Friday, July 15, 2022

काळ

 काळ



जुनी अँबॅसिडर/फियाट गाडी हायवे वरून धावते आहे. गाडीमध्ये ड्राईव्हरच्या शेजारच्या सीटवर वासंती बसली आहे. तिचा चेहेरा खूप आनंदी आणि हसरा आहे. मागच्या सीटवर वासंतीची आई आणि ड्राईव्हरच्या मागे तिचे बाबा आहेत. बाबांना झोप लागली आहे आणि आई पुस्तक वाचते आहे. वासंती गाडीच्या बाहेरच्या बाजूच्या आरशात स्वतःला बघत गोड हसते आहे. ती आत गाडीमध्ये मान वळवते. एकदा मागे वळून आई-बाबांकडे बघते आणि मांडीमधली पर्स उघडून त्यातून एक फॉर्मल envelop काढते आणि उघडून आतलं पत्र वाचायला लागते. तिचा चेहेरा हसरा आहे. आणि voice over सुरू होतो...

बॉस : हे घे letter वासंती....

वासंती : काय आहे हे सर?

बॉस : तुझं ट्रान्सफर letter pramotion सकट.... congratulations वासंती. You are been appointed as the manager at our Nashik branch.

वासंती : पण सर....

बॉस : No किंतु परंतु.... अग तुझा performance आणि unic कामाची पद्धत बघूनच हा निर्णय घेतला गेला आहे. आम्हाला खात्री आहे की तू ती नवीन ब्रँच उत्तम प्रकारे establish करशील.

वासंती : yes sir. of course sir. I won't let u down. Trust me.

बॉस : once again... congratulations.

वासंती : Thank you very much sir.

वासंती हसते आहे.

***

एका साध्या बंगल्यासमोर थांबते. वासंतीचे आई आणि बाबा गाडीतून खाली उतरून बंगल्याकडे बघत आहेत. वासंती खाली उतरून ड्राईव्हरला पैसे देते. मागे वळताना तिला तिचा चेहेरा ड्राईव्हरच्या बाजूच्या आरशात दिसतो. एकदा स्वतःकडे बघून ती तिचे केस नीटनेटके करते आणि वळून बंगल्याकडे बघते. आता तिघेही बंगल्याकडे बघत असतात आणि आतून एक तरुण बाहेर येतो. वासंतीला बघून पुढे होत तिच्या हातातून बॅग घेतो आणि तिला शेकहॅन्ड करायला हात पुढे करत म्हणतो...

कलीग : नमस्ते मॅडम. मी राजेश. आपलं बोलणं झाल्याप्रमाणे मी संपूर्ण घर लावून घेतलं आहे.

वासंती त्याच्याकडे बघत हसते आणि त्याला शेकहॅन्ड करत म्हणते...

वासंती : हॅलो राजेश. thank you very much. you really helped me a lot. By the way these are my parents. माझे बाबा आणि ही माझी आई.

असं म्हणून आपल्या आई वडिलांची ओळख करून देते. राजेश आई आणि वडिलांना हात जोडून नमस्कार करतो आणि म्हणतो...

राजेश : नमस्कार काका-काकू. तुम्हाला काहीही मदत लागली तर मला सांगा. मॅडमकडे माझा नंबर आहेच. आत्तासुद्धा हॉटेलमधून चहा आणि नाश्ता मागवला आहे मी. म्हणजे अगदी लगेच स्वयंपाकाला लागायला नको. काकू इथे पुढेच वाण्याचं दुकान आहे. त्याला मी सांगून ठेवलं आहे. त्याच्याकडे सामानाची लिस्ट दिली की तो घरपोच सामान आणून देतो. फळं-भाजी इथे जवळ मिळते. पण अगदी छान ताजी हवी असेल तर मंडईत जाऊन आणू शकता. इथून रिक्षाचे फक्त पंधरा रुपये होतात. आणि तुम्ही सांगितलं तर हे रिक्षावाले थांबतात आणि परत पण आणतात.

राजेश अगदी अगत्याने सगळी माहिती देतो. आई त्याच्याकडे हसत बघत सगळं ऐकून घेते. बाबा देखील त्याला शेकहॅन्ड करतात आणि म्हणतात...

बाबा : अरे तू ये न आत. तूच मागवलेला चहा घे आणि मग निघ.

बाबांचं बोलणं ऐकून सगळेच हसतात. राजेश म्हणतो...

राजेश : आज नको काका. थोडी कामं आहेत. मॅडम पहिल्यांदाच ऑफिसमध्ये येणार. तिथली देखील तयारी करायची आहे मला.

त्याच्याकडे हसत बघत आई विचारते...

आई : राजेश तुझं लग्न झालंय का?

तिच्या त्या प्रश्नाने वासंती काहीसे रागीट आणि मोठे डोळे करून आईकडे बघते. राजेशचे वासंतीकडे लक्ष नाही. तो आईकडे हसत बघत म्हणतो...

राजेश : हो काकू. नुकतंच लग्न झालंय. इथलीच आहे माझी बायको.

आई काहीशी हिरमुसली आहे. पण ते जाणवून न देता ती अगदी सहज आवाजात म्हणते...

आई : वा. छान... घेऊन ये एकदा ओळख करायला. ती मला तुमचं शहर पण दाखवेल.

राजेश : हो हो नक्की.

मग वसंतीकडे वळून म्हणतो...

राजेश : मॅडम तुम्ही कधी येणार ऑफिसला? आज आराम करून उद्यापासून आलात तरी चालेल. इथून डावीकडून चालत जेमतेम दहा मिनिटं लागतील. पण सहसा कोणी याबाजूचा रस्ता वापरत नाहीत असं मला घर मालक म्हणत होते. त्याबाजूने फारशी रहदारी देखील नसते. उजवीकडून चालत अर्धा तास लागतो.

