Friday, September 24, 2021

चिरंजीवी (भाग 2)

 चिरंजीवी


भाग 2

मनस्वी सिद्धार्थला विविध विषयातील शिक्षण घेण्याची आवडच होती असं म्हंटलं तरी चालेल. म्हणूनच तो केवळ ग्रॅज्युएट आणि पुढे एम. बी. ए. होऊन थांबला नव्हता; तर त्याने कायद्याचे शिक्षण देखील पूर्ण केले होते. सिध्दार्थला चित्रकलेची देखील खूप आवड होती. ती बहुतेक त्याच्या आईकडून आली असावी. त्याची आई वैदेही ही एक प्रथितयश चित्रकार होती. त्यामुळे त्याने चित्रकला देखील शिकून घेतली होती. त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे जिममध्ये जाऊन वजनं उचलून उगाच बॉडी बिल्डर प्रमाणे प्रचंड शरीरयष्टी निर्माण करण्यापेक्षा उत्तम योगाभ्यास करून त्याने उत्तम शरीरासोबत शांत आणि स्थिरचित्त मन-बुद्धी मिळवली होती. मितस्थ राहाणाऱ्या सिद्धार्थला आपल्या पुरातन काळातील कथा वाचायला खूप आवडत असे. केवळ कथा म्हणून वाचून विसरून जाणं त्याने कधीच केलं नाही. मग ते रामायण असो महाभारत असो किंवा विष्णू दशावतार, श्रीगणेश कथा... प्रत्येक कथा किंवा महाकाव्य वाचत असताना ते सत्यतेच्या बाजूने देखील समजून घेत होता तो आणि त्यानंतर त्या-त्या विषयाचा बराच अभ्यास देखील केला होता. अलीकडच्या काळातील तरुण-तरुणी ज्या कथांना - मायथॉलॉजि म्हणजे मिथ - खोट्या कथा म्हणून संबोधून आपल्याच देशाच्या उज्वल भूतकाळाला हसत होती; त्यावेळी सिद्धार्थ प्रत्येकवेळी स्पष्ट शब्दात त्यांचे म्हणणे खोडुन काढत होता.

"यार, समजून घ्या. मुळात मायथॉलॉजि हा शब्द आपला नाहीच आहे. इंग्रजांनी जाता-जाता जे काही निरर्थक शब्द स्वतः तयार केलेल्या अर्थसकट आपल्याला दिले त्यातलाच एक हा. सॉरी, धर्म-जात आणि मायथॉलॉजि या त्यांनी दिलेल्या शब्दांना आणि त्याच्या अर्थांना आजही आपण चिकटून आहोत. थोडा अभ्यास आणि लॉजिकल विचार तुम्ही केलात ना तरीही तुमच्या लक्षात येईल की ज्याला तुम्ही 'मिथ' म्हणजे 'खोट्या कथा' म्हणून हसता आहात तो कदाचित आपला खरा भूतकाळ असेल. अरे; आपल्या भारता इतका पुरातन एकही देश किंवा संस्कृती नाही. त्यामुळे आपला इतिहास खूप जुना आहे. हे सत्य त्या गोऱ्यांना मान्य करायचं नव्हतं. त्यांच्या मते तेच सार्वभौम होते आणि म्हणून महान होते. त्यामुळे त्यांनी हा खेळ केला." सिद्धार्थ कायम हिरीरीने स्वतःच मत मांडत असे.

मात्र त्याचं म्हणणं तेवढ्यापुरतं ऐकून घेऊन त्याचे मित्र विषय संपवत असत. पुढे पुढे तर इतिहास आणि पुराण काळ हे विषय सिद्धार्थ असताना सगळेच टाळायला लागले. हे लक्षात आल्यानंतर तर सिद्धार्थ अजूनच अंतर्मुख झाला; पण म्हणून त्याने त्याला आवडणाऱ्या या विषयाचा अभ्यास सोडला मात्र नाही. त्याच्या या काहीशा वेगळ्या विषयाच्या आवडीमध्ये त्याला मनापासून साथ देत होती ती त्याची प्रेयसी कृष्णा. कृष्णा स्वतः पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती आणि तिने देखील 'महाभारतीय युद्धामधील पांडव पुत्र संहार' हा विषय अभ्यासासाठी घेतला होता. या निमित्ताने तिच्या सोबत सिद्धार्थ देखील या विषयावरील वाचन करत होता.

सिध्दार्थच्या घराच्या जवळच एक रद्दीवाला होता. कधीतरी एकदा सिध्दार्थने त्याच्याकडे एक जुनं पुस्तक बघितलं होतं आणि लगेच खूप जास्त मोबदला देऊन विकत घेतलं होतं. तेव्हापासून तो रद्दीवाला काही अशी जुनी पुस्तकं मिळाली की सिध्दार्थला स्वतः आणून देत असे. जर ते पुस्तक हवं असेल तर सिद्धार्थ त्याला न विचारताच पण मोठी रक्कम देत असे. असंच एकदा सिद्धार्थ ऑफिसला जायला निघाला होता आणि तो रद्दीवाला मुलगा अगदी धावत सिध्दार्थकडे आला.

"दादा, मला माजे काका सांगून ग्येले हुते की तुमाला जुनी पुस्तकं आन तसंच काही आसल तर सांगायचं. म्हनून आलोय; एक लाकडी पेटी हाय आलेली. थोडी जड पडली म्हणून नाय आणली हित. येता का बघायला. तुमाला पटली तर घ्या... नायतर मी टाकून देनार म्हनतो." सिद्धार्थ समोर उभा राहात तो म्हणाला. सिध्दार्थ मंद हसला आणि लगेच त्याच्या सोबत त्याच्या दुकानाच्या दिशेने गेला. त्या पोराने त्याच्या त्या पत्र्याच्या खोपटातून एक सुंदर लाकडी पेटी बाहेर काढली. तिच्यावर सुंदर नक्षीकाम केलं होतं. सिध्दार्थने पेटी हातात घेतली आणि तिच्यावरून हात फिरवत धूळ झटकली. हात फिरवताना मात्र त्याला त्या नक्षीमध्ये काहीतरी वेगळं आहे याची जाणीव झाली; त्याने नीट निरखून बघितलं तर ती केवळ नक्षी नसून संस्कृत श्लोक असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्या पेटीविषयीची उत्सुकता त्याच्या मनात निर्माण झाली. त्याने एकदा त्या पोरकडे बघितलं. ते पोरगं देखील सिध्दार्थकडे हसत बघत होतं. सिध्दार्थने खिशात हात घातला आणि दोन हजार रुपये काढून त्या पोराला दिले. तो पोरगा हसला आणि सिद्धार्थ मागे वळला. पण मग त्याला काय वाटलं कोण जाणे परत त्याच्या जवळ जाऊन सिध्दार्थने त्याला अजून दोन हजार दिले आणि मग वळून घराकडे आला. सिद्धार्थ गाडीत बसून ऑफिसच्या दिशेने निघाला. ती पेटी त्याने त्याच्या शेजारच्या सीटवर ठेवली होती. खरं तर ती पेटी उघडायची उर्मी त्याला स्वतः बसू देत नव्हती. पण एक महत्वाची मीटिंग ठरली होती ऑफिसमध्ये. त्यामुळे मन दाबून तो ऑफिसमध्ये पोहोचला. मात्र मीटिंग सुरू होण्याअगोदर त्याने कृष्णाला मेसेज करून ठेवला आणि सोबत त्या पेटीचा फोटो देखील पाठवला.

सिद्धार्थ कॉन्फरन्स रूममधून स्वतःच्या केबिनमध्ये आला तर समोर कृष्णा बसली होती. तिच्या समोर ती पेटी होती आणि हातातील भिंगाने ती त्या पेटीचं निरीक्षण करण्यात गुंग झाली होती. तिला तसं बघून सिद्धार्थ हसला आणि त्याच्या शेजारी येऊन बसत म्हणाला;"काहीतरी इंटरेस्टिंग सांग ग." त्याच्या आवाजाने कृष्णा एकदम दचकली. तिने सिध्दार्थकडे मोठे डोळे करून बघितलं. तिच्या त्या मोहक रुपाकडे बघत सिद्धार्थ म्हणाला;"यार, किती वेळा सांगितलं आहे तुला असं मोठे डोळे करून नको बघत जाऊस माझ्याकडे. सगळं विसरून या डोळ्यात हरवून जातो मी." त्याच्या त्या बोलण्याने मनातून सुखवलेली कृष्णा वरकरणी मात्र त्याच्या दंडाला चापट मारत म्हणाली;"उगाच मस्का मारू नकोस ह." तिचा चेहेरा आपल्या हातांच्या ओंजळीत धरत सिद्धार्थ म्हणाला;"कृष्णा, खरंच मस्का नाही ग. तुझे हे टपोरे काळे डोळे मला खरंच वेड लावतात. तू सर्वार्थाने तुझ्या नावाला साजेशी आहेस. श्रीकृष्णाची कृष्णा! ती द्रौपदी देखील सावळी होती. काळ्याभोर विशाल नेत्रांची, हुशार, पराक्रमी आणि तरीही शालीन कुलीन होती ती. खरं सांगू? तुला जेव्हा जेव्हा हाक मारतो न मी तेव्हा तेव्हा मला ती आठवते." कृष्णा सिध्दार्थच्या कौतुकाने खूप सुखावून गेली होती आणि त्याच्या ओंजळीतल्या आपल्या चेहेऱ्यावर त्याची गुंतलेली नजर देखील तिला हवीशी वाटत होती. नकळत तिने डोळे मिटले आणि सिध्दार्थने न राहून तिचं चुंबन घेतलं. दोघेही हरवून गेले एकमेकांत. किती वेळ गेला कोण जाणे पण अचानक सिध्दार्थचा फोन वाजला आणि दोघेही भानावर आले. सिध्दार्थला हलकेच दूर ढकलत कृष्णा म्हणाली;"ए, ऑफिसमध्ये आहोत आपण. तुला बरा इथे चावटपणा सुचतोय." त्यावर मिश्कीलपणे हसत सिद्धार्थ म्हणाला;"यात चावटपणा काय? माझ्या लाडक्या प्रेयसीचं चुंबन घेतलं मी!" त्याचं बोलणं ऐकून कृष्णा एकदम कावरी-बावरी झाली आणि त्याला अजूनच ढकलून देत ती थोडं पलीकडे असलेल्या खुर्चीवर जाऊन बसली. तिच्या त्या कृतीने सिध्दार्थला खदखदून हसू आलं.

त्याच्या हसण्याकडे दुर्लक्ष करत कृष्णा म्हणाली;"सिद्धार्थ ही पेटी म्हणजे नक्की खजिना आहे पूर्वकालीन माहितीचा. अरे या पेटीवरचा हा श्लोक तू वाचलास का?" कृष्णाने विषय बदलला आणि सिद्धार्थ एकदम शांत होत तिच्या शेजारच्या खुर्चीत येऊन बसला. त्याने पेटी स्वतःसमोर ओढली आणि तिच्यावरून हात फिरवत त्याने श्लोकावरून नजर फिरवली आणि परत प्रश्नार्थक नजरेने कृष्णाकडे त्याने बघितलं.

"अग त्या रद्दीवाल्या पोराने मी अगदी निघताना हाक मारून ही पेटी दिली. ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग होती. त्यामुळे इच्छा असूनही मी पेटीकडे बघितलंसुद्धा नाही. तुला फोटो पाठवून इथे यायला सांगितलं आणि लगेच मीटिंगसाठी गेलो. ते आत्ता येतो आहे तुझ्यासमोर. मी पेटी हातात घेतली होती त्याचवेळी माझ्या लक्षात आलं होतं की या पेटीवर ही नक्षी नसून काहीतरी लिहिलं आहे. पण मग म्हंटलं तू वाचून अर्थ शोधूनच ठेवशील." सिद्धार्थ म्हणाला.

कृष्णाने परत एकदा ती पेटी स्वतःपुढे ओढली आणि त्या श्लोकावरून हात फिरवत ती म्हणाली; "सिद्धार्थ ही पहिली पेटी नाही." चमकून तिच्याकडे बघत सिद्धार्थ म्हणाला;"म्हणजे? काय म्हणते आहेस तू कृष्णा?"

"सिद्धार्थ हा श्लोक वाच:

चतुर्थ्म सम्पुटकः अस्य सप्तैतान् विचितिः!
प्राप्तंतु इदम् विचितिः अर्थात् अन्य सर्व मंजुषा आप्स्यति!

या श्लोकाचा अर्थ:

ही पेटी चौथी आहे आणि अशा सात पेट्या आहेत. ही पेटी जर तुला मिळाली असेल तर याचा अर्थ हा आहे की तुला बाकी सर्व पेट्या मिळतील.

म्हणजे ही पेटी जर चौथी आहे तर पहिल्या आणि पुढच्या तीन कुठे आहेत? जर ही तुला मिळाली आहे तर याचा अर्थ इतर देखील तुला मिळणार." कृष्णा बोलायची थांबली आणि तिने सिध्दार्थकडे वळून बघितलं. सिद्धार्थ स्वतःच्याच विचारांमध्ये गुंगला होता. त्याचा तो चेहेरा बघून कृष्णाला त्याची चेष्टा करण्याचा मोह झाला आणि त्याच्या डोळ्यांसमोर चुटकी वाजवत ती म्हणाली; "पण मग नक्की तुलाच की त्या रद्दीवाल्या मुलाला मिळणार त्या पेट्या?" तिच्या त्या एका वाक्याने सिद्धार्थ एकदम झोपेतून जागा झाल्यासारखा उठला आणि तिचा हात एका हातात धरत आणि दुसऱ्या हाताने ती पेटी उचलत तो झपाट्याने त्याच्या केबिनबाहेर पडला.

