Friday, April 22, 2022

अनाहत सत्य (भाग 21)

 अनाहत सत्य


भाग 21

"भीमा!!!" नाथाला एका क्षणात सगळाच उलगडा झाल्यासारखं झालं. "तुम्ही जसे आलात तसेच आहात." असं म्हणाला आणि थांबला नाथ. "काय झालं मित्रा?" भीमाने हसत त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं.

"भीमा, तुम्ही सगळेच इथे आलात त्यावेळेपासून जसे दिसता आहात तसेच राहिला आहात; तर हे तुमचं वेगळेपण आजवर कोणाच्याही लक्षात का नाही आलेलं?" नाथाने विचारलं.

"कारण आम्ही इथे आलो तेव्हापासून आम्हाला कोणीही बघितलेलं नाही नाथा. गेल्या सहा-सात वर्षांमध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांना इथवर येण्यास मुभा दिली. ज्यावेळी आमचं मुख्य उद्दिष्ट पूर्ण होत आलं." हसत अपाला म्हणाली.

"मुख्य उद्दिष्ट पूर्ण नाही झालेलं अपाला." मागून तीक्ष्णाचा आवाज आला आणि नाथ, भीमा आणि अपाला तिघांनाही मागे वळून बघितलं.

"म्हणजे?" भीमाच्या आवाजात आश्चर्य होतं. नाथाला तर काय बोलावं ते सुचणं अशक्य होतं. अजून तर त्याने समजलेलं सत्य स्वीकारून पचवलं नव्हतं. त्यात अचानक अत्यंत धारदार व्यक्तिमत्वाची आणि स्वभावाची तीक्ष्णा त्याच्या समोर होती. त्यामुळे नाथामान खाली घालून उभा राहिला.

"मान्य आहे भागीनेय तीक्ष्णा. माझी जवाबदारी अजूनही पूर्ण नाही करू शकले मी. पण तुला देखील त्याचं कारण माहीत आहे." अपाला अत्यंत शांत पण आत्मविश्वासपूर्ण आवाजात म्हणाली.

"दुसरं काय कारण असू शकतं भागीनेय अपाला? ज्यादिवशी तू राजकुमार गोविंद आणि कुंजर यांना बाजूला ठेऊन केवळ मानवीय संस्कृती जतन आणि संवर्धन यासाठी विचार करायला लागशील त्यादिवशी तू यशाची पायरी चढशील." तीक्ष्णा अत्यंत तीव्र आवाजात म्हणाली.

"तीक्ष्णा.........." तिच्या दिशेने एक पाऊल उचलत अपाला रागाने ओरडली.

अपालाचं ते रूप नाथाने कधीच बघितलं नव्हतं. अनेकदा राजकुमार गोविंद अपालाशी बोलताना रागावायचे. त्यावेळी देखील अपाला शांतपणे बोलत होती. त्यामुळे तिचं ते रागावणं त्याच्या समजण्यापालिकडे गेलं. अर्थात राजकुमार आणि कुंजर यांच्या विषयी ती कोणाकडूनही ऐकून घेणार नाही; हे समजून त्याचं मन सुखावलं.

"अपाला....." तीक्ष्णाचा आवाज देखील चढला आणि आपण इथे थांबणं योग्य नाही याची नाथाला जाणीव झाली.

दोन पावलं मागे जात तो तोंडातल्या तोंडात म्हणाला; "येतो मी." आणि तसाच मागच्या पावलाने तिथून निघून गेला.

