Friday, July 22, 2022

नातेदारी

 नातेदारी


1

मृदुला कॉलेजच्या गेट बाहेर पडते आहे. शाम त्याची बाईक तिथे पार्क करतो आहे. मृदुला त्याला बघून थबकते. तिच्या डोळ्यात त्याच्याबद्दल उत्सुकता आहे. शामचं तिच्याकडे लक्ष नाही. तो बाईकवरून उतरत असताना अचानक त्याचा पाय चिखलात जातो. शाम वैतागतो. मृदुलाला हसायला येतं. ती तिच्या बॅगमधून पाण्याची बाटली काढते आणि शाम जवळ जाऊन त्याला ती बाटली देते. तिला बघून शाम एकदम स्थब्द होतो. त्याचं संपूर्ण लक्ष तिच्या चेहऱ्याकडे आहे. तिच्या हातातली पाण्याची बाटली त्याला दिसत नाही. मृदुला हसते आणि टिचकी वाजवते. शाम ओशाळतो. मृदुला पाण्याची बाटली पुढे करते; शाम ती बाटली घेऊन त्याच्या सँडल्सवर पाणी घालायला लागतो. चिखल साफ करून शाम वर बघतो. मृदुला लांब चालत जाताना दिसते. तो आजूबाजूला बघतो. एक नवीन बाटली विकत घेतो.

मृदुला चालते आहे आणि शाम तिच्या शेजारी येऊन तिला थांबवत तिच्या हातात पाण्याची नवीन बाटली ठेवतो.

शाम : शाम...

मृदुलाचा आवाज चेष्टेचा आहे

मृदुला : अहं.... टळटळीत दुपार

शाम मिश्किल आवाजात म्हणतो : टळटळीत दुपार.... हे नाव थोडं ऑड नाही का?

मृदुला हसत : very funny

शाम : हे तर अजून विचित्र

मृदुला हसत शेक हॅन्ड साठी हात पुढे करते : हाय. मृदुला. MBA लास्ट सेम.

शाम : ओह.... मी पण. अरे? पण कधी बघितलं नाही.

मृदुला : कारण दीड वर्ष on line कॉलेज होतं.

शाम एकदम ओशाळतो आणि हसतो. एव्हाना दोघे एकत्र चालायला लागले असतात. मृदुला एका इमारतीजवळ थांबते.

शाम : इथे?

मृदुला : राहाते मी.

शाम : ओह...

वळून इमारतीकडे बघतो.

मृदुला हसत : चौथा मजला.

शाम हसत : hmmm....

मृदुला : आणि तू?

शाम : इथे नाही.

मृदुला : ते माहीत आहे... पण मग माझ्या सोबत इथे?

शाम : उद्या pick करायला यायचं तर बिल्डिंग नको का माहीत असायला?

मृदुला : तुमच्यात इतकं लगेच अँप्रोच करतात का दोस्तीसाठी?

शाम : अंह. पण ही केस वेगळी आहे.

मृदुला : अच्छा? काय आहे वेगळं?

शाम : हमारा इरादा सिर्फ दोस्ती का नही है.

मृदुला गोड हसते. शाम देखील. मृदुला जायला निघते.

शाम : उद्या मी वाट बघू न?

मृदुला मागे वळून बघते हसते आणि बिल्डिंगच्या आत शिरून दिसेनाशी होते. शाम गोड हसतो; एकदा इमारतीकडे वर बघतो आणि मागे वळतो.

***
2

सकाळची वेळ आहे. मृदुला इमारती बाहेर येते. समोरच शाम बाईक घेऊन उभा आहे. ती त्याच्याकडे बघून हसते आणि त्याच्या जवळ येते.

मृदुला : हाय... इथे?

शाम : कॉलेजकडे जायचा रस्ता इथूनच आहे.

मृदुला : पण तू जात नाही आहेस. थांबला आहेस.

शाम : अं... हो! वाट बघतो आहे.

त्याचं बोलणं ऐकून मृदुला हसते.

मृदुला : OK बाय.

आणि चालायला लागते. शाम एकदम गोंधळतो आणि बाईक ढकलत तिच्या सोबत चालायला लागतो.

शाम : फारच खडूस बुवा तू.

मृदुला हसत : हो का? आणि काही?

शाम : आणि खूप सुंदर.

मृदुला : माहीत आहे मला. आणि?

शाम : तू तुझ्या दिसण्याबद्दल म्हणते आहेस का?

मृदुला एकदम थांबते आणि त्याच्याकडे वळून बघते.

मृदुला : मग तू कोणत्या सौंदर्याबद्दल म्हणत होतास?

शाम : मनाच्या!

मृदुला : ओहो! आणि तुला कसं कळलं माझं मन?

शाम : अहं! अजून मन नाही कळलं. पण मनाचं सौंदर्य दिसलं.

मृदुला : ओह! That's too cheezy.

शाम : I don't think so.

मृदुला : What do u mean?

शाम : तू काल मला आपणहून तुझी पाण्याची बाटली देऊ केलीस. म्हणून म्हंटलं तू मनाने सुंदर आहेस.

