Friday, April 26, 2019

अधुरी एक कहाणी

अधुरी एक कहाणी



टक् टक्... 'आत्ता एवढ्या सकाळी आणि ते ही इथे मला भेटायला कोण येणार?' थोडं वैतागत... थोडं आश्चर्य वाटून लेखक महाशय दार उघडायला आले.

एका कादंबरीच्या लेखनासाठी प्रकाशकाच्या आग्रहावरुन ते थंड हवेच्या ठिकाणच्या त्या प्रकाशकाच्या बंगल्यावर काही दिवसांकरता रहायला आले होते. येऊन दोन दिवस झाले होते तरी त्यांना कथेचा प्लॉट सुचत नव्हता; त्यामुळे एकूणच ते थोडे वैतागले होते; रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता. जरा झापड येत होती  आणि त्यात सकाळीच दार वाजत होते.


थोड्या वैतागलेल्या मनस्थितीतच त्यांनी दार उघडलं. समोर एक मध्यम वयीन महिला कंबरेवर हात ठेऊन उभी होती. दार उघडलं जाताच दारात उभ्या असणाऱ्या लेखकाकडे दुर्लक्ष करून ती तरातरा आत आली आणि एका खिडकीच्या दिशेने गेली. मात्र जाताना एक खाष्ट कटाक्ष तिने लेखकाकडेे टाकला. लेखक बुचकळ्यात पडला.


'कोण असावी ही बाई आणि अशी आपल्याला न विचारता आत येऊन त्या खिडकीत जाऊन का बसली असेल? मुख्य म्हणजे आत आल्यावर आपल्याकडे रागाने का बघितलं तिने?' लेखकाच्या मनात एकामागून एक प्रश्न उभे राहिले. तो दारातच विचार करत उभा होता तेवढ्यात त्याला आतल्या बेडरूम मधून खोकल्याचा आवाज आला. गोंधळून लेखक आतल्या बेडरूमच्या दिशेने गेला. आत बेडरूममध्ये एका आराम खुर्चीत एक आजोबा बसले होते; ते दरवाजात उभ्या असणाऱ्या लेखकाकडेच पाहात होते. काय प्रकार आहे ते लेखकाला कळले नाही. आपल्यालाच भास होतो आहे अस समाजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तो परत बाहेर हॉलमध्ये आला; तर त्याच्या लक्षात आल की एकूण बाहेरच्या खोलीचा चेहरा मोहरा बदलला आहे. मघाशी दार उघडायला तो बाहेर आला होता तेव्हा बैठकीच्या खोलीत फ़क्त एक सोफ़ा होता. पण आता येऊन बघतो तर मेन दरवाजा दिसत नव्हता; एक सोफ़ा एका बाजूला होता आणि आता एका कोप-यात एक डायनिंग टेबल देखील अवतरलं होतं. लेखक पुरता बुचकळ्यात पडला. त्याला त्या बंगल्यात येऊन दोन दिवस झाले होते. त्यामुळे खोल्यांची रचना त्याला माहितीची झाली होती. हे असे अचानक होणारे बदल त्याला गोंधळात टाकत होते. तो थोडासा घाबरला देखील. हा काही भुताटकिचा प्रकार असावा अस त्याच मत झाल.


तेवढ्यात तो ज्या खोलीत झोपले होता तिथे काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि लेखक दचकुन आत खोलिकडे वळला. आत जाऊन बघतो तर त्यांनी त्याचे लिखाणाचे सामान ज्या टेबलावर ठेवले होते ते सामान खाली पडले होते. आणि जी स्त्री दार वाजवून त्याची झोप मोडायला आली होती; ती त्याच्या लेखन टेबला जवळ बसून काहीतरी लिहित होती. लेखक खोलीत आला आहे हे तिच्या लक्षात आले होते तरीही तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल लेखनाचे काम चालूच ठेवले.


काय प्रकार आहे हे अजूनही लेखकाच्या लक्षात आले नव्हते. पण हे असे अचानक या घरात उगवलेले आणि आपल्याला दिसणारे लोक काही त्रास देत नाही आहेत हे लक्षात आल्यावर लेखक थोडा शांत झाला. आता त्याच मन थोडं शांत झाल आणि विचार करायला लागलं. लेखकाच लक्ष परत त्या स्त्रीकडे गेलं. ती स्त्री अजूनही काहीतरी लिहित होती आणि तिने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. त्यामुळे असेल कदाचित पण त्याच्या टेबलावर बसून ती काय लिहिते आहे ते समजून घेण्याची लेखकाची उत्सुकता जागृत झाली. त्यामुळे हळूच तिच्या मागे जाऊन उभे राहात त्यानी तिच्या लिखाणावरुन नजर फिरवली.


...............ललिता एकटीच खिड़कीत विचार करत बसली होती. वयात येणारी मुलगी; व्यवसायात खूपच बिझी झालेला नवरा; इंजीनियरिंगच शिक्षण घेण्याच्या नावाखाली उड़ाणटप्पूपणा करणारा मुलगा.... ललिता सर्वच बाजुनी हतबल झाली होती. काय कराव... कोणाशी बोलाव तिला सुचत नव्हतं......... ती स्त्री भराभर लेखकाच्या नेहेमीच्या लिखाणाच्या कागदावर लिहित होती. ते लिखाण पाहुन लेखक बुचकळयात पडला. पण काही क्षणात त्याला आठवलं हा परिच्छेद त्याच्याच एका गोष्टितला होता. पण मग ती गोष्ट त्याने अर्धवट सोडली होती. एका दुसऱ्याच कथेची संकल्पना मनात आली होती म्हणून ही कथा अर्धी सोडून त्याने नवीन कथा सुरु केली होती. काही महिन्यांपूर्वीचीच तर घटना होती ती.


लिखाण पूर्ण होताच ती स्त्री परत खिड़कीजवळ जाऊन बाहेर बघत बसली. लेखकाने जिथे ती कथा सोडली होती तिथेच ती स्त्री थांबली होती. याच त्याला खूप आश्चर्य वाटलं. त्या स्त्रीला ती अर्धवट सोडलेली गोष्ट कशी माहित अस विचारायचा मोह लेखकाला झाला. पण तेवढ्यात शेजारच्या खोलितले आजोबा परत खोकले म्हणून लेखक त्या दिशेने वळला. आजोबा त्यांच्या आराम खुर्चित बसून लेखकाकडेच पहात होते. त्यांच्या शेजारी देखिल एक कागद पडला होता. आतापर्यत लेखकाची भीड बरीच चेपली होती. त्यामुळे तो पुढे झाला आणि तो कागद उचलून वाचला.


..............................काणे आजोबा म्हणजे एक उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांच्या तारुण्यात तर त्यांनी करियरमधली यशाची शिखरं गाठली होतीच, पण रिटायरमेंट नंतरही ते स्वस्थ बसले नाहीत कधी. सामाजिक संस्थांमधून कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता त्यांनी काम केल. त्यांच्या सुविद्य पत्नीनी त्यांना आयुष्यभर साथ दिली होती. पण साध्या तापाच निमित्त होऊन त्या अचानक गेल्या; आणि त्यानंतर मात्र काणे आजोबांचा आयुष्यातला इंटरेस्टच जणूकाही संपला...............


तो कागद वाचून लेखकाला खूप खुप आश्चर्य वाटलं. 'माझ्याच एका पूर्ण होत आल्या गोष्टीचा शेवटचा भाग.' लेखकाच्या मनात आल. पण मग अचानक काही मासिकांकडून त्याला वेगळ्या विषयाच्या गोष्टिची मागणी झाली आणि ही गोष्ट नंतर पूर्ण करू असे त्याने ठरवले होते. पण मग ती गोष्ट लिहिणे मागेच पडत गेले होते.


'अरे? हे काय गौडबंगाल आहे? माझ्याच गोष्टींची पानं माझ्यासमोर का येत आहेत?' लेखकाच्या मनात आल. त्याचवेळी हॉलमध्ये एक लहान मुल जोरजोरात हसल्याचा आवाज त्याला आला आणि या अचानक आलेल्या आवाजाने धक्का बसलेला लेखक हॉलच्या दिशेने धावला.


बाहेर साधारण ४-५ वर्षांचा मुलगा सोफ्यावर जोरजोरात उड्या मारत होता आणि बाजूला एक स्त्री ............बहुतेक त्याची आई असावी................. त्याला शांत करायचा प्रयत्न करत त्याला समजावत होती;"राजू बाळा, तुला बर नाही आहे न? मग स्वस्थ बस बघू. आत्ता बाबा येतील ह तुझे. मग आपण त्याना सांगू तुझ्यासाठी काहीतरी छान छान आणायला." तिने एवढ म्हणाल्यावर तो मुलागा तिच्याकडे बघायला लागला. क्षणभर सगळ स्थिर झाल आणि मग परत तो मुलगा सोफ्यावर उड्या मारायला लागला. परत ती त्याला शांत करायचा प्रयत्न करत तेच वाक्य त्याच प्रकारे बोलत समजावायला लागली.


आता लेखकाला हळूहळू लिंक लागायला लागली.  त्याने एका वेगळ्याच अपेक्षेने आजुबाजुला बघितले आणि त्याला डायनिंग टेबलावर एक कागद फड़फडताना दिसला. मनात कल्पलेली अपेक्षा पूर्ण झाल्याने लेखकाने मंद स्मित केले आणि तो कागद उचलला. त्याच्याच एका गोष्टीतल्या दिवाणखान्याच वर्णन त्यात लिहिल होत. आणि पुढे लिहिलं होत की लहानग्या राजूला कॅन्सरसारखा दुर्धर आजार झाला होता. त्याच्या आईवडिलांची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे कुठली मदत मिळते का ते बघण्यासाठी राजूचे बाबा सतत वणवण करत फिरत होते. या कशाचीच कल्पना नसलेला राजू मात्र घरात बालसुलभ मस्ती करत होता. मनातून कोलमडलेली आणि ते चेहेऱ्यावर दाखवता न येणारी राजूची आई त्याला सांभाळत त्याच्या वडिलांची वाट बघत होती............................. अशी काहीशी गोष्ट होती ती.... लेखकाचीच! अजुने के पूर्ण न झालेली.


'म्हणजे माझ्या अपूर्ण गोष्टी आज मला भेटायला आल्या आहेत अस दिसत.' लेखकाच्या मनात आल आणि कोडं उलगडल्याच्या स्सामाधानात तो हसत मागे वळला. मागे ललिता आणि काणे आजोबा त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहात उभे होते. यासर्वांच अस इथे येण्यामागच कारण त्याच्या लक्षात आलेलं नव्हत. त्यामुळे आता यांना काय उत्तर द्याव असा लेखकाला प्रश्न पडला. मुळात यांना आपण काही उत्तर देऊ लागतो का असा मुद्दा देखील त्याच्या मनात होता.  हे खर होत की लेखकाने फारच क्वाचित असेल, पण काही गोष्टी अपूर्ण सोडल्या होत्या. पण म्हणजे आपण अर्ध्या सोडलेल्या कथांमधील पात्र आज आपल्या भेटीला आली आहेत; हे त्याच्या लक्षात आलं. त्याने क्षणभर विचार केला आणि मग हसत ललिता आणि काणे आजोबांना, राजूला आणि त्याच्या आईलासुद्धा एका सोफ्यावर बसायला सांगितल. तो देखील बाजूची एक खुर्ची ओढून त्यांच्या समोर बसला.


