Friday, April 29, 2022

अनाहत सत्य (भाग 22)

 अनाहत सत्य


भाग 22

तीक्ष्णाने भिमाकडे आणि अपालाकडे निरखून बघितलं आणि ती मागे फिरली. तीक्ष्णाने ज्यांचा भूतप्रमुख म्हणून उल्लेख केला होता त्या सोनेरी दंडक हाती धरलेल्या बुरखाधारी उंच व्यक्तींनी अपालाच्या दिशेने मान फिरवली. त्यांचे डोळे दिसत नव्हते; पण तरीही अपाला जे समजायचं ते समजली आणि भिमाकडे किंवा गोविंद, नाथाकडे एकदाही न बघता ती त्यांच्या दिशेने चालू पडली. ते सगळेच तिथून गेले आणि भीमाने गोविंद आणि नाथाकडे बघितलं. गोविंद देखील भिमाकडे बघत होता.

"हे काय घडत होतं नक्की भीमा?" गोविंदने अत्यंत शांत आवाजात विचारलं.

"कुठे काय?" भीमाने आवाजावर काबू आणत म्हंटलं. त्याला खात्री होती की गोविंदला काहीच आठवत नसणार आहे. कदाचित केवळ काही क्षण गेले असल्याने तो धुसंर असं जे आठवतं आहे त्यावरून काहीतरी विचारतो आहे.

नाथ देखील त्याच्या अवस्थेतून जागा होत होता; त्याने गोविंदचा प्रश्न ऐकला होता. त्यामुळे गोंधळून त्याने गोविंदला विचारलं; "राजकुमार, आपण कशाबद्दल बोलता आहात?"

नाथाकडे बघत गोविंद शांतपणे म्हणाला; "आत्ता इथे जे काही घडलं त्याबद्दल विचारतो आहे मी नाथा."

"काय घडलं इथे?" नाथाने अजूनच गोंधळात विचारलं. गोविंदने त्यांच्याकडे नजर उचलून बघितलं आणि म्हणाला; "नाथ, कुंजर कुठे आहे ते बघतोस का? अपाला देखील दिसत नाहीय इथे. तिच्या सोबत असला तर ठीक.... पण तुला माहीत आहे; तो म्हणजे एक वावटळ आहे. कुठेतरी भिरभिरत जाईल आणि कळणार देखील नाही आपल्याला." गोविंदचं बोलणं ऐकून नाथा हसला आणि म्हणाला; "खरं आहे तुमचं राजकुमार. शेवटी तुमचं रक्त आहे त्याच्यात. आणतो शोधून त्याला." एवढं बोलून नाथाने भिमाकडे हसून बघितलं आणि तिथून निघाला. नाथ तिथून जाताच गोविंदने त्याचा पाय भीमाच्या दिशेने वळवला.

"राजकुमार! आपल्या पायाला मोठीच जखम झाली आहे. आपण बसा. मी उपाय करतो." असं म्हणत भीमाने गोविंदला बसायला मदत केली आणि त्याच्या जखमेचा अंदाज घ्यायला त्याच्या पायाजवळ बसला.

"भीमा, आत्ता जे काही घडलं त्यातला एकही क्षण मी विसरलेलो नाही." गोविंद अजूनही शांतच होता. मात्र त्याच्या या वाक्याने भीमा खरोखरच दचकला आणि त्याने झटकन गोविंदकडे बघितलं.

"तुझ्या अजूनही लक्षात नाही आलेलं; भीमा... तीक्ष्णा येण्याच्या अगोदर आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलत होतो. तुमचं सत्य तुम्ही मला आणि नाथाला सांगितलंत अर्थात.... जितकं तुमची इच्छा आहे तितकंच आणि मला जेवढं झेपेल तेवढंच. पण त्यातूनही जे समजायला हवं ते मी समजलो होतो. त्यामुळे तीक्ष्णा आली त्यावेळी तिच्या मागे उभ्या त्या व्यक्तींना बघितल्या क्षणी मी समोरच्या एका अणुकुचीदार दगडावर पाय रोवला. मला खात्री होती आता इथे असं काही घडणार जे मी किंवा नाथाने बघितलं किंवा ऐकलं नाही पाहिजे. म्हणजेच कदाचित आम्ही बघत असूनही आणि ऐकत असूनही आमची मती गुंग होऊन जाईल आणि नंतर आम्हाला काहीही आठवणार नाही. जर माझ्या शरीराला जखम झाली तर माझं लक्ष विचलित राहील आणि कदाचित जे घडतं आहे ते मी जाणिवेच्या आत राहून समजून घेऊ शकेन; असा मला अंदाज होता. म्हणून मग त्या अणुकुचिदार दगडावर पाय रोवून मी जखम करून घेतली." गोविंद काहीसं हसत म्हणाला.

