Friday, April 1, 2022

अनाहत सत्य (भाग 18)

 अनाहत सत्य

भाग 18

"प्रणाम सुमंत." राजवाड्याच्या विशेष कक्षात प्रवेश करताच समोर आलेल्या सुमंतांना वाकून प्रणाम करत तीक्ष्णाने म्हंटले.

तिच्याकडे एक तीव्र कटाक्ष टाकत सुमंतांनी केवळ मान हलवली आणि ते तिथून निघून गेले.

"या भागीनेय तीक्ष्णा." महाराज कृष्णराज यांनी तीक्ष्णाचं स्वागत केलं.

"महाराज, आपण माझा उल्लेख केवळ तीक्ष्णा करावा अशी विनंती मी आपणास अनेकदा केली आहे." अत्यंत आदरयुक्त आवाजात तीक्ष्णा म्हणाली.

"आपण मला अत्यंत आदरणीय आहात तीक्ष्णा. जर मला मोठी भगिनी असती तर ती तुमच्या सारखीच असती; असं नेहेमी वाटतं मला. म्हणूनच आपल्या इतर सहकाऱ्यांप्रमाणे मी देखील आपणास भागीनेय म्हणतो. असो. आपण निरोप पाठवून भेटीची वेळ मागितलीत त्यावेळीच मला लक्षात आलं की आपण मागील भेटीमध्ये सांगितल्या प्रमाणे श्रीशंभो मंदिर निर्मितीचे कार्य पूर्ण झाले असेल." अत्यंत मऊ आवाजात महाराज कृष्णराज बोलत होते.

"आपले अनुमान अत्यंत योग्य आहे महाराज. फारतर एका मासामध्ये मंदिर निर्मिती पूर्ण होणार आहे. त्यानंतर योग्य मुहूर्त बघून आपण मंदिर प्रवेश करावा आणि श्रीशंकर अभिक्षित करून मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करावेत; ही विनंती घेऊन मी आपणाकडे आले आहे." तीक्ष्णा शांतपणे बोलत होती.

"आपला विचार अत्यंत सुयोग्य आहे भागीनेय तीक्ष्णा." महाराज म्हणाले. त्यानंतर काही क्षण विचार करून महाराजांनी थेट तीक्ष्णाकडे बघत प्रश्न केला; "केवळ उत्सुकता म्हणून काही विचारले तर चालेल का?"

"महाराज, असे म्हणून आपण मला लाजवता आहात." हात जोडत तीक्ष्णा म्हणाली.

"हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही तीक्ष्णा." स्थिर आवाज आणि नजरेने महाराज कृष्णराज म्हणाले.

"केवळ उत्सुकता... हा शब्द प्रयोग देखील आपल्याकडून अपेक्षित नाही महाराज." तेवढ्याच स्थिर आवाजात महाराजांच्या नजरेला नजर देत तीक्ष्णा म्हणाली.

महाराजांना तीक्ष्णाचे बोलणे अजिबात पटले नाही. ते मनातून उसळले. मात्र चेहेरा अत्यंत शांत ठेवत ते हसले आणि म्हणाले; "भागीनेय तीक्ष्णा, मला आपल्याला कोणतीही आठवण करून देण्याची गरज नाही. तरीही.... आपल्या प्रथम भेटीमध्ये आपण स्पष्ट उल्लेख केला होता की मला मिळालेल्या दैवी संकेतानुसार आपण मंदिर बांधणार आहात; मात्र त्याव्यतिरिक्त त्या संपूर्ण भागामध्ये काय चालते त्याकडे मी पूर्ण दुर्लक्ष करावे. आपल्या कामामध्ये आमची कोणतीही मदत आपण स्वीकारली नाहीत. आम्ही ऐकून आहोत की आपण निर्माण केलेलीे मंदिर वास्तू आजवर भूतलावर कुठेही अस्तित्वात नाही अशी आहे. आपण मंदिर बांधणी कळासापासून सुरू केलीत असे आम्हास सांगितले गेले आहे.

