अनाहत सत्य
भाग 15
"माझी नजर तुझ्यावर आहे हे विसरू नकोस नाथा. तुझा उद्देश तू शब्दात सांगणार नाहीस; याची मला कल्पना आहे. पण तुला माझ्या क्षमतेचा अंदाज नाही. अजूनही तुझ्या उद्देशाचा मला व्यत्यय नाही. त्यामुळे उगाच कोणतेही वेगळे कृत्य करून गोविंद आणि अपाला यांच्या समोर मला अजून वेगळं चित्र उभं करायचं नाही. पण जर तुझं एकही कृत्य माझ्या उद्देशाच्या आड आलं तर मी कोणताही विचार करणार नाही." नैनाची नजर तीक्ष्ण होती आणि त्याहूनही तीक्ष्ण तिचे शब्द होते.
"शेषा?" जस्सीने शेषाच्या खांद्याला स्पर्श केला आणि विजेचा झटका बसावा तसा शेषा एकदम धडपडला. त्याची नजर भेदरलेली होती आणि नजरेतली सगळी ओळख पुसली गेली होती.
"अरे अरे?! काय झालं शेषा? ठीक आहेस ना?" त्याच्या जवळ जाऊन त्याला हात देऊन उठवत जस्सी म्हणाला.
शेषा भानावर आला. "अं?! हो हो! मी ठीक आहे. म्हणजे... अरे मला कळलंच नाही; पण काहीतरी झालं आत्ता इथे. आर मी....." शेषा जस्सीला काहीतरी सांगणार इतक्यात गोविंदने त्या दोघांनाही हाक मारली.
"जस्सी... शेषा... यार किती संथ आहात! चला लवकर या. अजून खूप काही बघायचं आहे." गोविंद बराच पुढे जाऊन उभा होता. तो एकटाच होता ते बघून जस्सीने त्याला लांबूनच ओरडून विचारलं; "अबे... संस्कृती कुठे आहे? तिला एकटीला सोडू नकोस त्या मही सोबत... चल रे शेषा... एकतर मला तो मही फारसा आवडत नाहीय. त्यात या गोविंदने तिला एकटीला सोडलेलं दिसतं आहे त्याच्या सोबत." असं म्हणून जस्सी भराभर पावलं उचलत गोविंदच्या दिशेने निघाला. शेषाने एकदा मागे वळून बघितलं. आपल्याला आत्ता जो अनुभव आला तो भास होता की सत्य!? शेषाच्या मनात आलं. पण इतक्यात पुढे गेलेल्या जस्सीने परत एकदा त्याला हाक मारली आणि मग मात्र शेषा गोविंद आणि जस्सीच्या दिशेने निघाला.
जस्सी आणि शेषा जवळ पोहोचले तसा गोविंद समोरच्या लेण्याच्या आत जायला निघाला. जस्सी देखील त्याच्या सोबत चालायला लागला. शेषाने परत एकदा गोविंदच्या काही पावलं मागे चालणं पसंत केलं. आता तर त्याची नजर अजूनच शोधक झाली होती. आपण नक्की काय शोधतो आहोत; हे त्याला देखील कळत नव्हतं. पण नुकताच आलेला अनुभव त्याच्या मनात ठाण देऊन बसला होता.
'नैनाच होती ती. पण तरीही काहीतरी वेगळं होतं तिच्यात. काय बरं? आणि नक्की काय म्हणाली ती? मला नाथा म्हणाली का? नाथा? कोण नाथा? गोविंद आणि अपाला! गोविंद म्हणजे आपला मित्र. पण ही अपाला कोण? तिचा माझा संबंध काय? बरं! त्यांच्या समोर तिला वेगळं चित्र उभं करायचं नाही. कोणाचं चित्र? कसलं चित्र? ते जाऊ दे; पण परत मूळ प्रश्न तसाच राहातो न. हे सगळं ती मला का सांगत होती? ते ही डोळ्यांतून आग ओकत! च्यायला हे काय चालू आहे?' गोविंदच्या मागून चालत शेषा विचार करत होता. त्याचं लेणी बघण्याकडे लक्षच नव्हतं. संस्कृती मात्र प्रत्येक इंच डोळ्यात तेल घालून बघत होती. जसं काही तिला आत्ताच बाहेर गेल्याक्षणी कोणीतरी या लेण्याचं चित्र काढायला सांगणार आहे.