"आता मला उलगडा होतो आहे तुमच्या उपस्थितिचा. पण उद्देश् मात्र अजुन लक्षात नाही आला." लेखक त्यांना म्हणाला. यावर त्यांच्यातल कोणीतरी एक उत्तर देईल अशी त्याची अपेक्षा होती. पण पाच मिनिटं झाली तरी ते सगळेच त्याच्याकडे थोड रागाने बघत पण आश्चर्यकारक रितीने स्वस्थ बसले होते. त्याचं हे अस न बोलता स्वस्थ बसण लेखकाला गोंधळवून टाकायला लागलं. हळूहळू लेखक अस्वस्थ व्हायला लागला.


"अरे, तुम्ही माझ्याच अपूर्ण गोष्टींमधली पात्र आहात हे एव्हाना माझ्या लक्षात आल आहे. पण हे अस अचानक इथे येण्यात तूमच काय प्रयोजन आहे; ते मला अजूनही समजल नाही. ते कसं कळावं बर?" लेखक वैतागुन काहीस त्यांच्याशी आणि काहीस स्वतःशीच म्हणाला.


तरीही काहीच घडले नाही. ते सगळे लेखकाने सांगितलेल्या सोफ्यावर स्वस्थ बसून पण रागाने लेखकाकडे बघत होते. एव्हाना चांगलीच सकाळ झाली होती. लेखकाला चहाची तल्लफ आली होती. चांगलीच भूकही लागली होती. एरवी सकाळीच बंगल्यावर काम करायला येणारा गोपाळ अजुन आला नव्हता. त्यामुळे काय कराव लेखकाला सुचत नव्हते.


'चहा मिळाला असता तर बर झाल असत. ही ललितासुद्धा नुसती बसून आहे. तिला काय हरकत आहे चहा करायला.' लेखकाच्या मनात विचार आला.... आणि काय चमत्कार... ललिता उठून उभी राहिली आणि स्वयंपाकघराकडे वळली. लेखक तिच्या मागून गेला आणि त्याला दिसले के ललिता चहा करत होती. लेखकाला आश्चर्य वाटल. आपण फक्त मनात एक विचार केला आणि लगेच तशी कृती ही ललिता करायला लागली हे त्याच्या लक्षात आल. म्हणून मग एक प्रयोग म्हणून त्याने मनात विचार केला,'चहा बरोबर मस्त गरमागरम पोहे असते तर मजा आली असती.' असा विचार करून लेखक त्याच्या खोलीत जाऊन बसला.


थोड्या वेळाने ललिता एका ट्रे मधून गरम गरम पोहे आणि वाफाळता चहा घेऊन त्याच्या समोर येऊन उभी राहीली. तिला बघून लेखक मोकळेपणाने हसला. आता त्याच्या लक्षात आले काय केले पाहिजे. त्यामुळे मग त्याने शांतपणे पोहे खाऊन आणि चहा घेऊन लेखक त्याच्या टेबलाकडे वळला. कागद पेन घेऊन त्याने थोडा विचार केला आणि मग लिहायला सुरुवात केली.


......................................ललिता कंटाळली होती. आणि तिला मन मोकळ करायची खूप इच्छा होती; आणि म्हणूनच तिने ठरवले की आज आत्ता समोर जे कोणी भेटेल त्यांच्याकडे मन मोकळे करायचे.....................


लेखकाचं एवढ़ लिहून होत न होत तोच चहा आणि पोहे लेख्कासमोर ठेऊन परत  खिड़कित जाऊन बसलेली ललिता एक मोठ्ठा सुटकेचा नि:श्वास टाकून तिथून उठून लेखकासमोर येऊन बसली.

"कित्ती बर वाटत आहे म्हणून सांगू तुम्हाला फ़क्त या कल्पनेने की आता मला माझ मन मोकळ करता येईल." ललिताने बोलायला सुरवात केली. "अहो लेखक महाशय किती किती दुःख लिहून ठेवली आहात तुम्ही माझ्या आयुष्यात. कमाल करता हो! अहो, केवळ वाचकांची सहानुभूति मिळवण्यासाठी माझा किती मानसिक छळ चालवाला आहात. अस काही खरच प्रत्यक्ष आयुष्यात असत का? प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात जसे दुःखाचे क्षण असतात तसे आनंदाचे क्षण पण असतीलच न? मी आपली सारखी घरातल्या प्रत्येकाच्या वागण्याने दु:खी-कष्टी झालेली असते. मी एकटीनेच का होईना पण आनंदाचे काही क्षण तर जगू शकते की नाही? मला देखिल तुमच्या पत्नीप्रमाणे कधीतरी मॉल्समधे शॉपिंगला पाठवा की. तुम्ही कधी कधी तुमच्या पत्नीच कौतुक करता न? मग माझ्या नव-याच्या तोंडी थोड़ माझ कौतुक टाकलत तर ते काही महा पाप नसेल. तो खूप व्यस्त असतो, त्याला माझ्यासाठी अजिबात वेळ नसतो, हे सगळ मान्य केलं तरी कधीतरी अशी वेळ येऊ शकतेच ना की तो माझं देखील थोडसं कौतुक करेल. बर ते नाही तर, अहो किमानपक्षी माझ्या मनात एखादी नोकरी करावी अस आल; एवढ लिहिलत तरी चालेल हो. इतकी काही मी मूर्ख नाही." ललिता भडाभड़ा बोलायला लागली.


'किती दिवस तिने हे सर्व मनात दाबून ठेवल असेल?' लेखकाच्या मनात विचार आला. त्याचच उत्तर म्हणून की काय ती म्हणाली,"अहो कायम असे विचार मनात येत असतात. पण सांगणार कोणाला? बर, तुम्ही मला कोणी जवळची मैत्रिण नाही दिलीत. ना मन मोकळ करता येईल अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात लिहिलीत. म्हणजे मी कायम दुखात पिचेला चेहेरा घेऊन खिडकीत दूरवर जाणार लावून बसायचं का? काहीतरी चांगलं लिहा की माझ्या आयुष्यात, की ज्या बळावर मी माझ आयुष्य जगू शकेन. सर्वात महत्वाच् म्हणजे सुरु केलेली कथा पूर्ण तर करा. अस आम्हाला अर्धवट सोडून तुम्ही दुसरीकडे कसे वळु शकता हो? आमचा थोड़ा तरी विचार करायचा ना." ललिता भडाभडा बोलत होती आणि लेखक अवाक होऊन तिच बोलण एकत होता. लेखकाकडे बघत ललिता पुढे म्हणाली,"परवाच आमची सर्वांची एक बैठक झाली....."


शांतपणे तिच बोलण ऐकणारा लेखात तिचे शेवटचे वाक्य एकताच दचकला. ललिता जरी त्याच्या समोर बसून बोलत होती तरीही ही आपल्या कथेतली एक व्यक्तिरेखा आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे 'आमची बैठक' हे शब्द एकटाच लेखक गोंधळाला आणि तिच बोलण निवांतपणे एकता-एकता अचानक ताठ होऊन बसला. आपला शांतपणा सोडत पहिल्यांदाच त्याने ललिताच्या समोर तोंड उघडले. "बैठक? कोणाची? अहो ललिताबाई काय बोलता आहात आपण?"


"जे घडल आहे न तेच बोलते आहे." ललिता म्हणाली. "तुम्ही आजवर ज्या ज्या  कथा अपूर्ण ठेवल्या आहात न त्यातील आम्ही सर्व व्यक्ती एकत्र येतो दर शुक्रवारी आणि चर्चा करतो."


"चर्चा? आणि ती कसली? कोण कोण असता या चर्चेला?" लेखकाने अजूनच बुचकळ्यात पडत ललिताला विचारले.


"तुम्हीच सांगा कोण कोण असेल. मलाच काय विचारता सगळ? कमाल करता तुम्ही. केवळ पैशासाठी लिहिता का हो? जेव्हा सुरवात केलित तेव्हा मात्र स्वसुखासाठी लिहिता अस सर्वाना सांगायचात न? आजही इतकी प्रतिष्ठा मिळाल्या नंतर जर कोणी मुलाखत घेतली तर तेच सांगता; हे देखील माहीत आहे आम्हाला." ललिता म्हणाली. "पण मग आता हे अस अचानक जे संपादक सांगेल ते त्याने सांगितलेल्या विषयावर ते म्हणतील तस  लिहायला का सुरवात केली आहात? अहो,  तुम्ही खूप पूर्वी ज्या कथा लिहायचात त्या कथांमधील व्यक्तिमतवांशी गप्पा मारायचात म्हणे! अशीच एक खूप जुनी कथा आहे तुमची. हसर दु:ख! आठवते तुम्हाला?" लालीताने लेखकाला विचारलं आणि त्याच्या उत्तराची वाट न बघतां पुढे बोलायला सुरवात केली,"त्या कथेतली अल्लड मैना नेहेमी सांगते आम्हाला. तुम्ही तिला तिच्या अर्ध्या वयात एका दु:खला सामोरं जायला लावलंत म्हणे. पण मग तुमचं तुम्हला ते फारसं पटलं नाही, मग तुम्ही तिच्याशी बोलायला लागलात. तिनेच तुम्हाला सुचवलं होतं की तिला तारुण्याच्या उंबरठ्यावर आणून कथा थांबवा. म्हणजे तुम्हला दुसरा भाग लिहिता येईल. मैनाची कथा लोकांनी खूपच डोक्यावर घेतली होती म्हणे. ती नेहेमी सांगते आम्हाला. तिची कथा एकीकडे पूर्ण आहे अस ती म्हणते आणि शेवटाकडे पुढचा भाग लिहिण्यासारखा मजकूर तुम्ही लिहिलात; त्यामुळे अपूर्ण देखील आहे अस तिचं म्हणण आहे. पण तिच्या मनात तुमच्याबद्दल राग नाही; जसा आमच्या मनात आहे. ती एकटीच आहे जी तुमची बाजू आमच्यासमोर मांडत असते. पण बाकी सगळीजण तुमच्यावर खूपच नाराज आहेत; समजल? काहो, तुम्ही जर दु:खी-कष्टी मैनाशी बोलू शकलात तर मग माझ्याशी कधीच का नाही बोललात? माझ्याही आयुष्यात काय कमी दु:ख लिहीली आहात का तुम्ही?" ललिता मनातल सगळ भडा-भडा बोलत होती.


