Friday, February 28, 2020

#खजुराहो दर्शन!!! भाग १

#खजुराहो दर्शन!!!



#खजुराहो म्हंटल की एकतर आपण एकमेकांकडे बघून डोळा मारतो किंवा त्या विषयाला बगल देऊन दुसरंच काहीतरी बोलायला लागतो. का? कारण आजच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये #कामशास्त्र या विषयावर उघडपणे चर्चा होऊच शकत नाही.... मात्र बहुतेक ज्या काळामध्ये #खजुराहोची शिल्प बनली आहेत; त्या काळामध्ये #कामशास्त्र हा विषय चोरून बोलण्यासारखा किंवा चर्चा न करण्यासारखा नसावा असा माझा कयास आहे. याव्यतिरिक्त ही मंदिरे आणि त्यातील #शिल्पकला बघितल्यानंतर असं वाटतं की त्या काळामध्ये स्त्रियांना सामाजिक स्तरावर अनन्यसाधारण महत्व होतं. त्यांचं अस्तित्व, त्यांची मतं, त्यांचे विचार आणि त्यांचे सामाजिक स्थान हे अत्यंत आदरपूर्ण स्वीकारले गेले होते. का वाटावं बरं असं? कारण या #शिल्पकला बघताना एक गोष्ट लक्षात येते की केवळ पुरुषांच्या समाधानासाठी मैथुन क्रिया केली गेलेली नाही; तर स्त्रीच्या सुखाच्या परमोच्च क्षणाचा देखील विचार केला गेला आहे. तिला देखील शारीरिक सुख हे हक्काने आणि योग्य प्रकारे मिळाले पाहिजे असा त्या काळातील दृष्टिकोन होता... असं या शिल्पांवरून प्रतीत होतं. या शिल्पांमध्ये दाखवल्या गेलेल्या स्त्री-पुरुषांच्या दोघांच्याही चेहेऱ्यावर एका अलौकिक आणि दैवी आनंदाची आभा सतत जाणवते. जरी ही शिल्पं कामकलेवर आधारित असली तरी त्यामध्ये जराही अश्लीलता नाही. तसे बघितले तर शरीरसुख हा विचार ना रहस्यपूर्ण आहे; ना त्यात कोणतीही पशुवृत्ती आहे. ते पाप किंवा पुण्याशी जोडलेले नाही; किंवा तोच एक आयुष्याच्या सुखाचा परमोच्च मार्ग आहे असा विचार कुठेही प्रतीत होत नाही. शरीरसुख अनुभवणे ही एक अत्यंत सामान्य कृती आहे. उलट याविषयी चर्चा होऊ न देणे, मुलांना प्रबोधन करताना देखील याविषयी एकप्रकारची गूढता निर्माण करणे, सर्वसामान्य सामाजिक व्यवस्थेमध्ये याविषयाची उदासीनता यामुळेच हा विषय केंद्रस्थानी असतो. अर्थात ही सर्व माझी मतं झाली... आता थोडं #खजुराहोबद्दल... त्याच्या इतिहासाबद्दल.... पुरणकाळातील दाखल्यांबद्दल आणि नंतर तेथील शिल्पकलांच्या फोटोंसाहित तेथील गाईडने सांगितलेल्या माहितीबद्दल!!!

असं म्हणतात.....

काशीच्या राजपंडितांची मुळगी हेमावती अपूर्व सौंदर्यवती होती. एका रात्री ती कमलपुष्पांनी भरलेल्या तळ्यामध्ये स्नान करत असताना तिच्या अनन्यसाधारण सौंदर्यावर चंद्रदेव मोहित झाले आणि मानव रूप धारण करून पृथ्वीवर उतरले. ती रात्र त्यांनी एकत्रित व्यतित केली. परंतु पहाटे चंद्रदेव परत निघाले असता हेमवतीने त्यांना थांबण्याचे आर्जव केले आणि ती गर्भवती झाली असल्याचे संगितले. हे ऐकताच चंद्रदेवांनी हेमवतीला आशीर्वाद दिला की ती एका वीर पुत्राला जन्म देईल. त्याला हेमवतीने खजुरपुराला न्यावे. हा मुलगा पुढे एक महान राजा बनेल आणि उद्यान आणि तलावांनी घेरलेल्या अनेक मंदिरांचे निर्माण करेल. पुढे चंद्रदेव हेमवतीला म्हणाले की राजा झाल्यावर तुझा वीर पुत्र एका विशाल यज्ञाचे आयोजन करेल; ज्यामुळे तुझी सर्व पापे नष्ट होतील. बदनामी होऊ नये म्हणून आणि आपल्या पुत्राला जन्मदेण्यासाठी हेमवतीने पित्याचे घर सोडले आणि ती एका लहान गावामध्ये जाऊन राहिली. यथावकाश तिला पुत्रप्राप्ति झाली. हेमवतीचा पुत्र चंद्रवर्मन आपल्या पित्याप्रमाणे तेजस्वी, शक्तिशाली आणि वीर होता. असे म्हणतात की तो सोळाव्या वर्षीच कोणतेही आयुध न घेता वाघाची शिकार करत असे. चंद्रवर्मनने अनेक युद्धे जिंकली. त्यानंतर हेमवतीच्या सांगण्यावरून त्याने सुंदर उद्याने आणि तलावयुक्त अशी एकूण पंच्याऐशी अद्वितीय मंदिरे निर्माण केली. त्यानंतर त्याने एक मोठा यज्ञ केला; ज्यायोगे हेमवतीचे सर्व पाप नष्ट झाले. पुढे चंद्रवर्मनच्याच नावाने निर्माण झालेल्या चंदेलवंशाच्या राजांनी खजुराहोमध्ये अनेक मंदिरे निर्माण केली.