"भागीनेय तीक्ष्णा.... अपाला.... मी माझ्या कार्यक्षेत्राच्या बाहेर काहीतरी बोलतो आहे असं तुम्ही दोघी मानू शकता. पण या विशिष्ट कामाच्या यशस्वीतेसाठी आपल्याला प्रत्येकाला एक जवाबदारी नेमून दिली आहे. त्यामुळे माझं हे कर्तव्य आहे की मी तुम्हाला काही बाबींची जाणीव करून द्यावी." दोघींच्याही मध्ये पडत भीमा म्हणाला. "मूलतः तुमच्या दोघींच्याही हे लक्षात येतं आहे का की तुम्ही दोघी भावनांच्या आहारी जात आहात. राग ही एक भावना आहे. ही भावना तुमची दोघीही एकमेकींसाठी तीव्र करता आहात. त्यामुळे कदाचित तुम्ही दोघीही आपापल्या जवाबदारी पासून दूर जाता आहात. भागीनेय तीक्ष्णा, तुमचा आरोप मला देखील मान्य नाही. गोविंद किंवा कुंजर हे अपालाच्या कामाच्या मध्ये येत नाही आहेत. तर तिने सुचवलेले उपाय तुम्ही आपल्या वरिष्ठांना वेळेत पोहोचवले नाहीत; आणि त्यामुळे त्यांनी ते स्वीकारले आहेत हे कळण्यास विलंब झाला आहे. अर्थात आता त्यांच्याकडून अपालाने सांगितलेले उपाय मान्य झाल्यानंतर ते पूर्ण करण्यास तिला फार वेळ लागणार नाही हे सत्य आहे. पण भागीनेय तीक्ष्णा, मंदिर पूर्ण होण्या अगोदर अपाला तिची जवाबदारी पूर्ण करून राजकुमार गोविंद आणि कुंजर सोबत नगर प्रवेश करेल; या तुमच्या मनातील एका विचारामुळे तुम्ही अपालाला मार्गदर्शन आणि मदत करणं थांबवलंत. त्यामुळे अपालाच्या वागण्यात काही बदल झाला नाही हे पाहून तुम्ही खरं तर तिच्या बाजूने आश्वस्त व्हायला हवं होतं. पण तुमची अस्वस्थता इतकी वाढली की त्यातून तुम्ही भावनिक व्हायला लागलात; हे तुमच्या लक्षात आलं आहे का? भागीनेय तीक्ष्णा, अपालाने प्रेम केलं; कुंजरला जन्म देखील दिला. पण तरीही कमलदलावरील पाण्याप्रमाणे ती अलिप्त राहिली."

भीमाच्या बोलण्यामुळे संतापलेली तीक्ष्णा काहीशी शांत झाली. तिने एक तीव्र कटाक्ष भिमाकडे टाकला आणि ती तिथून निघून गेली.

"भीमा! खरंच तू माझा खरा मित्र आहेस." भीमाच्या जवळ जात त्याचा प्रचंड मोठा हात स्वतःच्या हातात घेत मंद हसत अपाला म्हणाली.

"अपाला, मी तुझा मित्र आहे यात वादच नाही. आत्ता मी जे बोललो ते देखील अगदी खरं आहे. पण त्यामुळे तुझ्या हातून देखील चूक झालेली नाही असं नाही. अपाला, आत्ता नाथाला आपण दोघांनी मिळून जे सांगितलं त्यात एक सत्य सांगणं तू टाळलंस असं नाही का तुला वाटत? अपाला, मूलतः ज्यावेळी आपण त्या गोठवून घेण्याच्या क्षणाला सामोरे जात होतो; त्यावेळी आपण सर्वांनीच एकत्रित रित्या हे स्वीकारलं होतं की प्रेम या भावेनेमध्ये आपण कधीच गुंतायचं नाही. कारण त्यापासूनच पुढे इतर भावनांचा जन्म होतो. तरीही तू गोविंदच्या बाबतीत मनावर ताबा ठेऊ शकली नाहीस. अर्थात मी तुला चांगला ओळखतो त्यामुळे मला खात्री होती आणि आहे की तू त्याच्यात गुंतून तुझ्या जवाबदरीपासून दूर जाणार नाहीस. पण अपाला, यामुळे तू गोविंद आणि कुंजर यांच्यावर अन्याय नाही का करत आहेस?" भीमा बोलायचा थांबला. त्याने अपालाकडे बघितलं. तिचे डोळे भरून आले होते.

"हीच भावनिकता अपाला! कदाचित तू नाही कमकुवत पडणार अपाला. पण तुझ्या या कृतीमुळे तीक्ष्णा, मी आणि आपल्यातले इथे असलेले अनेक अस्वस्थ झाले आहेत. त्याची जवाबदरी देखील तू घेणार आहेस का?" भीमाने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं.

भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत अपालाने बोलण्यासाठी तोंड उघडलं खरं. पण मग त्याचा हात दूर करत मान खाली घालून ती तिथून निघून गेली.

***

"अपाला, काय झालं आहे? तू इतकी गप्प का आहेस?" मिठीतल्या अपालाला प्रेमाने कुरवाळत गोविंदने म्हंटलं.