"हे लेणं देखील अपूर्ण दिसतं आहे." गोविंद म्हणाला आणि त्याचा आवाज सगळ्या शांततेत एकदम घुमला. मही थोडा अंधारात उभा होता. पण त्याचं लक्ष या चौघांवर पूर्ण होतं. "हो! ही चार आणि पाच नंबरची लेणी पूर्ण झालेली नाहीत. तसे इथे हे अठ्ठावीस खांब आणि या वेगवेगळ्या मुद्रांमधल्या बुद्ध मूर्ती आहेत. या बाजूने या..." असं म्हणून त्याने गोविंदला अजून थोडं आत नेलं. "या इथे खोल्या आहेत तिथे बौद्ध संत-महंत ध्यानधारणा करायचे." मही अजून काहीतरी सांगणार होता; इतक्यात मागून आलेल्या संस्कृतीने म्हंटलं; "मुळात त्यासाठी नव्हत्या या खोल्या. तेव्हा देखील हाच तर वाद होता की नक्की काय वापर असावा या गुंफांचा. त्या पलीकडच्या खोलीमधून जो खाली जाणारा बोगदा आहे; आणि त्याच्या सारखे काही अजून आहेत इथल्या वेगवेगळ्या खोल्यांमधून आणि पुढच्या अनेक लेण्यांमधून देखील; त्याचं प्रयोजन जास्त महत्वाचं होतं. हवा खेळती राहण्यासाठी जे तंत्र वापरणं आवश्यक होतं ते कोणालाही न कळत करणं जरुरीचं होतं. तेव्हाही...." संस्कृती अजूनही काहीतरी बोलणार होती. पण परत एकदा गोविंदने तिच्या जवळ येत तिचा हात धरला. "संस्कृती काय करायचं आहे आपल्याला कोणती हवा कुठे खेळते आहे त्याबद्दल? अर्धवट आहेत या गुंफा. चला आपण पुढे जाऊ." तो तिच्याकडे बघत म्हणाला. शेवटचं वाक्य मात्र महिसाठी होतं.
"तुम्ही तर असं बोलता आहात मॅडम की तुम्हीच इथलं आर्किटेक्चर काढलं आहे." मही संस्कृतीकडे बघत म्हणाला. ती काहीतरी बोलायला पुढे होणार इतक्यात गोविंद मध्ये पडला आणि महिकडे बघत म्हणाला; "तुम्ही गाईड आहात. त्यामुळे फक्त आवश्यक ती माहिती द्या. इतर गप्पा नकोत." गोविंदच्या आवाजातला बदल मही सोबत जस्सीच्या देखील लक्षात आला. 'याला इतकं रागावायला काय झालं?' जस्सीच्या मनात आलं. पण तो काही बोलला नाही. "सॉरी" असं पुटपुटत मही तिथून बाहेर पडला. जस्सी देखील निघाला. गोविंदने संस्कृतीचा हात अजून सोडला नव्हता. "चल संस्कृती पुढे जाऊ या." तिला काही एक प्रश्न न विचारता गोविंद हळुवारपणे म्हणाला. बराचसा आधार असलेल्या त्या खोलीमधून बाहेर पडताना संस्कृतीने मागे वळून बघितलं. शेषा अत्यंत स्तब्ध उभा राहून खोली बाहेर पडणाऱ्या संस्कृतीकडे बघत होता.
"तू पुढे हो. शेषाची बहुतेक तंद्री लागली आहे. त्याला घेऊन येते." संस्कृती दबक्या आवाजात म्हणाली आणि गोविंदला अजून काही बोलू न देता स्वतःचा हात सोडवून घेत मागे वळली. गोविंदने मागे बघितलं आणि त्याच्या देखील लक्षात आलं की शेषा काहीसा विचित्र पद्धतीने अवघडून उभा आहे. त्यामुळे त्याला संस्कृतीचं म्हणणं पटलं. जस्सी आणि मही परत मागे वळू नयेत म्हणून तो पटकन पुढे निघाला.
"शेषा...." संस्कृतीने शेषा जवळ जात त्याला हाक मारली.
"अपाला?...."
"अं?....."
"तू तुझा मग काढत आली आहे तर ती." शेषा म्हणाला.
"कोण?"
"संस्कृती उगाच नाटकं करू नकोस. तुला नक्की कळतं आहे मी काय म्हणतो आहे ते." शेषाचा आवाज बदलला होता. त्यात स्पष्टपणा होता; पण अधिकार वाणी नव्हती ती.
"ती आली आहे? हा भास आहे की तू आत्ता मला.....?" संस्कृतीचा आवाज गोंधळलेला होता.
"म्हणजे तुला पण दिसली न ती?" शेषाने संस्कृतीला विचारलं.
