Friday, October 29, 2021

चिरंजीवी (भाग 7)

 चिरंजीवी


भाग 7

हॉस्पिटल मधून discharge मिळाल्यानंतर सिद्धार्थ घरी आला. त्याला काही दिवस संपूर्ण विश्रांती घेण्यास सांगितलं होतं. त्यामुळे तो कुठेही बाहेर जाणं शक्य नव्हतं. कृष्णाने एक दोन दिवस घरी आराम केला खरा.. पण मग ती रोज संध्याकाळी सिध्दार्थकडे जायला लागली. दहा दिवस झाले होते. सिद्धर्थच्या अनेक टेस्ट्स करण्यात आल्या होत्या. झालेल्या अपघाताचा कोणत्याही प्रकारचा परिणाम त्याच्या शरीरावर झालेला नाही न याची खात्री करण्यासाठी हे सगळं करण्यात आलं होतं. सिध्दार्थ या प्रकाराला कंटाळला होता. कारण या सततच्या हॉस्पिटलच्या वाऱ्यांमुळे तो कृष्णाशी कोणत्याही विषयावर निवांतपणे बोलू शकत नव्हता. त्याचा अस्वस्थपणा तिला कळत होता पण तिला देखील त्यावर उपाय सुचत नव्हता.

कृष्णाला सिध्दार्थला घराबाहेर काढायचं होतं. पण त्याचे वडील त्यासाठी परवानगी देत नव्हते. कृष्णला सिध्दार्थला घराबाहेर का न्यायचे आहे त्याचं कारण माहीत असूनही सिध्दार्थची आई देखील नकार देत होती. कृष्णा अगदीच हवालदिल झाली होती. त्यात एकदिवस तिला तिच्या कॉलेजमधून फोन आला की तिची अटेंडेन्स कमी पडायला लागली होती. परीक्षा द्यायचा विचार असेल तर तिने एकदा कॉलेजमध्ये जाणं आवश्यक होतं. कृष्णाने सिध्दार्थला फोन करून सांगितलं की आज तिला यायला थोडा उशीर होईल; कारण ती कॉलेजमध्ये जाऊन येणार आहे.

कॉलेजमध्ये कृष्णा तिच्या सरांना भेटली आणि तिने अपघाताचं कारण सरांना सांगितलं. त्यांना देखील ते पटलं कारण कृष्णाच्या कपाळावरची जखम दिसत होती. सरांना भेटून कृष्णा लायब्ररीमध्ये जायला वळली. सध्या कॉलेजमध्ये येणं शक्य नाही हे तिच्या लक्षात आलं होतं; त्यामुळे किमान काही पुस्तकं घेऊन जाऊन जमेल तसा घरीच अभ्यास करायचं तिने ठरवलं होतं. त्याप्रमाणे तिने हवी ती पुस्तकं मागून घेतली आणि ती निघाली.

कृष्णा तिच्या गाडीजवळ पोहोचली तर तिच्या गाडीला टेकून एक व्यक्ती उभी होती. पांढरीशुभ्र दाढी, धोतर आणि स्वच्छ पांढरा कुर्ता असा त्यांचा पेहेराव होता. कृष्णाने एकदा त्यांच्याकडे बघितलं आणि स्वतःची गाडी उघडली.

"कृष्णा, मी ऋषी पराशर आणि माता सत्यवती यांचा पुत्र व्यास. माझी ओळख वेद व्यास अशी देखील आहे. मला तुझी आणि सिध्दार्थची भेट घ्यायची आहे. हे कसं शक्य होईल?" व्यासांनी अत्यंत शांतपणे कृष्णला विचारलं.

'आपल्या समोर उभी असणारी व्यक्ती खरंच वेद व्यास आहे का?' कृष्णाच्या मनात प्रश्न उभा राहिला.

"मुली, अत्यंत स्वाभाविक आहे तुझ्या मनात हा प्रश्न येणं. हेच तर भगवान हनुमान सांगत होते. विश्वास असणे हे जीवनावश्यक सत्य आहे. स्थिर मनासाठी आणि वाहत्या जीवन प्रवासासाठी विश्वास ही भावनिक गरज आहे. हा विश्वास केवळ पूर्ण भक्तीतून येतो. तू सध्या महाभारतीय युद्धातील पांडव पुत्र संहार या विषयाचा अभ्यास करते आहेस ना... मग त्यातलंच एक उदाहरण देतो...

अर्जुनाने ज्यावेळी समोर युद्धासाठी उभे असलेले सर्व आप्त बघितले आणि त्याने युद्धास नकार दिला. त्यावेळी श्रीकृष्णाने त्याला जीवन सार सांगितले. मुली, हे काही 'पी हळद आणि हो गोरी'; इतके सोपे नसते. जरी श्रीकृष्णाने भगवत गीतेच्या स्वरूपात जीवन सत्य उघड केले होते तरी युद्धभूमीवर उभा अर्जुन त्यावेळी शिष्य दशेमध्ये नव्हता. त्यामुळे गीतेमध्ये कथित केलेल्या जीवन सत्याची उपरती होऊन अर्जुन युद्धास तयार झाला.... यापेक्षा थोडा असा विचार पटतो का बघ. भगवत गीता अर्जुनाला सांगणारा खुद्द श्रीकृष्ण होता; त्याचा परमप्रिय मित्र! मात्र गीतेमध्ये सांगितलेले विचार हे एका मित्राने दुसऱ्या मित्राला सांगितलेले नव्हते. त्यामुळे युद्धभूमीवर असताना गीतेमधील कर्तव्य आणि सामाजिक जवाबदारी हे मुद्दे किती लक्षात आले असतील अर्जुनाच्या ते सांगता येत नाही. मात्र भावनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत नाजूक अशा विषयाला आपला मित्र-बंधू एका वैश्विक दृष्टिकोनातून सांगतो आहे हे नक्की अर्जुनाच्या लक्षात आलं. विचारांनी इतका स्थिर असणारा आपला बंधू जर आपल्याला युद्ध करायला सांगतो आहे तर ते योग्यच असेल; या विश्वासातून पुढील परिणामांचा विचार न करता अर्जुनाने युद्धासाठी धनुष्य पेललं. मग या विश्वासाला हनुमंत भक्ती म्हणतील आणि तुम्ही पूर्वानुभवातून आलेलं शहाणपण म्हणा.. पण मूलतः सत्य हेच राहातं की विश्वास होता म्हणूनच अर्जुनाने गांडीव उचललं."

व्यास मुनी बोलायचे थांबले आणि त्यांचं बोलणं पूर्ण लक्ष देऊन एकणारी कृष्णा मंद हसली. "चला, मी सिध्दार्थलाच भेटायला जाते आहे." ती म्हणाली.

***

"अरे काका तुम्ही आज इतक्यात घरी कसे?" घरी पोहोचताच कृष्णाने समोर सिध्दार्थच्या वडिलांना बघून प्रश्न केला.

"अग, वैदेहीचं एक महत्वाचं सेमिनार आहे पुढचे तीन दिवस. म्हणून तिने मला घरी थांबायला सांगितलं आहे. नाहीतर तुम्ही दोघे अगदी बेभरवशाचे आहात. कोणी थांबवायला नाही म्हंटल्यावर लगेच भटकायला बाहेर पडाल." हसत हसत सिध्दार्थचे बाबा म्हणाले.

बोलताना त्यांची नजर कृष्णा सोबत असलेल्या व्यक्तीकडे पडली. कृष्णला ते लक्षात आलं आणि अगदी सहज आवाजात ती म्हणाली; "काका, हे माझे सर आहेत. व्यास सर. सिध्दार्थला ते ओळखतात. त्याला भेटायला आले आहेत ते."

"ओह! ठीक ठीक. म्हणजे तुमच्या गप्पा आता मस्त रंगतील न? एन्जॉय. सर, आता तुम्ही इथे आला आहात तर सिध्दार्थ कुठेही बाहेर जाणार नाही. बरं, मग मी जरा ऑफिसला जाऊन येतो." असं म्हणून ते लगेच निघाले देखील.

व्यास मुनींनी एकदा कृष्णाकडे बघितलं आणि म्हणाले; "हेच सांगायचा प्रयत्न मी करतो आहे. बघ! सिध्दार्थच्या वडिलांचा त्यांच्या कामावर दृढ विश्वास आहे; भक्ती करतात ते त्यांच्या कामाची.. त्यामुळे त्यांच्या समोर साधारण त्यांच्याच वयाची व्यक्ती दिसल्या क्षणी त्यांना आपल्या विश्वासाच्या किंवा भक्तीच्या मागे जाणं जास्त योग्य वाटलं. 'भक्ती' हा शब्द तुम्ही कशा प्रकारे समजून घेता त्यावर 'विश्वास' ही भावना अवलंबून आहे."

एक अत्यंत वेगळा विचार समोर घडलेल्या घटनेतून इतक्या सोप्या प्रकारे त्यांनी सांगितला होता की कृष्णा एकदम सीमित झाली. तिला भानावर आणत मुनी व्यास म्हणाले; "आपण इथे सिध्दार्थला भेटण्यास आलो आहोत मुली."

कृष्णाने पुढे होत त्यांना सिध्दार्थच्या खोलीकडे आणले आणि दार उघडत ती म्हणाली; "सिध्दार्थ, माझ्या सोबत...."

"गुरुवर्य अखेर आपण आलात!" कृष्णाचं वाक्य अर्धवट तोडत सिध्दार्थ पलंगावर उठून बसत म्हणाला.

"पुत्रा, मी येईन हे वचन दिलं होतं तुला स्वप्नात; आणि मी अशा कालातील आहे की चुकून झोपेत देखील दिलेला शब्द पाळण्यासाठी आम्ही सर्वस्वाचा त्याग करतो." मुनी व्यास खोलीमध्ये येत म्हणाले.

कृष्णला त्या दोघांच्या बोलण्यावरून अंदाज आला की सिध्दार्थला स्वप्नामध्येचं मुनी व्यास त्याला भेटायला येणार आहे हे कळले होते. ती काहीएक न बोलता सिध्दार्थच्या शेजारी जाऊन बसली.

"सिध्दार्थ, मुला 'स्वप्नात देखील दिलेलं वचन आम्ही पाळतो' याचा अर्थ तुला समजला आहे का?" मुनी व्यास सिध्दार्थ समोर बसत म्हणाले.

"होय गुरुवर्य." सिध्दार्थने तात्काळ उत्तर दिले.

सिध्दार्थने दिलेल्या उत्तराने कृष्णा एकदम चमकली. त्यावर तिच्याकडे बघत मुनी व्यास म्हणाले; "मुली थोडा धीर धर आणि तुला सर्वच विषयांची उकल होईल." एकदा कृष्णाकडे बघून सिध्दार्थने बोलायला सुरवात केली.

"गुरुवर्य, अपघातानंतर मी घराबाहेर पडू शकत नाही हे मला लक्षात आले. त्यामुळे मी फार अस्वस्थ झालो. पण मग माझ्या मनात आलं, कदाचित या सक्तीच्या विश्रांतीचं देखील काहीतरी प्रयोजन असेल. मी गेली अनेक वर्षे योगाभ्यासकरतो आहे; त्यामुळे ध्यानस्थ बसणे; ज्याला आजच्या आमच्या युगामध्ये मेडिटेशन म्हणतात; सुरू केले. अगोदर काही मिनिटांचे ध्यान करणे मी आत्मसद केले. त्यानंतर हळूहळू मी वेळ वाढवायला लागलो. गुरू कृपाचार्यांनी सांगितले होते की; आत्मविश्वास आणि स्वप्रजल्पनं.... स्वतःशी साधलेला संवाद.... ही दोन सुखी मानवीय आयुष्याची सत्य आहेत. याची अनुभूती मला हळूहळू यायला लागली. मुनिवर, यातूनच मला तुमच्या पर्यंत मनोबलाने पोहोचता आलं. अत्यंत खेदाने मला सांगावंसं वाटतं गुरुवार की या मात्र आजचा मानव या दोन सत्यांपासून दूर जातो आहे; हे दुर्दैव आहे."

"मुला, स्वप्रजल्पनं असणे आणि स्वकेंद्री असणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. याचं अत्यंत योग्य उदाहरण म्हणजे महात्मन बिभीषण. रावणासारखा अत्यंत हुशार आणि दशग्रंथी ब्राम्हण; मात्र त्याने लंकेचा उत्कर्ष घडवून आणला आणि स्वप्रजल्पनं ह्रास पाऊन केवळ स्वकेंद्री मानसिकता राहिली त्याची. त्याचे फळ देखील त्याला मिळालेच. बिभीषणांच्या बाबतीत मात्र त्यांनी स्वप्रजल्पनं कधीच सोडले नाही. म्हणूनच श्रीरामांनी ज्यावेळी त्यांना चिरंजीवित्व बहाल केले त्यावेळी त्यामागील मतितार्थ ते समजू शकले होते. किंबहुना म्हणूनच त्यांची याकाळातील किंकर्तव्यमूढता जास्त समजून घेतली जाऊ शकते.

जे सत्य बिभीषणासाठी अबाधीत होतं तेच सत्य बळी राजाच्या बाबतीत देखील लागू होतं. मात्र बळी राजाचा प्रवास स्वकेंद्रीपणा पासून सुरू होऊन स्वप्रजल्पनं पर्यंत येऊन थांबतो. म्हणूनच कृपाचार्य हस्तिनापुराचे राजगुरू होऊ शकले." आपण जे बोलतो आहोत ते सिध्दार्थ आणि कृष्णाला पटतं आहे का याचा अंदाज घ्यायला मुनी व्यास थांबले.

"मुनिवर, गेल्या काही दिवसातील अनुभवांमुळे आम्ही दोघेही समोरच्या व्यक्तीचे विचार स्विकारण्याच्या मानसिकतेमध्ये आलो आहोत. अर्थात सत्यासत्यता समजून घेतल्या नंतरच." मुनिवर बोलण्याचे का थांबले असावेत याचा अंदाज घेऊन कृष्णा म्हणाली.

"मुली, तू आत्ता जे बोललीस न त्यामुळे महात्मन परशुरामांचा निर्णय योग्य होता हे मला पुन्हा एकदा पटलं." मुनी व्यास म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून कृष्णा आणि सिध्दार्थ एकदम गोंधळले.

"मुली, भगवान परशुराम यांनी तुला सांगितलं होतं स्वतःला दुय्यम स्थान देऊ नकोस; तू सिध्दार्थहून कोणत्याही बाबतीत कमी नाहीस.. ज्यावेळी या काळातील कोण? असा आम्ही विचार केला त्यावेळी केवळ सिध्दार्थ नाही तर त्याच्या बरोबरीने विचारपूर्वक पाय उचलणारी अशी तू असू शकतेस हे परशुरामांनी आम्हाला संगीतलं होतं.

बरं, नमनालाच घडाभर तेल घटल्यासारखं झालं आहे. माझी आणि तुमची भेट का व्हावी याचं कारण अगोदरच ठरलेलं आहे. त्यानुसार मी माझे विचार तुमच्यासमोर मांडतो आहे...."

असं म्हणून मुनिवर पद्मासन घालून बसले आणि बोलायला सुरवात केली;

आपल्या हिंदू संस्कृतीला स्वतःच्या अस्तित्वावर इतका विश्वास होता की आपण आपल्या धर्मचा प्रचार करण्याचा विचार कधीही केला नाही. परंतु त्याचा परिणाम असा झाला की पुरातन काळापासून अस्तित्वात असलेली आपली संस्कृती आज आपण परदेशीय लोकांडून समजून घेतो आहोत. किती मोठा ह्रास आहे हा आपल्या अस्तित्वाचा. आजच्या पिढीतील अनेकांना 'मी नास्तिक आहे'; हे बिरुद मिरावण्यास आवडतं. मात्र नास्तिकता म्हणजे काय हे समजून घेण्या अगोदर आस्तिकता समजून घेणे जास्त महत्वाचे वाटते मला. मी नास्तिक आहे, धर्म, जात, असमानता मी मानत नाही... असं म्हंटलं की कोणतीही गोष्ट नाकारणे सोपे जाते. प्रामुख्याने धर्म आणि जात या दोन्ही विषयी जितक्या जोरात नकारात्मक तुम्ही बोलाल तितके जनमानसात चर्चिले जाल; ही मानसिकता तर सर्वात धोकादायक.

आपला उज्वल इतिहास बघितला तर सम्राट शंतनु यांनी एका मासे पकडण्याऱ्या स्त्रीशी लग्न केलं. माझा जन्म त्याच स्त्रीच्या गर्भातून आहे. माता सत्यवती आणि पराशर मुनींचा मी पुत्र आहे. म्हणजे मी जन्माने कोळी पुत्र असलो तरीही स्वकर्तृत्वावर महर्षी पदाला पोहोचलो आहे. आज ज्या live in नात्याबद्दल नकारात्मक भावनेने चर्चिले जाते ते त्याकाळात स्त्री-पुरुषाच्या इच्छेचा भाग होता. त्यामुळे सामाजिक बंधनांचा ह्रास होत नव्हता. विवाह संस्था देखील तितक्याच ताकदीने अस्तित्वात होती. याचाच अर्थ स्वीकाराह्यता होती मानवात. जी आजच्या काळात नाहीशी झाली आहे.

विदुर अंबालिकेच्या दासीला माझ्याकडून प्राप्त झालेले पुत्र आहेत. तसेच धृतराष्ट्र आणि पांडू देखील अनुक्रमे अंबिका आणि अंबालिकेला झालेले माझेच पुत्र आहेत. विदुर महान पंडित म्हणून ओळखले गेले तर धृतराष्ट आणि पांडू महान क्षत्रिय होते.

त्यानंतरच्या पिढीतील भीमाने वनवासी हिंडीबेशी विवाह केलाच न! पुत्र प्राप्ति नंतर भीम परत निघून आला. हिडिंबेने स्त्रीसत्ताक राज्य पद्धती सुरू करून आपल्या पुत्राला उत्तम युद्धनीती शिकवली. तोच भीम आणि हिडिंबेचा पुत्र पुढे महाभारतीय युद्धात पांडवांच्या बाजूने लढला.

