Friday, July 30, 2021

सुख!

 आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपल्याला खऱ्या सुखाचा विसर पडलेला असतो का? आपण फारच भौतिकसुखवादी तर नाही ना झालेलो... गेले काही दिवस या विचाराने अस्वस्थ होते... एक प्रश्न मला सतत सतावतो आहे... खरं सुख म्हणजे नक्की काय? माझ्यापरीने या प्रश्नाचं उत्तर शोधायचा एक लहानसा प्रयत्न केला आहे. तो आपल्यासमोर कवितेच्या माध्यमातून मांडते आहे.


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर...
सुखाचा अर्थ वेगळा असतो!
त्या वळणापूरता तो;
अगदी अगदी खरा असतो...

नकळत पण आपण फसतो...
जवाबदऱ्यांमध्ये सुखाला शोधतो...
खरं सुख हिरमुसलं असतं;
'मी फक्त तुझ्यासाठी' म्हणत असतं!

काय हरकत आहे थोडं थांबायला...
नभ, पक्षी, इंद्रधुनत सुख शोधायला...
वाढत्या वयात काय प्रेम आटतं?
मनातलं नवथरपण असं कसं हरवतं?

जवाबदाऱ्या कधी संपतात का?
सुखाची गणितं अशी मोजतात का?
धुंद स्वच्छंद आयुष्य हळूच चोरायचं...
गणित करण्यापेक्षा जगायला शिकायचं!

Friday, July 23, 2021

एक red wine नातं (भाग 9) (समाप्त)

 एक red wine नातं (भाग 9)


जीवापाड जपत होती ती ते red wine नातं. वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत होती ती त्याच्याकडे. कधी पाठवलेले मोठे मोठे मेल्स तर कधी व्हाट्सऍप वर लिहिलेल्या कविता. नवऱ्या सोबत केलेल्या टूर्सची सुंदर मोहक वर्णनं, लेकाचं मोठं होणं आणि त्यासोबत तिची त्याच्याशी होत असलेली मैत्री! सगळं सगळं लिहीत होती ती त्याला आणि भरभरून रिक्त होत होती.

एकदिवस ती नात्यातल्या एका समारंभासाठी ट्रेनने जात होती. आपल्याच तंद्रीत ती बसली होती. अचानक तिचं लक्ष डब्यातल्या एका बाईकडे गेलं. आनंदाने ती एकदम चित्कारलीच! तिची शाळेतली लाडकी मैत्रीण प्रणिता बसली होती. डब्यातली गर्दी... परत बसायला जागा मिळणार नाही याची जाणीव सगळं विसरून ती एकदम धावली प्राणिताकडे. तिच्या त्या गर्दी चिरत येण्याकडे प्राणिताचं देखील लक्ष गेलं. तिचा चेहेरा देखील आनंदाने फुलला. त्यानंतर दोघी आजूबाजूचं जगच विसरल्या जणू. येणाऱ्या प्रत्येक स्टेशनचं नाव ऐकायला येत होतं म्हणून... नाहीतर त्यांचं स्टेशन देखील चुकलं असतं. प्रणिताचं स्टेशन तिच्या अगोदर आलं आणि तिला घट्ट मिठी मारत आणि परत नक्की भेटायचं आश्वासन देत प्रणिता ट्रेनमधून उतरली. प्रणिता गेली आणि तिचा त्या समारंभासाठी जाण्याचा उत्साहच ओसरून गेला. पण तरीही जावं लागणारच होतं. ते आपल्याकडे कित्येकदा येऊन गेले आहेत. लेकाला गिफ्ट दिलं आहे... त्याची परतफेड नको का! तिच्या मानत आलं आणि इच्छा नसूनही ती त्या समारंभात सामील झाली.

मात्र त्या रात्री परत एकदा एक कविता व्हाट्सऍप वरून प्रवास करत त्याच्याकडे गेली होती.

एकदा एका वळणावर जुनी मैत्री भेटली...
आठवणी घेउन थांब ना... ऐक ना... हट्ट धरून बसली!
ऑफिसची वेळ; नवऱ्याचा डबा...
पोरांची शाळा; boss चा चेहरा..
आठवलं क्षणात सारं; अन् पाठ केली तिच्याकड़े...
थोड़ी हिरमुसली-थोड़ीशी फुगली...
निघून गेली दुसरीकडे...
जाणवलं तिचं हिरामुसणं फुगणं...
पण वेळ नव्हता मला... मनात होतं office ला वेळेत पोहोचणं!
संध्याकाळी परत train च्या डब्यात दिसली..
ओळख दाखवू की नको... या confusion मध्ये होती;
मी हसले... तशी ती पण हसली...
पटकन् जवळ येउन कुशीत शिरली..
'कळत ग मला तुझ्या असण्याचं महत्व...
सुटत नाही पण हे संसाराचं देणं'
तिला मिठीत घेउन मी मनातच म्हंटलं;
Station आलं म्हणून स्वतःला आवरलं.
ती हसली ... समजूतदार आहे पठ्ठी!
तिच हो ती...
कुमारी मैत्री विश्वास आठवणी!!!

'तुझ्या कवितांमध्ये चटका लावणार सत्य असतं एकएकदा. पण लिहीत जा... जे आणि जसं मानत येईल ते आणि तसं. पण एक सांगू? मला न तुझ्या त्या रोमँटिक आणि हळुवार प्रेम व्यक्त करणाऱ्या कविताच जास्त आवडतात.' त्याचं उत्तर आलं दुसऱ्या दिवशी आणि ती परत एकदा खुदकन हसली.

***

आता तशी ती बरीच मोकळी व्हायला लागली होती. त्यामुळे ते रिकामपण अस्वस्थ करायला लागलं होतं तिला. तिच्या मेल्स मधून ते त्यांच्यापर्यंत पोहोचत होतं. एकदिवस त्याचा मेसेज आला....

तुझ्यासाठी एक gift पाठवलंय कुरियरने. मिळालं की नक्की कळव.

त्यानंतर ती रोज कुरियरची वाट बघत होती. पुढचे पाच दिवस खूपच वेगळे गेले तिचे. मनातली उत्सुकता तिला चेहऱ्यावर दिसू द्यायची नव्हती. कारण तिच्या चेहऱ्यावर होणाऱ्या लहानात लहान बदलांनी देखील तिचा नवरा अस्वस्थ होत होता. तिला कळत होतं की हे त्याचं प्रेम आहे तिच्यावरचं. तिचं देखील प्रेम होतंच की त्याच्यावर. पण लग्नाला इतकी वर्ष झाल्यानंतर त्या प्रेमावर इतर अनेक भावनांची पुटं चढली होती. त्यामुळे तो जसं त्याचं प्रेम केवळ अस्वस्थतेतून दाखवत होता तशी ती तिचं प्रेम तिची सगळी कर्तव्य पूर्ण करून दाखवत होती. याहून जास्त काही तिला देता येत नव्हतं आणि त्याला हवं असून मागता येत नव्हतं. तिच्या बाजूने तिने सोपा मार्ग काढला होता... न बोलण्याचा!

कुरियर आलं आणि तिने ते अगदी परकरी मुलीच्या उत्सुकतेने उघडलं. हातातलं गिफ्ट बघून ती हरकून गेली होती. ते एक अप्रतिम सुंदर मुखपृष्ठ असलेलं पुस्तक होतं..... तिच्या कवितांचं!!!!

त्याच्या मेसेजमध्ये असंख्य लाल हर्ट्स होती.... ती सर्वात सुंदर पोचपावती असावी जगातली!!!

***

दोनच दिवसांनी तिला मेल आला त्याचा. यावेळी परत घोळ झाला आहे... म्हणजे मीच केला आहे. बडा ही बलंडर हुई गवा है। अग, तुझ्या कवितांचं पुस्तक एका मित्राच्या मदतीने बनवलं होतं आणि तुझा पत्ता देऊन त्यालाचं कुरियर करायला सांगितलं होत. जेणेकरून घरी कळणार नाही. पण त्या मूर्खाने receipt delivery चा पत्ता माझ्या घराचा टाकला. मी घरी नसताना दुपारी आली पोचपावती! आता ही पावती मला पोहोचवणार बहुतेक!!! पण काळजी करू नकोस.... काही दिवस मी तुझा नंबर ब्लॉक करतो आहे. मेल्स पण नाही. कोणताच संपर्क नसेल. सगळं ठीक होईपर्यंत तू कोणत्याही प्रकारे मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू नकोस. सगळं ठीक झालं की मी फोन करीन. फोनच करीन. माझ्या मेल्सना किंवा मेसेजना मुळीच उत्तर देऊ नकोस. माझ्याकडून मेल्स किंवा व्हाट्सऍपवरून मुद्दाम मेसेज करून घेतले जातील... म्हणून ही काळजी घ्यायला सांगतो आहे.

राणी.... बोललो नाही तरी माझ्या मनात तू कायम आहेस!! मला माहीत आहे की तुला हे माहीत आहे.... पण तरीही!!!

bye माझ्या जीवा!!!

***

तो मेल तिने किती वेळा वाचला असेल ते मोजणं तिने बंद केलं होतं. कारण गेल्या सहा महिन्यात त्याने एकदाही फोन केला नव्हता. बाकीचे कॉन्टॅक्ट करण्याचे प्रकार तर अशक्यच होते.

आज परत ती नरिमन पॉईंटवर एकटी येऊन बसली होती. किती वर्ष होतो बरं आपण एकत्र??? ती गणित लावत होती... बारा वर्ष! एक तप!!! आणि आता सहा महिने झाले..... एका कागदाच्या तुकड्याने संपलं सगळं? हम्म!!!

तिचे डोळे ओले होते... आयुष्यातला एक गोड ओलावा हरवला म्हणून; आणि त्या ओलाव्याच्या सोबतीने फुलणारी तिच्यातली मुलगी आता एकटी पडली होती म्हणूनही!

समोर ओहोटीचा समुद्र सोनेरी गोळा पोटात घेत दूर जात होता.... किनाऱ्याकडे येणारी प्रत्येक लाट एकमेकांत मिसळत असूनही मागे सरकत होती.... आणि ती.... पुढे काय? या विचारांनी मनातून हलली होती. तिच्याही नकळत तिने तिचं लाडकं गाणं लावलं. तिचं! फक्त तिचं असं! आजवर तिने कधीच कोणाशीही ते शेअर केलं नव्हतं. तिच्या मनात आलं.... कदाचित आजसाठीच आणि पुढच्या प्रवासाची सोबत म्हणून आपण हे फक्त स्वतःसाठी ठेवलं होतं!



समाप्त
https://youtu.be/hBvdIsBmQ6g


Friday, July 16, 2021

एक red wine नातं (भाग 8)

 एक red wine नातं (भाग 8)


'ए तुझं पिल्लू बारावी झालं नं? कसे दिवस जातात कळत नाही.'

त्याचा मेसेज होता.

'न कळायला काय झालं? अलीकडे सतत अक्कल शिकवतो आहे तो मला. त्यामुळे मी मागच्या पिढीत जाऊन बसले आहे; याची जाणीव खोल मनात होते आहे.' तिने उत्तर दिलं.

'त्यालाच उद्देशून एक कविता लिहिली आहे नुकतीच. थांब पाठवते... असं म्हणून तिने नुकतीच पूर्ण केलेली कविता त्याला पाठवली.

चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!
गर गर फिरणारा भोवरा.. बनुन बघायचय मला...
भरारणारा तो पतंग- त्याची ती उंची;
वाऱ्याशी दोस्ती काटाकाटीची मस्ती...
वेगळंच जगणं अनुभवायचंय मला!
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!
Born clerk... died clerk सगळेच असतात;
वेगळा option click फ़क्त थोडेच करतात;
त्या थोड्यांमद्धे रहायचंय मला...
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!
White color job आपला फंडा नाय...
कोपऱ्यावरच्या पक्याचा रुबाबसुद्धा जमत नाय..
एक वेगळ आयुष्य जगायचंय मला...
काय अन् कसं कोणी सुचवतंय का ज़रा?

I.A.S., I. P.S. किंवा एखादा BUSINESS,
10 वि, 12 वि च्या result मूळे आई बाबा expects...
यासर्व अपेक्षांपासून दूर जायचंय मला...
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!
झटपट यश... भरपूर प्रसिद्धि...
'डी' gang ची सर्वांनाच भिती...
करू का try थोडं? चाकोरीच्या बाहेर येणं...
Visky अन् rum च्या सोबतित धुंद होणं...
कुणाशीतरी हे सगळ discuss करायचय मला..
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!

नकोच जगुस चाकोरीबद्ध...
आयुष्य जगावंच धुंद धुंद...
चल तुला करवते एक वेगळी सैर;
चाकोरीच्या बाहेर उजाडलेली जशी एकच तिमिर!
धुंद निसर्ग धुंद नशा...
Canvasवर उतरवून रंग.. बदलून टाक दिशा.
नि:शब्द गुंफा, बोलकी स्कल्पचर्स...
Archaeology मधे आहेत चाकोरी बाहेरची features...
जगाचा प्रवास कर; प्रवासाचा picture कर...
दिसणाऱ्या प्रत्येक आश्चर्याचा
मनापासून आदर कर...
हे सुद्धा वेगळच आहे; चाकोरी बाहेरचच् आहे...
तू वेगळा विचार करतोयस; यातंच आयुष्याचं गमक आहे.

