Friday, July 1, 2022

मेतकूट भात (गूढ कथा)


मेतकूट भात

"काय ग? नुकतीच आलीस वाटतं इथे राहायला?"

भर दुपारची वेळ. नवीन जागा आणि मागून अचानक आलेल्या प्रश्नाने प्रज्ञा एकदम दचकली आणि तिने वळून बघितलं. तसं प्रज्ञाने तिच्या फ्लॅटचं दार उघडायच्या अगोदरच शेजारच्या घराच्या ग्रीलच्या दाराचं पूर्ण निरीक्षण केलं होतं. अगदी जुन्या टिपिकल लहान सळयांच्या ग्रील्स अर्ध्या दारात आणि उरलेलं दार लाकडाचं. मुख्य दरवाजा उघडाच. आता दार बघताना आतमध्ये लक्ष जाणं देखील स्वाभाविक असल्याने प्रज्ञाने आत देखील झरकन नजर फिरवली होती. समोरच्याच सोफ्यावर एक म्हाताऱ्या आजी बसल्या होत्या. हातात काहीतरी विणायला घेतलेलं होतं. शेजारी अनेक मासिकं पडलेली दिसत होती आणि आजीना मात्र डुलकी लागली होती. त्या आजी झोपलेल्या बघितल्या असल्यानेच तर मागून प्रश्न विचारल्याचा आवाज आला तेव्हा प्रज्ञा दचकली होती. तिने वळून बघितलं तर नुकत्याच डुलकी घेणाऱ्या आजी त्यांच्या ग्रीलच्या दारातून प्रज्ञाकडे बघत प्रश्न विचारत होत्या.

"तुमकु मराठी आता है क्या? मी मराठी हूं. तुम आत्ताच आयी का इधर राहायला?" प्रज्ञा उत्तर देत नाही हे बघून आजींना बहुतेक वाटलं की ती हिंदी आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या मराठी मिश्रित हिंदीमध्ये प्रज्ञाला परत प्रश्न केला होता. आता मात्र प्रज्ञाला हसायला आलं. "आजी, मी मराठीच आहे." तिने हसत उत्तर दिलं.

"अग्गोबाई! मग उत्तर का देत नव्हतीस ग पोरी? बरं! मला मालती ताई म्हणतात हं. तू पण तेच म्हणत जा." आजींनी मोठे डोळे करत तिला विचारलं. त्यांच्या जाड भिंगाच्या चष्म्याच्या मागचे त्यांचे डोळे मुळात मोठे वाटत होते. त्यात त्यांनी ते अजून मोठे केल्यावर प्रज्ञाला एकदम अस्वस्थ वाटलं. पण त्याकडे दुर्लक्ष करत ती म्हणाली; "बरं. मालती ताई! आत्ता तर तुम्ही झोपला होतात. त्यामुळे मला अगदीच अनपेक्षित होता तुमचा आवाज."

"अरेच्या असं झालं होय?" हसत मालती ताई म्हणाल्या.

त्यांच्या सोबत हसत प्रज्ञा म्हणाली; "हो! असंच झालं."

आपल्याच टोन मध्ये ही मुलगी उत्तर देते आहे हे ऐकून मालती ताईंना अजूनच हसू आलं आणि दोघीही एकमेकींकडे बघत हसायला लागल्या.

"गोड आहेस ग पोरी." हसणं आवरत मालती ताई म्हणाल्या. "आत्ताच येते आहेस वाटतं?" त्यांनी परत विचारलं.

"हो. हे काय दार उघडते आहे." प्रज्ञा म्हणाली.

"अग मग एकच बॅग?" तिच्या पायाशी असलेल्या बॅगकडे बघत मालती ताईंनी पुढचा प्रश्न केला.