"शेषा, तू आत्ता मला काय हाक मारलीस?" संस्कृतीने शेषाला प्रश्न केला.
"संस्कृती, तू नैनाला बघितलंस ना?" शेषाने तिला उलट प्रश्न केला.
"अपाला!? तू आत्ता अपाला म्हणालास का?" संस्कृती अजूनही वेगळ्याच तारेत होती. अचानक तिचे दोन्ही खांदे धरत शेषा म्हणाला; "हो संस्कृती; मी तुला अपाला म्हणून हाक मारली. कारण मला नैना म्हणाली की गोविंद आणि अपाला समोर तिला वेगळं चित्र नाही उभं करायचं. तिने गोविंदचं नाव घेतलं आणि त्याच्या सोबत संस्कृती ऐवजी ती अपाला म्हणाली. मला तिचं एकूण वागणंच कळलं नाही. अग, तिने मला नाथा म्हणून हाक मारली." शेषा अजूनही पूर्ण गोंधळलेला होता.
"नाथा? ओह! नाथा! तू?!" संस्कृती शेषाकडे बघत म्हणाली.
"संस्कृती, तू ठीक आहेस न?" शेषाने तिचे दोन्ही खांदे जोरात हलवत तिला विचारलं आणि एकदम शुद्धीवर आल्याप्रमाणे संस्कृतीने त्याच्याकडे बघितलं.
"अरे शेषा? तू इथे या खोलीच्या मध्यावर उभा राहून काहीतरी बडबडत होतास. मीच गोविंदला म्हंटलं मी शेषाला घेऊन येते तू पुढे हो. चल बघू. ते सगळे गेले केव्हाच." संस्कृती शुद्धीत येत म्हणाली. क्षणापूर्वी ती काय बोलत होती ते तिचं तिला देखील आठवत नव्हतं. शेषाच्या ते लक्षात आलं. तो काही एक न बोलता तिच्या सोबत खोली बाहेर आला आणि त्या गुंफेच्या बाहेर पडला. त्याच्या सोबत पुढे जात असताना संस्कृतीने परत एकदा मागे वळून बघितलं आणि तिला त्याच खोलीच्या मध्यावर नैना दिसली. ती संस्कृतीकडे शांत नजरेने बघत होती. त्या नजरेत कोणतीही नकारात्मक भावना नव्हती. असलंच तर एक आव्हान होतं. पुढे जाता जाता संस्कृती थांबली. शेषाच्या ते लक्षात नाही आलं. तो तसाच चालत पुढे गेला. संस्कृती परत एकदा मागे वळली.
"तोच वाद परत एकदा न अपाला?" नैना शांत नजरेने संस्कृतीकडे बघत म्हणाली.
"वाद तू घालते आहेस नैना. मी कायमच सांगत होते.... ते मार्ग सहज प्रवेश करण्यासारखे ठेवतानाच बिन महत्वाचे असल्याप्रमाणे निर्माण केले तरच ते कायमस्वरूपी राहातील हेच तर माझं म्हणणं होतं. पहा... आजही... इतक्या असंख्य वर्षांनंतर देखील कोणाच्याही लक्षात आलेलं नाही त्यांचं अस्तित्व. ही या जमिनी वरची आणि इथल्या सगळ्याच लेण्यांमधले हवा खेळती राहण्यासाठी मी निर्माण केलेली ही छिद्र.... निरुपद्रवी, बिनमहत्वाची वाटत आली आहेत. पण तेव्हा देखील तुला ते सगळं पटलं नव्हतं. केवळ तू सांगितलेल्या प्रमाणे स्थापत्य निर्मिती होत नव्हती; हा राग होता तुझा." संस्कृतीचा धीरगंभीर शांत आवाज त्या खोलीमध्ये घुमत होता.
"अपाला.... तू अजूनही मला समजून....." नैना बोलत असतानाच अचानक शेषाचा आवाज आला.
"संस्कृती? परत गेलीस की काय त्या खोलीत. चल ग बाई. तो गोविंद वैतागला आहे."
संस्कृतीने नकळत आवाजाच्या दिशेने मागे वळून बघितलं. तिला शेषा दिसला नाही. म्हणजे तो अगदीच पुढच्या दाराशी थांबलेला होता. संस्कृतीने परत एकदा समोर बघितलं. खोली रिकामी आणि थंड पडलेली होती. संस्कृतीने मान खाली घातली आणि डोळे घट्ट मिटले. क्षणभर ती तशीच उभी राहिली आणि मग मागे वळून न बघता झपाझप चालत तिथून बाहेर पडली.
