Friday, November 29, 2019

तो (गूढ कथा)(भाग १)



तो (भाग १)

'कधी सावरणार ही त्या धक्यातून कोण जाणे? जागा बदलली तर किमान जुन्या आठवणींपासून तिची सुटका होईल अस वाटल होत मला. पण इथेसुद्धा तो शेजारच्या जोशी काकूंच्या व्हरांड्याला झोपाळा बघितल्या पासून ही अजूनच गप्प झाली आहे. बरं, हिला कितीवेळा सांगितलं त्या बाजूच्या खिडकीकडे फिरकूसुद्धा नकोस. तर मी असताना नाही जात. पण मी नसलो की त्याच खिडकीत जाऊन बसलेली असते बहुतेक. काल जोशी काका भेटले होते ते म्हणाले,'संध्या खिडकीत दिसली म्हणून हिने हाक मारली; पण तिने उत्तर नाही दिलं.' मी म्हंटल, 'तिच लक्ष नसेल हो काका.' तर म्हणाले, 'अरे लक्ष होतं. आमच्या व्हरांड्यातल्या झोपाळ्याकडेच बघत होती ती बहुतेक. पण बाजूला उभ्या असलेल्या हिच्याकडे बघायला तयार नाही.' यावर मी काय बोलणार? 'हो का? बोलतो तिच्याशी.' अस उत्तर देऊन निघालो. तरी बरं त्यांना सगळं सांगितलं आहे मी अगोदरच. त्यामुळे ते देखील समजुतीने घेतात. फार प्रश्न नाही विचारत मला.' अस म्हणून अशोकने फोन ठेवला आणि घराकडे निघाला.

अशोकला पब्लिक बूथ मधून बाहेर पडताना जोशी काकांनी बघितलं होतं. पण ते त्याला सामोरे नाही गेले. कारण आदल्या दिवशी त्यांनी जेव्हा संध्याचा उल्लेख केला तेव्हा अशोकचा अस्वस्थ झालेला चेहेरा त्यांच्या नजरेतून सुटला नव्हता. उगाच कशाला त्याच्या दुखऱ्या मनाला अजून त्रास द्यायचा म्हणून तो जाईपर्यंत ते आडोशाला थांबले आणि मग किराण्याचं सामान घ्यायला दुकानात गेले. भानूशेटने जोशी काकांना बघून शेजारची खुर्ची पुढे केली. कारण काका सामान घ्यायला आले की थोडावेळ बसून भानूशेट बरोबर चहा घेत आणि थोड्या गप्पा मारून मगच निघत. काकांनी सामानाची यादी दिली ती नोकराच्या हातात देत शेटजी म्हणाले,"काय काका? कसे आहात?" खुर्चीवर बसत काका म्हणाले,"चालल आहे शेटजी. आम्ही काय म्हातारी खोडं. जोवर आहोत तोवर आहोत. बर एक सांगा... हा आत्ता इथून गेला तो मुलगा नेहेमी येतो का हो फोन करायला?" शेटजी हातातलं पेन खाली ठेवत म्हणाले,"कोण ते अशोक साहेब का? हो काका. इथूनच फोन करत असतात. दर एक दोन दिवसांनी मुंबईला फोन लावतात. अगदी थोडावेळ बोलतात आणि पैसे चुकते करून निघतात. का हो?" "काही नाही हो शेटजी. अहो, तो आमच्या शेजारच्या घरात राहायला आला आहे. तो आणि त्याची बायको." काकांच बोलण एकून शेटजीना आश्चर्य वाटलं. म्हणाले,"अरे बायको पण आहे का अशोक साहेबांना? कधी बोलले नाहीत. मला तर वाटत होत की बायकोलाच फोन करायला येतात इथे. वहिनी पण नाही आल्या कधी इथे माझ्या दुकानावर काही सामान घ्यायला." त्यावर मान हलवत काका म्हणाले,"बिचारा! नुकताच त्याच्या घरात वाईट प्रसंग होऊन गेला आहे. त्याचा धक्का त्याच्या बायकोने खूपच घेतला आहे; अस म्हणत होता तो. ती बाहेर कुठे पडतच नाही हो. हा एकटाच सगळ बघतो." काकांच्या मनात आलं उगाच आपण कशाला त्या अशोकच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी इतरांशी बोलायच्या. म्हणून मग त्यांनी विषय बदलला. थोड्या वेळाने चहा पिऊन आणि यादीप्रमाणे सामान घेऊन ते त्यांच्या घरी जायला निघाले.

"संध्या.... ए संध्या..... मी आलो आहे. कुठे आहेस तू?" अशोकने किल्लीने दार उघडून घरात शिरताच संध्याला हळुवार आवाजात हाक मारली. अशोक डायनींग टेबलाजवळ गेला. टेबलावर थंडगार झालेला चहाचा कप तसाच होता. अशोकला वाटले त्याच्या हाकेमुळे संध्या तंद्रीतून जागी झाली. तिला बघून तो हसला आणि तिच्या जवळ बसत त्याने तिला बाजूला बसायची खुण केली. संध्या त्याच्या बाजूला बसली. अजूनही तिचा चेहेरा थंड भावनारहित होता. त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला,"कशी आहेस ग बाबू? काय केलस दिवसभर? आज मला फारच उशीर झाला का?" संध्या त्याच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता जमिनीकडे नजर खिळवून बसली होती. अशोकच्या मनात तुटल्यासारखं झाल.लं पण तरीही तो बोलत होता,"अग, मी निघतच होतो पण बॉसने अगदी निघताना एक रिपोर्ट मागितला. तसा तयारच होता; त्यामुळे प्रिंटआउट घेऊन त्याला दिली आणि निघालो. तरी उशीर व्हायचा तो झालाच." संध्या ऐकत होती की नव्हती हे देखील अशोकला कळत नव्हतं. तिच्याकडे बघत तो तसाच बसला. पण मग थोड्यावेळाने उठून म्हणाला,"चल मी चहा करतो. तू घेतेस का थोडासा?" तो उभा राहिला आणि संध्याने त्याच्याकडे नजर उचलून बघितलं. क्षणभर तिच्या डोळ्यात हरवलेले भाव तसेच राहिले; अस अशोकला वाटलं. तिच्या डोळ्यातली मूक सम्मती बघून अशोक हसला आणि म्हणाला,"बस तू. मी फ्रेश होतो आणि चहा घेऊन येतो दोघांचा." अस म्हणून आतल्या खोलीकडे वळला.

अशोक हात-पाय धुवून आत स्वयंपाकघरात गेला. त्याने दोघांसाठी चहा बनवला आणि संध्याला हाक मारली. त्याची हाक एकूण संध्या आत टेबलाजवळ येऊन बसली. तिचा अगोदरचा थंड झालेला चहाचा कप एका बाजूला करत अशोकने ताजा गरम चहा तिच्यासमोर ठेवला. काही न बोलता दोघांनी चहा घेतला. चहा आटपला तसा अशोक संध्याला म्हणाला,"अजून तसा अंधार नाही ग पडला. चल न जरा पाय मोकळे करून येऊ." संध्याने नकारार्थी मान हलवली; त्यावर अशोक तिचा हात हातात घेत म्हणाला,"अग राणी चल ना थोडा वेळ. फार कुठे नाही, जवळच जाऊ. ते शेजारचे जोशी काका आत्ता भेटले होते. ते विचारत होते तुझ्याबद्दल. चल न. तुझी ओळख करून देतो त्यांच्याशी आणि जोशी काकूंशी. आपण येऊन इतके दिवस झाले पण तू कोणालाही भेटलेली नाहीस. आज बाहेर पड जरा. नंतर हव तर फक्त खिचडी टाक. तशीही मला फारशी भूक नाही." अशोकला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा संध्याने घराबाहेर पडायला हवे होते. त्याला वाटले अजूनही ती नाहीच म्हणेल. पण जोशी काका-काकूंचा उल्लेख एकून संध्याची नजर थोडी बदलली असं अशोकला वाटलं. तिने अशोककडे क्षणभर बघितले आणि मग "बरं" म्हणून मान हलवून ती आतल्या खोलीत गेली.