"राजकुमार... मी जर काही सांगितलं तर तुम्ही रागावणार तर नाही ना माझ्यावर? निघून नाही ना जाणार?" अपालाने गोविंदला अजूनच घट्ट मिठी मारत विचारलं.

"अग?! काय झालं अपाला? तुला मी इतकं अस्वस्थ कधीच बघितलेलं नाही. तुझ्यामध्ये आणि तीक्ष्णामध्ये काही वाद झाला आहे का?" तिची हनुवटी उचलून तिचा चेहेरा स्वतःकडे वळवत गोविंदने अत्यंत मऊ आवाजात तिला विचारलं.

"अहं! नाही. पण भीमा असं काहीतरी बोलून गेला की एक वेगळंच सत्य माझ्या समोर येऊन उभं राहिलं आहे. राजकुमार; नकळत मी फक्त माझ्या दृष्टिकोनातून योग्य-अयोग्य याचा विचार करत होते. पण प्रत्येक कृतीचे आणि घटनेचे अनेक आयाम असतात; हे काही काळासाठी माझ्या विस्मृतीत गेलं होतं." अपाला काहीसं गोविंदशी आणि बरचसं स्वतःशी बोलत होती.

"अपाला.... काय झालं? मला नाही का सांगणार?" गोविंदने तिला अजूनच जवळ ओढत म्हंटलं.

"गोविंद.... काहीतरी सांगायचं आहे तुला." अचानक अपाला म्हणाली.

"ओह! नक्कीच काहीतरी खास आहे ते." हसत गोविंद म्हणाला. "नाहीतर तू मला केवळ माझ्या नावाने हाक मारणं शक्यच नाही. बोल अपाला. मी सगळं स्वीकारायला तयार आहे."

"गोविंद स्वीकारशील तू. कारण त्याला पर्याय नाही. पण मी आत्ता जे सत्य सांगणार आहे ते पचवणं तुला कितपत शक्य होईल मला माहीत नाही. पण मला हे कळत आहे की याहून जास्त मी जर हा भार माझ्या मनावर ठेवला तर त्याच्या ओझ्याखाली माझ्या सोबत मी तुला आणि कुंजरला देखील ओढीनं." उठून बसत अपाला म्हणाली.

अपालाच्या त्या बोलण्याने गोविंद देखील गंभीर झाला. तिच्यापासून काहीसा दूर होत तो म्हणाला; "अपाला, तुझ्यावर प्रेम करताना मला कल्पना होती की हे शिवधनुष्य आहे. पेलवणं शक्य नाही... आणि तरीही मी ते स्वीकारलं. त्यामुळे तू अत्यंत मोकळ्या मनाने मला सगळं सांग. अपाला माझा विश्वास आहे की समोर येणाऱ्या कोणत्याही प्रश्नाला आपण दोघे मिळून सामोरे गेलो तर नक्की तो प्रश्न सुटेल."

"गोविंद, तुला वाटतं आहे तितकं ते सोपं नाही." एक मोठा निश्वास टाकत अपाला म्हणाली. तिने काही क्षण स्थिर नजरेने गोविंदकडे बघितलं आणि मग बोलायला सुरवात केली.

"राजकुमार गोविंद, मी आणि माझ्या सोबत इथे आलेल्या सगळ्यांचंच अस्तित्व खूप वेगळं आहे. राजकुमार, आम्हाला मृत्यू नाही. तो क्षण ज्यावेळी आम्ही त्या स्थिरत्वाला पोहोचलो त्यावेळी आमच्यातल्या ज्यांचं जे वय होतं, त्या वयाला आम्ही स्थिरावली. राजकुमार, हे का आणि कसं झालं यामागे खूप मोठं विश्लेषण आहे. संगीनच मी तुला. पण माझं हे सत्य तुला आत्ता सांगण्यामागचं कारण जास्त महत्वाचं आहे. राजकुमार, आम्ही इथे आलो आणि हे श्रीशिवमंदिर निर्मित केलं त्यामागे देखील एक कारण आहे. मूलतः आमचं नगर इथेच आहे.... या पर्वताखाली. आमचं तिथलं अस्तित्व काही नैसर्गिक व्याधींमुळे धोक्यात आलं होतं. त्या व्याधी दूर ठेवण्यासाठी आमच्या नगराचं वायुविजन वाढवणं आवश्यक होतं. त्याशिवाय आमच्याप्रमाणे आयुष्याला गोठवून जगणारे आमच्यातले अनेक जे या वसुंधरेवर इतर ठिकाणी आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याची आमची साधनं अलीकडे नीट काम करत नव्हती. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकत नव्हतो. म्हणून मग आमच्यातील काहींनी नक्षत्र आणि ग्रह ताऱ्यांच्या मदतीने त्यांच्याशी संपर्क करण्यासाठीची प्रणाली शोधून काढली. तिची निर्मिती देखील इथेच होणे आवश्यक होते. यासाठी आम्ही परत एकदा धरतीवर आलो. महाराज कृष्णराज यांच्या मदतीने आम्ही इथे कामाला सुरवात केली. राजकुमार, तुझ्या माहितीसाठी.... गेली अनेक वर्ष आम्ही इथे काम करतो आहोत. तू अगदी लहान असल्यापासून. तरीही तू तारुण्यात पदार्पण केलंस आणि इथे आलास तेव्हा देखील मी तशीच होते जशी आज आहे.... कदाचित माझ्यावरील प्रेमामुळे तुला ते लक्षात आलं नसेल....."

