अनाहत सत्य
भाग 4
भाग 4
"दीदी....." परत एकदा मागून मिठठू ची हाक ऐकून निर्मिती बाहेर आली.
"क्या हुवा मिठठू?" त्याच्याकडे बघत तिने विचारलं.
"दीदी, तुम्हाला प्रश्न पडला असेल नं की मला इतकी माहिती कशी? मी मराठी कसं बोलू शकतो? असंही वाटत असेल की सरांना यातील काहीही माहीत नाही? दीदी, एक सांगू.... सरांना सगळं माहीत आहे. माझी तर खात्रीच आहे की त्या मंदिराचं गूढ देखील त्यांनी शोधलं आहे. किंवा किमान त्यांना अंदाज आला आहे; तिथे नक्की काय आहे त्याचा." मिठठू परत एकदा जवळच्या दगडावर बसत म्हणाला.
निर्मितीच्या लक्षात आलं की आज मिठठू मनातलं सगळं बोलून टाकायच्या मनस्थितीत आहे. तिला देखील अनेक गोष्टी समजून घ्यायची इच्छा होती. त्यामुळे ती देखील त्याच्या समोर बसली आणि म्हणाली; "मिठठू, हे खरं आहे की तू इतकं चांगलंमआराठी कसं बोलू शकतोस; हा प्रश्न मला सतावतो आहे. पण तुला इतकी सगळी माहिती कशी... हा प्रश्न नाही आला मनात. उलट कौतुक वाटलं. तू ज्या परिस्थितीमधून पुढे आला आहेस; त्याचा बाऊ न करता तू जिद्दीने अभ्यास करतो आहेस हेच सिद्ध होतं तुझ्याकडे असणारी माहिती ऐकून."
".... आणि दीदी, मी जर तुम्हाला म्हंटलं की माझ्याकडची माहिती मी पुस्तकातून नाही वाचलेली; तर?" स्थिर आवाजात मिठठू म्हणाला. निर्मितीला त्याचा चेहेरा चांदण्यामध्ये अगदीच अस्पष्ट दिसत होता. तरीही त्याचे चमकणारे डोळे तिला काहीतरी वेगळी जाणिव करून देत होते.
"मिठठू थोड्या वेळापूर्वी तर तू म्हणालास की तू मला जरुरी पेक्षा जास्त माहिती दिली आहेस... आणि तरीही तू परत एकदा मला स्वतः हाक मारून बोलतो आहेस. असं काय आहे की जे तुझ्या ओठांपर्यंत येतं आहे पण तू मागे ढकलतो आहेस? तू जर बोललास तर कोणी तुला शिक्षा करेल अशी भीती आहे का तुला?" निर्मितीने त्याला विचारलं.
"भिती का मतलब हम कोई भी नही जानते दिदी. हम हमारे आजूबाजू की इस खूबसुरत दुनिया के साथ मिलजुलकर रेहेना जानते है... और चाहते भी है. हमरा बस चले तो यहा किसींको भी न आने दे हम." मिठठू तंद्रीमध्ये बोलत होता.
"पण तू स्वतःच तर सरांना बोलावून घेतलं आहेस न...." निर्मितीने त्याला अचानक प्रश्न केला.
"वो संकेत मुझे मिला और फिर मैने मुखीया को समझाया... वो मान गाये और मैने सर से बात की. मुझे..." मिठठू त्याच तंद्रीत बोलून गेला आणि बोलता बोलता थांबला.
"दिदी....."
"मिठठू, आत्ता तू मला जे जे सांगशील ते फक्त तुझ्या माझ्यात राहील हा शब्द देते मी तुला. पण मोकळेपणी बोल. एक लक्षात घे की तुझी माहिती कदाचित आम्हाला उद्या ते मंदिर बघताना उपयोगी पडेल." त्याच्या जवळ सरकून त्याचा हा अत्यंत प्रेमाने हातात घेत अगदी मऊ शब्दात निर्मिती म्हणाली.