"संस्कृती, मला काहीतरी भास होत आहेत. आणि माझी खात्री आहे तुला देखील." तिला समोर बघताच शेषा म्हणाला.
"शेषा, फक्त तू आणि मी नाही तर गोविंदला देखील काहीतरी वेगळं जाणवतं आहे." संस्कृती थेट त्याच्याकडे बघत म्हणाली.
"हो! पण त्यासगळ्याची चर्चा इथे नको संस्कृती. एकतर जस्सीला काही अनुभव आले आहेत का ते आपल्याला माहीत नाही. त्यामुळे इथे जर आपण काही बोलायला लागलो तर तो गोंधळेल. त्यातून अजून काही गडबड निर्माण होईल. त्यात तो आपला गाईड... तो काही मला बरा वाटत नाही. त्याला माझ्याबाबतीत काहीतरी पटलेलं दिसत नाही. तुसड्यासारखी उत्तरं देतो आहे. त्यामुळे तर आपण जास्त जपलं पाहिजे. तुला जर आणि जे काही वेगळं दिसतं किंवा जाणवतं आहे; ते मनात ठेव आत्ता. आपण हॉटेलवर गेल्यावर एकत्र बसून चर्चा करू. परत जाण्याची घाई देखील नाहीय आपल्याला. हवं तर उद्या परत येऊया इथे. आपले आपणच फिरुया. गाईड वगैरे काही नको. आजच या महिला अच्छा टाटा करून टाकू." शेषा शांतपणे बोलत होता. संस्कृतीला त्याचं म्हणणं पटलं आणि दोघेही समजूतदारपणे हसले. शेषा आणि संस्कृती गोविंद, जस्सी आणि महिला गाठायला तिथून बाहेर पडले. त्यावेळी आतून नैना त्यांच्याकडे बघत होती. तिच्या शेजारी जाड गोणपाटाप्रमाणे काहीतरी पांघरलेले एक वृद्ध देखील उभे होते. नैनाची नजर शांत आणि अधिकारी होती. तर त्या वृद्धाची नजर काळजीने भरलेली होती.
"अरे तुम्ही दोघे कुठे राहिला होतात? तुम्ही दोघे येइपर्यंत माहिती द्यायला सुरवात नाही करायची असं गोविंद सर म्हणाले." महिच्या आवाजात नाराजी होती. त्याने बोलताना गोविंदकडे मात्र त्याचा आवाज बदलला.
"चला, सगळे आले आहेत तर मी माहिती देतो. हे सहावे लेणे आहे. तारा बोधिसत्व यांची मूर्ती तुम्हाला इथे दिसेल. अरे जस्सी तिथे नाही इथे ये. इथून आत जायचं आहे." महिने माहिती द्यायला सूरवात केली आणि जस्सी दुसरीकडे वळला. त्यामुळे माहिती देण्याचे काम थांबवून मही जस्सीच्या मागे गेला.
"तुम्ही सांगा हो तुम्हाला जी माहिती द्यायची आहे त्याबद्दल. मी ऐकतो आहे. आणि जर मी ऐकलं नाही तरी सोडून द्या. मला फोटो काढण्यात जास्त इंटरेस्ट आहे." जस्सी डोळ्यावरचा कॅमेरा दूर न करता म्हणाला.
खांदे उडवून महिने परत बोलायला सुरवात केली. "तारा बोधिसत्व यांचे बौद्ध धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. इथून आत या. ही मूर्ती अवलोकितेश्वर यांची आहे. हे इथे या वेगवेगळ्या मूर्ती आहेत त्या विविध देवांच्या आहेत." मही कसलेल्या गाईडप्रमाणे बोलत बोलत पुढे जात होता.
"गोविंद, शेषाने देखील काहीतरी वेगळं अनुभवलं आहे." मही थोडा पुढे गेला आहे हे बघून संस्कृती गोविंदच्या कानाला लागली आणि म्हणाली. गोविंदने मागे वळून शेषाकडे बघितलं आणि शेषाने देखील होकारार्थी मान हलवली.
"संस्कृती हे नक्की काय चालू आहे? आपण इथे का आलो होतो? मला जो श्लोक मिळाला त्याचा अर्थ शोधायला ना? मग ते सोडून आत्ता आपण ही लेणी का बघतो आहोत? तुला, मला आणि शेषाला इथे आल्यापासून काहीतरी वेगळं जाणवतं आहे. ते काय आहे? मी खूपच गोंधळून गेलो आहे ग." अगदी दबक्या आवाजात गोविंद संस्कृतीला म्हणाला.
