Friday, June 28, 2019

आजोळच्या आठवणींची सोनेरी पानं



आजोळच्या आठवणींची सोनेरी पानं

आपल्या सर्वांच्याच लहानपणच्या आजोळच्या अशा काही ना काही आठवणी असतात. मामाच्या गावाला झुकझुक गाडीतून जातानाचं गाणं तर आपण सर्वांनीच लहानपणी अनेकदा म्हंटल असेल. माझ्या बाबतीत सांगायचं तर माझं आजोळ गिरगावातलं आणि माझा जन्म उपनगरातला. त्यामुळे आम्ही खरच कायमच लोकलने चर्नीरोडला उतरून मग चालत  जायचो सिक्का नगरला. आजोळी  माझी आज्जी, आजोबा, दोन मामा आणि एक मामी असे सगळे राहायचे. आमची मावस भावंड बेंगलोरला राहात असल्याने फारशी येत नसत. माझे दोन्ही मामा माझ्या आईपेक्षा लहान. त्यामुळे मी तिसरी किंवा चौथीमध्ये असताना एका मामाच लग्न झालं आणि दुसऱ्याच तर मी दहावीत असताना. त्यामुळे नातवंडं म्हणून आम्हीच होतो. म्हणून देखील लहानपणी आजी, आजोबा आणि मामा लोकांकडून सगळे लाड फक्त आणि फक्त आमचेच झाले.

माझी पहिली मामी आजही दिसायलाअत्यंत सुंदर आहे आणि त्याहूनही सुंदर तिच मन आणि स्वभाव आहे. त्यावेळी तर ती म्हणजे परीच वाटायची मला. माझी पहिली मैत्रिण अस देखील म्हणता येईल. त्याकाळात म्हणजे साधारण १९८९-९० मध्ये ती पार्लरमध्ये जाऊन केस कापायची. ही घटना माझ्यासाठी खूप मोठी होती. तिचं ते perfect साडी नेसणं आणि केसाला पिन्स लावण मी मन लावून निरीक्षण करायचे. ती कुठल्याश्या क्लासमध्ये काहीतरी शिकवायला जायची. घरून  निघताना आम्हाला सांगायची की अमुक एका वेळेला क्लास जवळ या दोघे. मग आम्ही शहाण्या मुलांसारखे तिथे जायचो. त्यानंतर आम्ही तिघे बस ने कधी 'म्हातारीचा बूट' तर कधी चालत 'चौपाटी' तर कधी 'गेट वे ऑफ इंडिया' ला जायचो. बाबूलनाथ देवळावरून जाताना तिथे असलेली कायमची गर्दी मला नेहेमी कोड्यात टाकायची. मामीला मी अनेकदा विचारलं देखील होतं; आपल्या सिक्कानगरच्या देवळात आणि या देवळात काय फरक आहे? इथे इतकी गर्दी असते.... मग तिथे का नाही? पण असे प्रश्न काही सेकंदांसाठीच मनात यायचे. मूळ आकर्षण तर म्हातारीच्या बुटाचं असायचं. त्यामुळे तिथे कधी एकदा पोहोचतो अस झालेलं असायचं. तिथे गेल्यावर मी आणि माझा भाऊ बऱ्यापैकी मस्ती करायचो. मग येताना भेळ, कुल्फी किंवा घराजवळ आलं की प्रकाशकडंच पियुष आणि साबुदाणा वडा ठरलेलं असायचं. कधी कधी सिक्कानगरच्या जवळच्या मंदिरांमध्ये मामी मला न्यायची. फणस वाडीतल व्यंकटेश मंदिर तर मला आजही आठवतं. ते मंदिर म्हणजे एखाद्या राजा सारख त्या परिसरात मिरवायचं. त्या मंदिरात संध्याकाळी प्रसाद म्हणून दही भात आणि भिसिबिली भात द्यायचे. तिकडचे पुजारी अगदी साऊथचा छाप होते. त्यांचं ते हेल काढून बोलणं आणि परत एकदा भाताची मूद वाढतानाचं ते कौतुकाने बघणं अजूनही आठवतं. अलीकडेच त्या मंदिराकडे जाण्याचा योग आला होता. पण आता तिथलं चित्र आगदी बदलून गेल आहे. कुठेतरी आत खोलात एक गरीब बिचारं दगडी मंदिर उभ आहे अस आता त्याच्याकडे बघताना वाटत होत.

आजोळी असलं  की रोज सकाळी लवकर उठवून आजी आम्हाला फडके मंदिरात न्यायची. ती कलावती आईंची उपासना वर्षानुवर्षे करायची. सुट्टीत ती आम्हाला देखील बालोपासना करायला लावायची. म्हणजे सकाळी मंदिरात जाऊन इतर मुलांबरोबर बसून लहान मुलांसाठी लिहिलेली स्तोत्रं म्हणायची. आजीच भजन वगैरे आटपेपर्यंत आम्ही मुलं मंदिराच्या आवारत किंवा मंदिराच्या व्हरांड्यात खेळायचो. आंता मात्र मंदिराचा व्हरांडा बार्स लावून बंद केला आहे आणि आवारात गाड्या लावलेल्या असतात.

