Friday, October 16, 2020

श्रीकृष्ण - नंदबाबा

 श्रीकृष्ण - नंदबाबा


तो : बाबा....

नंदबाबा : कान्हा, आज मथुरेचे राजमंत्री अक्रूर आले म्हणून नाही; तर तू गोकुळात आलास त्याक्षणापासून मला माहीत होतं की तू काही इथे फार काळ राहणार नाहीस. जसं तुझं येणं एक दैवी संकेत होता; तुझं गोकुळात असणं एक संकेत होता.....

तो : माझं गोकुळात असणं एक संकेत? बाबा!

नंदबाबा : हो माझ्या प्रिय पुत्रा... तू येण्याअगोदर गोकुळातील सर्व दही-दुभतं मथुरेत जात होतं. आम्ही कधीच इथल्या बालगोपाळांना धष्टपुष्ट करण्याचा विचार केला नव्हता. गुरांना राखणं आणि दुसऱ्यांसाठी दूध-दुभतं तयार करून विकणं इतकाच इथल्या लोकांचा दृष्टिकोन होता. तू आलास आणि प्रत्येक घरातील दही-लोणी चोरून बाळ-गोपाळांना दिलंस. आपल्या मुलांची तब्बेत अचानक चांगली कशी होते आहे याचा विचार करण्यास गोकुळवासीयांना भाग पाडलंस. शरीर संपदा सर्वात मोठी ठेव असल्याचं तुझ्या कृतीतून तू दाखवून दिलंस. आजचा धष्टपुष्ट झालेला गोकुळ कुमार आयुष्यभर तुझा ऋणी राहील आणि उद्या कोणत्याही युद्धात तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहील हे नक्की.

तो : पण गोकुळातील कुमार युद्ध का करेल बाबा?

नंदबाबा : (मंद स्मित करीत) गवळी नाही रे युद्ध करणार. पण हा माझ्या समोर उभा असलेला आठ वर्षांचा बालक ज्यावेळी भविष्यात एक कर्मयोगी योद्धा होऊन एक मोठा निर्णय घेईल आणि पुढील अनेक युगांना तत्वनिष्ठित आयुष्याचे धडे सांगण्यासाठी सत्य-असत्याचे युद्ध घडवून आणेल त्यावेळी त्याच्या सोबत त्याची शक्ती म्हणून हेच दही-लोणी चोर गोकुलकुमार उभे राहातील; याची मला खात्री आहे; आणि हाच तुझ्या गोकुळात येण्याचा संकेत आहे.

तो आठ वर्षांचा बालक काहीसं गूढ हसला आणि म्हणाला : बाबा, तुम्ही कधीही इतकं मोकळेपणी बोलला नाहीत. मग आजच का?

नंदबाबा : आज का? कारण तुझं गोकुळात येणं आणि राहाणं जसा एक संकेत होता तद्ववत तुझं उद्या गोकुळ सोडून कायमचं जाणं हे अबाधित सत्य आहे; हे माहीत असूनही तू जाऊ नयेस असं माझं मन मला सांगतं आहे. गोपाला, मला हे सगळं माहीत होतं. कसं ते विचारू नकोस; मात्र ही गोष्ट मी यशोदेला कधीच सांगितली नाही. तुझं आमच्या सोबत असणं किमान तिने तरी मनसोक्त उपभोगावं असं मला कायम वाटलं. पण आत्ता तिची जी अवस्था झाली आहे ती पाहून मात्र माझं चुकलं की काय असं मला वाटायला लागलं आहे. अजूनही तिचं मला हेच सांगणं आहे की मल्लक्रीडेसाठी माझा कान्हा लहान आहे; अजून एक-दोन वर्षांनंतर त्याला आपण पाठवू. तिला वेडीला हे कळलेलंच नाही की तिचा कान्हा... तिचा मोहन.... तिला सोडून कायमचा जातो आहे.... केवळ मल्लक्रीडेसाठी इतक्या लहान वयात बोलावणं आलेलं समजल्यावर तिची झालेली अवस्था; तू कायमचा जाणार हे कळल्यावर काय होईल याची मला कल्पना देखील करवत नाही रे! मोहना तू तुझ्या इथल्या वास्तव्याने आम्हा गोकुळवासियांना युगानुयुगांसाठी पावन करून टाकलं आहेस. तुझा निरागस सहवास जो आम्हाला मिळाला आहे तो कधीच कोणालाही मिळणार नाही. हे भाग्य फक्त आणि फक्त गोकुळवासीयांचं आहे हे मान्य; पण तरीही तुझं जाणं... कन्हैया... नको रे जाऊस.

तो : बाबा, सर्वकाही समजून देखील तुम्हीच जर असं म्हणाल तर यशोदा माता, रोहिणी माता आणि वेड्या गोकुळाला कोण सांभाळणार?

नंदबाबा : माझ्यात ती ताकद नाहीच रे मोहना. या आठ वर्षात तुझं रूप हृदयात साठवण्याव्यतिरिक्त मी काही केलेलं नाही. त्यामुळे यासर्वांची समजून काढून तुझं जाणं.... कायमच जाणं.... त्यांना स्वीकारायला लावण्याची जवाबदारी तुलाच घ्यावी लागणार आहे. केवळ तुझी यशोदा माता आणि रोहिणी माताच नाही तर तुझ्या प्रेमात वेडी झालेली राधा... तिला तुझ्या व्यतिरिक्त कोण सांभाळू शकेल रे.

तो : बाबा.... तुम्ही राधेबद्दल...

नंदबाबा : अरे मीच का.... संपूर्ण गोकुळ जाणून आहे. जिथे तिच्या पतीने; अनयने; तिला जशी आहे तशी स्वीकारली आहे तर मग इतर कोणीही काय बोलावं? मथुरेचे राजमंत्री आल्याची खबर हळूहळू गोकुळामध्ये पसरायला लागली आहे. ते कशासाठी आले आहेत हे समजून घेण्यासाठी या वेड्या गवळ्यांची रांग लागली आहे आपल्या वाड्याच्या दिशेने. तुझ्या तक्रारी सांगण्याच्या निमित्ताने सतत तुला कवटाळण्यासाठी येणाऱ्या गोपीदेखील राजमंत्री अक्रूर आल्यापासून माजघरात गर्दी करून आहेत. मग एकटी राधाच कशी लांब राहील? तिला तुझ्याव्यतिरिक्त कोणीही ही परिस्थिती समजावू शकेल का? मोहना, तुझं शारीरिक वय आठ वर्षे आहे. मात्र तू....

कानांवर हात ठेवत नंदबाबांना थांबवत तो म्हणाला : नको बाबा. किमान तुम्ही तरी असं बोलू नका.

नंदबाबा : (खिन्नपणे हसत) मी न बोलल्याने सत्य तर लपणार नाही ना कृष्णा? तू जगदनियंता आहेस. अनादिकालापासून तुझं अस्तित्व या विश्वाला व्यापून राहिलेलं आहे! तुझ्या लीला अगाध आहेत आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या आकलनाच्या पलीकडच्या आहेत. हे सत्य मी स्वीकारलं आहे.

एकवार काहीशा खिन्न नजरेने आपल्या प्रिय वडिलांकडे बघत तो मनमोहन बाहेर जाण्यास वळला. नंदबाबा धावले आणि आपल्या प्रिय पुत्राला मिठीत घट्ट कवटाळून घेत म्हणाले : नको जाऊस कान्हा. तू गेलास की गोकुळाचा प्राणच निघून जाईल. आम्हा सर्वांना जगणं अवघड होईल रे.

काही क्षण कोणीच काहीच बोलले नाही. पण मग मात्र नंदबाबांची ती प्रेमभरली मिठी सोडवून घेत श्रीकृष्ण लांब झाला. आपल्या वडिलांकडे पाठ करून तो बोलू लागला....

बाबा, जगणं अवघड होईल; यातच सर्व आलं! जे अशक्य असतं ते शक्य करण्यासाठी माझा जन्म आहे हे तुम्ही देखील ओळखून आहात. माझ्याशिवाय अवघड झालेलं जगणं तर तुमचे हे वेडे गवळी हळूहळू सोपं करून टाकतील. मात्र अत्याचार, हिंसा, असत्य वर्तन याचं अराजक आज जगात माजायला सुरवात झाली आहे; ते निपटून काढणं जास्त महत्वाचं आहे. माझं या कोवळ्या वयातील गोकुळ सोडण्याचं कारण तेच तर आहे. बाबा, आज तुम्ही क्षणात मला तुमचा आठ वर्षांचा बालक म्हणता आहात आणि क्षणात देवत्व देऊन मोकळे होता आहात. यापुढील आयुष्यात मला कायम हेच ऐकून घेत जगायचं आहे. कदाचित म्हणूनच मी माझ्या आयुष्याचे निरागस आणि मनमोकळे क्षण या गोकुळात घालवले आहेत. बाबा, उद्या मी निघणार. तुम्ही म्हणता आहात त्याप्रमाणे मला निघण्यापूर्वी गोकुळवासीयांची, माता यशोदा, माता रोहिणी यांची समजूत घालायची आहे. राधेला भेटणं तर मलाही शक्य नाही. परंतु ते ती देखील समजून घेईल याची मला खात्री आहे. बाबा, निघतो मी. पण जाता-जाता एकच पण खूप मनापासून सांगतो. खरतर मी कोणी विश्वव्यापक, विश्वविधाता किंवा जगदनियंता नाही. तर ज्यावेळी जो निर्णय घेणे आवश्यक असते तो निर्णय त्याच्या परिणामांची जवाबदारी घेत घेण्याचे साहस मनात कायम ठेवणारा एक मनुष्यप्राणी आहे; इतकंच! जे इतरांना जमणार नाही आहे ते करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कोणीतरी आरसा दाखवणे आवश्यक असते. मी तेच काम माझ्या पुढील आयुष्यात करणार आहे. बाबा, आत्ता तुम्ही भावुक झाले आहात; त्यामुळे मला अडवता आहात हे मी समजून आहे. मात्र माझ्याबद्दलचे हे भावुक भाव जसे तुम्ही आजवर स्वतःच्या मनात जपलेत त्याप्रमाणे पुढे देखील ते स्वतःपुरतेच ठेवा; ही एकच विनंती करतो आहे. बाबा, पुढे तुम्हाला माझ्याबद्दल बरंच काही ऐकू येणार आहे... मी भगोडा आहे; मी पाताळयंत्री दूत आहे; मी युद्धपुर्व युद्धाचे परिणाम ठरवणारा निष्ठुर निर्णायक आहे... असं बरंच काही! त्यावेळी तुम्हाला तुमचं मन घट्ट करावं लागणार आहे. कारण माझ्याबद्दलच्या प्रत्येक चर्चच्यावेळी हेच गोकुळवासी कासावीस होऊन तुमच्याकडे येणार आहेत. आज तुम्ही त्यांना सामोरं जाणं टाळता आहात; मात्र आजनंतर तुम्हाला प्रत्येक क्षणी माझा पिता होण्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. बाबा, सांभाळा स्वतःला. कोणीही कोणाच्याही आयुष्याला कायमचं पुरलं नाही; हे जितकं सत्य आहे; तितकंच मोठं सत्य हे देखील आहे की एकदा एखादं नातं स्वीकारलं की त्या नात्याचं उत्तरदायित्व आपल्यावर कायमचं राहातं. येतो मी नंदबाबा!