कळतिये ग आई मला तुझ्या विचारांची दिशा...
चाकोरी बाहेरच्या आयुष्याच्या तिमिराची नशा...
माझ्यात सामावलेल्य़ा तुझ्या प्रतिबिम्बाला हलवणार नाही...
चाकोरी बाहेरच्या आयुष्याला
गालबोट लावणार नाही!!!

अप्रतिम लिहिलं आहेस ग. कसं सुचत असतं हे सगळं तुला?

'तू आत्ता ज्याचा पिल्लू म्हणून उल्लेख केला आहेस न... त्या गधड्या बाप्याने हे सुचायला भाग पडलंय मला...' तिने उत्तर लिहिलं आणि खदखदून हसलेले असे अनेक स्माईलीज आले आणि त्यापुढे मेसेज;

'बाप्या'

'कसले मस्त शब्द वापरतेस ग. मी माझ्या मातीपासून आणि माझ्या भाषेपासून लांब असल्याची जाणीव पुसुन टाकतेस.'

त्याचं उत्तर वाचून ती हसली.

'तू ही काही कमीचा नाहीस भन्नाट शब्द वापरण्याच्या बाबतीत.' तिचा reply होता.

'You are right. मला पण असे गमतीदार आणि वेगळे शब्द वापरायला आवडतं. आठवतं तुला? आपल्या tour नंतरच्या गणपतीमध्ये तुम्ही घरी आला होतात. तुझे मिस्टर देखील होते. त्यावेळी माझी होणारी 'साखरपुडी' देखील आली होती घरी. आई-बाबांनी आणि तिने देखील किती आपुलकीने आणि आग्रहाने आमंत्रण दिलं होतं लग्नाचं.'

'आठवतं नं! गणपतीच्या अगोदरच आपण दोन-चार वेळा भेटलो होतो. तुझी एकूणच बोलायची पद्धत मला तेव्हा कळली होती. तरीही तू ओळख करून देताना खरंच म्हणाला होतास; "ही माझी होणारी साखरपुडी आणि मग कायमची बायको." ती प्रचंड वैतागली होती आणि मी आतून इतकी फुटले होते.... पण सगळे इतके गंभीर चेहेरा करून होते की अगदी शांत सभ्य चेहेरा करून बसले मी.

आजही तो प्रसंग आठवून ती हसायला लागली होती. त्याचं लग्न विसरणं शक्यच नव्हतं तिला. नेमका नवरा कामाच्या निमित्ताने टूरला गेला होता. त्यामुळे ती लेकाला घेऊन एकटीच गेली होती. त्यावेळी गूगल मॅप अजून सुरू झाला नव्हता. लेक लहान असल्याने तिने टॅक्सी केली होती; पण हॉल असलेला तो भाग तिला अजिबात माहीत नव्हता. त्यामुळे लग्नाचा हॉल काही केल्या मिळत नव्हता. तिच्याकडे फोन नंबर तर फक्त नवरदेवाचा! त्याच्या आई-वडिलांचा नंबर कधी विचारायची वेळच आली नव्हती. आता काय करावं ते सुचेना. शेवटी तिने विचार केला तो विधींमध्ये असेल. म्हणजे फोन त्याच्या आई किंवा वडिलांकडे असेल; म्हणून मग हिम्मत करून तिने फोन लावला. समोरून फोन उचलला गेला हे लक्षात आलं आणि ती घाईघाईने म्हणाली; "सॉरी हं! तुम्ही सगळे लग्नाच्या विधींच्या गडबडीत असाल. पण मी थोडी रस्ता चुकले आहे. हॉलवर जवळची काहीतरी खूण सांगू शकाल का?"

"अग, मीच बोलतो आहे. विधी कधीच सुरू झाले आहेत. वाट पाहातो आहे तुझी. अशी कशी चुकलीस? कमाल करतेस. किमान सप्तपदीच्या वेळेपर्यंत पोहोच हं. तू हवी आहेस मला समोर."

त्याचा आवाज ऐकून तिला धक्काच बसला.

"ए वेडपट! तू काय फोन घेऊन बसला आहेस? तुझं लग्न होतंय तिथे." ती म्हणाली.

"ए तू दुप्पट! लग्न माझंच होतं आहे... तिकडे नाही इथे. पण अधून मधून फक्त मुलीचे विधी असतात म्हंटलं. ते सुरू झाले आणि मी फोन घेतला मागून तुला फोन करायला. फोन हातात घेतला आणि तुझाच कॉल आला. बरं, आता उगाच बडबड करू नकोस... किती बोलते रे बाबा ही मुलगी! ऐक.... लग्नाच्या हॉलच्या शेजारीच एक मोठ्ठं CCD आहे. तिथे नको जाऊस आयरिश कॉफी घ्यायला. हॉलवर ये. तू येईपर्यंत मी सप्तपदी टाळत राहणार आहे हे लक्षात ठेव." तो एका श्वासात सगळं बोलला आणि तो खरंच थांबेल म्हणून ती धास्तावली. ड्रायव्हरला आणि रस्त्यावरच्या लोकांना सतत प्रश्न विचारत तिने हॉल एकदाचा शोधून काढला आणि अक्षरशः पळत-पळत आत शिरली. तिला पाहून त्याने हात केला भर विधी चालू असताना. तिने देखील एकदम आनंदाने हात हलवला. पण मग एकूण गर्दीकडे नजर टाकून आपल्या आनंदाच्या उधाणाला तिने आवर घातला. त्याची सप्तपदी झाली. तिने प्रेमाने त्याच्या बायकोला मिठी मारली आणि म्हणाली; "खूप लकी आहे ग हा; तुझ्यासारखी सांभाळून घेणारी बायको मिळाली आहे त्याला. केवळ त्याच्या स्वप्नासाठी तू परदेशात जायला तयार झालीस. खरंच मोठा निर्णय आहे तुझा." तिला वाटलं होतं ती इतक्या मित्रत्वाच्या नात्याने बोलते आहे तर त्याची बायको अगदीच काही नाही तर हसेल तरी तिच्याकडे बघून. पण नव्या नवरीने नजर वर करून देखील बघितलं नाही. तिच्या मनात काहीतरी हललं... पण ती काहीच बोलली नाही. त्याच्या आई-वडिलांना भेटून त्याला न सांगताच निघाली ती हॉलवरून.

***

त्याच्या लग्नाहून ती घरी आली ते तिथल्या अनुभवामुळे अस्वस्थ होऊनच. 'नशीब नवरोबा नाहीत. नाहीतर आडून आडून प्रश्न विचारून भंडावून सोडलं असतं.' तिच्या मनात आलं. नवरा परत आला तोपर्यंत तशी ती ठीक झाली होती. पण त्याची भिरभिरती नजर सतत तिचा पाठलाग करतच होती.

शेवटी दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी तो लवकर घरी आला तेव्हा तिने त्याला समोर बसवत विचारलं; "ऑफिसमध्ये काही टेन्शन आहे का?"

"छे! नाही ग. का?" त्याने नजर चुकवत तिला विचारलं.

"मग असा लहान मुलांसारखा माझ्या मागे मागे का करतो आहेस? काहीतरी खटकतं आहे तुझ्या वागण्यातलं." तिने शांतपणे त्याला म्हटलं.

"उगाच काहीतरी डोक्यात आणू नको हं." तो म्हणाला आणि लेकाशी बोलण्याच्या निमित्ताने त्याच्या खोलीत निघून गेला.

***

दुसऱ्या दिवशी मिरा ऑफिसमध्ये पोहोचली तर तो तिच्या केबिनमध्ये अगोदरच येऊन बसला होता. तिच्या लाडक्या पेपरवेटशी खेळत होता तो. केबिनमध्ये शिरल्या शिरल्या तिने ते त्याच्या हातून काढून घेतलं आणि फक्त भुवया उडवल्या.

"तू जर फुकटचा शिष्ठपणा करून दाखवणार असलीस न तर मी जातो इथून." तो मिरावरच वैतागला.

तिने थंडपणे त्याच्याकडे बघितलं आणि आपल्या जागेवर बसत म्हणाली; "मग का थांबला आहेस? जा की."

"मीरा, तुला कळतंय मी कोणत्या परिस्थितीतून जातो आहे. तर मला समजून घ्यायचं सोडून तू हे असले थंड कटाक्ष टाकते आहेस माझ्याकडे. कमाल करतेस यार." तो अजूनच वैतागत म्हणाला.

"हे बघ, एक तर तुझा गुंता तूच सोडवायचा आहे. मी फक्त ऐकायचं काम करते आहे. कारण मी आजवर सांगितलेल्या अनेक उपायांपैकी तू एकही वापरलेला नाही आहेस." मीरा शांतपणे म्हणाली.

"तुझे उपाय? जा बायकोला विचार तुझ्या आयुष्यात माझ्या व्यतिरिक्त कोणी आहे का? हे तुझे उपाय. म्हणजे मी माझ्या लग्नाला वाचवायचा प्रयत्न करतो आहे आणि तू....." मिराने एकदम थांबण्याचा हात करत टेबलावर झुकून त्याला म्हंटलं, "हे बघ. तुझं लग्न मुळीच बुडत नाही आहे. त्यामुळे वाचवायचा प्रयत्न वगैरे म्हणणं बंद कर. मला विचार लग्न बुडणं किंवा तुटणं म्हणजे काय! दोन अनुभव आहेत गाठीशी. आता नीट ऐक. हे जे काही तुला वाटतं आहे न; तो सगळा तुझ्या मनाचा खेळ आहे. चल, एक वेळ मी मान्य करते की तिच्या आयुष्यात कोणीतरी आहे. मग? परत एकदा सांगते; एकतर तिला स्पष्ट विचार नाहीतर सोडून दे विषय. याचा परिणाम फक्त आणि फक्त तुझ्यावर होणार आहे. तू तुला काही विचारत नाही तोपर्यंत ती तिच्या जगात खुश आहे; आणि तू माझ्या समोर हे असला 'दर्दभरा चेहेरा घेतोस तोपर्यंतच मी या विषयात आहे. कळलं?"

मिराचं बोलणं ऐकून त्याचं समाधान झालं नाही; पण नेहेमीप्रमाणे मन थोडं मोकळं झालं आणि तो उठून त्याच्या केबिनमध्ये गेला.

***

ती घरात डस्टिंग करत फिरत होती आणि तिचा मोबाईल वाजला;

'न जेवता निघालीस न तू लग्नातून?'

लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी त्याचा मेसेज आला तो एकदम हाच.

'अहं! अगदी नीट जेवले होते. पण आता माझा सासरा बनू नकोस हं काय काय खाल्लंस ते सांग म्हणत.' तिने उत्तर दिलं; आणि खुदकन हसली. मात्र त्याच्याकडून काहीच मेसेज नाही आला. एकदा तिच्या मानत आलं होतं की परत मेसेज करावा... पण आता तिने स्वतःला थांबवलं.

'त्याचं लग्न झालंय. नव्याची नवलाई आहे सगळी. असा अचानक मेसेज नको करायला. अजून त्याच्या बायकोचा अंदाज नाही आलेला.'

तिने विचार केला.... आणि तरीही तिला माहीत होतं की तिचा हा मनातला विचार देखील खरा नाही. काहीतरी चुकलं आहे किंवा चुकतं आहे. त्याच्या बायकोचं ते 'तुला बघून मला फार आनंद झालेला नाही'; हे न बोलता दाखवणं तिच्या आंतर्मनाला जाणवलं होतं.

म्हणूनच तिने अगदी ठरवून स्वतःहून मेसेज करणं बंद केलं होतं. त्याच्या देखील ते लक्षात आलं होतं; पण त्याला ते स्वीकारायचं नव्हतं.

***

'बायकोची मंगळागौर आहे. तू आलंच पाहिजेस.'

त्याचा मेसेज वाचून ती गोंधळली.

'अरे मंगळागौर श्रावणात असते. काहीतरी काय बोलत असतोस तू?'

तिने उत्तर पाठवलं.

'माहीत आहे ग. पण आम्ही नसू न श्रावणात. तोपर्यंत न्यूझीलंडवासी झालेले असू आम्ही. पण आमच्याकडचे सगळेच हौशी आहेत. त्यामुळे एक रात्र जागवून-खेळून घ्यायचा विचार आहे. तसा तुला आईचा फोन येईलच. पण मी आपलं सांगून ठेवतो आहे. मला माहीत आहे तुला सगळे खेळ येत असतील. ये नक्की.'

तिने त्याला काहीच उत्तर दिलं नाही. खरंच तिला मंगळागौर खेळायला खूप आवडायचं. तिच्या लग्नानंतरच्या पाचही वर्षांच्या मंगळागौरी तिने जागवल्या होत्या. इतर मैत्रिणींकडून देखील तिला आग्रहाचं आमंत्रण असायचं. तिने घातलेला कोंबडा, गाठोडं जोरदार असायचं. तिच्या सोबत होडी करायला सगळ्याच उत्सुक असायच्या.

