सिझोफ्रेनिया..... आजार की परसेप्शन!(?)
भाग 1
"अग, हसतेस काय? खरंच सांगतो आहे मी. राजन म्हणाला मला की तू गिताशी बोलू नकोस. ती काही ना काही कारणाने तुला आमच्यापासून तोडेल." विक्रांत गंभीरपणे गिताला सांगत होता आणि गिता हसत होती. " कमाल करतेस हं गिता. मी काहीतरी सिरीयसली सांगतो आहे. बरं हे फक्त राजानचं मत नाही; प्रकाश आणि हरीचसुद्धा हेच मत आहे." आता मात्र गिताला थोडा राग आला. "विकी मी का तोडेन तुला तुझ्या मित्रांपासून? आपण फक्त काही दिवस झाले एकमेकांना ओळखायला लागलो आहोत. तेही कामाच्या संदर्भात. तुझे मित्र तर तुझ्याबरोबर लहानपणापासून आहेत ना? मग ते तुला ओळखत नाहीत का? मी भले प्रयत्न केला तुला त्यांच्यापासून लांब करण्याचा; पण तू असं कोणाचं ऐकून तुझी जुनी मैत्री संपवणार नाहीस याची त्यांना खात्री कशी नाही?" ती थोडी वैतागून म्हणाली.
"त्यांना खात्री आहे ग, की मी असं कोणाचं ऐकून आमची मैत्री तोडणार नाही. पण मी आपली आमची चर्चा सांगितली तुला इतकंच. जाऊदे! तुला राग आलेला दिसतो आहे. सोड तो विषय." विक्रांत म्हणाला. तरी गिताच्या कपाळावरच्या आठ्या गेल्या नाहीत. त्यामुळे तिच्या गालावर रेंगाळणाऱ्या बटेला फुंकर मारत तो हळूच म्हणाला;"तशी तू वैतागलीस की अजून छान दिसतेस हं." त्याचं ते प्रेमळ बोलणं ऐकून गिता हसली आणि विक्रमने छेडलेला विषय तिथेच संपला.
विक्रमने विषय संपवला असं त्याला वाटत असलं तरी गिताच्या मनातून मात्र संध्याकाळचा विषय पूर्ण गेला नव्हता. तिने जेवताना तो विषय आई-बाबांकडे काढला. गिताच्या घरी रात्रीचं जेवण सगळे एकत्र घ्यायचे. त्या निमित्ताने दिवसभर कोणी काय केलं ते सांगितलं जातं; म्हणून तिच्या वडिलांनीच हा नियम केला होता. मुख्यतः गिता मोठी झाल्यावर तर ते सुद्धा आवर्जून रात्रीच्या जेवणाला घरी पोहोचायचे. गिताचे वडील हार्ट स्पेशालीस्ट होते आणि गीताची आई गायनाकॉलॉजीस्ट. दोघेही त्यांच्या कामात अडकलेले असायचे दिवसभर. मग एकमेकांची खबरबात कशी कळणार? म्हणून हा नियम होता. गीताने सायकॉलॉजिस्ट होण्याच्या निर्णय घेतला होता; त्याला तिच्या आई-वडीलांनी कधीच विरोध केला नव्हता. एकूणच समजूतदार परिवार होता तो.
"गिता अग कसं कळत नाही तुला. विक्रमला तू आवडायला लागली आहेस. पण अजून बहुतेक त्याला तुझ्या मनाचा अंदाज येत नाही आहे; म्हणून मग असं काहीतरी बोलून तो तुझ्या वागण्यातला बदल बघत असेल." गिताची आई हसत म्हणाली. त्याला बाबांनी दुजोरा दिला. "खरंच गिता! बहुतेक त्याला तुला काही विचारायची हिम्मत होत नसेल. म्हणून मग हे असं, तुझ्या मैत्रीमुळे माझ्या जुन्या मित्रांपासून लांब जाईन... सारखं काहीतरी तो बोलत असेल. याचा अर्थ स्पष्ट होतो ग... त्याला तू आवडतेस." असं म्हणून बाबा आणि आई दोघे हसले. पण गीताचं त्यांच्या बोलण्याने समाधान नाही झालं.
