Friday, March 25, 2022

अनाहत सत्य (भाग 17)

 अनाहत सत्य

भाग 17

"भागीनेय तीक्ष्णा, मी काय करणार आणि काय करणार नाही हा सर्वस्वी माझा निर्णय राहील; हे अगोदरच ठरलं आहे. त्यामुळे माझ्या वतीने तू कोणतेही विधान करू नयेस अशी मी विनंती करते." अपालाचा आवाज तीव्र होता. तीक्ष्णाने क्रुद्ध नजरेने अपालाच्या दिशेने बघितले. ती एक पाऊल पुढे आली; पण मग आपले पाऊल मागे घेत ती तिथून निघून गेली.

"अपाला, तीक्ष्णाची इच्छा नाही म्हणून तू संभ्रमित आहेस का?" दुखावलेल्या आवाजात गोविंदने अपालाला विचारलं.

"गोविंद, माझं स्वत्व जपणं जर तुला कळत नसेल तर विषय इथेच संपतो. जे उत्तर मी भागीनेयला दिलं तेच तुला देते. मी माझ्या आयुष्यात काय करावं हा सर्वस्वी माझा निर्णय असेल. माझ्या आयुष्यात कोणत्या व्यक्तीला आणि कोणत्या कृतीला किती महत्व आहे; हे ठरवण्याचा अधिकार मी कोणालाही दिलेला नाही. गोविंद; माझा जन्म आणि माझं संगोपन खूप वेगळं आहे. भावनिकता हा आयुष्याचा एक भाग आहे.... संपूर्ण आयुष्य नाही; असं मी मानते. अर्थात त्यामुळे माझ्या भावनिक आयुष्यात अनेक प्रकारचं नुकसान होऊ शकतं हे देखील मी जाणून आहे." अपाला शांतपणे बोलत होती.

"अपाला मी तुला कधीतरी समजू शकेन का?" गोविंद गोंधळून म्हणाला.

"असं का म्हणतोस गोविंद?" अपालाने त्याचा हात प्रेमाने हातात घेत विचारलं.

"अपाला, तुझं भावनिक नुकसान मी होऊ देईन का?" अत्यंत भावनिक होत गोविंदने म्हंटलं.

"गोविंद, तू असताना मला कसलीच काळजी नाही; हे मी जाणून आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीची भावनिक ओढाताण सहन करण्याची क्षमता वेगळी असते. त्यामुळे माझ्या या अनेकदा तुटक वागण्यामुळे तुला त्रास होऊ शकतो. त्यात तू माझ्यासारखा भावनिक नाती कमी असलेला नाहीस. तुझ्यावर अनेक प्रकारच्या कौटुंबिक आणि सामाजिक जवाबदऱ्या आहेत. त्यामुळे कधीतरी तुझ्या धिराचा बांध फुटू शकतो. त्यामुळे सर्वात जास्त नुकसान माझंच होणार आहे; हे सत्य देखील मी जाणून आहे. म्हणूनच मी म्हंटलं माझ्या काही निर्णयांमुळे माझंच नुकसान होऊ शकतं." अपाला अत्यंत प्रेमाने बोलत होती.

"तुला जर इतकं कळतं आहे तर मग तू आपल्या दोघांसाठी आणि कुजरसाठी म्हणून तरी माझ्या सोबत नगरात चल अपाला." गोविंदने तिला परत एकदा विनवणी केली.

"नाही गोविंद. तू समजून घे; तुझी माझी ओळख आणि मैत्री आणि त्यानंतर प्रेम हे इथे मी आल्यानंतर निर्माण झालेली भावनिक गुंतवणूक आहे. त्यासाठी मी इथे ज्या उद्देशाने आले आहे तो बाजूला सारणं म्हणजे माझ्यावर सोपवलेल्या जवाबदरीपासून मी पळ काढला असं होतं. ते मला मान्य नाही. अर्थात ते देखील दुय्यम आहे. माझं पाहिलं प्रेम माझ्या कामावर आहे गोविंद. ज्यावेळी भागीनेय तीक्ष्णा महाराज कृष्णराज यांना भेटण्यासाठी राजदरबारी दाखल झाली होती; त्यागोदरच आम्ही जिथून आलो आहोत तिथे प्रत्येकाच्या कामाचा निर्णय झाला होता. त्यावेळी भागीनेय तीक्ष्णाने श्रीशंकर मंदिर निर्मितीची जवाबदारी घेतली होती आणि मी स्वतः दुसऱ्या स्थापत्य दुरुस्तीची जवाबदारी मागून घेतली होती....." अपाला बोलत होती आणि मध्येच गोविंदने तिला थांबवलं.

"स्थापत्य निर्मिती ना अपाला? तू चुकून दुरुस्ती म्हंटलंस." तो म्हणाला. त्याच्या बोलण्याने अपाला एकदम भानावर आली आणि त्याच्याकडे बघत स्थिर नजरेने म्हणाली; "हो! हो! स्थापत्य निर्मिती..... मी ज्या निर्मितीसाठी इथे आले आहे; ते काम अत्यंत क्लिष्ट आणि मोठ्या जवाबदरीचं आहे. त्यामुळे त्याच्यापुढे मला माझं भावनिक नुकसान महत्वाचं नाही. मुळात मी तुझ्यात गुंतणच योग्य नव्हतं. त्यामुळे मी भागीनेय तीक्ष्णाला सतत मला बोलण्यावरून दोष देखील देत नाही. गोविंद, आपल्या आयुष्यात असा एक क्षण येतो की ज्यावेळी आपल्याला लक्षात येतं की आपल्या समोर दोन मार्ग आहेत... एक प्रेम, भावना आणि भावनिक सुख आणि दुसरा कर्तव्य आणि मानवतेची जवाबदारी. आपण कोणता मार्ग निवडतो हा सर्वस्वी आपला निर्णय असतो. जे प्रेमात गुंततात; त्यांना कदाचित सर्वसामान्य आयुष्य मिळतं. जे कर्तव्याचा मार्ग निवडतात; त्यांचं नाव पुढे अजरामर होतं. पण तरीही एक अबाधित सत्य राहातं गोविंद; जे प्रेम निवडतात ते मनातून कायम दुसऱ्या मार्गावरील सुखाबद्दल विचार करतात; आणि जे कर्तव्याला महत्व देतात त्यांना भावनिक मार्गामध्ये जास्त मनःशांति मिळाली असती; असं वाटत राहातं."

"मला कळतं आहे अपाला तू काय सांगायचा प्रयत्न करते आहेस. तुझी दोलायमानता मला कळते आहे. पण म्हणजन तर मी तुला सतत सांगतो आहे की तुझ्या कामाच्या आड मी कधीच येणार नाही. मला तुझ्या सोबत विवाह करायचा आहे; हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हे देखील आहे की मी तुला विवाह कर असा आग्रह धरणार नाही. अपाला गेल्या काही वर्षांमधील तुझ्या सहवासात मला लक्षात आलं आहे की तुझं असं वेगळं आयुष्य आहे. त्यात खूप काही गूढ आहे; जे तुला मला सांगायचं नाही. कारण काहीही असेल... मी दुखावला जाईन; समजून घेऊ शकणार नाही किंवा तुला असलेली बंधनं. म्हणूनच तू माझ्याप्रमाणे जग असं मी म्हणणार नाही. मात्र माझ्या सोबत राहा ही एकच विनवणी कायम राहील माझी. अपाला, तू सोबत असलीस तर मी राज्यशासन योग्य प्रकारे करेन. तू सतत माझ्या डोळ्यासमोर राहा; असं देखील माझं म्हणणं नाही. माझी खात्री आहे की तू माझी आहेस आणि कायम माझीच राहाशील. पण तुझं अस्तित्व मला ऊर्जा देतं. तुला माझ्या सोबत ठेवण्यासाठी अजून एक महत्वाचं कारण आपला कुंजर बाळ देखील आहे. मला माहीत आहे की ज्या दिवशी तू माझी सोबत नाकारशील त्या दिवशी तू माझ्यापासून दूर होशील आणि तुझ्या बरोबर कुंजर देखील. अपाला, असं काही झालं तर त्यानंतर मला जगणं अशक्य होईल. मी चुकीचे निर्णय घेईन. तू जे म्हणालीस ते बरोबर आहे. माझ्यावर कौटुंबिक आणि सामाजिक जवाबदारी आहे. माझ्या चुकीचे निर्णयांचे परिणाम केवळ मला नाही तर; माझ्या नकळत अनेकांना भोगायला लागतील. या विचारानेच मी तुला सतत विनवतो आहे की माझ्या सोबत राहा."

"मी कोणताही शब्द देणार नाही गोविंद. माझं तुझ्यावर प्रेम आहे. कुंजर माझं सर्वस्व आहे... हे जितकं खरं आहे तितकंच सत्य हे देखील आहे की माझ्यावर एक मोठी जवाबदारी आहे. ते दायित्व मोठं आहे. विशेषतः आता; जेव्हा मंदिराचं काम पूर्ण होत आलं आहे; आणि माझ्या अखत्यारीत असलेलं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. माझं उत्तरदायित्व मोठं आहे गोविंद. तुला खरंच कळणार नाही; त्यात तुझा दोष नाही. जाऊ दे. आपण या विषयावर परत कधीतरी बोलू. यावेळी मला गेलं पाहिजे." असं म्हणून अपाला झपझप चालत तिथून निघून गेली.

गोविंद दिगमूढ होऊन ती गेली त्या दिशेने बघत राहिला. दुरून नाथ देखील त्याच्याकडे बघत होता. भीमतटरक्षक देखील एका बाजूला कुंजरला मल्ल युद्धाचे धडे देत गोविंदकडे बघत होता.

***

"अपाला, तुझं गोविंदमध्ये गुंतण मला मान्य नव्हतं; कारण आपल्याला भावनिक होण्याची परवानगी नाही; हे तू जाणून आहेस. तू घेतलेली जवाबदारी खूप महत्वाची आहे. केवळ श्रीशंकर मंदिर निर्मिती हा आपला उद्देश नाही हे तू जाणून आहेस. आपल्या पूर्वीच्या मानव रक्षकांनी येथील भूगर्भात जी नगर निर्मिती केली आहे; त्यातील त्रुटी भरून काढण्याची जवाबदारी तुझी आहे..." तीक्ष्णा अपालाला समोर बसवून बोलत होती. तिचं वाक्य मध्येच तोडत अपाला म्हणाली; "मी देखील तेच सांगते आहे भागीनेय तीक्ष्णा; तुझी जवाबदारी मंदिर निर्मिती आणि माझी जवाबदारी भूगर्भातील निर्मितीसाठी योग्य वायुविजन करणे ही आहे. मात्र अशी योग्य प्रकारे हवा खेळती राहावी यासाठी मी जे जे उपाय सांगितले आहेत ते सर्वच तू अमान्य केले आहेस. त्यामुळे माझं काम धीम्या गतीने होतं आहे. खरं तर आपलं दोघींचंही काम एकमेकांपासून वेगळं आहे. त्यामुळे मी तुझ्या कामात दखल दिली नाही; अर्थात जी मदत माझ्याकडून होईल ती केली आहे. मात्र तू माझ्या कामामध्ये कायम खोडा घातला आहेस. भागीनेय...."

"मी तुझी शत्रू नाही अपाला." तिला थांबवत तीक्ष्णा म्हणाली.

"मी जाणून आहे ते भागीनेय... तुझा अनुभव माझ्याहून मोठा आहे. म्हणूनच मी माझ्या कामात कायम तुझा सल्ला आणि मत गृहीत धरत आले आहे. मात्र आता तुझं जे सांगणं आहे ते मला मान्य नाही. आपली संस्कृती जपण्याची जवाबदारी आपलीच आहे; हे जरी मान्य असलं तरी तिथे परत जायचं किंवा नाही; हा निर्णय घेण्याची मुभा मला आहे; हे तू विसरू नकोस. मी योग्य वेळेत माझी जवाबदारी पूर्ण करून मग माझ्या आयुष्याचा निर्णय घेईन; हे नक्की." अपालाने स्पष्ट शब्दात तीक्ष्णाला इशारा दिला आणि तिथून निघाली.

***

"अपाला, तू गोविंदला तुझ्या खऱ्या अस्तित्वाबद्दल सांगणं आवश्यक आहे." भीमतटरक्षक अपाला सोबत बसून बोलत होता. पूर्ण चंद्राची रात्र होती; त्यामुळे संपूर्ण गुंफा प्रदेश चंदेरी प्रकाशात चमकत होता. कुंजर भीमाच्या मांडीमध्ये थकून झोपला होता. अपालाचं लक्ष भीमाच्या बोलण्याकडे फारसं नव्हतं. भीमाला ते लक्षात आलं.

"अपाला...." त्याने परत एकदा तिला हाक मारली.

"अं?!" अपालाची तंद्री मोडली गेली.

"तू सगळं सत्य गोविंदला सांगून टाक." परत एकदा भीमा म्हणाला.

"नाही भीमा. गोविंद हे समजूच शकणार नाही." तिने अत्यंत दुःखी आवाजात म्हंटलं.

"असं नको म्हणुस अपाला. मी ओळखतो गोविंदला. तो नक्की स्वीकारेल सत्य." भिमा म्हणाला.