भागीनेय तीक्ष्णा मूलतः ते ठिकाण म्हणजे संत महात्म्यांच्या निवासाचे असल्याने; त्यात नगरापासून अत्यंत दूर जंगलामध्ये क्रूर आणि हिंस्त्र प्राणांचा सहज वावर असलेले असल्याने यापूर्वी तेथे कोणीही पोहोचले नव्हते. तेथील गुंफांमधून तपस्वी राहात आले आहेत. त्यामुळे तिथे मानव निर्मित काही गुंफा आहेत यापलीकडे तेथील कोणतीही माहिती आमच्याकडे नव्हती. त्यामुळेच आपल्या पहिल्या भेटीमध्ये आपण माझ्या दृष्टांताचा उल्लेख करून त्या गुंफांमध्येच मंदिर निर्मिती संदर्भातील प्रस्ताव जेव्हा आमच्या समोर ठेवलात; त्यावेळी आम्ही पूर्ण गोंधळून गेलो होतो. नगरापासून इतक्या दूर गर्द वृक्षांनी दाटलेल्या आणि क्रूर प्राणी सहज फिरत असणाऱ्या त्या गुंफांच्या रांगांमध्ये सर्वसामान्य कसे पोहोचतील हा एकच प्रश्न मनामध्ये होता. मात्र आपण कामास सुरवात केलीत आणि जणू काही तिथे गावच वसले गेले."

महाराज बोलायचे थांबले आणि तीक्ष्णाच्या चेहेऱ्यावर एक मंद हास्य निर्माण झाले.

"महाराज, आपल्या मनातील उत्सुकतापूर्ण प्रश्न मात्र अजूनही आपल्या मनातच आहे." तीक्ष्णा म्हणाली. तिच्या बोलण्याने महाराज देखील मोकळेपणी हसले आणि म्हणाले; "भागीनेय तीक्ष्णा, आपल्या सोबतच्या प्रत्येक भेटीमध्ये मला आपल्यामधील नवीन गुण पाहायला मिळतो. भागीनेय, माझा प्रश्न अत्यंत सरळ आहे; तो सोपा आहे की नाही ते मात्र आपण ठरवावे."

"महाराज, मला जेवढी माहिती आहे त्याच्या आधारावर मी आपणास सर्वात योग्य ते उत्तर देईन असा शब्द देते." तीक्ष्णा गंभीर आवाजात म्हणाली.

"भागीनेय, आम्ही राज्य चालवतो. त्यामुळे अशी राजकीय भाषा आम्हास शोभते." महाराज हसत म्हणाले.

"महाराज, कदाचित आम्ही देखील असेच काहीतरी चालवत असू...." तीक्ष्णा गूढ हसत म्हणाली.

"भागीनेय आपला रोख नाही कळला." महाराज ताठ बसत म्हणाले.

त्यांच्या बसण्याच्या पद्धतीमध्ये झालेला बदल तीक्ष्णाच्या नजरेतून सुटला नव्हता. स्वतःला सावरत ती मनात म्हणाली; 'सांभाळ तीक्ष्णा! जितके आवश्यक आहे तितकेच बोलले पाहिजे; नाहीतर आपल्याच शब्दांच्या जंजाळामध्ये आपण गुंततो... हा पहिला धडा देताना आर्य चणक्यांनी थेट आपल्याकडे बघितले होते; ते याच क्षणाचा विचार करून तर नव्हे.'

मात्र महाराजांकडे थेटबघत तीक्ष्णा म्हणाली; "काही वेगळा रोख नाही महाराज. आपला प्रश्न समजून घेण्यास मी उत्सुक आहे इतकेच."

"भागीनेय तीक्ष्णा, आपण श्रीमंदिरासाठी अत्यंत दुर्गम जागेचे चयन केलेत. त्यासाठी लागणारी कोणतीही मदत नाकारलीत. मी समजू शकतो की उत्तम काम करणारे कारागीर आपण स्वतःच आणले असतील. मात्र सर्वसामान्य मदत करण्यासाठी लागणारे कामगार देखील आपण नाकारलेत. मागील तेवीस वर्षांमध्ये आपण आम्हास तेवीस वेळा देखील भेटला नसाल. मात्र आम्ही ऐकून आहोत की आपण त्या गुंफा परिसरामध्ये एक लहानसे गावच बसवून टाकले आहे. कारागिरांसोबतच मोठ्या प्रमाणातील कामगार देखील आपण स्वतः घेऊन आलात. अर्थात त्यानंतर उत्तम कारागिरी शकण्याची इच्छा असलेले अनेक सर्वसामान्य लोक अनेक ठिकाणांहून तिथे येऊन दाखल झाले; हे देखील आम्ही जाणून आहोत. आमचा प्रश्न आहे की जर आपण स्वतःहून दाखल झालेल्या सर्वसामान्यांना स्वीकारलेत तर मग आपण आमच्या मदतीला का नाकारलेत?"