वासंती : Thank you for the information Rajesh. पण मी असल्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवत. बरं, मी थोड्याच वेळाने येते आहे ऑफिसला. इथे येताना आम्ही गाडीने आलो आहोत त्यामुळे त्यात काही दगदग नव्हती. आणि कसं यायचं ते मी बघून घेईन. address आहे माझ्याकडे.

राजेश आणि वासंतीचं बोलणं आई, बाबा ऐकत आहेत. त्यांचं बोलणं होतं आणि वासंती घराच्या आत जातात आणि राजेश गेटच्या बाहेर जातो आणि एकदा डावीकडे बघून; उजवीकडे वळतो आणि निघून जातो.

***

आई बाबा आणि वासंती हॉलमध्ये बसले आहेत. समोरच्या सेंटर टेबल वर काही कागदी पॅकेट्स आहेत आणि त्याच्या बाजूला एक थर्मास आहे. कप बशी, प्लेट्स असं देखील आहे. तिघांचं खाणं चालू आहे.

आई : नीट लावलं आहे ग घर राजेशने. लग्न झालं की एकूणच संसाराचं भान येतं प्रत्येकाला.

आईचं बोलणं ऐकून वासंतीचा चेहरा काहीसा रागावलेला होतो आणि ती म्हणते..

वासंती : काहीही आपलं तुझं. आणि आई त्याचं लग्न झालंय किंवा नाही याच्याशी आपल्याला काय देणं घेणं?

आई : अग तुझ्याच वयाचा आहे. लग्न झालंय मुलगा असून. आणि तू...

आईचं वाक्य अर्धवट तोडत वासंती म्हणते...

वासंती : आई, सध्या मला फक्त माझं काम दिसतं आहे. खूप विश्वासाने मला इथे पाठवलं आहे सरांनी. त्यामुळे सध्या इतर कोणताही विषय नको ग. बरं, मी काही दमलेले नाही. त्यामुळे जरा फ्रेश होऊन ऑफिसला जाऊन येते. आज ओळखी वगैरेचा फार्स झाला की उद्यापासून लगेच कामाला लागता येईल न मला. तुम्हाला माहीत आहे न माझ्या कामाच्या पद्धतीमुळेच तर मला इथे पाठवलं आहे. मग तसाच performance इथे पण नको का?

आई-बाबा तिच्या या बोलण्यावर काहीच म्हणत नाहीत. वासंती उठते आणि तिची बॅग घेऊन आत जाते.

***

वासंती वेगळा पंजाबी ड्रेस घालून बाथरूम मधून चेहेरा पुसत बाहेर येते आणि खोलीतल्या आरशासमोर उभी राहाते. एकदा स्वतःकडे बघते आणि आरशाच्या जवळ जात कपाळाला लावलेली टिकली नीट करते. स्वतःकडे बघून छानसं हसते आणि पलंगावरची पर्स उचलून खोली बाहेर पडते.

***

वासंती गेटच्या बाहेर उभी आहे. एकदा ती उजवीकडच्या रस्त्याकडे बघते आणि मग डावीकडच्या रस्त्याकडे बघते. स्वतःशीच हसते आणि डावीकडचा रस्ता घेऊन चालायला लागते.

वासंती डावीकडे वळते त्यावेळी तिच्या उजवीकडे पण थोडं लांब एक स्त्री उभी आहे. ती वासंतीला डावीकडे वळताना बघते. तिचे डोळे खूप मोठे होतात. ती वासंतीच्या दिशेने पाऊल उचलते आणि मग परत गप बसते. इतक्यात एक बारा-तेरा वर्षांचा मुलगा शाळेचे कपडे आणि पाठीवर बॅग असा उजवीकडून येतो. त्याला बघून ती बाई हात करते आणि तो जवळ येताच त्याला घेऊन तिच्या मागच्या गेटच्या आत जाते.

***

वासंती काहीशी रमत-गमत चालते आहे. मधलं एक घर सोडून पुढे जाते तर तिला एक काहीसा जुना बंगला दिसतो. बाहेर लहानशी बाग आहे आणि बागेमध्ये एक साधारण सहा-सात वर्षांचा मुलगा बॉलने टप्पी टप्पी खेळतो आहे. बाजूला एक झोपाळा आहे आणि त्यावर त्याची आजी बसली आहे. ती बहुतेक काहीतरी वाचते आहे... किंवा डुलक्या घेते आहे... वासंती ते दृश्य बघून मनात हसते बंगला काहीसा जुन्या पद्धतीने बांधलेला असल्याने वासंतीला तो आवडतो. पण फार उत्तम निगा राखलेली दिसत नसते. वासंती चालता-चालताच वाड्याकडे कौतुकाने बघत पुढे जाते.

***

दुसरा दिवस

सकाळची वेळ

वासंती तिच्या खोलीतल्या आरशात बघून ड्रेसला मॅचिंग असणारी टिकली नीट करते आणि खोलीबाहेर येऊन पायात चपला अडकवते. मुख्य दार उघडते आणि आईला हाक मारते...

वासंती : आई येते ग.

आईचा यातूनच 'बरं बरं' असा आवाज येतो आणि वासंती दारातून बाहेर पडते.

***

वासंतीगेट बाहेर उभी. एकदा ती उजवीकडच्या रस्त्याकडे बघते आणि मग डावीकडच्या रस्त्याकडे बघते. स्वतःशीच हसते आणि डावीकडचा रस्ता घेऊन चालायला लागते.