आजही ही पौराणिक कथा या भागातील प्रत्येक व्यक्ती सांगते. कदाचित ही कथा अशीच पिढ्यानपिढ्या एकमेकांना सांगितली गेली आहे आणि म्हणूनच ती जिवंत राहिली आहे. #खजुराहोचा इतिहास देखील इतकाच रोचक आहे. ऐतिहासिक दाखल्यांप्रमाणे चंदेलवंशाच्या राजानी दहा ते बाराव्या शतकात मध्य बारावर राज्य केले आहे. त्याचप्रमाणे याच ऐतिहासिक दाखल्यांच्या आधारे हे सिद्ध झाले आहे की #खजुराहो येथील मंदिरांचे निर्माण इ. स. ९५० ते इ. स. १०५० दरम्यान चंदेल राजांकरवी झालेलं आहे. मात्र असे म्हणतात की या मंदिरांना निर्माण केल्यानंतर चंदेल राजांनी त्यांची राजधानी महोबा येथे स्थलांतरित केली. मात्र तरीही त्याकाळात देखील #खजुराहोच्या मंदिरांचे महत्व अबाधित होते.

ही एकूण पांच्याएशी मंदिरांची शृंखला असून ही मंदिरे लक्ष्मण, शिव आणि पार्वती यांना समर्पित आहेत. #कंदारिया महादेवाचे मंदिरावरील #शिल्पकला विशेष आहे. हे मंदिर #खजुराहोमधील सर्वात विशाल आणि उत्तम #शिल्पकला असलेले आहे. याची उंची एकशे सतरा फूट असून लांबी देखील तेवढीच आहे. या मंदिराची रचना सप्तर्थ शैलीमधील आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस सहाशे सेहेचाळीस शिल्प असून आतमध्ये दोनशे सव्वीस शिल्पे आहेत. सर्वसाधारणपणे एका मंदिरामध्ये इतकी शिल्पे सापडणे अवघड आहे. या दीराचे प्रवेशद्वार नऊ शाखांचे आहे. या मंदिराचे विशेष महत्व म्हणजे त्यावेळच्या राजा विद्याधर याने मोहम्मद गजनीला दुसऱ्यांदा हरवल्यानंतर इ.स. १०६५ दरम्यान बांधले.

या मंदिरांचा शोध साधारण इ.स. १८५२ ते इ.स. १८८५ या काळात इंग्रजानी लावला. तोपर्यंत याप्रदेशामध्ये घनदाट जंगल होते आणि हिंस्त्र प्राण्याचा प्रभाव खूप मोठा होता. आज या पांच्याएशी मंदिरांपैकी केवळ बावीस मंदिरे आपण बघू शकतो. बाकीच्या मंदिरांचा ह्रास काळाच्या ओघात झाला. अर्थात जी मंदिरे आजही आहेत त्यांच्यावरील #शिल्पकलेच्या सौंदर्यावरून या मंदिरांचा सुवर्णकाळ किती उज्वल असेल याची आपण कल्पना करू शकतो. सर्वसाधारणपणे या शिल्पकलेमधून कामसूत्रात वर्णन केलेल्या अष्ट मैथुनचे चित्रीकरण आहे. कदाचित प्राचीन काळातील स्त्री-पुरुष देव, धर्म, नैतिकता याचा फार विचार न करता मुक्तपणे शरीरसुखाचा अनुभव घेत असावेत असे या शिल्पकलेवरून वाटते.

मंदिराचा संध्याकाळचा देखावा


 दहाव्या शतकातील गणपती मूर्ती


राजाला रिझवणारी नर्तकी आणि दरबारी


त्या काळात समूह मैथुन प्रथा असावी असं या शिल्पणवरून वाटतं


युद्धावर असताना योध्याना शरीरसुखाची इच्छा झाली असता ते अनेकदा घोड्यांचा पर्याय निवडायचे


राजा आणि दरबारी नृत्य आणि गायनात मग्न आहेत




विविध कामशास्त्र क्रिया


कामकलेची सुरवात चुंबनाने होते हे इथे प्रतीत होते


स्त्री अत्यंत प्रेमाने प्रियकराला रिझवत आहे. दोघांच्याही चेहेर्यावरील भाव अत्यंत आनंदी आहेत




पुरुष स्त्रीला प्रेमाने आलिंगन देऊन कामक्रियेसाठी उद्युक्त करतो आहे


एक रुपगर्वीता पायाला अल्ता लावते आहे. या शिल्पातील खासियत ही की तिला अल्ता लावायला मदत करणाऱ्या स्त्रीकडे सुंदर बॅग आहे.... 


कामक्रीडेतील अजून एक शिल्प




मंदिरातील छत


लक्ष्मण मंदिराच्या समोरच वराह शिल्प आहे. 


साजशृंगार करणारी सौंदर्यवती


पार्वती मंदिराबाहेरील हत्तीचे शिल्प


या प्राण्याचे निरीक्षण केले असता धड हत्ती प्रमाणे आणि शरीर घोड्याचे दिसते. कदाचित त्या काळात युद्धावरील प्राण्यांना मुखवटे घालून त्यांचे रूप उग्र करत असतील. शत्रू सैन्याला भिती वाटावी म्हणून


एक म्हटवाची माहिती. त्याकाळातील मंदिरे locking systim ने जोडलेली होती. सर्वच मंदिरातील दगड हे तुम्हाला आशा प्रकारच्या क्लिप्स नी जोडलेले दिसतील


घोड्याला राक्षस मुखवटा दिसतो आहे


सर्वसाधारणतः सर्व मंदिरांच्या भिंतींवरील शिल्पांची सुरवात अशा प्रकारच्या राक्षस चेहेऱ्यानी झालेली आहे


हत्ती, घोडे हे प्राणी माणसाळवून त्यांच्याकडून काम करून घेतले जात आहे


संध्याकाळच्या सुमाराच मंदिर परिसर


दहाव्या शतकातील बुद्ध मूर्ती


मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूने घेतलेला व्हिडीओ


मनापासून सांगते.... प्रत्येकाने या सुंदर मंदिरांना भेट द्यावीच. आपला सोनेरी इतिहास आणि त्याकाळातील श्रीमंत संस्कृती जाणून घेणे खूप म्हटवाचे आहे. त्याव्यतिरिक्त देखील खूप काही आहे खजुराहोमध्ये पाहण्यासारखे. ते पुढील भागात.

Friday, February 21, 2020

#नमामिगंगे... #काशीविश्वेश्वर.. #वाराणासी दर्शन!