मृदुला गाल उडवते आणि चालायला लागते. परत शाम त्याची बाईक ढकलत तिच्या सोबत चालायला लागतो.

मृदुला : गाडीत पेट्रोल नाही का?

शाम : आहे की. पण तुला चालायचं आहे न.

मृदुला शामकडे बघून हसते आणि त्याच्या मागे बसते. शाम तिला घेऊन निघतो.

***
3

शाम गेटजवळ उभा आहे. तो सतत घड्याळ बघतो आहे. त्याला समोरून मृदुला येताना दिसते.

शाम : अग, होतीस कुठे? सतत फोन लावतो आहे तर तुझा फोन बंद. मला वाटलं कॉलेजमध्ये आली असशील म्हणून थांबलो नाही तुझ्या बिल्डिंग जवळ. थेट इथे आलो. तर तू कॉलेजमध्ये पण नाहीस.

मृदुला : अरे काय सांगू? माझी सुपर मिनू म्हणजे न....

शाम : तुझ्याकडे मांजर आहे?

मृदुला : काय? कोणी सांगितलं?

शाम : मिनू हे नाव usually मांजरीचं असतं.

मृदुला : फालतू जोक करू नकोस. मिनू माझ्या आजीचं नाव आहे.

शाम : आणि तू तिला चक्क नावाने हाक मारतेस?

मृदुला : हो! तू भेटलास की लक्षात येईल तुझ्या. ती कोणत्याही अँगलने आजी नाहीय.

शाम : बरं! तर...... मिनूने काय केलं?

मृदुला एकदम उत्साहात येऊन सांगायला लागली.

मृदुला : अरे ती रोज सकाळी walk ला जाते तिच्या काही मैत्रिणींबरोबर. त्यातल्या एकीच्या गळ्यातली चेन आज सकाळी एका चोराने खेचली आणि पळायला लागला. मिनूने चक्क अचानक त्याला खेचला आणि खाली पाडला.

शामला ते ऐकून धक्का बसला. तो मोठे डोळे करून म्हणाला : मग?

मृदुला : मग काय? सगळ्या जणींनी मिळून धु धु धुतला त्याला आणि मग पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्या. हिने मला स्टेशन मधून फोन केला आणि सांगितलं सगळं.

शाम : मग?

मृदुला : मग मी धावले पोलिस स्टेशनला. तिथे जाऊन बघते तर त्या स्टेशन इनचार्जलाच हिने फैलावर घेतलं होतं. बागेत सकाळच्या वेळी पोलीस गस्त नसते म्हणून.

शाम : मग?

मृदुला : त्या इन्स्पेक्टरने तरी गप्प बसून ऐकून घ्यायचं न तिचं. नेमकं त्याने बोलायला सुरवात करताना तिला आजी म्हंटलं.

शाम : मग?

मृदुला : मग? मग जे झालं ते बघायला तू प्रत्यक्ष असायला हवा होतास.

शाम : मग?

आता मृदुला वैतागते.

मृदुला : हे मग मग काय लावलं आहेस? सगळं निस्तरला मी. त्या गोंधळात फोन switch ऑफ ठेवला होता तो तसाच राहिला होता. म्हणून तुला फोन लागत नव्हता.

शाम : सॉलिड आहे यार तुझी आजी.

मृदुला कपाळाला हात लावते आणि म्हणते : आजी नाही शाम.... मिनू... मिनू म्हणायचं तिला.

शाम : ओह सॉरी. सॉलिड आहे तुझी मिनू.

दोघे हसतात आणि कॉलेजच्या आत जातात.

***
4

मृदुलाला आज थोडा उशीर होतो कॉलेजमध्ये पोहोचायला. तिचं आणि शामचं कॉलेजच्या लायब्ररी जवळ भेटायचं ठरलं असतं. ती लायब्ररीच्या दारात येते आणि तिला दिसतं की शाम एका गोड मुलीशी एकदम मोकळेपणी गप्पा मारतो आहे. ते बघून मृदुला थोडी डिस्टर्ब होते. ती पटकन मागे वळते आणि लेक्चरला जायला निघते. इतक्यात शाम तिला बघतो आणि त्या मुलीला बाय म्हणून पटकन मृदुलाच्या दिशेने येतो.

शाम : हाय

मृदुला : हाय....

शाम : किती उशीर केलास? मी वाट बघत होतो.

मृदुला : हो दिसलं मला ते.

शाम : काय ग?

मृदुला : काही नाही. उशीर झालाय न? मग उगाच गप्पा नको मारुस. चल.

दोघेही क्लास च्या दिशेने जातात.

****
5

मृदुला कॉलेजजवळ पोहोचते. ती शामला शोधते आहे. तिचं लक्ष जातं तर शाम परत एकदा त्याच मुलीसोबत चहावाल्या जवळ उभा आहे. मृदुला एकदम थबकते. तिच्या चेहेऱ्यावर थोडं दुःख आहे. ती पटकन मागे वळते. यावेळी शामचं लक्ष जात नाही. मृदुला तिथून निघून जाते.