वासंती डावीकडे वळते त्यावेळी तिच्या डावीकडे पण थोडं लांब तीच आदल्या दिवशीची स्त्री उभी आहे. ती वासंतीला डावीकडे वळताना बघते आणि परत तिचे डोळे परत खूप मोठे होतात. तिच्या सोबत तिचा मुलगा शाळेत जाण्याच्या तयारीत दिसतो आहे. तो देखील वासंती जाते त्याबाजूला बघून आईकडे बघून काहीतरी बोलतो आहे आणि आई त्याला काहीतरी कडक शब्दात समज दिल्यासारखं बोलते आहे. 'बर' अशी मान हलवून एकदा परत वासंती गेली त्या दिशेने बघून तो मुलगा विरुद्ध दिशेने चालायला लागतो आणि त्याची आई गेटच्या आत जाते.

वासंती आज पहिला दिवस असल्याने झपाझप चालत निघाली आहे. परत एकदा त्याच जुन्या बांधकामाच्या बंगल्यावरून चालताना तिचं लक्ष आत जात. परत एकदा तो लहानगा बॉलने टप्पी टप्पी खेळतो आहे आणि आजी झोपाळ्यावर बसली आहे हेच दृश्य तिला दिसतं. ती ते बघून हसते आणि पुढे जाते.

***

संध्याकाळची वेळ.

काहीसा अंधार पडला आहे. रस्त्यावर खूपच कमी उजेड आहे कारण रस्त्यावर विजेचे खांब खूप अंतरावर आहेत आणि त्यावर मिणमिणता दिवा आहे. चालताना वासंतीचं लक्ष या खांबांवर देखील जातं. आणि कमी उजेड तिने notice केला आहे हे तिच्या चेहेऱ्यावरून कळतं.

वासंती घराच्या दिशेने येते आहे. तिचं लक्ष परत एकदा त्या वाड्याकडे जातं. आत्ता सुद्धा जेमतेम उजेडात तो मुलगा बॉलने टप्पी टप्पी खेळतो आहे आणि आजी बसली आहे. तेच ते दृश्य बघून वासंतीला आश्चर्य वाटलं आहे. ती एकदा मनगटातल्या घड्याळाकडे बघते आणि तशीच चालत तिच्या घराकडे येते; गेट उघडते आणि आत जाते.

लांब तीच ती स्त्री भाजीची पिशवी घेऊन उभी आहे. ती वासंतीला जुन्या बंगल्याच्या दिशेने येताना बघते. वासंती तिच्या घराच्या गेटच्या आत जाताच ती स्त्री देखील तिच्या घराच्या गेटच्या आत जाते.

***

सकाळची वेळ

वासंती चपला घालते आहे. इतक्यात आई आतून येते आणि तिच्याकडे बघते. वासंतीच्या कपाळावर टिकली नाही आहे. ते बघून आई तिला म्हणते..

आई : अग टिकली विसरलीस की काय?

वासंती कपाळाला हात लावून बघते. टिकली नाही हे तिच्या लक्षात येतं आणि ती हसते आणि म्हणते..

वासंती : अय्या राहिली वाटतं.

असं म्हणून वासंती पर्स उघडून त्यातून कॉम्पॅक्ट पावडरची डबी आणि टिकलीचं पाकीट काढते. टिकली काढून आरशात बघत ती लावते आणि पावडरची डबी आत ठेऊन आईला 'अच्छा' म्हणून बाहेर पडते.

***

वासंती गेट बाहेर उभी. डावीकडचा रस्ता घेऊन चालायला लागते. वासंती डावीकडे वळते त्यावेळी तिच्या उजवीकडे पण थोडं लांब तीच नेहेमीची स्त्री उभी आहे. ती वासंतीला डावीकडे वळताना बघते. परत एकदा तिचे डोळे परत खूप मोठे होतात. तिच्या सोबत तिचा मुलगा शाळेत जाण्याच्या तयारीत दिसतो आहे.

***

वासंतीचं लक्ष त्याच जुन्या बांधकामाच्या बंगल्यावरून चालताना आत जातं. परत एकदा तो लहानगा बॉलने टप्पी टप्पी खेळतो आहे आणि आजी झोपाळ्यावर बसली आहे हेच दृश्य तिला दिसतं. आता तिला त्या दृश्याची सवय झाली असल्यासारखी ती ते बघून हसते आणि पुढे जाते.

***

सकाळीची वेळ

वासंतीची ऑफिसला जाण्याची वेळ आणि समोरचा मुलगा शाळेत जाण्याची वेळ एक आहे हे आतापर्यंत establish झालं आहे. वासंती आता सहज सवयीने डावीकडे वळून चालायला लागते. तो मुलगा शाळेत जायला निघतो. तो पुढे गेल्या नंतर ती स्त्री वासंतीच्या घराच्या दिशेने येते. क्षणभर गेटजवळ घुटमळते आणि मग गेट उघडून आत जाते. मुख्य दरवाजाची बेल वाजवते.

वासंतीची आई दार उघडते. अनोळखी स्त्री असल्याने तिच्या चेहेऱ्यावर अनोळखी आणि गोधळलेले भाव आहेत. ती स्त्री हात जोडून नमस्कार करते आणि म्हणते..

स्त्री : नमस्कार काकू... मी मिसेस काळे. तुमच्या समोरच्या त्या बिल्डिंगमध्ये राहाते.

वासंतीची आई हसत नमस्कार करते आणि मिसेस काळेला घरात घेते.

****

संध्याकाळची वेळ

वासंती घराच्या दिशेने येते आहे. कालच्या प्रमाणे आजही रस्त्यावर खूपच कमी उजेड आहे कारण रस्त्यावर विजेचे खांब खूप अंतरावर आहेत आणि त्यावर मिणमिणता दिवा आहे. कमी उजेड वासंतीने notice केला आहे हे तिच्या चेहेऱ्यावरून कळतं. वासंती पुढे येते आणि तिचं लक्ष परत एकदा त्या वाड्याकडे जातं. आत्ता सुद्धा जेमतेम उजेडात तो मुलगा बॉलने तोच तो टप्पी टप्पी खेळ खेळतो आहे आणि आजी बसली आहे. तेच ते दृश्य बघून वासंतीच्या कपाळावर हलकीशी आठी येते. ती घड्याळाकडे बघते आणि 'कमाल आहे' असा चेहेरा करून तशीच चालत तिच्या घराकडे येते; गेट उघडते आणि आत जाते.

