खिडकी पलीकडचं जग
भाग 3 (शेवटचा)
खिडकी पलीकडचं जग
भाग 3
आता गौरीला थोड़ी भिती वाटायला लागली होती. काहीतरी वेगळ आहे दादाजींमध्ये. असा विचार करत गौरीने दादाजींच्या त्या घोळदार झग्याचे निरीक्षण केले आणि तिच्या लक्षात आलं की त्यांच्या पायाकडे हलकासा निळसर प्रकाश आहे. ते पाहून तिचा उर धपापायला लागला होता. तिची भिती खूप वाढली होती.
"गौरी... घाबरु नकोस. मी तुला काही करणार नाही. करूच शकत नाही. आपण दोन भिन्न जगातील एकक आहोत." दादाजिंना तिची अस्वस्थता जाणवली आणि ते थोड़े हसत म्हणाले.
"एकक म्हणजे काय दादाजी? आणि तुम्हाला अजुन काय काय दिसतं दादाजी? तुम्ही आज इथे या वेळी कसे आणि का आला आहात?" गौरीने धीर करून एका मागोमाग एक प्रश्न विचारले.
आपली गंभीर मुद्रा सोडून दादाजी आकाशाकडे बघत मोठ्ठयाने हसले. "हाssहाssहाss! गौरी किती प्रश्न? पण मी समजू शकतो. ठिक... एका एका प्रश्नाच उत्तर देतो. एकक! एकक म्हणजे... तुझ्या भाषेत व्यक्ति. प्रश्न दोन; मला काय काय दिसतं. मला पुढचा प्रवाह दिसतो. पण तो सांगण्याचा अधिकार मला नाही.... कोणालाच नाही गौरी! प्रवाह जगायचा असतो आणि अर्थात जे मला दिसतं ते सापेक्ष असतं. म्हणजे सर्वसाधारणपणे एकक आयुष्यात जे निर्णय घेऊ शकतात त्याचा विचार करून जो प्रवाह तयार होतो; तो मला दिसतो. पण जर एखाद्या एककाने निर्णय बदलला तर संपूर्ण प्रवाह बदलतो. प्रवाह म्हणजे काळ बरंका! आता तुझा शेवटचा प्रश्न... आज मी इथे या वेळी कसा आणि का आलो आहे! हम्... हे मात्र खूप महत्वाच आहे गौरी. नीट ऐक. तू आमच्या जगात येणार की नाही हा संपूर्ण तुझाच निर्णय आहे; हे मी अगोदरच मान्य केल होतं. पण माझा ओरस अजुन वहन-प्रवाहात नाही आला. तुला समजेल अशा भाषेत सांगायच तर; ओरस अजुन पूर्ण समजुतदार नाही झाला. जवाबदारीने आपले निर्णय घेण्यासारखा नाही झाला. मात्र तो त्या प्रवासाला निघायच्या उंबरठ्यावर असताना तू भेटलीस त्याला. त्याचा तुझ्यावर जीव जडला आहे. ख़ास मैत्रीण मानतो तो तुला.
आता तुझ्याशिवाय राहु नाही शकत तो. मला हे मान्य आहे की तू तुझ्या जगाप्रमाणे अजुन बरीच लहान आहेस.... पण मूली तू खूप हुशार आहेस. आमच्या जगातील भाषेत सांगायचं तर हे जग चालवण्याचं शिक्षण ज्या मोजक्या मुलांना दिलं ज़ातं, त्यातील सर्वात वरच्या फळीतली एक तू होऊ शकतेस. माझ्या ओरससारखी! तुझ गणितही बरोबर आहे. आमचं जग तुमच्या जगातील प्रवाहापेक्षा... काळापेक्षा... थोड़ पुढे पळतं.... तर त्यामुळे तुझ्या काळात जरी फ़क्त दोन आठवडे झाले असले तरी आमचा प्रवाह जास्त पुढे सरकला आहे. तू कदाचित् अजुन तुझा निर्णय घेतला नसशील. किंवा असा निर्णय घेतला असशील की आमच्या जगात नाही येणार; पण अजुन ओरसला सांगण्याची हिम्मत नसेल तुझ्यात. म्हणून तू तुझी खिड़की बंद करून बसतेस. पण त्याचा फार वाईट परिणाम ओरसवर झाला आहे. आमच्या जगात अस्वस्थता ही भावना माहीत नाही. त्यामुळे तू न दिसल्याने अस्वस्थ झालेला ओरस काही सांगता येत नसल्याने स्वस्थ बसून असतो. इतरांना काही कळत नसल्याने ते येता-जाता त्याला प्रश्न विचारतात. तो त्यांना त्याची अस्वस्थता सांगू शकत नाही आणि इथले कोणी त्याला समजू शकत नाहीत. केवळ मी त्याला समजू शकतो आणि म्हणून मी आज मुद्दाम तुला भेटायला आलो आहे." एवढं बोलून दादाजी क्षणभर थांबले आणि मग त्यांनी अचानक गौरीला विचारले," गौरी तू काय ठरवलं आहेस? तू इथे येणार आहेस की नाही?"
गौरी पार गोंधळून गेली होती. हे सगळं तिच्या समजुतीच्या बाहेर होतं. एकीकडे तिला तिच्या आई-बाबांना कायमच सोडून नव्हतं जायच आणि दादाजी कितीही म्हणाले की ती परत येऊ शकते तरीही तिला परत येता येईल याची खात्री वाटत नव्हती. दुसरीकडे ओरसची काळजी वाटत होती. कारण आतापर्यंत ती देखील त्याच्याशी भावनेने जोडली गेली होती. ओरस तिचा खूप खास मित्र झाला होता. शेवटी तिने दादाजींना विचारलं,"तुम्हीच सांगा दादाजी मी नक्की काय करू?"
दादाजी हसले. म्हणाले,"गौरी आमच्या जगात प्रत्येकजण स्वतः चा निर्णय स्वतःच घेतो. मी काय सांगू?"