#नमामिगंगे... #काशीविश्वेश्वर आणि #वाराणासी दर्शन!

वाराणासी म्हणजेच आपली काशी आणि येथील श्रीकाशीविश्वेश्वर मंदिर! भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी #नमामिगंगे कार्यक्रमाआंतर्गत गंगा नदीला पूर्ववत निर्मळ आणि प्रदूषणरहीत करण्याचे ठरवले आणि यासाठी लगेच आर्थिक निधी उभारून हे काम २०१४मध्ये सुरू केले. अजूनही या कार्यक्रमाची पूर्तता झालेली नाही हे जरी सत्य असले तरी आजची #वाराणासी हे पूर्वीपेक्षा शतपटीने स्वच्छ शहर झालं आहे; असं सतत ऐकत होते. #नमामिगंगे कार्यक्रमाबद्दल माहिती वाचल्यापासूनच मनात होतं की परत एकदा #वाराणासी ला जाऊन आलं पाहिजे. एकदिवस सहज ठरवलं आणि तिकीट काढून निघाले. निघताना पंधरा वर्षांपूर्वीच्या #वाराणासी च्या आठवणी सोबत होत्या. #गंगाआरती, वारणासीचा बाजार, रस्ते.... अस्वच्छता, गर्दी, धक्काबुक्की आणि मुलांना सांभाळत #गंगाआरती नंतर मनाचा हिय्या करून गंगेच्या त्या काळ्या पाण्यात तीन वेळा मारलेल्या डुबक्या... हे सगळं आठवत होतं. #वाराणासीच्या विमानतळावरून बाहेर पडले आणि स्वच्छ आणि चौपदरी रस्ते बघून मनाला दिलासा मिळाला. हॉटेलच्या दिशेने निघाले आणि आजूबाजूचा परिसर बघता बघता #वाराणासीच्या भूतकाळात हरवून गेले.

पौराणिक कथेमध्ये असा उल्लेख आहे की ब्रम्ह देवाने काशी येथे गंगे किनारी दहा अश्वमेध केले होते. त्यामुळे याठिकाणी गंगा स्नान केल्यास या दहा अश्वमेधांचे पुण्य मिळते. कदाचित म्हणूनच येथील अश्वमेध घाट हा खूपच महत्वाचा मानला जातो. पुढे श्री शंकर ब्रम्हाला भेटायला काशी येथे आले आणि त्यांना हा निसर्ग सुंदर परिसर आणि येथील पवित्रता खूप भावली. त्यांनी श्री ब्रम्हाकडून काशी मागून घेतली. तेव्हापासून श्रीकाशी क्षेत्र हे श्रीशंकराचे निवास्थान झाले.

तसं बघितलं तर #वाराणसी म्हणजे भारताचं किंबहुना जगभरातलं सर्वात प्राचीन शहर! इजिप्त, बगदाद, तेहरान, मक्का, रोम, एथेन्स, जेरुसलेम, बाईब्लोस, जेरिको, मोहन-जो-दारो, हडप्पा अशी अनेक शहरं जगातील प्राचीन शहरं म्हणून ओळखली जातात. मात्र पौराणिक आणि ऐतिहासिक सत्यता पडताळली तर जगातील सर्वात प्राचीन शहर हे #वाराणासी आहे. याचा उल्लेख इतिहासात देखील अगदी इसवीसनाच्या पुर्विपासूनचा आहे. जवळ जवळ तीन ते पाच हजार वर्षांपूर्वी पासून या शहरात लोकांचा निवास होता याचे दाखले आहेत. आपल्या धर्मग्रंथांमधील उल्लेखाचा अभ्यास केला तर हे शहर पुराण काळात देखील अत्यंत श्रीमंत शहर म्हणून ओळखलं जात होतं हे लक्षात येईल. महाभारत आणि उपनिषदांमध्ये देखील काशीचा उल्लेख झालेला आढळतो. भगवान बुद्ध, शंकराचार्य, वल्लभाचार्य, संत कबीर, गुरू नानक, तुलसीदास, चैतन्य महाप्रभू कालीदास असे अनेक महान संत या नगरमध्ये आले किंवा राहिले होते. संत तुलसीदासांनी रामचारीतमानस वाराणासी येथेच लिहून पूर्ण केले होते. गौतम बुध्दानी देखील बौध्द गया येथुन ज्ञान प्राप्त झाल्यानंतर वाराणासी येथे येऊन त्यांचे पहिले प्रवचन सारनाथ येथे दिले होते. हे शहर पुरातन काळापासून ज्ञान, शिक्षण आणि संस्कृतीचे केंद्र राहिले आहे. महाभारत काळामध्ये काशीचा उल्लेख तीर्थक्षेत्र म्हणून आढळतो. मात्र त्याअगोदर आणि त्यानंतर देखील अनेक पिढ्यामध्ये तीर्थक्षेत्र हा विचार नव्हता असं लक्षात येतं. माहाभारत काळातील ब्राह्मवर्त हा उल्लेख आपण अनेकदा ऐकला किंवा वाचला आहे... हे ब्राह्मवर्त म्हणजेच आजची #वाराणासी... आपली काशी!



#काशी हे 'मंदिरांचे शहर', 'भारताची धार्मिक राजधानी', 'भगवान शिवाने वसवलेली नगरी', 'दिव्यांचे शहर', 'ज्ञान नगरी' अशा विविध टोपण नावांनी ओळखले जाते. #काशीचा पहिला उल्लेख अथर्ववेदामध्ये आढळतो. एका श्लोकामध्ये एका रोग्याला उल्लेखून म्हंटले आहे की त्याचा ज्वर दूर होवो आणि त्याचा प्रसार काशी, कोशल आणि मगध राजांमध्ये न होवो. इथे हे स्पष्ट होते की ही तीनही शहरे त्याकाळात देखील होती. एका पौराणिक कथेतील उल्लेखाप्रमाणे सत्रजीत राजाच्या पुत्राने शतानिकने काशिवासीयांच्या पवित्र यज्ञाच्या अश्वाला पकडून आपला अश्वमेध यज्ञ पूर्ण केला होता; आणि आपला पवित्र अश्व पकडला गेला या रागापाई काशिवासीयांनी अग्निकर्म आणि अग्निहोत्र करणेच सोडून दिले होते.