***
6

संध्याकाळची वेळ आहे .शाम मृदुलाची वाट बघत तिच्या इमारती खाली उभा आहे. एक रिक्षा येते आणि आजी खाली उतरते.

आजी रिक्षावाल्याला : हा नंबर बोल तुझा.

रिक्षावाला गोंधळतो.

रिक्षावाला : तुम्हाला माझ्या रिक्षाचा नंबर का हवाय आजी?

आजी : आजी? तुला मी आजी वाटले का रे?

रिक्षावाला एकदम गडबडून जातो.

रिक्षावाला : मग? काय म्हणू?

आजी : काही म्हणू नकोस. तुझ्या रिक्षाचा नंबर नाही; मोबाईल नंबर दे. GPay करणार आहे मी. सुट्टे नाहीत माझ्याकडे.

रिक्षावाला : अरे देवा. माझ्याकडे नाही तुमचं pay.

आजी : असा कसा रे तू? आता पैसे कसे देऊ?

शाम हे सगळं बघत असतो. तो पुढे होतो आणि खिशातून पैसे काढून रिक्षावाल्याला देतो.

आजी : अरे अरे तू का देतो आहेस?

शाम : तुझ्याकडे सुट्टे नाहीत आणि त्याच्याकडे Gpay नाही. म्हणून हा मधला मार्ग काढला आहे. मी आत्ता देतो... तू मला तुझे सुट्टे झाले की दे किंवा Gpay कर.

आजी : सांग बघू नंबर.

शाम नंबर सांगतो. आजी तो फीड करून घेते आणि लगेच त्याला Gpay करते. दोघे एकमेकांकडे बघून हसतात.

आजी : हं चल.

शाम : अं?

आजी : अरे चल न. इतकी मदत केली आहेस तर चल मस्त कोकम सरबत देते तुला. का? उशीर होतो आहे का?

शाम एकदा त्याच्या बाईककडे बघतो... मग आजीकडे बघून हसतो.

शाम : अंहं.

***
7

लिफ्ट मधून आजी आणि शाम बाहेर पडतात.

शाम : चौथा मजला न हा.

आजी : हो! इथेच राहाते मी. का?

शाम : अंहं

आजी : अरे अंहं... ये छान सरबत करून देते तुला...

शामला कळत नाही आजी काय म्हणते आहे. आजी किल्लीने दार उघडणार इतक्यात घराचं दार उघडतं आणि मृदुला दारात उभी असते. ती शाम आणि आजीला एकत्र बघून गोंधळते. आजी हसून मृदुलाकडे बघते.

आजी : अग मृदुला, हा अं... अंहं.... आणि अंहं... ही माझी नात मृदुला.

शाम एकदम मोठ्याने हसतो.

शाम : तरीच! हिला पण पहिल्याच ओळखीत फिरक्या घ्यायची सवय आहे.

आजी : म्हणजे?

मृदुला : अग मिनू हाच तर शाम! आणि शाम....

शाम : ही मिनू. मी ओळखलं. रिक्षावाल्याशी ज्या प्रकारे तू बोलत होतीस न मिनू..... तू आजी असणं शक्यच नाही हे लगेच लक्षात आलं माझ्या.

तिघेही हसतात आणि घरात जायला वळतात.

***
8

मृदुला घराची बेल वाजवते. तिला दोन-तीन वेळा बेल वाजवायची सवय आहे हे लक्षात येतं. आतून आजीचा आवाज येतो.

आजी : अग धीर धर ग... आलेच!

आजी दार उघडते. मृदुला आत येते. आत शाम किचनच्या दारात उभा आहे आणि त्याच्या हातात कलथा आहे.

मृदुला : हे काय? तू इथे काय करतो आहेस?

शाम : ट्युशन घेतो आहे.

मृदुला : मिनूकडून? कसली ट्युशन?

आजी हसत : अग त्याला माझा केक करायला शिकायचं आहे. त्याच्या आईला सरप्राईज द्यायचं आहे म्हणे.

शाम : हो ग मिनू. ही परवा आली होती त्यावेळी तिने तुझ्या हातच्या केकचं इतकं कौतुक केलं की आई माझ्या मागे लागली काल youtub वरून रेसिपी शोधून दे म्हणून. अग, गंम्मत म्हणजे आईचा आजच वाढदिवस आहे; तर माझ्या मनात आलं रेसिपी शोधून देण्यापेक्षा मीच करतो केक तिच्यासाठी.

आजी हसते आणि म्हणते : बरं बरं... शंभराव्यांदा सांगितलं आहेस हे. आता ओव्हन मधून ते भांड बाहेर काढ आणि आणून इथे टेबलवर ठेव पंख्या खाली.

शाम एका नॅपकिन मध्ये परात धरून बाहेर आणून पंख्याखाली ठेवतो. आजी आणि शाम त्या केकवर चॉकलेट चिप्स लावायला लागतात. दोघे हसत काहीतरी बोलत काम करत असतात. मृदुला अगोदर ते कौतुकाने बघत असते. पण मग ती शामकडे बघते आणि त्याच्या अस्तित्वात हरवून जाते.