आम्ही घरी यायचो तोवर आण्णानी (माझे आजोबा) बेकरीतून मस्त ताजी गरम बटर आणलेली असायची. ही खास फर्माईश माझ्या भावाची असायची. मे महिना असेल तर बटर बरोबर आंबा चिरलेला असायचा. आजोळच आंबा पुराण हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. कारण आम्ही तिथे गेलो की दुसऱ्याच दिवशी आण्णा बाजारातून एक पेटी आंबे आणायचे. त्याकाळची ती पाच डझन आंबे असलेली लाकडी पेटी बघितली की आमचे डोळे चमकायचे. मग आजी आणि मामी मिळून त्याचे खिळे काढायच्या आणि घराच्या त्या प्रशस्त पुरुषभर उंचीच्या खिडकीत एका चादरीवर ते आंबे पसरायच्या. मग काय सकाळी आंबा, दुपारी आणि रात्री जेवताना आंबा! आम्ही सारखे आंबे खायचो. आज जेव्हा माझ्या मुलींच  चिमणीसारख खाणं बघते त्यावेळी आमचं न मोजता हवतस आणि हवं तेवढं खाणं आठवून हसायलाच येतं.

फडके मंदिराच्या समोरच आण्णांच सोन्याच्या दागिन्यांचं दुकान होत. दिवसभरात माझी आणि माझ्या भावाची एक तरी फेरी दुकानात असायची. पण त्याचं कारण खास होतं. बाजूलाच गिरगावातलं प्रसिद्ध आवटेंच आईस्क्रीमच दुकान होत. आमच्या दुकानातल मागलं दार त्यांच्या किचनमध्ये उघडायचं. त्यामुळे आम्ही आवटे आईस्क्रीम आमचंच असल्यासारखं हक्काने मागच्या दाराने आत जाऊन हव ते आईस्क्रीम काढून घ्यायचो. त्याकाळात प्लास्टिकच्या बॉलमध्ये आईस्क्रीम भरलेलं असायचं. त्याच सर्वात जास्त आकर्षण असायचं आम्हाला.

त्याकाळी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये साहित्य संघात बरीच बालनाट्य असायची. आण्णा आम्हाला त्यांच्या लुनावरून तिथे सोडायचे. बरोबर खाऊचा डबा दिलेला असायचा. नाटक संपलं की मी आणि माझा भाऊ गायवाडीमधून चालत घरी परत जात असू. त्याकाळातली नाटकं अजूनही मनात घर करून आहेत. हिमागौरी आणि सात बुटके नाटकात दिलीप प्रभावळकर चेटकीण होते. त्यांनी त्यांची एन्ट्री सभागृहातल्या एकदम मागच्या दारातून घेतली. मोठ्याने चित्र-विचित्र आवाज काढत ते धावात स्टेजच्या दिशेने गेले. सभागृहातल्या आम्हा सगळ्या मुलांच्या छातीत तेव्हा धडकी भरली होती ती चेटकीण बघून. अनेक मुलं तर मोठ्याने किंचाळली होती. अशी कितीतरी नाटकं आम्ही तिथे बघितली. मी आणि माझा भाऊ अनेकदा हट्ट करून मुद्दाम लवकर आयचो तिथे. अजून नाटकाचा सेट लागत असायचा. त्यामुळे तो भव्य सेट बघता यायचा. एका वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटायचं तेव्हा. बालनाट्य सृष्टीचा सुवर्णकाळ अक्षरश: जगलो आम्ही.

गिरगावातल्या त्या गल्ल्या.... ती चाळ संस्कृती. लहानात लहान सण असो किंवा कोणाच्याही घरातला समारंभ असो... सगळे एकत्र येऊनच साजरा करायचे. त्याकाळात गम्मत म्हणून वर्गणी काढली जायची. वर्गणी म्हणजे 'दिलंच पाहिजे;' असं अकाउंट नव्हतं तेव्हा.

आज चाळींमधल्या मोकळ्या जागेत दुचाकी-चारचाकी लावलेल्या असतात. पूर्वी तिथे शनिवारी रात्री दिवे लावून क्रिकेटच्या मॅचेस व्हायच्या. गणपतीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. संक्रांतीला गच्चीत सगळे मिळून पतंग उडवायचे. त्याकाळी देखील तिथे गुजराती लोकांचं वास्तव्य जास्त होत. मग 'जलेबी अने फाफडा' ची टेबलं लागायची गच्चीत. कोणीही यावं आणि हवं तितकं खावं. एक वेगळीच धम्माल असायची त्यात. तीच धम्माल आम्ही कायम अनुभवली ती गोपालकाल्याच्या वेळी. वेगवेगळी स्थिरचित्रं बनवलेले रथ आणि दही-हंडी फोडण्यासाठी निघालेल्या पथकांचे ट्रक्स. मग ज्यांची घरं रस्त्याच्या बाजूने असायची त्यांच्या घरी सगळ्या मुलांची गर्दी व्हायची. घरातल्या बादल्यांमधून पाणी भरून आणून त्या पथकांवर टाकायची आणि घरात चिखल करून टाकायचा. पण कधी कोणाची आई रागावल्याचं नाही आठवत. दिवाळीच्या वेळी कोणत्या मजल्यावर कोणत्या रंगाचे आकाशकंदील लावले जातील याची चर्चा रात्र-रात्र व्हायची. मग ते एकत्र जाऊन कंदील आणणं.... फटाकेसुद्धा असे एकत्रच उडवले जात. आजच्या सारखं नव्हतं तेव्हा. अलीकडे बघते तर आई-वडीलच सांगतात मुलांना त्यांच्या घरातले उडवून होऊ देत मग आपण जाऊ फटाके उडवायला. 'सर्वांनी मिळून' संपून 'आपलं-तुपलं' कधी आपल्या मनात आणि घरात शिरलं ते बहुतेक आपल्यातल्या अनेकांना कळलं देखील नसेल.