गोविंदचा हात हातात घेत अत्यंत प्रेमाने दाबत संस्कृती म्हणाली; "गोविंद आम्ही सगळेच गोंधळलो आहोत. आपण आज आत्ता इथेच थांबुया का? चल हॉटेलवर जाऊ आणि एकत्र नीट बोलूया. आपण इथे परत उद्या पण येऊच शकतो न. शेषा देखील मला तेच सुचवत होता."
गोविंद आणि संस्कृती बोलत होते तेव्हा शेषा काहीसा लांब उभं राहून त्यांच्याकडे बघत होता. त्याला कळत नव्हतं की संस्कृतीने गोविंदचा हात धरलेला त्याला का आवडत नाहीय. 'हे असं या दोघांचं जवळ येणं कळवायला हवं आपण.' त्याच्या मनात विचार आला आणि त्या विचाराचं शेषाला खूप आश्चर्य वाटलं. गोविंद आणि संस्कृती... they are made for each other. मला माहीत आहे हे. मग काय झालं आपल्याला? कोणालातरी हे सांगायला हवं निकडीने असं वाटतंय. पण कोणाला?' शेषा स्वतःच्याच विचारांमध्ये अडकत चालला होता.
"आपण पुढे जायचं का?" अचानक महिचा आवाज आला.
पुढे होत शेषा त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला; "का हो महिरक्षक; तुम्ही फक्त ही टेक्निकल माहिती देता आहात. ही माहिती तर औरंगाबाद किंवा लेणी असं कुठलंही पुस्तक वाचलं तरी मिळेल. पण ही लेणी कोणी कोरली? कधी कोरली? त्यामागचा उद्देश काय होता? याबद्दल काहीतरी माहिती द्या ना. ते जास्त इंटरेस्टिंग असेल न!"
"वा! चांगला प्रश्न विचारलास. वाटत नाही तुझ्याकडे बघून तू इतका हुशार असशील." मही चेष्टेच्या सुरात म्हणाला. पण गोविंदला ते अजिबात आवडलं नाही. "हे पहा मही, तुम्ही तुमचं काम करा. कोण किती हुशार आहे; ते आमचं आम्ही बघून घेऊ."
गोविंदचा चिडलेला आवाज ऐकून मही एकदम वरमला. "अरे सर, तुम्ही तर एकदम रागावलात." तो म्हणाला.
"माझ्या जवळच्या लोकांशी कोणी नीट वागलं नाही तर मला ते खपत नाही. हे लक्षात ठेव तू." आवाजावर ताबा आणत शांतपणे गोविंद म्हणाला.
"बरं, बरं! या लेण्यांचा इतिहास तर अगदी रंजक आहे सर. तुम्हाला खूपच आवडेल. आपण इथेच बसूया का? हे मधले लेणे अपूर्ण आहे. त्यामुळे ते बघायला कोणी फारसं थांबत नाही. आपल्याला कोणी डिस्टर्ब नाही करणार." मही म्हणाला.
"चालेल. इथेच बसूया. आपण सोबत आणलेली सॅंडविचेस आणि केक्स इथे बसून खाऊया. यार भूक लागली आहे मला." जस्सी खाली बसत म्हणाला. त्याच्याकडे बघत हसत संस्कृती म्हणाली; "जस्सी, भुके व्यतिरिक्त दुसरं काही सुचतं का रे तुला?"
"हो! रक्षक नीती आणि समुच्च नियोजन हा एक अंतस्थ विचार असतो सतत माझ्या डोक्यात." मान खाली घालून कॅमेरामध्ये काहीतरी करत जस्सी म्हणाला. त्याचं उत्तर ऐकून संस्कृतीच्या भुवया उचलल्या गेल्या.
"जस्सी??" तिने त्याला हाक मारली.
"काय ग?" जस्सीने वर बघत उलट प्रश्न केला. तिच्याकडे बघणारा जस्सी नेहेमीचाच होता. मात्र संस्कृतीची खात्री होती की मान खाली घालून कॅमेरामध्ये खुडबुड करताना काहीतरी उत्तर देणारा जस्सी कोणीतरी वेगळा होता. तिने गोविंदकडे बघितलं. गोविंदने देखील जस्सीचं बोलणं ऐकलं होतं. त्याने संस्कृतीला डोळ्यांनीच शांत राहायला सांगितलं आणि तो देखील जस्सी शेजारी खाली बसला.