"हो! म्हणजे नाही. मी अगदी आवश्यक वस्तू आणि कपडे घेऊन आले आहे. माझी आई कुरियरने बाकीचं सामान पाठवतेच आहे. उद्यापासून ऑफीस सुरू होतं आहे न. अगदी शॉर्ट नोटीस दिली त्यांनी. या करोनामुळे work from home चालू होतं इतके दिवस. म्हणजे मी जॉईन केलं आणि करोना आला. सुरवातीला तर वाटलं गेला हा जॉब हातातून. पण मला अपॉइंटमेंट लेटर मिळालेलं होतं. त्यामुळे त्यांना मला काढता आलं नाही. इतके दिवस मजा होती. घरूनच काम करत होते. पण अचानक परवाच्या ग्रुप मीटिंगमध्ये माझ्या सिनियरने आमच्या ग्रुपला सांगितलं अगदी एका दिवसात जॉईन करा. मग सगळीच गडबड झाली." प्रज्ञा सगळा वैताग त्या समोरच्या अनोळखी मालती ताई नावाच्या वृद्ध बाईला सांगून मनातून बाहेर काढत होती.

मालती ताई देखील बहुतेक आपल्याच तंद्रीत होत्या. "हो ग बाई. या करोनाने सगळीच गडबड करून टाकली हे खरंय." त्या म्हणाल्या.

"तरी बरं मालती ताई... हा फ्लॅट मिळाला लगेच. आईच्या मैत्रिणीच्या ओळखीतून मिळाला. सध्या कोणीच राहात नाही म्हणून कळलं. येताना चेंबूरला उतरून त्यांच्या नातेवाईकांकडून किल्ली घेतली मी." बडबडी प्रज्ञा बोलणं थांबवायला तयार नव्हती. मालती ताईंच्या ते लक्षात आलं.

"एकटीच आहेस का पोरी? बरं बरं. तुझं सामान आत टाक आणि ये. मी मस्त गरम गरम चहा करते." मालती ताई हसत म्हणाल्या आणि प्रज्ञाला काही बोलायला वेळ न देता त्यांच्या घरात वळल्या. असं आल्या आल्या त्या मालती ताईंनी त्यांच्या घरी बोलावल्यामुळे प्रज्ञा थोडी संकोचली. पण मग तिने विचार केला 'तसंही आपल्याला सगळंच सामान आणावं लागणार आहे. घरात काय आहे... सोई काय आहेत ते बघून सामान आणायचं आणि मग चहा करायचा म्हणजे कितीतरी वेळ जाईल. त्यापेक्षा आत्ता या मालती ताई देतायत तो चहा घेऊया.' एकदा मनात ठरवल्यावर प्रज्ञाने जेमतेम फ्लॅटमध्ये तिची बॅग ढकलली आणि तशीच मागल्या पावलाने मालती ताईंच्या घराच्या दारात येऊन उभी राहिली.

"मालती ताई...." प्रज्ञाने मोठ्याने हाक मारली.

"हळू ग. वरच्या मजल्यावर राहातात त्यांना शांतता लागते. जरा मोठ्याने बोललं तर लगेच वरतून ओरडतात... हळू बोला... त्रास होतोय." ग्रीलचा दरवाजा उघडत मालती ताई म्हणाल्या. "ओह! बरं बरं." असं म्हणत प्रज्ञा फ्लॅटच्या आत गेली.

"घे. गरम गरम चहा." आत येऊन सोफ्यावर बसणाऱ्या प्रज्ञाला त्यांनी चहाचा कप दिला. चहा हातात घेत प्रज्ञा सोफ्यावर बसली. "तुम्ही नाही घेत चहा?" तिने विचारलं.

"घेईन थोड्यावेळाने. माझं सगळं अगदी ठरलेल्या वेळेला असतं ग." मालती ताईंनी म्हंटलं.