स्वतः श्रीकृष्णाने राजपुत्र असून दूध विकणाऱ्या पुरुषांसोबत काम केले; तर बलराम शेती करत असत.

थोडक्यात सांगायचं तर पुराण काळापासूनच कोणतीही व्यक्ती जन्माने त्यांच्या आयुष्याचं कर्तव्य ठरवत नसे... तर त्याचे कर्तव्य त्यांची ओळख ठरवत असे.

परंतु आज मात्र धर्म, जात, लिंगभेद यामध्येच समाजमन अडकून गेलं आहे. त्यामुळे प्राचीन इतिहास असणाऱ्या स्वतःच्याच धर्माचा अभ्यास करण्याची इच्छा आणि उर्मी उरलेली नाही. मुलांनो.... स्वतःच्या मूळ अस्तित्वाचा जेव्हा आपल्याला विसर पडतो आणि आपण ते नाकारू लागतो त्यावेळी मनुष्य कर्तव्यहीन आणि अल्पायु होतो. हाच मोठा फरक आहे... चिरंजीवित्व आणि मानवीय आयुष्यात.

त्यामुळे मी चार वेदांचा रचिता मुनी व्यास... सातवा चिरंजीवी तुम्हा दोघांना हा आदेश देतो आहे की हा धर्माचा आणि पर्यायाने मानवीय अस्तित्वाचा होणारा ह्रास थांबवा. त्यासाठी तुम्ही काय करायला हवं ते तुम्हाला नक्की सुचेल. कधीतरी मार्ग अवघड होईल... कधीतरी तो खुंटला आहे असं वाटेल. पण चालत राहा! कधीही विसरू नका की एखादं दार बंद झालं तर दुसरं नक्की उघडलं जातं. फक्त आपण डोळे उघडे ठेवून दार बंद होऊ द्यायचं नाही; आणि झालंच तर दुसरं दार शोधण्यास सुरवात करायची."

सिध्दार्थ आणि कृष्णला व्यास मुनींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट पटली होती. मात्र इतक्या मोठ्या विषयाला हात कसा घालायचा हा प्रश्न होता. अर्थात कालौघात सर्वच अशक्य गोष्टी शक्य होतात यावर त्यांचा विश्वास होता.

क्रमशः

Friday, October 22, 2021

चिरंजीवी (भाग 6)

 चिरंजीवी


भाग 6

परशुराम पुढे पुढे चालत होते.. ते गेले त्यादिशेने काही वेळ कृष्णा बघत बसली आणि मग तिची नजर सागराकडे वळली. तिच्याही नकळत ती तिथेच आडवी झाली आणि तिला झोप लागली.

समुद्राच्या गाजेने कृष्णाला जाग आली तेव्हा उजाडलं देखील नव्हतं. आकाशात अजूनही तारे लुकलुकत होते. आपण असे वाळूत का झोपलो आहोत; हे काही क्षण तिच्या लक्षात आलं नाही. पण मग एक एक कडी जोडत गेली आणि आदल्या रात्रीच्या प्रसंगांची साखळी तिच्यासमोर उभी राहिली. सगळं आठवून ती पटकन उभी राहिली आणि भराभर पावलं टाकत घराच्या दिशेने निघाली. ती घरी पोहोचली तरीही सिध्दार्थ झोपलेलाच होता. त्याला उठवण्या अगोदर तिने तिचं सगळं उरकून घेतलं आणि ब्रेकफास्टसाठी सांगून मग त्याला हाक मारली.

"वा मॅडम. उशिरा उठायचं आणि निवांत निघायचं ठरलं असूनही लवकर उठून एकदम फ्रेश तयार होऊन मला हाक मारते आहेस?" सिद्धार्थ म्हणाला.

शांतपणे सिध्दार्थकडे बघून कृष्णा म्हणाली; ''खूप काही सांगण्यासारखं आहे. म्हणून तयारच होऊन बसले. तू पटकन तयार होऊन खाली ये. तोवर ब्रेकफास्ट येईलच. टांगा देखील पोहोचेल."

तिचा आवाज थोडा सिरीयस आहे हे सिध्दार्थच्या लक्षात आलं. पण त्यावेळी काही न बोलता तो उठला. कृष्णा खाली आली आणि ब्रेकफास्टची तयारी नीट आहे न बघितलं. सिध्दार्थ आला आणि दोघे ब्रेकफास्ट करायला बसले.

"सिद्धार्थ, काल संध्याकाळी आपल्याला जी व्यक्ती भेटली होती...."

"Don't tell me Krushna.... seriously? तेच परशुराम होते? खरं सांगू... माझ्या मनात देखील त्यावेळी आलं होतं पण मी काही म्हंटलं नाही. पण तुला कसं कळलं? ओह... ती पेटी! श्लोक वाचलास का तू सकाळी? काय लिहिलं आहे?" सिध्दार्थ बोलायचा थांबत नव्हता. कृष्णाने देखील त्याला बोलू दिलं. तो शांत झाला आणि ती म्हणाली; "सिध्दार्थ, परशुराम मला भेटले. त्यांची identity त्यांनी माझ्यासमोर revil केली."

क्षणभर सिध्दार्थला कळलं नाही की कृष्णा काय म्हणते आहे. पण लक्षात आलं आणि त्याच्या चेहेऱ्यावर आश्चर्य पसरलं. कृष्णाने त्याला शांतपणे आदल्या रात्रीची संपूर्ण घटना सांगितली. सिध्दार्थचा चेहरा अत्यंत समाधानी झाला.

"कृष्णा, खूप मोठी गोष्ट आहे ग ही. एक सांगू का? एक ऋषी कन्या गार्गी हिचं उदाहरण सोडलं तर आपल्याला अशी पुराण कालीन स्त्रियांची नावंच माहीत नाही ज्या पंडिता होत्या. त्याकाळात देखील स्त्रियांना पूर्ण शिक्षणाचा अधिकार होता. होणारे यज्ञ, होम-हवनं, धर्मचर्चा, वाद-विवाद यासोबतच युद्धभूमीवरील सर्व डावपेच त्यांना शिकवले जात असत. पण तरीही याविषयी फार बोललं जात नाही. कितीतरी उदाहरणं आहेत ग अशी. आपण सीतेला त्यागाची मूर्ती म्हणतो. अबला, सहनशीलतेची मूर्ती असंच बरंच काही.... सीता स्वयंवरमध्ये ज्या धनुष्याला रामाने प्रत्यंच्या बांधली आणि त्यावेळी ते धनुष्य मोडून पडलं ते परशुरामांचं होत हे तर आपल्याला माहीत आहे; पण ते राजा जनकाकडे कसा आलं याचा विचार किती लोक करतात? एक अशीही कथा आहे की राजा जनकाला परशुराम भेटण्यास आले होते त्यावेळी त्यांनी त्यांचं धनुष्य राजमहालाच्या बाहेरच ठेवलं होतं. काही वेळाने परशुराम बाहेर आले तर त्या धनुष्याशी सीता खेळत होती. तिने ते धनुष्य लीलया पेललं होतं... ते पाहून परशुरामांनी राजा जनकाला सांगितलं की या धनुष्याला जो प्रत्यंच्या बांधेल तो सीतेसाठी योग्य वर असेल. म्हणूनच तो पण स्वयंवरात ठेवला गेला. याचा अर्थ त्याकाळात देखील परशुराम वेगळ्या विचारांचे होते... किंवा असं म्हणूया की कदाचित आपण बुरसटलेल्या विचारांचे आहोत.... मात्र रामायण काळात स्त्रीला पुरुषांइतकंच महत्व होतं.

अग, इतकंच का... त्या काळातील स्त्रियांना स्वयंवराचा अधिकार होता. स्वयं-वर. स्वतःचा वर निवडण्याचा अधिकार. आपण अंबा, अंबिका, अंबालिका किंवा अशी काही गिनीचुनी उदाहरणं देतो आणि म्हणतो की स्त्रियांचं अपहरण केलं जायचं. अग, पण आपल्याला माहीत असलेल्या कथांमधील पत्रांव्यतिरिक्त भारतवर्षात इतर कोणीच नव्हतं का? हिडिंबेने स्वतः भीमाला choose केलं होतं; द्रौपदी स्वयंवरामध्ये जेव्हा कर्ण मस्यनेत्र वेधण्यासाठी उभा राहिला तेव्हा द्रौपदीने त्याला थांबवलं होतं. याचा अर्थ जरी पण ठेवला असला तरीही तो कोणी स्वीकारायचा ते ठरवण्याचा अधिकार स्त्रीला होता... पुढे श्रीकृष्णाला द्रौपदीचं मन वळवायला लागलं होतं की तिने पाचही पांडवांचा पती म्हणून स्वीकार करावा. याचा अर्थ तिला चॉईस होता नकार देण्याचा! या सगळ्या उदाहरणांवरून हेच तर सिद्ध होतं की त्या काळात देखील स्त्रियांना मानाने आणि बरोबरीने वागवलं जात होतं. त्यामुळे मला मुळीच आश्चर्य वाटत नाहीय की परशुरामांनी तुला निवडलं त्यांचं मन मोकळं करायला.

अर्थात आपल्या मनातला मूळ प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे अजून. Why us? Or now we can say; why we?! अर्थात माझा परशुरामांच्या म्हणण्यावर विश्वास आहे; जर आपली निवड झाली आहे; तर त्याचं कारण देखील ठरलंच असेल; आणि योग्य वेळी कळेलच. बरं, चल निघुया न आपण?" असं म्हणून सिध्दार्थ उठला.

कृष्णाला सिध्दार्थच्या समंजसपणाचं कौतुक वाटलं आणि त्याच वेळी तिच्या मनात विचार आला.... सिध्दार्थ समंजस आहे याचं मला कौतुक वाटतंय हीच गोष्ट मुळात किती चुकीची आहे! सिध्दार्थच काय सर्वच पुरुषांनी त्यांची मानसिकता बदलणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि आम्ही स्त्रियांनी अशा एखाद्या सिध्दार्थचं कौतुक देखील करणं बंद करणं आवश्यक आहे. स्त्रीने शालीन असावं.... मग पुरुषाने का नाही? शालीनता म्हणजे लाजरी भाऊली नाही तर वागण्यामध्ये आदब असणं... स्वतःचा मान राखून दुसऱ्याला मानाने वागवण. मग असं तर पुरुषांनी देखील वागलं पाहिजे. पुरुष साहसी... स्त्रीला प्रोटेक्ट करणारे.... का? स्त्रीने स्ट्रॉंग असणं का नाही? स्वतःला सांभाळण्यात तिने समर्थ असावं की. मुळात दोघांनी पूरक असावं.... हे जास्त योग्य. कृष्णा अजूनही विचार करत बसली असती; पण सिध्दार्थने तिला हाक मारली आणि ती पटकन उठून बाहेर पडली.'

"कुठे जातो आहोत आपण?" टांग्यात बसल्यावर सिध्दार्थने विचारलं.

"surprise आहे रे. थोडा धीर धर की." कृष्णा हसत म्हणाली; आणि तितक्यात टांगेवल्याने मागे वळत सिध्दार्थला विचारलं; साहेब, जागृत हनुमान मंदिराकडेच घेऊ न सर्वात अगोदर?''

त्याचा प्रश्न ऐकून कृष्णाने कपाळाला हात मारला आणि सिध्दार्थ खळखळून हसायला लागला....

मंदिरातून दर्शन घेऊन दोघेही बाहेर पडले आणि सिध्दार्थने कृष्णाला विचारलं; "तू मुद्दाम.... ''

''Not exactly.... पण या मंदिराबद्दल ऐकलं आणि मनात आलं काय हरकत आहे इथे यायला? इतकंच! कृष्णा म्हणाली.

त्यानंतर वेगवेगळे समुद्र किनारे आणि असंच कोकणाचं निसर्ग सौंदर्य बघत दोघे फिरले. एका घरगुती खाणावळीमध्ये मस्त मासे आणि सोलकढी असं जेवण देखील घेतलं. दोघे घराकडे परतले. रात्री झोपताना सिध्दार्थ कृष्णाला म्हणाला; "मला वाटतंय आपण परत जावं. हे असं इतकं obous करून काहीही होणार नाही आहे.''

कृष्णाला ते फारसं पटलं नाही. पण तिने वाद नाही घातला. जबरदस्तीने सिध्दार्थला इथे अडकवण्यात अर्थ नव्हता. मुळात हा प्लॅन बनवताना इथे चिरंजीवी भेटावेत असं तिच्या मानत नव्हतं... किंबहुना that was not her first priority... यानिमित्ताने दोघांनी एकत्र छान वेळ घालवावा; अशी तिची इच्छा होती. पण सध्या सिध्दार्थ अशा मूडमध्ये नाही आहे; हे तिच्या लक्षात आलं.

दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासात कृष्णा तशी अबोलच होती. पुणे मुंबई एक्सप्रेस वे ला लागल्यावर सिध्दार्थने सहज कृष्णाला विचारलं; "ए, कालपासून ती पेटी तुझ्याजवळच आहे. एकदा बघ तरी त्यावर काही नवीन...."''

एकदम ताठ बसत कृष्णाने सिध्दार्थकडे बघितलं आणि सिध्दार्थच्या काळजात चर्रर्र झालं.

''मी ती पेटी काल पाहाटे समुद्रावर सोडून आले सिध्दार्थ!" कानात गरम तेल पडावं तसे ते शब्द सिध्दार्थच्या कानात शिरले. एक्सप्रेस वे असल्याने तो गाडी थांबवू शकत नव्हता.... पण आता त्याचं मन सैरभैर झालं होतं. कृष्णाला ते लक्षात आलं होतं. 'सॉरी, चुकले, परत फिरुया का' यापैकी कोणताही शब्द ऐकायच्या मनःस्थितीत सिध्दार्थ नाही हे तिच्या पहिल्याच क्षणी लक्षात आलं होतं.

सिध्दार्थने नकळत गाडीचा वेग वाढवला होता.

"सावकाश सिध्दार्थ. चूक होऊन गेली आहे. आपण शांतपणे त्यावरचा उपाय शोधायला हवा आहे." सिध्दार्थने घाट सुरू झाल्यानंतर देखील जेव्हा स्पीड कमी केला नाही तेव्हा न राहून कृष्णा म्हणाली.

तिच्या त्या शांतपणे बोलण्याने सिध्दार्थ एकदम भडकला; नकळत त्याची नजर तिच्याकडे वळली आणि.....

कृष्णाने डोळे उघडले तर तिला वर पांढरशुभ्र छत दिसलं. एका क्षणात पूर्ण भानावर येत ती ताडकन उठून बसली. तिच्या डोक्यातून सण्णकन् कळ गेली आणि डोळ्यासमोर अंधारी आली. ती परत पलंगावर आडवी झाली. तिची आई शेजारीच होती. ती तिच्या जवळ येऊन म्हणाली; ''कृष्णा, बेटा, तुला जाग आली न? कशी आहेस आता?''

''ममा, सिध्दार्थ? कुठंय तो?''
''अजिबात चिंता करू नकोस बेटा. शेजारच्या रूममध्ये आहे तो. अगदी व्यवस्थित आहे. तूच बेशुद्ध होतीस. तो पूर्ण शुद्धीत आहे. In fact accident नंतर गाडीतून उतरून मागून येणाऱ्या गाडीला त्यानेच थांबवलं होतं. पण त्याच्या हाताला फ्रॅक्चर झालंय आणि पाठीला बराच मार लागला आहे. Air bags open झाल्यामुळे दोघेही वाचला आहात.'' आईचं बोलणं ऐकून कृष्णा थोडी शांत झाली.

''मला नक्की काय-काय झालंय? डोक्याला मार आहे. बहुतेक टाके पडले आहेत; हे कळलंय. पण बाकी?'' कृष्णाने विचारलं.

''बाकी काहीही झालेलं नाहीय तुला. थोड्या वेळात दोघांनाही डिस्चार्ज मिळेल. तुझे पपा formalities पूर्ण करण्यासाठीच तर गेलेत.'' कृष्णाची आई तिचा हात हातात घेत म्हणाली.

"म्हणजे मी सिध्दार्थच्या रूममध्ये जाऊ शकते. ok. मॉम प्लीज मला थोडी मदत कर. त्याला प्रत्यक्ष बघितल्या शिवाय माझं मन स्वस्थ नाही होणार." कृष्णा पलंगावरून उठत म्हणाली. आपण काहीही सांगितलं तरी ही ऐकणार नाही; याची कल्पना असल्याने कृष्णाच्या आईने तिचा हात धरला आणि तिला बाजूच्या खोलीच्या दिशेने नेलं. कृष्णा आत गेली आणि तिची आई परत कृष्णाला ठेवलं होतं तिथे आली आणि तिने कृष्णांचं सामान आवरायला सुरवात केली.

''I am really so sorry Sidharth. मला खरंच कळतंय ती पेटी किती महत्वाची होती. ही चूक...'' कृष्णाचं वाक्य मध्येच थांबवत सिध्दार्थ म्हणाला, ''इतका विचार नको करुस कृष्णा; कदाचित आपल्याला येणारा तो जगावेगळा अनुभव आपल्यापुरता इथेच संपत असेल. म्हणून कदाचित तुझ्या हातून ती पेटी तिथेच राहिली असेल. आता परत त्या विषयावर नको बोलूया.'' कृष्णाने सिध्दार्थचा फ्रॅक्चर नसलेला हात हातात घेतला तिचे डोळे भरून आले होते. इतक्यात दोघांचेही आई-वडील खोलीत आले. "कृष्णला discharge मिळाला आहे. पण सिध्दार्थला अजून एक दोन दिवस ओबसर्वशन खाली ठेवण्याचा विचार आहे डॉक्टरचा. इतका मोठा अपघात होऊनही त्याला म्हणावं तसं काहीही झालेलं नाही; हे थोडं unusual वाटतंय त्यांना. So they r keeping him under observation.'' खोलीत येताच सिध्दार्थच्या वडिलांनी माहिती दिली.