"मही तू पण बस. खाता खाता गप्पा मारू आपण." गोविंद म्हणाला आणि सगळेच खाली बसले.
"ही वेरूळ लेणी साधारण इसविसन सातशे सत्तावन्न ते त्र्याऐंशी या काळात निर्माण झाली. आपल्याला दिसतात ही समोरची चौतीस लेणी आहेत. बारा बौद्ध, सतरा हिंदू आणि शेवटची पाच जैन. वेरूळ लेण्यांमधील सर्वात महत्वाचं किंवा असं म्हणू की जगप्रसिद्ध असं शंकर मंदिर आहे. बारा ज्योतिलिंगांपैकी एक हे घृष्णेश्वर मंदिर आहे .हे मंदिर विशेष ठरतं ते त्याच्या स्थापत्यासाठी. द्राविडी शैलीतलं हे मंदिर दोनशे शहाहत्तर फूट लांब, एकशे चोपन्न फूट रुंद आणि नव्वद फूट उंच आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हे मंदिर एकाच दगडामध्ये कोरलेलं आणि ते ही वर पासून खाली घडवत गेलेलं आहे. एकूण चाळीस हजार टन दगड काढला गेला या कामामध्ये. हे स्थापत्य विशेष ठरत ते अजून एका गोष्टीसाठी. या मंदिराची महल तीन बाजूंच्या वर होती; जी मंदिराच्या वरच्या भागात जोडली होती. अर्थात आता हे पूल पडले आहेत. मात्र त्यावेळची ती स्थापत्य शोभा नजर दिपवणारी होती.
या मंदिराच्या निर्मितीचा पहिला विचार आला तो राजकुट घरण्यामधील अतिआदरनिय महाराज पहीले कृष्णराज यांच्या. त्यांनी त्यांच्या अत्यंत विश्वासू सल्लागार मित्राशी जो राज्याचा सुमंत देखील होता; याविषयी चर्चा केली. त्यावेळी त्यांचं वय केवळ पस्तीस वर्षे होतं. दुर्दैवाने राष्ट्रकूट घरण्याबद्दल आपल्या इतिहासात फार काहीच माहिती नाही. पण खरं तर या घराण्याने इसविसन सातशे त्रेपन्न पासून ते इसविसन नऊशे ब्याएशी पर्यंत म्हणजे तब्बल दोनशे एकोणतीस वर्षे राज्य केलं. ते देखील दक्षिण भारता पासून ते मध्य ते अगदी उतरेपर्यंत. मूळ राष्ट्रकूट घराण्यातील आंतरसंबंधीत पण स्वतंत्र कुळशाखा होत्या त्यांच्या.
अति आदरणीय पाहिले कृष्णराज भगवान शंकराचे निस्सीम भक्त होते. एका महाशिवरात्रीच्या उत्तर रात्री महाराज शंभो शंकराची महापूजा बांधून विश्रांतसाठी त्यांच्या भवनात गेले. ते मंजावर पहुडले होते; परंतु त्यांचं मन अतीव सुखाने भरून गेलं होतं. त्या अवस्थेतच त्यांना शंकर भगवंतांनी दृष्टांत दिला आणि सांगितलं की तुझ्या राजधानी बाहेरील गुंफांमधून मी वास करतो आहे. मात्र अजूनही मला स्वस्थ स्थान प्राप्त झालेले नाही. ही स्थान निर्मिती केवळ तू मनावर घेतलंस तरच होईल. राजा, एक असं मंदिर बांध की जे विश्वामध्ये वेगळे ठरेल. ज्या मंदिराचा यावदचंद्रदिवाकररौ लौकिक राहील. या मंदिराच्या अस्तित्वाची गरज सार्वभौम वसुंधरेला आहे. उठ राजा.... प्रातःकली तुला भेटण्यास जी पहिली व्यक्ती येईल तीच व्यक्ती या मंदिराच्या स्थापत्यासाठी योग्य आहे; यावर विश्वास ठेव.
