Friday, August 21, 2020

सिझोफ्रेनिया..... आजार की परसेप्शन!(?)(भाग 3)

 

सिझोफ्रेनिया..... आजार की परसेप्शन!(?)

भाग 3

ती शांत झालेली बघून तिच्या वडिलांनी तिला हाक मारली. "गिता.... बेटा.... काय झालं?"

"बाबा तुम्ही म्हणता ते खरं आहे. माझ्या लक्षात नाही आलं. नक्कीच विचार करण्यासारखा आहे हा मुद्दा. पण बाबा माझं म्हणणं वेगळंच आहे. हे मान्य की विकी एक पेशंट आहे. त्याने बर झाल्याची बतावणी बेमालूमपणे आजवर केली आहे. हे ही खरं की जर त्याची संपूर्ण केस स्टडी केली तर असा अर्थ निघेल कदाचित की तो कधीच पूर्ण बारा होऊ शकत नाही. पण म्हणून तो एक भाऊक मुलगा आहे आणि तो मला आवडायला लागला आहे; या दोन गोष्टींकडे मी कसं दुर्लक्ष करू?" गिता थोड्या दु:खी स्वरात म्हणाली.

तिचे बाबा तिच्याकडे बघून हसले. "आईचा राग आला आहे ना तुला गीतू?"

"हो!" थोड्या घुश्श्यात गीताने उत्तर दिलं.

बाबांनी तिच्या हातावर थोपटलं. ते म्हणाले,"बेटा ती तुझी आई आहे. विक्रमची नाही. त्यामुळे ती फक्त तुझाच विचार करते आहे न."

"बाबा, जर ती माझा विचार करते आहे तर मग तिला समजलं पाहिजे की मला विकी आवडायला लागला आहे. तिने किती ठाम भूमिका घेतली आहे. तिला माझ्या भावना समजत नाहीत असं नाही मी म्हणत. पण ती विकिचा विचार करायलाच तयार नाही आहे, हे मला खटकत आहे."

"गिता तिच्या बाजूने जर विचार केलास ना तर तुला तिची भूमिका पटेल बेटा. अग, तूच आत्ता म्हणालीस ना की कदाचित विक्रम कधीच बरा होऊ शकणार नाही? अग, मग अशा कायमस्वरूपी पेशंट बरोबर तू तुझं संपूर्ण आयुष्य काढावस अस तिला कसं वाटेल? बरं, तिचं जाऊ दे गिता; एक सायकॉलॉजिस्ट म्हणून तूच मला सांग... जर विक्रम सारखी केस तुझ्याकडे आली आणि असंच एखादी मुलगी तुला भेटायला आली. तिने जर तुला सांगितलं की या मुलाबरोबर मला माझं संपूर्ण आयुष्य काढायचं आहे, तर तू तिला काय सांगशील? भावनिक न होता प्रामाणिक उत्तर दे हं." गीताचे बाबा तिला म्हणाले.

मग मात्र गिता एकदम शांत झाली. थोडा विचार करून ती म्हणाली;"बाबा तुम्ही म्हणता ते खरं आहे. कदाचित मी अशा पेशंट बरोबर संपूर्ण आयुष्य घालवायला कोणा मुलीला सांगणार नाही. पण कोणा एका मुलीत आणि माझ्यात फरक नाही का बाबा? मी स्वतः सायकॉलॉजिस्ट आहे. त्यामुळे तर मी कायम विकिची ट्रीटमेंट निट चालू आहे की नाही यावर कायम लक्ष ठेवू शकेन ना!" गिताच्या या बोलण्याने तिच्या वडिलांच्या एक लक्षात आलं की गिता खरंच बरीच अडकली आहे विक्रांतमध्ये. त्याक्षणी गिता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हे त्यांच्या लक्षात आलं; आणि मात्र त्यांनी त्यांचा पवित्रा बदलला. ते म्हणाले;"ठीक आहे गिता. आपण यावर अजून काही महिन्यांनी बोलू. चालेल का?"

गितालासुद्धा विचार करायला थोडा वेळ हवा होता. ती जरी वडिलांशी वाद घालत असली तरी तिलाही हे पटत होतं की तिची बाजू थिटी आहे. त्यामुळे तिने लगेच ते मान्य केलं.

तिचे बाबा म्हणाले;"गीतू पण मग तू मला शब्द दिला पाहिजेस की तू तुझं मन आणि तुझा पेशा याचा निट समतोल राखशील. बेटा, अजून तर तुझी सुरवात आहे करियरची. त्यामुळे घाई करू नकोस कोणताही निर्णय घेण्याची; एवढंच सांगेन."

गिताला वडिलांच हे सांगणं पटलं. ती म्हणाली;"बाबा, काळजी करू नका. मी निर्णय घेऊन तुम्हाला येऊन सांगितला असं करणार नाही. तुम्ही माझ्या लहानपणापासून घरातला प्रत्येक निर्णय चर्चा करून घेतला आहात; हे मी पाहिलं आहे. आणि माझे विचार आणि मतं तुम्ही प्रामाणिकपणे समजून घ्याल आणि मगच तुमचं मत सांगाल याची मला खात्री आहे. आणि खरं तर मला पण थोडा वेळ हवा आहे विचार करायला."

तिच्या या समजूतदार बोलण्यावर तिचे बाबा हसले... तीसुद्धा हसली आणि बाबांना जाऊन बिलगली.

मध्ये दोन दिवस गिताची तब्बेत बिघडली. त्यामुळे ती क्लिनिकला गेली नव्हती. दिवसभर तशी झोपूनच होती ती. तिच्या आईने तसं कळवलं देखील होत क्लिनिकमध्ये. विक्रांतने गिताला त्याच्या मोबाईलवरून अनेकदा फोन केला होता. पण तापात असल्याने गीता फोन बंद ठेऊन आराम करत होती. दोन दिवसांनी गीताला थोडं बरं वाटत असल्याने ती दिवाणखान्यात बसली होती. त्यावेळी दरवाजाची बेल वाजली आणि तिने दार उघडलं तर दारात विक्रम उभा होता. त्याला अस अचानक घरी आलेलं बघून तिला खूप आश्चर्य वाटलं.

"अरे विकी तू कसा काय आत्ता? क्लिनिकमध्ये नाही गेलास?" तिने त्याला आत घेत विचारलं.

"नाही गेलो. जावसंच नाही वाटलं तू नसताना." असं म्हणून तो क्षणभर शांत बसला आणि मग अचानक तिचे दोन्ही हात धरून त्याने तिला जवळ बसवलं आणि म्हणाला;"गिता मला तू खूप खूप आवडतेस ग. कसं सांगू तुला? अग राजन, प्रकाश आणि हरीने अनेकदा सांगितलं की मी तुझ्याशी बोलण सोडलं पाहिजे. कारण तू कदाचित त्यांना स्वीकारणार नाहीस. पण तरीही आयुष्यात पहिलांदाच..... मी त्यांना न सांगता तुझ्याशी बोलणं चालू ठेवलं आहे. गिता आजवर मी माझ्या मित्रांशी कधीच खोटं बोललो नाही किंवा काही लपवलं नाही. पण तुझा विचार आला ना की तुझं माझ्या आयुष्यात असणं खूप महत्वाचं वाटतं."

विक्रमच्या अशा अचानक झालेल्या उद्रेकामुळे गिता गोंधळली होती. पण मग तिच्या लक्षात आलं की हीच वेळ आहे की विक्रमशी काही गोष्टी बोलता येतील. ती म्हणाली,"विकी मलाही तू खूप आवडतोस. तुलाही हे कळलं आहे. पण हे जे तू सारखं तुझ्या मित्रांना घाबरून असतोस ना ते मला अजिबात पटत नाही. मुळात तुला आणि तुझ्या मित्रांना असं का वाटतं की मी तुला त्यांच्यापासून तोडेन?" अस म्हणून गिताने त्याच्या डोळ्यात खोल बघितलं आणि त्याला विचारलं;"विकी, असं काही आहे का जे तू माझ्यापासून लपवतो आहेस?"

विक्रमच्या मनाचा निर्णय होत नव्हता. खरंच त्याचा जीव गीतामध्ये गुंतला होता. पण अजूनही त्याचा तिच्यावर पूर्ण विश्वास बसला नव्हता.

"ठीक आहे विकी. मी समजू शकते. असा काही विषय असेल जो मला सांगायचा की नाही असा तुझ्या मनात विचार येत असेल; तर ते चुकीचे नाही. मी थांबीन तू आपणहून बोलेपर्यंत." गीता मुद्धाम म्हणाली.

आता मात्र विक्रमच्या डोळ्यात तिला निश्चय दिसला. तो गीताकडे बघत म्हणाला;"गिता मी सिझोफ्रेनियाचा पेशंट आहे; अस डॉक्टर खरात आणि माझ्या वडिलांचं म्हणणं आहे."

तो अशी सुरवात करेल आणि लगेच इतके स्पष्ट बोलेल अस तिला वाटलं नव्हतं. पण म्हणूनच तिच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं, जे आवश्यक होतं. अर्थात एका क्षणात गिता भानावर आली. आता तिची खरी कसोटी होती. तिने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली;"विकी माझी चेष्टा करतो आहेस का? अरे, मी स्वतः सायकॉलॉजिस्ट आहे. मला नसतं का कळलं आतापर्यंत की तू पेशंट आहेस? मुख्य म्हणजे तुला माहित आहे ना की डॉक्टर खरात माझ्या वडिलांचे बेस्ट फ्रेंड आहेत. त्यांनी मला सांगितल नसतं का?"

"गीता त्यांनी तुला तसं सांगितलं नाही कारण त्यांच्या मते मला सिझोफ्रेनिया हा आजार झाला होता. पण आता मी संपूर्ण बरा आहे असं त्यांना आणि बाबांना वाटतं आहे." विक्रम म्हणाला.

"विकी आता मात्र हद्द झाली हं! मला वेडं ठरवण्यासाठी आला आहेस का तू आज? अरे तुला आजार होता; मग तू बरा झालास. काय प्रकार आहे हा?" गीता त्याला बोलतं करण्यासाठी म्हणाली.

"अस काय करतेस गिता? ऐकून तर घे माझं. माझी आई गेली ना त्यावेळी मी मनाने मोडून गेलो होतो. अग सुरवातीला मला आधार द्यायला माझी आई यायची माझ्याजवळ. मला धीर द्यायची; म्हणायची बेटा मन घट्ट कर; असा रडू नकोस. आता तुझ्या बाबांसाठी तूच आधार आहेस. आजी तुझं किंवा बाबांचं काही करणार नाही. उलट ती त्यांनासुद्धा बोलेल माझ्यावरून. तू रडत राहिलास तर तुलासुद्धा रागावेल. म्हणून रडू नकोस. बाबांना सांभाळ. सुरवातीला ती रोज यायची. पण मग एक दिवस म्हणाली; मी काही अशी रोज नाही येऊ शकणार तुला भेटायला. गिता, खरं सांगू का... मी काही खूप लहान नव्हतो माझी आई गेली तेव्हा. मला सगळं कळत होतं. बाबा म्हणायचे आई आता येऊ शकत नाही. पण हे देखील खरं आहे की माझी आई यायची. आणि ती गेली की मला खूप रडायला यायचं. आजीला नाही आवडायचं मी रडलेलं. म्हणून मग आई येऊन गेली की मी खाली जायचो मित्रांकडे. अगदी बाबा घरी येईपर्यंत मी त्यांच्याबरोबर असायचो. त्या तिघांनी मला खूप सांभाळलं ग त्यावेळी. अग, हरीला तर माझी आई एकदा घरातून बाहेर पडताना दिसलीसुद्धा होती. तोच म्हणाला होता मला. पण मी कितीही सांगितलं तरी माझ्या बाबांचा माझ्यावर विश्वास बसला नाही. अग माझी आई म्हणजे त्यांची पत्नी ना. पण तरीही ती मला भेटायला येऊ शकते; हे मान्य करायला ते तयार नव्हते. पण मग मी त्यांच्याशी कधी वाद नाही घातला. पण मग कधीतरी त्यांनी माझे मित्रदेखील नाहीत असं म्हणायला सुरवात केली. कुठूनतरी डॉक्टर खरातांना शोधून काढलं आणि मला तिथे घेऊन गेले. डॉक्टर खरातांनी अगोदर असं दाखवलं की त्यांचा माझ्यावर विश्वास आहे; आणि माझ्याकडून सगळं काढून घेतललं. मग मात्र त्यांनीसुद्धा माझ्या बाबांसारखं मला सांगायला सुरवात केली की माझी आई येतंच नाही. काही दिवसांनी आम्ही घर बदलंल. तोपर्यंत मला लक्षात आलं होत की माझ्या बाबांना बरं वाटायला हवं असेल तर मी आई भेटते हे म्हणणं बंद करायला हवं. मी आईबद्दल बोलायला लागलो की बाबा अस्वस्थ व्हायचे न. आणि आईने देखील मला बाबांना सांभाळायला सांगितलं होतं. शिवाय नवीन घरात आम्ही आलो आणि आईने येण बंद केलं. अग मी तिला नवा पत्ता द्यायला विसरलो होतो. त्यामुळे ती या नवीन घरी येऊ शकत नसेल. हळूहळू मी आईचं जाणं स्वीकारलं आणि मग हळूहळू सगळं ठीक होत गेलं."

गिता त्याचं म्हणणं नीट ऐकत होती. आणि तिला धक्यांवर धक्के बसत होते. तिच्या लक्षात आलं होतं की विक्रम कधीच बरा झाला नव्हता. विक्रम इतक्या सफाईने स्वतःच्या खऱ्या विचारांना लपवत होता की डॉक्टर खरातांसारखे अनुभवी आणि यशस्वी डॉक्टरसुद्धा तो बरा झाला आहे असं समजत होते.

विक्रम आपल्याच तंद्रीत बोलत होता. "गिता, मी नवीन घरी रहायला आलो ना तेव्हा जसं मी आईला नवा पत्ता द्यायला विसरलो होतो तसा माझ्या मित्रांना देखील नवा पत्ता द्यायला विसरलो होतो. पण माझे मित्र खरंच ग्रेट आहेत. त्यांनी मला शोधून काढलं; आणि मग ते अधून मधून थोडा वेळ मला भेटायला आमच्या नवीन घराकडे यायला लागले. यावेळी मात्र मी माझ्या बाबांना काही सांगतीलं नाही. एकतर त्यांनी परत घर आणि शाळा बदलली असती आणि परत मला सांगायला सुरवात केली असती की जशी आई नाही तसे हे मित्रदेखील नाहीत. सगळं कसं सुरळीत चाललं होतं. दहावी नंतर त्या तिघांनी माझ्याच कॉलेजमध्ये दाखला घेतला. मी त्या दिवशी खूप खुश होतो. त्याच आनंदात मी बाबांना सांगितलं की माझे तिन्ही बेस्ट फ्रेंड्स माझ्याच बरोबर माझ्याच कॉलेजमध्ये आहेत आणि मग माझ्या लक्षात माझी चूक आली. तरी राजन म्हणाला होता की बाबांना आमच्याबद्यल सांगू नकोस. त्यांना आम्ही आवडत नाही, त्यामुळे ते परत तुला आमच्यापासून तोडायचा प्रयत्न करतील. पण चुकून मी बोलून गेलो होतो.

बाबांनी पूर्वीप्रमाणे परत मला डॉक्टर खरातांकडे नेलं. डॉक्टर खरातांनी परत मला सांगायला सुरवात केली की माझे मित्र नाहीतच. त्यांचं म्हणणं खरं करण्यासाठी त्यांनी मला सांगितलं की मीचं आजारी आहे आणि माझ्या आजाराचं नाव सिझोफ्रेनिया आहे. अगोदर मला खूप राग आला होता त्यांचा. पण मग मी जेव्हा राजन, प्रकाश आणि हरीशी बोललो तेव्हा माझ्या मनातले प्रश्नच सुटले."

"अरे वा! सुटले तर! काय उपाय मिळाला तुला?" गीताने मुद्दाम त्याची तंद्री भंग केली. बोलतांना अडवल्यानंतर विक्रम काय करतो ते तिला पहायचे होते. तिच्या मते तो गोंधळायला हवा होता. किमान त्याची लिंक तोडली म्हणून तिच्यावर थोडा वैतागायला हवा होता. पण असं काहीच झालं नाही. विक्रमने तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला;"अग गिता असं बघ, तुझ्या हातात आत्ता ग्लास आहे की नाही?" गिताने ग्लासकडे बघितलं आणि म्हणाली;"हो विकी! तुलासुद्धा तो दिसतो आहे की नाही?"

मात्र त्यावर विक्रमच उत्तर तिला पूर्णपणे अनपेक्षित होत. "गिता, तुझ्या हातात ग्लास नाही आहे. मी फक्त कल्पना करतो आहे की ग्लास आहे."

त्याच्या त्या उत्तराने गीताला एकदम धक्का बसला. कारण ग्लास तिच्याच हातात होता. क्षणभर तिला वाटलं की तिने कदाचित तो समोरच्या टीपॉयवर ठेवलाय की काय. पण मग त्या ग्लासचा स्पर्श विक्रमला करत ती म्हणाली;"विक्रम, अरे तुला स्पर्श जाणवत नाही का? हा बघ, तुझ्या हाताला मी हा ग्लास लावला आहे."

"तू म्हणतेस तर हो... होतोय स्पर्श माझ्या हाताला." विक्रम म्हणाला.

आता त्याच्या अशा उत्तराने गिता निरुत्तर झाली. ती शांतपणे विक्रमकडे बघत बसून राहिली. कारण तिला लक्षात आलं की जर विक्रम असं काहीतरी उत्तर देतो आहे तर त्याचा अर्थ त्याला त्याचा मुद्दा कदाचित पटवायचा आहे.

"विक्रम मला कळतं आहे की तुला ग्लास दिसतो आहे. नाहीतर तू त्याचा उल्लेखच केला नसतास. पण तुला तुझा मुद्दा मला सांगायचा आहे. म्हणूनच तू हा ग्लास माझ्या हातात असणं हे फक्त माझ म्हणणं आहे असं म्हणतो आहेस. तू बोल विक्रम; मी ऐकते आहे." गिता म्हणाली आणि विक्रम हसला.

"गीतू तू ना मला ओळखायला लागली आहेस माझ्या मित्रांसारखी! तर, तुझ्या हातात ग्लास आहे असं तू म्हणते आहेस. किंवा समजा आत्ता इथे अजून ४-५ माणसं असती आणि त्यांनी म्हंटलं असतं... तर मग खरंच तुझ्या हातात ग्लास आहे हे सिद्ध झालं असतं. बरोबर? आणि समजा तू एकटीनेच म्हंटलं असतंस की तुझ्या हातात ग्लास आहे पण बाकीच्यांनी म्हंटलं असतं की तुझ्या हातात असं काहीच नाही... तर मग पलीकडच्या खोलीतल्या लोकांना काय वाटलं असतं?" विक्रमने तिला विचारलं.

गिता एकदम गोंधळली. "अरे काय म्हणतो आहेस तू?" तिने विक्रमला विचारलं.

"अग, असं काय करतेस? बरं! परत सांगतो. थोडं वेगळ्या पद्धतीने. तू जर एखादी गोष्ट या खोलीत आहे म्हणते आहेस आणि इतरांनी दुजोरा दिला, तर तू जे म्हणते आहेस ते खरं ठरतं; बरोबर? पण जर तू म्हणते आहेस त्याला दुजोरा नाही मिळाला तर मग तू कितीही ओरडून सांगितलंस तरी ते खरं ठरत नाही. हो की नाही?" विक्रमने परत एकदा त्याचं म्हणणं सांगायचा प्रयत्न केला.

गिताला आता त्याचा मुद्दा लक्षात आला. "विकी, तू म्हणतो आहेस ते बरोबर आहे. पण मुळात माझ्या हातात ग्लास आहे हे इतरांना दिसत असतंचं नं. त्यामुळे जर त्यांनी ते नाकारलं तर मी ते सिद्ध करू शकते न? त्या ग्लासचा स्पर्श त्यांच्या हाताला करून. किंवा काचेचा ग्लास असल्याने तो जमिनीवर फोडून... त्यामुळे केवळ मी म्हणते म्हणून हे सिद्ध होत नाही की ग्लास आहे; तर त्याच्या अस्तित्वाला सिद्ध केल्यानंतर ते मान्य होतं." गीताने एकूण चर्चेला तिला हवं तसं वळण द्यायला सुरवात केली. तिच्या एक लक्षात आलं होतं की विक्रमच्या विचारांना योग्य मार्गावर आणणं; आणि तेही इतर कोणी नाही तर त्याने स्वतःच; हाच एक उपाय आहे तो बरा होण्यासाठी.

"विकी तो ग्लास आणि त्याचं असणं याबद्धल आपण नंतर बोलू. अगोदर तू मला जे सांगत होतास ते पूर्ण कर बघू. तुझं आणि तुझ्या मित्रांचं असं काय बोलणं झाल रे की सगळे प्रश्नच सुटले." तिने त्याला आठवण करून दिली.

"गिता तुलासुद्धा मी सिझोफ्रेनिक वाटतो आहे का?" अचानक विक्रमने तिला विचारलं.

"विकी, मी जे विचारते आहे ते सोडून तू असं मलाच का सारखे प्रश्न विचारतो आहेस? जर तुला नसेल सांगायचं की तू आणि तुझ्या मित्रांनी मिळून तो प्रश्न कसा सोडवला तर राहु दे. मी आग्रह करणार नाही. पण मी तुला हे सगळं माझ्या उत्सुकतेमुळे विचारते आहे." त्याच्या प्रश्नाचं उत्तर टाळत गीताने थोडा त्याच्या भावनांना हात घातला. आणि त्याचा योग्य तोच परिणाम झाला.

"असं नाही ग. पण तू अगदी डॉक्टरच्या भूमिकेतून विचारल्यासारखं विचारते आहेस म्हणून मला वाटलं." विक्रम नरमून म्हणाला आणि सांगायला लागला;"अग उत्तर सोप्प होतं. आम्ही सर्वांनी मिळून चर्चा करून ते शोधलं होतं. मी पूर्वी प्रमाणेच डॉक्टर खरातांचं म्हणणं मान्य करायचं. ही पहिली गोष्ट. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्यांच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारे सिझोफ्रेनिया आजाराचा अभ्यास स्वतःच करायचा. उत्तर तर मिळालं होतं. फक्त ते कसं करायचं ते कळत नव्हतं. कारण मी जरी अभ्यास करायचा म्हंटलं तरी बाबांचं माझ्यावर बारीक लक्ष असणार. त्यात डॉक्टर आता परत औषध सुरु करणार. म्हणजे एकतर मी थोडा जास्त झोपायला लागणार, जेवण-खाण नकोस होणार. उत्साह नाही वाटणार.... हे माझ्या लक्षात आलं होतं. त्यामुळे काय करावं याचा मी विचारच करत होतो; आणि उत्तर डॉक्टर खरातांनीच दिलं. त्यांनी मला विचारलं की मी त्यांच्याच क्लिनिकमध्ये काम करेन का! मी लगेच हो म्हणून टाकलं. पण जर मला केसेसचा अभ्यास करायचा असला तर ते मी एकटा असतानाच शक्य होतं. म्हणून मग मी पोस्ट ग्रजुएशन करणार आहे असं सांगून क्लिनिक बंद असताना आत थांबायची परवानगी घेतली.