गौरी शांत झाली. विचार करत बसून राहिली. दादाजिंना वाटलं तिला यायची इच्छा नाही. ते मागे वळले आणि चालू लागले. गौरीने दादाजींना जाताना बघितलं आणि हाक मारली,"दादाजी थांबा ना."
दादाजी थांबले आणि मागे वळले. गौरीने निर्णय घेतला. "मी येते दादाजी. आत्ता... लगेच. तुमची रात्र लवकर संपेल पण माझ्या इथली नाही. आत्ता कुठे अकरा वाजत आहेत इथे. म्हणजे मी ओरसला भेटून नक्की परत येऊ शकेन. हो न दादाजी?" गौरीने दादाजींकडे आशेने बघत म्हंटले.
दादाजी दोन मिनिट शांत उभे राहिले आणि मग तिच्या दिशेने हात उघडून म्हणाले,"गौरी ये!"
गौरी क्षणभर गोंधळली. कारण अधु पायांनी ती त्या जगात कशी उतरणार होती ते तिचं तिलाच माहीत नव्हतं. पण मग तिने हिम्मत केली. तिने स्वतःच संपूर्ण वजन हातावर तोलल आणि प्रयत्नपुर्वक स्वतःला खिड़कीच्या कट्यावर खेचलं. मग व्हील चेयरवर बसल्यावर ज्याप्रमाणे ती तिचे पाय हाताने खेचायची तसे तिने स्वतःला खेचले. ती आता खिड़कीत बाहेर पाय सोडून बसली होती. तिला खिडकी बाहेरून एक अनामिक खेच जाणवत होती. तिने दादाजींकड़े बघितलं. तिला घरातून बोलताना ते खूप नीट दिसत होते. पण आता मात्र ते धुरकट वाटत होते. नक्की कुठे आणि कसे उभे आहेत ते तिला समजत नव्हतं. त्यांना बघायला ती थोड़ी अजुन पुढे सरकली आणि तिचा तोल गेला. तिच्या लक्षात आलं की तिचा तिच्या जगाशी संपर्क तुटला आहे. तिला वाटलं ती खोल .गर्तेत पड़ते आहे. तिने हात हवेत फ़ेकले आधारासाठी. ती खूप घाबरली. मागे वळून परत खिड़कीचा आधार शोधायला लागली. तिला परत जायचं होतं... आईच्या कुशीत शिरायचं होतं... तिची छाती पार दडपून गेली होती...... या अनामिक भितिशी ती एकटी तोंड देऊ शकत नव्हती. खूप घाबरली होती गौरी... मागे मिट्ट अंधार होता आणि पुढे फ़क्त आणि फ़क्त धूसर अनोळखी प्रकाश! असा किती वेळ गेला कोण जाणे. तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते आणि ती मनातल्या मनात दादाजिंना हाका मारत होती.
.........................आणि अचानक तिला जाणवलं की तिला कोणीतरी दोन्ही हातात तोललं आहे. तिने हळूच डोळे उघडले. ती दादाजींच्या कुशीत होती. त्यांनी तिला लहान बाळाला दोन्ही हातात उचलावं तसं उचलून घेतल होतं आणि ते शांतपणे चालत होते.
"दादाजी?" तिने प्रश्नार्थक हाक मारली त्यांना. ते हसले.
"अग, किती घाबरलीस? तू ओरससाठी येते आहेस की मी तुझ्यासाठी त्याला आणायला हवं असं वाटायला लागलं मला." दादाजी म्हणाले.
गौरी हसली. "बरं गौरी आता तुझी तू चालतेस का? मी असं तुला उचलून नेलं तर ओरस गोंधळून जाईल." दादाजी म्हणाले.
गौरीचा चेहेरा एकदम उतरला. "दादाजी तुम्हाला ओरसने सांगितलं नाही का? माझा एक अपघात झाला होता अलीकडे. त्यामुळे माझे पाय अधु आहेत." गौरी म्हणाली.
"ओह हो का? नाही बोलला तो मला. अपघात अलीकडे झाला होता म्हणजे तुला त्या अगोदर चालता येत होत नं?" दादाजींनी विचारलं.
गौरी हसत म्हणाली,"हा काय प्रश्न झाला दादाजी? मी जन्मने अधु नव्हते. अहो, शाळेत सगळ्या स्पोर्ट्समधे भाग घ्यायचे मी. अगदी पहिली नाही आले, पण एक चांगली स्पोर्ट्स गर्ल होते मी."
"बरं. मग चल तुला जमेल. मी हात धरतो तुझा." असं म्हणून दादाजींनी गौरीला काही कळायच्या आत एकदम त्यांच्या बाजूला उभं केलं. ती खूप गोंधळली... आपण आता तोल जाऊन पडू असं तिला वाटलं. तिने आधारासाठी दादाजींच्या दिशेने हात फेकले. पण मग तिच्या लक्षात आल की ती पूर्वी.... म्हणजे अपघाताच्या अगोदर जशी सहज उभी राहायची तशीच आत्ता देखील तिच्या दोन्ही पायांवर उभी होती..... दादाजींच्या आधाराशिवाय! तिचा विश्वासच बसत नव्हता. तिने आवंढा गिळला आणि दादाजिंकडे बघितलं. ते गालातल्या गालात हसत होते.
"चल गौरी. ओरस वाट बघत असेल. मी त्याला म्हंटल होतं की मी तुला आणायचा प्रयत्न करिन. आणि तुला ही वेळेत परत जायचं असेल न."
गौरीने एकदा दादाजिंकडे बघीतलं. आणि विश्वासाने पाऊल उचललं. गौरी पूर्वीसारखी चालु लागली. आता तिला आश्चर्य वाटलं नाही. तिने दादाजींकडे बघितलं आणि तिच्या लक्षात आलं की खिडकीतून दादाजी जितके उंच वाटत होते ते त्याहूनही उंच आहेत. तिने दादाजींचा हात धरला आणि म्हणाली,"दादाजी, मला सांगाल हे सगळ नक्की काय आहे? ओरस आणि इथली इतर जी माणसं दिसतात ती आमच्या जगातल्या माणसांसारखीच आहेत. भाषा देखील एकच आहे. पण तरीही खूप काही वेगळं आहे. मुख्य म्हणजे तुम्ही आमचे असे वाटता आणि तरीही काहीतरी वेगळं आहे तुमच्यात."
