शेजारी कथा (भाग शेवटचा)
ह
असेच काही दिवस गेले आणि एक दिवस.....
गेटचा आवाज ऐकून काकू स्वायंपाकघरातून दिवाणखान्यात आल्या. 'दूध आणायला बराच वेळ लागला यांना!' दार उघडताना त्यांच्या मनात आलं. मात्र गेटपाशी दुसऱ्याच कोणाचा तरी आवाज ऐकून काकू सावध झाल्या. परत एकदा दुखावलेल्या मनाने आणि तरीही कर्कश्य आवाजात त्यांनी प्रश्न केला;"कोण आहे ते गेटजवळ? जा बघू परत. उगाच माझ्या घराचं दार वाजवून मला त्रास देऊ नका." इतकं बोलून दार न उघडता त्या परत आत जाऊ लागल्या. इतक्यात त्यांना बाहेरून आवाज आला;"अहो काकू.... दार उघडा. काकांना घेऊन आलो आहे." 'काकांना घेऊन?' काकू हे ऐकून बुचकळ्यात पडल्या आणि त्यांनी घाईघाईने दार उघडले.
दारात एक स्ट्रेचर घेऊन हॉस्पिटलची माणसे उभी होती. स्ट्रेचरवर काका विव्हळत होते. त्यांच्या मागे एक गृहस्थ उभे होते. काकू खूपच गोंधळून गेल्या होत्या. त्या अजूनही दारातच उभ्या होत्या. स्ट्रेचर घेतलेल्यांपैकी एकाने काकूंना भानावर आणत म्हंटले;"अहो आजी बाजूला व्हा. पेशंटला त्रास होतो आहे. आत नीट गादीवर झोपवायला लागेल." ते ऐकून काकू एकदम भानावर आल्या आणि दारातून बाजूला झाल्या. स्ट्रेचर घेऊन आत आलेल्या वॉर्डबॉईजनी काकूंना विचारले;"बेडरूम कुठं आजी?" काकूंनी काही न बोलता त्यांना आतल्या खोलीचा दरवाजा दाखवला. दोन्ही वॉर्डबॉईजनी काकांना आत नेऊन स्ट्रेचरवरून हलकेच पलंगावर ठेवलं आणि ते आले तसे निघून गेले. काकू अजूनही संभ्रमातच होत्या. त्यांनी एकदा आतल्या खोलीच्या दाराकडे बघितले आणि घराचे दार बंद करायला त्या मागे वळल्या. त्यांनी दारात एका व्यक्तीला उभे बघितले आणि त्या परत एकदा थबकल्या. दारातली व्यक्ती आत यावे की नाही याचा विचार करत होती. त्यांच्या हातात काकांची नेहेमीची झोळी होती. काकूंनी त्यांच्याकडे राश्नार्थक नजरेने बघितले. तशी हिम्मत करून एक पाऊल पुढे येत ते म्हणाले;"नमस्कार काकू. मी कॉलनीच्या बाहेरच्या दुकानाचा मालक. आज काका नेहेमीप्रमाणे दूध घेऊन माझ्या दुकानातून निघाले. रस्त्याच्या कडेला काहीतरी काम चालू असल्याने खणून ठेवले होते. काकांच्या ते लक्षात आले नाही आणि त्यांचा पाय खड्यात गेला. कोणी धरायला नसल्याने काका एकदम पडले. त्यांचा आवाज ऐकून आम्ही बाहेर येऊन बघितलं. काका बरेच जोरात पडले होते. म्हणून मग आम्हीच काही जणांनी त्यांना उचलून जवळच्या हॉस्पिटल मध्ये नेलं...."