तुझे नि माझे नाते कसले
नजरेतुनि जरि मला न कळले
भाव फुलांच्या वेली वरुनि
हळूच माझ्या मनात विरले

स्पर्शा वाचुनि भाव उमजले
शब्दा वाचुनि मनही कळले
अस्ताच्या किरणांतुन अलगद
आपले तुपले नाते कथिले

धुंद मधुमति वाटेतुन फुलवत
मोहाच्या गंधातून फिरवत
तू मजला मी तुझला टिपले
तुझे नि माझे नाते असले

***

9

घराची बेल जोरात वाजते आहे. आतून आजी हॉलमध्ये येते. तिच्या हातात गरम कढई आहे. आजी कढई टेबलवर ठेवते आणि दरवाजाकडे जाते.

आजी : हो.. हो... अग आले... किती घाई...

आजी दरवाजा उघडते. मृदुला धाडकन आत येत आजीला मिठी मारते.

मृदुला : मीsssss नूsssssss माझा रिझल्ट लागला. सेकेंड ग्रेड मिळाली. इंटरव्ह्यू चा कॉल पण आहे दोन-तीन कंपनीज मधून.

आजी एकदम खुश होते. मृदुलाला मिठीत घेते.

आजी : आहेच माझी नात एकदम हुशार. दृष्ट काढायला हवी ग बाई तुझी.

दोघी हसतात. तितक्यात मागून आवाज येतो.

शाम : मी पण आहे इथे. आणि मला 1st क्लास मिळाला आहे. पण माझं कोणालाच कौतुक नाही.

आजी मागे वळून बघते आणि शामकडे बघून हसते.

आजी : अरेच्या तू पण आला आहेस? माझ्या लक्षातच आलं नाही.

शाम : बरोबर आहे. लाडक्या नातीपुढे तुला दुसरं कोणी दिसतं का मिनू?

मृदुला : हो.. आहेच मी लाडकी नात...

शाम : तू असशील ग नात... पण मी बॉयफ्रेंड आहे...

शामचं बोलताना टेबलवर ठेवलेल्या कढईकडे लक्ष जात. तो ती उघडून बघतो आणि हसतो.

शाम : मृदुला... तू लाडकी असशील... पण मिनूने माझा लाडका गाजर हलवा केला आहे.

आजी शामला एक हलकासा फटका मारते आणि हसत म्हणते...

आजी : उगाच तिला चिडवू नकोस ह शाम... तिचे आवडते रसगुल्ले मी मागवले आहेत. येतीलच इतक्यात.

आणि सगळे हसतात.

****
10

शाम हॉटेलच्या बाहेर उभा आहे. तो एकदा रस्त्याकडे बघतो आणि फोन करतो.

शाम : हॅलो... कुठे आहेस मृदुल? कधीपासून वाट बघतो आहे. माझा इंटरव्ह्यू? एकदम झकास... तू ये तर.... सांगतो.

इतक्यात रिक्षा थांबते आणि मृदुला उतरते. ती धावत शामकडे येते आणि त्याचे दोन्ही हात धरून त्याला गोल फिरवते.

मृदुला : I creaked it sham. I just creaked it.

शाम : म्हणजे?

मृदुला शेक हॅन्ड करण्यासाठी हात पुढे करते. शाम तिला शेक हॅन्ड करतो आणि तिच्याकडे बघतो.

मृदुला : हॅलो. Am mrudula. असिस्टंट टू HR.

शाम एकदम खुश होतो आणि मृदुलाला उचलून गोल फिरवतो. दोघे हसतात. मग एकदम कॉन्शस होतात. शाम तिला खाली ठेवतो. क्षणभर दोघे शांत होतात.

शाम : मॅडम may i know the company name.

मृदुला : नाम मे क्या रखा है. हमारा achievemnet देखो. ते जाऊ दे. तुझ्या इंटरव्ह्यू च काय झालं?

शाम तिच्यापुढे शेक हॅन्डसाठी हात करतो.

शाम : हॅलो. Am शाम. मॅनेजर at Systeem Approchers Compay Ltd.

मृदुलाचे डोळे एकदम मोठे होतात.

मृदुला : काय सांगतोस? इतक्या मोठ्या कंपनीचा इंटरव्ह्यू क्रॅक केलास? झकास रे. आता तर मला तुझ्याकडून दोन पार्ट्या हव्यात.

शाम : दोन?

मृदुला हसते

मृदुला : हो. दोन. एक मला जॉब मिळाला म्हणून आणि एक तुला मिळाला म्हणून.

दोघे हसतात.

शाम : त्याचीच तयारी केली आहे. चल...

मृदुला : तयारी?

शाम : म्हणजे पार्टीची ग. चल न आत...

मृदुला : पार्टीची तयारी म्हणजे?

शाम हसतो आणि म्हणतो : तुझी कोणाशीतरी ओळख करून द्यायची आहे ग. चल न.