"नाही भीमा. तू त्याला मित्र म्हणून ओळ्खतोस. मी त्याला माझा प्रियकर म्हणून ओळखते. माझा जन्म निसर्ग निर्मिती सोबत हजारो लाखो वर्षांपूर्वी झाला आहे; आणि मी अशा एका प्रजातीची प्रतिनिधी आहे ज्यांनी स्वतःला भूगर्भात लपवून घेतलं आहे; ज्यावेळी मानवीय आयुष्य लयाला जायला लागत; किंवा संपूर्ण नष्ट होतं; त्यावेळी आपण भूपृष्ठावर येऊन परत एकदा निर्मिती कार्य करतो...... हे ज्याक्षणी त्याला कळेल त्याक्षणी त्याच्या मानातली माझ्याबद्दलची प्रेम भावना संपुष्टात येईल. मी एक मानव स्त्री आहे म्हणून तो माझ्यावर प्रेम करतो. मी एक अतिप्राचीन मनुष्य निर्मिती आहे हे तो कधीच मान्य करू शकणार नाही." अपालाचा स्वर दुःखी होता.

"मला कळतं आहे तुझं दुःख अपाला. पण त्याला न सांगता तू निघून गेलीस तर तो तुला कधीच माफ करणार नाही. मात्र सांगून दूर गेलीस तर किमान तो त्याच आयुष्य सावरेल. कुंजरचं आयुष्य देखील योग्य प्रकारे मार्गी लागेल." भीमा कुंजरला कुरवाळत म्हणाला.

"मी जिथे असेन तिथे कुंजर असेल भीमा." अपाला म्हणाली.

"त्याच्यामध्ये सर्वसाधारण मनुष्याचा अंश आहे अपाला." भीमा म्हणाला.

"तो माझा पुत्र आहे भीमा; हे विसरू नकोस. तो जर इथे राहिला तर त्याचा त्रास होईल गोविंदला. कुंजर अत्यंत पराक्रमी आणि स्थिर मनोबलाचा राजा होईल; निःसंशय! मात्र भावनिकता आणि प्रेम यापासून दूर असल्याने तो कौटुंबिक प्रेम जवळ करणार नाही. त्यामुळे वंश वृद्धी होणार नाही. त्यातून निर्माण होणारा कोलाहल जास्त भीतीदायक असेल भीमा. आपण हे पूर्वी देखील बघितलं आहेच न. चाणक्य आणि चंद्रगुप्त यानंतर आपण केवळ साधन होण्याचा मार्ग निवडला आहे. त्या काळातील सर्वसाधारण मानवांमध्ये उपजत निर्माण होणाऱ्या मानसिकतेवर विश्वास ठेवत आपण त्यांना आपली निर्मिती सोपवून परत एकदा मागे फिरतो आहोत. त्यामुळे आता देखील असंच काहीसं होईल; हे मला माहीत आहे." अपालाने शांतपणे कुंजरला उचलत म्हंटलं. "भीमा उशीर झाला आहे. तुझे रक्षक तुझी वाट बघत असतील. तुला देखील तुझी जवाबदारी आवरती घेण्यास तीक्ष्णाने सांगितलंच असेल. त्यामुळे माझी काळजी करू नकोस. मी योग्य मार्ग आणि उपाय शोधून काढीन याची मला खात्री आहे. निघ तू." एक क्षण अपालाच्या डोळ्यात बघून भीमाने कुंजरला तिच्या हातात सुपूर्द केलं आणि तिथून उठून तो त्याच्या कामाला निघाला.

***

"तू तुझी जवाबदारी विसरतो आहेस नाथा." सुमंत कल्याण यांचा आवाज तीव्र होता. नाथाची नजर झुकलेली होती. "तुला राजकुमार गोविंदराज यांचा सखा होण्याची जवाबदारी देण्यात आली आहे; तो विशेषाधिकार नाही; हे तुला माहीत असावं असं मी मानतो." नाथाला सुमंत कल्याण यांचा प्रत्येक शब्द टोचत होता. मात्र त्यावर तो काहीच बोलत नव्हता.

"राजकुमार गोविंदराज यांनी नगर प्रवेश करावा आणि योग्य विवाह बंधन स्वीकारून राज्यधुरा सांभाळावी अशी महाराज कृष्णराज यांची इच्छा आहे. त्यांची मनोकामना आहे की राज्य व्याप्ती वाढवावी आणि राष्ट्रकूट घराण्याचा एकछत्री अम्मल भारतवर्षावर राहावा. जेणेकरून लोकांना सुखी समृद्ध आयुष्य जगता येईल. मात्र त्यासाठी गोविंदराज यांनी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यांच्या सोबत राहून त्यांचं मन वळवणे ही तुझी जवाबदारी आहे." सुमंत कल्याण अत्यंत कठोर आवाजात बोलत होते.

"मी जाणून आहे सुमंत. मी माझ्या बाजूने सतत प्रयत्न करत असतो. मात्र गोविंदराज यांच्या अपाला बद्दलच्या भावना अत्यंत कोमल आणि तरीही तीव्र आहेत. तिच्यापासून दूर जावे लागेल अशी कोणतीही बाजू ऐकून घेण्यास देखील ते तयार नाहीत." नाथाने त्याची अडचण सांगण्याचा प्रयत्न केला.

"नाथा, एक गोष्ट समजून घे. माझा त्या अपालावर किंवा त्या तीक्ष्णावर काडी इतका देखील भरवसा नाही. तीक्ष्णा ज्यावेळी प्रथम महाराजांना भेटण्यास आली त्यावेळी देखील तिचा प्रत्येक शब्द प्रमाण असावा असा तिचा आग्रह होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराजांनी देखील तिचा प्रत्येक शब्द मान्य केला. तिने महाराजांची भेट मागितली. ठरल्या प्रमाणे महाराज, तीक्ष्णा आणि मी असे विशेष कक्षात दाखल झालो. मात्र मला पाहाताच तिने बोलण्यास नकार दिला. एरवी असं कोणी म्हंटलं असतं तर महाराजांनी त्या व्यक्तीस निघून जाण्यास सांगितलं असतं. मात्र महाराजांनी तिला बसवून घेतलं आणि त्यादोघांमध्ये जी चर्चा होईल त्याबद्दल मला ते नंतर सांगतील असं सांगून मला तिथून निघण्यास सांगितलं. तो दिवस आणि आजचा दिवस.... ती तीक्ष्णा ज्या ज्या वेळी महाराजांना भेटण्यास येते त्या-त्या वेळी ती एकटीच भेटते. त्यानंतरच्या आमच्या भेटीमध्ये महाराज त्यांच्या भेटीमधील निर्णयांसंदर्भात माझ्याशी चर्चा करतात; हे जरी खरे असले तरी.... मुळात त्या दोघांमध्ये काय बोलणे होते ते मला माहीत नाही. तीक्ष्णाने महाराजांसमोर मंदिर बांधणी सोबत अजूनही काहीतरी वेगळा प्रस्ताव ठेवला असावा असा मला संशय आहे. महाराजांनी जरी स्पष्ट तसे मला सांगितले नसले तरी राजकुमार गोविंदराज यांना मंदिर निर्मितीच्या कामाची पाहणी करण्याची जवाबदारी महाराजांनी दिली त्यावरूनच तिथे मंदिर निर्मिती सोबतच अजूनही काहीतरी कार्य असावे असं मला वाटतं. अर्थात.... दिलेली जवाबदारी विसरून राजकुमार गोविंदराज त्या अपालाच्या प्रेमाबंधनात अडकले आहेत. गेली अनेक वर्षे ते तिथेच असतात. त्यादोघांचा पुत्र कुंजर! ना विवाह केला आहे ना करण्याची इच्छा आहे अपालाची. त्यामुळे महाराजांनी जे ठरवलं आहे ते देखील तडीस जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. यावर एकच उपाय आहे नाथा. राजकुमार गोविंदराज यांचा नगर प्रवेश. अपाला आणि कुंजर सोबत किंवा सोबतीशिवाय. यासाठी तुला जे काम दिले आहे ते तू लवकरात लवकर तडीस नेणे आवश्यक आहे." आपलं बोलणं थांबवत सुमंत कल्याण यांनी नाथाकडे बघितलं. त्यांच्या त्या थंड नजरेने आणि शब्दांनी नाथा जे समजायचं ते समजला.

"मी तुमच्या शब्दाबाहेर नाही सुमंत." तो कसंबसं म्हणाला.

"उत्तम. दोन दिवसांनी मला येऊन भेट नाथा." सुमंत म्हणाले आणि त्यांच्या बोलण्याला होकार देत नाथा बाहेर पडला.

क्रमशः

Friday, March 18, 2022

अनाहत सत्य (भाग 16)

 अनाहत सत्य


भाग 16

"आयला! गोविंद भडकली रे ती. पहिल्यांदा तुला असं वागताना बघितलं यार! असा अचानक तिच्यावर काय गेलास? जा आता मस्का मारून परत आण तिला. By the way; महिजी तुम्ही मात्र मस्त स्टोरी रंगवत होतात हा. मजा येत होती ऐकताना." शेषा बडबड करत होता. त्याचं गोविंदकडे लक्ष नव्हतं. गोविंदचा चेहेरा कमालीचा चिडलेला होता. त्याने एकदा शेषाच्या दिशेने रागीट कटाक्ष टाकला आणि संस्कृती गेली होती त्या दिशेने तो तरातरा निघून गेला.

"स्टोरी? तुम्हाला काय मी उगाच रचून सांगितलेली गोष्ट वाटते का ही?" महिचा आवाज देखील चढला होता.

"मग काय? तुम्ही होतात का त्या राजदरबारामध्ये? राजा बरोबर? तो राजा काय बोलतो; काय करतो ते बघायला?" खदाखदा हसत शेषाने प्रश्न केला.

शेषाच्या त्या वाक्याने तर मही भलताच चिडला आणि ताडकन उभा राहिला. परिस्थिती एकदम तापलेली बघून जस्सी मध्ये पडला आणि एकदम दोघांना शांत करत म्हणाला; "अरे... अरे... तुम्ही दोघेसुद्धा काय भांडायला लागलात? शांत व्हा बघू! जाऊ दे ही सगळी चर्चा. यार शेषा.... तुझं घड्याळाकडे लक्ष आहे का? यार चार वाजून गेले आहेत. अजून आपण फक्त या सुरवातीच्या काही गुंफा बघितल्या आहेत. त्यात इथे कशाला आलो होतो ते राहीलं आहे बाजूला आणि आपण या गुंफा बघत फिरायला लागलो आहोत. आता गोविंद आणि संस्कृतीला येऊ दे. आपण निघू परत जायला. उद्या येऊया परत. काय हो महिरक्षक; तुम्ही उद्या असाल का पुढच्या गुंफा दाखवायला? की आम्ही उद्यासाठी वेगळा गाईड शोधायचा?"

जस्सी बोलत होता. मात्र शेषा आणि मही एकमेकांकडे खाऊ की गिळू असे बघत उभे होते. खरं तर जस्सीला ते कळत होतं; पण तो त्याकडे दुर्लक्ष करत होत. त्याने गोविंद गेला त्या दिशेने तोंड करत मोठ्याने गोविंदला हाक मारली; "गोविंद... यार संस्कृतीला घेऊन बाहेर ये; आपण निघुया. आजसाठी इतकंच पुरे."

मात्र.... जस्सीचा आवाज गोविंद आणि संस्कृतीपर्यंत पोहोचत होता की नाही.............

"सॉरी संस्कृती! मला लक्षात आलं की तू नक्की काहीतरी असं बोलून जाणार आहेस की त्याचा परिणाम अवघड होईल सांभाळायला. अग, जस्सी आणि शेषा आपलेच आहेत. पण हा गाईड! मला मुळात तो फार पटत नाहीय. त्यात त्याच्या समोर तू काहीतरी असं बोलली असतीस; ज्यामुळे सगळं एकदम उघड झालं असतं; म्हणून तुला थांबवायला मी....." गोविंद बोलत बोलत गुंफेच्या आत जात होता. त्याला संस्कृती दिसत होती. काहीशी आत गेलेली. त्याच्याकडे पाठ करून उभी असलेली. तो जसजसा आत जात होता; तसतसा त्याचा आवाज घुमायला लागला होता. त्याचं त्यालाच ते थोडं विचित्र वाटत होतं. तो एकीकडे संस्कृतीशी बोलत होता; तिला विनवत होता.... आणि दुसरीकडे त्याच्या मनात वेगळेच विचार चालू होते. 'आपला आवाज इतका धीरगंभीर आहे? वा! मस्तच वाटतं आहे आपलाच आवाज ऐकताना!' हा विचार आला आणि त्याचं त्यालाच हसू आलं. तो क्षणभर थांबला.

समोरच संस्कृती उभी होती..... 'अं!? संस्कृती!?' बांधा सांस्कृतीसारखाच होता. गोविंदची चूक होऊच शकत नव्हती.... पण तरीही..... ती?? 'यार भुरे कुरळे तर आहेत केस संस्कृती सारखे. फक्त विचित्र बांधले आहेत. संस्कृती घट्ट बो बांधते किंवा मोकळे ठेवते. बाजूला सॅक आहे की संस्कृतीची. जीन्सच आहे न? की काय असं घट्ट घातलं आहे? दोन्ही हात कंबरेवर ठेऊन अशी उभी राहात नाही संस्कृती. आयला! लाकडी बांगड्या आहेत का? गळ्यात काय आहे ते? कधी घेतलं? आपण पुढे येत होतो तेव्हा ते बाहेर हातात माळा घालून विकायला उभे राहिलेले लोक होते त्यांच्याकडून घेतलं की काय? पण आपल्या लक्षात नाही आलं का?' गोविंदचं मन आता अजून गोंधळायला लागलं होतं.

"जीन्स आणि टॉप घालून गुंफेच्या आत आलीस न ग? मग आता हे काय घातलं आहेस? कपडे कधी बदललेस ग?" काहीसा चेष्टेचा आणि खुपसा आश्चर्य वाटलेला आवाज होता गोविंदचा. "ए! संस्कृती!?" गोविंदने संस्कृतीला हाक मारली. 'दुसरी कोणी असावी की काय ती? पण कसं शक्य आहे? आपण सगळे बाहेर बसलो होतो तेव्हा या गुंफांच्या दिशेने कोणीच आलं नव्हतं. संस्कृती चिडून आतल्या दिशेने आली तेव्हा तर नक्की कोणी नव्हतं. मग...!???....' गोविंद पुरता सैरभैरला होता. तो तसाच थोडा पुढे गेला.