***

रात्रीची जेवायची वेळ आहे. वासंती घरगुती टी शर्ट आणि ट्रॅक पँट घालून आतल्या खोलीतून बाहेर येते. बाबा सोफ्यावर बसून टी व्ही बघत आहेत. त्यांच्याकडे एकदा बघून डायनींग टेबलाच्या दिशेने येते. आईने जेवणाची पूर्ण तयारी केली आहे. तीन ताटं, वाटी पाण्याचं भांड तयार आहेत. समोर गरम जेवण आहे. भात, डाळ, पोळी, भाजी अशी मोठी भांडी दिसत आहेत. पाण्याची बाटली आहे. ती तयारी बघून वासंती आईकडे बघून हसते आणि म्हणते..

वासंती : तू सगळंच करून ठेवतेस ग. इथे आल्यापासून माझी तुला काहीच मदत नाही आहे घरकामात. पण काय करू ग. ऑफिसमध्ये इतकं काम आहे की नेहेमीच्या वेळेपेक्षा देखील जास्त वेळ थांबावं लागतं आहे. पण आता थोडं वेळेत निघू शकेन आणि अगदी संध्याकाळी दिवे लागणीलाच येईन घरी.

वासंती बोलत असताना तिची आई हसत असते. पण तिच्या शेवटच्या वाक्यासरशी ती काहीशी दचकते आणि पटकन नवऱ्याच्या दिशेने बघते. वासंतीचे वडील देखील बायकोकडे बघतात. वासंतीची वडिलांकडे पाठ आहे. त्यामुळे वडिलांचा चेहेरा तिला दिसत नाही आहे. याचा फायदा घेऊन वडील ओठांवर बोट ठेऊन 'काही बोलू नकोस' अशी खूण बायकोला करतात. बायकोला ते फारसं पटलेलं दिसत नाही. पण ती काही म्हणत नाही.

वासंती आपल्याच नादात आहे. त्यामुळे ती पुढे बोलते..

वासंती : खूप भूक लागली आहे ग आई. चला जेवायलाच बसूया न? बाबा या बघू.

बाबा टी व्ही बंद करतात आणि एका ताटावर येऊन बसतात. आई देखील तिसऱ्या ताटावर बसते आणि सगळे स्वतःला वाढून घेऊन जेवायला सुरवात करतात.

वासंती पहिला घास तोंडात घालते आणि गप्पांना सुरवात करत म्हणते..

वासंती : काय आई, काही ओळखी पाळखी झाल्या की नाही तुझ्या आजूबाजूला. तसं हे लहान शहर आहे त्यामुळे लोक पण मोकळ्या स्वभावाची आणि ample free time असलेली असणार. किती मैत्रिणी गोळा केल्यास.

असं म्हणून हसते. आई काही बोलायच्या अगोदर परत पुढे बोलते..

वासंती : अग, तो आपल्या घराच्या डाव्याबाजूला पलीकडचा तो जुन्या बांधकामाचा बंगला आहे न.... कोण राहातं तिथे काही कळलं का ग? मी रोज जाते त्या वाड्यावरून... एक लहानगा मुलगा खेळत असतो बॉलने एकटाच आणि आजी झोपाळ्यावर डुलक्या घेत असते. बाकी कोणी दिसत नाही.

आता मात्र आईला राहावंत नाही. ती एकदा बाबांकडे बघते आणि त्यांनी 'बोलू नकोस' अशी खूण करूनही बोलायला लागते..

आई : वासंती तू त्या वाड्यावरून जाणं-येणं बंद करून टाक बघू...

आईचा आवाज जरा शार्प आहे आणि आवाजात थोडी नाराजी देखील आहे. वासंती तोंडात घास घालताना आश्चर्याने आईकडे बघते. आईचा चेहेरा काहीसा not so happy असा दिसतो आहे. ते पाहून वासंती वडिलांकडे बघून भुवया उडवते. वसंतीकडे बघत असलेले वडील थोडंसं हसतात आणि म्हणतात..

वडील : अग पलीकडच्या बिल्डिंग मधल्या काळे वहिनी आजच आल्या होत्या. अगदी सहज ओळख करून घ्यायला ग. तर गप्पांच्या ओघात त्या म्हणाल्या की तो वाडा काही चांगला नाही. तुमच्या मुलीला सांगा त्या बाजूचा रस्ता नको वापरू. आम्ही देखील नाही वापरत; असं म्हणत होत्या. खरं तर त्यांच्या मुलाची शाळा डावीकडून गेलं तर पलीकडच्याच गल्लीत आहे. पण तरीही त्या त्याला उजव्या बाजूने जायला लावतात. त्या म्हणाल्या थोडा long cut पडतो रोजच. पण तरीही...

वासंती वडिलांचं वाक्य अर्धवट तोडते आणि म्हणते..

वासंती : oh come on baabaa. Do u believe all this? हे लहान शहरातले लोक न काहीही बोलत असतात. just ignor it. अहो, आपण आता विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर आहोत. तरीही हे भुतं-खेतं आणि झपाटलेलं वगैरेवर आपण विश्वास ठेऊन कसं चालेल? मला मान्य आहे ते घर जुनं आहे आणि फार चांगलं mentain केलेलं नाही. पण म्हणून लगेच घर चांगलं नाही... लोक चांगले नाहीत असं आपण judge करून कसं चालेल?

आई मध्येच वासंतीचं बोलणं थांबवत म्हणते...

