने हाक मारली "मालती ताई....." आतून काहीच उत्तर आलं नाही. पण वरच्या जिन्यावरून कोणीतरी खाली येत असल्याचा आवाज प्रज्ञाला आला.

आपण मोठ्याने हाक मारली म्हणून आले असावेत असं वाटून प्रज्ञा मागे वळली.

"कोण हवंय तुम्हाला?" आदल्या दिवशी मधल्या पॅसेजमध्ये येऊन तिच्याकडे विचित्र नजरेने बघणारे गृहस्थ खाली येत होते.

"अहो मालती ताई दार उघडत नाहीयेत. त्यांना काल रात्री बरं नव्हतं. ताप होता. सकाळी दार बंद बघितलं तर मला वाटलं आराम करत असतील. पण आत्ता देखील त्यांचं दार बंद आहे. मला वाटतं त्यांना जास्त त्रास होत असावा. काहीतरी केलं पाहिजे." प्रज्ञा काळजीने म्हणाली.

"तुम्ही मालती ताईंबद्दल बोलता आहात का?" त्या गृहस्थाने प्रज्ञाला प्रश्न केला.

त्याच्या प्रश्नाने प्रज्ञा वैतागली. "अहो अजून कोणाबद्दल बोलत असेन मी? मालती ताई राहतात ना इथे? मग त्यांच्या बद्दलच बोलेन न." तिने कपाळाला आठ्या घालत म्हंटलं.

"मालती ताई राहात नाहीत आता इथे...." ते गृहस्थ प्रज्ञाकडे विचित्र नजरेने बघत म्हणाले.

"अहो काय बोलता आहात तुम्ही? इथे राहात नाहीत तर कुठे राहातात मालती ताई?" प्रज्ञाला आता राग यायला लागला होता. मदत करायची सोडून ते गृहस्थ दुसरंच काहीतरी बोलत होते.

"अहो.... म्हणजे त्या इथे राहायच्या. पण दुसऱ्या करोनाच्या लाटेमध्ये त्या गेल्या. एक दिवस ताप आल्याचं निमित्त झालं आणि एका रात्रीत सगळं संपलं. मुलगा आणि सून येऊ देखील शकले नाहीत." ते गृहस्थ म्हणाले.

त्यांचं बोलणं ऐकून प्रज्ञाला धक्का बसला. "अहो काय बोलता आहात तुम्ही. काल रात्री मी त्यांच्याशी बोलले. मेतकूट भात करून दिला मी त्यांना. पण झोप लागली होती म्हणून जवळ ठेऊन आले बाहेर." प्रज्ञा म्हणाली.

"ओह.... काय सांगता? त्यांना गरम भात, मेतकूट, तूप असं साधंस जेवण आवडायचं. पण ते देखील नाही मिळालं त्यांना. या करोनामुळे कोणी जात नव्हतं न एकमेकांकडे. त्यांनी हाक मारली होती बहुतेक आम्हाला. पण कळलं नाही. मी सकाळी दूध आणायला खाली उतरलो तर त्यांचा मुख्य दरवाजा उघडा होता आणि त्या सोफ्यावर पडल्या होत्या. मी लांबूनच हाक मारली. त्यांनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही. उगाच आत जायची रिस्क मी नाही घेतली. हॉस्पिटलमध्ये कळवलं. ते आले आणि त्यांची बॉडी घेऊन गेले. त्याच लोकांनी दार ओढून घेतलं घराचं. त्यानंतर आत कोण गेलंय हो? संपलं न सगळं." ते गृहस्थ बोलत होते. पण प्रज्ञाला आता काही ऐकू येत नव्हतं. ती काहीशी भेदरलेल्या आणि गोंधळलेल्या नजरेने त्या गृहस्थाकडे बघत उभी होती.

समाप्त