तिने एक निश्वास टाकला आणि पुढे बोलायला सुरवात केली. "काहो तुम्हाला ते नार्वेकर आठवतात का? तुमच्या उमेदिच्या काळातील एका कथेतले व्यक्तिमत्व. त्यांनी देखील सांगितले आम्हला त्याचं आणि तुमच छान पटायच म्हणे. ती कथा जेव्हा तुम्ही अर्धवट सोडलित तेव्हा त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही सांगितल होत की अचानक त्या कथेने तुमच्याशी बोलण बंद केल होत. आम्ही समजू शकतो हो की एखाद्या वेळी एखादी कथा सुचेनाशी होऊ शकत. म्हणून मग तुम्ही ती कथा अपूर्ण सोडत आहात. पण तुम्ही नार्वेकाराना विश्वासात घेतल होतंत.  नार्वेकर मिटींगमध्ये बोलतात ना तेव्हा नेहेमी म्हणतात की त्याना वाईट वाटत त्यांची कथा तुम्ही अर्धवट सोडलीत. पण त्यांना पटल होत की कदाचित तुम्ही म्हणालात तस त्या कथेने तुमच्याशी बोलण सोडून दिल असेल. मात्र इतरांच अस मत नाही आहे. आम्हला काहीजणांना वाटत की तुम्ही पुढे पुढे केवळ पैशांच्या मागे लागून आमच्या कथा अर्धवट सोडल्या आहात. त्यातलीच माझी एक! अहो... किती वाट बघू मी? सारख नुसत खिड़कीमधे बसून कंटाळा येतो हो. बर कथा अर्धी सोडताना मला एखादा छंद वगैरे तरी लाउन द्यायचात ना? काही म्हणजे काहीच नाही? कमाल करता हो तुम्ही...माझ सोडा एकवेळ. तस माझ वय आहे की मी धीर धरु शकते. पण त्या दुसऱ्या कथेतल्या बिचा-या काणे आजोबांचा विचार करा. ना ते काही करतात; ना त्याचं देहावसान होत. बिचारे तसेच अडकून आहेत. काय तर  म्हणे आराम ख्रुचीत ते बसले होते आणि भूतकाळाचा विचार करत होते. बास? अहो म्हातारे झाले म्हणून फक्त भूतकाळाचा विचार करत असतील का ते? मनुष्याचा स्वभाव विशेष हाच आहे की काही कालावधी दु:ख केल्यानंतर तो भविष्याची स्वप्न बघायला लागतो. त्यात तुम्ही त्याचं संपूर्ण आयुष्य खूप घटनांनी आणि कर्तुत्वाने भरून टाकलेलं आहात. आता मात्र त्यांना एका आराम खुर्चीत अडकवून ठेवलं आहात...." ललिता काही बोलायची थांबत नव्हती.


लेखकाच्या मानत आल; 'हीच एकटी बोलते आहे. बाकीच्यांना कुठे काही हरकत आहे?' मात्र हा विचार करताना लेखक हे विसरला होता की त्याचे विचार हाच खरा आणि एकाच दुवा आहे त्याच्या अर्धवट लिहिलेल्या कथांमधील व्याक्तीमात्वांमध्ये आणि त्याच्यामद्धे. त्यामुळे त्याच्या मनात हा विचार आला आणि त्याच क्षणी मागून काणे आजोबांनी लेखकाला हाक मारली. "अहो! अहो! इथे मागे वळून बघा. हो! मीच काणे आजोबा बोलतो आहे. तुम्ही तिने बोलावं असा विचार मनात आणलात म्हणून ती आम्हा सर्वांच्या वतीने बोलत होती. मात्र मी वाटच बघत होतो की कधी मला बोलता येत आहे. अगदी बरोबर सांगते आहे ती ललिता. कंटाळलो आहे या आराम खुर्चीत झुलून झुलून. आता माझ पुढे काही होणार आहे की नाही? बर, माझं राहुद्या एकवेळ, मला निदान संपूर्ण आयुष्य चांगल जगण्याच सामाधान आहे. पण या राजूने काय तुमच घोड मारल आहे हो? एकतर त्याला कॅन्सर सारखा आजार दिलात. त्यात त्याच्या आई-वडिलांची परिस्थिती बेताची केलीत. मग वडिलाना बाहेर पाठवलत पैशांची सोय करायला आणि राजूला आणि त्याच्या आईला घरात बंद केलत आणि थांबलात. बर आजारी पोर आहे तर त्याला झोपवून ठेवायचं; तर नाही; म्हणे मस्तीखोर राजू आईच एकत नव्हता. ती बिचारी कायम त्याला समजावत असते........ तेही तेच तेच वाक्य परत परत बोलून? का तर तुम्ही पुढे काही न लिहिता ती कथा अर्धी सोडलीत." काणे आजोबा स्वतःबरोबर राजू आणि त्याच्या आईची बाजू देखील मांडत होते.


लेखक त्यांच बोलण एकून गोंधळून गेला. हे खर होत की राजूची गोष्ट तो पूर्ण करणार होता; पण अलीकडे जास्त भावनिक कथा लोकाना नको असते अस एका प्रकाशकाच मत पडल; म्हणून मग त्याने विचार बदलला. पण मग नवीन वळणं जर त्याच कथेत घालावीत तर त्या कथेत खूप जास्त बदल करावे लागणार होते; म्हणून मग ती अर्धवट सोडून देवून लेखकाने नवीन गोष्ट लिहायला सुरवात केली होती आणि ती नवीन गोष्ट पूर्णसुद्धा केली होती.


लेखक एकूणच विचारात पडला. 'अशा अजूनही काही कथा आपण अर्ध्या लिहून सोडल्या आहेत. ती एक रहस्य कथां होती की. ज्यात एका गाढवर एका सरदार घराण्यातल्या लोकांमध्ये होणाऱ्या घटना आपण लिहित होतो; आणि ती दुसरी भय कथा! मग ती देखील आपण पूर्ण केली नव्हती. त्यामधली व्यक्तिमत्व मात्र इथे आलेली दिसत नाहीत. लेखकाच्या मनाला तो विचार स्पर्शून गेला.' त्याने एकदा समोर उभ्या असलेल्या काणे काका, राजू आणि राजूच्या आईकडे बघितलं आणि त्याच्या मनात विचार आला,'एवढीच व्यक्तिमत्व का आली आहेत माझ्याकडे आज? माझ्याशी फक्त बोलायला की काही दुसरा विचार आहे यांच्या मनात?'.......... बस तो एक क्षणभरासाठी आलेला विचार आणि.....


अचानक बोलता बोलता ती सर्वच पात्र उभी राहिली आणि लेखकाच्या दिशेने येऊ लागली. त्यांची नजर थंडगार होती. कुठल्याही भावना त्या नजरेत नव्हत्या. आत्तापर्यंत फक्त आपल दु:ख त्याना सांगणारी ती सर्व त्याच्याच कथेतील पात्र.. एका अर्थी त्यांनीच निर्माण केलेलं जग... आज त्याच्या दिशेने पुढे सरकत होत.  आता मात्र त्यांची बोबडी वळली. काय कराव त्याना सुचेना. तो मागे मागे जाऊ लागला. त्याक्षणी मागून लालीताच्या विकट हसण्याचा आवाज आला आणि काणे काका, राजू आणि राजूची आई यांच्याकडे पाठ करून लेखकाने लालीताच्या दिशेने तोंड फिरवले. मागे वळताच लेखकाला मोठ्ठा धक्का बसला होता. कारण त्याच्या समोर सरदार घराण्यातली प्रत्येक व्यक्ती उभी होती आणि ..... आणि त्या भय कथेतली ती बाई.....


"अहो.... अहो बाई.... मला थोड़ बोलू द्याल का? अहो.. अहो.. सरदार साहेब.... अरे! अरे! थांबा.... एका ना... एक मिनिट..." लेखक एका जागी थिजल्यासारखा उभा राहून हात हलवत ओरडत होता. त्याचा श्वास धपापत होता. त्याला गुदमरल्यासारख होत होत, डोळ्यासमोर अंधार दाटला होता............... आणि अचानक........


......................."साहेब..... अव... साहेब जी....." गोपाळ लेखक महाशायांच्या पलंगाजवाळ उभा राहून त्यांना हाका मारत होता. आणि पलंगावर गाढ़ झोपेत असलेले लेखक महाशय हात-पाय झाड़त 'नाही... नको.. थांबा...अहो... एक मिनिट.... ऐका... ऐकाना...' अस काहिस ओरडत होते.


शेवटी गोपाळने लेखकाला गदागदा हलवल आणि लेखकाला जाग आली. तो दचकुन ओरडत पलंगावर उठून बसला. त्याच्या अंगाला दरदरून घाम सुटला होता. नजर पूर्ण गोंधळून गेली होती.  "काय.... काय.... कोण............ कोण......"  गोपाळकड़े बघत लेखक गोंधळून म्हणाला.


"अव साहेब, मगासधरन आवाज देऊन राहिलोय तर तुम्ही उठायच नाव नाही घेत. काय सपान बिपान पडल का काय तुम्हास्नी?अस काय करताय राव? बर बोला जी, चाय बनवु ना?" गोपाळने लेखकाकडे विचित्र नजरेने बघत विचारले.


आता मात्र लेखकाला पूर्ण जाग आली होती. ' म्हणजे ते सगळ स्वप्न होत तर... मात्र किती खर वाटलं होत ते सगळ! क्षणभर तर मला वाटल खरच ती सगळी व्यक्तिमत्व माझ्या अंगावर धावून येत आहेत.' लेखकाच्या मनात आल. क्षणभर विचार केल्यावर मात्र लेखकाच्या चेहेऱ्यावर हसू फुटलं,'अरे तस बघायला गेल तर उत्तम प्लॉट आहे की पुढच्या कथेसाठी. वा! वा! भलतेच प्रोफेशनल झालो आहोत की आपण. आपल्याला स्वप्नही आजकाल छान पडायला लागली आहेत. चला लिहायला विषय मिळाला. आता सुरवात केली पाहिजे लगेच.' त्याच्या मनात विचार आला आणि तो स्वतःवरच खुश होऊन हसायला लागला.


लेखकाच असं आपलं आपण हसण अचंब्याने बघणाऱ्या गोपाळकडे बघून तो म्हणला;"गोपाळ.. खरच एक फक्कड़सा चहा कर. मी फ्रेश होऊन लिहायलाच बसणार आहे."आणि मनापासून खुश होत बाथरूमच्या दिशेने वळला.


एक विचित्र कटाक्ष टाकून गोपाळ स्वयंपाक घराच्या दिशेने निघाला. मात्र त्याचा पाय दाराजवळ ठेवल्या एका कप-बशीला लागला. बाजूलाच गार झालेल्या पोह्यांची बशीसुद्धा होती.


"चाय पिउन परत झोपलं की काय साहेब? पोहे पन तसच हायेत. बर म्या तर आताच आलू. मंग ह्ये पोहे आन च्या केला कोनी कोन जान?" अस मनाशी म्हणत आणि अजब करीत कप-बशी घेऊन गोपाळ आतल्या दिशेने वळला.



                                                                        समाप्त

Friday, April 19, 2019

'दोस्ती'




दोस्ती



नितिन, विकास आणि सुधीर लहानपणापासूनचे मित्र. एकाच वयाचे. एकाच शाळेत जायचे. एकाच सोसायटीत रहायचे. कायम एकत्र. अगदी जीवश्च कंठश्च मित्र!