चहा घेताना प्रज्ञाने घराचं निरीक्षण केलं. अगदीच साधं होतं घर. हॉलमध्ये एक सोफा. त्याच्या समोर एक टेबल. सोफ्यावर बरीचशी मराठी मासिकं. एका बाजूला विणण्याचं सामान. मालती ताई काहीतरी मोठं विणत असाव्यात हे प्रज्ञाच्या लक्षात आलं. डावीकडे स्वयंपाकघर आणि त्याच्याच शेजारी बेडरूम दिसत होती. घरात बहुतेक अजून कोणी नव्हतं. प्रज्ञाला राहावलं नाही. चहा होताच कप समोर ठेवत तिने आजींना विचारलं; "तुम्ही एकट्याच रहाता का मालती ताई?" तिच्या त्या प्रश्नाने मालती ताई एकदम अस्वस्थ झाल्या सारख्या प्रज्ञाला वाटल्या. "काय झालं तुम्हाला?" तिने उठून त्यांच्या जवळ जात म्हंटलं.

"काही झालं नाही ग. हो! एकटीच आहे मी. म्हणजे माझा मुलगा आणि सून परदेशात कायमचे गेले. मी इथेच राहिले.... एकटी. इतकी एकटी की बोलावसं वाटलं की मी स्वतःशीच बोलते." मालती ताई म्हणाल्या. त्यांचं बोलणं ऐकून प्रज्ञाला वाईट वाटलं.

"आता मी आले आहे न. आपण खूप गप्पा मारू." ती हसत हसत मालती ताईंना म्हणाली. त्यावर मालती ताईंनी देखील हसत मान डोलावली. "बरं आता निघते. थोडं घर लावते आणि आवश्यक सामान आणते. मालती ताई, तुम्ही घरात लागतं ते सामान कुठून आणता? ऑर्डर दिली तर घरी आणून देत असतील ना इथले दुकानदार?" चपला पायात सरकवताना प्रज्ञाने मालती ताईंना विचारलं.

मालती ताई स्थिर नजरेने कुठेतरी दुसरीकडेच बघत होत्या. मग अगदी हळु आवाजात म्हणाल्या; "देत असतील. मला नाही माहीत." मालती ताईंचं ते उत्तर प्रज्ञाला विचित्र वाटलं. तिने वळून त्यांच्याकडे बघितलं. त्यांची हरवलेली नजर तिला लक्षात आली. मुलाच्या आठवणीत मालती ताई हरवल्या की काय असं वाटून ती त्यांच्या जवळ गेली आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली; "काय झालं मालती ताई? मी दुखावलं का तुम्हाला एकट्या रहाता का विचारून?" तिच्या त्या स्पर्शाने मालती ताईंच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या हातावर थोपटत त्या म्हणाल्या; "छे छे अग. असं काही नाही. तशी मी विडिओ कॉल करते की त्यांना अधून मधून. ते लोक सुद्धा करतात हो. हा बघ समोरच आहे माझा लॅपटॉप." असं म्हणून मालती ताई हसल्या. उगाच अजून काही बोलून त्यांना दुखवायला नको म्हणून मग प्रज्ञा तिथून निघाली.

संध्याकाळी प्रज्ञा बाहेरच काहीतरी खाऊन आणि बरंचसं सामान घेऊन परत आली. आत्ता देखील मालती ताईंच्या घराचा मुख्य दरवाजा उघडा होता आणि मालती ताई सोफ्यावर विणत बसल्या होत्या. प्रज्ञाला बघून त्या दाराशी आल्या.

"अरे बरंच सामान घेऊन आलीस की." प्रज्ञाच्या हातातल्या पिशव्या बघून मालती ताई हसत म्हणाल्या.

"हो! उद्यापासून ऑफिस सुरू होतं आहे नं. सकाळी गडबड नको म्हणून सामान घेऊन आले." प्रज्ञाने हसून उत्तर दिलं.

"बरं बरं. चहा हवा आहे का? आणि मी माझ्यासाठी उप्पीट केलं आहे. तुला देऊ का थोडं?" मालती ताईंनी प्रेमाने विचारलं.