गिता त्यानंतर मात्र मी खूप प्रामाणिकपणे अभ्यास केला या आजाराचा. केसेसचा खजिनाच होता डॉक्टर खरातांच्या क्लिनिकमध्ये. शिवाय इंटरनेट होताच; जास्तीच्या माहितीसाठी.

त्या अभ्यासातूनच मला कळलं की सिझोफ्रेनिया हा विचारांचा आजार आहे. हा काही दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाचा विषय नाही. किंवा हा आजार असणारी व्यक्ती समाजासाठी भयावह देखील नसते. अनेकदा हा आजार अनेक पिढ्यांअगोदर त्या घरातील कोणालातरी झालेला असतो. म्हणजे किमान ७०% वेळा असं असतं. मेंदूमधल्या काही रसायनांच्या असंतुलनामुळे हा आजार होऊ शकतो. serotonin आणि dopaminc अशी त्या केमिकल्सची नावं आहेत. त्यांच्या असंतुलनामुळे मेंदू विचित्र प्रतिक्रिया देतो. हा आजार असणाऱ्यांना आवाज, वास, दृष्टी, चव या बाबतीत भ्रम होऊ शकतात.

ही माहिती कळल्यानंतर मी स्वतःचा अभ्यास सुरू केला. मुळात बाबांना गप्पांमधून विचारलं की त्यांच्या किंवा आईकडंच्या नात्यामध्ये मागच्या पिढीत हा आजार कोणाला कधी झाला होता का? पण तसं काही नव्हतं. मग मी स्वतःच्या serotonin आणि dopaminc टेस्ट्स करून घेतल्या. बाबांच्या किंवा डॉक्टरांच्या नकळत हं. त्यात थोडं असंतुलन आलं खरं. पण हे असंतुलन अस्वस्थ मनःस्थितीत येऊ शकतं हे मी शोधून काढलं. बाबांना मी आजारी आहे असं वाटतं यामुळे मी सतत अस्वस्थ तर होतोचं न. म्हणजे असंतुलन असूनसुद्धा मी सिझोफ्रेनिक आहे असं म्हणणं योग्य होत नव्हतं. बरं वास, दृष्टी, चव, आवाज या बाबतीत मला भ्रम देखील नाहीत. डॉक्टर खरातांच्या क्लिनिककडे जातांना ती कचऱ्याची पेटी आहे तिथून येताना मला खूप त्रास व्हायचा वासाचा. एकदा तिथून जातांना मी मुद्धाम बाबांना म्हणालो किती छान वाटतंय नं? तर ते म्हणाले हा वास सोडला तर सगळं छान आहे. अशाच प्रकारे मी दृष्टी, चव आणि आवाजाच्या बाबतीत खात्री केली. गीतू, इतरांना प्रत्येक गोष्ट जशी दिसते किंवा जाणवते तशीच ती मला दिसते किंवा जाणवते. मग मी समजून चुकलो की मला असा कोणताही आजार नाही आहे." विक्रमचं ते बोलणं ऐकून गिताला काय बोलावं तेच कळेना.

एखाद्या अत्यंत हुशार आणि सयुक्तिक विचार करणाऱ्या व्यक्तीसारखा विक्रम बोलत होता. मुख्य म्हणजे त्याचे मुद्दे सरळ खोडून काढणं अवघड होतं हे गिताच्या लक्षात आलं. त्याने सिझोफ्रेनिया या विषयाचा खूप चांगला अभ्यास केला होता आणि त्याच्या वागण्याचं स्पष्टीकरण त्याने स्वतःलाच देऊन तेच योग्य आहे अशी समजूत देखील करून घेतली होत. बरं, त्याने याविषयी आत्ता जे सांगितलं होतं ते वैज्ञानिक निकषावर बरोबरच होतं. त्याला त्याचे मित्र दिसतात हा दृष्टी भ्रम आहे हे त्याला मान्यच नव्हतं; त्यामुळे त्याविषयी तो बोलायलाच तयार नव्हता.

आता गीता समोर एक खूप मोठं आव्हान उभं राहीलं होतं. तिला विक्रमला संशय येऊ न देता हे समजावायचं होतं की त्याचे मित्र मुळात नाहीच आहेत. म्हणजे त्याला दृष्टिभ्रम आहे. हे एक आव्हान एवढ्यासाठी होतं कारण आता विक्रमला याविषयातील माहिती होती; त्यामुळे गीताने कितीही प्रयत्न केला असता तरी तिचे मुद्दे तो खोडून काढू शकत होता.

क्रमशः

Friday, August 14, 2020

सिझोफ्रेनिया..... आजार की परसेप्शन!(?) (भाग 2)

 सिझोफ्रेनिया..... आजार की परसेप्शन!(?) 


भाग 2

ठरल्याप्रमाणे गिता लंचच्या वेळी बाहेर पडली. दुपारी क्लिनिक बंद असायचं. परंतु विक्रम तिथे बसून सगळे रिपोर्ट्स टाईप करायचा. म्हणून मग गीता रोजच एकटी निघायची. त्यामुळे विक्रमला काही त्यात वेगळ नाही वाटलं.

ठरल्याप्रमाणे गिता डॉक्टर खरातांना भेटली. त्यांच्याबरोबर अजून एक गृहस्थ होते. हॉटेलमध्ये बसल्यावर डॉक्टरांनी त्यांची ओळख गिताला करून दिली. ते विक्रमचे वडील होते. त्यांना डॉक्टरांनी बोलावलेलं पाहून गिताला खूप आश्चर्य वाटलं. डॉक्टर म्हणाले;"गिता, हे विक्रमचे वडील. सुहास राजे! तुझ्या बोलण्यात असा उल्लेख होता की वडील बोलवायला येईपर्यंत विक्रम गच्चीत मित्रांबरोबर बसला होता. बरोबर? तू ते सांगितलंस तेव्हाच माझ्या मनात आलं की असं काही जर विक्रम म्हणाला असेल तर त्याच्या वडिलांनी मला कसं काहीच कळवलं नाही? म्हणून मग मी त्यांना फोन करून इथे बोलावून घेतलं. एकतर आपलं बोलणं त्यांच्या समोर झालेलं बरं म्हणजे त्यांना ही जर काही सांगायचं असेल तर ते सांगतील आणि मुख्य म्हणजे विक्रमच्या वागण्यात काही बदल झालेच असतील आणि त्यांना ते कळले नसतील तर आता ते निट लक्ष ठेऊ शकतील.

तर मी तुला सांगितलं की विक्रमची केस माझ्याकडे कशी आली आणि तोवरचे त्याच्याबाबातीतले अनुभव ते देखील मी तुला सांगितले. विक्रम त्यावेळेस खूपच लहान होता. त्यामुळे त्याला कोणता मानसिक आजार आहे हे सांगूनही त्याला समजले नसते. आणि जर ही गोष्ट बाहेर पडली असती तर त्याच्या एकूणच आयुष्यावर यासर्वाचा परिणाम झाला असता. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की सुरवातीला विक्रमला त्याचे मित्र म्हणजे त्याच्या मनातली कल्पना आहे असं सांगायचं नाही. कारण त्यावेळी विक्रम त्याचे विचार त्याच्या या नसलेल्या मित्रांच्या नावाने सांगत होता."

"म्हणजे नक्की काय काका?" गीताने विचारले.

संभाषणात प्रथमच भाग घेत विक्रमचे वडील म्हणाले," मलाच ते लक्षात आलं होतं. त्याचं असं झालं; जेव्हा मी त्याला विचारलं की, तू मित्रांना घरी का नाही आणत खेळायला? तेव्हा तो म्हणाला, आजीला कदाचित माझे मित्र नाही आवडणार. कारण तिला माझी आईदेखील आवडत नाही. त्याचं उत्तर एकून मला खूप आश्चर्य वाटलं. आणि जेव्हा मी खोलात जाऊन माहिती घेतली तेव्हा माझी आई विक्रमला त्याच्या आईवरून जे बोलायची ते विक्रमने मला सांगितलं. मी त्याला विचारलं,'बेटा तू मला अगोदर का नाही सांगितलंस हे सगळं?' तेव्हा तो म्हणाला,'बाबा, आईने सांगितलं होतं की तुम्हाला त्रास होईल. म्हणून मी नाही सांगितलं आणि आजीला पण आवडलं नसतं. मग ती मला खूप रागावली असती. मला आजीची भिती वाटते. म्हणून तर तुम्ही नसताना मी घरी फार वेळ नाही थांबत. त्यामुळेच तर राजन, प्रकाश, आणि हरीशी माझी मस्त मैत्री झाली आहे.' त्याचं हे उत्तर एकून मला वाटलं की माझ्या आईमुळेच कदाचित माझ्या मुलाला असले भास होऊ लागले आहेत."

"त्यांचा हा गैरसमाज मी दूर केला." डॉक्टर खरात म्हाणाले. " हे खरं आहे की अशा पेशंट्सवर आजुबाजूच्या लहान लहान भावनिक घटनांचा परीणाम होतो. पण अशा घटनांमुळे किंवा कोणा एका व्यक्तीमुळे हा आजार होत नाही; हे सुहासजींना सांगणे खूप महत्वाचं होतं. नाहीतर त्यांच्या मते त्यांची आईच दोषी ठरली असती आणि त्यामुळे प्रश्न सुटण्या ऐवजी वाढला असता."

"खरंय डॉक्टर. मला अगोदर माझ्या आईचा खूप राग आला. परंतु तुमच्याशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ती जुन्या पिढीतली स्त्री आहे. त्यामुळे सून कायम आजारी असते हे स्वीकारणं तिच्यासाठी खूप अवघड आहे. कदाचित म्हणूनच ती कधी काही बोलली असेल. हे सर्वसाधारणपणे स्वाभाविक आहे. तिला बिचारीला हे कळलंच नसेल की तिच्या अशा वागण्याचा लहानग्या विक्रमवर चुकीचा परिणाम होत असेल. कारण तिचा तिच्या नातवावर खूप जीव होता. परंतु जेव्हा मी तिला विक्रमच्या आजाराबद्धल सांगितलं तेव्हा मात्र तिने ऐकून घ्यायची तयारी नाही दाखवली. तिच्या मते विक्रमला त्याची आई दिसत होती आणि हे नसलेले मित्रही दिसत होते; याचा अर्थ त्याला भूताने पछाडलं होतं. आणि त्यासाठी तिच्याप्रमाणे मी देखील कसलेसे तंत्र-मंत्र करावेत असं तिचं म्हणणं होतं. ते ऐकल्यावर मात्र मला कठोर निर्णय घ्यावा लागला. मी आमचं मोठं घर विकलं आणि दुसऱ्या ठिकाणी एकाच इमारतीमध्ये पण वर-खाली अशी दोन लहान घरं घेतली. आता माझी आई आमच्या वरच्याच मजल्यावर राहाते. तिच्या वयामुळे आता तिच्या सोबतीसाठी एक मुलगी देखील मी ठेवली आहे. हा बदल विक्रमच्या आयुष्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा ठरला. पण मग विक्रमला शाळेव्यतिरिक्त कुठे ठेवायचं हा प्रश्न उभा राहिला. त्याला सर्वसाधारण पाळणाघरात ठेवणं शक्य नव्हतं. कारण त्याचा आजार एका वेगळ्या दृष्टीने बघितला गेला असता. म्हणून मग मी माझी ऑफिसची जागा देखील विकली आणि माझं काम मी घरातूनच करायला लागलो."

"हे सगळे बदल सुहासजींनी माझ्याशी बोलूनच केले होते. विक्रम अजून बराच लहान होता. त्यामुळे जागा बदलल्यामुळे तो कदाचित लवकर सुधारला असता. मुख्य म्हणजे त्याचे मित्र मागेच जुन्या घराजवळ राहिले आहेत आणि आता त्याने नवीन मित्र करावेत हे त्याच्या मनावर बिंबवणे सोपे झाले असते."

"पण मग विक्रमने हा बदल सहज स्वीकारला का?"गीताने विचारले.

"नाही गिता. तुझा अंदाज बरोबर आहे. मुळात घर बदलण्यासाठी विक्रम तयार नव्हता. पण मग त्याच्या वडिलांनी त्याला समजावलं; आणि सांगितलं की नवीन जागी नवीन मित्र मिळतील तेव्हा तो अनिच्छेने का होईना पण तयार झाला." डॉक्टर म्हणाले.

"आम्ही नवीन जागी राहायला आलो. मी त्याची शाळादेखील बदलली. असे अनेक बदल अचानक झाले होते त्याच्या आयुष्यात. पण सुरवातीचे दोन दिवस सोडले तर मग त्याने फारसा त्रास नाही दिला हे बदल स्वीकारताना. तो नवीन घरात आणि नवीन शाळेत छान रमला. मात्र या नव्या इमारतीमधल्या मुलांशी त्याने मैत्री नाही केली. तसा तो आपल्यातच मग्न असायचा. अधून मधून खाली जायचा. बराचवेळ. पण डॉक्टर म्हणाले होते त्याला फार प्रश्न विचारू नका. किंवा त्याच्यावर लक्ष ठेवता आहात असं त्याला कळू देऊ नका. विक्रम मोठा होत होता....

त्याचं दहावीचं वर्ष होतं. त्यामुळे शाळा, क्लासेस आणि अभ्यास यात तो खूपच अडकला. त्याने परत कधी त्याच्या मित्रांचा उल्लेख नाही केला आणि त्याची आईदेखील देवाघरी गेली आहे हे स्वीकारलं त्याने. खूप शहाण्यासारखा वागायचा तो. खरं तर म्हणूनच मग मला ते थोडं विचित्र वाटायला लागलं. दहावीचा निकाल लागला. तो उत्तम गुणांनी पास झाला आणि जवळच्या एका चांगल्या कॉलेजमध्ये मी त्याचा दाखला करून घेतला. सगळ सुरळीत होतं. एक दिवस तो घरी आला ते खूप खुश होऊन. मी त्याला कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला की राजन, प्रकाश आणि हरीसुद्धा त्याच्याच कॉलेजमध्ये आहेत. आता जुन्या मित्रांबरोबर जास्त वेळ राहता येणार म्हणून तो खुश आहे. त्याच्या 'जास्त वेळ' या शब्दांचा मला संशय आला. पण त्याक्षणी मी काहीच बोललो नाही. मात्र रात्री जेवताना त्याच्या कलाने घेत प्रश्न विचारले आणि माझ्या लक्षात आलं की मला वाटत होतं की माझा विकी बरा झाला आहे, परंतु तो जे कधी कधी बाहेर जायचा संध्याकाळी ते त्याचे जुने मित्र त्याला भेटायला यायचे म्हणून. मग मी त्याला विचारलं की आता तर आजीदेखील नाही आपल्याकडे. मग तू त्यांना घरी का नाही आणलंस कधी. त्यावर त्याचं उत्तर मलाच निरुत्तर करून गेलं... तो म्हणाला बाबा खरं सांगा तुमचा विश्वास आहे का की माझे हे मित्र घरी आले तर तुम्ही त्यांच्याशी नीट बोलू शकाल? मुळात त्याचे असे कोणी मित्र नव्हतेच. तर मग मी काय उत्तर देणार होतो त्याला."

"त्यांच्यातल्या या संभाषणा नंतर सुहासजी मला येऊन भेटले. याचा अर्थ विक्रम त्याच्या विचारांमधून बाहेर पडला नव्हता हेच खरं होतं. म्हणून मग मी सुहासजींना सांगितलं की आता विक्रम एवढा मोठा आहे की त्याला त्याच्या आजाराची कल्पना आपण दिली पाहिजे. त्यांना देखील हे पटले. मी विक्रमला भेटायला सुरवात केली. तुला तर माहीतच आहे आपला सायकॉलॉजिच्या दृष्टिकोनातून भेटी कशा असतात! अगोदर त्याचं सगळं ऐकून घेतलं आणि मग त्याच्या कलाने घेत त्याला सत्य सांगत गेलो. सुरवातीला विक्रमला काही पटायचं नाही. तो माझ्याकडे यायला देखील तयार नसायचा. पण मग हळू हळू त्याने सत्य स्वीकारायला सुरवात केली. हे मी आत्ता सांगताना सोपं वाटत असलं तरी यासगळ्याला बराच कालावधी लागला. तो त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे सामान्य वागायला लागला तोवर तो पदवीधर देखील झाला होता. गिता तुला अंदाज आहेच, असे पेशंट्स मनाने खूप कमकुवत....हळवे म्हणू हवे तर.... असे असतात. त्याला पुढे शिकायचं होतं. त्याच्या वडिलांनी आणि मी देखील त्याच्या या निर्णयाला प्रोत्साहन दिलं. पण आता तो अशा वयात होता की त्याच्यावर सतत लक्ष ठेवलेलं त्याला आवडलं नसतं आणि अजूनही तो पूर्ण बरा झाला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी त्याच्यावर लक्ष असणं आवश्यक होतं. म्हणून मग मीच त्याला म्हंटलं की तू माझ्याकडे कामाला यायला लाग. दुपारी क्लिनिक बंद असेल तेव्हा अभ्यास करत जा. बाकी माझं काम बघशील. त्यामुळे तुला स्वतःसाठी थोडं फार कमावता पण येईल आणि अभ्यास देखील होईल. त्याने देखील थोडा विचार करून ते मान्य केलं. त्याला माझी सवय झाली होती आणि तोच म्हणायचा की त्याला इथे सुरक्षित वाटतं. म्हणून मग सुहासजींनी देखील त्याने माझ्याकडे कामाला येण्याला हरकत घेतली नाही." डॉक्टरांनी सुहासजी सांगत होते त्यापुढची माहिती गिताला दिली.

हे सगळं ऐकून गीताने विचारलं,"काका, जर त्याने एकूणच स्वीकारलं होतं की त्याचे राजन, प्रकाश आणि हरी नावाचे मित्रच नाहीत; तर मग हे अचानक त्याने माझ्याकडे त्यांचा उल्लेख का केला? सुहास काका, तो मला म्हणाला होता की काल तो आणि त्याचे मित्र गच्चीत होते आणि तुम्ही आलात म्हणून त्याचे मित्र पळाले आणि विकी तुमच्याबरोबर घरी आला. काल नक्की काय झालं होतं?"

"गिता हे खरं आहे की विकी कुठे आहे आणि इतका वेळ का लावतो आहे हे बघण्यासाठी मी गच्चीत गेलो. विकी टाकीवर बसून कुठलंस गाणं गुणगुणत होता. मी हाक मारली तसं त्याने माझ्याकडे वळून बघितलं आणि आलो म्हणून लगेच खाली उतरून आला आणि माझ्याबरोबर घरी आला. अग, मला कल्पनाच नव्हती की त्याला परत त्याचे ते मित्र दिसायला लागले आहेत, नाहीतर मी त्याला तिथेच छेडलं असतं." विक्रमचे वडील म्हणाले.

"बर मग आता पुढे काय काका?" गीताने डॉक्टर खरातांना प्रश्न केला.

"पुढे असं गिता, की तू त्याच्याशी बोलत रहायचं. कारण त्याचा तुझ्यावर विश्वास बसला आहे. त्याच्या मित्रांना तू आवडली नाही आहेस असं त्याचं म्हणणं आहे. पण तरीही तो तुझ्याशी बोलतो आहे याचा अर्थ तो हळूहळू तुला सगळं सांगणार. मी त्याची औषध चालू करतो. सुहासजी आपण त्याची औषध चालू करोत आहोत हे मात्र त्याचा संशय आल्यामुळे नाही; हे त्याला सामजावावं लागेल. ते मी बघतो." डॉक्टर खरात विचार करून म्हणाले.

"डॉक्टर साहेब, का हो असं होतं आहे माझ्याच मुलाबरोबर?" सुहासजींच्या डोळ्यात पाणी आलं. "आता माझी शक्ती संपत आली आहे हो. जरा बरा झाला आहे असं म्हणेपर्यंत परत हा त्या कुठल्याश्या नसलेल्या मित्रांचा उल्लेख करतो आणि मी हताश होऊन जातो. त्याला कधीच सर्वसामान्य आयुष्य जगता नाही येणार का हो?" सुहासजी खूपच दुःखी झाले होते. त्यांना गिता खूप आवडली होती. अशी आपली सून असती तर; असा विचार मनात येऊन ते जास्त कष्टी झाले होते. कारण असं कधीच होणार नाही याची त्यांच्या मनाला कल्पना होती.

डॉक्टर खरातांनी त्यांच्या खांद्यावर थोपटलं. पण ते काहीच बोलले नाहीत. डॉक्टर खरातांना विक्रमच्या वडिलांना खोटी आशा दाखवायची नव्हती आणि विक्रमचे वडील त्याक्षणी तरी खरं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

पूर्वी गीताचा विक्रमकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. तिला तो मनापासून आवडायला लागला होता. पण आता मात्र मनाच्या एका कोपऱ्यात तो एक पेशंट आहे हा विचार कायम जागा राहायला लागला.

गीतामधली सायकोलॉजीस्ट तिला कायम आठवण करून द्यायची की विक्रम आजारी आहे. त्यामुळे आता ती त्याच्याशी बोलताना कायम सतर्क राहायला लागली. पण तिचं तरुण मन विक्रमकडे सारखं ओढ घेत होतं. त्यामुळे तिची मनापासून इच्छा होती की तो पूर्ण बरा व्हावा.

त्याच दिवशी रात्रीच्या जेवणाच्यावेळी तिने तिच्या आई-वडिलांकडे विक्रमचा विषय काढला. तिने त्याअगोदर जेव्हा विक्रमच्या मित्रांना ती आवडत नाही हे तिच्या आई-वडिलांना सांगितलं होतं तेव्हा त्यांनी तो विषय थोडा थट्टेवारी नेला होता. कारण साहजिक होतं. गिता आता लग्नाच्या वयाची झाली होती. त्यामुळे चांगल्या घरच्या सुशिक्षित मुलासोबत गीताची मैत्री होत असेल तर त्यात तिच्या आई-वडिलांना काही वावग वाटत नव्हतं.