विक्रमची आणि गिताची ओळख अगदीच अलीकडची होती. गीताने नुकतंच डॉक्टर खरातांचं क्लिनिक जॉईन केलं होतं. विक्रम मात्र तिथे गेलं एक वर्ष काम करत होता. गिता स्वतः सायकॉलॉजिस्ट होती. विक्रम मात्र क्लिनिक मधलं सगळं पेपर वर्क बघायचा. डॉक्टर खरात खूप मोठे सायकॉलॉजिस्ट होते. त्यांच्याकडे अनेक पेशंट्स यायचे. प्रत्येक केस कॉन्फिडेन्शल असायची. त्यामुळे विक्रमशिवाय इतर कोणालाही डॉक्टरांच्या परवानगीशिवाय केस पेपर्स मिळायचे नाहीत. प्रत्येक केसचं फायलिंग तो खूप व्यावास्थित करून ठेवायचा. खरात गिताच्या वडिलांचे मित्र असल्याने गिताला त्यांनी स्वतः आग्रहाने ट्रेनिंगसाठी ठेवून घेतलं होतं. आणि तिथेच तिची विक्रमशी ओळख झाली होती. विक्रम स्वभावाने खूप चांगला होता. सरळ होता. गिताला कोणतेही केस पेपर्स पटकन काढून द्यायचा आणि अनेकदा एखादी जुनी केस तिला सांगायचा सुद्धा.
गिता त्याला एकदा म्हणाली देखील होती;"विक्रम तू न सायकॉलॉजिस्ट व्हायला हवा होतास. तुला प्रत्येक केस नीट अगदी सगळ्या बारकाव्यांसहित माहित असते." त्यावर तो फक्त हसला होता.
"का बरं विकीला असं वाटतं की मी त्याला त्याच्या मित्रांपासून दूर करेन? आई-बाबा म्हणतात ते खरं असेल का? पण मग मी जर आवडत असेन तर तो तसं स्पष्ट सांगेल. त्याला उगाच गोल गोल नाही बोलता येत किंवा बोलण्या अगोदर तो खूप विचार करत असेल करत असेल असं नाही वाटत. मुळात मी त्याला आवडणं किंवा आमचं एकत्र येणं त्याला त्याच्या मित्रांपासून कसं दूर करेल? त्याचे मित्र त्याला असं का सांगत आहेत? परत एकदा छेडून बघितलं पाहिजे त्याला या विषयावर. जर त्याच्या मित्रांना भेटता आलं तर मस्तच. उगाच विकीच्या मनात असं काही भरवू नका हे गप्पांच्या ओघात सांगीन. मी असेन किंवा अजून कोणी दुसरी येईल कदाचित त्याच्या आयुष्यात. पण जर एकदा त्याच्या मनाने स्वीकारलं की त्याच्या आयुष्यात येणारी कोणीही मुलगी त्याला त्याच्या मित्रांपासून तोडेल तर मग हा विचार पुढे जाऊ शकतो. मग तर त्याला असं ही वाटायला लागेल की ती मुलगी त्याला त्याच्या घरच्या लोकांपासून पण तोडेल. अहं! हे काही बरोबर नाही. बोललंच पाहिजे परत एकदा या विषयावर त्याच्याशी." गिता स्वतःशीच विचार करत होती. तिला तिच्या आई-बाबांचं मत फारसं पटलं नव्हतं. कारण तिच्यातली सायकॉलॉजिस्ट वेगळा विचार करायचा प्रयत्न होती. पण दुसरं कुठलही कारण तिच्या लक्षात येत नव्हतं.