"अपाला, मला ते लक्षात आलं होतं... कधीच. पण मी ते बोललो नाही. अर्थात त्याचं कारण माझं तुझ्यावरचं प्रेम." गोविंदने तिला थांबवत म्हंटलं. त्याच्या त्या वाक्याने अपालाला आश्चर्य वाटलं. गोविंद हसला आणि बोलायला लागला; "अपाला, मी एक राजाचा मुलगा आहे. हे खरं आहे की मी माझी जवाबदारी बाजूला ठेऊन केवळ तुझ्या प्रेमासाठी इथे थांबलो आहे. पण त्यामुळे माझं अस्तित्व संपत नाही. अपाला, इथे जे घडतं आहे आणि त्यात जे वेगळेपण आहे ते मला कळलं आहे. फरक इतकाच की मी त्या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न नाही केला. मला खात्री होती तू कधीतरी मला सगळं सांगशील."

"राजकुमार..." अपाला काहीतरी बोलणार होती. पण तिला थांबवून गोविंद म्हणाला; "थांब अपाला. मी काय सांगतो आहे ते ऐक. कारण माझं मन मला सांगतं आहे की जर तू आत्ता बोललीस तर कदाचित तो संवाद आपल्यातला शेवटचा संवाद ठरेल. मला तसं होऊ द्यायचं नाहीय. म्हणून तू ऐक. अपाला, तू कुठून आलीस, का आलीस... तुझं अस्तित्व... तुझं स्वतःला गोठवून घेणं.... याच्या पलीकडे जाऊन माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला हे देखील माहीत आहे की तू कोणत्याही भावेनेमध्ये अडकणार नाही आहेस. कदाचित त्यामुळेच तू अचानक एक दिवस निघूनही जाशील. पण अपाला, तुझं माझ्या आयुष्यातून जाणं म्हणजे जिवंतपणी मृत्यूला स्वीकारण्यासारखं होईल मला." असं म्हणून गोविंद थांबला. त्याने अपालाच्या डोळ्यात खोल बघितलं. तिच्या थंड नजरेकडे आणि भावना राहात चेहेऱ्याकडे बघून गोविंद हादरला. "अपाला, काहीही कर, पण मला सोडून जाऊ नकोस. असा कोणताही निर्णय घेऊ नकोस ग; ज्यामुळे तू, मी आणि कुंजर आपल्या तिघांचे आयुष्य विखरून जाईल." गोविंदच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. आता मात्र अपालाचं हृदय देखील हललं. ती पटकन पुढे झाली आणि गोविंदच्या कुशीत शिरत म्हणाली; "गोविंद, हा माझा शब्द आहे; मी आणि कुंजर तुझ्यापासून कधीही दूर जाणार नाही." तिला मिठीत घेताना गोविंदच्या चेहेऱ्यावर जग जिंकल्याचा आनंद होता.

दूरवरून त्यांच्याकडे बघण्याच्या तीक्ष्णाचा चेहेरा मात्र कठोर झाला होता.

***

"मी काय मदत करू शकतो गोविंद? मी केवळ इथला संरक्षक प्रमुख आहे. माझ्या हातात काहीच नाही." भीमा अत्यंत गंभीर आवाजात बोलत होता. त्याच्या समोर गोविंद, नाथ आणि अपाला बसले होते.