Friday, October 9, 2020

श्रीकृष्ण - वसुदेव!

 श्रीकृष्ण - वसुदेव!


श्रीकृष्ण म्हंटलं की आपल्याही नकळत आपल्या चेहेऱ्यावर एक स्मितरेषा तरळते. कारण कृष्णाचं व्यक्तिमत्त्व विश्वविधाता म्हणून जितकं भव्य आहे; तितकंच ते माखन चोर कान्हा किंवा मुरलीधर मनोहर मोहन म्हणूनही आपल्याला प्रिय आहे. तो एकाचवेळी आपले डोळे दिपवून टाकतो आणि आणि कुशीत शिरून लाड करून घेतो; तारुण्याच्या उंबरठ्यावरची हुरहूर लावतो किंवा प्रौढत्वाकडे झुकलेल्या मनाचे तत्वज्ञान सांगतो. त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याने त्याच्या देवत्वाचा अंश दाखवला आहे; आणि तरीही त्याच्या देवत्वचं दडपण कोणाच्याही मनात असेल असं वाटत नाही. खरं सांगू का..... कृष्ण म्हंटलं नं की मी तुमच्यासारखीच मंत्रमुग्ध होऊन जाते. या मंत्रमुग्धत्यातूनच या मदनमोहनाच्या आयुष्यातील काही महत्वाच्या स्त्रियांचं मनोगत मी मागे लिहिलं आहे. तसंच काहीसं त्याच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांबद्दल देखील लिहिण्याचा हा थोडा प्रयत्न.

तसं पाहिलं तर विविध स्वभावविशेष असणारे पुरुष महाभारतात उल्लेखले गेले आहेत; आणि त्यांचा कधी ना कधी श्रीकृष्णाशी संबंध आलाच आहे. परंतु ज्यांच्या अस्तित्वामुळे श्रीकृष्ण काही क्षण तरी स्तब्ध झाला; असं मला वाटतं; असे काही पुरुष म्हणजे वासुदेव - श्रीकृष्णाचे जन्मदाते; नंदराज - त्याचे पालन करते; बलराम - त्याचा मोठा भाऊ, पेंद्या - त्याचा बालपणीचा लाडका मित्र, सुदामा - ज्याचे पोहे खाऊन श्रीकृष्ण तृप्त झाला; पार्थ - त्याच्या अत्येचा कुंतीचा पुत्र आणि त्याचा लाडका बंधू, कर्ण - ज्याच्या आयुष्याचं गुपित श्रीकृष्णाला माहीत होतं आणि ज्याच्यावर श्रीकृष्णाने मनातून खरंच खूप प्रेम केलं, हे तर आहेतच परंतु ज्यांच्याबद्दल आपण फारशी माहिती करून घेतलेली नाही परंतु त्यांचं श्रीकृष्णाच्या आयुष्यातलं अस्तित्व खूप महत्वाचं होतं असे दारूक - त्याचा सारथी, सात्यकी - श्रीकृष्णाचा सेनापती आणि परममित्र आणि सर्वात महत्वाचा असा एक पुरुष ज्याचा उल्लेख श्रीकृष्णाच्या सोबत असूनही आपल्याला राग येईलच असा तो पारधी ज्याच्या बाणामुळे श्रीकृष्णाने त्याचा हा अवतार संपवला.. या सर्वांचे मनोगत माझ्या दृष्टिकोनातून.

***

वसुदेव


माझे पिता यदुवंशी शूरसेन हे मथुरेचे महाराज उग्रसेन यांचे परममित्र. माझे पिता शूरसेन आणि माता मारिषा यांच्या आशीर्वादानेच मी महाराज उग्रसेन यांचा मंत्री झालो. महाराज उग्रसेन यांचा पुत्र कंस माझा परममित्र. तो स्वभावाने तसा थोडा आततायी आणि शीघ्रकोपी आहे; मात्र आमची मैत्री खरंच खूप गहिरी आहे. माझ्या शांत स्वभावाविषयी तो नेहेमी माझी चेष्टा करतो आणि मी त्याला कायम सांगतो की 'कोणत्याही संकटामध्ये कोपीष्ट मनाने घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. राग येणे स्वाभाविक आहे; मात्र शांत मनाने विचार करून घेतलेला निर्णय हा आयुष्यात चांगली फळेच देतो.' कंसाचे मित्रप्रेम वाखाडण्याजोगे आहे. त्याने त्याच्या पिताजींकडे स्वतः आग्रहपूर्वक माझ्या विवाहाचा विषय काढला. कंसाचे काका; आदरणीय देवक महाराज यांच्या सात कन्यांपैकी देवकी ही कंसाचे लाडकी बहीण. त्यामुळे माझा विवाह तिच्याशी व्हावा ही त्याची मनीषा होती. त्याने माझ्याशी बोलल्यानंतर हा प्रस्ताव उग्रसेन महाराजांकरवी महाराज देवक यांच्यापुढे ठेवला; आणि आश्चर्य म्हणजे महाराज देवक यांनी केवळ देवकीच नाही तर त्यांच्या सातही पुत्रिंशी माझा विवाह आपणहून ठरवला. माझ्या मंत्री होण्यानंतरच्या या घटना इतक्या लवकर झाल्या की माझा माझ्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता. विवाह इतक्या लवकर ठरला की माझे पिता शूरसेन महाराज, माझी माता मारीषा माझ्या या विवाह सोहळ्याला येऊ शकले नाहीत. मात्र मी त्यांना दूताकरवी निरोप पाठवला होता की मी विवहाहानंतर लगेच माझ्या सप्तपत्नींसोबत त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे. मी विवाहबद्ध झालो याचा आनंद कंसाच्या प्रत्येक कृतीमध्ये दिसत होता. विवाह सोहळ्यानंतर माझ्या सप्त पत्नींसोबत मी स्वगृही जाण्यास निघालो त्यावेळी मथुरेच्या वेशीपर्यंत आमच्या रथाचे सारथ्य कंसाने आग्रहपूर्वक स्वीकारले. मथुरेचे नगरजन त्यांच्या सुपुत्रींच्या पाठवणीसाठी मथुरेच्या रस्त्या-रस्त्यावर पुष्पांची उधळण करत उतरले होते. कंस सारथ्य करत असताना देखील माझ्याशी बोलत होता. पुढील प्रवासासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्याने आमच्या सोबत दिल्या होत्या; त्यासंदर्भात माहिती देखील देत होता.... आणि अचानक ती आकाशवाणी झाली.... ती आकाशवाणी ऐकताच कंस बेभान झाला. मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. शरीर नश्वर असते. त्यामुळे असा कोणताही आततायी निर्णय घेऊ नकोस की ज्यामुळे तुला यापुढील आयुष्य सततच्या भीतीच्या सावटाखाली जगावे लागेल. मात्र शीघ्रकोपी कंसाने कधीच कोणाचेही ऐकले नव्हते. त्या एका आकाशवाणीने माझे आणि माझ्या नववधू देवकीचे आयुष्यच बदलून गेले.