संध्या लगेच बाहेर पडायला तयार झाली याचं अशोकला खूप आश्चर्य वाटलं. पण तो काहीच बोलला नाही. ती त्याच्याबरोबर येते आहे याचाच त्याला खूप आनंद झाला होता. संध्या पाच मिनिटात बाहेर आली. तिने कपडे बदलले होते. साधा पण बरा ड्रेस घातला होता आणि केस देखील विंचरले होते. ती दरवाज्याच्या दिशेने गेली तसा अशोक देखील निघाला. एकवार घरात मागे वळून बघून तो हलकसं हसला आणि बाहेर पडला.

दोघे घराच्या आवारातून बाहेर पडले आणि रस्त्याला लागले. जोशी काकांचं घर उजवीकडे होतं. अशोक जाणून बुजून डावीकडे वळला. तो जोशिकाकांच्या बाजूला न वळलेला बघून संध्याने नजर उचलून त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. त्यावर तिचा हात हातात घेत तो म्हणाला,"किती दिवसांनी तू बाहेर पडायला तयार आली आहेस. चल न, थोडं चालत जाऊ. अगदी हाकेच्या अंतरावरच तर समुद्र आहे. तुला आवडतं न समुद्राच्या वाळूत बसायला?" संध्याने मान खाली घाताली. पण ती काहीच बोलली नाही. शांतपणे ती चालत राहिली अशोकबरोबर. दोघे समुद्राजवळ पोहोचले. तिने समुद्राकडे बघितलं आणि ती स्थब्द झाली. अशोकला त्याच्या हातातली तिच्या हाताची पकड घट्ट झालेली जाणवली. त्याने तिच्या हातावर थोपटले. एका बाजूला अजून काही लोक होते. बहुतेक सहज समुद्रावर फिरायला आलेले. उगाच त्यांच्यासमोर काही व्हायला नको म्हणून अशोक स्वस्थ उभा राहिला. पण तो डोळ्याच्या कोपऱ्यातून संध्याकडे बघत होता. थेट बघणं मात्र टाळत होता. ती शांत होती. काहीच बोलत नव्हती. दोघे तसेच समुद्रापासून लांब... जेमतेम वळूला पाय लागतील असे उभे होते काहीही न बोलता. थोड्या वेळाने ती मागे वळली; तसा तो तिच्याबरोबर मागे वळला. दोघे घरी आले. तिचा चेहेरा खूपच दमलेला वाटत होता. घरात येताच तिने सोफ्यावर तिच आंग झोकून दिलं. अशोक तिच्या बाजूला बसला आणि तिला थोपटलं. ती तशीच डोळे मिटून पडून राहिली.

"बाबू, दमलीस? थांब हं पाणी आणतो." तो म्हणाला आणि आत स्वयंपाकघरात गेला. स्वतः ग्लासभर पाणी प्यायला आणि संध्यासाठी म्हणून घेऊन आला. ती तशीच सोफ्यावर पडून होती. तिने एक हात डोळ्यांवर ठेवला होता आणि तिचा दुसरा हात तिच्या पोटावर होता. श्वासाबरोबर संथपणे वर-खाली होणाऱ्या तिच्या हातावरून अशोकच्या लक्षात आले की संध्याला झोप लागली आहे. मग त्याने तिला उठवले नाही. एकतर ती इथे आल्यापासून पहिल्यांदाच घराबाहेर पडायला तयार झाली होती. त्यात तो तिला समुद्रावर घेऊन गेला होता. ती बहुतेक म्हणूनच खूप दमली होती असं त्याला वाटलं. त्यामुळे तिला तसंच झोपू देऊन तो स्वयंपाकघराकडे वळला. त्याने शांतपणे आवाज होऊ न देता खिचडी टाकली. बाहेरच्या खोलीचा दिवा देखील लावला नाही. हळूच आपली bag स्वयंपाकघरात घेऊन गेला. खिचडी होईपर्यंत तो ऑफिसचं काम करत बसला. खिचडी झाली तशी परत एकदा त्याने बाहेर डोकावून बघितलं. संध्या अजूनही शांतपणे झोपलेली होती. त्याने एकदा खांदे उडवले आणि तिला जाग येणार नाही इतक्या हळुवारपणे स्वतःला खिचडी वाढून घेऊन खाऊन घेतलं. स्वयंपाकघर आवरून घेतलं. टेबलावर एक लहानशी चिठ्ठी ठेवली,'संध्याराणी, खिचडी तयार आहे. उठलीस की गरम करून खाऊन घे. मला माहित आहे तू मला उठवणार नाहीस. पण एकटं वाटलं तर जरूर हाक मार. अशु' चिट्टी पटकन दिसेल अशी ठेवून तो झोपायला गेला.

सकाळी अशोकला थोडी उशिराच जाग आली. त्याने घड्याळात बघितलं तर नऊ वाजायला आले होते. तो पटकन उठला. संध्या बहुतेक अंघोळीला गेली होती. त्याने पटकन स्वतःसाठी चहा करून घेतला आणि पटकन संपवला. तो आतल्या खोलीत गेला तर संध्या आरशापुढे उभं राहून तिचे ओले केस पुसत होती. तिचा नाजूक शेलाटा बांधा मोहक वाटत होता. अशोकला वाटलं आज दांडी मारावी ऑफिसला. पण मग बॉसचा चेहेरा डोळ्यासमोर आला आणि तो पटकन अंघोळीला पळाला. तो तयार होऊन बाहेरच्या खोलीत आला. संध्या बहुतेक त्याचा डबा करण्यात गुंतली होती. अशोकला मात्र खूपच उशीर झाला होता. त्यामुळे तिला हाक मारून तो डबा नको म्हणून सांगणार होता. तेवढ्यात त्याच लक्ष जोशी काकांच्या बाजूला उघडणाऱ्या खिडकीकडे गेलं. खिडकी उघडी होती आणि वाऱ्यामुळे खिडकीचा पडदा उडत होता. तो खिडकीजवळ गेला आणि हळूच पडद्याआडून त्याने जोशी काकांच्या घराकडे बघितलं. जोशी काकू झोपाळ्या जवळ उभं राहून खिडकीकडेच बघत होत्या असा अशोकला भास झाला. आपण दिसणार नाही याची काळजी घेत अशोकने पडदा सारून घेतला आणि संध्याला 'येतो ग राणी'; अस म्हणत घराचा दरवाजा ओढून घेऊन तो घाईघाईने घराबाहेर पडला.

खर तर ऑफिसला जाण्यासाठी अशोकला उजवीकडे वळायला हव होतं. पण त्याबाजूनी गेलो तर जोशी काका किंवा काकू हाक मारतील आणि गप्पा मारायला लागतील आणि अजून उशीर होईल असा विचार करून तो डावीकडे वळला आणि पटपट चालायला लागला.