परंतु जेव्हा गीताने विक्रमचा एकूण आजार आणि त्याचं वागणं सांगितलं तेव्हा मात्र तिच्या आईचा पवित्रा बदलला. गीताने विक्रममध्ये जास्त इंटरेस्ट दाखवू नये अस त्यांना ठामपणे वाटायला लागलं. मोकळ्या स्वभावाची आपली आई असा विचार करेल असं गिताला कधीच वाटलं नव्हतं. तिने तिचं मन मोकळं केलं होतं तिच्या आई-वडिलांकडे.

"आई असं काय करतेस? अग त्याच्यात इंटरेस्ट घेऊ नको म्हणजे नक्की काय करू? तो मला रोज भेटतो आणि भेटणार आहे. मी काही त्याला अजून I love you म्हंटलेलं नाही किंवा त्यानेही असं काही म्हंटलेलं नाही. पण मला तो आवडतो हे सत्य मी किती दिवस डोळ्याआड करू? त्याच्याशी बोलताना तो पेशंट आहे हे कायम कसं मनात राहील? बरं! एक त्याचे ते नसलेले मित्र हा विषय सोडला ना तर एरवी तो खूप नॉर्मल असतो ग. अग, त्याने डॉक्टर काकांना किंवा त्याच्या वडिलांना नाही सांगितलं कधी. पण तो कविता करतो ग. आणि खूप भावूक असतात त्याच्या कविता. त्याने ते फक्त मलाच सांगितलं आहे." गिता म्हणाली.

प्रथमच एकूण संभाषणात भाग घेत तिच्या वडिलांनी तिला विचारलं;"गिता फक्त तुलाच सांगितलं आहे? नक्की?"

"हो बाबा! मी का खोटं बोलेन?" गिता वडिलांच्या प्रश्नाने दुखावून म्हणाली.

"गिता, बेटा तू खोटं बोलशील म्हणून नाही विचारलं. बरं, मला सांग तो नक्की काय म्हणाला?" तिचे बाबा तिच्या जवळ जाऊन खांद्यावर थोपटत म्हणाले.

गिता म्हणाली;"बाबा, त्याने एकदा गप्पांच्या ओघात मला सांगितलं की मी कविता करतो. मला खूप आश्चर्य वाटलं. मी म्हणाले खरंच? मग एखादी वाचून दाखव बघू. तर लगेच त्याने एक कविता वाचून दाखवली. मन या विषयावर होती ती कविता. खूप सुंदर होती हो! मी विचारलं कविता कधी पासून करतोस? तो म्हणाला अग खूप दिवस झाले... दिवस नाही वर्ष. मी करतो कधी कधी कविता. पण कधी बाबांना नाही सांगितलं. मी विचारलं, म्हणजे तुझी कविता ऐकणारी मीच पहिली ना? त्यावर तो हसून म्हणाला; हो तूच पहिली मुलगी. तस राजन, प्रकाश आणि हरीला माहित आहे. पण ते फक्त ऐकून घेतात. तुझ्यासारखे त्यांचे डोळे चमकत नाहीत माझी कविता ऐकताना. मला एकदम लाजल्यासारखं झालं बाबा. किती हळुवार आहे हो तो. प्रेमसुद्धा कसं हळुवार व्यक्त करतो." गिता सांगताना हरवून गेली होती.

तिच्या वडिलांनी एकदा आईकडे बघितलं आणि 'मी बघतो' अशी डोळ्यानीच खुण केली. ते गीताच्या जवळ बसले आणि म्हणाले;"गिता, अग तू त्याच्या कवितेत आणि त्याच्या हळूवारपणात इतकी अडकलीस की त्यामुळे तुला हे लक्षातच आलं नाही विक्रम बोलता-बोलता म्हणाला,'त्याच्या त्या तीन मित्रांनी देखील कविता ऐकल्या आहेत. तू पहिली मुलगी आहेस.' गिता याचा अर्थ असा आहे की त्याने खरातची आणि त्याच्या वडिलांची कायम दिशा भूल केली आहे. तो कधीच बरा झालेला नाही. गिता, तुला भले तो आवडत असेल, पण तू हे कधीच विसरून चालणार नाही की तो एक पेशंट आहे. अग त्या एका वाक्यातून त्याने तुला खूप काही सांगितलं. त्याचे ते फक्त त्यालाच दिसणारे तीन मित्र त्याच्याबरोबर कायम आहेत. अगदी त्यांनी घर बदललं तरी आणि तो कॉलेजला गेला तरी... किंबहुना त्यानंतरही; अगदी आजपर्यंत! फक्त त्याने त्यांचा उल्लेख सर्वांसमोर करणं सोडून दिलं होतं. कारण त्याचं असं मत झालं असणार की खरात किंवा त्याचे वडील त्याच्या या मित्र असण्यावर विश्वास ठेवणार नाहीत. पण तुझ्याबाबतीत थोडं वेगळं घडलं आहे. गिता, त्याच्या मते तुला त्याच्या आजाराची माहिती नाही. अजून तू त्याच्या त्या मित्रांवर अविश्वास व्यक्त नाही केला आहेस. महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला तू आवडायला लागली आहेस. तू म्हणतेस की अजून त्याने स्पष्ट शब्दात तुला असं म्हंटलं नाही. पण कधीतरी भावूक झालाकी तो त्याच्या भावना मोघमपणे तुला सांगतो. हो ना? गिता, सर्वात महत्वाचं म्हणजे अजून तू त्याच्याकडे त्या मित्रांना भेटण्याची इच्छा व्यक्त नाही केली आहेस. त्यामुळे त्याने स्वतःभोवती निर्माण केलेलं सुरक्षा कवच अजून अबाधित आहे.

बेटा, तुला तो आवडतो आहे आणि त्याला तू कदाचित मैत्रिण किंवा प्रेयसी किंवा अगदी सहचारिणी म्हणूनही हवी असशील. कदाचित् तुलाही त्याच्याबद्दल अशाच काहीशा भावना असतील. पण तू हे विसरून कसं चालेल की तो पहिल्यांदा एक पेशंट आहे आणि तू एक सायकालोजीस्ट."

गीताने एकदा वडिलांकडे बघितलं. तिला त्यांचं म्हणणं पटत होत ही आणि नव्हतं ही. तिने मान खाली घातली. तिच्या मनात विचार आला,'खरंच की. विकीच्या त्या एका वाक्यातून खूप काही अर्थ निघू शकतात. मला त्यावेळी लक्षात आलं नाही. किंबहुना आत्ता बाबांनी सांगेपर्यंत हा मुद्दासुद्धा असू शकतो हे मनात आलं नाही. खरंच का मी इतकी त्याच्या प्रेमात अडकायला लागले आहे?'
क्रमशः

Friday, August 7, 2020

सिझोफ्रेनिया..... आजार की परसेप्शन!(?)

 सिझोफ्रेनिया..... आजार की परसेप्शन!(?)


भाग 1

"अग, हसतेस काय? खरंच सांगतो आहे मी. राजन म्हणाला मला की तू गिताशी बोलू नकोस. ती काही ना काही कारणाने तुला आमच्यापासून तोडेल." विक्रांत गंभीरपणे गिताला सांगत होता आणि गिता हसत होती. " कमाल करतेस हं गिता. मी काहीतरी सिरीयसली सांगतो आहे. बरं हे फक्त राजानचं मत नाही; प्रकाश आणि हरीचसुद्धा हेच मत आहे." आता मात्र गिताला थोडा राग आला. "विकी मी का तोडेन तुला तुझ्या मित्रांपासून? आपण फक्त काही दिवस झाले एकमेकांना ओळखायला लागलो आहोत. तेही कामाच्या संदर्भात. तुझे मित्र तर तुझ्याबरोबर लहानपणापासून आहेत ना? मग ते तुला ओळखत नाहीत का? मी भले प्रयत्न केला तुला त्यांच्यापासून लांब करण्याचा; पण तू असं कोणाचं ऐकून तुझी जुनी मैत्री संपवणार नाहीस याची त्यांना खात्री कशी नाही?" ती थोडी वैतागून म्हणाली.

"त्यांना खात्री आहे ग, की मी असं कोणाचं ऐकून आमची मैत्री तोडणार नाही. पण मी आपली आमची चर्चा सांगितली तुला इतकंच. जाऊदे! तुला राग आलेला दिसतो आहे. सोड तो विषय." विक्रांत म्हणाला. तरी गिताच्या कपाळावरच्या आठ्या गेल्या नाहीत. त्यामुळे तिच्या गालावर रेंगाळणाऱ्या बटेला फुंकर मारत तो हळूच म्हणाला;"तशी तू वैतागलीस की अजून छान दिसतेस हं." त्याचं ते प्रेमळ बोलणं ऐकून गिता हसली आणि विक्रमने छेडलेला विषय तिथेच संपला.

विक्रमने विषय संपवला असं त्याला वाटत असलं तरी गिताच्या मनातून मात्र संध्याकाळचा विषय पूर्ण गेला नव्हता. तिने जेवताना तो विषय आई-बाबांकडे काढला. गिताच्या घरी रात्रीचं जेवण सगळे एकत्र घ्यायचे. त्या निमित्ताने दिवसभर कोणी काय केलं ते सांगितलं जातं; म्हणून तिच्या वडिलांनीच हा नियम केला होता. मुख्यतः गिता मोठी झाल्यावर तर ते सुद्धा आवर्जून रात्रीच्या जेवणाला घरी पोहोचायचे. गिताचे वडील हार्ट स्पेशालीस्ट होते आणि गीताची आई गायनाकॉलॉजीस्ट. दोघेही त्यांच्या कामात अडकलेले असायचे दिवसभर. मग एकमेकांची खबरबात कशी कळणार? म्हणून हा नियम होता. गीताने सायकॉलॉजिस्ट होण्याच्या निर्णय घेतला होता; त्याला तिच्या आई-वडीलांनी कधीच विरोध केला नव्हता. एकूणच समजूतदार परिवार होता तो.

"गिता अग कसं कळत नाही तुला. विक्रमला तू आवडायला लागली आहेस. पण अजून बहुतेक त्याला तुझ्या मनाचा अंदाज येत नाही आहे; म्हणून मग असं काहीतरी बोलून तो तुझ्या वागण्यातला बदल बघत असेल." गिताची आई हसत म्हणाली. त्याला बाबांनी दुजोरा दिला. "खरंच गिता! बहुतेक त्याला तुला काही विचारायची हिम्मत होत नसेल. म्हणून मग हे असं, तुझ्या मैत्रीमुळे माझ्या जुन्या मित्रांपासून लांब जाईन... सारखं काहीतरी तो बोलत असेल. याचा अर्थ स्पष्ट होतो ग... त्याला तू आवडतेस." असं म्हणून बाबा आणि आई दोघे हसले. पण गीताचं त्यांच्या बोलण्याने समाधान नाही झालं.

विक्रमची आणि गिताची ओळख अगदीच अलीकडची होती. गीताने नुकतंच डॉक्टर खरातांचं क्लिनिक जॉईन केलं होतं. विक्रम मात्र तिथे गेलं एक वर्ष काम करत होता. गिता स्वतः सायकॉलॉजिस्ट होती. विक्रम मात्र क्लिनिक मधलं सगळं पेपर वर्क बघायचा. डॉक्टर खरात खूप मोठे सायकॉलॉजिस्ट होते. त्यांच्याकडे अनेक पेशंट्स यायचे. प्रत्येक केस कॉन्फिडेन्शल असायची. त्यामुळे विक्रमशिवाय इतर कोणालाही डॉक्टरांच्या परवानगीशिवाय केस पेपर्स मिळायचे नाहीत. प्रत्येक केसचं फायलिंग तो खूप व्यावास्थित करून ठेवायचा. खरात गिताच्या वडिलांचे मित्र असल्याने गिताला त्यांनी स्वतः आग्रहाने ट्रेनिंगसाठी ठेवून घेतलं होतं. आणि तिथेच तिची विक्रमशी ओळख झाली होती. विक्रम स्वभावाने खूप चांगला होता. सरळ होता. गिताला कोणतेही केस पेपर्स पटकन काढून द्यायचा आणि अनेकदा एखादी जुनी केस तिला सांगायचा सुद्धा.

गिता त्याला एकदा म्हणाली देखील होती;"विक्रम तू न सायकॉलॉजिस्ट व्हायला हवा होतास. तुला प्रत्येक केस नीट अगदी सगळ्या बारकाव्यांसहित माहित असते." त्यावर तो फक्त हसला होता.

"का बरं विकीला असं वाटतं की मी त्याला त्याच्या मित्रांपासून दूर करेन? आई-बाबा म्हणतात ते खरं असेल का? पण मग मी जर आवडत असेन तर तो तसं स्पष्ट सांगेल. त्याला उगाच गोल गोल नाही बोलता येत किंवा बोलण्या अगोदर तो खूप विचार करत असेल करत असेल असं नाही वाटत. मुळात मी त्याला आवडणं किंवा आमचं एकत्र येणं त्याला त्याच्या मित्रांपासून कसं दूर करेल? त्याचे मित्र त्याला असं का सांगत आहेत? परत एकदा छेडून बघितलं पाहिजे त्याला या विषयावर. जर त्याच्या मित्रांना भेटता आलं तर मस्तच. उगाच विकीच्या मनात असं काही भरवू नका हे गप्पांच्या ओघात सांगीन. मी असेन किंवा अजून कोणी दुसरी येईल कदाचित त्याच्या आयुष्यात. पण जर एकदा त्याच्या मनाने स्वीकारलं की त्याच्या आयुष्यात येणारी कोणीही मुलगी त्याला त्याच्या मित्रांपासून तोडेल तर मग हा विचार पुढे जाऊ शकतो. मग तर त्याला असं ही वाटायला लागेल की ती मुलगी त्याला त्याच्या घरच्या लोकांपासून पण तोडेल. अहं! हे काही बरोबर नाही. बोललंच पाहिजे परत एकदा या विषयावर त्याच्याशी." गिता स्वतःशीच विचार करत होती. तिला तिच्या आई-बाबांचं मत फारसं पटलं नव्हतं. कारण तिच्यातली सायकॉलॉजिस्ट वेगळा विचार करायचा प्रयत्न होती. पण दुसरं कुठलही कारण तिच्या लक्षात येत नव्हतं.

दुसऱ्या दिवशी तिने मुद्दाम विक्रमला छेडलं. "काय मग विकी काल तुझे दोस्त काहीच म्हणाले नाहीत का माझ्याबद्दल." ती विक्रमकडे हसत बघत म्हणाली. पण विक्रम काहीच बोलला नाही. कामात लक्ष आहे असं दाखवून त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तिला ते थोडं विचित्र वाटलं. पण गीतानेसुद्धा ठरवलं होतं की उगाच घाई करायची नाही. एकूण हा प्रकार काय आहे त्याची माहिती मात्र घ्यायची. कारण तिला खरंच विक्रम आवडायला लागला होता.

विक्रम तसा शांत मुलगा होता. त्याला त्याचे वडील क्लिनिकला सोडायला यायचे. बहुतेक तिथून ते त्यांच्या कामाला जात असावेत. क्लिनिक उघडायच्या अगोदर पंधरा-वीस मिनिटं विक्रम यायचा आणि त्या दिवसाच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स प्रमाणे सगळे पेपर्स लावून ठेवायचा. ऑफिस संपूर्ण फिरून सगळ निट आहे न याची खात्री करून आपल्या जागेवर जाऊन बसायचा. पण मग मात्र तो त्या जागेवरून अजिबात उठायचा नाही. दुपारचं जेवण देखील तो तिथेच घ्यायचा. अजून एक रीसेप्शानिस्ट होती. कारण फोन्स घेणं किंवा नवीन येणाऱ्या पेशंट्सशी बोलणं अशी काम विक्रम करत नसे. विक्रम त्या रीसेप्शानिस्टशी पण फारसा बोलायचा नाही. आणि तीसुद्धा स्वतःच्याच नादात असायची. पण गिताने क्लिनिक जॉईन केलं आणि थोड्याच दिवसात तिची आणि विक्रमची मैत्री झाली. एक तर गिताला काही केसेसची माहिती हवी असायची. जुन्या केसेसचा ती अभ्यास करायची. त्यामुळे तीदेखील अनेकदा लवकर यायची. डॉक्टर येईपर्यंत मग अनेकदा गिता आणि विक्रम गप्पा मारायचे.

हळूहळू गिताला विक्रमची माहिती कळायला लागली. विक्रमची आई त्याच्या लहानपणीच गेली होती. घरात फक्त तो आणि त्याचे वडील होते. त्याची आजीदेखील होती. पण तिचं आणि विक्रमचं अजिबात पटायचं नाही. त्यामुळे ती त्यांच्याच इमारतीमध्ये पण वरच्या मजल्यावर एकटीच राहायची. त्याच्या वडिलांचा व्यवसाय होता. पण विक्रमला त्यात इंटरेस्ट नव्हता. त्याच्या वडिलांची डॉक्टर खरातांशी कधीतरी ओळख झाली होती आणि कॉलेज संपल्यानंतर एक वेगळा अनुभव मिळावा म्हणून त्याच्या वडिलांनी विक्रमसाठी डॉक्टरांकडे शब्द टाकला होता. डॉक्टरसुद्धा लगेच तयार झाले होते. कारण त्यांच्याकडे काम करणाऱ्या जुन्या जाणत्या कामातबाईंना अलीकडे काम झेपत नव्हतं. मग विक्रम यायला लागला आणि कामातबाईंनी त्याला सगळं काम समजावलं. तो निट शिकला आहे याची खात्री झाल्यावर कामातबाई यायच्या बंद झाल्या. आर्थात हे सगळ विक्रमने गिताला सांगितलं होत.

वडिलांचा एवढा व्यवसाय असूनही विक्रम हे असं इथे कारकुनी काम का करायला येतो ते गिताला कळेना. पण मग तिने तो विषय तिथेच सोडला. तसा विक्रम थोडा मुडी होता. त्यामुळे जर त्याच्या मनाविरुद्ध जास्त प्रश्न विचारले तर तो गप्प व्हायचा. किंवा चक्क दुर्लक्ष करायचा. म्हणून मग गिता त्याच्या कलाने घ्यायची आणि तो जेवढी आणि जी माहिती ओघात सांगायचा ती ऐकून घ्यायची.

एक दिवस सकाळपासून विक्रम मस्त मूडमध्ये होता. त्याच दिवशी नेमकी गीता तो यायच्या अगोदरच आली होती आणि एका जुन्या केसचा अभ्यास करत होती. त्यामुळे तो आत आला तेव्हा स्वतःशीच हसत होता ते तिच्या लक्षात आलं. तो पेपर्स लावत होता तेव्हा ती त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याला हळूच विचारलं;"काय विकी, आज काही खास? एकदम मस्त मूडमध्ये दिसतो आहेस!"

तिच्याकडे वळत तो म्हणाला;"गिता काल खूप दिवसांनी राजन भेटला. मग आम्ही प्रकाश आणि हरीला जाऊन भेटलो. मस्त गप्पा मारल्या. मी त्यांना आपल्याकडे आलेली ती नवीन केस आहे ना त्याबद्दल सांगितलं. ती ग... १२ वर्षांची सिमरन येते ना... तिची केस. बिचारी मुलगी! आई जाऊन ३ महिने झालेत पण अजूनही ती ते स्वीकारायला तयार नाही. तिला अजूनही वाटतं की तिची आई घरी आहे आणि फक्त तिच्याशी बोलते कारण तिचे बाबा सारखे फिरतीवर असतात. खर सांगू का असं वाटतं ग मुलांना. त्यांना अस आईशिवाय राहावं लागणार ही कल्पना नकोशी वाटते. आजारी असली तरी चालेल पण आई हवी असते ग त्या वयात. मलासुद्धा खूप त्रास झाला होता आई गेली हे स्वीकारताना. जाऊ दे! पण तुला माहित आहे; हरी म्हणाला तिला भूत बाधा झाली असेल. मग मी त्यांना समजावलं की भूत बित काही नसतं. हा एक आजार आहे. त्याला पॅरानोइड सिझोफ्रेनिया म्हणतात. मग त्याची सगळी लक्षणं सांगितली. सगळं समजावलं तर राजन खूष झाला. मला म्हणाला विकी तू ना डॉक्टरच व्हायला हवा होतास. किती व्यवस्थित समजावतोस तू हा इतका अवघड विषय.' मी म्हणालो, 'आईचं आजारपण मी खूप जवळून बघितलं आहे. त्यामुळे तेव्हापासूनच मला इच्छा होती डॉक्टर व्हायची. पण मग बाबा नको म्हणाले म्हणून मग मी तो विचार बदलला.' जाम खुश होते माझे मित्र माझ्यावर. मग आम्ही एकत्र जाऊन पार्टी पण केली. रात्री उशिरापर्यंत गच्चीवर बसलो होतो आम्ही. अगदी बाबा बोलवायला वर येईपर्यंत. बाबा आले आणि ते तिघे पळाले. पण खूप मज्जा आली काल." हे सांगताना विक्रम खूप खुश होता. हसत होता. गिताला पटलं नाही की विक्रमने इथे आलेली केस त्याच्या मित्रांना सांगितली. पण ती त्याबद्धल त्याच्याकडे काहीच बोलली नाही. उलट तिने विचारलं;"अरे विकी; मी पण तुला म्हंटलं होत नं की तू सायकॉलॉजिस्ट व्ह्यायला हवा होतास. मग तू राजनला का नाही सांगितलंस की गिता पण मला असं म्हणाली होती." तिने असं म्हणताच तो त्याच्या तंद्रीत म्हणाला;"छेछे! मी तुझा उल्लेखही करत नाही. त्यांना तू आवडत नाहीस. तुझ्याबद्दल बोलायला लागलो की ते निघून जातात. जसे बाबा आले की जातात ना तसे."

तिचा उल्लेख झाला तर निघून जातात? हा काय प्रकार आहे? गीता त्याच्या या बोलण्यामुळे गोंधळली आणि त्याहीपेक्षा तिला दुसरीच एक गोष्ट खटकली. विक्रम क्लिनिकमधली अत्यंत गोपनीय माहिती त्याच्या मित्रांना सांगत होता; हे योग्य नव्हतं. त्यामुळे डॉक्टर आले तेव्हा ती काम काढून त्यांच्या केबिनमध्ये गेली आणि म्हणाली;"डॉक्टर काका, विक्रम आपल्याकडे येणाऱ्या केसेस त्याच्या मित्रांकडे सांगतो."

डॉक्टर समोरचे पेपर्स बघण्यात गढले होते. त्यांनी मान वर करून गीताकडे बघितलं आणि विचारलं;"कोणी सांगितलं तुला असं गिता?"

"काका, तो स्वतःच मला सांगत होता आत्ता की त्याने काल त्याच्या मित्रांना सिमरनची केस सांगितली." गिता म्हणाली.

डॉक्टर खरातांनी तिच्याकडे चमकून बघितलं आणि विचारलं,"तुला सांगितलं त्याने की तो त्याच्या मित्रांना काल भेटला?" गिता म्हणाली;"हो!"