मात्र त्या आजोळच्या.... गिरगावातल्या.... सोनेरी आठवणी आजही मनाच्या कस्तुर कुपीमध्ये दरवळतात.

ते बालपणीचे रम्य क्षण आजही सुखावून जातात. शाळा संपली आणि कॉलेज सुरु झाल्यावर मात्र दर सुट्टीतलं गिरगावात जाण कमी झालं. आता तर तिथे इतके मोठे मोठे बदल झाले आहेत; की पूर्वीचं गिरगाव त्यात हरवूनच गेलं आहे. आता आजोळी जाणं हे फक्त काही ना काही समारंभाच्या निमित्तानेच होतं. क्वचित कधीतरी मुद्दाम ठरवून माझ्या अजूनही खुप सुंदर दिसणाऱ्या आणि खूप खूप प्रेमळ मामीला भेटायला जाते. तिथे गेलं की जुन्या आठवणीमध्ये हरवून जाते. परत एकदा ते दिवस जगावेसे वाटतात.... आणि मनात येत राहातं...... जाने कहां गये वो दिन!!!


Friday, June 21, 2019

नवीन नात्यांना समजून घेण्यातली गरज!

नाती म्हटलं की आपल्या मानत रक्ताची नाती उभी राहातात. पण ही रक्ताची नाती मुळात निर्माण होतात ती एका विश्वासाच्या नात्यामुळेच. पती-पत्नीचं नातंच मुळी केवळ प्रेम आणि विश्वास यावर उभं राहातं. अर्थात पुढे जाऊन त्यात प्रेम किती आणि विश्वास किती हे मोजणं अवघड जातं. अनेकदा अनेक जोडप्यांमध्ये लग्नाच्या काही वर्षांनंतर प्रेम किंवा विश्वास उरतोच असं देखील नाही. तर लग्नानंतर निर्माण झालेल्या अनेक नात्यांच्या गुंतागुंतीमुळे हे पती-पत्नीचं नातं सांभाळून घेतलं जातं किंवा टिकवलं जातं. सुरवातीच्या काळातले गुलाबी ढग संपता-संपता नवीन पाहुण्याची चाहूल असते. येणाऱ्या बाळाबरोबरच होणाऱ्या आई-बाबांचं आयुष्य बदलतं. त्यात जर घरात इतर मंडळी असतील तर मग सुरू होते खरी भावनिक लढाई. सांभाळावी लागणारी सगळीच नाती.... आपली नोकरी किंवा व्यवसाय... सण-वार.... पै-पाहुणा... यातून मग एकमेकांना फारसा वेळ देता येतोच असं नाही. त्यातून कधी कधी होणारी भावनिक कुचंबणा ही दोघांचीही असते. केवळ पत्नी/आईच सगळं सांभाळत असते असं माझं मत नाही; तर अनेकदा पती/वडील देखील अनेक भावनिक दोलायमानतेतून जात असतात. या सगळ्याचा परिणाम मूळच्या पती-पत्नी या नात्यावर नकळतपणे होत असतो. पहाता-पहाता दिवस-महिने-वर्ष संपतात. मुलं मोठी होतात आणि त्यांच्या आयुष्याच्या मार्गी लागतात. पण तोवर पती-पत्नींमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला असतो. एकमेकांबरोबर ते असतात तर खरे.... सहली.... मित्र-मैत्रिणींबरोबर भेटी-गाठी.... सण-समारंभ एकत्र साजरे करणं सगळं अगदी बिनबोभाट चालू असतं. पण मनाचं जोडलेलं असणं तितकंच महत्वाच नाही का? अनेकदा ते अभावानेच दिसतं. सवईमुळे एकमेकांची घेतलेली काळजी... किंवा आता या वयाला येऊन मी एकटी पडेन किंवा एकटा पडेन म्हणून साथीदाराला सांभाळणं वेगळं आणि मनात असलेल्या प्रेमामुळे सोबत असणं वेगळं. अर्थात हे 'प्रेम' प्रत्येकानं आपलं आपण ठरवायचं असतं.

