Friday, September 9, 2022

वासंतीचं स्वप्न (भाग 3)

 वासंतीचं स्वप्न

भाग 3


भाग 2

तो गेला त्या दिशेने बघत आत्या म्हणाली; "पहा बरं वहिनी.... दोन दिवस नाही झाले मोठा भाऊ जाऊन तर वहिनी वरून वासंती झाली ती या नंदनसाठी. मला काय? मी आपलं तुमचं काम सोपं व्हावं म्हणून बोलत होते. ठेऊन घ्यायची असेल ही आग घरात तर ठेवा. मी कोण काही बोलणारी? आण्णा सारखी तेराव्याला येऊन जाईन झालं." असं म्हणून आत्या देखील आत निघून गेली.

वासंतीच्या खोलीत तिची आई गेली. बघते तर वासंती भरतकाम करत बसली होती. "हे काय करते आहेस वासंती? बाहेर तुझ्यावरून वादळ पेटलं आहे आणि तू इथे शांतपणे भरत काम करत बसली आहेस?" बोलताना आईच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं.

आईकडे शांतपणे बघत वासंती म्हणाली; "मग काय करू मी आई? माझ्याबद्दल बोलताना मला किमान ऐकण्यासाठी तरी बाहेर बोलवावं असंही कोणाला वाटलं नाही. मग किमान मी माझं मन रमेल असं काहीतरी करते न."

तिच्या जवळ जात आई म्हणाली; "कसं होणार ग तुझं पुढे वासंती? पूर्ण आयुष्य पडलं आहे तुझं तुझ्या समोर. पोरी... काय फुटकं नशीब घेऊन जन्माला आलीस ग?"

वासंतीने हातातलं काम बाजूला ठेवलं आणि आईकडे शांत नजरेने बघितलं आणि म्हणाली; "आई, माणसांच्या चुकीच्या निर्णयाचं खापर आपण नशिबावर फोडणं कधी बंद करणार ग?"

"म्हणजे?" नकळून आईने विचारलं.

"आई, एकोणीस वर्ष हे लग्नाचं वय नाही. या आजच्या काळात तर नक्कीच नाही. त्यात शिकायची इच्छा असताना शिकू न देणं चूकच. तुमच्याकडे पैसे नव्हते हे मान्य... पण म्हणून दुसरे मार्गच नव्हते असं नाही. ग्रंथाळ्यातल्या काकांनी बाबांना सांगितलं होतं की मुलींनी शिकावं म्हणून अलीकडे सरकार कितीतरी योजना आणत आहे; पण दुर्दैवाने बाबांची मानसिकता नव्हती. दादा म्हणाला आणि लग्न ठरवून टाकलं त्यांनी. हा... लग्नानंतर नवरा गेला हे मात्र नशीब. पण मग इतक्या लहान वयाच्या मुलीला आता पुढे काय करायचं आहे हे तिला न विचारता तिच्या आयुष्याचा निर्णय असे लोक घेणार जे फक्त लग्नाला जेवायला आले होते? आणि म्हणणार काय... तर मुलीचं नशीब फुटकं." शांतपणे परत भरतकाम करत वासंती म्हणाली. तिचं बोलणं आईला पटत देखील होतं आणि सामाजिक बंधनाची जाणीव देखील मनाला टोचत होती.

तिसऱ्या दिवशी काका, आत्या आणि त्यांच्या घरातले सगळे निघाले. निघताना तेराव्याला येतो. काही मदत लागली तर कळवा. असं औपचारिक बोलणं झालं. ते सगळे गेले आणि वासंतीचा भाऊ आईसमोर येऊन उभा राहिला.

"मला निघायला हवं. तिकडे कामं पडली आहेत सगळी. तू थांब हवं तर तेराव्या पर्यंत. पण मग मात्र माघारी ये. घरची कामं सुलेखाला एकटीला आवरत नाहीत. मदत नसेल तर ती आजारी पडेल." आईकडे बघत तो म्हणाला.

काय बोलावं आईला सुचेना. वासंतीच पुढे झाली आणि म्हणाली; "दादा, माझं राहूदे... पण आईचा थोडा तरी विचार कर. तिच्या तरण्या ताठ्या मुलीचा नवरा वर्ष पूर्ण व्हायच्या आत गेला आहे. मुलीचं कसं होणार या चिंतेत ती आहे. तुला मात्र फक्त तुझे प्रश्न दिसतात का रे?" वासंतीचं बोलणं तिच्या भावाला चांगलंच झोंबलं.

"ए अवदसे गपते का? काळ्या तोंडाची अपशकुनी आहेस तू. आमचं सगळं छान चाललं होतं आणि अचानक जन्म घेतलास. इतकी लहान नणंद म्हणून मला मुली सांगून येईनात. त्यात बाबा रिटायर्ड झाले; तरी तुला शिकवत राहिले. कुठून आणणार होते ते पैसे? मग माझ्या वाटणीचे पैसे तुझ्यावर उडवायला लागले. शेवटी मीच ती उधळपट्टी बंद करून तुझं लग्न लावून दिलं म्हणून बरं. गेलेच न ते अगोदरच. सगळी जवाबदारी माझ्यावर सोडून? आणि आईचं काय सांगतेस मला? मी काही तिच्यावर सगळं काम लादत नाही. तिनेच अति हौसेने ती झाडं लावून ठेवली आहेत; त्याची उस्तवारी फक्त तिने करावी. इतकीच माफक इच्छा आहे माझी. च्यायला, पण तुला का सांगतो आहे हे सगळं मी? हे बघ वासंती... तुझं लग्न करून दिलं आणि तुझा आमचा संबंध संपला. आता तू आणि तुझं सासर काय ते बघून घ्या. आई परत येताना तुला घेऊन आली न... तर दोघींना घरातून हाकलून देईन. समाजलात?" एकदम उसळून वासंतीचा भाऊ बोलला आणि तसाच निघून गेला.