समोरच त्याला नेने काका दिसले. नेने काका सिध्दार्थच्या वडिलांनी जेव्हा ही कंपनी सुरू केली त्यावेळेपासून त्यांच्या सोबत आणि आता सिध्दार्थसोबत काम करत होते. सिध्दार्थने लिफ्टच्या दिशेने जाताना नेने काकांना हाक मारली आणि म्हणाला; "काका, एक खूप महत्वाचं काम आठवलं आहे. आज परत येत नाही बहुतेक मी. तुम्ही सांभाळून घ्या. अर्थात तसं महत्वाचं काही असलं तर फोन आहेच. सकाळच्या मीटिंगमध्ये जी चर्चा झाली आहे; त्याचा निर्णय आपण घेतलाच आहे. त्यामुळे त्याचं exicution तुम्ही सुरू करालच. येतो मी." नेने काका काही बोलायच्या आत सिद्धार्थ कृष्णा समवेत लिफ्टमध्ये शिरला होता.

सिध्दार्थने गाडी त्या रद्दीच्या दुकानाजवळ थांबवली. सिद्धार्थ आणि कृष्णा गाडीतून खाली उतरले आणि बघतात तर ते लहानसं पत्र्याचं खोपट पार तुटून गेलं होतं. आतमध्ये असणारा वजनाचा काटा देखील रस्त्यावर पडला होता. ते पाहून सिध्दार्थला खूप आश्चर्य वाटलं. तो पुढे झाला आणि त्या खोपटाकडे हतबल नजरेने बघणाऱ्या किरकोळ शरिरयष्टीच्या रद्दीवाल्याला त्याने विचारलं; "काय झालं या दुकानाचं?" सिध्दार्थकडे वळून बघत तो म्हणाला; "साहेब, काय सांगू? इतकी वर्षं आहे मी इथे. पण कधी काही प्रॉब्लेम झाला नाही. चार दिवस गावाला गेलो आणि बी एम सी वाले आले आणि माझं दुकान तोडून गेले." सिध्दार्थला ते ऐकून खूप वाईट वाटलं. त्याने खिशात हात घालून थोडे पैसे काढले आणि त्याच्या हातावर ठेवत विचारलं; "दादा, तुमचा भाचा कुठे गेला? तो होता का दुकान तुटत होतं तेव्हा?" त्यावर उसळून येऊन तो मनुष्य म्हणाला; "कुठला भाचा आन काय घेऊन बसलात साहेब? माझ्या झोपडीच्या शेजारी रस्त्यावरच राहात होता तो पोरगा. मला गावाहून फोन आला होता की आईची तब्बेत ठीक नाही. मला तसंच पळायचं होतं म्हणून मग त्या पोराला सांगितलं होतं काही दिवस दुकान सांभाळ. तसा प्रामाणिक आहे. त्यामुळे त्याच्यावर भरवसा होता. अर्थात जे झालं त्यात त्याची काहीच चूक नाही. उगाच रागावलो हो मी त्याच्यावर. हाकलून दिला त्याला. बिचारा कुठे जाईल आता काय माहीत." त्यांचं बोलणं ऐकून सिद्धार्थ विचारात पडला. तो मुलगा सापडला तर हे कळणार होतं की ही पेटी कोणी आणून दिली होती. पण तो कुठे गेला ते त्या दुकानदाराला माहीत नव्हतं. त्यामुळे सिद्धार्थ पुढे काय करावं या विचारात पडला.

सिध्दार्थचं मन थोडं शांत झालं आणि कृष्णा त्याच्या जवळ आली आणि म्हणाली; "सिद्धार्थ, तुला असं नाही का वाटतं की तू हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागला आहेस? अरे जी पेटी आपल्याजवळ आहे तिचा विचार तर करूया अगोदर."

सिध्दार्थने कृष्णाकडे वळून बघितलं आणि म्हणाला; "खरंय. चल, बघू तर खरं काय आहे त्या पेटीमध्ये. म्हणजे आपल्याला अंदाज येईल इतर सहा पेट्यांमध्ये काय आहे. मग ठरवू त्याच्या मागे लागायचं का."

सिध्दार्थचा हात धरत कृष्णा म्हणाली; "सिद्धार्थ, तू नीट ऐकलं नाहीस बहुतेक मी काय म्हणाले ते. मी म्हणाले; आपण विचार करूया या पेटी संदर्भात. एकूण सात पेट्या आहेत याव्यतिरिक्त त्या श्लोकातून काहीही प्रतीत होत नाही आहे. त्यामुळे ही पेटी उघडल्यानंतर आत काय असेल याचा विचार केल्याशिवाय उगाच धोका पत्करण्यात अर्थ नाही."

सिध्दार्थला तिचं म्हणणं पटलं आणि तो तिला म्हणाला; "इथवर आलीच आहेस तर चल घरीच जाऊया. शांतपणे विचार करून ठरवू काय करायचं आहे."

दोघेही घरी आले; पण कोणीही बोलायच्या मनस्थितीत नव्हतं. पेटी हॉलमधील मधल्या टेबलवर ठेऊन विचार करत-करत सिद्धार्थ गॅलरीमध्ये जाऊन उभा राहिला... कृष्णा मागून त्याचं निरीक्षण करत स्वतःच्याच विचारात गढून गेली होती. इतक्यात सिध्दार्थची आई तिथे आली. सिद्धार्थ आणि कृष्णा विचारात गढलेले बघून तिला हसायला आलं आणि ती त्याच्या सोबत सोफ्यावर बसली. तरीही दोघांचंही लक्ष तिच्याकडे गेलं नाही. मात्र वैदेहींच लक्ष समोर ठेवलेल्या पेटीकडे गेलं आणि अगदी सहज त्यांनी ती पेटी मांडीत घेतली. तिच्यावरील नक्षीकामावरून त्यांनी हात फिरवला. कोरलेला श्लोक देखील वाचला. त्यामुळे त्यांची उत्सुकता एकदम वाढली. त्यांनी एकदा परत सिद्धार्थ आणि कृष्णाकडे बघितलं. दोघेही आपापल्या विचारत गढलेले आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. एक हलकंस स्मित करून त्यांनी ती पेटी उलट-सुलट करून बघितली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की इच्छा असली तरी ही पेटी अशी सहज उघडली जाणार नाही आहे. कारण ना त्याला काही लॉक होतं; ना कुठूनही उघडण्यासाठीची फट. कोणत्याही बाजुंनी हिंजीस नसल्याने पेटी कुठून उघडली जाईल ते देखील कळणं अवघड होतं. काही क्षण विचार करून वैदेहींनी केसातून पिन काढली आणि अगदी हलेकच ती पिन त्या कोरलेल्या श्लोकावरून फिरवायला लागल्या. संपूर्ण श्लोकावरून पिन फिरली पण तरीही काहीही झालं नाही. त्यावर खांदे उडवून वैदेहींनी पेटी परत टेबलावर ठेवली आणि आता मात्र त्यांनी सिद्धार्थ आणि कृष्णाला हाक मारली.

"तुम्ही एकमेकांसोबत आहात की एकटे आहात ते सांगा रे पोरांनो; त्याप्रमाणे कोणाशी आणि कसं बोलायचं ते मी ठरवते." त्यांचा आवाज ऐकून दोघेही भानावर आले आणि एकदम सगळेच हसले. सिध्दार्थचा मनस्वी स्वभाव माहीत असल्याने समोरच्या पेटीविषयी काही एक न बोलता वैदेहींनी इतर गप्पांना सुरवात केली आणि पेटीचा विषय मागे पडला. थोड्या वेळाने कृष्णा निघाली. तिला सोडायला सिद्धार्थ खाली गेला त्यावेळी त्याचा हात हातात घेऊन कृष्णा म्हणाली; "सिद्धार्थ, आता मला जाणं आवश्यक आहे. पण मी उद्या सकाळीच येते आहे. मग ठरवू आपण काय करायचं ते. पण तोवर ती पेटी उघडू नकोस हं; प्लीज!" कृष्णाचा हात हातात घेऊन त्यावर थोपटत सिद्धार्थ म्हणाला; "कृष्णा, Don't worry. नाही उघडणार मी ती पेटी तुझ्याशिवाय." त्यावर एक गोड हास्य करून कृष्णाने त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि मागे वळून चालायला लागली.

कृष्णा निघाली आणि सिद्धार्थ घरी परतला. समोर ती पेटी तशीच पडलेली होती. काहीसा विचार करून सिध्दार्थने ती पेटी उचलली आणि तो त्याच्या खोलीत गेला. समोर ती पेटी ठेऊन सिद्धार्थ पलंगावर बसला आणि परत स्वतःच्याच विचारांमध्ये गढून गेला आणि त्यातच त्याला झोप लागली. जेव्हा सिध्दार्थला भान आलं त्यावेळी किती वेळ गेला त्याला कळलंच नाही. पण खोलीमध्ये खूपच अंधार होता. सिध्दार्थचं लक्ष त्या पेटीकडे गेलं आणि तो दचकला. कारण पेटी एका बाजूनं उघडली गेली होती आणि त्यातून हिरव्या रंगाचा प्रकाश परावर्तित होत होता. आपण झोपेत तर नाही न असं वाटून त्याने स्वतःला चिमटा काढला... आणि आपण पूर्ण जागे असल्याचं त्याच्या लक्षात आलं. अगदी सावकाश तो त्या पेटीच्या दिशेने गेला. तो पेटीला हात लावणार इतक्यात त्याला जाणवलं की समोरच्या स्टडी टेबलासमोरच्या खुर्चीवर कोणीतरी बसलं आहे. त्या जाणिवेने सिद्धार्थ खूपच दचकला.

"कोण? कोण बसलंय?" सिध्दार्थने धारदार आवाजात विचारलं. पण उत्तर नाही आलं. मात्र सिध्दार्थची खात्री होती की नक्की कोणीतरी आहे तिथे. त्याचा हात बाजूच्या दिव्याच्या बटणाकडे गेला.... त्याने सटकन त्याने दिवा लावला.... आणि समोर बघितलं......

दिवा लावण्यासाठी जो एक क्षण तो वळला होता त्यात देखील त्याच्या मनात एक विचार एखाद्या शलाके प्रमाणे चमकून गेला.... मी मान वळविन तेव्हा समोर कोणीही नसणार... आणि मग हा मला भास होता असं मी स्वतःला समजावणार!

.....आणि समोर बघितलं..... सिध्दार्थच्या समोर स्टडी टेबलाच्या बाजूच्या खुर्चीमध्ये अत्यंत सहजपणे एक मध्यम वयाचे गृहस्थ बसले होते. अत्यंत प्रसन्न चेहेरा होता त्यांचा. भरदार दाढी होती. शांत मनमिळाऊ नजरेने ते सिध्दार्थकडे बघत होते.

कोणीतरी आगंतुक आपल्या खोलीमध्ये असल्याचं बघून सिध्दार्थला खूप आश्चर्य वाटलं. पण मनात कुठेही भितीचा लवलेशही नव्हता. "कोण तुम्ही?" त्याने अगदी सहज आवाजात विचारलं.

"सिध्दार्थ, मी कोण आहे हे समजून घेऊन काय फरक पडणार आहे वत्सा?"

एक अत्यंत धीरगंभीर आवाज सिध्दार्थच्या मानत घुमला. सिध्दार्थला खात्री होती की आवाज समोरच्या व्यक्तीच्या दिशेनेच आला आहे. पण तरीही तीच व्यक्ती बोलली याबद्दल त्याला खात्री नव्हती. सिध्दार्थच्या मनाची अवस्था अत्यंत दोलायमान झाली होती. समोर कोणीतरी आहे; हे नक्की... पण ती व्यक्ती बोलते आहे की आपलं मन बोलतं आहे? या व्यक्तीचा समोरच्या पेटीशी काही संबंध आहे का?

"सिद्धार्थ, वत्सा, थोडं स्वतःच्या अंतर्मनात वळून बघितलंस तर तुला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला तुझ्यातच सापडेल."

परत एकदा आवाज घुमला आणि आता मात्र सिद्धार्थ अस्वस्थ झाला. खरं तर तो आवाज इतका शांत आणि गंभीर होता की एखाद्याला गुंगी यावी. पण सिद्धार्थ त्याक्षणी त्या आवाजाच्या जादूमध्ये किंवा त्यांनी बोललेल्या शब्दांमध्ये अडकला नव्हता; तर ही व्यक्ती इथे आलीच कशी या प्रश्नाशी त्याचं मन गुंतलेलं होतं.

"सिद्धार्थ, मी कोण आहे? इथे कसा आलो? हे जाणून घेण्यापेक्षा देखील महत्वाचं म्हणजे मी तुझ्याकडे का आलो आहे; हे तू जाणून घेणं नाही का?"

सिध्दार्थने पहिल्यांदाच कोणाचा आवाज आहे यापलीकडे जात तो आवाज काय म्हणतो आहे हे ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्याला एक मंद हास्य ऐकू आलं.