"दिदी.... मुझे मालूम था की एक दिन आप आओगे. म्हणजे तुम्ही.... निर्मिती.... येणार असं नव्हतं माहीत. पण मला जो संकेत मिळाला होता... त्यात दोन व्यक्ती अपेक्षित होत्या. अनेक महिने एकटे सर येत होते... त्यामुळे मी अलीकडे अस्वस्थ झालो होतो. मला संकेत कळला नाही की काय; असं वाटायला लागलं होतं. पण तुम्हाला बघितलं आणि लक्षात आलं की तुम्हीच ती दुसरी व्यक्ती आहात. दिदी, मला फार काही माहीत नाही.... पण तुमचं आयुष्य नक्की बदलणार आहे इथून जाताना; हे मला माहीत आहे. मुख्य म्हणजे इथून तुम्ही वेड न लागता जाणार आहात याची मला खात्री आहे." मिठठू म्हणाला. त्याच्या बोलण्याने निर्मिती थोडी दचकली आणि तिने मिठठूला विचारलं; " तू नक्की काय म्हणतो आहेस मिठठू?"
"दिदी, तुम्हाला सरांनी सांगितलं नाही का मंदिराचं सत्य? मला माहीत आहे; नक्की सांगितलं असेल. कारण प्रोफेसर सर कोणालाही इथे फसवून आणणार नाहीत. ते तसे आहेत; म्हणूनच तर मी त्यांनाच कॉन्टॅक्ट केलं. नाहीतर आज त्यांच्याहूनही जास्त शिकलेले आणि माहिती असलेले अनेक तरुण प्रोफेसर्स आहेत की. पण ते मंदिर बघताना हुशारी आणि माहिती असणं जसं आवश्यक आहे तसच भावनिकता देखील महत्वाची आहे. मुळात आम्ही इथे राहाणारे सगळे आदिवासी आजही केवळ भावनिकतेवरच तर जगतो आहोत. " मिठठू म्हणाला.
निर्मितीला त्याच्या बोलण्याचा काहीच अर्थ लागला नाही. "काय म्हणतो आहेस तू मिठठू? मंदिराचं सत्य? नाही रे! सरांनी मला असं काहीच वेगळं सांगितलं नाही." निर्मिती गोंधळून म्हणाली.
"दिदी, नीट आठवा.... सरांनी तुम्हाला सांगितलं असेल की इथे येणारे लोक एकतर वेडे होतात किंवा गायब होतात."
"हो! हे त्यांनी सांगितलं होतं मला. पण हे सगळं इथल्या लोकांनी पसरवलेलं असेल न. त्या देवळापाशी सहसा कोणी जाऊ नये म्हणून." निर्मिती अजूनही गोंधळलेलीच होती.
"होय दिदी! थोडं पसरवलेलं आहे. पण मुळात काहीतरी असेल म्हणून तर धूर काढू शकतो आहोत आपण." मिठठू म्हणाला.
"मिठठू, तू कोड्यात बोलणं बंद करशील का जरा? नीट काय ते सांग मला." निर्मिती काहीशी वैतागत म्हणाली.
"दिदी, मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला म्हंटलं न की या भागात जे होमो सेपियन्स आले आणि मग नाहीसे झाले.... ते जर नाहीसे झालेच नसतील तर?" मिठठू म्हणाला.
निर्मिती क्षणभर शांत राहिली आणि मग बोलायला लागली; " मिठठू, तू उगाच माझ्या मनात साशंकता निर्माण करतो आहेस असं आता मला वाटायला लागलं आहे. कारण तू जे म्हणालास की होमो सेपियन्स इथे आले आणि मग गायब झाले... तर ते तसं फारसं खरं नाही. कारण... तू इथेच राहातो आहेस. तुमच्या या कबिल्याप्रमाणे इथे अनेक कबिले आहेत.... अगदी नरभक्षक देखील आहेत खोल जंगलात. हे कोण आहेत असं तुला वाटतं? अरे आपण सगळेच त्या होमो सेपियन्सचे वंशज आहोत. हे बघ मिठठू..... होमो सेपियन्सची उत्पत्ती तू थोड्या वेळापूर्वी मला सांगत होतास न तेव्हा मला तुझं खूप कौतुक वाटत होतं. म्हणून मी तुला अडवलं नाही. पण अरे माझा अभ्यासाचा विषयच मानव जन्म आणि आपला इतिहास हा आहे.