''मग मीच थांबते त्याच्या सोबत इथे.'' कृष्णाचा आवाज इतका ठाम होता की तिच्याशी कोणीच वाद घातला नाही.

रात्रीचं जेवण आलं दोघांनी जेवून घेतलं आणि औषध घेऊन सिध्दार्थने डोळे मिटले.

कृष्णा देखील फ्रेश होऊन झोपण्याच्या विचाराने बाथरूममध्ये गेली. तिने हलक्या हाताने तोंड धुवायला सुरवात केली. कोमट पाण्याने ती हळूहळू चेहेरा शेकत होती. तिच्या नकळत वाफ समोरच्या आरशावर जमा होत होती; आणि त्यावर काही शब्द उमटत होते. कृष्णाने मान वर केली आणि तिला समोरच्या आरशावर उमटलेला श्लोक दिसला.

अवशप्त अस्य जायते तद्नंतरम् अनुभूत
तस्मात् अहम् किमर्थम् तादृश मह्यम् मिलति

त्या श्लोकावरून नजर ढळू न देता हाताशी असलेला मोबाईल उचलून तिने झट्कन त्या श्लोकाचा फोटो काढला. जणूकाही तिची नजर ढळली असती तर तो श्लोक गायब झाला असता. फोटो नीट आला आहे याची खात्री झाल्यावर ती झट्कन खोलीत वळली आणि तिने हलक्या आवाजात सिध्दार्थला हाक मारली. त्याला झोप लागली असली तर काय करायचं या विचाराने ती अस्वस्थ झाली होती. पण तिने सिध्दार्थला हाक मारली आणि त्याने डोळे उघडले. कृष्णाने हातातला मोबाईलमधला फोटो त्याच्या समोर धरला. ते काय आहे लक्षात येऊन सिध्दार्थ एकदम उठून बसला आणि कृष्णाला कळायच्या आत पलंगावरुन उतरून बाथरूमच्या दिशेने धावला. सिध्दार्थ पाठोपाठ कृष्णा देखील धावली.

अजूनही समोर श्लोक दिसत होता. सिध्दार्थचे डोळे भरून आले होते आणि तो त्या श्लोकाकडे टक लावून बघत होता. कृष्णा त्याच्या शेजारी उभी राहिली आणि तिने आरशाच्या दिशेने बघितलं. समोरचा श्लोक बघून तिचे डोळे मोठे झाले. त्क्षणी तिने परत एकदा समोरच्या आरशाचा फोटो काढला होता.

सार्वत्रिक सत्य विश्वास अस्तु भक्तिरुपात् निर्मित:!
तत् विश्वास निर्माणार्थम् अस्मात् चिरंजीवी जायते!

सिध्दार्थने तिला परत फोटो काढताना बघितलं आणि विचारलं; ''पहिला नीट नाही का आला?''

''अहं! सिध्दार्थ हा दुसरा आहे.'' कृष्णाने शांतपणे म्हंटलं.

''खरंच?''

''हो!''

''फोटो नीट आलेत?''

''हो!''

''चल न बाहेर. अर्थ समजून घेऊया.'' सिध्दार्थ म्हणाला आणि दोघेही बाहेर आले.

सिध्दार्थ पलंगावर बसला. अचानक केलेल्या हालचालींमुळे फ्रॅक्चर झालेल्या हातातून एकदम कळ आली आणि सिध्दार्थने कळवळून हाताकडे बघितलं.

''कृष्णा..... पटकन.... अजून एक फोटो काढ.''

कृष्णा पुढे झाली आणि तिने फोटो काढला.

सगळ्याच घटना इतक्या वेगाने झाल्या होत्या की दोघेही एकदम स्थितप्रज्ञ होऊन बसले. असेच काही क्षण गेले आणि अगोदर कृष्णा भानावर आली. तिने शेजारीच असलेलं हॉस्पिटलचं नोटिंग पॅड हातात घेतलं आणि सिध्दार्थ समोर ठेवून पेन त्याच्या हातात दिलं. सिध्दार्थने देखील पेन घेतलं आणि तिच्याकडे बघितलं. कृष्णाने पहिला फोटो उघडला आणि श्लोक मोठ्याने वाचला. काही क्षण विचार केला आणि सिध्दार्थकडे बघून म्हणाली "मला जो अर्थ कळतो आहे तो मी सांगते; तू लिही. मग तुझ्या मनातला अर्थ लिहू आणि compair करूया.'' सिध्दार्थने 'बरं' म्हणून मान हलवली आणि डोळे बंद करून कृष्णा अर्थ संगायला लागली.

समजण्यास अवघड परंतु सत्य आले की जो अपराध मागे घेता येत नाही तो समजून होऊ देणे म्हणजे पाप आहे. मी शापित झाल्यानंतर उपरती झाली; असा मी काबरं कोण मला भेटावं.

सार्वभौम सत्य विश्वास आहे जो भक्तितून निर्माण होतो; त्या विश्वासाच्या प्रचारार्थ मी चिरंजीवी आहे.

दोन चिरंजीवांना भेटताच जीवन रहस्य नक्की कळेल.

कृष्णाने डोळे उघडले आणि सिध्दार्थकडे बघितलं. सिध्दार्थ काही वेळ कृष्णाने सांगितलेले अर्थ वाचत होता. तो म्हणाला; ''मला देखील हाच अर्थ लक्षात येतो आहे ग. पण मग पुढे काय?''

बाथरूमच्या दिशेने एक अंधारा कोपरा होता तिथून गंभीर आवाज आला; ''बेटा, जर श्लोक आणि त्यांचे लावलेले योग्य अर्थ समोर आहेत तर त्याअनुषंगाने पुढे होणारी घटना देखील ओघाने आलीच न.''

सिध्दार्थ आणि कृष्णाने एकाचवेळी आवाज येत होता त्या दिशेने बघितलं.

अत्यंत सुदृढ असा एक पुरुष पुढे आला. सर्वसाधारण लोकांपेक्षा खूप जास्त उंची होती त्याची. सावळी कांती अत्यंत तकतकीत होती. दाढी-मिशीने संपूर्ण चेहेरा झाकलेला होता आणि तरीही त्याच्याकडे फार वेळ टक लावणं शक्य नव्हतं. सिध्दार्थ आणि कृष्णा दोघांची नजर खाली झुकली. इतक्यात खोलीबाहेर काहीतरी गडबड झाल्याप्रमाणे आवाज आला आणि अत्यंत स्वाभाविकपणे कृष्णाने उठून दार उघडलं. अनपेक्षितपणे समोर कोणीसं उभं होतं; ते बघून ती दचकली आणि मागच्या दिशेने धडपडली. त्या व्यक्तीच्या मागून नर्सचा आवाज आला; ''मॅडम तुम्ही ठीक आहात न? अहो, हे गृहस्थ आजच इथे ऍडमिट झाले आहेत. अपघात केसच आहे. मोठी जखम आहे कपाळावर. खरं तर त्यांनी आराम केला पाहिजे. पण माझं लक्ष नसताना दोन वेळा खोली बाहेर आले आणि आत्ता तर नजर चुकवून थेट तुमच्या खोलीत...''

नर्सचा आवाज कावरा-बावरा होता. कारण सिध्दार्थ म्हणजे मोठं प्रस्थ आहे याची तिला कल्पना होती. सर्वात मोठी आणि आरामदायक खोली त्याच्या वडिलांनी मुद्दाम मागून घेतली होती. त्यामुळे सिध्दार्थ-कृष्णा डिस्टर्ब झाले असते तर तिची काही खैर नव्हती. कृष्णा काही बोलायच्या आत खोलीमध्ये असलेले गृहस्थ काहीसे मोठ्याने म्हणाले; ''मॅडम, अहो ओळखतो आम्ही त्यांना. येऊ दे त्यांना आत.'' आत देखील कोणी अनोळखी व्यक्ती आहे हे पाहून नर्स अजूनच वैतागली. पण बडी मंडळी म्हणजे रुल्स तोडणारच असा विचार करून खांदे उडवून निघून गेली. कृष्णा दारातून बाजूला झाली आणि..... अश्वत्थामा खोलीच्या आत आले.

''तू ठीक आहेस ना अश्वत्थामा?'' कृष्णाच्या मागून आवाज आला आणि अश्वत्थाम्याने खाली घातलेली मान हलवून होकार दिला आणि तो एका बाजूस जाऊन उभा राहिला. कृष्णाला अचानक एकामागोमाग एक घडणाऱ्या घटना सहन करणं अवघड वाटायला लागलं. ती झट्कन जाऊन सिध्दार्थच्या जवळ बसली.

हनुमंत मंद स्मित करून बोलायला लागले; ''मला कळतं आहे की सकाळपासून तुम्ही दोघेही ज्या अनुभवातून जात आहात त्यामुळे तुम्ही भांबावून गेला आहात. अत्यंत स्वाभाविक आहे ते. परंतु सुरू झालेली घटनांची शृंखला अशी मध्येच थांबवणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही इथे तुमच्या समोर उभे आहोत. सिध्दार्थ-कृष्णा येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही वेदव्यास ऋषींना भेटणार आहात. त्याच्या मुखातून बाहेर पडणारी शब्दरूपी मौत्यीके मनाच्या कुपीत जतन करून ठेवा. या भेटींचे प्रयोजन ते तुम्हाला सांगतीलच. पण त्याअगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे... बेटा, त्रेता युग.... त्यानंतरचं द्वापार... दोन्ही युगं मी अनुभवली आहेत. त्यानंतर अनेक जिवशक्ती उदयास आल्या आणि ह्रास पावल्या. मात्र तुम्ही आज ज्याला भारत म्हणता अशी ही मानवधर्म सर्वोच्च मानणारी भूमी खूप प्रगत पावली आहे. तुमच्या इतका जास्त उदय झालेली संस्कृती दुसरी कोणतीही नाही. परंतु दुर्दैवाने बाह्य शक्ती मिळवण्याच्या नादात तुम्ही मानव आंतरशक्तीचा ह्रास करता आहात. तरीही मानवीय आयुष्य गणनेनुसार तुमच्या नंतरची तिसरी पिढी निसर्गाच्या होणाऱ्या ह्रासाचा अनुभव प्रत्यक्ष घेईल. मग तरीही आम्ही तुम्हाला का भेटतो आहोत. कारण होणाऱ्या बदलांमुळे तुम्ही सारासार विचारबुद्धी देखील गहाण ठेवायला सुरवात केली आहे. याचा अत्यंत वाईट परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो आहे. मूलतः तुम्ही मानव आयुष्यातील एक अत्यंत महत्वाची भावनिक गरज विसरता आहात. विश्वास!!! तुम्ही जितके शास्त्रीय दृष्टिकोनातून मोठे होत जाल तितके तुम्ही विश्वास या जीवनावश्यक सत्यापासून दूर जाणार आहात. त्यानंतर ह्रासाला सुरवात होईल आणि एकदा उताराला लागलेलं चक्र थांबवता येत नाही. विश्वास जर अढळ ठेवायचा असेल तर मनातील सत्यतेवर पूर्ण विश्वास ठेवा. विश्वास हा केवळ निस्सीम भक्तिमधून येतो; हे त्रिकालाबाधित सत्य देखील विसरू नका. माझ्या येण्याचं प्रथम प्रयोजन अश्वत्थाम्याला तुमच्या पर्यंत पोहोचवणं होतं; आणि आजच्या काळामध्ये ज्याची अवहेलना सतत होते असे भक्तीरूप तन-मनात साठवून आपल्या उद्दिष्टाशी तादात्म्य ठेवा मानवांनो!'' हनुमंत बोलायचे थांबले आणि त्यांच्या आवाजाने भारून गेलेली खोली तशीच उबदार ठेवून ते निघून गेले....

सिध्दार्थ आणि कृष्णाची नजर समोर एका कोपऱ्यात उभ्या अश्वत्थाम्याकडे गेली. काहीसा अंधारा असणारा कोपरा... झुकलेली नजर... काही क्षण तर असेच गेले.

''तुम्ही बसा न."न राहून कृष्णा म्हणाली.

"एक शाप म्हणून चिरंजीवित्व मिळालेला मी... ज्या कारणासाठी श्रीकृष्णाने मला हा शाप दिला ते कारण उराशी घेऊन एक एक दिवस जगतो आहे.''

''महात्मन, जी पुराण कथा आम्हाला माहीत आहे त्याप्रमाणे; आपल्या पिताश्रींचा कपटाने केलेला वध आणि आपला प्रिय मित्र दुर्योधन याचा झालेला मृत्यू यामुळे विवेकबुद्धिपासून दूर जात आपण ब्रम्हास्त्र पांडव पुत्रांवर सोडलंत. त्यांचा संहार आपण केलात म्हणून आपणास चिरंजीवित्वाचा शाप मिळाला. हे खरे आहे का?'' सिध्दार्थने अत्यंत आदरपूर्वक अश्वत्थाम्याला प्रश्न केला.

''हे अर्ध सत्य आहे वत्सा; आणि ते खोट्यापेक्षा देखील जास्त धोकादायक असतं. मी सोडलेलं ब्रम्हास्त्र परत घेण्याचे ज्ञान माझ्याकडे नव्हते. रागाच्या भरात त्याच्या शक्तीचा संपूर्ण विचार मी केला नाही आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्यावेळी उत्तरेच्या गर्भावर तो वार होणार होता त्यावेळी मी तिथून पळ काढला. माझ्या या कृत्यामुळेच मला चिरंजीवित्वाचा शाप मिळाला. मूलतः सद्सद विवेकबुद्धी दूर करून ज्यांचा मृत्यू झाला होता आणि जे स्वतःच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत होते; ते केवळ माझे हृदया जवळचे होते म्हणून त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मी जे कृत्य केले ते अत्यंत निंदनीय होते. त्यातूनही पांडव पुत्रांवर ब्रम्हास्त्र सोडताना त्याच्या शक्तीचा अंदाज मला नव्हता... ही दुसरी गोष्ट आणि केलेल्या कृतीचे परिणाम स्वीकारण्याची मनाची तयारी नव्हती त्यामुळे मी पळून गेलो. यासर्वाचा परिपाक मला शाप मिळाला. जी चूक सुधारता येत नाही किंवा माफीच्या लायकीची नसते ती चूक म्हणजे महान पाप आहे. याची उपरती मला शाप मिळाल्यानंतर झाली. आज मी श्रीहनुमंतांसोबत तुम्हाला भेटायला आलो आहे; त्याचं कारण म्हणजे कदाचित तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. मात्र आपली सद्सद्विवेक कायम जागृत ठेवा आणि भक्तीरूप विश्वासाने आयुष्य क्रमित करा हे सांगायला. मनात इच्छा असूनही मी माझ्या चिरंजीवित्व नाकारू शकत नाही हे दुखरं टोचर सत्य मी आयुष्यभर वागवतो आहे. तुम्ही अशा कोणत्याही पापाचे भागीदार होऊ नका... "

अश्वत्थअमा बोलण्याचा थांबला. सिध्दार्थ आणि कृष्णा त्याचं बोलणं मन लावून ऐकत होते. ते बोलायचे थांबले आणि सिध्दार्थ आणि कृष्णाचे डोळे आपोआपच मिटले गेले.

सकाळी जाग आली तेव्हा कृष्णा सिध्दार्थच्या कुशीत झोपली होती आणि खोलीमध्ये आशावादी स्वच्छ प्रकाश पसरला होता.

क्रमशः

Friday, October 15, 2021

चिरंजीवी (भाग 5)

 भाग 5


सिध्दार्थला बळी राजाच्या बोलण्याचा मतितार्थ कळला आणि हातातली पेटी सावरत एकदाही मागे वळून न पाहाता तो पुढे निघाला.

ओढ्याच्या बाजूने चालताना नकळत सिध्दार्थ सतत पेटीवरील श्लोकाकडे बघत होता. 'कदाचित श्लोक बदलेल आणि पुढील चिरंजीवी आपल्याला या काही मिनिटांच्या प्रवासात भेटेल'; असं त्याला सतत वाटत होतं. पण तसं काही न होता सिध्दार्थ मचाणपर्यंत पोहोचला. मधली बॅरिकेट्स पार करत त्याने परत एकदा मचाणच्या आवारात प्रवेश केला आणि रेस्टॉरंटच्या दिशेने चालायला लागला. समोरूनच हॉटेलचा मॅनेजर येत होता; तो स्वतः पुढे आला आणि त्याने सिध्दार्थला शेक हॅन्ड केलं आणि म्हणाला; "नमस्कार सर, आपली गाडी तयार आहे आणि इथे पार्किंगमध्ये येऊन उभी आहे. गाडीच्या सर्विसिंगचे जे काही पैसे झाले आहेत ते मचाणकडून भरले गेलेले आहेत. आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत सर."

सिध्दार्थने त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि म्हणाला; "अरे तुमच्या चुकीने गाडी बंद पडली नव्हती. त्यामुळे तुम्ही त्यासाठी तसदी घेणं योग्य नाही."

पण सिध्दार्थला पुढे बोलू न देता मॅनेजर म्हणाला; "सर, प्लीज! आपल्यासारखे आमचे मोठे कस्टमर इथून जाताना जर काही प्रोब्लेममध्ये आले तर आमचं कर्तव्य बनतं मदत करणं. सर, आपण परत मागे येऊन आम्हाला सांगितलं असतं तर आपल्याला जो त्रास झाला तो झाला नसता. आत्तासुद्धा आपण या आड रस्त्याने चालत आलात; त्याबद्दल देखील आम्ही दिलगीर आहोत."

सिध्दार्थ हसला आणि म्हणाला; "अहो मॅनेजर साहेब; इतक्या formalities ठेवू नका. मला काहीही त्रास झालेला नाही. बस् आत्ता मात्र मस्त भूक लागली आहे. जेवण मिळणार असेल तर ते द्या; म्हणजे मी निघायला मोकळा. या गाडीमुळे माझ्या कामाचा बराच वेळ वाया गेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर मला मुंबईला पोहोचणे आवश्यक आहे."