***

जोशी काकूंनी काकांना हाक मारली. काका मागच्या अंगणात पारिजातकाची फुलं गोळा करत होते. त्यांना अलीकडे कमी ऐकायला यायचं. त्यात ते अनेकदा मुद्दामच ऐकण्याच यंत्र काढून खिशात ठेवत असत. त्यामुळे काकूंनी मारलेली हाक त्यांना ऐकू आली नाही. तशी वैतागत काकू मागच्या दारी गेल्या आणि जरा मोठ्याने म्हणाल्या,"अहो ऐकलत का?" काकांनी ऐकायचं यंत्र कानात अडकवत काकूंना विचारलं,"काही म्हणालीस का? मी यंत्र काढून ठेवलं होत." कपाळाला हात लावत काकू म्हणल्या,"हो अहो. मी म्हणत होते की त्या अशोकला एकदा संध्याला घेऊन जेवायला बोलावूया का? तो शेजारी येऊन महिना होऊन गेला; पण अजून त्याच्या बायकोची आणि माझी भेट झाली नाही." काकांनी एकदा काकूंकडे बघितलं आणि परत खाली बसून पारिजातक गोळा करत ते म्हणाले,"अग, अशोकने काय सांगितलं ते आठवतं आहे ना? मग काय घाई आहे तुला? तो म्हणाला आहे नं; आणेल तो संध्याला आपल्याला भेटवायला. मग थांब की तोवर." त्यावर खाली ओट्याच्या पायरीवर बसत काकू म्हणल्या,"माझी थांबायला हरकत नाही हो. पण काळजी वाटते त्या पोरीची. जागेत बदल झाला तर जुन्या गोष्टी विसरेल म्हणून हा तिला घेऊन आला तर खरा इकडे. पण दिवसभर हा ऑफिसमध्ये आणि ती बिचारी मुलगी घरात एकटी. बरं नाही वाटत."

काकूंचा अस्वस्थपणा बघून काका त्यांच्याजवळ जाऊन बसले आणि म्हणाले,"खरं आहे तुझं. पण तू कमी प्रयत्न केलेस का? दोन-तिन वेळा जाऊन आलीस ना तो ऑफिसला गेल्यावर त्यांच्या घरी. पण ती मुलगी दारच नाही उघडत तर तू आणि मी काय करणार? बरं! तिला हाक मारावी तर आपल्या बाजूची खिडकी कायम बंद असते. कधीतरी अशोकच काय तो दिसतो त्या खिडकीत." काकांच्या म्हणण्याला दुजोरा देत काकू म्हणल्या,"हो नं. काल माझ लक्ष गेलं तर नेमकी उघडी होती खिडकी. कोणीतरी पडद्याच्या आडून इथे बघतं आहे अस वाटलं. बहुतेक तिच असेल; अशोकची संध्या! म्हणून तिला हाक देखील मारली मी. पण उत्तर काही आलं नाही तिच्याकडून." काका होकारार्थी मान हलवत काकूंना म्हणाले,"हो. काल अशोक ऑफिस वरून येत असताना भेटला तेव्हा मी त्याला म्हंटल की तुझी संध्या खिडकीत होती आणि काकूने हाक मारली म्हणून. पण तिने उत्तर दिलं नाही." त्यावर कपाळाला आठ्या घालत काकू म्हणल्या,"अरेच्या! कधी भेटला अशोक तुम्हाला? बरं ते जाऊ दे. काय म्हणाला तो त्यावर?" उठून घरात जात काका म्हणाले," काय म्हणणार तो बिचारा? म्हणाला बोलतो तिच्याशी. आणि गेला." काकांच्या मागोमाग उठत काकू म्हणल्या,"खरच ग बाई बिचारा. अजून काय? तरी सगळं निभावून नेतो आहे हो!"

काकूंकडे कामाला येणारी काशी आज थोडी उशिरा आली. काका जेवण आटोपून वामकुक्षी घेत पडले होते. काकू स्वयंपाकघरातलं आवरून काशीचीच वाट बघत झोपाळ्यावर बसल्या होत्या. अधून मधून त्या वळून अशोकच्या घराच्या खिडकीकडे वळून बघत होत्या. आज खिडकीचा पडदा नीट सारलेला होता. पण तरीही त्याच्या आडून अशोकची संध्या आपल्याकडे बघते आहे की काय अस काकूंना वाटत होत. काशी फाटक उघडून आत आली तशी काकू झोपाळ्यावरून उठत तिला म्हणल्या,"का ग काशे इतका उशीर केलास आज? कधीची वाट बघते आहे तुझी. पार दामले आहे. कधी एकदा आडवी होते असं झालं आहे." त्यावर भराभर भांडी उचलून मागल्या दारी जात काशी म्हणाली,"काकू नवीन काम धरलं हाय नव्ह.तित थोडा येळ झाला. तुमी पडायचंत की. म्या आवरून जाताना हाक दिली असती." तिच्या मागे जात काकूंनी तिला विचारलं,"नवं काम कुठे धरलंस ग बाई? हे शेजारच्या घरी की काय?" त्यावर तोंड वाकड करत काशी म्हणाली,"न्हाई... पार पलीकडच्या अंगाला हाय. कोनी हापिसर आलाय त्येच्या बायकून बोलावलं हुत. काकू, तुमी म्हनला म्हनून म्या शेजारच्या सायबास्नी दोन येळा जाऊन इच्चारलं कामाला येऊ का? तर त्ये म्हन्ल नकू. माझं म्या करीन. चार खनाच तर घर हाय." काशीने बोलता बोलता भांडी घासायला सुरवात केली होती.

एक स्टूल ओढून घेऊन तिच्या जवळ बसत काकूंनी तिला विचरलं,"घरी गेली होतीस नं दोन वेळा?" भांडी घासण्यात मग्न काशीने काकूंकडे न बघताच उत्तर दिल,"व्हय काकू." आवाज खाली आणत काकूंनी काशीला विचारलं,"त्या अशोकच्या बायकोला बघितलस का ग तू? कशी दिसते ती?" हातातलं काम थांबवून काशीने क्षणभर विचार केला आणि मग परत कामाला सुरवात करत म्हणाली,"म्या न्हाई बघितली तिला. ती आतमंदी हुती बहुत्येक. भाऊ आत जाऊन बोलून आले जनु. काय बाय आवाज आलं बोलल्याच भाईर मला. पन मंग भाईर यिऊन म्हन्ले तू नग येउस. आमी दोघच्या दोघ हाउत तर आमचं आमी करू. तर म्या म्हन्ल जोशी काका आन काकूबी दोघच हाईत. तरी म्याच करती सार काम. त भाऊ म्हन्ल आमी तरणी लोकं हाओत. मंग म्या काय सांगनार? म्या बरं म्हन्ल. आन निघाली. तस दुसऱ्यांदा म्या जानारच न्हवती. पन तुमी म्ह्न्लासा की ती आजारी बाईमानुस हाय म्हनून मुद्दाम भाऊ नसतांना ग्येली. म्हन्ल थ्येट त्या बाईंशी बोलीन. किती येळ दार वाजवत हुती म्या. आतून गानी लावल्याचा आवाज येत हुता. पन बाईनी दार न्हाई उघडलं." काशीच बोलणं एकून काकू विचारात पडल्या. त्यांना विचरात पडलेलं बघून काशी म्हणाली,"काकू परत नगा हो जायला सांगू. म्या न्हाई जायची. हाईत ती कामं बरा पैका द्येतात मला. उगा कोनाच्या माग काम द्या म्हनून लागायला मला न्हाई आवडत." त्यावर तिच्याकडे एकवार बघून काकू तिथून उठल्या आणि आत जाऊन पडल्या.

क्रमशः


Friday, November 22, 2019

स्टुडियो अपार्टमेंट


आई-वडिलांच्या मनाविरुद्ध हट्टाने हे स्टुडीयो अपार्टमेंट शेवटी घेतलंच. वर्षभर इथे राहाते आहे भाड्याने. आता अगदी आपलसं वाटतं. स्टुडीओ अपार्टमेंट ही इमारत या गल्लीमधील शेवटून दुसरी; शेजारी एक बंगला आहे. तिथे कोणीच राहत नाही. दिवसभर माळी मामा आणि वॉचमन असतात. त्यांच्या समोरची दोन माजली इमारत पण बहुतेक रिकामीच आहे. माझ्यासारखं दुसऱ्या मजल्यावर कोणीतरी रहातं. पण बहुतेक सतत प्रवास वगैरे करत असेल. क्वचितच दिवा दिसतो त्या बाल्कनीत.... ते ही जेम-तेम संध्याकाळी. मग सगळच शांत.
आई आली होती समजावायला. "विकत कशाला घेतेस? भाड्याने राहा. नोकरी बदललीस तर उगाच पैसे अडकतील. त्यात मोठी असली तरी एकच खोली. काय हा वेडेपणा! उद्या लग्न झालं की काय करणार आहेस?" लग्न हा विषय तर ती पदोपदी काढते. मला तर त्यावर बोलायचं देखील नाही. म्हणून मग मी एकूणच तिच्याकडे दुर्लक्ष केलं. "इथून ऑफिस देखील किती जवळ आहे. फुल्ल फर्निश आणि खिशाला परवडतो आहे..." अशी कारणं देत हट्टाने घेतली ही जागा.