कंसाने आम्हाला दोघांनाही मथुरेतून बाहेर जाण्यास मज्जाव केला आणि आमची रवानगी कारावासात झाली. काही कळायच्या आत आम्ही दोघेही कंसाच्या कैदेत अडकले होतो. महाराज उग्रसेन यांनी आपल्या पुत्राची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्याचा परिणाम असा झाला की महाराज उग्रसेन यांना देखील कंसाने कालकोठडीत टाकले आणि स्वतःचा राज्यभिषेक करून घेतला. कारावास! एक दिवस-रात्र विरहित भावनांच्या गर्तेतील आयुष्य. मला त्या कारावासातील कोठडीमध्ये हे देखील कळण्यास मार्ग नव्हता की माझ्या इतर सहा पत्नीचे काय झाले. दिवसांमागून दिवस जाऊ लागले आणि देवकी गर्भवती झाली. ही बातमी कळताच कंस राजवैद्यांना घेऊन आमच्या कोठडीमध्ये आला. त्यांच्याकरवी देवकीची तपासणी करवून घेऊन त्याने तिच्या तब्बेतीची पूर्ण काळजी घेण्याची आज्ञा राजवैद्यांना दिली. त्याच्या या निर्णयाने मला खूपच आश्चर्य वाटले. मात्र जाताना त्याने वळून माझ्याकडे बघितले आणि म्हणाला;"वसुदेवा; मला तुझ्याविषयी काहीच तक्रार नाही. त्यामुळे देवकीचे गर्भारपण मी नीट सांभाळणार. परंतु तिच्या आठही बाळांना मी मारणार. त्यानंतर मात्र मी तुला आणि माझ्या या प्रिय भगिनीला मुक्त करेन हा माझा शब्द." कंस निघून गेला आणि त्यांच्या वक्तव्याने मी आनंदित व्हावे की दुःखी या संभ्रमात मी पडलो.

दिवस जात होते आणि देवकी आणि माझे पुत्र जन्मतःच कंसाच्या हातून मारले जात होते. देवकी सातव्या वेळी गर्भवती राहिली त्यावेळी राजवैद्य तिची तब्बेत पाहण्यासाठी आले होते. आज राजवैद्यांचा चेहेरा चिंतीत दिसत होता. त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवलेल्या कंसाच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही; आणि त्याने अत्यंत काळजीभरल्या आवाजात राजवैद्यांना प्रश्न केला; "वैद्यराज, काही काळजी करण्याजोगे आहे का?" त्याचा तो काळजीभरला आवाज ऐकून मलाही प्रश्न पडला की याच्या मनात नक्की काय आहे? आजवर याने माझे सहा पुत्र माझ्या नजरेसमोर मारून टाकले आहेत आणि एकाही वेळी त्याचे मन द्रवले नाही आहे किंवा त्याचा हात किंचित देखील कापला नाही आहे. तरीही आज माझ्या पत्नीच्या गर्भारपणाची त्याला काळजी वाटत आहे.

राजवैद्यांनी एकदा माझ्याकडे पाहिले आणि ते कंसाला म्हणाले;"महाराज, यावेळी देवी देवकींचा गर्भ काहीसा कमजोर वाटतो आहे. त्यांना मोकळी हवा आणि सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज आहे." हे ऐकताच कंसाने कारावासाच्या सुरक्षिततेसाठी पाहाऱ्यावर ठेवलेल्या त्याच्या अत्यंत विश्वासू सेवकाला बोलावले आणि म्हणाला,"शूर्पका, आजपासून तुझ्या पत्नीला संध्यासमयी इथे घेऊन ये आणि माझ्या भगिनीला; देवकीला; कारावासातील प्रांगणात घेऊन जाण्याची आणि परत सुखरूप कारागृहात आणण्याची जवाबदारी दे. एक लक्षात ठेव; देवकीच्या बाबतीत कोणतीही चूक झाली तर त्याची शिक्षा ही केवळ देहांत नसून हालअपेष्टा सहन करत मिळणारा देहांत!" त्याच्या त्या गोंधळून टाकणाऱ्या वागण्या-बोलण्याचा अर्थ लागेपर्यंत कंस राजवैद्यांना घेऊन तेथून निघाला होता.

मी अजूनही त्याच्या वागण्याचा अर्थ शोधत होतो. त्यावेळी देवकी माझ्या जवळ आली आणि भिंतींनाही ऐकू जाणार नाही याची काळजी घेत मला म्हणाली;"स्वामी, मी कारागृहाच्या प्रांगणात रोज जाऊ लागले की राजवैद्य एका सायंकाळी रोहिणीला घेऊन येणार आहेत. त्यांनी मला वचन दिले आहे की या गर्भाला ते रोहिणीच्या गर्भात संकर्षित करणार आहेत; जेणेकरून माझे हे बाळ वाचेल." तिचे ते बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मात्र तिने डोळ्यांनी खूण करताच मौन धारण केले. दिवस जात होते आणि देवकीचा सप्तम गर्भ दिसामासाने तिच्या उदरात वाढत होता. देवकीचा सातवा महिना सुरू झाला. यावेळचे गर्भारपण तिला सोसवत नव्हते की काय कोण जाणे; परंतु ती अत्यंत अशक्त दिसू लागली होती. कारावासाच्या प्रांगणात जाण्याकरता देखील तिला आता किमान दोन दासींची मदत लागत होती. मात्र तरीही ती प्रतिदिनी निग्रहपूर्वक बाहेर पडत होती. कंस रोजच राजवैद्यांसोबत देवकीच्या तब्बेतीची विचारपूस करण्यास येत असे. त्याने हा परिपाठ देवकीच्या प्रथम गर्भारपणापासून ठेवला होता.

त्यादिवशी राजवैद्यांनी देवकीची तब्बेत बघितली आणि म्हणाले,"महाराज, देवी देवकींचा हा गर्भ किती दिवस त्यांच्या उदरात जगेल याबद्दल मला शंका आहे. आपली परवानगी असली तर मी प्रतिदिनी संध्या समयी देखील देवींच्या तब्बेतीची विचारपूस करण्यास येऊन जाईन. त्या ज्यासमयी प्रांगणात येतात त्यासमयी केवळ लांबूनच मी त्यांचे दर्शन घेईन." काही क्षण विचार करून कंसाने राजवैद्यांना परवानगी दिली. या घटनेला केवळ दोन दिवस झाले असतील; त्यादिवशी देवकी उठून बसू शकत नव्हती. मात्र ती हट्टाने संध्यासमयी प्रांगणात गेली. मला आता देवकीची खूपच काळजी वाटू लागली होती. आपल्या सहा पुत्रांचा जन्मतःच झालेला मृत्यू तिने पाहिला होता. हे दुःख कोणत्याही मातेला दुभंगून टाकण्यास पुरेसे होते. तरीही ती शक्तीदेवता सप्तम पुत्राला जन्म देण्यासाठी सज्ज झाली होती. आज प्रांगणाच्या दिशेने जाताना तिने एकदा माझ्याकडे वळून बघितले आणि आपल्या उदरावर हात ठेऊन तिने 'निरोप द्यावा'; अशा पद्धतीचा इशारा मला केला. मी तिच्या त्या इशाऱ्याने कोलमडून गेलो. मात्र देवकी अत्यंत घट्ट मनाने ठाम पावले उचलत बाहेर पडली. संध्या समय टळून बराच वेळ झाला होता; तरी अजूनही देवकी परतली नव्हती. तिच्या काळजीने माझ्या जीवाचे पाणी पाणी होत होते. एक असाहाय्य कैदी यापेक्षा जास्त मी काहीच नव्हतो. स्वतःच्या या असाहाय्य स्थितीवर आज मला प्रचंड क्रोध येत होता... मी ना योग्य पुत्र होऊ शकलो होतो ना योग्य पती! मी माझ्या पुत्रांना देखील वाचवू शकलो नव्हतो. का जन्मलो होतो मी या जगात? काय उद्देश आहे माझ्या आयुष्याचा? या प्रश्नांच्या गर्तेत मी हरवून गेलो होतो... आणि त्याचवेळी मला देवकीचा टाहो ऐकू आला. माझा जीव पिळवटून गेला. मी कारावासाच्या दारापर्यंत धावलो मात्र बांधलेल्या शृंखलांमुळे पडलो. काही वेळानंतर देवकी शूर्पक पत्नीचा आधार घेत कारावासाच्या आत आली. ती पूर्णपणे उन्मळून पडलेली मला दिसत होती. मात्र मी काहीच करू शकत नव्हतो. देवकी आत येते न येते तोच कंस देखील तेथे दाखल झाला. त्याच्या सोबत राजवैद्य देखील होते.

आत येताच राजवैद्यांनी घाईघाईने देवकीच्या तब्बेतीची पाहाणी केली. त्यांचा चेहेरा देवकीला पाहून भयभीत झाला. ते धावले आणि त्यांनी कंसाचे पाय पकडले. "त्राही माम्! महाराज.... मी माझ्याकडून कोणतेही उपचार कमी केले नव्हते. तरीही जे व्हायला नको होते ते झाले आहे." त्याचे बोलणे ऐकून कंस गोंधळून गेला. राजवैद्यांना उठण्याची आज्ञा देत त्याने विचारले;"नक्की काय झाले आहे वैद्यराज?" मान खाली घालून राजवैद्य म्हणाले;"महाराज, देवी देवकी यांचा सप्तम गर्भ त्यांच्या सप्तम महिन्यात आतल्याआत जिरून गेला आहे. सप्तम महिना हा गर्भने संपूर्ण जीव धरण्याचा असतो. याच महिन्यात त्याची शारीरिक वाढ पूर्ण होऊन पुढे मानसिक आणि बौद्धिक वाढ सुरू होते असे शास्त्र म्हणते. त्यामुळे हा सप्तम महिना व्यवस्थित पार पडावा यादृष्टीने मी प्रयत्न करत होतो. मात्र आज देवी देवकी यांचा हा गर्भ आतल्याआत जिरून गेला आहे." ही माहिती देताना राजवैद्य थरथर कापत होते. कारण त्यांना महाराज कंसाच्या क्रोधाची कल्पना होती. मात्र आश्चर्यकारक रीतीने कंस शांत होता. काही क्षण विचार करून कंसाने गडगडाटी हास्य केले आणि गर्वाने छातीवर हात मारत तो म्हणाला;"याचा अर्थ देवकीचे गर्भ माझ्या भीतीने जन्मआगोदरच मृत्यूला प्राप्त होणार तर! म्हणजे एका दृष्टीने माझ्या प्रिय भगिनीच्या शेवटच्या दोन पुत्रांपैकी एकाला मृत्युदंड देण्याची मला गरज उरलेली नाही. वैद्यराज आपण खूपच चांगली बातमी मला दिली आहे." यानंतर माझ्याकडे वळून कंस म्हणाला;"मित्रा वसुदेवा, आता केवळ तुझा अष्टम पुत्र! त्याला मारून मी अमर होईन. एकदा त्याचा निकाल लावला की मग तू आणि माझी प्रिय भगिनी या कारावासातून मोकळे व्हाल." असे म्हणून तो निघून गेला. त्याच्या सोबत निघताना राजवैद्यांनी माझ्याकडे पाहून म्हंटले;"वसुदेव महाराज, देवींची काळजी घ्या." मी राजवैद्यांकडे पाहिले आणि मला जाणवले की राजवैद्यांच्या चेहेऱ्यावर नकळत एक समाधानाची रेषा उमटली आहे. कंस आणि राजवैद्य जाताच मी देवकीकडे धावलो. शारीरिक यातना सहन करणाऱ्या त्या स्त्रीशक्तीने माझा हात हातात घेतला आणि अत्यंत हळुवार आवाजात ती म्हणाली;"रोहिणी माता होणार आहे. तिला मी आजच तुमचे बंधू गोकुळातील नंद महाराज यांच्याकडे जाण्याविषयी सुचविले आहे." एवढे बोलल्याचे कष्ट देखील तिला सहन झाले नाहीत आणि तिला ग्लानी आली.