"खरंय गौरी... आमच्या जगात आणि तुमच्या जगात फारसा फरक नाही. फ़क्त प्रवाह थोड़ा वेगळा आहे." असं म्हणून मग क्षणभर थांबले आणि परत बोलायला लागले. "प्रवाह म्हणजे काळ. दूसरा थोड़ा फरक म्हणजे आम्ही तुमच्या जगापेक्षा खूप जास्त प्रगत आहोत. तुमच्याकडे अनेक देश आहेत आणि त्यांना चालवणारी वेगळी सरकारं आहेत. आमचं जग एकत्र बांधलेलं... एकच आहे. आम्ही बुद्धीच्या, हुशारीच्या आणि स्थिर मनाच्या निकशावर आमच्या जगातली मुलं निवडतो आणि त्यांना योग्य ते किंवा असं म्हणू आवश्यक ते शिक्षण देतो. एकदा आमची खात्री झाली की ही मुलं तयार झाली आहेत की मग आम्ही हे आमचं प्रगत जग त्यांच्या हातात सुपुर्द करतो. आमच्या जगात उत्तम बुद्धि असलेली मूलं लहानपणीच शोधून वेगळी केली जातात. त्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्याही नकळत शिकवत असतो. आम्ही अनेको वर्षे प्रयत्न करून विविध शोध लावले आहेत. त्यामुळे या जगात आजार, दु:ख, वेदना नाहीत. तसे कोणी भांडत देखील नाहीत. पण तरीही इथे आयुष्याला एक जिवंतपणा आहे. या जगातलं आयुष्य देखील तुमच्या सारखं सर्वसाधारण आहे. लोक रोज नोकरीला जातात. संसार करतात. जी मुलं वेगळी केली जातात त्यांचं आयुष्य सुरवातीला जरी इतरांसारखं असलं तरी मग ते वेगळं होतं. ओरस असाच वेगळा निवड झालेला मुलगा आहे. पण अजुन त्याला वहन प्रवाहात सामिल केलेलं नाही. म्हणून तर मी त्याची काळजी घ्यायला त्याच्या बरोबर असतो. माझ्यासारखे अजून काही दादाजी इथे कार्यरत आहेत. आम्ही काही एकक मात्र अनेको प्रवाह अजुन आहोत. तुला समजेल असं सांगायचं तर मला मृत्यू नाही... माझ वय वाढत नाही... मी गेले अनेक प्रवाह असाच आहे. ओरस सारखी अनेक मुलं मी तयार केली आहे. तेच माझ काम आहे. माझ्यासारखे जे दादाजी आहेत ते सर्व मिळून पुढची पिढी तयार करण्याचं काम करतात."
गौरी दादाजींचा हात धरून चालत होती. तिला दादाजी जे सांगतात ते सगळं समजत होतं. पण तरीही स्वीकारणं थोडं अवघड वाटत होतं. ती दादाजींचं बोलणं ऐकून विचारात पडली होती. त्यामुळे ती किती चालली किंवा कुठे आली ते तिला कळलं देखील नाही. अचानक दादाजी थांबले आणि म्हणले, "गौरी आपण पोहोचलो."
गौरी विचारातून जागी झाली आणि समोर बघायला लागली. समोर एक अति प्रचंड इमारत उभी होती. इमारत म्हणाण्यापेक्षा एक चिरेबंदी आकाशाला भिडलेला किल्ला होता तो. काळ्याभोर दगडांचा, कौलारु आणि तरीही उंच. मोठ-मोठ्या खिडक्या आणि दरवाजे होते त्या किल्ल्याला. खिड़क्या-दरवाजांवर कोरीव काम केलेल्या महिरपी होत्या. रात्र असूनही त्याच्याभोवती एकप्रकारचा उजेड प्रसवत होता. त्यामुळे तो किल्ला गुलाबी-निळ्या उजेडात प्रकाशमान झाला होता. एका वेगळ्याच दिमाखात उभा होता तो आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. तिला एकदम हॅरी पॉटरच्या हॉगवॉर्डसची आठवण झाली आणि ती खुदकन हसली.
दादाजींनी गौरीचा हात सोडला आणि समोरच्या दरवाजाशेजारी असणारा जाड दोर ओढला. आत खोल कुठेतरी घंटानाद झाला. आतून दरवाजाजवळ कोणीतरी आल्याचा आवाज झाला आणि त्या प्रचंड मोठ्या वाड्याचा तसाच मोठ्ठा दरवाजा हळूहळू उघडला गेला. आत अजुन एक दादाजी उभे होते. गौरी चमकली आणि दोघांमधलं साम्य बघुन चक्रावून गेली. तिच्या शेजारचे ओरसचे दादाजी हसले. "माझा प्रवाह स्नेही" त्यांनी ओळख करून दिली. गौरी त्या दुसऱ्या दादाजिंकडे बघुन हसली आणि तिने नमस्कार केला. "तूच का ग...व......री?" त्या दादाजींनी विचारलं. "हो! पण ग...व....री... नाही गौरी." तिने हसत उत्तर दिलं. तेही मजेत हसले. "चल ओरस तुझी वाट बघतो आहे" असं म्हणून ते चालु लागले.