तिचं काहीच उत्तर येत नाही बघून त्याने परत मेसेज केला.

'येशील न?'

आता मात्र तिला त्याची चेष्टाचा करायचा मूड आला.

'हो मंगळागौरीला येते. पण मग तुझी बायको वटपौर्णिमा पण त्याअगोदर करणार असेल न? त्याचं आमंत्रण नाही का मला?'

तिच्या त्या मेसेजने तो एकदम गोंधळून गेला.

'तुला नक्की काय म्हणायचं आहे? अग, वटपौर्णिमा तर ती तिकडे पण करू शकते न? म्हणजे अगदी वडाचं झाड नाही मिळालं तरी फक्त उपास करूच शकेल; किंवा आमच्या मातोश्री तिला एक फांदी कुरियर करतील.' असं म्हणून त्याने हसणारे स्मायली पाठवले.

खरं तर त्याचं उत्तर अगदी साधंसं होतं. पण का कोणजाणे तिचा पारा एकदम चढला. एक दीर्घ श्वास घेत तिने मेसेज टाईप करायला घेतला.

'म्हणजे तुझी इच्छा आहे की तिने वडाची पूजा करावी तुझ्यासाठी. तूच पति असावास पुढील सात जन्म म्हणून? पटतं का रे तुला हे सगळं? मला मान्य आहे की तुझा प्रेम विवाह आहे... माझा देखील. पण तरीही याच पुरुषासोबत या जन्मी वर्षानुवर्षं राहिल्यानंतर; मला तर बुवा चॉईस. पण तरीही जर चॉईस नाहीच मिळाला तर मात्र पुढच्या जन्मी मी नवरा आणि तो बायको.... विनोदाचा भाग सोड! पण खरंच तुला पटतं का हे असं वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून घरी आणून त्याची पूजा करणं? अरे सत्यवान-सावित्रीच्या मूळ कथेमध्ये सत्यवानाला लहानपणापासून फिट्स येत होत्या. हे सत्य सावित्रीला माहीत होतं; तरीही तिने लग्न केलं. सत्य माहीत असूनही अशा मुलाशी तिने लग्न केलं याचा अर्थ तिला स्वतःविषयी विश्वास होता की त्याच्या फिट्स वरचा उपाय ती शोधू शकते. अशीच कोणतीतरी फिट आली असेल त्याला लाकडं तोडायला जंगलात गेला असताना. तुला एक शास्त्रीय सत्य माहीत आहे का? वडाचं झाड चोवीस तास ऑक्सिजन देतं. त्याला फिट आल्याचं कळल्यावर कदाचित तिने त्याला वडाच्या झाडांच्या जंगलात नेलं असेल; कारण तिला माहीत असेल की त्याच्या फिट्सवर उपाय एकच आहे की जास्त प्रमाणात सतत त्याला प्राणवायू मिळायला हवा. वडाच्या झाडांच्या जंगलात त्याला सतत आणि अत्यंत शुद्ध प्राणवायू मिळाला असेल आणि त्याला परत जाग आली असेल. हा उपाय लक्षात आल्यानंतर त्यांनी वडाच्या झाडांच्या जंगलाजवळच राहाणं पसंत केलं असेल; आणि म्हणून तो जगला असेल..... या शास्त्रीय कारणांचा विचार न करता हे काय रे वडसवित्री आणि वडपौर्णिमा पूजन-उपास घेऊन बसलास?'

तिचा तो एवढा मोठा मेसेज वाचून तो एकदम गडबडला.

'अग, एकदम इतकी का चिडते आहेस? माझ्या बायकोने वडपौर्णिमेचा उपास करावा आणि वडाची पूजा करावी असं माझं मुळीच म्हणणं नाही. उलट मी तर म्हणतो याच जन्मी सात वर्षांनी आपण बदलून टाकावा नवरा.'

त्याचा मेसेज बघून अचानक चढलेला तिचा पारा एकदम खाली उतरला आणि 'गप रे...' म्हणत तिने 'bye' म्हणत फोन बंद केला.

त्याच्या आईचा फोन आला आणि तिने जायचं कबूल देखील केलं. पण ती खेळणार नव्हती. 'रात्री उशीर नाही जमणार... लेक लहान आहे'; हे कारण देऊन लवकर निघणार होती... ठरवलंच होतं तिने.

ती हॉलवर पोहोचली. तिचा चेहेरा अगदी शांत होता. एरवी तो असताना ओसंडून वाहणारा उत्साह एकदम गायब होता. त्याची बायको समोरून आली आणि अगदी आपलेपणाने बोलली. हात धरून तिला आत नेलं. पण तरीही ती शांतच होती. गंम्मत म्हणजे पुरुष मंडळी देखील होती तिथेच. थोडावेळ गप्पा झाल्या आणि सगळ्या उठल्या खेळायला. त्याची आई आली तिला बोलवायला. पण ती म्हणाली; "मला फारसं खेळता येत नाही." मग त्यांनी देखील फार आग्रह नाही केला. सगळे खेळ चालू होते आणि ती आतून दाटून येणारी उर्मी चेहेऱ्यावर दिसू न देण्याचा खेळ स्वतःशीच खेळत बसली होती. काही वेळाने सगळ्यांचा उत्साह ओसरला आणि नेहेमी प्रमाणे भेंड्या सुरू झाल्या. तसे रात्रीचे दहा वाजत आले होते. ती उठली आणि त्याच्या आईचा आणि बायकोचा निरोप घेऊन निघाली. तिला थांबण्याचा आग्रह झाला नाही; याचं मनातून तिला हायसंच वाटलं होतं. तो तसा हॉलच्या आतच आजूबाजूला हुंदडत होता मित्रांसोबत. त्याला फक्त तिने हात केला लांबूनच.

***

'मुद्दाम खेळली नाहीस न?'

ती अजून घरी पोहोचली देखील नव्हती आणि तिच्या फोनने वाजायला सुरवात केली.

'अरे मला येत नाही फारसं खेळायला. त्यात माझं पिल्लू लहान आहे म्हंटलं. घरी वेळेत गेलेलं बरं म्हणून निघाले.' तिने शांतपणे उत्तर दिलं.

तिला उत्तरादाखल दोन फोटो आले. एक ती कोपऱ्यात बसली होती पण पूर्ण गुंतलेली होती समोर चाललेल्या खेळात. दुसरा फोटो............. तिने मुडपून गच्च धरलेली पायाची बोटं होती. टॅक्सिच्या खिडकीबाहेर नजर वळवत ती घर यायची वाट बघायला लागली.

***

'बोलणार आहेस का?' काही दिवसांनी त्याचा मेसेज आला.

'या विषयावर आत्ता एकदा आणि शेवटचंच. चालणार असेल तरच बोलते.' तिने उत्तर दिलं.

'जशी तुमची मर्जी राणी सरकार.'

'हे बघ.... तुला मी आवडते आणि मला तू. आपली मैत्री आहे का? हो आहे! मैत्रीच्या पुढे काही आहे का? हो आहे! मग त्याला प्रेम म्हणायचं का? हो म्हणायचं! पण त्याचं कारण मैत्रीच्या पुढे आणि रूढार्थाने 'प्रेम' असतं त्याच्या अलीकडे असं काहीतरी नातं असतं... पण त्याला अजून नाव नाही. शब्दातीत आहेत या भावना... पण म्हणूनच समजून घ्यायला अवघड. तुझ्या घरच्यांनी आणि माझ्या नवऱ्याने त्या समजून घ्याव्यात ही मनापासून इच्छा करू शकतो आपण. पण जबरदस्ती नाही! समोरून स्वतःहुन तर मी स्पष्टीकरण कधीच देणार नाही. त्यामुळे तुझ्या बायकोने मला स्वीकारावं हा प्रयत्न तू बंद कर.'

'हम्म!' त्याचं उत्तर. पण थोड्यावेळाने एक गाणं आलं तिच्या मेसेजमध्ये.

https://youtu.be/doPtBhDTpj0

गाणं ऐकताना तिचं मन जड झालं होतं. गाणं संपलं आणि तिने एक जड निःश्वास सोडला.

.....आणि मग त्यानंतर त्या दोघांमध्ये तिच्या किंवा त्याच्या घरच्यांचा विषय नाही निघाला. घरी होणारे गमतीदार - चांगले - वाईट प्रसंग सांगितले जायचे एकमेकांना. पण ते सगळं बोलण्याच्या ओघातला भाग असायचं. बोलण्याचा मुख्य विषय तो नसायचा. मुळात त्यांच्याकडे इतके सुंदर आणि वेगवेगळे विषय होते बोलायला की घरचे आणि त्यांची यांच्या बद्दलची मतं हा विषय कधीच मागे पडून गेला होता.

***

त्याची प्रत्येक भारत भेट खास व्हायला लागली होती तिच्या सोबत. वर्षातून दोन किंवा तीन दिवस... फार तर दोन किंवा तीन तास भेटायचं! पण तरीही त्यांच्यातलं प्रेम फुलत होतं. हो 'प्रेम'च होतं ते. पण स्पष्टीकरण द्यावं लागेल असं प्रेम नाही!

त्याच प्रेमाचा पुढचा टप्पा होता का तो? तिला त्याचा एक मेल आला.... फक्त तिच्याचसाठी लिहिलेला....

दिवस, महिने... वर्षे सरली,
तशीच ओढ तरी का मज तुझ्या भेटीची?
नेहेमीच होते मन अधीर भेटण्यास तुला;
जाते चुकवून हळूच काळजाचा ठोका.
दिसताच तू वाटे धडधड अनामिक,
बोलायाचे असे बरेच,पण शब्दच हरवतात,
असे परंतु काही जादू तुझ्या स्पर्शात,
मज जाणवले ते प्रत्येक क्षणात.
घेताच मी हात तुझा माझ्या हाती,
होते शांत काहूर उठले जे मनात.....

तिने मेल वाचली आणि ती हसली... डोळ्यात अश्रू तरळले होते का दोन? फक्त त्याच्यासाठी? कुणास ठाऊक!

तिने त्याला फक्त 'मस्त' इतकाच रिप्लाय केला. अन् पुरेसा होता तो त्याला. एक मंद स्मित होतं त्याच्या चेहेऱ्यावर तिचा तो एक शब्दाचा मेल वाचताना.

***

दिवस... महिने सरकत होती. कधीतरी तो एकदम ओसंडून जायचा... मग सतत मेसेज असायचे त्याचे. कधी तिची तारांबळ व्हायची उत्तरं देताना. तर कधी त्याच मौन समजून घेणं अवघड व्हायचं. मग त्या प्रत्येक वेळी तिची एक कविता असायची.

असे बरेच दिवस गेले होते... त्याने स्वतःहून मेसेज केला नव्हता. ती देखील संसारात रमली होती. पण तरीही आठवण जागत होती. एकदिवस कॉफी पिता पिता तिला काहीतरी सुचलं आणि लगेच तिने ते त्याला पाठवलं...


कॉफ़ीत एक नशा असते...
ती कधी एकट्याने.. तर कधी दुकट्याने..
अनुभवायची असते..
नशा काही कॉफ़ीची नसते..
ती सोबतिच्या भावनेची असते..
एकटेपणातही नशेची company असते...
ती कधी खोल गर्तेत नेते..
दुकटेपणात romance ची सोबत असते...
romantic नशेची धुंदी कॉफ़ीत असते...


मोजक्या गप्पा, business deals;
कॉफ़ी च्या टेबलावरची अनेक thrills...
गरमा-गरम गप्पांची वाफाळती कॉफ़ी,
हळुवार नजरांची बर्फाळती कॉफ़ी...
प्रेमाच्या आणा-भाका; कुटुंबांची बैठक
कॉफ़ी च्या टेबलाची अशीही एक रौनक!
सोबत कॉफ़ीची वाट पहातानाची....
खूप कामानंतरच्या निवांत क्षणाची!


कधी सुरु झाली ही कॉफ़ी संस्कृति?
कळत-नकळत झाली आपल्यात sink ती...
टपरीच्या चहाची इज्जत भारी;
पण कॉफ़ी च्या टेबलाने आणली नजाकत न्यारी!

खुश होती ती तिच्या त्या कॉफीवर. आणि त्याच्या उत्तराने तर मोरपीस फुललं तिच्या मनावर!

'माझी आयरिश ती!'

'ए! तुला माहीत आहे आपण जी आयरिश पितो न तो फक्त फ्लेवर आहे. खरी आयरिश इथे प्यायलो मी. तशी खरी आयरिश तुझ्यासोबत घ्यायची आहे. ए! लगेच लेक्चर नको. मुंबईमध्येच घ्यायची! ताज!!! बांद्रा!!! एकदा नक्की...'

***

आणि एकदिवस अचानक त्याचा मेल आला...