मृदुलाचा चेहेरा एकदम गोधळलेला होतो. पूर्वी एक दोन वेळा ज्या मुलीला शाम बरोबर बघितलं असतं ती मृदुलाला आठवते. मृदुला थबकते. शाम दोन पावलं पुढे गेला असतो; तो मागे वळून बघतो आणि हसतो.

शाम : ए चल न...

मृदुला : हम्म...

दोघे रेस्टरन्ट च्या आत जातात.

****
11

दाराची घंटा एकदाच वाजते. आजी स्वतःशीच बोलते.

आजी : रसगुल्ले आले वाटतं. बरं झालं मृदुल यायच्या आत आले.

आजी दरवाजा उघडते. दारात मृदुला असते. आजीला आश्चर्य वाटतं.

आजी : अरे तू आहेस होय? एकच बेल वाजली तर मला वाटलं रसगुल्ले घेऊन आला. ये. काय झालं ग इंटरव्ह्यूमध्ये? अशी एकदम शांत का?

मृदुला एकदम चेहऱ्यावर हसरे भाव आणते आणि म्हणते

मृदुला : शांत आणि मी? Guess what? मला जॉब मिळाला. मिनू मी असिस्टंट to HR झाले आहे.

आजी : अरे वा... माझी लाडकी बेटी.

मृदुला एकदम आजीला मिठी मारते.

आजी : का ग शाम नाही आला तुझ्यासोबत?

मृदुला अजूनही आजीला मिठी मारून आहे. त्यामुळे तिचा चेहेरा आजीला दिसत नाही.

मृदुला : अग मिनू त्याला पण मस्त जॉब मिळाला आहे. थेट बेंगलोरला. त्याला लगेच जॉईन करायचं आहे. म्हणून तो नाही आला. नंतर फोन करेल म्हणाला आहे.

आजी : असं होय? बरं!

मृदुला : हम्म. तुला माहीत आहे का.... मला नव्या नोकरी बरोबर नवीन फ्लॅट पण मिळाला आहे. आपल्याला लगेच शिफ्ट पण व्हायचं आहे.

आजी : हे काय ग आता?

मृदुला : अग, ते घर माझ्या ऑफिस पासून जवळ आहे. त्यामुळे सोपं होईल मला. मला माहीत आहे एकदम सगळं बदललं तर तुला त्रास होईल...

आजी : छे! मला कसला त्रास? अग उलट अजून नवीन मैत्रिणी मिळतील. मृदुल तुला शिफ्ट व्हायचं आहे न? मग मी आहे तुझ्या सोबत.

आजीचं बोलणं ऐकून मृदुला आजीला मिठी मारते. मृदुलाचे डोळे भरून आलेले असतात; पण ते आजीला दिसत नाही. आजीच्या चेहेऱ्यावर आठ्या असतात. तिचा चेहेरा गंभीर झालेला असतो.... पण ते मृदुलाला दिसत नाही.

***
12

शाम खिडकीत उभा आहे. त्याचे डोळे पाण्याने भरले आहेत. त्याच्या मनात जुन्या आठवणी रुंजी घालत आहेत.

शब्द सुटले
मन हे तुटले
शांत झाल्या दिशा

नि:शब्द घन हे
नि:शब्द वन हे
शांत झाली धरा

मृदुला एकटी खिडकीत उभी आहे. तिला वाटतं आजी झोपली आहे. तिला शाम सोबत घालवलेले क्षण आठवत आहेत. तिचे डोळे भरून येत आहेत. आजी हलकेच डोळे उघडून तिच्याकडे बघते. आजीचा चेहेरा दुःखी होतो. ती परत डोळे मिटून घेते.

अजुनी सागराच्या
का गर्जती भावना
अजुनी प्रेमिकांच्या
का गूंजती कल्पना

शाम त्याच्या पलंगावर आडवा पडला आहे. त्याची नजर गोल फिरणाऱ्या पंख्यावर लागली आहे. डोळ्यातून पाणी ओघळतं आहे.

भाव सुटले
तरी अडकल्या
लोचनांच्या दिशा

कंठ दाटले
भान हरपले
दाटु आल्या कडा

संध्याकाळची वेळ आहे. मृदुला टेबलवर बसली आहे आणि तिच्या समोर तिचा लॅपटॉप उघडा आहे. तिचं कामात लक्ष नाही. आजी कॉफी आणून देते. बिस्कीट हवं का विचारते. मृदुला हसून नाही म्हणते. तिचा उदास चेहेरा आजीच्या लक्षात येतो. ती तिच्या चेहेऱ्यावरून हात फिरवते. काही बोलत नाही. हसते आणि आत जाते. आत जाताना दारात उभी राहून मागे वळून मृदुलाकडे बघते. मृदुला परत लॅपटॉपमध्ये बघते आहे. आजीला तिचं ते रूप बघून खूप वाईट वाटतं आहे.

दूर जाता निशा
आठव गूंजी जिवा
प्रेम भरल्या मना
फ़क्त उरल्या खुणा

शाम ऑफिसला जायला तयार होऊन बाईक स्टार्ट करतो आहे. त्याला समोर एक मुलगी एका मुलाच्या मागे बसताना दिसते आणि भास होतो की मृदुला त्याच्या मागे बसते आहे. तो मागे वळून बघतो तर मागे कोणीच नाही.