लग्न! केवळ शिक्षण पूर्ण करून नोकरी-धंद्याला लागलं....वयात आलं....प्रेम केलं.... म्हणून करतो आपण. आपली मानसिकताच ती असते. पण कधी कोणी असा विचार का नाही करत.... सोबत राहण्यासाठी.... आयुष्य एकत्र समरसून जगण्यासाठी लग्न करावं. मुलं जन्माला घालणे.... माझ्या/तुझया आईवडिलांना सांभाळणे.... आर्थिक जवाबदऱ्या एकत्र सांभाळणे हे लग्नाचे मुद्दे का असावेत? काही दिवसांपुर्वी एका बावीस वर्षाच्या मुलीने मला सांगितले की मी आता हळूहळू माझ्या करियरमध्ये काहीतरी करायला लागले आहे. अजून थोडा वेळ लागेल पण मला माहीत आहे की मी पुढे जाऊन नक्की यशस्वी होईन. माझ्या आई-वडिलांची मला साथ देखील आहे. सगळं छान चालू आहे पण अलीकडे आई-बाबांना माझ्या लग्नाची काळजी लागून राहिली आहे. खर सांगू का मला तर वाटतं की मला आयुष्यात पुरुषाची आधारासाठी गरजच नाही. पण सुखी समाधानी आयुष्यासाठी सोबती हवा आहे; आयुष्य परिपूर्णतेने जगण्यासाठी सोबत हवी आहे. पण म्हणून लग्नाचा अट्टहास नाही करायचा मला. इतकी वर्षे मी माझ्या आई-वडिलांबरोबर राहिले त्यांची तत्व-त्यांचे विचार... या घरातल्या सवई सोडून आणि केवळ लग्न केलं म्हणून एखाद्या मुलाच्या घरातले विचार-आचार मान्य करायचे हे मला पटत नाही आहे. अर्थात त्याचा अर्थ मी केवळ स्त्रीवादी विचारांची किंवा मुक्त नात्यात राहण्याच्या विचारांची आहे अस देखील नाही. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की लग्न करताना आयुष्य जोडीने जगावं... लग्नामुळे येणाऱ्या नवीन जवाबदऱ्या दोघांनी सांभाळून आपल्या वयाला आवश्यक असे मोकळे श्वास देखील दोघांनी अनुभवावेत. केवळ लग्न झालं म्हणून आपल्या मित्र-मैत्रिणींना दोघांनीही तिलांजली द्यायची गरज नाही... मात्र लग्नाच्या बंधीलकीला विसरायचं नाही.

काहीसे पटले मला तिचे विचार. पण इतके आदर्शवादी संसार आपल्या आजूबाजूला होताना आपण बघतो तरी का? लग्न म्हणजे 'जुळवून घेणे' असं अजूनतरी आपल्या समाजात आहे. दुर्दैवाने अजूनही आपण घरच्या कर्त्याची भूमिका केवळ पुरुषाकडे देतो. त्यामुळे अनेकदा पुरुष त्यांच्या खऱ्या वयापेक्षा जास्त मोठे वाटतात; आणि याउलट स्त्रीची तिची हुशारी... समजूतदारपणा तिने किती वर्षे संसार केला आहे यावर ठरवला जातो. त्यामुळे तसे म्हंटले तर दोघांवरही अन्यायच नाही का? मुलगा त्याच वय विसरून जातो... आणि वयाबरोबर गुलाबी ढगसुद्धा... मुलगी मात्र जवाबदारी नसल्यामुळे अडकून राहाते स्वप्नांच्या राज्यात!

.... आणि मग मी वर म्हंटल्याप्रमाणे अनेकदा अनेक जोडप्यांमध्ये लग्नाच्या काही वर्षांनंतर प्रेम किंवा विश्वास उरतोच असं देखील नाही. मात्र आजची पिढी थोडी वेगळी आहे... काहीशी स्वतंत्र विचारांची आहे.... मागील पिढीमध्ये लग्नाची बोलणी होताना जवाबदाऱ्यांची जंत्री मोजली जायची. मात्र आजच्या पिढीमध्ये वयक्तिक आणि जोडीदाराच्या स्वप्नांचा अगोदर विचार करण्याची प्रवृत्ती वाढते आहे.

मला वाटतं बदल होतो आहे.... चांगला की वाईट हे काळच ठरवेल... पण बदल होणे ही समाजव्यवस्थेची गरज आहे. त्यामुळे आजच्या लग्नाळू मुलांच्या आणि मुलींच्या पालकांनी त्यांच्या विचारांना समजून घेणं आवश्यक आहे. 'आमच्या वेळी असं नव्हतं.' 'लग्न म्हणजे adjusments आणि जवाबदऱ्या'; हे सांगणं थांबवलं पाहिजे. थोडं त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ दे की! आपल्याला खूप काही करायचं होतं... कदाचित आपण नाही करू शकलो... पण आजची मुलं प्रयत्न करत आहेत... तर करू देत की! त्यांच्या पाठीशी उभं राहून 'क्या जमाना बदल राहा हे?' हा प्रश्न विचारण्यापेक्षा... 'हा... जमाना बदल रहा हें; मैं साक्षीदार हूं!' असं म्हणायला काय हरकत आहे.

Friday, June 14, 2019

२०१९ च्या निवडणुकीचं यश.... कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून

२०१९ च्या निवडणुकीचं यश.... कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून

राहुल गांधी यांना हरवून जायंट किलर ठरलेल्या स्मृती इराणी यांच्या अनेक मुलाखती झाल्या. त्यातल्या एका मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आलेला प्रश्न तसं बघितलं तर अगदी ओघातला होता. मात्र स्मृती इराणी यांचं उत्तर मला काहीसं अंतर्मुख करून गेलं.

प्रश्न होता : २०१९ च्या निवडणुकीची तयारी आपण कधीपासून सुरू केलीत?

त्यावरचं स्मृती इराणी यांचं उत्तर फारच मार्मिक होतं. त्या म्हणाल्या;"मोदीजींनी २०१४ पासूनच २०१९ ची तयारी सुरू केली होती."