या पौराणिक उल्लेखांव्यतिरिक्त काशीचे ऐतिहासिक महत्व तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या अस्थी काशीला जाऊन गंगेत सोडल्या आणि त्यांच्या नावाने तेथे पिंड दान केले तर त्या मृत जीवाला स्वर्ग प्राप्ती होते अशी हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे. त्याशिवाय वृद्धावस्थेमध्ये संन्यस्त जीवन जगण्यासाठी काशीला जाऊन राहावं असा एक विचार देखील आहेच. काशी शहराचं पुराण आणि ऐतिहासिक काळातील शैक्षणिक महत्व तर जगद्सिद्धच आहे. अशा या #काशी #वाराणासी मधील #काशीविश्वेश्वराच्या दर्शनासाठी आणि त्याहूनही जास्त स्वच्छ गंगेच्या दर्शनासाठी मी निघाले होते.

दुपारी हॉटेलवर पोहोचून सामान टाकले. मला माझी उत्सुकता स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे लगेच गंगा घाटाच्या दिशेने निघाले. खरं सांगू का... माझ्या मनातल्या पंधरा वर्षांपूर्वीच्या सगळ्या आठवणी आजच्या #वाराणासी ने साफ पुसून टाकल्या. संपूर्ण शहरात कमालीची स्वच्छता आहे. एका ठराविक अंतरापर्यंत चार चाकी वाहाने जाऊ शकतात, मग रिक्षा, मग बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा किंवा सायकल रिक्षांनाच परवानगी आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे इथले रस्ते फारच लहान आहेत. त्याच रस्त्यांवर कडेने अनेक भाजीवाले किंवा असंच काहीबाही विकणारे बसलेले असतात. त्यातच लोक चालत असतात. रस्त्यांच्या दोन्ही बाजूनी असलेल्या दुकानातील गर्दी तर आपल्याला गोंधळून टाकते. मात्र आपण मजल-दरमजल करत गंगेच्या घाटाच्या दिशेने चालत राहावं. कोणतीही गल्ली शेवटी घाटाच्या दिशेनेच जात असल्याने ही गल्ली की ती गल्ली असा प्रश्नच उदभवत नाही. तरीही शंका आली तर शेजारून जाणाऱ्या कोणालाही तुम्ही फक्त 'गंगा घाट..' इतकंच म्हणा की तुम्हाला काही पावलं सोबत करून अगदी घाटाच्या जवळ नेऊन सोडलंच समजा.

संध्याकाळी पाचच्या सुमाराच्या घाटाचं दर्शन म्हणजे एक नेत्र सोहळाच आहे. रोज संध्याकाळी अगदी तिनशेपाशष्ट दिवस इथे #गंगाआरती होते. त्याची तयारी पाच वाजल्यापासूनच सुरू झालेली असते. एकूण सात पुरोहित षोडशोपचाराने गंगेची आरती करतात. संपूर्ण आसमंत एका वेगळ्याच पवित्र वातारणाने भारलेला असतो. आरतीच्या अगोदरची तयारी.... त्यानंतर धूप, दीपादीने सुरवात होऊन उच्च स्वरात महादेवाच्या जयजयकाराने आणि घंटानादाने होणारा शेवट म्हणजे नास्तिकाला देखील नकळत हात जोडायला लावणारा अनुभव आहे. गंगा आरती बघण्यासाठी वृद्धांसाठी खुर्चा तर इतर भाविकांसाठी चटया अंथरून बसण्याची सोय केलेली आहे. तसेच बोटींमधून देखील हा गंगा आरती बघण्याचा अनुभव घेऊ शकतो. प्रत्येक भाविकांच्या मनातला सात्विक आणि गंगेला समर्पित होण्याचा भाव जाणवत असतो. # गंगाआरती संपल्यानंतर हळूहळू घाट रिकामा व्हायला लागतो. त्यात देखील घाई नव्हती. त्यामुळे घाटावरून चालत गंगेचं मनोहर रूप मनात साठवत होते.

थोड्यावेळाने घाट अगदीच रिकामा झाला. मग श्रीकाशीविश्वेश्वराचं दर्शन घ्यावं म्हणून निघाले. जसे सगळे रस्ते शेवटी गंगेच्या घाटाकडे वळतात; तसेच घाटाजवळील सगळ्या गल्ल्या शेवटी श्रीकाशीविश्वेश्वराच्या मंदिराच्या दिशेने जातात. त्यामुळे कोणत्याही गल्लीमध्ये शिरून थोडं विचारत पुढे गेलं की मंदिर येतं. अर्थात मंदिर प्रवेश आणि विश्वेश्ववराचं दर्शन तसं सोपं नक्कीच नाही. मंदिरामध्ये कोणतीही चामड्याची किंवा धातूची वस्तू नेण्यास परवानगी नाही. त्यामुळे बाहेर अनेक लॉकर्स उपलब्ध असतात तिथे आपल्या सगळ्याच वस्तू ठेवाव्या लागतात.... आणि इथून सुरू होतो आपल्या भावनांचा बाजार! लॉकर फुकट असतो मात्र देवाला नेण्याचा प्रसाद त्याच दुकानातून घ्यायचा असतो. त्याची किंमत तुमच्या वेशभूषेवरून ठरते. दर्शनाची रांग लांबच लांब असते. आपण शांतपणे रांगेत उभे राहातो... वेळ जात असतो आणि रांग फारशी पुढे सरकत नसल्याचे लक्षात आल्याने आपण अस्वस्थ व्हायला लागतो. तेव्हाच एक माणूस येतो. आपला वेगळा शहरिपणा ओळखून विचारतो की लवकर दर्शन करून हवं आहे का? मला काही नको... मात्र आत पुरोहितांना दक्षिणा द्यावी लागेल; ती तुम्हीच तुमच्या हातांनी द्या. रांगेत उभं राहून आपण कंटाळले असतो; त्यामुळे ते आपण लगेच मान्य करतो. प्रत्येक तपासणी द्वारातून तो आपल्याला अगदी सहज पुढे घेऊन जातो. जाताना उजवीकडे अन्नपूर्णा देवीचे मंदिर लागते. 'येताना देवीचे दर्शन नक्की घ्या;' असे सांगून तो आपल्याला पुढे जायला भाग पडतो. मुख्य विश्वेश्ववराचे दर्शन म्हणजे खरोखरच दिव्य आहे. खूपशा धक्काबुक्की नंतर तुम्ही अगदी गाभाऱ्यापर्यंत पोहोचता. पण तरीही आत जाणं अशक्य असतं. तेव्हाच कुठूनतरी तिथे 'मुख्य पुरोहित' येतो आणि तो तुम्हाला त्या गर्दीमधून आत घेऊन जातो. त्याच परिस्थितीत हातातील लोट्यामधून आणलेलं आणि धक्काबुक्कीमध्ये लोट्यामध्ये अगदी थोडंसं उरलेलं गंगाजल आपण श्रीविश्वेश्ववराच्या पिंडीवर ओतायचं. पिंडीला हात लावून नमस्कार करेपर्यंत जेमतेम तीन-चार सेकंद मिळतात आणि आपल्याला लक्षात यायच्या अगोदरच आपण बाहेर फेकले गेलेले असतो. मग आपल्या योग्यतेप्रमाणे पुरोहित सांगतो की त्याने किती अवघड असलेलं दर्शन आपल्याला सुलभ करून दिलं. ते मान्य करत आपण त्यांना दक्षिणा द्यायची आणि मागे फिरायचं. अन्नपूर्णेच दर्शन घेऊन लॉकर मधल आपलं सामान घेऊन बाहेर पडायचं.