लांबच लांब बोळ होता तो. दुतर्फा दरवाजे असलेला. काळयाभोर सागवानी लाकडाचे मजबूत दरवाजे होते ते. त्या बोळात देखील मंद गुलाबी-नीळा उजेड होता. मात्र ते तिघे जसजसे पुढे जात होते तसे बोळाच्या दुतर्फा असलेले दिवे जास्त प्रज्वलित होत होते आणि ते पुढे सरकले की मंद होत होते. ते बघुन गौरीला गम्मत वाटली. तिने दादाजिंकडे बघितलं. ते मात्र शांतपणे पुढे सरकत होते. तिचं लक्ष पुढुन चालणाऱ्या दादाजिंकडे गेलं. त्यांची पाठच फ़क्त दिसत होती. तिची नजर सरकत सरकत खाली गेली आणि ती दचकली. त्यांच्या झग्याच्या खालूनही निळसर प्रकाश येत होता मात्र त्यांचे पायच दिसत नव्हते. ते पायाला चाकं लावल्यासारखे सरकत होते. ते पाहून ती दचकली आणि तिचं लक्ष स्वाभाविकपणे ओरस च्या दादाजिंकडे गेलं. तिच्या लक्षात आलं की ते पण निळ्या उजेडात फ़क्त सरकत होते. तिला आठवलं की तिने तिच्या खिड़कीतून जेव्हा दादाजिंना बघितलं होतं तेव्हासुद्धा तिला तो उजेड दिसला होता. तिला दादाजींनी त्यांच्या हातातून खाली उतरवून उभं केलं; त्यावेळी ती उभी राहू शकते आणि चालू शकते या आनंदात तिने दादाजींच्या चालण्याकडे लक्षच दिलं नव्हतं हे आता तिच्या लक्षात आलं. याचा अर्थ दादाजी तिच्या सारखे किंवा ओरस सारखे चालत नव्हते... त्यांना पायाच नव्हते. फक्त होता तो निळा प्रकाश. तिला हे लक्षात आलं आणि दादाजिंबद्दल मनात एक आदरयुक्त भिती निर्माण झाली.
ती दादाजिंकडे वळली आणि तिने विचारलं,"दादाजी तुमचे पाय असे कसे?"
"गौरी मी तुला म्हंटल ना आम्ही अनेक प्रवाह बघितलेले जे आहोत ते थोड़े वेगळे आहोत. किंवा असं म्हणू की आम्ही मुद्दाम आमच्यात थोड़े बदल करुन घेतले आहेत. येणाऱ्या प्रत्येक पिढीला पूर्ण तयार करायची जवाबदारी आमची आहे. त्यासाठी आम्ही असणं आवश्यक आहे. म्हणून हे बदल आवश्यक होते." दादाजींनी तिच्याकडे न बघताच पुढे सरकत तिला उत्तर दिलं.
त्यांच्या उत्तराने तिच समाधान झालं. मग मात्र तिने काही विचारलं नाही. थोड़ चालून पुढे गेल्यावर ते तिघे थांबले. समोर एक बोळ दिसत होता; गौरी आणि ओरसचे दादाजी त्या बोळात शिरले आणि दादाजिंनी समोरच्या दरवाजाची कड़ी वाजवली. दार उघडले गेलं आणि दारात ओरस उभा होता. खिड़कीतून दिसायचा त्यामानाने जास्तच उंच होता तो. दिसायला मोहक होता. मजबूत बांधा आणि नुकतीच फुटलेली मिसरूड; यामुळे त्याचं मुळातलं राजबिंड रूप अजूनच खुलून दिसत होतं. 'तो खिडकीतून दिसत होता त्याहून जास्त समंजस आणि मोठा वाटतो आहे,' गौरीच्या मनात विचार चमकून गेला. मात्र आत्ता तो बराच वाळला होता. किंबहुना आजारीच वाटत होता. नुकतीच फुटायला लागलेली दाढ़ी-मिशी आणि डोक्यावरचे केस सगळच् अस्ताव्यस्त होतं. गौरीला बघुन त्याचे खोल गेलेले डोळे मोठ्ठे झाले.
"तू???" त्याचा आवाज खोल गेला होता पण आवाजात प्रचंड आनंद होता. तिला बघुन तो खुश झाला. तिचे दोन्ही हात धरून त्याने तिला खोलीत नेलं आणि समोरच्या पलंगावर बसवल. "ग...व...रि...मला माहीत होत तू येशिल. नक्की येशिल." गौरी हसली. तो ही तिच्याकडे बघून हसला. त्याचे डोळे आनंदाने चमकत होते. त्याने गौरीचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवले होते. जणूकाही त्याने हात सोडले तर ती त्याला न सांगता पळून जाईल. आणि अचानक म्हणाला,"अग पण तू म्हणाली होतीस की तू चालत नाहीस. पण मग तू इथे कशी आलीस? आणि तू तर चालते आहेस." काय उत्तर द्यावं ते न सुचुन गौरी परत फ़क्त हसली आणि म्हणाली,"चालता येतं मला इथे. बर ते जाऊ दे. तुला काय झालं आहे नक्की? तू असा का दिसतो आहेस? तब्बेत ठिक नाही का?" क्षणभर शांत राहून मग ओरस म्हणाला,"तुझी वाट बघत होतो ग. अग आता काही दिवसात मी पुढचं शिक्षण घेण्यासाठी जाणार आहे. मग मला तुझ्या खिड़कीपर्यंत नाही येता येणार. तू अचानक त्या खिडकीत यायची बंद झालीस. मला कळेना तुला हाक तरी कशी मारू? तुझी खिडकी बंद असताना माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही याची मला कल्पना होती. मुख्य म्हणजे एकदा मी इथून गेलो की मग मी परत कधी येणार याची मला कल्पना नव्हती. जाण्याअगोदर मला एकदा तरी तुला भेटायचं होतंच. पण ते कसं जमेल याचाच मी विचार करत होतो. त्यामुळे थोड खाण्याकडे दुर्लक्ष झालं आणि म्हणून मी असा दिसतो आहे इतकंच! मी दादाजींशी पण बोललो होतो तुला भेटण्याबद्दल. ते तर म्हणाले तुझी इच्छा असेल तर तू पण माझ्याच बरोबर येऊ शकशील; जिथे मी जाणार आहे तिथेच.... आमच्या प्रवाहात. त्याचं बोलणं एकून तर मी खूपच खुश झालो होतो ग...व....री. ते म्हणतात की तू तशीच एक एकक आहेस; माझ्यासारखि! त्यामुळे तू देखील माझ्याप्रमाणे शिक्षण घेऊन इथेच राहू शकतेस. ग...व...री.... येतेस इथे? कायमची?"