"यार संस्कृती! काय चेष्टा चालवली आहेस?" त्याच्या आवाजातला गोंधळ आणि खर्ज वाढत होता. तो आता त्या मुलीच्या अगदी जवळ येऊन पोहोचला होता. त्याने हात पुढे करून तिच्या खांद्यावर ठेवला आणि ती मागे वळली.

सुंदर भुऱ्या डोळ्यात काजळ, नाकामध्ये लाकडी पण सुंदर नाजूक दागिना, उंच मानेचं सौंदर्य वाढवणारी लाकडी नक्षीदार जाड पट्टी होती गळ्यात. तशाच नक्षीदार पट्ट्या हातात आणि पायाशी देखील; तिने घातलेल्या चांबडी बूट सदृश पायताणांच्या वर. ते बूट.... किंवा जे काही होतं ते..... गुढग्याच्याही वरपर्यंत बांधलेलं होतं. दोन्ही खांद्यांवर गाठी बांधलेला जाड कपडा.... तिच्या शेलाट्या सुंदर कोरीव-बांधीव बांध्याची कल्पना देत होता........ ती..... ती तीच होती!

...... संस्कृती!!! अहं!!! ...................... अपाला!!! बाजूला पडलेल्या चांबडी पिशवीतून बाहेर दिसणारी हत्यारं.... आणि सुंदर, मोहक चेहेऱ्यावरचा आत्मविश्वास आणि डोळ्यातली घट्ट पकड!!! ती अपालाच होती. गोविंदची खात्री झाली. 'माझी अपाला! याच मोहक सर्वांवर केवळ डोळ्यांनी नियंत्रण ठेवणाऱ्या चेहेऱ्याने वेड लावलंय आपल्याला.'

"गोविंदराज.... " अपालाने त्याला हाक मारली आणि त्यांची नजरानजर झाली.

गोविंदराजच्या पायात देखील अपाला प्रमाणे बूट सदृश काहीतरी होतं. अगदी मांड्यांपर्यंत पोहोचणारं. कंबरेला बांधलेल्या अधनियाचा काचा मांड्यांवर व्यवस्थित गच्च बसला होता. मात्र हातात आणि गळ्यात असलेल्या सोनेरी आणि चंदेरी धातूच्या कड्यांमुळे गोविंदचं 'राज' असणं अधोरेखित होत होतं.

"आपण दोघेच असताना तू मला फक्त गोविंद म्हणशील असा शब्द दिला आहेस अपाला." त्याचा आवाज प्रेमाने ओथंबलेला होता.

"हो! पण आपण इथे एकटे नाही आहोत." अपालाचा आवाज काहीसा मृदू, मिश्किल होता. तिने नजरेनेच तिच्या मागे कोणीतरी असल्याची खूण केली आणि गोविंदने तिच्या खांद्यावरून मागे नजर टाकली. जेमतेम तीन-साडेतीन फूट उंचीचे तिघे उभे होते. लुकलूकणाऱ्या डोळ्यातले भेदरलेले भाव, एका हातातली अवजारं सांभाळत आणि दुसरा हात मागे घेतलेला, तोंडात काहीतरी खाल्ल्याचा तोबरा भरलेला.... मात्र शरीराचा पिळदार, मजबूत घाट नजरेत भरण्याजोगा होता. त्यांच्याही मागे कोणीतरी होतं.... दोन गोड लूकलूकणारे हसरे डोळे.

"कुंजरराज....." गोविंदचा हुकमी आवाज गुंफेमध्ये घुमला.

"मी असाच इथे आलो होतो. मला नव्हतं माहीत इथे काम चालू आहे." एक गोड बालिश आवाज आला.

"बाहेर ये आधी." अपालाने हसत हात पुढे केला आणि तिच्या करंगळीला लहानशा नाजूक बोटांची मिठी बसली.

"कुंजर... किती वेळा सांगितलं आहे; मी काम करत असताना असं येऊ नकोस." अपालाने आपल्या लेकाचा; कुंजरचा; चेहेरा कुरवाळत म्हंटलं.

"पण मला तुला हे द्यायचं होतं मा." हातातल्या टोपलीतलं फळ पुढे करत तो म्हणाला. त्याने दिलेलं फळ प्रेमाने हातात घेत तिने त्याचा हात गोविंदच्या हातात दिला आणि म्हणाली; "मी येतेच थोड्या वेळात."

"हो! मी वाट बघतो." गोविंद म्हणाला आणि कुंजरचा हात हातात घेऊन गुंफेतून बाहेर पडला.

***

"गोविंदराज; आपण मंदिराजवळील वृक्षवाटिकेमध्ये थांबलात तर बरे होईल." गुंफेतून बाहेर येणाऱ्या गोविंदला सामोरे जात नाथा म्हणाला.

"बरं. चल; सोबतच जाऊ." गोविंदने कुंजरचा हात सोडून दिला. उड्या मारत कुंजर पुढे निघाला आणि गोविंदच्या दोन पावलं मागून नाथा चालायला लागला.

"राजकुमार!" काहीसं पुढे गेल्यावर नाथाने गोविंदला हाक मारली.

"बोल नाथा. मी ऐकतो आहे." मागे वळूनही न बघता गोविंद म्हणाला.

"महाराजांचे सुमंत कल्याण आपल्या भेटीसाठी थांबले आहेत." नाथाचा आवाज अजिजीचा होता.

"नाथा, तू वृक्षवाटिकेचा उल्लेख केलास त्याचवेळी माझ्या लक्षात आलं होतं. परत एकदा तेच प्रश्न आणि माझी तीच उत्तरं. तीच चर्चा आणि ..... जाऊ दे. तुला तरी मी काय सांगणार? मित्र आहेस माझा. सोबतीने चाल; इतकी विनंती देखील तू मान्य करत नाहीस माझी. मग इतरांना मी काही सांगून ते कितपत माझं म्हणणं ऐकतील याबद्दल मला शंकाच आहे." गोविंद शांतपणे बोलत होता. त्याचा स्वर मात्र दुखावलेला होता.

"राजकुमार, तुम्ही मला मित्र मानता हा माझा सन्मान आहे. एरवी मी नक्कीच तुमच्या सोबत चाललो असतो. मात्र सुमंत कल्याण यांनी जर मला तुमच्या सोबत पाऊल उचलताना बघितलं तर नगरातील माझे वृद्ध वडील मला परत कधीच दिसणार नाहीत; याची मला कल्पना आहे." नाथाचा आवाज दबलेला होता.

"मलाही त्याची कल्पना आहे नाथा. चल.... सुमंत कल्याण वाट बघत आहेत." गंभीर आवाजात गोविंद म्हणाला.

"राजकुमार गोविंदराज; प्रणाम." कंबरेत झुकत सुमंत कल्याण म्हणाले. मात्र त्यांच्या आवाजातला ताठरपणा आणि ताठ मानेने गोविंदच्या नजरेला दिलेली नजर यातून 'प्रणाम' शब्द कितपत अर्थपूर्ण होता याबद्दल गोविंदच्या मनात शंका होती.

"प्रणाम सुमंत. आज इथे या दगडांच्या राशींमध्ये येण्याचं प्रयोजन?" गोविंदने चेहेऱ्यावर कोणतीही भावना येऊ न देता प्रश्न केला.


"राजकुमार, आपण जाणताच. आदरणीय मही कृष्णराज उत्तरेकडील स्वारीची तयारी करत आहेत. त्यांची इच्छा आहे की आपण एकदा तरी नगरात येऊन त्यांना येऊन भेटून जावेत." सुमंत कल्याणने महाराजांची इच्छा बोलून दाखवली.

"बरं. येईन म्हणून निरोप द्यावात." गोविंदचा स्वर अजूनही भावनाहीन होता.

"कधी याल म्हणून सांगू?" सुमंत कल्याणने परत एकदा प्रश्न केला.

"या तुम्ही सुमंत." गोविंद म्हणाला आणि मागे वळून तिथून निघून गेला.

"नाथ." सुमंत कल्याणने नाथाला हाक मारली.

"सुमंत!" मान खाली घालून अत्यंत लीन आवाजात नाथाने उत्तर दिलं.

"तू बहुतेक केवळ मित्रत्वाचं नातं लक्षात ठेऊन आहेस." सुमंत कल्याण यांच्या आवाजातला थंडपणा नाथाच्या अंगावर काटा उभा करून गेला.

"सुमंत......" नाथ काहीतरी बोलणार होता. पण सुमंत कल्याणने उजवा हात वर करत त्याला थांबवलं आणि म्हणाला; "नाथा हे कधीही विसरू नकोस. आपली प्रामाणिकता राजसिहासनाशी असते. व्यक्तीसापेक्ष नसते. आज आदरणीय महाराज कृष्णराज या सिंहसनाधीश आहेत. त्यामुळे तुझी सेवा त्यांच्या चरणी रुजू होणे आवश्यक आहे."

"सुमंत... मी आपल्या शब्दाबाहेर नाही." नाथाचा आवाज अजूनच केविलवाणा झाला होता.

"मी सुमंत... राष्ट्रकूट घराण्यातील महिंचा रक्षक आहे. माझ्यासाठी माझे काम हा माझा कर्मयोग आहे. महिरक्षक असणे हा माझा सन्मान समजतो मी. परंतु मला असं का वाटतं आहे की तुझी सेवा महिंच्या चरणी रुजू करण्यापेक्षा इथे राजकुमार गोविंदराज यांच्या सोबत एक मित्र म्हणून राहण्यात तुला जास्त धन्यता वाटते आहे!" सुमंत कल्याण त्याच थंड आवाजात बोलत होते.

"सुमंत आपण विश्वास बाळगावात. माझ्या मानत कायम मही कृष्णराज यांच्या मनीची इच्छा हाच एक विचार असतो. वेळ येईल तेव्हा माझी सेवा मही चरणी अर्पण करेन; याची आपण पूर्ण खात्री बाळगावीत." नाथाच्या शब्दांवर सुमंत कल्याण यांचा कितपत विश्वास बसला ते नाथाला कळले नाही. पण एक उग्र कटाक्ष त्याच्या दिशेने टाकून सुमंत तिथून निघून गेले.

नाथाने एक दीर्घ निश्वास टाकला आणि मागे वळून तो राजकुमार गोविंदला शोधण्यास निघाला. दूरवर त्याला राजकुमार गोविंदराज दिसले. ते लेण्यांच्या रक्षणासाठी सतत जागरूक भीमतटरक्षक सोबत बसले होते. नाथाने भराभर पावलं उचलली आणि त्यांच्या जवळ जाऊन पोहोचला.

भीमतटरक्षक उंचापुरा प्रचंड मोठी शरीरयष्टी लाभलेला होता. आकाशातील घारीच्या चोचीतला साप देखील एका सध्या दगडाच्या फेकीत तो खाली पाडू शकत असे; इतकी तेज नजर होती त्याची. मात्र लेण्यांच्या संपूर्ण रक्षणाची जवाबदारी तीक्ष्णा त्याच्याकडे सुपूर्द करताना त्याच्या तल्लख बुद्धीचा विचार जास्त केला होता.

नाथाने पुढे होत भीमाला वळसा घातला आणि त्याच्या पुढ्यात गेला. भीमा लहानग्या कुंजरचा हात धरून त्याला उंच उडी मारण्यास शिकवत होता. कुंजर प्रत्येक उद्दीनंतर खिदळत होता. "कुंजर, तू केवळ मस्ती करतो आहेस हं. मी तुला खेळवत नाही आहे बेटा. उंच उडी आणि लांब उडी हा चपळतेवर मिळवायच्या नियंत्रणावरचा पहिला पाडाव आहे." भीमा एकीकडे हसत पण कुंजरला रागावत असल्याप्रमाणे बोलत होता.

कुंजरवर मात्र त्या बोलण्याचा काहीही परिणाम होत नव्हता. "पण भीमा काका, मी तेच तर करतो आहे. पाडाव पार करण्यासाठी तुमच्या हाताची गरज आहे मला." खिदळत कुंजरने उत्तर दिलं. त्याच्या उत्तरावर गोविंद, भीमतटरक्षक आणि नाथ सगळेच हसले. नाथ आलेला बघून भीमाने कुंजरच्या उड्यांच्या खेळाला थांबवलं आणि त्याच्याकडे बघत म्हणाला; "छे! दमलो बुवा तुझ्या शक्तीपूढे. आता मला थोड्या विश्रांतीची गरज आहे. तू पळ बघू. जा तुझ्या सोबत्यांसोबत खेळ."

"भीमा काका, मी लहान आहे; मंदबुद्धी नाही. तुम्हाला तातांसोबत आणि नाथ काका सोबत काहीतरी महत्वाचं बोलायचं असावं. ठीक. जातो मी खेळायला." असं म्हणून कुंजर निघाला. पण परत मागे वळून गोविंदकडे बघत तो म्हणाला; "तात, मा येईलच एवढ्यात. याल ना तुम्हीसुद्धा?" गोविंदने होकारार्थी मान हलवली आणि कुंजर गोडसं हसत तिथून पळत गेला.

"हुशार आहे कुंजर." तो गेला त्या दिशेने बघत नाथ म्हणाला.

"प्रश्नच नाही. म्हणूनच अपालाने त्याचं नाव कुंजर ठेवलं आहे. कुंजर.... गजराज आहे तो. अत्यंत बुद्धिवान! त्याचं शक्तीसामर्थ्य मी नक्कीच गजराजांप्रमाणे निर्माण करीन." कुंजर गेलेल्या दिशेने कौतुकाने बघत भीमतटरक्षक म्हणाला.