आई : वासंती पण मी काय म्हणते... तुला उजवीकडून जायला काय अडचण आहे? जर कोणी नको म्हणतं तर ऐकावं न. काळे वाहिनींचं कुटुंब गेली 20 वर्ष... अगदी साठीच्या दशकापासून इथे राहातं. त्या दहा वर्षांपूर्वी लग्न होऊन इथेच आल्या. आता मुलगा आठवीत आहे. त्या म्हणाल्या गेल्या दहा वर्षात इथे राहणारे कोणीही त्या बाजूने गेलेले त्यांनी देखील बघितले नाहीत. तुमच्या मुलीला सुद्धा सांगा; असं म्हणत होत्या. मी अजून काही विचारायला गेले तर म्हणाल्या आम्ही त्याबद्दल बोलत देखील नाही.... अग...

आई अजूनही काहीतरी बोलणार असते. पण वासंती तिला हातानेच थांबवते आणि म्हणते...

वासंती : आई please हे असलं काही मला सांगू नकोस. तुला माहीत आहे माझा यावर विश्वास नाही.

आई परत बोलायचा प्रयत्न करते

आई : अग... पण...

वासंती परत आईचं बोलणं तोडत म्हणते..

वासंती : जाऊ दे न आई. आपण तो विषयच सोडून देऊ. ऐक न! तू एकदम खुश होशील असं काहीतरी सांगू?

वासंती विषय बदलत म्हणते. आईच्या कपाळावर आठ्या येतात. ती भुवया वर करत 'काय' अशी म आन हलवते.

वासंती : आई-बाबा माझं सुरुवातीचं ब्रँच मार्गी लावायचं काम झालं आहे. म्हणून तर आईला म्हंटलं उद्यापासून लवकर येऊ शकेन.... आणि आई.... आता हवं तर तू माझ्यासाठी नवरा शोधू शकतेस.

आई : अग... काय सांगतेस काय वासंती?

वासंती हसत म्हणते...

वासंती : हो ग आई. खरंच! बरं... मी झोपायला जाऊ का? खूप दमले आहे. त्यात उद्या अगदी वेळेत जायचं आहे. पण उद्यापासूनच तिन्हीसांजेपर्यंत यायला सुरवात करीन हं. म्हणजे तुमच्या सोबत वेळ मिळेल मला.

वासंतीचे आई बाबा वसंतीकडे बघत खुशीत हसत म्हणतात...

बाबा : जा बाळा झोपायला तू. दमलेली दिसतेच आहेस.

यावर वासंती बाबांकडे हसत बघते आणि टेबलवरून उठते 'good night' म्हणते आणि आत जाते. ती तिच्या खोलीतल्या बाथरूममध्ये जाऊन रात्रीचा ब्रश करायला लागते. त्यावेळी ती नकळत स्वतःच्या चेहेऱ्याचं निरीक्षण करते आहे आरशात.

***

सकाळची वेळ.

वासंती तयार होऊन खोलीतून बाहेर येते आणि चपला घालत असते. इतक्यात आई बाहेरच्या दारातून आत येते. आईच्या हातात गजरा आहे. ती त्याची शेवटची गाठ बांधते आहे. दाताने दोरा तोडते आणि वसंतीकडे बघून म्हणते...

आई : ए आपल्या बागेतल्या मोगऱ्याचा गजरा आहे. मुद्दाम तुझ्यासाठी तयार केलाय.

असं म्हणून वासंतीला पाठ करायला सांगते आणि तिच्या वेणीवर तो गजरा माळते. समोरच आरसा आहे. वासंती त्यात बघत असते. आई गजरा माळून थोडं डावीकडे सरकत वासंती प्रमाणेच आरशात बघते आणि तिच्या हनुवटीला हात लावून म्हणते...

आई : गोड दिसते आहेस ग बेटा.

वासंती हसते. आई बाजूला होते आणि वासंती चपला घालून बाहेर पडते.

***

संध्याकाळची अगदी तिन्हीसांजाची वेळ. पूर्ण सूर्यास्त झालेला नाही.

वासंती निवांत चालत घराकडे येते आहे. ती त्या बंगल्याच्या बाजूने चालताना तिची चाल मंदावते. त्या बंगल्याच्या बाहेरच असणाऱ्या रस्त्यावरच्या दिव्याकडे ती एकदा मान वर करून बघते आणि 'नाही नाही' अशी मान हलवते. ती आता सवयीने आत नजर वळवते तर तोच तो मुलगा आत गेटपासून थोडा आतल्या बाजूला उभा आहे. त्याच्या डोळ्यात पाणी तरळतं आहे. त्याच्या डोळ्यातलं पाणी वासंतीला दिसतं आणि त्याच्या दिशेने गेटकडे जाते. वासंती गेटकडे जाताना तिच्या पावलांवर कॅमेरा आहे. त्यामुळे जुना फारशी उखडलेला फुटपाथ दिसतो आहे. एका फरशीला अडखळून वासंती धडपडते आहे. (फुटपथची वाईट स्थिती लक्षात येईल अशाप्रकारे highlight झाली पाहिजे) त्यावर ती काहीशी वैतागली देखील आहे. पण त्या मुलाच्या डोळ्यातलं पाणी बघून ती स्वतःच्या धडपडण्याकडे दुर्लक्ष करते आणि ती अगदी मऊ आवाजात त्याला विचारते

वासंती : काय झालं बाळा? तू का रडतो आहेस?

वसंतीकडे डबडबलेल्या डोळ्यांनी बघत तो म्हणतो..

मुलगा : ताई तू एकटीच रोज जातेस न आमच्या घरावरून. मी तुला रोज बघतो.

त्याच बोलणं ऐकून वासंती हसते आणि म्हणते...

वासंती : हो... अरे माझं ऑफिस आहे न इथून पुढे गेलं की म्हणून मी रोज जाते. पण तू का रडतो आहेस. काय झालं?

मुलगा : ताई.. माझ्या घरातले सगळेच हरवले आहेत.