ओरसचं बोलणं ऐकून गौरी एकदम गोंधळली. तिने प्रश्नार्थक नजरेने दादाजिंकडे बघितलं. दादाजी हसले. ओरसकड़े वळून ते म्हणाले,"ओरस गौरीला निघालं पाहिजे. तिने अजुन काही निर्णय घेतलेला नाही. तोपर्यंत तरी तिला तिच्या खिडकीतून परत जायला हव न." आणि दोघांनाही काही जास्त बोलायची संधी न देता त्यांनी गौरीला हाताला धरून उठवलं आणि ते दाराच्या दिशेने चालु लागले.
गौरीला देखिल जाणिव झाली की तिला देखील आत्ता तरी नक्कीच निघायला हवं. जर चुकून आई किंवा बाबा खोलीत आले आणि ती खोलीत दिसली नाही तर घाबरतील. त्यामुळे ती देखील दादाजींबरोबर निघाली. मात्र तिने मनातच ठरवलं की परतीच्या प्रवासात दादाजींकडून सगळाच खुलासा करून घ्यायचा.
दाराबाहेर पड़ताना तिने ओरसकड़े वळून बघितलं आणि हसत म्हणाली,"निघते ह आत्ता ओरस. पण आपण नक्की परत भेटणार आहोत. स्वतःची काळजी घे. अच्छा!" ओरस जणूकाही ती मागे वळून बघण्याचीच वाट बघत होता. तो तिच्या जवळ आला आणि अच्छा म्हणतांना तिचा हात हातात धरायच्या निमित्ताने त्याने दादाजींच्या नकळत तिच्या हातावर काहीतरी ठेवलं. तिनेही दादाजींच्या नकळत ते जे काही होत ते पटकन खिशात टाकलं आणि ओरसच्या खोलीचं दार ओढुन घेतलं.
दादाजी आणि गौरी परतीच्या वाटेला लागले. गौरी सुरवात कशी करायची याच विचारात होती; पण तिने काही विचारायच्या अगोदरच दादाजी बोलायला लागले.
"गौरी मला माहीत आहे तूझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन. प्रत्येक शंकेच निरसन करेन. पण अगोदर मी जे सांगतो ते नीट ऐक. कदाचित् मग तुला प्रश्नच पडणार नाहीत."
गौरीने डोळे मोठ्ठे केले. पण काहीच बोलली नाही. दादाजी खोट बोलणार नाहीत किंवा तिला चुकीच काही सांगणार नाहीत याची आतापावेतो तिला खात्री झाली होती. ती दादाजींच बोलण मन लावून ऐकायला लागली.
"गौरी ओरस जे म्हणाला ते खरं आहे. तू इथे आमच्या जगात जर आलीस तर तू त्याच्या बरोबरीने एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकाशील. मी तुला थोड्या वेळापूर्वी सांगितल्या प्रमाणे आम्ही हे जग चालवण्यासाठीचं शिक्षण काही ठराविक मुलांना देतो. त्या समूहाचा एक भाग तू देखिल असशील. मी नंतर तुझ्याशी हे बोलणारच होतो; परंतु ओरसने उल्लेख केला आहेच तर मग आत्ताच बोलणं योग्य असं मला वाटतं.
ऐक.... मी तुला जे म्हंटलं की काही प्रवाहांपूर्वी त्या जगातुन या जगात काही आले होते. मी त्यांच्यातीलच एक आहे गौरी. म्हणूनच मी तुझी भाषा इतक्या चांगल्या प्रकारे बोलू शकतो. ओरस किंवा ते दुसरे दादाजी तुझ नाव ग..व..री... अस घेतात पण तुझ्या लक्षात आलं असेल की मी तुझ्या नावाचा योग्य उच्चार करू शकतो. मीच आपली भाषा इथल्या जगात जागृत केली आणि शिकवली. त्यागोदर इथे मनाच्या जोडणीतून एकमेकांशी संवाद होत असे. परंतु ही जोडणी एकाच वेळी जर दोघांशी झाली तर त्यातून अनेकदा गोंधळ निर्माण होत असे. त्यामुळे मग मी इथे ही बोली भाषा शिकवली. आता जर गरज पडली तरच मनाची जोडणी करून संवाद साधला जातो. बाकी आपल्याप्रमाणे बोली भाषाच वापरली जाते इथे देखील." अस म्हणून दादाजिंनी तिच्याकडे बघुन एक मंद हास्य केलं. हे ऐकून मात्र गौरीच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही.
"पण मग......" गौरीने बोलायचा प्रयत्न केला. दादाजींनी हात वर करून तिला थांबवलं. "माझ पूर्ण बोलणं ऐकून घे गौरी मग तुझे प्रश्न विचार. कारण आपल्याकडे तसा वेळ कमी आहे. तुला तुझ्या जगात तिकडच्या पहाटेच्या अगोदर पोहोचणं आवश्यक आहे; हे विसरु नकोस."
गौरीला दादाजींचे म्हणणं पटलं. ती त्यांचं बोलणं ऐकु लागली.
"तर.... मी तुमच्याच जगातला एक वैज्ञानिक होतो. आम्ही दोन मित्र मिळून आपल्या जगा व्यतिरिक्त जग असतं का या शोधावर काम करत होतो आणि खूप मेहेनतीने आम्हाला या जगाचा शोध लागला. हे जग त्यावेळी देखील जास्त प्रगत होत. आम्ही त्यावेळी इथे अनेकदा येऊन गेलो. त्यावेळच्या इथल्या प्रगती टप्प्यावर विविध देश एकत्र करून एकसंघत्व करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. लढाया, वाद, एकमेकांचा नाश हे सर्व त्यांनी संपवून टाकायला सुरवात केली होती. आमच्या नशिबाने आमची ओळख इथल्या सरवोच्च पदस्थांशी झाली. आमची बुद्धि आणि योग्यता बघुन त्यांनी आम्हाला या जगात येण्यासाठी विचारलं. कारण त्यांनादेखील त्यावेळी अशा लोकांची खूप गरज होती. त्यांना हे जग शांतता प्रिय आणि भय रहित जगण्यायोग्य करायचं होतं. आम्हाला दोघांनाही या सर्वच गोष्टींबद्दल उत्सुकता होती आणि अभ्यास करण्याची इच्छा होती. त्या जगात आमची भावनिक गुंतवणूक अशी नव्हती. त्यामुळे आम्ही दोघेही इथे आलो. ही झाली माझी इथे येण्याची कहाणी.
