'युगंधर' शिवाजी सावंत लिखित कादंबरी
शिवाजी सावंत हे सिद्धहस्त कादंबरीकार. 'मृत्युंजय' ही त्यांची कर्णावरील सर्वात जास्त गाजलेली कादंबरी, 'छावा' ही संभाजी राजांवरील कादंबरी, आणि 'युगंधर' ही श्रीकृष्णवरील एक अद्भुत कादंबरी. याव्यतिरिक्त देखील श्रीयुत सावंत यांनी बरेच लेखन केलं आहे. मी आज थोडं 'युगंधर' बद्दल सांगणार आहे.
'श्रीकृष्ण'! या एका व्यक्तिमत्वाबद्दल आपण जितकं लिहू किंवा वाचू तितकं कमीच असं मला नेहेमी वाटतं. खरं सांगू? कधी कधी वाटतं आपण उगाच त्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला देवत्व देऊन आपल्यापासून दूर नेऊन ठेवलं आहे. खरं तर तो आपल्यातलाच एक आहे. त्याने प्रत्येक वयात त्या-त्या वयातल्या टप्प्याचा पूर्ण उपभोग घेतला आहे किंवा फारतर असं म्हणू की प्रत्येक वयात सर्वसामान्य व्यक्तीने कसं वागावं याचा आदर्श ठेवला आहे आपल्यासमोर. कडेकोट बंदोबस्तामध्ये जन्मलेलं देवकी-वसुदेवाचं बाळ संपुर्णपणे आपल्या आई-वडिलांच्या निर्णयावर अवलंबून होतं. नंदराज-यशोदेचा कान्हा बाललीलांमध्ये रमला होता. मोठा होत असताना घरच्या गाई चरायला नेताना त्याने घरची जवाबदारी आपल्या वयाप्रमाणे घ्यावी हे आपल्याला सांगितलं. मथुरेहून कंस मामाचं बोलावणं आलं आणि कृष्णाने नंदनवन सोडलं. त्याचबरोबर बालपणाचा निरागस किसना संपून गेला. त्यानंतरचं श्रीकृष्णाचं आयुष्य म्हणजे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर जगासाठी आदर्शवत राहूनदेखील आकंठ जगणे; असंच आहे. 'युगंधर' मध्ये हेच अत्यंत उत्कृष्ट रितीने सांगितलं आहे. संपूर्ण कादंबरी विविध व्यक्तिरेखांच्या मनाचा मागोवा घेत पुढे सरकते. सुरवातच श्रीकृष्णापासून होते.
श्रीकृष्णाने सुरवातीलाच त्याला 'देव' न मानता आपल्यातलाच एक मानण्यास सांगितलं आहे; आणि त्यानंतर कृष्णाने त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या असण्याचा कार्यकारणभाव मोकळेपणी सांगितला आहे. 'राधा माझी पहिलीच 'स्त्री गुरू' होती'; हे म्हणताना स्त्रीत्वाच्या भाव-भावनांचा अर्थ कृष्णाने सामजावून सांगितला आहे.
श्रीकृष्णच्या मनोगतानंतर त्याची प्रथम पत्नी आणि त्याची खऱ्या अर्थाने जीवनसाथी रुक्मिणीचं मनोगत आपल्या सोमोर येतं. श्रीकृष्णाने खरोखर प्रेम केलं ते रुक्मिणीवर. मात्र पुढे त्याने अजून सात लग्न केली. रुक्मिणीने देखील तिच्या सात सवतींना आपल्या धाकट्या बहिणींप्रमाणे स्वीकारून कायम आदराने वागवलं. कदाचित रुक्मिणीच्या मनाचा हाच वेगळेपणा कृष्णाने ओळखला होता. जांबवती, सत्यभामा, मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, भद्रा आणि कालिंदी या रुक्मिणीनंतर द्वारकेत आलेल्या कृष्ण पत्नी. दोन माता, अष्ट पत्नी, बहीण सुभद्रा, प्रेयसी राधा अशी अनेक स्रीरूपं आयुष्यात असूनही कृष्णाची खरी सखी मात्र कायम यज्ञासेनी राहिली.
'युगंधर'मध्ये रुक्मिणी नंतर एका वेगळ्याच व्यक्तीचं मनोगत आपल्या समोर येतं. ते म्हणजे दारुकाचं! दारूक म्हणजे श्रीकृष्णाचा सारथी. ज्या श्रीकृष्णाने जगाचा रथ हाकला त्याचं सारथ्य करण्याचं भाग्य लाभलेला एक अबोल आणि आयुष्यभर साथ दिलेला जीव. त्याचं मनोगत वाचताना आयुष्याचे वेगळेच पैलू आपल्या सोमर येतात. दारुकानंतर येते ती द्रौपदी. श्रीकृष्ण आणि द्रौपदीचं नातंच शब्दातीत आहे असं मला वाटतं. मला वाटतं द्रौपदीशी हितगुज करणारा कृष्ण आपल्याला नेहेमी सांगायचा प्रयत्न करतो की आयुष्यात कोणताही विचार न करता मनमोकळं बोलण्यासाठी एकतरी सखी/सखा असलाच पाहिजे. द्रौपदी प्रमाणेच एका व्यक्तीवर कृष्णाने मनापासून प्रेम केलं; तो म्हणजे अर्जुन! अर्जुनाचं मनोगत म्हणजे गुरू-शिष्य नात्याचे विविध पदर उलगडून समोर आल्यासारखं आहे. खरं तर महारथी कर्ण हा अर्जुनापेक्षा काकणभर सरसच होता सर्वच बाबतीत... आणि याची श्रीकृष्णाला पूर्ण जाणीव होती. मात्र अंगीचे गुण अयोग्य ठिकाणी वापरले तर काय होतं हे अधोरेखित करण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाचं सारथ्य केलं आणि ज्यावेळी महारथी कर्णाच्या रथाचं चाक जमिनीने गिळंकृत केलं त्यावेळी अर्जुनाला न्याय-अन्याय आणि योग्य-अयोग्य याची महती समजावून देत धनुष्याची प्रत्यंचा खेचण्यास भाग पाडलं. अर्जुनानंतर आपलं मन आपल्यासमोर मोकळं करतो तो सात्यकी. श्रीकृष्णाच्या अफाट मोठ्या सेनेचा सेनापती आणि कृष्णाचा आयुष्याच्या शेवटापर्यंत असलेला सोबती. सर्वात शेवटी आपल्यासमोर येतो तो उद्धव! मी श्रीकृष्णाचा 'भावविश्वस्त' होतो; या उद्धवाच्या एकाच वाक्यात त्याचं आणि श्रीकृष्णाचं नातं अधोरेखित होतं.
'युगंधर' म्हणजे श्रीकृष्णाचं आपल्यातलाच एक असणं! 'युगंधर' म्हणजे न्यायप्रविण, उत्तम राजकारणी, आपल्या भावनांवर विजय मिळवूनही अत्यंत भावुक असणाऱ्या त्या आकाशायेवढ्या महानायकाचं 'देवत्व' त्यागून मानवात वावरणं!!!
'युगंधर' एकदा तरी नक्की वाचावी अशी कादंबरी! श्रीकृष्णार्पणमस्तु!
No comments:
Post a Comment