वासंतीने अपेक्षेने आईकडे बघितलं. पण आईची खाली गेलेली मान वर येत नव्हती. वासंतीने सुस्कारा सोडला आणि ती खोलीतून बाहेर पडली.

दुसऱ्या दिवशी वासंती तयार होऊन बाहेर पडली. तिची आई कुठल्यातरी कामात घरात होती. त्यामुळे आईला काही कळलं नाही वासंती बाहेर निघाली आहे. सासू मात्र समोरच सोफ्यावर बसली होती. तिने वासंतीला समोर बघताच विचारलं; "कुठे निघाली तुमची स्वारी?" सासूच्या नेहेमीच्या आवाजापेक्षा वेगळा आवाज होता तो. वासंतीला सगळं कळत होतं. पण आता यासगळ्याची सवय व्हायला हवी; असा विचार करून तिने शांतपणे उत्तर दिलं; "जरा मार्केटला जाऊन येते." "असं काय आणायचं आहे मार्केट मधून?" सासूने काहीसं संशयाने विचारलं. "माझा साबण संपला आहे." वासंती म्हणाली. "अग, मग त्यासाठी तू कशाला जाते आहेस? नंदन आणून देईल..." सासू म्हणाली. "पण मला अजूनही अशाच काही वस्तू हव्या आहेत सासूबाई. तो पुरुष आहे. त्याला नाही कळणार. मलाच जावं लागेल." वासंती म्हणाली. "अग, असं असेल तर तुझी आई जाईल की. मग तर तुला तुझ्याजवळचे पैसे पण खर्चायला नकोत. तीच देईल पैसे. आता तुला देखील जपून पैसे खर्च करावे लागणार आहे न. सचिन जे काही देऊन गेला होता ते सांभाळून वापर हो. त्याचे इन्शुरन्सचे येतील ते तुलाच देऊ आम्ही. पण त्याला खूप महिने लागतील. तोपर्यंत तुझ्या जवळ जे आहेत तेच तुला तुझ्या खर्चासाठी पुरवायचे आहेत." सासू म्हणाली. सासू असं काही म्हणेल याची कल्पना वासंतीला नव्हती; तिच्या डोळ्यात एकदम पाणी उभं राहिलं. पटकन वळून ती तिच्या खोलीत गेली.

जेवायची वेळ झाली तशी तिची आई तिला बोलवायला आली. "वासंती, चल बेटा जेवायला." अगदी मऊ आवाजात आई म्हणाली.

"आई, मी थोड्या वेळापूर्वी मार्केटला जायला निघाले होते." वासंती म्हणाली.

"अग? असं काय हवं होतं?" आईने तिला आश्चर्याने विचारलं.

"तसं महत्वाचं काही नव्हतं आई... पण मला मोकळा श्वास घ्यायचा होता. हे असं सतत दुःखात राहाणं मला जमत नाहीये आई." वासंती म्हणाली.

"अग, मग गच्चीत जा. मागच्या दारातल्या झाडांना पाणी घालायला जा. तिथे आहे की मोकळी हवा... घे हवा तितका श्वास." आई अगदी सहज आवाजात म्हणाली.

आईचं बोलणं ऐकून वासंतीला अजूनच वाईट वाटलं. "तुला खरंच कळत नाहीय का ग आई? का उगाच न कळल्याचं नाटक करते आहेस?" वासंती काहीसं वैतागून म्हणाली.

आईला खरंच कळलं नव्हतं की ती असं काय बोलली की वासंतीला अजून वाईट वाटलं. आई वासंतीच्या शेजारी बसली आणि म्हणाली; "वासंती, मी एका लहान गावात राहिलेली अडाणी बाई आहे. त्यात तुझ्या माझ्या वयात बरंच अंतर आहे; हे तू समजून घ्यावसं असं मला वाटतं ग. तुझ्या वडिलांना तू काय म्हणते आहेस ते कळायचं ग. मला कधीच नाही कळलं. ते होते तोवर तेच तुझ्या बाबतीतले सगळे निर्णय घेत होते. ते गेले अचानक.... आणि मी तुझ्या भावावर अवलंबले. मी म्हणजे कायम आधार शोधणारी वेल आहे वासंती. मला माझे असे विचारच नाहीत. त्यामुळे तू घरी आली होतीस; त्यावेळी देखील तू जे काही बोललीस ते पटलं असलं तरी त्याप्रमाणे मी वागूच शकणार नाही.... काल तू जे बोलत होतीस ते पटत होतं; पण खरं सांगू तर मला जनमानसाची लाज आणि भीड जास्त आहे ग. आत्ता देखील तू नक्की काय म्हणायचा प्रयत्न करते आहेस; ते मला कळत नाहीय. मला नीट सांगशील का?"

