Friday, March 27, 2020

#करोनाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली कविता


#करोनाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली कविता

गेला होउन जो.... भूत;
होऊ घातला तो... भविष्य...
हातात काही न ज्यांच्या;
तेच भुत अन भविष्य....

वर्तमानाचा तो सागर...
उचंबळु येई किनारी;
करंटया मनुष्याला परी....
नाही किम्मत तयाची!

नाही हातात हो जे...
तेची हवे म्हणे माणूस;
म्हणुनच का ग त्याला;
वर्तमान आणि रंजिस?!

Friday, March 20, 2020

होळीच्या निमित्ताने...

होळीच्या निमित्ताने...


आपण आजवर अनेक कथा एकल्या आणि वाचल्या आहेत होळी सणासंदर्भात! त्यातली सर्वसाधारणपणे सर्वांनाच माहित असणारी कथा म्हणजे  दुष्ट हिरण्यकष्यपू राजाची!

हिरण्यकश्यपू राजाने आपला मुलगा प्रल्लाद श्रीविष्णूचा भक्त आहे हे समजल्यानंतर त्याला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे अग्नीमध्ये न जळण्याचा वर मिळालेल्या होलिकेला त्याने प्रल्लादकडे पाठवले. होलीकेने प्रल्लादाला आपल्या मांडीत बसवले आणि चारही बाजुने अग्नी प्रज्वलित करून घेतला. प्रल्लादाने डोळे मिटून श्रीविष्णूची प्रार्थना करायला सुरात केली आणि आपल्या भक्ताची हाक एकून श्रीविष्णूने प्रल्लादाला वाचवले आणि  होलिकेचे दहन केले. प्रल्लाद अग्नीतून सुखरूप बाहेर आला तो दिवस पौर्णिमेचा होता. त्या दिवसाला आता होळी पौर्णिमा म्हणतात आणि ज्याप्रमाणे होलिका ही दुष्ट प्रवृत्तीची होती आणि म्हणूनच तिचे दहन झाले त्याप्रमाणे आपण देखील दुष्ट प्रवृतीचे दहन करण्यासाठी प्रतीकात्मक होळी पेटवतो.

दुसरी एक कथा अशी देखील प्रचलित आहे की पार्वतीला शिवाला प्राप्त करून घ्यायची इच्छा होती. परंतु शिव तपश्चर्येला बसले होते. पार्वतीची मदत करण्यासाठी  कामदेवाने शंकराची तपश्चर्या भंग करण्यासाठी त्यांच्यावर मदनबाण सोडला. तपश्चर्या भंग झाल्याने शिव चिडले आणि त्यांनी त्यांचा तिसरा नेत्र उघडून कामदेवाला भस्म केले. परंतु शांत झाल्यावर त्यांची नजर पार्वतीवर पडली आणि ते तिच्यावर मोहित झाले आणि शिव-पार्वतीचा विवाह झाला. या कथेवरून वासनात्मक आकर्षणाचे दहन करण्यासाठी होळी पौर्णिमेला प्रतीकात्मक होळी पेटवली जाते.

अजून एका कथे अंतर्गत कंसाला जेव्हा समजले की त्याचा वध करु शकणारा कृष्ण गोकुळात सुखरूप वाढतो आहे त्यावेळी त्याने पुतना या राक्षसीला कृष्णाच्या वधासाठी पाठवले. त्यावेळी तिने स्तनपानातून कृष्णावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला. परंतु कृष्णाने तिचा वध केला. पुतना वधाचा म्हणजेच पर्यायाने वाईट कृत्याचा नाश म्हणून होळी दहन होते... अशी ही एक पुराण कथा आहे.

आपण कोणतीही कथा विचारात घेतली तरी त्यातून एकच विचार पुढे येतो की सत्याचा असत्यावर विजय होतो.... किंवा सदाचाराचा दुराचारावर विजय होतो. अर्थात आपण त्यातील अतिरंजीकता दूर केली तर एक महत्वाची बाब आपल्या लक्षात येईल की असत्य किंवा दुराचार किंवा वाईट विचार यांचे दहन जादूने किंवा आपोआप होत नाही. प्रत्येक कथे मध्ये 'देव' नामक एक घटक आहे जो अशा वाईट गोष्टी दूर करतो. जर आपण पूराण कथा खऱ्या मानायच्या ठरवलच तर एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की त्याकाळासाठी ज्यांनी दुराचार, असत्य किंवा वाईट विचार याविरुद्ध बंड केले ते त्याकाळातील लोकांसाठी कोणी देव नव्हते. तर स्वच्छ मनाचे आणि प्रमाणिक आचार असलेले त्यांच्यासारखेच त्यांच्यातलेच कोणी व्यक्ति होते.