"महाराज, आपली परवानगी हीच सर्वात मोठी मदत होती. त्यानंतर जे काही आम्ही करू शकलो ती तर केवळ आपल्या दृष्टांत इच्छेची अंमलबजावणी आहे. तरीदेखील आपल्या प्रश्नाचे विस्तृत उत्तर देण्यास मला आवडेल. महाराज, आपण उल्लेख केल्याप्रमाणे या गुंफा अत्यंत दाट अरण्यात आहेत. जिथे जंगली श्वापदे सहज फिरत असतात. त्यामुळे सर्वसामान्य कारागीर किंवा कामगार अशा ठिकाणी येण्यास कचरले असते. माझ्या सोबत आलेले सर्वच अशाप्रकारच्या परिस्थितीमध्ये राहण्यास सरावलेले आहेत. त्यामुळे त्याच्या सोबत काम करणे सोपे होते. आमचे काम सुरू झाल्यानंतर तेथून जे प्रवासी जात असत ते आमचे काम पाहण्याच्या मिषाने येत. त्यावेळी त्यांच्याकडील धान्य आणि अत्यावश्यक वस्तूंच्या बदल्यात आम्ही आमच्या कारागिरांनी फावल्या वेळात निर्माण केलेल्या पाषाण मूर्ती त्यांना देत असू. या पाषाण मूर्ती विविध ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांना पाहूनच अनेक कारागीर याठिकाणी आले. एक-एक जोडले गेले आणि आमच्याही नकळत तिथे गाव निर्माण झाले." तीक्ष्णा बोलायची थांबली आणि मग महाराजांकडे थेट बघत मिश्कीलपणे म्हणाली; "मला वाटते या महितीमध्येच आपल्या प्रशाचे संपूर्ण उत्तर आहे."

महाराज हसले आणि क्षणभर विचार करून म्हणाले; "भागीनेय तीक्ष्णा; आपण पहिल्या भेटीमध्ये एक उल्लेख केला होतात.... त्याच ठिकाणी मंदिर का या प्रश्नाचे उत्तर देताना आपण म्हणाला होतात की श्रीमंदिर निर्मितीसोबतच आपल्या संस्कृती जपवणुकीसाठी आवशक असे काही स्थापत्य आपणास तिथेच निर्माण करायचे आहे. परंतु त्या पहिल्या भेटीमधील त्या उल्लेखानंतर आपण सदर स्थापत्य निर्मिती संदर्भात कोणतीही माहिती मला कधीच दिली नाहीत. राजकुमार गोविंद सोळा वर्षांचे झाल्यानंतर आपण जेव्हा आम्हास भेटण्यास आला होतात; त्यावेळी आपण आग्रहपूर्वक गोविंदला त्या गुंफांच्या ठिकाणी पाठवण्यास सांगितलेत. त्यामागे आपला उद्देश अत्यंत योग्य असेल याची खात्री असल्याने आम्ही देखील राजकुमार गोविंदना तिथे पाठवले. मात्र आता आम्ही ऐकून आहोत की राजकुमार तेथे अपाला नामक आपल्या हाताखाली काम करणाऱ्या एका स्त्रीच्या प्रेमात आहेत... त्याव्यतिरिक्त ते तिथे काहीच करत नाहीत."

महाराजांचा रोख तीक्ष्णाच्या लक्षात आला. पुन्हा एकदा तीक्ष्णाच्या मनात अपाला संदर्भातील राग शिगेला पोहोचला. 'या हट्टी अपालामुळे आजून कोणत्या कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे कोण जाणे.' तीक्ष्णा मनात आले.

वरकरणी मात्र महाराजांकडे बघत तीक्ष्णा म्हणाली; "महाराज आपण लक्षात घ्यावेत की केवळ माझाच नाही; तर मी जिथून येते तेथील सर्वच विचारवंतांचा आग्रह होता की राजकुमार गोविंद यांनी काही वर्ष इथे राहून राजकारणातील काही महत्वाचे धडे शिकून घ्यावेत. त्या सोबतच सर्वभौमत्वासंदर्भातील त्यांच्या काही परीक्षा देखील घ्याव्यात असे मनात होते."

"मग काय निर्णय झाला भागीनेय?" महाराजांच्या आवाजात उत्सुकता होती.

"महाराज, राजकुमार गोविंद अत्यंत भावनिक आहेत...." तीक्ष्णाच्या आवाजातील नाराजी लपलेली नव्हती.