"अजून काय काय सांगितलं त्याने गिता?" डॉक्टरांनी समोरची फाईल बंद केली आणि तिला बसायला सांगत विचारलं.

गिताला थोड विचित्र वाटलं हे सगळं. कारण तिच्या मते सिमरनची केस विक्रमने मित्रांना सांगणं अयोग्य होतं आणि डॉक्टरांनी त्याला त्याबद्धल समज द्यायला हवी असं तिला वाटत होत. पण डॉक्टर खरातांना विक्रमला समाज देण्यापेक्षा त्याने गीताला काय सांगितलं ते समजून घेण्याची इच्छा होती. मग तिने शांतपणे तिचं आणि विक्रमचं एकूण झालेलं बोलणं त्यांना सांगितलं.

"तो म्हणाला काल रात्री तो मित्रांबरोबर होता?"ती म्हणाली. "हो का? बरं! या अगोदर कधी तुझं आणि त्याचं त्याच्या मित्रांबद्दल बोलणं झालं होत का?" डॉक्टरांनी तिला विचारलं. मग गीताने मागे घडलेला प्रसंगसुद्धा त्यांना सांगितला.

डॉक्टर खरात थोडावेळ विचार करत बसले आणि मग त्यांनी गीताकडे सरळ बघत तिला विचारलं;"गिता, तुला विक्रम आवडायला लागला आहे का?"

अचानक डॉक्टर काकांकडून आलेल्या त्या प्रश्नाने गिता गोंधळली."काय काका? तुम्ही असं का विचारता आहात?" तिने डॉक्टरांना विचारलं.

गीताच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत स्वतःच्याच विचारात गढलेल्या डॉक्टर खरातांनी म्हंटल,"गीता, जर असं काही तुझ्या मनात असेल तर तुला विक्रम बद्दल काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे."

विक्रम बद्धल अस काय आहे? आता मात्र गिता पुरती गोंधळली होती.

"गिता, विक्रम हा एक सिझोफ्रेनियाचा पेशंट होता.... किंवा आहे... असं आपण म्हणूया." डॉक्टर खरात म्हणाले आणि गिताला मोठा धक्का बसला. "पण काका त्याच्यात मला अशी कोणतीही लक्षणं दिसली नाहीत. तो शांत स्वभावाचा आहे हे मान्य. पण तो त्याचं काम अगदी मन लावून करतो. माझ्याशी आणि आपल्या झाडू काढायला येतात त्या बाईंशी चांगला बोलतो. ती एकलकोंडा आहे किंवा लोकांपासून दूर रहायचा प्रयत्न करतो आहे असं मला कधीच वाटलं नाही काका. किंवा त्याचं बोलणं कधी असयुक्तिक किंवा निरर्थक नाही वाटलं." ती तिची मतं पटापट मांडायला लागली.

डॉक्टर खरात हसले आणि म्हणाले;"बेटा तुला तो आवडायला लागला आहे न? माझच चुकलं. मी तुला अगोदरच कल्पना द्यायला हवी होती. पण अजूनही वेळ गेलेली नाही. नको गुंतूस त्याच्यात."

गिता डॉक्टरांकडे बघून हसली."काका, मला तो आवडायला लागला आहे हे खरं आहे. तो स्मार्ट आहे. चांगला दिसतो आणि अत्यंत समंजस आहे तो. पण प्रश्न माझ्या आवडण्याचा नाही आहे आत्ता. काका मी देखील सायकॉलॉजिचा अभ्यास केला आहे. तरीही मला कळलं नाही की तो एक पेशंट आहे आणि इथे ट्रीटमेटसाठी येतो आहे; कमाल आहे माझी."

"बेटा, विक्रम इथे ट्रीटमेटसाठी नाही येत. तो खूपच सुधारला आहे. खरं तर त्याचा हा आजार खूप लवकर लक्षात आल्याने त्याची ट्रीटमेट लवकर सुरु झाली आणि तो सहयोग करतो आहे हे लक्षात आल्यावर आम्ही त्याला विश्वासात घेऊन सगळं समजावलं. सुरवातीला त्याने काही स्वीकारलं नाही. पण मग हळूहळू तो आमचं सांगणं समजून घेऊ लागला आणि मग तो लवकरच बराच बरा झाला. गेली काही वर्ष तो माझ्या निरीक्षणा खाली आहे. पण हळूहळू त्याची सिझोफ्रेनियाची लक्षणं कमी झाल्याचं मला जाणवलं. त्यामुळे त्याची औषध मी स्वतःच त्याच्या वडिलांशी बोलून कमी केली. असे पेशंट्स कायामचे बरे होत नाहीत हे तुलाही चांगलाच माहित आहे. पण अर्थात हळूहळू बऱ्याच प्रमाणात साधं आयुष्य ते जगू शकतात." काकांनी गिताला माहिती दिली.

"किती वर्ष झाली तो ट्रीटमेंट घेतो आहे काका? आणि औषधं कधी बंद केली?" गीताने काकांना विचारलं. तिच्यातली सायकोलोजीस्ट आता बोलत होती.

डॉक्टर खरातांनी गिताला माहिती दिली. ते म्हणाले;"गिता विक्रम १४ वर्षांचा होता तेव्हा त्याची आई देवाघरी गेली. खरं तर मिसेस राजे.... विक्रमची आई.... अनेक महिने आजारी होत्या. त्यांना रक्तातली कावीळ झाली होती. आणि ते खूप उशिरा लक्षात आलं. त्यांनी तो आजार अंगावर खूप काढला होता. त्यामुळे त्यातच त्यांचा अंत झाला. विक्रमने त्याच्या लहानपणी त्याच्या आईला फक्त औषधं घेताना आणि आजारी असलेली बघितलं होतं. विक्रमचे वडील कायम कामात अडकलेले असायचे. त्यामुळे विक्रम, त्याची आजारी आई आणि त्याची आजी असेच घरात असायचे. त्याची आजी कायम सुनेला टोचून बोलायची आणि विक्रमलासुद्धा. विक्रमला खूप वाईट वाटायचं. पण तो खूप लहान होता; त्यात आई आजारी असल्याने तो त्याच्या आजीवर जास्त अवलंबून होता. त्यामुळे आवडलं नाही तरी त्याविषयी करायचं ते त्याला कधी सुचायचं नाही. एक-दोन वेळा त्याने वडिलांना सांगायचा प्रयत्न केला. पण विक्रमसाठी त्यांच्याकडे वेळच नव्हता. आपलं काम आणि आजारी पत्नीची ट्रीटमेंट यातच ते अडकून गेले होते.

कधी लवकर आलेच घरी आणि विक्रमला घरात बघितलं तर त्याला म्हणायचे की त्याच्या वयाच्या मुलाने घरात बसू नये संध्याकाळी. मित्रांबरोबर खेळावं. पण त्यांना हे माहित नव्हतं की त्यांच्या बिल्डिंगमध्ये विक्रमच्या वयाची मुलंच नसतात. बाबांनी मित्र कर आणि बाहेर खेळत जा म्हणून सतत सांगितलं; म्हणून मग विक्रम रोज संध्याकाळी बाहेर जायला लागला.

हळू हळू तो घरात थोडा बोलायला लागला. त्याला काही मित्र मिळाले होते असं तो आईला सांगायचा. आम्ही खाली खेळतो असं म्हणायचा. त्याच्या आईला खूप आश्चर्य वाटायचं. कारण तिला माहित होतं की त्यांच्या बिल्डिंगमध्ये कोणी मुलंच नाहीत. त्यातूनही तिच्या मनात यायचं जर त्याला मित्र मिळाले असतील आणि ते खाली खेळत असतील तर आपल्याला आवाज कसा येत नाही; कारण विक्रमचं कुटुंब पहिल्या मजल्यावारच राहात होतं. तिने विक्रमचं हे वेगळं बोलणं विक्रमच्या बाबांच्या कानावर घालायचा खूप प्रयत्न केला. पण त्यांनी ते फारसं मनावर नाही घेतलं. काही दिवसांनी विक्रमची आई गेली. विक्रमने ते मान्य केलं नाही. तो नेहेमी म्हणायचा त्याची आई त्याच्याशी बोलते. ती इथेच आहे. सुरवातीला त्याच्या वडिलांना वाटलं की आई गेल्याच्या दुःखामुळे विक्रम असं बोलत असेल. पण हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की विक्रमचा त्याच्या म्हणण्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण तो वडील घरात असतानादेखील आईशी बोलत असल्यासारखा स्वतःशीच बोलायचा. तो कोणावरही विश्वास ठेवायला तयार नव्हता. हे लक्षात आल्यावर त्याच्या आजीने घरात हंगामा केला. सुनेच्या नावाने परत एकदा बोटं मोडली. त्यांचं मत होत की नातवाला सुनेच्या भुताने पछाडलं आहे. त्यामुळे विक्रमचे वडील दुपारी घरात नसताना एक दोन वेळा त्यांनी कोणा साधू बाबांना बोलावून होम-हवन करवले घरात. त्याचा अजूनचं वाईट परिणाम झाला विक्रमवर. तो खूपच एकटा रहायला लागला घरात असताना आणि शाळेत देखील. बाबा घरात नसताना तो बाहेरच राहायला लागला. कुठे असतोस असं विचारलं तर म्हणायचा की मित्रांबरोबर होतो."

"अरे? काका याचा अर्थ विक्रमची केस बरीच क्लिष्ट आहे." गिता मन लावून एकत होती. डॉक्टर थांबले तसं तिने तिचं पाहिलं निरीक्षण सांगितलं.

"गिता खरा प्रश्न पुढे आहे." डॉक्टर म्हणाले.

"म्हणजे काय काका?" गीताने आश्चर्य वाटून विचारलं.

"गिता, विक्रमची आई गेल्यानंतर साधारण सहा महिन्यानंतरची गोष्ट आहे. त्याचे वडील त्या दिवशी थोडे लवकर घरी आले. विक्रम घरात नव्हता म्हणून सहज त्याला शोधायला ते बाहेर पडले. त्यांना विक्रम बिल्डींगच्या मागच्या बाजूला पाण्याच्या टाकीवर कोणाशीतरी बोलतो आहे असं दिसलं. खरं तर विक्रम एकटाच होता. पण लांबून असं वाटत होतं की तो कोणाशीतरी बोलतो आहे. मध्ये एक झाड असल्याने विक्रमला त्याचे बाबा दिसत नव्हते. ते अजून जवळ गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आल की विक्रम खरंच बोलत होता कोणाशीतरी. पण त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. त्यांना वाटलं लपाछापी खेळत असतील. पण तसं नव्हतं. विक्रम त्याच्या बाजूलाच कोणीतरी आहे अशा प्रकारे बोलत होता. अगदी तावातावाने बोलत होता. त्याच्या वडिलांनी गोंधळून त्याला हाक मारली. विक्रम एकदम चमकला आणि त्याने वळून बघितलं. बाबांना बघून तो धावत त्यांच्याकडे आला आणि म्हणाला... बघा ना बाबा मगासपासून मी हरीला सांगतो आहे की राजानला बोलावूया त्याशिवाय खेळायला मजा येणार नाही. राजन सांगतो तो खेळ खेळायला मजा येते. पण हरी ऐकतच नाही. म्हणे राजन नसला तरी आपण खेळूया. बाबा एकदम चक्रावले. त्यांनी परत विक्रम जिथे उभा होता तिथे मान वळवून बघितलं. त्यांना खात्री झाली की तिथे कोणीच नाही. त्यांनी विक्रमचा हात धरला आणि त्याला घेऊन ते घरी आले. त्यांनी त्यांच्या आईला म्हणजे विक्रमच्या आजीला विचारलं की विक्रमचे मित्र कधी घरी आले आहेत का? त्या म्हणाल्या;"मी त्याला म्हंटलं अनेकदा घेऊन ये घरी. अलीकडे अंधार लवकर होतो; घरातच खेळा. मी कुठे तुला शोधायला येऊ. पण तो कधी त्यांना घरी आणायला तयार होत नाही."

हे काहीतरी वेगळं असावं असा संशय विक्रमच्या वडिलांना पहिल्यांदा आला आणि त्यांनी त्यांच्या नेहेमीच्या डॉक्टरना गाठलं. त्या डॉक्टरांनी त्यांना माझ नाव सांगितलं आणि अशा प्रकारे विक्रमची केस माझ्याकडे आली." डॉक्टर खरात बोलायचे थांबले. त्यांनी एकदा घड्याळाकडे बघितलं आणि ते गीताला म्हणाले;"बेटा आपण दुपारी किंवा रात्री क्लिनिकच्या वेळेच्या नंतर बोलू. आता माझी एक अपॉइंटमेंट आहे. मुख्य म्हणजे विक्रमला असं अजिबात वाटायला नको की आपण त्याच्याबद्दल बोलतो आहोत. त्यामुळे आता तू बाहेर जा आणि त्याच्याशी पूर्वीसारखीच वाग. ठीके?"

गीतानेदेखील घड्याळाकडे बघितलं आणि बरं म्हणून ती केबिनच्या बाहेर आली.

"इतकावेळ काय करत होतीस आत?" ती बाहेर येताच विक्रमने तिच्याकडे बघत तिला विचारलं.

"अरे आज जी केस येणार आहे ना त्याची चर्चा करत होतो आम्ही. डॉक्टरांनी या पेशंटची पुढची सेशन्स मला घ्यायला सांगितलं आहे. का रे?" विक्रमला संशय येऊ नये म्हणून गीताने नीट उत्तर दिलं. त्यावर हळूच मोकळा श्वास सोडत विक्रम म्हणाला;"काही नाही. मला वाटलं तू आपल्या सकाळच्या गप्पा सांगायला गेलीस की काय." गिताने गोंधळल्यासारखा चेहेरा केला आणि मग आठवल्यासारखं करत विचारलं;"कुठल्या गप्पा? ओह! तू तुझ्या मित्रांबरोबर मजा केलीस ते? अरे, हे मी डॉक्टरांना हे कशाला सांगू विकी? तू पण कमाल करतोस हं!"

"तस नाही ग! डॉक्टरांना काम सोडून उगाच गप्पा मारत बसलेलं नाही आवडत नं. तू ओघात आपल्या गप्पा सांगितल्या असत्यास ना तर ते तुला आणि मग मला रागावले असते. म्हणून विचारलं." विक्रम आता मोकळेपणे बोलला आणि त्याच्या कामाला लागला.

आपल्या जागेकडे येताना गीताने डॉक्टर काकांना मेसेज केला, 'आपण क्लिनिकमध्ये विक्रम विषयी चर्चा करणं टाळलं पाहिजे. त्याच्या लक्षात येऊ शकतं.'

डॉक्टर खरातांनी लगेच तिला उत्तर दिलं, 'ठीक आहे. आज दुपारी मी तुला लंचसाठी बाहेर भेटतो.'

क्रमशः

Friday, July 31, 2020

खिडकी पलीकडचं जग (भाग 3) (शेवटचा)

खिडकी पलीकडचं जग

भाग 3 (शेवटचा)

खिडकी पलीकडचं जग

भाग 3

आता गौरीला थोड़ी भिती वाटायला लागली होती. काहीतरी वेगळ आहे दादाजींमध्ये. असा विचार करत गौरीने दादाजींच्या त्या घोळदार झग्याचे निरीक्षण केले आणि तिच्या लक्षात आलं की त्यांच्या पायाकडे हलकासा निळसर प्रकाश आहे. ते पाहून तिचा उर धपापायला लागला होता. तिची भिती खूप वाढली होती.

"गौरी... घाबरु नकोस. मी तुला काही करणार नाही. करूच शकत नाही. आपण दोन भिन्न जगातील एकक आहोत." दादाजिंना तिची अस्वस्थता जाणवली आणि ते थोड़े हसत म्हणाले.

"एकक म्हणजे काय दादाजी? आणि तुम्हाला अजुन काय काय दिसतं दादाजी? तुम्ही आज इथे या वेळी कसे आणि का आला आहात?" गौरीने धीर करून एका मागोमाग एक प्रश्न विचारले.

आपली गंभीर मुद्रा सोडून दादाजी आकाशाकडे बघत मोठ्ठयाने हसले. "हाssहाssहाss! गौरी किती प्रश्न? पण मी समजू शकतो. ठिक... एका एका प्रश्नाच उत्तर देतो. एकक! एकक म्हणजे... तुझ्या भाषेत व्यक्ति. प्रश्न दोन; मला काय काय दिसतं. मला पुढचा प्रवाह दिसतो. पण तो सांगण्याचा अधिकार मला नाही.... कोणालाच नाही गौरी! प्रवाह जगायचा असतो आणि अर्थात जे मला दिसतं ते सापेक्ष असतं. म्हणजे सर्वसाधारणपणे एकक आयुष्यात जे निर्णय घेऊ शकतात त्याचा विचार करून जो प्रवाह तयार होतो; तो मला दिसतो. पण जर एखाद्या एककाने निर्णय बदलला तर संपूर्ण प्रवाह बदलतो. प्रवाह म्हणजे काळ बरंका! आता तुझा शेवटचा प्रश्न... आज मी इथे या वेळी कसा आणि का आलो आहे! हम्... हे मात्र खूप महत्वाच आहे गौरी. नीट ऐक. तू आमच्या जगात येणार की नाही हा संपूर्ण तुझाच निर्णय आहे; हे मी अगोदरच मान्य केल होतं. पण माझा ओरस अजुन वहन-प्रवाहात नाही आला. तुला समजेल अशा भाषेत सांगायच तर; ओरस अजुन पूर्ण समजुतदार नाही झाला. जवाबदारीने आपले निर्णय घेण्यासारखा नाही झाला. मात्र तो त्या प्रवासाला निघायच्या उंबरठ्यावर असताना तू भेटलीस त्याला. त्याचा तुझ्यावर जीव जडला आहे. ख़ास मैत्रीण मानतो तो तुला.

आता तुझ्याशिवाय राहु नाही शकत तो. मला हे मान्य आहे की तू तुझ्या जगाप्रमाणे अजुन बरीच लहान आहेस.... पण मूली तू खूप हुशार आहेस. आमच्या जगातील भाषेत सांगायचं तर हे जग चालवण्याचं शिक्षण ज्या मोजक्या मुलांना दिलं ज़ातं, त्यातील सर्वात वरच्या फळीतली एक तू होऊ शकतेस. माझ्या ओरससारखी! तुझ गणितही बरोबर आहे. आमचं जग तुमच्या जगातील प्रवाहापेक्षा... काळापेक्षा... थोड़ पुढे पळतं.... तर त्यामुळे तुझ्या काळात जरी फ़क्त दोन आठवडे झाले असले तरी आमचा प्रवाह जास्त पुढे सरकला आहे. तू कदाचित् अजुन तुझा निर्णय घेतला नसशील. किंवा असा निर्णय घेतला असशील की आमच्या जगात नाही येणार; पण अजुन ओरसला सांगण्याची हिम्मत नसेल तुझ्यात. म्हणून तू तुझी खिड़की बंद करून बसतेस. पण त्याचा फार वाईट परिणाम ओरसवर झाला आहे. आमच्या जगात अस्वस्थता ही भावना माहीत नाही. त्यामुळे तू न दिसल्याने अस्वस्थ झालेला ओरस काही सांगता येत नसल्याने स्वस्थ बसून असतो. इतरांना काही कळत नसल्याने ते येता-जाता त्याला प्रश्न विचारतात. तो त्यांना त्याची अस्वस्थता सांगू शकत नाही आणि इथले कोणी त्याला समजू शकत नाहीत. केवळ मी त्याला समजू शकतो आणि म्हणून मी आज मुद्दाम तुला भेटायला आलो आहे." एवढं बोलून दादाजी क्षणभर थांबले आणि मग त्यांनी अचानक गौरीला विचारले," गौरी तू काय ठरवलं आहेस? तू इथे येणार आहेस की नाही?"

गौरी पार गोंधळून गेली होती. हे सगळं तिच्या समजुतीच्या बाहेर होतं. एकीकडे तिला तिच्या आई-बाबांना कायमच सोडून नव्हतं जायच आणि दादाजी कितीही म्हणाले की ती परत येऊ शकते तरीही तिला परत येता येईल याची खात्री वाटत नव्हती. दुसरीकडे ओरसची काळजी वाटत होती. कारण आतापर्यंत ती देखील त्याच्याशी भावनेने जोडली गेली होती. ओरस तिचा खूप खास मित्र झाला होता. शेवटी तिने दादाजींना विचारलं,"तुम्हीच सांगा दादाजी मी नक्की काय करू?"

दादाजी हसले. म्हणाले,"गौरी आमच्या जगात प्रत्येकजण स्वतः चा निर्णय स्वतःच घेतो. मी काय सांगू?"

गौरी शांत झाली. विचार करत बसून राहिली. दादाजिंना वाटलं तिला यायची इच्छा नाही. ते मागे वळले आणि चालू लागले. गौरीने दादाजींना जाताना बघितलं आणि हाक मारली,"दादाजी थांबा ना."

दादाजी थांबले आणि मागे वळले. गौरीने निर्णय घेतला. "मी येते दादाजी. आत्ता... लगेच. तुमची रात्र लवकर संपेल पण माझ्या इथली नाही. आत्ता कुठे अकरा वाजत आहेत इथे. म्हणजे मी ओरसला भेटून नक्की परत येऊ शकेन. हो न दादाजी?" गौरीने दादाजींकडे आशेने बघत म्हंटले.

दादाजी दोन मिनिट शांत उभे राहिले आणि मग तिच्या दिशेने हात उघडून म्हणाले,"गौरी ये!"

गौरी क्षणभर गोंधळली. कारण अधु पायांनी ती त्या जगात कशी उतरणार होती ते तिचं तिलाच माहीत नव्हतं. पण मग तिने हिम्मत केली. तिने स्वतःच संपूर्ण वजन हातावर तोलल आणि प्रयत्नपुर्वक स्वतःला खिड़कीच्या कट्यावर खेचलं. मग व्हील चेयरवर बसल्यावर ज्याप्रमाणे ती तिचे पाय हाताने खेचायची तसे तिने स्वतःला खेचले. ती आता खिड़कीत बाहेर पाय सोडून बसली होती. तिला खिडकी बाहेरून एक अनामिक खेच जाणवत होती. तिने दादाजींकड़े बघितलं. तिला घरातून बोलताना ते खूप नीट दिसत होते. पण आता मात्र ते धुरकट वाटत होते. नक्की कुठे आणि कसे उभे आहेत ते तिला समजत नव्हतं. त्यांना बघायला ती थोड़ी अजुन पुढे सरकली आणि तिचा तोल गेला. तिच्या लक्षात आलं की तिचा तिच्या जगाशी संपर्क तुटला आहे. तिला वाटलं ती खोल .गर्तेत पड़ते आहे. तिने हात हवेत फ़ेकले आधारासाठी. ती खूप घाबरली. मागे वळून परत खिड़कीचा आधार शोधायला लागली. तिला परत जायचं होतं... आईच्या कुशीत शिरायचं होतं... तिची छाती पार दडपून गेली होती...... या अनामिक भितिशी ती एकटी तोंड देऊ शकत नव्हती. खूप घाबरली होती गौरी... मागे मिट्ट अंधार होता आणि पुढे फ़क्त आणि फ़क्त धूसर अनोळखी प्रकाश! असा किती वेळ गेला कोण जाणे. तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते आणि ती मनातल्या मनात दादाजिंना हाका मारत होती.