त्या गृहस्थाचं बोलणं ऐकून काकू एकदम घाबरून घेल्या. त्यांचा आवाज एकदम मऊ झाला. आतल्या दाराकडे बघत त्यांनी हलकेच विचारलं;"काय झाली यांना नक्की? काय म्हणाले डॉक्टर?" काकूंचा बदललेला आवाज आणि मऊ झालेला चेहेरा बघून त्या गृहस्थांना थोडा दिलासा मिळाला. ते आश्वस्त स्वरात म्हणाले;"काळजी करू नका काकु. फार काही नाही झालेलं. घोट्याजवळ अगदी हेअर लाईन फ्रॅक्चर झालं आहे. डॉक्टर म्हणाले साधं क्रेप बँडेज म्हणजे ते गुलाबी बँडेज पण चाललं असतं. पण काकांचं वय लक्षात घेता त्यांनी प्लास्टर घातलं आहे. तीन आठवड्यांचाच प्रश्न आहे. मग काका परत पहिल्यासारखे हिंडू-फिरु शकतील." काकूंना 'तीन आठवडे' हे शब्द एखाद्या जादूच्या कांडीसारखे वाटले. त्यांचं सगळं बोलणं ऐकून काकूंनी त्याच हलक्या आवाजात विचारलं;"फक्त तीन आठवडे म्हणाले का डॉक्टर?" काकूंच्या प्रश्नाचा रोख न काकूंना ते गृहस्थ म्हणाले;"हो. का हो काकू?" त्यांच्या डोळ्यातले आश्चर्य बघून काकूंनी स्वतःला सावरले आणि म्हणाल्या;"अहो, हे आता बाहेर पडू शकणार नाहीत. म्हणजे सगळं मलाच बघावं लागेल न. म्हणून अंदाज घेत होते नक्की किती दिवस हे अंथरुणात पडून राहणार आहेत." त्यावर थोडं हसून ते गृहस्थ म्हणाले;"काळजी करू नका काकू. आम्ही आहोत न. काकांसारख्या सज्जन आणि सगळ्यांशी गोड असणाऱ्या व्यक्तीसाठी कोणीही मदत करेलच." काकूंनी मनात तेच शब्द परत उच्चारले.... 'सज्जन आणि सगळ्यांशी गोड' पण मोठ्याने काहीच म्हणाल्या नाहीत. ते गृहस्थच परत म्हणाले;"निघतो मी काकू. त्यांना झोपेचं औषध दिले आहे. तसे झोपतीलच थोडावेळ. हा घ्या माझ्या दुकानाचा नंबर. काही लागलं तर कधीची फोन करा." नंबर घेत काकूंनी 'हो' म्हणून मान डोलावली आणि ते गृहस्थ काकांची झोळी देऊन निघाले.
ते जाताच काकूंनी घराचे दार लावून घेतले आणि त्या आतल्या खोलीकडे वळल्या. त्यांनी आत जाऊन बघितले तर खरंच काकांना गाढ झोप लागली होती. काकूंनी पंखा चालू केला. त्या बाहेर आल्या आणि दिवणखण्यातल्या सोफ्यावर विचार करत बसून राहिल्या. किती वेळ गेला याचा त्यांना अंदाजच आला नाही. पण अचानक त्यांना काकांनी हाक मारल्याचे ऐकू आले. काकू लगबगीने उठल्या आणि आतल्या खोलीत गेल्या. काका अस्वस्थपणे उठून बसण्याचा प्रयत्न करत होते. काकू पुढे झाल्या आणि काकांना बसायला मदत करायला लागल्या. काकांचा चेहेरा वेदनेने पिळवटून गेला होता. "खूप त्रास होतो आहे का?" काकूंनी काळजीने विचारले. त्यांचा प्रश्न ऐकून काका अजूनच चिडले आणि काकूंवर ओरडले;"अजिबात त्रास होत नाही आहे. ज्याप्रकारे तू मला मदत करते आहेस त्यामुळे बरच वाटतंय." काकूंना कळेना त्यांनी काय केलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी काकांचा हातात असलेला पाय सोडून दिला आणि त्या बाजूला झाल्या. अचानक झालेल्या या हालचालीमुळे काकांना अजूनच वेदना झाल्या आणि ते जीवाच्या आकांताने ओरडले. काकू घाबरून अजूनच मागे झाल्या.