मिठठू, साधारण 13.5 बिलियन वर्षांपूर्वी एक माहास्फोट झाला आणि वेळ, ऊर्जा, अवकाशआणि पदार्थ अस्तित्वात आले. त्यानंतर देखील साधारण चार बिलियन वर्षांपूर्वी आपल्या या ग्रहावर काही विशिष्ठ रेणू विशिष्ठ ऊर्जेच्या संपर्कात आले आणि त्यातून सजीव निर्माण झाले. मग कधीतरी साधारण 70000 वर्षांपूर्वी या सजीवांमधल्या होमो सेपियन नावाच्या एका प्रजातीने अजूनच गुंतागुंतीची आणि विस्तृत रचना तयार केली, तिला संस्कृती म्हटलं जातं, या संस्कृतींचा अभ्यास म्हणजे इतिहास. अर्थात हा एक सिद्धांत आहे. सिद्धांत म्हणजे नियम नाही... एखाद्या निरीक्षकाच्या अनेक निरीक्षणांचा तपासून सिद्ध करता येईल असा संच म्हणजे सिद्धांत. आपले पूर्वज.. ज्यांचा उल्लेख तू केलास... होमो सेपियन्स... ते होमो सेपियन्स निर्माण होण्या अगोदर अनेक संक्रमणं झाली हे तुला माहीत आहे का?
होमो सेपियन्सचे चुलत भाऊ... म्हणजे होमो सेपियन्स मधील नर किंवा मादी आणि अजून एक प्रजाती यांच्या संक्रमणातून हे चुलत भाऊ निर्माण झाले होते. त्यांना होमो निअंडरथल म्हणतात. आपल्याहून ताकदवान, मोठा मेंदू असणारे मानव होते ते. अगदी तीस हसज वर्षांपूर्वीपर्यंत ते आपल्या सोबत या ग्रहावर नांदत होते. त्याच्या प्रमाणेच होमो सेपियन्सचे अनेक इतर भाऊ.... म्हणजे होमोच्या प्रजाती होत्या. होमो फ्लोरिसीएनसिस, होमो हबिलीसहोमो, हैडेलबेग्रेसीस, होमो नालेंदी, होमो निअंडरथलेसिस असे अनेक होते. आपण मुळात माकडांपासून नाही बनलो; तर माकड सदृश प्राण्यापासून उत्क्रांत झालो आहोत. त्या प्राण्यापासून एक शाखा मानव बनली आणि दुसरी माकड.
मिठठू, अरे विचार कर, जर आपण फक्त माकडापासून उत्क्रांत झालो असतो तर माकडं आज असती का? त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की; जेंव्हा एखादी नवीन स्पिसिज या भूतलावर येते तेंव्हा काही हजार/ लाख वर्ष ती ज्या प्रजातीपासून फुटून वेगळी झालीय ती प्रजातीही या जगात असते, त्या काळात हि नवीन तयार झालेली प्रजाती आपल्या मूळ प्रजातीबरोबर सतत संकर करत असते कारण त्यांची गुणसूत्र जवळ जवळ सारखी असतात, आणि अशा कित्येक प्रजाती तयार होत असतात. काही काळात जर हि नवीन प्रजाती मूळ प्रजातिपेक्षा जगण्याच्या शर्यतीत यशस्वी ठरली तर ती जुन्या प्रजातीत आपले सगळे जीन्स पसरवून टाकते आणि जुनी प्रजाती नामशेष होते.