............ आणि देवकी अष्टम समयी गर्भवती राहिली. सप्तम समयी तिच्यावर असणारी अवकळा पूर्णपणे नाहीशी झाली होती. तिचा आनंदी, हसरा, उजळलेला चेहेरा बघून मी देखील समाधान पावत होतो. यावेळी कंस रोज सकाळ-संध्याकाळ स्वतः राजवैद्यांसोबत कारावासामध्ये येत होता. दिवस भरत आले आणि कंसाने कारावासामधील पाहारा वाढवला. त्याने शूर्पकाला सक्त ताकीद दिली होती की कारावासामध्ये होणाऱ्या प्रत्येक क्षणांची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. स्वतः शूर्पक आता कारावासातच येऊन राहिला होता.

आज भाद्रपदातील अष्टमी. आज आकाश फाडून मेघांनी धारतीकडे धाव घेतली होती. देवकी संध्याकाळपासूनच अस्वस्थ होती. मात्र तिला होणारा त्रास ती प्रगट करत नव्हती. वेळ पुढे सरकत होती आणि रात्री बाराच्या सुमारास देवकीला अंतिम कळा येऊ लागल्या. काही क्षणातच पुत्ररत्न जन्माला आले. माझा आनंद गगनात मावत नव्हता. कारावासाच्या पाहरेकऱ्यांना ही बातमी कळू नये म्हणून मी त्या अर्भकाला उचलून कवटाळले जेणे करून त्याचे रुदन कोणालाही ऐकू जाऊ नये. देवकी म्लान होऊन पडली होती. अजून तिने तिच्या अष्टम पुत्राचे मुखावलोकन देखील केले नव्हते. आश्चर्य म्हणजे दर क्षणाला आत येऊन बघणारे पाहारेकरी अजून आले नव्हते. सर्वत्र एक निर्मम शांतता पसरली होती. त्या अर्भकाला कवटाळून काय करावे याचा विचार मी करत होतो... आणि.... मला माझ्यातूनच एक प्रकाश शलाका निर्माण झाल्याचा भास झाला. मी हातातील अर्भकाकडे पाहिले. ते माझ्याकडे पाहात हसत होते... आणि माझ्या मनाच्या गाभाऱ्यातून एक आवाज गुंजला... "बाबा, मला देखील माझ्या मोठ्या भावाप्रमाणे गोकुळात नेऊन सोडा. चला, उठा... तुम्हाला कोणीही अडवणार नाही."

एक क्षण मी देवकीकडे बघितले. तिने ग्लानीतून जागे होण्याची वाट पाहण्याची इच्छा असूनही मी मन घट्ट करून माझ्या या अष्टम पुत्राला घेऊन निघालो. माझ्या मनाच्या आवाजाने जे सांगितले होते तसेच झाले. मला माहीत होते माझ्या हातातील नवजात अर्भक म्हणजे मानव रूपातील तो विश्वकर्ता आहे. त्यामुळे मला कसलीच काळजी नव्हती. मी दुथडी भरून वाहणाऱ्या नर्मदेला पार करून गोकुळात पोहोचलो; आश्चर्य म्हणजे माझा बंधू नंद माझी वाट पाहात होता. त्याची पत्नी यशोदा नुकतीच बाळंतीण झाली होती. नंदाने माझ्याकडे पाहिले आणि माझ्या हातातून माझ्या पुत्राला घेऊन देवी यशोदेच्या कुशीत नेऊन ठेवले. नंदाची कन्या घेऊन मी कारावासात पोहोचलो आणि अचानक देवकीला जाग आली. ती कण्हत उठली आणि तिच्या आवाजाने पाहारेकरी देखील धावत आत आले. कंसाला निरोप गेला आणि तो धावत कारावासात आला. त्याने त्या नवजात अर्भकाला उचलले आणि........ ती आदिमाया स्वरूपात प्रकटली आणि सत्य वदून अंतर्धान पावली.

प्रचंड संतापलेला कंस माझ्याकडे वळला. "तू हे कसे केलेस ते मला माहीत नाही वसुदेवा. पण यापुढे ना तू माझा मित्र आहेस ना ही माझी भगिनी. आता मी तुला भेटेन ते तुझ्या त्या गोकुळातील पुत्राच्या मृत्यूनंतरच. तोपर्यंत तू माझा कैदी आहेस हे विसरू नकोस." कंस दाणदाण पावले आपटत निघून गेला. त्याक्षणी माझ्या आणि देवकीच्या आयुष्यातील काळरात्रीला सुरवात झाली.

"वासुदेवा, तुझं हे नाव माझ्या नावावरून पडलं आहे याची मला कल्पना आहे. माझ्या आयुष्यातील काळरात्री तू तुझ्या हाताने संपवल्यास. कंस वध करून तू माझी आणि तुझ्या जन्मदात्या आईची सुटका केलीस. मथुराधिपती म्हणून माझा राज्यभिषेक देखील करवलास. आजवरच्या भारतवर्षाच्या इतिहासात पुत्राने पित्याचा राज्यभिषेक करवला असे घडले नसेल. देवकीचे दुःख समजून घेऊन तू तुझे सहाही बंधू परत आणलेस. पुढे द्वारका वसवलीस आणि तेथे देखील माझ्या अधिपत्याखाली बालरामाचा संपूर्ण मान ठेऊन तू राज्यव्यवस्था बघितलीस. माझ्या प्रिय भगिनी कुंती हिच्या पुत्रांसाठी तू महाभारत घडवलेस. तू एक उत्तम पुत्र, एक उत्तम पिता, बंधू तर झालासच पण एक आदर्श जन्म लोकांसमोर मांडलास. पुत्रा, आज मात्र मी तुझ्यासमोर एक पिता म्हणून माझं दुःख मांडणार आहे. प्रत्येक पित्याची एक सुप्त इच्छा असते की आपण आपल्या पुत्राला मार्गदर्शन करून एक उत्तम व्यक्तीमध्ये त्याचे रूपांतर करावे. आपल्या पुत्राने आपण शकवलेल्या मार्गाचे पालन करताना पाहाणे यासारखे सुख नसते पित्याला. मात्र मी या संपूर्ण जगातील आणि सर्व कालखंडातील एकुलता एक पिता असेन की ज्याला जन्मतःच त्याच्या पुत्राने मार्गदर्शन केले; आयुष्याच्या उत्तरार्धात पुत्राने पित्याचा राज्यभिषेक केला अशी घटना देखील फक्त माझ्याच आयुष्यात घडली असेल. कृष्णा युगानुयुगे तुझं नाव वसुदेव म्हणून गाजेल आणि त्यायोगे माझ्या नावाचा देखील उल्लेख होईल; या विचाराने मला कितीतरी समाधान लाभते. मी एका विश्वव्यापी विधात्याचा पिता म्हणून युगानुयुगे ओळखला जाईन आ विचाराने मी कायम समाधान पावतो. परंतु माझ्या मानत खोल कुठेतरी एक भळभळती जखम आहे रे पुत्रा.... नंदाने जे सुख अनुभवले ते माझ्या वाटेला कधीच आले नाही याचे दुःख घेऊनच मी या जगाचा निरोप घेणार. अंततः इतकेच........ श्रीकृष्णार्पणमसुस्तू!!!"

Friday, October 2, 2020

 मला समजलेली 'द दा विंची कोड' कादंबरी

 मला समजलेली 'द दा विंची कोड' कादंबरी


'द दा विंची कोड' अजित ठाकूर यांनी अनुवादित केलेली आणि मूळ लेखक डॅन ब्राऊन यांनी लिहिलेली एका विचित्र आणि तरीही अर्थपूर्ण घटनांची फोड करणारी कादंबरी. संपूर्ण कादंबरीमध्ये एकमेकांममध्ये गुंतलेल्या आणि लागोपाठ घडणाऱ्या घटना सांगितल्या आहेत. या सर्वच घटना हळूहळू एका अतिप्राचीन आणि अबाधित सत्याकडे बोट दाखवतात.