"तू काय करू शकतोस ते तुला आणि अपाला या दोघांना चांगलंच माहीत आहे भीमा. तुमचं सत्य कळल्यापासून तर मी निःशब्द झालो आहे." गोविंद म्हणाला.

"भीमा...." अपाला काहीतरी बोलणार होती पण भीमाने तिला थांबवलं. "भागीनेय तीक्ष्णा. काही काम होतं का? मला बोलावून घ्यायचंत न." उठून उभं राहात भीमा म्हणाला. गोविंद, नाथ आणि अपालाने चमकून मागे वळून बघितलं. मागे तीक्ष्णा उभी होती. पण ती एकटी नव्हती. तिच्या सोबत... पण थोडं लांब तीन व्यक्ती उभ्या होत्या. तीक्ष्णापेक्षा देखील उंच अशा त्या व्यक्तींनी गळ्यापासून पायापर्यंत अंगरखा पांघरला होता आणि त्यांच्या डोक्यावर चेहेरा अर्धा झाकेल अशी टोपी होती. तिघांच्याही हातात एक उच लाकडी दंडक होता आणि त्या दंडकाचं वरचं टोक सोनेरी धातूने चमकत होतं. त्या तिघांकडे नजर जाताच भीमा आणि अपालाचा चेहेरा बदलला. पण ते गोविंद किंवा नाथाच्या लक्षात येणं शक्यच नव्हतं. कारण ते दोघेही मंत्रमुग्ध झाल्यासारखे एकदा त्या तीन व्यक्तींकडे आणि एकदा तीक्ष्णाकडे बघत होते.

"भीमतटरक्षक मी आपणास बोलावून घेणं योग्य झालं नसतं. ज्याप्रमाणे मी इथे या मंदिर निर्मितीसाठी आहे आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे मंदिर कळासावरील नक्षत्र क्षेपणासाठी योग्य रचनेच्या निर्मितीसाठी ज्याप्रमाणे माझी नेमणूक केली गेली; आपल्या नगरासाठी योग्य वायुविजन प्रणाली निर्माण करण्यासाठी अपालाची नेमणूक झाली त्याचप्रमाणे यासंपुर्ण निर्मितीचं वर्तमान आणि भविष्यात देखील योग्य संरक्षण व्हावं यासाठी तुमची नेमणूक झाली आहे. तुम्हाला माहीतच आहे की श्रीशिव मंदिराची निर्मिती पूर्ण होत आली आहे. केवळ एक माह इतकेच काम आता राहिले आहे. अपालाने वायुवीजनासाठी सांगितलेली उपाययोजना देखील कार्यान्वयीत झाली आहे. ते काम देखील येत्या माहामध्ये पूर्ण होईल; याबद्दल मला संदेह नाही. त्यामुळे आता येता संपूर्ण माह तुम्हालाच सर्व बाजूनं रक्षक तट निर्माण करणे आवश्यक आहे. आपल्याला आपल्या कामाची जाणीव आहे याबद्दल मला खात्री आहे." तीक्ष्णा बोलायची थांबली.

तीक्ष्णा इतक्या स्पष्ट सगळंच बोलेल याची भीमा आणि अपाला दोघांनाही कल्पना नव्हती. त्यामुळे ते दोघे एकमेकांकडे बघायला लागले. त्यांच्या नजरेतील प्रश्न ओळखून तीक्ष्णा क्षणभर हसली आणि तिने अत्यंत अर्थपूर्ण नजरेने तिच्या मागे उभ्या असलेल्या तिघांकडे बघितलं. भीमा अजूनही गोंधळलेलाच होता. पण अपालाच्या लक्षात सगळंच आलं.

खालील नगरातून या तीन प्रमुखांचं याठिकाणी येणं म्हणजे तीक्ष्णाने इथल्या कामाला आवरतं घेण्यास सुरवात केली आहे; हाच अर्थ होत होता. त्यात देखील गोविंद आणि नाथ असूनही सगळंच स्पष्टपणे बोलली होती ती.... याचा अर्थ तिने तिचा शेवटचा डाव पुढे केला होता. कारण यासर्वांसमोर असूनही; घडणाऱ्या आणि बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दाला साक्ष असूनही.... गोविंद आणि नाथ आत्ता जे घडत होतं ते सगळं विसरून जाणार होते.

क्रमशः

No comments:

Post a Comment