दुसऱ्या दिवशी तिने मुद्दाम विक्रमला छेडलं. "काय मग विकी काल तुझे दोस्त काहीच म्हणाले नाहीत का माझ्याबद्दल." ती विक्रमकडे हसत बघत म्हणाली. पण विक्रम काहीच बोलला नाही. कामात लक्ष आहे असं दाखवून त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तिला ते थोडं विचित्र वाटलं. पण गीतानेसुद्धा ठरवलं होतं की उगाच घाई करायची नाही. एकूण हा प्रकार काय आहे त्याची माहिती मात्र घ्यायची. कारण तिला खरंच विक्रम आवडायला लागला होता.
विक्रम तसा शांत मुलगा होता. त्याला त्याचे वडील क्लिनिकला सोडायला यायचे. बहुतेक तिथून ते त्यांच्या कामाला जात असावेत. क्लिनिक उघडायच्या अगोदर पंधरा-वीस मिनिटं विक्रम यायचा आणि त्या दिवसाच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स प्रमाणे सगळे पेपर्स लावून ठेवायचा. ऑफिस संपूर्ण फिरून सगळ निट आहे न याची खात्री करून आपल्या जागेवर जाऊन बसायचा. पण मग मात्र तो त्या जागेवरून अजिबात उठायचा नाही. दुपारचं जेवण देखील तो तिथेच घ्यायचा. अजून एक रीसेप्शानिस्ट होती. कारण फोन्स घेणं किंवा नवीन येणाऱ्या पेशंट्सशी बोलणं अशी काम विक्रम करत नसे. विक्रम त्या रीसेप्शानिस्टशी पण फारसा बोलायचा नाही. आणि तीसुद्धा स्वतःच्याच नादात असायची. पण गिताने क्लिनिक जॉईन केलं आणि थोड्याच दिवसात तिची आणि विक्रमची मैत्री झाली. एक तर गिताला काही केसेसची माहिती हवी असायची. जुन्या केसेसचा ती अभ्यास करायची. त्यामुळे तीदेखील अनेकदा लवकर यायची. डॉक्टर येईपर्यंत मग अनेकदा गिता आणि विक्रम गप्पा मारायचे.
हळूहळू गिताला विक्रमची माहिती कळायला लागली. विक्रमची आई त्याच्या लहानपणीच गेली होती. घरात फक्त तो आणि त्याचे वडील होते. त्याची आजीदेखील होती. पण तिचं आणि विक्रमचं अजिबात पटायचं नाही. त्यामुळे ती त्यांच्याच इमारतीमध्ये पण वरच्या मजल्यावर एकटीच राहायची. त्याच्या वडिलांचा व्यवसाय होता. पण विक्रमला त्यात इंटरेस्ट नव्हता. त्याच्या वडिलांची डॉक्टर खरातांशी कधीतरी ओळख झाली होती आणि कॉलेज संपल्यानंतर एक वेगळा अनुभव मिळावा म्हणून त्याच्या वडिलांनी विक्रमसाठी डॉक्टरांकडे शब्द टाकला होता. डॉक्टरसुद्धा लगेच तयार झाले होते. कारण त्यांच्याकडे काम करणाऱ्या जुन्या जाणत्या कामातबाईंना अलीकडे काम झेपत नव्हतं. मग विक्रम यायला लागला आणि कामातबाईंनी त्याला सगळं काम समजावलं. तो निट शिकला आहे याची खात्री झाल्यावर कामातबाई यायच्या बंद झाल्या. आर्थात हे सगळ विक्रमने गिताला सांगितलं होत.
वडिलांचा एवढा व्यवसाय असूनही विक्रम हे असं इथे कारकुनी काम का करायला येतो ते गिताला कळेना. पण मग तिने तो विषय तिथेच सोडला. तसा विक्रम थोडा मुडी होता. त्यामुळे जर त्याच्या मनाविरुद्ध जास्त प्रश्न विचारले तर तो गप्प व्हायचा. किंवा चक्क दुर्लक्ष करायचा. म्हणून मग गिता त्याच्या कलाने घ्यायची आणि तो जेवढी आणि जी माहिती ओघात सांगायचा ती ऐकून घ्यायची.