सिध्दार्थचं बोलणं ऐकून मॅनेजरचा जीव भांड्यात पडला. सिध्दार्थने जर काही तक्रार केली तर त्याची नोकरी थेट गेलीच असती याची त्याला कल्पना होती. तो स्वतः सिध्दार्थला रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला आणि जेवणाची ऑर्डर दिली. सिध्दार्थ स्थिरस्थावर झाला आहे याची खात्री करून तो मागे वळणार होता इतक्यात त्याला काहीतरी आठवलं आणि परत सिध्दार्थकडे येऊन तो म्हणाला; "सर, आपण एकदा आपल्या घरी आणि मॅडम कृष्णा यांना फोन केलात तर बरं होईल. दोन्ही ठिकाणाहून मला अनेक कॉल्स आले आहेत."

मॅनेजरचं बोलणं ऐकून सिध्दार्थला एकदम लक्षात आलं की त्याने सकाळपासून घरी किंवा कृष्णाला कॉन्टॅक्ट करण्याचा एकदाही प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे मॅनेजरला 'मी बोलतो घरी;' असं म्हणून त्याने मोबाईल हातात घेतला. मात्र हॉटेलच्या आत रेंज नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. इतक्यात हॉटेल स्टाफपैकी एकाने लँडलाईन फोन आणून दिला आणि सिद्धर्थने अगोदर घरी फोन लावला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे गोपाळने फोन उचलला. सिध्दार्थने आईसाठी निरोप ठेवला की तो ठीक आहे थोड्याच वेळात घरी येतो आहे. त्यानंतर त्याने कृष्णाला फोन लावला.

"प्लीज न रागावता दोन मिनिटं माझं एक. विषय खूप गहन आहे कृष्णा. तुझ्याशी बोलणं आवश्यक आहे. मी आत्ता मचाणमध्ये जेवतो आहे. इथून बाहेर पडलो की रेंजमध्ये येताच तुला फोन करतो. किमान प्रवासात आपण बोलू. कारण घरी पोहोचून फ्रेश होऊन मला ऑफिसमध्ये जाणं भाग आहे. गेल्या दोन दिवसात मी एका वेगळ्या जगात जगतो आहे; मात्र त्यामुळे मी माझ्या जवाबदरीपासून लांब जातो आहे; हे मला जाणवलं आहे. त्यात आज बाबा माझी वाट बघणार होते; ऑफिस hours नंतर. त्यांना भेटून कामं उरकायची आहेत. मी जे सांगेन त्याचा तू विचार करून ठेव आणि मग रात्री आपण परत बोलू; फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून."

***

सिध्दार्थ गाडी घराच्या खाली पार्क करत असताना फायनली त्याने कृष्णाला बाय म्हंटलं. "रात्री प्रत्यक्ष भेटूच सिध्दार्थ. बाय" असं म्हणून कृष्णाने फोन ठेवला; आणि लिफ्टने वर जाताना सिध्दार्थच्या मनात ऑफिसमधले विचार यायला लागले.

***

'हे अचानक येणारे अनुभव सिध्दार्थच्याच आयुष्यात का असावेत?' कृष्णा विचार करत होती. तिला सिध्दार्थचा स्वभाव माहीत होता. तो अत्यंत भावुक असूनही प्रॅक्टिकल निर्णय घेताना स्थिर मनाचा होता. पुरुषी ईगो नव्हता त्याला. श्रीमंत घरातला.... अत्यंत लाडात वाढलेला होता तरीही डोक्यात हवा गेलेला नव्हता. अत्यंत एक्सप्रेसिव्ह सिध्दार्थ प्रेमळ, समजूतदार होता. अनेकदा तर कृष्णाने त्याला म्हंटलं होतं की तू सतत receiving end ला का राहातोस सिध्दार्थ? त्यावरचं त्याचं उत्तर ऐकून ती एकदमच शांत झाली होती.

तो म्हणाला होता; "Sweetheart, receiving end is a huge turm. But if you really want to say so; let me tell you something... when we are at receving end that means opposite person is either angree on us or is frustrated. Not on us or because of us... but still there is not a conversation; but explosion of feelings. अशा प्रत्येक वेळी मी स्वतःला विचारतो... समोरची व्यक्ती जो राग व्यक्त करते आहे तो माझ्यामुळे आहे का? माझी यात काही चूक आहे का? जर उत्तर 'नाही' आलं तर मग मी केवळ कान उघडे ठेवतो; मन नाही. पण जर माझी चूक असेल तर ऐकून घेऊन परत असं होणार नाही असा प्रयत्न करण्याचं वचन देतो; स्वतःला आणि समोरच्या व्यक्तीला. यामुळे relationship hurt होत नाही; आणि solution मिळतं. अर्थात मी इतका समजूतदार कायम नसतोच. राग येणं, चुका होणं आणि कधी कधी या चुका कोणालाही कळू नयेत असं वाटणं; कधी त्या लपवण्याचा प्रयत्न करणं हे सगळं मी देखी करतोच. पण in larger aspect emotional expresion some times is relising negativity from mind and heart; असं मला वाटतं.... म्हणून as you said... I am at receiving end at times.

तो असं बोलायला लागला की त्याचं बोलणं ऐकत राहावं असं वाटतं. त्याचं हे असं समजूतदार असणं कदाचित त्याला हे अनुभव देतं आहे का?' कृष्णा स्वतःचाच तंद्रीत होती.

'बिभीषण, कृपाचार्य आणि बळी राजा.... तीन चिरंजीव भेटले सिध्दार्थला. म्हणजे अजून चार बाकी आहेत. सिध्दार्थचं आयुष्य वेगळं वळण घेणार आहे; असं तर नाही न? पण जे तिघे भेटले त्यांनी त्यांच्या मनातील व्यथा सांगताना; किंवा आजच्या काळातील अत्यंत चुकीच्या परिस्थितीबद्दलचं त्यांचं मत सांगताना कुठेही सर्वसंगपरित्याग करून साधुत्व स्वीकारून निघून जाऊन तपश्चर्या करावी असं म्हंटलेलं नाही. मात्र कालौघात सामाजिक मानसिकतेत झालेले बदल आणि त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा irrilevence emphasis केला आहे. पण असं कसं होऊ शकतं?' कृष्णाच्या मनातल्या विचारांचं आवर्तन थांबत नव्हतं. सिध्दार्थला भेटून त्याच्याशी बोलल्याशिवाय मन स्वस्थ होणार नाही हे तिच्या लक्षात आलं आणि हातातली कामं झटपट उरकून साधारण नऊच्या सुमारास ती सिध्दार्थच्या घरी पोहोचली.

"बरं झालं तू आलीस ते." तिला बघताच सिध्दार्थची आई वैदेही म्हणाली आणि तिचा हात धरून तिला सोफ्याच्या दिशेने घेऊन गेली.

"तो नुकताच आला आहे; फ्रेश होतो आहे. तुला घेऊन बाहेर जाण्याच्या विचार होता त्याचा. पण मीच नको म्हंटलं. कृष्णा, तो एका जगावेगळ्या अनुभवातून जातो आहे; याची त्याने मला कल्पना दिली आहे. दुपारी घरी आला आणि ऑफिसमध्ये जायला निघाला तेवढ्या वेळात मला घरी बोलावून घेऊन बोलला आहे तो. म्हणूनच मी त्याला म्हंटलं की कुठेही बाहेर जाऊ नकोस. त्याचं मन स्थिर नाही सध्या... अशावेळी उगाच ड्राईव्ह करणं योग्य नाही. तुम्ही दोघे गच्चीवर जाऊन बसा... मी जेवण तिथेच पाठवते. थोडं मोकळं वाटेल आणि नीट बोलता देखील येईल. पण माझं एक suggession आहे... जमलं तर दोघे कुठेतरी बाहेर जा काही दिवस. मी त्याला देखील हे म्हंटलं आहे. हे बघ... जर खरंच सिध्दार्थ chosen one असेल; for whatever reason... best known to those unknown.... तर सिध्दार्थ कुठेही गेला तरी हे जे वर्तुळ सुरू झालं आहे ते पूर्ण होणारच. मग तसंच असेल तर किमान रोजच्या धकाधकीच्या आयुष्यापासून लांब असलं तर विचार करायला आणि घडणाऱ्या गोष्टींचं analysis करायला नीट वेळ तर मिळेल. काय वाटतं तुला?" वैदेही बोलायची थांबली. कृष्णाला त्यांचं बोलणं पटलं. बोलते त्याच्याशी. तिने स्मित करत उत्तर दिलं. तेवढ्यात सिध्दार्थ बाहेर आला आणि दोघांनी एकमेकांकडे हसून बघितलं.

"चल, जाऊया न गच्चीवर." तो म्हणाला; आणि तिघेही मोकळेपणी हसले.

***

"कृष्णा; why me? या प्रश्नाचा विचार करणं मी सोडून दिलं आहे. गच्चीत येताच सिध्दार्थ म्हणाला. सध्या तरी येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला मोकळ्या मनाने सामोरं जायचं असं ठरवलं आहे. आई म्हणाली ते पटलं मला. हे जे अनुभव येत आहेत त्यामध्ये मला चॉईस नाही आहे. मग त्रास करून न घेता..... as you always say; I will be at receiving end; till I get to know why me?" गच्चीत येताच सिध्दार्थ म्हणाला.

त्याच्याकडे हसून बघत कृष्णा म्हणाली; "You are right."

"अग, तुला पटलं आहे तर इतका गहन विचार करत असल्यासारखा चेहेरा का केला आहेस?" सिध्दार्थने हसत हसत तिला विचारलं. त्यावर मिश्कीलपणे हसत कृष्णा म्हणाली; "माझ्या मॉमला काय कारण देऊ याचा विचार करते आहे. तसं मला कोकण बघायचं आहे; आणि आपण दोघे जायचा विचार करतो अहोत असं मी मध्ये एकदा सहज आणि उगीच तिला म्हंटलं होतं. तेच कारण सांगून खरंच आपण कोकणात जायचं का? तसंही अशा अनेक कथा ऐकल्या आहेत की लोकांना परशुराम कोकणात भेटतात." असं म्हणून कृष्णा खळखळून हसली. तिच्या हसण्याला साथ देत सिध्दार्थ देखील मनापासून हसला.

"मस्त कल्पना आहे कृष्णा. आई कितीही म्हणाली तरी मला विमानाने कुठेही प्रवास करायचा नाही आहे. स्वतः ड्राईव्ह करून जाण्यात एक वेगळी मजा आहे. तू तुझ्या आईशी बोलून बुकिंग करशील का? मला बाबांना थोडं पटवायला लागेल. हे गेले दोन दिवस मी ऑफिसमध्ये अजिबात लक्ष घातलेलं नाही. त्यांना ते पटत नाहीय; पण अजून तरी ते रागावलेले नाहीत. आज संध्याकाळी आमची मोठी आणि detailed मीटिंग झाली आहे. मी मुद्दाम स्वतःकडे मोठं काम घेतलं नव्हतं. पण तरीही अचानक काही दिवसांसाठी मी ऑफिसमध्ये नाही हे त्यांना पटणार नाही. तशी त्यांना मी असण्याची सवय झाली आहे हे एक कारण आणि अलीकडे त्यांना झेपत देखील नाहीय एकट्याने. पण तुझं नाव घेतलं तर ते नाही म्हणायचे नाहीत. परवा निघू आपण... सकाळी सहा चालेल न तुला?" सिध्दार्थने जवळ जवळ सगळं ठरवूनच टाकलं हे लक्षात येऊन कृष्णा हसली. प्रॅक्टिकल निर्णय घेताना स्थिर मनाचा आहे तो. तिच्या मनात दुपारचा विचार परत एकदा येऊन गेला.

तेवढ्यात जेवण आलं आणि मग मात्र अगदीच वेगळ्या विषयांवर बोलत दोघेही जेवले.

***

सिध्दार्थने छान 80s ची गाणी लावली होती. दोघेही गुणगुणत गाणी एन्जॉय करत होते. सगळी बुकिंग्ज कृष्णाने केली असल्याने ती सिध्दार्थला रस्ता सांगत होती. एका लहानशा गावातला होम स्टे तिने राहाण्यासाठी निवडला होता. साधारण एकच्या सुमाराला दोघे पोहोचले. सिध्दार्थ तर एकदम खुश झाला तो होम स्टे बघून. खरंच खूप सुंदर कल्पना होती. संपूर्ण मातीचं घर. खाली एक हॉल आणि स्वयंपाकघर आणि लाकडी जिन्याने वर गेलं की मोठी बेडरूम. लाकडी पलंग. सौर ऊर्जेचे दिवे आणि झरोके... कंदील.... जवळच होम स्टेचे मालक राहात होते. त्यांच्याकडे रोजचा ठरलेला मेन्यू असायचा. त्याव्यतिरिक्त काही हवं असेल तर सांगायचं होतं. कृष्णाने आजूबाजूला बघण्यासारख्या ज्या जागा होत्या त्यांची देखील लिस्ट बनवून ठेवली होती. जेवून थोडा आराम करून दोघेही संध्याकाळी जवळच्याच समुद्रकिनाऱ्यावर गेले होते.

दोघे हातात हात घालून ओल्या वाळूतून चालत होते... आपापल्या विचारांमध्ये हरवून.

"काय वाटतं तुला? आता कोण भेटेल?" सिध्दार्थने अचानक कृष्णाला प्रश्न केला... आणि त्याचवेळी कृष्णाने त्याला विचारलं; "सिध्दार्थ, असं म्हणतात की परशुरामांनी कोकणाची निर्मिती केली. म्हणजे नक्की काय रे? तुला माहीत आहे का?"

"मला माहीत आहे!" मागून एक आवाज आला आणि दोघांनी मागे वळून बघितलं.

एक अत्यंत हँडसम व्यक्ती मागे उभी होती. कुर्ता पायजमा घातलेली. चेहरा काहीसा राकट, कातीव दाढी, हसरे हृदयाचा ठाव घेणारे डोळे....

"कोण तुम्ही दोघे? नवीन लग्न झालेलं जोडपं दिसता! आमचं कोकण बघायला आलात वाटतं. खरी आवड दिसते आहे तुम्हाला निसर्गाची. नाहीतर या आडगावी सहसा असं कोणी फिरायला येत नाही." असं म्हणून ती व्यक्ती स्वतःशीच खो-खो हसली. कृष्णाला थोडा राग आला. पण ती काही बोलली नाही. सिध्दार्थ देखील शांत होता.

दोघे काही बोलत नाहीत हे पाहून ती व्यक्ती थोडी गंभीर झाली आणि म्हणाली; "तुम्हाला डिस्टर्ब करतो आहे का मी? या बाजूच्या किनाऱ्यावर कधीतरी येत असतो; तसा शांत आहे आणि फार कोणी नसतं म्हणून. सूर्यास्त बघत होतो आणि तुम्ही दोघे दिसलात; आश्चर्य वाटलं म्हणून तुमच्या दिशेने आलो... नेमकं या मुलीचं शेवटचं वाक्य कानावर पडलं आणि बोलण्याचा मोह आवरू शकलो नाही. पण ठीक आहे! निघतो मी. सॉरी."

त्यांचं बोलणं ऐकून कृष्णाचं मन एकदम बदललं आणि ती म्हणाली; "असं काही नाही. आम्ही दोघे एकटेच होतो इथे आलो तेव्हा; त्यामुळे अचानक तुमचा आवाज ऐकून गोंधळलो. पण आम्हाला दोघांना समजून घ्यायला आवडेल; परशुरामांनी का निर्माण केली ही भूमी."

"वा! तुमच्या वयातल्या मुलांना देखील जुन्या काळातल्या कथा आवडतात हे ऐकून बरं वाटलं. चला वाळून बसूया का? उभं राहून किती वेळ गप्पा मारणार आपण?" असं म्हणून ती व्यक्ती कोरड्या वाळूच्या दिशेने चालू लागली. सिध्दार्थ आणि कृष्णा देखीलं त्यांच्या मागे चालत जाऊन काही अंतर राखत कोरड्या वाळूत बसले.

"तर..... परशुरामांनी कोकण भूमी का निर्माण केली? परशुरामांनी एकवीस वेळा संपूर्ण पृथ्वी क्षत्रियहीन केल्यानंतर त्यांना काही काळ एकांतवास हवा होता. तपश्चर्या करून मन:शांती मिळवायची होती. त्यासाठी ते एखादं शांत ठिकाण शोधत शोधत या भागात आले. विपुल निसर्गाने नटलेला हा संपूर्ण समुद्र किनारा, या नारळी-पोफळीच्या बागा, रानमेव्याने भरपूर झाडं आणि निर्मनुष्य परिसर बघून ते समाधान पावले आणि इथेच काही काळ राहून तपश्चर्या करावी असं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे रोज सकाळी उठून प्रातर्विधी उरकून ते एका गुहेमध्ये तप करण्यासाठी बसत असत. असाच बराच कालखंड गेला... किती दिवस, वर्षं, युगं ते कोणालाही सांगता येणार नाही... पण कधीतरी अचानक त्यांच्या या दिनक्रमात एक बाधा आली. तप करण्यासाठी गुहेच्या दिशेने जाणाऱ्या परशुरामांच्या समोर काही मानव येऊन उभे राहिले आणि म्हणाले: 'देवन, आम्ही या परिसरामध्ये नवीन आहोत. आमच्या सोबत स्त्रिया आणि लहान मुले देखी आहेत. हा परिसर निसर्गाने भरपूर आहे; पण तरीही आम्ही भुकेले आणि तहानलेले आहोत. राहण्यासाठी कुठेही जागा नाही. कारण समुद्र कधी रुद्रावतार धारण करेल आणि आम्हाला ओढून नेईल सांगता येत नाही. आम्ही कायम भितीच्या छायेत वावरतो आहोत. आपणास आम्ही रोज एकच दिनक्रम पाळताना बघतो आहोत. त्यामुळे आमच्या मनात एक आशा जागृत झाली आहे... आम्ही जर इथे राहायचा विचार केला तर आपण आम्हाला मदत कराल असा आम्हाला विश्वास वाटतो आहे.'