"नको मालती ताई. मी खाऊनच आले आहे. आता झोपेनच. उद्या लवकर उठायचं आहे. पहिलाच दिवस आहे ऑफिसचा. सगळं स्वतःच आवरून वेळेत पोहोचायचं म्हणजे दिव्य वाटतं आहे मला." पर्स मधल्या घराच्या किल्ल्या काढत प्रज्ञा म्हणाली. बहुतेक तिचा आवाज वाढला होता. कारण अचानक वरच्या मजल्याच्या मधल्या पॅसेजमध्ये येऊन कोणीतरी तिच्याकडे वाकून बघत होतं. 'बापरे.... मोठ्याने बोलते आहे की काय मी?' प्रज्ञाच्या मनात आलं. त्यांच्या दिशेने हात वर करत ती "सॉरी" म्हणाली. तिच्याकडे थोडं विचित्र नजरेने बघत ते गृहस्थ परत वर गेले.

"खूप मोठ्याने बोलत होते का मी मालती ताई?" तिने आवाज हळू करत हसत मालती ताईंना विचारलं.

"का ग?" ग्रील मधून तिच्याकडे बघत मालती ताईंनी तिला उलट प्रश्न केला.

"आत्ता तिथे वरच्या बाजूला कोणीतरी येऊन माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होतं. बहुतेक तुम्ही दुपारी म्हणालात तसा त्यांना माझ्या आवाजाचा त्रास झाला." प्रज्ञा हसत म्हणाली.

अचानक मुख्य दरवाजा बंद करत मालती ताई म्हणाल्या; "असेल असेल. बरं जा आवर आणि झोप." प्रज्ञा मागे वेळेपर्यंत त्यांनी दार लावून घेतलं होतं. इतक्यात वरून कोणीतरी खाली आलं. आपल्या मोठया आवाजावरून ते काहीतरी बोलतील असं वाटून त्यांच्याकडे लक्षच नाही असं दाखवत प्रज्ञाने तिच्या घराचं दार उघडलं आणि ती आत गेली. त्या गृहस्थांनी एकदा प्रज्ञाच्या दाराकडे आणि एकदा मालती ताईंच्या दाराकडे बघितलं आणि मग ते खाली निघून गेले.

***

सकाळी हातात एक केळं आणि खांद्यावर सॅक घेतलेली एकदम फॉर्मल कपडे घातलेली प्रज्ञा तिच्या घराचं दार लावून निघाली. आता तिने सवयीने मालती ताईंच्या घरात डोकावलं. त्या तशाच सोफ्यावर विणत बसल्या होत्या. "बाय मालती ताई. संध्याकाळी वेळेत आले तर भेटू." जिना उतरत प्रज्ञा म्हणाली. "नक्की भेटू ग." मागून मालती ताईंचा आवाज आला.

***

"बराच उशीर झाला आहे ग तुला." घराचं दार प्रज्ञा उघडत असताना तिला मागून मालती ताईंचा आवाज आला. आता ती दचकली नाही. कारण मालती ताईंना डुलकी लागली असली तरी आपला दार उघडण्याचा आवाज आला की त्या जाग्या होतात ते तिच्या लक्षात आलं होतं. हसत मागे वळत ती म्हणाली; "हो न. पहिलाच दिवस होता. पण इतकं काम होतं न मालती ताई." तिने मालती ताईंकडे बघितलं तर त्यांनी स्वेटर घातला होता. त्यांचा चेहेरा देखील उतरल्या सारखा होता. "अरे! बरं नाहीय का मालती ताई?" त्यांच्या ग्रीलच्या दाराजवळ जात प्रज्ञाने विचारलं.

"हो ग. थोडी कणकण वाटते आहे." त्यांनी आतून म्हंटलं.

"दार उघडा बघू मालती ताई. किती ताप आहे ते मला बघू दे." प्रज्ञाने आग्रह केला. मालती ताईंनी दार उघडलं. प्रज्ञाने आत शिरत त्यांच्या कपाळाला हात लावला. "अरे चांगलाच ताप आहे तुम्हाला. काही औषध घेतलंय का तुम्ही?" त्यांना सोफ्यावर बसवत तिने विचारलं. "हो अग. क्रोसीन घेतली आहे. उतरेल सकाळपर्यंत." अगदी थकलेल्या आवाजात मालती ताई म्हणाल्या.