आपल्याला सर्वसाधारणपणे माहीत असणारे जे विविध धर्म आहेत त्यातलाच एक म्हणजे ख्रिश्चन धर्म. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टितकोणातून बघायचे झाले तर; 'चर्चमध्ये जाऊन येशू ख्रिस्ताची प्रार्थना करतात ते ख्रिश्चन!' मात्र ज्याप्रमाणे आपल्या हिंदू धर्मात अनेक विचार आहेत; आणि आपण सहस्त्र कोटी देवांमधील आपल्याला स्वीकार असणाऱ्या देवाची ज्याप्रमाणे पूजा करतो त्याप्रमाणे ख्रिश्चन धर्मामध्ये देखील 'देवत्व' या संकल्पनेच्या बाबतीत वेगळ्या विचारसरणीचे किंवा प्रार्थना करणारे लोक आहेत.

असेच काही ख्रिश्चन हे 'स्त्री देवते'ला मानणारे देखील आहेत. हे लोक निसर्गाला आणि प्रामुख्याने 'स्त्रियांच्या प्रजननक्षमते'ला पवित्र मानतात आणि त्याची आराधना करतात. अशा लोकांना (#Wicca) विक्का धर्मीय असे देखील म्हंटले जाते. ख्रिश्चन धर्मामध्ये (#whitchcraft) विचक्राफ्ट मानणारे असे हे लोक आहेत असे मानले जाते. (#whitchcraft) विचक्राफ्ट याकडे फारच नकारात्मक दृष्टिकोनातून बघितले जाते. विक्का पंथ येशू ख्रिस्ताच्या जन्मआधी म्हणजेच ख्रिस्त पूर्व हजार एक वर्षांपासून प्रचलित आहे. हे लोक प्रार्थना करताना (#pentacle) पेंटॅकल या चिन्हाचा वापर करतात. (हे चिन्ह चांदणी सारखे दिसते.) दुर्दैवाने या चिन्हाचा वापर 'सैतानाची पूजा' करताना केला जातो ही सर्वसामान्य वंद्यता आहे. मात्र पेंटॅकल म्हणजे (#paganus) पॅगॅनस हा लॅटिनमधला शब्द असून निसर्गपूजेच्या जुन्या पारंपरिक विचारांना मानणाऱ्या लोकांचे हे चिन्ह आहे; असे ही मानतात. साधारणपणे असे निसर्गपूजन करणारे लोक खेडवळ असल्याने आणि अशा अत्यंत आदिवासी किंवा खेडवळ लोकांबद्दल शहरी लोकांच्या मनात एक प्रकारची भीती असल्याने यांना दुष्ट खलनायकी विचाराचे लोक असे समजतात.

ज्यावेळी कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता त्यावेळी केवळ निसर्गाला देव मानण्यात येत होते. त्यावेळी जगाचे केवळ दोन भाग होते. स्त्री आणि पुरुष; आणि स्त्री आणि पुरुष या दोन्ही शक्ती 'सम शक्ती' म्हणून मान्यता पावलेल्या होत्या. (#pentacle) पेंटॅकल चिन्ह म्हणजे जगातील अर्ध्या भागाचे म्हणजे 'स्त्री शक्ती'चे किंवा 'पवित्र स्त्रीत्वाचे' किंवा 'दैवी शक्ती'चे चिन्ह आहे. 'शुक्राची चांदणी' जी (#pentacle) पेंटॅकल प्रमाणे दिसते तिला 'व्हीनस देवते'चे प्रतीक मानली जाते. दुर्दैवाने आजही अनेक परदेशी भयचित्रपटांमधून या चिन्हाचा वापर सैतानी शक्तीशी केला जातो. कदाचित (#Wicca) विक्का पंथाला मानणारे लोक तुलनात्मक संख्येने कमी असतील किंवा ते आदिवासी/अत्यंत खेडवळ असल्याने आपले विचार नीट मांडू शकत नसतील किंवा दुर्दैवाने (#Wicca) विक्का पंथाचे विचार आजच्या ख्रिश्चन सामाजिक मानसिकतेमध्ये स्वीकारार्हय नसतील किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे असेल पण हे चिन्ह बदनाम आहे; हे खरे आहे.

(#Wicca) विक्का प्रमाणेच 'ओपस डाय' म्हणजे परमेश्वराच्या कार्याचा संदेश देणारा पंथ देखील आहे. या पंथाला मानणारे लोक परमेश्वराचे कार्य म्हणजे शुद्धतेची शपथ घेणे, स्वतःच्या उत्पन्नाचा दहा टक्के भाग देवाला देणेे आणि स्वतःला चाबकाचे फटके मारून आणि खिळे टोचून दुःख करून घेणे असे मानतात. स्वतःला दुःख दिल्याने पापशुद्धी होते असे ते मानतात. असे म्हंटले जाते की या पंथाच्या लोकांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी जुनाट मध्ययुगीन आहे. या पंथातील स्त्री कर्मचाऱ्यांना कुठलाही मोबदला न देता पुरुषांचे मठ साफ करायला लावतात. स्त्रिया लाकडी जमिनीवर झोपतात तर पुरुषांना गाड्या असतात. स्त्रियांना स्वतःला जास्तच शारीरिक यातना करून घ्याव्या लागतात. खरे तर स्त्री आणि पुरुष हे निसर्गतःच समान पातळीवर असूनही 'ओपस डाय' पंथाला मानणारे स्त्रीला दुय्यम किंबहुना अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक देतात. सध्याच्या ख्रिश्चन धर्मीय लोकांमध्ये 'ओपस डाय पंथाला मानणारे लोक जास्त असावेत आणि ते विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या हुद्यावर किंवा प्रचंड श्रीमंत असावेत असा कयास आहे. त्यामुळे 'ओपस डाय' पंथ हा आज जास्त प्रमाणात स्वीकारला जातो; असेही म्हणतात.

'द दा विंची कोड' या कादंबरीमध्ये (#Wicca) विक्का आणि 'ओपस डाय' या दोन पंथांमधील विचारसरणी आणि त्यामुळे होणारा संघर्ष सांगितला आहे. (#Wicca) विक्का पंथामधील एका रहस्याचा मागोवा घेणाऱ्या आणि सांकेतिक चिन्हांचा अर्थ शोधणाऱ्या तज्ञाचा रोमांचकारी प्रवास म्हणजे 'द दा विंची कोड'! 'लिओनार्दो दा विंची' या इटालियन महान चित्रकाराने 'लास्ट सप्पर' हे चित्र काढले त्याचा एक वेगळाच अर्थ या कथेमध्ये कल्पित केला आहे. म्हणूनच या कादंबरीचे नाव 'द दा विंची कोड' असे आहे.

प्रामुख्याने (#Wicca) विक्का पंथ हा (#whitchcraft) विचक्राफ्ट म्हणजेच 'सैतानाला मानणारा पंथ' नसून 'स्त्रीत्वाचा आदर' करणारा आणि निसर्गातील समानता राखणाऱ्या 'स्त्री' ला 'देवता' मानणारा ख्रिस्त पूर्व काळातील पंथ आहे; आणि या पंथाला मानणाऱ्या लोकांनी ख्रिस्त पूर्व काळापासून या पंथातील बहिष्कृत देवी 'मेरी मॅगडालीन'च्या अस्थी लपवून ठेवल्या आहेत; असे मानले जाते. येशू ख्रिस्त हा देव नसून 'मर्त्य मानव' होता आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात देखील सर्वसामान्य घटना घडल्या होत्या आणि त्या कहाण्या येशू ख्रिस्ताला 'देव' या संज्ञेमध्ये अडकवण्या अगोदर प्रचलित होत्या. त्या कहाण्यांच्या अनुषंगाने काही पुरावे आणि कागदपत्रे देखील होती. देवी 'मेरी मॅगडालीन'च्या अस्थी आणि ख्रिस्त पूर्व काळातील येशूला 'मर्त्य मानव' म्हणणारे पुरावे आणि कागदपत्रे या सर्वांना सांभाळून ठेवलेल्या जागेच्या खुणेचा 'कोड' चा मागोवा घेणारी आणि त्याअनुषंगाने अंगावर रोमांच उभे करणारी कथा या कादंबरीमध्ये चितारली आहे.

प्रास्ताविकाच्या पहिल्या शब्दापासून सुरू होणारी ही कादंबरी शेवटपर्यंत आपल्याला एका जागी खिळवून ठेवते. जसजसे आपण शेवटाकडे येतो तसे आपल्या लक्षात येते की 'स्त्रीत्व' किती आदरणीय आहे आणि 'प्रजनन शक्ती' बाळगणारी आणि 'निसर्गाचा समतोल सांभाळणारी स्त्री' ही खरोखरच किती आदराची आणि सन्मानाने वागवण्याची व्यक्ती आहे. खरोखरच संपूर्ण जगातील समाजाचे हे दुर्दैव म्हणावे का की या दिव्य शक्तिमधील 'दैवत्वाचा' आदर तर सोडाच पण स्त्रीला अत्यंत अपमानास्पद वागणून देऊन तिला दुय्यम स्थान दिले जाते(?)! 

Friday, September 25, 2020

 'युगंधर' शिवाजी सावंत लिखित कादंबरी

 'युगंधर' शिवाजी सावंत लिखित कादंबरी


शिवाजी सावंत हे सिद्धहस्त कादंबरीकार. 'मृत्युंजय' ही त्यांची कर्णावरील सर्वात जास्त गाजलेली कादंबरी, 'छावा' ही संभाजी राजांवरील कादंबरी, आणि 'युगंधर' ही श्रीकृष्णवरील एक अद्भुत कादंबरी. याव्यतिरिक्त देखील श्रीयुत सावंत यांनी बरेच लेखन केलं आहे. मी आज थोडं 'युगंधर' बद्दल सांगणार आहे.