"राजकुमार, तुमचा अंदाज अगदी योग्य होता. हे खरंच आहे की इथे जे काही घडलं आणि बोललं गेलं ते आता नाथाला कधीच आठवणार नाही; आणि तुम्ही कधीच विसरणार नाही." भीमा देखील गोविंद सोबत हसत म्हणाला.

"भिमा.... काय आहे हे सगळं नक्की? मला सांगशील का?" गोविंदने भीमाचा हात हातात घेत विचारलं.

"राजकुमार गोविंद, तुम्ही असं काही कराल असा विचार देखील माझ्या मनात नव्हता आला. परंतु आता जेव्हा तुम्ही मला हे सगळं सांगता आहात तेव्हा मला पटतं आहे की संपूर्ण सत्य समजून घेणं हा तुमचा अधिकार आहे. राजकुमार, तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला देतो. भागीनेय तीक्ष्णा आणि अपाला यांच्यामध्ये सतत उडणारे खटके तर तुम्ही बघतच आहात. त्यामागचं एक अत्यंत महत्वाचं कारण हे आहे की भागीनेय तीक्ष्णा या अपालाच्या मार्गदर्शक राहिल्या आहेत. त्यामुळे गेल्या हजारो वर्षांमध्ये दोघींमध्ये एक आंतरदुवा निर्माण झाला आहे. त्या दोघींनाही एकमेकींचे विचार समजतात. याचा उपयोग त्यांनी विविध कामांमध्ये कायम केला आहे. त्यांच्या कृती एकमेकांना पूरक राहिल्या आहेत कायम. म्हणूनच इथल्या नक्षत्र जोडणीचं काम भागीनेय तीक्ष्णाच्या हाती सुपूर्द करताना भूगर्भातील आमच्या नगराच्या वायुवीजनाची जवाबदारी आमच्या भूतप्रमुखांनी अपालाकडे दिली. तुम्ही येईपर्यंत काम अत्यंत योग्य प्रकारे झाले. त्यानंतर आपण इथे आलात राजकुमार...."

"हो! पण मी इथे यावं ही तीक्ष्णाची इच्छा होती. तसं तिने महाराजांकडे बोलून दाखवलं होतं. तीक्ष्णाच्या इच्छेचा मान ठेऊन महाराजांनी मला इथे पाठवलं होतं." गोविंद म्हणाला.

"हो! कारण तो आमच्या प्रमुखांचा निर्णय होता. सुरवातीला भागीनेय तीक्ष्णाला देखील हरकत नव्हती. पण तुम्ही आलात आणि हळूहळू अपाला आणि तुमच्यात वेगळे बंध निर्माण व्हायला लागले. भागीनेय तीक्ष्णा यांनी त्याकडे देखील दुर्लक्ष केलं. कारण आम्ही आता अशा मानसिक स्थितीला पोहोचलो आहोत की भावनिक गुंतवणूक हा भाग आमच्या मनात येत नाही. मात्र शारीरिक गरजा आमच्या देखील आहेतच. त्यामूळे जर कधी असे कोणी जवळ आले तर आमची हरकत नसते. मात्र अपाला हळूहळू तुमच्यामध्ये गुंतायला लागली. तिने कुंजरला जन्म दिला. त्यानंतर भागीनेय तीक्ष्णा यांच्या लक्षात आलं की अपाला भावनिकतेच्या आहारी जाऊन काही वेगळे निर्णय घेऊ शकते." भीमा बोलत होता. त्याला थांबवून गोविंदने विचारलं; "वेगळे निर्णय? तुला नक्की काय म्हणायचं आहे भीमा. तू मला गेली काही वर्ष ओळ्खतोस. मी कधीही अपालाच्या कामआड़ आलो का?"

"राजकुमार, विषय तिच्या कामाचा नाही. अपाला कधीच तिच्या कामात कुचराई करणार नाही याची सगळ्यांनाच कल्पना आहे. उलट तिने जे काम केलं आहे ते अत्यंत योग्य आहे. राजकुमार तुम्हाला सांगितल्या प्रमाणे.... या ठिकाणाच्या खालीच आमचं नगर वसलेलं आहे. आमच्या नगराचं वायुवीजन अयोग्य झाल्यामुळे अनेकांना शारीरिक व्याधी निर्माण व्हायला लागल्या आहेत..." भीमा सांगत होता.

"अरे पण थोड्याच वेळापूर्वी तुम्ही मला म्हणालात की तुम्हाला मृत्यू नाही." गोविंदने गोंधळलेल्या आवाजात विचारलं.

"खरंय! आम्हाला मृत्यू नाही. पण म्हणून शारीरिक व्याधी नाहीत असं नाही. राजकुमार उलट असा विचार करा की एका शरीराला मृत्यू नाही; पण शारीरिक व्याधी आहे. हे किती जास्त त्रासदायक होईल." भीमा म्हणाला. मान हलवत गोविंदने होकार दिला. "खरंय रे. असं जगणं कोणालाही नकोसं होईल." गोविंद म्हणाला.

"म्हणूनच अनेक स्थापत्य दुरुस्त्या करणं आवश्यक होतं. कदाचित तुम्ही म्हणाल आम्ही असं भूगर्भात का राहातो? त्याचं कारण देखील तितकंच महत्वाचं आहे राजकुमार. या सुंदर शामल आणि मोहक भूमीवर राहिलं की हळूहळू अनेक इच्छा निर्माण व्हायला लागतात. हळूहळू इच्छांचं रूपांतर प्रत्येक गोष्ट हक्काची किंवा मालकीची व्हावी याकडे होतं. हा प्रवास अंतहीन असतो... किंवा स्वतःचा अंत झाल्यानंतरच थांबणारा असतो. त्यामुळे या इच्छा-आकांशांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी आम्ही भूमिगत असणं जास्त योग्य मानतो." भीमा म्हणाला.

"पण इच्छा, आकांशा, भावना असणं वाईट नाही न?" गोविंद म्हणाला.

"नाहीच. वाईट नाहीच. पण अतिरेक वाईट. दुर्दैवाने मानवाला याची जाणीव नाही. कारण इतर कोणत्याही सजीवाकडे जे नाही ते आपल्याकडे आहे. विकसित बुद्धी. त्या बुद्धीचा आपण जितका जास्त वापर करतो तितकी मानवीय संस्कृती प्रगत होते... प्रत्येक प्रगतीचा एक परमोच्च बिंदू असतो आणि मग अधोगती असते. त्याप्रमाणे मानवाची अधोगती होते. हे चक्र या धर्तीच्या निर्मितीपासून सुरू आहे. पण अधोगती नंतर पूर्ण ह्रास होतोच. त्या ह्रासानंतर परत एकदा मानव निर्माण होतोच. त्याकाळात त्याला परत एकदा मार्गावर आणण्याचं काम आम्ही करतो." भीमा गोविंदच्या प्रश्नांना खूप शांतपणे उत्तरं देत होता.

"मग मी इथे यावं यामागे देखील काहीतरी कारण असेलच न?" गोविंदने विचारलं.

"हो! राजकुमार आपण चाणक्य आणि चंद्रगुप्त यांच्याबद्दल काही माहीत आहे?" भीमाने विचारलं.

"अर्थात भीमा. आदरणीय चाणक्य यांच्याविषयी माहिती नसणारे राजघराणे मला तरी माहीत नाही." गोविंद म्हणाला.

"किमान हजार वर्षांपूर्वीचा काळ असल्याने मी विचारलं." भीमा म्हणाला.

गोविंदने काही क्षण विचार केला आणि थेट भीमाच्या डोळ्यात बघत म्हणाला; "भीमा, तुला बरंच काही माहीत आहे. मी समजून घ्यायला उत्सुक आहे. योग्य आहे की नाही ते तू ठरव आणि मला सांग."