"मला खात्री होती की मी तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे." परत तोच आवाज. आता सिद्धार्थ मनातून शांत झाला होता. त्याच्या मनाने त्याला खात्री दिली होती की समोर बसलेली व्यक्ती त्यालाच काय जगात कोणालाही दुखवू शकत नाही. किंबहुना या व्यक्तीचं इथे असणं याला नक्की काहीतरी प्रयोजन आहे. एकदा मनाने ग्वाही दिल्यानंतर सिद्धार्थ देखील मंद हसला आणि म्हणाला;

"तुम्ही कोण आहात ते मला माहीत नाही. पण एक नक्की सांगेन की आम्ही मानव समोर कोण आहे, त्या व्यक्तीचं तिथे असण्याचं प्रयोजन काय अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये अगोदर अडकतो. त्यामुळे जर मला माझ्या मनातील या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत तर तुम्ही मला जे काही सांगण्यासाठी इथवरचा प्रवास केला आहात तो व्यर्थ जाईल."

परत एकदा एक मंद हास्य आजूबाजूला पसरलं आणि त्यासोबत त्या पेटीमधून येणारा हिरवा प्रकाश देखील.

"सिद्धार्थ, यापुढे तू एका वेगळ्या प्रवासासाठी निघणार आहेस. कदाचित तुझ्या मनात पहिला प्रश्न हा उद्भवू शकतो की तूच का? त्याचं उत्तर मी देऊ शकणार नाही; कारण माझं प्रयोजन त्यासाठी नाही. मात्र तुझ्या मनातील सर्व शंका दूर करणं आवश्यक आहे; हे मला मान्य आहे आणि म्हणूनच मी तुला माझी ओळख सांगतो आहे."

असं म्हणून ती व्यक्ती उभी राहिली आणि सिध्दार्थच्या लक्षात आलं की सर्वसाधारण मनुष्याच्या उंचीपेक्षा या व्यक्तीची उंची जास्त आहे. ती व्यक्ती सिध्दार्थच्या समोर येऊन बसली... बसताना त्या व्यक्तीने पद्मासन घातले. आता सिद्धार्थ त्या व्यक्तीचं पूर्ण निरीक्षण करू शकत होता. त्यांनी परत एकदा एक मंद स्मित केलं आणि बोलायला सुरवात केली...

"वत्सा, माझं नाव बिभीषण! मी सर्व वेद मुखोद्गत असलेला दशग्रंथी ब्राम्हण असूनही क्षत्रिय धर्म पालन करणाऱ्या रावणाचा बंधू आहे. हे सत्य तू अमान्य करूच शकणार नाहीस पुत्रा; कारण आजवर कोणत्याही माता-पित्याने आपल्या मुलाचं नाव बिभीषण ठेवलं नसेल. मी इथे त्या पेटीकेच्या साहाय्याने आलो आहे.... तुझ्या मर्त्य मनातील प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर आता मी माझ्या येण्याचे प्रयोजन सांगतो. सिद्धार्थ; पुत्रा... मी बिभीषण; श्रीरामांनी दिलेल्या वरानुसार चिरंजीवित्व स्वीकारून कालमापनाच्या मर्यादांच्या पलीकडे जात जगतो आहे. त्रेता युगातील श्रीराम जन्म आणि त्यांनी केलेले कार्य याचा मी साक्षीदार आहे. माझ्या सख्या भावांच्या वीरमरणाचं काही अंशी कारण मी स्वतः आहे... आणि तरीही मी श्रीरामांच्या आशीर्वादाने चिरंजीवी झालो आहे. माझ्या चिरंजीवित्वाचं कारण देखील तसंच आहे..."

ती व्यक्ती अव्याहत बोलत होती आणि सिद्धार्थ मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे ऐकत होता. परंतु तरीही त्याची सारासार विवेकबुद्धी जागृत होती. त्यामुळे समोरची व्यक्ती कोण आहे हे कळल्यानंतर सिध्दार्थचं मन देखील त्याच्याशी बोलू लागलं. नकळत हात जोडत सिध्दार्थ बोलायला लागला...

"महाराज; आपण ज्याप्रमाणे सांगता आहात की आपण स्वतः बिभीषण आहात... हे ऐकून माझ्या मानत कुतूहल जागृत झाले आहे."

"बोल वत्सा, आज खरं तर मी तुझ्याशी बोलण्यासाठी आलो आहे. परंतु एकतर्फी बोलणे मला कधीच मान्य नाही आणि नव्हते. त्यामूळे तुझ्या मनातील शंका दूर करण्यास मी तयार आहे."

"महाराज, माझ्या मनात काही प्रश्न उभे राहिले आहेत. आपण जर बिभीषण असाल तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या... स्वतःच्याच भावांच्या आणि आप्तस्वकीयांच्या मृत्यूचं कारण आपण स्वतः आहोत हे माहीत असूनही आपण चिरंजीवित्व का मान्य केलंत?"

सिध्दार्थचा प्रश्न ऐकून समोरची व्यक्ती काही क्षण शांत झाली आणि मग परत बोलायला लागली...

"वत्सा, मी ज्यावेळी पहिल्यांदा लंकेमधून बाहेर पडलो आणि श्रीरामांच्या समक्ष जाऊन उभा राहिलो त्यावेळी माझ्याही मानत हाच प्रश्न होता की स्वतःच्याच आप्त-स्वकीयांच्या विरोधात मी उभा राहतो आहे हे योग्य आहे का? मात्र श्रीरामांनी मला सांगीतले की कोणीही कितीही दूषणे दिली तरी विवेकबुद्धिपासून ढळू नये. त्यावेळी दशग्रंथी अशा माझ्या बंधूने केवळ अविचार करून माता सीता यांचे अपहरण केले होते. ही कृती न्याय सम्मत नव्हती. मी विविध प्रकारे माझ्या बंधुला समजावण्याचा प्रयत्न केला... परंतु त्याचा उपयोग झाला नाही. सरते शेवटी समस्त मानव जातीच्या उध्दाराच्या दृष्टीने मी योग्य निर्णय घेतला आणि श्रीरामांना येऊन भेटलो. माझ्या या कृतीमधून माझी न्याय सम्मत संसार निर्मितीची उर्मी श्रीरामांच्या लक्षात आली आणि त्यांनी माझा हाच विचार पुढील पिढ्यांमध्ये मी रुजवावा यासाठी मला चिरंजीवित्व दिले. परंतु वत्सा आज या कलियुगामधील मानवाने सद्सद्विवेक बुद्धी दूर सारली आहे आणि केवळ स्वकेंद्री आयुष्याच्या मागे तो धावतो आहे. वत्सा, आता मी कितीही प्रयत्न केला तरी आजच्या मानवाने स्वतःच्या ह्रासाच्या दिशेने पाऊल उचलले आहे; ते मागे फिरवणे शक्य नाही. आज मी माझ्या उद्दिष्टापासून अनेक दशके दूर गेलो आहे... आणि तरीही चिरंजीवित्व वागवतो आहे. सिद्धार्थ, तुला भेटण्याचे हेच एक प्रयोजन आहे... तू एका वेगळ्या प्रवासाला निघतो आहेस. त्यामुळे या प्रवासादरम्यान जर तुझी गाठ अशा व्यक्तीशी झाली की ती व्यक्ती या माझ्या चिरंजीवित्वाचा परत एकदा विचार करू शकणार असेल; तर माझ्या मनातील व्यथा तू नक्की त्या व्यक्तीपर्यंत पोहोचव. आजच्या या काळात ना न्यायसंमत राज्य चालवले जात आहे; ना खऱ्या सुखाचा विचार कोणी करतो आहे.... माझ्या आयुष्याच्या असण्याचे कारणंच संपले आहे. त्यामुळे मला हे माझे चिरंजीवित्व परत करायचे आहे. सिध्दार्थ केवळ तूच हे करू शकतो आहेस... कारण तुझी निवड करण्यात आली आहे.

............ मी जे सांगितलं त्याचा विचार कर वत्सा....." इतके बोलून ती व्यक्ती बोलायचे थांबली. सिध्दार्थच्या डोळ्यावर झापड यायला लागली आणि नकळत त्याचा डोळा लागला.

सिध्दार्थला जाग आली त्यावेळी त्याच्या घडाळ्याचा अलार्म वाजत होता आणि खोलीमध्ये सूर्यप्रकाश शिरला होता.

क्रमशः

Friday, September 17, 2021

चिरंजीवी भाग 1

 चिरंजीवी


भाग 1

चिरंजीवित्व म्हणजे नक्की काय असेल? काळ मापन संपेपर्यंत जिवंत राहाणं. कालांता पर्यंत मृत्यू न येणं; म्हणजे चिरंगीजित्व असेल का? पण जरी मृत्यू येत नसला तरीही शरीर पेशींमध्ये सुक्ष्मगतीने का होईना पण बदल तर होत असतीलच न. जीवन धर्म - शरीर धर्म तर कोणालाही चुकलेला नाही. आप्त-स्वकीय सोबत नसलेलं, बदलत्या काळासोबत होणारे बदल स्वीकारणं अवघड जात असताना देखील जगत राहाणं किती अवघड असेल? भारतीय पुराण काळातील कथांमध्ये सांगितल्याप्रमाणे सात मानव आहेत ज्यांना चिरंजीवित्व प्राप्त झालं आहे.

अश्वत्थामा बलिर्व्यासः हनूमांश्च बिभीषणः।
कृपः परशुरामश्चैव सप्तेते चिरंजीविनः॥

अश्वत्थामा, बळी राजा, व्यास मुनी, हनुमान, राजा बिभीषण, कृपाचार्य, परशुराम हे चिरंजीवी आहेत. यातील बळी राजा आणि परशुराम हे सत्ययुगातले आहेत. हनुमान आणि बिभीषण हे त्रेता युगातले तर कृपाचार्य, व्यास महर्षी आणि अश्वत्थामा हे द्वापार युगातले. हे सगळे जरी चिरंजीवी असले तरी प्रत्येकाचे चिरंजीवित्वचे कारण संपूर्णपणे वयक्तिक आणि वेगळे आहे.

सत्य युगातील बळी राजा असुर योनीतील असूनही अत्यंत सत्शील आणि न्यायसम्मत राज्य करत होता. अत्यंत दानी बळी राजा भक्त प्रल्हादाचा नातू होता. एक अशी कथा देखील आहे की इंद्राने कपटाने बळी राजाच्या पित्याचा वध केला होता. त्यामुळे पृथ्वीवरील राज्य प्रस्थापित झाल्यानंतर बळी राजाने त्याचा मोर्चा स्वर्गाकडे वळवला आणि इंद्राशी युद्ध करून त्याला स्वर्गातून हाकलून दिले. इंद्राने विष्णुकडे धाव घेतली. विष्णूने वामन अवतार घेतला आणि तो बळी राजाकडे गेला. युद्ध जिंकल्यानंतर बळी राजाने मोठा यज्ञ केला होता आणि त्यानंतर दान दानासाठी नावाजलेला बळी राजा दान देण्यास उभा राहीला. त्यावेळी वामन अवतारातील विष्णूने तीन पावलांइतकी जमीन दान मागितली. बळी राजाने ते मान्य करून अर्ध्य सोडले. त्क्षणी वामन अवतारातील विष्णूने विश्व रूप धारण करत पाहिले पाऊल स्वर्गावर ठेवले. दुसरे पाऊल पृथ्वीवर ठेवले... आणि मग बळी राजाकडे वळून म्हणाला अरे तू जे जिंकले होते ती जमीन तर मी दोन पावलांमध्ये प्राप्त केली. तरीही तिसरे पाऊल अजून आहेच. त्यावर बळी राजाने तिसरे पाऊल माझ्या मस्तकी ठेवावे; असे वामन अवतारी श्रीविष्णूला सांगितले. वामनाने तिसरे पाऊल तर ठेवले; परंतु आपण कोण आहोत हे माहीत असूनही बळी राजा दान देण्यास कचरला नाही हे समजून श्रीविष्णू त्यांच्या मूळ रुपात आले आणि त्यांनी बळी राजाला वर मागण्यास सांगितले. बळी राजाने सस्मित चेहेऱ्याने म्हंटले; "देवा, मी आनंदाने पाताळचे राज्य स्वीकारतो परंतु माझी एकच इच्छा आहे की तुम्ही माझ्या राज्याचे द्वारपाल व्हावे." श्रीविष्णूने ते मान्य केले. आता ज्या राज्याचा द्वारपाल प्रत्यक्ष श्रीविष्णु आहे तिथे यम देखील जाणे शक्य नसल्याने बळी राजा चिरंजीवी झाला.