.........................आणि अचानक तिला जाणवलं की तिला कोणीतरी दोन्ही हातात तोललं आहे. तिने हळूच डोळे उघडले. ती दादाजींच्या कुशीत होती. त्यांनी तिला लहान बाळाला दोन्ही हातात उचलावं तसं उचलून घेतल होतं आणि ते शांतपणे चालत होते.

"दादाजी?" तिने प्रश्नार्थक हाक मारली त्यांना. ते हसले.

"अग, किती घाबरलीस? तू ओरससाठी येते आहेस की मी तुझ्यासाठी त्याला आणायला हवं असं वाटायला लागलं मला." दादाजी म्हणाले.

गौरी हसली. "बरं गौरी आता तुझी तू चालतेस का? मी असं तुला उचलून नेलं तर ओरस गोंधळून जाईल." दादाजी म्हणाले.

गौरीचा चेहेरा एकदम उतरला. "दादाजी तुम्हाला ओरसने सांगितलं नाही का? माझा एक अपघात झाला होता अलीकडे. त्यामुळे माझे पाय अधु आहेत." गौरी म्हणाली.

"ओह हो का? नाही बोलला तो मला. अपघात अलीकडे झाला होता म्हणजे तुला त्या अगोदर चालता येत होत नं?" दादाजींनी विचारलं.

गौरी हसत म्हणाली,"हा काय प्रश्न झाला दादाजी? मी जन्मने अधु नव्हते. अहो, शाळेत सगळ्या स्पोर्ट्समधे भाग घ्यायचे मी. अगदी पहिली नाही आले, पण एक चांगली स्पोर्ट्स गर्ल होते मी."

"बरं. मग चल तुला जमेल. मी हात धरतो तुझा." असं म्हणून दादाजींनी गौरीला काही कळायच्या आत एकदम त्यांच्या बाजूला उभं केलं. ती खूप गोंधळली... आपण आता तोल जाऊन पडू असं तिला वाटलं. तिने आधारासाठी दादाजींच्या दिशेने हात फेकले. पण मग तिच्या लक्षात आल की ती पूर्वी.... म्हणजे अपघाताच्या अगोदर जशी सहज उभी राहायची तशीच आत्ता देखील तिच्या दोन्ही पायांवर उभी होती..... दादाजींच्या आधाराशिवाय! तिचा विश्वासच बसत नव्हता. तिने आवंढा गिळला आणि दादाजिंकडे बघितलं. ते गालातल्या गालात हसत होते.

"चल गौरी. ओरस वाट बघत असेल. मी त्याला म्हंटल होतं की मी तुला आणायचा प्रयत्न करिन. आणि तुला ही वेळेत परत जायचं असेल न."

गौरीने एकदा दादाजिंकडे बघीतलं. आणि विश्वासाने पाऊल उचललं. गौरी पूर्वीसारखी चालु लागली. आता तिला आश्चर्य वाटलं नाही. तिने दादाजींकडे बघितलं आणि तिच्या लक्षात आलं की खिडकीतून दादाजी जितके उंच वाटत होते ते त्याहूनही उंच आहेत. तिने दादाजींचा हात धरला आणि म्हणाली,"दादाजी, मला सांगाल हे सगळ नक्की काय आहे? ओरस आणि इथली इतर जी माणसं दिसतात ती आमच्या जगातल्या माणसांसारखीच आहेत. भाषा देखील एकच आहे. पण तरीही खूप काही वेगळं आहे. मुख्य म्हणजे तुम्ही आमचे असे वाटता आणि तरीही काहीतरी वेगळं आहे तुमच्यात."

"खरंय गौरी... आमच्या जगात आणि तुमच्या जगात फारसा फरक नाही. फ़क्त प्रवाह थोड़ा वेगळा आहे." असं म्हणून मग क्षणभर थांबले आणि परत बोलायला लागले. "प्रवाह म्हणजे काळ. दूसरा थोड़ा फरक म्हणजे आम्ही तुमच्या जगापेक्षा खूप जास्त प्रगत आहोत. तुमच्याकडे अनेक देश आहेत आणि त्यांना चालवणारी वेगळी सरकारं आहेत. आमचं जग एकत्र बांधलेलं... एकच आहे. आम्ही बुद्धीच्या, हुशारीच्या आणि स्थिर मनाच्या निकशावर आमच्या जगातली मुलं निवडतो आणि त्यांना योग्य ते किंवा असं म्हणू आवश्यक ते शिक्षण देतो. एकदा आमची खात्री झाली की ही मुलं तयार झाली आहेत की मग आम्ही हे आमचं प्रगत जग त्यांच्या हातात सुपुर्द करतो. आमच्या जगात उत्तम बुद्धि असलेली मूलं लहानपणीच शोधून वेगळी केली जातात. त्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्याही नकळत शिकवत असतो. आम्ही अनेको वर्षे प्रयत्न करून विविध शोध लावले आहेत. त्यामुळे या जगात आजार, दु:ख, वेदना नाहीत. तसे कोणी भांडत देखील नाहीत. पण तरीही इथे आयुष्याला एक जिवंतपणा आहे. या जगातलं आयुष्य देखील तुमच्या सारखं सर्वसाधारण आहे. लोक रोज नोकरीला जातात. संसार करतात. जी मुलं वेगळी केली जातात त्यांचं आयुष्य सुरवातीला जरी इतरांसारखं असलं तरी मग ते वेगळं होतं. ओरस असाच वेगळा निवड झालेला मुलगा आहे. पण अजुन त्याला वहन प्रवाहात सामिल केलेलं नाही. म्हणून तर मी त्याची काळजी घ्यायला त्याच्या बरोबर असतो. माझ्यासारखे अजून काही दादाजी इथे कार्यरत आहेत. आम्ही काही एकक मात्र अनेको प्रवाह अजुन आहोत. तुला समजेल असं सांगायचं तर मला मृत्यू नाही... माझ वय वाढत नाही... मी गेले अनेक प्रवाह असाच आहे. ओरस सारखी अनेक मुलं मी तयार केली आहे. तेच माझ काम आहे. माझ्यासारखे जे दादाजी आहेत ते सर्व मिळून पुढची पिढी तयार करण्याचं काम करतात."

गौरी दादाजींचा हात धरून चालत होती. तिला दादाजी जे सांगतात ते सगळं समजत होतं. पण तरीही स्वीकारणं थोडं अवघड वाटत होतं. ती दादाजींचं बोलणं ऐकून विचारात पडली होती. त्यामुळे ती किती चालली किंवा कुठे आली ते तिला कळलं देखील नाही. अचानक दादाजी थांबले आणि म्हणले, "गौरी आपण पोहोचलो."

गौरी विचारातून जागी झाली आणि समोर बघायला लागली. समोर एक अति प्रचंड इमारत उभी होती. इमारत म्हणाण्यापेक्षा एक चिरेबंदी आकाशाला भिडलेला किल्ला होता तो. काळ्याभोर दगडांचा, कौलारु आणि तरीही उंच. मोठ-मोठ्या खिडक्या आणि दरवाजे होते त्या किल्ल्याला. खिड़क्या-दरवाजांवर कोरीव काम केलेल्या महिरपी होत्या. रात्र असूनही त्याच्याभोवती एकप्रकारचा उजेड प्रसवत होता. त्यामुळे तो किल्ला गुलाबी-निळ्या उजेडात प्रकाशमान झाला होता. एका वेगळ्याच दिमाखात उभा होता तो आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. तिला एकदम हॅरी पॉटरच्या हॉगवॉर्डसची आठवण झाली आणि ती खुदकन हसली.

दादाजींनी गौरीचा हात सोडला आणि समोरच्या दरवाजाशेजारी असणारा जाड दोर ओढला. आत खोल कुठेतरी घंटानाद झाला. आतून दरवाजाजवळ कोणीतरी आल्याचा आवाज झाला आणि त्या प्रचंड मोठ्या वाड्याचा तसाच मोठ्ठा दरवाजा हळूहळू उघडला गेला. आत अजुन एक दादाजी उभे होते. गौरी चमकली आणि दोघांमधलं साम्य बघुन चक्रावून गेली. तिच्या शेजारचे ओरसचे दादाजी हसले. "माझा प्रवाह स्नेही" त्यांनी ओळख करून दिली. गौरी त्या दुसऱ्या दादाजिंकडे बघुन हसली आणि तिने नमस्कार केला. "तूच का ग...व......री?" त्या दादाजींनी विचारलं. "हो! पण ग...व....री... नाही गौरी." तिने हसत उत्तर दिलं. तेही मजेत हसले. "चल ओरस तुझी वाट बघतो आहे" असं म्हणून ते चालु लागले.

लांबच लांब बोळ होता तो. दुतर्फा दरवाजे असलेला. काळयाभोर सागवानी लाकडाचे मजबूत दरवाजे होते ते. त्या बोळात देखील मंद गुलाबी-नीळा उजेड होता. मात्र ते तिघे जसजसे पुढे जात होते तसे बोळाच्या दुतर्फा असलेले दिवे जास्त प्रज्वलित होत होते आणि ते पुढे सरकले की मंद होत होते. ते बघुन गौरीला गम्मत वाटली. तिने दादाजिंकडे बघितलं. ते मात्र शांतपणे पुढे सरकत होते. तिचं लक्ष पुढुन चालणाऱ्या दादाजिंकडे गेलं. त्यांची पाठच फ़क्त दिसत होती. तिची नजर सरकत सरकत खाली गेली आणि ती दचकली. त्यांच्या झग्याच्या खालूनही निळसर प्रकाश येत होता मात्र त्यांचे पायच दिसत नव्हते. ते पायाला चाकं लावल्यासारखे सरकत होते. ते पाहून ती दचकली आणि तिचं लक्ष स्वाभाविकपणे ओरस च्या दादाजिंकडे गेलं. तिच्या लक्षात आलं की ते पण निळ्या उजेडात फ़क्त सरकत होते. तिला आठवलं की तिने तिच्या खिड़कीतून जेव्हा दादाजिंना बघितलं होतं तेव्हासुद्धा तिला तो उजेड दिसला होता. तिला दादाजींनी त्यांच्या हातातून खाली उतरवून उभं केलं; त्यावेळी ती उभी राहू शकते आणि चालू शकते या आनंदात तिने दादाजींच्या चालण्याकडे लक्षच दिलं नव्हतं हे आता तिच्या लक्षात आलं. याचा अर्थ दादाजी तिच्या सारखे किंवा ओरस सारखे चालत नव्हते... त्यांना पायाच नव्हते. फक्त होता तो निळा प्रकाश. तिला हे लक्षात आलं आणि दादाजिंबद्दल मनात एक आदरयुक्त भिती निर्माण झाली.

ती दादाजिंकडे वळली आणि तिने विचारलं,"दादाजी तुमचे पाय असे कसे?"

"गौरी मी तुला म्हंटल ना आम्ही अनेक प्रवाह बघितलेले जे आहोत ते थोड़े वेगळे आहोत. किंवा असं म्हणू की आम्ही मुद्दाम आमच्यात थोड़े बदल करुन घेतले आहेत. येणाऱ्या प्रत्येक पिढीला पूर्ण तयार करायची जवाबदारी आमची आहे. त्यासाठी आम्ही असणं आवश्यक आहे. म्हणून हे बदल आवश्यक होते." दादाजींनी तिच्याकडे न बघताच पुढे सरकत तिला उत्तर दिलं.

त्यांच्या उत्तराने तिच समाधान झालं. मग मात्र तिने काही विचारलं नाही. थोड़ चालून पुढे गेल्यावर ते तिघे थांबले. समोर एक बोळ दिसत होता; गौरी आणि ओरसचे दादाजी त्या बोळात शिरले आणि दादाजिंनी समोरच्या दरवाजाची कड़ी वाजवली. दार उघडले गेलं आणि दारात ओरस उभा होता. खिड़कीतून दिसायचा त्यामानाने जास्तच उंच होता तो. दिसायला मोहक होता. मजबूत बांधा आणि नुकतीच फुटलेली मिसरूड; यामुळे त्याचं मुळातलं राजबिंड रूप अजूनच खुलून दिसत होतं. 'तो खिडकीतून दिसत होता त्याहून जास्त समंजस आणि मोठा वाटतो आहे,' गौरीच्या मनात विचार चमकून गेला. मात्र आत्ता तो बराच वाळला होता. किंबहुना आजारीच वाटत होता. नुकतीच फुटायला लागलेली दाढ़ी-मिशी आणि डोक्यावरचे केस सगळच् अस्ताव्यस्त होतं. गौरीला बघुन त्याचे खोल गेलेले डोळे मोठ्ठे झाले.

"तू???" त्याचा आवाज खोल गेला होता पण आवाजात प्रचंड आनंद होता. तिला बघुन तो खुश झाला. तिचे दोन्ही हात धरून त्याने तिला खोलीत नेलं आणि समोरच्या पलंगावर बसवल. "ग...व...रि...मला माहीत होत तू येशिल. नक्की येशिल." गौरी हसली. तो ही तिच्याकडे बघून हसला. त्याचे डोळे आनंदाने चमकत होते. त्याने गौरीचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवले होते. जणूकाही त्याने हात सोडले तर ती त्याला न सांगता पळून जाईल. आणि अचानक म्हणाला,"अग पण तू म्हणाली होतीस की तू चालत नाहीस. पण मग तू इथे कशी आलीस? आणि तू तर चालते आहेस." काय उत्तर द्यावं ते न सुचुन गौरी परत फ़क्त हसली आणि म्हणाली,"चालता येतं मला इथे. बर ते जाऊ दे. तुला काय झालं आहे नक्की? तू असा का दिसतो आहेस? तब्बेत ठिक नाही का?" क्षणभर शांत राहून मग ओरस म्हणाला,"तुझी वाट बघत होतो ग. अग आता काही दिवसात मी पुढचं शिक्षण घेण्यासाठी जाणार आहे. मग मला तुझ्या खिड़कीपर्यंत नाही येता येणार. तू अचानक त्या खिडकीत यायची बंद झालीस. मला कळेना तुला हाक तरी कशी मारू? तुझी खिडकी बंद असताना माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही याची मला कल्पना होती. मुख्य म्हणजे एकदा मी इथून गेलो की मग मी परत कधी येणार याची मला कल्पना नव्हती. जाण्याअगोदर मला एकदा तरी तुला भेटायचं होतंच. पण ते कसं जमेल याचाच मी विचार करत होतो. त्यामुळे थोड खाण्याकडे दुर्लक्ष झालं आणि म्हणून मी असा दिसतो आहे इतकंच! मी दादाजींशी पण बोललो होतो तुला भेटण्याबद्दल. ते तर म्हणाले तुझी इच्छा असेल तर तू पण माझ्याच बरोबर येऊ शकशील; जिथे मी जाणार आहे तिथेच.... आमच्या प्रवाहात. त्याचं बोलणं एकून तर मी खूपच खुश झालो होतो ग...व....री. ते म्हणतात की तू तशीच एक एकक आहेस; माझ्यासारखि! त्यामुळे तू देखील माझ्याप्रमाणे शिक्षण घेऊन इथेच राहू शकतेस. ग...व...री.... येतेस इथे? कायमची?"

ओरसचं बोलणं ऐकून गौरी एकदम गोंधळली. तिने प्रश्नार्थक नजरेने दादाजिंकडे बघितलं. दादाजी हसले. ओरसकड़े वळून ते म्हणाले,"ओरस गौरीला निघालं पाहिजे. तिने अजुन काही निर्णय घेतलेला नाही. तोपर्यंत तरी तिला तिच्या खिडकीतून परत जायला हव न." आणि दोघांनाही काही जास्त बोलायची संधी न देता त्यांनी गौरीला हाताला धरून उठवलं आणि ते दाराच्या दिशेने चालु लागले.

गौरीला देखिल जाणिव झाली की तिला देखील आत्ता तरी नक्कीच निघायला हवं. जर चुकून आई किंवा बाबा खोलीत आले आणि ती खोलीत दिसली नाही तर घाबरतील. त्यामुळे ती देखील दादाजींबरोबर निघाली. मात्र तिने मनातच ठरवलं की परतीच्या प्रवासात दादाजींकडून सगळाच खुलासा करून घ्यायचा.

दाराबाहेर पड़ताना तिने ओरसकड़े वळून बघितलं आणि हसत म्हणाली,"निघते ह आत्ता ओरस. पण आपण नक्की परत भेटणार आहोत. स्वतःची काळजी घे. अच्छा!" ओरस जणूकाही ती मागे वळून बघण्याचीच वाट बघत होता. तो तिच्या जवळ आला आणि अच्छा म्हणतांना तिचा हात हातात धरायच्या निमित्ताने त्याने दादाजींच्या नकळत तिच्या हातावर काहीतरी ठेवलं. तिनेही दादाजींच्या नकळत ते जे काही होत ते पटकन खिशात टाकलं आणि ओरसच्या खोलीचं दार ओढुन घेतलं.

दादाजी आणि गौरी परतीच्या वाटेला लागले. गौरी सुरवात कशी करायची याच विचारात होती; पण तिने काही विचारायच्या अगोदरच दादाजी बोलायला लागले.

"गौरी मला माहीत आहे तूझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन. प्रत्येक शंकेच निरसन करेन. पण अगोदर मी जे सांगतो ते नीट ऐक. कदाचित् मग तुला प्रश्नच पडणार नाहीत."

गौरीने डोळे मोठ्ठे केले. पण काहीच बोलली नाही. दादाजी खोट बोलणार नाहीत किंवा तिला चुकीच काही सांगणार नाहीत याची आतापावेतो तिला खात्री झाली होती. ती दादाजींच बोलण मन लावून ऐकायला लागली.

"गौरी ओरस जे म्हणाला ते खरं आहे. तू इथे आमच्या जगात जर आलीस तर तू त्याच्या बरोबरीने एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकाशील. मी तुला थोड्या वेळापूर्वी सांगितल्या प्रमाणे आम्ही हे जग चालवण्यासाठीचं शिक्षण काही ठराविक मुलांना देतो. त्या समूहाचा एक भाग तू देखिल असशील. मी नंतर तुझ्याशी हे बोलणारच होतो; परंतु ओरसने उल्लेख केला आहेच तर मग आत्ताच बोलणं योग्य असं मला वाटतं.

ऐक.... मी तुला जे म्हंटलं की काही प्रवाहांपूर्वी त्या जगातुन या जगात काही आले होते. मी त्यांच्यातीलच एक आहे गौरी. म्हणूनच मी तुझी भाषा इतक्या चांगल्या प्रकारे बोलू शकतो. ओरस किंवा ते दुसरे दादाजी तुझ नाव ग..व..री... अस घेतात पण तुझ्या लक्षात आलं असेल की मी तुझ्या नावाचा योग्य उच्चार करू शकतो. मीच आपली भाषा इथल्या जगात जागृत केली आणि शिकवली. त्यागोदर इथे मनाच्या जोडणीतून एकमेकांशी संवाद होत असे. परंतु ही जोडणी एकाच वेळी जर दोघांशी झाली तर त्यातून अनेकदा गोंधळ निर्माण होत असे. त्यामुळे मग मी इथे ही बोली भाषा शिकवली. आता जर गरज पडली तरच मनाची जोडणी करून संवाद साधला जातो. बाकी आपल्याप्रमाणे बोली भाषाच वापरली जाते इथे देखील." अस म्हणून दादाजिंनी तिच्याकडे बघुन एक मंद हास्य केलं. हे ऐकून मात्र गौरीच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही.

"पण मग......" गौरीने बोलायचा प्रयत्न केला. दादाजींनी हात वर करून तिला थांबवलं. "माझ पूर्ण बोलणं ऐकून घे गौरी मग तुझे प्रश्न विचार. कारण आपल्याकडे तसा वेळ कमी आहे. तुला तुझ्या जगात तिकडच्या पहाटेच्या अगोदर पोहोचणं आवश्यक आहे; हे विसरु नकोस."

गौरीला दादाजींचे म्हणणं पटलं. ती त्यांचं बोलणं ऐकु लागली.

"तर.... मी तुमच्याच जगातला एक वैज्ञानिक होतो. आम्ही दोन मित्र मिळून आपल्या जगा व्यतिरिक्त जग असतं का या शोधावर काम करत होतो आणि खूप मेहेनतीने आम्हाला या जगाचा शोध लागला. हे जग त्यावेळी देखील जास्त प्रगत होत. आम्ही त्यावेळी इथे अनेकदा येऊन गेलो. त्यावेळच्या इथल्या प्रगती टप्प्यावर विविध देश एकत्र करून एकसंघत्व करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. लढाया, वाद, एकमेकांचा नाश हे सर्व त्यांनी संपवून टाकायला सुरवात केली होती. आमच्या नशिबाने आमची ओळख इथल्या सरवोच्च पदस्थांशी झाली. आमची बुद्धि आणि योग्यता बघुन त्यांनी आम्हाला या जगात येण्यासाठी विचारलं. कारण त्यांनादेखील त्यावेळी अशा लोकांची खूप गरज होती. त्यांना हे जग शांतता प्रिय आणि भय रहित जगण्यायोग्य करायचं होतं. आम्हाला दोघांनाही या सर्वच गोष्टींबद्दल उत्सुकता होती आणि अभ्यास करण्याची इच्छा होती. त्या जगात आमची भावनिक गुंतवणूक अशी नव्हती. त्यामुळे आम्ही दोघेही इथे आलो. ही झाली माझी इथे येण्याची कहाणी.

आता तुझ्या मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं. त्या जगातील काळापेक्षा इथला काळ दीड पटीने पुढे आहे. त्यामुळे मी इथे जन्मणाऱ्या लोकांपेक्षा जास्त काळ जगलो. त्यामुळे जास्त शोधांमद्धे भाग घेऊ शकलो. मग मी प्रयत्न पूर्वक हळूहळू आयुष्य मर्यादा वाढवली. म्हणून मी इथले अनेक प्रवाह..... त्या जगातला काळ..... बघितला आहे. हे झालं माझ्या या जगातल्या आयुष्याबद्दल.