"ते काही नाही. आडव्या व्हा बघू तुम्ही आत." त्यांचा हात धरत प्रज्ञा म्हणाली.

"इथेच पडते ग. आत नको वाटतंय." सोफ्याकडे जात मालती ताई म्हणाल्या.

"बरं इथे पडा." त्यांना सोफ्यावर बसवत प्रज्ञा म्हणाली. "मालती ताई, औषध घेतलं आहात पण काही खाल्लं आहे की नाही तुम्ही?" तिने त्यांच्या जवळ बसत म्हंटलं.

"भूक नाही ग." अगदीच मलूल झाल्या होत्या मालती ताई. "अरे कमाल करता. तुमच्याकडे कोणी कामाला येत नाही का? ते जाऊ दे. मी काहीतरी पटकन करून देते तुम्हाला. काय करू?" प्रज्ञा स्वयंपाक घराकडे वळत म्हणाली.

"खरंच करशील? मऊ भात आणि मेतकूट. तिथेच एका बाजूला तूप आहे. ते घाल आणि लोणच्याची बरणी दिसेल बघ. थोडं लोणचं. तू काहीतरी करते आहेस म्हणालीस आणि एकदम इच्छा झाली बघ पोरी." मालती ताई मनापासून म्हणाल्या. त्यांच्याकडे बघत हसत प्रज्ञा म्हणाली; "तुम्ही हे असं हक्काने सांगितलंत; बरं वाटलं मला. पटकन करून आणते मऊ भात. तोवर पडा तुम्ही." असं म्हणून प्रज्ञा स्वयंपाकघरात गेली.

प्रज्ञा एका ताटात मऊ भात मेतकूट आणि तूप कालवून आणि लोणचं घेऊन बाहेर आली. तिने समोर बघितलं तर मालती ताईंना गाढ झोप लागली होती. त्यांचा चेहेरा देखील अगदी शांत समाधानी दिसत होता. 'झोप लागली आहे तर डिस्टर्ब करायला नको;' असा विचार करून प्रज्ञाने एक स्टूल सोफ्याच्या जवळ ओढलं आणि त्यावर भाताची ताटली ठेऊन त्यावर झाकण ठेवलं. मालती ताईंना जाग आली की त्यांना समोरच मेतकूट भात दिसेल आणि त्या खातील असा विचार करून प्रज्ञा हलकेच घराबाहेर आली आणि आवाज न करता तिने दरवाजा ओढून घेतला.

***

सकाळी प्रज्ञाला नेहेमीप्रमाणे उशीरच झाला होता. बॅग सावरत तिने तिच्या घराचं दार ओढून घेतलं. तिची नजर मालती ताईंच्या दाराकडे गेली. पण अजूनही त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा बंदच होता. 'बरं नसल्याने त्या उठल्या नसतील;' प्रज्ञाच्या मनात आलं. उशीर होत असल्याने घड्याळाकडे बघत ती भराभर जिना उतरली.

आज प्रज्ञाला फार उशीर झाला नव्हता. जेमतेम आठ वाजले होते. मालती ताईंना हाक मारायची असं ठरवूनच ती आली होती. ती जिना चढुन वर आली. पण आत्ता देखील मालती ताईंच्या घराचं दार बंद होतं. तिला थोडी काळजी वाटली. तिने बेल वाजवली. पण ना आत बेल वाजल्याचा आवाज आला ना काही हालचाल जाणवली. थोडं थांबून तिने परत बेल वाजवली. पण काहीच रिस्पॉन्स नव्हता. इतक्यात एक दहा-बारा वर्षांचा मुलगा खालून जिना चढून वर आला. प्रज्ञाला मालती ताईंच्या दारासमोर उभं बघून तो तिच्याकडे विचित्र नजरेने बघायला लागला. प्रज्ञाने त्याच्याकडे बघितलं मात्र तो पटकन पुढचा जिना चढून निघून गेला. प्रज्ञाने परत एकदा बेल वाजवली. पण काहीच हालचाल नव्हती. आता मात्र तिला मालती ताईंची काळजी वाटायला लागली. तिने हाक मारली "मालती ताई.." पण दाराशी पावलं वाजली नाहीत. प्रज्ञाने आवाज चढवत अजून मोठ्याने हाक मारली "मालती ताई....." आतून काहीच उत्तर आलं नाही. पण वरच्या जिन्यावरून कोणीतरी खाली येत असल्याचा आवाज प्रज्ञाला आला.