परशुराम कथा देखील अशीच काहीशी अचंबित करणारी आहे. परशुरामांना त्याच्यातून मोठे असे सहा भाऊ होते. त्यांचे पिता जमदग्नी ऋषी होते. ते एकदा संध्येसाठी बसले होते त्यावेळी त्यांना अर्ध्य देण्यासाठी जल हवे होते. त्यांनी त्याच्या पत्नीस; रेणुका मातेस; जल आणून देण्यास सांगितले. रेणुका मातेला जल देण्यास विलंब झाला आणि जमदग्नी ऋषींना खूप राग आला. त्या रागाच्या भरात त्यांनी आपल्या पुत्रांना रेणुका मातेचा वध करण्यास सांगितले. त्यावेळी परशुराम तेथे नव्हते. सहाही पुत्रांनी मातेचा वध करण्यास नकार दिला. त्यामुळे जमदग्नी ऋषींचा राग अजूनच वाढला आणि त्यांनी आपल्या सहाही पुत्रांना भस्मसाद केले. त्याचवेळी परशुराम तिथे आले. जमदग्नी ऋषींनी परशुरामांना रेणुका मातेचा वध करण्यास सांगितले. परशुरामांनी कोणताही विचार न करता त्क्षणी रेणुका मातेचा वध केला. ते पाहून जमदग्नी ऋषींचा राग शांत झाला. आपले म्हणणे लगेच मान्य केले यामुळे ते परशुरामांवर खुश झाले आणि त्यांनी हवा तो वर माग म्हंटले. त्यावेळी परशुरामांनी आपले सहाही भाऊ आणि माता रेणुका यांना परत जिवंत करण्याची विनंती जमदग्नी ऋषींना केली. जमदग्नी ऋषींनी देखील हसत हसत ती विनंती स्वीकारली आणि त्या सर्वांना परत एकदा जीवन दान दिले. त्यानंतर त्यांनी परशुरामांना स्वतः आशीर्वाद देऊन चिरंजीवित्व बहाल केले.

त्रेता युगातील हनुमंत आणि बिभीषण हे दोघे चिरंजीव हे श्रीरामांच्या आशीर्वादाने त्या पदाला पोहोचले आहेत. श्रीराम-रावण यांच्यातील युद्ध संपल्यानंतर श्रीरामांनी बिभीषणाला लंकेचे राज्य दिले. त्यावेळी बिभीषण अत्यंत दुःखी होता. 'देवन, मी माझ्या स्वतःच्या भावांचा विनाश केला हा विचार मला कालांता पर्यंत दुःख देईल. त्यामुळे मला हे राज्य नको. आता हा देह आपल्या साक्षीने कायमचा अग्निस अर्पण करावा अशी इच्छा आहे.' असे बिभीषणाने म्हणताच श्रीरामांनी त्याला जवळ घेतले आणि सांगितले; "बिभीषणा. वत्सा, तू असे म्हणणे योग्य नाही. राजा, तुझे जिवीतकार्य अजून संपलेले नाही. कोणीही कितीही दूषणे दिली किंवा आरोप केले; तरीही आपण आपल्या विवेकबुद्धिपासून आणि सारासार विचारशक्तिपासून विचलित होऊ नये; हा पुढील काळासाठी अत्यंत आवश्यक असा विचार त्या काळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुझे असणे आवश्यक आहे. त्यामुळे मी तुला चिरंजीवित्व बहाल करतो." असे म्हणून त्याला चिरंजीव केले.

लव-कुश परत आल्यानंतर आणि सीतेने स्वतःला भूमातेमध्ये सामावून घेतल्यानंतर श्रीरामांचे मन राज्यकारभारात लागत नव्हते. त्यामुळे जल समाधी घेऊन जीवनाचा त्याग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळी हनुमंताने देखील त्यांच्या सोबत निर्वाण करण्याचा मानस बोलून दाखवला. 'मला सतत तुमच्या नामस्मरणात राहायचे आहे भगवान.' हनुमान म्हणाला. त्यावेळी श्रीरामांनी हनुमानास सांगितले की अजून तुझे अवतार कार्य संपलेले नाही. काही दिवस लव - कुश यांच्या सोबत त्यांना राज्यकारभार करण्यास मार्गदर्शन कर आणि त्यानंतर कली युगापर्यंत भक्तीरूप सार जनमानसात रुजविण्याचे काम तू कर.. असे सांगितले आणि हनुमंतास चिरंजीवित्व बहाल केले.

द्वापर युगातील कृपाचार्य हे जन्मतःच चिरंजीव होते अशी वंद्यता आहे. कृपाचार्य आणि त्यांची भगिनी कृपी यांचे पिता शरद्वान ऋषी हे मोठे धरुर्धर होते. शास्त्र-अस्त्रपरंगत अशा शरद्वान ऋषींनी तपश्चर्या करण्यास सुरवात केल्यावर इंद्र घाबरला आणि त्याने जानपदी या देवकन्येला शरद्वान ऋशींची तपश्चर्या भंग करण्यास पाठवले. शरद्वान ऋषी जानपदीवर भाळले आणि पुढे कृप-कृपीचा जन्म झाला. मात्र माता-पिता दोघांनीही या मुलांचा त्याग केला आणि आपापल्या मार्गाने निघून गेले. कृप आणि कृपी ही दोन्ही बाळं राजा शंतनूला मिळाली असे मानले जाते. शंतनू राजाने त्यांचे पालन केले. कृपाचार्य आपल्या वडिलांप्रमाणे जन्मतःच धनुर्विद्येत अत्यंत पारंगत होते. त्याचप्रमाणे त्यांना इतर अस्त्र-शस्त्र विद्यांचे ज्ञान देखील उत्तम होते. त्यामुळे ते कौरव-पांडवांचे राजगुरू झाले. महाभारतीय युद्धानंतर कृपाचार्य हे पांडवांसोबत गेले. पुढे उत्तरेच्या मुलाला, परीक्षिताला; देखील कृपाचार्यांनी अस्त्रविद्या शिकविली असे मानले जाते. या संपूर्ण जीवन प्रवासात कृपाचार्यांच्या मृत्यूचा उल्लेख कधीही कुठेही मिळत नाही. त्यामुळे ते जन्मतः च चिरंजीवी होते; या मान्यतेला आधार मिळतो.

ऋषी पराशर आणि मत्स्यगंधा किंवा योजनगंधा किंवा सत्यवती यांचे पुत्र म्हणजे वेद व्यास. जन्मतःच महर्षी व्यासांना चारही वेदांचे पूर्ण ज्ञान होते; म्हणूनच त्यांना वेद व्यास म्हंटले जाते.

शंतनु आणि सत्यवती पुत्र चित्रांगद आणि विचित्रविर्य यांच्या मृत्यूनंतर सत्यवतीच्या आग्रहाखातर अंबा आणि अंबिका या विचित्रविर्य पत्नींना महर्षी व्यासांकडून पुत्र प्राप्ति झाली आहे. महाभारताचे लेखनकर्ते, वेद-पुराण निर्माते वेद व्यास यांना त्यांच्या पित्याकडून महर्षी पराशरांकडून चिरंजीवित्वाचे वरदान मिळाले आहे.

चिरंजीवित्व प्राप्त झालेल्यांमध्ये सर्वात शेवटी अश्वत्थामा येतो. गुरू द्रोणाचार्य आणि कृपी यांचा पुत्र अश्वत्थामा अत्यंत पराक्रमी आणि अस्त्र-शस्त्र विद्या पारंगत होता. जन्मतःच त्याच्या टाळूवर एक चमकणारा मणी होता. त्यावेळी ब्रह्मस्त्र जाणणारे केवळ परशुराम, अर्जुन, कर्ण आणि अश्वत्थामा होते. दुर्योधनाच्या मृत्यूनंतर आणि विशेषतः आपले पिता द्रोणाचार्य यांच्या मृत्यूमुळे संतापलेल्या अश्वत्थाम्याने ब्रह्मस्त्राचा वापर करून पांडवांच्या सर्व पुत्रांचा वध केला. श्रीकृष्णाने अश्वत्थाम्याला ब्रह्मस्त्र परत घेण्यास सांगितले असता त्याने ती विद्या येत नसल्याचे सांगितले. त्यावेळी श्रीकृष्ण सुदर्शनाच्या मदतीने अभिमन्यू पत्नी उत्तरेच्या गर्भातील परीक्षिताचा जीव वाचवू शकला होता. जी विद्या पूर्णपणे येत नाही तिचा वापर केवळ रागाच्या भरात अश्वत्थाम्याने केल्याने श्रीकृष्णाने त्याच्या टाळूवरील रत्न काढून घेतले आणि त्याला चिरंजीवित्वाचा शाप दिला. अशा प्रकारे अश्वत्थामा देखील चिरंजीव झाला.

असे आपल्या पुराणातील हे सात चिरंजीव! कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानक असे आपल्या पुराण कथांमधील चिरंजीवींबद्दल मी का सांगते आहे. पण गेले काही दिवस माझ्या मनात एकच विचार डोकावतो आहे... जर हे चिरंजीव आज या कलियुगात आले.... आणि फक्त आलेच असे नाही तर ते जी तत्व, विचार, साधना घेऊन आजवर जगत आहेत ती तत्व, विचार, साधना त्यांनी आपल्या समोर ठेवली तर?

...............सिद्धार्थ एका मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा. जन्मतः तोंडात सोन्याचाच नाही तर हिरे-माणके जडवलेला चमचा घेऊन जन्मलेला. आज तो एक अत्यंत उमदा तरुण आहे.... अत्यंत हुशार मुलगा. तत्वनिष्ठ असलेला सिद्धार्थ जर मनात आलं तर मात्र कोणाच्याही हाती लागण्याच्या पलीकडच्या कृती करतो. वडिलांसोबत तो ऑफिसमध्ये रोज जात होता. पण कधीतरी अचानक त्याच्या हाती एक जुनं पुस्तक पडलं आणि......

क्रमशः

Friday, September 10, 2021

एका भितीची गोष्ट (भाग 3) (समाप्त)

 

एका भितीची गोष्ट 

(भाग 3) (समाप्त)

ते गोदामाच्या दिशेने निघाले आणि मी त्यांच्या मागे. गोदामाच्या दारापाशी जीवा उभा होता. "आत कोणाला सोडू नकोस. मी आणि दिघे एकूण लाकडांची मोजणी करून लगेच बाहेर येतो आहोत." अस म्हणून मालक गोदामात शिरले. ते आत अगदी पहिल्या लाकडांच्या राशीपाशी जाऊन उभे राहिले आणि त्यांनी मलादेखील त्यांच्या जवळ बोलावून घेतले. मी पुरता बुचकळ्यात पडलो होतो. मालकांना हे असे अचानक लाकडे मोजण्याचे का सुचावे ते मला कळत नव्हते. 'कोणी माझ्याबद्दल तक्रार केली असेल का? माझ्यावरचा त्यांचा विश्वास उडाला असेल का?' माझ्या मनात अनेक विचार येत होते. मी देखील भराभर चालत त्यांच्याजवळ जाऊन पोहोचलो. "दिघे, मी काय सांगतो आहे ते निट एका. माझ्याकडे फार बोलायला वेळ नाही आहे. एरवी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याइतके माझे डोके देखील शाबूत आहे की नाही ते मला माहित नाही. पण हे नक्की की आज... आत्ता माझ मन आणि बुद्धी संपूर्णपणे माझ्या ताब्यात आहे. नंतरचं मला माहित नाही. तुम्ही जर उद्या मला आपल्या या भेटीची आठवण करून दिलीत तर कदाचित मी सपशेल नाकारीन. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. कारण मी आपली ही भेट इथून बाहेर पडण्याच्या अगोदर मनातून पुसून टाकणार आहे. त्याचं कारणही तसंच आहे. तिने जर माझं मन वाचलं तर तुमचं आणि माझं दोघांचं भविष्य धोक्यात येईल...." मालक अत्यंत हळू आवाजात बोलत होते आणि बोलताना देखील सारखे आजूबाजूला बघत होते. खर तर गोदामात आम्ही दोघेच होतो. सगळे कामगार कधीच निघाले होते. चुकून एकखाद-दुसरा काम करत असावा.... मशीनवर शेवटचे लाकूड कापले जात असावे. कारण मशीन चालू असल्याचा आवाज मात्र येत होता. पण ते सगळ बाहेर पार लांब चालू होतं. मी नक्की काय केलं पाहिजे ते मला सुचत नव्हतं. त्यामुळे मी मालकांच्या समोर नुसता उभा राहून ते काय बोलतात ते ऐकत होतो.


"दिघे, तिचं आपल्याकडे बारीक लक्ष आहे. आपल्या तिघांकडे! अजून तुम्हाला काहीच माहित नाही आहे त्यामुळे तुम्हाला ती काहीच करणार नाही. किंबहुना तिला काहीच करता येणार नाही. अहो, मलादेखील जोवर या सगळ्या प्रकारची माहिती नव्हती तोवर मी देखील खूप सुखी होतो. एकदिवस अचानक माझ्यासमोर हे सगळं उलगडलं आणि मीदेखील यात माझ्या इच्छेविरुद्ध अडकलो." मालक अजूनही कोड्यातच बोलत होते आणि मी जास्तच गोधाळून जात होतो. शेवटी मी मालकांना विचारले,"तुम्ही काय म्हणता आहात मालक? मला काहीच कळत नाहीय. कोण ती? काय करणार आहे?"