प्रश्नकर्त्याला कदाचित काहीतरी वेगळं उत्तर अपेक्षित असावं किंवा स्मृतिजींना शब्दात पकडण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा असावी किंवा कदाचित स्मृतिजींचं उत्तर प्रश्नकर्त्याच्या लक्षातच आलं नसावं. कारण त्यांनी तोच प्रश्न परत दोन वेळा विचारला आणि तरीही स्मृतिजींचं उत्तर तेच होतं. साहजिक आहे... कारण भारतीय जनता पक्षाने खरोखरच २०१९ ची तयारी २०१४ मध्ये सुरू केली होती. किंबहुना असं म्हणता येईल की निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता देखील एकप्रकारची वेगळीच कार्यप्रणाली भारतीय जनता पक्षाने पक्षाच्या अगदी सुरवातीपासूनच्या बांधणीच्या वेळेपासून आत्मसाद केली आहे. याच प्रणालीचा उल्लेख आदरणीय श्री नरेन्द्र मोदी यांनी त्यांच्या २३ मे २०१९ च्या विजया नंतरच्या भाषणात ओझरता केला होता. ते म्हणाले होते;'अब सब जान जाएंगे पन्ना प्रमुख का महत्व क्या होता हें!' त्याच दिवशीच्या श्री अमित शहा यांच्या भाषणात देखील त्यांनी बूथ मधील कार्यकर्त्यांच्या मेहेनातीचा उल्लेख केला होता. त्याहूनही खास गोष्ट म्हणजे श्री नरेंदजी मोदी यांनी या कार्यपद्धती प्रमाणे काम करण्याबद्दल केवळ २०१९ च्या विजयी भाषणात उल्लेख केला अस नाही; तर या अगोदरच ही प्रणाली पक्षीय कार्यकर्त्यांनी अमलात आणली पाहिजे हे सांगितले होते. भारतीय जनता पक्षाने श्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम खांद्यांवर २०१४ च्या निवडणुकीची जवाबदारी २०१३ मधील राष्ट्रीय बैठकीत दिली. त्याचवेळी मोदीजींनी 'पन्ना प्रमुख' प्रणालीचे पुनरुत्थान केले होते. (त्यांच्या संपूर्ण भाषणातील या प्रणाली संदर्भातील उल्लेख : चुनाव के विजय का गर्भादान पोलिंग बूथ मे होता हे। पोलिंग बूथ विजय की जननी होती हें। और जो जननी होती हें उसकी हिफजत करना हमारा दायित्व होता हें। इसलीये पोलिंग बूथ की हिफजत हो; पोलिंग बूथ की चिंता हो; पोलिंग बूथ जितनेका संकल्प हो; इस संकल्प को लेकर आगे बढे और भारत दिव्य बने; भारत भव्य बने इस सपने को साकार करने के लिये देशवासींयो की शक्ती को हम साथ मिलकर कर के व्होट मे परिवर्तित करे।)


मात्र २०१४ मध्ये लगेच निवडणुका असल्याने त्यावेळी ही प्रणाली म्हणावी तशी कार्यरत झाली नव्हती. तीच प्रणाली श्री अमित शहा यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची सूत्र हातात घेतल्यावर सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पूर्ण शक्तीनिशी राबवण्यास सांगितले.


सर्वसामान्यांना कदाचित हे 'पन्ना प्रमुख' प्रकरण माहीत नसेल. त्यामुळे मोदींजिंच्या २०१९ च्या विजयोत्तर भाषणातील हे एक वाक्य सहसा कोणाच्या लक्षात देखील आलं नसेल. मात्र भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना; विशेषतः ज्यांनी यासाठी मेहेनत घेतली आहे अशा कार्यकर्त्यांना; त्या वाक्यातील अर्थ आणि त्यामागे दडलेलं यश नक्कीच समजलं असेल. २५ मे २०१९ रोजीच्या NDA च्या खासदारांसमोरील भाषणात देखील मोदीजींनी परत एकदा म्हंटले की २०१९ च्या निवडणुकीचे यश हे त्यांचे किंवा कोण्या एका व्यक्तीचे किंवा राजकीय पक्षांचे नसून ते काम केलेल्या कार्यकर्त्यांचे आणि पर्यायाने लोकांचे आहे. त्यांच्या या सांगण्यामागील मतितार्थ जर आपणास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला मुळात पन्ना प्रमुख म्हणजे नक्की काय ते समजून घ्यावे लागेल. म्हणजे मग एकूणच ही प्रणाली समजणे सोपे जाईल.

अगदी साध्या शब्दात सांगायचं तर आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे का हे आपण तपासून पाहात असतो. ही प्रत्येक मतदार यादी प्रत्येक बुथप्रमाणे केलेली असते. आपण मतदान केंद्रावर ज्या खोलीमध्ये मतदानासाठी जातो तो आपला बूथ असतो. सर्वसाधारणपणे या एका बुथमध्ये आठशे ते बाराशे मतदार असतात. म्हणजे साधारणपणे तीनशे ते चारशे घरे. या सर्व मतदारांशी संपर्कात राहणे हे खरे तर लोकप्रतिनिधीचे (नगरसेवक) काम. मुंबईसारख्या शहरांमध्ये एका प्रभागात साधारण पन्नास ते पंचावन्न बूथ असतात. म्हणजे साधारण १५००० ते २०००० घरांशी संपर्क असणे गरजेचे असते. हे झाले मुंबईसारख्या शहरांमधील एका प्रभागाबद्दल. राज्यस्तरीय लोकप्रतिनिधीला (आमदार) असे किमान सात प्रभाग असतात; ज्याला आपण विधानसभा म्हणतो. केंद्रीय प्रतिनिधीला (खासदार) अशा सात विधानसभा असतात. या नागरिकांना येणाऱ्या अडचणींचे प्रतिनिधित्व या लोकप्रतिनिधींना त्यांच्या स्तरावर करायचे असते.