"तुम्हा दोघांचं कुंजरचं कौतुक करणं संपलं असलं तर आपण थोडं महत्वाचं बोलूया का?" गोविंदच्या आवाजातील गंभीरता लक्षात येऊन भीमा आणि नाथ दोघेही गोविंद समोरील दगडांवर बसले.

"सुमंत कल्याण परत तेच सांगायला आले होते न?" बराच वेळ शांततेत गेल्यानंतर कुठूनतरी सुरवात करावी या विचाराने भीमाने विषयाला तोंड फोडले.

"हो" इतकंच म्हणून गोविंद शांत बसला.

"पण त्यांचं म्हणणं मला तरी चुकीचं नाही वाटत राजकुमार." नाथाचा आवाज अजिजीचा होता.

"नाथ, मला देखील पिताजींची इच्छा चुकीची नाही वाटत. उत्तरेकडे चाल करून जाण्याचा त्यांचा मानस आहे. मला माहीत आहे की त्यांना सर्व ऋतू दोनवेळा अनुभवावे लागतील या प्रवासात. त्यामुळे त्यांची इच्छा आहे की मी राजगादी स्वीकारावी. सुमंत कल्याण यांनी देखील मला अनेकदा हे सांगितलं आहे. सुमंत पिताजींचे केवळ सल्लागार नाहीत; तर अत्यंत जवळचे मित्र आहेत. त्याहूनही महत्वाचं म्हणजे ते राष्ट्रकूट राजपरिवाराचे अत्यंत विश्वासार्ह सल्लागार आणि हितचिंतक आहेत." गोविंदचा स्वर आता थोडा समजूतदार होता. त्याच्या आवाजातला फरक जाणवल्याने नाथाने मनातच निश्वास सोडला.

"राजकुमार तुम्हाला सर्वच माहीत आहे. मग तरीही तुम्ही त्यांचं म्हणणं मान्य करत नाही आहात." नाथ म्हणाला.

"नाथा, तुला देखील सगळं माहीत आहे. तरी देखील तेच ते माझ्या तोंडून वदवून घ्यायला तुला का आवडतं ते मला अजूनही कळलेलं नाही. मी एकदाही म्हंटलेलं नाही की मला राजगादी नको. सुमंत कल्याण यांना देखील मी अनेकदा सांगितलं आहे की नगरात येऊन मही कृष्णराज यांच्या चरणी स्वतःला ठेवण्यात मला माझ्या आयुष्याची पूर्तता वाटते. मात्र; नाथा; तू चांगलंच जाणून आहेस की राजसीहासनापेक्षा देखील माझ्या आयुष्यात अपाला आणि कुंजर जास्त महत्वाचे आहेत. ज्याक्षणी अपाला आमच्या विवाहाचा प्रस्ताव मान्य करेल आणि माझ्या सोबत नगरात येण्यास रुकार देईल; मी एक क्षण देखील इथे थांबणार नाही." गोविंद म्हणाला.

"आणि मी का देईन रुकार आपल्या विवाहाला?" मागून अपालाचा आवाज ऐकून तिघांचेही डोळे मोठे झाले. भीमा आणि नाथ उठून उभे राहिले.

"माझी कामाची वेळ झाली. एकदा पूर्ण फिरून योग्य जागी रक्षक उभे आहेत का ते बघून घेतो." असं म्हणत भीमाने तिथून काढता पाय घेतला.

"कुंजरने बोलावलं होतं मला." नाथा स्वतःशीच बोलल्या सारखं करून भीमाच्या मागोमाग गेला.

"गोविंद! तुला देखील जायचं आहे का?" अपालाने गोविंदकडे बघत म्हंटलं.

"नाही. मला जाणून घ्यायचं आहे; का नाही करणार तू विवाह?" गोविंद शांतपणे म्हणाला.

"पुन्हा तेच? ज्याप्रमाणे सुमंत तुला नगरात येण्याविषयी सांगण्यास थकत नाहीत; त्याप्रमाणे तू मला तोच प्रश्न परत परत विचारण्यास थकत नाहीस. बरं! मी देखील उत्तर देण्यास थकणार नाही. गोविंद, विवाह बंधन का? आपण दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहोत; एकमेकांशी प्रामाणिक आहोत. तुझ्यामुळेच मला कुंजर प्राप्त झाला आहे. त्यासाठी नक्कीच मी तुझ्याशी आयुष्यभर एकनिष्ठ राहीन. मात्र गोविंद, कुंजर इतकंच माझं माझ्या कामावर प्रेम आहे. तीक्ष्णा सोबत मी देखील या विशाल शिव मंदिराच्या पूर्णत्वाचं स्वप्न बघितलं आहे. सर्वोत्तम मूर्ती निर्मिती आणि कळसाकडून मंदिर निर्मिती हा स्थापत्य अविष्कार तीक्ष्णा आणि मी नक्कीच पूर्णत्वास नेणार आहोत. त्यामुळे माझं काम पूर्ण होईपर्यंत मला त्यामध्ये खंड होईल असा कोणताही निर्णय घ्यायचा नाही." अत्यंत स्थिर आवाजात अपाला बोलत होती.

तिच्या जवळ जात तिचा हात हातात घेऊन गोविंद म्हणाला; "पण मी तुझ्या कामाच्या आड येतच नाही अपाला. तुझं हे स्वत्व जपून माझ्यावर प्रेम करणंच तर मला तुझ्या प्रेमात जास्त गुंतवून ठेवतं आहे. मी तुला आत्ता विवाह कर असं मुळीच म्हणत नाही. फक्त शब्द दे अपाला; की तू तुझ्या मंदिर पूर्ती नंतर देखील माझ्या सोबत असशील. तू कोणत्याही क्षणी मला सोडून निघून जाशील ही भीती मला कायम असते ग. म्हणून तर एका दिवसासाठी देखील मी नगरात जाण्याचा विचार करत नाही. अपाला; तुझ्या सर्व जवाबदारी संपल्या की मग आपण विवाह करू. नाहीतरी मही कृष्णराज यांना येण्यास दोन ऋतू काळ इतका अवधी लागणार आहे. तोवर तुझं निर्मिती कार्य पूर्ण होईलच. त्यानंतर आपण विवाह करू."

"अपाला विवाह करणार नाही." मंदिराच्या बाजूने सामोरे येत तीक्ष्णाने स्पष्ट शब्दात विधान केले.

क्रमशः


Friday, March 11, 2022

अनाहत सत्य (भाग 15)

 अनाहत सत्य

भाग 15

"माझी नजर तुझ्यावर आहे हे विसरू नकोस नाथा. तुझा उद्देश तू शब्दात सांगणार नाहीस; याची मला कल्पना आहे. पण तुला माझ्या क्षमतेचा अंदाज नाही. अजूनही तुझ्या उद्देशाचा मला व्यत्यय नाही. त्यामुळे उगाच कोणतेही वेगळे कृत्य करून गोविंद आणि अपाला यांच्या समोर मला अजून वेगळं चित्र उभं करायचं नाही. पण जर तुझं एकही कृत्य माझ्या उद्देशाच्या आड आलं तर मी कोणताही विचार करणार नाही." नैनाची नजर तीक्ष्ण होती आणि त्याहूनही तीक्ष्ण तिचे शब्द होते.

"शेषा?" जस्सीने शेषाच्या खांद्याला स्पर्श केला आणि विजेचा झटका बसावा तसा शेषा एकदम धडपडला. त्याची नजर भेदरलेली होती आणि नजरेतली सगळी ओळख पुसली गेली होती.

"अरे अरे?! काय झालं शेषा? ठीक आहेस ना?" त्याच्या जवळ जाऊन त्याला हात देऊन उठवत जस्सी म्हणाला.

शेषा भानावर आला. "अं?! हो हो! मी ठीक आहे. म्हणजे... अरे मला कळलंच नाही; पण काहीतरी झालं आत्ता इथे. आर मी....." शेषा जस्सीला काहीतरी सांगणार इतक्यात गोविंदने त्या दोघांनाही हाक मारली.

"जस्सी... शेषा... यार किती संथ आहात! चला लवकर या. अजून खूप काही बघायचं आहे." गोविंद बराच पुढे जाऊन उभा होता. तो एकटाच होता ते बघून जस्सीने त्याला लांबूनच ओरडून विचारलं; "अबे... संस्कृती कुठे आहे? तिला एकटीला सोडू नकोस त्या मही सोबत... चल रे शेषा... एकतर मला तो मही फारसा आवडत नाहीय. त्यात या गोविंदने तिला एकटीला सोडलेलं दिसतं आहे त्याच्या सोबत." असं म्हणून जस्सी भराभर पावलं उचलत गोविंदच्या दिशेने निघाला. शेषाने एकदा मागे वळून बघितलं. आपल्याला आत्ता जो अनुभव आला तो भास होता की सत्य!? शेषाच्या मनात आलं. पण इतक्यात पुढे गेलेल्या जस्सीने परत एकदा त्याला हाक मारली आणि मग मात्र शेषा गोविंद आणि जस्सीच्या दिशेने निघाला.

जस्सी आणि शेषा जवळ पोहोचले तसा गोविंद समोरच्या लेण्याच्या आत जायला निघाला. जस्सी देखील त्याच्या सोबत चालायला लागला. शेषाने परत एकदा गोविंदच्या काही पावलं मागे चालणं पसंत केलं. आता तर त्याची नजर अजूनच शोधक झाली होती. आपण नक्की काय शोधतो आहोत; हे त्याला देखील कळत नव्हतं. पण नुकताच आलेला अनुभव त्याच्या मनात ठाण देऊन बसला होता.

'नैनाच होती ती. पण तरीही काहीतरी वेगळं होतं तिच्यात. काय बरं? आणि नक्की काय म्हणाली ती? मला नाथा म्हणाली का? नाथा? कोण नाथा? गोविंद आणि अपाला! गोविंद म्हणजे आपला मित्र. पण ही अपाला कोण? तिचा माझा संबंध काय? बरं! त्यांच्या समोर तिला वेगळं चित्र उभं करायचं नाही. कोणाचं चित्र? कसलं चित्र? ते जाऊ दे; पण परत मूळ प्रश्न तसाच राहातो न. हे सगळं ती मला का सांगत होती? ते ही डोळ्यांतून आग ओकत! च्यायला हे काय चालू आहे?' गोविंदच्या मागून चालत शेषा विचार करत होता. त्याचं लेणी बघण्याकडे लक्षच नव्हतं. संस्कृती मात्र प्रत्येक इंच डोळ्यात तेल घालून बघत होती. जसं काही तिला आत्ताच बाहेर गेल्याक्षणी कोणीतरी या लेण्याचं चित्र काढायला सांगणार आहे.

"हे लेणं देखील अपूर्ण दिसतं आहे." गोविंद म्हणाला आणि त्याचा आवाज सगळ्या शांततेत एकदम घुमला. मही थोडा अंधारात उभा होता. पण त्याचं लक्ष या चौघांवर पूर्ण होतं. "हो! ही चार आणि पाच नंबरची लेणी पूर्ण झालेली नाहीत. तसे इथे हे अठ्ठावीस खांब आणि या वेगवेगळ्या मुद्रांमधल्या बुद्ध मूर्ती आहेत. या बाजूने या..." असं म्हणून त्याने गोविंदला अजून थोडं आत नेलं. "या इथे खोल्या आहेत तिथे बौद्ध संत-महंत ध्यानधारणा करायचे." मही अजून काहीतरी सांगणार होता; इतक्यात मागून आलेल्या संस्कृतीने म्हंटलं; "मुळात त्यासाठी नव्हत्या या खोल्या. तेव्हा देखील हाच तर वाद होता की नक्की काय वापर असावा या गुंफांचा. त्या पलीकडच्या खोलीमधून जो खाली जाणारा बोगदा आहे; आणि त्याच्या सारखे काही अजून आहेत इथल्या वेगवेगळ्या खोल्यांमधून आणि पुढच्या अनेक लेण्यांमधून देखील; त्याचं प्रयोजन जास्त महत्वाचं होतं. हवा खेळती राहण्यासाठी जे तंत्र वापरणं आवश्यक होतं ते कोणालाही न कळत करणं जरुरीचं होतं. तेव्हाही...." संस्कृती अजूनही काहीतरी बोलणार होती. पण परत एकदा गोविंदने तिच्या जवळ येत तिचा हात धरला. "संस्कृती काय करायचं आहे आपल्याला कोणती हवा कुठे खेळते आहे त्याबद्दल? अर्धवट आहेत या गुंफा. चला आपण पुढे जाऊ." तो तिच्याकडे बघत म्हणाला. शेवटचं वाक्य मात्र महिसाठी होतं.

"तुम्ही तर असं बोलता आहात मॅडम की तुम्हीच इथलं आर्किटेक्चर काढलं आहे." मही संस्कृतीकडे बघत म्हणाला. ती काहीतरी बोलायला पुढे होणार इतक्यात गोविंद मध्ये पडला आणि महिकडे बघत म्हणाला; "तुम्ही गाईड आहात. त्यामुळे फक्त आवश्यक ती माहिती द्या. इतर गप्पा नकोत." गोविंदच्या आवाजातला बदल मही सोबत जस्सीच्या देखील लक्षात आला. 'याला इतकं रागावायला काय झालं?' जस्सीच्या मनात आलं. पण तो काही बोलला नाही. "सॉरी" असं पुटपुटत मही तिथून बाहेर पडला. जस्सी देखील निघाला. गोविंदने संस्कृतीचा हात अजून सोडला नव्हता. "चल संस्कृती पुढे जाऊ या." तिला काही एक प्रश्न न विचारता गोविंद हळुवारपणे म्हणाला. बराचसा आधार असलेल्या त्या खोलीमधून बाहेर पडताना संस्कृतीने मागे वळून बघितलं. शेषा अत्यंत स्तब्ध उभा राहून खोली बाहेर पडणाऱ्या संस्कृतीकडे बघत होता.