तुझ्या मनात हा प्रश्न नक्की असेल की ओरस असं का म्हणाला की तूसुद्धा इथे येऊ शकतेस. गौरी नीट ऐक. मी शोध करत होतो; अभ्यास करत होतो. मला आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्या माझ्या मित्राला दोघांना मिळून हे जग प्रयत्न करून सापडलं. त्यानंतर या जगाशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला खूप मेहेनत घ्यावी लागली. पण तुला खूप लहान वयात अगदी सहज हे जग दिसलं आहे. त्याहुनही महत्वाचं म्हणजे संपर्क तू नाही केलास; तर इथून तुझ्याशी झाला. म्हणूनच जेव्हा ओरसने मला तुझ्याबद्दल सांगितलं तेव्हा मला आश्चर्य तर वाटलंच पण त्याहुनही जास्त कुतूहल वाटलं. मी तुझा अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं की तुझ्यात एक वेगळेपण आहे; म्हणूनच तू हे जग बघू शकते आहेस आणि तुला इथे संपर्क साधणं सहज शक्य होतं आहे. गौरी ओरस म्हणाला ते खरं आहे. तू वेगळी आहेस आणि तू या जगात आलीस तर त्याचा फायदा जसा तुला होईल तसाच या जगाला देखील होईल. तू जर इथे आलीस तर तुझ्या आयुष्याला एक खूप वेगळं वळण लागेल यात शंकाच नाही. परंतु हे देखिल तेवढंच खरं की मी इथे येण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी बराच मोठा होतो आणि माझी कुठलीही भावनिक गुंतवणूक त्या जगात उरली नव्हती. शिवाय मुळात मला असा काही शोध लागावा अशी इच्छा होती; माझ्या प्रयत्नांना फळ आलं आणि फ़क्त शोध लागला असं नाही तर या वेगळ्या जगात येण्याची संधी मिळाली आणि ती मी घेतली.

मला माहित आहे की तुझ्या वयाची त्या जगातली मूलं अजुन स्वतंत्र विचार करुन निर्णय घेतातच असं नाही. त्यात तू त्या जगात असताना तुझ्या आई-वडिलांवर पूर्णपणे अवलंबून आहेस. त्यामुळे तू नीट विचार कर. हवं तर तुझ्या आई-वडिलांशी बोल. फ़क्त एकच विनंती अशी; खूप उशीर करू नकोस निर्णय घेताना. त्या जगाच्या कालमानाप्रमाणे तू ओरसशी बहुतेक फ़क्त दोन आठवडे बोलली नाहीस. पण इथे प्रवाह जवळ-जवळ चार आठवाड़े पुढे गेला आहे. हे लक्षात असू दे. दुसरी महत्वाची गोष्ट; जर तू इथे न येण्याचा निर्णय घेतलास तर माझी तुला विनंती आहे की या जगाबद्दल कधीच कुठेही वाच्यता करू नकोस. याबद्दलची माहिती फक्त तुझ्याचकडे ठेव. अजून ते जग इतकं प्रगत नाही की या जगाचा ते स्वीकार करू शकतील. त्यामुळे कदाचित् दोन्ही जगांचा ऱ्हास होईल. एवढं करशील ना गौरी?" शेवटचा प्रश्न विचारून दादाजींनी गौरीकडे बघितलं. गौरीने देखील त्यांच्याकडे बघितलं आणि एक मंद स्मित केलं. ती दादाजींना म्हणाली,"दादाजी, मी काय निर्णय घेईन ते मला देखील माहित नाही. पण मी तुम्हाला वचन देते की जर मी न येण्याचा निर्णय घेतला तर ही खिडकी मी कायमसाठी बंद करून इथून निघून जाईन आणि कधीच कोणालाही याबद्दल माहिती देणार नाही. मला तुमचं म्हणणं पटलं आहे."

बोलता बोलता दोघेही गौरीच्या घराच्या खिड़कीजवळ पोहोचले. दादाजींनी गौरीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हाणाले,"गौरी आता ओरस इथे येऊ शकणार नाही. त्याची पुढील शिक्षणाला जाण्याअगोदारची तयारी सुरु होईल. पण तू जो काही निर्णय घेशील तो मला सांग. मला हाक मार; मी लगेच तुझ्याशी संपर्क साधेन. अच्छा. तुमच्याकड़ची पाहाट व्हायला लागली आहे. चल, तुला परत जायला हवं."

दादाजींनी गौरीला उचलून घेतलं आणि एखादं फूल सहज ठेवावं तसं तिला खिड़कीच्या कडेवर बसवून ते मागे सरकले. गौरीला मात्र त्या जगात जाताना जशी एक खेच जाणवली होती; तशीच काहीशी जाणीव झाली; पण आता तिला तिच्या खिडकीकडे ढकलल्यासारखं वाटलं. तिने खिड़कीच्या कठड्यावर बसून दादाजींच्या दिशेने पाहिलं. ते खूप लांब उभे आहेत अस वाटत होतं. ती घरात जाण्यासाठी वळली आणि तिच्या लक्षात आलं की परत तिचे पाय निकामी झाले आहेत. तिला मोठा धक्का बसला. एव्हाना ती हे विसरून गेली होती की ती अधू झाली आहे. खूप मजेत ती दादाजिंबरोबर चालत होती. त्यामुळे क्षणात झालेला हा बदल स्वीकारणं तिला खूप अवघड वाटलं. पण मग स्वतःला सावरून ती घरात तिच्या पलंगावर उतरून बसली. तिने वळून खिड़कीतून बाहेर बघितलं. दादाजी तिथेच उभे होते. त्यांनी हात हलवून तिचा निरोप घेतला आणि मागे वळले. गौरी पलंगावर आडवी पडली. ती मनाने आणि शरीराने खूप थकुन गेली होती. त्यामुळे तिला लगेच झोप लागली.

सकाळी गौरी खूप उशिरा उठली. बाबा कामावर जायला निघतच होते. आईदेखिल स्वयंपाकाला लागली होती. गौरी विचार करत होती, काल जे काही तिने अनुभवलं होतं ते खरंच होतं की स्वप्न! विचार करता करता तिचा हात सहज तिच्या खिशाकडे गेला आणि तिच्या हाताला काहीतरी कड़क दगडा सारखं लागलं. तिने तो गोळा बाहेर काढला. काळाभोर आणि तरीही स्वतःचा असा एक निळसर रंगाचा प्रकाश असलेला चमकणारा दगड होता तो. तो दिसता क्षणी तिला आठवलं की ओरसने ती निघत असताना जे काहीतरी तिच्या हातात ठेवलं होतं ते म्हणजे हाच दगड. मग मात्र रात्रीच्या सर्व घटना खऱ्या होत्या याची तिला खात्री पटली.

'काय करावं? ते जग खरंच आहे. दादाजी स्वतः म्हणाले की ते आपल्याच जगतले आहेत. अर्थात आपल्या जगात ते कोणत्या काळात होते ते मात्र आपल्याला माहित नाही. आता ते तिथलेच झाले आहेत; कदाचित् गेली अगणित वर्ष.' विचार करत असताना गौरीच्या लक्षात आलं,'तिथे मी चालु शकते, अजुन खूप शिकु शकते.... पण तिथे आई-बाबा नसतील माझे. ते आयुष्य कसं असेल ते सांगता येणं अशक्य आहे. इथे माझे आई-बाबा कायम असणार आहेत माझ्याबरोबर. पण इथे या जगात मी आयुष्यभर अधुच रहाणाऱ आहे. मी रोज व्यायाम करतेच की. ते आईचं समाधान म्हणून. त्याचा फारसा उपयोग आजवर झालेला नाही. याची मला कल्पना आहे.' गौरी विचार करत बसली होती.

"अग बेटा उठलीस? रात्रि झोप नव्हती का लागली? आणि अशी इतकी दमलेली का दिसते आहेस? बरं नाही का वाटत तुला?" आई तिच्या जवळ बसत तिला विचारत होती. ऑफिसला निघालेले बाबा देखिल तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिथेच बसले.

"मी एकदम ठिक आहे आई-बाबा. इतकी ठिक तर मी गेल्या कित्येक महिन्यात नव्हते." गौरी हसत म्हणाली.

तिला हसताना पाहुन त्या दोघांना बरं वाटलं.

"आई जर मला चालता यायला लागलं तर तुला काय वाटेल ग?" अचानक गौरीने तिच्या आईला विचारलं.

आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. "म्हणजे? हा काय प्रश्न झाला राणी? जगातली सर्वात आनंदी व्यक्ति असेन मी. आणि मीच का तुझे बाबा देखील. अग, देवाने जर मला म्हंटलं की तू चल माझ्याबरोबर तुझे पाय देतो मी गौरीला; तर मी हसत जाईन त्याच्याबरोबर त्याच क्षणी."आईने उत्तर दिलं.

"काय ग आई काहीतरीच बोलतेस ह. बरं आणि जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुमच्या गौरीला चालता येईल इतकंच नाही तर पुढे खूप शिकता येईल. फ़क्त त्यासाठी तुम्हाला तिला कायमचं दूर पाठवावं लागेल; तर मग तूम्ही काय कराल बाबा?" गौरीने बाबांना विचारलं.

"बेटा, आज तू असे प्रश्न का विचारते आहेस ते मला खरच कळत नाही. पण विषय निघालाच आहे तर सांगतो. आपण जरी इथे नाशिकला आलो असलो तरी मी मुंबईच्या डॉक्टर्सच्या संपर्कात सतत आहे. त्यांचं म्हणणं आहे की एक ऑपरेशन आहे; ते केलं तर कदाचित् तू चालु शकाशील. पण त्याचा ख़र्च खूप जास्त आहे. परदेशात न्याव लागेल तुला. मी पैसे जमवायला सुरुवात केली आहे. खरं तर मुंबईहून इथे आलो त्याचवेळी मी आपलं मुंबईचं घर विकून टाकलं होतं आणि ते सगळे पैसे तुझ्या नावाने गुंतवून ठेवले होते. तुझे पाय कदाचित ठीक होतील असं मला डॉक्टर बर्वेनी त्यावेळी म्हंटल होतं. ज्यांनी तुझी सगळी ट्रीटमेंट केली होती; त्यांना तेव्हाच थोड़ी आशा आहे असं वाटलं होतं.पण सगळं ठरलं तर मात्र त्यावेळी तुला एकटिलाच जावं लागणार आहे. आम्ही नसु तुझ्याबरोबर. कारण तुझ्या बरोबर येणाऱ्या व्यक्तीचा देखील खर्च असेलच न. तेवढी सोय नाही करता येणार मला. गौरी एक सांगू? बेटा आम्ही काही तुला आयुष्यभर नाही पुरणार आहोत. कधी ना कधी तुला स्वतःची काळजी घ्यावीच लागणार आहे. त्यावेळी तुला कोणाची मदत घ्यावी लागू नये किंवा तू कोणावर अवलंबून राहू नयेस म्हणून तर हे सगळे प्रयत्न करतो आहे मी. जर तुझ्या आयुष्याचं भल होत असेल न बेटा तर आम्ही तुला कधीच अडवणार नाही." बाबा बोलत होते.

बाबा खूप मनापासून बोलत होते. त्याक्षणी गौरीला वाटलं आपणही सर्वकाही सांगून टाकावं. पण तिने मनाला आवरलं. कितीही झाल तरी दुसऱ्या जगाचं असणारं अस्तित्व, तिचे तिथले अनुभव यावर कोणाचाही विश्वास बसला नसता; आणि जरी तिच्या आई-बाबांनी तिच्यावर विश्वास ठेवलाच असता तरी तिने दादाजींना शब्द दिला होता की ती त्या जगाबद्दल इथे कोणालाही काहीही सांगणार नाही. म्हणून मग तिने विषय बदलला. थोडावेळ तिच्या सोबत बसून बाबा कामाला गेले आणि आई देखील तिच्या रोजच्या कामाला लागली.

काही केल्या गौरीच्या मनातले विचार मात्र जात नव्हते. एकीकडे एक उत्तम सुदृढ़ सक्षम आयुष्य त्या जगात तिची वाट बघत होतं आणि दुसरीकडे या जगात आई-बाबांची भावनिक गुंतवणूक होती. काय करावं काही केल्या तिला सुचत नव्हतं.

गौरी सतत विचार करत होती. ती दिवसभर अस्वस्थ आहे हे आईच्या लक्षात आलं. मग त्या दिवशी ती शेजारच्या काकुंकडे नाही गेली. मुद्दाम गौरीला घेऊन त्यांच्या पुढील दाराजवळच्या गॅलरीमध्ये बसली. दोघीजणी गप्पा मारत होत्या. समोरच्या झाडावर एक माकडीण तिच्या पिल्लाबरोबर बसली होती. ती पिल्लाचं लक्ष नसताना अचानक कुठेतरी गेली. आई जवळ नाही हे पाहुन ते पिल्लू कावरं-बावरं झालं. ते बघुन गौरीला वाईट वाटलं. ती आईला म्हणाली,"बघ ग आई, बिचाऱ्या पिल्लाला एकट सोडून ती माकड़ीण निघुन गेली." ते ऐकून गौरीची आई हसली. म्हणाली,"बेटा कोणी कोणाला आयुष्यभर पुरत नसतं. ज्याने-त्याने आपापला मार्ग शोधायचा असतो. चिंता करु नकोस. थोडावेळ ते पिल्लू गोंधळेल; पण मग आपला मार्ग बरोबर शोधेलच. हा निसर्ग नियमच आहे गौरी."

"आई, म्हणजे हा नियम सर्वांनाच लागू होत असेल का?" गौरीने आईकडे बघत विचारलं.

तिच्या मनात काय चालु आहे याची अजिबात कल्पना नसलेल्या आईने सहज शब्दात उत्तर दिलं,"हो बेटा. हे जग असंच चालतं. ती कविता आहे न.... जन पळभर म्हणतील हाय हाय.... किती योग्य शब्दात त्यांनी सत्य मांडलं आहे. या जगात कोणीही कोणासाठी थांबत नाही बेटा. आज सकाळी बाबांनी देखील हेच सांगितलं न तुला. तू तुझ्या पायावर उभं रहावस ही आमची मनापासूनची इच्छा आहे. कारण आमच्या नंतर देखील तुला तुझं आयुष्य जगायचं आहेच न बेटा."

आई जे सांगत होती ते गौरी मन लावून एकत होती. त्यावर ती काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने बाबा आले. सगळं विसरून गौरी बाबांच्या गळ्यात पडली. तिघांनी नेहेमीप्रमाणे एकत्र जेवण घेतलं. खूप वेळ गपा मारत बसले होते ते.

रात्र वाढत होती पण गौरीच्या गप्पा संपत नव्हत्या. शेवटी बाबा म्हणाले,"गौरी बेटी झोप आता. काल रात्रिदेखिल तू नीट झोपली नव्हतीस न."

गौरीने हसून बर म्हंटलं. आई दिवा मालवण्यासाठी उठली. गौरीने आईचा हात धरला आणि तिला जवळ बोलावून तिच्या गालावर ओठ टेकवले. आईने तिला कुशीत घेतलं आणि कुरवाळलं. "झोप ह बेटा स्वस्थ." अस म्हणून आणि तिला कपाळाच चुंबन घेतलं.

बाबा देखिल उठले आणि गौरीच्या डोक्यावरून हात फिरवून त्यांच्या खोलीत गेले.

"आज वारा चांगलाच सुटला आहे नाही हो? कधीची वाऱ्यावरून एक वेगळीच अशी शीळ एकु येते आहे. अगदी कोणीतरी सतत साद घालत असल्यासारखी." गौरीची आई खोलीत येत म्हणाली आणि तिने दिवा मालवला. दिवा मालवताना एक क्षण तिला वाटललं की गौरीच्या खोलीत काहीतरी हालचाल झाली आहे, पण मग वाऱ्यामुळे झाडांची सावली हलत असेल अस मनात येऊन ती स्वतःशीच हसली आणि आडवी पडली.

........ सकाळी बराच वेळ झाला तरी गौरीच्या खोलीतून काहीच हालचाल जाणवली नाही."बरं नाही की काय पोरीला..." असं म्हणून गौरीचे बाबा तिच्या खोलीत शिरले. परंतु गौरी तिच्या पलंगावर नव्हती. तिची व्हील चेअर देखील तिथेच होती. ते बघून बाबा गोंधळले आणि तिच्या पलंगाजवळ गेले......... तिच्या पलंगावर एक काळाभोर दगड आपल्या निळसर तेजाने चमकत असलेला बाबांना दिसला. बाबांनी तो दगड हातात घेतला आणि गौरीला हाक मारली...."गौरी..... बाळा......" पण गौरीच्या बाबांना कल्पना नव्हती की गौरी तिच्या खोलीतच काय .... या जगातच नव्हती..... तिने तिचा निर्णय घेतला होता! एका सुदृढ आणि सक्षम आयुष्याचा!!!!!

समाप्त

Friday, July 24, 2020

खिडकी पलीकडचं जग (भाग 2)

खिडकी पलीकडचं जग

भाग 2

खिडकी पलीकडचं जग
भाग 2
मात्र खोल मनात गौरीला कुठेतरी खात्री वाटत होती की तिने त्या मैदानावर मुलांना बघितले होते. ती दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळची वाट पाहात होती. साधारण पाचची वेळ झाली आणि गौरीची आई आणि ती खिडकीतून त्या मैदानाकड़े डोळे लावून बसल्या. पाचचे साडे पाच झाले... साडे पाचचे सहा. पण त्या मैदानावर चिटपाखरुही दिसले नाही. गौरी खूपच हिरमुसली. तिच्या आईने तिची समजूत काढली की आदल्या दिवशी नक्कीच गौरीचा डोळा लागला असणार आणि त्या झोपेत तिला तो भास झाला असणार. असेच दोन-तीन दिवस गेले. गौरी रोज संध्याकाळी त्या खिडकीतून बाहेर मैदानाकडे बघत होती. पण तिला परत तिथे कोणीही खेळतानाच काय पण साधे उभे असलेले देखील दिसले नाही. आता मात्र गौरीलासुद्धा आई म्हणते ते खरे वाटायला लागले. तिने त्या मैदानावर आपल्यला कोणी दिसेल या विचाराचा नाद सोडला.

दिवस जात होते. गौरी आता त्या घराला आणि तिच्या खोलीला रुळली होती. ती आता स्वतःहून आपल्या व्हील चेअरवर बसायला लागली होती. आईला लहान लहान कामात काही ना काही मदत करणे आणि चित्र काढत बसणे असे गौरीचे दिवस जात होते. एक दिवस गौरी आणि तिची आई दुपारी गप्पा मारत जेवत होत्या तेव्हा शेजारच्या मावशींनी दार वाजवले. गौरीच्या आईने उठून दार उघडले आणि म्हणाली,"अरे मावशी तुम्ही या वेळेला कशा? बसा ना. जेवता का आमच्या बरोबर?" त्यावर हसत हसत मावशी म्हणल्या, "अहो गौरीची आई बसते कसली, बारीच कामं आहेत. आज न मी हळदी-कुंकु ठेवल आहे संध्याकाळी. त्याचच आमंत्रण करायला आले होते. तुम्ही नक्की या हं." आणि मग गौरीकडे वळून त्या म्हणल्या," गौरी तू पण ये न. तुलाही थोड़ा बदल होईल." काकुंनी प्रेमाने आमंत्रण केले.

"येते हं काकू." गौरी हसत म्हणाली.

संध्याकाळी पाचच्या सुमारास गौरीची आई तयार झाली आणि व्हील चेयर गौरीजवळ आणून म्हणाली,"चल बेटा. मावशी वाट बघत असतील. हळदी-कुंकवाला जाऊन येऊ."

गौरी हसली आणि म्हणाली,"आई तू जाऊन ये. मी घरीच थांबते. अग आज बाबा लवकर येणार म्हणाले आहेत नं? उगाच त्यांचा गोंधळ व्हायला नको." गौरीला व्हील चेअरवर बसून हळदी-कुंकवाला जायचे नव्हते. कारण मावशी जरी चांगल्या असल्या आणि त्यांनी गौरी समोर कधी तिच्या अपघाताबद्दल विषय काढला नसला तरी नवीन येणाऱ्या बायकांनी तिच्या आईला गौरीबद्द्ल प्रश्न विचारलेच असते. गौरीला ते सगळे परत एकदा ऐकायचे नव्हते. परत त्याच यातना अनुभवायच्या नव्हत्या; आणि आईला पण त्यांना उत्तर देताना त्रास झाला असता हे गौरीला चांगले माहित होते. म्हणून मग बाबा लवकर येणार आहेत अस सांगून तिने जाणे टाळले होते. गौरीची आई देखील अलीकडे तिच्या बाबतीत फारच हळवी झाली होती. म्हणून मग ती बरं म्हणाली आणि लवकरच येते असं सांगून मावशींकडे गेली. काही दिवसांपूर्वी गौरीने खिडकी बाहेर जे जीवंत मैदान बघितलं होतं, ते तिच्या मनात खोल घर करून बसलं होतं. त्यामुळे तिने त्याचं जसं आठवेल तसं चित्र काढायला घेतलं होतं. आई निघाल्यावर तिने ड्राइंग बोर्ड पुढे ओढला आणि चित्र काढण्यात गढुन गेली.

बहुतेक अवघी पाच मिनिटं झाली असतील-नसतील आणि तिला खिडकीबाहेरुन मुलांच्या खेळण्याचा कोलाहल ऐकू यायला लागला. त्या गोंगाटाने गौरी दचकली. तिची नजर खिड़की बाहेर वळली आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिने काही दिवसांपूर्वी बघितलेलं जीवंत मैदान परत तसंच मुला-माणसांनी भरलं होतं. तोच गोंगाट... तसेच मुलांनी खेळ खेळणं.. मोठ्या लोकांचं बसून गप्पा मारणं. गौरीला आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याचवेळी खूप आनंद देखील झाला. ती टक लावून त्या जिवंत झालेल्या मैदानाकडे बघत बसली. बराच वेळ झाला. हळूहळू अंधार पडायला लागला. एक-एक करत सगळे मैदानावरुन बाहेर पडायला लागले. मैदानाच्या आजूबाजूला असलेल्या घरांमधून लुकलुकते दिवे दिसायला लागले. तेव्हा गौरीच्या लक्षात आलं की त्या मैदानाच्या आजू-बाजूला थोडी दूर वाटतील अशी घरं देखील आहेत. ती घरं बघून गौरी थोडीशी गोंधळली. एरवी ही घरं आपल्यला कशी दिसली नाहीत असा विचार तिच्या मनात आला. हळूहळू तिथली सगळी मंडळी निघून गेली आणि ते मैदाना रिकामं झालं. आता त्या मैदानावरचा अंधार देखील भलताच दाटला होता.