तसे आपल्यातले जे होमो जुळवून घेऊ शकले नाहीत ते नष्ट पावले आणि ज्यांनी बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये स्वतःला बदललं ते त्यांची उत्क्रांती होत राहिली. होमो सेपियन... म्हणजे आपला पूर्वज हा इतर सर्व प्रजातीपासून वेगळा झाला कारण त्याने बदलत्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार स्वतःच्या जनुकीय उत्पत्ती मध्ये केला. आपल्या पूर्वजासोबत ज्या इतर जाती होत्या किंवा असं म्हणू की जे होमो होते त्यांनी होणारे बदल एकतर स्विकारले नाहीत किंवा त्यांच्यात जनुकीय बदल टिकले नाहीत; किंवा हे बदल काही प्रजातींना झेपले नाहीत. त्यामुळे पुढे कालौघात या जाती नष्ट पावल्या .
पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की Nature is enormous but not intelligent. त्यामुळे सर्वसाधारणपणे जगण्यासाठीचे बदल हे आपोआप होत गेले. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर... आपल्या हाताच्या अंगठ्याचे बोटं इतर चार बोटांपेक्षा दूर असले तर आपली पकड अजून मजबूत होईल हे आपल्या पूर्वजाला माहीत नव्हतं, पण अपघाताने असा एखादा जन्माला आला, मग या सोयीमुळे तो जास्त जगला, त्याला जास्त मुलं झाली आणि हळूहळू आपल्या सगळ्यांचे अंगठे माकडांना ठेंगा दाखवण्या इतपत बदलले." निर्मिती स्वतःच्याच तंद्रीमध्ये बोलत होती. पण अचानक तिला भान आलं आणि बोलायचं थांबवून तिने मिठठूकडे बघितलं.
"कंटाळलास ना मिठठू? मी पण बघ न कुठे तुला काहीसा कंटाळवाणा इतिहास... माहिती देत बसले आहे." हसत निर्मिती म्हणाली.
"दिदी, असं नका म्हणू. ही सगळीच माहिती माझ्यासाठी नवीन नाही. पण तरीही तुम्ही ती ज्या पद्धतीने समजावता आहात न... त्यातून मला काही वेगळेच अर्थ लागायला लागले आहेत. दिदी, तुम्ही इतक्या मनापासून आणि मोकळेपणी बोलता आहात की वाटतं तुमच्याशी असंच बोलत राहावं. खर सांगू का? माझ्या मनात खरंच खूप काही आहे... जे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं आहे. सर माझ्याहून वयाने खूपच मोठे आहेत. त्यामुळे इच्छा असूनही त्यांच्याशी बोलताना एक दडपण येतं... आणि माझ्या सोबतचे इथले जे आहेत... त्याच्या स्वतःच्या अशा काही कल्पना आहेत... विचार आहेत... त्यामुळे ते मला समजून घेऊ शकत नाहीत; असं मला वाटतं. दिदी; इथली काही सत्य आहेत... जी मी तुम्हाला सांगणार आहे.... पण त्यासाठी मला वेगळी परवानगी घ्यावी लागेल. त्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. तुम्ही असं काही करू शकता का... की आपण उद्याच्या ऐवजी परवा जाऊ मंदिराकडे?" मिठठू अगदी मनापासून बोलतो आहे हे निर्मितीच्या लक्षात आलं. त्याच्याकडे बघत हसत निर्मिती म्हणाली; "अरे अगदी सोपं आहे. तू उद्या नको येऊस आम्हाला घ्यायला... म्हणजे तुझी वाट बघत आम्ही थांबून राहू आणि उद्याचा दिवस टाळता येईल."
तिचं बोलणं ऐकून मिठठू हसला आणि म्हणाला; " दिदी, तुम्ही अजून सरांना ओळखलं नाही वाटतं? त्यांना माझी गरज नाही देवळाकडे जायला. इथवर येण्यासाठी देखील... मी म्हणजे एक सोबत असतो... वाटाड्या नाही. दिदी, एक सांगू? सरांनी काहीतरी नक्की शोधून काढलं आहे... पण ते अजून त्यावर काही बोलत नाही आहेत. कदाचित त्यांना स्वतःची खात्री करून घ्यायची असेल... कदाचित म्हणूनच त्यांनी तुम्हाला इथे आणलं असेल. म्हणूनच म्हणतो आहे; की त्यांना माझी गरज नाही आहे... त्यात एकदा सरांनी स्वतःचं शेड्युल ठरवलं की ते कोणाचंही ऐकणार नाहीत. म्हणून विचारलं तुम्हाला की अगदी त्यांना पटेल असं कारणच सांगावं लागेल त्यांना. तुम्हाला बरं वाटत नाही असं काही सांगू नका... ते त्यांना पटणार नाही. किंवा मग तुम्हाला सोडून ते निघतील." एका दमात मिठठू बोलला.