"तू पुढे हो. शेषाची बहुतेक तंद्री लागली आहे. त्याला घेऊन येते." संस्कृती दबक्या आवाजात म्हणाली आणि गोविंदला अजून काही बोलू न देता स्वतःचा हात सोडवून घेत मागे वळली. गोविंदने मागे बघितलं आणि त्याच्या देखील लक्षात आलं की शेषा काहीसा विचित्र पद्धतीने अवघडून उभा आहे. त्यामुळे त्याला संस्कृतीचं म्हणणं पटलं. जस्सी आणि मही परत मागे वळू नयेत म्हणून तो पटकन पुढे निघाला.

"शेषा...." संस्कृतीने शेषा जवळ जात त्याला हाक मारली.

"अपाला?...."

"अं?....."

"तू तुझा मग काढत आली आहे तर ती." शेषा म्हणाला.

"कोण?"

"संस्कृती उगाच नाटकं करू नकोस. तुला नक्की कळतं आहे मी काय म्हणतो आहे ते." शेषाचा आवाज बदलला होता. त्यात स्पष्टपणा होता; पण अधिकार वाणी नव्हती ती.

"ती आली आहे? हा भास आहे की तू आत्ता मला.....?" संस्कृतीचा आवाज गोंधळलेला होता.

"म्हणजे तुला पण दिसली न ती?" शेषाने संस्कृतीला विचारलं.

"शेषा, तू आत्ता मला काय हाक मारलीस?" संस्कृतीने शेषाला प्रश्न केला.

"संस्कृती, तू नैनाला बघितलंस ना?" शेषाने तिला उलट प्रश्न केला.

"अपाला!? तू आत्ता अपाला म्हणालास का?" संस्कृती अजूनही वेगळ्याच तारेत होती. अचानक तिचे दोन्ही खांदे धरत शेषा म्हणाला; "हो संस्कृती; मी तुला अपाला म्हणून हाक मारली. कारण मला नैना म्हणाली की गोविंद आणि अपाला समोर तिला वेगळं चित्र नाही उभं करायचं. तिने गोविंदचं नाव घेतलं आणि त्याच्या सोबत संस्कृती ऐवजी ती अपाला म्हणाली. मला तिचं एकूण वागणंच कळलं नाही. अग, तिने मला नाथा म्हणून हाक मारली." शेषा अजूनही पूर्ण गोंधळलेला होता.

"नाथा? ओह! नाथा! तू?!" संस्कृती शेषाकडे बघत म्हणाली.

"संस्कृती, तू ठीक आहेस न?" शेषाने तिचे दोन्ही खांदे जोरात हलवत तिला विचारलं आणि एकदम शुद्धीवर आल्याप्रमाणे संस्कृतीने त्याच्याकडे बघितलं.

"अरे शेषा? तू इथे या खोलीच्या मध्यावर उभा राहून काहीतरी बडबडत होतास. मीच गोविंदला म्हंटलं मी शेषाला घेऊन येते तू पुढे हो. चल बघू. ते सगळे गेले केव्हाच." संस्कृती शुद्धीत येत म्हणाली. क्षणापूर्वी ती काय बोलत होती ते तिचं तिला देखील आठवत नव्हतं. शेषाच्या ते लक्षात आलं. तो काही एक न बोलता तिच्या सोबत खोली बाहेर आला आणि त्या गुंफेच्या बाहेर पडला. त्याच्या सोबत पुढे जात असताना संस्कृतीने परत एकदा मागे वळून बघितलं आणि तिला त्याच खोलीच्या मध्यावर नैना दिसली. ती संस्कृतीकडे शांत नजरेने बघत होती. त्या नजरेत कोणतीही नकारात्मक भावना नव्हती. असलंच तर एक आव्हान होतं. पुढे जाता जाता संस्कृती थांबली. शेषाच्या ते लक्षात नाही आलं. तो तसाच चालत पुढे गेला. संस्कृती परत एकदा मागे वळली.

"तोच वाद परत एकदा न अपाला?" नैना शांत नजरेने संस्कृतीकडे बघत म्हणाली.

"वाद तू घालते आहेस नैना. मी कायमच सांगत होते.... ते मार्ग सहज प्रवेश करण्यासारखे ठेवतानाच बिन महत्वाचे असल्याप्रमाणे निर्माण केले तरच ते कायमस्वरूपी राहातील हेच तर माझं म्हणणं होतं. पहा... आजही... इतक्या असंख्य वर्षांनंतर देखील कोणाच्याही लक्षात आलेलं नाही त्यांचं अस्तित्व. ही या जमिनी वरची आणि इथल्या सगळ्याच लेण्यांमधले हवा खेळती राहण्यासाठी मी निर्माण केलेली ही छिद्र.... निरुपद्रवी, बिनमहत्वाची वाटत आली आहेत. पण तेव्हा देखील तुला ते सगळं पटलं नव्हतं. केवळ तू सांगितलेल्या प्रमाणे स्थापत्य निर्मिती होत नव्हती; हा राग होता तुझा." संस्कृतीचा धीरगंभीर शांत आवाज त्या खोलीमध्ये घुमत होता.

"अपाला.... तू अजूनही मला समजून....." नैना बोलत असतानाच अचानक शेषाचा आवाज आला.

"संस्कृती? परत गेलीस की काय त्या खोलीत. चल ग बाई. तो गोविंद वैतागला आहे."

संस्कृतीने नकळत आवाजाच्या दिशेने मागे वळून बघितलं. तिला शेषा दिसला नाही. म्हणजे तो अगदीच पुढच्या दाराशी थांबलेला होता. संस्कृतीने परत एकदा समोर बघितलं. खोली रिकामी आणि थंड पडलेली होती. संस्कृतीने मान खाली घातली आणि डोळे घट्ट मिटले. क्षणभर ती तशीच उभी राहिली आणि मग मागे वळून न बघता झपाझप चालत तिथून बाहेर पडली.

"संस्कृती, मला काहीतरी भास होत आहेत. आणि माझी खात्री आहे तुला देखील." तिला समोर बघताच शेषा म्हणाला.

"शेषा, फक्त तू आणि मी नाही तर गोविंदला देखील काहीतरी वेगळं जाणवतं आहे." संस्कृती थेट त्याच्याकडे बघत म्हणाली.

"हो! पण त्यासगळ्याची चर्चा इथे नको संस्कृती. एकतर जस्सीला काही अनुभव आले आहेत का ते आपल्याला माहीत नाही. त्यामुळे इथे जर आपण काही बोलायला लागलो तर तो गोंधळेल. त्यातून अजून काही गडबड निर्माण होईल. त्यात तो आपला गाईड... तो काही मला बरा वाटत नाही. त्याला माझ्याबाबतीत काहीतरी पटलेलं दिसत नाही. तुसड्यासारखी उत्तरं देतो आहे. त्यामुळे तर आपण जास्त जपलं पाहिजे. तुला जर आणि जे काही वेगळं दिसतं किंवा जाणवतं आहे; ते मनात ठेव आत्ता. आपण हॉटेलवर गेल्यावर एकत्र बसून चर्चा करू. परत जाण्याची घाई देखील नाहीय आपल्याला. हवं तर उद्या परत येऊया इथे. आपले आपणच फिरुया. गाईड वगैरे काही नको. आजच या महिला अच्छा टाटा करून टाकू." शेषा शांतपणे बोलत होता. संस्कृतीला त्याचं म्हणणं पटलं आणि दोघेही समजूतदारपणे हसले. शेषा आणि संस्कृती गोविंद, जस्सी आणि महिला गाठायला तिथून बाहेर पडले. त्यावेळी आतून नैना त्यांच्याकडे बघत होती. तिच्या शेजारी जाड गोणपाटाप्रमाणे काहीतरी पांघरलेले एक वृद्ध देखील उभे होते. नैनाची नजर शांत आणि अधिकारी होती. तर त्या वृद्धाची नजर काळजीने भरलेली होती.

"अरे तुम्ही दोघे कुठे राहिला होतात? तुम्ही दोघे येइपर्यंत माहिती द्यायला सुरवात नाही करायची असं गोविंद सर म्हणाले." महिच्या आवाजात नाराजी होती. त्याने बोलताना गोविंदकडे मात्र त्याचा आवाज बदलला.

"चला, सगळे आले आहेत तर मी माहिती देतो. हे सहावे लेणे आहे. तारा बोधिसत्व यांची मूर्ती तुम्हाला इथे दिसेल. अरे जस्सी तिथे नाही इथे ये. इथून आत जायचं आहे." महिने माहिती द्यायला सूरवात केली आणि जस्सी दुसरीकडे वळला. त्यामुळे माहिती देण्याचे काम थांबवून मही जस्सीच्या मागे गेला.

"तुम्ही सांगा हो तुम्हाला जी माहिती द्यायची आहे त्याबद्दल. मी ऐकतो आहे. आणि जर मी ऐकलं नाही तरी सोडून द्या. मला फोटो काढण्यात जास्त इंटरेस्ट आहे." जस्सी डोळ्यावरचा कॅमेरा दूर न करता म्हणाला.

खांदे उडवून महिने परत बोलायला सुरवात केली. "तारा बोधिसत्व यांचे बौद्ध धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. इथून आत या. ही मूर्ती अवलोकितेश्वर यांची आहे. हे इथे या वेगवेगळ्या मूर्ती आहेत त्या विविध देवांच्या आहेत." मही कसलेल्या गाईडप्रमाणे बोलत बोलत पुढे जात होता.

"गोविंद, शेषाने देखील काहीतरी वेगळं अनुभवलं आहे." मही थोडा पुढे गेला आहे हे बघून संस्कृती गोविंदच्या कानाला लागली आणि म्हणाली. गोविंदने मागे वळून शेषाकडे बघितलं आणि शेषाने देखील होकारार्थी मान हलवली.

"संस्कृती हे नक्की काय चालू आहे? आपण इथे का आलो होतो? मला जो श्लोक मिळाला त्याचा अर्थ शोधायला ना? मग ते सोडून आत्ता आपण ही लेणी का बघतो आहोत? तुला, मला आणि शेषाला इथे आल्यापासून काहीतरी वेगळं जाणवतं आहे. ते काय आहे? मी खूपच गोंधळून गेलो आहे ग." अगदी दबक्या आवाजात गोविंद संस्कृतीला म्हणाला.

गोविंदचा हात हातात घेत अत्यंत प्रेमाने दाबत संस्कृती म्हणाली; "गोविंद आम्ही सगळेच गोंधळलो आहोत. आपण आज आत्ता इथेच थांबुया का? चल हॉटेलवर जाऊ आणि एकत्र नीट बोलूया. आपण इथे परत उद्या पण येऊच शकतो न. शेषा देखील मला तेच सुचवत होता."

गोविंद आणि संस्कृती बोलत होते तेव्हा शेषा काहीसा लांब उभं राहून त्यांच्याकडे बघत होता. त्याला कळत नव्हतं की संस्कृतीने गोविंदचा हात धरलेला त्याला का आवडत नाहीय. 'हे असं या दोघांचं जवळ येणं कळवायला हवं आपण.' त्याच्या मनात विचार आला आणि त्या विचाराचं शेषाला खूप आश्चर्य वाटलं. गोविंद आणि संस्कृती... they are made for each other. मला माहीत आहे हे. मग काय झालं आपल्याला? कोणालातरी हे सांगायला हवं निकडीने असं वाटतंय. पण कोणाला?' शेषा स्वतःच्याच विचारांमध्ये अडकत चालला होता.

"आपण पुढे जायचं का?" अचानक महिचा आवाज आला.

पुढे होत शेषा त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला; "का हो महिरक्षक; तुम्ही फक्त ही टेक्निकल माहिती देता आहात. ही माहिती तर औरंगाबाद किंवा लेणी असं कुठलंही पुस्तक वाचलं तरी मिळेल. पण ही लेणी कोणी कोरली? कधी कोरली? त्यामागचा उद्देश काय होता? याबद्दल काहीतरी माहिती द्या ना. ते जास्त इंटरेस्टिंग असेल न!"

"वा! चांगला प्रश्न विचारलास. वाटत नाही तुझ्याकडे बघून तू इतका हुशार असशील." मही चेष्टेच्या सुरात म्हणाला. पण गोविंदला ते अजिबात आवडलं नाही. "हे पहा मही, तुम्ही तुमचं काम करा. कोण किती हुशार आहे; ते आमचं आम्ही बघून घेऊ."

गोविंदचा चिडलेला आवाज ऐकून मही एकदम वरमला. "अरे सर, तुम्ही तर एकदम रागावलात." तो म्हणाला.

"माझ्या जवळच्या लोकांशी कोणी नीट वागलं नाही तर मला ते खपत नाही. हे लक्षात ठेव तू." आवाजावर ताबा आणत शांतपणे गोविंद म्हणाला.

"बरं, बरं! या लेण्यांचा इतिहास तर अगदी रंजक आहे सर. तुम्हाला खूपच आवडेल. आपण इथेच बसूया का? हे मधले लेणे अपूर्ण आहे. त्यामुळे ते बघायला कोणी फारसं थांबत नाही. आपल्याला कोणी डिस्टर्ब नाही करणार." मही म्हणाला.

"चालेल. इथेच बसूया. आपण सोबत आणलेली सॅंडविचेस आणि केक्स इथे बसून खाऊया. यार भूक लागली आहे मला." जस्सी खाली बसत म्हणाला. त्याच्याकडे बघत हसत संस्कृती म्हणाली; "जस्सी, भुके व्यतिरिक्त दुसरं काही सुचतं का रे तुला?"