हे सगळं मी साग्रसंगीत केलं आणि लहान गल्ल्या-बोळ पार करत बाहेर आले... आणि मग माझ्या मानत आलं की अरे या सगळ्या नादात एकदाही आपण या अतिप्राचीन देवळाच्या रचनेकडे डोळे भरून पाहिलंही नाही. मनातून थोडं वाईट वाटलं. कारण मला पुरातन वास्तुकला बघायला खूप आवडतं. मात्र दर्शन उत्तम झालं होतं. त्या समाधानात बाहेर पडून भैरव मंदिराकडे निघाले. श्रीकाशीविश्वेश्वर आणि अन्नपूर्णा देवीच्या दर्शनानंतर भैरव दर्शन करावं अशी तिथली प्रथा आहे; असं अनेकांनी मला सांगितलं होतं... केवळ म्हणून! भैरव दर्शन मात्र अगदी सहज झालं आणि #वाराणासी ला आल्याचं एक वेगळंच समाधान मनाला मिळालं. आल्या दिवशी #गंगादर्शन, गंगा आरती, श्रीविश्वेश्वर, अन्नपूर्णा आणि भैरव दर्शन असा संपूर्ण वैदिक सोहळा पार पडला होता. मात्र तिथून बाहेर पडेपर्यंत बराच उशीर झाला होता. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. पण तरीही गंमत म्हणजे संपूर्ण शहर जागं होतं. दुकानं ओसंडून वाहात होती. रस्त्यावरील गोलगप्पे, आलूटिक्की, समोसा चाट, लस्सी आणि तत्सम सगळे स्टॉल्स गर्दीने व्यापलेले होते. त्याच चाट भांडारावर मस्त ताव मारला आणि परत एकदा सायकल रिक्षा मग पेट्रोलची रिक्षा आणि मग टॅक्सी असा उलटा प्रवास करत हॉटेलमध्ये पोहोचले.

दुसरा दिवस माझा मला मोकळा होता. त्यामुळे आज जितकं शक्य आहे तितकं वास्तुशिल्प आणि जुनं शहर बघायचं ठरवलं होतं. गौतम बुद्धांचा प्राचीन असा एक स्तूप सारनाथ येथे आहे. तो स्तूप बघण्यास गेले. या स्तुपाची रचना काहीशी इजिप्त मधल्या पिरॅमिड सारखी वाटते. विटांनी बनलेली ही विशाल रचना चंद्रगुप्त काळातील म्हणजे जवळ जवळ चौथ्या किंवा पाचव्या शतकातील आहे. बोध प्राप्तीनंतर भगवान बुद्धांची भेट पंचवर्गीय भिक्षूंशी इथेच झाली असे म्हंटले जाते. या स्तुपाचा उल्लेख सातव्या शतकातील विख्यात चिनी यात्री हवेन सांग याने त्याच्या यात्रेच्या लेखन अनुभवामध्ये केला आहे. पुरातत्व विभागाने येथे केलेल्या उत्खननामध्ये ज्या मूर्ती मिळाल्या त्यात धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेमधील बुद्ध प्रतिमा आणि तलवारधारी मानव मूर्ती अशा चंद्रगुप्त काळातील मूर्ती मिळाल्या आहेत; असा तेथील लेखावर उल्लेख आहे. तसं बघितलं तर विटांचं बांधकाम असलेला हा स्तूप फार शोभनिय नाही; मात्र याला असणारा इतिहास नक्कीच संस्मरणीय आहे. सारनाथ हा स्तूप तसा गावाबाहेर आहे. त्यामुळे हा स्तूप आणि त्यानंतर त्यापुढे नवीन बांधले बौद्ध मंदिर आणि तेथील २०११ मध्ये प्रस्थापित केलेली ऐशी फूट उंच बुद्ध मूर्ती बघून मी परत #वाराणासी गावात निघाले. गावामध्ये श्रीलक्ष्मी तलाव हे स्थळ देखील पाहण्यासारखे आहे; हे समजल्यामुळे ते बघण्यास गेले. तेथे एका लहान तलावामध्ये एक लहानसे लक्ष्मी मंदिर आहे. त्यानंतर मात्र माझ्या लक्षात आले की आपापल्या श्रद्धेप्रमाणे प्रत्येकजण मला त्याच्या इष्ट देवतेचे दर्शन घेण्यास सांगणार. त्यामुळे मग मात्र मी कोणालाही काहीही न विचारता गंगेच्या घाटाच्या दिशेने निघाले. #गंगाआरतीचा अनुभव आदल्याच दिवशी घेतल्यामुळे मी आज त्यापासून थोडं लांब इतर घाटांवरून फिरण्याचे ठरवले. जसजशी काहीशा दूरच्या घाटाच्या दिशेने चालू लागले तसतसं लक्षात आलं की आपला हा निर्णयच बरोबर आहे. कारण आपण जसजसे मुख्य घाटापासून दूर जातो तसतसा गंगेच्या सुंदर घाटांचा अनुभव आपल्याला येतो. सुदंर बांधून काढलेले घाट, त्यांची अलीकडच्या काळात सांभाळलेली स्वच्छता आणि मुख्य घाटापासून दूर असल्याने कोणत्याही प्रकारचा बाजारूपणा नसलेले वातावरण मनाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. गंगेच्या वाहात्या पाण्याचा खळखळाट आणि गावातल्या रहिवाशांचे रोजचे घाटावर येऊन बसणे.... खरोखरच इतक्या लांब आल्यानंतर विश्वेश्ववराच्या दर्शनापेक्षा देखील जास्त समाधान या निसर्गरम्य आणि खेडूत अशा वातावरणात जाणवते.