एक दिवस सकाळपासून विक्रम मस्त मूडमध्ये होता. त्याच दिवशी नेमकी गीता तो यायच्या अगोदरच आली होती आणि एका जुन्या केसचा अभ्यास करत होती. त्यामुळे तो आत आला तेव्हा स्वतःशीच हसत होता ते तिच्या लक्षात आलं. तो पेपर्स लावत होता तेव्हा ती त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याला हळूच विचारलं;"काय विकी, आज काही खास? एकदम मस्त मूडमध्ये दिसतो आहेस!"
तिच्याकडे वळत तो म्हणाला;"गिता काल खूप दिवसांनी राजन भेटला. मग आम्ही प्रकाश आणि हरीला जाऊन भेटलो. मस्त गप्पा मारल्या. मी त्यांना आपल्याकडे आलेली ती नवीन केस आहे ना त्याबद्दल सांगितलं. ती ग... १२ वर्षांची सिमरन येते ना... तिची केस. बिचारी मुलगी! आई जाऊन ३ महिने झालेत पण अजूनही ती ते स्वीकारायला तयार नाही. तिला अजूनही वाटतं की तिची आई घरी आहे आणि फक्त तिच्याशी बोलते कारण तिचे बाबा सारखे फिरतीवर असतात. खर सांगू का असं वाटतं ग मुलांना. त्यांना अस आईशिवाय राहावं लागणार ही कल्पना नकोशी वाटते. आजारी असली तरी चालेल पण आई हवी असते ग त्या वयात. मलासुद्धा खूप त्रास झाला होता आई गेली हे स्वीकारताना. जाऊ दे! पण तुला माहित आहे; हरी म्हणाला तिला भूत बाधा झाली असेल. मग मी त्यांना समजावलं की भूत बित काही नसतं. हा एक आजार आहे. त्याला पॅरानोइड सिझोफ्रेनिया म्हणतात. मग त्याची सगळी लक्षणं सांगितली. सगळं समजावलं तर राजन खूष झाला. मला म्हणाला विकी तू ना डॉक्टरच व्हायला हवा होतास. किती व्यवस्थित समजावतोस तू हा इतका अवघड विषय.' मी म्हणालो, 'आईचं आजारपण मी खूप जवळून बघितलं आहे. त्यामुळे तेव्हापासूनच मला इच्छा होती डॉक्टर व्हायची. पण मग बाबा नको म्हणाले म्हणून मग मी तो विचार बदलला.' जाम खुश होते माझे मित्र माझ्यावर. मग आम्ही एकत्र जाऊन पार्टी पण केली. रात्री उशिरापर्यंत गच्चीवर बसलो होतो आम्ही. अगदी बाबा बोलवायला वर येईपर्यंत. बाबा आले आणि ते तिघे पळाले. पण खूप मज्जा आली काल." हे सांगताना विक्रम खूप खुश होता. हसत होता. गिताला पटलं नाही की विक्रमने इथे आलेली केस त्याच्या मित्रांना सांगितली. पण ती त्याबद्धल त्याच्याकडे काहीच बोलली नाही. उलट तिने विचारलं;"अरे विकी; मी पण तुला म्हंटलं होत नं की तू सायकॉलॉजिस्ट व्ह्यायला हवा होतास. मग तू राजनला का नाही सांगितलंस की गिता पण मला असं म्हणाली होती." तिने असं म्हणताच तो त्याच्या तंद्रीत म्हणाला;"छेछे! मी तुझा उल्लेखही करत नाही. त्यांना तू आवडत नाहीस. तुझ्याबद्दल बोलायला लागलो की ते निघून जातात. जसे बाबा आले की जातात ना तसे."
तिचा उल्लेख झाला तर निघून जातात? हा काय प्रकार आहे? गीता त्याच्या या बोलण्यामुळे गोंधळली आणि त्याहीपेक्षा तिला दुसरीच एक गोष्ट खटकली. विक्रम क्लिनिकमधली अत्यंत गोपनीय माहिती त्याच्या मित्रांना सांगत होता; हे योग्य नव्हतं. त्यामुळे डॉक्टर आले तेव्हा ती काम काढून त्यांच्या केबिनमध्ये गेली आणि म्हणाली;"डॉक्टर काका, विक्रम आपल्याकडे येणाऱ्या केसेस त्याच्या मित्रांकडे सांगतो."