शब्द सुटले
मन हे तुटले
अस्वस्थ या भावना

नि:शब्द घन हे
नि:शब्द वन हे
अशांत काहूर मना

शाम बाईक थांबवून हेल्मेट काढतो आणि ढसाढसा रडतो.

***

13

आजी आणि नीलाताई दोघी बागेमध्ये walk घेत आहेत.

नीलाताई : मिनू बसूया ग आता. तुला भारी उत्साह आहे. पण मी दमले.

दोघी एका बेंचवर बसतात. आजी मोबाईल बाहेर काढते आणि तिचं FB चेक करायला लागते.

नीलाताई : सतत काय ग बघत असतेस?

आजी : अग FB चेक करत होते. काल आपला फोटो टाकला होता ना आपण आसनं करत होतो न त्याचा. त्याला किती likes आल्या आहेत ते बघत होते.

नीलाताई : काय बघत होतीस?

आजी मोबाईल निलाताईला दाखवते.

आजी : हे बघ. हे FB म्हणजे face book. इथे आपण आपले जुने मित्र मैत्रिणी शोधू शकतो. नातेवाईक भेटतात. प्रत्यक्ष भेटणं अवघड. पण इथे फोटोंवरून आपल्याला सगळं दिसतं त्यांचं काय चाललं आहे. त्याशिवाय आजकाल जगात काय चाललं आहे... नवीन काय आहे हे सगळं कळतं.

नीलाताईना एकदम आठवतं त्यांचा नातू देखील सतत FB वर काहीतरी बघत असतो.

नीलाताई : अगोबाई. हे म्हणजे आमचा अंगठ्याएवढा सुजय जे बघत असतो ते होय?

आजी हसते.

आजी : हो! तेच ते.

नीलाताई: अग... माझ्या फोनमध्ये पण दे न करून हे सगळं. मिनू मला तर अलीकडे इतका कंटाळा येतो न घरी. सगळ्या कामांना मशीन तरी आहे किंवा नोकर. काय करायचं कळत नाही.

आजी : अग एकदा FB वर आलीस की घरातले हाक मरतील तरी तुला कळणार नाही. खरं सांगू का? हे सगळं बरोबर की चूक माहीत नाही ग. पण आजच्या जगात हे सगळं माहीत असणं गरजेचं. बघ न.... माझी मृदुल इतकी बिझी झाली आहे की तिला घरी असताना देखील माझ्याशी बोलायला वेळ नसतो.

आजीचा आवाज एकदम मऊ... दुःखी होतो. नीलाताई तिच्या खांद्यावर हात ठेवतात.

नीलाताई : मिनू... तूच म्हणत होतीस न... की ती इतकी बिझी नसते; पण त्या शामच्या विचारांपासून दूर राहायला सतत कामात गाढुन घेतलं आहे तिने.

आजी : हो ग. काय करू ते सुचत नाहीय मला. मृदुलला किमान दहा वेळा तरी विचारलं. पण ती टाळतेच आहे त्याचा विषय. काय करू सुचत नाहीय.

नीलाताई : सांगू का? एकदा हटकून बघ. नाहीतर सरळ तूच फोन लाव त्या शामला.

आजी : नीला अग अलीकडच्या या मुलांच्या बाबतीत असं करून चालत नाही. माझ्या पर्सनल स्पेसमध्ये दखल देऊ नकोस असं मृदुल म्हणाली तर?

नीलाताई : कसली पर्सनल स्पेस ग मिनू? तू न एकदा तिला विचारून बघ. जर नीट उत्तर दिलं तर ठीक नाहीतर तू सरळ फोन करून बोल बघू! कदाचित तो शाम इथेच असेल. काय ते बेंगलोर बिंगलोरला गेलाच नसेल.

आजी थोडावेळ विचार करते. तिचा चेहेरा खुलतो ती निलाताईला डोळा मारते.

आजी : ही आयडिया बेस्ट आहे ग. बघते मी. बरं! तुझा मोबाईल काढ बघू बाहेर. तुला एकदा FB इन्स्टॉल करून; चालू करून देते.

नीलाताई फोन काढतात. आजी तो घेते आणि तिला समजावायला लगते.
***

14

मृदुला लॅपटॉप वर काम करत असते. आजी बाजूला बसून मोबाईलमध्ये काहीतरी करते आहे.

आजी : अग मृदुला तुला गम्मत माहीत आहे का... त्या पलीकडच्या विंग मधल्या नीलाताई आहेत न, त्यांना मी आज फेसबुक शिकवलं.

मृदुला कामातून डोकं वर करते.

मृदुला : अरे वा! म्हणजे इथे देखील सुरू केलेस वाटतं तू तुझे क्लासेस?

मृदुलाचा आवाज एकदम शांत आहे. त्यात कोणतीही एकसाईटमेंट नाही. आजीला ते जाणवतं. पण ती काहीच बोलत नाही.