यातून एक सिद्ध होते की आपण जे विचार करतो किंवा जे आचरण करतो त्याच कालांतराने रूढी बनतात आणि कदाचित् शेकडो-लाखो वर्षानंतर त्याच परंपरा म्हणून सर्वमान्य होतात. म्हणून जुन्या रूढी, परंपरा अंतिम सत्य न मानता त्यात कालानुरूप बदल घडवून आणणे आवश्यक आहे. त्यासाठी देव नामक कोणीतरी अवतार घेण्याची वाट न बघता आपल्यातल्या वाईटाचा नाश आपणच केला पाहिजे; म्हणजे आपोआपच चांगुलपणा हाच एक विचार तयार होईल पुढे हीच रूढी बनेल आणि कालांतराने तीच परंपरा असेल.

नुक्त्याच झालेल्या होळीच्या निमित्ताने एक वेगळा विचार मांडायचा प्रयत्न केला आहे... एवढच!

Friday, March 13, 2020

कुंती, द्रौपदी, सीता.... काळ आणि परिस्थिती!


आपल्या पुराण कथांमध्ये सांगितले आहे की दुर्वास मुनी एकदा कुंतीभोज राजाकडे आले आणि म्हणाले की त्यांना एक यज्ञ करायचा आहे आणि त्यासाठी त्यांना एकांत हवा आहे; मात्र त्यांच्या गरजा पूर्ण होणे देखील महत्वाचे आहे. दुर्वास मुनी अत्यंत तापट असल्याने वेळी-अवेळी दुर्वासांनी बोलावले असता तत्पर असणारी व्यक्तीच त्यांची सेवा करू शकेल; याची कुंतीभोजा कल्पना होती. त्यामुळे त्याने आपल्या गुणी आणि अत्यंत समंजस अशा कन्येला; कुंतीला ही जवाबदारी दिली. कुंतीने देखील ही जवाबदारी अत्यंत मनापासून स्वीकारली आणि दुर्वासांची सेवा मनोभावे केली. त्यायोगे दुर्वास मुनींचा यज्ञ यथासांग पार पडला. दुर्वास मुनी कुंतीच्या शांत आणि सेवाभावी स्वाभावाने खुश झाले आणि त्यांनी तिच्यावर अनुग्रह करून तिला एक वरदान दिले. त्यांनी त्यांच्या तपश्चर्येने मिळवलेला असा एक मंत्र कुंतीला दिला की त्याचे स्मरण करून ती ज्या शक्तीला आव्हाहन करेल ती शक्ती तिच्या समोर प्रगट होऊन तिला पुत्ररत्न देईल. हा मंत्र दिला त्यावेळी कुंतीने केवळ तारुण्यसुलभ कुतूहलातून तिला कायम मोह वाटत असणाऱ्या तेजोमय शक्तीच्या देवाला सूर्याला आव्हाहन केले. त्यातूनच कर्णाचा जन्म झाला. मात्र त्यावेळी कुंती कुमारी असल्याने, आणि त्यावेळी देखील सामाजिक बंधीकीचा पगडा खूप जास्त असल्याने तिला कर्णाचा त्याग करावा लागला. पुढे यथावकाश कुंतीचे लग्न हस्तिनापूरचा राजा पांडू याच्याशी झाले. परंतु दुर्दैवाने राजा पांडूला एक शाप मिळाला. या शापामुळे राजा पांडू प्रणय करू शकणार नव्हता. हे समजल्यानंतर पांडूची राज्य त्याग केला आणि कुंती व द्वितीय पत्नी माद्री वानप्रस्थाश्रमात स्वीकारला. पांडू वानप्रस्थाश्रमात होम-हवन, धर्म कार्य करीत होता; परंतु तरीही कायम दु:खी होता. जर पुत्र प्राप्ति झाली नाही तर स्वर्गात जागा मिळणार नाही; हा विचार त्याचे मन जाळत होता. हे पतीचे दु:ख समजून कुंतीने दुर्वास मुनींकडून मिळालेल्या वरदानाची माहिती पांडूला दिली. त्यानंतर त्याच्या सांगण्यावरून तिने तीन शक्तींशी समागम केला आणि पुत्र प्राप्ति करून घेतली. कुंतीला झालेले तीन पुत्र पाहून माद्री... पांडूची दुसरी पत्नी दु:खी राहू लागली; त्यावेळी पांडूच्या विनंतीवरून कुंतीने आपले वरदान माद्रीच्या ओटीत घातले. अशाप्रकारे माद्रीला देखील दोन पुत्र झाले. त्याकाळात लग्नानंतर स्त्रीने जन्म दिलेली मुले ही ती ज्या व्यक्तीची पत्नी असे त्या व्यक्तीचीच मानली जायची. त्यामुळे धर्म, भीम, अर्जुन हे कुंती पुत्र आणि नकुल, सहदेव हे माद्री पुत्र पुढे पांडू पुत्र म्हणून ओळखले जायला लागले.


द्रौपदीच्या पांडवांबरोबरच्या लग्नाच्या बाबतीत एक कथा प्रचलित आहे. त्यातील एक कथा अशी की, द्रौपदीने पूर्व जन्मात शंकराचे तप करून 'सर्वगुण संपन्न पुरुष' पुढील जन्मात पती म्हणून मिळावा असे वरदान प्राप्त केले होते. द्रौपदीला पणात जिंकल्यानंतर अर्जुन तिला घेऊन घरी आला आणि आई कुंतीला द्रौपदीबद्दल सांगताना 'मी कोणती भिक्षा आणली आहे बघ'; असे म्हणाला. त्यावेळी कुंतीची दाराकडे पाठ होती. तिने मागे न बघताच आदेश दिला की आणलेली भिक्षा पाचहीजणांमध्ये वाटून घ्या; त्यावेळी हे ऐकून द्रौपदी स्तंभित झाली. तिने या प्रस्तावाला नकार दिला. त्यावेळी श्रीकृष्णाने तिला तिच्या पूर्वजन्मी केलेल्या तपाची आठवण करून दिली आणि पाच पांडवांचे गुण मिळून एक सर्वगुण संपन्न पुरुष होतो; असे सांगून तिला त्या लग्नासाठी तयार केले.


वडिलांनी त्यांच्या पत्नीला दिलेला शब्द पाळण्यासाठी रामाने वनवासाला जाण्याचा निर्णय घेतला. पतीच्या बरोबरच पत्नीने असावे' या त्या काळाला साजेशा विचाराने सीतेनेही रामाबरोबर जाणे ठरवले. पुढे वनात रामाला बघून रावणाची बहीण शूर्पणखा त्याच्यावर मोहित झाली; आणि तिने त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. रामाने नकार देताच ती लक्ष्मणाकडे गेली; परंतु लक्ष्मणाकडून देखील तिला नकार मिळाला. त्यावेळी लक्ष्मणाने रागाने शुर्पणखेचा एक कान आणि नाक कापले. आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला म्हणून रावणाने सीतेचे अपहरण केले. त्यानंतर त्याने तिला अशोक वनात ठेवले आणि आपल्याशी विवाह करण्याची विनंती केली. परंतु त्याने कधीही सीतेला स्पर्श केला नाही. तरीही लंकेवर स्वारी करून पत्नीला सोडवल्यानंतर केवळ सामाजिक बांधिलकीचा विचार करून रामाने तिला अग्नी परीक्षा द्यायला लावली. अग्नी परीक्षा देऊनही सीतेच्या आयुष्यातले दु:ख संपले नाही. पुढे एका धोब्याच्या बोलण्यावारून राजा रामाने राणी सीतेचा त्याग केला. त्यानंतर रामाच्या पुत्रांना जन्म देऊन त्यांचे योग्य शिक्षण सीतेने परत एकदा वनात राहूनच केले. सरते शेवटी रामाला त्याचे पुत्र सुपूर्द करून तिने धरतीमध्ये स्वतःला सामावून घेतले.