'श्रीकृष्ण'! या एका व्यक्तिमत्वाबद्दल आपण जितकं लिहू किंवा वाचू तितकं कमीच असं मला नेहेमी वाटतं. खरं सांगू? कधी कधी वाटतं आपण उगाच त्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला देवत्व देऊन आपल्यापासून दूर नेऊन ठेवलं आहे. खरं तर तो आपल्यातलाच एक आहे. त्याने प्रत्येक वयात त्या-त्या वयातल्या टप्प्याचा पूर्ण उपभोग घेतला आहे किंवा फारतर असं म्हणू की प्रत्येक वयात सर्वसामान्य व्यक्तीने कसं वागावं याचा आदर्श ठेवला आहे आपल्यासमोर. कडेकोट बंदोबस्तामध्ये जन्मलेलं देवकी-वसुदेवाचं बाळ संपुर्णपणे आपल्या आई-वडिलांच्या निर्णयावर अवलंबून होतं. नंदराज-यशोदेचा कान्हा बाललीलांमध्ये रमला होता. मोठा होत असताना घरच्या गाई चरायला नेताना त्याने घरची जवाबदारी आपल्या वयाप्रमाणे घ्यावी हे आपल्याला सांगितलं. मथुरेहून कंस मामाचं बोलावणं आलं आणि कृष्णाने नंदनवन सोडलं. त्याचबरोबर बालपणाचा निरागस किसना संपून गेला. त्यानंतरचं श्रीकृष्णाचं आयुष्य म्हणजे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर जगासाठी आदर्शवत राहूनदेखील आकंठ जगणे; असंच आहे. 'युगंधर' मध्ये हेच अत्यंत उत्कृष्ट रितीने सांगितलं आहे. संपूर्ण कादंबरी विविध व्यक्तिरेखांच्या मनाचा मागोवा घेत पुढे सरकते. सुरवातच श्रीकृष्णापासून होते.

श्रीकृष्णाने सुरवातीलाच त्याला 'देव' न मानता आपल्यातलाच एक मानण्यास सांगितलं आहे; आणि त्यानंतर कृष्णाने त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या असण्याचा कार्यकारणभाव मोकळेपणी सांगितला आहे. 'राधा माझी पहिलीच 'स्त्री गुरू' होती'; हे म्हणताना स्त्रीत्वाच्या भाव-भावनांचा अर्थ कृष्णाने सामजावून सांगितला आहे.

श्रीकृष्णच्या मनोगतानंतर त्याची प्रथम पत्नी आणि त्याची खऱ्या अर्थाने जीवनसाथी रुक्मिणीचं मनोगत आपल्या सोमोर येतं. श्रीकृष्णाने खरोखर प्रेम केलं ते रुक्मिणीवर. मात्र पुढे त्याने अजून सात लग्न केली. रुक्मिणीने देखील तिच्या सात सवतींना आपल्या धाकट्या बहिणींप्रमाणे स्वीकारून कायम आदराने वागवलं. कदाचित रुक्मिणीच्या मनाचा हाच वेगळेपणा कृष्णाने ओळखला होता. जांबवती, सत्यभामा, मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, भद्रा आणि कालिंदी या रुक्मिणीनंतर द्वारकेत आलेल्या कृष्ण पत्नी. दोन माता, अष्ट पत्नी, बहीण सुभद्रा, प्रेयसी राधा अशी अनेक स्रीरूपं आयुष्यात असूनही कृष्णाची खरी सखी मात्र कायम यज्ञासेनी राहिली.

'युगंधर'मध्ये रुक्मिणी नंतर एका वेगळ्याच व्यक्तीचं मनोगत आपल्या समोर येतं. ते म्हणजे दारुकाचं! दारूक म्हणजे श्रीकृष्णाचा सारथी. ज्या श्रीकृष्णाने जगाचा रथ हाकला त्याचं सारथ्य करण्याचं भाग्य लाभलेला एक अबोल आणि आयुष्यभर साथ दिलेला जीव. त्याचं मनोगत वाचताना आयुष्याचे वेगळेच पैलू आपल्या सोमर येतात. दारुकानंतर येते ती द्रौपदी. श्रीकृष्ण आणि द्रौपदीचं नातंच शब्दातीत आहे असं मला वाटतं. मला वाटतं द्रौपदीशी हितगुज करणारा कृष्ण आपल्याला नेहेमी सांगायचा प्रयत्न करतो की आयुष्यात कोणताही विचार न करता मनमोकळं बोलण्यासाठी एकतरी सखी/सखा असलाच पाहिजे. द्रौपदी प्रमाणेच एका व्यक्तीवर कृष्णाने मनापासून प्रेम केलं; तो म्हणजे अर्जुन! अर्जुनाचं मनोगत म्हणजे गुरू-शिष्य नात्याचे विविध पदर उलगडून समोर आल्यासारखं आहे. खरं तर महारथी कर्ण हा अर्जुनापेक्षा काकणभर सरसच होता सर्वच बाबतीत... आणि याची श्रीकृष्णाला पूर्ण जाणीव होती. मात्र अंगीचे गुण अयोग्य ठिकाणी वापरले तर काय होतं हे अधोरेखित करण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाचं सारथ्य केलं आणि ज्यावेळी महारथी कर्णाच्या रथाचं चाक जमिनीने गिळंकृत केलं त्यावेळी अर्जुनाला न्याय-अन्याय आणि योग्य-अयोग्य याची महती समजावून देत धनुष्याची प्रत्यंचा खेचण्यास भाग पाडलं. अर्जुनानंतर आपलं मन आपल्यासमोर मोकळं करतो तो सात्यकी. श्रीकृष्णाच्या अफाट मोठ्या सेनेचा सेनापती आणि कृष्णाचा आयुष्याच्या शेवटापर्यंत असलेला सोबती. सर्वात शेवटी आपल्यासमोर येतो तो उद्धव! मी श्रीकृष्णाचा 'भावविश्वस्त' होतो; या उद्धवाच्या एकाच वाक्यात त्याचं आणि श्रीकृष्णाचं नातं अधोरेखित होतं.

'युगंधर' म्हणजे श्रीकृष्णाचं आपल्यातलाच एक असणं! 'युगंधर' म्हणजे न्यायप्रविण, उत्तम राजकारणी, आपल्या भावनांवर विजय मिळवूनही अत्यंत भावुक असणाऱ्या त्या आकाशायेवढ्या महानायकाचं 'देवत्व' त्यागून मानवात वावरणं!!!

'युगंधर' एकदा तरी नक्की वाचावी अशी कादंबरी! श्रीकृष्णार्पणमस्तु!





Friday, September 18, 2020

 'स्वामी' रणजित देसाई लिखित

 'स्वामी' रणजित देसाई लिखित 


मला खात्री आहे की 'स्वामी' कादंबरी आपल्यापैकी अनेकांनी अनेकवेळा वाचली असेल. मी देखील ही कादंबरी अनेक वेळा वाचली आहे. आज 'स्वामी' बद्दल लिहायचंच असं ठरवून गेले काही दिवस निवांतपणे वाचत असलेली ही कादंबरी आजचं संपवली. या कादंबरीने माझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मला वेगवेगळी सत्य सांगितली. त्यामुळे या कादंबरीमध्ये काय आहे हे सांगण्यापेक्षा मला माझ्या वाढत्या आयुष्यात या कादंबरीने काय दिलं ते सांगायला जास्त आवडेल.

मी पहिल्यांदा 'स्वामी' कादंबरी वाचली तेव्हा मी साधारण सतरा-अठरा वर्षांची होते. त्यामुळे त्यावेळी मला या कादंबरीमधले फक्त रमा-माधवच दिसले. त्यांचं एकमेकांविषयीचं प्रेम, आदर खूप भावून गेला मला. माधवराव पेशव्यांना पेशवाईच्या जवाबदरीमुळे रमेला वेळ देता येत नसे; त्याचा सल त्यांच्या मनात कायम होता. मात्र त्यांनी तो सल रमाबाईंकडे कधी मोकळेपणी बोलून नाही दाखवला. संपूर्ण कादंबरीमध्ये माधवराव मोकळेपणी रमाबाईंशी बोलले असतील तर त्यांच्या शेवटच्या थेऊरच्या वास्तव्याच्या वेळी. आजही त्यादोघांचे संभाषण वाचताना डोळे भरून येतात. वयाच्या सोळाव्या वर्षी माधवरावांनी पेशवाईची वस्त्र धारण केली; आणि केवळ अकरा वर्षात; वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी; त्यांचे देहावसान झाले. या अकरा वर्षात त्यांनी अनेक स्वाऱ्या-मोहिमा केल्या. त्यामुळे संपूर्ण तारुण्य रमाबाईंनी शनिवारवाड्यात माधवरावांची वाट पाहण्यात घालवलं. त्यांना माधवरावांचा खरा सहवास लाभला तो त्यांच्या शेवटच्या काही दिवसांचा; थेऊरच्या वास्तव्याच्या वेळी....... मात्र माधवरावांना रमाबाईंचा सहवास त्यांच्या मृत्यूनंतर देखील लाभला. रमा-माधवाचं प्रेम शब्दातीत होतं हेच खरं. खरा संसार असा दोघांनी केलाच नाही आणि तरीही एकमेकांमध्ये गुंतलेलं त्यांचं मन मृत्यूला देखील वेगळं करता आलं नाही.