निर्मितीला त्याचं म्हणणं पटलं आणि ती देखील हसली. काही क्षण विचार करून ती मिठठूला म्हणाली; "मिठठू, खोटं बोललेलं कायमच पकडलं जात आणि त्याचे परिणाम फार वाईट होतात.... आणि खरं सांगितल्याने कदाचित समोरची व्यक्ती दुखावली जाते किंवा नाराज होते... पण आपण समजून काढू शकतो. त्यामुळे मला वाटतं उद्याचा एक दिवस थांबून आपण परवा देवळाकडे जायला निघुया हे सत्य आपण सरांना सांगितलं पाहिजे. मला खात्री आहे... त्यांना हे पटेल. कोणतीही रिस्क घेऊन ते काही करणार नाहीत."
मिठठूला देखील निर्मितीचं म्हणणं पटलं आणि त्याने हसून मान डोलावली. असेच काही क्षण गेले आणि मिठठूने निर्मितीला विचारलं; "दिदी, आपले पूर्वज होमो सेपियन्स होते... म्हणजे आपली जनुकं त्यांच्यातील बदलांमुळे निर्माण झालेली आहेत. पण मला हे कळत नाही की तुम्ही आत्ता जी नावं संगीतलीत ते सर्व होमो म्हणजे मूलतः एकच तर होते. मग हे असे बदल कसे होत गेले?"
त्याच्या प्रश्नाचं निर्मितीला कौतुक वाटलं. तिला वाटलं होतं की एव्हाना मिठठूला कंटाळा आला असेल तिच्या या माहितीपूर्ण बदबडीचा... त्यामुळे हसून ती म्हणाली; "अरे अगदी सोपं आहे हे समजायला... हे बघ; एकत्र कुटुंबातून जेंव्हा एखादं जोडपं वेगळं निघून स्वतःच घर करतं, तेंव्हा त्याचे काही टप्पे असतात, सुरवातीला झोपायची खोली वेगळी होते, मग वस्तू वेगळ्या होतात, हळूहळू चूल वेगळी होते आणि मग ते कुटुंब वेगळं घर म्हणून ओळखलं जातं. निसर्गात जेंव्हा एखादी नवीन प्रजाती तयार होते, तेंव्हा अर्थातच ती एकदम अवतीर्ण होतं नाही. तिचे कुणीतरी पूर्वज असतात, या पूर्वजांपासून एकाच वेळी अनेक प्रजाती फुटून जगात येण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थातच या सगळ्या प्रजाती आपल्या पूर्वजाशी आणि एकमेकांशी अत्यंत सारख्या असतात. त्या एकमेकांशी सहजपणे संकर करू शकतात, त्यांना अपत्य होऊ शकतात आणि त्या अपत्यांनाही पुढे संतती होते. उत्क्रांतीचा हा प्रवाह असा एखाद्या पाण्याच्या अनिर्बंध लोंढ्यासारखा ज्या दिशेने वाट मिळेल तिकडे सुसाटत पुढे जात असतो. पण एक लक्षात घे की ही प्रक्रिया लाखो वर्ष घडत असते. आपल्याही नकळत.... पण उत्क्रांती होत असते.
ही उत्क्रांती कशी होते हे जर तुला समजून घ्यायचं असेल तर तुला गेली अब्जावधी वर्ष कसे बदल होत गेले हे समजून घ्यावं लागेल. हे बघ.... मानवी कळपात आणि माकडांच्या/लांडग्यांच्या कळपात लाखभर वर्षांपूर्वीपर्यंत फक्त एक महत्वाचा फरक होता, तो म्हणजे मानवाने आगीवर नियंत्रण मिळवले होते.