वासंतीला आईची एकदम कीव आली. आपण आईचा एक स्त्री म्हणून कधीच विचार केलेला नाही; हे एकदम जाणवलं वासंतीला. तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. तिने आईचा हात हातात घेतला आणि म्हणाली; "आई, मी देखील तुला समजून घेण्यात कमी पडले आहे. तू आहेस आणि असशील.... इतकं तुझं असणं मी गृहीत धरत गेले. तुला स्वतःचं अस्तित्व 'स्वत्व' आहे याची जाणीवच नाही झाली मला. चुकलंच माझं. पण आता माझ्याकडून तरी अशी चूक नाही करणार मी. अर्थात हे म्हणताना मी नक्की काय करणार आहे; ते माझं मला देखील माहीत नाही.... तरीही..."

आईने देखील वासंतीचा हात प्रेमाने हातात घेतला आणि म्हणाली; "बेटा, आई असतेच कायम असण्यासाठी... त्यामुळे तिच्या असण्याचा वेगळा विचार तुम्ही मुलांनी करावा अशी तिची अपेक्षाच नसते... फक्त तुम्ही प्रेम करावं इतकंच तिचं म्हणणं असतं. बरं, ते जाऊ दे. तुला का घुसमटतं आहे? डॉक्टरला बोलवायला हवं का?"

वासंती आईच्या शेवटच्या प्रश्नाने हसली आणि म्हणाली; "अग मोकळा श्वास म्हणजे... हे बघ; श्वास तर मी इथे या खोलीत देखील घेतेच आहे की. गच्चीत किंवा मागल्या दारी गेले तर अजून थोडं मोकळं वाटेल हे खरं.... पण मला तसा मोकळा श्वास म्हणायचं नव्हतं. आई... अग.... मला या सततच्या दुःखी वातावरणातून बाहेर पडायचं आहे. इथे राहून मला माझ्या पुढच्या आयुष्याचा विचार करता येत नाहीय ग. थोडी लांब गेले घरापासून तर कदाचित मी काहीतरी विचार करू शकेन; असं वाटलं म्हणून मी मार्केटच्या नावाखाली बाहेर पडणार होते. असं म्हणतात.... out of site is out of mind."

तिचं बोलणं ऐकून आईचा पवित्र परत बदलला. तिच्या मनातली घाबरट आणि सतत दुसऱ्यावर अवलंबलेली स्त्री पुढे आली आणि म्हणाली; "हे इंग्रजीत तू काय म्हणते आहेस ते मला माहित नाही वासंती. पण एक सांगून ठेवते; तुझ्या आयुष्याचा विचार करायला मोठे आहेत वासंती. उगाच काहीतरी बोलू नकोस आणि तेवढ्यासाठी बाहेर जाऊ नकोस."

"पण आई...." वासंतीने बोलायचा प्रयत्न केला. पण तिला गप्प करत तिची आई म्हणाली; "हे मनातले नको ते विचार लांब कर वासंती आणि हात पाय धुवून घरकामात मदत करायला ये. हे इथे नुसतं बसून तुझं डोकं नको तिथे चालायला लागलं आहे. तसंही आता घरकाम काही तुझ्या नशीबातून सुटणार नाही आहे. त्यामुळे गप गुमान सवय करून घे." इतकं बोलून तिची आई खोलीतून बाहेर पडली.

आई गेली आणि वासंती मान खाली घालुन मुसमुसायला लागली. इतक्यात हळूच दरवाजा उघडून नंदन आत आला. "वहिनी..." त्याने अगदी मऊ आवाजात वासंतीला हाक मारली. पण आपल्याच विचारात हरवलेल्या वासंतीला त्याची हाक ऐकू नाही आली. तिच्या जवळ जात नंदनने प्रेमळपणे तिला परत हाक मारली; "वासंती...." त्याच्या हाकेने दचकून वासंतीने वर बघितलं.

"अरे नंदन? तू कधी आलास आत? मला कळलंच नाही." वासंती म्हणाली.

"तू रडत होतीस तेव्हा...." नंदन म्हणाला आणि स्वतःचे डोळे पुसत हलकेच हसत वसांती म्हणाली; "हो का? बरं! मग बघ मी डोळे पुसले. बोल काय म्हणत होतास?"

"वासंती.... मला तुला काहीतरी विचारायचं होतं." नंदन म्हणाला.

"अरे, काल पण तू काहीतरी बोलणार होतास न? मग बोल की. तू हे असं परवानगी घेऊन का बोलतो आहेस माझ्याशी?" वासंती अगदी सहज आवाजात बोलत होती. तिला नंदनच्या मनात काय चालू आहे त्याचा मुळीच अंदाज नव्हता.

नंदनने एकदा तिच्या डोळ्यात खोल बघितलं आणि म्हणाला; "वासंती तू तुझ्या पुढच्या आयुष्याचा काही विचार केला आहेस का? तू अजून फक्त वीस वर्षांची आहेस. माझ्याहून देखील लहान. दादाहून तर बरीच लहान होतीस. मुळात तू दादाला हो कसं म्हणालीस हेच मला कोडं होतं. पण तुला बघितल्या पासून मी.... आणि दादासुद्धा एकदम आनंदी होता... म्हणून मी काहीच बोललो नव्हतो तेव्हा. पण आता.... वासांती आता अचानक सगळं बदलून गेलं आहे. तुझं लहान वय हे तसं बघितलं तर तुझ्यासाठी चांगलं आहे; पण तसं बघितलं तेच तुझ्या आयुष्यातला मोठा अडसर होणार आहे."

"नंदन तुला नक्की काय सांगायचं आहे मला?" नकळून वासंती म्हणाली.