या पुराण काळातील तीन स्त्रिया आणि त्यांच्या आयुष्याचा हा साधारणसा गोषवारा. कुंतीच्या तारुण्य सुलभ उत्सुकतेतून कर्ण जन्माला. त्याकाळात देखील समाजाच्या भीतीने तिने हे सत्य आयुष्यभर लपवले. मात्र लग्नानंतर पतीच्या इच्छेखातर आणि त्याच्या आज्ञेनुसार तिने इतर कोणाकडून पुत्रप्राप्ती करून घेतली. द्रौपदीच्या बाबतीत देखील; श्रीकृष्णाने तिला तिच्या पूर्व जन्मीच्या तपाची आठवण करून दिली आणि तिला पाचही भावांशी लग्न करण्यास भाग पाडले. मात्र तिने तप केले होते हे केवळ श्रीकृष्णाला माहीत होते; आणि श्रीकृष्ण कुशल राजकारणी होता हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे सौंदर्यवती द्रौपदीमुळे पाच भावांमध्ये भांडण होऊन फूट पडू नये म्हणून श्रीकृष्णाने ही शक्कल लढवली असणे शक्य आहे. सीतेच्या बाबतीत विचार केला तर तिच्या आयुष्यात घडलेल्या कुठल्याच घटनांवर किंवा काळावर तिचे नियंत्रण नव्हते. तरीही तिच्या आयुष्याची परवड कधीच संपली नाही.

आज जेव्हा मी या तीनही स्त्रियांचा विचार करते तेव्हा मनात येत की भावनिक पातळीवर या स्त्रियांची किती परवड झाली; हे कोणालाही लक्षात येत नाही. मात्र या तीनही स्त्रिया मनाने खंबीर आणि स्वत्वासाठी आयुष्यभर झगडल्या हे चित्र आपल्या डोळ्यांसमोर कायम उभं राहातं. मात्र दुर्दैवाने केवळ 'समाज काय म्हणेल' या विचारामुळे किंवा वडील, पती, सखा यांच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याची परवड करून घेतली. जी कथा या पुराणातील स्त्रियांची.... तीच कथा आजच्या स्त्रीची देखील नाही का? आजची स्त्री खूप शिकते आहे. प्रत्येक क्षेत्रात तिचा स्वतःचा ठसा ती उमटवते आहे. विविध स्त्ररांवर खंबीरपणे निर्णय घेऊन त्या निर्णयांची जवाबदारी बाळगत ते निर्णय यशस्वी करते आहे. नवीन नवीन क्षितिजं ती पादाक्रांत करते आहे. आणि तरीही.... ती भावनिक पातळीवर अजूनही हळवी आहे. आपल्या जिवलग लोकांसाठी... वडील, पती, मुलगा आणि कधी कधी तर समाजाच्या भीतीने देखील ती
स्वतःसाठीचेच निर्णय पण स्वतःच्या मनाविरुद्ध घेते आहे.

खरंच पुराणापासून आजवर काळ बदलला आहे का? आजची परिस्थिती वेगळी आहे का? ती एक स्त्री म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून तिला योग्य वाटतील असे तिच्या स्वतःसाठीचे निर्णय घेऊ शकते आहे का? हे आणि असे अनेक प्रश्न!!! मला इथे उत्तराची अपेक्षाच नाही.... ते प्रत्येकाने स्वतःला द्यावं असं मला वाटतं.

Friday, March 6, 2020

#खजुराहो दर्शन भाग 2

#खजुराहो दर्शन भाग 2

#खजुराहो दर्शन भाग एक मध्ये #खजुराहो संदर्भातील मला माहीत असलेली ऐतिहासिक आणि पौराणिक माहिती मी दिली. तरीही मला हे सतत वाटतंय की अजूनही खूप काही सांगायचं बाकी आहे. मला वाटतं की मागील भागात जे फोटो राहिले आहेत; ते या भागात देते आणि त्याअनुषंगाने माझ्या मनातले विचार मी व्यक्त करते.


खरंच या शिल्पाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच. स्त्री आणि पुरुषाच्या चेहेऱ्यावरील तृप्ततेचे भाव दाखवत असतानाच दोघांचेही एक पाय वर आणि एका पायाचे आलिंगन इतक्या उत्कृष्ट रीतीने कोरणे अवघडतच आहे.