"राजकुमार, तुम्ही अत्यंत योग्य आहात याची मला खात्रीच आहे. म्हणूनच मी तुम्हाला म्हंटलं की अत्यंत महत्वाची अशी माहिती देतो. राजकुमार, चाणक्य हे आमच्यापैकीच एक होते. आमच्यामधील एक महान प्रमुख त्याकालामध्ये भूतलावर मानवीय जीवन विकासासाठी आले होते. त्यांच्यामध्ये आणि त्याकाळातील एका अत्यंत प्रगल्भ बुद्धीच्या स्त्रीमध्ये संकर झाला आणि विष्णुगुप्त जन्माला आले. त्यांनी निर्माण केलेला इतिहास हा अजरामर आहे. त्यांच्यापासून सुरू झालेली मानवीय जीवनाची प्रगती आजही योग्य दिशेने होते आहे. मात्र आता त्याला काही वेगळे वळण असणे आवश्यक आहे. त्यासाठीच योग्य व्यक्तीचा शोध आम्ही घेत आहोत. राजकुमार, तुम्हाला माहीत असलेला हा प्रदेश आणि ही भूमी.... याहूनही खूप जास्त विस्तार आहे तिचा. हा शोध केवळ इथेच नाही तर या भूतलावर विविध ठिकाणी घेण्यात येत आहे. गरज आहे ती काळाची. या शोधांतर्गत भागीनेय तीक्ष्णाने तुमच्या बद्दलची माहिती आमच्या भूतप्रमुखांना दिली. त्यांनी सर्वात्मक विचार करून तुमची निवड करण्यासाठीची चाचणी घेण्यास भागीनेय तीक्ष्णाला सांगितले. मात्र तुम्ही इथे आलात आणि अपालाच्या प्रेमात पडलात. तुम्ही कर्तव्य आणि भावना यामध्ये भावनेला निवडलंत आणि इथेच सगळं बदलून गेलं.

मी सांगितल्याप्रमाणे भागीनेय तीक्ष्णा ही अपालाची मार्गदर्शक आहे. दोघींनी आजवर अनेक उत्तम कामे सहज पार पाडली आहेत. मात्र आता अपालाच्या मनात तुमच्या सोबत मानवीय आयुष्य जगण्याचा विचार आहे. तिला मृत्यू नसल्याने कदाचित एका काळानंतर ती कोणत्यातरी मार्गाने परत एकदा आमच्याकडे परत येईल. परंतु तोपर्यंत ती तुमच्या आयुष्यात नाही याबद्दलची तुमच्या मनाची तयारी झालेली असेल; याची ती काळजी घेईल. हा अपालाच्या मनातील विचार भागीनेय तीक्ष्णाच्या लक्षात आला. ते तिला मान्य नाही. अपालाने परत आमच्यासोबत जाणेच योग्य असं तिचं मत आहे. अपाला ते मान्य करत नाही आहे. जर भागीनेय तीक्ष्णाने आग्रह धरला तर अपाला काहीतरी असं पाऊल उचलेल की ज्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतील. हे आमच्या भूतप्रमुखाना लक्षात आल्याने कदाचित त्यांनी इथले काम पूर्णत्वास नेण्यासंदर्भात आग्रह धरला आहे. तुम्ही काही वेळापूर्वी जो संवाद ऐकलात तो याविषयीच होता." भीमा बोलायचा थांबला आणि गोविंद विचारात पडला.

हे सगळेच आपल्यापेक्षा वेगळे आहेत हे निश्चित. पण अपाला नक्की वेगळी आहे. आपली निवड यांनी ज्यासाठी केली ती ऊर्जा आपल्यात नाही हे देखील यांच्या लक्षात आतापर्यंत आले असेल. याचाच अर्थ त्यांना आता आपली गरज नाही. त्यांचं काम पूर्ण होत आलं आहे म्हणजे महाराजांची देखील त्यांना गरज उरलेली नाही. याचा अर्थ भावनांवर विजय मिळवून भावनाहीन आयुष्य जगणारे हे मानव.... परत एकदा त्यांच्या त्या निरस आयुष्यात परत जाण्याचा विचार करत आहेत. गोविंदच्या मनातील विचार हळूहळू स्पष्ट व्हायला लागले होते. एका क्षणी त्याच्या लक्षात आलं.......... हे मानव परत जाण्याचा विचार करत आहेत. म्हणजेच आपली अपाला आपल्यापासून दूर होतंर आहे. हा विचार मनात आल्याक्षणी गोविंद एकदम गडबडून गेला आणि त्याच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं.

"राजकुमार, तुम्ही योग्य विचार करत आहात. येत्या काळामध्ये अनेक घटना वेगाने घडणार आहेत. त्यासाठी तुम्ही तुमच्या मनाची तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे." भीमाने गोविंदचा हात हातात घेत म्हंटलं.

त्याचा हात घट्ट धरत गोविंद म्हणाला; "भीमा.... खूप काही घडणार आहे ते मला दिसतंच आहे. एक सांग तू कोणाच्या बाजूने उभा आहेस?"

"राजकुमार, अपालासाठी मी काहीही करीन." भीमा म्हणाला.

त्यादोघांमध्ये होणारा संवाद मागील झाडामागे उभं राहून ऐकणारा नाथ एकदम ताठ झाला आणि मागल्या पावली झपाझप निघाला.

क्रमशः

No comments:

Post a Comment