डॉक्टर समोरचे पेपर्स बघण्यात गढले होते. त्यांनी मान वर करून गीताकडे बघितलं आणि विचारलं;"कोणी सांगितलं तुला असं गिता?"
"काका, तो स्वतःच मला सांगत होता आत्ता की त्याने काल त्याच्या मित्रांना सिमरनची केस सांगितली." गिता म्हणाली.
डॉक्टर खरातांनी तिच्याकडे चमकून बघितलं आणि विचारलं,"तुला सांगितलं त्याने की तो त्याच्या मित्रांना काल भेटला?" गिता म्हणाली;"हो!"
"अजून काय काय सांगितलं त्याने गिता?" डॉक्टरांनी समोरची फाईल बंद केली आणि तिला बसायला सांगत विचारलं.
गिताला थोड विचित्र वाटलं हे सगळं. कारण तिच्या मते सिमरनची केस विक्रमने मित्रांना सांगणं अयोग्य होतं आणि डॉक्टरांनी त्याला त्याबद्धल समज द्यायला हवी असं तिला वाटत होत. पण डॉक्टर खरातांना विक्रमला समाज देण्यापेक्षा त्याने गीताला काय सांगितलं ते समजून घेण्याची इच्छा होती. मग तिने शांतपणे तिचं आणि विक्रमचं एकूण झालेलं बोलणं त्यांना सांगितलं.
"तो म्हणाला काल रात्री तो मित्रांबरोबर होता?"ती म्हणाली. "हो का? बरं! या अगोदर कधी तुझं आणि त्याचं त्याच्या मित्रांबद्दल बोलणं झालं होत का?" डॉक्टरांनी तिला विचारलं. मग गीताने मागे घडलेला प्रसंगसुद्धा त्यांना सांगितला.
डॉक्टर खरात थोडावेळ विचार करत बसले आणि मग त्यांनी गीताकडे सरळ बघत तिला विचारलं;"गिता, तुला विक्रम आवडायला लागला आहे का?"
अचानक डॉक्टर काकांकडून आलेल्या त्या प्रश्नाने गिता गोंधळली."काय काका? तुम्ही असं का विचारता आहात?" तिने डॉक्टरांना विचारलं.
गीताच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत स्वतःच्याच विचारात गढलेल्या डॉक्टर खरातांनी म्हंटल,"गीता, जर असं काही तुझ्या मनात असेल तर तुला विक्रम बद्दल काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे."
विक्रम बद्धल अस काय आहे? आता मात्र गिता पुरती गोंधळली होती.
"गिता, विक्रम हा एक सिझोफ्रेनियाचा पेशंट होता.... किंवा आहे... असं आपण म्हणूया." डॉक्टर खरात म्हणाले आणि गिताला मोठा धक्का बसला. "पण काका त्याच्यात मला अशी कोणतीही लक्षणं दिसली नाहीत. तो शांत स्वभावाचा आहे हे मान्य. पण तो त्याचं काम अगदी मन लावून करतो. माझ्याशी आणि आपल्या झाडू काढायला येतात त्या बाईंशी चांगला बोलतो. ती एकलकोंडा आहे किंवा लोकांपासून दूर रहायचा प्रयत्न करतो आहे असं मला कधीच वाटलं नाही काका. किंवा त्याचं बोलणं कधी असयुक्तिक किंवा निरर्थक नाही वाटलं." ती तिची मतं पटापट मांडायला लागली.
डॉक्टर खरात हसले आणि म्हणाले;"बेटा तुला तो आवडायला लागला आहे न? माझच चुकलं. मी तुला अगोदरच कल्पना द्यायला हवी होती. पण अजूनही वेळ गेलेली नाही. नको गुंतूस त्याच्यात."