मी घोळ घालून ठेवला आहे. माझ्या बायकोने तुझे माझे whatsaap वरचे chats बघितले. तसं मी नेहेमी डिलीट करतो ग. पण काल राहिलं आणि तिने माझा फोन हाताळताना तुझ नाव वाचून आपलं chat उघडलं आणि बघितलं. आपल्या साध्याच गप्पा होत्या नेहेमी प्रमाणे. पण मी तुझा उल्लेख 'राणी', 'सोन्या', 'डार्लिंग' असा केलेला तिने बघितला आणि मग घरात तिसरं महायुद्ध झालं. तिने लगेच आई-बाबांना फोन करून सांगितलं. त्यांना हे माहित आहे की आपण अधून मधून बोलतो; पण तरीही त्यांना देखील या असल्या गप्पा पटल्या नाहीत. त्याचं देखील बरोबर आहे न; आपली जी आणि जशी मैत्री आहे ती सहसा कोणाला पटणार नाही. म्हणून त्यांच्या समाधानासाठी तुला एक whatsaap मेसेज करोतो आहे.

आणि त्याचा whatsaap वरचा मेसेज होता.....

आपल्यामध्ये जी काही मैत्री or जे काही होतं ते सगळं मी थांबवतो आहे. ह्या पुढे मी तुला कुठलाही मेसेज, chat or इतर काहीही contact करणार नाही. good bye

तिला धक्का बसला.... पण क्षणभरात तिने स्वतःला सावरलं आणि त्याच्या मेसेजला उत्तर लिहीलं.....

जे काही होतं? अरे आपली एक चांगली healthy मैत्री आहे. किंवा होती म्हणू. हे अचानक काय आलं? पण ठीके! नाही बोलायचं तर नको. तू माझ्याशी किंवा मी तुझ्याशी न बोलल्यामुळे आपलं आयुष्य थांबणार नाही आहे. किंवा बोलल्यामुळे आयुष्य वेगळं देखील होणार नाही आहे. मुळात आपण असं किती बोलतो रे; की बोलणं थांबवायचा मेसेज तू करोत आहेस? एक लक्षात घे मी एक सुखी सांसारिक स्त्री आहे. तुझे आई-वडील आणि माझा नवरा एकमेकांशी का comfortable होऊ शकले नाहीत ते मला माहित नाही. त्यामुळे माझं देखील तुझ्या आई-वडिलांशी बोलण थांबलं... पण असं का झालं ते मी त्यांना देखील कधी विचारलं नाही. बरं; थट्टा, मस्करी, गप्पा याव्यातीरिक्त आपण नक्की काय बोलतो रे की तू म्हणावस की जे काही होतं? अरे माझा मुलगा आणि नवरा देखील माझा मोबाईल हाताळतात आणि माझी त्याबद्दल काही हरकत देखील नाही. ते दोघे फोन घेतात म्हणून मी कधी तुझे मेसेज डिलीट नाही करत. तुझा हा मेसेज बघून त्यांचा काही गैरसमज होऊ शकतो ना. किमान १० वेळा विचार करायचास की रे मेसेज करताना. बरं; फक्त तुझ्या माहितीसाठी सांगते आहे... मी हे मेसेज पण डिलीट नाही करणार. जर त्यांनी बघितले आणि काही विचारलं तर मी स्पष्ट सांगीन की आम्ही बोलायचो.. आणि त्याने असा अचानक हा मेसेज का पाठवला त्याचं त्याला माहित. तुला माझी बाजू सांगणं मला गरजेचं वाटलं म्हणून हा मेसेज करते आहे. good bye

तिने whatsaap बंद केला आणि तशीच स्वस्थ बसून राहिली. तिला फार वाट बघायची गरजच नव्हती. मेल आल्याचं तिच्या मोबाईलने लगेच ओरडून सांगितलं तिला. तिने हसतच inbox उघडलं.

अग हा काय मेसेज केलास? मी फक्त त्यांच्या समाधानासाठी मेसेज करतो आहे असा मेल केला होता तो बघितला नाहीस का? रागावली आहेस का राणी? खरंच बोलायचं नाही का आपण आता? अर्थात तू अस ठरवलं असलंस तर तुझं देखील बरोबर आहे म्हणा. हे असं खोटं बोलून नाव नसलेलं नात जर तुला पटत नसेल तर मी तुला काहीच प्रश्न नाही विचारणार.

ती हसली. मात्र त्याचा उतरलेला चेहेरा तिच्या डोळ्यासमोर आला आणि तिने घाईघाईने रिप्लाय केला.

वेडा आहेस तू अगदी. माझ्या मेसेजने तू जर गडबडला आहेस तर नक्कीच त्याचा योग्य तो परिणाम इतरांवर झाला असेल न? मला कळतं रे; की नाही पटणार तुझ्या घरच्यांना हे असं आपलं बोलणं. ही मैत्री स्वीकारणं अवघड आहे सगळ्यांना. तो मेसेज करताना देखील मला मनातून वाटत होतं की खरं तर हे असं काहीतरी एक बोलायचं आणि वेगळंच वागायचं मला पटत नाही. तसा माझा काय आणि तुझा काय स्वभाव नाही. पण कोणालाही काहीतरी सिद्ध करून दाखवण्यापेक्षा.... आणि काय पटतं आहे किंवा नाही याहीपेक्षा तुझं माझ्या आयुष्यात असणं मला जास्त महत्वाचं वाटतं. तुझं मन देखील हेच सांगतं आहे तुला याची मला खात्री आहे. त्यामुळे आता फार विचार करू नकोस. झालं गेलं संपलं ते सगळं. बस! आता मात्र काळजी घे.

तिचा मेल वाचून तो विसावला आणि मग त्याचं उत्तर आलं तिच्या मेलला....

आठवतं का ग असंच एकदा आपण गप्पा मारत होतो; तेव्हा कधीतरी मी तुला विचरलं होतं 'काय नाव द्यावं आपल्या या नात्याला?' आणि तू म्हणाली होतीस 'या नात्याला नाव नको देऊया.' पण आत्ता माझ्या मूर्खपणामुळे ज्या काही घटना घडल्या आणि तू मला सावरून घेतलंस.... आणि त्याहूनही जास्त महत्वाचं म्हणजे... तू का सावरून घेतलंस याचं कारण सांगितलंस आणि मनात आलं खरंच काही नाव का नसावं ह्या नात्याला? किंवा काय नाव देता येईल ह्या नात्याला? तसं आपल्या सामाजिक परिस्थितीत आपलं हे नातं कुठेच बसत नाही. म्हणजे 'खूप चांगली मैत्री'च्या बरंच पुढे 'girlfriend - boyfriend' च्या देखील पुढे गेलंय हे नातं. तरीही अस्तित्वात असलेल्या कोणत्याही नात्यापर्यंत पोहोचू न शकणारं असं हे विलक्षण साधंसं आणि तरीही गुंतागुंतीचं........ भावनिक आणि तरीही सुंदर........... नातं आहे हे. मग मनात विचार आला ह्या विलक्षण नात्याला नाव देखील तेवढंच विलक्षण हवं. नाव असावंच असं नाही, पण काय आहे न आपलं दोघांचं हे नातं खरंच खूप सुंदर आहे. इतकी वर्ष होऊनही तेवढंच जिवंत आणि तरुण आहे. ना कधी भांडण ना वाद... हा; एखादा विषय पटला नाही तर चर्चा होतेच की आपल्यात.... तू तुझा मुद्दा सोडत नाहीस आणि मी माझा... पण ते तेवढ्या पुरतंच असतं; आणि दोघांनाही त्याची पूर्ण जाणीव असते. एक वेगळीच समज आहे या नात्याला. मग अशा या नात्याला नाव पण तसंच हवं न.

विचार करताना मनात आलं एक नाव.... red wine नातं! रुढार्थाने कोणत्याही नात्याच्या अटींमध्ये न बसणारं आणि एकमेव असं हे नातं आहे. आता जर हे नाव मी देतो आहे तर त्याचं कारण देखील तुला सांगितलं पाहिजे न.... हेच नाव का ते सांगू?

एकतर; red wine आपल्याला दोघांना आवडते. बर wine घ्यायला काळ वेळ लागत नाही. तरीही जेव्हा wine घेतली जाते ती वेळ खास असते. आपलं पण असंच आहे न... केव्हाही आणि कुठेही भेटलो तरी ती जागा आणि ती वेळ खास होते. red wine मध्ये एकूणच elegance आहे, नाजुकपणा आहे. wine घेताना ती कधीच संपू नये असं सारखं वाटत असतं. तसंच आपल्या नात्यात आहे. एक elegance आहे... एक नाजुकपणा आहे आपल्या नात्यात..... आणि भेटलो की ती भेट संपूच नये असं वाटतं. बियर म्हंटलं की विजय मल्ल्याची किंगफिशर आणि त्याची जाहिरात करणाऱ्या अल्पवस्त्रांकित ललना डोळ्यासमोर येतात. त्यामुळे तू आणि बीअर असा विचार कधी मनाला नाही शिवला. red wineचं तसं नाही. red wine म्हंटलं की एक शांत संध्याकाळ.... मावळतीचा सूर्य किंवा एखादी पौर्णिमेची रात्र आठवते. समोर अथांग समुद्र... जो आपल्याला दोघांना आवडतो.... आणि माझ्या शेजारी संपूर्ण पांढऱ्या शुभ्र ड्रेस मध्ये केस मोकळे सोडून बसलेली तूच आठवतेस. अजून एक कारण हेच नाव देण्याचं. red wine चा लाल रंग; तू असलीस की सगळं कसं गुलाबी होतं न... हा गुलाबी रंग पण त्या लाल रंगात मुरला आहे. एक अजून, red wine ची चव बराच वेळ रेंगाळते.... तुझ्या आठवणी सारखी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे wine ला expairy date नसते.... उलट ती जितकी जुनी तेवढीच तिची चव मुरते.... तिचा elegance वाढतो आणि रंग गहिरा होत जातो.

राणी; आज या नात्याला नाव देताना मनातून समाधान वाटतं आहे.... खूप काहीतरी शांत झालं आहे मनात. माझं माझ्या आयुष्यावर.... आई-बाबांवर आणि बायकोवर जितकं प्रेम आहे न तितकंच ते तुझ्यावर देखील आहे.... हे 'red wine' नातं खूप खूप खास आहे माझ्यासाठी............. अहं................. आपल्यासाठी!!!

क्रमशः


Friday, July 9, 2021

एक red wine नातं (भाग 7)

 एक red wine नातं (भाग 7)


तिचा लेक आता दहावीत गेला होता; त्यामुळे तिच्यावर बाहेर पडण्याच्या बाबतीत बंधनं आली होती. लेकाचा अभ्यास, शाळेच्या-क्लासच्या वेळा, त्याच्या वाढत्या भुकेची तंत्र... ती अगदी मनापासून जपत होती. लेक मोठा होत असताना तिच्याही नकळत तिने त्याच्या सोबत आई पासून मैत्रिणीपर्यंतचा प्रवास केला होता. त्यामुळे आता त्याला अभ्यास करण्यासाठी रागवावं लागत नव्हतं. प्रिलिंम झाली आणि त्याचा रिझल्ट देखील आला. प्रिलिंम्समध्येच त्याने झक्कास मार्क मिळवले होते. त्यामुळे ती एकदम खुश होती. त्याच दिवशी रात्री तिला मेसेज आला.

'मी येतो आहे. परवाचं फ्लाईट आहे. पोहोचलो की फोन करतोच.'

त्याचा तो मेसेज बघून ती मनातून एकदम सुखावून गेली. पण दुसऱ्याच क्षणी तिच्या मनात आलं; त्याला भेटता येईल न आपल्याला? लेकाच्या वेळा सांभाळत काहीतरी प्लॅन करावा लागेल. पूर्वी ठीक होत सुजाता होती सांभाळून घ्यायला. आताही ती सगळं करायला तयार होईल; पण अभ्यासाचं कारण देऊन हा मुळीच जाणार नाही कुठेही. माझं मी बघीन; तू जा; म्हणेल. बराचवेळ विचार करत बसली होती ती. पण मग अति आणि आत्ता विचार करून काहीही होणार नाही; हे लक्षात येऊन तिने तो विषय सोडला. 'तेव्हाचं तेव्हा बघू.' तिने ठरवलं.

***

दोन दिवसांनी सकाळी ती उठली आणि नेहेमीप्रमाणे कामाला लागली. पण मनातली आवर्तनं तिला अस्वस्थ करत होती. 'पहाटेच उतरला असेल. म्हणजे आत्ता झोपला असेल. तसंही घरी त्याचे आई-बाबा, सासू-सासरे सगळेच जमले असतील. एवढ्यात तो बाहेर पडणं शक्यच नाही आणि फोन देखील करता येणार नाही त्याला.' तिच्या मनातले विचार बहुतेक तिच्या चेहेऱ्यावर दिसत होते. ती टेबलावर पोह्यांची कढई ठेवत होती त्यावेळी नवऱ्याने विचारलंच; "बरं नाही का ग तुला?"

"बरंय की. का रे?" तिने त्याच्याकडे न बघता त्याची प्लेट भरत म्हंटलं.

