श्रीकृष्ण - नंदबाबा
तो : बाबा....
नंदबाबा : कान्हा, आज मथुरेचे राजमंत्री अक्रूर आले म्हणून नाही; तर तू गोकुळात आलास त्याक्षणापासून मला माहीत होतं की तू काही इथे फार काळ राहणार नाहीस. जसं तुझं येणं एक दैवी संकेत होता; तुझं गोकुळात असणं एक संकेत होता.....
तो : माझं गोकुळात असणं एक संकेत? बाबा!
नंदबाबा : हो माझ्या प्रिय पुत्रा... तू येण्याअगोदर गोकुळातील सर्व दही-दुभतं मथुरेत जात होतं. आम्ही कधीच इथल्या बालगोपाळांना धष्टपुष्ट करण्याचा विचार केला नव्हता. गुरांना राखणं आणि दुसऱ्यांसाठी दूध-दुभतं तयार करून विकणं इतकाच इथल्या लोकांचा दृष्टिकोन होता. तू आलास आणि प्रत्येक घरातील दही-लोणी चोरून बाळ-गोपाळांना दिलंस. आपल्या मुलांची तब्बेत अचानक चांगली कशी होते आहे याचा विचार करण्यास गोकुळवासीयांना भाग पाडलंस. शरीर संपदा सर्वात मोठी ठेव असल्याचं तुझ्या कृतीतून तू दाखवून दिलंस. आजचा धष्टपुष्ट झालेला गोकुळ कुमार आयुष्यभर तुझा ऋणी राहील आणि उद्या कोणत्याही युद्धात तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहील हे नक्की.
तो : पण गोकुळातील कुमार युद्ध का करेल बाबा?
नंदबाबा : (मंद स्मित करीत) गवळी नाही रे युद्ध करणार. पण हा माझ्या समोर उभा असलेला आठ वर्षांचा बालक ज्यावेळी भविष्यात एक कर्मयोगी योद्धा होऊन एक मोठा निर्णय घेईल आणि पुढील अनेक युगांना तत्वनिष्ठित आयुष्याचे धडे सांगण्यासाठी सत्य-असत्याचे युद्ध घडवून आणेल त्यावेळी त्याच्या सोबत त्याची शक्ती म्हणून हेच दही-लोणी चोर गोकुलकुमार उभे राहातील; याची मला खात्री आहे; आणि हाच तुझ्या गोकुळात येण्याचा संकेत आहे.
तो आठ वर्षांचा बालक काहीसं गूढ हसला आणि म्हणाला : बाबा, तुम्ही कधीही इतकं मोकळेपणी बोलला नाहीत. मग आजच का?
नंदबाबा : आज का? कारण तुझं गोकुळात येणं आणि राहाणं जसा एक संकेत होता तद्ववत तुझं उद्या गोकुळ सोडून कायमचं जाणं हे अबाधित सत्य आहे; हे माहीत असूनही तू जाऊ नयेस असं माझं मन मला सांगतं आहे. गोपाला, मला हे सगळं माहीत होतं. कसं ते विचारू नकोस; मात्र ही गोष्ट मी यशोदेला कधीच सांगितली नाही. तुझं आमच्या सोबत असणं किमान तिने तरी मनसोक्त उपभोगावं असं मला कायम वाटलं. पण आत्ता तिची जी अवस्था झाली आहे ती पाहून मात्र माझं चुकलं की काय असं मला वाटायला लागलं आहे. अजूनही तिचं मला हेच सांगणं आहे की मल्लक्रीडेसाठी माझा कान्हा लहान आहे; अजून एक-दोन वर्षांनंतर त्याला आपण पाठवू. तिला वेडीला हे कळलेलंच नाही की तिचा कान्हा... तिचा मोहन.... तिला सोडून कायमचा जातो आहे.... केवळ मल्लक्रीडेसाठी इतक्या लहान वयात बोलावणं आलेलं समजल्यावर तिची झालेली अवस्था; तू कायमचा जाणार हे कळल्यावर काय होईल याची मला कल्पना देखील करवत नाही रे! मोहना तू तुझ्या इथल्या वास्तव्याने आम्हा गोकुळवासियांना युगानुयुगांसाठी पावन करून टाकलं आहेस. तुझा निरागस सहवास जो आम्हाला मिळाला आहे तो कधीच कोणालाही मिळणार नाही. हे भाग्य फक्त आणि फक्त गोकुळवासीयांचं आहे हे मान्य; पण तरीही तुझं जाणं... कन्हैया... नको रे जाऊस.
तो : बाबा, सर्वकाही समजून देखील तुम्हीच जर असं म्हणाल तर यशोदा माता, रोहिणी माता आणि वेड्या गोकुळाला कोण सांभाळणार?
नंदबाबा : माझ्यात ती ताकद नाहीच रे मोहना. या आठ वर्षात तुझं रूप हृदयात साठवण्याव्यतिरिक्त मी काही केलेलं नाही. त्यामुळे यासर्वांची समजून काढून तुझं जाणं.... कायमच जाणं.... त्यांना स्वीकारायला लावण्याची जवाबदारी तुलाच घ्यावी लागणार आहे. केवळ तुझी यशोदा माता आणि रोहिणी माताच नाही तर तुझ्या प्रेमात वेडी झालेली राधा... तिला तुझ्या व्यतिरिक्त कोण सांभाळू शकेल रे.
तो : बाबा.... तुम्ही राधेबद्दल...