"वसांती... सांगायचं नाहीय... विचारायचं आहे...." नंदन तिच्या समोर तिच्या पलंगावर बसत म्हणाला. त्याचवेळी वासंतीची आई वासंतीला बोलवायला परत आली आणि खोलीत वसांती सोबत नंदनला बघून एकदम गडबडली. पण तिची नंदनला काही बोलण्याची हिम्मत झाली नाही. त्यामुळे अचानक वसंतीवर भडकत ती वासंतीला ओरडली... "मी म्हंटलं अजून का येत नाहीस तू कामात मदत करायला... तुझी ही थेरं चालु आहेत म्हणून बसली आहेस का इथे? वासंती... एक सांगून ठेवते... माझ्यासमोर हे असलं वागणं चालणार नाही. कळलं? उठ आत्ताच्या आत्ता आणि चल माझ्यासोबत."

वासंतीला काहीच कळलं नाही की आई अचानक इतकी का चिडली. मात्र नंदनच्या ते लक्षात आलं. तरीही तो तिथेच बसून राहिला. त्याच्या नजरेत एक वेगळाच आत्मविश्वास होता. वासंतीच्या आईला त्याची नजर आवडली नाही. पण ती काहीच म्हणाली नाही. वासंतीला पुढे घेऊन ती खोलीतून निघून गेली.

वसांती आणि तिची आई खोलीतून जाताच नंदन वासंतीच्या कपाटाजवळ गेला. कपाटाला लॉक नव्हतं. त्याने ते उघडलं... एकदा वळून खोलीच्या दाराकडे बघितलं आणि समोर दिसणाऱ्या वासंतीच्या कपड्यांना हात घातला. नंदन खोलीतून बाहेर पडला आणि थेट त्याच्या खोलीत गेला. वासंतीची आई मागे लपून लक्ष ठेऊन होती. नंदनने काहीतरी नेलं आहे हे तिच्या लक्षात आलं; पण काही एक न बोलता ती कामाला लागली. मात्र त्यानंतर तिने वासंतीला एक मिनिटं देखील एकटं सोडलं नाही.

रात्री वासांती आणि तिची आई खोलीत आल्या. आज वासंतीला खूपच दमायला झालं होतं. कारण नंदन पासून लांब ठेवण्याच्या नादात तिच्या आईने तिच्याकडून खूप जास्त काम करून घेतलं होतं. काही कारण नसताना सगळ्या घराचे पडदे बदलणं; चादरी बदलणं.... असली कामं आज वासंतीने केली होती. त्यामुळे खोलीत येताच ती आडवी झाली. तिच्या शेजारी आडवं पडत तिची आई म्हणाली; "वासंती हा नंदन कसा मुलगा आहे ग?"

"हा काय प्रश्न आहे आई अचानक?" वासंतीने विचारलं.

"खरं सांगू का? सचिनजी गेल्याचं कळलं आणि आम्ही आलो.... तेव्हापासून मी बघते आहे की नंदन सतत तुझ्याकडे बघतो आहे. खरं सांग वासंती; तुमच्यात काही चालू आहे का? मी ऐकलं तो सकाळी काय बोलला. हे खरं आहे की सचिनजी आणि तुझ्यामध्ये वयाचं बरंच अंतर होतं; पण अग मी आणि तुझ्या बाबांनी त्यावेळी हाच विचार केला होता की मुलगा उत्तम शिकलेला आहे आणि मुंबईत नोकरी करतो. त्यामुळे तुला सुखी ठेवेल. पण तू त्याच्या सोबत न जाता इथेच राहिलीस. हा नंदन देखील शिक्षण संपलं आहे तरी अजून नोकरी न करता इथेच आहे. त्यामुळे तुझं आणि त्याचं उठणं बसणं होतच असेल न? तो ज्या पद्धतीने तुझ्याकडे बघतो; तुझी बाजू घेऊन बोलतो आणि मुख्य म्हणजे तुझ्याशी बोलताना त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळाच भाव असतो.... म्हणून विचारलं तुझं आणि त्याचं...." वासंतीची आई बोलता बोलता थांबली आणि तिने वासंतीकडे बघितलं. दमलेली वासंती कधीच झोपली होती. आईच्या मनात एकदा आलं की तिला उठवावं आणि विषय पूर्ण बोलून घ्यावा. पण मग तिला वासंतीची दया आली आणि तिला थोपटत ती देखील झोपली.

वासंतीची आई आता डोळ्यात तेल घालून नंदन आणि वासंतीवर लक्ष ठेऊन होती. त्या रात्रीनंतर तिने वासंतीकडे मनातला विषय काढला नव्हता. पण वासंतीला एकट देखील सोडलं नव्हतं. एक एक दिवस पुढे जात होता. वासंतीला आईचं सतत काम करायला लावणं आवडत नव्हतं. पण ती काहीच बोलत नव्हती. कारण तिला माहीत होतं की; ती जर आईला काही बोलली असती तर तिच्या सासूबाईंनी आईचा अपमान केला असता. जाणाऱ्या प्रत्येक दिवसा बरोबर वासंतीला सगळं नकोसं होत होतं.