गिता डॉक्टरांकडे बघून हसली."काका, मला तो आवडायला लागला आहे हे खरं आहे. तो स्मार्ट आहे. चांगला दिसतो आणि अत्यंत समंजस आहे तो. पण प्रश्न माझ्या आवडण्याचा नाही आहे आत्ता. काका मी देखील सायकॉलॉजिचा अभ्यास केला आहे. तरीही मला कळलं नाही की तो एक पेशंट आहे आणि इथे ट्रीटमेटसाठी येतो आहे; कमाल आहे माझी."
"बेटा, विक्रम इथे ट्रीटमेटसाठी नाही येत. तो खूपच सुधारला आहे. खरं तर त्याचा हा आजार खूप लवकर लक्षात आल्याने त्याची ट्रीटमेट लवकर सुरु झाली आणि तो सहयोग करतो आहे हे लक्षात आल्यावर आम्ही त्याला विश्वासात घेऊन सगळं समजावलं. सुरवातीला त्याने काही स्वीकारलं नाही. पण मग हळूहळू तो आमचं सांगणं समजून घेऊ लागला आणि मग तो लवकरच बराच बरा झाला. गेली काही वर्ष तो माझ्या निरीक्षणा खाली आहे. पण हळूहळू त्याची सिझोफ्रेनियाची लक्षणं कमी झाल्याचं मला जाणवलं. त्यामुळे त्याची औषध मी स्वतःच त्याच्या वडिलांशी बोलून कमी केली. असे पेशंट्स कायामचे बरे होत नाहीत हे तुलाही चांगलाच माहित आहे. पण अर्थात हळूहळू बऱ्याच प्रमाणात साधं आयुष्य ते जगू शकतात." काकांनी गिताला माहिती दिली.
"किती वर्ष झाली तो ट्रीटमेंट घेतो आहे काका? आणि औषधं कधी बंद केली?" गीताने काकांना विचारलं. तिच्यातली सायकोलोजीस्ट आता बोलत होती.
डॉक्टर खरातांनी गिताला माहिती दिली. ते म्हणाले;"गिता विक्रम १४ वर्षांचा होता तेव्हा त्याची आई देवाघरी गेली. खरं तर मिसेस राजे.... विक्रमची आई.... अनेक महिने आजारी होत्या. त्यांना रक्तातली कावीळ झाली होती. आणि ते खूप उशिरा लक्षात आलं. त्यांनी तो आजार अंगावर खूप काढला होता. त्यामुळे त्यातच त्यांचा अंत झाला. विक्रमने त्याच्या लहानपणी त्याच्या आईला फक्त औषधं घेताना आणि आजारी असलेली बघितलं होतं. विक्रमचे वडील कायम कामात अडकलेले असायचे. त्यामुळे विक्रम, त्याची आजारी आई आणि त्याची आजी असेच घरात असायचे. त्याची आजी कायम सुनेला टोचून बोलायची आणि विक्रमलासुद्धा. विक्रमला खूप वाईट वाटायचं. पण तो खूप लहान होता; त्यात आई आजारी असल्याने तो त्याच्या आजीवर जास्त अवलंबून होता. त्यामुळे आवडलं नाही तरी त्याविषयी करायचं ते त्याला कधी सुचायचं नाही. एक-दोन वेळा त्याने वडिलांना सांगायचा प्रयत्न केला. पण विक्रमसाठी त्यांच्याकडे वेळच नव्हता. आपलं काम आणि आजारी पत्नीची ट्रीटमेंट यातच ते अडकून गेले होते.
कधी लवकर आलेच घरी आणि विक्रमला घरात बघितलं तर त्याला म्हणायचे की त्याच्या वयाच्या मुलाने घरात बसू नये संध्याकाळी. मित्रांबरोबर खेळावं. पण त्यांना हे माहित नव्हतं की त्यांच्या बिल्डिंगमध्ये विक्रमच्या वयाची मुलंच नसतात. बाबांनी मित्र कर आणि बाहेर खेळत जा म्हणून सतत सांगितलं; म्हणून मग विक्रम रोज संध्याकाळी बाहेर जायला लागला.