कसेबसे काका बसते झाले आणि काकूंकडे खाऊ का गिळू या नजरेने बघायला लागले. काकूंची नजर खाली झुकलेली होती. त्या काकांकडे बघायला देखील धजावत नव्हत्या. काही क्षण असेच तणावात गेले आणि काकांचा पारा थोडा खाली आला. आवाजावर काबू आणत त्यांनी काकूंना म्हंटल;"मी सकाळपासून फार काही खाल्लेलं नाही. औषध घेण्यापूरतं चहा आणि चार बिस्किटं खाली होती. त्यामुळे मला आता खूप भूक लागली आहे. तू सकाळी जे काही बनवलं असशील ते मला लगेच आणून दे." काकांचं बोलणं ऐकून काकू एकदम कावऱ्या-बावऱ्या झाल्या. त्यांनी काकांकडे बघणं टाळत म्हंटल;"मी सकाळी उप्पीट करणार होते. त्याची तयारी देखील केली होती. पण त्याचवेळी तुम्हाला घेऊन हॉस्पिटलचे लोक आले आणि मी विसरूनच गेले काही करायला." काकुंच बोलणं एकूण काकांचा पारा परत चढायला लागला. त्यांचा रागावलेला अवतार काकूंच्या लक्षात आला आणि काकू पटकन खोली बाहेर जात म्हणाल्या;"पाच मिनिटं लागतील फक्त. उप्पीट लगेच करून आणून देते."
काकांना अजूनही बरच काही बोलायचं होतं; पण काकू समोर उभ्याच राहिल्या नाहीत. त्यांनी पटकन स्वयंपाकघरात जात उप्पीट करायला घेतलं. काकूंनी खरच दहा मिनिटात उप्पीट केलं आणि काकांना प्लेट भरून आणून दिली. काकांनी काही न बोलता खाऊन घेतलं. त्यांच्या हातातली प्लेट घेत काकूंनी पाण्याचा पेला पुढे केला. काकांनी परत एकदा काकूंकडे कडक नजरेने बघताच काकूंच्या लक्षात आलं की काकांच्या सकाळच्या गोळ्या घेणं बाकी आहे. त्यामुळे त्या लगबगीने जेवणाच्या टेबलाजवळ गेल्या आणि काकांची औषधं घेऊन आल्या. काकांनी औषधं घेतली आणि दमून मान मागे टाकली. काकांच्या पायाला फ्रॅक्चर अगदी थोडंच झालेलं असलं तरी ते खूपच जोरात पडले होते. त्यामुळे बराच मुका मार लागला होता. सकाळी डॉक्टरांनी पेन किलर इंजेक्शन दिलेलं असल्याने अजूनपर्यंत फार त्रास झाला नव्हता. पण आता इंजेक्शनचा परिणाम कमी व्हायला लागला असल्याने काकांचं सगळं अंग दुखायला लागलं होतं.
काही क्षण काका मान मागे टाकून तसेच बसले आणि मग काकूंकडे बघत सौम्य आवाजात म्हणाले;"माझं अंग खूपच दुखतं आहे ग. डॉक्टरने काही औषधं लिहून दिली होती. पण सकाळी आणणं शक्यच नव्हतं. आता जर दुखणं कमी व्हायला हवं असेल तर त्यांनी दिलेलीऔषधं घ्यायलाच हवीत." काकांचा बदललेला आवाज काकूंच्या लक्षात आला. पण त्या काहीच बोलल्या नाहीत. फक्त मान खाली घालत त्यांनी हळू आवाजात 'हो' म्हंटल. त्या वाट बघत होत्या काकांनी म्हणायची, की जाऊन औषधं घेऊन ये. 'ह्यांच्या परवानगीनेच बाहेर पडायला मिळेल यासारखा आनंद कोणता', काकूंच्या मनात विचार आला. काकांनी काकूंची लागलेली तंद्री बघितली आणि काकूंना हाक मारली;"एकलस का? माझी सकाळची झोळी घेऊन ये." काकू भानावर आल्या. काही न बोलता त्यांनी जाऊन काकांची झोळी आणली. काकांनी झोळी उघडून आतून एक कागद काढला आणि काकूंकडे बघत म्हणाले;"जाऊन फोन घेऊन ये. मला एक फोन करायचा आहे." काकूंना काहीच कळेना. खरं तर काकांना औषध घेणे आवश्यक होते. त्यांना त्रास होत आहे हे काकूंना कळत होते. त्यामुळे काका आपल्यालाच औषध आणायला पाठवतील असा त्यांचा होरा होता. मात्र काकांना काही प्रश्न विचारण्याची त्यांची हिम्मतच नव्हती. त्यामुळे त्यांनी जाऊन फोन आणला आणि काकांकडे दिला. काकांनी कागडाकडे बघत एक फोन फिरवला आणि बोलायला लागले;"नमस्कार भाऊ. मी काका बोलतो आहे. हो, हो! आताच उठलो आणि थोडं खाऊन घेतलं. होय हो! खूपच दुखतंय अंग. हो... हो... तीच विनंती करायला फोन केला होता. सकाळी डॉक्टरांनी जी औषधं लिहून दिली होती ती आपल्याला सकाळी घेणं शक्य झालं नाही. तीच आता घ्यायची आहेत..... अरे! धन्यवाद... अहो खरंच कळत नव्हतं आता काय करु? ही तर.... तुम्हाला माहीतच आहे न. हीच कसं आहे..... बरं बरं! मी वाट बघतो हं. भाऊ परत एकदा मनापासून आभार मानतो तुमच्या मदतीचे." काकांनी असं म्हणून फोन बँड केला आणि नजर उचलून काकूंकडे बघितले.
त्यांच्या चेहेऱ्यावर एक दुष्ट हसू होते. काकूंकडे रोखून बघत काकांनी त्यांना विचारले;"तुला काय वाटलं होतं की आता मी आंथरूणावर आहे तर तुला सगळं रान मोकळं झालं का? मनात येईल तेव्हा.... हवं तिथे भटकायला मोकळी झालीस असा गैरसमज तर नाही न करून घेतलास? एक लक्षात घे काहीही झालं तरी मी तुला लांब होऊ देणार नाही माझ्यापासून.... समजलीस?" असं म्हणून काका खूप मोठ्याने हसले... इतक्या मोठ्याने की त्यांच्या दुखऱ्या पायातून चांगलीच कळ आली. त्यामुळे त्यांचा चेहेरा एकदम वेडा-वाकडा झाला. डोळे घट्ट बंद करून त्यांनी आलेली कळ पचवली आणि डोळे उघडून म्हणाले;"ते दुकानवाले भाऊ जोशी आहेत ते त्यांच्या दुकानातल्या मुलाबरोबर माझी औषधं पाठवत आहेत. त्यांनी देखील डॉक्टरांकडून ही औषधं लिहून घेली होती. त्यामुळे परत औषधांची नावं सांगण्याची गरज नाही. त्यांनी माझ्याकडे त्यांचा नंबर कधीचाच देऊन ठेवला होता. आज उपयोग झाला त्याचा." काकांचं बोलणं ऐकून काकूंच्या मनात निर्माण झालेला एक आशेचा किरण देखील विरून गेला. त्यांनी हताशपणे काकांकडे बघितले आणि स्वयंपाकघरात जायला त्या वळल्या.
ओट्याजवळ उभं राहून काकू विचार करत होत्या. स्वयंपाकघर ही एकच खोली होती की जिथे त्या असल्या तर काका त्यांना काहीच बोलत नसत. नाहीतर इथेच का बसलीस? काय करते आहेस? आता का झोपलीस? असे एक ना अनेक प्रश्न विचारत ते काकूंच्या मागे फिरत. 'का आणि कधी झालं हे सगळं असं? हे असे पहिल्यापासून नव्हते. उलट लग्नानंतर अनेक वर्ष तर मी एकटीनेच काढली की. हे फक्त रात्री जवळ यायचे. एवढंच काय त्याकाळातलं एकमेकांना ओळखणं होतं. बाकी यांचं सगळं बोलणं यांच्या आईशी असायचं. कमावून आणायचे ते देखील आईच्या हातात. मी फक्त घरात राबायला आणि रात्री सुख द्यायला आणलेली होते.... आणि ते मी मान्य देखील करून टाकलं होतं. न मान्य करून काय करणार होते? होतं कोण माझं असं? आठ मुलींमधली मी एक होते माहेरी. एकदिवस हे आले. वडिलांनी आम्हाला सगळ्यांनाच तयार होऊन समोर यायला सांगितलं. आम्हा सगळ्या बहिणींमधून यांनी मला निवडलं... वडिलांना पैसे दिले आणि थेट मंदिरात नेऊन लग्न लावून घेतलं. वडिलांना वाकून नमस्कार करत होते तेवहा वडीलं म्हणाले;"मुली आता तुझ्या अस्थी त्या घरातून बाहेर पडतील हो. आम्ही मेलो आता तुझ्यासाठी कायमचे." अरुण, आमचा एकुलता एक लेक, लहान होता तेव्हा सगळं कसं छान होतं. तो आणि मी असं आमचंच एक विश्व होतं..... आणि अचानक सासूबाई निवर्तल्या. यांनी सासूबाईंनी सगळी कार्य खूपच नीट केली. तेराव्याची जेवणं उरकली आणि नातेवाईक निघाले... त्यारात्रीत सगळं बदलून गेलं.
त्यारात्री त्यांनी मला आतल्या खोलीत बोलावून घेतलं. तोवर अरुण लहान राहिला नव्हता. चांगला बारावीत होता. त्यामुळे मी आत जायला तशी तयारच नव्हते. पण काय मनात होतं यांच्या नकळे... त्याच्या समोर बखोटाला धरून यांनी आत नेलं. आत जो काही छळ केला त्याचा तर आता या वयाला विचारसुद्धा नको वाटतो. त्यानंतर जमते दोन-चार महिने. अरूंचा बारावीचा रिझल्ट लागला आणि यांनीहून आग्रहाने त्याला परदेशाच्या शिक्षणासाठी पाठवून दिल. त्यासाठी त्याकाळी कर्ज देखील काढलं होत त्यांनी. अरुणच्या मनावर त्या कर्जाचा बोजा इतका वाढवून दिला होता त्यांनी की कधी चुकून त्याने इथे येण्याचा विषय काढला तरी फक्त 'कर्ज आहे रे अजून;' हे एक वाक्य पुरायच त्याला तो विचार सोडून द्यायला. अरुण गेला आणि माझं घर म्हणजे तुरुंग आणि आयुष्य म्हणजे शरीरातली कैद झालं. किती वर्ष लोटली त्याला आता गिनती देखील नाही. मला मन आहे.... भावना आहेत.... इच्छा-आकांशा आहेत हेच मुळी मी विसरून गेले होते....
.... आणि मग अरुण आला.... आपल्या गोंडस लेकाला आणि गुणी बायकोला घेऊन आला. येताना पैशाचा डोंगर घेऊन आला होता. त्यामुळे यांचं तोंडच बंद झालं ओत. अरुण आला त्या काळात यांनी मला स्वयंपाकघरात देखील ऐकट सोडलं नाही. तरीही एका क्षणी त्यांच्या नकळत अरुणने मला सांगायचं प्रयत्न केला होता की आता या तुरूंगातून मी माझी सुटका करून घेतली पाहिजे. मलादेखील त्याच्या रूपाने सुटकेचा किरण दिसला होता. पण मग काय झालं ते कळलंच नाही. दोन दिवसांसाठी अरुण बायकोला घेऊन गेला होता. त्याच्या लेकाला आमच्यावर सोडून. यांनादेखील गोंडस लहानग्या नातवाचा लळा लागला होता असं मला वाटत होतं. पण अरुणाला घाईघाईने परत बोलावून घ्यावं लागलं ते त्याच्या बाळाच्या अंतिम विधीसाठीच. काय तोंड दाखवणार होते मी अरुणला आणि त्याच्या बायकोला? यांचा स्वभाव पूर्ण माहीत असूनही मीच आग्रहाने अरूणच्या लेकाला ठेवून घेतलं होत माझ्याकडे. त्यामुळे अरुणने कितीतरी बोलायचा प्रयत्न केला पण मीई त्याच्या समोर जायलाच नकार दिला. शेवटी तो बायकोला घेऊन कायमचाच निघुन गेला आणि मी माझ्या आयुष्यच वास्तव स्वीकारलं.