नितिनची आई शिक्षिका आणि वडील प्राइवेट फर्ममधे नोकरीला होते. नितिन शांत स्वभावाचा आणि अभ्यासु मुलगा होता. एखादा विषय तो उत्तम फोड़ करून सांगायचा. त्याने साधारण कॉलेजमध्ये असतानाच पुढे काय करायचं ठरवल होत. त्याप्रमाणे ग्रेजुएशन आणि पोस्ट ग्रेजुएशन नंतर तो एका उत्तम कॉलेज मधे प्रोफेसर म्हणून जॉइन झाला. विषय शिकवायची हातोटी चांगली होती म्हणून अल्पावधितच नाव झाल आणि मग तर त्याने आपले प्राइवेट कोचिंग क्लासेस् सुरु केले. सकाळी 6 ते रात्रि 10 तो बिझी असायचा. नितीनची कॉलेजमध्ये असतानाच स्वाप्नाशी ओळख झाली होती आणि पुढे त्या ओळखीचे रुपांतर मैत्री....प्रेम.... आणि मग दोघांच्याही आईवडीलांच्या परवानगीने लग्न असा छानसा प्रवास त्यांच्या ओळखीचा झाला होता. नितीन-स्वप्नाला दोन मुल होती. मोहन आणि राधिका. स्वप्ना देखील पोस्टग्रजुएट होती. पण तिने कधी नोकरी करण्याचा विचार केला नव्हता. अगोदर मुल आणि संसार याला वेळ देण तिला जास्त महत्वाच वाटायचं. अर्थात दोघांनी मिळून मुलांना छान वाढवाल होत. परंतु मुल मोठी झाली आणि शाळेत जायला लागली. त्यानंतर नितीनने  स्वप्नाच्या मागे लागायला सुरवात केली. "आता मुल मोठी झाली आहेत, मग तू फक्त घरात का बसून राहातेस? तू क्लासची जवाबदारी थोडी तरी घेतलीस तर आपण दोघे मिळून क्लास जास्त व्यावास्थित चालवू शकू." अस म्हणत तो नेहेमी तिच्या मागे लागायचा. स्वप्नाला देखील त्याच म्हणण पटायला लागल.म्हणून मग एकदा मुलांच रुटीन तिने व्यवस्थित लावून दिल, आणि मग तीदेखील त्याच्या क्लासेस् मधे शिकवायला लागली आणि मग हळूहळू त्यात रमली. उच्च मध्यम वर्गातल सुखी चौकोनी कुटुंब होत ते.


विकासचे वडील सरकारी कर्मचारी होते. तो ग्रेजुएशनच्या दुस-या वर्षाला असतानाच ते ह्रदय विकाराच्या झटक्याने गेले आणि विकास त्यांच्या जागेवर नोकरीला लागला. त्याने जेमतेम ग्रेजुएशन पूर्ण केले. त्यामुळे विकासच आयुष्य तस सरळ साध राहील होत. 9 ते 6 ची नोकरी तो अगदी लहान वयापासून करायला लागला होता. लग्नाच वय झाल आणि सरकारी नोकरी असल्याने मुली लगेच सांगून यायला लागल्या. त्याने नेहेमीच्या साच्याप्रमाणे मुलगी बघण्याचा कार्यक्रम करून नीताला पसंत केल आणि त्यांच लग्न झाल. नीता देखील एका प्रायवेट कंपनीमध्ये क्लार्क होती. अरुण हा एकुलता एक मुलगा होता त्यांचा. साधासा पण सुखी संसार होता. विकास आणि नीताच बालपण साधारण सारखच गेल होत. त्यामुळेच असेल पण त्यांची स्वप्न देखील खूप श्रीमंत होण्याची कधीच नव्हती. परंतु एकूण सांपत्तिक स्थिती चांगली होती. दोघेही नोकरी करत असल्याने कधी पैशांची चणचण जाणवली नाही. त्यानी मॉल्समध्ये जाण्यापेक्षा समुद्र किनारा किंवा विविध बागांमधून फिरण्याची सवय अरुणाला लावाली होती. त्यामुळे उगाच डोळे दिपवणारी आणि आवाक्याबाहेरच्या स्वप्नाची अपेक्षा अरुणने देखील कधी व्यक्त केली नव्हती. कधी एख्याद्या शनिवार-रविवार ट्रेकला जाण तर कधी नातेवाईकांना घरी बोलावण आणि कधी त्यांच्याकडे जाण... असा काहीसा असायचा त्यांचा कार्यक्रम. साधस मध्यमवर्गीय आणि तरीही सुखी समाधानी आयुष्य होत विकासच आणि त्याच्या कुटुंबाच.


तिघा मित्रांमध्ये सुधीरची स्वप्न मात्र पहिल्यापासूनच खूप मोठी होती. त्याला कायमच काहीतरी खूप मोठ मिळवाव, नाव कमवाव, खूप श्रीमंत व्हावं.... अस वाटायच. तसा हुशारही होता तो. मेहेनती देखील होता. ग्रेजुएशन नंतर मग त्याने MBA केल. काही दिवस मल्टिनॅशनल कंपनी मधे नोकरी केली. आणि त्या अनुभवाच्या जोरावर स्वतःचा कॉन्सिल्तान्च्सी चा व्यवसाय सुरु केला. यथावकाश आई-वडिलांनी सांगितलेल्या मुलीशी सुधीरने लग्न केल होत. सुधीरची पत्नी मिता नोकरी करत नसे. अर्थात दोन मुलगे होते.... सुमित आणि मितेश....त्यांना सभाळणे आणि घरचे सगळे बघणे यातच ती अड़कलेली होती ती. सुधीर कामानिमित्त कायम बाहेर गावी आणि परदेशात फिरत असायचा. घराला वेळ देणे त्याला शक्य नव्हते. म्हणूनच तिने स्वतः निर्णय घेऊन घराची पूर्ण जवाबदारी उचलली होती. कारण सुधीरच्या मते अशा लहान लहान विषयात चर्चा करण्यासारखे कधी काही नव्हतेच. त्याच्या मते तो यात दाखल न देतां मीताला पूर्ण मोकळीक देत होता. परंतु त्यामुळे मिता आणि सुधीरमध्ये कधी मैत्री झालीच नव्हती. ते दोघे उत्तम पती-पत्नी होते. मिता सुधीरबरोबर मोठ-मोठ्या पार्टीजना जायची आणि त्याची सुविध्य पत्नी असण्याचा उत्तम अभिनय करायची. सुधीरला घरातले सगळे अपडेट्स असायचे... पण संवाद माहित नसायचे. अर्थात हे सुधीरच्या कधीच लक्षात आले नाही. कारण संसारात अडकणे हा त्याचा स्वभावाच नव्हता. मुळात सुधीर थोडासा अलिप्त स्वभावाचा होता. मी.. माझी स्वप्न... माझं यश... हेच त्याचे विचार होते. त्यामुळे सुरवातीला मीताने प्रयत्न केला. पण त्याचा स्वभाव लक्षात आल्यावर तिनेही तो विषय सोडून दिला. नंतर तर लागोपाठ मुल झाली आणि मग तीदेखील मुलांमध्ये रमून गेली.


अशीच वर्षा मागून वर्षे जात होती. नवीन टेक्नॉलजीमुळे सगळ्यांकडे मोबाईल्स आले होते. त्यामुळे नितीन, विकास आणि सुधीरचा एकमेकांशी चांगलाच संपर्क असायचा पण आलीकडे त्यातला ओलावा कमी झाला होता. तिघांचा असा एक whatsaap वर ग्रुप होता. पण त्यावर अलीकडे जास्त करून फोर्वार्ड्सच असायचे. मात्र हरवणारा हा ओलावा टिकवण्यासाठी विकास कायम प्रयत्न करायचा. ग्रूपवर मुद्दाम कसे आहात हे तो विचारायचा आणि उत्तर आल नाही तर मग स्वतःहून अनेकदा दोघानाही फोन करायचा. अशा वेळी तो अगदी सहज... मिनिट दोन मिनिट बोलत असे. पण त्यामुळे एकमेकांची खाबर मिळायची तिघांना. सुधीरच्या आयुष्याला शेडूल अस नव्हतच. अनेकदा तो  मीटिंग मध्ये असायचा. त्यामुळे सुधीर फोन उचलायचाच असं नव्हत. पण तरीही विकासने फोन करण सोडलं नव्हत. मात्र नितीनच शेद्युल विकासने साधारण समजून घेतल होत. त्यामुळे तो कधी फ्री असेल याचा अंदाज घेऊन तो फोन करत असे. तिघा मित्रांच्या मैत्रित मात्र अजिबात अंतर नव्हतं. खूप जीव होता त्यांचा एकमेकांवर. आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या आणि साजरा करता येतील अशा सर्व घटनांची माहिती त्याना एकमेकांना असायची. असेच दिवस... वर्ष सरकत होते.


एक दिवस संध्याकाळी 7 च्या सुमारास नितिनचा मोबाईल वाजला. विकासचा नंबर बघुन त्याला खूप आश्चर्य वाटल. नितिनला 12वी च्या वर्गावर जायच होत. पण विकास असा अवेळी फोन करणार नाही याची त्याला खात्री होती. त्यामुळे काळजी वाटून त्याने फोन घेतला.


"काय रे विकास? काय झाल? सगळ ठीक ना?" नितिनने फोन उचलून काळजीच्या आवाजात विचारल.


"सगळ एकदम मस्त यार. सहज केला होता फोन. आज तुझी आणि सुधीरची खूप आठवण आली म्हणून. डिस्टर्ब केल न तुला? आत्ता तुझी लेक्चर्स असतात न? अरे आवाज एकावासा वाटला रे. चल ठेवतो मी फोन." विकास म्हणाला.


"अरे लेक्चर्स रोजच असतात. थोड़ा उशिरा गेलो वर्गावर तर मुल खुशच होतील. तू बोल यार. कसा आहेस? खूप बर वाटल तुझा आवाज ऐकून." नितिन म्हणाला. त्यात विकासला बोलत करण्याचा त्याचा उद्देश होता. कारण विकास असा सहज फोन करणार नाही याची नितीनला खात्री होती.


"मी मस्त मजेत आहे. नितिन एकदा भेटु या ना यार. किती महीने... महिने का वर्ष होऊन गेल आपण तिघे भेटलो त्याला." विकास थोडा भाऊक होत म्हणाला.


"हो रे. गेल्या वर्षी मी नवीन जागा घेतली क्लाससाठी त्याच्या पूजेला आला होतास न तू तेव्हा भेटलो होतो आपण. सुधीर तर बाहेर गावी होता. त्याला जमलच नाही शेवटी." नितिन म्हणाला. "खरच भेटलं पाहिजे रे. तुम्हाला दोघांना भेटलो ना की नवीन शक्ती मिळाली आहे अस वाटत. तू सांग. कधी भेटु या? नाहीतर एक काम करतोस का... सुधीरला विचार. त्याच्या सोईनी भेटु. कारण आपण दोघांनी ठरवून काही उपयोग नाही. सुधीरला देखील जमायला हव न. त्याची सोय बघितली की तिघही भेटू शकू. काय?"