श्रीकाशीविश्वेश्वर दर्शन आणि वाराणासी दर्शन हा मन भारून टाकणारा अनुभव नक्कीच माझ्या हृदयाच्या कुपीत मी कायम जतन करून ठेवणार आहे. तुम्हाला देखील मनःपूर्वक आग्रह आहे की केवळ वय झाल्यानंतरच #काशी ला... #वाराणासी ला जावं असं नाही... तर #नमामिगंगे योजनेआंतर्गत झालेल्या #बनारस चा कायापालट बघण्यासाठी आणि निसर्गरम्य गंगा घाट अनुभवण्यासाठी नक्की तेथे एकदा जावं.
रात्री उशिरा गजबजलेला बाजार
ओसंडून वाहणारा रस्ता

#गंगाआरती

गंगा आरती दरम्यान धुपारती

आरतीला सुरवात होण्या अगोदर होणारी तयारी आणि जमणारे भाविक
#गंगाआरती नंतर गंगेच्या पवित्र पाण्यात दीप सोडले जातात. भाविकांचा असा विश्वास आहे की हे दीप आपल्या सोडून गेलेल्या जवळच्या व्यक्तीच्या नावाने सोडल्यास त्यांच्या आत्म्याला शांती लाभते.


बनारसी पान भांडार



छोले कचोरी, समोसा छोला, पुरी-भाजी, जलेबी, रबडी, लस्सी, रसमलाई... जो बोलो मिलजाता हें यहा।



रात्री उशिरा गजबजलेला बाजार




ओसंडून वाहणारा रस्ता


#गंगाआरती


धुपारती


गंगा आरतीची तयारी आणि भाविक जमत असताना


2011 मध्ये बांधलेल्या बुद्ध मंदिरातील बुद्ध मूर्ती


2011 मध्ये बांधलेली ऐंशी फूट उंच बुद्ध मूर्ती


2011 मध्ये बांधलेले बुद्ध मंदिर


सारनाथ येथील स्तूप


#गंगाआरती झाल्यानंतर पवित्र गंगेच्या पाण्यात सोडलेले दिवे


सायकल रिक्षा

Friday, February 14, 2020

दुरून डोंगर साजरे 

दुरून डोंगर साजरे


अनंत आणि त्याची पत्नी अनन्या लग्नाचा पंधरावा वर्धापन दिन साजरा करायला न्यूझीलंडला गेले होते. एक चर्च बघायला गेले असताना साधारण त्यांच्याच वयाचं एक जोडपं त्यांना तिथे भेटलं. सहज गप्पा सुरू झाल्या; त्यात त्या परदेशी जोडप्याने सांगितलं की हे दोघांचंही दुसरं लग्न आहे आणि अफेअर्स त्यांनी फार लक्षात ठेवली नाहीत. अनंतने कौतुकाने सांगितलं की त्यांच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली आहेत आणि लग्ना अगोदर चार वर्ष त्याची पत्नीच त्याची प्रेयसी होती. हे ऐकून ते परदेशी जोडपं काहीसं गोंधळल.

"Are you serious? You mean you both are styaing together for last ninteen years?"

"No! We know each other for last ninteen years. But we started staying together after we got married."

"How many kids you have? Do they stay with you?"

"We have two kids and of course they both stay with us. Infact we stay with my parents and our kids in one home."

"Good loard! That's a remarkable lifestyle!"

"I don't think so. That's a very normal and happily accepted lifestyle in India." अनंत अभिमानाने म्हणाला.

काहीवेळ गप्पा मारून दोन्ही जोडपी आपापल्या मार्गाने गेली. ते दोघे परत आल्यानंतर एकदा अनन्यायची मैत्रीण अजिता त्यांच्याकडे गेली असताना अनन्याने तिला ही घटना सांगितली. अजिता म्हणाली; "खरंच आहे न ग! आपल्याकडे कुटुंब म्हंटल की अजूनही आजी-आजोबा, आई-वडील आणि नातवंड हेच डोळ्यासमोर येतं. पूर्वी आई-वडील, दोन भावंड आणि त्यांचं कुटुंब असं असायचं; आता मात्र दोन भाऊ वेगळे राहातात."

अनन्या म्हणाली; "हे सगळं मला माहीत नाही का? माझी हरकत वेगळीच आहे. हा म्हणाला 'happily accepted lifestyle'.... कशावरून ग मी ही कुटुंब व्यवस्था happily स्वीकारली आहे?"