काही काळानंतर बहुदा मानवाने स्वतःहून जंगलांना आगी लावायला सुरवात केली. जाळलेलं जंगल म्हणजे जणू मानवाचं पहिलं स्वयंपाकघर होतं. जमिनीत गाडलेली अनेक कंदमुळं, बिळात लपलेले प्राणी हे जंगल पेटताच आयती शिकार होऊन मानवाच्या हाती सापडू लागले. पण आगीने अजून महत्वाची गोष्ट केली जी अन्यथा शक्य नव्हती. जे अन्न मानव कच्च खाऊ शकत नव्हता, तेही त्याला भाजून खाणं शक्य झालं.
अग्नीचे नियंत्रण करू शकणारा मानव आणि इतर प्राणी यांच्यात हळू हळू एक दरी तयार होतं गेली. बहुतेक प्राणी त्यांच्या जीवितासाठी स्वतःच्या शक्तीवर अवलंबून राहतात पण मानव मात्र बाहेरची साधनं वापरू लागला, अगोदर अग्नी आणि मग हत्यारं..
अनेक शास्त्रज्ञांच्या मते, अग्नीने अजून एक महत्वाचा बदल मानवी शरीरात घडवला, भाजलेले आणि पचायला हलके अन्न खायला लागल्यावर मानवाला खूप मोठ्या आतड्याची गरज उरली नाही. त्यामुळे मानवाचं आंतडं हळूहळू आकसायला लागलं. शरीरातल्या दोन अवयवांना खूप जास्त ऊर्जा लागते, एक म्हणजे आतडी, दुसरा मेंदू. आतडी लहान व्हायला लागली तशी हि वाचलेली ऊर्जा मेंदूकडे वळवली गेली, या उपलब्ध फ्री ऊर्जेमुळे हळूहळू मानवी मेंदूचा आकार वाढायला लागला. मानव एका वेगळ्या वाटेवर चालायला लागला.
मिठठू कदाचित तुला हे समजणं सोपं जाईल की ;मोठ्या मेंदूमुळे सगळ्यात जास्त नुकसान सुरवातीच्या काळातल्या स्त्रियांचं झालं. कारण आजही अनेक आदिवासी जातींमध्ये मोठ्या डोक्याची अर्भक जन्मतात. तू अशी अनेक उदाहरणं बघितली असशील. यात आपण एक समजून घेणं आवश्यक आहे की एकतर मनुष्य हा दोन पायांवर चालणार प्राणी, त्यामुळे मनुष्य प्राणाच्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा आकार मर्यादित, त्यात लहान कटीभाग. या छोट्या जागेत या स्त्रियांना अशी बाळं वाढवायची होती ज्यांचा मेंदू सतत मोठा होतं होता आणि मेंदू बरोबरच डोकं.. हे मोठं डोकं असलेली मुलं शरीराबाहेर काढणं हे मानवी स्त्रीसाठी प्रचंड कठीण काम आहे. आजही मानवी स्त्रीइतक्या प्रसववेदना प्राणीजगतातली कोणतीही मादी बहुदा सहन करत नाही. त्या सुरवातीच्या काळात बहुदा कित्येक मुलं आणि स्त्रिया बहुदा अशाच मेल्या असाव्या.
या समस्येवर उत्क्रांतीच्या चक्रात एक तोडगा मिळाला, अशा स्त्रिया, ज्यांची मुलं अपुरी वाढ झालेली असतानाच जन्माला यायचे, त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या जगण्याची शक्यता वाढली. भले अपुरी वाढ झाली असल्याने बऱ्याच मुलांचे बालमृत्यू होतं असतील पण आईचा मृत्यू होण्यापेक्षा हे चांगलं. त्यामुळेच बाळाचा मेंदू आणि डोकं लहान असतानाच मानव प्राणी त्याला जन्म देऊ लागला. आजही आपण तुलना केल्यास मानवी बाळं खूप जास्त काळ आपल्या आई वडिलांवर अवलंबून असतं, याच साधं कारण हे आहे की ते मुळातच अविकसित अवस्थेत जन्माला येतं.