आजी : हो अग. नवीन सोसायटीत आल्यामुळे मला बरं झालंय. रोज सगळ्या नवीन मैत्रिणींना गोळा करते. कधी walk ला जातो... कधी भेळ खातो. मस्त मजा करत असते मी. पण बेटा, तू फारच बिझी झाली आहेस. त्या शामचा देखील काहीच पत्ता नाही. पठ्ठ्याने फोन देखील केला नाहीय मला. फारच राबून घेतात अलीकडे.

मृदुला शामच्या उल्लेखाने दचकते. आजीच्या ते लक्षात येतं पण ती ते मृदुलाला कळू देत नाही. स्वतःच्याच नादात असल्यासारखं दाखवत आजी पुढे म्हणते...

आजी : काही फोन होता का ग त्याचा?

मृदुला : अं? नाही... म्हणजे हो! हो अग. फोन होता. अग तो खूप बिझी आहे. म्हणाला त्याला फोन करायला पण वेळ नाही. इथे आला की येईल भेटायला.

आजी : मृदुल तो नक्की बंगलोरला आहे का? की त्याच्या गर्ल friend ला डीच करतोय तो?

आजीच्या त्या वाक्याने मृदुला एकदम चमकते आणि आजीकडे बघते

मृदुला : काय? कोणाला डीच करतोय?

आजी : अग girl friend ला....

मृदुला : तुला माहीत आहे?

आजी तिच्या प्रश्नाने सावध होते.

आजी : काय?

मृदुला : त्याची girl friend?

आजी : हो!

मृदुला : कोण?

आजी : अग मी!!!! मीच नाही का त्याची girl friend. मला डीच करून दुसरी कोणीतरी तर नाही ना त्याने शोधली?

मृदुला आजीच्या त्या एक्सप्लॅनशन ने काहीशी hurt होते.

मृदुला : काहीही काय ग? मला नाही माहीत काही.

इतकं बोलून मृदुला तिथून उठून जाते. ती जाताना डोळे पुसते ते आजी बघते.

***

15

आजी एका रेस्टॉरंटमध्ये बसली आहे. रेस्टॉरंटचा दरवाजा उघडतो आणि शाम आत येतो. तो आजीला बघतो आणि हात वर करून तिला हाय करतो आणि तिच्या जवळ येऊन बसतो आणि आजीकडे बघून हसतो. पण त्याचे उदास डोळे आणि उतरलेला चेहेरा आजीच्या लक्षात येतो.

आजी : कसा आहेस?

शाम आजीकडे बघतो आणि त्याचे डोळे पाण्याने भरून येतात. आजी त्याच्या हातावर हात ठेवते आणि शाम बोलायला लागतो.

शाम संपूर्ण प्रसंग सांगतो. तो आणि मृदुल रेस्टरन्टच्या आत जातात. एका कोपर्यंतलं टेबल खूप छान सजवलेलं असतं. मृदुला त्याच्या सोबत तिथपर्यंत जाते. टेबलावर एका गोड टेडीच्या हातात एक बॉक्स असतं. शाम तो टेडी मृदुलाला देतो. ती तो घेते आणि बॉक्स उघडून बघते. त्यात अंगठी असते. ती अंगठी बघून मृदुला एकदम स्तब्ध होते. शाम गुडघ्यावर बसून तिच्याकडे हात पुढं करतो. मृदुला तरीही स्तब्धच असते.... अचानक तिचे डोळे भरून येतात. शामने पुढे केलेल्या हातात ती तो बॉक्स हातात धरलेला टेडी ठेवते आणि झटक्यात गर्रकन मागे फिरून निघून जाते.

शाम : का गेली ग ती मला अशी अचानक सोडून? दोघांना नोकरी नक्की लागणार याची खात्रीच होती मला; दोघांनी इंटरव्ह्यू क्रॅक केले. मिनू.... त्याच दिवशी मी तिला प्रपोज केलं आणि काहीही न बोलता ती निघून गेली. मला ब्लॉक केलं तिने सगळीकडे. मी घरी गेलो तर तुम्ही दोघी निघून गेला होतात. मला कळेना की मी तुला फोन करावा की नाही. रोज ऑफिसला जातो ग... पण मनातून मी मोडून गेलो आहे.

आजी : मला वाटलंच होतं काहीतरी बिनसलं आहे. शाम... काळजी करू नकोस. ती असं का वागते आहे ते मला माहीत आहे.

असं म्हणून आजी थोडावेळ विचार करते. तिच्या चेहेऱ्यावर एकदम एक मिश्किल हास्य येतं.

आजी : उद्या रविवार आहे. संध्याकाळी काय करतो आहेस?

शाम उदासपणे म्हणतो : काय करणार?

आजी पर्समधून एक कागद काढते आणि त्यावर एक पत्ता लिहिते आणि तो शामला देते.

आजी : या पत्यावर ये.

शाम पत्ता वाचतो : कोण राहातं इथे?

आजी हसते आणि म्हणते : तुझी girl friend.

शामचा चेहेरा बदलतो. दोघेही एकमेकांकडे बघून हसतात.