"श्श.... हळू बोल. भिंतींनाही कान असतात. मुख्य म्हणजे तिची नजर सतत माझा पाठलाग करत असते. दिघे, एक सांगू? मी हे असं दुसरं लग्न केल खरं. पण मला मुळात परत लग्नच करायचं नव्हतं. तिने मला भाग पडलं. म्हणून मग मी मुद्दाम आयत्यावेळी मालिनीच्या एवजी शालीनिशी लग्न करायचं म्हंटलं. मला वाटलं होतं बुवा नाही म्हणतील आणि मी एक निष्पाप जीव वाचवू शकेन. पण ते जमलं नाही. तिला माझा आणि माझ्याबरोबर अनेकांचा अंत करायचा होता, हे माझ्या उशिरा लक्षात आलं. मग मात्र  मला योग्य वेळेची वाट बघत बसण्याव्यातिरिक्त काही मार्ग नव्हता. दिघे, तुम्ही आलात आणि मला सुटकेची आशा वाटायला लागली. पण मग तुमचं आणि मालिनीच लग्न झालं आणि परत मला थांबायला लागेल हे लक्षात आलं. पण तुम्ही दोघे बंगल्यावर येऊन गेलात आणि माझ्या लक्षात आल की आता हा खेळ फार वेळ टिकणार नाही. तिचे विचार माझ्यापेक्षाही पुढे धावत आहेत.  मुळात जर मी स्वतःला वाचवायला गेलो तर इतर मारतील. आणि दुसऱ्यांना मरू देऊन मी जगू शकत नाही. दिघे, मला माझा अंत दिसतोच आहे... पण निदान मी निर्दोष आणि प्रामाणिक आयुष्य वाचवू शकलो तर शांतपणे मरू शकेन." 


मालक काय बोलत होते ते मला अजिबात कळत नव्हतं. ते कोणाबद्दल बोलत होते? कोण होती ही ती? जिच नाव ते घ्यायला तयार नव्हते. मालिनी...की शालिनी? जिला सगळं कळतं असं त्याचं म्हणण होत. अगदी मनदेखील वाचता येत होतं तिला मालकांच! कदाचित शालिनीच. नाहीतर अजून कोण होतं त्यांच्या बंगल्यात आणि आयुष्यात? मी मालकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. "मी काही करण्यासारखं आहे का मालक?" मी विचारलं. त्यावर त्यांनी डोळ्यात पाणी आणून नाकारात्मक मान हलवली. ते अगदी हळू आवाजात पुटपुटले,"हिने देखील हट्टाने माझ्याशी लग्न केले. मी खूप समजावले होते तरी. आता ती देखील माझ्याबरोबर भोगते आहे सगळं." मी अजूनच गोंधळलो. मी अजून काहीतरी त्यांना धीर देणारं बोलणार होतो तेवढ्यात जीवा आत आला आणि म्हणाला,"मालक, बंगल्यावरून फोन होता. मालकीणबाईंना बरं वाटत नाही. तुम्हाला लवकर बोलावलं आहे." माझ्याकडे एक हेतुपूर्ण कटाक्ष टाकून मालक निघाले. 


दोन पावलं पुढे जाऊन ते अचानक परत मागे फिरले आणि परत माझ्याकडे आले. म्हणाले,"दिघे तू खुप चांगला माणूस आहेस. तू इथून निघून जा तुझ्या पत्नीला घेऊन. खरच जा! मी माझ्या एका मित्राकडे तुझ्या नोकरीबद्दल बोललो आहे. बुवांचा पत्ता दिला आहे मुद्दाम. तुला त्या पत्त्यावर पत्र येईल. तू जा इथून." एवढ बोलून मला काहीही बोलायला न देता मालक तिथून निघून गेले. 


मी एकटाच विचार करत तिथे कितीतरी वेळ उभा होतो. 'मालकांनी आजवर माझा एकेरी उल्लेख केला नव्हता. परंतु जाता जाता त्यांनी मला ही नोकरी आणि गाव सोडायला सांगितलं आणि माझा एकेरी उल्लेख केला. अस का? मालक नक्की कोणाबद्दल बोलत होते? शालीनीची त्यांना भिती वाटत असेल का? पण तसं असतं तर ते म्हणाले नसते की माझ्याशी हट्टाने लग्न करून मग ती देखील भोगते आहे. पण असं काय झालं असेल? शालिनी दिसायला मालीनिपेक्षा नक्कीच उजवी आहे. पण मी आणि मालिनी भेटायला गेलो होतो दिवाळीत तेव्हा तर मालिनी म्हणाली होती की आता शालिनी वेगळी आणि अजून चांगली दिसायला लागली आहे. हा विचार मनात आला आणि आठवलं की आम्ही जेव्हा निघण्यासाठी उठलो होतो आणि माझी पाठ होती त्यावेळी मालिनीचा आवाज एकदम बदलला होता. अचानक थोडा तुटक, गंभीर आणि काहीसा धमकावणी दिल्यासारखा आला होता. म्हणजे मालकांनी उल्लेख केलेली "ती" म्हणजे मालिनी तर नव्हे? पण मग तसं असतं तर मालक मला असं का म्हणाले की तुझ्या पत्नीला घेऊन निघून जा?.....एक ना अनेक विचार माझ्या मनात सारखे येत होते. माझ्याही नकळत मी विचार करत अजूनही तिथेच लाकडांच्या राशींजवळ उभा होतो. थोड्यावेळाने जीवा मी उभा होतो तिथे आला. म्हणाला,"कारखाना बंद करायचा आहे साहेब. तुम्ही निघता ना?" मी एकवेळ त्याच्याकडे बघितलं आणि काही न बोलता तिथून निघालो. 


मी घरी पोहोचलो तर संध्याकाळ होत आली होती. मालिनी घरी नव्हती. बहुतेक मला उशीर झाला म्हणून ती देवळाकडे निघून गेली होती. मी परत बाहेर पडण्याच्या मनस्थिती नव्हतो. मालिनी काहीशी उशिराच आली. बहुतेक मी दुपारी न आल्यामुळे आणि तिला काही कळवलं नसल्याने ती घुश्श्यात होती. त्यामुळे ती काहीच बोलत नव्हती. मी देखील काहीच बोललो नाही. मालकांनी मला जे सांगितलं होत ती तसं धक्कादायक आणि काहीसं अविश्वासनीय होतं. त्यामुळे ते सगळं सांगून मालिनीला उगाच कशाला त्रास द्यायचा? हळूहळू काय सत्य आहे ते समजेलच. असा विचार मी केला. त्यादिवशी कारखान्यातल्या कामामुळे आणि मालकांनी सांगितलेल्या एकूणच सगळ्या विषयामुळे मी मनाने आणि शरीराने खूप थकलो होतो. पण तरीही झोप येत नव्हती. मालिनी सगळ आवरून झोपायला आली तरी मी अस्वस्थपणे फेऱ्या मारत होतो. शेवटी तिने जवळ येऊन विचारलं,"काय झालंय आज तुम्हाला? आज दुपारी जेवायला देखील आला नाहीत. मी नाराजी दाखवली तरीही तुमचं अजिबात लक्ष नव्हतं. एकूणच कशातही अगदी लक्ष नाही तुमचं आज." तिचा आवाज आर्जवी होता. म्हणाली,"चला बघू आत झोपायला. कसली एवढी काळजी करता आहात?" तिचं ते प्रेमळ आणि काळजीपोटी बोलणं ऐकून मला माझाच राग आला. मालकांनी त्या कोणा स्त्रीबद्दल काहीतरी सांगितलं आणि मी मनातल्या मनात का होईना माझ्या पत्नीवर संशय घेतला होता. मनात आलं किती कोत्या मनाचा होतो मी. म्हणून मग विषय बदलत मी म्हणालो,"मालिनी, माझ्या गावाहून पत्र आलं आहे. एक छोटासा जमिनीचा तुकडा होता आमचा. त्यासंदर्भात आहे. मी जरा बुवांना भेटून येतो. तू झोप कडी लावून. काळजी करू नकोस. आताच इतका उशीर झाला आहे. त्यामुळे मी काही परत येत नाही; आज तिथेच राहीन. उद्या सकाळीच येतो." मालिनीला बहुतेक आवडली नव्हती ती कल्पना. मी पहिल्यांदाच तिला सोडून जात होतो लग्नानंतर. मात्र ती काही बोलली नाही. फक्त होकारार्थी मान हलवली. मी पायात चपला अडकवून तसाच निघालो आणि देवळात जाऊन बसलो. काही गावातली मंडळी बसली होती त्यांच्याशी गप्पा सुरु झाल्या. आणि नकळत मन थोड हलकं झालं. गप्पांना चांगलाच रंग चढला होता. विषय बाजूच्या गावात आलेल्या नव्या तमाशा पार्टीचा होता. त्यामुळे किती वाजले आहेत याचं भान कोणालाच नव्हत.


अचानक मालकांच्या बंगल्याच्या बाजूने ओरड ऐकू आली. आम्ही सगळेच गोंधळून गेलो आणि धावत बंगल्याच्या दिशेने निघालो. जाऊन बघतो तर काय संपूर्ण बंगला पेटला होता. मला काय करावं सुचेना. मी आउट हाउसच्या दिशेने धावलो. मालिनीला बाहेर काढणं महत्वाचं होतं. ती एकटीच होती आत. आणि मी येणार नाही अस सांगितल्याने कडी लावून झोपली होती. माझ्या जीवाची घालमेल होत होती. मी धावतच आमच्या त्या छोट्याश्या आउट हाउसकडे पोहोचलो. पण आग आउट हाउसपर्यंत पोहोचली देखील होती. मी मालिनीच्या नावाने हाका मारायला सुरवात केली. पण मला तिच्या ओरडण्याचा आवाज एकू येत नव्हता. बरोबर आलेले गावकरी जमेल तिथून पाणी आणून आउट हाउसवर मारत होते. मी दाराकडे धावलो. पण दराने पेट घेतला होता. लोकांनी मला अडवलं. माझ्या डोळ्यासमोर संपूर्ण बंगला आणि आउट हाउस जळून गेलं. मी काहीही करू शकलो नाही. आग आटोक्यात येईपर्यंत पाहाट झाली होती. पाणी मारणाऱ्या लोकांनी जरा उसंत घेतली... त्याचवेळी कोणीतरी सांगत आल की काल रात्री कारखानासुद्धा पेटला होता.... आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे मालकांनी कारखान्यासामोरच्या झाडाला लटकून गळफास लावून घेतला होता. 


मी धावत कारखान्याकडे गेलो. कारखाना धगधगत होता आणि समोरच्या झाडाला मालकांचा मृतदेह लटकत होता. लोकांनी पुढे होऊन त्यांचा देह खाली उतरवला. कोणीतरी गावातल्या पोलीस चौकीवर जाऊन वर्दी दिली होती. त्यामुळे पोलीस पाटील तिथे येऊन पोहोचले होते. मी एकूण झालेल्या घटनाक्रमामुळे सरभरीत झालो होतो. डोक्याला हात लावून मी मट्कन तिथेच बसलो. बुवा आणि माझ्या सासूबाई देखील तिथे येऊन पोहोचले होते. सासूबाईंना बायकांनी आवरून धरले होते. परंतु त्या छाती पिटून पिटून रडत होत्या आणि मोठमोठ्याने म्हणत होत्या,"मी आई नाही कैदाशीण आहे. सोन्यासारख्या मुलींना मी स्वतःच्या हाताने मरणाच्या दाढेत लोटलं. कुठे फेडू हे पाप." बुवा त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले,"जावईबापू चला माझ्याबरोबर. आता इथे काहीच उरलेले नाही."


मला एकूणच परिस्थितीचे भान राहिले नव्हते. त्यामुळे ते 'चला' म्हणाले आणि मी त्यांच्याबारोबार निघालो. बायकांनी सासुबाईंना धरून घराकडे चालवले. सासूबाईंच्या अंगातली शक्ती आता पूर्णपणे संपली होती. त्या आधार घेऊन निमुटपणे चालत होत्या. फटफटीत उजाडले होते आणि थंडीचे दिवस असूनही एकूणच प्रचंड उष्मा जाणवत होता. घराकडे पोहोचताच बुवांनी पडवीमध्ये एक घोंगडी अंथरली आणि मला आडवं व्हायला सांगितल. मी निमुटपणे  त्यांनी सांगितल्या प्रमाणे आडवा झालो. तोपर्यंत मी मनाने आणि शरीराने इतका दमलो होतो की मनात दु:ख दाटून आल होत तरी आडवं होताक्षणीच मला झोप लागली. जेव्हा जाग आली तेव्हा उन्ह उतरणीला लागली होती आणि जाग आल्यावर लक्षात आल की समोर पोलीस पाटील उभे आहेत आणि बुवा माझ्याकडे हात करून त्यांच्याशी काहीतरी बोलत आहेत. मी उठून बसलो आणि त्यांच्या दिशेने गेलो. मला पहाताच बुवा गप्प झाले. पोलीस पाटील माझ्याकडे बघत होते. मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले,"हे बघा, बंगल्याला आग लागली आणि ती आउट हाउसपर्यंत पोहोचली तरी तुम्हाला कळलं नाही ही खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे. कारण तिथे असणारी सर्वच माणसं आज मृत्यूमुखी पडली आहेत. वाचलेले असे तुम्ही एकटेच आहात. अर्थात आता एकूण सगळच संपलं आहे. तुमच्या पत्नी आणि मेव्हणी दोघीही लागलेल्या आगीत जळून गेल्या आहेत. पोलिसांच्या दृष्टीकोनातून सांगायचं तर तुमच्या मालकांनी बंगल्याला आणि कारखान्याला आग लावून स्वतःला गळफास लावून घेतला आहे, असा अहवाल लिहून आम्ही एकूण ही केस बंद केली आहे. कारण समोर हेच एक सत्य दिसत आहे. त्यामुळे तुमच्यावर कोणतेही बालंट येणार नाही आहे. मुख्य म्हणजे आमचं आणि गावातल्या लोकांचं तुमच्या बद्दलचं मत चांगलंच असल्याने आग लागली तेव्हाच नेमके तुम्ही देवळात कसे होतात अस कोणीच विचारलेलं नाही. मात्र मी एक गोष्ट सुचवू का तुम्हाला? हे गाव सोडून लवकरात लवकर निघून जा तुम्ही." एवढ बोलून पोलीस पाटील परत जायला निघाले. 