"अस्वस्थ वाटते आहेस; तर म्हंटलं विचारावं काही हवंय का? किंवा हरवलंय का!" तिच्याकडे एकटक बघत तो म्हणाला. त्यावर हलकंस हसत तिने नकारार्थी मान हलवली आणि परत स्वयंपाक घरात गेली. खरं तर आत काम असं काही नव्हतं. पण त्याच्या सोबत बसणं तिला टाळायचं होतं. कसं कोण जाणे पण नवऱ्याच्या ते लक्षात आलं बहुतेक. आतल्या दिशेने बघत तो म्हणाला; "ये ग लवकर. थांबलोय मी. पोहे गार होत आहेत." आत उगाच खुडबुड करणाऱ्या तिला खुदकन हसायलाच आलं.

'हा कधीच स्पष्ट काही विचारत का नाही मला? त्याने विचारलं तर मी सांगणार नाही का?' तिने मानेला एक झटका दिला आणि मनातले विचार मागे ढकलत ती बाहेर त्याच्या सोबत येऊन बसली.

आत गेलेली 'ती' आणि बाहेर आलेली 'बायको' हा फरक त्याच्या लक्षात आला. तो मनातल्या मनात अस्वस्थ झाला. पण मग काही एक न बोलता ब्रेकफास्ट करून निघाला.

नवऱ्याच्या चेहेऱ्यावरचे भाव आठवून तिला परत एकदा हसायला आलं. 'अगदी असाच अस्वस्थ झाला होता हा; जेव्हा तो पहिल्यांदा आला होता भारतात. याचा अर्थ माझ्या चेहेऱ्यावर देखील तेच ते पहिल्यांदा तो आला होता तेव्हाचे अस्वस्थ भाव असतील. तिच्या मनात आलं.'

....तो पहिल्यांदा परत आला तेव्हा....

नेहेमीप्रमाणे हातातली खाण्याची प्लेट बाजूला सारत ती सोफ्यावर जाऊन बसली.

***

आज तिच्या नवऱ्याचं एक महत्वाचं प्रेसेंटशन होतं ऑफिसमध्ये. त्यामुळे तिच्या मनात काहीतरी चालू आहे हे लक्षात येऊन देखील तो जास्त काही बोलला नाही. खरं तर त्याला ती एक-एकदा कळायचीच नाही. त्याला माहीत होतं तिचं त्याच्यावर, लेकावर खूप प्रेम होतं. पण कधीतरी अचानक स्वतःच्याच तंद्रीत जायची. मग ती सोबत असूनही नसल्यासारखा फील यायचा त्याला. तिचं कधीतरी ते रात्री मेसेज करणं आणि सकाळी डोळे उघडल्या क्षणी मोबाईल हातात घेणं त्याला पटायचं नाही. तिच्या नकळत त्याने तिचा फोन चेक करण्यासाठी हातात घेतला देखील होता; पण मग का कोण जाणे परत ठेऊन दिला होता. तिच्यावर संशय घ्यावा असं काहीच वागायची नाही ती.... एक ते फोन मधले मेसेज प्रकरण सोडलं तर. मग उगाच आपल्या मनातल्या संशयापाई तिला दुखवायचं नव्हतं त्याला.

तो ऑफिसमध्ये पोहोचला पण मन स्वस्थ नव्हतं. मीटिंग नीट पार पडली. त्याचं प्रेसेंटशन देखील मान्य झालं. एक निःश्वास टाकत त्याने कॉफी घेतली आणि ऑफिसच्या मागच्या smoing zone मध्ये येऊन उभा राहिला.

"परत तेच ते विचार आहेत न तुझ्या मानत?" मागून मीराचा आवाज आला आणि मागे वळून बघत काही न बोलता त्याने कॉफीचा मग वर केला. मीरा त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली आणि तिने सिगरेट काढून शिलकवली.

"मीरा, तुझं नाव आणि तुझ्या कृती किती विसंगत आहेत ग." त्याने तिच्या सिगरेटकडे बघत म्हंटलं.

"नाम मे क्या रखा हें? बरं, माझं सोड. तू बोल. परत तेच ते विचार न?" मिराने मोठा झुरका घेत त्याला विचारलं.

"काय करू ग? मला तिच्या माझ्यावरच्या प्रेमाबद्दल काडी इतका देखील संशय नाही. सगळंच कसं व्यवस्थित आहे. पण तरीही कधीतरी ती हरवून गेल्यासारखी वाटते." तो दूर नजर लावत म्हणाला.

"How's your performance in the bed?" मिराने त्याला कोपराने टोचत विचारलं.

तिच्याकडे वैतागून बघत तो म्हणाला;"shut up मीरा."

ती हसत आणि खांदे उडवत "OK" म्हणाली.

दोघेही काही वेळ शांत होते. मग मिरानेच परत विषयाला सुरवात केली; "अरे यार, किती वेळा सांगितलं तुला; सरळ विचारून टाक तिला. बाई तुझ्या आयुष्यात कोणी आहे का? किंवा माझ्या सोबत समाधानी आहेस का?"

"अग, पण ती असमाधानी नाहीच वाटत. तुला कसं सांगू तेच कळत नाही मला. तिच्या आयुष्यात कोणी आहे का... हा प्रश्न नाही सतावत मला. वाईट वाटतं की जर तसा कोणी असलाच तर तो मी नाही!" तो मिराकडे वळत म्हणाला.

त्याच्याकडे एक शांत कटाक्ष टाकत मीरा म्हणाली; "हम्म! मला कळतंय तुला नक्की काय म्हणायचं आहे. यावरचा उपाय एकच आहे; एक तर तू तिला स्पष्ट विचार किंवा stop thinking about it. एक लक्षात ठेव; आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक ग्रे एरिया असतो. तो ज्याचा त्याला जपू द्यावा."

अजूनही त्याच्या चेहेऱ्यावरचा अस्वस्थ भाव गेला नव्हता हे मिराच्या लक्षात आलं. त्याने मिराकडे पाठ वळवली आणि परत ऑफिसमध्ये शिरत होता; तेव्हा तिने त्याला हाक मारली आणि मिश्कीलपणे विचारलं; "मग? विचारणार आहेस का आजच?"

तिच्याकडे वैतागलेल्या नजरेने बघत तो हसला आणि म्हणाला; "मीरा, तेरा कूच नही हो सकता." आणि हसत हसत तिथून निघाला.

***

तिने सोफ्यावर बसत त्या दिवशीचं वर्तमानपत्र हातात घेतलं; पण मन कधीच त्याच्या पहिल्या परतीच्या भेटीत गुंतलं होतं. असाच मेसेज होता...

'मी येतो आहे... तुला भेटायला अगदी अधीर झालो आहे. आलो की दोन-चार दिवसात फोन करतो. काहीतरी मस्त प्लॅन करून ठेवशील न? बरोबर एक महिन्याने येतो आहे मी. सत्तावीस जानेवारीला पोहोचेन. तो पूर्ण दिवस घरी. मग सासुरवाडी. मग मित्र. हे सगळे सोपस्कार पूर्ण केल्याशिवाय तुला भेटता येणार नाही. कारण माझं मन जरी आपल्या नात्याच्या बाबतीत तुझ्या इतकंच स्पष्ट असलं तरी माझ्या घरचे समजून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचं समाधान झालं की मग भेटणार आहे मी तुला.'

त्याचा मेसेज वाचून परीक्षा संपल्यावर धावत येऊन वडा-पावचा हट्ट करणाऱ्या लेकाचा चेहेरा तिला आठवला आणि खुदकन हसली ती.

'ए इतकं मोठं स्पष्टीकरण देण्याची खरंच गरज आहे का? तू येतो आहेस आणि मला भेटणार आहेस... खूप आहे इतकंच माझ्यासाठी.' तिने त्याला उत्तर लिहिलं होतं.

तो आल्यानंतर तीन दिवसांनी तिच्या मोबाईलमध्ये मेसेज आला होता.

'दोघेही एकाच वेळेच्या मर्यादेत आलो आहोत; हा विचार देखील किती सुखावह आहे ग. बरं, बोल... कधी? कुठे?"

'चर्चगेट स्टेशन? साधारण अकरा वाजता दोन नंबर प्लॅटफॉर्म! ledies डब्ब्या जवळ.' तिने त्याला लिहिलं.

'पोहोचलोसुद्धा.' त्याचं उत्तर आलं आणि ती मनापासून हसली.

***

लेकाने जर्मन भाषा शिकायचं ठरवलं होतं. तिला देखील त्याचा तो निर्णय पटला होता. चर्चगेटच्या मॅक्समोलर इन्स्टिट्यूटमध्ये त्यासंदर्भातली माहिती आणि फॉर्म्स घेण्यासाठी तिला चर्चगेटला जायचंच होतं. काम पटकन उरकून ती स्टेशनवर येऊन बसली होती. त्याची वाट बघत. तो तिला दिसला. धावली ती. त्याला मिठी मारून मनापासून हसली. क्षणभर तो गोंधळाला. पण मग स्टेशन गुलाबी झालं.

"आता यापुढे तुला जेव्हा जेव्हा भेटेन आणि जिथे जिथे भेटेन ती जागा गुलाबी होऊन जाणार बघ." ती मिठी सोडून लांब झाली तसं तो म्हणाला. ती गालात हसली आणि दोघे निघाले. स्टेशन बाहेर आल्यावर त्याने विचारलं; "मग कुठे?" आणि तिने हसत डोळा मारला.

एकदम पाय आपटत तो म्हणाला; "आपल्या अनेक स्वप्नांमधलं पुढंचं स्वप्न नं? ए... जा ग! इतकं मनकवडं कसं असू शकतं कोणी?" त्याचं ते बालिश वागणं आणि बोलणं ऐकून ती खडखदली आणि तिला जाणवलं... 'तो असला की मी बदलते; त्याच्यासोबत असताना मला माझ्यातली 'मी' सापडते आहे का?' पण मनातले विचार दूर सारत ती म्हणाली;

"You are right! Pizza by the Bey! मी टेबल book करून ठेवलं आहे. म्हंटलं नेमकं आपण जाऊ आणि आपला लाडका दिसायचा नाही आपल्याला." ती हसत म्हणाली.

"तुला नेहेमीच कळत ग माझ्या मनातलं. पण मला खात्री आहे; तू माझ्याकडे आलीस की मी देखील तू न संगता आपली स्वप्न पूर्ण करेन तुझ्यासोबत. तू खरंच ये न माझ्याकडे. इतके समुद्र किनारे दाखवायचे आहेत तुला. तुझ्याशिवाय त्या ओल्या वाळूचा स्पर्श सुख नाही देत." तो तिच्या सोबत चालत म्हणाला. तो सतत बोलत होता; आणि ती त्याचं बोलणं ऐकत असताना देखील स्वतःमध्ये हरवत होती.

काही क्षणांनंतर तिने त्याच्याकडे बघितलं तर तो देखील तिच्याकडे बघत होता. तिने बोलण्यासाठी मोठा श्वास घेतला आणि त्याने तिला थांबण्याची खूण करत म्हंटलं; "अहं! तू नाही येणार आहेस तिथे! कारण इथले भारतातले सगळे समुद्रकिनारे अगोदर बघायचे आहेत तुला. तुझं तुझ्या भारतातल्या निसर्गसौंदर्यावर जास्त प्रेम आहे. तुला माहीत आहे न की तुझे डोळे बोलतात?" त्याच्या त्या बोलण्याने ती मनापासून हसली आणि म्हणाली; "पण खरंच आपल्या देशाला जितकं निसर्गसौंदर्य लाभलं आहे तितकं इतर कुठेही नसेल; असं मला मनापासून वाटतं. अर्थात हे देखील मी मान्य करते की आपण ते नीट जपत नाही किंवा त्याचं संवर्धन देखील करत नाही."

"ए! गोवा?" त्याने तिच्या लेक्चरला आळा घालत म्हंटलं; आणि ती लहान मुलींसारखी खुदकन हसली.

"हो! गोवा! तू आणि मी... आपला लाडका समुद्र.... मावळत्या संध्याकाळपासून ते उगवत्या पाहाटेपर्यंत हातात हात घालून चालूया आपण. एकदा गोव्याला जाऊ या आपण." तिचे डोळे स्वप्नाळू झाले होते. असेच काही क्षण गेले आणि दोघेही भानावर आले.

तिने खास सांगून ठेवलेल्या टेबलवर ते बसले आणि नकळत दोघांनीही नजर त्यांच्या लाडक्या समुद्राकडे वळली.

वेटरने येऊन समोर मेन्यूकार्ड ठेवलं आणि दोघेही आपापल्या तंद्रीतून जागे झाले आणि एकमेकांकडे बघून सगळं उमजल्यासारखे हसले. त्याने ऑर्डर दिली आणि मग दोघांमध्ये खूप गप्पा रंगल्या! तिला वेळेचं भान होतं.... त्यालाही! पण तरीही गप्पा रंगल्या. तिथे गेल्यावर सुरवातीला त्याला खूप अडचणी आलेल्या होत्या. पण त्यावर त्याने जिद्दीने मात केली होती; आणि आता एक छानशी नोकरी मिळाली होती. अजूनही त्याचं Ph D चालूच होतं. सगळं कसं छान चालू आहे ते तो उत्साहाने सांगत होता आणि ती समाधानाने मनापासून ऐकत होती. तिच्या आयुष्यात घडलेले आणि घडणारे बदल ती देखील मनापासून त्याला सांगत होती; आणि तिच्या डोळ्यात खोलवर बघत तो ते ऐकत होता.