"हो! रक्षक नीती आणि समुच्च नियोजन हा एक अंतस्थ विचार असतो सतत माझ्या डोक्यात." मान खाली घालून कॅमेरामध्ये काहीतरी करत जस्सी म्हणाला. त्याचं उत्तर ऐकून संस्कृतीच्या भुवया उचलल्या गेल्या.

"जस्सी??" तिने त्याला हाक मारली.

"काय ग?" जस्सीने वर बघत उलट प्रश्न केला. तिच्याकडे बघणारा जस्सी नेहेमीचाच होता. मात्र संस्कृतीची खात्री होती की मान खाली घालून कॅमेरामध्ये खुडबुड करताना काहीतरी उत्तर देणारा जस्सी कोणीतरी वेगळा होता. तिने गोविंदकडे बघितलं. गोविंदने देखील जस्सीचं बोलणं ऐकलं होतं. त्याने संस्कृतीला डोळ्यांनीच शांत राहायला सांगितलं आणि तो देखील जस्सी शेजारी खाली बसला.

"मही तू पण बस. खाता खाता गप्पा मारू आपण." गोविंद म्हणाला आणि सगळेच खाली बसले.

"ही वेरूळ लेणी साधारण इसविसन सातशे सत्तावन्न ते त्र्याऐंशी या काळात निर्माण झाली. आपल्याला दिसतात ही समोरची चौतीस लेणी आहेत. बारा बौद्ध, सतरा हिंदू आणि शेवटची पाच जैन. वेरूळ लेण्यांमधील सर्वात महत्वाचं किंवा असं म्हणू की जगप्रसिद्ध असं शंकर मंदिर आहे. बारा ज्योतिलिंगांपैकी एक हे घृष्णेश्वर मंदिर आहे .हे मंदिर विशेष ठरतं ते त्याच्या स्थापत्यासाठी. द्राविडी शैलीतलं हे मंदिर दोनशे शहाहत्तर फूट लांब, एकशे चोपन्न फूट रुंद आणि नव्वद फूट उंच आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हे मंदिर एकाच दगडामध्ये कोरलेलं आणि ते ही वर पासून खाली घडवत गेलेलं आहे. एकूण चाळीस हजार टन दगड काढला गेला या कामामध्ये. हे स्थापत्य विशेष ठरत ते अजून एका गोष्टीसाठी. या मंदिराची महल तीन बाजूंच्या वर होती; जी मंदिराच्या वरच्या भागात जोडली होती. अर्थात आता हे पूल पडले आहेत. मात्र त्यावेळची ती स्थापत्य शोभा नजर दिपवणारी होती.

या मंदिराच्या निर्मितीचा पहिला विचार आला तो राजकुट घरण्यामधील अतिआदरनिय महाराज पहीले कृष्णराज यांच्या. त्यांनी त्यांच्या अत्यंत विश्वासू सल्लागार मित्राशी जो राज्याचा सुमंत देखील होता; याविषयी चर्चा केली. त्यावेळी त्यांचं वय केवळ पस्तीस वर्षे होतं. दुर्दैवाने राष्ट्रकूट घरण्याबद्दल आपल्या इतिहासात फार काहीच माहिती नाही. पण खरं तर या घराण्याने इसविसन सातशे त्रेपन्न पासून ते इसविसन नऊशे ब्याएशी पर्यंत म्हणजे तब्बल दोनशे एकोणतीस वर्षे राज्य केलं. ते देखील दक्षिण भारता पासून ते मध्य ते अगदी उतरेपर्यंत. मूळ राष्ट्रकूट घराण्यातील आंतरसंबंधीत पण स्वतंत्र कुळशाखा होत्या त्यांच्या.

अति आदरणीय पाहिले कृष्णराज भगवान शंकराचे निस्सीम भक्त होते. एका महाशिवरात्रीच्या उत्तर रात्री महाराज शंभो शंकराची महापूजा बांधून विश्रांतसाठी त्यांच्या भवनात गेले. ते मंजावर पहुडले होते; परंतु त्यांचं मन अतीव सुखाने भरून गेलं होतं. त्या अवस्थेतच त्यांना शंकर भगवंतांनी दृष्टांत दिला आणि सांगितलं की तुझ्या राजधानी बाहेरील गुंफांमधून मी वास करतो आहे. मात्र अजूनही मला स्वस्थ स्थान प्राप्त झालेले नाही. ही स्थान निर्मिती केवळ तू मनावर घेतलंस तरच होईल. राजा, एक असं मंदिर बांध की जे विश्वामध्ये वेगळे ठरेल. ज्या मंदिराचा यावदचंद्रदिवाकररौ लौकिक राहील. या मंदिराच्या अस्तित्वाची गरज सार्वभौम वसुंधरेला आहे. उठ राजा.... प्रातःकली तुला भेटण्यास जी पहिली व्यक्ती येईल तीच व्यक्ती या मंदिराच्या स्थापत्यासाठी योग्य आहे; यावर विश्वास ठेव.

भगवान शंकर अंतर्धान पावले आणि महाराज मंचावर उठून बसले. त्यांनी त्वरेने त्यांच्या परम मित्राला सुमंताला बोलावणे पाठवलं. तो समोर येताच साश्रु नयनांनी महाराजांनी त्याला झालेला दृष्टांत कथित केला. तो देखील हर्षोल्लासित झाला आणि म्हणाला "महाराज, आपण आजवर भगवान शंकरांची जी उपासना केली आहात; त्याचंच हे फळ आहे. आपल्या इच्छेने आणि आपल्याच संकल्पनेमधून या मंदिराची निर्मिती होईल; याची मला खात्री आहे." महाराजांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी त्यांच्या परम मित्राला आदेश दिला की उगवत्या नारायणासोबत राजधानीमध्ये पुकारा करावा की आज महाराज आम जनतेस सामोरे येणार आहेत. सर्वसामान्यांपैकी ज्यांना कोणाला महाराजांना भेटण्याची इच्छा असेल; त्यांनी आज राजदरबारी यावे. महाराजांच्या ठायी निर्माण झालेल्या चैतन्याचा अंश त्यांच्या मित्राकडे देखील संक्रमित झाला. मागे फिरताना त्याने महाराजांना विनंती केली की आजच्या राजदरबारामध्ये निश्चिन्त प्रवेश परवानगी असावी. मात्र महाराजांशी एकांतात बोलत असताना परम मित्र आणि राज्याचा सुमंत तिथे उपस्थित राहणारच! महाराजांना या विनंतीमध्ये काहीच चुकीचे वाटले नाही. त्यांनी रुकार भरला आणि परम मित्र राजदरबाराची व्यवस्था बघण्यासाठी निघाला.

महाराज राजदरबारात येऊन बसले. त्यांची प्रसन्न मुद्रा त्यांच्या मनातला आनंद सर्वश्रुत करत होती. राष्ट्रकूट घराण्याच्या सार्वभौमत्वाचे महत्व माहीत असणारे अनेक व्यापारी महाराजांना भेटण्यास आले होते. गेली अनेक वर्षे हे व्यापारी उत्तर भारतामध्ये उतरून मध्य भारत पार करून दक्षिणेपर्यंत प्रवास करत असत. सोबत आणलेल्या विविध वस्तू विकून त्याबदल्यात त्यांना आवश्यक अशा वस्तू ते घेत असत. मात्र त्यांना विक्री कर प्रचंड मोठ्या प्रमाणात द्यावा लागत होता. जर परम आदरणीय कृष्णराज महाराजांनी या करामध्ये सवलत दिली तर त्यांचा व्यापार मोठा होणार होता. यासाठी त्यांनी महाराजांची वयक्तिक भेट मागितली. सर्वांना भेटून झाल्यानंतर विशेष कक्षामध्ये या व्यापाऱ्यांना घेऊन येण्यास महाराजांनी त्यांच्या परम मित्रास सांगितले. व्यापारी वर्ग महाराजांना विशेष कक्षामध्ये येऊन भेटला आणि त्यांनी त्याची इच्छा बोलून दाखवली. त्यावेळी महाराजांचा परम मित्र आणि राज्याचा सुमंत तिथेच उपस्थित होता. त्याने महाराजांच्या कानाला लागत महाराजांना सुचवलं की जर या व्यापाऱ्यांना आपण विक्री करामध्ये सूट दिली तर ते आपल्या इथे बनणाऱ्या वस्तू जास्त विकत घेतील; जेणेकरून आपल्या लोकांचाच जास्त फायदा होईल. महाराजांना देखील हे पटले आणि त्यांनी कर सवलती संदर्भात विचार करून निर्णय घेण्यात येईल; असे त्या व्यपाऱ्यांना वचन दिले. अत्यानंदि होऊन व्यापारी वर्ग तेथून बाहेर पडला.

काही बौद्ध महंत देखील महाराजांना भेटण्यास आले होते. ते राजधानीच्या दक्षिणेकडील गुंफांमधून राहात होते. त्यांना पाहाताच महाराजांना प्रथम प्रहरी मिळालेल्या दृष्टांताची आठवण झाली. सर्वच महंतांचा यथायोग्य आदर-सत्कार करून महाराजांनी त्यांच्या अडचणीविषयी पृच्छा केली. मूलतः अत्यंत मितभाषी आणि मनुष्यवस्तीपासून लांब रहाणारे हे बुद्ध महंत महाराजांच्या आदरातिथ्याने संकोचून गेले. त्यांच्या प्रमुखाने पुढे होत अत्यंत कमी शब्दात विषय मांडणी करत सांगितले की बौद्ध धर्मातील काही महत्वाच्या निर्णय प्रक्रियेसाठी सर्वच महंतांना काही काळासाठी त्यांचे राहाते ठिकाण सोडून जावे लागणार आहे. हे ठिकाण जरी सर्वसामान्य मनुष्यांच्या दृष्टिक्षेपातील असले तरी जर गुंफांमधील महंतांचा वावर बंद झाला तर तिथे हिंस्त्र जनावरांचा वास सुरू होईल. त्यामुळे त्यांनी महाराजांना विनंती केली की काही काळासाठी या गुंफांचे संरक्षण करण्याची जवाबदारी घ्यावी. महंतांच्या विनंतीला मान देऊन महाराजांनी तेथील बंदोबस्ताची पूर्ण जवाबदारी स्वीकारली. महंत निश्चिन्त होऊन महाराजांना दुवा देऊन निघून गेले.

त्यानंतर अनेक गावकरी आणि इतर मंडळी महाराजांना भेटली. काहींच्या अडचणी होत्या तर काही केवळ आशीर्वाद देण्यासाठी आले होते. काहींना महाराजांची प्रसन्न मुद्रा समाधान देऊन गेली; तर काहींनी महाराजांच्या कारभाऱ्यांनी दिलेल्या त्रासाबद्दल तक्रार करून दाद मागितली आणि महाराजांनी तात्काळ त्यावर निर्णय दिले.

हळूहळू राजदरबाराची वेळ संपत आली. अजूनही महाराजांच्या नजरेतला शोध संपला नव्हता. भगवान शंकरांनी दिलेल्या संकेतानुसार आज कोणीतरी भेटणे आवश्यक होते. मात्र अजूनही कोणीच समोर आले नव्हते. सरते शेवटी महाराजांनी खुणेचा दंड उचलण्याची खुण केली; दंड उचलला जाणार इतक्यात राजदरबाराच्या मध्यावधी द्वारातून एक स्त्री पुढे येताना महाराजांना दिसली. महाराजांनी दंड उचलण्याची प्रक्रिया थांबवली आणि अत्यंत उत्सुकतेने त्यांनी समोरून येणाऱ्या स्त्रीचे स्वागत केले.

"महाराज, मला आपणास एकांतात भेटायचे आहे." धीरगंभीर आवाजात आणि अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये त्या स्त्रीने मनीची इच्छा बोलून दाखवली. क्षणभर महाराजांनी विचार केला आणि होकारार्थी मान हलवली. तत्क्षणी मानाचा दंड उचलला गेला आणि राजदरबार बरखास्त झाला.

महाराजांच्या विशेष कक्षामध्ये महाराज येऊन बसले. त्यांच्या सोबत राज्याचा प्रामाणिक सुमंत आणि त्यांचा परम मित्र देखील होता. ती स्त्री विशेष कक्षात प्रविष्ट झाली. अत्यंत तीक्ष्ण नजरेची ती स्त्री तिच्या प्रत्येक पावलागणिक तिच्यातील आत्मविश्वासाची जाणीव करून देत होती. ती महाराजांसमोर येऊन उभी राहिली. महाराजांनी तिला आसन ग्रहण करण्याची विनंती केली; त्याप्रमाणे तिने आसन ग्रहण केले. मात्र ती एकही शब्द बोलण्यास तयार नव्हती. महाराजांनी काही क्षण वाट बघून सुमंतांना खुण केली आणि सुमंतांनी तिला तिच्या येण्याचे प्रयोजन विचारले. तिने थेट महाराजांकडे बघितले आणि त्याच त्या धीरगंभीर आणि स्पष्ट आवाजात ती म्हणाली; "महाराज, विषय अत्यंत महत्वाचा; म्हंटले तर नाजूक आणि तुमच्या दृष्टांतासंदर्भातील आहे. त्यामुळे मी एकांतात तुमच्याशी बोलू इच्छिते......."

...................मही बोलण्याचा थांबला. त्याच्या कथेमध्ये गुंतून गेलेले गोविंद, जस्सी, शेषा आणि संस्कृती तो अचानक का थांबला म्हणून त्याच्या तोंडाकडे बघायला लागले.

"पुढे?" न राहून गोविंदने विचारले.

................................"पुढे? महिला.........." संस्कृती बोलणार इतक्यात गोविंद झपकन पुढे झाला आणि सर्वांसमोर त्याने तिला दोन्ही खांदे धरून घुसळले.