सर्वसाधारणपणे विचार केला तर केवळ प्रभाग प्रतिनिधीलाच (नगरसेवक) १५००० ते २०००० हजार घरांचा सतत संपर्क करणे कितीतरी अवघड असते. मग राज्यस्तरीय लोकप्रतिनिधी (आमदार) आणि केंद्रीय प्रतिनिधींना (खासदार) नक्कीच ते काम अजूनच अवघड असू शकते. अर्थात प्रभाग प्रतिनिधी (नगरसेवक) हा दैनंदिन गरजांसाठी सहज उपलब्ध असतो. राज्यीय विकास आणि अधिनियम तयार करणे हा राज्यस्तरीय लोकप्रतिनिधींच्या (आमदार) कामाचा भाग असतो; तर आपल्या जिल्ह्यातील विकास विषय आणि इतर राष्ट्र किंवा देश स्तरावरील समस्या केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे काम केंद्रीय प्रतिनिधी (खासदार) करत असतो. मात्र यासर्वसाठी लोकसंपर्क फार महत्वाचा असतो.

म्हणून मग भारतीय जनता पक्षाने हाच लोकसंपर्क लोकप्रतिनिधींसाठी आणि लोकांसाठी देखील सोपा व्हावा म्हणून एक प्रणाली खूप पूर्वीच विकसित करून ठेवली आहे. या प्रणालीमध्ये सात ते आठ बूथ मिळून एक शक्तिकेंद्र गठीत केले जाते. या शक्तिकेंद्राचा एक शक्तिकेंद्र प्रमुख असतो. प्रत्येक बुथमध्ये एक स्थानीय समिती संघाटीत केली जाते. या स्थानीय समितीचा एक प्रमूख असतो आणि त्याच्या सोबत त्या स्थानीय समितीमध्ये सदस्य असतात. तेथील शक्तिकेंद्र प्रमुखाचा आणि स्थानीय समिती प्रमुखाचा लोकांशी असणारा संपर्क यातून किती सदस्य असू शकतात ते ठरते. इतके जास्त सदस्य तितके जास्त जनसंपर्क करणे सोपे. शहरांचा विचार केला तर प्रत्येक इमारतीमधून एक असे आणि गावांचा विचार केला तर साधारण पन्नास घरे मिळून असे साधारण वीस ते पंचवीस सदस्य या समितीमध्ये असतात. या सदस्यांकडे त्यांच्या इमारतीची/घरांची जवाबदारी असते. म्हणजे लोकांच्या अडचणी त्यांनी बूथ प्रमुखापर्यंत पोहोचवायच्या असतात; बूथ प्रमुख शक्तिकेंद्र प्रमुखापर्यंत हे काम पोहोचवतो आणि शक्तिकेंद्र प्रमुख प्रभाग अध्यक्ष किंवा लोकप्रतिनिधीपर्यंत ते काम पोहोचवतो. यामुळे लोकप्रतिनिधींनी करायचे काम हे त्यांच्यापर्यंत सहजपणे पोहोचवले जाते आणि त्यामुळे त्या कामाचे परिणाम लवकर आणि चांगले दिसून येतात. त्याचप्रमाणे जर पक्षीय कार्यक्रम शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर याच शिडीचा उपयोग करून घेताला जातो.

आपणा सर्वांनाच माहीत आहे की २०१९ च्या निवडणुकीच्या तयारीसंदर्भात श्री अमित शहा यांनी विविध राज्यातील कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी ते जेवले किंवा भेटायला गेले आहेत; असे फोटो किंवा अशा मथळ्याची माहीती देखील आपण वाचली/पाहिली असेल. सर्वच प्रकारच्या प्रचार माध्यमांनी यावरील चर्चा खूपच जास्त केली होती त्या काळात. अगदी ममतादिदींच्या पश्चिम बंगालमध्ये नक्सलबारी नामक विधानसभेतील (जेथून नक्षलवादाला सुरवात झाली आणि त्या विधानसभेच्या नावानेच त्या लोकांच्या कृतीला ओळखले जाते) पाच ते सहा कार्यकर्त्यांच्या घरी श्री अमित शहा एप्रिल २०१७ मध्ये गेले होते. तसेच मे २०१७ महिन्यात देखील लक्षद्वीप येथील कवरत्तीद्वीप येथील तीन घरी जनसंपर्क अभियाना अंतर्गत भेट दिली होती. (या दोन भेटी केवळ उदाहरणा दाखल इथे देते आहे. अशा प्रकारचा जनसंपर्क श्री अमित शहा यांनी कायम ठेवला आहे.) म्हणजेच २०१९ च्या निवडणुकीची तयारी श्री अमित शहा यांनी खरच खूपच अगोदर सुरू केली होती. आणि स्वतःच्या कृतींमधून इतर कार्यकर्त्यांना देखील तोच संदेश दिला होता. ज्यावेळी आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अगदी खालपर्यंत पोहोचतात हे पक्षातील कार्यकर्त्यांच्या लक्षात आले त्यावेळी त्यांना देखील स्वतःच्या जवाबदारीची जाणीव झाल्याशिवाय राहिली नाही. यातूनच बूथ मजबूत करण्यासाठी जे काही करावे लागते ते प्रत्येक कार्यकर्त्याने मनावर घेतले. या जनसंपर्क अभ्यानाच्या बातमीची किती चर्चा झाली याला तोड नाही. गम्मत म्हणजे या भेटीचे वेगळे अर्थ आता समजत आहेत. हे सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणजेच 'शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख किंवा पन्ना प्रमुख' असे होते; हे केवळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच माहीत असेल.