नंदबाबा : अरे मीच का.... संपूर्ण गोकुळ जाणून आहे. जिथे तिच्या पतीने; अनयने; तिला जशी आहे तशी स्वीकारली आहे तर मग इतर कोणीही काय बोलावं? मथुरेचे राजमंत्री आल्याची खबर हळूहळू गोकुळामध्ये पसरायला लागली आहे. ते कशासाठी आले आहेत हे समजून घेण्यासाठी या वेड्या गवळ्यांची रांग लागली आहे आपल्या वाड्याच्या दिशेने. तुझ्या तक्रारी सांगण्याच्या निमित्ताने सतत तुला कवटाळण्यासाठी येणाऱ्या गोपीदेखील राजमंत्री अक्रूर आल्यापासून माजघरात गर्दी करून आहेत. मग एकटी राधाच कशी लांब राहील? तिला तुझ्याव्यतिरिक्त कोणीही ही परिस्थिती समजावू शकेल का? मोहना, तुझं शारीरिक वय आठ वर्षे आहे. मात्र तू....
कानांवर हात ठेवत नंदबाबांना थांबवत तो म्हणाला : नको बाबा. किमान तुम्ही तरी असं बोलू नका.
नंदबाबा : (खिन्नपणे हसत) मी न बोलल्याने सत्य तर लपणार नाही ना कृष्णा? तू जगदनियंता आहेस. अनादिकालापासून तुझं अस्तित्व या विश्वाला व्यापून राहिलेलं आहे! तुझ्या लीला अगाध आहेत आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या आकलनाच्या पलीकडच्या आहेत. हे सत्य मी स्वीकारलं आहे.
एकवार काहीशा खिन्न नजरेने आपल्या प्रिय वडिलांकडे बघत तो मनमोहन बाहेर जाण्यास वळला. नंदबाबा धावले आणि आपल्या प्रिय पुत्राला मिठीत घट्ट कवटाळून घेत म्हणाले : नको जाऊस कान्हा. तू गेलास की गोकुळाचा प्राणच निघून जाईल. आम्हा सर्वांना जगणं अवघड होईल रे.
काही क्षण कोणीच काहीच बोलले नाही. पण मग मात्र नंदबाबांची ती प्रेमभरली मिठी सोडवून घेत श्रीकृष्ण लांब झाला. आपल्या वडिलांकडे पाठ करून तो बोलू लागला....
बाबा, जगणं अवघड होईल; यातच सर्व आलं! जे अशक्य असतं ते शक्य करण्यासाठी माझा जन्म आहे हे तुम्ही देखील ओळखून आहात. माझ्याशिवाय अवघड झालेलं जगणं तर तुमचे हे वेडे गवळी हळूहळू सोपं करून टाकतील. मात्र अत्याचार, हिंसा, असत्य वर्तन याचं अराजक आज जगात माजायला सुरवात झाली आहे; ते निपटून काढणं जास्त महत्वाचं आहे. माझं या कोवळ्या वयातील गोकुळ सोडण्याचं कारण तेच तर आहे. बाबा, आज तुम्ही क्षणात मला तुमचा आठ वर्षांचा बालक म्हणता आहात आणि क्षणात देवत्व देऊन मोकळे होता आहात. यापुढील आयुष्यात मला कायम हेच ऐकून घेत जगायचं आहे. कदाचित म्हणूनच मी माझ्या आयुष्याचे निरागस आणि मनमोकळे क्षण या गोकुळात घालवले आहेत. बाबा, उद्या मी निघणार. तुम्ही म्हणता आहात त्याप्रमाणे मला निघण्यापूर्वी गोकुळवासीयांची, माता यशोदा, माता रोहिणी यांची समजूत घालायची आहे. राधेला भेटणं तर मलाही शक्य नाही. परंतु ते ती देखील समजून घेईल याची मला खात्री आहे. बाबा, निघतो मी. पण जाता-जाता एकच पण खूप मनापासून सांगतो. खरतर मी कोणी विश्वव्यापक, विश्वविधाता किंवा जगदनियंता नाही. तर ज्यावेळी जो निर्णय घेणे आवश्यक असते तो निर्णय त्याच्या परिणामांची जवाबदारी घेत घेण्याचे साहस मनात कायम ठेवणारा एक मनुष्यप्राणी आहे; इतकंच! जे इतरांना जमणार नाही आहे ते करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कोणीतरी आरसा दाखवणे आवश्यक असते. मी तेच काम माझ्या पुढील आयुष्यात करणार आहे. बाबा, आत्ता तुम्ही भावुक झाले आहात; त्यामुळे मला अडवता आहात हे मी समजून आहे. मात्र माझ्याबद्दलचे हे भावुक भाव जसे तुम्ही आजवर स्वतःच्या मनात जपलेत त्याप्रमाणे पुढे देखील ते स्वतःपुरतेच ठेवा; ही एकच विनंती करतो आहे. बाबा, पुढे तुम्हाला माझ्याबद्दल बरंच काही ऐकू येणार आहे... मी भगोडा आहे; मी पाताळयंत्री दूत आहे; मी युद्धपुर्व युद्धाचे परिणाम ठरवणारा निष्ठुर निर्णायक आहे... असं बरंच काही! त्यावेळी तुम्हाला तुमचं मन घट्ट करावं लागणार आहे. कारण माझ्याबद्दलच्या प्रत्येक चर्चच्यावेळी हेच गोकुळवासी कासावीस होऊन तुमच्याकडे येणार आहेत. आज तुम्ही त्यांना सामोरं जाणं टाळता आहात; मात्र आजनंतर तुम्हाला प्रत्येक क्षणी माझा पिता होण्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. बाबा, सांभाळा स्वतःला. कोणीही कोणाच्याही आयुष्याला कायमचं पुरलं नाही; हे जितकं सत्य आहे; तितकंच मोठं सत्य हे देखील आहे की एकदा एखादं नातं स्वीकारलं की त्या नात्याचं उत्तरदायित्व आपल्यावर कायमचं राहातं. येतो मी नंदबाबा!
No comments:
Post a Comment