भगवान शंकर अंतर्धान पावले आणि महाराज मंचावर उठून बसले. त्यांनी त्वरेने त्यांच्या परम मित्राला सुमंताला बोलावणे पाठवलं. तो समोर येताच साश्रु नयनांनी महाराजांनी त्याला झालेला दृष्टांत कथित केला. तो देखील हर्षोल्लासित झाला आणि म्हणाला "महाराज, आपण आजवर भगवान शंकरांची जी उपासना केली आहात; त्याचंच हे फळ आहे. आपल्या इच्छेने आणि आपल्याच संकल्पनेमधून या मंदिराची निर्मिती होईल; याची मला खात्री आहे." महाराजांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी त्यांच्या परम मित्राला आदेश दिला की उगवत्या नारायणासोबत राजधानीमध्ये पुकारा करावा की आज महाराज आम जनतेस सामोरे येणार आहेत. सर्वसामान्यांपैकी ज्यांना कोणाला महाराजांना भेटण्याची इच्छा असेल; त्यांनी आज राजदरबारी यावे. महाराजांच्या ठायी निर्माण झालेल्या चैतन्याचा अंश त्यांच्या मित्राकडे देखील संक्रमित झाला. मागे फिरताना त्याने महाराजांना विनंती केली की आजच्या राजदरबारामध्ये निश्चिन्त प्रवेश परवानगी असावी. मात्र महाराजांशी एकांतात बोलत असताना परम मित्र आणि राज्याचा सुमंत तिथे उपस्थित राहणारच! महाराजांना या विनंतीमध्ये काहीच चुकीचे वाटले नाही. त्यांनी रुकार भरला आणि परम मित्र राजदरबाराची व्यवस्था बघण्यासाठी निघाला.
महाराज राजदरबारात येऊन बसले. त्यांची प्रसन्न मुद्रा त्यांच्या मनातला आनंद सर्वश्रुत करत होती. राष्ट्रकूट घराण्याच्या सार्वभौमत्वाचे महत्व माहीत असणारे अनेक व्यापारी महाराजांना भेटण्यास आले होते. गेली अनेक वर्षे हे व्यापारी उत्तर भारतामध्ये उतरून मध्य भारत पार करून दक्षिणेपर्यंत प्रवास करत असत. सोबत आणलेल्या विविध वस्तू विकून त्याबदल्यात त्यांना आवश्यक अशा वस्तू ते घेत असत. मात्र त्यांना विक्री कर प्रचंड मोठ्या प्रमाणात द्यावा लागत होता. जर परम आदरणीय कृष्णराज महाराजांनी या करामध्ये सवलत दिली तर त्यांचा व्यापार मोठा होणार होता. यासाठी त्यांनी महाराजांची वयक्तिक भेट मागितली. सर्वांना भेटून झाल्यानंतर विशेष कक्षामध्ये या व्यापाऱ्यांना घेऊन येण्यास महाराजांनी त्यांच्या परम मित्रास सांगितले. व्यापारी वर्ग महाराजांना विशेष कक्षामध्ये येऊन भेटला आणि त्यांनी त्याची इच्छा बोलून दाखवली. त्यावेळी महाराजांचा परम मित्र आणि राज्याचा सुमंत तिथेच उपस्थित होता. त्याने महाराजांच्या कानाला लागत महाराजांना सुचवलं की जर या व्यापाऱ्यांना आपण विक्री करामध्ये सूट दिली तर ते आपल्या इथे बनणाऱ्या वस्तू जास्त विकत घेतील; जेणेकरून आपल्या लोकांचाच जास्त फायदा होईल. महाराजांना देखील हे पटले आणि त्यांनी कर सवलती संदर्भात विचार करून निर्णय घेण्यात येईल; असे त्या व्यपाऱ्यांना वचन दिले. अत्यानंदि होऊन व्यापारी वर्ग तेथून बाहेर पडला.
काही बौद्ध महंत देखील महाराजांना भेटण्यास आले होते. ते राजधानीच्या दक्षिणेकडील गुंफांमधून राहात होते. त्यांना पाहाताच महाराजांना प्रथम प्रहरी मिळालेल्या दृष्टांताची आठवण झाली. सर्वच महंतांचा यथायोग्य आदर-सत्कार करून महाराजांनी त्यांच्या अडचणीविषयी पृच्छा केली. मूलतः अत्यंत मितभाषी आणि मनुष्यवस्तीपासून लांब रहाणारे हे बुद्ध महंत महाराजांच्या आदरातिथ्याने संकोचून गेले. त्यांच्या प्रमुखाने पुढे होत अत्यंत कमी शब्दात विषय मांडणी करत सांगितले की बौद्ध धर्मातील काही महत्वाच्या निर्णय प्रक्रियेसाठी सर्वच महंतांना काही काळासाठी त्यांचे राहाते ठिकाण सोडून जावे लागणार आहे. हे ठिकाण जरी सर्वसामान्य मनुष्यांच्या दृष्टिक्षेपातील असले तरी जर गुंफांमधील महंतांचा वावर बंद झाला तर तिथे हिंस्त्र जनावरांचा वास सुरू होईल. त्यामुळे त्यांनी महाराजांना विनंती केली की काही काळासाठी या गुंफांचे संरक्षण करण्याची जवाबदारी घ्यावी. महंतांच्या विनंतीला मान देऊन महाराजांनी तेथील बंदोबस्ताची पूर्ण जवाबदारी स्वीकारली. महंत निश्चिन्त होऊन महाराजांना दुवा देऊन निघून गेले.