"ठीके. तुला मेसेज करतो मी त्याच्याशी बोलून." अस म्हणून विकासने फोन ठेवला.


बंद झालेल्या फोनकडे नितिन काही सेकंद बघत राहिला. त्याच्या मनात आल... विकास असा अचानक फोन नाही करणार. काहीतरी कारण आहे नक्की. चांगली न्यूज असती तर त्याने लगेच सांगितली असती. काही अडचणीत असेल का? संकोचाने बोलला नसेल का? नितीनला थोडी काळजी वाटली. पण मग त्याच लक्ष मनगटावरच्या घड्याळाकडे गेलं आणि लेक्चरला जायला उशीर होतो आहे ते त्याच्या लक्षात आल आणि तो लेक्चरला निघाला. दोन दिवसात विकासकडून काहीच मेसेज आला नाही. म्हणून रात्रि शेवटच्या लेक्चरनंतर त्याने विकासाच्या एवजी अगोदर सुधीरला फोन केला. त्यादिवशी विकासने संध्याकाळी म्हणजे खर तर तसा अवेळी फोन केला होता ते काहीसं वेगळ होत अस सारख नितीनच्या मनात येत होत. कारण विकास कायम दुसऱ्याचा विचार करून मगच कोणतीही कृती करेल याची नितिनला खात्री होती. हे मानातले विचार सुधीरला सांगाव अस वाटल आणि त्याला देखील अस काही जाणवल का ते विचाराव असही त्याच्या मनात होत.


फोनची रिंग बराच वेळ वाजली आणि आता नितिन फोन कट करणार तेव्हा सुधीरने फोन उचलला. "नितिन अरे यार ज़रा गड़बडित आहे. उद्या एक महत्वाची मीटिंग आहे. त्याची तयारी करतो आहे. नंतर बोलतो तुझ्याशी." नितिन काही बोलायच्या आत सुधीर म्हणाला. "ठीके." एवढच म्हणून नितिनने फोन ठेवला. सुधीरची सोय बघून भेटायच्या संदर्भात मेसेज करतो अस म्हणूनही विकासचा मेसेज का आला नसेल ते त्याच्या लक्षात आल. तरीही विकासच अस फोन करण त्याला साध वाटत नव्हतं.


रात्रि जेवताना त्याने हा विषय स्वप्नाकडे काढला. तिने सल्ला दिला "तुला जर काही वेगळ वाटतय तर  मग तू जाऊन ये बघू लगेच उद्या. उगाच मनात संशय ठेवला की धड कामात लक्ष नाही लागणार तुझ. मुख्य म्हणजे विकास तुझा जुना आणि खरा मित्र आहे. त्यात तुम्ही बऱ्याच दिवसात भेटलेला नाहीत. मग सहज म्हणून भेटून आलास तरी काय हरकत आहे. तू क्लासची आणि लेक्चर्सची काळजी करू नकोस. मी करेन संध्याकाळची लेक्चर्स मॅनेज."  नितिनला देखील ते पटल आणि तो दुस-या दिवशीच् संध्याकाळी विकासाच्या घरी अचानक जाऊन थड़कला. त्याने विचार केला होता की अचानक जाऊन आपण विकासाला आश्चर्यचकित करुया. पण त्या एवजी नितिन केवळ सरप्राइज नाही तर पुरता कोलंमडून गेला; विकासाच्या घरी पोहोचल्यावर.


नितिनने बेल वाजावली आणि विकासच्या आठवीत शिकणा-या अरुणने दार उघडल. घरात पाऊल ठेवताच नितिनला दवाखान्यातील औषधांच्या वासासारखा वास जाणवला. त्याक्षणी काहीतरी गडबड असावी हे नितीनच्या मनात आल. त्याने हलक्याच आवाजात अरुणला विचारलं,"काय रे सगळ ठीक ना बेटा? बाबा कुठे आहेत तुझे?" अरुणने आत खोलीकडे बोट दाखवलं.  विकास त्याच्या खोलीत झोपला होता. त्याची पत्नी नीता नितिनला तिथे घेऊन गेली. विकास प्रचंड बारीक झाला होता. त्याचे डोळे खोल गेले होते. नितिन पुरता गड़बडला. त्याने नीताकडे गोंधळून बघितल. ती कसनुस हसली आणि डोळ्याला पदर लावून बाहेर गेली. नितीन तिला जाऊन काही विचारणार इतक्यात विकासने डोळे उघडले आणि नितिनला बघुन उठून बसला.


"काय रे हे विकास?" नितिनने त्याच्या शेजारी बसत आणि त्याचा हात प्रेमाने हातात घेत विचारले.


त्याचा हात दाबत विकास म्हणाला,"अरे काय सांगू? मला कॅन्सर डिटेक्ट झाला आहे. last stage आहे. no hopes." त्याच अस शांतपणे बोलण एकूण नितीन हबकून गेला. अवाक् झाला. "अरे no hopes काय म्हणतोस? तुला काही कळत आहे का? सायन्स इतकं पुढे गेल आहे. माझ्या ओळखित एक डॉक्टर आहेत. एक्सपर्ट आहेत. मी त्यांची उद्याच् अपॉइंटमेंट घेतो. तू चल फ़क्त."


विकास हसला. "नितिन तुला खरच वाटत की मी किंवा नीताने हे काही केल नसेल? अरे नीताचा सख्खा भाऊच डॉक्टर आहे. त्यामुळे माझी योग्य तिच ट्रीटमेंट चालू आहे. फ़क्त सत्य हे आहे की कॅन्सिर आहे हेच उशिरा लक्षात आल्यामुळे एकूण सगळच हाताबाहेर गेलं आहे. आता काही उपयोग नाही" त्याने नितीनच्या हातावर थोपटत उत्तर दिल. नितीनला काय बोलाव सुचत नव्हत. तो विकासकडे बघत होता आणि अचानक त्याच्या डोळ्यात पाणी आल. विकासच्या ते लक्षात आल. त्यामुळे त्यानेच विषय बदलत म्हंटल,"बर ते जाऊ दे. तू सांग ... तू कसा आहेस? अरे मी सुधीरला कॉल केला होता. पण तो थोड़ा बिझी होता; म्हणून मग तुला मेसेज नाही केला मी. तुझ काही बोलण झाल आहे का त्याच्याशी?"


"झाल होत बोलणं. पण थांब आत्ताच सुधीरला फोन करतो." नितिन त्याचा मोबाईल बाहेर काढत म्हणाला.


विकासने त्याचा हात धरला. म्हणाला,"नितिन प्लीज माझ्या आजारपणाबद्धल कोणालाही सांगू नकोस. मला कोणाची दया नको आहे. दोस्तीच्या ओढीने तो आला तर ठिक. नाहीतर नको. माझा इलाज व्हावा... मदत मिळावी म्हणून नाही मी तुला किंवा त्याला कॉन्टेक्ट केला. तुम्हाला भेटावस वाटल म्हणून कॉन्टेक्ट केला आहे."


नितिनला त्याच म्हणण पटल. त्याने फोन आत ठेवला. मग विकास आणि नितीन गप्पात रंगले. मग पुढचे 3 तास ते दोघे जुन्या आठवणी आणि मस्ती केलेले दिवस यावर गप्पा मारुन खूप हसले. साधारण रात्रि 10 च्या सुमाराला नितिन निघाला. निघताना नितीनने विकासचा हात हातात घेतला आणि थोपटला. त्या एका स्पर्शात दोघा दोस्ताना प्रेमाची भाषा समजली. नितीन आल्यापासून विकास खूप वेळ बसल्याने दमला होता. तो आडवा झाला आणि लग्गेच् झोपला.


निघताना नितिनने नीताला सांगितल.."काही लागल तर लग्गेच् कळव वहिनी. मी इथेच आहे. खर तर माझ्या मनात एक गोष्ट आहे. माझा एक खूप चांगला मित्र डॉक्टर आहे. मी त्याला उद्या घेऊन येतोच."


नीता शांत होती. ती म्हणाली,"नको नितिन भावजी. विकासला नाही आवडणार. मुख्य म्हणजे जे जे म्हणून शक्य आहे ते सर्व काही आम्ही करतो आहोत. माझा भाऊच डॉक्टर आहे. त्यामुळे योग्य ट्रीटमेंट चालु आहे. माझ्या एका बहिणीच्या ओळखीने आयुर्वेदिक औषध पण चालू केली आहेत मी. तुम्ही आलात आणि विकास आज खूप दिवसानी असा उठून बसला. गप्पा मारल्या. त्याला अस बघून मला खूप बर वाटल भावजी. खूप जीव आहे त्याचा तुमच्यावर आणि सुधीर भावजिंवर. त्यामुळे फ़क्त एकच विनंती आहे; तुम्ही फ़क्त जमेल तस भेटायला या, त्याच्या जवळ बसा, गप्पा मारा. अजून काय म्हणू मी?" एवढ़ बोलून तिने डोळ्याला पदर लावला. नितीनच्या डोळ्यात देखील पाणी उभ राहील. जमेल तसं विकासला भेटायला यायचं हे तिथल्या तिथे नितीनने ठरवलं आणि नीताचा निरोप घेऊन तो तिथून निघाला.


जड़ मनाने नितिन घरी पोहोचला. घरी त्याने स्वप्नाला सर्व कल्पना दिली. "जीव तुटतो आहे ग. माझा विकास आयुष्यभर कायम परिस्थितिशी झगड़ला. पण कधीही तक्रार नाही केली. वडील लवकर गेले आणि तो त्यांच्या जागी लागला. कायम हसत मुख. आज मनात येत ग की त्याची काय एम्बिशन होती ते कधी आम्ही त्याला विचारलच नाही. तो जे जगतो आहे तीच त्याची इच्छा असावी हे गृहीत धरल. आणि आता काही विचारायला उशीर झाला आहे ग. मुख्य म्हणजे आजही तो शांत आहे.हे एवढ मोठ आजारपण देखील त्याने स्वीकारलं आहे ग. मी उद्याच् सुधीरला फोन करुन सगळ सांगतो. विकास नको म्हणाला आहे; पण त्याची तब्बेत खूपच खालावली आहे. काहीच सांगता येत नाही ग. सुधीर भेटला तर त्याला बर वाटेल." नितीन बोलत स्वप्नाशी होता.... पण खर तर ते स्वगतच होत.