कमाल आहे. इतके दिवस हा दिवा त्रास नव्हता देत. हे काय अचानक. तो दुसरा मजलावाला! त्याच्या बाल्कनीचा दिवा बंद न करताच गेला वाटतं टूरवर.

"माळीमामा, तो त्या बाल्कनीमधला दिवा चालूच आहे गेल्या दोन रात्री. झोपले की बरोब्बर माझ्या तोंडावर उजेड पडतो."

"रात्रभर दिवा चालू असतो तिथला?"

"हो!"

"ताई बंद आहे दिवा. थोडं मागे या आणि वर बघा बघू."

"अरेच्या! खरच की. आला वाटत तो टूरवाला. बरं झाालं. गेल्या दोन रात्री जाम त्रास झाला मला त्या उजेडाचा. चला! येते मी."

"ताई, आज सोनचाफा नको?"

"अय्या आहे? हवाच मग!"

अरेच्या मामा सकाळी म्हणाले दिवा बंद आहे. पण आता चालूच आहे. बहुतेक आत्ता लावला असेल. रात्री बंद होईल. झालाच पाहिजे. अगदी तोंडावर येतो उजेड. टॉर्चने मुद्दाम माझ्याच तोंडावर मारल्यासारखा.

अरे बारा वाजून गेले. अजूनही दिवा चालूच? कमाल आहे. या खोलीत दुसरी जागा देखील नाही की मी पलंगाची जागा बदलेन. उद्या जाऊन सांगिन तो जो कोणी आहे त्याला.

"मामा, अहो काल देखील रात्रभर दिवा चालू होता. कोण राहात हो त्या घरात? मी हे घर घेतलं त्यावेळी ते मालक काहीतरी सांगत होते त्या घराबद्दल. पण आता माझ्या लक्षात नाही."

"ताई तुम्ही भाड्याने राहाता ना?"

"नाही हो मामा. म्हणजे भाड्याने राहात होते. पण हे घर इतकं आवडलं की घेऊन टाकलं आत्ता काही दिवसांपूर्वी. माझ्या ऑफिस पासून जवळ आणि माझ्या बजेटमध्ये होत म्हणून."

"ताई, मला बोलला नाहीत!"

आता यांना का बर मी सांगावं की मी हे घर घेतलं? जरा नीट बोललं की जास्तच करतात हे लोक. म्हणे मला बोलला नाहीत! त्यांच्याकडे दुर्लक्ष करून निघालेच मी. आज घरी जाताना त्या दुसरा मजलावाल्याला मुद्दाम जाऊन सांगणार आहे; दिवा बंद कर म्हणून.

अरेच्या! एकूण घरातले सगळेच दिवे बंद आहेत. नाहीये वाटत तो. नशीब माझं!

हे काय? अचानक आत्ता दिवा लागला? किती वाजलेत? रात्रीचे दोन! काय फालतूपणा आहे!!

"................ ओय.......... अहो! शुक शुक! ओSSS....... तुमच्या बाल्कनीचा दिवा बंद करा हो. गेले काही दिवस खूप त्रास होतो आहे मला."

आयला! रात्रीच्या शांततेत पार दुसऱ्या गल्लीपर्यंत माझा आवाज गेला असेल. पण या माणसाला ऐकायला जात नाहीये. उद्या सकाळी ऑफिसला जायच्या अगोदर त्या घरी जाणारच मी.

"अरे ताई कुठे जाता आहात?"

"अहो मामा, आता मला वाटत मुद्दाम मला त्रास व्हावा म्हणून ते जे कोणी आहेत ते दिवा लावतात. वेळी-अवेळी. आत्ता जाऊन सांगणार आहे मी त्यांना."

"नको ताई. त्यापेक्षा तुम्ही जागा बदला."

"जागा बदलू? म्हणजे? अहो एकुलती एक खोली आहे. इतकी जागाच नाही की पलंग दुसरीकडे सरकवू शकेन."

"अहो ताई, मी पलंगाची जागा नाही म्हणत. तुम्ही जा इथून."

"मामा.................. हे अतिच होतं आहे बर का! अहो फुल फर्निश घर आणि इथे मध्य वस्तीत. तरीही शांत आणि माझ्या ऑफिस पासून इतकं जवळ. इतक्या वाजवी किमतीत मिळालं. तुम्ही सरळ सांगता जा म्हणून? कमाल करता हं."

"ताई............ मी साधा माळी आहे. लहान तोंडी मोठा घास वाटेल तुम्हाला. पण ऐका माझं."

"छे! तुमच्याशी बोलत बसले आणि उशीर झाला. संध्याकाळी जाऊन सांगीन. जाते मी."

"ताई........ जाते म्हणू नाही. येते म्हणावं."

डोक्यात जातो आहे तो माळी आता. नवीन राहायला आले त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या बंगल्यातला सोनचाफा बघून खुश झाले. त्याला म्हंटल; मला सोनचाफा आवडतो; तर लगेच म्हणाला रोज देईन तुम्हाला. मग इथल्या तिथल्या गप्पा झाल्या... अधून मधून काहीतरी सामान आणायला मदत करायला लागला म्हणून मी पण मामा म्हणायला लागले. पण आता हे अतिच झालं. म्हणे निघून जा घर सोडून. हा कोण लागतो माझा की हक्काने घर सोडा म्हणाला? मूर्ख नुसता! आता बोलणारच नाही त्याच्याशी.

फारच उशीर झाला आज घरी यायला. खूप दामले आहे. आता नाही जात त्या घरी.....

हे भगवान!! गेल्या कित्येक रात्री शांत झोप नाही लागत त्या दिव्यामुळे. परत आज चालू आहे. सकाळ-बिकाळची वाट नाही बघणार आहे मी. आत्ताच जाऊन बोलणार आहे. काय समजतो काय स्वतःला? मनात आलं की दिवा लावतो. बरं, बाल्कनीमध्ये तर एकदाही दिसला नाही.

अरे तरातरा निघाले आणि बहुतेक किल्ल्या विसरले. पण ते सगळ नंतर. आत्ता या क्षणी त्या घरात जाऊन त्या माणसाची हजेरी घेणार आहे चांगली आणि त्या दिव्याची तर वाट लावणार आहे मी.....................................
****
............."अहो! शुक शुक! गेले दोन दिवस मी तुम्हाला या बंगल्याच्या बागेची काळजी घेताना बघते आहे."

"नमस्कार ताई! मी या बंगल्याचा माळी आहे. तुम्ही?"

"या बाजूच्या इमारतीतल्या त्या पहिल्या मजल्यावरचा स्टुडिओ अपार्टमेंट भाड्याने घेतला आहे मी. मामा, मला सोनचाफा आवडतो. देता का एखादं फुल?"

"अरे घ्या ना ताई. रोज देईन. नाहीतरी झाडावर सुकून जाणार."

"धन्यवाद मामा."

"......................ताई!"

"काय मामा?"

"एक सांगू?"

"बोला ना!"

"भाड्याने राहा. विकत नका घेऊ ते घर."

"अरेच्या! का मामा?"