आपण मोठ्याने हाक मारली म्हणून आले असावेत असं वाटून प्रज्ञा मागे वळली.

"कोण हवंय तुम्हाला?" आदल्या दिवशी मधल्या पॅसेजमध्ये येऊन तिच्याकडे विचित्र नजरेने बघणारे गृहस्थ खाली येत होते.

"अहो मालती ताई दार उघडत नाहीयेत. त्यांना काल रात्री बरं नव्हतं. ताप होता. सकाळी दार बंद बघितलं तर मला वाटलं आराम करत असतील. पण आत्ता देखील त्यांचं दार बंद आहे. मला वाटतं त्यांना जास्त त्रास होत असावा. काहीतरी केलं पाहिजे." प्रज्ञा काळजीने म्हणाली.

"तुम्ही मालती ताईंबद्दल बोलता आहात का?" त्या गृहस्थाने प्रज्ञाला प्रश्न केला.

त्याच्या प्रश्नाने प्रज्ञा वैतागली. "अहो अजून कोणाबद्दल बोलत असेन मी? मालती ताई राहतात ना इथे? मग त्यांच्या बद्दलच बोलेन न." तिने कपाळाला आठ्या घालत म्हंटलं.

"मालती ताई राहात नाहीत आता इथे...." ते गृहस्थ प्रज्ञाकडे विचित्र नजरेने बघत म्हणाले.

"अहो काय बोलता आहात तुम्ही? इथे राहात नाहीत तर कुठे राहातात मालती ताई?" प्रज्ञाला आता राग यायला लागला होता. मदत करायची सोडून ते गृहस्थ दुसरंच काहीतरी बोलत होते.

"अहो.... म्हणजे त्या इथे राहायच्या. पण दुसऱ्या करोनाच्या लाटेमध्ये त्या गेल्या. एक दिवस ताप आल्याचं निमित्त झालं आणि एका रात्रीत सगळं संपलं. मुलगा आणि सून येऊ देखील शकले नाहीत." ते गृहस्थ म्हणाले.

त्यांचं बोलणं ऐकून प्रज्ञाला धक्का बसला. "अहो काय बोलता आहात तुम्ही. काल रात्री मी त्यांच्याशी बोलले. मेतकूट भात करून दिला मी त्यांना. पण झोप लागली होती म्हणून जवळ ठेऊन आले बाहेर." प्रज्ञा म्हणाली.

"ओह.... काय सांगता? त्यांना गरम भात, मेतकूट, तूप असं साधंस जेवण आवडायचं. पण ते देखील नाही मिळालं त्यांना. या करोनामुळे कोणी जात नव्हतं न एकमेकांकडे. त्यांनी हाक मारली होती बहुतेक आम्हाला. पण कळलं नाही. मी सकाळी दूध आणायला खाली उतरलो तर त्यांचा मुख्य दरवाजा उघडा होता आणि त्या सोफ्यावर पडल्या होत्या. मी लांबूनच हाक मारली. त्यांनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही. उगाच आत जायची रिस्क मी नाही घेतली. हॉस्पिटलमध्ये कळवलं. ते आले आणि त्यांची बॉडी घेऊन गेले. त्याच लोकांनी दार ओढून घेतलं घराचं. त्यानंतर आत कोण गेलंय हो? संपलं न सगळं." ते गृहस्थ बोलत होते. पण प्रज्ञाला आता काही ऐकू येत नव्हतं. ती काहीशी भेदरलेल्या आणि गोंधळलेल्या नजरेने त्या गृहस्थाकडे बघत उभी होती.

समाप्त

1 comment:

  1. झकास जमली आहे...

    ReplyDelete