दुस-या दिवशी नितिनने सुधीरला फोन केला. पण सुधीरने फोन उचलला नाही. म्हणून मग नितिनने एक मेसेज केला. "थोडं म्हत्वाच काम आहे. जमेल तसा पण लगेच फोन कर." मात्र त्या दिवशी सुधीरचा फोन आला नाही. नितीन सुधीरच्या फोनची वाट बघत होता. फोन आला नाही हे बघून नितिन खूप डिस्टर्ब झाला होता. त्याचा अस्वस्थपणा बघुन स्वप्ना म्हणाली;"मी काही दिवस संध्याकाळची क्लासेस् बाघिन नितीन. तू तुझ्या विकासला भेटायला जात जा. खर सांगू का नितीन विकासला भेटायची गरज त्याच्यापेक्षा तुलाच जास्त आहे. कारण आपण काही करू शकत नाही हे समजून तू जास्त अस्वस्थ झाला आहेस. "


नितिनला स्वप्नाच म्हणण पटल. मग त्याने आणि स्वप्नाने कामाच वेळापत्रक बनवलं आणि तो एक दिवसा आड़ विकासकडे जाऊन बसु लागला. दोघे जुन्या आठवणी जागवायचे... त्यातून निघणा-या संदर्भातुन ज्यांची नावं आठवायची त्यांना दोघे मिळून फोन करायचे. एकच अट होती... विकासाची सद्य परिस्थिती सांगायची नाही. मग नितिन फोन लावून म्हणायचा की सहज आलो होतो विकासकड़े तर तुमची आठवण निघाली आणि फोन केला. आणि मग दोघे बोलायचे त्या व्यक्तिशी. कधी सोसायटी मधले जुने मित्र... तर कधी एकमेकांचे नातेवाईक.. असा फोन्सचा सिलसिला चालत असे. अशाच गप्पांमधून एकदा सुधीरला देखील त्यांनी फोन लावला होता. अगदी सहज.. फक्त गप्पा माराव्यात या उद्देशाने. पण तेव्हाही सुधीरने फोन उचलला नाही. त्यानंतर मात्र नितिन मनातून रोज सुधीरच्या फोनची किंवा निदान मेसेजची वाट बघत होता. पण सुधीरचा काहीच पत्ता नव्हता.


असेच दोघे एकदिवस गप्पा मारत बसले होते आणि विकासने नितीनचा हात धरून विचारल;"नितीन तुला ती मनीषा आठवते का रे?"

"आयला विकी तू पण ग्रेट हा! तुला आठवते ती अजून? पहिल्या बिल्डिंगमध्ये भाड्याने आली होती ती ना?" हसत नितीनने विचारले.


"हो रे! काय वेडे झालो होतो ना आपण तिघेही तिच्या मागे? कुठल्या शाळेत जाते.. कधी येते... तिच्याबद्धालच्या सगळ्या बातम्या काढल्या होत्या आपण." विकास हसत म्हणाला.


"हो! साल्या तूच काढल्या होत्यास. सुधीरसाठी. पागल झाला होता ना तो तिच्यासाठी." नितीन म्हणाला.


"का रे त्याच्यावर नाव ढकलतो आहेस? तू काय कमी होतास तिच्या मागे? तिची शाळा आपल्या नंतर अर्ध्या तासाने सुटायची. तर आम्हाला चुकवून तू धावत यायचास सोसायटीमध्ये. आणि ती दिसेल असा गेट जवळ रेंगाळत राहायचास." विकासने त्याला आठवण करून दिली.


"जा रे! मी भले लवकर यायचो. पण तुला सुधीरबद्धल जास्त प्रेम होत न. त्यामुळे तू मनीषाशी ओळख करून घेऊन त्याची आणि तिची भेट घालून दिली होतीस हे मला कळल नव्हत अस समजतोस का?" नीतीनेने विकासला कोपरखळी मारली.


"हो रे. त्याला ती जाम आवडायची. सारखा तिच्याकडे टक लावून बघायचा. मला राहावल नाही. मग मीच तिची ओळख काढून तिच्याशी मैत्री केली आणि मग तिची आणि सुधीरची मैत्री करून दिली होती. यार ती पण त्याला मस्त लाईन द्यायची रे. पण मग तिच्या बाबांची बदली झाली आणि गेले ते लोकं दोन वर्षात. पण कमाल तर सुधीरची आहे.  विसरला यार तो त्या मनिषाला लगेच. साला पटकन बाहेर पडायचा कुठल्याही भावनिक बंधनातून." विकास म्हाणाला.


"पण काहीही म्हण विकी तुझा सुधीरवर जास्त जीव होता की नाही?" नितीनने विचारल.


विकास हसत म्हणाला;"नाही रे. अस का म्हणतोस? आपण तिघे घट्ट मित्र होतो."


"ते होतोच रे. पण तुला का माहित नाही त्याच्याबद्धल एक वेगळा ओलावा होता. कधी कोणी तुला काही दिल आणि ते सुधीरला आवडणार असेल तर तू तो येईपर्यंत वाट बघायचास आणि मग त्याच्याशी शेअर कारयाचास. मला कधी जेलस नाही वाटल. पण ते माझ एक ओब्झरवेशन होत. खर सांग ह."


"हो रे! खर सांगू का सुधीरच्या व्यक्तीमत्वात तस काहीस आहे. तो जिथे जातो ना तिथे त्याला हव तस घडवून आणतो. मला त्याचा हा स्वभाव खूप आवडायचा. बघ न! आज त्याच्या त्याच स्वभावाने त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवलं आहे. हो की नाही? खूप खूप अभिमान वाटतो रे सुधीरचा. कधी कुठल्या बिझनेस मागझीनमध्ये त्याच नाव वाचल की उर भरून येतो. मी सगळ्याना दाखवतो ते मागझीन आणि सांगतो हा माझा बालपणीचा घट्ट मित्र आहे. बस... एकच वाटत रे! जसा मोठा होत गेला तसा तो खूप जास्त बिझी होत गेला रे. घरच्यांना तरी वेळ देतो की नाही कोण जाणे. अर्थात ही तक्रार नाही ह. सहज आपलं मनात आल म्हणून म्हंटल." अस म्हणून विकास हसला आणि सगळ समजून नितीनही हसला.


असे 8-10 दिवस गेले. एक दिवस दुपारी नीताचा नितिनला फोन आला. ती रडत होती; म्हणाली; "भावजी या..." बस इतकंच.


नितिन जीवाच्या आकांताने धावला.... पण सगळ संपल होत. विकासच्या मुलाला.... अरुणला... पोटाशी घेऊन नितिन खूप रडला. अगदी लहान मुला सारखा. "मी त्याच्यासाठी काहीच करू शकलो नाही.." बस नितीन एवढाच परत परत म्हणत होता. नीता त्याच्या जवळ आली आणि म्हणाली,"भावजी अस काय करता? तुमच्यामुळे विकासचे शेवटचे दिवस खूप चांगले गेले. तुमच्या येण्याकड़े तो डोळे लावून बसलेला असायचा. तुम्ही असे पर्यंत तो त्याच दुखण देखील विसरून जायचा. आता जर तुम्ही असा त्रास करून घेतलात तर त्याच्या जीवाला तिथे त्रास होईल. सांभाळा स्वतः ला." नितिनने त्या धीराच्या स्त्रीकडे बघितल आणि मन आक्रंदत असूनही तो  शांत झाला.


2-3 दिवस गेले आणि सकाळीच् नितिनला सुधीरचा फोन आला. आवाज गोंधळालेला होता. "नितिन आज न्यूज़ पेपरमधे एक फोटो आणि बातमी दिसते आहे निधनाची. अरे नाव विकास राजे आहे. फोटो देखील आपल्या विकाससारखा आहे यार. इतका घाबरलो आहे मी. विकासचा फोन लावतो आहे पण बहुतेक तो ऑफिसला जायला निघाला असेल; त्यामुळे ट्रेन मधे असेल. रेंज नसावी. कारण लागत नाहिये...."


नितिनच्या डोळ्यात पाणी आल; त्याचा आवाज भरून आला आणि तो म्हणाला,"सुधीर बातमी आपल्या विकासचीच आहे. मीच दिली आहे काल."


सुधीर गडबडला. "अरे काय म्हणतो आहेस तू? बरा आहेस ना तू? मला काहीच कळत नाहीये" त्याचा आवाज घाबरलेला होता.


मग मात्र नितिन शांत झाला आणि म्हणाला,"सुधीर अरे विकासला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. लास्ट स्टेज होती. डॉक्टर्सनीसुद्धा कल्पना दिली होती. मी तुला 2-3 वेळा कॉन्टेक्ट करायचा प्रयत्न केला होता. पण तू फारच बिझी होतास."


सुधीर हतबलपणे म्हणाला,"अरे मी परदेशात गेलो होतो रे. पण तू मला काहीतरी कल्पना द्यायचीस न. बर आपण नीतावाहिनीना भेटायला गेल पाहिजे रे. मी आज थोडा गड़बड़ित आहे. आपण उद्या संध्याकाळी जाऊ या. चालेल का तुला?" त्यावर नितिन शांतपणे म्हणाला,"सुधीर मी जातोच वाहिनी आणि अरुणला भेटायला सध्या रोज. तुला किती वाजता जमेल ते सांग."आणि त्याने फोन ठेवला.


दुस-या दिवशी संध्याकाळी नितिन आणि सुधीर दोघे विकासकडे गेले. अरुणने दार उघडले आणि नितिनकड़े बघुन हसला. ते दोघे आत आले. अरुण आतल्या खोलीत निघून गेला. नीता तिथेच बसली होती विकासच्या फोटोकडे बघत. नितिन आणि सुधीर बसले. काय बोलाव कुणालाच सुचत नव्हतं. शेवटी सुधीर म्हणाला,"वाहिनी मला काहीच कल्पना नव्हती हो. नाहीतर मी नक्की वेळ काढला असता आणि येऊन गेलो असतो. निदान माझ्या ओळखीतले स्पेशालीस्ट डॉक्टर्स पाठवले असते. खूप वाईट झाल. विकास मी आणि नितिन बेस्ट फ्रेंड्स होतो. काल पेपरमध्ये बातमी वाचली तेव्हापासून खूप अस्वस्थ आहे मी. शेवटच भेटू पण नाही शकलो मी माझ्या मित्राला. त्याच्यासाठी काहीच करू शकलो नाही मी." अस महणून सुधीर क्षणभर थांबला आणि मग म्हणाला," वहिनी तुम्हाला जर काही मदत लागली तर नक्की सांगा ह."


नीताने सुधीरकडे बघितल. ती काही बोलणार इतक्यात आतून सर्व संभाषण ऐकणारा अरुण बाहेर आला.


 "सुधीर काका. माझ्या वडिलांना योग्य ट्रीटमेंट चालु होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सगळे उपाय करत होतो. माझे मामाच डॉक्टर आहेत. त्यामुळे डॉक्टर्सची पण कमी नव्हती. पण माझ्या बाबांना फ़क्त मैत्रीचा ओलावा हवा होता. नितिनकाका गेले अनेक दिवस एक दिवसा आड़ येऊन बाबांबरोबर बसायचे. गप्पा मारायचे. काकांची यायची वेळ झाली की बाबा नितीनकाकांची वाट बघत असायचे. आम्हाला त्यांनी तस कधीच म्हंटल नाही. पण आम्हाला दिसत होत की त्यांच्या मनात तुम्हाला भेटायची खूप ओढ होती. पण आपल्यामुळे कोणाच काहीही अडू नये; हा त्यांचा स्वभाव होता. आजही आम्हाला काहीच मदत नको आहे. कारण  त्यांना त्यांचा आजार कळल्यानंतर त्यांनी आमची योग्य ती सोय करून ठेवली आहे. मी अजुन लहान आहे मान्य आहे. पण माझा क्लेम माझ्या बाबांच्या जागी त्यांच्या नोकरीत रहाणार आहे; तसा पत्रव्यवहार त्यांनी करून ठेवला आहे त्यांच्या ऑफिसमध्ये.  माझी आई प्रायवेट फर्ममध्ये नोकरी करते आहे. त्यामुळे आम्हाला पैशाची चणचण नाही जाणवणार. बाबांनी चांगल्या इन्वेस्टमेंट्स केल्या होत्या. त्यामुळे भविष्याची चिंता देखील नाही काका. त्यांनी मलाही सांगून ठेवल आहे की जर मला वेगळ काही करियर करायचं असेल तर मी ते जरूर केल पाहिजे. त्याना ते जमल नाही, कारण त्यांच्यावर वडीलांनतर घराची जवाबदारी होती. पण माझ्या सुदैवाने मला ती काळजी नाही आहे. त्यामुळे आम्हाला तुमच्याकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा नाही.