'असं काय बघतोस?' ती.

'काही नाही.' तो.

'ए तुझ्या डोळ्यांच्या पापण्या मला फार आवडतात; आणि तुझे ब्राऊन डोळे तर खूपच गहिरे आहेत रे.' ती.

'फक्त माझे नाही... तुझे पण त्याच रंगाचे आहेत. आणि त्याला ब्राऊन नाही.. गावठी मधाचा रंग म्हणतात.' तो.

'कोण म्हणतात?' तिचा तोच तो मिश्किल आवाज तिच्याही नकळत बाहेर आला.

'आम्ही.... म्हणजे मी ग. तुझ्या डोळ्यातला गावठी मध मला गुंतवून ठेवतो.' त्याचा ओलावलेला हळुवार आवाज.

त्याच्या बोलण्यावर ती फक्त हसली.... मधाळसं!

घड्याळ पुढे सरकत होतं; आणि दोघांना त्याची जाणीव सतत होत होती. शेवटी निघाले दोघे स्टेशनच्या दिशेने.

"तसंच जायचं न? ट्रेनने... दारात उभं राहून... पूर्वीसारखं!" त्याने विचारलं.

"Of course... तू गेल्यापासून ट्रेनच्या दारात उभं राहायची वेळ नाही आलेली. बहुतेक तुझ्यासाठीच थांबले होते." ती खळखळून हसत म्हणाली आणि दोघेही स्टेशनच्या दिशेने निघाले. अचानक थांबत ती म्हणाली; "ए आज बसने जाऊया? डबलडेकरमध्ये! वरती सर्वात पुढे बसून!!!"

"टायटॅनिकचा feel येतो न?" त्याने तिच्याकडे बघत डोळा मारला आणि दोघेही समोर आलेल्या बसमध्ये शिरले.

"उशीर होईल न तुला?" तिने त्याला विचारलं.

"हो! तुला?" त्याने तिच्याकडे बघत हळुवार प्रश्न केला.

"खरं सांगू? माझा नवरा काहीच विचारणार नाही. काहीसा वेडा आहे रे तो. मला माहीत आहे; कधी कधी माझ्या वागण्यामुळे तो अस्वस्थ होतो. पण तो मला काहीच विचारत नाही.... आणि मी तुला मागेच सांगितलं तसं... मी आपणहून काहीही सांगणार नाही." ती बाहेर दूरवर बघत म्हणाली.

"हो! आठवतंय मला. पण का नाही सांगणार तू आपणहून?" त्याने काहीसं गोंधळून विचारलं.

"कारण दुर्दैवाने आपल्या सामाजिक बैठकीमध्ये एखादी स्त्री नवऱ्याला आपणहून तिच्या मित्राबद्दल सांगायला गेली तर तिच्या मनात अपराधीपणाची भावना आहे; असा अर्थ काढला जातो. तू माझा मित्र आहेस... किंबहुना मित्रापेक्षाही खूप काही जास्त आहेस.... पण त्यात अपराधीपणाची भावना नाही. प्रेम आहे, आदर आहे, अगदी नव्हाळीची हुरहूर देखील आहे... पण तरीही मला त्यात काही चूक आहे असं वाटत नाही; आणि म्हणून मी कधीच त्याला आपणहून जाऊन आपल्या या नात्याबद्दल सांगणार नाही. अर्थात; मागे म्हंटलं तसं.... त्याने विचारलं तर काहीच लपवणार नाही." ती म्हणाली. तो तिचं बोलणं ऐकत होता; त्याला ते पटत देखील होतं. पण तरीही त्याला ते इतक्या सहजपणे निभावता येईल का याबद्दल तो मनातून साशंक झाला होता. मन अस्वस्थ व्हायला लागलं त्याचं; पण तिची तंद्री लागली होती. शेवटी 'let's go with the flow...' असा विचार करून त्याने देखील नजर बाहेर वळवली.

***

त्यानंतर तो जाण्याच्या दोन दिवस आधी देखील ते भेटले. यावेळी बसस्टॉप गुलाबी झाला होता त्यांच्यासाठी. तिने त्याला वरळीला यायला सांगितलं होतं.

"ए, आपल्याही नकळत आपण या लाटांना आपल्या सोबत जोडून घेतलं आहे न." टळटळीत दुपार असूनही कॅमेऱ्याला उसंत न देता तो बोलत होता.

"हम्म!" तिने उत्तर दिलं. गप्पांमधला हा त्याचा तिसरा प्रश्न होता आणि त्यावरचं तिचं तिसरं उत्तर देखील "हम्म!" होतं. काहीतरी गडबड आहे हे लक्षात येऊन त्याने कॅमेरातून नजर काढून तिच्याकडे बघितलं. ती कुठेतरी एकटक बघत होती. चेहेऱ्यावर बालिश उत्सुकता होती. तिच्या नजरेचा धागा पकडत त्याने देखील नजर उचलली.

"आपली रोमँटिक डेट तिथेच असणार आहे राणी." अँबॅसेडर हॉटेलच्या सर्वात वरच्या मजल्याकडे दोघेही बघत होते. रिव्हॉव्हींग होता तो मजला. तिथली नजर हलवत त्याच्या दंडाला चापटीचा जुना प्रसाद देत ती म्हणाली; "माहीत आहे का तिथले मेन्यूकार्ड मधले रेट्स?"

"नाही." तो निरागसपणे म्हणाला. पण मग तिच्याकडे नजर वळवत म्हणाला; "पण मेन्यूच्या उजवीकडे बघावं लागणार नाही याची खात्री देतो तुला; आणि एक सांगू? चार बंगड्यांमध्ये बसवून घरी सोडायला येईन मी." त्याचं बोलणं ऐकून तिने हसत बरं म्हणून मान हलवली आणि दोघे निघाले.

कुर्ला स्टेशनला दोघे पोहोचले. तो निघाला होता; तिचा जीव हुरहूरला होता नेहेमीप्रमाणे. दोघेही एकमेकांना सांगत नव्हते; तरीही दोघांनाही मनातल्या भावना कळत होत्या. स्टेशनमध्ये शिरण्या अगोदर त्याने खांद्यावरची त्याची सॅक काढली आणि त्यातून एक खूपच सुंदर निळ्या रंगाची cool blue नावाची परफ्युमची बाटली काढली.

"राणी, हा तुझा पाडवा! आपल्याला आवडणाऱ्या सागराच्या रंगाचा." तो म्हणाला आणि तिने काहीही बोलायच्या आत तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाला; "काही गोष्टी न सांगता स्वीकारायच्या असतात."

तिच्या डोळ्यात उभं राहणारं पाणी बघायला मात्र तो थांबला नव्हता. लांब लांब पावलं टाकत तो आत स्टेशनमध्ये नाहीसा झाला होता.

***

लेकाची दहावी झाली. झक्कास मार्क मिळवले होते त्याने. 94% होते. नवरा तर इतका खुश होता तिचा... रिझल्टच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊन तो घरी थांबला. तिघेही डायनिंग टेबलावर बसले होते.

"बोल बेटा काय ठरवलं आहेस तू? म्हणजे सायन्सची ऍडमिशन सहज होईल आता; ते माझं टेन्शन तू घालवलं आहेस... पण पुढे काय विचार केला आहेस?" नवऱ्याने लेकाला केलेला प्रश्न तिने ऐकला आणि मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. त्यापुढे होणाऱ्या शाब्दिक युद्धाची ती फक्त साक्षीदार राहणार होती.

लेकाने आर्टस् घेतलं आणि त्यासोबतच जर्मन आणि जपानी भाषा देखील शिकायला सुरवात केली. तिच्या नवऱ्याला ते अजिबात पटलं नव्हतं. घरात या निर्णयावरून महाभारत युद्ध झालं होतं. पण आजच्या जमान्याचा अभिमन्यू धारातीर्थी पडला नव्हता.

***

अशीच त्याची पुढची भारत भेट होती.....

'मी ठरवू यावेळी आपण कुठे भेटायचं?' त्याचा मेसेज वाचून तिला हसू आलं.

'हो! चालेल की. बरंच होईल.' तिने लिहिलं.

'ठाण्यातला मॉल.' त्याचं उत्तर आलं.

'मॉल? हम्म! आलं लक्षात. बरं. पण आपण थोडं लवकर भेटू हं. लेकाच्या घरी येण्या-जाण्याच्या वेळा बदलल्या आहेत. आता शाळेची बंधनं नाहीत न.' तिने लिहिलं.

मॉलच्या बाहेर तो तिची वाट बघत उभा होता. "ए, दोनची वेळ ठरली होती न?" तो बराच वेळ उभा असावा हे लक्षात येऊन तिने विचारलं.

"राहवलं नाही ग. म्हणून लवकर निघालो.. आणि लवकर निघालो; म्हणून लवकर आलो." तो हसत म्हणाला.

"चल, मला कांजीवरम हवी आहे; नल्लीज मधून." ती मॉलच्या आत शिरत म्हणाली आणि तो एकदम खुश होत म्हणाला; "मन बागबाग हो गया मेरा; जो आपने समज लिया मेरे दिल का ख्वाब." तिने त्याच्याकडे कृतकोपाने बघितलं आणि स्वतःचा दंड तिच्या समोर करत तो म्हणाला; "सुकला आहे ग हा बिचारा; वर्षभर प्रसाद नाही न मिळाला त्याला."

खदखदून हसत तिने त्याला चापट मारली आणि दोघेही मॉलमध्ये शिरले. ती एक एक दुकान बघत पुढे पुढे सरकत होती. त्याने एक-दोन वेळा खिशात हात घालून खास तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट बाहेर काढलं होतं आणि परत आत ठेवलं होतं. तसं तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. पण त्याच्या त्या सततच्या खिशात हात घालण्यामुळे तिने त्याच्याकडे वळून बघितलं आणि न बोलता फक्त भुवया उडवत 'काय' अशी खूण केली. त्याने देखील स्वतःच्या खिशाकडे बघून परत तिच्याकडे बघितलं आणि भुवया उडवल्या. त्याला काय म्हणायचं आहे हे नकळून तिने परत भुवया उडवल्या.... मग त्याने परत.... एक जोरदार चापटीचा 'संपूर्ण भोग' त्याच्या दंडाला मिळाल्या बरोबर त्याचं तोंड उघडलं.

"ओये! Physical abuse करू नकोस. पोलिसांना तक्रार करीन."

"फजिलपणा बंद कर म्हणजे physical abuse बंद होईल. काय चाललं काय आहे तुझं कधीच? खिशाकडे काय बघतोस... माझ्याकडे काय बघतोस... बरा आहेस न?" तिने त्याला विचारलं.

"हो ग राणी! एकदम बरा आहे. फक्त तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे ते कसं देऊ याचा विचार करतो आहे." तो म्हणाला.

"कसं देऊ म्हणजे? तुझ्या हातांनी माझ्या हातात!!! वेडोबा कुठला." तिने चेष्टेच्या सुरात म्हंटलं.

"हो क्का? मला वाटलं पायाने पायात देतात तुमच्यात. म्हणून विचार करत थांबलो होतो." त्याने तिला वेडावत म्हंटलं.

"नमनाला घडाभर तेल झालं हं आता......" असं म्हणत ती पुढे झाली आणि त्याच्या खिशात हात घालून तिचं गिफ्ट काढून घेतलं. त्याच्याकडे एकदा बघून तिने ते गिफ्ट उघडलं.

Sea green, काहीशी shining blue अशा दोन eye pencels होत्या त्या. त्या बघून तिला काहीच कळलं नाही.

"हे दोन रंग तू माझ्यासाठी आणले आहेस?" तिने प्रचंड आश्चर्याने त्याला विचारलं.

"हो! कारण तू जेव्हा समुद्रात विरघळणाऱ्या सोन्याकडे बघतेस नं तेव्हा तुझे डोळे पण सोनेरी होतात. म्हंटलं त्या सोन्याला या दोन समुद्री रंगांचं कोंदण द्यावं." तो खूप गोड आवाजात म्हणाला.

तिने त्याच्याकडे क्षणभर बघितलं आणि त्याच्याकडे पाठ करून चालायला लागली. तिच्या त्या प्रतिक्रियेमुळे तो एकदम गोंधळला. तिला गाठत त्याने विचारलं; "राग आला का तुला? नाही आवडलं का गिफ्ट?"

त्याच्याकडे न बघता अगदी सहज म्हणाली ती; " खूप छान आहेत दोन्ही रंग. मी नक्की नक्की वापरणार आहे ते. पण हेच रंग का ते तू सांगितलंस आणि नक्की काय म्हणावं ते मला कळलंच नाही आणि मनातला गोंधळ तुला दिसू नये म्हणून चालायला लागले एकदम."