हळू हळू तो घरात थोडा बोलायला लागला. त्याला काही मित्र मिळाले होते असं तो आईला सांगायचा. आम्ही खाली खेळतो असं म्हणायचा. त्याच्या आईला खूप आश्चर्य वाटायचं. कारण तिला माहित होतं की त्यांच्या बिल्डिंगमध्ये कोणी मुलंच नाहीत. त्यातूनही तिच्या मनात यायचं जर त्याला मित्र मिळाले असतील आणि ते खाली खेळत असतील तर आपल्याला आवाज कसा येत नाही; कारण विक्रमचं कुटुंब पहिल्या मजल्यावारच राहात होतं. तिने विक्रमचं हे वेगळं बोलणं विक्रमच्या बाबांच्या कानावर घालायचा खूप प्रयत्न केला. पण त्यांनी ते फारसं मनावर नाही घेतलं. काही दिवसांनी विक्रमची आई गेली. विक्रमने ते मान्य केलं नाही. तो नेहेमी म्हणायचा त्याची आई त्याच्याशी बोलते. ती इथेच आहे. सुरवातीला त्याच्या वडिलांना वाटलं की आई गेल्याच्या दुःखामुळे विक्रम असं बोलत असेल. पण हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की विक्रमचा त्याच्या म्हणण्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण तो वडील घरात असतानादेखील आईशी बोलत असल्यासारखा स्वतःशीच बोलायचा. तो कोणावरही विश्वास ठेवायला तयार नव्हता. हे लक्षात आल्यावर त्याच्या आजीने घरात हंगामा केला. सुनेच्या नावाने परत एकदा बोटं मोडली. त्यांचं मत होत की नातवाला सुनेच्या भुताने पछाडलं आहे. त्यामुळे विक्रमचे वडील दुपारी घरात नसताना एक दोन वेळा त्यांनी कोणा साधू बाबांना बोलावून होम-हवन करवले घरात. त्याचा अजूनचं वाईट परिणाम झाला विक्रमवर. तो खूपच एकटा रहायला लागला घरात असताना आणि शाळेत देखील. बाबा घरात नसताना तो बाहेरच राहायला लागला. कुठे असतोस असं विचारलं तर म्हणायचा की मित्रांबरोबर होतो."
"अरे? काका याचा अर्थ विक्रमची केस बरीच क्लिष्ट आहे." गिता मन लावून एकत होती. डॉक्टर थांबले तसं तिने तिचं पाहिलं निरीक्षण सांगितलं.
"गिता खरा प्रश्न पुढे आहे." डॉक्टर म्हणाले.
"म्हणजे काय काका?" गीताने आश्चर्य वाटून विचारलं.
"गिता, विक्रमची आई गेल्यानंतर साधारण सहा महिन्यानंतरची गोष्ट आहे. त्याचे वडील त्या दिवशी थोडे लवकर घरी आले. विक्रम घरात नव्हता म्हणून सहज त्याला शोधायला ते बाहेर पडले. त्यांना विक्रम बिल्डींगच्या मागच्या बाजूला पाण्याच्या टाकीवर कोणाशीतरी बोलतो आहे असं दिसलं. खरं तर विक्रम एकटाच होता. पण लांबून असं वाटत होतं की तो कोणाशीतरी बोलतो आहे. मध्ये एक झाड असल्याने विक्रमला त्याचे बाबा दिसत नव्हते. ते अजून जवळ गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आल की विक्रम खरंच बोलत होता कोणाशीतरी. पण त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. त्यांना वाटलं लपाछापी खेळत असतील. पण तसं नव्हतं. विक्रम त्याच्या बाजूलाच कोणीतरी आहे अशा प्रकारे बोलत होता. अगदी तावातावाने बोलत होता. त्याच्या वडिलांनी गोंधळून त्याला हाक मारली. विक्रम एकदम चमकला आणि त्याने वळून बघितलं. बाबांना बघून तो धावत त्यांच्याकडे आला आणि म्हणाला... बघा ना बाबा मगासपासून मी हरीला सांगतो आहे की राजानला बोलावूया त्याशिवाय खेळायला मजा येणार नाही. राजन सांगतो तो खेळ खेळायला मजा येते. पण हरी ऐकतच नाही. म्हणे राजन नसला तरी आपण खेळूया. बाबा एकदम चक्रावले. त्यांनी परत विक्रम जिथे उभा होता तिथे मान वळवून बघितलं. त्यांना खात्री झाली की तिथे कोणीच नाही. त्यांनी विक्रमचा हात धरला आणि त्याला घेऊन ते घरी आले. त्यांनी त्यांच्या आईला म्हणजे विक्रमच्या आजीला विचारलं की विक्रमचे मित्र कधी घरी आले आहेत का? त्या म्हणाल्या;"मी त्याला म्हंटलं अनेकदा घेऊन ये घरी. अलीकडे अंधार लवकर होतो; घरातच खेळा. मी कुठे तुला शोधायला येऊ. पण तो कधी त्यांना घरी आणायला तयार होत नाही."