"असंच! मागच्यावेळी सांगायचं राहून गेलं होतं. म्हणून............"

आगाऊ आहे हा माळी! जरा मामा म्हणून काय म्हंटल... जास्तच बोलायला लागला. खरतर कित्ती आवडलं आहे हे स्टुडीओ अपार्टमेंट मला.........................

Friday, November 15, 2019

मस्तानीचं मनोगत

मस्तानीचं मनोगत



नुकतीच 'राऊ' कादंबरी परत एकदा वाचून संपवली. खरं तर या विषयावर अनेकांनी अनेकदा लिहिलं आहे. पेशवेकाळाबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या आहेत. त्यात अलीकडेच बाजीराव-मस्तानी सिनेमा येऊन गेला होता. त्यावेळी तर पेशवे... मराठा साम्राज्य... त्या काळातील विवाहेतर प्रेम संबंध... बेबंद स्वभावाचे बाजीराव पेशवे... त्यांच्यावर जान कुर्बान करणारी मस्तानी... या सगळ्यावर खूप खुप उहापोह झालाच होता. पण म्हणूनच जरा वेळ मिळाला आणि परत एकदा राऊ कादंबरी हातात घेतली होती. या कादंबरीमधले वेगवेगळे भावनिक बंध मला दरवेळी वेगवेगळ्या प्रकारे भिडतात. यावेळी ही कादंबरी वाचताना त्यातील एक प्रसंग मनाला स्पर्शून गेला; काहीसा टोचला!

मस्तानीला आप्पा (पेशव्यांचे धाकटे बंधू) अचानक एक दिवस 'पुणे सोडून जा'; सांगतात आणि बाजीराव पेशव्यांचा निरोपही न घेता मस्तानी बुंदेलखंडाला रवाना होते. ही बातमी समजताच बाजीराव पेशवे दोन दिवसांची अविरत घोडदौड करत तिला गाठतात. त्यावेळचा हा प्रसंग. मी एकट्या मस्तानीच्या शब्दात मांडण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. एकीकडे राऊ तिच्यासाठी आले हा झालेला आनंद; दमलेल्या राऊंबद्दल वाटणारी काळजी आणि त्याचवेळी पुण्यात उडालेल्या गदरोळाची जाणीव... तिच्या अस्तित्वामुळे निर्माण झालेला तिढा आणि हट्टी राऊ हे भावनांचे कल्लोळ मस्तानीच्या मनात घोंगावत असतील. मात्र त्याचवेळी नसलेल्या माहेरच्या; त्या बुंदेलखंडाच्या वाटेवरून दोन दिवस प्रवास करताना तिच्या स्त्रीमनाला काय आणि किती टोचण्या लागून राहिल्या असतील. सोबत लहानगा समशेरबहाद्दर आणि आयुष्याचं फरफरणारं सुकाणूशिवायचं जाहाज... या सर्वच भावनांची सरमिसळ लिहायचा प्रयत्न इथे केला आहे.

केवळ आणि केवळ राऊ कादंबरीच्या प्रेमाखातर आणि या प्रसंगातून मस्तानीचा एक वेगळा पैलू मांडता येईल अस वाटून....

**********

राऊ... राऊ तुम्ही आलात? या यत्किंचित कंचनीसाठी? पाउस-वादळी वारा यामुळे इथवरचा प्रवास करण्यास या दासीला दोन दिवस लागले. तोच प्रवास आपण काही प्रहरात पूर्ण केलात... ओह राऊ! ये क्या हें? अरे, आप तो पसिनेसे भिग गये हो! सार शरीर थकलेल दिसतंय. कुठ माझा शोध करीत आलात राऊ? राऊ एकटे धावत इतक्या दूर येतील ही या दासीला कल्पना नव्हती. आता मात्र काही न बोलता दमलेल्या राऊंनी विश्रांती घ्यावी. माझ्या या राहुटीत जे काही असेल ते स्वीकारावं एवढीच विनंती आहे. (राऊ मात्र ताठपणे एकाजागी उभे आहेत. ते कठीण चेहेऱ्याने आणि करड्या नजरेने मस्तानीकडे बघत असतात; जणू त्यांची नजर म्हणत असते 'मस्तानी तू परत चल';) तुमच्यावर मी जीव ओवाळून टाकला आहे माझ्या हृदयेश्वरा! पण परत पुण्याला चल असा हट्ट बरा नव्हे. राऊ पेशवे आहेत हे त्यांनी विसरू नये. एका कंचनीसाठी पेशवे पुण्याहून अखंडपणे इथपर्यंत दौडत आले, हे पुण्यात समजलं तर केवढा हाहाकार होईल. तिकडे पुण्यामध्ये शोधाशोध सुरु झाली असेल. राऊ इथे आले याची वर्दी तरी पुण्याला पाठवावी. मग आम्ही सांगूच आमची कर्मकहाणी.

राऊ आपण रागावू नये. ही दासी आपल्या मनानं पुण्यातून बाहेर पडली नाही. राऊंच्या सावलीत राहण्याची शपथ घेऊन पुरते चार प्रहरसुद्धा उलटले नाहीत, तोच मस्तानीवर हा प्रसंग आला. आम्ही खुशीनं पुणं सोडलं नाही. कोणी जबरदस्ती केली म्हणून का विचारता राऊ? त्यांचं नाव समजून देखील काय होणार आहे? या चौकशीची काही जरुरी आहे का? वाटल्यास असं समजावं की आम्ही आपल्या मनानंच बाहेर पडलो आहोत. आमच्यावर कुणीही जबरदस्ती केली नाही.( तिच्या या वाक्याने राऊंच्या नजरेत अंगार फुलतो. नाही नाही अशी मान हलवत नजर खाली वळवत मस्तानी म्हणते) राऊ नका अस भरीस पाडू आम्हाला. आम्हाला हुकुम झाला.... पण यापुढे अजून काहीही सांगण्याअगोदर आम्हाला एक वाचन मिळेल तर सांगू. मी नाव सांगेन पण त्यांना अभय मिळालं पाहिजे. आणि मग शब्द फिरवू देणार नाही आम्ही...(राऊंचा हात हातात घेऊन त्यावर प्रेमाने थोपटत मस्तानी बोलते) आप्पास्वामींच्या कारकुनानं सांगितलं की मस्तानीनं सूर्य उगवायच्या आत पुण्याची वेस ओलांडून बुंदेलखंडाच्या रोखानं निघून जावं. आप्पास्वामींनी आम्हाला हुकुम केला आणि आम्ही पुण्याच्या बाहेर पडलो. आम्हाला सक्त हुकुम होता की आम्ही कुणालाही काहीही न कळवता ताबडतोब पुण्याची वेस ओलांडून मार्गाला लागलं पाहिजे. सारी तयारी करूनच आम्हाला हुकुम दिलेले होते. (दोन क्षण शांतता. मस्तानी खुरमांडी बदलून पाय समोर घेते आणि गूढघ्यानवर हाताचा विळखा घालत म्हणते) राऊ... तुम्ही दिलेल्या वाचनाची आठवण आहे ना? आप्पास्वामींनी हुकुम दिला आणि मीही तो मानला. (राऊंची मुद्रा अत्यंत दुःखी होते. त्यांचं मन समजून घेणं त्यांच्या लहान बंधूंना मान्य नाही याचं दुःख त्यांच्या चेहेऱ्यावर दिसून येत आणि मस्तानीचं मन पिळवटून निघतंं.) राऊंनी दु:खी होऊ नये. ज्याचा इलाज माणसाच्या हातात नसतो त्याचं दु:ख करूनही उपयोग नसतो. आप्पास्वामींची मर्जी मोडायची नसेल तर मला पुण्यात राहता येत नाही. तुम्ही आलात खरे मला परत पुण्यात नेण्यासाठी परंतु आप्पास्वामींची आज्ञा नसतानासुद्धा आम्ही याव? त्यापरीस या चरणांशी एक विनंती आहे. मी पुण्यात राहाणं आता शहाणपणाचं होणार नाही. माझ्याबद्दल आता राऊंच्या हवेलीपर्यंत गवगवा झालेला आहे. छोटे समशेरबहाद्दरही यातून सुटलेले नाहीत. तेव्हा राऊंनी आता मला परत पुण्यास ठेवण्याचा हट्ट धरू नये. कारण मी पुण्यात परत येणं याचा आता अर्थ एकच आहे. लोक असं म्हणतील की राम-लक्ष्मणासारख्या या दोन भावांच्यात मस्तानिमुळे वितुष्ट आलं. या विषारी शब्दांनी लोक मला टोचून मारतील. राऊ! कुणी तोंडावर म्हंटल नाही तरी मनात म्हणतीलच. मनातले शब्द प्रत्यक्ष बोलण्यापेक्षाही जास्त जहरी असतात. तरीही राऊंच्या आज्ञेबाहेर ही दासी नाही.