लग्नानंतर परत एकदा 'स्वामी' हातात घेतली. त्यावेळी संपूर्ण कादंबरीमधील एक प्रसंग आयुष्यभराचं सार शिकवून गेला. माधवरावांनी राघोबादादांना शनिवारवाड्यावर नजरकैदेत ठेवले होते. राघोबादादा तेथून पळून जात असताना पकडले गेले. त्यावेळी माधवराव थेऊरला त्यांच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये राहण्यास गेले होते. पकडलेल्या राघोबादादांना माधवरावांसमोर पेश केले. त्यावेळी माधवरावांनी हताशपणे राघोबादादांना पेशवाईची वस्त्रे बहाल केली. त्यावेळी डोळ्यात पाणी आणून राघोबादादांनी माधवरावांना म्हंटले की त्यांच्या पदरचे लोक त्यांचे कान भरतात आणि त्या तिरिमिरीमध्ये राघोबादादा चुकीचे निर्णय घेत मराठेशाहीशी बंड करतात.... त्यावेळी माधवरावांनी दिलेले उत्तर आपण सर्वांनीच आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखे आहे... ते म्हणाले... आमच्या पदरीही सारे योग्य सल्ला देणारे आहेत, असं नाही.... अक्कल शाबूत ठेवायची ती आम्ही. थोडक्यात सांगायचे तर कोणीही काहीही सांगितले तरी कोणावर विश्वास ठेवायचा आणि आयुष्यतले निर्णय स्थिर बुद्धीने घ्यायचे हे आपण समजून घेतले पाहिजे.

त्यानंतर माझ्या दोन्ही लेकींच्या जन्मानंतर कधीतरी परत एकदा 'स्वामी' हातात घेतली आणि माझ्याही नकळत त्यावेळी देखील झापटल्यासारखी वाचून संपवली. यावेळी जाणवलं ते जेमतेम सोळाव्या वर्षी पेशवेपद स्वीकारून माधवरावांनी सावरलेली कर्जबाजारी पेशवाई. हलक्या कानांच्या काकांच्या बंडखोरीचा आयुष्यभर सोसलेला त्रास; कठोर निर्णयामुळे दुरावलेला मातोश्रींचा सहवास; सततच्या लढाया आणि मोहिमांमुळे पेशवाईवर झालेलं कर्ज या माधरावांच्या पेशवे पदाच्या काळातील अडचणी अगदी अंगावर आल्या. माझ्या वयाच्या जेमतेम चोविसाव्या वर्षी माझ्या पदरात माझ्या लाडक्या दोन लेकी होत्या. त्यावयात देखील त्या दोघींचे शिक्षण; शालेय शिक्षणाव्यतिरिक्त काय शिकवावं; त्यांचं व्यक्तिमत्व परिपूर्ण व्हावं यासाठी काय आणि कसं करावं हेच विचार मनात घोळायचे. 'स्वामी' वाचताना सतत जाणवलं की माधवरावांनी केवळ आणि केवळ मराठी साम्राज्याचा विचार केला ते या साम्राज्याला पुत्रवत मानलं म्हणूनच.

नंतर कधीतरी एकदा पुन्हा ही कादंबरी हातात आली. यावेळी ती अगदी तब्बेतीत वाचली. प्रत्येक प्रसंग जगण्याचा प्रयत्न केला आणि खरं सांगू? जगले देखील. यावेळच्या वाचनात एक मात्र प्रकर्षाने जाणवलं; आपल्याला तो काळ कधीच उमजणार नाही.... पेशवाईच्या काळातील अनेक धारावाईक आणि सिनेमे आपण सर्वांनी बघितले आहेत. तरीही ही कादंबरी वाचताना मनात येत होतं की त्यावेळचं पुणं.... तेथील सर्वसामान्य जनजीवन.... राजकीय स्थैर्य-अस्थैर्य... याची खरी कल्पना आपण या धारावाईक किंवा सिनेमांमधून करूच शकत नाही. मात्र तरीही या दृक्श्राव्य माध्यमांमुळे आपला उज्वल इतिहास किमान थोड्याफार प्रमाणात आपल्यापर्यंत आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतो आहे; याचं समाधान आहे.

..... आणि आज जेव्हा ही कादंबरी पुन्हा एकदा वाचली त्यावेळी मनापासून भावलेला भाग तुम्हाला सांगितल्याशिवाय राहावंत नाही आहे......

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ #yogiaditynath यांनी आग्र्यामधील #agra मुघल म्युझियमला #mughalmuseum छत्रपती शिवाजी माहाराजांचे #chatrapatishivajimaharaj नाव देण्याचे घोषित केले आहे. यावेळी त्यांनी म्हंटले आहे की 'हम सबके नायक शिवाजी माहाराज हैं!' किती सत्यता आहे या एका वाक्यात. आपल्यापैकी कितीजणांना माहीत आहे की मराठ्यांची सत्ता केवळ माहाराष्ट्रपुर्ती मर्यादित नव्हती; तर दिल्लीच्या तक्तापासून ते पार कर्नाटकापर्यंत मराठा साम्राज्य पसरलेले होते. माधवराव पेशव्यांनी निजामाला हरवून शरणागती पत्करायला लावली होती; आणि त्यानंतर त्याला सौहार्दपूर्ण वागणूक देत त्याच्याशी मैत्री करून मराठा साम्राज्याचा एक शत्रू कायमचा संपवून टाकला होता. हैदराचा कायमचा बंदोबस्त केला होता. पेशवाईचा कारभार मार्गी लावत असताना माधवरावांचा आजार बळावला. मात्र त्या आजारात देखील त्यांनी दख्खन स्वारीवर आपले खंदे मुत्सद्दी वीर पाठवून त्यांच्याकरवी तेथे विजय मिळवला. माधवराव पेशव्यांच्या शेवटच्या काही दिवसात दक्खन स्वारीवरील वीरांनी दिल्लीपतीला सिंहासनस्थ केले. म्हणजेच मराठ्यांच्या मदतीमुळेच केवळ दिल्लीमधील मुघलांचे राज्य टिकले. मराठ्यांचे मांडलिक होणे मान्य करून त्यांनी दिल्ली राखली. आपल्याला सगळ्यांना पेशव्यांचा आणि पर्यायाने मराठी साम्राज्याचा पानिपतचा पराजयच केवळ माहीत आहे. मराठ्यांच्या पराभवामुळे पेशवाईला लागलेले पानिपताचे गालबोट देखील या स्वारीत पुसले गेले. याची इतिहासात ठळक नोंद नाही.... किंवा खेदाने म्हणावे लागते आहे की या विजयाची नोंद सर्वसामान्य लोकांच्या सहज वाचनात येईल असा प्रयत्न आपल्या इतिहासकारांनी केला नाही. दुर्दैवाने आपल्याला माहीत असणारा इतिहास हा भारतावर इंग्रजांच्या अगोदर मुघलांचे राज्य होते; हाच आहे. मात्र मराठेशाही.... मराठा साम्राज्य.... उत्तरेपासून ते थेट दक्षिणेपर्यंत पसरले होते; हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे.

मुघलांना नमवणाऱ्या त्या दूरदृष्टी लाभलेल्या जनतेच्या राजाचे छत्रपतींचे नाव आजवर मुघल नाव वागवणाऱ्या संग्रहालयाला देण्याचा निर्णय घेऊन योगी आदित्यनाथ यांनी मराठा साम्राज्याचा इतिहास सर्वांनी परत एकदा समजून घ्यावा हे सांगितले आहे असे मला वाटते.

आज पुन्हा एकदा 'स्वामी' कादंबरी वाचून संपवताना या कादंबरी मधील रमा-माधवाचं प्रेम; माधवरावांची दूरदृष्टी; सार्वभौम भारतामध्ये बसवला गेलेला पेशवाईचा अंमल... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मराठा साम्राज्याचा आवाका नजरेसमोर आला आणि खूप खूप समाधान वाटलं.


Friday, September 11, 2020

विश्वस्त' वसंत वसंत लिमये लिखित कादंबरी





 

विश्वस्त' वसंत वसंत लिमये लिखित कादंबरी

विश्वस्त. श्रीकृष्णाच्या अस्तित्वाचा ठसा!

महाभारताचा काळ! आपल्या पुराणकथा की आपला इतिहास?

याच महाभारत काळातील माझं - किंबहुना अनेकांचं आवडतं व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीकृष्ण! तो अनादि-अनंत, तो सर्वत्र-समावेशक, कर्ता-करविता. तो निर्गुण-सगुण, निर्मोही. मात्र त्याचं अस्तित्व मोहमयी! देवत्व असूनही आपल्यातलाच एक असा! तो व्यावहारिक, हिशोबी, बेरकी आणि तो द्रष्टाही! म्हणूनच कदाचित स्वतःच्या मानव असण्याचा आणि मानवी मर्यादांचा त्याने कायम स्वीकार केला. त्याच श्रीकृष्णाच्या असीम दूरदृष्टीची कथा म्हणजे वसंत वसंत लिमये लिखित 'विश्वस्त'! श्रीकृष्णाच्या बालपणाचा काळ, तारुण्य, त्याचं प्रौढत्व, त्याची सुजाण बुद्धी याबद्दल आपण खूप वाचलं आहे. मात्र ‘विश्वस्त’च्या निमित्ताने आपल्याला कृष्ण नावाच्या मानवाचा वृद्धापकाळ समोर येतो. आपल्या वारसदारांचा होणारा र्‍हास याचि देही याचि डोळा पाहात असतानादेखील पुढच्या अनादि-अनंत काळातील आपल्या पिढ्यांसाठी त्या द्रष्ट्या पुरुषाने करून ठेवलेली तजवीज म्हणजे ‘विश्वस्त’!