आता तुझ्या मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं. त्या जगातील काळापेक्षा इथला काळ दीड पटीने पुढे आहे. त्यामुळे मी इथे जन्मणाऱ्या लोकांपेक्षा जास्त काळ जगलो. त्यामुळे जास्त शोधांमद्धे भाग घेऊ शकलो. मग मी प्रयत्न पूर्वक हळूहळू आयुष्य मर्यादा वाढवली. म्हणून मी इथले अनेक प्रवाह..... त्या जगातला काळ..... बघितला आहे. हे झालं माझ्या या जगातल्या आयुष्याबद्दल.
तुझ्या मनात हा प्रश्न नक्की असेल की ओरस असं का म्हणाला की तूसुद्धा इथे येऊ शकतेस. गौरी नीट ऐक. मी शोध करत होतो; अभ्यास करत होतो. मला आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्या माझ्या मित्राला दोघांना मिळून हे जग प्रयत्न करून सापडलं. त्यानंतर या जगाशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला खूप मेहेनत घ्यावी लागली. पण तुला खूप लहान वयात अगदी सहज हे जग दिसलं आहे. त्याहुनही महत्वाचं म्हणजे संपर्क तू नाही केलास; तर इथून तुझ्याशी झाला. म्हणूनच जेव्हा ओरसने मला तुझ्याबद्दल सांगितलं तेव्हा मला आश्चर्य तर वाटलंच पण त्याहुनही जास्त कुतूहल वाटलं. मी तुझा अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं की तुझ्यात एक वेगळेपण आहे; म्हणूनच तू हे जग बघू शकते आहेस आणि तुला इथे संपर्क साधणं सहज शक्य होतं आहे. गौरी ओरस म्हणाला ते खरं आहे. तू वेगळी आहेस आणि तू या जगात आलीस तर त्याचा फायदा जसा तुला होईल तसाच या जगाला देखील होईल. तू जर इथे आलीस तर तुझ्या आयुष्याला एक खूप वेगळं वळण लागेल यात शंकाच नाही. परंतु हे देखिल तेवढंच खरं की मी इथे येण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी बराच मोठा होतो आणि माझी कुठलीही भावनिक गुंतवणूक त्या जगात उरली नव्हती. शिवाय मुळात मला असा काही शोध लागावा अशी इच्छा होती; माझ्या प्रयत्नांना फळ आलं आणि फ़क्त शोध लागला असं नाही तर या वेगळ्या जगात येण्याची संधी मिळाली आणि ती मी घेतली.
मला माहित आहे की तुझ्या वयाची त्या जगातली मूलं अजुन स्वतंत्र विचार करुन निर्णय घेतातच असं नाही. त्यात तू त्या जगात असताना तुझ्या आई-वडिलांवर पूर्णपणे अवलंबून आहेस. त्यामुळे तू नीट विचार कर. हवं तर तुझ्या आई-वडिलांशी बोल. फ़क्त एकच विनंती अशी; खूप उशीर करू नकोस निर्णय घेताना. त्या जगाच्या कालमानाप्रमाणे तू ओरसशी बहुतेक फ़क्त दोन आठवडे बोलली नाहीस. पण इथे प्रवाह जवळ-जवळ चार आठवाड़े पुढे गेला आहे. हे लक्षात असू दे. दुसरी महत्वाची गोष्ट; जर तू इथे न येण्याचा निर्णय घेतलास तर माझी तुला विनंती आहे की या जगाबद्दल कधीच कुठेही वाच्यता करू नकोस. याबद्दलची माहिती फक्त तुझ्याचकडे ठेव. अजून ते जग इतकं प्रगत नाही की या जगाचा ते स्वीकार करू शकतील. त्यामुळे कदाचित् दोन्ही जगांचा ऱ्हास होईल. एवढं करशील ना गौरी?" शेवटचा प्रश्न विचारून दादाजींनी गौरीकडे बघितलं. गौरीने देखील त्यांच्याकडे बघितलं आणि एक मंद स्मित केलं. ती दादाजींना म्हणाली,"दादाजी, मी काय निर्णय घेईन ते मला देखील माहित नाही. पण मी तुम्हाला वचन देते की जर मी न येण्याचा निर्णय घेतला तर ही खिडकी मी कायमसाठी बंद करून इथून निघून जाईन आणि कधीच कोणालाही याबद्दल माहिती देणार नाही. मला तुमचं म्हणणं पटलं आहे."
बोलता बोलता दोघेही गौरीच्या घराच्या खिड़कीजवळ पोहोचले. दादाजींनी गौरीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हाणाले,"गौरी आता ओरस इथे येऊ शकणार नाही. त्याची पुढील शिक्षणाला जाण्याअगोदारची तयारी सुरु होईल. पण तू जो काही निर्णय घेशील तो मला सांग. मला हाक मार; मी लगेच तुझ्याशी संपर्क साधेन. अच्छा. तुमच्याकड़ची पाहाट व्हायला लागली आहे. चल, तुला परत जायला हवं."
दादाजींनी गौरीला उचलून घेतलं आणि एखादं फूल सहज ठेवावं तसं तिला खिड़कीच्या कडेवर बसवून ते मागे सरकले. गौरीला मात्र त्या जगात जाताना जशी एक खेच जाणवली होती; तशीच काहीशी जाणीव झाली; पण आता तिला तिच्या खिडकीकडे ढकलल्यासारखं वाटलं. तिने खिड़कीच्या कठड्यावर बसून दादाजींच्या दिशेने पाहिलं. ते खूप लांब उभे आहेत अस वाटत होतं. ती घरात जाण्यासाठी वळली आणि तिच्या लक्षात आलं की परत तिचे पाय निकामी झाले आहेत. तिला मोठा धक्का बसला. एव्हाना ती हे विसरून गेली होती की ती अधू झाली आहे. खूप मजेत ती दादाजिंबरोबर चालत होती. त्यामुळे क्षणात झालेला हा बदल स्वीकारणं तिला खूप अवघड वाटलं. पण मग स्वतःला सावरून ती घरात तिच्या पलंगावर उतरून बसली. तिने वळून खिड़कीतून बाहेर बघितलं. दादाजी तिथेच उभे होते. त्यांनी हात हलवून तिचा निरोप घेतला आणि मागे वळले. गौरी पलंगावर आडवी पडली. ती मनाने आणि शरीराने खूप थकुन गेली होती. त्यामुळे तिला लगेच झोप लागली.