(डोळ्यातून वाहणारी आसवं रोखण्याचा प्रयत्न करत मस्तानी पुढे बोलू लागते) एक सांगायचं होत राऊ... आम्हा बायकांना माहेरची वाट जिवाभावाच्या मैत्रिणीसारखी प्रिय असते. पण राऊ, त्या दिवशी पुण्याहून आम्ही माहेरच्या या वाटेला लागलो तेव्हा तीच वाट आम्हाला वैरिणीसारखी झाली. आमचं माहेर आता तुमच्यामध्येच आहे. ते वेगळ नाही. पण हा जन्म स्त्रीचा पडला. आम्ही दोन दिवस वाट चालत असताना मनात एक विचार आतून कसा डंख देत होता. साऱ्यांनी वाऱ्यावर सोडलं तरी स्त्रीला आपल्या माहेरची आशा असते. तो आसरा, ती सावली स्वप्नासारखी असली तरी त्या आधारावर कठीण प्रसंगातही सतीला दिवस काढता येतात. पण राऊ, ही वाट आमच्या माहेरची आहे अस फक्त म्हणायचं. कोण आहे आमचं तिथं? अस वाटत की, आपल्याला कुठतरी माहेर असावं. जेव्हा आयुष्यात पराभवाचा क्षण येईल किंवा परमेश्वराच्या मनात आपली ताटातूट अटळ असेल तर तेव्हा कुशीत दडायला कुठतरी माती असावी. लग्न झालेल्या बाईला माहेरकडून चोळी-बांगडी मिळते. आम्हा कलावंतीणीना कोण देणार ही चोळीबांगडी? कुणाच्या कुशीत मान खुपसून आम्ही मनातलं दु:ख सांगाव? इतक्या दूर, एकाकी वारा, वादळ, पावसात माझ्यासारख्या क्षुल्लक कंचनीसाठी राऊंच इथवर येणं झालं. माझी समजूत काढून इथून मला परत पुण्याला घेऊन जाणं होत आहे. राऊंना सोडून माहेरच्या दिशेन मी तुडवालेली वाट आता इथेच संपली आहे. आता हातात हात घालून परतीचा प्रवास पुण्यापर्यंत आपण जोडीनं करणार आहोत. ही वाट जिथ संपली तेच गाव चोळी-बांगडी म्हणून राऊ या मस्तानीला द्या. अर्थात मनात असेल तरच! आमचा कशासाठीच हट्ट नाही.

***********




Friday, November 8, 2019

तो आणि ती.............. श्रीकृष्ण!(भाग 12)(शेवटचा)



तो आणि ती................. श्रीकृष्ण!

"नारायणा............ विश्वेश्वरा............... जगद् उद्धारा .............. मोहना............... वासुदेवा.................. काय करून बसलो मी हे? तुमच्या चक्रवर्ती पावलाला मी ससा कसा समजू शकलो? या पापी हातांनी तुमच्या सुलक्षणी पावलाच्या अंगठ्याला तीर मारून जी जखम केली आहे ती मला निस्तरू दे देवेश्वरा............. नाहीतर माझा उभा जन्मच नव्हे तर माझ्या सहस्त्र पिढ्या कायम नरकात जातील. मला या शापातून मुक्त करा मोहेश्वरा!"

"धीराने घे जरा. तू व्याधी आहेस. या वनात तू शिकारीसाठी आलास आणि तुझ्या मतिला जे दिसले त्यादिशेने तू तुझ्या भात्यातील तीर सोडलास. यात तू कोणतेही पाप केलेले नाहीस. त्यामुळे असा व्याकूळ होऊ नकोस. बस इथे असा! या अतिप्रचंड वृक्षाखाली पहुडले असताना नकळत मी माझ्या जीवनाचा पट पाहात होतो; माझ्या मनातील भाव मी स्वतःलाच समजावत होतो.... आता तू आला आहेस तर बस माझ्या जवळ इथे.... आज मला माझे मन कोणाकडे तरी मोकळे करावे ही उर्मी दाटून आली होती; आणि तू समोर आलास. हादेखील एक कर्मयोग असावा... त्यामुळे पुढची चिंता करू नकोस....."

"तू तुझ्या कोणत्याही कृतीला दोष देऊ नकोस. कारण आपण आयुष्यात जे करत असतो त्यामागील कार्यकारण भाव अगोदरच ठरलेला असतो. नाहीतर माझा जन्म होताच क्षणी मातेच्या हृदयाला बिलगून तिच्या उष्ण प्रेमळ प्रेमरसाचा घोट न घेता तिच्यापासून नाळ तोडून घेत मला गोकुळात जावे लागले नसते. माझ्या अगोदरच्या सहा पुत्रांना माझ्या देवकी मातेने गमावले होते. तिच्या सातव्या पुत्राचा अंश रोहिणी मातेने स्वतःच्या उदरात धारण केल्याने तो पुत्र जरी वाचला होता; तरी देवकी मातेच्या हृदयातील पीडा मात्र तशीच होती. अशा परिस्थितीत माझा जन्म झाला. तिचे मातेचे हृदय कोणकोणत्या भावनिक आंदोलनांमधून गेले असेल याचा विचार देखील करणे पिता म्हणून माझ्या वसुदेव बाबांना शक्य झाले नव्हते. त्यावेळी त्यांनी केवळ कर्तव्य पूर्तीच्या भावेने मला गोकुळात नंद बाबांच्या घरी नेले आणि यशोदा मातेच्या कुशीत मी माझ्या जन्माचे पहिले रुदन केले. माझ्या त्या रुदनामध्ये देवकी मातेचा विरह लपला होता; मात्र तो कोणालाही लक्षात आला नाही; आणि आयुष्यभर मी तो कधी व्यक्त केला नाही.

प्रेमळ यशोदा मातेच्या प्रेमसायीने माखल्या पदराच्या आधाराने मोठे होत असताना अनेक असुरांना, राक्षसांना मी वधले.... त्यावेळच्या माझ्या त्या लीलांमुळे यशोदा मातेच्या कोमल स्त्रीमनाला भीतीच्या किती यातना मी दिल्या असतील या जाणीवेने माझे मन अनेकदा पोखरले गेले. मात्र त्यावेळी देखील प्रेमयोगापेक्षा कर्मयोग जास्त मोठा आहे; याची जाणीव खोल हृदयात सतत तेवत होती.