c26d6f64095649329af6d96da7918602

ही कादंबरी अनेक दिवस डोळ्यासमोर ठेवली होती. पण वाचायचा मुहूर्त लागत नव्हता. ५२३ पानं असल्याने कसा वेळ मिळेल असं सारखं वाटत होतं. पण मिसळपाववरील दिवाळी अंकाचं आवाहन वाचलं आणि ठरवलं - 'विश्वस्त'चं रसग्रहण लिहायचं. मग लगेच पुस्तक हातात घेतलं आणि तीन दिवसात, किंबहुना तीन रात्रींत वाचून संपवलं. त्या तिन्ही रात्री मी एका वेगळ्याच जगात होते. तो श्रीकृष्णाचा काळ होता.... चाणक्याचा काळ होता.... आणि तरीही वर्तमानाचं पूर्ण भान होतं. श्रीकृष्ण आणि पर्यायाने महाभारत काळ म्हणजे आपल्या 'पौराणिक कथा' असं आजवर मी मानत आले. मात्र त्या विचारालाच या कादंबरीने धक्का दिला आहे. चाणक्य काळ आपण आपला इतिहास आहे असंच मानतो. त्यापूर्वीदेखील आपला इतिहास होताच नं? तो काय होता? याचा विचार करायला लावणारं पुस्तक म्हणजे 'विश्वस्त'! साध्या सरळ शब्दात विश्वस्त म्हणजे संचिताचा 'सांभाळ करणारा' आणि योग्य व्यक्तीस किंवा योग्य वेळेस पुढे सुपुर्द करणारा. हा सांभाळ करण्याचा काळ ज्या वेळी खूप मोठा होतो आणि योग्य व्यक्ती किंवा योग्य वेळ किंवा योग्य समाजव्यवस्था जोपर्यंत प्राप्त होत नाही, तोपर्यंत सांभाळ करता करताच त्याला वारसदारदेखील व्हावं लागतं, याची उकल करून सांगणारं पुस्तक म्हणजे 'विश्वस्त'!

लेखकाने स्पष्ट शब्दात म्हटलं आहे - कल्पित आणि सत्य यांच्यामधल्या पुसट, धूसर सीमारेषांवर आट्यापाट्या खेळणारी नाट्यपूर्ण, वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकाला खेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी कादंबरी... आणि तरीही ही एक कल्पित कथा नसून संपूर्ण सत्यकथन आहे असं आपल्याला प्रत्येक क्षणी वाटत राहतं. यातील अनेक प्रसंग आणि अनेक दाखले आपल्याला खिळवून ठेवतात. आजच्या अगदी पाच-सात वर्षांपूर्वीचे दाखले जसे यात आहेत, तसेच महाभारत काळातले आणि चाणक्य काळातलेदेखील दाखले आहेत.

एक कथा म्हणून विश्वस्त कशी आहे हे प्रत्येक वाचकाचं वैयक्तिक मत असू शकतं. पण या कादंबरीची खासियत ही की ती आपल्याला विचारात पाडते. काय असेल आपला खरा इतिहास? असं म्हणतात की आपण जो वाचतो किंवा ऐकतो, तो जेत्याचा इतिहास असतो. मग असं तर नाही की आपण इंग्रजांनी सांगितलेल्या आणि लिहिलेल्या कथनाला आपला इतिहास मानतो? हिंदू हा धर्म नसून सिंधू, सरस्वती नद्यांच्या किनारी उगम पावलेली आणि पुढे संपूर्ण आर्यवर्तात पसरलेली ही एक सारस्वत संस्कृती आहे. म्हणूनच कदाचित इतर धर्म (की पंथ?) यांचे प्रेषित किंवा स्थापनकर्ते आपल्याला माहीत आहेत. मात्र हिंदू धर्म यांनी स्थापन केला असा संदर्भ कधी माझ्या वाचनात आला नाही. पूर्वी लिखित साहित्यापेक्षा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक माध्यमातून ऐतिहासिक सत्य सांगितलं जायचं. दुर्दैवाने एखादी शृंखला ढळली तरी त्यामुळे आपल्या इतिहासाचं केवढं तरी नुकसान झालं असेल. ‘विश्वस्त’मध्ये आपल्या इतिहासाची आणि पुराणांची खूप रोचक सांगड घातलेली आहे.

या कादंबरीमध्ये अनेक ठिकाणांची ऐतिहासिक किंवा पौराणिक दाखले देत गुंफण केली आहे. मुंबई, नालासोपारा, दापोली ते अगदी द्वारका आणि सोमनाथ मंदिर असा आपला वारसा इतका सुंदर रितीने समोर येतो की एकदा हातात घेतलेली ही कादंबरी संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटतच नाही. तर, 'विश्वस्त' ही एक वाचायलाच हवी अशी कादंबरी आहे; हे सांगणे नलगे!

P-20170521-103302

***

माझ्या मनात गेली अनेक वर्षं येत आहे की आपल्या मुंबईला एक वलयांकित इतिहास आहे. तो आपण समजून घेतला पाहिजे. या कादंबरीच्या निमित्ताने 'जरा हटके, जरा बचके' अशा या 'मुंबई मेरी जान'मधील ऐतिहासिक संदर्भ आणि खदाडीसाठीच्या काही जागा मला समजल्या, त्या आपल्यासमोर या लेखाच्या निमित्ताने मांडते आहे.

खादाडी :

१. लीलावती हॉस्पिटलसमोरील चिंचोळ्या गल्लीमधील 'जमवा आओजी' हे खास पार्शी हॉटेल. 'आकुरी' खास पार्शी पद्धतीची मसालेदार अंडाभुर्जी.

२. नागीनदास मास्टर रोड, फोर्ट येथील 'कॅफे मिलिटरी'. मटण कटलेट ग्रेव्ही आणि सली बोटी.

३. मेट्रोजवळील 'कयानी' इराणी रेस्टॉरंट

४. याझदानी बेकरी, फोर्ट. ब्रून मस्का पाव. आजही या बेकरीमध्ये लाकडावर आणि कोळशावर चालणारी पारंपरिक भट्टी आहे. जिंजर बिस्किट्स आणि अ‍ॅपल पायदेखील खास.

ऐतिहासिक मागोवा :

१. जीपीओ परिसरातील जमिनीखाली सापडलेलं भुयार (कामा हॉस्पिटल, मिडल ग्राउंड आणि ऑईस्टर रॉक ही मूळ मुंबई येते आणि मलबार हिल अशा दक्षिण मुंबईतील विविध भागात भुयारी मार्ग असू शकतात.)

२. आत्ताचं वेस्टर्न नेव्हल कमांडचं हेडक्वार्टर, फोर्ट भागात ज्या ठिकाणी आहे, त्याचं मूळचं नाव ‘कॅसा डी ओरटा’ ( Casa da Orta) म्हणजेच बाँबे कॅसल.

३. एलिफंटा केव्हज म्हणजेच घारापुरीची लेणी (सहाव्या शतकातील निर्मिती)
जवाहरद्वीप म्हणजेच 'बुचर आयलंड', 'मिडल ग्राउंड' आणि 'ऑईस्टर रॉक' बेटं मुंबईच्या इतिहासाची शान अजूनही जपतात.

४. तेराव्या शतकातील राजा भीमदेव याची राजधानी महिकावती म्हणजे आजचं माहीम.

५. फोर्ट भागात सहज फिरलं तरी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस बांधलेल्या 'निओ गॉथिक' आणि 'आर्ट डेको' अशा शैलीत बांधलेल्या अनेक इमारती दिसतात.

६. वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव (जबरेश्वर मंदिराच्या कोपऱ्यावर उजवीकडील चिंचोळी गल्ली)

७. ओल्ड कोर्ट हाऊस ते आझाद मैदान, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल ते कामा हॉस्पिटल, मिडल ग्राउंड ते जी.पी.ओ., मिडल ग्राउंड ते ऑईस्टर रॉक, सेंट जॉर्ज फोर्ट ते सेंट जॉर्जेस हॉस्पिटल
(कदाचित मुंबईच्या या ऐतिहासिक वास्तूंना जोडणारी भुयारं असू शकतील)

८. बाँबे कॅसलच्या ईशान्य टोकाकडे सेंट जॉर्ज फोर्ट (सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो रोड) होता. तेथे दारूगोळ्याचं कोठार होतं. आता तिथे महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व खात्याचं ऑफिस आहे.


श्रेयनिर्देश : प्रकाशचित्रं श्री. वसंत वसंत लिमये ह्यांजकडून


पुस्तकाचे नाव: विश्वस्त
लेखक: वसंत वसंत लिमये
प्रकाशक: राजहंस प्रकाशन ( प्रथम प्रकाशन १ जानेवारी २०१७)
ISBN 8174349995 (ISBN13: 9788174349996)


Friday, September 4, 2020

एक प्याला स्त्रीजन्माचा (कविता)

 एक प्याला स्त्रीजन्माचा


पुढील जन्मी पुन्हा फिरुनी
लाभू दे मज जन्म स्त्रीयेचा
या जन्मी जे राहील जगणे
आकंठुन रस प्रशिन मी त्याचा

नसेन दश भुजा काली मी
किंवा मखरातील कोणी देवी
सर्वव्यापी मानव ज्योत ती
अंतरी ठेवीन माझ्या तेवती

थोडे जगणे स्वतःसाठी अन्
मग थोडा विचार इतरांचा 
वैचारिक-सामाजिक बेडीला
झुगारून स्वीकारी स्वच्छंदाला

सन्मानाचा-सुंदर-तृप्त जन्म
या जन्मी लाभला मला हा
मागून घेईन त्या आत्मशक्तीतून
एक प्याला परत स्त्रीजन्माचा