तिने न सांगता देखील त्याच्या लक्षात आलं होतं की बहुतेक असा तिचा इतका विचार करून आजवर कोणी तिला काहीतरी वेगळं गिफ्ट दिलं नसावं. ती सुखावली की नाही ते त्याला कळलं नाही. पण मग त्याने विचार केला; देताना मला बरं वाटलं आणि तिने ते नाकारलं नाही; यातच सगळं आलं. दोघेही साडीच्या दुकानात शिरले. क्षणापूर्वी अचानक भावनिक झालेली ती साड्या बघायला लागल्यावर मात्र एकदम जादू व्हावी तशी बदलून गेली. 'अलीकडे तिचं पाडवा गिफ्ट ती हक्काने घ्यायला लागली आहे;' त्याच्या मानत आलं. आवडती साडी घेताना तिचा चेहेरा जसा खुलला होता तसाच ती साडी विकत घेताना त्याचा चेहेरा देखील खुलला होता.

साडीचं शॉपिंग झालं आणि तो तिला म्हणाला; "भूक लागली आहे ग. चल न काहीतरी खाऊया." तिने हसत हसत बरं म्हंटलं आणि ते food court ला गेले. समोरच कैलाश परबत दिसलं. आजचा त्यांचा खास मेन्यू होता 'पुरी, बटाटा भाजी आणि श्रीखंड.' ते वाचून ती त्याच्याकडे वळून म्हणाली; "ए! तो मेन्यू वाच. मस्त न?" त्याने मेन्यू बघितला आणि म्हणाला; "थांब आणतो."

"अहं ! ते नाही तू केलेलं." त्याच्याकडे वळून बघत लाडिक आवाजात ती म्हणाली; "मुलीने मुलाच्या आवडीचा पदार्थ करायचा आणि मुलाने तो खायचा असं नेहेमीच होतं सगळीकडे. आपण वेगळे आहोत किनै... मग आपण वेगळं केलं पाहिजे न? त्यामुळे मी श्रीखंड घेऊन येईन. तू पुरी भाजी बनव फक्कडशी." त्याला गंम्मत वाटली तिच्या बोलण्याची.

"हो ग! आपण खरंच वेगळे आहोत. त्यामुळे आपण सगळंच वेगळं केलं पाहिजे कायम!" तो तिच्या डोळ्यात पाहात म्हणाला.


क्रमशः

Friday, July 2, 2021

एक red wine नातं (भाग 6)

 एक red wine नातं (भाग 6) 


त्याचा फोन वाजला भर लायब्ररीमध्ये. एकदम दचकलाच तो. सहसा त्याला कोणी फोन करायचं नाही दुपारी. त्यामुळे फोन silent mode वर ठेवायला तो विसरला होता. घाईघाईने फोन उचलत त्याने आवाज बंद केला आधी. पण तेवढ्यात सुपरव्हायजरने मोठ्ठ "शूsssssssss" केलंच. चेहेरा कसानुसा करत तो लायब्ररी बाहेर पळाला.

"काय ग? एकदम फोन?" तिचा नंबर बघून त्याने थोडं काळजीच्या आवाजात विचारलं.

"फोन हळूहळू कसा करतात तुमच्यात? आमच्यात तर बुवा फोन लावला की तो एकदम वाजतोच." समोरून उत्तर आलं तिचं आणि तो आभाळभर हसला.

"बोला राणी सरकार काय आज्ञा आहे?"

"ओ खिदमदगार... इस हफ्ते या तो मंगलवार को या फिर गुरुवार को वक्त रखना। आपका सरप्राईज इसी दिन होगा। साधारण दुपार के तीन बजे से लेकर आठ बजे तक तुम राणी सरकार के साथ रेहेनेवाले हो।" तिने हसत सांगितलं.

थोडा विचार करून तो म्हणाला; "मंगलवार को बंदा हाजीर होजाएगा। बस् वक्त और जगह बता देना।"

"हम खिदमदगारो से ज्यादा बात नही करते। मेसेज पढ लेना। बाय।"

"अच्छा! खिदमदगारशी फार बोलत नाहीत तुमच्यात; पण बाय म्हणतात!" तो खो खो हसत म्हणाला आणि समोरून देखील एक हसण्याची लकेर शिरली त्याच्या कानात.

मेसेज प्रमाणे तो जुहूला जे. डब्ल्यू. मॅरियेट जवळच्या गल्लीजवळ जाऊन उभा राहिला. फोन करावा का असं मनात येतंच होतं आणि त्याच्या पाठीवर मागून थाप पडली. तो वळला... समोर एक राजहंसी उभी होती. संपूर्ण पांढराशुभ्र चुडीदार; सुंदर ठसठशीत ऑक्सिडाइज्ड दागिने आणि मुख्य म्हणजे काजळ घातलेले टपोरे मोठे डोळे.

"ती पाहताच बाला... कलिजा खल्लास झाला..." त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि त्याचा दंड आणि चापट यांची परत दोस्ती झाली.

"चल..." ती म्हणाली आणि चालायला लागली. तिच्या सोबत तो देखील चालायला लागला.

"अरेच्या! पृथ्वी थिएटर?" तो चित्कारला आणि ती समाधानाने हसली.

"good! म्हणजे तुला फार काही सांगायला नको. खरं तर मागच्या भेटीत तुला खूप खूप ज्ञान दिलं होतं नं. म्हणून म्हंटलं आज फक्त फक्त मनोरंजन!" ती त्याच्याकडे बघत म्हणाली.

"कोणतं नाटक ग? तुला तिकीट बरं मिळालं? मी नेहेमीच फक्त ऐकत आलो इथल्या अनुभवाबद्दल. खरंच माझी राणी ती." तिच्या डोक्यावर हात ठेवत तो म्हणाला.

ते पृथ्वीच्या आत शिरणार इतक्यात आतून एक गोड मुलगी बाहेर आली आणि त्याला विचारलं; "hey hii! Do you know where is shiv sagar hotel?" त्याने शांतपणे तिला रस्ता सांगितला आणि ती 'thank you' म्हणून निघून गेली. ती गेल्याच्या दिशेने दोघांनी काही क्षण बघितलं; चापटीची जागा चिमट्याने घेतली होती. "हाय! दुखलं नं ग." दंड चोळत तो म्हणाला आणि दोघे आत शिरले.

"सर... सर... सरला! मकरंद देशपांडेंच नाटक आहे." ती आत जात म्हणाली.

"वा! All time hit आहे. नुकतंच मकरंदने दिग्दर्शित करून स्टेजवर आणलं न?" तो आनंदाने म्हणाला.

"हम्म! एकदम 3 नाटकं दिग्दर्शित केली होती त्याने." ती म्हणाली.

नाटक संपलं आणि दोघे बाहेर आले थिएटरच्या. "इतकं कसं कोणाला कोणी आवडू शकतं?" तिने त्याच्याकडे बघत म्हंटलं. त्याचे डोळे तिच्या चेहेऱ्यावरून ढळत नव्हते. तिच्या ते लक्षात आलं पण काहीच कळलं नाही असा भाव आणत तिने म्हंटलं; "मी नाटकाबद्दल म्हणत होते. पण जाऊ दे. बोल! आता काय करायचं?"

"मी ऐकलं आहे की इथली आयरिश कॉफी आणि समोसा पुरी मुंबई मे वर्ल्ड फेमस है।" तो हसत म्हणाला आणि दोघे एक कोपरा पकडून बसले.



कितीतरी वेळ दोघे नाटकाबद्दल बोलत होते. मॅकने प्रत्येक व्यक्तिमत्व इतकं सुंदर लिहिलं होतं की कलाकारांना ते सादर करताना फार वेगळे कष्ट घेण्याची गरजच नव्हती. त्यात 'सरांच्या' भूमिकेत स्वतः मॅक होता. त्यामुळे तर त्या नाटकाची लज्जत न्यारीच होती.

हळूहळू कँटीन मधली गर्दी वाढायला लागली आणि ते दोघे उठलेच.

"जुहूची वाळू चौपाटीपेक्षा जास्त मऊ असते." तो हळूच तिला म्हणाला आणि ती एकदम खळखळून हसली.

"हो का? तुला बरं माहीत रे कुठली कुठली वाळू मऊ... कोणत्या जागेवरून कुठे जायचं... सगळंच!" तिने परत एकदा चिमट्यावरून चापटीकडे वळत म्हंटलं.

"ओह! ते! हो ग. मी कुठेही गेलो... अगदी उद्या चंद्रावर गेलो ना तरी कोणीतरी मला पत्ता विचारायला येईल." तो हसत म्हणाला.

त्याला एकदा पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळत तिने त्याला विचारलं;"उंची काय रे या देहाची?"

"सहा दोन." त्याने काहीशा मक्ख चेहेऱ्याने उत्तर दिलं आणि ती भर रस्त्यात खो खो हसायला लागली. हसण्याचा भर ओसरला आणि तिने त्याला विचारलं;"ए तुला माहीत आहे BEST बसेसच्या मागच्या दरवाज्याच्या बाजूला काय लिहिलं असतं?" त्याचा चेहेरा अजून मक्ख झाला. "हो! रांगेचा फायदा सर्वांना! हम्म! बोल पुढे बोल... तुझी यावरची विशेष टिपणी मला समजून घेतलीच पाहिजे."

परत एकदा खुदखुदत ती म्हणाली;"रांगेचा फायदा सर्वांना आणि उंचीचा फायदा फक्त या उंटाला. दूर पर्यंतची हिरवळ दिसते." तिचं वाक्य पूर्ण झालं आणि दोघेही मस्त धम्माल हसत समुद्राच्या दिशेने निघाले.

ओल्या वाळूतून चालताना नकळत तिने त्याचा दंड धरला होता. अगदी सहज भाव होता तिचा... तो काहीसा सुखावला होता मनातून! पण काही बोलला नाही. दोघे आपल्याच नादात होते. चालता-चालता ती एकदम खुदकन हसली.

"आता काय सुचलंय तुला?" त्याने डोळे गोल फिरवत तिला विचारलं.

"ए मला न आत्ता एक गाणं ऐकवायचं आहे तुला." ती एकदम गोड आवाजात म्हणाली. तिची नजर देखील खाली झुकली होती. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले.

"ऐकव न मग." तो हळुवारपणे म्हणाला.

"थांब हं. शोधते. तोपर्यंत तू हॅन्डस फ्री काढ बघू." असं म्हणून तिने तिच्या मोबाईलमध्ये तिच्या मनातलं गाणं शोधायला सुरवात केली. त्याला एकदम देवानंद-राज कपूर जमान्यातली रोमँटिक गाणी आठवायला लागली. त्याने हॅन्डस फ्री काढून कानात घातले आणि तिने ते तिच्या मोबाईलला जोडले.

"डोळे बंद कर हं." ती म्हणाली आणि त्याने डोळे मिटले.

गाणं सुरू झालं आणि मोठ्ठा भोपळा डोक्यावर फुटल्यासारखा त्याचा चेहेरा झाला.......... कारण ते गाणं अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या गुरू सिनेमातलं मल्लिका शेरावतवर चित्रित झालेलं 'मय्या मय्या....' होतं.




त्याच्या क्षणापूर्वीच्या रोमँटिक भावनेचा चक्काचूर झाला होता. पण तिच्या चेहऱ्यावर एक शांत भाव होता. त्याच शांत चेहऱ्याने ती त्याला म्हणाली; "मला माहीत आहे की तू कुठलंस रोमँटिक गाणं अपेक्षित केलं असशील. पण तरीही तू हेच गाणं शांतपणे ऐकलस तर मला आवडेल. मनापासून ऐक. गुलजारचे शब्द आहेत. मल्लिकाला डोळ्यासमोरून पुसून टाक आणि फक्त गाणं ऐक. रेहेमानची जादू आणि गुलजारचे शब्द तुला लाटांच्या दुनियेत नेतील." तिने असं म्हणताच त्याने परत एकदा डोळे मिटले आणि गाणं ऐकायला लागला.

तू नील समंदर है
मैं रेत का साहिल हूँ
आग़ोश में ले ले
मैं देर से प्यासी हूँ

पहिल्या चार ओळी त्याने ऐकल्या आणि डोळे उघडून तिच्याकडे बघितलं.

"एक सांगू? मी कल्पना करू शकलो असतो त्याहूनही जास्त रोमॅंटिक गाणं एकवते आहेस तू मला." तो ओल्या आवाजात म्हणाला आणि परत एकदा कानात हेडफोन्स घालत गाण्यात बुडाला.

एक सौदा रात का, एक कौड़ी चाँद की
चाहे तो चूम ले, तू थोडी चाँद की
एक सौदा रात का...
एक चाँद की कश्ती में, चल पार उतरना है
तू हलके हलके खेना, दरिया न छलके
मय्या मय्या, गुलाबी तारे चुन ले, सारे चुन
मय्या मय्या, कि जिस्मों की परतों में दर्दों के मारे चुन ले
मय्या मय्या, गुलाबी...

जब नील समंदर जागे, आग़ोश में ले कर साहिल
लहराता है और मस्ती में महताब का चेहरा चूमता है
मैं सीने में तेरी साँसे भर लेती हूँ
करवट-करवट, मैं तुझसे लिपटकर, रात बसर कर लेती हूँ

मइया मइया मइया मइया
सीने से मेरे, उठता है धुआँ
माइया माइया माइया माइया
दीवार पे क्या लिखता है धुआँ
धीमा धीमा धीमा धुआँ
हर बार ये क्या कहता है धुआँ?
मई-मई-मइया
अरे-एहे-एहे-एहे-एहे
मई-मई-मइया
अरे-एहे-एहे-एहे-एहे
एक सौदा रात का, एक कौड़ी चाँद की
चाहे तो चूम ले, तू थोडीकी
एक मेघ की कश्ती में, चल पार उतरना है
तू हलके हलके कहना, दरिया न छलके
मय्या मय्या...