"शांत रहा संस्कृती!!!" अत्यंत तीव्र शब्दात गोविंद म्हणाला.

"तू??? तू हिम्मत कशी केलीस मला स्पर्श करण्याची?" संस्कृतीचा अवतार अचानक इतका बदलला होता की मही, जस्सी, शेषाच काय गोविंद देखील दचकला आणि मागे हटला. क्षणात गोविंदला दूर लोटत संस्कृती फणकाऱ्याने उठली आणि समोरच्या गुंफेच्या दिशेने निघाली.

क्रमशः



Friday, March 4, 2022

अनाहत सत्य भाग 14

 अनाहत सत्य

भाग 14

गोविंद, जस्सी, शेषा आणि संस्कृती चौघेही समोरच दिसणाऱ्या शंकराच्या मंदिरासमोर उभे होते. चौघेही आपल्याच तंद्रीमध्ये त्या प्रचंड मोठ्या मंदिर असलेल्या लेण्याकडे बघत उभे होते. मही मागून येऊन त्यांच्या सोबत उभा राहिलेला त्यांना चौघांनाही कळला नाही.

"चला, एका वेगळ्या काळ सफरीला." महिचा आवाज ऐकून चौघेही तंद्रीतून जागे झाले आणि दचकून त्याच्याकडे बघायला लागले.

"काळ सफर? नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला?" शेषाने विचारलं.

महिने शेषाकडे बघितलं पण त्याच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत त्याने एक पाऊल पुढे टाकलं. गोविंदला ते अजिबात आवडलं नाही.

"शेषा काहीतरी विचारतो आहे." गोविंदचा आवाज काहीसा कठोर होता. गोविंदच्या त्या वाक्याने शेषा, संस्कृती आणि जस्सीने देखील गोविंदकडे थोडं आश्चर्याने बघितलं. आजवर गोविंदच्या आवाजात असा कठोरपणा त्यांना कधीच जाणवला नव्हता. जस्सी आणि संस्कृतीने एकमेकांकडे बघितलं. शेषा मात्र गोविंदकडे एकटक बघत होता, त्याला गोविंदच्या त्या बोलण्याने आतून खूपच बरं वाटलं. पुढे जायला निघालेला मही मात्र तटकन थांबला. त्याने गर्रकन वळून गोविंदकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात एकप्रकारचं आश्चर्य होतं. तो क्षणभर थांबला आणि मागे येत म्हणाला; "अरे तुम्ही तर एकदम रागावलात. तुमच्या मित्राच्या प्रश्नामध्ये काही अर्थ नाही असं वाटलं मला; म्हणून उत्तर नाही दिलं. अहो काळ सफर म्हणजे ही लेणी आणि त्यांची कथा.... त्या सफरीवर चला इतकंच म्हणत होतो मी." मही म्हणाला.

"ओह! आम्हाला सगळ्यांना वाटलं तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे की वेगळ्या काळामध्ये चला." काहीसं तापलेलं वातावरण हलकं करण्यासाठी संस्कृती हसत म्हणाली.

"मॅडम, तुम्हाला काहीही वाटू शकतं. पण ते तसंच असतं किंवा होतं असं नाही न." मही बोलला. त्याची नजर कुठेतरी लांब लागली होती. तो संस्कृतीकडे अजिबात बघत नव्हता. का कोण जाणे पण संस्कृतीला वाटलं महिला तिच्याशी बोलण्याची इच्छा नाही. पण अजून वाद वाढू नयेत म्हणून ती शांत राहिली.

"बरं महिजी, तुम्ही आम्हाला या लेण्यांच्या सफरीवर घेऊन चला बघू." जस्सी त्याचा कॅमेरा सावरत म्हणाला आणि सगळेच निघाले.

"वेरूळ लेणी ही अत्यंत खास लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण चौतीस लेणी आहेत. यामध्ये सुरवातीची बारा लेणी बौद्ध स्थापत्याची आहेत; नंतरची सतरा लेणी हिंदू संस्कृती बद्दल माहिती देतात आणि ही डाव्या बाजूची शेवटची पाच जैन लेणी आहेत. इसविसन १९५१ साली भारत सरकारने या लेण्याला 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून घोषित केलं आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपवण्यात आली आहेत. युनेस्कोने इसविसन १९८३ मध्ये वेरूळ लेण्यांचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला. आपल्याला हे समोर जे दिसतं आहे ते कैलास मंदिर. हे या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रामधलं सर्वात अदभुत आहे. तुम्ही जर पृथ्वी बाहेरील सॅटेलाइट मधून पृथ्वीकडे बघितलंत तर काही ठळक खुणा दिसतात. त्यामध्ये या कैलास मंदिराच्या वरच्या भागाचा समावेश आहे." मही बोलत बोलत मंदिराच्या दिशेने चालत होता.

गोविंद, संस्कृती, जस्सी आणि शेषा महिच्या मागे चालत होते. त्यांची नजर समोरच्या कैलास मंदिरावर होती आणि कान मही जे सांगत होता त्याकडे होते. पण तरीही प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चाललं होतं.

"या लेण्यांची खासियत अशी आहे की संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरून ही लेणी निर्माण केलेली आहेत. आपल्याला समोर हे जे कैलास मंदिर दिसते आहेत ते द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले आहे. एकूण two senventy six फूट लांब, one fifty four फूट रुंद असं हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधलेलं आहे. त्याहूनही महत्वाचं म्हणजे सर्वसाधारणपणे कोणतंही बांधकाम हे पायापासून कळसाकडे जातं. पण हे मंदिर वरपासून खालपर्यंत तयार केलेलं आहे. ते बांधण्यासाठी, खडकातून सुमारे चाळीस हजार टन दगड काढला गेला असा अंदाज आहे. पहिल्या भागात हा एकूण पर्वत बांधकामासाठी वेगळा करण्यात आला. म्हणजे लेण्यांसाठी हीच जागा योग्य आहे; हे ठरल्यानंतर संपूर्ण पर्वताची लांबी रुंदी मोजली गेली. मग हा भाग संपूर्ण पर्वतापासून वेगळा केला गेला. त्यानंतर मंदिरासाठी हा पर्वत भाग आतून कापला गेला आणि नव्वद फूट उंचीच हे कैलास मंदिर बांधण्यात आलं. याची वेगळी बाजू म्हणजे हे मंदिर बाहेरील बाजूने मूर्तींनी भरलेले आहे. विशेष म्हणजे या मंदिराची महल तीन बाजूंच्या वर होती, जी मंदिराच्या वरच्या भागाला जोडलेली होती. आता ते पुल पडले आहेत. पण त्यावेळचा नजरा डोळे दिपवणाराच होता. खुल्या मंडपात समोर नंदी आणि विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत. हे काम भारतीय स्थापत्य शास्त्र कौशल्यांचा एक अद्भुत नमूना आहे." मही तंद्री लागल्यासारखा बोलत होता; जणूकाही त्याला ते मंदिर बांधलं जात असताना दिसत होतं. तो स्वतःच्या नादात हळूहळू मंदिराच्या दिशेने चालत होता. मागून गोविंद, संस्कृती, जस्सी एका वेगळ्याच ओढीने चालत होते.

त्यांच्यातला शेषा मात्र महिच्या बोलण्यामध्ये फार गुंतला नव्हता. त्याचं लक्ष इतर लोकांकडे देखील होतं. तो गोविंदच्या मागून चालत होता. दोन पावलांचं अंतर ठेऊन. अर्थात तो जरी महिच्या माहितीमध्ये गुंतला नव्हता तरी त्याचं पूर्ण लक्ष होतं त्याच्या बोलण्याकडे.

"लांबी, रुंदी मोजायला तुम्ही होतात का?" शेषाने अचानक प्रश्न केला आणि सगळ्यांनीच त्याच्याकडे वळून बघितलं. खांदे उडवत शेषा हसला. काही वेळापूर्वीच्या अनुभवामुळे यावेळी त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता महीनेच उलट प्रश्न विचारला; "का? तुला का असं वाटलं?" हसत हसत शेषा म्हणाला; "अहो, तुम्ही जे वर्णन करता आहात ना... त्यावरून तर असं वाटतं की तुम्हीच ही जागा ठरवलीत, हे पर्वत मोजलेत आणि....."

"आणि?" संस्कृतीने आवाज थोडा मोठा करत विचारलं.

तिच्या त्या प्रश्नामुळे शेषा बोलायचा थांबला. "आणि काही नाही." तो तिच्याकडे बघत म्हणाला.

"काही नाही न? मग ठिक. चला, आपण हे मंदिर बघूया." संस्कृती म्हणाली आणि सगळेच मंदिराच्या दिशेने निघाले.

नेहेमीच्या सवयीमुळे असेल पण मही काहीसा भरभर चालत पुढे निघाला. गोविंद आणि जस्सीने देखील त्याला गाठण्यासाठी वेग वाढवला. तेवढी संधी साधून संस्कृती शेषाकडे आली आणि म्हणाली; "मला माहीत आहे तुला या सगळ्यामध्ये फारसा इंटरेस्ट नाही. पण म्हणून प्रत्येकवेळी त्या महिला उलट प्रश्न विचारून डिस्टर्ब करू नकोस. कळलं?"

हसत हसत शेषाने बरं म्हणून मान हलवली आणि ते दोघे देखील मंद हसत मंदिराच्या दिशेने निघाले.

पुढे गेलेल्या गोविंदचं संपूर्ण लक्ष महिला गाठण्यामध्ये होतं; आणि अचानक त्याला जाणवलं की कोणीतरी लहानग्याने खिदळत येऊन त्याच्या पायाला येऊन मिठी मारली आहे. पायाला ओढ जाणवून गोविंद एकदम थांबला आणि त्याची नजर खाली वळली. पण त्याच्या पायाजवळ कोणीच नव्हतं. आता पायाला ओढ देखील जाणवत नव्हती. क्षणापूर्वी त्याची शंभर टक्के खात्री होती की लहानसं बाळ... कदाचित तीन-चार वर्षांचं असेल; त्याच्या पायाला मिठी मारून हसत होतं. पण पायाजवळ कोणीच नाही बघून तो पूर्णपणे गोंधळून गेला. तोपर्यंत काहीसे मागे राहिलेले शेषा आणि संस्कृती त्याच्या जवळ आले आणि संस्कृतीने नजरेनेच त्याला काय म्हणून विचारलं. गोविंदने देखील काही नाही असं मानेनेच सांगितलं आणि ते तिघे पुढे गेलेल्या जस्सी आणि महिच्या दिशेने निघाले.

जस्सी काहीसा मोठ्या ढांगा टाकत महिला गाठायचा प्रयत्न करत होता.... आणि अचानक त्याला जाणवलं की त्याच्या आजूबाजूला खूपशी गर्दी आहे. घामाचा दर्प त्याला जाणवत होता. तो थांबून आजूबाजूला बघायला लागला. कोणीच नव्हतं त्याच्या बाजूला. त्याला देखील ते कळत होतं. पण तरीही ती गर्दी त्याला जाणवत होती. अगदी स्पष्टपणे! पण ती जी भावना होती त्यावर काही विचार मनात येण्याअगोदरच गोविंद, शेषा आणि संस्कृती त्याच्या शेजारी आले. जस्सीने त्यांच्याकडे बघितलं; आणि क्षणभरापूर्वी झालेला भास मनाच्या मागे टाकून तो देखील पुढे निघाला.

"अरे तुम्ही मागे राहिलात. मी आपला एकटाच बोलत होतो." मागे वळून हसत मही म्हणाला.

"हो! ते जरा फोटो काढत होतो मी संपूर्ण लेण्यांच्या परिसराचे." जस्सी मोघम म्हणाला.

"लेणी सुरू होतात उजवीकडून. त्या तिथल्या पहिल्या लेण्यापासून. अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे साधारण स्थापत्य सांगायचं तर ती उजवीकडची पहिली बारा लेणी बौद्ध पद्धतीची आहेत, त्यानंतरची सतरा हिंदू आणि नंतरची या बाजूची शेवटची पाच जैन लेणी आहेत. हे फरक कसे तर आतील मूर्ती आणि बांधकाम स्थापत्यावरून केलेले आहेत. मात्र सर्वसाधारण लोक या कैलास मंदिरापासून सुरवात करतात. पहिली काही लेणी तर लोक बघत देखील नाहीत. एकदम त्या नवव्या लेण्यापासून सुरवात करतात बघायची. तसं पहिल्या लेण्यांमध्ये बघण्यासारखं वेगळं असं काहीच नाही." आता महिमधला टिपिकल गाईड जागा झालेला दिसत होता.

"आम्हाला सगळंच नीट बघायचं आहे." पुढे होत संस्कृती म्हणाली.

"वाटलंच मला." मही काहीसा रुक्ष स्वरात म्हणाला. पण आपल्या आवाजातला बदल लगेच लपवत पुढे म्हणाला; "अरे वा! नक्की बघा. मला पण आवडेल सगळं नीट दाखवायला. पण सुरवात कुठून करणार?"

संस्कृतीने मागे वळून गोविंद, जस्सी आणि शेषाकडे बघितलं. ते तिघे शांत उभे होते. त्यामुळे तिनेच निर्णय घेतला आणि म्हणाली; "आपण त्या पहिल्या लेण्यापासून सुरवात करू."

"चला तर मग. आपण त्यादिशेने चालायला लागुया." मही म्हणाला आणि उजवीकडे वळून चालायला लागला.

"तिथे पोहोचेपर्यंत इथल्या एकूण इतिहासाची थोडी कल्पना द्याल का?" जस्सी फोटो काढत म्हणाला. चालताना देखील त्याच्या हाताल्या कॅमेराला क्षणभराची देखील उसंत नव्हती.