त्या लोकांचं गाऱ्हाणं ऐकून परशुरामांचं हळवं मन पांघळलं. 'उद्या सकाळी तुम्ही या... तुमचं इप्सित पूर्ण होईल'... ते म्हणाले. ते मानव नमस्कार करून तिथून निघून गेले. परशुरामांनी रोजच्याप्रमाणे त्यांची साधना पूर्ण केली आणि सूर्यास्त समयी सागरासमीप येऊन उभे राहिले. त्यांच्या हातात त्याचं लाडकं आयुध परशु होतं. डाव्या हातात ते तोलत त्यांनी सागराकडे एक दृष्टिक्षेप टाकला. परशुरामांनी त्याचं परशु उचललं आणि त्यांच्या समोर साक्षात समुद्रदेवता येऊन उभ्या राहिल्या.

'आमचा काहीही दोष नसताना आपण आमचा संहार का करता आहात देवन?' त्यांनी हात जोडत परशुरामांना प्रश्न केला.

'तुमचा संहार करण्याचा माझा काहीच मानस नाही. परंतु इथे काही मानव आहेत; ते गुण्यागोविंदाने जवळील भूमीवर राहू इच्छितात. परंतु सागराला येणारी भरती आणि अंतरी उठणारी वादळं यामुळे त्यांचं जीवन सतत नष्ट पावतं आहे. त्यामुळे ते माझ्याकडे मदतीसाठी आले.'

हे ऐकताच समुद्रदेवता म्हणाले; 'महात्मन आपण परशूने वार करण्यापेक्षा आपला परशु सागरामध्ये फेकावात. तो जिथे जाऊन थांबेल तिथवर आम्ही मागे हटू. त्यानंतर मानवाने सागरकिनारी वस्ती करावी आणि आम्ही आमच्या मर्यादेत सुखी राहू.'

परशुरामांनी ते मान्य केलं आणि परशु सागरामध्ये लांबवर फेकला. तो जिथे जाऊन थांबला तिथवर सागर मागे हटला... अशाप्रकारे कोकणाची निर्मिती करून परशुराम मागे फिरले आणि विध्य पर्वतावर जाऊन तपश्चर्येत मग्न झाले."

ती व्यक्ती बोलायची थांबली. सिध्दार्थ आणि कृष्णा मंत्रमुग्ध होऊन त्यांच्या गंभीर आवाजातली परशुरामांची कहाणी ऐकत होते. दोघेही एकदम भानावर आले.

"तर अशी आहे ही कहाणी. मला माहीत आहे तुमच्या सारख्या तरुणांना असल्या कहाण्यांमध्ये विश्वास नसेल. पण माझं असं एक लॉजिक सांगतो.... कदाचित ते लोक परशुरामांना भेटायला गेले आणि त्यांना संकडं घातलं; त्यावेळी सुर्यदशा आणि चांद्रदशा अशी असेल की ज्यामुळे समुद्राला ओहोटी लागून तो खूप आत खेचला जाणार असेल आणि मग त्याची सीमा त्याअनुषंगाने बदलून काही योजने मागे हटणार असेल. ज्याचा अभ्यास परशुरामांनी केला असेल. आपल्या अभ्यासानुसार सागर मागे हटतो आहे का हे बघण्यासाठी स्वतः परशुराम उभे राहिले असतील. त्यावेळी ओहोटीच्या वेळी सागरातील जीवांचे हाल झाले असतील.... पशु-पक्षी-जलचर हे देखील एका वेगळ्या दशेमध्ये संवाद साधतात; ती दशा परशुरामांना अवगत असेल आणि ओहोटीच्या वेळी त्या जीवांना परशुरामांनी मदत केली असेल. हे तिथे असलेल्या लोकांनी बघितलं असेल. पुढे हेच सत्य आपभ्रंशीत होऊन परशुरामांनी सागराला मागे जायला लावून कोकण प्रदेश निर्माण केला अशी कथा प्रचलित झाली असेल..... काय बरं म्हणतात या प्रकाराला.... हा! greapwine! नाही नाही.... कानगोष्टीचा खेळ. पहिली व्यक्ती कानात जे सांगते आणि शेवटची व्यक्ती जे मोठ्याने बोलते त्यात जमीन अस्मानाचा फरक असतो. मला तर वाटतं या जुन्या गोष्टींचं काहीसं असंच असावं. बरं! आता तुम्हाला निघायला हवं. गप्पांमध्ये बराच उशीर झाला आहे."

त्यांनी असं म्हणताच सिध्दार्थचं लक्ष मोबाईलकडे गेलं. तसा फार उशीर नव्हता. पण इथे रस्त्यावरचे विजेचे दिवे नसल्याने खूपच अंधार वाटायला लागला होता. अनोळखी प्रदेश आणि सोबत कृष्णा असल्याने सिध्दार्थ कपडे झटकत उठला. त्याला उठलेलं बघून कृष्णा देखील उठली.

"तुम्ही सांगितलेली कथा आणि त्यावरचा तुमचा अंदाज... दोन्ही आवडलं. धन्यवाद सर. पण खरंच आता आम्ही निघालेलं बरं. उशीर फार नाही झालेला पण हा भाग ओळखीचा नाही आणि आम्ही दोघेही आज दिवसभराचा प्रवास करून आलो आहोत; त्यामुळे वेळेत झोपू. नमस्कार!" असं म्हणून सिध्दार्थने हात जोडले. ते गृहस्थ अजूनही तिथेच बसून होते. त्यांनी फक्त हात जोडले.

सिध्दार्थ आणि कृष्णा राहात्या जागी आले. दोघे जेवायला बसले आणि कृष्णा सिध्दार्थला म्हणाली; "कोण असतील कोण जाणे; पण छान माहिती दिली त्यांनी. आपल्याला माहीतच नाहीत काही गोष्टी हे खरं. बरं! ते राहू दे. सिध्दार्थ उद्या आपण कुठे जायचं आहे ते मी ठरवून ठेवलं आहे. तुझी हरकत नसेल तर थोडं आरामात निघू आणि उद्या गाडी नाही ह काढायची; इथला लोकल टांगा बुक केला आहे मी. त्यातूनच फिरुया उद्या." सिध्दार्थने हसून 'बरं' म्हणून मान डोलावली. जेवण आतपलं आणि दोघेही दमले असल्याने लगेच झोपायला गेले.

सिध्दार्थला लगेच झोप लागली. दिवसभराची दगदग आणि नकळत त्याच्या डोक्यात चाललेले विचार! खूप दमला होता तो. पण कृष्णाला काही केल्या झोप येत नव्हती. ती उठून जवळच्या खिडकीमध्ये जाऊन उभी राहिली... इतकं सुंदर चांदणं तिने कधीच बघितलं नव्हतं. संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला होता चंदेरी उजेडात. मंद वाहणारा वारा आणि झाडांमधून येणारी शीळ... अगदी प्रसन्न वातावरण होतं. कृष्णाला उर्मी दाटून आली की सिध्दार्थला उठवावं आणि थोडं फिरून यावं. पण मग तो दमला असेल या विचाराने तिने त्याला हाक नाही मारली. आपल्या हालचालीमुळे तो जागा होऊ नये म्हणून कृष्णा हळूच खाली उतरून आली. त्यांचं सामान समोरच एका सोफ्यावर होतं. तिथे बहुतेक एखादा दिवा विझवायचा राहून गेला होता बहुतेक. कृष्णा त्यादिशेने गेली आणि समोरचं दृष्य बघून एकदम स्थब्द झाली...... पेटीमधून हिरव्या रंगाचा प्रकाश परावर्तित होत होता.

तसंच मागे फिरावं आणि सिध्दार्थला उठवावं अशी उर्मी दाटून आली कृष्णाच्या मनात. पण समोरच्या दृष्यतली उत्सुकता जास्त मोठी ठरली आणि तिने पुढे होऊन लाकडी पेटी हातात घेतली.

कृष्णाने श्लोक वाचला:

नि:क्षत्रिय अवनि भवेत् परशुराम कारणे!
मंजुषा भवन्तम् विद्यति करणेन परशुराम भवत् मेलनं करोति!

तिच्या मनात श्लोक वाचतानाच अर्थ उमटतं होता:

नि:क्षत्रिय पृथ्वी झाली परशुरामांच्यामुळे! मंजुषा तुला मिळाली कारण (तेच) परशुराम तुला भेटणार!!!

कृष्णाने परत एकदा अर्थ मनात घोळवला. मंजुषा तुला मिळाली..... 'तुला!' 'ती मी आहे?'

कृष्णाच्या मनात परत एकदा सिध्दार्थला उठवावं असं आलं... पण मग कोणत्याशा अनामिक उर्मिने तिने ती पेटी हातात घेतली... मोबाईल सोबत असल्याची खात्री केली आणि दार उघडून कृष्णा बाहेर पडली.

समुद्राच्या गार वाऱ्याने तिच्या अंगावर शहारा आला... 'आपण एकटीने इथे येऊन चूक तर नाही ना केली? असं तर नाही की तो निरोप सिध्दार्थसाठी होता आणि आपण आगाऊपणा करून......'

"नाही मुली! स्वतःला दुय्यम स्थान देऊ नकोस. तू सिध्दार्थहून कोणत्याही बाबतीत कमी नाहीस... फक्त तूच का... समस्त स्त्रीजात पुरुषांच्या बरोबरीने सर्वत्र असते. तरीही समाजमन अजूनही स्त्रीला दुर्बल मानतं हे आपलं दुर्दैव आहे."

कृष्णाने मागे वळून बघितलं... पण त्यागोदरच तिने आवाज ओळखला होता.

"सर, तुम्ही!?"

"तुझ्या या तुम्ही मध्ये दोन अर्थ दडलेले आहेत. त्या दोन्हीचं उत्तर हो आहे पोरी. मी! तुम्हाला संध्याकाळी भेटलेला.... मी! परशुराम!!!"

"पण....."

"या रुपात!? तुमच्या बोलीभाषेप्रमाणे बोलणारा!? हेच ना?"

"कृष्णा.... खूप सुंदर नाव ठेवलं आहे तुझ्या आई-वडिलांनी तुझं! अगदी तुला शोभेलसं. तू सावळी आहेस म्हणून नाही; तर विचारी आहेस त्या सर्वेश्वराप्रमाणे... म्हणून! माझ्या या रूपाचा फार विचार करू नकोस. कृष्णा, मी एकटाच असा आहे जो सत्य, त्रेता, द्वापार आणि कली युगामध्ये सहज प्रवास करू शकलो आहे. बाळा, स्वीकाराह्यता हा माझा स्वभावधर्म आहे. त्यामुळेच मी प्रत्येक युगात तग धरू शकलो. माझा जन्म सत्ययुगात झाला. जन्माने ब्राम्हण आणि धर्माने क्षत्रिय झालो. वडिलांची इच्छा पूर्ण करताना हा विचार मनात होताच की आशीर्वाद घेताना परत एकदा मातेची आणि बंधूंची मागणी करायची. जमदग्नी पुत्र आहे मी. एका अतिज्ञानी महान ऋषींचा पुत्र. योग्य निर्णयशक्ती उपजत आहे माझ्यात."

"आणि तरीही तुम्ही एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रियहीन केलीत. देवा...."

"मुली मी तुला तुमच्या कल्पनेतल्या देवासारखा दिसतो का?" कृष्णाला थांबवत परशुराम म्हणाले.

"म्हणजे?" कृष्णा गोंधळली.

"अग, तुमच्या आजच्या कल्पनेत राजा रविवर्माने चितारलेली देवता-ऋषी-मुनी संकल्पना आहे न. मी तुला तसा दिसतो आहे का?"

"नाही महात्मन." काहीसं हसू येऊन कृष्णा म्हणाली.

"मग माझ्याशी बोलताना देवा... महात्मन... असं संबोधण्यापेक्षा सर म्हण मला. तुला सोपं जाईल बोलायला. उगाच दडपण घेऊन बोललीस तर मनातील सर्व शंकांचं निरसन होणार नाही." मंद हसत परशुराम म्हणाले.

"बरं! तर.... सर.... खुदकन हसत कृष्णा म्हणाली; तुम्ही एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रियहीन कशी केलीत? मुळात पहिल्या वेळीच जर पृथ्वी क्षत्रियहीन झाली होती तर मग पुढच्या वीस वेळा नक्की काय केलंत?"

"बघ! केवळ देवा... या उपाधी ऐवजी सर म्हणता क्षणी तुझ्या प्रश्नात मोकळेपणा आला." परशुराम देखील मोकळेपणी हसत म्हणाले.

"बस! किती वेळ उभं राहणार आहोत आपण." असं म्हणत स्वतः गार आणि तरीही उबदार वाळूमध्ये ते बसले.

"बेटा, नि:क्षेत्रीय पृथ्वी म्हणजे काय ते समजून घे. म्हणजे मग एकदा की एकवीस वेळा की... अजून किती वेळा... ते तुलाच लक्षात येईल. पहिल्या वेळी मी पृथ्वी नि:क्षेत्रीय का केली ते माहीत आहे का तुला? त्यासाठी मूलतः क्षत्रिय म्हणजे कोण ते तुला समजून घ्यावे लागेल. या कली युगातील जातीय क्षत्रियता हा विचार नाही खऱ्या क्षत्रियतेमध्ये. ज्याचे कर्म आहे गरीब-दिन-दुबळ्यांचे संरक्षण करणे तोच जर मदमस्त होऊन या दिनांना त्रास देऊ लागला तर? ज्या ज्या वेळी अशा प्रकारे स्वकर्तव्य जो विसरला आणि दिन-दुबळ्यांना केवळ स्वतःच्या शक्तीमुळे त्रास द्यायला लागला अशा क्षत्रियला मी नेस्तनाबूत केलं आहे. पहिल्या वेळी देखील केवळ तोच जो दुष्टपणे वागला आणि शक्तीचा गैरवापर करायला लागला त्याचा सांहर केला आणि एकविसाव्या वेळी देखील तेच केलं. पण मग माझ्या लक्षात आलं की मी परशुराम असं कितीही वेळा करत राहिलो तरी परत परत अशा मानसिकतेचे मानव निर्माण होणार आहेत. त्यामुळे मग मात्र मी थांबलो. मिळालं का तुझ्या प्रश्नाचं उत्तर?" परशुराम बोलायचे थांबले. चांदण्यामध्ये त्यांच्या चेहेऱ्यावरील मंद स्मित कृष्णाला दिसत होते.

"सर.... सिध्दार्थ का? म्हणजे... आम्ही का?" कृष्णाने मनात असलेला पुढचा प्रश्न विचारला.

"बेटा याचं योग्य उत्तर तुला माझ्याकडून मिळणं अवघड आहे. पण उत्तर मात्र नक्की मिळेल; याची खात्री बाळग. आता काही माझ्या बाजूने. राजा बिभीषण, कुलगुरू कृपाचार्य आणि राजा बळी यांनी त्यांच्या भेटीमध्ये आजच्या काळामध्ये त्यांचं असणं निरर्थक असल्याचं सांगितलं असेल याची मला कल्पना आहे. मात्र मी थोडं वेगळं काही सांगणार आहे. म्हणूनच मी आज संध्याकाळी भेटून नक्की कोणाशी बोलायचं त्याचा अंदाज घेतला. कृष्णा, सिध्दार्थ नक्कीच विचारी आहे; पण तितकाच भावनाप्रधान आहे. अनेकदा त्याचे निर्णय हे भावनेच्या भरात घेतलेले असतात. याचं अगदी ताज उदाहरण म्हणजे... पहिल्या दिवशी पेटीका मिळाली आणि श्लोक वाचता क्षणी दुसरा कुठलाही विचार न करता तो त्या मुलाला शोधायला धावला. भावनिकता हेच त्याचं कारण आहे. मात्र त्यामानाने तू जास्त विवेकी विचारांची आहेस; त्यामुळे सिध्दार्थची सोबत कधीही सोडू नकोस.

आता फक्त शेवटचे काहीतरी. मी का भेटतो आहे तुम्हाला! बेटा, ज्याप्रमाणे मला एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रियहीन केल्यानंतर उपरती झाली की याहून जास्त मी काही करू शकत नाही... तद्ववतच या कालामध्ये वावरताना मला एक गोष्ट लक्षात आली आहे; अत्यंत दुःखाने सांगावं लागतं आहे; की कली युगाचा अंत अगदी काही शतकांवर आला आहे. कदाचित तोच कालांत असेल; आणि त्याचाच अर्थ चिरंजीवित्वाचा अंत असेल. पण ज्याप्रमाणे चिरंजीवी असल्याने मृत्यू नाही... परंतु शरीर ह्रास आहे. अर्थात तो तुमच्या शंभर वर्षांच्या आयुष्यात जसा होतो तसाच आमच्या आयुष्यात काही हजार शतकांमध्ये होतो आहे. त्याप्रमाणे तत्वह्रास हा कली युगातील मानवाला मिळालेला शाप आहे. यातून अगदीच काही मोजके वेगळे आहेत. त्यातील तुम्ही दोघे! बस् माझ्याकडून इतकंच! मुली, एकूणच सर्वस्वाचा अंत नक्की आहे... मात्र मानवजातीला काहीतरी देणं लागतात तुमच्यासारखे. त्याची जाणीव लवकर व्हावी तुम्हाला हीच त्या परमपित्याकडे मागणी करतो... आणि तुझी रजा घेतो."

असं म्हणून परशुराम उठले आणि चालू पडले. त्यांना हाक मारावी किंवा थांबवावं असं कृष्णाला वाटलं नाही. त्यांना जाताना ती बघत राहिली.

काहीसं पुढे जाऊन ते थांबले... परशुराम मागे वळले नाहीत तरीही त्यांचा स्पष्ट आणि घनगंभीर आवाज "कृष्णाच्या मनात गुंजला... तू कमी नाहीस बेटा! You both are equals. निसर्गाचा balance आहेत तुम्ही. येतो मी!"