सकाळी गौरी खूप उशिरा उठली. बाबा कामावर जायला निघतच होते. आईदेखिल स्वयंपाकाला लागली होती. गौरी विचार करत होती, काल जे काही तिने अनुभवलं होतं ते खरंच होतं की स्वप्न! विचार करता करता तिचा हात सहज तिच्या खिशाकडे गेला आणि तिच्या हाताला काहीतरी कड़क दगडा सारखं लागलं. तिने तो गोळा बाहेर काढला. काळाभोर आणि तरीही स्वतःचा असा एक निळसर रंगाचा प्रकाश असलेला चमकणारा दगड होता तो. तो दिसता क्षणी तिला आठवलं की ओरसने ती निघत असताना जे काहीतरी तिच्या हातात ठेवलं होतं ते म्हणजे हाच दगड. मग मात्र रात्रीच्या सर्व घटना खऱ्या होत्या याची तिला खात्री पटली.
'काय करावं? ते जग खरंच आहे. दादाजी स्वतः म्हणाले की ते आपल्याच जगतले आहेत. अर्थात आपल्या जगात ते कोणत्या काळात होते ते मात्र आपल्याला माहित नाही. आता ते तिथलेच झाले आहेत; कदाचित् गेली अगणित वर्ष.' विचार करत असताना गौरीच्या लक्षात आलं,'तिथे मी चालु शकते, अजुन खूप शिकु शकते.... पण तिथे आई-बाबा नसतील माझे. ते आयुष्य कसं असेल ते सांगता येणं अशक्य आहे. इथे माझे आई-बाबा कायम असणार आहेत माझ्याबरोबर. पण इथे या जगात मी आयुष्यभर अधुच रहाणाऱ आहे. मी रोज व्यायाम करतेच की. ते आईचं समाधान म्हणून. त्याचा फारसा उपयोग आजवर झालेला नाही. याची मला कल्पना आहे.' गौरी विचार करत बसली होती.
"अग बेटा उठलीस? रात्रि झोप नव्हती का लागली? आणि अशी इतकी दमलेली का दिसते आहेस? बरं नाही का वाटत तुला?" आई तिच्या जवळ बसत तिला विचारत होती. ऑफिसला निघालेले बाबा देखिल तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिथेच बसले.
"मी एकदम ठिक आहे आई-बाबा. इतकी ठिक तर मी गेल्या कित्येक महिन्यात नव्हते." गौरी हसत म्हणाली.
तिला हसताना पाहुन त्या दोघांना बरं वाटलं.
"आई जर मला चालता यायला लागलं तर तुला काय वाटेल ग?" अचानक गौरीने तिच्या आईला विचारलं.
आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. "म्हणजे? हा काय प्रश्न झाला राणी? जगातली सर्वात आनंदी व्यक्ति असेन मी. आणि मीच का तुझे बाबा देखील. अग, देवाने जर मला म्हंटलं की तू चल माझ्याबरोबर तुझे पाय देतो मी गौरीला; तर मी हसत जाईन त्याच्याबरोबर त्याच क्षणी."आईने उत्तर दिलं.
"काय ग आई काहीतरीच बोलतेस ह. बरं आणि जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुमच्या गौरीला चालता येईल इतकंच नाही तर पुढे खूप शिकता येईल. फ़क्त त्यासाठी तुम्हाला तिला कायमचं दूर पाठवावं लागेल; तर मग तूम्ही काय कराल बाबा?" गौरीने बाबांना विचारलं.
"बेटा, आज तू असे प्रश्न का विचारते आहेस ते मला खरच कळत नाही. पण विषय निघालाच आहे तर सांगतो. आपण जरी इथे नाशिकला आलो असलो तरी मी मुंबईच्या डॉक्टर्सच्या संपर्कात सतत आहे. त्यांचं म्हणणं आहे की एक ऑपरेशन आहे; ते केलं तर कदाचित् तू चालु शकाशील. पण त्याचा ख़र्च खूप जास्त आहे. परदेशात न्याव लागेल तुला. मी पैसे जमवायला सुरुवात केली आहे. खरं तर मुंबईहून इथे आलो त्याचवेळी मी आपलं मुंबईचं घर विकून टाकलं होतं आणि ते सगळे पैसे तुझ्या नावाने गुंतवून ठेवले होते. तुझे पाय कदाचित ठीक होतील असं मला डॉक्टर बर्वेनी त्यावेळी म्हंटल होतं. ज्यांनी तुझी सगळी ट्रीटमेंट केली होती; त्यांना तेव्हाच थोड़ी आशा आहे असं वाटलं होतं.पण सगळं ठरलं तर मात्र त्यावेळी तुला एकटिलाच जावं लागणार आहे. आम्ही नसु तुझ्याबरोबर. कारण तुझ्या बरोबर येणाऱ्या व्यक्तीचा देखील खर्च असेलच न. तेवढी सोय नाही करता येणार मला. गौरी एक सांगू? बेटा आम्ही काही तुला आयुष्यभर नाही पुरणार आहोत. कधी ना कधी तुला स्वतःची काळजी घ्यावीच लागणार आहे. त्यावेळी तुला कोणाची मदत घ्यावी लागू नये किंवा तू कोणावर अवलंबून राहू नयेस म्हणून तर हे सगळे प्रयत्न करतो आहे मी. जर तुझ्या आयुष्याचं भल होत असेल न बेटा तर आम्ही तुला कधीच अडवणार नाही." बाबा बोलत होते.