गाणं पूर्ण झालं आणि त्याने डोळे उघडले आणि तो तिच्याकडे खूप प्रेमळपणे बघायला लागला.

"धत! मी इतका प्रयत्न करूनही मल्लिकाच दिसत होती न तुला?" अत्यंत मिश्किलपणे आणि खळखळून हसत तिने त्याला विचारलं. त्याच्या हृदयाचं अगदी पाणी पाणी झालं; कारण त्याच्या समोर एक मोहक सुंदर राजहंसी वाळूत गुढगे टेकून खदखदून हसत त्याच्याकडे बघत होती.

त्याचा हात आपसूकच त्याच्या कॅमेराच्या दिशेने गेला.

***

अरेच्या बेल वाजते आहे वाटतं घराची'. ती तंद्रीतून जागी झाली आणि रिकामा कॉफीचा मग घेऊन दार उघडायला गेली. कॉफी टेबलवरून एक मोहक सुंदर राजहंसी उठली होती... आणि एक आई दरवाजा उघडत होती.

तिने दार उघडेपर्यंत दोन वेळा बेल वाजली होती.

"अरे; हो! हो! झालंय काय इतकी बेल वाजवायला?" दार उघडून हसत तिने म्हंटलं. तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत तिचा लेक पाय आपटत आत आला आणि थेट स्वतःच्या खोलीकडे जाताना तणतणला; "आई, परत वासंती ताईला पाठवू नकोस हं मला घ्यायला. ती मला 'बाबू' म्हणून हाक मारते सगळ्यांसमोर आणि चक्क माझी बॅग धरायला मागते. मी काय आता लहान आहे का?"

त्याच्यामागोमाग वासंतीदेखील आत आली होती. दोघींनी एकदा एकमेकींकडे बघितलं आणि खळखळून हसल्या. तिने वासंतीच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटलं;"आता जेऊनच जा ग." त्यावर हसत वासंती म्हणाली;"आज नको वहिनी. पण रविवारी येईन तर मस्त चिकन करते बाबूसाठी. मग त्याच्या सोबतच जेविन."

तिचा लेक कपडे बदलून जेवण्यासाठी टेबलावर येऊन बसला. ताट वाढताना तिने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली;"असं चिडू नये बाळा वासंतीवर. ती तुला बाबुच तर म्हणते लहानपणापासून. मग एकदम कशी बदलेल तिची सवय?" त्यावर काहीशा रुसलेल्या आवाजात तो म्हणाला;"पण मग सगळे मित्र मला चिडवतात त्याचं काय? तू वासंती ताईला सांग न आता मी मोठा झालोय. सगळ्यांसमोर तरी नावाने हाक मार; घरी म्हण हवं तर बाबू." तिला त्याचं म्हणणं पटलं आणि तिने ' बरं' म्हणत विषय संपवला.

नेहेमीप्रमाणे सगळं आवरून ती बेडरूममध्ये आली आणि सकाळपासून हरवलेल्या त्याच्या आणि तिच्या विश्वाची आठवण परत मनात जागली. परत एकदा जगलेले ते क्षण त्याला सांगावेत म्हणून तिने मोबाईल हातात घेतला आणि तिच्या लक्षात आलं की दुपारचे दोन वाजून गेले होते. साडे सहा तासांचा फरक!!! तिच्या मनात आलं आणि मेसेज करण्याचा विचार तिने रद्द केला.

'साडे सहा तासांचा फरक!' परत एकदा मनात आलं तिच्या. पलंगावर आडवी पडून तिने डोळे तर मिटले पण तिच्या मिटल्या डोळ्यांसमोर तो निघाला होता तो दिवस.... ती वेळ.... घोळायला लागली.

***

त्याने त्याच्या फ्लाईटची वेळ कळवली होती तिला. पाच तास अगोदर पोहोचावं लागणार होतं त्याला. सोबत बायको आणि ढीगभर सामान असणार होतं; त्याची त्याने तिला कल्पना दिली होती. म्हणून तर तो मुद्दाम वेळ काढून तिला भेटायला आला होता निघायच्या दोन दिवस आधी. त्यांच्या लाडक्या नरिमन पॉईंटवर दोघे हातात हात घालून बसले होते.

"इतक्या सहज तुझा हात कधीपासून धरायला लागलो ग मी?" त्याने निळ्या शाईत विरघळणाऱ्या सोनेरी किरणांकडे बघत तिला विचारलं होतं.

"काय फरक पडतो? आत्ता हातात हात आहे; बस्! हा क्षण जगू दे मला." त्याने तिच्याकडे बघितलं. निळी शाई तिच्या डोळ्यात गडद होत होती.

"मी भेटायला येणार आहे." तिने गाल फुगवत त्याला सांगितलं होतं.

"मी वाट बघणार आहे विमानतळावर." त्याने म्हंटलं होतं.

नेहेमीप्रमाणे दादरला ट्रेन बदलण्यासाठी दोघे उतरले.

समोरून ट्रेन येत होती. तिचे डोळे पाणावले होते. काहीतरी म्हणणार होती ती; पण मग तशीच पटकन ट्रेनमध्ये चढली.

तो त्याची ट्रेन घेण्यासाठी वळला आणि त्याला एक मेसेज आला.





त्याने मेसेज उघडून बघितला आणि काही एक न बोलता त्याचे handsfree कानात घातले. त्यानंतर त्याचं स्टेशन कधी आलं; तो ट्रेनमधून उतरून घरी कसा पोहोचला हे त्याचं त्याला कळलं नाही. केवळ सवयीचा भाग म्हणून तो कुठेही चुकला नव्हता.

***

ती धावली त्याला विमानतळावर भेटायला. पण तिला तसा थोडा उशीरच झाला. ती पोहोचली तोवर तो गेला होता आत. त्याच्या आई-वडिलांशी थोडफार बोलून ती जड मनाने परतली. घरी खिडकीत बसून दोघांच्या मेसेंजरवरच्या गप्पा, कधीतरी अधून मधून भेटले होते तेव्हाचे किस्से आठवत होती; आणि अचानक तिचा मोबईल वाजला. त्याचा फोन होता. विमानतळावरून! तिच्या डोळ्यात पाणी उभं राहीलं.

'जातोस?'

'हो ग! जायला हवं न?'

'हम्! विसरशील?'

'वेडी! आणि तू?'

'वेडा आहेस?'

'मेल्स करत जा....' दोघांनी एकमेकांना बजावलं आणि तो गेला.



***

त्याचा पहिला मेल आला तो जवळ जवळ सहा महिन्यांनंतर. तोपर्यंत whatsapp वरून देखील मेसेज नव्हता. पण तिने ते सहज स्वीकारलं होतं. तो गेला तेव्हा ती खरंच खूप अवस्थ होती. तशी सवय झाली आहे सतत बोलायची. तो तिकडे गेला की एक तर साडेसहा तासांचा फरक पडणार आणि नवीन जागा, नवीन अभ्यासक्रम... सगळंच नवीन असल्याने तो स्थिरस्थावर होईपर्यंत काही महिने जातील याचा तिला अंदाज होता. त्यामुळे देखल काहीही संपर्क नसेल याची तिने मनातुन तयारी केली होती. पण मग मेल आला; आणि तो दिवस ती एकदम खुशीत होती.

कशी आहेस? रोज आठवतेस. पण इथे इतकं काही घडतं आहे; की निवांतपणे बसून तुझ्या आठवणी जगता येत नाहीत. आल्यापासून पूर्णच अडकून गेलो. सगळंच नवीन होतं; त्यात बायको dependent visa वर असल्याने खूप जास्त formalities होत्या. इथले नियम खूप कडक आहेत. त्यामुळे खूपच सांभाळून राहावं लागतं इथे. ट्रेनमध्ये सरकून घेतला चौथी सीट हसत देणारी फक्त मुंबई मेरी जान आहे. तिला खूप मिस करतो आहे. पण आता हळूहळू सगळं मार्गी लागलं आहे.

ए, इथे एक मस्त ग्रुप आहे. दर शनिवार-रविवार ते ट्रेकला जातात. येत्या शनिवार-रविवार मी पण जातो आहे त्यांच्या सोबत. तू असशीलच माझ्या सोबत... पण तरीही मला काहीतरी खास हवंय तुझ्याकडून. जे मला तिथे पोहोचल्यावर आमच्या कॅम्प फायरच्या वेळी जगता येईल.

सांगितलं हं मी; मला काय हवंय. ते काय असेल आणि कसं असेल ते तुलाच ठरवावं लागणार आहे नेहेमीप्रमाणे.

कायम तुझाच...... खिदमदगार गं!

आज गुरुवार! म्हणजे आजच विचार करून ठेवावा लागेल. हे साडेसहा तासांचं ओझं आहे न डोक्यावर. मनातल्या आनंदात देखील हा विचार सतत होताच सोबतीला. दिवस संपत आला तरी तिला काही सुचलं नव्हतं. सतत लेकाची भुणभुण; घरातली कामं आणि नेहेमीचे फोन. दिवस नेहेमीचा होता; पण आज ती थोडी वेगळ्या मूडमध्ये होती. त्यामुळे 'आपलं-तुपलं' क्षणांचं जग जगायला ती गच्चीत गेली.

'आपलं-तुपलं!' गच्चीत गेल्यावर तिच्या मनात आलं... किती दिवसांनी हे शब्द आठवले. केवळ त्या शब्दांनी देखील तिच्या चेहेऱ्यावर हास्याची लकेर छेडली गेली.

**

त्यांच्या पहिल्यांदा झालेल्या CCD च्या भेटीनंतर अधून-मधून गप्पा व्हायला लागल्या होत्या. त्यावेळी कधीतरी तो म्हणाला होता;

'आपलं CCD आहे न......'

त्याचा मेसेज पूर्ण होऊ न देताच तिने मेसेज टाकला... 'आपलं? जा रे! तुपलं असेल ते CCD. लगेच आपलं म्हणून एका छताखालचं नातं नको जोडूस...' खरं तर ती गंम्मत करत होती. पण अजून तिची ओळख पूर्ण न झाल्याने तो एकदम गोंधळला होता आणि गप बसला होता. अगोदर तिच्या ते लक्षात नव्हतं आलं. कारण त्याने मेसेज केला नाही; तर वाट न बघता ती तिच्या कामाला लागली होती. पण मग रात्री झोपण्या अगोदर एकदम तिला आठवलं की तिच्या मेसेज नंतर त्याने त्याचं वाक्य पूर्ण केलं नाही. तिने फोन हातात घेतला आणि मेसेज टाईप केला...

'आपलं-तुपलं CCD यापुढे कधीही घडेल.... किंवा मग भेट कोणतीही असेल... पण आयरिश कॉफी या आपल्या-तुपल्याचा अविभाज्य भाग असेल.' तिने फोन बंद केला आणि आडवी पडणार इतक्यात तो परत वाजला होता.

'अग राणी, तेच तर सांगणार होतो न....'

'मला माहीत होतं नं...' तिने लिहिलं होतं आणि फोन बंद केला होता. पण तेव्हापासून त्या दोघांमध्ये गप्पा होत असताना एकत्र काही करायचं ठरलं की आपलं-तुपलं ठरलं हं! हे एकदा तरी एकमेकांना सांगितलं जायचं. गोड गुपित होतं ते दोघांचं.

**

गच्चीत बसून ती विचार करत होती... कॅम्प फायरच्या वेळी सर्वांमध्ये असूनही तो 'आपलं-तुपलं' काय आठवू शकेल? तिने डोळे मिटले आणि तिच्या मिटल्या डोळ्यासमोर हिरवा गार डोंगर... झुळझुळणारा झरा आणि लहान मुलांसारखे बागडणारा तो आणि ती आले. एकदम हसू आलं तिला आणि घरी येऊन तिने लिहायला घेतलं...

अंतरीच्या स्पंदनांची
भावना मी वदतो....
रत्नहार बिंदूंचा....
तव कोमल कंठी शोभतो!

लाजुनि तू शलाकेपरी...
क्षणार्धात लोपसी...
त्या क्षणिक रूपाच्या मोहात;
निळावंति मी गुंतलो....

सागर-नभापरि मी तृषार्त...
तू बरसती नभरेखा...
मिलन आपुले क्षितिजावर...
त्या क्षणास मी आतुरलो....


रात्री तिने मेसेज पाठवला; त्याचं उत्तर आलंच होतं सकाळी...

किती किती ओळ्खतेस मला.

'आपलं मिलन क्षितिजावरचं असेल नक्की.... खरंच आतुरलो आहे मी त्यासाठी.'

ए, यापुढे तुझं कवितेतून व्यक्त होणं मला जास्त आवडेल राणी!

तिने मेसेज वाचला आणि मग तो दिवस पण खुदखुदत होता तिच्या सोबत!


क्रमशः