त्याच बोलणं ऐकून क्षणभर वासंती गोधळते पण मग काहीसं हसत म्हणते..

वासंती : अरे असे कसे हरवतील सगळे. असतील घरातच. तू नीट बघितलंस का?

तो मुलगा आता अजून रडवेला झालेला आहे. तो म्हणतो..

मुलगा : हो ग ताई.. मला पण वाटतं ते घरातच असतील पण कोणीच नाहीय न. आई , बाबा, दादा... सगळ्यांना कधीपासून शोधतो आहे मी. पण मिळतच नाहीत न मला.

त्याच बोलणं ऐकून एकीकडे वासंतीला हसू येतं आणि एकीकडे त्याची कीव पण येते. ती त्याला म्हणते..

वासंती : अरे तुझी गंमत करत असतील सगळे. लपाछपी खेळत असतील तुझ्या सोबत. तू घरात जाऊन बघितलंस का?

तिच्याकडे क्षणभर टक लावून बघितल्यासारखं करत तो म्हणतो..

मुलगा : मला न घरात एकट्याने जायची भिती वाटते आहे.

त्याच्या डोळ्यातले अश्रू आता ओघळायला लागले आहेत. वासंतीला ते बघून वाईट वाटतं. ती गेट उघडून आत जाते आणि त्याच्या समोर वाकते... आणि त्याचे डोळे पुसत ती म्हणते...

वासंती : किती बावरला आहेस तू. मी येऊ का तुझ्या सोबत तुझ्या घरातल्या सगळ्यांना शोधायला?

ते ऐकून त्या मुलाचा चेहरा खुलतो आणि तो म्हणतो...

मुलगा : तू येशील आत? चालेल तुला? घाबरणार नाहीस न?

वासंती हसत त्याच्याकडे बघते मग मनगटातल्या घड्याळाकडे आणि म्हणते..

वासंती : नाही घाबरणार मी. येते चल...

वासंती असं म्हणताच तिला मागे गेट पटकन लावलं गेल्याचा आवाज येतो. ती मागे वळून बघते तर गेट बंद झालेलं असतं. तिला ते थोडं वेगळं वाटतं; पण तो लहान मुलगा रडतो आहे हे तिच्या मानत असल्याने ती बंद गेटकडे बघून परत पुढे बघते तर तो मुलगा आता तिच्या शेजारी नसतो. तिला आश्चर्य वाटतं. ती घराच्या दिशेने बघते तर तो तिथे पायऱ्यांपाशी उभा असतो. मुख्य दाराजवळ अंधार असतो. त्यामुळे त्या मुलाची आकृती फक्त तिला दिसते. वासंती पुढे होते आणि त्याच्या जवळ जाऊन उभी राहाते आणि म्हणते...

वासंती : अरे इथपर्यंत आला आहेस तर मग घरात पण जायचं न. बरं, चल आत जाऊया.

वासंती आता त्या मुलाचा हात धरते आणि दाराजवळ येते. ती दार वाजवते. पण कोणीच दार उघडत नाही. त्यामुळे ती परत एकदा जरा जास्त जोराने दार वाजवते. पण तरीही कोणीही दार उघडत नाही. आता वासंतीच्या चेहेऱ्यावर आश्चर्याचे भाव आहेत. ती एकदा परत त्या मुलाकडे बघते. तो वासंतीकडेचं बघतो आहे. तिची नजर त्याच्याकडे वळताच तो तिला म्हणतो..

मुलगा : अग, सगळे हरवले आहेत तर मग दार कोण उघडणार ग?

वासंती परत समोर दाराकडे बघते आणि एकदा 'नाही-नाही' अशी मान हलवते आणि हलकेच दाराला धक्का देते. दार आतल्याबाजूला उघडतं. दार उघडलं जाताना सहसा वापरात नसलेल्या दारातून जसा आवाज येईल तसा आवाज येतो. आत अंधार आहे. काळोखात वासंती त्या मुलाचा हात धरून दाराच्या फ्रेममध्ये उभी आहे हे दिसतंय. वासांतीने एक पाऊल पुढे टाकल्या क्षणी आतमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज येतो. आत खरं तर अंधार आहे. त्यामुळे वासंतीची shadow दिसते आहे. आत काहीतरी पडल्याच्या आवाजामुळे वासंती दचकते आहे. पण मुलाची shadow शांत स्वस्थ उभी आहे हे लक्षात येतं. आतमध्ये वासंतीचा आवाज घुमतो..

वासंती : कोणी आहे का घरात? तुमचा मुलगा घाबरला आहे.

आतून कोणताही आवाज येत नाही. आता वासंतीची आकृती भिंतीवरचं दिव्याचं बटण शोधते आहे. ते सापडत आणि वासंती दिवा लावते. पण फार लक्ख प्रकाश नाही आहे. जुना पिवळसर दिवा चालू होतो. वासंती मान उचलून समोर बघते आणि एकदम दचकते. समोर मोठ्ठा गोल आरसा असतो. ज्यात तिला तिचं स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. आपणच आहोत हे लक्षात येऊन मग मात्र तिला काहीसं हसायला येतं.

आता वासंती परत एकदा त्या मुलाकडे बघते. त्याचा चेहेरा आता शांत आहे. तिला त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव बघून थोडं वेगळं वाटलं आहे. ते तिच्या चेहेऱ्यावर दिसतं. ती त्याच्याकडे वळून म्हणते..

वासंती : अरे तू हाक मारून बघ बघू. कदाचित तुझा आवाज ऐकून तुझी आई किंवा बाबा बाहेर येतील.

वासंतीचं बोलणं ऐकून मुलगा तिच्याकडे शांतपणे बघतो आणि नाही नाही अशी मान हलवत म्हणतो..

मुलगा : अग ताई, तुला म्हंटलं न. मी कधीपासून शोधतो आहे. पण ते कोणी सापडतच नाहीत न. हरवले आहेत ते सगळे.