त्यानंतर अनेक गावकरी आणि इतर मंडळी महाराजांना भेटली. काहींच्या अडचणी होत्या तर काही केवळ आशीर्वाद देण्यासाठी आले होते. काहींना महाराजांची प्रसन्न मुद्रा समाधान देऊन गेली; तर काहींनी महाराजांच्या कारभाऱ्यांनी दिलेल्या त्रासाबद्दल तक्रार करून दाद मागितली आणि महाराजांनी तात्काळ त्यावर निर्णय दिले.
हळूहळू राजदरबाराची वेळ संपत आली. अजूनही महाराजांच्या नजरेतला शोध संपला नव्हता. भगवान शंकरांनी दिलेल्या संकेतानुसार आज कोणीतरी भेटणे आवश्यक होते. मात्र अजूनही कोणीच समोर आले नव्हते. सरते शेवटी महाराजांनी खुणेचा दंड उचलण्याची खुण केली; दंड उचलला जाणार इतक्यात राजदरबाराच्या मध्यावधी द्वारातून एक स्त्री पुढे येताना महाराजांना दिसली. महाराजांनी दंड उचलण्याची प्रक्रिया थांबवली आणि अत्यंत उत्सुकतेने त्यांनी समोरून येणाऱ्या स्त्रीचे स्वागत केले.
"महाराज, मला आपणास एकांतात भेटायचे आहे." धीरगंभीर आवाजात आणि अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये त्या स्त्रीने मनीची इच्छा बोलून दाखवली. क्षणभर महाराजांनी विचार केला आणि होकारार्थी मान हलवली. तत्क्षणी मानाचा दंड उचलला गेला आणि राजदरबार बरखास्त झाला.
महाराजांच्या विशेष कक्षामध्ये महाराज येऊन बसले. त्यांच्या सोबत राज्याचा प्रामाणिक सुमंत आणि त्यांचा परम मित्र देखील होता. ती स्त्री विशेष कक्षात प्रविष्ट झाली. अत्यंत तीक्ष्ण नजरेची ती स्त्री तिच्या प्रत्येक पावलागणिक तिच्यातील आत्मविश्वासाची जाणीव करून देत होती. ती महाराजांसमोर येऊन उभी राहिली. महाराजांनी तिला आसन ग्रहण करण्याची विनंती केली; त्याप्रमाणे तिने आसन ग्रहण केले. मात्र ती एकही शब्द बोलण्यास तयार नव्हती. महाराजांनी काही क्षण वाट बघून सुमंतांना खुण केली आणि सुमंतांनी तिला तिच्या येण्याचे प्रयोजन विचारले. तिने थेट महाराजांकडे बघितले आणि त्याच त्या धीरगंभीर आणि स्पष्ट आवाजात ती म्हणाली; "महाराज, विषय अत्यंत महत्वाचा; म्हंटले तर नाजूक आणि तुमच्या दृष्टांतासंदर्भातील आहे. त्यामुळे मी एकांतात तुमच्याशी बोलू इच्छिते......."
...................मही बोलण्याचा थांबला. त्याच्या कथेमध्ये गुंतून गेलेले गोविंद, जस्सी, शेषा आणि संस्कृती तो अचानक का थांबला म्हणून त्याच्या तोंडाकडे बघायला लागले.
"पुढे?" न राहून गोविंदने विचारले.
................................"पुढे? महिला.........." संस्कृती बोलणार इतक्यात गोविंद झपकन पुढे झाला आणि सर्वांसमोर त्याने तिला दोन्ही खांदे धरून घुसळले.
"शांत रहा संस्कृती!!!" अत्यंत तीव्र शब्दात गोविंद म्हणाला.
"तू??? तू हिम्मत कशी केलीस मला स्पर्श करण्याची?" संस्कृतीचा अवतार अचानक इतका बदलला होता की मही, जस्सी, शेषाच काय गोविंद देखील दचकला आणि मागे हटला. क्षणात गोविंदला दूर लोटत संस्कृती फणकाऱ्याने उठली आणि समोरच्या गुंफेच्या दिशेने निघाली.
क्रमशः
No comments:
Post a Comment