शेवटी एका दुपारी तिने तिच्या मैत्रिणीला अनघाला फोन केला. वासंतीच्या फोनची अपेक्षा नसल्याने अनघाने लगेच फोन उचलला. "अरे वासंती? तू कसा काय फोन केलास? कशी आहेस ग? मी पहिल्या दिवशी येऊन गेले ग पण तू दिसलीच नाहीस. मी फक्त नंदनला ओळखते. पण इतक्या सगळ्या लोकांत त्याच्याशी बोलले असते तर वाईट दिसलं असतं. म्हणून मग पार्थिवाला नमस्कार केला आणि लगेच निघाले. तुला फोन करायचं इतक्या वेळा मनात आलं ग; पण काय बोलू आणि तुझं सांत्वन कसं करू कळलं नाही म्हणून हातात घेतलेला फोन खाली ठेवला." श्वास देखील न घेता अनघा बोलली.

तिचं बोलणं ऐकून वासंतीला हसायलाच आलं. "अग... हो! हो! किती ते explanation? नाही केलास फोन तर नाही.... मला काही वाईट नाही ह वाटलं त्याचं. पण खरं सांगू का अनघा.... मी काही दुःखात बिख्खात नाहीय ह. अग तुला तर माहीतच आहे माझं आणि सचिनचं तसं फार जुळलं नव्हतं. त्यामुळे तो गेल्याचं वाईट वाटलं असलं तरी अगदी मोडून पडले..... आता माझं पुढे काय होणार.... असं काही होत नाहीय मला." वासंती मोकळेपणी म्हणाली.

तिचं बोलणं ऐकून अनघाला धक्काच बसला. "काय बोलते आहेस वासांती? तुला ना माहेरचा आधार... आता तर मोठा दीर आणि सासू. म्हणजे त्यांच्या तालावर आयुष्यभर राहावं लागणार आहे आणि तुझं पुढे काय होणार याची तुला चिंता वाटत नाही?" अनघाने वासंतीला विचारलं.

"नाही अनघा.... म्हणजे काय करावं पुढे याचा मी सतत.... अगदी सतत.... विचार करते आहे. मला माहित आहे मी माहेरी जाऊच शकत नाही. पण तरीही आत्ता मला फक्त एकाच गोष्टीचं प्रेशर आहे ग. सगळ्यांना मी न सतत दुःखी असायला हवी आहे. मी सतत सचिनचं नाव घेऊन रडावं असं वाटतं सगळ्यांना.... अगदी माझ्या आईलासुद्धा. पण मला नाही ग रडायला येत. सगळंच कसं अवघड होऊन बसलं आहे. सतत विचार करून मी वेडी होईन असं वाटतंय मला. बरं ते जाऊ दे.... ए ऐक न! मी न तुला अगदी वेगळ्याच कारणासाठी फोन केला आहे. अनघा.... तू मला भेटायला येऊ शकशील का आज?"

वासंतीचा प्रश्न ऐकून अनघा एकदम गोंधळली. "का ग? आत्ता तर म्हणालीस दुःखात नाही आहेस.... मग?" अनघाने विचारलं.

"अग, ही आई मला न सतत कामाला जुंपते आहे. तू आलीस की मला थोडा आराम मिळेल आणि दुसरं पण एक कारण आहे." असं म्हणून वासंतीने आजूबाजूला कोणी ऐकत तर नाहीय न याची खात्री केली. "दुसरं काय कारण ग?" अनघाने तेवढ्यात विचारलं. "अनघा.... अग गेले दोन दिवस मला न thums up प्यावसं वाटतंय. पण सध्याच्या माझ्या परिस्थितीत मला कोणी बाहेर जाऊ देणार नाही. आणि तरीही गेलेच; तर thums up विकत घेताना कोणा ओळखीच्या व्यक्तीने बघितलं तर माझं कल्याण होईल. तू येताना हळूच तुझ्या पर्स मधून घेऊन आलीस तर मला पिता तरी येईल." वासांती म्हणाली.

अनघाला एकदम हसायलाच आलं. "बरं बरं. येते आज चार वाजेपर्यंत." ती वासंतीला म्हणाली आणि तशी आली देखील. काही वेळ बाहेर बसून वासंतीच्या सासुशी बोलून झाल्यावर वासंती तिला घेऊन खोलीत गेली. आत गेल्याबरोबर अनघाने तिच्या पर्स मधून आणलेलं thums up काढलं आणि वासंतीला दिलं. घाईघाईने बाटली उघडून वासंतीने ती तोंडाला लावली आणि त्याच्यातल्या सोडल्यामुळे वासंतीला ठस्का लागला. तिला लागलेला ठस्का बघून अनघा हसायला लागली. वासंती देखील हसायला लागली... इतक्यात नंदन आत आला. त्याला बघून दोघी एकदम बावचळल्या. त्यावर हलकेच हसत त्याने पाठी लपवलेले दोन ग्लास वासंतीच्या पुढे केले आणि डोळ्यांनीच 'पी बिनधास्त' अशी खुण करून तो परत बाहेर निघून गेला. तो जाताच परत एकमेकींकडे बघत अनघा आणि वासंती हसायला लागल्या. त्यांच्या हसण्याच्या आवाजाने वासंतीची आई आत आली. आईच असल्याने वासंती निवांत होती; पण वासंतीच्या हातात thums up बघून आई प्रचंड चिडली.

"लाज वाटते का ग तुला? अजून तुझ्या नवऱ्याचं तेरावं नाही झालं आणि तुला मात्र बाहेरख्यालीपणा सुचतो आहे! अग चांडाळणी जन्मायच्या अगोदरच का नाही मेलीस? इतक्या उतार वयात जन्मलीस की तुझ्या काळजीने तुझे वडील लवकर गेले. मी एकटी पडले. पण मनाला दिलासा देत होते की किमान तुझं आयुष्य मार्गी लागलं; तर नवऱ्याला खाऊन बसलीस. त्यावर ढेकर येत नाही की काय? म्हणून हे असलं काहीतरी प्यायची इच्छा होते आहे?" आई तोंडाला येईल ते बोलत होती. अनघा त्या अचानक झालेल्या भडीमराने एकदम घाबरली आणि पटकन आपली पर्स उचलून निघून गेली. वासंतीला आई असं काही बोलेल हे मनात देखील नव्हतं. त्यामुळे ती एकदम सुन्न झाली. आई बोलायची थांबली आणि वासंती शांतपणे उठून खोलीतून निघून गेली. वासंती गेली त्याबरोबर पलंगावर बसून आई हमसून हमसून रडायला लागली.

वासंती खोलीबाहेर पडली ते थेट गच्चीत गेली. ती गच्चीच्या कठड्यावर बसली होती आणि तिची नजर कुठेतरी हरवून गेली होती. किती वेळ गेला त्याचं तिला भानच नव्हतं. पण आता उन्ह उतरायला लागली होती. कलती संध्याकाळ होती. अचानक वासंतीला मागून हाक ऐकू आली.

"वासंती!" नंदन वासंतीच्या मागे उभा होता.

वासंतीने वळून बघितलं. "काय करते आहेस इथे? बराच वेळ मी तुझ्या मागे उभा आहे. पण तुझं लक्षच नाहीय." नंदन म्हणाला.

"नंदन.... लग्नानंतर सगळ्याच आयुष्य संपतं का रे? मी फक्त माझ्यासाठी नाही म्हणत रे. पण एकदा लग्न झालं की मुलगा आणि मुलगी वेगळे नसतातच का? त्यांच्या आयुष्यात जे होतं ते एकत्र जोडीनेच होतं का? तसं असेल तर का असावं तसं? सचिन इतकी चांगली नोकरी करत होता. छान जगत होता.... पण मग त्याचं लग्न झालं आणि मी त्याची एक जवाबदारी म्हणून आले त्याच्या आयुष्यात. तुला माहीत आहे.... आम्ही फारच कमी वेळ घालवला एकत्र. मला त्याच्या डोळ्यात खूप जिव्हाळा - काळजी दिसायची माझ्याबद्दल. आम्ही एकत्र देखील आलो. पण तरीही प्रेम नव्हतं फुललं आमच्यात. बोलताना नेहेमी तो माझ्यासाठी काय करणार ते सांगायचा. मग स्वतःचे प्लॅन्स सांगायचा आणि मला म्हणायचा की माझ्यात खूप पोटेन्शियल आहे; टॅलेंट आहे. मी देखील काहीतरी केलं पाहिजे. त्याच्या बोलण्यात कधीही आम्ही दोघे काय करणार हे नव्हतंच. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून जे अपेक्षित आहे न तशी रेअकॅशन मी देऊ शकणारच नाही रे. धाय मोकलून रडण्या इतकं प्रेम नव्हतं आमचं आणि दुःख न करण्या इतकी detachment नव्हती. सचिनची आणि माझी मैत्री होती रे... जी लग्न बंधनात अडकली होती. त्यामुळे आता तो नाही तर माझ्यासाठी किंवा तो स्वतःसाठी काय करणार हे आपोआप संपतं न! आता मी काहीतरी केलं पाहिजे इतकंच उरलं आहे रे माझ्यासाठी. मनात सतत तेच विचार असतात. पण हे मी आईला सांगूच शकत नाहीय. कारण तिला ते समजणारचं नाही. तिलाच का.... कोणालाही कळणार नाही. नंदन हे किती दुर्दैव आहे न... की मला काहीतरी करायचं आहे. तशी लायकी आणि हुशारी आहे... फक्त मार्ग माहीत नसल्याने मी अडकून पडणार आहे या टिपिकल आयुष्यात. कोणाच्यातरी उपकारांवर जगत आयुष्य काढणं सोपं नसतं रे. त्या नुसत्या विचाराने देखील मी अस्वस्थ होते आहे." उसासून काहीसं नंदनशी आणि काहीसं स्वतःशी बोलली वासंती. इतक्यात तिला तिच्या आईने मारलेली हाक ऐकू आली.

वासंतीने नंदनकडे बघितलं. नंदन वासंतीकडे स्थिर डोळ्यांनी बघत होता. काहीतरी होतं त्याच्या डोळ्यात. वासंतीला कळलं नाही. नंदन पुढे झाला आणि त्याने वासंतीचे दोन्ही खांदे धरले आणि म्हणाला; "वासंती, काळजी करू नकोस. मी आहे तुझ्या सोबत. उद्या तेरावं आहे दादाचं. सकाळी सगळे येतील. खूप गडबड असेल. ते सगळं उरकलं की मला तुला...." नंदन काहीतरी सांगणार होता; इतक्यात वासंतीची आई गच्चीत आली. नंदनने वासंतीचे खांदे धरले होते ते बघून ती एकदम स्थब्द झाली. नंदनची नजर अगदी शांत होती. त्याने एकदा वासंतीच्या आईकडे बघितलं आई मग वासंतीला म्हणाला; "वासंती मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे. तुझ्याबद्दल.... माझ्या मनात जे आहे ते. पण आत्ता नाही. उद्या सगळे विधी उरकले की मगच. त्यामुळे आत्ता जा तू."