"भागीनेय, मी हे जाणून आहे की आपण जेथून येता तेथे भावनीकतेला महत्व नाही. मात्र आपण हे विसरून चालणार नाही की आम्ही सर्वसामान्य मानव केवळ भावनेवर जगतो." तीक्ष्णाचे वाक्य अर्धवट तोडत अत्यंत स्पष्ट शब्दात महाराज कृष्णराज बोलले आणि तत्क्षणी उभे राहिले. "भागीनेय, आम्हाला आता येथून प्रस्थान करणे आवश्यक आहे. मात्र आपण भोजन केल्याशिवाय निघू नये ही आमची विनंती आहे."

महाराजांना आपल्या बोलण्याचा राग आला आहे हे तीक्ष्णाच्या लक्षात आले. आपला अपाला वरील रागाचा उद्रेक महराजांशी गोविंद बद्दल बोलताना झाला आहे हे देखील तिला समजले. परंतु आता त्याबद्दल काहीच करणे शक्य नाही हे तिने जाणले आणि मान खाली घालून तिने महाराजांना प्रणाम केला.

तीक्ष्णाच्या दिशेने एक तीक्ष्ण कटाक्ष टाकून महाराज तिथून बाहेर पडले. महाराज जाताच तीक्ष्णा देखील तिथून निघाली. मात्र सुमंतांनी तिच्या मागे ठेवलेल्या रक्षकांना ती नक्की कुठे गेली ते कळले देखील नाही. मात्र तिथून बाहेर पडताना तीक्ष्णाला दिसत होते की पुन्हा एकदा सुमंतांनी दिलेल्या शिक्षेला सामोरे जावे लागेल या भीतीने रक्षकांचे चेहरे काळवंडले होते.

***

"राजकुमार आपण माझं म्हणणं तर समजून घ्या." गोविंदच्या मागे चालत नाथाने परत एकदा विनवणी केली.

"नाथा तू माझा अत्यंत जवळचा मित्र आहेस. तुला देखील हे माहीत आहे. तरीही मला तुझं काहीही ऐकून घेण्याची इच्छा नाही." गोविंद नाथाकडे दुर्लक्ष करत म्हणाला.

"राजकुमार मी आपल्या आणि कुंजर, अपालाच्या चांगल्यासाठी काहीतरी सांगतो आहे." नाथाचा आवाज विनवणी केल्यागत होता.

"नाही नाथा! तू सुमंतांच्या भितीमुळे बोलतो आहेस." गोविंद त्याच्याकडे न बघताच बोलत होता.

"बरं! तसं तर तसं! हो! मी घाबरलो आहे राजकुमार..." नाथाचं वाक्य मधेच तोडत गोविंद म्हणाला; "मला फक्त गोविंद म्हण नाथा."

"आपण कितीही आग्रह धरलात तरी हे पाप माझ्या तोंडून होणार नाही राजकुमार." नाथाचा आवाज मलूल झाला होता.

त्याच्या आवाजातील दुखावलेपण जाणवून गोविंद तिथेच जवळच्या पाषाणावर बसला आणि त्याने हात धरून नाथाला शेजारी बसवून घेतलं. "बोल नाथा. मी सगळं ऐकून घेईन तुझं. पण असा दुःखी होऊ नकोस." त्याचा हात हातात घेत गोविंद म्हणाला.

"राजकुमार, आपणास नगरामध्ये परत आणण्यासाठीच केवळ माझी नेमणूक झाली होती. आपल्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून आपले मन अपाला विषयी कलुषित करावे; हे देखील मला सांगण्यात आले होते." नाथाचा आवाज देखील फुटत नव्हता.

"नाथा मी सर्व जाणून आहे. तरी देखील माझा तुझ्यावर राग नाही. अरे, मला तर सुमंतांचा उद्देश देखील चुकीचा वाटत नाही रे. मी नगरात परत जाणे आवश्यक आहे हे मी जाणून आहे. महाराज कृष्णराज; माझे पिता; यांच्या मनातील उन्नत उद्देश हा सर्वसमावेशक आहे. सार्वभौमत्व ही त्यांची महत्वाकांक्षा नाही नाथा.... एक राजा म्हणून प्रजेला आपण हे देणं लागतो असं ते मला नेहेमी सांगत आले. एक अंमली राज्य असले की प्रजा जास्त सुखी असते. नाहीतर दोन राजांमधील वितुष्टाचा भुर्दंड प्रजेला युद्धातून आणि युद्धानंतर निर्माण होणाऱ्या दारिद्र्यातून सहन करावा लागतो; असं त्यांचं नेहेमीच म्हणणं राहिलं आहे. त्यामुळे त्यांना येथून सर्वभौमत्वासाठी येथून प्रस्थान करणे आवश्यक आहे; हे मी जाणून आहे. त्यात आता तर श्रीमंदिराचे काम देखील पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे माझे नगरात जाणे आवश्यक आहे. हे सगळेच मान्य करूनही... नाथा.... माझे अपाला वरील प्रेम मला जास्त महत्वाचे वाटते. तिच्या शिवाय आणि कुंजर शिवाय माझं आयुष्य निरर्थक आहे नाथा." शेवटचे वाक्य गोविंदने इतके हळुवारपणे उच्चारले होते की त्यातील वेदना आणि भावना दोन्ही नाथाच्या हृदयाला जाऊन भिडले.