परशुराम पुढे पुढे चालत होते.. ते गेले त्यादिशेने काही वेळ कृष्णा बघत बसली आणि मग तिची नजर सागराकडे वळली. तिच्याही नकळत ती तिथेच आडवी झाली आणि तिला झोप लागली.

क्रमशः

Friday, October 8, 2021

चिरंजीवी (भाग 4)

 चिरंजीवी


भाग 4


.......आणि बसलेल्या ठिकाणावरून शांतपणे उठून सिध्दार्थ टेकाड उतरून खाली जायला निघाला.

"साब, वो मेरा दोस्त बोला गाडी खराब है करके मै आया. मेरेकू लगाच आप इधरकू आएंगे करके." सिध्दार्थला समोरून येताना बघून समोर उभा असलेला तरुण बडबड करायला लागला. खरं तर त्याक्षणी तरी सिध्दार्थला कोणाशीही काहीही बोलायचं नव्हतं. त्याचं तसं लक्ष देखील नव्हतं त्या पोराच्या बोलण्याकडे. पण एकदम थांबून त्याने त्या पोराकडे बघितलं आणि म्हणाला; "अरे तुमको कैसे मालूम था मै इधर ही रहुंगा?"

"अरे साब, आप को देखकर समझ मे आता है के आप को भी वो भागवन मिले अभि अभि. आप ही सोचो साब, आपका गाडी एकदम फस्टक्लास चल राहा था. अभि भी गाडी खराब नही हुवा लेकिन बंद तो पड गया. तभी मेरा फ्रेंड इधर से ही गुजरा. फिर भी आप नही गया उसके साथ. साब..... आप ऊन महात्मन को मिलने का वरदान लेके आए है. लेकिन मै नही पुछुंगा क्या बात हुवा." तो पोरगा सिध्दार्थ सोबत गाडीच्या दिशेने चालत बडबडत होता. त्याचं लक्ष सिध्दार्थच्या बदलत्या चेहेऱ्याकडे नव्हतं. आपल्याच तंद्रीत तो बोलत होता.

"क्यों नही पुछोगे?" सिध्दार्थने आवाजावर ताबा मिळवत त्याला विचारलं. सिध्दार्थला राहून राहून आश्चर्य वाटत होतं की या मुलाला बरं माहीत मी या टेकाडावर असेन आणि इथे मला कोणीतरी भेटेल. भगवन म्हणतो आहे तो कृपाचार्यांना. काय आहे नक्की प्रकरण?

"अरे साब, किसींको याद नही रहाता ना के वो भगवन क्या बोलते करके. बस्! अपने मे खुश होता है आदमी उनके दर्शन करके. साब, उनका मन हो ना तो वो ही किसीं किसीं को रोक लेते है बात करने को. इधर के गांव मे सब को मालूम है. तभी तो मेरेकू मेरा दोस्त बोला.... भगवन वाली टीला पे जा... साब वही रहेंगे." तो अजूनही आपल्याच तंद्रीत बडबडत होता.

"कौन है वो? कूच तो मालूम होगा ना तुमको?" सिध्दार्थने परत एकदा त्याला विचारलं.

"साब.... कोई मिलता है यहा... भगवन है... बस्! इसके अलावा कोई कूच भी नही बोल सकता. अरे, साब, आप इतना पुछ रहे हो इसका मतलब आप भी मिले... तो आप बताओ ना कौन थे वे?" तो मुलगा थांबून सिध्दार्थकडे बघत म्हणाला.

"पता नही... लेकिन उनको मिलने के बाद ऐसा लग रहा है के उन महात्मन को फिर मिलु." सिध्दार्थ म्हणाला.

"अरे साब, एक बार मिले... जिंदगी सफल. इस याद के साथ जिना बहुत बडी बात है. वैसे आप इधर के लोगोंके अलावा किसीको ये बात बताएंगे तो कोई विश्वास नही करेंगा. तो बस् किसीं एसी पुण्य आत्मा से मिले इतना सोच के खुश हो जाना साब." बोलत बोलत दोघे गाडीजवळ पोहोचले होते. गाडीची परिस्थिती बघूनच तो पोरगा सिध्दार्थच्या दिशेने आला होता. गाडीजवळ त्याने दोन अजून हट्टी-कट्टी माणसं आणून ठेवली होती. सर्वांनी मिळून गाडी त्या दगडापासून लांब केली. समोरून पत्रा थोडा वाकडा झाला होता. एकूण नुकसान बघून तो पोरगा सिध्दार्थकडे आला आणि म्हणाला; "साब, बोलो तो गाडी ठीक करके दु? वैसे आप कंपनीमे भेजेंगे तो बहुत खर्चा होगा. मै कम पैसे मे करके दुंगा दो-चार घंटे मे." सिध्दार्थने घड्याळाकडे बघितलं आणि म्हणाला; "मतलब... ज्यादा से ज्यादा चार बजेतक तैयार होगी गाडी?" काम मिळतंय बघून खुश होत तो पोरगा म्हणाला; "अरे साब, उसके पेहेले ही देता हु."

सिध्दार्थ हसला आणि खिशातून दोन पाचशेच्या नोटा काढून त्याच्या हातात दिल्या आणि म्हणाला; "वो दो आदमी को देना. तेरा हिसाब बाद मे करता हु. चल, गाडी मै चलाउंगा."

त्या आड रस्त्यावरून गाडी घेऊन सिध्दार्थ त्या मुलाबरोबरो निघाला. सिध्दार्थला वाटलं होतं की मुख्य रस्त्याकडे घेऊन जाईल हा. पण उलट त्या मुलाने सिध्दार्थला अजून आतल्या बाजूला गावाकडे वळवलं.

"अरे, किधर जा रहे है हम?" एका विचित्र वळणा नंतर अजूनही पुढे काही दिसत नाहीय हे लक्षात आल्यावर सिध्दार्थ काहीसा साशंक झाला.

"साब, बस् पांच मिनिट. आगे मेरा गांव है. वही वो वेल्डिंग वाला है. उससे वेल्डिंग करवा के बाद मे कलर करके देता हु साब. डरना नही. लुटूंगा नही." त्याच्या बोलण्याने सिध्दार्थ हसला. थोडं पुढे गेल्यावर अगदी अचानक समोर काही घरं दिसायला लागली. तो मुलगा म्हणाला त्याप्रमाणे सिध्दार्थने गाडी वळवली आणि एके ठिकाणी आणून थांबवली. दोघे गाडीतून उतरले. सिध्दार्थ गाडीजवळच थांबला आणि तो मुलगा पुढे जाऊन एका माणसाला घेऊन आला. गाडीचं निरीक्षण करून त्या माणसाने मान डोलावली आणि तो परत गेला. तो मुलगा सिध्दार्थकडे आला आणि म्हणाला; "साब, आपका कोई किमती सामान होगा तो निकाल लेना गाडी से. चाबी उसको देना पडेगा. मेरे गांव का है; मुझे पुरा विश्वास है; लेकिन बाहरवलो सें हम खुद को बचाते है."

सिध्दार्थ हसला आणि त्याने एकदा गाडीत नजर टाकली. मागच्या सीटवरची ती खास पेटी त्याच्या नजरेस पडली आणि ती उचलून सिध्दार्थने गाडीची किल्ली त्या मुलाच्या हातात दिली.

"यार, थोडी भूक लगी है. कूच मिलेगा क्या खानेको?" सिध्दार्थने त्याला विचारलं.

"अरे साब, सबकूच मिलेगा. क्या चाहीये बोलो. आपको आपके फेव्हरेट मचान से कूच चाहीये तो वो भी मिलेगा. इधर पिछे के साईडसे निकलेंगे तो चलके जा सकते है वहा. तभी तो हमारे गांव के सब लडके उधर और आजूबाजूके हॉटेल मे काम कर सकते है." तो मुलगा हसत म्हणाला.

ते ऐकून सिध्दार्थला एकदम मजा वाटली. इथे काहीतरी मागवण्यापेक्षा आपणच जावं मचाण पर्यंत असं त्याच्या मनात आलं आणि तो म्हणाला; "मुझे रास्ता बता; मै मचान पे चलके जाता हुं. गाडी ठीक हो जाएगी तो तू उधर ही आना."

मुलाने बरं म्हणून मान हलवली आणि सिध्दार्थला त्याच्या मागून चलायची खुण करून तो चालायला लागला. सिध्दार्थ त्याच्या मागे जायला लागला. पाच-पन्नास घरांचं गाव असावं ते... त्याला बाहेरूनच वळसा घालून दोघे थोडे पुढे गेले आणि तो मुलगा थांबून म्हणाला; "देखो साब, ये नाला दिख रहा है ना... इसका साईड मत छोडना.. सिद्धा चलके जाएंगे तो आधे घंटेमे पोहोचेंगे आप मचान पे. वो माचान के बाजू मे जो नाला जाता है ना... जिधर उनका रेस्टोरेन्ट है... ये ही वो है."

सिध्दार्थने हसून 'बाय' असा हात हलवला आणि तो चालायला लागला. हातात फक्त एक पेटी होती. भुकेची जाणीव होती; पण त्रास होत नव्हता. झाडी देखील भरपूर होती त्यामुळे उन्हाचा त्रास देखील नव्हता. हे अचानक मिळालेलं एकटेपण सिध्दार्थला हवंस वाटलं. थोडं पुढे जाऊन त्याने मागे वळून बघितलं तर तो मुलगा मागे नव्हता. सिध्दार्थ काही क्षण तिथेच उभा राहिला आणि मग नाल्याच्या जवळ जायला लागला. थोडं खाली उतरून सिध्दार्थ नाल्या जवळ आला आणि खळखळत्या निर्मळ पाण्याजवळ जाऊन त्याने तोंडावर पाण्याचे हबके मारले. खूप बरं वाटलं त्याला. ओंजळी भरभरून तो पाणी प्यायला आणि थोडं मागे होऊन जवळच्याच एका झाडाला टेकून बसला. तिथे त्या शांततेत त्याला खूप बरं वाटत होतं. कालपासून अचानक त्याच्या आयुष्यात जे काही घडायला लागलं होतं त्याबद्दल एकटेपणाने विचार करायला त्याला वेळच मिळाला नव्हता. त्यामुळे इथेच थोडावेळ बसून मन स्थिर झाल्यावर पुढे जावं; असं त्याने ठरवलं.

सिध्दार्थने डोळे मिटले आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या खोलीतील प्रसंग जसाच्या तसा उभा राहीला.

".......कोणीही कितीही दूषणे दिली तरी विवेकबुद्धिपासून ढळू नये.

........न्याय सम्मत संसार निर्मितीची उर्मी श्रीरामांच्या लक्षात आली आणि त्यांनी माझा हाच विचार पुढील पिढ्यांमध्ये मी रुजवावा यासाठी मला चिरंजीवित्व दिले.

.........आजच्या मानवाने स्वतःच्या ह्रासाच्या दिशेने पाऊल उचलले आहे; ते मागे फिरवणे शक्य नाही.

.........आज मी माझ्या उद्दिष्टापासून अनेक दशके दूर गेलो आहे... माझ्या आयुष्याच्या असण्याचे कारणंच संपले आहे. त्यामुळे मला हे माझे चिरंजीवित्व परत करायचे आहे."

'महात्मन बिभीषणांनी माझ्याजवळ आपलं मन मोकळं केलं होतं. मी नक्की काय करू शकणार होतो? आजवर मी हेच बघत आलो आहे की माझ्या आजूबाजूचे लोक या जुन्या कथांकडे केवळ अतिरंजित कहाणी म्हणून बघतात... आणि मग त्या कथांमधील जी चांगली कॅरेटर्स आहेत त्यांना देवत्व देऊन त्याच्याकडूनच काहीतरी मागत असतात. पण हे थोडं वेगळं नाही का.... की श्रीरामाच्या कालखंडातील एक व्यक्ती माझ्यासारख्या एका मर्त्य मानवाकडे काहीतरी मागते आहे. जो अनुभव भगवन बिभीषणांचा तोच अनुभव हस्तिनापुराचे राजगुरू श्री कृपाचार्यांचा. आज काय बरं म्हणाले ते.....'

''........त्या सर्वसाक्षी सर्वदाता परमेश्वराने... निसर्गाने.... जे दिलं ते आम्ही जपलं; जमेल तसं वृद्धिंगत केलं; त्याचं फलित काही अतींद्रिय शक्ती जागृत होण्यात झालं. वत्सा; आत्मविश्वास आणि स्वप्रजल्पनं.... स्वतःशी साधलेला संवाद.... ही दोन सुखी मानवीय आयुष्याची सत्य आहेत. मात्र आजचा मानव या दोन सत्यांपासून दूर जातो आहे; हे दुर्दैव आहे.

.........पंचमहाभूतांनी दिलेली शिकवण नाकारून आजच्या मानवाने स्वनिर्मितीची घमेंड करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आता ज्ञान हे दान आहे आणि दाता आणि युयुत्सु दोघेही आपापल्या जागी योग्य असणे आवश्यक आहे; हे सार्वभौम सत्य लयाला जाते आहे."

'या दोन महान व्यक्तींनी माझ्याकडे काही मागावं इतका मोठा मी नक्कीच नाही; हे मला कळतं आहे. तरीही हे जगावेगळे अनुभव देखी फक्त मलाच येत आहेत; यात शंका नाही. पण मग ते का?'

सिध्दार्थच्या मनात विचारांची आवर्तनं सुरू होती. समोर वाहणारं झुळझुळतं पाणी आणि निरव शांतता यामुळे त्याची तंद्री लागली होती. हातातील पेटीवरून तो नकळत हात फिरवत विचार करत होता.... आणि अचानक त्याला जाणवलं की पेटी लाकडाची असूनही तप्त झाली आहे. त्याची तंद्री पूर्ण भंगली आणि त्याने घाईघाईने समोरच्या दगडावर पेटी ठेवली.

'नक्की श्लोक वेगळा आहे!' त्याच्या मनात आलं; आणि त्याने शांतपणे पेटीकडे बघितलं.

पेटीका तदीय बलि अस्तु नृपति महीस्वर्गात् !
वामनस्य पदे भवतु नरेश्वर: पाताल राज्य!

समोर दिसणारा श्लोक सिध्दार्थ परत परत वाचत होता. त्याच्या मेंदूमध्ये श्लोकाचा अर्थ प्रतीत होत होता; परंतु तरीही नवीन अनुभवासाठी त्याचं मन अजून तयार झालं नव्हतं.

अर्थ:
ही पेटी बलीची आहे जो पृथ्वी स्वर्गाचा नृपति होता; वामनाच्या पदस्पर्शाने तो पातालाचा राजा झाला.

'म्हणजे आता मी तिसऱ्या चिरंजीविला भेटणार आहे! नक्की काय होणार आहे? कधी भेटणार आहे मी?' सिध्दार्थ खूप गोंधळून गेला होता. त्याने अस्वस्थपणे मान जोरात हलवली आणि उठून उभा राहिला. 'इथून निघालेलं बरं!' त्याच्या मनात आलं. सिध्दार्थ मागे वळला आणि दचकला. कारण त्याच्या मागे थोड्या अंतरावर एक अत्यंत जराजर्जर व्यक्ती बसली होती. सिध्दार्थने त्या व्यक्तीचं निरीक्षण केलं. त्याच्या मनात एक चुकार विचार डोकावला... 'बळी राजा तो हाच नव्हे ना?'

पण मग त्याच्याच मनाने त्याला फटकारलं. 'आजवर जे दोन चिरंजीव भेटले ते माध्यम वयातील जरी असले तरी तब्बेत अत्यंत उत्तम आहे हे त्यांच्याकडे बघून लक्षात येत होतं. बळी राजा तर वीर, पराक्रमी आणि असुर असूनही सत्शील होता. केवळ दिलेला शब्द पाळायचा म्हणून त्याने पृथ्वी आणि स्वर्गाचं राज्य सोडलं आणि कायमचा पातालधिपती झाला. त्याने मनात आणलं असतं तर पुन्हा एकदा पृथ्वी आणि स्वर्ग जिंकणं त्याला अवघड नव्हतं. पण आपण दिलेला शब्द खोटा पडू नये म्हणून तो कायम पाताळात राहिला. असा श्रेष्ठ कर्तृत्वाने महान असा राजा कुठे आणि समोरची वृद्ध व्यक्ती कुठे.'

सिध्दार्थने शांतपणे समोरची पेटी उचलली आणि तो त्या व्यक्तीच्या समोरून पुढे जाण्यास वळला.

"कोण? सिध्दार्थ? म्हणजे माझा अंदाज बरोबर होता तर. या अधू दृष्टीमुळे समोर नक्की कोण आहे ते कळत नाही. नीट ऐकू येत नाही; किंवा बोलणं देखील जड जातं. तू इथे आहेस हे माझ्या अतींद्रिय मनाने मला सांगितलं आणि त्या अनुषंगाने मी इथे आलो. पण बहुतेक तू शांत बसला होतास. त्यामुळे तुझं अस्तित्व जाणवत असूनही; तू नक्की कुठे आहेस हे कळत नव्हतं. बहुतेक तू इथून निघण्याच्या विचाराने उठलास आणि मला तुझ्या अस्तित्वाचा अंश जाणवला." ती व्यक्ती बोलत होती आणि सिध्दार्थ अवाक होऊन ऐकत होता.

"तुम्ही?" सिध्दार्थला प्रश्न करतानाच त्या प्रश्नातला फोलपणा लक्षात आला होता.

"होय! मीच पातालधिपती बळी. सिध्दार्थ... मला असं या परिस्थितीत बघून तुला आश्चर्य वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे पुत्रा. माझी ही अवस्था का तेच तर सांगण्यासाठी इथवरचा प्रवास केला आहे मी. सिध्दार्थ, मी चिरंजीवी आहे; हे जितकं खरं आहे तितकंच खरं; किंबहुना महत्वाचं चिरंजीवित्व म्हणजे काय हे समजणं आहे.