***

16

मृदुला काम करत बसली आहे. आजी खिडकीशी उभी राहून बाहेर बघते आहे. एकदम आजीचा चेहेरा खुलतो आणि मृदुलाच्या शेजारी येऊन बसते.

आजी : मृदुला, मला न तुला एक न्युज द्यायची आहे.

मृदुला आजीकडे बघते. इतक्यात बेल वाजते.

आजी : अरे आला वाटतं.

मृदुला : कोण?

आजी : बघ तूच.

मृदुलाच्या कपाळावर आठ्या येतात. ती उठून दार उघडते. दारात शाम असतो. मृदुला एकदम गोंधळून जाते. आजी आतूनच शामला हाक मारते.

आजी : येरे आत ये.

शाम मृदुलाच्या बाजूने पुढे होत आत येतो. मृदुला दार लावून आत येते.

आजी : मृदुला हा शाम. मी याच्याशी लग्न करते आहे.

मृदुला : काय?

आजी : अग, तू त्याच्याशी लग्न करायला तयार नाहीस न. मग मी तरी करते.

मृदुला पूर्ण गोंधळून एकदा आजीकडे बघते आणि मग शामकडे बघते. शाम पुढे होतो आणि मृदुलाच्या समोर बसतो. तिचा हात हातात घेतो.

शाम : मृदुल... आपल्याला दोघांना जॉब मिळाला त्याच दिवशी मी तुला प्रपोज केलं पण तू एकदम काही एक न बोलता निघून गेलीस. तुला थांबवायची इच्छा असूनही मी थांबवू शकलो नाही इतका मोठा धक्का होता तो माझ्यासाठी. कसंबसं स्वतःला सावरून मी तुमच्या घरी गेलो तर घराला मोठं कुलूप... शेजाऱ्यांना पण माहीत नव्हतं तुम्ही दोघी अशा अचानक कुठे गेलात. तू मला ब्लॉक करून टाकलं होतंस. तुला कुठे आणि कसं शोधू ते कळत नव्हतं मला.... पार मोडून गेलो होतो मी. आणि एक दिवस अचानक मला मिनूचा फोन आला.

असं म्हणून त्याने आजीकडे बघितलं. आजी त्या दोघांकडे प्रेमळपणे बघत होती.

आजी : मृदुला... बाळा.... तुम्ही मला नावाने हाक मारलीत म्हणून मी तुमच्या वयाची होत नाही ग. सगळं कळत होतं मला. अर्थात तुझ्या अशा वागण्याचं कारण देखील मलाच माहीत आहे. तुला वाटतं तुझे बाबा आणि आई तुझ्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती तुला घेऊन US ला गेले. पण बेटा; विजयला... तुझ्या बाबाला... तिथे चांगली नोकरी मिळाली होती. तिथे खूप चांगले प्रॉस्पेक्ट्स होते. पण तुला माझ्याच जवळ राहायचं होतं. त्याने मला देखील चालण्याचा खूप आग्रह केला होता. पण मला तिथलं ते शांत आयुष्य जमलं नसतं. म्हणून मी नकार दिला. तुला मात्र माझ्याच सोबत राहायचं होतं. म्हणून तिथलं शिक्षण संपल्यानंतर तू इथे आलीस... माझ्याकडे. MBA ला ऍडमिशन घेतलीस. तिथे तुला शाम भेटला आणि तू त्याच्या प्रेमात पडलीस. पण त्याने तुला लग्नाचं विचारलं आणि एकदम तुला जाणवलं की तुला परत मला सोडून जावं लागेल. म्हणून त्याला काहीही उत्तर न देता तू निघून आलीस. तुला सगळे संबध तोडायचे होते म्हणून एकदम घर देखील बदलायचं ठरवलंस. सुरवातीला मला ते लक्षात आलं नाही. वाटलं तुमच्यात काहीतरी लहान सहान वाद असेल. पण तुझं हे रोज झुरणं मला बघवत नव्हतं ग बेटा.

शाम : मृदुल... अग तुझ्या मनात असं काही होतं तर मला सांगायचं न.

मृदुलाचे डोळे भरून येतात.

शाम : अग मृदुला... तू इथे भाडं देऊन राहाते आहेस आणि मी पण आई बाबांसोबत भाडं देऊनच राहातो आहे. जर आपण दोघांनी आपले पैसे एकत्र केले तर मोठ्या घराचं भाडं देखील आपण affort करू शकतो न. मग तर आपल्या सोबत माझे आई-बाबा आणि तुझी मिनू देखील राहू शकते.

मृदुलाचे डोळे पाझरायला लागतात. शाम तिचे डोळे पुसतो.

मृदुला : ओह... शाम... हे इतकं सोपं होतं?

आजी : हो! इतकं सोपंच होतं. म्हणूनच मी शामला इथे बोलावून घेतलं होतं. बरं, आता मी निघते. नीलाताईंकडे जायचं आहे मला. येताना रसगुल्ले घेऊन येते ह.

असं म्हणून आजी घराबाहेर पडते आणि मृदुला हसत शामला मिठी मारते.

समाप्त

No comments:

Post a Comment