मी आणि बुवा देखील घराकडे निघालो.  थोड पुढे जाऊन पाटलांनी मला हाक मारली म्हणून बुवांना थांबायला सांगून मी परत पोलीस पाटलांकडे गेलो. त्यांनी एकवार पाठमोऱ्या बुवांकडे बघितले आणि घाईघाईने माझ्या हातात एक कागद दिला. मग मात्र काही एक न बोलता झपझप चालत ते तिथून निघून गेले. एव्हाना संध्याकाळ पुरती कलली होती. त्यांनी कागद मला बुवांच्या समोर दिला नव्हता, म्हणजे कदाचित तो कागद केवळ माझ्यासाठी होता, असा कयास मी केला आणि पटकन तो कागद सदऱ्याच्या खिशात घालून मी बुवांना गाठले. रात्री शेजाऱ्यांनी आणून दिलेलं पिठलं भात कसतरी पोटात ढकलून मी परत पडवीत येऊन बसलो. बुवांनी येऊन एक कंदील माझ्याशेजारी ठेवला आणि गारठा जाणवत असल्याने ते परत घरात घेले. थोडी सामसूम झाल्यावर मी पाटलांनी दिलेला कागद खिशातून बाहेर काढला.  


ती एक चिट्ठी होती.... मालकांनी माझ्या नावाने दिलेली. त्यात त्यांनी लिहील होत,"दिघे जे घडल आहे त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करू नकोस. जे घडलं आहे त्याचा विचारही  आयुष्यात कधीही मनात आणू नकोस. कारण जोवर तू भीत नाहीस तोवरच तू जगणार आहेस, हे लक्षात ठेव. मी आयुष्यभर भिती मनात येऊ दिली नाही. पण कधी कशी कोण जाणे मनात भिती डोकावली आणि आता तू माझं पत्र वाचत असताना मी या जगात नाही. मनुष्याने स्वतःच्या मनातल्या भय राक्षसावर ताबा मिळवायला शिकलं पाहिजे. बाकी 'ति'ने सांगितलं म्हणून मी लग्न केलं काय किंवा 'तिची' नजर सतत माझा पाठलाग करायची हा माझा कयास काय.... सगळं खोटं. भय लांब ठेव मनापासून."


ती दोन ओळींची चिट्ठी वाचून मी हबकून गेलो. भिती? मालकांच्या मनात केवळ भिती होती म्हणून हे सगळ घडलं? मालकांनी मनात भिती बाळगली होती म्हणून त्यांनी स्वतःला आणि स्वतःबरोबर माझ्या संसाराला संपवलं? या  गावात आल्यापासून मी स्वतःला भाग्यवान समजायला लागलो होतो. परंतु गेल्या दोन दिवसात माझ्या आयुष्यात जे घडलं होतं त्याचा विचार करता मी ते गाव सोडून जायचा निर्णय घेतला. मात्र मालकांनी माझ्यासाठी जिथे नोकरीचं बोलणं केलं होतं त्यांचं पत्र येईपर्यंत मी तिथेच बुवांच्या घरी राहिलो. नोकरी मिळाल्याचं पत्र येताक्षणी मात्र बुवांचा निरोपही न घेता मी ते गाव सोडलं."


................दिघे बोलायचा थांबला आणि त्याची कहाणी ऐकणारे जेटली आणि काणे थरारून गेले. दोघांच्याही तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. दिघे शांतपणे त्यांच्याकडे बघत होता. त्याचं पिणं कधीच थांबल होतं आणि जी काही चढली होती ती देखील पुरती उतरली होती.


जेटली अगोदर भानावर आला. त्याने दिघेचा हात हातात घेतला आणि गच्च धरला. तो प्रचंड घाबरला होता. त्याचा हात थरथरत होता. आवाजही कापत होता. त्याने आजूबाजूला बघितलं आणि म्हणाला,"दिघ्या साल्या खरं सांग... काहीतरी गोष्ट रचून सांगतो आहेस ना? भडव्या.... तुझ्या आयुष्यात इतकं काही घडलं आणि तरीही तू इतका शांत असतोस? भेनच्योद आपण इथे मजा करायला आलो आहोत ना?.आणि अशा अनोळखी जागी रात्रीच्यावेळी तुला असल्या कहाण्या सुचताहेत काय?" जेटलीची जाम फाटली होती. भितीने मनाचा पुरता पगडा घेतला होता. मात्र दिघे शांत होता. त्याच शांतपणे त्याने जेटलीकडे बघितलं. त्याची नजर थंड होती. जेटलीचे दिघेच्या डोळ्यांकडे लक्ष नव्हते. तो उगाचच आजूबाजूला काही दिसत आहे का ते बघत होता. मात्र काणे दिघेकडेच बघत होता. त्यामुळे त्याच्या डोळ्यातले भाव बघून तो हबकून गेला. दिघ्याने जेटलीच्या हातातला आपला हात सोडवून घेतला आणि तीच थंड नजर खिडकीबाहेर वळवली.


दिघ्या खिडकी बाहेर टक लावून बघायला लागला त्यामुळे नकळत जेटली आणि काणेची नजर देखील खिडकीबाहेर वळली............ जेटली आणि काणे दोघांचे डोळे मोठे झाले..... खिडकी बाहेरच्या झाडावर दिघेच्या मालकाचे शव लटकत होते. डोळे सत्ताड उघडे होते, जीभ बाहेर आली होती........ आणि आजूबाजूला आग लागल्या प्रमाणे ज्वाळा जाणवत होत्या. त्या परिस्थितीत देखील मालकांच्या त्या हिडीस सुजलेल्या चेहेऱ्यावर केविलवाणे हसू होते. ते पहाताच जेटली आणि काणे दोघेही छातीवर हात दाबत खाली पडले.


ते दोघे खाली पडल्याचा आवाज एकून दिघेने खोलीत नजर वळवली. दोघांनाही पडलेले पाहून तो तोंडातल्या तोंडात स्वतःशीच पुटपुटला.... "मूर्ख लेकाचे! सगळ लक्ष आग कशी लागली, मालक कसे मेले आणि ते मारताना कसे दिसत होते या वर्णनामध्ये होतं; आणि मानत एकच प्रश्न की मालक जिचा उल्लेख करत होते ती कोण? आता देखील मी सहज खिडकी बाहेर बघत होतो ...... बहुतेक यांनी काहीतरी अपेक्षा करत भीत भीत बाहेर बघितलेलं दिसतं आहे..... आणि त्यामुळेच त्यांची अपेक्षा पूर्ण झाली आहे. हम्म! ठीक आहे......स्साले.... माझी चेष्टा करत होते? मला कमी लेखत होते ना! घ्या!!! किंमत मोजावी लागलीच शेवटी. जाउ दे! मात्र हे बरं झालं......चला पुढच्या वेळी दुसऱ्या कोणाबरोबर बाहेर जाईन तेव्हा जर त्यांनी माझी थट्टा केली तर या दोघांची गोष्ट तर सांगता येईल ना. स्साले, वरच्या पोस्टवर होते म्हणून माज दाखवत होते ना......... घ्या आता.... 



त्या दोन कलेवरांच्या बाजूला बसून दिघे स्वतःशीच बडबडत होता............ आणि खिडकी बाहेरच्या झाडावर............................................


समाप्त

Friday, September 3, 2021

एका भितीची गोष्ट (भाग 2)

 एका भितीची गोष्ट

(भाग 2)


पुजारीबुवा देवळाच्या बाजूलाच फर्लांगभर अंतरावर राहात होते. घराच्या आजूबाजूला बरीच फुलझाडं होती. पेरू, चिक्कू, आवळे अशी थोडी बहुत फळझाडं देखील दिसत होती. ते बघून मी म्हणालो,"बुवा झाडं बरीच आणि  छान आहेत. बाग छान ठेवली आहे तुम्ही." त्यावर ते हसत म्हणाले,"अहो मी काही करत नाही. मालिनीला झाडांची खूप आवड आहे. फुलझाडं आणि फळझाडं सगळी तिनेच लावली आहेत. मागे विहीर आहे त्यातून दहा-पंधरा बादल्या पाणी काढावं लागत रोज या झाडांसाठी. नाहीतर इथल्या हवेला कसली जगतात ही झाडं. पण मालिनीला अजिबात कंटाळा म्हणून माहित नाही. रोज सकाळी उठून ती फुलं काढते आणि सगळ्या झाडांना पाणी घालते. त्यामुळेच माझ्या देवळातल्या देवांना बारा महिने उत्तम फुलांचे हार असतात बरं." लेकीच कौतुक करताना पूजारीबुवांचा चेहेरा फुलून गेला होता. काही मिनिटापुर्वीची अस्वस्थता अजिबात नाहीशी झाली होती. 


ओवारीवरूनच त्यांनी मालिनीच्या आईला हाक मारली. "ऐकलत का... अच्युतराव आले आहेत. साखर घेऊनच बाहेर या... मालीनिसाठी त्यांनी होकार दिला आहे." 


"अग्गोबाई... आलेच" असा आवाज आला आणि मालिनीची आई बाहेर आली. त्यांनी बुवांच्या आणि माझ्या हातावर साखर ठेवली. "चहा ठेवू का?" त्यांनी बुवांना विचारलं.


"नको... आता वेळ टळून गेली आहे चहाची. तुम्ही जेवणाची तयारी करा. आज अच्युतराव इथेच जेवतील." पुजारीबुवा म्हणाले. 


"अहो बुवा नको. मी जातो घरी. उगाच कशाला तुम्ही घोळ घालता आहात." मी संकोचून म्हणालो.


"अच्युतराव अहो तुम्ही लग्नाला होकार देऊन माझा मेल्यानंतरचा स्वर्गाचा मार्ग मोकळा केला आहात. आता आज तुम्ही कशालाच नाही म्हणू नका. आमच्याकडे काही पक्वान्न नाहीत हो. पण तरीही आज तुम्ही थांबाच. आम्ही जी काही भाजी भाकरी खातो त्यातलीच थोडी तुम्हीदेखील खाल, अजून काय?" बुवा म्हणाले. मला त्यांचा आग्रह मोडता आला नाही. आणि मग घरात मालिनी आणि तिची आई स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. मी आणि बुवा बाहेर गप्पा मारत बसलो. 


रात्रीची जेवणं आटपली आणि मी निघालो. मला सोडायला बुवा देवळापर्यंत आले. मी निघताना मला म्हणाले,"अच्युतराव मला माहित आहे की कदाचित् तुम्हाला कल्पना असेल. पण तरीही मी आपणहून तुम्हाला सांगावं अस वाटत म्हणून सांगतो आहे;" बुवा असं म्हणताच मला वाटलं ते त्यांच्या लग्न झालेल्या मुलीबद्दल आता सांगणार आहेत. पण त्यांनी दुसराच विषय काढला. म्हणाले,"अच्युतराव आमची मालिनी तुमच्यापेक्षा वर्षभराने मोठी आहे." त्यांनी हे सांगताच माझा थोडा अपेक्षा भंग झाला. पण स्वतःला सावरत मी बुवांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो,"बुवा मला अंदाज होता. अहो पण आता या वयाला आणि माझ्यासारख्या आगा-पिछा नसलेल्या माणसाला कोण मुलगी देणार होतं. मी तर लग्न हा विषय माझ्या आयुष्यातून काढूनच टाकला होता. त्यामुळे माझी काहीच हरकत नाही. मला तुमच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे आणि तुम्हाला माझ्या. त्यामुळे आता यावर फार चर्चा नकोच. तुम्ही मुहूर्त बघा आणि आपण या आपल्या देवळातच लग्न उरकून टाकू. माझी तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही बुवा. उलट जो काही खर्च होईल तो मीच करणार. ठीक?"


"अजून एक होत...." बुवा चाचरत बोलायला लागले. मी त्यांना थांबवलं. कदाचित त्यांच्या एका मुलीच लग्न माझ्या मालकांशी झाल आहे हे सांगताना त्यांना अवघड वाटत असावं अस मला वाटल म्हणून मी म्हणालो,"बुवा जितकी चर्चा करू तितके प्रश्न उभे राहातील. त्यामुळे आता फक्त दिवस ठरवा.......... माझी एकच विनंती आहे की मालिनीची या लग्नाला खरच तयारी आहे का हे मला तिच्याकडून जाणून घ्यायचे आहे. त्यामुळे मला एकदा फक्त तिला एकटीला भेटायची परवानगी द्या... अर्थात तुमची हरकत नसली तर."


बुवांच्या डोळ्यात पाणी उभं राहील. "आमची काही हरकत नाही. उद्या गुरुवार आहे. दत्ताच्या पुढ्यात भजन आहे संध्याकाळी. त्यामुळे फुलांचा हार घेऊन मालिनी येईलच तिथे. त्यावेळी तुम्ही तिच्याशी बोलून घ्या. माझ्या मनातही होतच. पण तिच्या आईला पटणार नाही म्हणून मी काही बोललो नाही. आता तुम्हीच म्हणता आहात म्हंटल्यावर ती काही म्हणायची नाही."  ते डोळे टिपत म्हणाले.


दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मालिनी देवळात आली. ती पूजारीबुवांना मदत करत होती. त्यामुळे त्यावेळी तिच्याशी जाऊन बोलावं हे मला प्रशस्त वाटलं नाही. म्हणून मग मी थांबलो देवळाच्या पायऱ्यांवरच. हळू हळू लोक जमायला लागले. आता मालिनीशी कस बोलावं ते मला कळेना. थोडंसं गोंधळून मी तिथेच पायऱ्यांवर बसून राहिलो. येणारी प्रत्येक व्यक्ति मला आत येण्यासाठी सांगत होती आणि मी 'आलो', 'येतोय', असं सांगून आत जाणं टाळत होतो.


शेवटी एकदाची भजनाला सुरवात झाली आणि मालिनी देवळाच्या कामातून मोकळी होऊन तिच्या घराकडे निघाली. त्यावेळी मात्र सगळा धीर एकवटून मी तिला गाठले. मागूनही तिचा कमनीय बांधा लक्षात येत होता. वय वाढल असलं तरी मालिनी अजूनही अप्रतिम सुंदर दिसत होती. तिच्या मागे चार पावलांवर चालत मी हळूच म्हणालो,"मालिनी, मला तुमच्याशी बोलायचं होत थोडं." तिने थबकून मागे वळून बघितलं. ती थांबलेली बघून मी अंतर राखून उभा राहिलो. तिची मान खाली होती. ती काहीच बोलत नव्हती. क्षणभर मला कशी सुरवात करावी ते सुचेना. पण मग मनाचा हिय्या करून मी तिला थेट प्रश्न केला. "तुमचा या लग्नाला होकार आहे का मालिनीजी?" तिने मानेनेच हो म्हंटले. मला बरे वाटले. आणि मग उगाच कोणी बघितले तर चर्चा होईल म्हणून मी लगेच मागे फिरलो आणि निघालो. पण मालिनीने मागून हळुवारपणे हाक मारली,"अहो.... एक मिनिट." मालिनीने हाक मारली हे लक्षात येऊन मी वळून बघितले. आता ती थेट माझ्याकडे बघत होती. "तुम्हाला माहित आहे का की माझ्या बहिणीचं लग्न तुम्ही जिथे काम करता त्या कारखान्याच्या मालकांशी झालं आहे." स्वतःबद्दल किंवा माझ्याबद्दल न बोलता हे अचानक बहिणीच्या लग्नाबद्दल ती का बोलत होती ते माझ्या लक्षात आल नाही. मी शांतपणे 'हो' म्हंटल. त्यावर ती म्हणाली ,"हम्म... कदाचित बाबांनी सांगितल असेल नसेल म्हणून मी बोलले. पण मला वाटत नाही की तुम्हाला हे माहित असेल की माझ्या धाकट्या बहिणीशी त्यांनी लग्न केलंय. तस सांगायचं तर तुमच्या मालकांनी अगोदर मला मागणी घातली होती. पण लग्नाच्या दिवशी त्यांनी बाबांना सांगितल की त्यांना माझ्याशी नाही शालिनीशी लग्न करायचं आहे. बाबांना मोठा धक्का बसला. पण अस स्थळ परत नसतं आलं याची आम्हाला सर्वांना कल्पना होती. बाबांना आमच्या दोघींचं काय एकीचं लग्न कारण सुद्धा परवडणारं नव्हतं. त्यात त्या लग्नाचा संपूर्ण खर्च तुमचे मालकच करत होते. उत्तम कपडे, दागिने, खाणं-पिणं सगळा खर्च त्यांनी केला होता. मग असं चांगल स्थळ का सोडायचं. मी बाबांना समजावलं किमान एकीच्या जवाबदारीमधून तर सुटाल. आणि जर माझ्या नशिबात लग्न असेल तर कधी ना कधी नक्की होईल. आई-बाबांना पटलं. शालिनी एकूणच माझं लग्न ठरल्यापासून शांत होती. मालकांच्या मागणीनंतरही ती शांतच होती. अर्थात तिला तिची इच्छा विचाराण्यासारखी परिस्थिती देखील नव्हती. म्हणून मग तुमच्या मालकांनी इच्छा व्यक्त केल्या प्रमाणे त्यांचं आणि शालिनीचं लग्न बाबांनी लावून दिलं. मात्र त्यादिवासानंतर आम्ही शालिनीला कधीच भेटलेलो नाही. का कुणास ठाऊक पण तिने कधीच आमच्याकडे काही निरोप धाडला नाही किंवा कधी भेटायला आली नाही. बस! एवढच सांगायचं होत मला." अस म्हणून ती वळली आणि निघून गेली.


मी एकूणच सगळ एकून चक्रावून गेलो होतो. थोडा विचार केल्यावर लक्षात आलं की कदाचित काल बुवांना हेच सांगायचं असेल. पण आपण बोलू दिल नाही त्यांना. अर्थात मालकांनी अस का केलं... किंवा आता त्यांच्या पत्नीने माहेरच्या माणसांशी काहीच संबंध का ठेवलेला नाही... हे प्रश्न असले तरी त्याची उत्तरं शोधायची माझी इच्छा नव्हती. शेवटी हा ज्याच्या त्याच्या आयुष्याचा प्रश्न असतो अस म्हणून मी तो विषय तिथेच सोडला. 


आठ दिवसानंतरचा एक मुहूर्त बुवांनी काढला. ना माझ्याकडे पैसा होता ना बुवांकडे... मोठ लग्न, जेवणावळी हे आम्हाला दोघांनाही परवडणार नव्हत. त्यामुळे गावातल्या कोणाला बोलावल  नाही. पण गावकरी देखील चांगले होते, त्यांना माझ्या आणि  बुवांच्या परिस्थितीची कल्पना होती. त्यामुळे त्यांनी देखील समजून घेतलं. आम्हाला केवळ आशीर्वाद देण्यासाठी गावातली मोठी जाणती मंडळी लग्न लागल्यानंतर काही वेळानी आली आणि हातावर एक पेढा तेवढा घेऊन निघून गेली. 


खर तर लग्न झालं तरी माझ्या आयुष्यात फार फरक पडला नव्हता. मी तसाच रोज पहाटे उठून कारखान्यात जात होतो. त्यावेळी करण्यासारखं काहीही नसल्याने मालिनी देखील तेव्हाच उठायची आणि तिच्या बगीच्याकडे जायची. झाडांना पाणी घालणे, देवांचे हार करणे वगैरे नेहेमीची कामे उरकून परत घरी यायची. घरातली थोडी आवराआवर करून थोडं उशिरानेच माझं जेवण करून माझी वाट बघायची. लग्न झालं आणि मी दुपारी घरी जेवायला जायला लागलो होतो. साधारण दोन-अडीच ला यायचं; जेवून थोडं पडायचं आणि तीनपर्यंत परत कामावर जायचं.  त्यामुळे मला आता घरी परतायला साधारण पाच वाजत होते. कामावरून घरी गेलो की मग मात्र आम्ही दोघेही देवळाकडे जायचो. मालिनी आईला भेटून यायची त्यावेळी मी देवळात बसायचो. इतर गावकरी देखील असायचेच. मालिनी आली की मग आम्ही घरी जायचो. लग्न झालं आणि खरच आयुष्याला एक वेगळ वळण लागलं असं मला वाटायला लागलं होतं. खूप सुखी होतो मी. मालिनी देखील आहे त्यात सुख मानणारी होती. असेच दिवस जात होते. त्यावर्षीची दिवाळी आली. तस बघितलं तर आमचा पहिला सण. पण ना माझ्याकडे काही होत ना बुवांकडे काही देण्यासारखं! त्यामुळे आम्ही पाडव्याला बुवांकडे जेवायला गेलो इतकंच. तेही रोजचंच साधस जेवण.  


जेवण झालं; मी आणि बुवा पाय मोकळे करायला बागेत फेऱ्या मारत होतो. मालिनी आईला आवरा-आवर करायला मदत करत होती. बुवांना काय वाटलं कोणास ठाऊक त्यांनी अचानक बोलायला सुरवात केली. म्हणाले,"जावईबापू, कदाचित आतापावेतो मालिनी तुम्हाला बोलली असेलच की माझ्या धाकट्या मुलीचं लग्न तुमच्या मालकांशी झाल आहे. तिने लग्नाच्या वेळचा प्रसंग देखील सांगितला असेल. तुमच्या मनात प्रश्न देखील असेल की मालकांनी अस का केल असेल... किंवा आता आमचा त्या घराशी काहीच संबंध का नाही.... आज का कोणजाणे मला तुम्हाला त्याबद्दल सांगावसं वाटतं आहे. मालिनी जशी शांत आणि दिसायला सोज्वळ आहे तसाच तिचा स्वभाव आहे. मात्र शालिनी तशी नाही. म्हणजे शालिनी आणि मालीनी दिसायला अगदी सारख्या आहेत. जवळ जवळ उभ्या राहिल्या तर कोण शालिनी आणि कोण मालिनी ते कळणार नाही. पण शालिनी फार ढालगज स्वभावाने. एका गरीब पुजाऱ्याच्या घरातल्या मुलीला परवडणार नाही अशी तिची स्वप्नं होती. तिने घरात कधीच काहीच काम केलं नाही. कायम स्वतःच सौंदर्य मिरवत गावातून फिरत असायची. तुमच्या मालकांच्या पहिल्या पत्नी कायम आजारी असायच्या. त्यांची सेवा करायला माझी पत्नी जायची. कधी कधी मालिनी देखील तिला मदत करायला जायची. तेव्हाच कधीतरी मालकांनी मालिनीला बघितली असेल. त्यामुळे पत्नीच्या निधनानंतर त्यांनी मालिनीला मागणी घातली. तुम्ही आमची परिस्थिती पाहातच आहात. त्यामुळे आम्ही नकार देण्याचं प्रश्नच येत नव्हता. परंतु मालिनीचं लग्न ठरलं आणि शालिनी खूप अस्वस्थ झाली. तिने लग्नाच्या दोन दिवस अगोदर देवळात मला गाठलं आणि म्हणाली की तिला कारखान्याच्या मालकांशी लग्न करायचं आहे. परंतु ते माझ्या हातात नव्हत तर मी तिला काय सांगणार? ती खूप चिडली... संतापली आणि तरातरा निघून गेली...... त्यानंतर लग्नाच्या दिवशी झालेला तो घोळ. शालिनी मला भेटायला देवळात आली होती आणि तिने तिची जी इच्छा बोलून दाखवली होती ते मी आजवर कोणालाच सांगितल नव्हतं. अगदी मुलींच्या आईलादेखील नाही. पण मला मनातून ही गोष्ट खात होती. मन मोकळ करायचं होत. तुमच्याजवळ बोलून खूप बरं वाटलं." 


त्यांनी जे सांगितलं ते एकून मला खूप आश्चर्य वाटलं. पण मी तसं काहीच दाखवलं नाही. बुवांच्या खांद्यावर थोपटून मी म्हणालो,"बुवा मी तुमच्या मुलासारखाच आहे. माझ्याशी बोलून तुम्हाला हलकं वाटत असेल तर मोकळेपणी माझ्याशी बोलत जा. मी कधीही कोणालाही यातलं काही बोलणार नाही. बर! आमची निघायची वेळ झाली आहे. घराकडे जाऊया का?" अस म्हणून मी घराकडे वळलो. त्यावेळी बुवांनी मला थांबवलं आणि म्हणाले,"जावईबापू, गैरसमज करून घेऊ नका पण एक सांगू का?" त्याचं अस विचारण  मला विचित्र वाटलं. म्हणालो,"बोला बुवा... अस का म्हणता? मोकळेपणी सांगा काय ते."  "जावईबापू, तुम्हाला जर कधी तुमच्या मालकांच्या बंगल्यावरून बोलावण आल तर कृपा करून जाऊ नका किंवा मालिनीला देखील पाठवू नका." मला त्याचं बोलण एकून आश्चर्य वाटलं. मी म्हणालो,"बुवा अस का म्हणता? अहो तुमचीच मुलगी आहे शालिनी. त्यावेळी ती कशी का वागली असेना... पण लग्नानंतर सगळे बदलतात. ती देखील बदलली असेल. सर्वात महत्वाचं म्हणजे मालिनीला तुमची आणि शालीनीची देवळातली भेट माहित नाही. त्यमुळे जर शालिनीने मालिनीला बोलावलं आणि बहिणीने बोलावलं म्हणून मालिनीने जायचं ठरवलं तर मी कस अडवू तिला?" त्यावर मात्र गंभीर होत बुवा म्हणाले,"जावईबापू, शालिनीला मालिनीचं सुख कधीच बघवलं नाही. तिने सख्खी बहिण असूनही मालिनीला कायम पाण्यात बघितलं आहे. मला संशय आहे की शालीनिनेच काहीतरी करून मालकांचं मन वळवलं आणि त्यांना त्यांचा निर्णय बदलायला भाग पाडलं. तिला कदाचित वाटलं असेल की मालिनीचं लग्न आता होणारच नाही. पण तुमच्या रूपाने मला देवच पावला. आता मालिनीच्या चेहेऱ्यावरून ती खूप सुखात आहे ते मला कळतं आहे. त्यामुळे आता मालिनीच्या सुखात शालिनीने विष कालवू नये अस मला वाटतं इतकंच." बुवा मनापासून अगदी पोटतिडकीने बोलत होते. त्यामुळे मी त्यांना शांत करत शब्द दिला की मी किंवा मालिनी कधीच शालिनीला भेटायला जाणार नाही. माझ्या त्या एका वाक्याने ते शांत झाले आणि आम्ही घराकडे वळलो.