कालाच्या अंतापर्यंत जगणं म्हणजे चिरंजीवित्व! शरीराचा अंशा अंशाने ह्रास होत असताना तो स्वीकारून एकट्याने जीवन कंठणं म्हणजे चिरंजीवित्व. आपल्या जवळचे सगळेच कालौघात यमसदनी जात असताना त्यांना निरोप देणं म्हणजे चिरंजीवित्व..... आणि मग आप्तस्वकीयांच्या नंतर देखील प्रत्येक पुढची पिढी आपापली जीवन मर्यादा स्वीकारत पुढच्या प्रवासाला जाताना बघणं म्हणजे चिरंजीवित्व." अत्यंत खोल आवाजात राजा बळी बोलत होता आणि नकळतपणे त्याच्या समोर जाऊन बसलेला सिध्दार्थ व्याकुळ नजरेने त्या जराजर्जर शरीराकडे बघत होता.

"महाराज पण आपण चिरंजीवी आहात... मग आपली अशी परिस्थिती कशी होऊ शकते?" अत्यंत कळकळीने सिध्दार्थने प्रश्न केला.

समोर बसलेला बळी राजा हसला.... 'केविलवणं होतं का ते हास्य? की अत्यंत दुःख दडलं होतं त्या हास्यात?' सिध्दार्थच्या मनात आलं.

"बाळ सिध्दार्थ, तू जो प्रश्न केला आहेस त्याचंच तर उत्तर मी दिलं अगोदर. पण तरीही परत एकदा तुला नीट सांगतो. असुर असूनही दानशूर म्हणून जगद्विख्यात होण्याच्या लालसेने मी पृथ्वी आणि स्वर्गावर अधिराज्य स्थापित केल्यानंतर मोठा यज्ञ केला. यज्ञानांतर मी दान देण्यासाठी उभा राहिलो आणि विष्णू रुपाला ओळखूनही आणि गुरू शुक्राचार्यांनी सांगून देखील मी तीन पाऊले जमिनी देतो; हे दान अर्ध्य देऊन सोडलं. मात्र तिसरे पाऊल स्वशिरावर धारण करतानाच मी ठरवलं होतं की भगवन विष्णू यांच्याकडून चिरंजीवित्व मिळवायचंच. त्याप्रमाणे मी स्वतः पाताळ राज्य स्वीकारून परत पृथ्वी किंवा स्वर्गाकडे बघणार नाही हा शब्द देतानाच वामनरुपधारी त्या सर्वेश्वराकडे मागणी केली की पाताळ राज्याच्या सीमेचे रक्षण स्वतः श्रीविष्णुच करतील. त्या मागणी मागे एकच विचार होता की विश्वरूप श्रीविष्णुच जर द्वारपाल असतील तर यमराज देखील आत येऊ शकणार नाहीत. याचा थेट अर्थ होतो की मला मृत्यू स्पर्श करू शकणार नाही. मी खुश होतो मागणी करताना... आणि श्रीविष्णु स्मितहास्य करत कीव करत होते माझ्या मर्त्य बुद्धिकुवतीचं! मला माहीत आहे मुला तुला अजूनही लक्षात आलेलं नाही...

सिध्दार्थ, मुला, अरे मी यमराजाला माझ्यापर्यंत पोहोचण्यास मज्जाव केला; श्रीविष्णूंना माझ्या सीमेचे द्वारपाल करून. मात्र मर्त्य मानवाला हळूहळू का होईना शरीर ह्रास सहन करत वृद्धत्वाकडे वाटचाल करावीच लागते... हे त्याक्षणी विसरून गेलो होतो. पण विधिलिखित कोणाला टळतं का? बघ एकदा माझ्याकडे पुत्रा; मला कालांतापर्यंत मृत्यू तर नाही; परंतु शरीर ऱ्हास आहे.... माझे प्रियजन हळूहळू करत मला सोडून गेले आहेत; कालौघात माझ्या आजूबाजूची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. यामुळे मी एकटा पडलो आहे; परंतु जगतो आहे.

अविवेकी अपेक्षा आणि राखून दिलेल्या चौकटीबाहेर चुकीच्या पद्धतीने पडल्यास काय होऊ शकते ते माझ्या इतकं चांगलं कोणीच सांगू शकणार नाही. पण दुर्दैवाने मला उमजलेलं हे सत्य मी पुढील मर्त्य मानवापर्यंत पोहोचवू शकत नाही; ते केवळ माझ्या या जराजर्जर शरीरामुळे. म्हणूनच तुला विनंती करण्यास आलो आहे की पुढील प्रवासात जेव्हा कधी तू त्या आदिशक्तीला भेटशील तर माझी व्यथा नक्की सांगावीस."

राजा बळी बोलण्याचे थांबले... त्यांचा श्वास फुलला होता आणि धाप लागली होती; ते पाहून सिध्दार्थ झट्कन पुढे झाला आणि त्यांना आधार द्यायला लागला. पण त्या परिस्थितीत देखील त्यांना हसू आलं आणि ते म्हणाले; "सिद्धार्थ, मला काहीही होणार नाही आहे. हा शरीरधर्म सहन करत जीवन कंठणार आहे मी. तू निघ! अजून खूप काही अनुभवायचं आहे तुला."

सिध्दार्थला त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ कळला आणि हातातील पेटी सावरत एकदाही मागे वळून न पाहाता तो पुढे निघाला.

क्रमशः

Friday, October 1, 2021

चिरंजीवी (भाग 3)

 चिरंजीवी


भाग 3

सिध्दार्थला जाग आली त्यावेळी त्याच्या घडाळ्याचा अलार्म वाजत होता आणि खोलीमध्ये सूर्यप्रकाश शिरला होता.

सिद्धार्थ उठून बसला; त्याने सवयीने मोबाईल हातात घेतला आणि त्याला धक्का बसला. त्याला कृष्णाने आदल्या रात्री 12 वेळा फोन केला होता. मोबाईलच्या स्क्रीनकडे बघताना एकदम त्याला कालची रात्र आठवली आणि तो ताठ बसला. त्याची नजर शेजारी असलेल्या त्या पेटीवर गेली. ती पेटी उघडली गेली होती हे खरं होतं. त्याने एकीकडे कृष्णाला फोन लावला आणि दुसरा हात पेटीच्या दिशेने नेला.

त्या दोन क्षणात देखील त्याच्या मनात एक विचार शलाके सारखा येऊन गेला. 'मी हात लावायच्या अगोदरच ही पेटी नाहीशी तर नाही होणार नं?' पण तसं काहीच झालं नाही. सिध्दार्थने उघडी पेटी हातात घेतली आणि त्याचवेळी कृष्णाने फोन उचलला.

"कमाल करतोस सिद्धार्थ! किती फोन करायचे? तू फोन उचलत नव्हतास म्हणून मी घरी गोपाळला फोन केला तर तो म्हणाला मी गेल्यानंतर तू जो खोलीत गेला आहेस तो बाहेर नाही आलास. गोपाळने एक दोन वेळा दार वाजवलं देखील. पण तू उत्तर देखील दिलं नाहीस."

"ओह, अग झोप लागली होती मला काल लवकर." सिध्दार्थ म्हणाला.

काही क्षण शांतता होती फोनवर; आणि मग कृष्णा शांत आवाजात म्हणाली; "सिद्धार्थ, there is something wrong for sure. If you do not wish to tell me; that's fine. But don't lie. That's not you."

सिद्धार्थ मंदसं हसला आणि म्हणाला; "कृष्णा, आपण भेटूया. माझ्या किंवा तुझ्या घरी नको. सात वाजलेत न? आठला तुला pick up करतो तुझ्या घराकडे. आज काही महत्वाचं काम आहे का first half मध्ये?''

कृष्णाने हलकेच श्वास सोडल्याचं जाणवलं सिध्दार्थला. ''अहं, तसं काही फार महत्वाचं नाहीय. का रे?''

''Let's go for breakfast.... Lonavla!'' सिद्धार्थ.

''Oh! Thats so sweet. Done! मी आठला तयार असेन.'' कृष्णा म्हणाली.

सिध्दार्थ अर्ध्या तासात तयार होऊन खोलीतून बाहेर आला. समोर डायनींग टेबलावर आई-बाबा नेहेमीप्रमाणे ब्रेकफास्ट करायला बसले होते.

''काय? आज सकाळीचं स्वारी कुठे निघाली?''

त्याला बाहेर पडायच्या तयारीत बघून आईने विचारले. ''अग, कृष्णा म्हणत होती ब्रेकफास्टला भेटूया का? दोघे जातो आहोत.'' सिद्धार्थ हसत म्हणाला.

वडिलांनी पेपरमधून मान वर करत म्हंटलं; ''Thats good. Give our regards to Krushna. Enjoy. पण सिद्धार्थ, कालच्या मीटिंगचा रिपोर्ट मला तुझ्याकडून देखील हवा आहे; आणि आजच मिळाला तर बरं.''

''Dont worry baba. Second half of the day I am going to be in office. Will meet you in your cabin then''.

''OK. Bye.'' असं म्हणून बाबांनी परत पेपरमध्ये लक्ष घातलं. सिद्धार्थ दाराच्या दिशेने जायला लागला तशी वैदेही उठली आणि दाराकडे आली.

''सिद्धार्थ, भांडण नक्की नाही झालेलं तुमच्यात. पण तरीही.... काल कृष्णाने रात्री उशिरा मला फोन केला होता. तू फोन उचलत नव्हतास म्हणून. मी गोपाळला तुझ्या खोलीत डोकावायला सांगितलं तर तो म्हणाला की तू खोली लॉक करून बसला आहेस. म्हणून मी आले होते हाक मारायला. तू खोलीतून काहीही उत्तर दिलं नाहीस.... झोपला असशील असं वाटून मी मागे फिरले... पण आतून तू कोणाशीतरी बोलत असल्याचा आवाज आला मला. मी मागे वळले पण मग दार नाही वाजवलं परत..... सिद्धार्थ..... तुझ्या खोलीमधून एक मंद सुगंध येत होता आणि हलकासा हिरवा प्रकाश दाराच्या फटीतून....'' वैदेही बोलायची थांबली; पण सिध्दार्थने काहीतरी बोलावं या अपेक्षेने. मात्र त्याक्षणी तरी सिध्दार्थला काहीच सांगायची इच्छा नव्हती. त्याने एकदा आईकडे बघितलं आणि हसत म्हणाला; ''come on mom. तुला काहीतरी भास झाला असेल. एक तर तुझी झकास perfums... तोच सुगंध तुला जाणवला असेल आणि....''

सिध्दार्थला थांबवत वैदेही म्हणाली; ''निघ तू बेटा. आपण नंतर निवांत बोलू."

सिध्दार्थने दार उघडलं; वैदेहीने त्याचा खांदा धरून त्याला स्वतःकडे वळवलं आणि त्याच्या हातात काहीतरी ठेवलं. सिद्धार्थने हातात काय आहे म्हणून बघितलं तर त्याच्या हातात एक हेअरपिन होती.... अंगभूत हिरव्या रंगाने ती चमकत होती. सिध्दार्थने चमकून आईकडे बघितलं. वैदेही मंद हसत होती आणि तिने 'bye' म्हणायला हात वर केला तर तिच्या डाव्या हाताची बोटं देखील असाच काहीसा हिरवा प्रकाश फेकत होती.

सिध्दार्थचे डोळे एकदम मोठे झाले. तो काहीतरी म्हणणार होता; पण तिने ओठांवर बोट ठेवत मंद स्मित केलं आणि हळूच म्हणाली; ''निघ बेटा; कृष्णा वाट बघत असेल.''

सिध्दार्थची मनस्थिती क्षणभरासाठी द्विधा झाली खरी. पण त्याला खात्री होती त्याची आई त्याला सगळं सांगेल. त्याने एकदा वळून वडिलांकडे बघितलं.

''तुझ्या बाबांना काहीही माहीत नाहीय. मला देखील! सिद्धार्थ.... काल रात्री कृष्णाने मला तुमच्या कालच्या अनुभवाबद्दल सांगितलं. मला माहीत आहे; तू पूर्ण विचार करूनच करशील जे काही करशील ते. पण तरीही... काळजी वाटते. सांभाळून राहा हं बेटा.'' इतकं म्हणून वैदेहीने परत एकदा त्याला अच्छा केलं आणि आईला जवळ घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवून सिद्धार्थ पटकन घराबाहेर पडला.

सिद्धार्थ गाडी चालवत होता आणि कृष्णा शेजारी शांतपणे बसली होती. सिध्दार्थने काहीतरी बोलावं म्हणून ती वाट बघत होती; आणि नक्की कुठून सुरवात करावी आणि काय सांगावं हिला याचा विचार सिद्धार्थ करत होता.

''....... तर तू खोलीत जाऊन दार लावून घेतलंस आणि..... ??? घे! सुरवात करून दिली मी. कसं सांगू हा प्रश्न सोडवला! आता बोल....'' हलकंस हसत कृष्णा म्हणाली आणि गाडी चालवताना एकदा तिच्याकडे कटाक्ष टाकून सिद्धार्थ देखील हसला.

''खरंय ग! काय नक्की सांगू असा प्रश्न पडला होता.... तर मी पलंगावर बसलो ती पेटी घेऊन आणि विचार करता करता मला झोप लागली....''

एकदा सांगायला सुरवात केली आणि मग मात्र सिद्धार्थ थांबला नाही.... सिद्धार्थ बोलायचा थांबला त्यावेळी कृष्णा देखील विचारात गढून गेली होती. सिध्दार्थने तिला भानावर आणलं आणि दोघे गाडीतून उतरून मचाण रेस्टॉरंटमधल्या सिध्दार्थच्या आवडत्या टेबलाच्या दिशेने निघाले. सिध्दार्थने लोणावळा म्हंटल्याक्षणी कृष्णाने फोन करून त्यांचं टेबल बुक केलं होतं. सिध्दार्थला मनातलं काही बोलायचं असलं की तो कृष्णाला घेऊन तिथेच यायचा. त्याने तिला प्रपोज देखील तिथेच केलं होतं. सिद्धार्थ-कृष्णाला स्टाफ देखील चांगलं ओळखत होता. दोघे टेबलावर बसले आणि दोघांच्या आवडीचा मेन्यू टेबलावर मांडला गेला. सिध्दार्थने कृष्णाकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला आणि एक लाजरं हास्य गेलं त्याच्या दिशेने.

दोघे काही क्षण तसेच बसले होते. कृष्णाने सिध्दार्थला तंद्रीतून जागं केलं आणि म्हणाली; "तू कालपासून काहीही खाल्लेलं नाहीस. अगोदर खाऊन घे; मग गप्पा मारुच."

सिध्दार्थने हसून खायला सुरवात केली.... समोर गरम फिल्टर कॉफी आली आणि सिद्धार्थ म्हणाला;

"कृष्णा मला आज जाग आल्यापासून फक्त आणि फक्त एकच प्रश्न सतत सतावतो आहे...."

"खरंय! Why you? तुझी निवड का?" हसत कृष्णा म्हणाली. आणि सिद्धार्थ देखील हसला.

"Exactly!!! You nailed it." सिद्धार्थ म्हणाला.

''कदाचित सिद्धार्थ....'' कृष्णा त्याच्याकडे थेट बघत म्हणाली; "आजच्या पिढीप्रमाणे तू आपल्या पुराण कथांना थेट टाकाऊ म्हणत नाहीस म्हणून. किंवा; किमान सत्यासत्यता पटेपर्यंत खोटं ठरवत नाहीस म्हणून."

"कृष्णा... पण माझ्यासारखा विचार करणारे अनेक असतीलच की. तुझंच उदाहरण घे. तू तर अशाच विषयाचा अभ्यास करते आहेस."

"Exactly! सिद्धार्थ.... अरे आपल्या पिढीत एकतर या विषयाचा अभ्यास करणारे आणि शास्त्रीय रित्या त्याची कारणमीमांसा करणारे आहेत; किंवा सरळ या कथांना टाकाऊ म्हणणारे आहेत. तू थोडा वेगळा आहेस. तू अगदीच शास्त्रीय दृष्टिकोनातून सतत नाही बघत आपल्या पुराण कथांकडे.... आणि चेष्टा देखील नाही करत. विश्वास आहे तुझा... आणि तरीही खात्री करून घ्यायची इच्छा देखील आहे. कदाचित म्हणून तू.... सिद्धार्थ आठवतं जेव्हा आपली नुकतीच ओळख झाली होती आणि आपण अनेकदा या पुराण कथा आणि पुराण काळ याबद्दल बोलायचो... त्यावेळी तू मला तुझं असं एक लॉजिक सांगितलं होतंस."

"हो! लॉजिक नाही कृष्णा... माझं ठाम मत आहे. हे बघ.... आपल्याला माहीत आहे की शिवाजी महाराज खरे आहेत. ती काही कुठली कथा किंवा बनवून सांगितलेली गोष्ट नाही. शिवाजी महाराज पन्नास वर्ष जगले. त्यांनी लहान मोठ्या लढाया साधारण वयाच्या सोळाव्या वर्षी सुरू केल्या... म्हणजे त्याचं स्वराज्यासाठी ऍक्टिव्ह participation किमान 30 वर्षं तर नक्की होतं. पण त्यांच्या आयुष्यातल्या फार तर सात ते आठ महत्वाच्या घटना सोडल्या तर आपण कधीही जास्त खोलात जातो का ग? शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले सर केले... इतकं एकच वाक्य त्यांच्या पराक्रमाबद्दल? तुला आठवत असेल; आपण इतके ट्रेक केले आहेत पुण्याच्या आजूबाजूच्या किल्ल्यांचे. केवळ रसद ठेवायला दोन किल्ले होते.... पण काही घटनांमध्ये बांधून टाकलं आपण त्यांच्या पराक्रमाला. दुसरा त्याहूनही जास्त महत्वाचा मुद्दा; जो माझ्या मानत सतत फिरत असतो... कृष्णा; एक वंद्यता अशी निर्माण झाली आहे की शिवाजी महाराजांना स्वतः भवानी मातेने येऊन तलवार दिली. अग, हे सांगणाऱ्या व्यक्तीला देखील माहीत असेल की असं काही नसतं. पण शिवाजी महाराजांच्या बद्दलच्या अपार भक्तीपाई आणि प्रेमापोटी ही वंद्यता निर्माण केली गेली आहे न? मग आपण हेच लॉजिक आपल्या पुराण कथांना का नाही लावायचं ग? कृष्ण निळा होता..... अग निळा रंग असतो का कोणाचाही? तो काळा होता..... व्यवस्थित काळ्या रंगाचा होता कृष्ण! पण त्याच्या बद्दलच्या प्रेमापोटी त्याला निळा केला... त्यात देखील त्याकाळात कदाचित त्याला आकाशाच्या रंगाचा; म्हणजे अजून उजाडलेलं नसतं किंवा संध्याकाळ संपून रात्र होत असते त्यावेळचं आकाश... असं उल्लेखलं गेलं असेल... पण आपण मात्र त्याला निळं करून टाकलं."