'बहुतेक तीन-एक तास आपण त्या मैदानावरच्या मुलांच्या खेळाकडे बघण्यात रमलो होतो वाटतं. अरे! इतका वेळ झाला तर मग अजुन आई कशी नाही आली?' गौरीच्या मनात आलं. तिने मैदानावरची नजर हटवली आणि घड्याळात बघितलं. ती घड्याळ बघुन दचकली. जेम-तेम साडे सहा झाले होते. म्हणजे आई जाऊन फ़क्त दिड तास!

'हे कस शक्य आहे? मी कित्तितरी वेळ बसले होते मैदानावरची गंमत बघत. अगदी मैदानावर अंधार होईपर्यंत. तरी फ़क्त दीड तासच झाला?' गौरी विचार करत होती. तिने परत मैदानाकड़े वळून बघितलं. आता मैदाना रिकामं झालं होतं; पण ते आता एरवी सारखं रिकामं आणि एकटं वाटत नव्हतं. मस्ती करून दमलेल्या लहान मुलासारखं शांत झालं होतं. मैदानाच्या आजूबाजूच्या पण थोडं दूर असणाऱ्या घरांमधून येणारा मंद प्रकाश तिला जाणवत होता.

"गौरी काय बघते आहेस ग त्या मैदानाकड़े? मी दोनदा हाक मारली. पण तुझ लक्षच नाही." गौरीच्या आईने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटलं. गौरी आईच्या आवाजाने भानावर आली. तिने आईकडे बघितलं. तिच्या मनात आलं की सांगून टाकावा आपला अनुभव आईला. पण मग ती थांबली. अजुन तिलाही हा प्रकार नक्की काय आहे ते समजलं नव्हतं. आज तिने जे बघितलं होतं ते खरं होतं. कोणताही भास किंवा स्वप्न किंवा कल्पनाविलास नव्हता; याची तिला खात्री होती. पण मग मधले काही दिवस आपल्याला ते मैदान अस हसरं-खेळतं असलेलं का नाही दिसलं? तिला या प्रश्नाचं उत्तर शोधायच होतं. तिने ठरवलं की नीट उलगडा होईपर्यंत कोणालाही काहीच सांगायचं नाही. असा विचार करत असताना तिची नजर परत एकदा त्या मैदानाच्या दिशेने वळली आणि परत एकदा तिला आश्चर्याचा धक्का बसला. कारण काही वेळा पूर्वी गौरीने त्या मैदानाच्या आजूबाजूला जी घरं बघितली होती आणि त्या घरांमधला मंद उजेड तिच्या डोळ्यांना दिसला होता ती घरं आता तिथे नव्हती. मग मात्र तिच्या मनातला विचार अगदीच पक्का झाला.

ती आईकडे बघुन हसली आणि म्हणाली,"काही नाही ग; चित्र काढण्यात मग्न होते. तर त्याबाजूने काहीतरी आवाज आला अस वाटलं म्हणून बघत होते; तेवढ्यात तू आलीस." आई तिच्याकडे बघुन हसली आणि 'बरं' म्हणाली. मग त्या दोघी गप्पा मारत बसल्या. थोड्या वेळात बाबा पण आले आणि एकूण घरातला माहोल बदलून गेला. इच्छा असुही गौरी तिला आलेल्या अनुभवाचा विचार करू शकली नाही किंवा मानतली शंका आई-बाबांकडे बोलू देखील शकली नाही.

रात्री आई-बाबांबरोबर जेवण वगैरे सगळं आटपुन गौरी आपल्या गादीवर आडवी झाली आणि मग तिला तिच्या संध्याकाळच्या अनुभवावर विचार करायला वेळ मिळाला. 'काय होत ते? चार दिवसांपूर्वी आपल्याला ते मैदाना गजबजलेलं दिसलं आणि आज पण. मग मधले दिवस का नाही दिसलं? हा नक्की काय प्रकार आहे?' गौरी विचार करत होती. ती तशी समंजस मुलगी होती. त्यामुळे उगाच भुताटकी असेल असा विचारही तिच्या मनाला शिवला नाही. मात्र हे असं मध्येच मैदानावर खूपसे लोक दिसतात आणि ते ही रोज नाही तर अचानक एखाद्या दिवशी हे का? त्याचा उलगडा तिला होत नव्हता. असाच विचार करताना तिच्या अचानक लक्षात आल की पहिल्यांदा तिला तिथे माणसं दिसली तेव्हा ती तिच्या घरात एकटीच् होती. आणि आज पण तिची आई हळदी कुंकवासाठी गेली होती त्यामुळे गौरी घरात एकटीच होती. पहिल्यांदा तिला जेव्हा त्या मैदानावर लोक दिसले हे तिने आईला सांगितलं त्यानंतर ते परत दिसतात का याची वाट तिने आणि आईने मिळून बघितली होती. दोघीही खिडकीत बसून गप्पा मारत त्या मैदानाकडे बघायच्या; हे गौरीला लक्षात आलं.

'म्हणजे फ़क्त मला दिसतं ते सगळं!' हा विचार मनात येताच गौरी एकदम खुलली. अवघी सोळा-सतरा वर्षांची मुलगी. अचानक झालेल्या अपघाताने कायमची अधु झालेली. नवीन जागा. ना मित्र-मैत्रिणी... ना कुठे जाणं-येणं. त्यामुळे अपघातानंतर तिच्या आयुष्यात यापुढे कधी काहीतरी वेगळं... थरारक घडेल याची तिने आशाच सोडली होती. अचानक हे एक वेगळ गुपित... फ़क्त तिचंच असं.... तिला मिळालं होतं. त्या नवीन शोधामुळे खूप खुश झाली होती गौरी. मात्र आपल्याला लागलेल्या या शोधाची खात्री करून घ्यायला हवी हे देखील तिच्या मनात आलं. दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ कधी एकदा होते याचा विचार करत करतच गौरी त्या रात्री झोपली. झोपेतसुद्धा तिला त्या मैदानाची स्वप्नं पडत होती आणि ती खुदखुदून हसत होती.

गौरी दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच संध्याकाळचे पाच वाजायची वाट पाहात होती. आज तिचं कशातही लक्ष लागत नव्हतं. ती आईशी गप्पा मारत होती पण तरीही तिचं लक्ष सारखं घड्याळाकडे लागलं होतं. एकदा तर आईने तिला विचारलं देखील,"काय गं गौरी सारखं घड्याळाकडे का बघते आहेस?" आईने असं विचारता क्षणीच आपली अधीरता आईच्या लक्षात आली तर कदचीत आपल्या मनात असलेलं आपल्याला करता येणार नाही; हे गौरीच्या लक्षात आलं. मग उगाच सारवासारव केल्यासारखी ती म्हणाली,"काही नाही गं आई... आज थोडा कंटाळाच आला आहे. आजचा दिवस फारच सावकाश सरकतो आहे असं वाटतं आहे. म्हणून मी सारखी घड्याळाकडे बघते आहे इतकंच." आईला खरंच वाटलं की आज गौरी कंटाळलेली आहे. त्यामुळे तिने मनात ठरवलं की आज गौरीला घेऊन कुठेतरी बाहेर जायचं संध्याकाळी. अर्थात आईला माहित नव्हतं की गौरीने संध्याकाळसाठी काय करायचं ते अगोदरच ठरवून ठेवलं आहे.

साधारण पावणे पाच वाजता तिने आईला हाक मारली आणि म्हणाली, "आई, अग माझे ऑइल पेंट्स संपले आहेत. आणून देतेस का गं?"

गौरीच्या आईला कळेना की अचानक गौरी ओईल पेंट्स का मागते आहे. ती गौरी जवळ येऊन म्हणाली,"अग आता गेले तर उशीर होईल. ऑइल पेंट्स जवळ नाही नं मिळत. एक काम करुया. तू पण तयार हो. आपण दोघी जाऊन घेऊन येऊ. त्या निमित्ताने तू घराबाहेर पडशील आणि तुला देखील बरं वाटेल. चालेल?" आईचं बोलणं एकून गौरीची पंचाईत झाली. कारण गौरीला आईने एकटीनेच जायला हवं होतं. त्यामुळे मग तिने हट्ट धरला. "मला आत्ताच हवेत ते कलर्स. असं काय करतेस? मी तयार होणार आणि मग आपण निघणार. त्यात कितीतरी वेळ जाईल. मला आताच त्या कलर्सनी रंगवायचं आहे हे चित्र. तू एकटीच गेलीस तर तासाभरात येशीलसुद्धा. आण नं प्लीज."

आईला तिचं मन मोडवेना; म्हणून मग तिने एकटीनेच जाऊन येणं मान्य केलं. म्हणाली,"बर मी पटकन जाऊन येते. शेजारच्या मावशींना सांगून जाते. त्यांना हाक मार हं काही लागल तर." गौरी खुशीत 'हो' म्हणाली आणि तिची आई पटकन तयारी करून बाहेर पडली. आईने दरवाजा ओढुन घेतला आणि गौरीने पराकोटीच्या उत्सुकतेने मैदानाच्या दिशेने मान वळवली................

.............मैदानावर मुलांचा खेळ रंगात आला होता. मोठी माणसं कुठे गप्पा... कुठे पाय मोकळे करायला चालणं अशी विखुरली होती. ते दृश्य बघून गौरी हरकून घेली. 'आपला अंदाज बरोबर आहे तर. आई असताना हे दृश्य नाही दिसत.' तिच्या मनात आलं,'पण मला तर रोज हे बघायला आवडेल. मी आता खेळू शकत नसले, तरी या मुलांना खेळताना बघून खूप बरं वाटेल मला.' गौरी मनात विचार करत हसत होती. आणि अचानक तिच्या मनात आलं,'पण रोज कस आईला बाहेर पाठवणार? आणि तिला हे सांगितलं तरी तिला हे कुठे पटणार?' गौरी विचारात पडली. ती त्या मैदानाकड़े बघत बसली होती. थोड्यावेळाने तिला घराच दार उघडण्याचा आवाज आला म्हणून तिने वळून दाराकडे बघितलं. आई काहीतरी बोलत गौरीच्या खोलीच्या दिशेने येत होती. आई आलेली बघून गौरीने परत मैदानाच्या दिशेने मान फिरवली. ते रिकामं होतं. स्विच ऑफ करून जसा आपण टी. व्ही. बंद करतो... तस काहिसं. गौरीला मनातून माहित होतं की हे असंच होणार आहे. पण तरीही ती थोड़ी हिरमुसली. अर्थात ते तिने आईला कळू दिलं नाही. कारण बिचारी आई केवळ गौरीने हट्ट केला होता म्हणून बाजारात जाऊन तिचे ऑइल कलर्स घेऊन आली होती. तिने हसत आईकडे बघितलं आणि तिने आणलेले ओईल पेंट घेऊन पुढ्यातलं चित्र रंगवायला घेतलं.

असेच अजून दोन-तीन दिवस गेले. आई घरातच असल्याने गौरीला मैदानावर खेळणारी मुलं दिसली नव्हती; आणि त्या विचाराने गौरी मनातून थोडी दु:खी होती. मात्र तिने ते आईला कळू दिलं नव्हतं. गौरीची आई त्यादिवाशी सकाळी कोपऱ्यावरच्या वाण्याकडे गेली होती. नेमका अवेळी अचानक पाऊस आला होता आणि त्यात ती भिजली होती. त्यामुळे गौरीच्या आईला दुपारी अंगात जरा कणकण जाणवली. म्हणून मग गौरीला सांगून आणि औषध घेऊन तिची आई दुसऱ्या खोलीत दुपार पासूनच झोपली होती. चारचा सुमार होता. गौरी तिचं चित्र पूर्ण करत बसली होती. गौरीचं सहज मैदानाकडे लक्ष गेलं आणि तिला धक्काच बसला. कारण नेहेमीची सवाय असल्यासारखी हळूहळू मैदानावर मूलं जमायला लागली होती. फ़क्त मुलंच नाही तर नेहेमी प्रमाणे मोठी माणसं देखिल मैदानावर आली होती. आता मात्र गौरीच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. तिच्या मानत आलं,' घरात आई आहे आणि तरीही आपल्यला या मैदानावरची ही सर्व मंडळी कशी दिसत आहेत? त्यात आता जेमतेम चार वाजलेत आणि इतक्या लवकर कशी आली ही मुलं खेळायला? गौरीच्या मनात एका मागून एक विचार यायला लागले. पण मग गौरीच्या लक्षात आल की बाहेर मैदाना जवळ उन्हाचा तडाखा चार सारखा वाटत नव्हता. मात्र घरातलं घड्याळ चारची वेळ दाखवत होतं आणि एरवी चार वाजता जसं वातावरण असत तसंच वातावरण घरात होतं. हा वेळेचा फरक कसा ते गौरीला कळेना. ती विचार करायला लागली आणि तिच्या लक्षात आलं की मागच्या दोन्ही वेळेला आपल्याकडे संध्याकाळचे सहा वाजतात न वाजतात तोवर हे मैदान मोकळं व्हायला लागलं होतं. म्हणजे कदाचित याचं घड्याळ आपल्यापेक्षा थोडं पुढे आहे की काय?'

मैदानावर नजर खिळवून गौरी विचार करत होती. समोर जी लोकं दिसत होती त्यांच्या घडाळ्यात किती वाजले असतील याचा अंदाज तिला नव्हता. पण तिच्या घरातल्या घडाळ्यात जेम तेम चारच वाजले होते. याचा अर्थ त्याचं घडयाळ आपल्यापेक्षा थोडं पुढे आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. हा विचार मनात पक्का झाला आणि मग मात्र गौरीने स्वतःचे असे ठोकताळे बांधायला सुरवात केली. एक म्हणजे फ़क्त तिलाच ते जीवंत मैदान, तिथे खेळणारी मुलं आणि माणसं दिसतात. आज आई घरात आहे पण ती दुसऱ्या खोलीत झोपलेली आहे. म्हणजे ही लोकं ज्यावेळी या मैदानावर यायला सुरवात करतात त्यावेळी गौरी खोलीत एकटी हवी आणि सारखं कोणी त्रास देणारं नको. आता गौरीला त्या ऐकूण प्रकाराचा विचार करण्यात आणि त्या मैदानावरच्या लोकांचा शोध घेण्यात अजुन गंमत वाटायला लागली. आता तिला तिची उत्सुकता स्वस्थ बसु देत नव्हती. पण त्या लोकांबद्दल अजून जाणून घ्यायचं तर गौरीला घरात एकटं असणं आवश्यक होतं. कारण आज आईला बरं नव्हतं म्हणून ती दुसऱ्या खोलीत झोपलेली होती. नाहीतर तिची आई सतत गौरीच्या भोवतीच असायची. आणि आई घरात असताना गौरी काहीच करू शकत नव्हती.

गौरीने विचार करून गप्पा मारताना हळूहळू आईला पटवून दिलं की तिने सतत गौरीचा विचार करत राहाणं बरोबर नाही. थोडं घराबाहेर पड़लं पाहिजे. गौरीमुळे ती खूप अडकून पडली आहे. पूर्वी मुंबईला असताना तिची आई एका सेवाभावी संस्थेमध्ये मदत म्हणून त्यांचं ऑफिस सांभाळायला जायची रोज. ३-४ तासाचं काम होतं. पण त्यामुळे तिची आईदेखील थोडी बिझी असायची. तसच इथे देखील तिने काही करावं असं गौरीने सुचवालं. पण तिची आई गौरीला सोडून कुठे लांब जायला तयार नव्हती. पण मग यावर गौरीनेच एक तोडगा शोधून काढला.

रोज संध्याकाळी शेजारच्या मावशींकडे आजुबाजूची मूलं गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, पाढे वगैरे म्हणायला जमायची. तास-दीड तासाचा कार्यक्रम. गौरेने आईला सुचवलं की ती मावशींना मदत करायला शेजारी जाऊ शकते. मावशींचं घर शेजारीच होत. त्यामुळे आई कुठे लांब जाण्याच्या प्रश्न नव्हता. आणि गौरी अगोदर दोन-तीन दिवस आईबरोबर गेली. आईला ते सगळं आवडतं आहे हे लक्षात आल्यावर हळूच तिने अंग काढून घेतलं. तिने आईला समजावलं की असं खूप वेळ व्हील चेअर मध्ये बसायची तिला सवय नसल्याने तिला त्रास होतो. आईलादेखील ते पटलं. आणि मग गौरी घरीच थांबली; आणि आईला जायला भाग पाडलं. हळूहळू आईला पण सवय झाली. आणि गौरीला स्वर्ग सापडल्याचा आनंद झाला.

मग मात्र गौरी रोज संध्याकाळी आई गेल्या बरोबर खिडकीत बसून त्या मुलांचं निरिक्षण करायची. त्याच मैदानाची वेगवेगळी चित्रं काढायला तिने सुरवात केली. प्रत्येक वेळचे चित्रातले बारकावे वेगळे असायचे. एक दिवस ती अशीच निरिक्षण करत बसली होती; आणि अचानक त्या मैदानावर फुटबॉल खेळणाऱ्या मुलांचा बॉल गौरीच्या खिड़कीच्या दिशेने आला. गौरी थोड़ी दचकली. पण तिचं मत होतं की ती काही त्यांना दिसणार नाही. कारण आतापर्यंत तिला हे लक्षात आलं होतं की ते जग वेगळं होतं. तिची खिड़की हा केवळ त्या जगात डोकावायचा एक लहानसा झरोका होता. तिचं त्या जगात काहीही स्थान नव्हतं. त्यामुळे तिला कोणी बघू देखील शकणार नव्हतं. म्हणून मग बॉल तिच्या दिशेने येऊनही गौरी शांत होती.

"ए बॉल तुझ्या खिड़कीत आला आहे. टाक ना...." त्या आवाजाने आणि समोर कंबरेवर हात ठेऊन उभ्या मुलाकडे बघुन मात्र गौरी पुरती गडबडली.

"क...काय? कोण?..... मी? म्हणजे ... मला म्हणालास?" गौरीने अडखळत विचारलं. ती पुरती गोंधळून गेली होती. तिच्या मनातला समज चुकीचा आहे हे तिच्या लक्षात येऊनही तिला ते पचत नव्हते.

"हो... कमाल करतेस. खिड़कीत तूच बसली आहेस न? मग दुसऱ्या कोणाला कसं सांगेन?" तो मुलगा सहज आवाजात म्हणाला.

"तुला मी दिसते आहे?" तिने आश्चर्याने विचारलं.

"तू वेडी आहेस का? तू दिसत नसतीस तर मी काय हवेशी बोलतो आहे का?" त्याने हसत उत्तर दिलं. " नेहमीच बघतो मी तुला. तशी रोज दिसतेस अलीकडे. पण अगोदर जेव्हा दिसली होतीस तेव्हा मला आश्चर्य वाटलं होतं. तुझ्याशी बोलायचं ठरवलं होतं, पण मग तू दुसऱ्या दिवशी दिसलीच नाहीस. मग मधेच एक दिवस दिसलीस. परत गायब. मग मी तुझा नाद सोडला. अलीकडे मात्र रोज दिसत असतेस. पण तू कधी खेळायला येत नाहीस. एकदा येणार पण होतो तुला विचारायला. पण दादाजी नको म्हणाले. आणि तसंही हे मैदान म्हणजे आमची सीमा रेषा आहे असं म्हंटलं जातं. इथपर्यंत येण्याची वेगळी परवानगी घ्यावी लागते. म्हणून मग उगाच माझ्या हातून काही चूक व्हायला नको असा विचार केला आणि मग नाही आलो. शिवाय दादाजी म्हणाले तू आपणहुन हाक मारशील आणि येशिल तेच चांगलं. पटल ते मला. म्हणून तू हाक मारायची वाट बघत होतो. आज मात्र आमचा बॉल आला आहे तुझ्या खिडकीजवळ. त्या निमित्ताने निदान तुझ्याशी बोलतो तरी आहे. बरं ते जाऊ दे. तो बॉल टाक. आमचा खेळ खोळंबला आहे;" तो मुलगा रोजची ओळख असल्या सारखा गौरीशी बोलत होता. गौरी मात्र आश्चर्याने पार गारद झाली होती. तिने काही न बोलता बॉल टाकला. त्या मुलाने झेलला आणि परत मैदानाकड़े पळाला.

'मी पण त्यांना दिसते? गेले अनेक दिवस....? असं तो मुलगा म्हणाला खरं. पण असं कसं? दादाजी कोण असतील? त्यांनी असं का सांगितलं की मी हाक मारेपर्यंत थांबायचं? तो मुलगा म्हणाला हे मैदान एक सीमारेषा आहे... म्हणजे नक्की काय? हे एकूण काय असेल?' गौरी जाम गोंधळली होती; पण घाबरली मात्र नव्हती. ती विचार करत होती. विचार करण्यात किती वेळ गेला ते तिच्या लक्षात आलं नाही. पण थोड्या वेळाने तिची आई आली आणि मग बाबा देखील आले. आई-बाबा असताना त्यांच्याशी अगदी नेहेमीसारखं वागत-बोलत होती ती. पण तिचं आंतर मन सतत विचार करत होतं. तिचं वयच असं होतं की तिची उत्सुकता तिला स्वस्थ बसु देत नव्हती. आणि मग तिने स्वतःच हाक मारायच ठरवलं.

"ए..... ए... शुक-शुक... ए मुलगा......" गौरीने हाक मारली.

काल बॉल घेऊन जाणाऱ्या त्या मुलाने वळून बघितलं. त्याने तिच्या दिशेने हात हलवला आणि धावत येऊन तिच्या समोर उभा राहिला.

"ए शुक-शुक काय? मला नाव आहे." कंबरेवर हात ठेऊन तो म्हणाला.

"अरे पण मला माहीत नाही न तुझ नाव..." गौरी हसत म्हणाली.

"ओरस..." तो शांतपणे म्हणाला.

"काय?" गौरी गोंधळून म्हणाली.

"माझ नाव ग... ओ...र...स... आणि तुझं?" तो म्हणाला.

"गौरी" तिने उत्तर दिलं.

"काय? ग...व...री? असं कसं नाव?" त्याचा चेहरा गोंधळाला होता. "बरं. ते जाऊ दे. येतेस खेळायला?" त्याने विचारलं आणि एकदम दाताखाली जीभ चावली. त्याने कसानुसा चेहेरा करत इथे-तिथे बघितलं.

"नाही जमणार रे..." गौरी दुःखी होत म्हणाली. "आणि असा का केलास चेहेरा?" तिने विचारलं.

"अग मी तुला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं होतं. मग अचानक तू गायब होतिस काही दिवस. मग एक दिवस परत दिसलिस आणि मग रोज दिसायला लागलीस. मी हे सगळ दादाजिंना सांगितलं....." ओरस बोलत होता. त्याला मध्येच थांबवत गौरीने विचारलं,"हे दादाजी कोण रे?"