 काका, फक्त एकच सांगतो.... मला माहित आहे लहान तोंडी मोठा घास वाटेल तुम्हाला; पण तुम्ही आत्ता येऊन जे बोलता आहात त्यापेक्षा तुम्ही जर बाबा असताना एकदा तरी आला असतात न तर त्यांना खूप बर वाटल असत. तुम्ही तुमची एखादी खूप महत्वाची मीटिंग केली नसतीत तर अजुन 15 वर्षानी ते कोणालाही लक्षात राहणार नव्हतं. पण मी आयुष्यभर हे लक्षात ठेविन की माझ्या बाबांनी ज्यांच्यावर मित्र म्हणून मनापासून प्रेम केल ते सुधीरकाका माझ्या वडिलांना एकही संध्याकाळ देऊ शकले नाहीत त्यांच्या शेवटच्या दिवसात. अर्थात हे माझ मत झाल. माझ्या बाबांनी नक्कीच तुम्हाला कधीच माफ केल असेल."


त्याच बोलण ऐकून सुधीरचा चेहेरा उतरला. त्याक्षणी त्याला भावना... प्रेमाचा ओलावा... याचा अर्थ जाणवत होता. कालपासून त्याच्या मनात विकासच्या खूप आठवणी दाटून आल्या होत्या. त्याला ते सगळ अरुणला सांगाव अस मनातून वाटत होत. पण त्याच्या लक्षात आल की आता खरच खूप खूप उशीर झाला होता. त्याचा विकास त्याला सोडून गेला होता.... त्याची वाट बघत गेला होता.... आज सुधीरला जाणवत होत की एक्स्पर्ट डॉक्टर्सचा ताफा उभा करण अवघड नसत. पण हृदयाच्या जवळ जी असतात त्यांच्या भावना समजून घेण आणि सांभाळण जास्त महत्वाच असत. त्याला नीता वाहिनीची माफी मागायची होती. त्याला अरुणला जवळ घ्यायचं होत. त्याच्या मनातल्या भावनांना मोकळी वाट करून द्यायची होती. पण सुधीरने काहीच केल नाही.... आज अरुण जे बोलला त्या सत्याचा विचार त्याच्या मनात आला.  तो काहीही न बोलता तिथून बाहेर पडला.


-----------------------------------------------------------------------------------------.


Friday, April 12, 2019

स्त्री अस्तित्वाचा प्रवास

स्त्री अस्तित्वाचा प्रवास

सन १९१६.....सन १९६६.......सन २०१६



"केवळ एकुलती एक लेक आणि तिची इच्छा म्हणून तिला वाड्याबाहेर पडायची आणि घोडा चालवायला शिकायची परवानगी दिली होती आम्ही. पण हे ध्यानात ठेवा की जर तिने शिंद्यांच्या घराण्याची आब्रू वेशीवर टांगायचे ठरवले असेल तर तिच शिर धडावेगळ करून त्याच वेशीवर टांगताना आम्ही एका क्षणाचाही विचार करणार नाही. समजावा आपल्या लेकीला." आप्पासाहेब शिंद्यांनी आपल्या पत्नीला मोठ्या आवाजात समाज दिली. ती समज माजघराच्या दरवाजाच्या आड उभ्या असणाऱ्या सईच्या कानावर पडली आहे याची त्यांना खात्री होती.


पती घराबाहेर पडल्याची खात्री करून घेऊन सईची आई तिच्या जवळ आली. तिने काही बोलायच्या आतच सई रडत आईच्या गळ्यात पडली. " जीव जडला आहे ग माझा त्यांच्यावर. वेशीजवळच्या गणपती मंदिरात रोज भेट व्हायची आमची. सुरवातीला अस काहीच मनात नव्हत. पण रोज दोघांची दर्शनाची एकच वेळ आणि आम्ही दोघेच घोड्यावरून येणारे; त्यामुळे एक-दोन वेळा जुजबी बोलणं झाल असेल-नसेल. पण केवळ नजरेतून जन्म-जन्मांतरीच्या बंधनाची भाषा दोघांनाही समजली आहे.  तू बोल ना पिताजींशी. ते देखील पैशा-अडक्याला आपल्याच तोडीचे आहेत ग." सईने आईला आर्जवी स्वरात विनवले.


त्यावर तिचा हात हातात घेत तिची आई इतकेच म्हणाली,"सई, मुलीच्या जन्माला येऊन इतकी मोठी स्वप्न बघू नयेत. अग, तुला वाड्याच्या बाहेर पडू दिल, घोडा चालवायला शिकवलं हेच खूप समज. सई, प्रेम लग्नाच्या अगोदर करण्याचा अधिकार स्त्रीला नाही हे का तुला वेगळ सांगायला हवं? आई-वडिलांनी ज्या घरात लग्न लावून दिल असेल त्या घरातल्या लोकांची आणि पतीची सेवा करण हाच स्त्रीधर्म आहे हे समजून घे. मनातून हे असले प्रेमाचे वाईट आणि आपल्या घराण्याला काळिमा फासणारे विचार काढून टाक. नाहीतर यांनी काही करण्याच्या अगोदर मीच तुला परसदारातल्या आडात ढकलून देईन."


....सईचा विवाह तिच्या इच्छेविरुद्ध थाटामाटात झाला. त्यांच्या घराण्याच्या बरोबरीच्या घरात.

*************************



सन १९६६


"तुला शिक्षण दिल. चांगल बी. एड. केलं आणि आमच्या साहेबांच्या ओळखीने जवळच्याच शाळेत शिक्षिकेची नोकरी लावली ते हे असे गुण उधळण्यासाठी नव्हे. अलीकडे लग्नाच्या बाजारात नोकरी करणाऱ्या मुलींची किंमत जास्त आहे म्हणून घराण्याची आब्रू बाजूला ठेऊन तुला हे सगळ करू दिल आहे. याचा अर्थ तू मनात येईल तस वागू शकतेस अस समजू नकोस. तुझ वय ते काय आणि बोलतेस किती? जी अक्कल शिकवायची असेल ती तुझ्या शाळेतल्या तुझ्या समोर बसणाऱ्या त्या मेंढरांना शिकव. अजून आई-बापाला अक्कल शिकवण्याइतकी तू मोठी झालेली नाहीस... समजलीस? आणि अहो.... तुम्ही देखील फार चढवून ठेवली आहात तुमच्या लेकीला. शिंद्यांच्या सात पिढ्यांमध्ये कधी कोणी प्रेम केलेलं नाही; आणि पुढच्या सात पिढ्यांमध्ये देखील अस व्हायचं नाही. सांगा तुमच्या मुलीला." अस म्हणून आप्पासाहेब शिंदे घराबाहेर पडले.


सईजवळ येत तिचे डोळे पुसून तिच्या आईने तिला समजावले,"बेटा, तुला फक्त त्यांचा राग दिसतो आहे. पण हे समजून घे की तुझ्या बरोबरीच्या मुलीना आई-वडिलांनी शिकू न देता त्यांची कधीच लग्न लावून दिली. त्यांनी मात्र केवळ तुझी इच्छा म्हणून तुला शिकवलं. ते तुझे वडीलच आहेत न. त्यांनी तुझ्या भविष्याचा विचार करूनच तुझ लग्न ठरवल असेल न! अग, तू जो मुलगा म्हणते आहेस तो बँकेत कारकून आहे. काय सुख देणार आहे तो तुला? काढून टाक हा असला विचार मनातून. अग मुलीच्या जातीने लग्नानंतर प्रेम कराव... ते ही आपल्या पतीवर आणि त्याच्या कुटुंबावर."


 त्यावर सईने आईचा हात हातात घेतला आणि म्हणाली,"आई, अग शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेला कोण मोठा उद्योग धंदेवाला मिळणार आहे? आणि मिळालाच तरी मी अनिच्छेने लग्न केल तर त्याच्याबरोबर सुखी कशी होईन? जर मी माझ्या इच्छेने लग्न केलं तर आयुष्य थोड त्रासाच जाईल हे मान्य, पण ते सुखाच असेल. जाऊ दे. तुला नाही समजणार. चल निघते मी. माझी निघायची वेळ झाली." अस म्हणून सईने तिची पर्स उचलली आणि ती निघाली.


संध्याकाळी नेहेमीच्या वेळेला सई घरी आली नाही तेव्हा तिच्या आई-वडिलांनी धावपळ केली; चौकशी केली आणि पत्ता न लागल्याने ते पोलिसात गेले. त्यावेळी त्यांना समजल की सईने घरातून पळून जाऊन आपल्या इच्छेनुसार लग्न केल आहे.


************************


सन २०१६


"बाबा, माझी आणि विकासची M. B. A. करताना ओळख झाली. कॅम्पस इंटरव्यूमध्ये दोघांनाही मल्टीन्याश्नल कंपनीमध्ये चांगली पोस्ट मिळाली आहे." सई तिच्या बाबांशी रात्री जेवताना बोलत होती.


"बर मग? हे अस अचानक कोणाचा तरी बायोडेटा मला सांगण्याच प्रयोजन?" बाबांनी तिला थोडं थठ्ठेत थोड गंभीरपणे विचारलं.


"we are in love, बाबा. आमचा लग्न करायचा विचार आहे. आम्ही नोकरीचं होईपर्यंत final होईपर्यंत घरात याविषयी बोलायचं नाही अस ठरवलं होत." सई हसत हसत म्हणाली.


"अग, मला तरी काही कल्पना द्यायचीस न सई. हा असा एकदम बॉम्ब टाकलास! कमाल आहे ह तुझी." आई म्हणाली.


"अग, बॉम्ब नाही ग. पण आम्ही ठरवलं होत की जोपर्यंत जॉब लागत नाही तोपर्यंत घरात नाही सांगायचं." सई म्हणाली.


"काय नाव त्याच? म्हणजे पूर्ण नाव ग! आपल्या जातीचा आहे का?" बाबांनी विषयाला वेगळ वळण दिल.