अजिता थोडीशी गोंधळली. कारण अनन्याची सासू तशी बरीच active होती. दोघींचं भांडण झालेलं कधी ऐकलं नव्हतं. थोडे मान-अपमान असायचे... पण अनन्यानेच अनेकदा म्हंटल होत की एकत्र असलं की भांड्याला भांड लागणारच. ते ना मी धरून बसत ना त्या. मग तिने हे असं अचानक का म्हणावं ते अजिताला कळलंच नाही. अजिता तिच्याकडे प्रश्नर्थक नजरेने बघितलं. अनन्या म्हणाली,"अग, आमच्यात काहीच प्रश्न नाहीत आता. उलट बरीचशी सवय झाली आहे. त्या कुठे आणि कधी कसं बोलतील हे मला माहीत असतं; आणि माझे शालजोडीतले त्यांना देखील कळतात. सवय झाली आहे आम्हाला एकमेकींची. पण खरं सांगू? नवीन लग्न झालं तेव्हा अनेकदा काही गोष्टी अजिबात पटायच्या नाहीत. पण तसं बघितलं तर त्या गोष्टी इतक्या शुल्लक असायच्या की ते विषय धरून ठेवले असते तर इतर अनेक गोष्टींमध्ये अडचण आली असती म्हणुन गप्प बसायचे."

तिचं बोलणं अजूनही अजिताच्या लक्षात येत नव्हतं. ती म्हणाली; "ऐ काय ते स्पष्ट सांग. हे तुझं कोड्यात बोलणं मला कळत नाही."

त्यावर अनन्या म्हणाली, "अग, मी लग्न करायच्या अगोदरच सांगितलं होतं की मी नोकरी कायम करणार आहे. सासूबाई फारच उत्साही होत्या. त्यामुळे त्यांची कधीच हरकत नव्हती माझ्या नोकरीला. रोज नवऱ्याच्या बरोबरीने त्या माझा डबासुद्धा भरायच्या. पण मग दर रविवारी किंवा कोणत्याही सुट्टीच्या दिवशी स्वयंपाकघराची सगळी जवाबदारी माझी असायची. त्यातच एप्रिल-मे मध्ये तिखट-हळद भरणे, गोडा-गरम मसाला करून ठेवणे ही कामं सुट्टीच्या दिवशी असायची. मला खूपदा वाटायचं ग की हे सगळे पदार्थ विकत आणावेत..... सुट्टीच्या दिवशी आरामात उठावं.... नवऱ्याबरोबर बाहेर जावं..... कधीतरी जीन्स आणि टॉप किंवा शॉर्ट वन पीस घालावा..... पण हे कधीच करता आलं नाही. तुझं बरं होतं. तू कायमच वेगळी राहिलास आणि हवं तसं जगलीस."

"अग, पण तुम्ही तर तुमच्या ऑफिस मधल्या पिकनिक्सना नेहेमी जायचात की. जोडप्याने जायचात. तू माझ्याकडे येऊन जीन्स आणि टॉप घालून जयचीस. आठवत न? तुझी मुलं देखील तुझी सासू सांभाळायची त्यावेळी. विसरलीस की काय?" अजिता म्हणाली.

"हो. अगदी शंभर टक्के मान्य! म्हणून तर म्हंटल की विषय शुल्लकच होते; त्यामुळे त्यावरून वाद-भांडण करावंसं वाटलंच नाही. अग, पण एखाद्या सुट्टीच्या दिवशी मला फक्त आम्ही दोघांनी बाहेर भटकायला जावं असं फार वाटायचं ग. मात्र फक्त आम्ही दोघेच गेलो तर आईला काय वाटेल? ती कायम घरात असते आणि आपण कामाच्या निमित्ताने बाहेर.... असं म्हणून सुरवातीला याने ते टाळलं.... मग मुलं झाल्यावर मुलांबरोबर अगदी नेमाने जायचो. पण ते दोघांनी हातात हात घालून भटकणं मी नाही कधी अनुभवलं. एक अजून सांगू? मी कधीच आळसावलेली सकाळ माझ्याच घरात नाही अनुभवली." अनन्या म्हणाली.

"अग, पण मग आता कर न हवा तितका आळशीपणा. आता तर तुम्ही चोवीस तासासाठी कामाला बाई ठेवली आहे. त्याव्यतिरिक्त स्वयंपाकाला बाई........." अजिता म्हणाली. तिला थांबवत अनन्या म्हणाली,"अग, आता सगळंच मी बघते. त्यामुळे साठवणीचे पदार्थ विकत, चोवीस तास बाई असली सुखं आहेत. मुलं आता आपलं आपण सगळं करतात. गेल्याच वर्षी मला चांगली पोस्ट मिळाली आणि पगार देखील वाढला आहे. अनंत देखील चांगलं कमावतो आहे. तसं म्हंटल तर आता सगळी सुखं हात जोडून समोर उभी आहेत. पण त्या वयातली ती काहीशी वेडी स्वप्न हरवली आहेत ग.... आणि आता कितीही पैसे दिले न तरी ना ते वय परत येणार आहे; ना त्यातलं थ्रिल." काहीशी उसासत अनन्या म्हणाली. अजिताला तिचं म्हणणं पटत होतं देखील आणि नाही देखील.

गम्मत अशी होती की अजिताला अनन्याच्या आयुष्याबद्दल कायम हेवा वाटत आला होता. अजिता लग्नाच्या पहिल्या दिवसापासून वेगळी राहिली होती. लग्न करतानाची तिची तीच तर अट होती. ती मोकळ्या वातावरणात वाढलेली मुलगी होती. त्यामुळे तिला एकत्रित कुटुंब नको होतं. वेगळं घर असल्यामुळे अजिताला मनाला येईल तस वागता यायचं. कधीही उठावं... मित्र-मैत्रिणींना कधीही बोलावता यायचं. उशिराची जागरणं आणि हवा तसा आळशीपणा. पण वेगळ्या घराबरोबर सगळ्याच जवाबदऱ्या देखील आल्या होत्या. सगळी बिले वेळेत भरली गेली की नाही ते बघणं. घर कामाची बाई आली नाही की एकटीने सगळं काम उरकणं. हे तर करावं लागायचं; पण स्वप्नालीच्या जन्मानंतर तर अनेकदा खूपच तारांबळ उडून जायची. तिचा नवरा केशव खूप मदत करायचा. तरीही अजिताची ओढाताण व्हायचीच. मुख्य म्हणजे स्वप्नाली जर आजारी असली आणि महत्वाच्या कामांमुळे दोघांनाही सुट्टी घेणं शक्य नसलं की आजारी स्वप्नाली तशीच डे-केअरमध्ये सोडली जायची. त्याची टोचणी अजूनही अजिताची मनाला होती. खर तर या अडचणींमुळेच केशव आणि अजिताने एकच बाळ पुरे असा निर्णय घेतला होता.