बाबा खूप मनापासून बोलत होते. त्याक्षणी गौरीला वाटलं आपणही सर्वकाही सांगून टाकावं. पण तिने मनाला आवरलं. कितीही झाल तरी दुसऱ्या जगाचं असणारं अस्तित्व, तिचे तिथले अनुभव यावर कोणाचाही विश्वास बसला नसता; आणि जरी तिच्या आई-बाबांनी तिच्यावर विश्वास ठेवलाच असता तरी तिने दादाजींना शब्द दिला होता की ती त्या जगाबद्दल इथे कोणालाही काहीही सांगणार नाही. म्हणून मग तिने विषय बदलला. थोडावेळ तिच्या सोबत बसून बाबा कामाला गेले आणि आई देखील तिच्या रोजच्या कामाला लागली.
काही केल्या गौरीच्या मनातले विचार मात्र जात नव्हते. एकीकडे एक उत्तम सुदृढ़ सक्षम आयुष्य त्या जगात तिची वाट बघत होतं आणि दुसरीकडे या जगात आई-बाबांची भावनिक गुंतवणूक होती. काय करावं काही केल्या तिला सुचत नव्हतं.
गौरी सतत विचार करत होती. ती दिवसभर अस्वस्थ आहे हे आईच्या लक्षात आलं. मग त्या दिवशी ती शेजारच्या काकुंकडे नाही गेली. मुद्दाम गौरीला घेऊन त्यांच्या पुढील दाराजवळच्या गॅलरीमध्ये बसली. दोघीजणी गप्पा मारत होत्या. समोरच्या झाडावर एक माकडीण तिच्या पिल्लाबरोबर बसली होती. ती पिल्लाचं लक्ष नसताना अचानक कुठेतरी गेली. आई जवळ नाही हे पाहुन ते पिल्लू कावरं-बावरं झालं. ते बघुन गौरीला वाईट वाटलं. ती आईला म्हणाली,"बघ ग आई, बिचाऱ्या पिल्लाला एकट सोडून ती माकड़ीण निघुन गेली." ते ऐकून गौरीची आई हसली. म्हणाली,"बेटा कोणी कोणाला आयुष्यभर पुरत नसतं. ज्याने-त्याने आपापला मार्ग शोधायचा असतो. चिंता करु नकोस. थोडावेळ ते पिल्लू गोंधळेल; पण मग आपला मार्ग बरोबर शोधेलच. हा निसर्ग नियमच आहे गौरी."
"आई, म्हणजे हा नियम सर्वांनाच लागू होत असेल का?" गौरीने आईकडे बघत विचारलं.
तिच्या मनात काय चालु आहे याची अजिबात कल्पना नसलेल्या आईने सहज शब्दात उत्तर दिलं,"हो बेटा. हे जग असंच चालतं. ती कविता आहे न.... जन पळभर म्हणतील हाय हाय.... किती योग्य शब्दात त्यांनी सत्य मांडलं आहे. या जगात कोणीही कोणासाठी थांबत नाही बेटा. आज सकाळी बाबांनी देखील हेच सांगितलं न तुला. तू तुझ्या पायावर उभं रहावस ही आमची मनापासूनची इच्छा आहे. कारण आमच्या नंतर देखील तुला तुझं आयुष्य जगायचं आहेच न बेटा."
आई जे सांगत होती ते गौरी मन लावून एकत होती. त्यावर ती काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने बाबा आले. सगळं विसरून गौरी बाबांच्या गळ्यात पडली. तिघांनी नेहेमीप्रमाणे एकत्र जेवण घेतलं. खूप वेळ गपा मारत बसले होते ते.
रात्र वाढत होती पण गौरीच्या गप्पा संपत नव्हत्या. शेवटी बाबा म्हणाले,"गौरी बेटी झोप आता. काल रात्रिदेखिल तू नीट झोपली नव्हतीस न."
गौरीने हसून बर म्हंटलं. आई दिवा मालवण्यासाठी उठली. गौरीने आईचा हात धरला आणि तिला जवळ बोलावून तिच्या गालावर ओठ टेकवले. आईने तिला कुशीत घेतलं आणि कुरवाळलं. "झोप ह बेटा स्वस्थ." अस म्हणून आणि तिला कपाळाच चुंबन घेतलं.
बाबा देखिल उठले आणि गौरीच्या डोक्यावरून हात फिरवून त्यांच्या खोलीत गेले.
"आज वारा चांगलाच सुटला आहे नाही हो? कधीची वाऱ्यावरून एक वेगळीच अशी शीळ एकु येते आहे. अगदी कोणीतरी सतत साद घालत असल्यासारखी." गौरीची आई खोलीत येत म्हणाली आणि तिने दिवा मालवला. दिवा मालवताना एक क्षण तिला वाटललं की गौरीच्या खोलीत काहीतरी हालचाल झाली आहे, पण मग वाऱ्यामुळे झाडांची सावली हलत असेल अस मनात येऊन ती स्वतःशीच हसली आणि आडवी पडली.
........ सकाळी बराच वेळ झाला तरी गौरीच्या खोलीतून काहीच हालचाल जाणवली नाही."बरं नाही की काय पोरीला..." असं म्हणून गौरीचे बाबा तिच्या खोलीत शिरले. परंतु गौरी तिच्या पलंगावर नव्हती. तिची व्हील चेअर देखील तिथेच होती. ते बघून बाबा गोंधळले आणि तिच्या पलंगाजवळ गेले......... तिच्या पलंगावर एक काळाभोर दगड आपल्या निळसर तेजाने चमकत असलेला बाबांना दिसला. बाबांनी तो दगड हातात घेतला आणि गौरीला हाक मारली...."गौरी..... बाळा......" पण गौरीच्या बाबांना कल्पना नव्हती की गौरी तिच्या खोलीतच काय .... या जगातच नव्हती..... तिने तिचा निर्णय घेतला होता! एका सुदृढ आणि सक्षम आयुष्याचा!!!!!
समाप्त

शेवट छान केलास
ReplyDeleteधन्यवाद
DeleteInteresting end ... Dhananjay gangal
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete