अनाहत सत्य
भाग 17
"भागीनेय तीक्ष्णा, मी काय करणार आणि काय करणार नाही हा सर्वस्वी माझा निर्णय राहील; हे अगोदरच ठरलं आहे. त्यामुळे माझ्या वतीने तू कोणतेही विधान करू नयेस अशी मी विनंती करते." अपालाचा आवाज तीव्र होता. तीक्ष्णाने क्रुद्ध नजरेने अपालाच्या दिशेने बघितले. ती एक पाऊल पुढे आली; पण मग आपले पाऊल मागे घेत ती तिथून निघून गेली.
"अपाला, तीक्ष्णाची इच्छा नाही म्हणून तू संभ्रमित आहेस का?" दुखावलेल्या आवाजात गोविंदने अपालाला विचारलं.
"गोविंद, माझं स्वत्व जपणं जर तुला कळत नसेल तर विषय इथेच संपतो. जे उत्तर मी भागीनेयला दिलं तेच तुला देते. मी माझ्या आयुष्यात काय करावं हा सर्वस्वी माझा निर्णय असेल. माझ्या आयुष्यात कोणत्या व्यक्तीला आणि कोणत्या कृतीला किती महत्व आहे; हे ठरवण्याचा अधिकार मी कोणालाही दिलेला नाही. गोविंद; माझा जन्म आणि माझं संगोपन खूप वेगळं आहे. भावनिकता हा आयुष्याचा एक भाग आहे.... संपूर्ण आयुष्य नाही; असं मी मानते. अर्थात त्यामुळे माझ्या भावनिक आयुष्यात अनेक प्रकारचं नुकसान होऊ शकतं हे देखील मी जाणून आहे." अपाला शांतपणे बोलत होती.
"अपाला मी तुला कधीतरी समजू शकेन का?" गोविंद गोंधळून म्हणाला.
"असं का म्हणतोस गोविंद?" अपालाने त्याचा हात प्रेमाने हातात घेत विचारलं.
"अपाला, तुझं भावनिक नुकसान मी होऊ देईन का?" अत्यंत भावनिक होत गोविंदने म्हंटलं.
"गोविंद, तू असताना मला कसलीच काळजी नाही; हे मी जाणून आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीची भावनिक ओढाताण सहन करण्याची क्षमता वेगळी असते. त्यामुळे माझ्या या अनेकदा तुटक वागण्यामुळे तुला त्रास होऊ शकतो. त्यात तू माझ्यासारखा भावनिक नाती कमी असलेला नाहीस. तुझ्यावर अनेक प्रकारच्या कौटुंबिक आणि सामाजिक जवाबदऱ्या आहेत. त्यामुळे कधीतरी तुझ्या धिराचा बांध फुटू शकतो. त्यामुळे सर्वात जास्त नुकसान माझंच होणार आहे; हे सत्य देखील मी जाणून आहे. म्हणूनच मी म्हंटलं माझ्या काही निर्णयांमुळे माझंच नुकसान होऊ शकतं." अपाला अत्यंत प्रेमाने बोलत होती.
"तुला जर इतकं कळतं आहे तर मग तू आपल्या दोघांसाठी आणि कुजरसाठी म्हणून तरी माझ्या सोबत नगरात चल अपाला." गोविंदने तिला परत एकदा विनवणी केली.
"नाही गोविंद. तू समजून घे; तुझी माझी ओळख आणि मैत्री आणि त्यानंतर प्रेम हे इथे मी आल्यानंतर निर्माण झालेली भावनिक गुंतवणूक आहे. त्यासाठी मी इथे ज्या उद्देशाने आले आहे तो बाजूला सारणं म्हणजे माझ्यावर सोपवलेल्या जवाबदरीपासून मी पळ काढला असं होतं. ते मला मान्य नाही. अर्थात ते देखील दुय्यम आहे. माझं पाहिलं प्रेम माझ्या कामावर आहे गोविंद. ज्यावेळी भागीनेय तीक्ष्णा महाराज कृष्णराज यांना भेटण्यासाठी राजदरबारी दाखल झाली होती; त्यागोदरच आम्ही जिथून आलो आहोत तिथे प्रत्येकाच्या कामाचा निर्णय झाला होता. त्यावेळी भागीनेय तीक्ष्णाने श्रीशंकर मंदिर निर्मितीची जवाबदारी घेतली होती आणि मी स्वतः दुसऱ्या स्थापत्य दुरुस्तीची जवाबदारी मागून घेतली होती....." अपाला बोलत होती आणि मध्येच गोविंदने तिला थांबवलं.
"स्थापत्य निर्मिती ना अपाला? तू चुकून दुरुस्ती म्हंटलंस." तो म्हणाला. त्याच्या बोलण्याने अपाला एकदम भानावर आली आणि त्याच्याकडे बघत स्थिर नजरेने म्हणाली; "हो! हो! स्थापत्य निर्मिती..... मी ज्या निर्मितीसाठी इथे आले आहे; ते काम अत्यंत क्लिष्ट आणि मोठ्या जवाबदरीचं आहे. त्यामुळे त्याच्यापुढे मला माझं भावनिक नुकसान महत्वाचं नाही. मुळात मी तुझ्यात गुंतणच योग्य नव्हतं. त्यामुळे मी भागीनेय तीक्ष्णाला सतत मला बोलण्यावरून दोष देखील देत नाही. गोविंद, आपल्या आयुष्यात असा एक क्षण येतो की ज्यावेळी आपल्याला लक्षात येतं की आपल्या समोर दोन मार्ग आहेत... एक प्रेम, भावना आणि भावनिक सुख आणि दुसरा कर्तव्य आणि मानवतेची जवाबदारी. आपण कोणता मार्ग निवडतो हा सर्वस्वी आपला निर्णय असतो. जे प्रेमात गुंततात; त्यांना कदाचित सर्वसामान्य आयुष्य मिळतं. जे कर्तव्याचा मार्ग निवडतात; त्यांचं नाव पुढे अजरामर होतं. पण तरीही एक अबाधित सत्य राहातं गोविंद; जे प्रेम निवडतात ते मनातून कायम दुसऱ्या मार्गावरील सुखाबद्दल विचार करतात; आणि जे कर्तव्याला महत्व देतात त्यांना भावनिक मार्गामध्ये जास्त मनःशांति मिळाली असती; असं वाटत राहातं."
"मला कळतं आहे अपाला तू काय सांगायचा प्रयत्न करते आहेस. तुझी दोलायमानता मला कळते आहे. पण म्हणजन तर मी तुला सतत सांगतो आहे की तुझ्या कामाच्या आड मी कधीच येणार नाही. मला तुझ्या सोबत विवाह करायचा आहे; हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हे देखील आहे की मी तुला विवाह कर असा आग्रह धरणार नाही. अपाला गेल्या काही वर्षांमधील तुझ्या सहवासात मला लक्षात आलं आहे की तुझं असं वेगळं आयुष्य आहे. त्यात खूप काही गूढ आहे; जे तुला मला सांगायचं नाही. कारण काहीही असेल... मी दुखावला जाईन; समजून घेऊ शकणार नाही किंवा तुला असलेली बंधनं. म्हणूनच तू माझ्याप्रमाणे जग असं मी म्हणणार नाही. मात्र माझ्या सोबत राहा ही एकच विनवणी कायम राहील माझी. अपाला, तू सोबत असलीस तर मी राज्यशासन योग्य प्रकारे करेन. तू सतत माझ्या डोळ्यासमोर राहा; असं देखील माझं म्हणणं नाही. माझी खात्री आहे की तू माझी आहेस आणि कायम माझीच राहाशील. पण तुझं अस्तित्व मला ऊर्जा देतं. तुला माझ्या सोबत ठेवण्यासाठी अजून एक महत्वाचं कारण आपला कुंजर बाळ देखील आहे. मला माहीत आहे की ज्या दिवशी तू माझी सोबत नाकारशील त्या दिवशी तू माझ्यापासून दूर होशील आणि तुझ्या बरोबर कुंजर देखील. अपाला, असं काही झालं तर त्यानंतर मला जगणं अशक्य होईल. मी चुकीचे निर्णय घेईन. तू जे म्हणालीस ते बरोबर आहे. माझ्यावर कौटुंबिक आणि सामाजिक जवाबदारी आहे. माझ्या चुकीचे निर्णयांचे परिणाम केवळ मला नाही तर; माझ्या नकळत अनेकांना भोगायला लागतील. या विचारानेच मी तुला सतत विनवतो आहे की माझ्या सोबत राहा."
"मी कोणताही शब्द देणार नाही गोविंद. माझं तुझ्यावर प्रेम आहे. कुंजर माझं सर्वस्व आहे... हे जितकं खरं आहे तितकंच सत्य हे देखील आहे की माझ्यावर एक मोठी जवाबदारी आहे. ते दायित्व मोठं आहे. विशेषतः आता; जेव्हा मंदिराचं काम पूर्ण होत आलं आहे; आणि माझ्या अखत्यारीत असलेलं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. माझं उत्तरदायित्व मोठं आहे गोविंद. तुला खरंच कळणार नाही; त्यात तुझा दोष नाही. जाऊ दे. आपण या विषयावर परत कधीतरी बोलू. यावेळी मला गेलं पाहिजे." असं म्हणून अपाला झपझप चालत तिथून निघून गेली.
गोविंद दिगमूढ होऊन ती गेली त्या दिशेने बघत राहिला. दुरून नाथ देखील त्याच्याकडे बघत होता. भीमतटरक्षक देखील एका बाजूला कुंजरला मल्ल युद्धाचे धडे देत गोविंदकडे बघत होता.
***
"अपाला, तुझं गोविंदमध्ये गुंतण मला मान्य नव्हतं; कारण आपल्याला भावनिक होण्याची परवानगी नाही; हे तू जाणून आहेस. तू घेतलेली जवाबदारी खूप महत्वाची आहे. केवळ श्रीशंकर मंदिर निर्मिती हा आपला उद्देश नाही हे तू जाणून आहेस. आपल्या पूर्वीच्या मानव रक्षकांनी येथील भूगर्भात जी नगर निर्मिती केली आहे; त्यातील त्रुटी भरून काढण्याची जवाबदारी तुझी आहे..." तीक्ष्णा अपालाला समोर बसवून बोलत होती. तिचं वाक्य मध्येच तोडत अपाला म्हणाली; "मी देखील तेच सांगते आहे भागीनेय तीक्ष्णा; तुझी जवाबदारी मंदिर निर्मिती आणि माझी जवाबदारी भूगर्भातील निर्मितीसाठी योग्य वायुविजन करणे ही आहे. मात्र अशी योग्य प्रकारे हवा खेळती राहावी यासाठी मी जे जे उपाय सांगितले आहेत ते सर्वच तू अमान्य केले आहेस. त्यामुळे माझं काम धीम्या गतीने होतं आहे. खरं तर आपलं दोघींचंही काम एकमेकांपासून वेगळं आहे. त्यामुळे मी तुझ्या कामात दखल दिली नाही; अर्थात जी मदत माझ्याकडून होईल ती केली आहे. मात्र तू माझ्या कामामध्ये कायम खोडा घातला आहेस. भागीनेय...."
"मी तुझी शत्रू नाही अपाला." तिला थांबवत तीक्ष्णा म्हणाली.
"मी जाणून आहे ते भागीनेय... तुझा अनुभव माझ्याहून मोठा आहे. म्हणूनच मी माझ्या कामात कायम तुझा सल्ला आणि मत गृहीत धरत आले आहे. मात्र आता तुझं जे सांगणं आहे ते मला मान्य नाही. आपली संस्कृती जपण्याची जवाबदारी आपलीच आहे; हे जरी मान्य असलं तरी तिथे परत जायचं किंवा नाही; हा निर्णय घेण्याची मुभा मला आहे; हे तू विसरू नकोस. मी योग्य वेळेत माझी जवाबदारी पूर्ण करून मग माझ्या आयुष्याचा निर्णय घेईन; हे नक्की." अपालाने स्पष्ट शब्दात तीक्ष्णाला इशारा दिला आणि तिथून निघाली.
***
"अपाला, तू गोविंदला तुझ्या खऱ्या अस्तित्वाबद्दल सांगणं आवश्यक आहे." भीमतटरक्षक अपाला सोबत बसून बोलत होता. पूर्ण चंद्राची रात्र होती; त्यामुळे संपूर्ण गुंफा प्रदेश चंदेरी प्रकाशात चमकत होता. कुंजर भीमाच्या मांडीमध्ये थकून झोपला होता. अपालाचं लक्ष भीमाच्या बोलण्याकडे फारसं नव्हतं. भीमाला ते लक्षात आलं.
"अपाला...." त्याने परत एकदा तिला हाक मारली.
"अं?!" अपालाची तंद्री मोडली गेली.
"तू सगळं सत्य गोविंदला सांगून टाक." परत एकदा भीमा म्हणाला.
"नाही भीमा. गोविंद हे समजूच शकणार नाही." तिने अत्यंत दुःखी आवाजात म्हंटलं.
"असं नको म्हणुस अपाला. मी ओळखतो गोविंदला. तो नक्की स्वीकारेल सत्य." भिमा म्हणाला.
"नाही भीमा. तू त्याला मित्र म्हणून ओळ्खतोस. मी त्याला माझा प्रियकर म्हणून ओळखते. माझा जन्म निसर्ग निर्मिती सोबत हजारो लाखो वर्षांपूर्वी झाला आहे; आणि मी अशा एका प्रजातीची प्रतिनिधी आहे ज्यांनी स्वतःला भूगर्भात लपवून घेतलं आहे; ज्यावेळी मानवीय आयुष्य लयाला जायला लागत; किंवा संपूर्ण नष्ट होतं; त्यावेळी आपण भूपृष्ठावर येऊन परत एकदा निर्मिती कार्य करतो...... हे ज्याक्षणी त्याला कळेल त्याक्षणी त्याच्या मानातली माझ्याबद्दलची प्रेम भावना संपुष्टात येईल. मी एक मानव स्त्री आहे म्हणून तो माझ्यावर प्रेम करतो. मी एक अतिप्राचीन मनुष्य निर्मिती आहे हे तो कधीच मान्य करू शकणार नाही." अपालाचा स्वर दुःखी होता.
"मला कळतं आहे तुझं दुःख अपाला. पण त्याला न सांगता तू निघून गेलीस तर तो तुला कधीच माफ करणार नाही. मात्र सांगून दूर गेलीस तर किमान तो त्याच आयुष्य सावरेल. कुंजरचं आयुष्य देखील योग्य प्रकारे मार्गी लागेल." भीमा कुंजरला कुरवाळत म्हणाला.
"मी जिथे असेन तिथे कुंजर असेल भीमा." अपाला म्हणाली.
"त्याच्यामध्ये सर्वसाधारण मनुष्याचा अंश आहे अपाला." भीमा म्हणाला.
"तो माझा पुत्र आहे भीमा; हे विसरू नकोस. तो जर इथे राहिला तर त्याचा त्रास होईल गोविंदला. कुंजर अत्यंत पराक्रमी आणि स्थिर मनोबलाचा राजा होईल; निःसंशय! मात्र भावनिकता आणि प्रेम यापासून दूर असल्याने तो कौटुंबिक प्रेम जवळ करणार नाही. त्यामुळे वंश वृद्धी होणार नाही. त्यातून निर्माण होणारा कोलाहल जास्त भीतीदायक असेल भीमा. आपण हे पूर्वी देखील बघितलं आहेच न. चाणक्य आणि चंद्रगुप्त यानंतर आपण केवळ साधन होण्याचा मार्ग निवडला आहे. त्या काळातील सर्वसाधारण मानवांमध्ये उपजत निर्माण होणाऱ्या मानसिकतेवर विश्वास ठेवत आपण त्यांना आपली निर्मिती सोपवून परत एकदा मागे फिरतो आहोत. त्यामुळे आता देखील असंच काहीसं होईल; हे मला माहीत आहे." अपालाने शांतपणे कुंजरला उचलत म्हंटलं. "भीमा उशीर झाला आहे. तुझे रक्षक तुझी वाट बघत असतील. तुला देखील तुझी जवाबदारी आवरती घेण्यास तीक्ष्णाने सांगितलंच असेल. त्यामुळे माझी काळजी करू नकोस. मी योग्य मार्ग आणि उपाय शोधून काढीन याची मला खात्री आहे. निघ तू." एक क्षण अपालाच्या डोळ्यात बघून भीमाने कुंजरला तिच्या हातात सुपूर्द केलं आणि तिथून उठून तो त्याच्या कामाला निघाला.
***
"तू तुझी जवाबदारी विसरतो आहेस नाथा." सुमंत कल्याण यांचा आवाज तीव्र होता. नाथाची नजर झुकलेली होती. "तुला राजकुमार गोविंदराज यांचा सखा होण्याची जवाबदारी देण्यात आली आहे; तो विशेषाधिकार नाही; हे तुला माहीत असावं असं मी मानतो." नाथाला सुमंत कल्याण यांचा प्रत्येक शब्द टोचत होता. मात्र त्यावर तो काहीच बोलत नव्हता.
"राजकुमार गोविंदराज यांनी नगर प्रवेश करावा आणि योग्य विवाह बंधन स्वीकारून राज्यधुरा सांभाळावी अशी महाराज कृष्णराज यांची इच्छा आहे. त्यांची मनोकामना आहे की राज्य व्याप्ती वाढवावी आणि राष्ट्रकूट घराण्याचा एकछत्री अम्मल भारतवर्षावर राहावा. जेणेकरून लोकांना सुखी समृद्ध आयुष्य जगता येईल. मात्र त्यासाठी गोविंदराज यांनी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यांच्या सोबत राहून त्यांचं मन वळवणे ही तुझी जवाबदारी आहे." सुमंत कल्याण अत्यंत कठोर आवाजात बोलत होते.
"मी जाणून आहे सुमंत. मी माझ्या बाजूने सतत प्रयत्न करत असतो. मात्र गोविंदराज यांच्या अपाला बद्दलच्या भावना अत्यंत कोमल आणि तरीही तीव्र आहेत. तिच्यापासून दूर जावे लागेल अशी कोणतीही बाजू ऐकून घेण्यास देखील ते तयार नाहीत." नाथाने त्याची अडचण सांगण्याचा प्रयत्न केला.
"नाथा, एक गोष्ट समजून घे. माझा त्या अपालावर किंवा त्या तीक्ष्णावर काडी इतका देखील भरवसा नाही. तीक्ष्णा ज्यावेळी प्रथम महाराजांना भेटण्यास आली त्यावेळी देखील तिचा प्रत्येक शब्द प्रमाण असावा असा तिचा आग्रह होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराजांनी देखील तिचा प्रत्येक शब्द मान्य केला. तिने महाराजांची भेट मागितली. ठरल्या प्रमाणे महाराज, तीक्ष्णा आणि मी असे विशेष कक्षात दाखल झालो. मात्र मला पाहाताच तिने बोलण्यास नकार दिला. एरवी असं कोणी म्हंटलं असतं तर महाराजांनी त्या व्यक्तीस निघून जाण्यास सांगितलं असतं. मात्र महाराजांनी तिला बसवून घेतलं आणि त्यादोघांमध्ये जी चर्चा होईल त्याबद्दल मला ते नंतर सांगतील असं सांगून मला तिथून निघण्यास सांगितलं. तो दिवस आणि आजचा दिवस.... ती तीक्ष्णा ज्या ज्या वेळी महाराजांना भेटण्यास येते त्या-त्या वेळी ती एकटीच भेटते. त्यानंतरच्या आमच्या भेटीमध्ये महाराज त्यांच्या भेटीमधील निर्णयांसंदर्भात माझ्याशी चर्चा करतात; हे जरी खरे असले तरी.... मुळात त्या दोघांमध्ये काय बोलणे होते ते मला माहीत नाही. तीक्ष्णाने महाराजांसमोर मंदिर बांधणी सोबत अजूनही काहीतरी वेगळा प्रस्ताव ठेवला असावा असा मला संशय आहे. महाराजांनी जरी स्पष्ट तसे मला सांगितले नसले तरी राजकुमार गोविंदराज यांना मंदिर निर्मितीच्या कामाची पाहणी करण्याची जवाबदारी महाराजांनी दिली त्यावरूनच तिथे मंदिर निर्मिती सोबतच अजूनही काहीतरी कार्य असावे असं मला वाटतं. अर्थात.... दिलेली जवाबदारी विसरून राजकुमार गोविंदराज त्या अपालाच्या प्रेमाबंधनात अडकले आहेत. गेली अनेक वर्षे ते तिथेच असतात. त्यादोघांचा पुत्र कुंजर! ना विवाह केला आहे ना करण्याची इच्छा आहे अपालाची. त्यामुळे महाराजांनी जे ठरवलं आहे ते देखील तडीस जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. यावर एकच उपाय आहे नाथा. राजकुमार गोविंदराज यांचा नगर प्रवेश. अपाला आणि कुंजर सोबत किंवा सोबतीशिवाय. यासाठी तुला जे काम दिले आहे ते तू लवकरात लवकर तडीस नेणे आवश्यक आहे." आपलं बोलणं थांबवत सुमंत कल्याण यांनी नाथाकडे बघितलं. त्यांच्या त्या थंड नजरेने आणि शब्दांनी नाथा जे समजायचं ते समजला.
"मी तुमच्या शब्दाबाहेर नाही सुमंत." तो कसंबसं म्हणाला.
"उत्तम. दोन दिवसांनी मला येऊन भेट नाथा." सुमंत म्हणाले आणि त्यांच्या बोलण्याला होकार देत नाथा बाहेर पडला.
क्रमशः
No comments:
Post a Comment