"बाबा, तुम्हाला खरच अस वाटत की तो कोणत्या जातीचा आहे याने आमच्या रोजच्या आयुष्यावर काही परिणाम होणार आहे? come on बाबा. आम्ही दोघेही चांगले शिकलेले आहोत. चांगली नोकरी आहे आणि आमचे स्वभाव देखील जुळतात. गेली ४ वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो आहोत." सईने शांतपणे बाबांकडे बघत म्हंटले.


"त्याने त्याच्या घरात सांगितले आहे का? निदान तो कुठे राहतो? घरात कोण कोण आहे? हे तरी विचारू शकतो ना आम्ही?" बाबांनी सईकडे बघत हसत विचारलं.


"आपल्याच शहरात रहातो. त्याची आई बँकेत नोकरी करते आणि बाबा प्रायवेट कंपनीमध्ये मेनेजर आहेत. धाकटा भाऊ आता T.Y. ला आहे आणि पुढे तो देखील M. B. A. करणार आहे. अजून काही?" सईने देखील हसत उत्तर दिल.


"कधी भेटवतेस? तुम्ही लग्नाची तारीख ठरवली आहात की आमच्यासाठी काही ठेवल आहे?" हसत आणि तिला जवळ घेत आप्पासाहेब शिंदे म्हणाले.


आप्पासाहेब शिंद्यांनी आपल्या लाडक्या लेकीच लग्न तिच्या इच्छेने धुमधडाक्यात लावून दिल.


Friday, April 5, 2019

दुरून डोंगर साजरे

दुरून डोंगर साजरे

 अनंत आणि त्याची पत्नी अनन्या लग्नाचा पंधरावा वर्धापन दिन साजरा करायला न्यूझीलंडला गेले होते. एक चर्च बघायला गेले असताना साधारण त्यांच्याच वयाचं एक जोडपं त्यांना तिथे भेटलं. सहज गप्पा सुरू झाल्या; त्यात त्या परदेशी जोडप्याने सांगितलं की हे दोघांचंही दुसरं लग्न आहे आणि अफेअर्स त्यांनी फार लक्षात ठेवली नाहीत. अनंतने कौतुकाने सांगितलं की त्यांच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली आहेत आणि लग्ना अगोदर चार वर्ष त्याची पत्नीच त्याची प्रेयसी होती. हे ऐकून ते परदेशी जोडपं काहीसं गोंधळल.

"Are you serious? You mean you both are styaing together for last ninteen years?"

"No! We know each other for last ninteen years. But we started staying together after we got married."/ "How many kids you have? Do they stay with you?"

"We have two kids and of course they both stay with us. Infact we stay with my parents and our kids in one home."

"Good loard! That's a remarkable lifestyle!"

"I don't think so. That's a very normal and happily accepted lifestyle in India." अनंत अभिमानाने म्हणाला.

काहीवेळ गप्पा मारून दोन्ही जोडपी आपापल्या मार्गाने गेली. ते दोघे परत आल्यानंतर एकदा अनन्यायची मैत्रीण अजिता त्यांच्याकडे गेली असताना अनन्याने तिला ही घटना सांगितली. अजिता म्हणाली; "खरंच आहे न ग! आपल्याकडे कुटुंब म्हंटल की अजूनही आजी-आजोबा, आई-वडील आणि नातवंड हेच डोळ्यासमोर येतं. पूर्वी आई-वडील, दोन भावंड आणि त्यांचं कुटुंब असं असायचं; आता मात्र दोन भाऊ वेगळे राहातात."

अनन्या म्हणाली; "हे सगळं मला माहीत नाही का? माझी हरकत वेगळीच आहे. हा म्हणाला 'happily accepted lifestyle'.... कशावरून ग मी ही कुटुंब व्यवस्था happily स्वीकारली आहे?"

अजिता थोडीशी गोंधळली. कारण अनन्याची सासू तशी बरीच active होती. दोघींचं भांडण झालेलं कधी ऐकलं नव्हतं. थोडे मान-अपमान असायचे... पण अनन्यानेच अनेकदा म्हंटल होत की एकत्र असलं की भांड्याला भांड लागणारच. ते ना मी धरून बसत ना त्या. मग तिने हे असं अचानक का म्हणावं ते अजिताला कळलंच नाही. अजिता तिच्याकडे प्रश्नर्थक नजरेने बघितलं. अनन्या म्हणाली,"अग, आमच्यात काहीच प्रश्न नाहीत आता. उलट बरीचशी सवय झाली आहे. त्या कुठे आणि कधी कसं बोलतील हे मला माहीत असतं; आणि माझे शालजोडीतले त्यांना देखील कळतात. सवय झाली आहे आम्हाला एकमेकींची. पण खरं सांगू? नवीन लग्न झालं तेव्हा अनेकदा काही गोष्टी अजिबात पटायच्या नाहीत. पण तसं बघितलं तर त्या गोष्टी इतक्या शुल्लक असायच्या की ते विषय धरून ठेवले असते तर इतर अनेक गोष्टींमध्ये अडचण आली असती म्हणुन गप्प बसायचे."

तिचं बोलणं अजूनही अजिताच्या लक्षात येत नव्हतं. ती म्हणाली; "ऐ काय ते स्पष्ट सांग. हे तुझं कोड्यात बोलणं मला कळत नाही."

त्यावर अनन्या म्हणाली, "अग, मी लग्न करायच्या अगोदरच सांगितलं होतं की मी नोकरी कायम करणार आहे. सासूबाई फारच उत्साही होत्या. त्यामुळे त्यांची कधीच हरकत नव्हती माझ्या नोकरीला. रोज नवऱ्याच्या बरोबरीने त्या माझा डबासुद्धा भरायच्या. पण मग दर रविवारी किंवा कोणत्याही सुट्टीच्या दिवशी स्वयंपाकघराची सगळी जवाबदारी माझी असायची. त्यातच एप्रिल-मे मध्ये तिखट-हळद भरणे, गोडा-गरम मसाला करून ठेवणे ही कामं सुट्टीच्या दिवशी असायची. मला खूपदा वाटायचं ग की हे सगळे पदार्थ विकत आणावेत..... सुट्टीच्या दिवशी आरामात उठावं.... नवऱ्याबरोबर बाहेर जावं..... कधीतरी जीन्स आणि टॉप किंवा शॉर्ट वन पीस घालावा..... पण हे कधीच करता आलं नाही. तुझं बरं होतं. तू कायमच वेगळी राहिलास आणि हवं तसं जगलीस."

"अग, पण तुम्ही तर तुमच्या ऑफिस मधल्या पिकनिक्सना नेहेमी जायचात की. जोडप्याने जायचात. तू माझ्याकडे येऊन जीन्स आणि टॉप घालून जयचीस. आठवत न? तुझी मुलं देखील तुझी सासू सांभाळायची त्यावेळी. विसरलीस की काय?" अजिता म्हणाली.

"हो. अगदी शंभर टक्के मान्य! म्हणून तर म्हंटल की विषय शुल्लकच होते; त्यामुळे त्यावरून वाद-भांडण करावंसं वाटलंच नाही. अग, पण एखाद्या सुट्टीच्या दिवशी मला फक्त आम्ही दोघांनी बाहेर भटकायला जावं असं फार वाटायचं ग. मात्र फक्त आम्ही दोघेच गेलो तर आईला काय वाटेल? ती कायम घरात असते आणि आपण कामाच्या निमित्ताने बाहेर.... असं म्हणून सुरवातीला याने ते टाळलं.... मग मुलं झाल्यावर मुलांबरोबर अगदी नेमाने जायचो. पण ते दोघांनी हातात हात घालून भटकणं मी नाही कधी अनुभवलं. एक अजून सांगू? मी कधीच आळसावलेली सकाळ माझ्याच घरात नाही अनुभवली." अनन्या म्हणाली.

"अग, पण मग आता कर न हवा तितका आळशीपणा. आता तर तुम्ही चोवीस तासासाठी कामाला बाई ठेवली आहे. त्याव्यतिरिक्त स्वयंपाकाला बाई........." अजिता म्हणाली. तिला थांबवत अनन्या म्हणाली,"अग, आता सगळंच मी बघते. त्यामुळे साठवणीचे पदार्थ विकत, चोवीस तास बाई असली सुखं आहेत. मुलं आता आपलं आपण सगळं करतात. गेल्याच वर्षी मला चांगली पोस्ट मिळाली आणि पगार देखील वाढला आहे. अनंत देखील चांगलं कमावतो आहे. तसं म्हंटल तर आता सगळी सुखं हात जोडून समोर उभी आहेत. पण त्या वयातली ती काहीशी वेडी स्वप्न हरवली आहेत ग.... आणि आता कितीही पैसे दिले न तरी ना ते वय परत येणार आहे; ना त्यातलं थ्रिल." काहीशी उसासत अनन्या म्हणाली. अजिताला तिचं म्हणणं पटत होतं देखील आणि नाही देखील.

गम्मत अशी होती की अजिताला अनन्याच्या आयुष्याबद्दल कायम हेवा वाटत आला होता. अजिता लग्नाच्या पहिल्या दिवसापासून वेगळी राहिली होती. लग्न करतानाची तिची तीच तर अट होती. ती मोकळ्या वातावरणात वाढलेली मुलगी होती. त्यामुळे तिला एकत्रित कुटुंब नको होतं. वेगळं घर असल्यामुळे अजिताला मनाला येईल तस वागता यायचं. कधीही उठावं... मित्र-मैत्रिणींना कधीही बोलावता यायचं. उशिराची जागरणं आणि हवा तसा आळशीपणा. पण वेगळ्या घराबरोबर सगळ्याच जवाबदऱ्या देखील आल्या होत्या. सगळी बिले वेळेत भरली गेली की नाही ते बघणं. घर कामाची बाई आली नाही की एकटीने सगळं काम उरकणं. हे तर करावं लागायचं; पण स्वप्नालीच्या जन्मानंतर तर अनेकदा खूपच तारांबळ उडून जायची. तिचा नवरा केशव खूप मदत करायचा. तरीही अजिताची ओढाताण व्हायचीच. मुख्य म्हणजे स्वप्नाली जर आजारी असली आणि महत्वाच्या कामांमुळे दोघांनाही सुट्टी घेणं शक्य नसलं की आजारी स्वप्नाली तशीच डे-केअरमध्ये सोडली जायची. त्याची टोचणी अजूनही अजिताची मनाला होती. खर तर या अडचणींमुळेच केशव आणि अजिताने एकच बाळ पुरे असा निर्णय घेतला होता.

त्यामुळे अजिताला नेहेमीच वाटत आलं होतं की अनन्या तिच्यापेक्षा कितीतरी सुखी आहे. तिची मुलं सांभाळायला सासू आहे. अनन्या कधीही कुठेही फिरायला जाऊ शकते. काहीच बंधनं नाहीत तिला.

आज मात्र अनन्याच्या घरून बाहेर पडताना अजिताला मनात हसायला येत होत. अजिताला अनन्याच्या आयुष्याचा हेवा वाटत आला होता आणि अनन्याला मात्र कायम अजिताच आयुष्य हवसं वाटलं होतं. दोघींनाही एकमेकींचे डोंगर दुरून साजरे वाटले होते.