या शिल्पातील स्त्रीच्या पारदर्शक आणि मांडीपर्यंतच असलेल्या वस्त्राचा आभास कितीतरी सुदंर प्रकारे दाखवला आहे. त्याचबरोबर कदाचित अंघोळ करून बाहेर आल्यानंतर ती तिचे अंग पुसते आहे त्यामुळे तिच्या गळ्यातील हार मानेच्या बाजूला उलटा झाला आहे; हे देखील प्रतीत केले आहे



प्रियकर आणि प्रेयसीची प्रणायक्रिडा चालू असताना चोरून बघणाऱ्या पुरुषाला देखील प्रणय इच्छा झाली असल्याने तो हस्तमैथुन करत आहे. अस तर नसेल ना की हजारो वर्षांपूर्वी प्रणय केवळ बंद दाराआडच करावा असे नाही हा विचार मान्य असेल?





बहुदा त्याकाळात मोठ्या गुन्ह्याची शिक्षा ही हत्तीच्या पाई देणे ही असावी असं वाटतं आणि मनात येतं आजच्या काळात स्त्रियांवर जे अन्याय करतात त्यांना देखील हीच शिक्षा झाली पाहिजे


या शिल्पामध्ये दोन खास वैशिष्ट्य दिसून येतात. एकतर या स्त्रीने परिधान केलेले वस्त्र पारदर्शी आहे हे अत्यंत सुंदर पद्धतीने तिच्या पायाकडील नाजूक रेषेवरून दिसून येते. दुसरी खास गोष्ट म्हणजे या स्त्रीच्या उजव्या मांडीवरील विंचवाचे कोरीव काम. याचा अर्थ त्या काळात देखील टॅटू म्हणजेच शरीरावर गोंदवून घेण्याची पद्धत असावी. असे म्हणतात की विंचू हा उत्तम शरीरसौख्याचे प्रतीक आहे. कदाचित असे तर नसेल ना की त्याकाळात स्त्रिया अत्यंत मोकळेपणी आपली इच्छा अशाप्रकारे शरीरावर गोंदवून घेत असतील!




एका श्रीमंत सुखी कुटुंबाचे शिल्प! त्यांच्या बसण्याच्या आसनावरून त्यांची सांपत्तिक स्थिती लक्षात येते. त्याचप्रमाणे चेहेऱ्यावरील सुखी आणि आनंदी भाव देखील उत्तम रीतीने कोरलेले आहेत

याशिल्पकला बघताना माझ्या मनात सारखा एकच विचार येत होता की कसे असेल त्याकाळातील आयुष्य? या शिल्पांमधून एक गोष्ट खूपच स्वच्छ प्रतीत होते की त्याकाळात स्त्रीला आणि तिच्या भावनांना अनन्यसाधारण महत्व होते. त्याचबरोबर तिला बरोबरीची वागणूक मिळत असावी. समाजातील तिचे स्थान दुय्यम नव्हते. तिला तिची मते सांगण्याचा पूर्ण अधिकार होता आणि कदाचित त्याकाळात आपला शरीरसुखासाठीचा जोडीदार निवडण्याचा मोकळेपणा देखील तिला होता.

पण मग हा प्रश्न खरच मनात सतत येतो की पुढे जाऊन आपला इतिहास का बरं बदलला? आजदेखील आपण स्त्रीला दुय्यम दर्जा देतो. तिच्या घराबाहेरील कर्तृत्वाचा खूप गाजावाजा होत असला तरी तिचं घरातच असणं; घर आणि संसार सांभाळणं यात टी काही कौतुकास्पद करते आहे असं आपल्याला वाटतच नाही; हे किती दुर्दैवी! एक 'की और का' सिनेमा येऊन जातो.... आणि शेवटी केवळ लिंग बदलून तोच प्रश्न तोच विचार आपल्यासमोर ठेऊन जातो. स्त्री स्वातंत्र्याबद्दल बोलताना देखील तिने समजून उमजून योग्य कपडे घालावेत; असं मत स्त्रियांचं असतच न! मुलींना सलसपणे वागण्याचे वेगळे धडे नाही दिले जात.... मात्र दुर्दैवाने मुलांना स्त्रीसन्मान केला पाहिजे हे सांगावं लागतं!!!

आज आपली संस्कृती पुढारलेली आहे असं आपण मानतो.... हे खरं आहे की हजार वर्षांपूर्वी कदाचित आजच्यासारखे मोबाईल्स नसतील, गाड्या किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू नसतील.... मात्र मला वाटतं की ती संस्कृती विचारांनी आणि आचारांनी आपल्यापेक्षा जास्त प्रगत होती.