माझ्याहून वयाने मोठ्या असणाऱ्या राधेने माझ्यावर जीव ओवाळून टाकला. मी देखील तिच्यावर मनापासून प्रेम केले. किंबहुना राधेवरील माझ्या प्रेमभावनांचा पुनरानुभव मला आयुष्यात कधी झाला नाही. तिने माझ्या प्रेमाखातर तिचे भावजीवन त्यागले आणि तरीदेखील लोकार्थाने तिने तिचे जीवन एका सर्वसामान्य स्त्रीप्रमाणे कंठले. मी गोकुळ सोडताना ती माझ्या रथासमोर येऊन उभी राहिली; त्यावेळी मी तिला केवळ शब्दांनी समजावले. तिने दिलेली वैजयंतीमाला स्वीकारताना ती आसुसून माझ्या नेत्रांकडे पाहात होती. तिला शेवटचे एकदा माझ्या नेत्रातील प्रेमभाव तिच्या हृदयात साठवायचे होते. मी मात्र तिच्याकडे नजर उचलून बघितले नाही. माझ्या नजरेतील घायाळ प्रेम पाहून तिने गोकुळ त्यजले असते; याची मला पूर्ण जाणीव होती; आणि त्याचवेळी गोकुळ सोडतानाच मला माझ्या पुढील आयुष्याच्या वाटचालीची जाणीव झाली होती. त्या आयुष्यात राधेसारख्या सात्विक प्रेमभाव जपणाऱ्या स्त्रीला स्थान नव्हते. त्यामुळे माझ्या मनातील भावना दूर सारत मी कठोरपणे तिच्याकडे पाहाणे टाळले. मात्र माझे ते वागणे आयुष्यभर माझ्याच मनात घर करून बसले.

आयुष्याच्या विविध वळणांवर अनेक स्त्रिया माझे जीवन स्पर्शून गेल्या. या स्त्रियांपैकी मन:निर्धाराचा मेरुमणी असणाऱ्या माझ्या कुंती अतेला कधी विसरू शकणार नाही. वयाच्या पौगंडावस्थेत केवळ उत्सुकतेपाई तिने एक खूप मोठा निर्णय घेतला. त्या निर्णयाचा बोजा तिने आयुष्यभर सहन केला. कर्ण तिचा प्रथम पुत्र असुनही ती कधीच त्याचा स्वीकार करू शकली नाही. शेवटी तिच्या पाच पुत्रांच्या आयुष्यासाठी तिला तिच्या या लोकोत्तर प्रथम पुत्राची आहुती त्या माहाभारतीय होमकुंडात द्यावी लागली. सर्व माहित असूनही त्या मातेला स्वमुखाने आपल्या पुत्राकडे त्याच्याच मृत्यूची मागणी करावी लागली..... काय म्हणावे आयुष्याच्या या खेळीला? तिला तिच्या त्या प्रथम पुत्राकडे जाण्याचा निर्णय घेण्यास मीच मदत केली होती.... कुंती आते हे मनात घोळवत असेल का?

जी परिस्थिती कुंती आतेची होती काहीशा फरकाने तीच परिस्थिती द्रौपदीची होती. कुंतीआतेने चार लोकोत्तर शक्तींपासून तशाच चार शक्ति पुत्रांना जन्म दिला.... तिच्या स्नुशेने; द्रौपदीने पंचपतींना वरून त्यासार्वांशी एकरूपतेने आयुष्यभर संसार केला. द्रौपदीला स्वयंवरामध्ये अर्जुनाने जिंकले होते.... त्यामुळे खरेतर तिने केवळ अर्जुनाची पत्नी होणे योग्य होते. मात्र कुंती मातेच्या मुखातून नकळत का होईना परंतु दिला गेलेला आदेश आणि द्रौपदीने तिच्या मागील जन्मात शिवाकडे मागितलेल्या वराची सांगता यामुळे तिला पाच पुरुषांसोबत लग्न करावे लागले. पांचाली असूनही ती पतिव्रता स्त्री कायम स्थिर बुद्धीने वावरली. तिचे क्षत्राणी तेज कायम तिच्या सोबत राहिले आणि तिची निर्णयक्षमता पांडवांचे बलस्थान. द्रौपदीच्या या सर्व गुणांमुळेच ती माझी प्रिय सखी राहिली आयुष्यभर....

माझ्या एकुलत्या एक भगिनीबद्दल काय सांगू? रूपवती, गुणवती अशी माझी सुभद्रा.. माझी प्रिय भद्रा.... तिच्या मनात अर्जुनाविषयीचे प्रेमभाव मीच जागवले. कारण तिच्या उदरी जन्म घेणारा तिचा आणि अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू याच्या हातून त्यानंतरच्या भविष्यात एक मोठे कार्य होणे आवश्यक होते. यासर्वाची य:किंचित कल्पना नसलेली माझी भद्रा........ माझ्यावरच्या निस्सीम विश्वासावर तिने तिच्या आयुष्याची दोर माझ्या हाती सुपूर्द केली होती. भावबंधांचा विचार करायचे म्हंटले तर मी माझ्या या लहान भगिनीचा अपराधी आहे; असे मला वाटते. अभिमन्यूच्या वीर मरणाची वार्ता ज्यावेळी शिबिरात येऊन थडकली त्यावेळचा सुभद्रेने फोडलेला टाहो त्यानंतर कायमच माझ्या हृदयात गुंजत राहिला आहे. तिचे सांत्वन करताना माझे थरथरणारे हात आपल्या ओंजळीत घेऊन तिने त्यात स्वतःचा चेहेरा लपवला होता... जणू ती सांगत होती... दादा, सर्व जाणून देखील जर तू तुझ्या भद्रेला या दुःखात लोटले आहेस तर ते देखील मी तुझा आशीर्वाद म्हणून स्वीकारते.

हे आणि असे अनेक निर्णय मी आयुष्यात घेतले. ती काळाची गरज होती.... पुढील अनके आयुष्यांच्या सन्मार्गासाठी काही आयुष्यांचे बलिदान देण्याचा निर्णय घेण्यासाठीच तर माझा जन्म झाला.... हजारो वर्षानंतर देखील या महाभारतीय युद्धाचे दाखले देऊन अनेक महत्वाचे निर्णय वेळोवेळी घेतले जातील. त्यासाठी धर्म मार्ग आखून देणे आवश्यक होतेच. याच निर्णयांच्या शृंखलेतील काही निर्णय हे माझ्या स्वतःच्या जीवनात देखील महत्वाचे टप्पे ठरले..... सत्यभामेच्या वडिलांकडील स्यमंतक मणीरत्नाने माझ्या आयुष्यात जांबवती, सत्यभामा यांना आणले... तर मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा आणि भद्रा यांच्याशी विवाह ही युद्ध कालातील शक्तीकेंद्रांची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन केलेली संधी होती. कालिंदीचे माझ्या आयुष्यातील आगमन ही तिच्या तपश्चर्येची सांगता होती. अर्थात मी पतीधर्म कधीच सोडला नाही.... याचे कारण देखील माझी प्रथम पत्नी.... आणि माझ्यावर निस्सीम प्रेम करत असूनही स्वत्व जपलेली माझी रुक्मिणी हे आहे..... तिच्या नेत्रातील माझ्या निर्णय क्षमतेवरील विश्वास आणि मी नात्यातील भावनिक गुंता सोडवत असताना तिचे माझ्या बरोबर खंबीरपणे असणे.... यामुळे मला कायम एक वेगळीच उर्जा प्राप्त होत राहिली.

माझ्या आयुष्यात अनेकविध स्त्री-पुरुष येऊन गेले. काही माझ्या हृदयातील भावबंधाने जोडले गेले; तर काही काळाची गरज म्हणून............. आज आयुष्याच्या या वळणावर हा कृष्णरूपी देह त्यागताना पुढील भविष्यासाठी एक योग्य आणि धर्मसंमत भविष्यकाळ निर्माण केला आहे हे समाधान माझ्या मनी वसते आहे. जरा व्याधा, तू अजिबात दु:ख करू नकोस. तुझे इथे असणे हेच सिद्ध करते आहे की माझे अवतार कार्य इथे संपते आहे........... कालात् तस्मैsनम:!!!"


( समाप्त)

Friday, November 1, 2019

तो आणि ती........ रुक्मिणी!(भाग 11)




तो आणि ती................. रुक्मिणी!