"नक्कीच. पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात निर्माण झालेल्या या लेण्यांमधलं प्रसिद्ध कैलास मंदिर हे बारा जोतिर्लिंगांपैकी एक आहे. घृष्णेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जातं हे मंदिर. त्याची निर्मिती पहिल्या राष्ट्रकूट माहाराजांनी केली. त्याचं नाव पाहिले कृष्ण महाराज!" मही माहिती देत चालत होता. बोलताना त्याने गोविंदकडे बघितलं आणि हसला. गोविंद देखील महिकडे बघत सहज हसला. महिच्या कपाळावर हलकीशी आठी आली असावी असं त्याला वाटलं. पण त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि पुढे चालायला लागला. मही पुढे बोलायला लागला; "या लेण्यापैकी १० क्रमांकाच्या गुहेतील मागच्या भिंतीवर राष्ट्रकूट महाराज दंतीदुर्ग याचा शिलालेख आहे. पहिले कृष्ण महाराज हे दंतीदुर्ग महाराजांचे चुलते होते. इसवी सनाच्या ७५३ ते ७५७ या काळातील हा लेख आहे. यावरून कैलास मंदिर लेण्याची निर्मिती ही इसवी सनाच्या ७५७ ते ७८३ या काळातील असावी असा अंदाज केला जातो.

हा लेणीसमूह व्यापारी मार्गावर असल्याने तत्कालीन समाजाच्या दृष्टिपथात कायम राहिला. विविध राजघराण्यातील व्यक्ती आणि उत्साही अभ्यासू प्रवासी यांनी या लेण्यांना वेगवेगळ्या काळांमध्ये भेटी दिल्या आहेत. दहाव्या शतकात अरब प्रवासी अल-मस-उदी याने देखील इथे भेट दिली आहे. बहामनी सुलतान गंगू याने इथे आपला तळ ठोकला होता आणि ही लेणी आतून बाहेरून पूर्णपणे पाहिली. फिरिस्टा, मालेट यांसारख्या परदेशी प्रवासी अभ्यासकांनी इथे भेट दिल्या आहेत. ही लेणी काही काळ हैदराबादच्या निजामाच्या नियंत्रणात देखील होती. त्याला मात्र या लेण्यांबद्धल मुळीच आस्था नव्हती. त्याने त्याच्या एका सरदाराला इथे तळ ठोकून या लेण्यांची नासधूस करण्याचे फर्मान सोडले होते. त्या सरदाराने खूप प्रयत्न केला. असंख्य मजूर लावले होते त्याने ही लेणी फोडण्यासाठी..."

"इतकं सोपं नाही या लेण्यांना हात लावणं. लेण्यांची सुरक्षा हा अत्यंत महत्वाचा आणि मूलभूत प्रश्न दुर्लक्षित कसा असेल?" जस्सी म्हणाला. खरं तर फोटो काढण्यात गुंतला होता. त्याचं महिच्या बोलण्याकडे लक्ष होतं की नाही ते कळणं देखील अवघड होतं. इतका तो कॅमेऱ्यामध्ये गुंतला होता. त्यामुळे त्याच्या बोलण्याने सगळेच चमकले.

"खरंय! तुला काय वाटतं? निजामाच्या सरदाराला इतका प्रयत्न करूनही का नसेल फोडता आली ही लेणी?" महिने जस्सीकडे वळत विचारलं.

"कारण ज्यांनी ही लेणी बांधली असतील त्यांनी त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था केलीच असेल न?" जस्सी म्हणाला. अजूनही त्याचा डोळा कॅमेऱ्याच्या लेन्सला लागलेला होता आणि चेहेरा कॅमेऱ्याच्या मागे लपला होता.

"हो न. तूच होतास न सगळी व्यवस्था बघायला आणि सूचना द्यायला." शेषा थट्टेच्या सुरात म्हणाला आणि परत एकदा वादाला तोंड फुटेल असं वाटून संस्कृती मध्ये पडली.

"यार आपण शांतपणे लेणी बघणार आहोत की सतत फालतू बडबड करून सगळ्यांचा वेळ वाया घालवणार आहोत?" तिच्या काहीशा रागावलेल्या आवाजाचा अंदाज येऊन जस्सी आणि शेषा गप्प बसले आणि सगळेच परत एकदा चालायला लागले.

जस्सीचा कॅमेरा फटाफट क्लीक आवाज करत फिरत होता. अचानक जस्सीला दूर काहीतरी वेगळं वाटलं. त्याने कॅमेरा डोळ्यापासून लांब केला आणि अंदाज घेतला. त्याची नजर इतरांकडे वळली. पण सगळेच पुढे चालत होते. परत एकदा कॅमेराच्या लेन्समध्ये बघत त्याने त्या जागी फोकस केलं. "च्यायला....." त्याच्या तोंडून एक कचकचीत शिवी बाहेर पडली. "ही इथे?" त्याने हलकेच स्वतःशी म्हंटलं आणि पटकन दोन तीन फोटो क्लीक केले. डोळ्यापासून कॅमेरा लांब करत त्याने परत एकदा त्या दिशेने बघितलं आणि त्याचे डोळे विस्फारले गेले.

त्याला लांब एका दिशेने नैना दिसली होती. म्हणूनच आश्चर्य वाटून त्याने पटकन फोटो काढले होते. पण कॅमेरा डोळ्यापासून लांब करून त्या दिशेने बघितल्यावर तिथे कोणीच नाही हे त्याच्या लक्षात आलं. तसा तो भाग पहिल्या लेण्यांच्या बाजूला होता. तिथे अजून कोणीच नव्हतं आणि इथून लांबून तरी लपण्यासाठी काही जागा असेल असं वाटत नव्हतं... अर्थात ती खरंच नैना असली आणि यांना बघून लेण्याच्या आत गेली असली तर अचानक गायब होण्याचा अर्थ कळला असता. फोटो काढला असूनही जस्सीला खात्री नव्हती की त्याने नैनाला बघितलं... दुसरं म्हणजे त्याला उगाच नको ते वाद आत्ता तरी निर्माण करायचे नव्हते. त्यामुळे तो काही एक न बोलता चालायला लागला.

"१९व्या शतकात भारतात ब्रिटीश राजवट असताना वेरुळ लेणी पूर्णपणे दुर्लक्षित होती. आक्रमकांमुळे किंवा काळाच्या ओघात मूर्तींचेही नुकसान झालं होतं हे खरं. ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडेफार प्रयत्न केले; कारण या लेण्यांच्या ऐतिहासीक महत्वाची त्यांना कल्पना होती. मात्र त्यांचे ते प्रयत्न अगदीच सुरवातीच्या काळातले आणि वरकरणी होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९६०च्या दशकात या लेण्यांची काळजी घेण्याचा खरा प्रयत्न सुरू झाला. याच काळात अजिंठा-वेरूळच्या लेण्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटनस्थळे म्हणून प्रसार सुरू झाला आणि मग ही लेणी बघण्यासाठी प्रवाशांची रीघ लागली. आमच्या सारख्या गाईड्सच्या पोटापाण्याची सोय झाली." मही माहिती देत होता.

बोलता बोलता ते सगळे पहिल्या लेण्याजवळ पोहोचले. मही पहिल्या लेण्याच्या आत प्रवेश करत म्हणाला; "सर्वसाधारण प्रवासी या लेण्यांपर्यंत येत नाहीत कारण इथली रचना फारशी आकर्षक नाही."

"आठ खणी स्तूप रचना आहे ही. बाहेर कडाक्याची थंडी असो किंवा उन्हाळा आतलं वातावरण कायमच समतोल असतं. साहजिक आहे... वयोवृद्ध राहणार तर त्याप्रमाणे रचना असणं आवश्यक नाही का?" संस्कृती म्हणाली. ती काहीशी वेगळी उभी होती इतरांपासून आणि टक लावून बघत होती त्या गुहा सदृश खोली किंवा स्तूप जे काही होतं त्याकडे.

"चल, आत जाऊया का?" गोविंद हलकेच तिच्या खांद्याला स्पर्श करत म्हणाला. संस्कृती काहीशी दचकली आणि त्याच्या लक्षात आलं की तिची तंद्री लागली होती. "ये तू थोड्या वेळाने आत किंवा थांब इथेच. आम्ही आत जाऊन येतो." तो अगदीच समजूतदार प्रेमळ आवाजात म्हणाला आणि जस्सी, शेषाला त्याने खूण केली. मही अगोदरच आत गेला होता. गोविंद, जस्सी आणि शेषा देखील आत गेले. संस्कृतीची नजर अजूनही त्या लेण्याच्या वरच्या बाजूला लागली होती. तिची खात्री होती की तिने तिथे नैनाला बघितलं होतं. नैनाची उंची आणि तिची तीच ती केशभूषा! सगळे केस एकत्र घेऊन घट्ट बांधलेला बो आणि त्याला खाली घातलेली लांबलचक वेणी. ती नैनाच होती.... पण आता याती तिथे दिसत नव्हती. नजर खाली करत संस्कृती आत जाणार इतक्यात तिला लाहान बाळ खिदळण्याचा आवाज आला. तिने मागे वळून बघितलं तर एक तीन-चार वर्षांचा मुलगा मोठ्याने हसत एका झुडपाकडे बघत होता.

'अरे? इथपर्यंत कोणी येत नाही. इतर कोणी मोठे दिसत नाहीत; मग हा एकटा लहानगा काय करतो आहे इथे?' संस्कृतीच्या मनात आलं. तिला एकदम त्या बाळाची काळजी वाटायला लागली. अचानक तिला आतून शेषाने हाक मारली.

"संस्कृती ये न आत. बघ इथे इतकं मस्त वाटतं आहे ग." तो म्हणाला. तिने वळून शेषाकडे बघितलं आणि 'आलेच' अशी खुण करून परत समोर बघितलं तर ते लहान बाळ तिथे नव्हतं. तिच्या कपाळावर आठ्या आल्या. पण काही एक न बोलता ती आत गेली.

"ओह! मी जशी कल्पना केली होती तसंच आहे इथलं वातावरण अजूनही." आत जाताच ती म्हणाली.

"हम्म! हा मधला हॉल आहे. हे इथे बुद्ध देवांची मूर्ती कोरली आहे आणि ही पहा तारा बोधिसत्व मूर्ती. समोर चौथरा आहे तो निवांत बसून ध्यान करावं किंवा गप्पा मारण्यासाठी बसण्याची सोय आहे. या दोन्ही बाजुंनी खोल्यांसारखे खण आहेत; तिथे बौद्ध भिक्खू राहायचे." मही सांगत होता.

"ते खूप नंतर....." संस्कृती म्हणाली आणि गोविंदने तिचा हात धरून हलकेच दाबला. तसा आत अंधार होता त्यामुळे इतरांच्या ते लक्षात आलं नाही.

"बरं! इथे अजून काही बघण्यासारखं नाही. पुढच्या लेण्यात जाऊया का?" काही क्षण शांत राहून मही म्हणाला आणि इतर कोणी काही म्हणायची वाट न बघता तिथून बाहेर पडत पुढच्या लेण्याकडे वळला. जस्सी आणि शेषा देखील बाहेर पडले आणि ती संधी साधून गोविंद संस्कृतीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला; "संस्कृती, मला देखील जाणवतं आहे की इथे काहीतरी वेगळं आहे. पण ते कदाचित तुला आणि मला... इतकंच मर्यादित आहे. त्यातल्या त्यात जस्सी आणि शेषा समजून घेतील ग आपल्याला. पण हा महिरक्षक.... उगाच काहीतरी वाटेल त्याला. त्यामुळे जे काही वेगळं वाटतं आहे किंवा दिसतं आहे; ते मनात साठव. हॉटेलवर गेल्यावर बोलू आपण." त्या अर्धवट उजेड असलेल्या स्तूप सदृश खोलीमध्ये देखील संस्कृतीला गोविंदचे प्रेमाने ओथंबलेले डोळे समजले. मंद हसत तिने मानेनेच 'हो' म्हंटलं आणि ते दोघे तिथून बाहेर पडले.

"ही दुसरी आणि तिसरी लेणी. अगदी पहिल्या लेण्याप्रमाणेच आहे रचना यांची. आतून बघणार का हे पण?" मही दुसऱ्या लेण्याच्या बाहेर उभं राहून म्हणाला.

"नको.... आपण पुढे जाऊ चला." गोविंद म्हणाला.

"पण मला आत जाऊन बघायचं आहे काही वाट लागली आहे का आतून." जस्सी म्हणाला.

"मग तू आत जाऊन बघून ये आणि पुढे येऊन आम्हाला भेट. गोविंदजी म्हणाले ना पुढे जायचं... मग झालं तर." मही म्हणाला आणि पुढे चालायला लागला.


यावर शेषा काहीतरी बोलणार होता पण जस्सीने त्याला थांबवलं आणि 'चल पुढे जाऊ;' अशी खुण केली. सगळेच शांतपणे पुढे निघाले. गोविंदच्या मागे दोन-तीन पावलांचं अंतर ठेऊन शेषा चालत होता. त्याची नजर सगळीकडे फिरत होती. अचानक त्याला मागून कोणीतरी चालत येत असल्याचा भास झाला आणि थांबून तो मागे वळला. त्याच्या समोर नैना उभी होती.

उंच बांधलेली लांबलचक वेणी, काळे कपडे, डोळ्यांमध्ये असलेल्या काजळामुळे तिचे मूळचे तीक्ष्ण डोळे शेषाच्या काळजाचा वेध घेत होते. मुळात उंच असलेली नैना आत्ता मूळ उंचीपेक्षा देखील खूप जास्त उंच वाटत होती. शेषाची नजर नैनाच्या नजरेत गुंतली होती आणि त्याचं स्थळ काळाचं भान हरपलं होतं.

क्रमशः