आता वासंतीला त्याचं उत्तर आवडत नाही आहे. तरीही तिचं मन त्याला तिथे एकटं सोडून जायला तयार नाही आहे हे तिच्या चेहेऱ्यावरून कळतं आहे. ती एकदा घड्याळाकडे बघते आणि परत त्या मुलाचा हात धरते आणि म्हणते..

वासंती : चल आपण आतल्या घरात जाऊ. कदाचित आपला आवाज त्यांना ऐकू गेला नसेल.

आता वासंती आणि तो मुलगा पुढची खोली पार करून स्वयंपाक घरात येतात. तिथे सगळं कसं व्यवस्थित मांडून ठेवलेलं दिसतं आहे. पण ते अनेक दिवसात वापरलेलं नाही असं वाटतं आहे. वासंतीला आश्चर्य वाटतं की आपण इतके आत आलो तरी कोणीच कसं दिसत नाही आहे. तसं ती त्याला बोलून दाखवते..

वासंती : अरे आपण स्वयंपाक घरात आलो तरी कोणीच कसं समोर येत नाही.

तो मुलगा आता काहीच बोलत नाही. तो आता स्थिर नजरेने वसंतीकडे बघत उभा आहे. वासंतीला त्याची नजर आवडत नाही. तिच्या कपाळावर आठी निर्माण होते. ती इथे तिथे बघते. तिला झाकून ठेवलेला पाण्याचा माठ दिसतो आणि तिला स्वतःला तहान लागल्याची जाणीव होते. ती तिचा हात गळ्याकडे नेते आणि काहीसं खकरल्यासारखं करते. वासंती पाण्याच्या माठाकडे जाते आणि त्याचं झाकण उघडून बाजूला असलेलं भांडं त्यात बुडवते. तिचा हात आत-आत जातो... पण पाणी हाताला लागत नाही. ते तिच्या आश्चर्यचकित चेहेऱ्यावरून कळतं आहे. शेवटी तिचा हात पूर्ण आत जातो आणि माठाच्या तळाला भांडं अपटल्याचा आवाज येतो. आता वासंतीचा चेहेरा पूर्णपणे आश्चर्यचकित झालेला आहे. ती हात बाहेर काढते आणि त्या मुलाकडे वळून म्हणते..

वासंती : अरे यात अजिबात पाणी नाही. तुम्ही प्यायचं पाणी कुठे भरून ठेवता?

वासंतीच्या बोलण्यावर काही क्षण तो मुलगा काही बोलत नाही. दोन पावलं मागे सरकून तो भिंतीला टेकून उभा राहातो आणि हातातल्या बॉलने टप्पी टप्पी खेळायला लागतो. त्याची ही कृती थोडी confident मुलासारखी आहे. तो शांतपणे वासंतीकडे बघतो आणि मग एकदा मान खाली घालतो. तो काहीतरी बोलेल याची वासंती वाट बघते आहे. तो मुलगा खटकन वर बघतो. आता त्याची नजर अगदी स्थिर आहे. तो अत्यंत शांत आवाजात वासंतीला म्हणतो..

मुलगा : कोण भरणार पाणी ताई? सगळे हरवले आहेत नाही का? तुला मी सारखं सांगतो आहे की सगळे हरवले आहेत आणि तरी तुला वाटतंय हाक मारली की ते येतील. अग कोणीच तर नाही ना घरात. म्हणून तर मला एकट्याला आत यायला भिती वाटते म्हणून तर मी या बॉलने सारखा बागेतच खेळत असतो न.

मुलाचा आवाज अत्यंत स्थिर आणि शांत आहे. आता त्याच्या आवाजातला अस्वस्थपणा संपला आहे. वासंतीला आता त्याच्याकडे बघायची इच्छा नाही आहे. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते. ती स्वयंपाक घरातून बाहेर पडण्याच्या विचाराने दाराच्या दिशेने जाते. मुलगा दाराजवळच आहे. तो एकदम तिच्या मध्ये येतो आणि तिला म्हणतो..

मुलगा : काय झालं ताई? तू मला शोधायला मदत करणार होतीस न?

वासंती त्याच्याकडे बघते आणि थांबून म्हणते..

वासंती : मी तर तुझ्या घरातल्या कोणालाही ओळखत नाही. कसं शोधणार मग मी त्यांना? मला वाटलं होतं हाक मारली की कोणीतरी येईल पुढे. पण कोणीच आलं नाही.

असं म्हणून ती एकदा हातातल्या घड्याळाकडे बघते आणि मग त्या मुलाकडे बघत परत बोलायला लागते..

वासंती : हे बघ, आता मात्र मला उशीर होतो आहे. बघ; आले तेव्हा जेमतेम सहा वाजले होते. तिन्हीसांजेची वेळ होती. आता मात्र सात वाजले आहेत. एक तास कसा गेला ते कळलं पण बाही. तुझ्या घरातले सगळे हरवले आहेत... माझ्या घरातले नाही. माझे आई आणि बाबा माझी वाट बघत असतील. मला आता घरी गेलंच पाहिजे.

असं म्हणून वासंती त्याला एका हाताने बाजूला करते आणि स्वयंपाक घराच्या बाहेर पाऊल टाकते. ती एकटीच पुढे जात आहे. मुलगा स्वयंपाक घराच्या दाराच्या फ्रेममध्ये उभा आहे. वासंती पुढचं पाऊल टाकते आणि तिला मागून त्या मुलाचा आवाज ऐकायला येतो...

मुलगा : ताई नक्की हरवले नाहीत न तुझ्या घरातले तुझे आई-बाबा?

वसांतीला तो प्रश्न ऐकून एकदम राग येतो. ती गर्रकन मागे वळते... पण आता स्वयंपाक घराच्या दाराच्या फ्रेममध्ये तो मुलगा नाही आहे... मात्र वसांतीला परत त्याचा आवाज ऐकायला येतो...