हे काहीतरी वेगळं असावं असा संशय विक्रमच्या वडिलांना पहिल्यांदा आला आणि त्यांनी त्यांच्या नेहेमीच्या डॉक्टरना गाठलं. त्या डॉक्टरांनी त्यांना माझ नाव सांगितलं आणि अशा प्रकारे विक्रमची केस माझ्याकडे आली." डॉक्टर खरात बोलायचे थांबले. त्यांनी एकदा घड्याळाकडे बघितलं आणि ते गीताला म्हणाले;"बेटा आपण दुपारी किंवा रात्री क्लिनिकच्या वेळेच्या नंतर बोलू. आता माझी एक अपॉइंटमेंट आहे. मुख्य म्हणजे विक्रमला असं अजिबात वाटायला नको की आपण त्याच्याबद्दल बोलतो आहोत. त्यामुळे आता तू बाहेर जा आणि त्याच्याशी पूर्वीसारखीच वाग. ठीके?"
गीतानेदेखील घड्याळाकडे बघितलं आणि बरं म्हणून ती केबिनच्या बाहेर आली.
"इतकावेळ काय करत होतीस आत?" ती बाहेर येताच विक्रमने तिच्याकडे बघत तिला विचारलं.
"अरे आज जी केस येणार आहे ना त्याची चर्चा करत होतो आम्ही. डॉक्टरांनी या पेशंटची पुढची सेशन्स मला घ्यायला सांगितलं आहे. का रे?" विक्रमला संशय येऊ नये म्हणून गीताने नीट उत्तर दिलं. त्यावर हळूच मोकळा श्वास सोडत विक्रम म्हणाला;"काही नाही. मला वाटलं तू आपल्या सकाळच्या गप्पा सांगायला गेलीस की काय." गिताने गोंधळल्यासारखा चेहेरा केला आणि मग आठवल्यासारखं करत विचारलं;"कुठल्या गप्पा? ओह! तू तुझ्या मित्रांबरोबर मजा केलीस ते? अरे, हे मी डॉक्टरांना हे कशाला सांगू विकी? तू पण कमाल करतोस हं!"
"तस नाही ग! डॉक्टरांना काम सोडून उगाच गप्पा मारत बसलेलं नाही आवडत नं. तू ओघात आपल्या गप्पा सांगितल्या असत्यास ना तर ते तुला आणि मग मला रागावले असते. म्हणून विचारलं." विक्रम आता मोकळेपणे बोलला आणि त्याच्या कामाला लागला.
आपल्या जागेकडे येताना गीताने डॉक्टर काकांना मेसेज केला, 'आपण क्लिनिकमध्ये विक्रम विषयी चर्चा करणं टाळलं पाहिजे. त्याच्या लक्षात येऊ शकतं.'
डॉक्टर खरातांनी लगेच तिला उत्तर दिलं, 'ठीक आहे. आज दुपारी मी तुला लंचसाठी बाहेर भेटतो.'
क्रमशः
No comments:
Post a Comment