Friday, September 2, 2022

वासंतीचं स्वप्न (भाग 2)

 वासंतीचं स्वप्न


भाग 2


"वहिनी, दादा मित्राची बाईक घेऊन जात होता. त्याने हेल्मेट देखील घातलं होतं. पण एका ट्रकने मागून धडक दिली आणि तो जागीच गेला. दादाच्या मित्राचा आताच मला फोन आला होता. मी लगेच निघतो आहे मुंबईला जायला. तू आईला सांभाळ." नंदन म्हणाला आणि तसाच उठून निघून गेला.

का कोण जाणे पण रडणाऱ्या सासूबाईंकडे बघून देखील वासंतीला रडू येत नव्हतं. तिने सासूबाईंना हाताने उठवून सोफ्यावर बसवलं; त्यांना पाणी दिलं आणि त्या थोड्या शांत झाल्यानंतर स्वतःचा मोबाईल बाहेर काढून सर्वात पहिला फोन तिने तिच्या भावाला केला. भावाला देखील सचिन गेला आहे हे सांगताना तिचं मन खूपच शांत होतं तिचं तिलाच तिच्या शांतपणे आश्चर्य वाटत होतं. बातमी ऐकून तिच्या भावाला खूप मोठा धक्का बसला. आईला घेऊन लगेच निघतो एवढं म्हणून त्याने फोन ठेवला.

वासंतीचा भाऊ आणि वासंतीची आई त्यांच्या तिच्या घरी पोहोचेपर्यंत नंदन सचिनचं पार्थिव घेऊन मुंबईहून परत आला होता. आपल्या तरुण ताठ्या मुलाचं पार्थिव बघून वासंतीच्या सासुने मोठा हंबरडा फोडला. घरात एकूणच रडारड सुरू झाली. मात्र त्या परिस्थितीत देखील वासंती शांतच होती. तिचं तिलाच आश्चर्य वाटत होतं की तिला रडू का येत नाही. शेवटी ती रडत नाही हे लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून ती तिच्या खोलीत गेली आणि दरवाजा बंद करून घेतला.

थोड्यावेळाने वासंतीची आई चहा आणि दोन बिस्किट घेऊन तिच्या खोलीत आली.

" बाळा चहा घेतेस?" वासंतीच्या आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला विचारलं.

" हो ग! कधीपासून इच्छा होती. पण काय करू बाहेर इतकी रडारड चालू आहे; की मी इच्छा असूनही स्वयंपाक घरात जाऊ शकले नाही." अगदी सहज आवाजात वासंती म्हणाली आणि आईच्या हातातून चहाचा कप आणि बिस्किट खाऊन चहा घ्यायला सुरुवात केली. वासंतीच्या आईला थोडं विचित्र वाटलं. पण कदाचित बसलेल्या मोठ्या धक्क्यामुळे वासंती अशी वागते आहे असं त्यांना वाटलं. वासंतीच्या डोक्यावर थोपटून वासंतीची आई खोली बाहेर गेली आणि जाताना दरवाजा ओढून घेतला.

सचिनचा पार्थिव मिळण्याची वेळ आली त्यावेळेला 'वासंतीला बाहेर बोलवा;' असं आलेल्या गुरुजींनी म्हटलं. म्हणून वासंतीची आई तिच्या खोलीत दार उघडून आत गेली. वासंती खिडकीत उभी होती आणि काहीतरी गुणगुणत होती.

" वासंती? बरी आहेस ना? चल बाहेर! गुरुजींनी तुला बाहेर बोलावलं आहे." वासंतीला तिची आई म्हणाली. मात्र वासंतीचा शांत चेहरा आणि तिचा गुणगुणणारा आवाज ऐकून वासंतीच्या आईला धक्का बसला.

शांत चेहऱ्याच्या आणि सहज हालचाल करणाऱ्या वासंतीने बाहेर जाणं वासंतीच्या आईला योग्य वाटलं नाही. वासंती रडली नाही तर तिच्याबद्दल गैरसमज निर्माण होतील असं त्यांच्या मनात आलं. त्यामुळे तिच्या दोन्ही खांद्यांना धरून गदागदा हलवत त्यांनी तिला विचारलं; "वासंती! अगं! तुझा नवरा गेला. सचिन.... तुझा नवरा मेला वासंती. तरीही अजून तुला रडू येत नाहीये? अगं, अशी का वागते आहेस? तुला बाहेर बोलावलं आहे. जर बाहेर जाऊन तुझा चेहरा असा स्थितप्रज्ञ सारखा दिसला तर काय म्हणतील लोक?"

आईकडे शांतपणे बघत वासंती म्हणाली; " पण आई मला रडायलाच येत नाहीये. मला कळतंय ग की मला वाईट वाटलं पाहिजे. सचिन, माझा नवरा होता हे काय मला माहित नाही? पण आई रडायला येतच नाहीये मला; करू तरी काय?"

बोलताना वासंतीचा आवाज थोडा मोठा झाला. तिचा आवाज ऐकून तिची आई थोडी गडबडली. " अगं, हळू बोल! बाहेर ऐकू गेलं तर काय म्हणतील लोक?" तिची आई घाबरत घाबरत म्हणाली. इतक्यात खोलीच्या दाराशी वासंतीची सासू आली. " वासंतीला घेऊन बाहेर येताय ना?" त्यांनी अत्यंत मऊ भिजलेल्या आवाजात प्रश्न केला. " धक्का बसलाय हो तिला; काहीच बोलत नाहीये. थोडं समजावते आणि आणते." वासंतीची आई गडबडीने म्हणाली. " बरं!" म्हणून वासंतीची सासू परत गेली.

"वासंती, रडू येत नसेल तर नको रडूस; पण निदान चेहरा तरी दुःखी करू शकतेस ना?" वासंतीची आई तिला म्हणाली. थंड नजरेने आईकडे बघून वासंतीने मान हलवली आणि ती आई सोबत बाहेर जायला निघाली. वासंतीला आणि वासंतीच्या आईला दोघींनाही लक्षात आलं नाही की घरात आल्या आल्या सासूला जी लाल साडी वासंती दाखवत होती ती साडी अजूनही वासंतीच्या खांद्यावर होती. दोघी बाहेर आल्या आणि वासंतीला घेऊन तिची सासू पुढे झाली. इतक्यात शेजारच्या बाईने सासूला खूण केली की वासंतीच्या खांद्यावर एक रंगीत साडी आहे. वासंतीच्या सासुने ते बघितलं आणि खस्कन ती साडी काढून जमिनीवर फेकली. वासंतीला ते खूपच अनपेक्षित होतं. जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेल्या साडीकडे तिने एकदा बघितलं; आणि मग वळून तिने सासूकडे बघितलं. सासूच्या डोळ्यात एक विचित्र राग होता. वासंतीला त्याचा अर्थच कळला नाही. ती तशीच शांतपणे पुढे झाली. होणारा प्रकार तिचा दिर नंदन बघत होता. त्याची नजर वासंतीवर स्थिरावली होती.

वासंती पुढे झाली तशी गुरुजींनी नंदनला सांगितलं; "तिच्या हातावर पाणी दे."

पण नंदन सगळं लक्ष वासंतीच्या चेहऱ्याकडे होतं. त्यामुळे गुरुजी काय सांगतायत ते त्याला लक्षात आलं नाही. नंदनचं वासंतीकडे बघणं वासंतीची आई मागून बघत होती. त्याची ती नजर वासंतीच्या आईला आवडली नाही. पण त्या काहीच बोलल्या नाहीत. गुरुजींनी परत एकदा नंदनला सांगितलं पाणी द्यायला आणि एकदम चपापत नंदनने पाणी वासंतीच्या हातावर ठेवलं. सगळे सोपस्कार पूर्ण झाले आणि सचिनचं पार्थिव घेऊन सगळेजण निघाले. पार्थिव उचलता क्षणी वासंतीची सासू, वासंतीची आई, आणि आजूबाजूच्या जमलेल्या सगळ्याच बायका रडायला लागल्या. वासंती थंड नजरेने सगळ्यांकडे बघत होती. तिच्या डोळ्यात एक टिपूसही पाणी आलं नव्हतं. सचिनचा पार्थिव घेऊन पुरुष मंडळी गेली आणि बायका परत एकदा घरात येऊन बसल्या. वासंतीच्या शांत वागण्याची चर्चा आता त्यांच्यामध्ये कुजबूज त्या आवाजात व्हायला लागली. वासंतीच्या आईला ते लक्षात आलं. वासंती तिथेच बसली होती तिच्याजवळ जात त्या म्हणाल्या; "वासंती, बेटा उठ आणि तुझ्या खोलीत जा बघू. जे घडलं ते खूप वाईट होतं; मला कळतंय की तुला खूप मोठा धक्का बसला आहे. थोडा आराम कर बरं वाटेल." वासंतीने थंड नजरेने आईकडे बघितलं आणि उठून ती तिच्या खोलीत गेली.

हळूहळू सगळ्याच बायका उठून निघून गेल्या. थोड्यावेळाने पुरुष मंडळी देखील परत आली. नंदन त्याच्या आई समोर येऊन बसला आणि म्हणाला; " आई, तुला माहितीये दादाचा कुठल्याच गोष्टींवर विश्वास नव्हता. कधीतरी आम्ही दोघे गप्पा मारायचो; तेव्हा तो नेहमी म्हणायचा की हे मृत्यूनंतर आपण दहाव; बाराव करतो ते मला मान्य नाही. उगाच नको तो खर्च. एखादी व्यक्ती गेल्यानंतर लोकांना जेवण काय घालायचं? त्याची इच्छा होती की; असं काही त्याच्या नंतर करू नये. अर्थात ती परिस्थिती इतक्या लवकर येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण मला वाटतं; की त्याच्या मताप्रमाणे आपण वागाव."

नंदनला पुढे बोलू न देता त्याच्या आईने शांतपणे त्याच्याकडे बघितलं आणि; " माझ्या सचिनचं दहाव बाराव सगळं होणार. तो गेला; पण आपण आहोत ना. नंदन, कधी कधी आपल्याला काय वाटतं यापेक्षा जनरीत काय आहे ते समजून घेणं आणि त्याप्रमाणे वागणं जास्त महत्त्वाचं असतं. जाणारा जातो रे; पण मागे राहणाऱ्यांना याच समाजात राहायचं असतं ना? समाजाला जे पटत नाही तसं वागून कसं चालेल? त्यामुळे तू गुरुजींना सांग की यथायोग्य पद्धतीने सगळं काही होईल." नंदन काहीतरी बोलणार होता पण त्याच्या आईने डोळेच मिटून घेतले. त्यामुळे तो निघून गेला.

रात्र झाली होती; सगळ्यांच्या अंघोळी उरकल्या गेल्या होत्या आणि सगळेजण हॉलमध्ये बसले होते. एकटी वासंती काय ती स्वतःच्या खोलीत होती. शेजाऱ्यांनी रात्री सगळ्यांसाठी म्हणून खिचडी आणून दिली होती. वासंतीच्या भावाने वासंतीच्या आईला हळूच भूक लागली आहे अशी खूण केली. वासंतीची आई कुठली आणि सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात हलकेच म्हणाली; " जाणारा जातो; पण राहणाऱ्यांना शरीर धर्म विसरून चालणार नाही. शेजाऱ्यांनी खिचडी आणून दिली आहे. ती मी आणते; सगळ्यांनी थोडं थोडं खाऊन घ्यावं असं मला वाटतं."

यावर कोणीच काही बोललं नाही. तोच होकार समजून वासंतीची आई आत गेली आणि सगळ्यांसाठी खिचडी घेऊन बाहेर आली. वासंती बाहेर आली नाही; हे पाहून नंदन म्हणाला; "वासंतीला देखील भूक लागली असेल; मी तिला बोलावून आणतो." पटकन पुढे होत वासंतीची आई म्हणाली; " अरे तू बस. मी जाते खिचडी घेऊन वासंतीसाठी." उठत असलेल्या नंदनने एकदा वासंतीच्या आईकडे बघितलं आणि तो परत खाली बसला. खिचडीचं ताट घेऊन वासंतीची आई वासंतीच्या खोलीत केली. वासंती तिच्या पलंगावर पडली होती. वासंतीची आई तिच्या जवळ गेली आणि तिने तिला उठण्यासाठी हाक मारली; पण आईच्या लक्षात आलं की वासंती गाढ झोपली होती. दिवसभरामध्ये झालेल्या घटना नंतर देखील वासंती इतकी शांत कशी झोपू शकते? याचं वासंतीच्या आईला आश्चर्य वाटलं. बाहेर कोणाला तिचं हे झोपणं लक्षात येऊ नये म्हणून वासंतीच्या आईने घाईघाईने दरवाजा बंद केला आणि वासंतीला हलवून उठवलं. आईने काही एक न बोलता वासंतीच्या हातात खिचडी ठेवली; एकदा आईकडे बघून वासंतीने शांतपणे खिचडी खायला सुरुवात केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांसाठी पोहे आणि चहाची सोय वासंतीच्या आईनेच केली. वासंतीची सासू तर अजूनही रडतच होती. आता हळूहळू घरात बरेच जण जमायला लागले होते. वासंतीचे काका, काकू देखील आले होते.

" वहिनी, नंदनचं शिक्षण झालं असलं तरी तसा तो अजून लहानच आहे. तुमचे सुने विषयी काय बोलायचं? तिला हवं तर ती तिच्या आई-वडिलांच्या घरी जाऊ शकते...." काका पुढे काहीतरी बोलणार होते इतक्यात वासंतीचा भाऊ एकदम उभा राहिला आणि म्हणाला; " काका माझं बोलणं कदाचित लहान तोंडी मोठा घास असं वाटेल. पण आपल्या समाजाचीच पद्धत आहे की एकदा लग्न झालं की मुलीचं माहेर संपत. सणावारी कोड कौतुक करून घेण्यासाठी जाणं वेगळं आणि परत कायमचं जाणं वेगळं. त्यामुळे वासंती इथेच राहील." वासंतीच्या भावाचं हे असं बोलणं खरंतर काकांना, वासंतीच्या सासूला आणि नंदनला अजिबात आवडलं नाही. पण त्यावर कोणीच काहीच बोललं नाही. काकांनी एकदा वासंतीच्या आईकडे बघितलं आणि ते परत बोलायला लागले; "नंदन लहान असला तरी सगळे विधी तोच करू दे असं मला वाटतं." एकदा नंदनकडे बघून वासंतीच्या सासूबाईंनी बर म्हणून मान हलवली आणि चर्चा संपली.

वासंतीची आई तिच्या खोलीमध्ये गेली. बघते तर वासंतीने कपडे बदलले होते. ती कुठेतरी बाहेर जायला निघाली होती.

"अग, कुठे जाते आहेस?" वासंतीच्या आईने आश्चर्याने विचारलं.

अगदी सहज आवाजात वासंती म्हणाली; "कुठे नाही ग. ग्रंथालयात जाऊन येते. तुझ्याकडे आले होते त्याआगोदरच ही कादंबरी वाचून पूर्ण झाली होती. तिची तारीख देखील होऊन गेली आहे. अजून उशीर केला तर उगाच जास्तीचे पैसे भरावे लागतील. तसंही मला घरात बसून कंटाळा आला आहे. एखादं पुस्तक आणीन म्हणते आहे; म्हणून निघाले आहे." तिचं ते सहज बोलणं ऐकून वासंतीच्या आईला धक्का बसला. वासंतीला हाताला धरून पलंगावर बसवत ती म्हणाली; "तुला वेड लागलं आहे का वासंती? कशी वागते आहेस कालपासून? तुला काही कळत नाही आहे का? तुला धक्का बसला आहे म्हणावं तर नीट वागते, बोलते आहेस. खाते-पिते आहेस. अग, तुझा नवरा मेला काल आणि तू आज ग्रंथालयात जायला निघालीस? लोक काय म्हणतील याचा तरी विचार कर ग." आईकडे शांतपणे बघत वासंती म्हणाली; "आई वेड नाही लागलेलं मला. सगळ्यांना वाटतंय की मी मोठमोठ्याने रडावं... सचिन... सचिन... करून सतत डोळ्यातून पाणी काढावं. पण आई मला असं काही करावंसं वाटतच नाही आहे." तिचं बोलणं ऐकून वासंतीची आई गोंधळून गेली.

आईला समोर बसवत वासंती म्हणाली; "आई, सचिन माझा नवरा होता हे खरं आहे. पण आई आमचा असा इतका सहवास झालाच नाही की माझी त्याच्याबद्दल खूप काही attachment निर्माण होईल. लग्नाला फक्त सात महिने झाले आहेत आई. त्यात आम्ही दोघे किती दिवस एकत्र होतो माहीत आहे का? लग्नाचे दोन दिवस धरून देखील जेमतेम दहा-बारा दिवस फक्त! तो त्याच्या कामाच्या बाबतीत खूप पॅशनेट होता. त्यात मला इथून लवकर घेऊन जायची त्याची इच्छा होती... हे सगळं मला माहित आहे. ते मला आवडायचं देखील. पण आई, अग, मुळात मला लग्न करायचं नव्हतं. त्यात बाबा गेले आणि तुम्ही मला सावरायला वेळही न देता लग्न करून दिलंत. इथे ज्याच्या जीवावर आले तोच नव्हता माझ्या सोबत. त्यामुळे तो गेल्यावर त्याच्यासाठी राडण्याइतका जिव्हाळाच निर्माण झाला नव्हता आमच्यात आई. अर्थात वाईट तर वाटतंच आहे; कारण आमच्यात छान दोस्ती झाली होती. कधीतरी अधून मधून गप्पा होत होत्या. पण आई..... नव्या नवलाईतलं प्रेमबिम नव्हतं आमच्या गप्पात." वासंतीचं ते शांतपणे समजावणं आईला अजूनच विचित्र वाटलं. पटकन तिच्या जवळून उठत ती म्हणाली; "मला तुझं हे बोलणं काहीही कळत नाही वासंती. पण मी तुला स्पष्ट सांगते; तू आत्ता कुठेही जायचं नाही आहे. गपचूप खोलीत बस." वासंतीला तिच्या आईच्या त्या बोलण्याचा अर्थच कळला नाही आणि तिच्या काही लक्षात यायच्या अगोदरच तिची आई खोलीबाहेर निघून गेली होती. जाताना तिने दरवाजा ओढून घेतला आणि बाहेरून कडी घातलेली वासंतीला ऐकू आली. वासंतीला आईच्या या अशा वागण्याचाच जास्त धक्का बसला.

थोडा वेळ गेला आणि अचानक तिला खोलीची कडी काढल्याचा आवाज आला. वासंती अजूनही पलंगावर बसली होती. ग्रंथालयात घेऊन जायला जी कादंबरी तिने काढली होती तीच कादंबरी वासंती चाळत होती. तिने मान वळवून दरवाजाकडे बघितलं. दारात नंदन उभा होता.

"वहिनी काय करते आहेस?" दारात उभं राहात नंदनने विचारलं.

"काही नाही रे. ही कादंबरी चाळत बसले आहे. खरं तर मला ती बदलायला जायचं होतं. पण आईने जाऊ दिलं नाही." अगदी सहज आवाजात वासंती म्हणाली.

"वहिनी, मी आत येऊ?" नंदनने विचारलं.

"कमाल करतोस नंदन. त्यात विचारण्यासारखं काय आहे. ये की आत." वासंती हसत पलंगावरून उठत म्हणाली. नंदन आत आला. त्याचा चेहेरा एकदम गंभीर होता. तो वासंती जवळ जाणार इतक्यात वासंतीची आई खोलीत आली. तिथे नंदनला बघून ती मनात चरकली. आदल्या दिवशी नंदन ज्या पद्धतीने वासंतीकडे बघत होता ते तिला आठवलं. अचानक खाकरत ती पुढे आली आणि म्हणाली; "नंदनजी काही हवं होतं का? वासंती अजून धक्क्यातून सवरलेली नाही. मला सांगा न तुम्हाला काय हवं आहे. मी देते." नंदनने मागे वळून बघितलं आणि वासंतीच्या आईकडे बघून कपाळाला आठ्या घातल्या. "मला काही नको आहे. बोलायला आलो आहे मी वहिनीशी." तो म्हणाला. "मग नंतर बोलता का? ती आत्ता थोडा आराम करते आहे." वासंतीच्या आईने देखील चिवटपणे उत्तर दिलं. वासंतीच्या आईचा अपमान होऊ नये म्हणून नंदन खोलीतून बाहेर निघून गेला. पण जाताना त्याने वासंतीकडे एकदा वळून पाहिलं. अर्थात ते देखील वासंतीच्या आईला आवडलं नाही. पण ती काहीच बोलली नाही.

"वासंती तू असं उगाच कोणालाही खोलीत येऊ देऊ नकोस ह. चांगलं नाही दिसत ते." वासंतीची आई तिला म्हणाली.

आईच्या बोलण्याने वासंतीला धक्काच बसला. "अग, कोणालाही म्हणजे काय? नंदन कोणीही नाही माझा दिर आहे." वासंती शांतपणे म्हणाली.

"ते मला देखील कळतं वासंती. पण लोक काय म्हणतील? अजूनही सचिनच्या घरातली सगळी पाहुणे मंडळी आहेत या घरात. जर त्यांनी बघितलं की तुझा दीर तुझ्या खोलीत येतो आणि बराच वेळ थांबतो तर उगाच तुझ्याबद्दल वाईट साईट चर्चा सुरू होईल. कसं कळत नाही ग तुला?" आई पोटतिडकीने म्हणाली.

"काय चाललं आहे आई तुझं? मी कुठेही जायचं नाही; कोणी माझ्याशी बोलायचं नाही. मग मी आयुष्यात काय करायचं नक्की? अग, माझा नवरा गेला यात माझी काय चूक? तू तर असं वागते आहेस की मी काहीतरी घोड चूक केली आहे; किंवा मीच त्याला मारलं आहे आणि आता त्याची शिक्षा मी भोगली पाहिजेच." वासंती म्हणाली. तिचं बोलणं ऐकून आई प्रचंड चिडली आणि तरातरा तिच्या जवळ येत तिने वासंतीला जोरात फटका मारला. "तुझ्या जिभेला काही हाड वासंती? काय बोलावं; कधी बोलावं याला काही काळ वेळ असतो की नाही? अग, वयाने लहान असलीस तरी आता लग्न होऊन विधवा सुद्धा झाली आहेस. आयुष्यातल्या अनुभवांनी काहीच कसं शिकवलं नाही तुला? इतकी पुस्तकं वाचतेस पण कसं वागावं ते मात्र नाही कळत तुला." आई म्हणाली.

"आई, तू संपूर्ण विरोधाभासी विषय लागोपाठच्या वाक्यात कसे बोलू शकतेस ग?" वासंती आईला चिडवल्या सारख्या आवाजात म्हणाली.

न कळून तिच्या आईने विचारलं; "म्हणजे?"

"आई, मुळात आपल्या जिभेला हाडच नसतं. बरं, जर हे भाषिक हाड आहे असं आपण म्हंटलं... म्हणजे मी कुठे, कधी आणि योग्य अयोग्य बोलणं.... या अर्थाने! तर तुझ्या पहिल्या प्रश्नातच हे समजतं की मला बोलण्याचं भान नाही. मग तू प्रश्न का विचारतेस? तुला हे मान्य आहे की मी वयाने लहान आहे; मग आई लग्न झालेली किंवा विधवा असले तरी त्या वयात मुली जसं वागतात तशीच तर वागते आहे मी. आई, तुला मी कालच सांगितलं आहे; माझं लग्न झालं होतं तरीही माझ्यात आणि सचिनमध्ये असं काही प्रेम नव्हतं की मी त्याच्या आठवणींमध्ये बुडून जाईन. मी जे आजवर वाचलं आहे न त्यातून जे शिकले तशी वागते आहे. आयुष्य म्हणजे पुढे जाणं आई; अडकून राहाणं नाही." वासंती म्हणाली.

"मला अक्कल नको शिकवू वासंती. एक लक्षात ठेव; निदान मी इथे असे पर्यंत मी तुला चुकीचं वागू देणार नाही. कळलं?"

आईच्या त्या बोलण्याने वासंती दुखावली गेली. पण तिला आईशी अजून वाद घालायचा नव्हता. त्यामुळे तिने आईकडे पाठ केली आणि ती पलंगावर आडवी झाली.

वासंतीची आई खोली बाहेर यायच्या आत बाहेर उभं राहून वासंती आणि तिच्या आईच्या मधलं बोलणं ऐकणारा नंदन पटकन निघून गेला.

दिवस उगवत होता आणि मावळत होता. दोन दिवस गेले आणि सगळेच नातेवाईक परतीचा विचार करायला लागले. संध्याकाळी सगळे हॉलमध्ये बसले होते त्यावेळी नंदनच्या आत्याने विषय काढला.

"उद्या तिसरा दिवस होतो आहे सचिन गेला त्याला." आत्या म्हणाली.

तिच्या त्या एका वाक्याने सचिनच्या आईच्या डोळ्यात परत पाणी उभं राहिलं. तिच्या जवळ जाऊन बसत आत्या म्हणाली; "वहिनी, इतका त्रास करून घेऊ नकोस ग. आपल्या हातात असतात का या गोष्टी? नको रडूस."

"माझा सोन्यासारखा मुलगा गेला वन्स. रडू नको तर काय करू? आता सगळी जवाबदारी नंदनवर." रडू आवरत सचिनची आई म्हणाली.

"नंदनवर तुमची जवाबदारी तर राहणारच न वहिनी." बाजूला बसलेले काका म्हणाले.

"फक्त मीच नाही भावजी. वासंती देखील आहेच की." सचिनची आई म्हणाली.

"अहो, वर्ष देखील झालेलं नाही लग्नाला. पाठवून द्या तिला माहेरी. तुमची जवाबदारी नाही होऊ शकत ती." काका एकदम म्हणाले आणि सगळेच काकांकडे बघायला लागले.

"मी काही चुकीचं सांगत नाही आहे. लहान आहे वासंती. परत तिचं आयुष्य सुरू करू शकते ती." काका म्हणाले.

अचानक वासंतीचा भाऊ उभा राहिला आणि म्हणाला; "वासंतीला आम्ही नेणार नाही. तिचं लग्न करून दिलं आम्ही. आता परत तिला परत नेणं शक्य नाही आम्हाला. मुळात विधवा मुलीचं लग्न परत होणं सोपं नाही. त्यात आम्ही राहातो लहानशा गावात. तिथे तर असं बोलणं म्हणजे देखील पाप. आता माझे वडील देखील नाहीत. आईची जवाबदारी माझ्यावर आहे. माझी पत्नी, दोन मुलांचं शिक्षण आणि आईच्या आजारपणांचा खर्च भागवताना मी मेटाकुटीला आलो आहे. त्यात अजून विधवा बहिणीची जबाबदारी घेणं मला परवडणार नाही. तुम्ही सधन आहात काका. तुम्हीच सांभाळा तिला."

त्याचं बोलणं ऐकून सचिनची आत्या म्हणाली; "अरे, असं एकदम जबाबदारी टाळून कसं चालेल? विषय पैशाचा नाही; पण सचिनचं वर्ष श्राद्ध व्हायच्या आत नंदनचं लग्न करावं लागेलच न आम्हाला. कारण पुढे तीन वर्षे थांबायचं म्हणजे नंदन तिशी ओलांडेल. मग त्याला शोभेशी मुलगी कशी मिळेल? आणि घरात मोठी विधवा वहिनी कायमची आहे; हे नवीन लग्न करून येणाऱ्या मुलीला कसं मान्य होईल? अशाने चांगली स्थळं नाही येणार सांगून नंदनसाठी."

"अहो पण आता तुमच्या घरातली एक व्यक्ती नाही का वासंती?" वासंतीचा भाऊ आपला मुद्दा सोडायला तयार नव्हता.

वासंतीची आई हळू आवाजात म्हणाली; "नेऊ आम्ही वासंतीला काही दिवसांसाठी..... पण... "

तिला पुढे काही बोलू न देता वासंतीचा भाऊ सगळ्यांसमोर आईला म्हणाला; "कुठे नेणार आहेस तू तिला आई? तुझं तुला तरी झेपतं आहे का? अजून जवाबदारी का घेते आहेस डोक्यावर? काही दिवसांसाठी तरी तुला जमणार आहे का? नवरा गेल्याचं दुःख मोठं असतं आई. तुला कामात मदत म्हणून नेशील तिला इथून; पण ती सतत रडत बसणार. मदत राहू दे; तुलाच तिचं सगळं करावं लागेल."

मुलीच्या सासरच्या लोकांसमोर आपला मुलगा आपल्याला खोटं पडतो आहे हे बघून वासंतीची आई एकदम गप झाली. ती मनातून दुखावली गेली होती; पण काही बोलणं शक्य नव्हतं. त्यामुळे पटकन उठून ती वासंतीच्या खोलीत निघून गेली.

"आम्ही वासंतीला नेणार नाही; उद्या तिसरा दिवस आहे. त्यामुळे मी निघीन उद्या. आई राहील तेरावं होईपर्यंत. तुम्हाला माझं काही बोलणं लागलं असेल तर मी माफी मागतो." इतकं बोलून वासंतीचा भाऊ देखील उठला आणि निघून गेला. सगळे तो गेला त्या दिशेने बघत राहिले.

थोड्या वेळाने उसासा सोडून काका उभे राहिले आणि म्हणाले; "वहिनी, शेवटी तुमचं मत महत्वाचं. पण मला वाटतं तरणी ताठी मुलगी घरात असणं योग्य नाही. नंदन आणि वासंतीच्या वयात फार अंतर नाही. उद्या नको ते काही घडलं तर त्या मुलीला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. ठरवा काय ते. आम्ही देखील उद्या निघू. तेराव्याला येऊ तोपर्यंत ठरवा म्हणजे झालं." असं म्हणून काका देखील गेले. त्यांच्या पाठोपाठ त्यांची बायको देखील उठली.

काका गेल्यावर आत्याने विहिनीच्या खांद्यावर थोपटल आणि म्हणाली; "तुम्ही खरंच विचार करा ह वहिनी. तसं एक सांगू का? मी माझ्याकडे नेईन वासंतीला हवं तर. तुम्हाला तर माहीत आहे आमचा वाडा किती मोठा आहे; घरात आला गेला पण खूप. सासरे सरपंच आहेत माझे. घरात काम खूप असतं. नोकर कितीही ठेवले तरी घरचं माणूस लागतंच न. वासंती आली तर मला मदतच होईल मला." तिचं बोलणं ऐकून नंदन एकदम उभा राहिला आणि आत्याकडे चिडून बघायला लागला. नंदनच्या आईने एकदा नंदनकडे बघितलं आणि म्हणाली; "ठीक आहे वन्स. मी विचार करीन." तिचं बोलणं ऐकून तर नंदन पुरता भडकला; "आई कसला विचार करणार आहेस? वासंती इथे राहू शकते. हे तिचं घर आहे." असं म्हणून तिथून रागारागाने निघून गेला.

क्रमशः

No comments:

Post a Comment