दोन महिने झाले असतील त्या घटनेला आणि अचानक यांचं झोपेतून दचकून उठणं आणि अरुणच्या लेकाच्या नावाने हाका मारणं सुरू झालं. त्यांच्यातला बदल त्यांनाच लक्षात आला बहुतेक... आणि मग अचानक येऊन म्हणाले हे घर सोडणार आहोत आपण. गावाबाहेर एक बंगल्यांची कॉलनी बांधत आहेत. तिथे एक सुंदर शांत असा बंगला मी बघितला आहे. तुला खूप आवडेल. तस तुला शांतता खूप आवडते न. म्हणून तुझाच विचार करून घेतला आहे तो बंगला. माझ्याशी आयुष्यात कधी बसून दोन शब्दही न बोलता यांना मला काय आवडतं हे कसं माहीत? कधी विचारलं तरी होतं का यांनी मला? हा भर वस्तीमधला अगदी बाजारपेठेतला सुंदर वाडा सोडायला माझं मन तयारच नव्हतं. खिडकीतून येणारी जाणारी लोकं दिसायची तोच काय तो माझ्या शुष्क आयुष्यातला विरंगुळा होता. पण बाळाचे भास वाढायला लागले आणि घाईघाईने निर्णय घेऊन यांनी वाडा सोडला.
हे म्हणतील तसं त्यांचं ऐकत जगायचं याची सवय इतकी झाली होती की मी काहीच म्हंटल नाही. पण इथे आलो आणि माझ्या लक्षात आलं की आता आयुष्य म्हणजे फक्त तुरुंगवास नाही तर साखळदंडांनी बांधलेल्या कायद्याची शिक्षा सुरू झाली आहे. माझं बाहेर पडणच काय पण खिडकीकडे जाणं देखील यांनी बंद करून टाकलं. गावात असतानाच यांनी लोकांना सांगायला सुरवात केली ओटी की मी एकलकोंडी बाई आहे. इथे तर त्यापुढील पायरी गाठली यांनी माझ्या बदनामीची. एकएकदा इतका राग यायचा मनातून. पण अरुणच्या लेकाच्या वेळची घेताना आठवून मी कधीच कोणाशीही बोलायचा प्रयत्न केला नाही.
पण मग अवि आणि सरू त्यांच्या लहानग्या पिल्लाला घेऊन जवळच्याच एका बंगल्यात राहायला आले आणि माझ्या मनाने परत एकदा उचल घेतली. माझ्या मनाने त्या कुटुंबाकडे ओढ घ्यायला सुरवात केली. यांच्या नकळत मी खिडकीतून त्या घराकडे हळूच नजर टाकायचे. मग तर तसा नादच लागला. तो इवलासा छोकरा सतत त्यांच्या आवारात खेळत असायचा. एकदिवस तो दिसला नाही तर मन कावर-बावर झालं आणि गेले बघायला. तर तो लब्बाड मागील दारी होता. मग त्याच्या आईच्या नकळत त्याच्याशी दोन शब्द बोलले आणि पटकन परत आले. माझं हे गुपित माझ्याकडेच राहिलं आणि हळूहळू थोडी हिम्मत वाढली. पण मग एक दिवस सरू तिच्या लेकाला घेऊन आमच्या घरात वादळासारखी शिरली आणि............ आणि मग ते वादळ त्या तिघांच्या मृत्यूनंतरच थांबलं.
त्यानंतर यांच्या व्यतिरिक्त मी कोणाशी बोलेन ही आशाच मी सोडून दिली. पण मनुष्य स्वभाव तरी कसा! हे आज पडले आणि आता तीन आठवड्यांची अंथरुणात अडकले आहेत तर परत एकदा माझ्या जीवाने उचल खाल्ली आहे. बाहेरच्या जगाशी थोडा तरी संपर्क होईल का? ही आशा परत एकदा मनात जागृत झाली आहे.
समाप्त
No comments:
Post a Comment