मी आणि मालिनी दोघे घरी आलो आणि बंगल्यावरून निरोप आला की मला आणि मालिनीला मालकांनी बोलावल होत. मला खूप आश्चर्य वाटलं. नेमकं दुपारीच  माझ आणि बुवांचं याच विषयावर बोलणं झाल असणं आणि त्याचवेळी मालकांच्या घरून बोलावणं येणं हा काय योगायोग असावा ते मला कळेना. आता माझी अवस्था कात्रीमध्ये असल्यासारखी झाली होती. मी बुवांना शब्द दिला होता की मी किंवा मालिनी कधीच बंगल्यावर जाणार नाही आणि नेमकं आजच आमंत्रण आलं होतं. मी ठरवलं होत की एक दोन दिवसात एखादी बनावट गोष्ट तयार करून मालिनीला सांगायची आणि आपण दोघांनी वाड्यावर कधीही जायचं नाही हे तिला पटवून द्यायचं. त्यात बुवांना शब्द देताना माझ्या मनात होतं की आजवर मालकांनी कधीच त्यांच्या घरी बोलावल नव्हतं. किंवा माझं लग्न झालं तरी कधी त्याविषयी ते माझ्याशी बोलले नव्हते. लग्न झाल्यवर लगेच जर बोलावलं नाही तर आता इतक्या महिन्यांनंतर कशाला मालक किंवा मालिनीची बहिण आम्हाला बोलावेल. पण माझे सगळेच विचार फोल ठरले होते. आणि मी काही निर्णय घ्यायच्या आत मालिनी आनंदाने तयार होऊन निघालीसुद्धा होती. आता मात्र मला काहीच पर्याय उरला नाही. तिला काही समजावावं इतका वेळ देखील नव्हता. मात्र बंगल्यावर पोहोचण्याअगोदर मी मालिनीला एवढेच म्हणालो,"मालिनी, दिवाळीच्या शुभेच्छा देऊन आपण लगेच निघायचं आहे. तिथे अजिबात रेंगाळायचं नाही." मालिनीला माझं बोलण ऐकून खूप आश्चर्य वाटलं. तिने का म्हणून विचारलं. तिला काय कारण सांगाव हे न सुचल्याने मी थोडा आवाज चढवून म्हणालो,"मी म्हणतो म्हणून. प्रत्येकवेळी मी तुझ्या प्रश्नाला उत्तर दिलंच पाहिजे अस नाही." लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच मी माझा आवाज मालिनीवर चढवला होता. त्यामुळे माझ असं आवाज चढवून बोललेलं ऐकून मालिनीला खूप आश्चर्य वाटलं. ती थोडी नाराज देखील झाली. पण त्यावेळी तिला काही समजावणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे मी गप राहिलो. 


आम्ही बंगल्यावर पोहोचलो. मालक दिवाणखान्यातच बसलेले होते. त्यांनी शांतपणे आमच स्वागत केल, बसायला सांगितलं आणि आत निघून गेले. मालक गप्पिष्ट स्वभावाचे नव्हतेच. पण माझ्याशी जेव्हा जेव्हा बोलले होते त्यावेळी मला ते मोकळ्या स्वभावाचे वाटले होते. त्यामुळे त्याचं असं स्वतःच बोलावून आत निघून जाणं मला थोडं विचित्र वाटलं, पण मी काहीच बोललो नाही.  


थोड्या वेळाने एक नोकर खूपसे फराळाचे जिन्नस आणि तीन-चार प्रकारचा गरम-गरम नाश्ता घेऊन आला. आणि आमच्यापुढे ठेऊन आत निघून गेला. आम्ही गोंधळून एकमेकांचे चेहेरे बघत बसून राहिलो. असाच थोडा वेळ गेला. आता माझ्या मनात चलबिचल सुरु झाली होती. आणि तेवढ्यात आतून शालिनी बाहेर आली. तिला पाहून माझा श्वासच अडकला. बुवा म्हणाले होते की शालिनी मालीनिपेक्षा दिसायला काकणभर कमी होती.... की जास्त चांगली होती? की दोघी सारख्याच दिसतात? काय म्हणाले होते बुवा? मला काहीच आठवत नव्हते. मात्र समोर उभी असलेली आमच्या मालकांची पत्नी आणि मालिनीची धाकटी बहिण म्हणजे संगमरवारातून घडवलेल्या अप्सरेच्या मूर्तीसारखी अप्रतिम सुंदर होती. तिने उंची साडी नेसली होती आणि अनेक दागिनेदेखील घातले होते. परंतु तरीही तिचे उपजत सौंदर्यच जास्त उठून दिसत होते. तिला पाहाताच मालिनी उठून उभी राहिली आणि आनंदाने तिच्या जवळ जाऊन तिने शालिनीला मिठी मारली. तिने शालिनीचा हात हातात घेतला आणि म्हणाली,"शालिनी किती सुंदर दिसते आहेस. लग्न छानच मानवलं आहे ग तुला. आपण दोघी पूर्वी सारख्याच दिसायचो हे कोणाला सांगूनही खर वाटायचं नाही आता." शालिनीच्या चेहेऱ्यावर मंद हास्य होतं. तिने मालिनीचा हात हातात घेतला आणि तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत उलट तिला विचारलं,"कशी आहेस ताई? तुझं लग्न ठरलं आणि झालंसुद्धा. पण मला मात्र तू बोलावलं नाहीस हं. ताई, पण आज तुझा दिवाळसण म्हणून मी मुद्दाम तुला बोलावणं पाठवलं. मला माहित होतं की मी बोलावलं आहे हे कळलं तर तुझे पती कदाचित येणार नाहीत. म्हणून मग ह्यांच्या नावाने निरोप पाठवला. मी आले ही असते ग तुला भेटायला या अगोदर. पण मला या बंगल्यातून बाहेर पडायची परवानगी नाही." अस म्हणून ती क्षणभर थांबली आणि मग म्हणाली;"... म्हणजे... यांना माझी काळजी वाटते नं! त्यामुळे त्यांनी मला एकटीने बाहेर पडू नकोस म्हणून सांगितलं आहे." मग माझ्याकडे वळून ती म्हणाली,"भाऊजी कसे आहात?" मी काहीतरी उत्तर देणार होतो. पण त्याअगोदर तीच बोलायला लागली,"अरे तुम्ही काही घेतलं नाहीत का? अहो, घ्या ना. तुमच्यासाठी मुद्दाम गरम-गरम नाश्ता बनवून घेतला आहे." तिच एकूण वागणं आणि बोलणं  खूपच सोज्वळ आणि शांत होत. आता मात्र मी पुरता गोंधळून गेलो. आजच बुवांनी मला सांगितलं होत की शालिनी ढालगज स्वभावाची होती आणि तिलाच मालकांशी लग्न करायची तीव्र इच्छा होती. पण माझ्या समोर जी शालिनी उभी होती, ती आपल्या बहिणीचा मत्सर करणारी वाटत नव्हती. 


ती ज्या पद्धतीने माझ्याशी बोलली होती आणि मालिनीची आस्थेने विचारणा करत होती त्यावरूनही ती मनाने वाईट असेल असं वाटत नव्हतं. अर्थात समोर उभी असलेली शालिनी खरी की बुवांनी वर्णन केलेली शालिनी खरी हा प्रश्नच होता. कारण आपणहून कोणी वडील आपल्या मुलीबद्दल वाईट सांगणार नाहीत, असं माझं मन मला सांगत होतं. पण डोळ्यांना जे दिसात होतं ते मात्र खूप वेगळं होतं. 


माझ्या मनात विचारांची आवर्तनं सुरु होती. त्यामुळेच कदाचित् मी गप्प बसलो होतो. पण मालिनीला वाटलं की मला मुळात वाड्यावर यायचं नव्हतं; कदाचित म्हणूनच मी शांत आहे. तिला बहुतेक माझ मन दुखवायचं नव्हतं. म्हणून मग एकदा माझ्यकडे बघून मालिनी म्हणाली,"शालू अग आम्ही नुकतेच आई-बाबांकडून जेऊन आलो आहोत. त्यामुळे खायला काहीच नको. तुझं लग्न झाल्यापासून तुझी भेट नव्हती झाली. त्यात तूच बोलावणं पाठवलं असशील अशी माझी खात्री होती. म्हणून फक्त तुला भेटायला आले आहे गं मी. बर! निघू का आम्ही आता? तसं आता आपण जवळच राहतो आहोत. आज भेटण झालंच आहे तर भेटूच की परत."


"खरच भेटू नं ताई आपण? येशील माझ्याकडे? येत जा हं." शालिनी मालिनीचा हात हातात धरून म्हणाली. बोलतांना तिचा गळा भरून आला होता.


आम्ही निघणार होतो म्हणून मी उठून दाराकडे वळलो होतो. इतक्यात मला मालिनीचा आवाज एकायला आला. "नक्की भेटूच. आता तर भेटलंच पाहिजे तुला परत एकदा." मालिनी म्हणाली. तो आवाज नक्की मालीनिचाच होता याची मला खात्री होती. पण तरीही त्या आवाजात काहीतरी वेगळ होतं. म्हणून मी गर्कन मागे वळून बघितलं. मालिनीची माझ्याकडे पाठ होती आणि शालीनिकडे चेहेरा. मी बगितलं की तिने असं म्हणताच शालिनी दचकली होती आणि भेदरून तिने मालीनिकडे बघितलं होतं. मग तिने माझ्याकडे नजर उचलून बघितलं आणि मालिनीचा हात सोडून दोन पावलं मागे झाली. तिने हात सोडताच मालिनी माझ्याकडे आली आणि म्हणाली,"चलूया का? आपला पहिला दिवाळसण आहे. घरी देवासमोर दिवा लावायचा आहे मला." मी मानेनेच होकार दिला आणि आम्ही निघालो. माझ्या समोर आलेली मालिनी शांत होती. पण क्षणभर मला वाटलं की ही माझी नेहेमीची मालिनी नाही. अर्थात मी फार विचार करत थांबलो नाही.  


मात्र मी बंगल्याच्या दारातून बाहेर पडताना सहज मागे वळून बघितलं तर शालिनीने तिच्या साडीचा पदर डोळ्यांना लावला होता. तिचं संपूर्ण अंग थरथरत होतं. बहुतेक ती रडत होती... किंवा खूप घाबरली होती. घरी गेल्यावर शालीनिबद्दल मालिनीला विचारावं अस मी मनात ठरवलं. आम्ही घरी आलो आणि मालिनी देवाला दिवा लावणे वगैरे कामाला लागली. त्यामुळे मग बंगल्यावरच्या भेटीबद्दल आमच्यात काहीच चर्चा झाली नाही आणि मग तो विषय राहूनच गेला. शालीनिशी बोलतानाचा मालिनीचा तो वेगळा आवाज मी ऐकला होता त्याचाच विचार मी करत होतो. पण परतल्या नंतर मला एकूणच मालिनीच्या वागण्यात कोणताच फरक जाणवला नाही. त्यामुळे मलाच काहीतरी भास झाला असेल असा विचार करून मी तो विषय तिथेच सोडून दिला. 



असेच दिवस जात होते. दिवाळीची मालकांच्या घरची ती भेट माझ्या मनातून पुसली गेली होती. माझं आणि मालिनीचं नेहेमीचं रुटीन सुरु झालं होतं. एक दिवस मालक सकाळीच कारखान्यावर आले. त्यांना एवढ्या लवकर आलेले बघून मला खुप आश्चर्य वाटलं. पण कारखाना त्यांचा... झाली असेल इच्छा  म्हणून आले असतील; असा विचार करून मी माझ्या कामाला लागलो. त्यादिवशी बरीच लाकडं आली होती. त्यामुळे ती उतरवून घेऊन त्यांचा हिशोब करून मशीनवर चढवायची यादी कारण आणि बाकीची लाकडं निट गोदामात ठेवून घेणं हे सगळ मार्गी लावेपर्यंत खूप उशीर झाला. मला क्षणाचीही उसंत मिळाली नव्हती. त्यामुळे मी घरी जेवायला देखील गेलो नव्हतो. आता जवळ जवळ चार वाजून गेले होते. मला कडकडून भूक लागली होती. मालिनीसुद्धा माझ्यासाठी थांबून राहिली असेल हे मनात येत होतं. पण  जीवा अजूनही इथे तिथे घुटमळत असलेला मला सारखा दिसत होता म्हणजे मालक देखील कारखान्यातच होते... मालक गेल्याशिवाय तो जाणार नाही याची मला खात्री होती. अर्थात माझ काम आटपलं होतं त्यामुळे मी निघायची तयारी करायला लागलो. हात पाय धुवून मी मागे वळलो तर मालक समोर उभे. त्यांना असं अचानक समोर बघून मी दचकलोच. त्यांनी मला त्यांच्या मागून येण्याची खुण केली आणि ते वळून चालू लागले. 

क्रमशः