निवडणुकीच्या पूर्वी श्री मोदी यांनी विविध राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या बूथ स्तरीय कार्यकर्त्यांशी केलेला थेट संवाद देखील कदाचित आपण सर्वांनी पहिला/ऐकला असेल. कारण त्याला देखील दृक्श्राव्य मीडियाने खूपच महत्व दिले होते. यातून भारतीय जनता पक्षाचे अत्यंत सोपे आणि तरीदेखील अत्यंत महत्वाचे धोरणच अधोरेखित होते. ज्यावेळी पक्षातील सर्वोच्च पदावरील नेते सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधतात त्यावेळी त्या पक्षाचे यश नक्कीच अधोरेखित झालेले असते.

वरती उल्लेख केलेल्या २०१३ च्या श्री मोदी यांच्या भाषणातील वाक्याचा अर्थच जणू ते दोघे पुढील पाच वर्ष जगले आहेत. (श्री मोदी : चुनाव के विजय का गर्भादान पोलिंग बूथ मे होता हे।) श्री मोदीजींना यातून पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हेच सांगायचे होते की; 'भारतीय जनात पक्ष देशभरात कसा जिंकतो याची काळजी तू करू नकोस. तू फक्त तुझ्या बुथची काळजी कर. तुझ्या बूथ मधील प्रत्येक घरात तू पोहोचला पाहिजेस. प्रत्येक घरात आपले सरकार काय काम करते आहे ते पोहोचले पाहिजे. जर त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या समजून घे आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न कर. त्यांचा विश्वास जिंक आणि मग मतदानादिवशी हे सर्व मतदार मतदान करायला बाहेर पडतील असं बघ. हे मतदान नक्की आपल्या पक्षासाठी असेल. तू बूथ सांभाळ. देशात आपला पक्ष नक्की जिंकेल.'

यामधील 'सरकार काय करते आहे ते प्रत्येक घरात पोहोचव;' हा कळीचा मुद्दा आहे. २०१४ पासून ते २०१९ पर्यंतच्या पाच वर्षांच्या काळात पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या विकासासाठी अनेक नवीन योजना आणल्या. श्री मोदींजींच्या मनातील भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या लोक कल्याण योजनांच्या लाभारतींपर्यंत प्रत्येक बुथमधील कार्यकर्ते पोहोचले. त्याशिवाय मोदीजींनी जुन्या योजनांचे पुनरुज्जीवन केले; त्याची माहिती देखील या कार्यकर्त्यांनी मोकळेपणी सर्वांसमोर मांडली. देशाच्या सीमारेषा सुरक्षित व्हाव्यात यादृष्टिकोनातून देखील अनेक महत्वाचे निर्णय मोदींच्या सरकारने घेतले. भारताला कमजोर देश समजणाऱ्या शेजारच्या देशांच्या मनात दहशत निर्माण होईल असे निर्णय घेण्यास लष्कराला मोकळीक दिली. मोदींच्या सरकारवर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. हे सर्व सत्य शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही प्रणाली उपयोगी झाली. सर्वोच्च नेता आणि तळातील कार्यकर्ता किंवा सर्वसामान्य नागरिक असा थेट संवादच श्री मोदीजींनी स्थापित केला. आणि हा संवाद योग्य प्रकारे होतो आहे की नाही हे बघण्याची काळजी श्री अमित शहा यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय स्तरावर घेतली.

महाराष्ट्रामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा भार सांभाळून देखील पक्षीय जवाबदारीचे संपूर्ण भान ठेवत हा संवाद बुथमधील प्रत्येक कार्यकर्ता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतो आहे की नाही हे जातीने बघितले. त्याचेच फळ म्हणजे २०१९ चा भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशभरातील विजय! जिथे सर्वच राजकीय तत्ववेत्त्यांचे अंदाज कमी पडले.... आणि श्री राहुल गांधी, श्रीमती सोनिया गांधी आणि राजकारणात नवीनच पदार्पण केलेल्या श्रीमती प्रियांका वड्रा यांना काय झाले ते कळलेच नाही.

Friday, June 7, 2019

Being ALONE n not LONELY!



Being *ALONE* n not *LONELY*!