त्यामुळे अजिताला नेहेमीच वाटत आलं होतं की अनन्या तिच्यापेक्षा कितीतरी सुखी आहे. तिची मुलं सांभाळायला सासू आहे. अनन्या कधीही कुठेही फिरायला जाऊ शकते. काहीच बंधनं नाहीत तिला.

आज मात्र अनन्याच्या घरून बाहेर पडताना अजिताला मनात हसायला येत होत. अजिताला अनन्याच्या आयुष्याचा हेवा वाटत आला होता आणि अनन्याला मात्र कायम अजिताच आयुष्य हवस वाटलं होतं. दोघींनाही एकमेकींचे डोंगर दुरून साजरे वाटले होते.

Friday, February 7, 2020

स्वयंपाकातील आयुधं

स्वयंपाकातील आयुधं

खल आणि बत्ता करतात ठणाणा
आम्हाला काहीतरी काम सांगाना
स्टोव्ह शेगडीला लागली घरघर
ग्यास सिलेंडर आला घरोघर
काड्याची पेटी हिरमसून बसली
लायटरने माझी जागा पटकावली
यांत्रिक युगाला झाली सुरवात
जुन्या बुढयाना करुया बाद
वीज नी यंत्रे रुसतात जेव्हा
जुने ते सोने म्हणतात तेव्हा

लहानपणीच हे बडबड गीत म्हणताना मजा यायची. तरीही त्यावेळच्या त्या स्वयंपाक घरातल्या आयुधांचे अनन्यसाधारण महत्व मान्य होतेच. मला अजूनही आठवत खास पाहुणे आले की माझी आई खास कॉफी करायची. त्यासाठी खल-बत्यातून मस्त वेलची कुटायची आणि  खिसणीवर जायफळ खिसून ते त्या कॉफीच्या पाण्यात टाकायची. आमच्या लहानपणी सर्रास चहा-कॉफी मिळत नसे. पण ती खास कॉफी मात्र तिच्या मागे लागून हट्टाने मी मागून घेत असे. ती देखील हसत म्हणायची अग खल-बत्त्याची चव मिक्सरला नाही बाळा. तिच कथा पाट्या-वरवंट्याची. आई जेव्हा त्यावर चटणी वाटायला बसायची तेव्हा घराच्या कुठल्याही कोपऱ्यात असले तरी मला ते कळायचं. कारण वरवंटया सोबत तिच्या खळखळ वाजणाऱ्या बांगड्या आजच्या चटणीचा बेत कानात येऊन सांगायच्या आणि मग हळूहळू कोथिंबीर-मिर्चीचा तो खास संमिश्र वास संपूर्ण घरात भरून जायचा.

शेगडीवर शिजवलेल्या पितळी डब्याच्या कुकरमधल्या वरण-भाताची चव तर अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. निवत आलेल्या निखाऱ्यात सारलेले एखाद-दोन कांदे-बटाटे आणि त्यांचा तो खरपूस वास. अहाहा! शेगडी वरच भाजलेलं वांग आणि मग खमंग फोडणी घातलेलं ते भरीत. व्वा!

घरात एक बसायचा ओटा होता. अगदी जुन्या styleचा. त्याच्या बाजूच्या मोरीला लागून (अलीकडे या मोरीला सिंक म्हणतात) रगडा होता. इडलीच पीठ त्यात वाटल जायचं. पुरणपोळीच्या पुरणाच पण हाताने चालवायच पुरण मशीन देखील होतं. त्या पुरणाची चव आणि मऊसूत इडलीच पीठ अजून आठवत. एक पाय मुडपून विळीच्या त्या छोट्याश्या पाटावर आई कशी बसायची याचा देखील नेहेमी मला प्रश्न पडायचा. पालेभाजी चिरतानाचा तो विशिष्ट आवाज आणि चिरलेल्या ताज्या भाजीचा वास अजूनही मनात रेंगाळतोय. गाजराच्या हलव्यासाठी खिसणीवर गाजरं खिसताना खिसून घेतलेली बोटं अजून आठवतात.

त्यावेळी आईचा स्वयंपाक म्हणजे कितीतरी तयारी असायची. बिचारी सारखी स्वयंपाक घरात अडकलेली असायची. ही सगळी जुनी यंत्र वापरायची मग ती धुवून निथळायला ठेवायची आणि मग आवरून ठेवायची. ही सगळी आयुधं हाताळायला तशी वजनदार  होती. त्यामुळे अनेकदा यासगळ्यासाठी मी आईला मदत करायचे. त्या मदतीच्या निमित्ताने मी स्वयंपाक घरात कायम रेंगाळायचे. त्यामुळे अगदी लहान असताना पासूनच माझी आणि आईची दोस्ति झाली. "तुला स्वयंपाक करायला शिकवते." असं मला कधी आई म्हणाली नाही. पण मी सगळच शिकले.... तिच्याशी गप्पा मारत आणि तिला करताना बघून.

आज मात्र माझ्या स्वयंपाक घरात शक्य ती सगळी मशीन्स आहेत. फूड प्रोसेसरमुळे तर अर्धी कामं अवघ्या काही मिनिटातच संपतात. त्यात स्वयंपाक घरात मदतीसाठी एक बाई आहेच. त्यामुळेच कदाचित माझ्या लेकींना स्वयंपाक घराकडे वळण्याची सवयच नाही. पास्ता, पिझा हौसेने करण्याऱ्या माझ्या लेकी "जरा पोळ्या कर"; म्हंटल तर "नाही येत ग." अस म्हणून पळतात; आणि मग मात्र माझ्या मनात आईशी स्वयंपाक घरात मारलेल्या गप्पा आणि मुद्दाम न शिकता-शिकवता यायला लागलेले सगळे पदार्थ रुंजी घालतात.