मुलगा : नक्की ना ताई.....

आता मात्र वासंतीच्या चेहेऱ्यावरचा राग जाऊन तिथे थोडा गोंधळला भाव येतो... त्याला काहीशी घाबरलेल्या भावनेची किनार आहे. वासंती स्वयंपाक घराकडे पाठ करते आणि त्या घराच्या बाहेर जायला सुरवात करते.

***

कॅमेरा वासंतीच्या पायांवर आहे. वासंती भराभर चालत त्या घरातून बाहेर पडते आहे... तिची भरभर पुढे पडणारी पावलं दिसत आहेत. वासंती घराच्या बाहेर येताच मुख्य दरवाजा खटकन बंद होतो. वासंतीची पावलं पायऱ्या उतरून खाली येतात आणि गेटच्या दिशेने भराभर पडत आहेत. गेट उघडलं गेलं आहे आणि वासंतीची पावलं गेटच्या बाहेर आली आहेत. तिची पावलं ज्या फुटपाथवर आहेत तो अत्यंत नवीन आहे आणि छान बांधलेला आहे. (हा एक मोठा फरक highlight होणं आवश्यक आहे) बाहेर संध्याकाळीच वेळ आहे. पण आता प्रेक्षकांना लक्षात येतील असे रस्त्यावरचे दिवे भरपूर उजेड देत आहेत.

कॅमेरा वासंतीच्या पावलांवर आहे. वासंतीची पावलं काहीशी अडखळलेली आहेत. पण तशीच पटापट पुढे जातात आणि तिच्या घराच्या गेटच्या जवळ येऊन थांबतात. आता कॅमेरा गेटवर येतो. ते गेट वासंतीच्या घराच्या गेटसारखं नाही. ते बदललेलं आहे. त्यावर सुंदर रंगाच्या काचा आणि आरसे लावले आहेत. पण आत्ता फक्त गेट दिसतं आहे. अजूनही वासंती दिसलेली नाही. त्या गेटजवळ एक watchman उभा आहे तो मोबाईलवर बोलतो आहे. वासंती त्याच्या दिशेने वळते आणि वासंतीचा प्रश्न त्याला ऐकू येतोय..

वासंती : watchman हे गेट कोणी बदललं? पाहिलं गेट कुठे गेलं?

watchman च्या चेहेऱ्यावर खूप आठ्या आहेत. तो एकदा उद्धट-उर्मटपणे क्या है अशी मान हलवतो. परत वासंतीचा आवाज येतो. आता ती हिंदीमध्ये प्रश्न विचारते आहे.

वासंती : अरे हे गेट किसने बदल दिया? पहिलं गेट किधर है? तुमको किसने watchman करके रखा?

watchman तिच्या प्रश्नांनी वैतागला आहे हे त्याच्या चेहेऱ्यावरून कळतंय.

watchaman : ओ मावशी... तुमी कुनाला शोधून राहिलात? गेट हवं हाय की मानुस?

वासंतीचा चिडलेला आवाज ऐकायला येतो आहे...

वासंती : ए आगाऊ... मावशी कोणाला म्हणतोस रे?

आता watchman च्या चेहेऱ्यावरचा उर्मटपणा खूपच जास्त झाला आहे. तो अत्यंत उद्धटपणे चढलेल्या आवाजात म्हणतो...

watchman : ए म्हातारे... मंग काय तुला तरणी पोर म्हनू काय? ऑ? म्हातारी हायसं म्हनून उभं तरी केलं हितं....

watchman चा आवाज background वर येतो आहे. तो अजूनही बडबड करतो आहे. आणि अचानक वासंतीचा चेहेरा गेटवर decoration साठी लावलेल्या आरशात दिसतो. वासंती आता स्वतःकडे बघते आहे. ती स्वतःला निरखायला पुढे आली आहे. आणि आता तिचा चेहेरा त्या आरशात स्पष्ट दिसतो आहे. तिचे केस पिकलेले आणि पिंजारलेले आहेत... डोळे खोल गेले आहेत... चेहेऱ्यावर वयाच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. ते बघून वसांतीला धक्का बसला आहे ते आरशात दिसतं.

आता कॅमेरा संपूर्णपणे वासंतीला फोकस करतो आहे. वासंतीला बसलेला धक्का तिच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसतो आहे. ती एक एक पाऊल मागे जाते आहे... बाजूला watchman अजूनही बडबडतो आहे.... सौंदर्यीकरण केलेल्या फुटपाथच्या कडेला असलेल्या कर्ब स्टोनवरून वासंती धडपडते आणि एकदम रस्त्यावर कोसळते. ते बघून watchman एकदम 'अरे अरे... सांभाळा मावशी' असं म्हणत पुढे येतो.... पण तेवढ्यात मागून एक मोठी गाडी येते आणि करकचून ब्रेक लागल्याचा आवाज हेतो... गाडी थांबली आहे... वासंती पालथी पडली आहे.. तिच्या कपाळावरून रक्ताचा ओघळ आला आहे... तिचे डोळे मिटत आहेत... त्यावेळी तिला दूरवर त्या जुन्या वाड्याच्या गेट जवळ तोच तो लहान मुलगा दिसतो आणि वासंती म्हणते....

वासंती : आई-बाबा कुठे आहात? तुम्ही हरवलात की .....

आणि वासंतीचे डोळे मिटतात... कॅमेरा त्या मुलाच्या दिशेने जातो... तो मागे वळून बॉलने टप्पी टप्पी खेळायला सुरवात करतो. बॉल bounce होतो आणि वर येतो त्यावेळी समोरच्या झोपाळ्यावर वय झालेली वासंती बसलेली दिसते.

समाप्त

No comments:

Post a Comment