प्राण्याचे अन्नसाखळीतील स्थान तो हि ऊर्जा आपल्या शरीरात कोणत्या टप्प्यावर ग्रहण करतो, आणि त्याच्या कडून हि ऊर्जा कोण काढून घेते यावर ठरते. वाघ सिंहासारखे मांसाहारी प्राणी या पृथ्वीवर आल्यापासून या अन्नसाखळीत सर्वोच्च स्थानी आहेत. हरीण, माकडं, म्हशी असे प्राणी पहिल्यापासूनच मधल्या स्थानावर आहेत. मानव हा एकमेव असा प्राणी आहे ज्याचं अन्नसाखळीतील स्थान बदललंय. माकड आणि हरिणांबरोबर लाखो वर्ष अन्नसाखळीत मधल्या स्थानी राहिल्यावर काही हजार वर्षात मानवाने अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थान व्यापले.
आता तुझ्या लक्षात आलं का... म्हणूनच मधमाशीचं पोवळ, हरणं - म्हशी -झेब्रा यांच्या झुंडी आणि हत्ती माकडं रानडुक्कर यांचे कळप असतात...."
निर्मिती अजूनही बोलत राहिली पण तिला अडवत मिठठू म्हणाला; "दिदी, जर एकूणच उत्क्रांती सगळ्याच होमोज मध्ये होत होती... तर केवळ होमो सेपियन्स कसे शिल्लक राहिले?"
मिठठूकडे बघत निर्मिती म्हणाली; "मिठठू, तू खरंच अगदी मनापासून ऐकतो आहेस हे कळलं मला. नाहीतर अगदी योग्य प्रश्न योग्य वेळी तू विचारला नसतास. या प्रश्नच उत्तर तसं म्हंटलं तर अगदी सोपं आणि लहानसं आहे... होमो सेपियन्स जगले आणि उत्क्रांत होत गेले... कारण इतर कोणत्याही होमोंमध्ये जे विकसित झालं नाही ते होमो सेपियन्सनी विकसित केलं होतं. एकमेकांमधील संवाद! भाषा!! इतर सर्व होमोजपेक्षा वेगळी अशी स्वतःची भाषा निर्माण केली होमो सेपियन्सनी. त्यामुळे विचारांची देवाण-घेवाण आणि होणाऱ्या प्रत्येक बदलाचा एकमेकांना सांगून केलेला स्वीकार... यामुळे होमो सेपियन्स अब्जावधी वर्षांनंतर देखील आजही आहेत आणि त्यांच्यात उत्क्रांती होत आहे."
"अगदी खरं दिदी. And here I differ with my opnion. आपली उत्क्रांती आजही होत आहे.... अंह! आता आपण अधोगतीला लागले आहोत.... आणि ही घसरणीला लागलेली गाडी त्यांच्या लक्षात आली आहे; म्हणूनच आज तू आणि सर इथे आला आहात." मिठठू खोल अंधारात बघत म्हणाला.
बहुतेक तंद्रीमध्ये किंवा झोप आली असल्याने मिठठू काहीतरी बोलतो आहे असं निर्मितीला वाटलं... तिने त्याला हाक मारली... "मिठठू... काय बोलतो आहेस तू?"
अगदी शांतपणे निर्मितीकडे नजर वळवून मिठठू म्हणाला; "दिदी, जा झोपायला. सरांना माझा निरोप दे... मी परवानगी घ्यायला जातो आहे. एक दिवस थांबा म्हणून सांग...."
इतकं बोलून मिठठू एकदम उठला आणि अंधारात सर्रकन चालत निघून गेला. काहीही कळायच्या आत निघून गेलेल्या मिठठूच्या दिशेने बघत गोंधळलेली निर्मिती तशीच बसून राहिली काही वेळ... आणि मग तो नक्की परत येत नाही हे लक्षात आल्यावर उठून झोपण्यासाठी वळली.
क्रमशः
No comments:
Post a Comment