एक सांगू का? आपण सगळेच एक साचेबंद आयुष्य जगत असतो. आपले आई-वडील हौसेने आपल्याला जन्माला घालतात... लहानपणी शाळा... तरुणपणी कॉलेज... मग एखादी चांगलीशी नोकरी किंवा व्यवसाय.... यथावकाश लग्न. असा सरधोपट मार्ग आपल्यापैकी बहुतांशी सगळेच जगतो. पुढे आपण देखील हौसेचे आई-वडील होतो. साधारण एवढ सगळ होईपर्यंत आपण पस्तिशीत पोहोचलेलो असतो. अर्थात अजून आर्थिक स्थिरता मनासारखी साधलेली नसतेच.... मग थोडं सुखासीन आयुष्य जगण्याच्या इच्छेने म्हणा किंवा नोकरी-व्यवसायातल्या कॉम्पिटीशनला तोंड द्यायचं असत म्हणून म्हणा आपण पळत असतो. अचानक कधीतरी आपल्या लक्षात येत की आपण पंचेचाळीशी गाठली देखील. आता थोडं सोपं झालय आयुष्य. मुलं मोठी झाली आहेत. त्यांचं असं एक विश्व आहे. मात्र आपण त्या विश्वाचा एक लहानसा भाग आहोत फक्त. आपली बायको/नवरा देखील काहीसे त्यांच्या आयुष्यात रमले आहेत. हळूहळू कुठेतरी मनात एकटेपणा जाणवायला लागतो. BEING LONELY feel!


मग आपण देखील कधीतरी हळू हळू जुने मित्र-मैत्रिणी शोधायला लागतो. क्वचित् कधीतरी होणारे फोन्स अधून-मधून व्हायला लागतात. ग्रुप्स तयार होतात. भेटी ठरायला लागतात. मुलाचं चाललेलं शिक्षण, त्यांचे आणि आपले देखील पुढील करियर प्लान्स हे विषय सुरवातीला हमखास असतात. हळूहळू आपल्याला या जुन्या मैत्रीतला मोकळेपणा आवडायला लागतो. भेटी वाढायला लागतात; आणि जुने दिवस गप्पांच्या ओघात येतात. मग चर्चा काहीशी बदलते....


"यार तू कसला झक्कास गायचास रे शाळेत. शिकत देखील होतास न? मग पुढे काय झालं?"


"सोड यार. दहावीत चांगले मार्क्स हवे होते. म्हणून मग सोडल गाण-बिण. आणि नंतर वेळच नाही मिळाला. पण तानसेन नसलो तरी आपण पक्के कानसेन आहोत हा. solid collection आहे आपल्याकडे. ये एकदा दाखवतो."


"ए तू कायम नाटकांमध्ये भाग घ्यायचीस ग. तेव्हा तर असच काहीतरी करायचं आहे अस म्हणायचीस? पुढे काहीच नाही केलंस?"


"पुढे काय करणार ग? कर्म माझ! अग ते त्या वयातले बालिश विचार होते. बी. कॉम. नंतर बँकेत लागले... आता ऑफिसर आहे. नाटक-बिटक बहुतेक नसत जमल मला. पण आता एकही चांगल नाटक सोडत नाही ह बघायचं. किमान अशी तरी हौस भागवून घेते."


"अबे तू शाळेत एम. एफ. हुसेनला लाजवेल अशी चित्र काढायचास. आता काय फक्त खर्डेघाशी?"


"यार! इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली आणि मग राहूनच गेल हे सगळ."


हे असे विषय होतात. आणि मग कधीतरी आपल्याला वाटायला लागत खरच आपल्याला काहीतरी छंद होतेच की. मग बायकोशी/नवऱ्याशी गप्पा मारताना किंवा ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी बोलताना आपण सांगतो आपली ती लहानपणी बघितलेली स्वप्न. अशा गप्पांमध्ये कोणीतरी सहज म्हणून जातं;" अरे वेळ नाही गेली अजून. त्यात करियर नाही केलस तरी चालेल, पण छंद आहे तर आता चालू कर की." त्याक्षणी  ऐकून न ऐकल्यासारखं करत असलो तरी खोल मनात आपण देखील तो विचार करायला लागतो. नकळत कधीतरी आवडणाऱ्या छंदाचा क्लास जवळपास शोधतो आणि जमेल तसं... जमेल तेव्हा आपली हौस पुरवून घ्यायला लागतो. अलीकडे अचानक जाणवायला लागलेला एकटेपणा अचानक नाहीसा होतो. स्वतःत हरवून जायला लागतो आपण... कदाचित जागायला शिकतो आपण.... अगदी नकळत!


.... आणि मग पुढच्यावेळी जेव्हा तेच जुने मित्र-मैत्रिणी भेटतात तेव्हा हौसेने त्यांना या नवीन  हौसेची माहिती देतो. एक वेगळाच आनंद असतो या परत एकदा सुरु केलेल्या छंदात. हरवून जायला लागतो आपण त्यात. मग आपल्यातच हरवून जातो आपण. खूप खुश राहायला लागतो. मनातला एकटेपणा नकळत कमी झालेला असतो.... आणि अनेकदा सोबत नसूनही आपण दुःखात नसतो.


THAT'S WHAT I CALL BEING ALONE AND NOT LONELY!!!



स्वतःत हरवून जाणं................... एकटेपणात नाही!!!


मग? तुमचा काय छंद आहे? केलीय का सुरवात? नाही? मग कधी करणार?