"आहेत... अम्.... म्हणजे ते एक आहेत त्यांना आम्ही सगळेच दादाजी म्हणतो. सगळे म्हणजे माझ्याहून मोठेसुद्धा आणि माझ्याहून लहानसुद्धा. ते आमच्यातले खूप काहीतरी आहेत. त्यांना मी जेव्हा सांगितलं तू दिसतेस तेव्हा ते म्हणाले अस होत कधी-कधी. नकळत एखादी खिड़की दिसते उघडलेली. जरी ती खिडकी दोन्ही बाजूंनी उघडलेली असली तरी आमच्या बाजूने बोलायला सुरवात करणं योग्य नाही असं ते म्हणाले. आणि म्हणाले की तू स्वतः बोलेपर्यंत नाही बोलायचं. म्हणून तर मी खूप वाट बघितली की तू बोलशील. पण तू नुसतीच् बघत बसलेली असायचीस. एक गंमत सांगू? कोणाला सांगू नकोस हं... पण मी काल मुद्धाम बॉल इथे मारला आणि त्या निमित्ताने आलो इथे तुझ्यासमोर. बघ, झाला की नाही उपयोग. लागलो की नाही आपण बोलायला. मला वाटलं होतं कोणाला कळणार नाही मी मुद्दाम बॉल याबजुला मारला आहे. पण दादाजिंपासून काहीच लपत नाही. दादाजींच्या ते लक्षात आलं की मी मुद्धाम बॉल इथे मारला होता. ते म्हणाले मला ... ओरस मला कळलं बर का... बास इतकंच! तसा मी त्यांचा लाडका आहे न. त्यामुळे रागावले नाहीत." तो....ओरस... हसत म्हणाला.

ते सगळं ऐकून गौरी थोड़ी गोंधळली. पण मग हसून म्हणाली,"बरं झालं तू स्वतःहून मला हाक मारलीस. अरे मला वाटायचं की फ़क्त मलाच तुम्ही दिसता. तुम्हाला मी दिसत असेन असं वाटलंच नाही; नाहीतर कधीच हाक मारली असती."

त्यावर ओरस हसला. "ग.....व.....री... चल येतेस खेळायला?" असं ओरसने विचारलं आणि गौरी एकदम गप्प झाली.

"का ग तुला खेळायला नाही आवडत?" तिला असं अचानक गप झालेलं बघून त्याने विचारलं.

"ओरस माझ नाव न गौरी आहे रे... ग...व...री... नको ना म्हणुस. शेणाच्या गवऱ्यांसारखं वाटतं." गौरी म्हणाली... "आणि किनै मला पण खूप आवडतं खेळायला. पण... पण किनै मी कंबरेखालुन अधु आहे. त्यामुळे मी नाही येऊ शकणार खेळायला." गौरीने खालच्या आवाजात सांगितलं.

"अधु? म्हणजे?" ओरसने गोंधळून विचारलं. अगोदर गौरीला वाटलं तो तिच्या अधू असण्याची चेष्टा करतो आहे आणि तिला राग आला. पण मग त्याचा गोंधळलेला चेहेरा बघुन ती म्हणाली,"अरे म्हणजे मी कमरेखालुन हलु शकत नाही."

"अरे?असं कसं? का नाही? सगळेच कमरे खालून हलू शकतात. मग तू का नाही?" आता ओरस अजुन गोंधळला.

"माझा एक अपघात झाला होता." तिने उत्तर दिलं.

"अपघात? म्हणजे?" त्याने परत विचारलं. आता मात्र गौरी थोड़ी वैतागली. "जा विचार तुझ्या त्या दादाजिंना. तू म्हणतोस न त्यांना सगळं कळतं? मग त्यांना अपघात म्हणजे काय ते पण सांगता येईल तुला. मला याहून जास्त नाही समजावता येत." अस म्हणून गप बसली.

"हो ग. त्यांना न सगळं कळतं आणि माहीत असतं. त्यांनी खूप जास्त प्रवाह बघितले आहेत." ओरस म्हणाला.

"प्रवाह? म्हणजे? तुमच्याकडे खूप नद्या आहेत का?" आता न समजण्याची पाळी गौरीची होती.

"अग नद्या नाही ग. अग प्रवाह.. म्हणजे हा जो आहे तो.. म्हणजे आपण हे जे करतो ते..." ओरस त्याच्या परीने समजावत होता. आता समजावायची पाळी त्याची होती न. त्यांच्या गप्पा अजूनही लांबल्या असत्या. पण अचानक एक मोठी शीळ वाजली आणि त्याने डोळे विस्फारुन मैदानाच्या दिशेने वळून बघितलं. शिळेचा आवाज ऐकताच सगळे परत निघाले होते. त्याने तिला घाईघाईने अच्छा असा हात केला आणि बोलतानाचं वाक्य अर्धवट सोडून तो मैदानाच्या दिशेने धुम पळाला.

गौरीने पण "बाय" म्हंटलं. पण बहुतेक त्याला ते एकु नाही गेलं. तिने मान आत वळवुन घरात बघितलं. अजुन आई आली नव्हती. तिने हलकासा निश्वास टाकला. 'ओरसशी बोलण्याच्या नादात आपण आपलं घर आणि आई-बाबा विसरलो होतो. हे बरोबर नाही. सांभाळलं पाहिजे.' तिच्या मनात आलं. तेवढ्यात आई आलीच आणि मग इतर विचार बाजूला ठेवत गौरी आईशी गप्पा मारण्यात मग्न झाली.

असेच काही दिवस गेले. ओरस तिच्या खिडकीकडे रोज यायला लागला होता. तो आणि गौरी रोज गप्पा मारायला लागले होते. आता गौरीची ओरसशी छान गट्टी देखील जमली होती. त्याचे दादाजी म्हणजे त्याचे खरे आजोबा नव्हते हे एव्हाना गौरीच्या लक्षात आले होते. ते त्यांच्या जगातले एक अत्यंत जुने गृहस्थ होते. त्यांना सगळेच 'दादाजी' म्हणायचे कारण त्यांनी त्या जगातल्या अनेक पिढ्या बघितल्या होत्या. पण दिसायला ते वृद्ध नव्हते असं ओरसचं मत होतं. त्यांच्याकडे ट्रॅफिक.... मोठ्ठे आवाज... भांडणं.... अपघात..... अस काहीच नव्हतं म्हणे. कारण ती असं काही सांगायला लागली की ओरस गोंधळून जात असे. हे सगळं समजून गौरीला थोड़ विचित्रच वाटलं.

तिने तिच्या जगाची माहिती दिली. त्यात मोठ्ठे आवाज होते; गोंधळ-कलकलाट होते; अपघात होते.... ओरसच्या मते ते सगळं खरं नव्हतंच. कारण त्याला या सगळ्याची कल्पना करताच येत नव्हती.

हळूहळू गौरीची आणि ओरसची चांगली दोस्ती झाली होती. दोघांनाही आता हे लक्षात आलं होतं की ते दोघे वेगवेगळ्या जगातले होते. गौरीच्या खिडकीमध्ये काहीतरी होतं की ज्यामुळे ती ओरसच्या जगाला बघू शकत होती, आणि ते जग... त्यातला ओरस...... तिला बघू शकत होता. गेला आठवडाभर ते दोघे गप्पा मारत होते. खरं सांगायचं तर एकमेकांच्या वेगळेपणाचा अंदाज घेत दोघेही माहिती गोळा करत होते. तो तास-दीड तास म्हणजे गौरीच्या रुक्ष आयुष्यातलं एक सुंदर हिरवं वळण होतं. फ़क्त तिच्यासाठी उघडलं गेलेलं; याची तिला पूर्ण कल्पना आली होती. ती या आणि त्या जगाच्या उंबरठ्यावर उभी होती याची तिला आतापर्यंत कल्पना आली होती.

गौरीचा जीव आई-बाबांमधे जितका रमायचा तितकाच् तो आता ओरसबरोबर गप्पा मारताना खुलायचा. ओरस देखिल तिला बघितलं की खेळ सोडून धावत यायचा. कधीतरी तिची आई घरीच थांबायची गौरीला बरं वाटावं म्हणून. मग गौरीदेखील काही म्हणायची नाही. ती आईशी गप्पा मारताना सारखी खिड़कीबाहेर बघायची. पण तिथे ओरस आणि त्याचं जग दोन्ही नाही दिसायचं. अर्थात त्याची तिला कल्पना होती. तिला हे देखील लक्षात आलं होतं की तिची आई असताना जरी गौरी खिडकीमद्धे बसली तरी ओरसला ती दिसत नव्हती.

असाच अनेक दिवसांपैकी एक दिवस होता. ओरस आणि गौरी गप्पा मारत होते. आणि अचानक ओरस म्हणाला,"गौरी किती दिवस आपण अस गप्पा मारणार? ये न इथे. आपण एकत्र खेळूया." गौरी काही न बोलता गप बसली. तिच गप बसणं म्हणजे होकार आहे असं ओरसला वाटलं आणि मग ओरस् तिच्या मागेच् लागला.

त्याचा आग्रह वाढला तशी गौरी म्हणाली,"अरे ओरस् कस समजाऊ तुला. मला नाही येता येणार तिथे. मुळात मला एकटीने हलताच येत नाही. आणि मी प्रयत्न करून आलेच तिथे तरी तुमचं जग माझ्या जगापेक्षा वेगळं आहे. मी परत येऊच नाही शकले तर? माझ्या आई-बाबांचं कसं होईल असं मला अचानक गायब झालेलं बघुन? अरे अजुन तुझ्या लक्षात नाही का आलं? आपण दोघे एका अशा सीमारेषेवर उभे आहोत; की मी तिथे आले तर परत येऊ शकेन याची मला शाश्वती नाही आहे." गौरीने त्याला शांत करत उत्तर दिलं.

त्यावार ओरस म्हणाला,"मी दादाजींना विचारलं."

"काय म्हणाले ते?" तिने उत्सुकतेने विचारलं.

"तुझ्या परत जाण्याबद्दल ते काहीच म्हणाले नाहीत. ते म्हणाले इथे येण्याचा निर्णय तुला स्वतः ला एकटीने घ्यायचा आहे. त्यांनी मला तुझा निर्णय विचारायला सांगितले आहे." तो म्हणाला.

त्याचं बोलणं ऐकून गौरी थोडी गंभीर झाली. "समजा मी म्हणाले हो येते तर? तुझे दादाजी मला मदत करतील? मला परत इथे माझ्या आई-बाबांकड़े येता येईल? मला चालता येत नाही. फार तर खिड़कीत चढु शकेन; मला ते तिकडे उतरवून घेऊ शकतील? तुमचं जग आमच्या जगापेक्षा अनेक बाबतीत पुढे आहे. तुम्ही जास्त प्रगत आहात. तुमचं कालमापन आमच्यापेक्षा थोडं वेगळं आहे. आमचा तास म्हणजे तुमच्याकडचा बहुतेक दीड तास असावा; असा माझा अंदाज आहे. हे सगळं वेळेचं गणित तुझे दादाजी जमवू शकतील? ओरस मलाही तिथे तुमच्या जगात यावसं वाटतं रे. पण परतीची वाट बंद होईल की काय या भितीने मी तिथे येण्याचा विचार देखील करत नाही. आणि अर्थात हे माझं अधू असणं देखील एक मोठा प्रश्न आहे...... या सगळ्याची उत्तरं तुझे दादाजी देऊ शकतीलं?" तिने एका मागोमाग एक प्रश्न विचारले.

ओरसला काय बोलावं ते सुचत नव्हतं. तो गौरीकडे बघत होता आणि गौरी त्याच्याकडे.... आणि अचानक एक खूप गंभीर आणि खोल खर्जातला आवाज आला..."हो गौरी! सगळ जमेल"

ओरस् आणि गौरी दोघेही दचकले. ओरसने वळून बघितलं. शेजारच्या एका मोठ्ठया झाडामागुन एक अत्यंत उंच आणि गोरिपान, तेजस्वी व्यक्ति ओरस च्या शेजारी येऊन उभी राहिली. त्यांनी शुभ्र पांढरा गाऊन घातला होता... ख्रिश्चन फादर्स घालतात तसा.... मोठी शुभ्र दाढ़ी होती. पण दिसायला ते म्हातारे नव्हते वाटत. उलट चेहेरा तकतकीत, गंभीर, अत्यंत तेजस्वी आणि तरीही थोड़ा मिशिक्ल होता. मोठ्ठे आश्वासक डोळे होते. छान छाप पडावी असं एकूण व्यक्तिमत्व होतं त्याचं. गौरी त्यांना बघुन मंत्रमुग्ध झाली. ओरसला खूप आनंद झाला.

"दादाजी हीच गौरी. माझी नवी मैत्रीण. खरंच तिला आपल्याकडे घेता येईल?" त्याने उत्सुकतेने विचारले.

".....आणि थोड्या वेळात परत पण जाता आले पाहिजे ह..."गौरीने तिच्या मनातला विचार जोडला.

दादाजी दोघांकडे बघुन हसले. "हो... दोन्ही जमेल. पण त्यासाठी गौरीने स्वतः प्रयत्न करावा लागेल. ओरस तिला जे समजलं ते तुला पटत नाही आहे. आपण दोन वेगळ्या जगांच्या सीमा रेषेवर आहोत. तिला इथे येण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. मी मदतीला आहेच. पण सुरवात तिने करावी लागेल. गौरी मागे अनेक प्रवाहांपूर्वी; म्हणजे तुला कळेल अशा भाषेत सांगायचं तर; तुमच्या अनेक वर्षांपूर्वी मी हा प्रयोग केला होता. त्यावेळी ते मला सहज जमलं होतं. त्यामुळे हे नक्की की तू इथे येऊ शकतेस आणि परत जाऊ ही शकतेस. पण सुरवात तू करायची आहेस. बस एवढंच." अस म्हणून दादाजी आश्वासक हसले.

दादाजींच्या आश्वासक हास्याने गौरीला धीर आला. तिने शांतपणे दादाजींकडे बघितलं आणि म्हणाली,"दादाजी, हा खूप मोठा निर्णय आहे माझ्यासाठी. मला वेळ हवा विचार करायला. खूप आवडेल मला तिथे यायला. पण भिती पण वाटते आहे मनातून."

"मी समजु शकतो गौरी. ठिक आहे. विचार कर. तू तुझा वेळ घे... आम्ही आहोतच इथे." दादाजी म्हणाले आणि ओरसकड़े वळून म्हणाले,"चल ओरस. आपली हाक येईल एवढ़यात. मला तुझ्यासारखं पळायचं नाही." आणि मग गौरीला अच्छा करून; लवकर भेटण्याचं वचन देऊन ते मागे वळले.

"अच्छा गौरी. लवकर विचार करून ठरव आणि इथे ये ह." असं हसत म्हणून ओरस देखिल वळला आणि दादाजींना गाठून त्यांच्या बरोबर गप्पा मारत चालायला लागला. गौरीने मान घरात वळवली. आई यायची वेळ झाली होती; पण अजुन ती आली नव्हती.

'काय करावं बरं? खरंच दादाजी म्हणतात तस पूर्वी कोणीतरी कधीतरी गेलं होतं? दादाजी म्हणाले त्यांनीच असं केलं होतं... असेलही. पण मग मला जमेल? या अशा अवस्थेत? आणि परत कशी येणार मी? नाहीच येऊ शकले तर? आईला सांगू का हे सगळं? तिचा विश्वास बसेल का? काय करू?' गौरीच्या मनात विचारांवर विचार चालु होते. तिचं मन पार गोंधळून गेलं होतं. तिला ओरसच्या जगात जावंसं तर वाटत होतं; पण परत येता येईल की नाही याची शाश्वती वाटत नसल्याने ती गोंधळून गेली होती.

"अग कधिपासून हाक मारते आहे बेटा. कुठल्या विचारात बुडली आहेस? " गौरीची आई तिला हलवत म्हणाली.

"अं? अरे आई तू कधी आलीस?" दचकुन गौरी म्हणाली.

"झाला थोडा वेळ. आज काकुंना बरं नाही म्हणून लवकर आटपलं आम्ही. पाहिलं तर खिड़की बाहेर बघुन स्वतःशीच बोलत होतीस तू. मी बाहेर नजर टाकली तर कोणीच नव्हतं, पण तू मात्र दोन-तीन लोक बाहेर असल्यासारखी बोलत होतीस. हसत होतीस. खुश होतीस ग राणी. तुला असं खूप दिवसानी हसताना बघुन डोळ्यात पाणी आलं... मग तुला हाक मारावीशी वाटली नाही आणि मी स्वयंपाकघरात वळले. पण मग अचानक शांत झालीस आणि विचार करत बसलीस. म्हणून मग हाक मारली." आई तिच्या केसातून हात फिरवत म्हणाली.

याचा अर्थ आज आई खोलीत होती तरी गौरीला ते जग आणि ओरस आणि दादाजी दिसाले होते. पण मग त्यावेळी गौरीला तिची आई आणि आईची हाक नव्हती लक्षात आली. किंबहुना तिला आई दिसली देखील नव्हती. हा अजून एक वेगळा झालेला असा बदल होता. जेव्हा ती त्या जगाच्या संपर्कात येत होती त्यावेळी ती या जगाच्या संपर्कातून तुटत होती. म्हणजे त्या काळासाठी ती तिच्या आईपासून तुटत होती. या विचाराने देखील गौरी बावरली. समोर आईला बघून गौरीला एकदम भरून आलं. आईच्या कुशीत शिरत ती म्हणाली,"आईं मी न तुला सोडून कुठ्ठे जाणार नाही. मी तुझ्याजवळ खूप खुश आहे ग."

आईला कळेच ना काय झालं अचानक गौरीला. तिला जवळ घेऊन थोपटत ती म्हणाली,"बेटा कोण आणि का नेईल तुला माझ्यापासून दूर? आणि मी तरी असं होऊ देईन का? अज्जीबात घाबरु नकोस ह. स्वप्न पड़लं का काही तुला राणी?"

"हो.. स्वप्नच... खूप छानसं... हवहवसं वाटेल अस स्वप्न. जाऊ दे न पण तो विषय. चल आज तू लवकर आली आहेस तर काहीतरी खास पदार्थ बनवुया बाबांसाठी. मी पण मदत करते तुला." डोळे पूसत गौरी म्हणाली आणि स्वतःची व्हील चेयर जवळ ओढुन त्यात बसायला तिने सुरवात केली देखिल.

आई थोड़ी गोंधळली. पण ती शक्यतोवर गौरीला दुखवायची नाही. त्यामुळे जास्त प्रश्न न विचारता तिला मदत करायला लागली. आईने गौरीला तिच्या खुर्चीत बसवलं आणि काहीतरी बोलत स्वयंपाक घराच्या दिशेने वळली. गौरीने तिच्या खुर्चीची व्हील्स पुढे केली आणि परत एकदा क्षणभरासाठी मागे वळून त्या खिडकीकडे बघितलं. पण मग तिने काहीसा विचार केला आणि ती स्वयंपाकघराच्या दिशेने वळली. दोघी माय लेकी हसत-गप्पा मारत काहीतरी नवीन पदार्थ करायला लागल्या.

अजूनही आई संध्याकाळी काकुंकड़े जात होती; पण गौरी मोह होऊनही त्या खिड़कीपासून आणि ओरस पासून लांब राहत होती. तिने मनातल्या मनात एक निर्णय घेतला होता. त्यामुळे ठरवून ती त्या खिडकीपासून लांब राहात होती. एरवी दिवसभर ती खिडकीतून बाहेर काही दिसतं आहे का याचा अंदाज घ्यायची. पण आई निघायच्या वेळेस खिड़की ओढुन घेऊन ती तिचा चित्राचा कॅनवास घेऊन बसायची.

असेच दोन आठवडे गेले.

त्या दिवशी रात्री चंद्र खूपच मोठ्ठा दिसत होता. पौर्णिमा होती.मात्र वारा अज्जीबात नव्हता. पण तरीही उकड़त नव्हतं. आज बाबांनी मस्त कुल्फी आणली होती घरी. जेवणं झाल्यावर गौरी आणि आई-बाबा तिच्या खोलीत गप्पा मारत कुल्फी खात होते. सहज गौरीच लक्ष खिड़कीतून बाहेर गेलं आणि ती दचकली. खिड़कीच्या समोरचं जे झाड़ होतं त्याला टेकुन कोणीतरी उभं होतं. अगोदर तिला वाटल भास् होतो आहे. पण मग तिथे हालचाल झाली आणि तिच्या लक्षात आलं की खरंच कोणीतरी उभं आहे. तिने त्या व्यक्तीला बघितलं हे त्या व्यक्तीच्या देखील लक्षात आलं. कारण खिडकी बाहेर होणारी हालचाल थोडी वाढली. आता गौरीचं मन गप्पात रमना. सारखी तिची नजर बाहेर जात होती. शेवटी ती म्हणाली,"आई बाबा झोपुया का आता? मला झोप येते आहे." असा अचानक तिचा मूड का बदलावा हे त्यांच्या लक्षात नाही आलं. पण तसा उशीरही झाला होता. म्हणून मग तिला नीट आडवं व्हायला मदत करून ते दोघे त्यांच्या खोलीत गेले.

त्यांच्या खोलीचा दिवा बंद झाला आणि त्याक्षणी गौरीला तिच्या नावाने मारलेली हाक एकु आली.

"गौरी... गौरी..." आवाज गंभीर आणि खोल होता. ते दादाजी होते. गौरी उठून बसली. तिने खिडकीचा बंद दरवाजा उघडला.

"दादाजी? तुम्ही आहात का?" गौरीने हलक्या आवाजात विचारले.

"हो गौरी. मी.... ओरसचा दादाजी." दादाजी पुढे आले. चंद्राच्या उजेडात. त्यांचे पाणीदार डोळे आज जास्तच चमकत होते.

"काय झाल दादाजी? तुम्ही आज असे या वेळी कसे काय येऊ शकलात? आई-बाबा झोपेपर्यंत तुम्ही थांबलात ते माझ्या लक्षात आलं. याचा अर्थ तुम्हाला इथलं सगळं दिसत होतं न? आणि मुख्य म्हणजे आई-बाबांशी बोलत असताना मला तुम्ही दिसलात. म्हणजे या जगातली माणसं त्या जगाकडे बघताना देखील दिसतात का?" गौरीने त्यांना विचारलं. ती पार गोंधळून गेली होती.

"गौरी.. मला इथलंच काय.. इतरही खूप काही दिसतं. सोय म्हणून मी स्वतःला दादाजी म्हणून घेतो. पण माझा प्रवाह... म्हणजे मी जगलेला काळ.... कोणालाही सांगता येणार नाही इतका आहे."दादाजी त्याच गंभीर आणि खोल शांत आवाजात बोलत होते. बोलता बोलता ते खिडकीच्या खूपच जवळ आले.

क्रमशः