"अशीच लॉजिक्स इतर कथांना लावू शकतो न ग?" सिद्धार्थ अत्यंत भावनिक होऊन बोलत होता; आणि या संपूर्ण विषयाबद्दलची त्याची भावना माहीत असल्याने कृष्णा शांतपणे त्याचं बोलणं ऐकून घेत होती.

"सिद्धार्थ; हेच तुझे मुद्दे आणि मतं ऐकून माझ्या मनात महाभारतीय युद्धाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि म्हणून मी तो विषय घेतला आहे अभ्यासासाठी; आणि हेच माझं म्हणणं आहे. कदाचित तुझे हे विचार आणि मतं... आणि तरीही तुझं या विषयात नवखेपण ... ही कारणं असतील तुलाच निवडण्याची! पण एक सांगू का? तुझ्या मनात मीच का हा प्रश्न येतो आहे... माझ्या मनात दुसराच प्रश्न पिंगा घालतो आहे..." सिध्दार्थकडे बघत कृष्णा म्हणाली.

तिच्याकडे चमकून बघत सिध्दार्थने विचारलं; "अजून कोणता प्रश्न कृष्णा?"

"सिद्धार्थ, now you really need to come out of the box and think out of the box. काल आपण जी पेटी बघितली होती....." कृष्णाला थांबवत सिद्धार्थ म्हणाला; "मी आणली आहे ती सोबत. दोघे मिळून बघू म्हणून...." क्षणभर त्याच्याकडे टक लावून बघून मग कृष्णा हसली आणि म्हणाली; "बघ, हेच तुझं रॉ असणं... म्हणून तू...." सिध्दार्थला ती काय म्हणते आहे ते कळलं नाही. त्याच्या कपाळावर आठ्या आल्या आणि काहीसं वैतागून तो म्हणाला; "कृष्णा उगाच कोड्यात बोलू नकोस. अगोदरच मी पूर्ण गोंधळलो आहे." त्यावर हसत कृष्णा म्हणाली; "सिद्धार्थ, त्या पेटीचं प्रयोजन संपलं आहे. आपल्या खुणा त्या हेअरपिनवर आणि काकूंच्या बोटांवर ठेऊन तिने तिचं असणं आपल्यापुरत संपवलं आहे. आता जरी तू ती पेटी उघडलीस तरी तुला त्यात काहीही दिसणार नाही आहे."

कृष्णाने असं म्हणताच सोबत आणलेल्या बॅग मधून सिध्दार्थने ती पेटी बाहेर काढली आणि घाईघाईने उघडली. आत खरंच काहीच नव्हतं. सिध्दार्थला पूर्ण खात्री होती की काल त्याने त्या पेटीतून हिरवा रंग प्रकाशित होताना बघितला होता. त्याची साक्ष त्याच्या आईच्या पिनवर आणि बोटांवर होती. पण तरीही आत्ता त्याच्या समोर फक्त एक लाकडी पेटी होती... बस्!

त्याने नजर उचलून कृष्णाकडे बघितलं आणि तिने मंद स्मित केलं.

"मग आता या पेटीचं काय करायचं?" सिध्दार्थने गोंधळून तिला विचारलं.

"पेटीचं काही करायचं नाही. इच्छा असेल तर संग्रहात ठेवायची. पण तिच्या वरच्या श्लोकाचा विचार मात्र आपण नक्की करायला हवा आहे." कृष्णाचा आवाज काहीसा गंभीर झाला होता.

सिध्दार्थने परत एकदा ती पेटी बंद केली आणि त्याची नजर पेटीवरच्या श्लोकावर गेली...

राजगुरू कृपाचार्य: पेटकम् अस्तु तत:!
यदि भवती प्रयत्नात पुन: मिलति जायते!

"कृष्णाsssssss अगsssssss"

कृष्णाने झट्कन सिध्दार्थच्या हातातून पेटी घेतली आणि तो श्लोक काहीसा मोठ्याने वाचला....

"सिद्धार्थ, तुला पहिला श्लोक आठवतो आहे का?" तिने त्याच्याकडे बघत त्याला विचारलं. सिद्धार्थ स्वतःच्याच विचारात गुंतला होता.

"सिद्धार्थ....."

"अं? काय? काय ग!?" त्याने तिच्याकडे हरवलेल्या नजरेने बघत म्हंटलं.

"तुला कालचा श्लोक आठवतो आहे का?" तिने परत एकदा तिचा प्रश्न विचारला.

"नाही ग.... फक्त तू सांगितलेला अर्थ आठवतो आहे.''

''ही पेटी चौथी आहे आणि अशा सात पेट्या आहेत. ही पेटी जर तुला मिळाली असेल तर याचा अर्थ हा आहे की तुला बाकी सर्व पेट्या मिळतील. हो न? हाच होता न अर्थ?" सिध्दार्थने कृष्णालाच विचारलं.

"हो! हाच होता अर्थ." ती म्हणाली आणि दोघेही एकदम शांत झाले...

किती वेळ गेला दोघांनाही कळलं नाही. हॉटेलच्या स्टाफ पैकी एकाने येऊन कृष्णाला विचारलं; "मॅडम, कॉफी थंड झाली आहे. दुसरी आणू का?"

त्याच्या बोलण्याने दोघेही भानावर आले. एकदा कॉफीकडे बघून कृष्णा हसली आणि म्हणाली; "नको. बिल आणा. आम्ही निघतो आहोत."

सिद्धार्थ आणि कृष्णा गाडीत बसले आणि सिद्धर्थने गाडी चालू केली. मचाण तसं काहीसं आड बाजूला असलेलं हॉटेल असल्याने तिथून मुख्य रस्त्याला येईपर्यंत रस्ता बराच खडबडीत आणि मातीचा होता. रस्त्यावर एकही वाहन नव्हतं; त्यामुळे दोघेही आपल्याच तंद्रीत होते. अचानक गाडी कशाला तरी जोरात आपटली आणि मागचं चाक गरगर फिरायला लागलं आणि दोघांची तंद्री तुटली. सिध्दार्थने गाडी थांबवून खाली उतरून बघितलं. गाडीचं मागचं चाक काहीसं अडकलं होतं आणि पुढचा बंपर एका मोठ्या दगडाला आपटून त्यात घुसल्यासारखा अडकला होता. सिद्धार्थ एकदम वैतागला. कृष्णा गाडीखाली उतरली आणि तिने देखील एकूण परिस्थिती बघितली.

"आता?" तिने सिध्दार्थला विचारलं.

"तुला मुख्य रस्त्यापर्यंत नेऊन बसमध्ये बसवून देतो. मग बघतो काय करायचं ते." सिद्धार्थ स्वतःवर वैतागत गाडीला लाथ मारत म्हणाला.

इतक्यात मागून एक मोठी गाडी येताना दिसली. गाडीवर मचाण हॉटेलचा लोगो होता. त्यांच्याजवळ येऊन गाडी थांबली आणि ड्राईव्हरने खाली उतरून सिध्दार्थला सलाम केला. "नमस्ते साब. मै मचान का ड्राईव्हर. क्या हुवा?"

"अरे, गाडी पथरपर टकराकर बंद पड गाई है." सिद्धार्थ म्हणाला.

"अरे साब, आपको वापस छोड दु क्या हॉटेलमे? या फिर हायवे पे छोडता हु. मै वही तो जा रहा हु. pick up है अभि मेरा नही तो रुककर गाडीका काम कर के देता." ड्राईव्हर म्हणाला.

सिध्दार्थने त्याच्याकडे बघितलं आणि कृष्णाकडे बघत म्हणाला; "कृष्णा, तू याच्या बरोबर जा. मी गाडीचं काय ते बघतो आणि येतो. माझी चिंता नको करुस. बरं, रेंजमध्ये गेलीस की आईला फोन करून सांग. नाहीतर काळीजी करत राहील.... आणि हो! प्लिज बाबांना पण फोन कर आणि सांग मला उशीर होईल ऑफिसमध्ये पोहोचायला. पण नक्की येतोय म्हणून सांग." कृष्णा काहीतरी बोलणार होती... पण मग तिने तिचे शब्द मागे फिरवले आणि काही एक न बोलता गाडीतून पर्स काढून घेऊन ती मचाणच्या गाडीत जाऊन बसली. ड्राईव्हरने सिध्दार्थकडे बघून म्हंटलं; "साब, मै मेरे दोस्त को फोन करता हु आगे जा के. इधर रेंज नही है ना. वो आएगा और सबकुछ करके देगा. मै रुकता था; लेकिन मेरा pick up है ना. वो लोगोको लेकर आता हु तब तक मेरा दोस्त भी आ जाएगा."

सिध्दार्थने त्याच्या खांद्यावर थोपटल्यासारखं केलं. ड्राईव्हर गाडीत बसला आणि त्याने गाडी सुरू केली. कृष्णाने सिध्दार्थला 'बाय' केलं आणि गाडी पुढे निघून गेली.

मचाणची गाडी गेली आणि सिध्दार्थने शांतपणे त्याच्या गाडीतून ती पेटी काढून हातात घेतली आणि गाडी बंद करून तो पूर्व दिशेने चालायला लागला. समोर एक टेकाड होतं. ते चढून सिद्धार्थ एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसला. त्याने हातातल्या पेटीकडे परत एकदा बघितलं. 'श्लोक कसा बदलला गेला असेल?' या श्लोकाचा अर्थ....

राजगुरू कृपाचार्य यांची ही पेटी आहे; जर व्यक्तीने प्रयत्न केला तर परत भेट होईल.

'पेटी जर कृपाचार्यांची... तर काल बिभीषण कसे भेटले? परत भेट!? म्हणजे परत बिभीषण भेटणार का? किंवा कृपाचार्यांसोबत बिभीषण असतील? हे काय आहे नक्की?' सिद्धार्थ विचार करून थकला होता. पण विचार थांबत नव्हते. त्याच्याही नकळत तो विचारांच्या नादात आकाशात वर सरकणाऱ्या सूर्याकडे टक लावून बघत होता. असा काहीसा वेळ गेला असेल आणि सिध्दार्थला जाणवलं की त्याच्या शेजारी कोणीतरी आहे. त्याने बाजूला नजर फिरवली. पण खूप वेळ सूर्याकडे बघितल्याने त्याच्या डोळ्यांसमोर काहीशी अंधारी आली होती. त्यामुळे शेजारी नक्की कोण आहे ते त्याला कळेना.

"कोण आपण?" सिध्दार्थने अत्यंत हळुवारपणे विचारलं.

उत्तर आलं नाही. ड्राईव्हरने सांगितल्याप्रमाणे त्याच्या मित्राला पाठवलं असावं असं वाटून त्याने हिंदीत तोच प्रश्न केला...

"कौन हो आप?" बोलताना सिद्धार्थ डोळे चोळत होता.

"सिद्धार्थ, आत्ताच तू ज्या श्लोकाचा अर्थ स्वप्रयत्नाने शोधलास; त्या श्लोकामध्ये उल्लेखलेले राजगुरू कृपाचार्य म्हणजे मी!"

एक धीरगंभीर आवाज सिध्दार्थच्या कानावर पडला आणि डोळे चोळायचे थांबवून किलकिल्या डोळ्यांनी सिध्दार्थने आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे बघण्याचा प्रयत्न केला.

"पुत्रा, काही क्षण डोळे घट्ट बंद कर आणि मग उघड. म्हणजे तुझी दृष्टी तुझ्या मनाप्रमाणे स्वच्छ होईल."

परत एकदा तोच आवाज.

त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे सिध्दार्थने डोळे घट्ट मिटले आणि उघडले..... ही कृती करायला जी तीन-चार सेकंद लागली त्यात त्याच्या मनात आलं.... जर ही व्यक्ती कृपाचार्य आहे; तर त्यांनी फक्त माझ्या डोळ्यांवर हात ठेवला असता तरी पुरेसं होतं की. त्यांच्याजवळ असलेल्या शक्तीमुळे मला नीटच दिसलं असतं. बस्! विचार आला आणि गेला. कारण तोपर्यंत त्याने डोळे उघडले होते आणि त्याला नीट दिसत देखील होतं.

समोर एक स्वच्छ शुभ्र धोतर आणि तसाच स्वच्छ कुर्ता घातलेली पांढरी दाढी असलेली अत्यंत तेजस्वी आणि तेवढीच गंभीर मुद्रा असलेली व्यक्ती बसली होती. त्यांच्याकडे पाहाताच सिध्दार्थचे डोळे मोठे झाले.... त्याने काही म्हणायच्या आत त्या व्यक्तीने त्याला 'थांब' अशा अर्थाची खूण केली आणि बोलायला सुरवात केली....

"पुत्रा... सिद्धार्थ..... तू स्वतः परस्परविरोधी विचार करतो आहेस याची तुला कल्पना आहे का? तू काही वेळापूर्वी तुझ्या प्रेयसीला जे सांगत होतास त्याचा सारांश हाच होता न की प्रत्येक कालखंडात घडणारी गोष्ट पुढे जाऊन काहीशी अपभ्रंशीत होते... त्याचं कारण काहीही असो.... आणि त्यामूळेच त्या सत्य घटनेकडे एक कपोकल्पित कथा अशा दृष्टीने पाहिलं जात. तुमच्या कालखंडात ज्याला जादू असं म्हणतात.... जी खरी हातचलाखी असते..... हे तुला माहीत आहे न? ही दोन्ही सत्य ज्ञात असूनही काही क्षणपूर्वी तुझ्या मनात इच्छा जागृत झाली होती की मी काहीतरी जादू करून तुझी दृष्टी परत पूर्ववत करावी. म्हणजे द्वापार युगातील कौरव-पांडवांचे गुरू; हस्तिनापुराचे राजगुरू; कृपाचार्य; यांनी तुझे डोळे नीट करावेत ही इच्छा म्हणजे तू स्वतःच्याच विचारांशी केलेली प्रतारणा नाही का? बालका; मी केवळ माझ्या युगाबद्दल सांगू शकतो... आणि हे नक्की आहे की त्या कालखंडात घडलेल्या अनेक घटना या अतिरंजित किंवा अविश्वसनीय वाटू शकतात.... परंतु तूच दिलेलं उदाहरण काहीसं वाढवून सांगायचं तर.... उत्तुंग व्यक्तिमत्व आणि देशहित परायण श्री शिवछत्रपती महाराज यांच्या कालखंडामध्ये जो निसर्ग होता; तो आता तुमच्या कालखंडामध्ये आहे का? त्याकालात क्षुधाशांतीसाठी जे अन्न भक्षण केलं जात होतं... त्यातील काही अंशी अन्न भक्षण आजचा मानव करू शकेल का? तद्ववत... काही हजार शतके पूर्व कालातील आम्ही जगलेलं प्रतिदिन जीवन वेगळंच असणार. त्यामुळे आमची शारीरिक आणि मानसिक जीवनाशक्ती वेगळी असणारच न?

त्या सर्वसाक्षी सर्वदाता परमेश्वराने... निसर्गाने.... जे दिलं ते आम्ही जपलं; जमेल तसं वृद्धिंगत केलं; त्याचं फलित काही अतींद्रिय शक्ती जागृत होण्यात झालं. वत्सा; आत्मविश्वास आणि स्वप्रजल्पनं.... स्वतःशी साधलेला संवाद.... ही दोन सुखी मानवीय आयुष्याची सत्य आहेत. मात्र आजचा मानव या दोन सत्यांपासून दूर जातो आहे; हे दुर्दैव आहे.

पंचमहाभूतांनी दिलेली शिकवण नाकारून आजच्या मानवाने स्वनिर्मितीची घमेंड करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आता ज्ञान हे दान आहे आणि दाता आणि युयुत्सु दोघेही आपापल्या जागी योग्य असणे आवश्यक आहे; हे सार्वभौम सत्य लयाला जाते आहे. अशा या काळामध्ये जिवीतकार्यहीन असे हे माझे जीवन मला किंकर्तव्यमूढ करते आहे. त्यागणे शक्य नाही आणि जगणे नाकारावे तर ते कोणापुढे या प्रश्नाने मी ग्रासलो आहे.

पुत्रा... सिध्दार्थ... तुझ्या या नवीन प्रवास कार्यामध्ये जर खरंच तुझी भेट त्या सर्वसाक्षी परमपित्याशी झालीच... तर माझ्या मनीची व्यथा उद्धकृत नक्की कर....."

समोरची व्यक्ती बोलायची थांबली आणि मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं ऐकणारा सिध्दार्थ काहीसा भानावर आला.

अचानक दूरवरून त्याला कोणीतरी हाक मारल्याचा भास झाला आणि अगदी नकळत त्याची मान वळली.... त्क्षणी त्याच्या लक्षात त्याची चूक आली होती...... परत गर्रकन समोर मान वळवली सिध्दार्थने... परंतु तिथे कोणीही नव्हतं... ज्याची त्याला जाणीव होती.

.......आणि बसलेल्या ठिकाणावरून शांतपणे उठून सिध्दार्थ टेकाड उतरून खाली जायला निघाला.

क्रमशः