वासंतीने एकदा नंदनकडे गोंधळून बघितलं. आई आली तरी नंदनने बोलायला हरकत नव्हती असं तिचं मत होतं. पण ती काहीही बोलली नाही आणि आई सोबत खाली उतरायला लागली.

"वासंती काय म्हणत होता तो?" आईने वासंतीला जिन्यातच प्रश्न केला.

"त्याला काहीतरी विचारायचं आहे मला. किंवा सांगायचं आहे... माहीत नाही मला नक्की. पण उद्या सगळं उरकलं की बोलेन म्हणाला आहे तो." वासंतीने शांतपणे उत्तर दिलं.

वासंतीच्या आईला ते काहीच पटलं नाही. पण काय बोलावं न कळून ती गप बसली.

दुसऱ्या दिवशी पाहाटेपासूनच सचिनचे काका, आत्या अशी मंडळी यायला लागली. वासंतीचा भाऊ देखील आला होता. त्याने आईला एकट्यात गाठलं आणि म्हणाला; "हे बघ आई, हे सगळं आटोपलं की तू माझ्या सोबत निघायचं आहे. उगाच वासंतीचं लटांबर गळ्यात घेऊ नकोस. आपल्याला आपलाच खर्च उरकत नाहीय. त्यात तिची भर नको." त्याचं बोलणं ऐकून वासंतीच्या आईला खूप राग आला. पण ती काहीच बोलली नाही. मुलाशी वाकड्यात जाऊन काही उपयोग नाही; हे तिला माहीत होतं. शेवटी त्याच्या सोबतच तर राहायचं होतं तिला मरेपर्यंत."

"वासंती नाही येणार आपल्या सोबत. चिंता करू नकोस. तीच सासर तिला पोसू शकतं." आई चिडक्या आवाजात म्हणाली. त्यावर "मग ठीक..." असं म्हणून वासंतीचा भाऊ निघून गेला.

त्यानंतर भटजी आले आणि त्यांनी हवनाला सुरवात केली. सगळे सोपस्कार करण्यासाठी नंदनच बसला होता. नंदनचे डोळे सतत वासंतीचा मागोवा घेत होते आणि वासंतीच्या आईचे डोळे नंदनच्या डोळ्याचा...

हवन आटपलं आणि भटजींनी सगळ्यांना एक एक करून नमस्कारासाठी बोलावलं. वासंती नमस्कार करण्यासाठी वाकली आणि कोणालाही लक्षात येण्याच्या अगोदर नंदनने तिच्या हातात एक चिठ्ठी सारली. वासंती एकदम चमकली आणि तिने नजर उचलून नंदनकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात आर्जव होतं. त्याच्या डोळ्यात डोळे घालून काही क्षण बघून वासंतीने नमस्कार केला आणि बाजूला झाली. हे सगळं अगदी काही क्षणात घडलं होतं. त्यामुळे कोणाच्याही लक्षात आलं नाही. पण...... वासंतीच्या आईच्या नजरेतून काहीच सुटलं नव्हतं. मात्र त्याक्षणी ती काहीच बोलली नाही.

हवन आटोपलं आणि भटजी म्हणाले; "इथलं सगळं आटोपलं आहे. आता सगळी पुरुष मंडळी एकदा स्मशानात जाऊन आली म्हणजे सचिनचा आत्मा मोकळा होईल."

भटजींनी सांगितल्या प्रमाणे सगळे पुरुष निघाले. सचिनच्या आईला रडू आवरत नव्हतं. आत्या आणि काकू तिची समजून घालत होत्या. पण तरणा ताठा मुलगा गेल्याचं दुःख त्या माउलीला सहन होत नव्हतं. वासंतीला मात्र अजिबात रडू येत नव्हतं. उगाच कोणी काही बोलू नये म्हणून वासंती उठली आणि हळूच तिच्या खोलीत गेली. वासंतीच्या आईने ते बघितलं आणि ती देखील पटकन उठून वासंतीच्या मागे गेली.

वासंती पलंगावर बसली होती. नंदनने दिलेली चिठ्ठी ती उघडणार इतक्यात तिची आई आत आली. आई आली म्हणून वासंतीने चिठ्ठी असलेला हात मागे नेला. पण आई पुढे आली आणि तिने तिच्या हातातून ती चिठ्ठी काढून घेतली आणि उघडली.

वासांतीला आईचं वागणं आवडलं नव्हतं. पण ती काहीच न बोलता आईकडे बघत बसली. चिठ्ठी वाचली आणि वासंतीच्या आईने नजर उचलून वासंतीकडे बघितलं. वासंतीला तिच्या आईच्या चेहेऱ्यावरून काहीच अंदाज येईना. आईने शांतपणे हातातली चिठ्ठी वासंतीला दिली. वासंतीने चिठ्ठी हातात घेतली आणि वाचायला सुरुवात केली...

"वासंती;

आयुष्य एकमेकांसोबत प्रेमाने घालवणं सुंदर असतं. पण ती भावना दोघांच्याही मनात असावी लागते. दादा मला हेचअनेकदा म्हणाला होता. त्याला तुझ्यात मैत्रीण दिसायची. प्रेयसी नाही. पण तरीही मला वाटतं, तो असता तर तुमचा दोघांचा संसार खूप सुंदर झाला असता; कारण दोस्तीचं नातं हे इतर कोणत्याही नात्यापेक्षा शुद्ध आणि प्रामाणिक असतं; असं मी मानतो. पण आता तो नाही.... आणि म्हणूनच तू त्याच्या सोबत बांधल्या गेलेल्या नात्यातून मोकळी आहेस. मात्र हे इथल्या कोणालाही कळत नाहीय असं मला वाटतं. वासंती दादा गेला आणि तू एक निर्जीव वस्तू असल्याप्रमाणे सगळ्यांनी तू काय करावं; कसं जगावं हे ठरवायला सुरवात केली.