"रुक्मिणी..... प्रिये...... आज या सागरकिनारी तुझा हात हातात घेऊन उभे असताना माझ्या मनात काही प्रश्न दाटून आले आहेत."

"स्वामी.... मला असे का वाटते आहे की आपल्या भावजीवनाबद्दल माझ्या प्रिय सवतींना, विशेष करून सत्यभामेला............ कुंती आतेला किंवा देवकी मातेला जे प्रश्न पडले तेच तुम्ही माझ्यासमोर मांडणार आहात; आणि तरीही तुमच्या मनातील भाव काहीतरी वेगळेच उत्तर देऊन जाणार आहेत."

"काय सांगतेस प्रिये... असे काय प्रश्न त्यांच्या मनात होते; की जे त्यांनी तुझ्याकडे मांडले मात्र माझ्याजवळ कधी त्याचा उल्लेख देखील केला नाही."

"यादवश्रेष्ठा, त्यांच्या मनातील प्रश्न हे जरी तुमच्या संबंधातील होते तरीही त्याची उत्तरे त्यांना माझ्याकडूनच हवी होती. कदाचित् माझ्या उत्तरातून त्या स्त्रीमनाचा शोध घेत असतील. भामेच्या मनात कायम एक प्रश्न राहिला की आम्हा अष्ट पत्नींवर तुम्ही मनापासून प्रेम केलेत... तरीही तुमच्या आयुष्यातील प्रेयसीचे स्थान राधेलाच मिळाले. असे का? आर्य, एकदा कुंती आतेंशी हितगुज करताना त्यांच्या स्नुषेचा; द्रौपदीचा; विषय निघाला असता त्यांनी मला विचारले होते; 'रुक्मिणी, तू माझ्या श्रीकृष्णाची प्रथम प्रिय पत्नी... तुझ्यावर त्याने मनापासून प्रेम केले. कोणाचीही तमा न बाळगता केवळ तुझ्या एका हाकेवर तुझे हरण करून तुला मानाने द्वारकानगरीत आणले. मला खात्री आहे की तो तुझ्याजवळ त्याच्या मनातील सर्व भाव मोकळे करीत असेल. परंतु तरीही ज्या-ज्या वेळी तो द्रौपदीबद्दल बोलतो; त्याप्रत्येक वेळी तो तिचा उल्लेख सखी द्रौपदी असाच करतो......... तू प्रिय पत्नी असूनही तो द्रौपदीला सखी मानतो याचे तुला वैषम्य नाही का ग वाटत?' यादवश्रेष्ठा, प्रत्यक्ष तुमच्या देवकी मातेने देखील मला एकदा प्रश्न केला होता की माझ्यानंतर आलेल्या तुमच्या सप्त पत्नींचे स्वागत मी कसे करू शकले? त्या सर्वांनी आपणहून मला त्यांच्या थोरल्या भगिनीचे स्थान दिले.... इतके प्रेम मी त्यांना कसे देऊ शकले?........."

"रुक्मिणी.... हे अगदी खरे आहे की माझ्या मनात देखील आज हेच प्रश्न आहेत. मला खात्री आहे या सर्वाना तू योग्य ते उत्तर दिलेच असशील. आज मला देखील समजून घ्यायचे आहे तुझ्या मनातील भाव.... सांग प्रिय पत्नी.... तू काय उत्तर दिलेस या सर्वाना?"

"यदुकुलभूषणा, मी जे काही उत्तर देणार आहे; ते तुम्हाला माहित आहे याची मला खात्री आहे. तरीदेखील तुमची इच्छाच आहे तर ऐका.......... ही समोर दूरवर पसरलेली धरती, हा जणू अंत नसणारा सागर, तुमच्या नील कायेप्रमाणेच नील रंगाने व्यापलेले हे अवकाश.... तुमच्या उत्तनियाला उडवणारा हा वायू आणि आता परतीच्या वाटेकडे लागलेले ते सूर्यकिरण...... ही पंच माहाभूते! ही पंचमाहाभूते एकमेकांशिवाय अधुरी आहेत. स्वामी...... तुमचं आणि माझं नात देखील या पंचमहाभूतांप्रमाणे अत्यंत गहिरं, खोल आणि आत्मीय आहे. मात्र या किनाऱ्याने ज्याप्रमाणे धरतीला सागरापासून वेगळे केले आहे; त्या क्षितीजरेषेने सागर आणि अवकाशाचे अस्तित्व दुभंगवले आहे; सूर्यकिरणांनी त्यांच्या उष्ण स्पर्शाने त्यांचे अस्तित्व आपल्या पर्यंत पोहोचवले आहे आणि वायुने न दिसताही आपले स्वत्व जाणवून दिला आहे; त्याचप्रमाणे मी तुमच्या-माझ्या या नात्याच्या मोहमयी रेशीम बंधनात असून देखील माझ्यात उरलेच आहे..... हे अंशत: असलेले स्वतंत्र अस्तित्व मी आयुष्यभर उराशी सांभाळले आहे; हे असे का हा प्रश्न मला कायम सतावत आला आहे. परंतु म्हणूनच कदाचित् मला राधेच्या प्रेयसी असण्याचे दु:ख झाले नाही..... द्रौपदीच्या सखी असण्याचे वैषम्य वाटले नाही; किंवा माझ्या प्रिय सवतींबद्दल कधी दुजाभाव मनात आला नाही. मनमोहना, हे एकरुपतेतले द्वैत मला आयुष्यभर जाणवले; मात्र ते कोडे कधीच उलगडले नाही; आणि मला खात्री आहे की आज इथे या सागरकिनारी तुम्ही मला काही विचारण्यासाठी आणेलेले नसून माझ्या मनातील या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आणले आहे."

"रुक्मिणी, माझ्या प्रिय पत्नी.......... अगदी नेमके ओळखले आहेस. मला आयुष्यभर तुझे हे स्वत्व जपणेच तर मोहवत आले आहे. आजवर माझ्या बाललीलांमुळे किंवा पुढील आयुष्यातील प्रासंगिक निर्णयांमुळे झालेल्या चमत्कारात्म्क कृतींमुळे माझ्या आयुष्यातील सर्व स्त्री-पुरुष सर्वस्वाने माझ्यात सामावून गेले आणि मला पुजू लागले. मात्र माझी प्रिय राधा.... सखी द्रौपदी आणि तू... केवळ तुम्ही तिघींनी माझ्या अस्तिवाचा भाग असूनही आपले स्वत्व जपलेत. प्रिये, माझ्या आयुष्यातील मी घेतलेल्या निर्णयांमधील कार्यकारणभाव समजून त्यायोगे आपल्या आयुष्यातील योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे मला कायम भावले. ही क्षमता केवळ राधेमध्ये, द्रौपदीमध्ये आणि सुलक्षणे तुझ्यामध्ये मी पाहिली. मात्र अलीकडे मला हे जाणवू लागले होते की तुझे हे स्वत्व जपणे तुला अस्वस्थ करते आहे. म्हणूनच मी तुला इथे आणले. तुझे म्हणणे अगदी योग्य आहे. या पंचमहाभूतांप्रमाणे एकमेकात सामावून देखील स्वत्व जपणे हेच खरे आयुष्य जगणे आहे. ते तुला कळले आहे...... त्यामुळे इतरांच्या माझ्यात सामावण्याच्या भावनेचा मी आदर करीत असलो तरी तुमच्या 'स्वत्वाचा' मी हृदयापासून स्वीकार केला आहे हे जाणून घे."

"श्री......... तुम्ही माझ्या मनीचे भाव जाणलेत आणि आयुष्याच्या या उत्तरार्धात मला ऋणमुक्त केलेत... याहून जास्त मी काय मागावे?.............. चलावे....... अस्त घटिका जवळ आली आहे."

----------------------