"राजकुमार...." नाथ काहीतरी बोलणार होता. पण त्याला थांबण्याचा हात करून गोविंद तिथून उठला आणि निघून गेला.

***

"मला राजकुमारांचे दुःख बघवत नाही भीमा." भीमाच्या शेजारी बसून शून्य नजरेने नाथा म्हणाला.

"मी जाणून आहे नाथ. मला देखील अपाला आणि गोविंदने एक व्हावे असं वाटतं. पण तुझ्या माझ्या वाटण्याने काही होत नाही. सुमंत आणि तीक्ष्णा एकमेकांचा द्वेष करतात. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात ते दोघेही गोविंद, अपाला आणि कुंजर यांचा विचार देखील करत नाही आहेत." भीमाने नाथाच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटलं.

"नाही रे भीमा. सुमंतांना तीक्ष्णा आवडत नाही हे सत्य आहे. तीक्ष्णाने कधीच सुमंतांवर विश्वास ठेवला नाही. पहिल्या भेटीपासूनच तिने केवळ महाराजांशी बोलणे केले. कदाचित तुमची अशी काही गुपितं असतील जी आमच्या सारख्या सर्वसामान्यांना कळणे योग्य नसेल. पण त्यामुळे सुमंतांच्या मनात तिच्याबद्दल अढी निर्माण झाली. पण तरीही त्यांचा अपालावर राग नाही. मात्र त्यांचा आग्रह आहे की राजकुमारांनी आता त्वरित नगरात परतावे. आता श्रीमंदिराचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे कदाचित महाराजांच्या मनात राजकुमार गोविंद यांच्या राज्यभिषेकाचा विचार असेल. त्यामुळे राजकुमारांनी नगरात परतणे आवश्यक आहे. त्यांच्या सोबत अपाला आणि कुंजर आले तरी सुमंत कल्याण राजकुमारांच्या पाठीशी उभे राहून त्यांची बाजू महाराजांना समजावतील याची मला खात्री आहे. पण अपाला नगर प्रवेशास तयार होत नाही आहे. ती नाही म्हणते आहे त्यामुळे राजकुमार परत फिरत नाही आहेत. मात्र आपल्या या निर्णयामुळे आपण महाराजांना दुखावतो आहोत हे जाणून राजकुमार दुःखी आहेत. सुमंत कल्याण हे राजकारणी असल्याने त्यांना कोणत्याही भावनिकतेच्या पुढे जाऊन विचार करणे आवश्यक आहे." नाथा पोटतिडकीने बोलत होता.

"नाथा, मी समजून घेऊ शकतो तुला काय म्हणायचे आहे. पण अपालाने गोविंद सोबत नगरात प्रवेश करावा आणि त्याच्या सोबत सम्राज्ञी पद स्वीकारावे हा गोविंदचा आग्रह अपाला मान्य करेल असं मला वाटत नाही. अरे अपाला खूप वेगळी आहे आम्हा सर्वांहून. ती अगदी सहज जाऊन भिडते तीक्ष्णाला. तिचे विचार स्वतंत्र आहेत. अगदी तिच्या कामाच्या पद्धतीप्रमाणे. त्यामुळे गोविंदला स्वतः निर्णय घ्यावा लागणार आहे. अपालाला अपेक्षित नाते स्वीकारायचे की तिला दूर करून नगरात परतायचे." भीमा म्हणाला.

"......... आणि जर मला दोन्ही हवे असेल तर?" मागून गोविंदचा आवाज आला. भीमा आणि नाथा एकदम गर्रकन मागे वळून बघायला लागले.

क्रमशः

No comments:

Post a Comment