वासंती दादा आणि तुझ्यात जी मैत्री निर्माण झाली होती त्यापेक्षा देखील जास्त गहिरी दोस्ती आपल्यात आहे असं मला वाटतं. वासंती तू खरंच कोणालाही आवडविस अशीच आहेस. हुशार, सोजवळ आणि स्ट्रीट स्मार्ट!

वासंती तू लग्न होऊन आलीस आणि तुझ्या वाचनाच्या आवडीमधून मला लक्षात आलं की तुझं केवळ मराठीच नाही तर हिंदी आणि इंग्रजी भाषेवर देखील उत्तम प्रभुत्व आहे. म्हणूनच मी तुला माझ्या सोबत जर्मन शिकायला लावलं होतं. तुला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले होते तेव्हा मला इतर कोणाहीपेक्षा जास्त आनंद झाला होता.आज तू जर्मन भाषा सहज वाचू लिहू शकते आहेस; याचा मला खूप अभिमान आहे.

वासंती... आता मी तुला जे सांगतो आहे ते मात्र खूप खूप महत्वाचं आहे. वासंती, खरंच तू माझ्यासाठी खूप खास आहेस. म्हणूनच तुझ्याबद्दल सगळे बोलायला लागले आणि तेव्हाच मी ठरवलं की तू आता तरी कोणाच्यातरी मर्जीने जगायचं नाही.

वासंती, तुझा ई-मेल चेक कर. तुला एका जर्मन संस्थेकडून ट्रान्सलेटर म्हणून जॉब मिळाला आहे. मी दादाच्या मित्रांशी बोललो आहे. ते तुला पहिले दोन महिने त्यांच्या सोबत राहायला द्यायला तयार आहेत. फक्त तुला त्याच्यासाठी जेवण बनवावं लागणार आहे. I think that's a fair deal.

वासंती.... माझ्या लाडक्या मैत्रिणी (तू आणि मी असताना मी तुला अशीच हाक मारायचो आणि कायम अशीच हाक मारणार आहे...) now sky is the limit for you. पंख पसर आणि घे भरारी! आम्ही परत येईपर्यंत जर तू निघाली असलीस तर पुढच्या प्रवासात देखील मी तुझ्या सोबत असेन. पण निर्णय तुला घ्यायचा आहे. आश्रित म्हणून जगायचं की स्वतःच्या turms वर स्वतःला सिद्ध करायचं.

तुझा मित्र,
नंदन

वासंतीने चिठ्ठी वाचली आणि तिचे डोळे भरून आले. चिठ्ठी वाचतानाच तिच्या मनात आलं होतं की आई आता मोठा तमाशा करणार आहे. तिने मान भरल्या डोळ्यांनी मान वर केली आणि....

वासंतीची आई कपाटातून वासंतीचे कपडे काढून एका बॅगेत भरत होती. वासंतीला आता पुढे काय वाढून ठेवलं आहे ते कळेना. तिने आईला हाक मारली....

"आई...."

"वासंती उठ. तुला लगेच निघायला हवं. इतक्यात येतीलच सगळी मंडळी. हे बघ मागल्या गॅलरीतून खाली उतर. मी करते मदत; आणि हे घे. हे थोडे पैसे आहेत माझ्याकडे. ते ठेव. लागतील तुला सोबत." आई भराभर तिचं समान भरत म्हणाली.

वासंतीला आईच्या बोलण्याने आणि वागण्याने धक्का बसला. आई जवळ जात तिने आईला घट्ट मिठी मारली. तिला जवळ घेत तिची आई म्हणाली; "बाळा, काल जे काही बोलले ते तुझ्या काळजीने होतंच ग; पण त्याहूनही जास्त माझी अगतिकता बोलत होती. बेटा; मला तुझी हुशारी कळत नव्हती असं नाही; पण सामाजिक बांधिलकी मला काही करू देत नव्हती. पण कोण कुठला तो नंदन. माझ्याहूनही जास्त तो तुझा विचार करत होता ग. तो म्हणतो आहे तेच बरोबर आहे बेटा. आश्रिता सारखं आयुष्यभर जगणं अशक्य आहे. तुझ्या पंखात बळ आहे. जा... जग ग बाळा सुखाने."

आई अजूनही काही बोलली असती. पण खालून आत्याचा हाक मारल्याचा आवाज आला आणि डोळे पुसत वासंतीला काही एक बोलण्याचा वेळ न देता आईने तिच्या हातात तिची बॅग दिली. पैसे तिच्या पर्समध्ये ठेवत तिला गॅलरीत नेलं आणि चादरींच्या मदतीने तिला खाली उतरवलं. वासंतीने खाली उतरून मागे वळून बघितलं. आई तिचे डोळे पुसत होती. आईला बाय म्हणून वासंतीने मागच्या भिंतीवरून उडी मारली आणि ती बस स्टॉपच्या दिशेने निघाली.

समाप्त





No comments:

Post a Comment