अनाहत सत्य
भाग 2
कॉलेजमध्ये निर्मितीने मानवीय जीवन उत्पन्न आणि त्याचा ऱ्हास हाच विषय घेतला. निर्मिती मुळात तशी अबोल स्वभावाची होती. त्यामुळे ती कायम हातात पुस्तक घेऊन काही ना काही वाचत बसलेली असायची. तिला प्रत्येक युगातील मानवी आयुष्याबद्दल जाणून घ्यायची ओढ होती. मानव जन्माला कसा आला असेल? त्याने स्वतःला कसे प्रगत केले असेल? कसे जगत असतील ते लोक त्या काळात? त्यावेळची संस्कृती किती प्रगत झाली होती? कधी ऱ्हास पावली .... त्याची कारणं काय असतील? त्यावेळची भाषा, व्यवहार, धर्म, चाली-रिती...... निर्मितीला सगळ सगळ समजून घ्यायचं होत. तो एकच ध्यास हळू हळू तिच्या मनाने घेतला होता. त्यामुळे ती सतत तिच्या कॉलेजातल्या प्रोफेसर्सना आणि त्याचबरोबर प्रोफेसर राणेंना भेटून विविध प्रश्न विचारायची आणि त्यांनी सांगितलेली सगळी रेफरन्स बुक्स शोधून वाचून नोट्स तयार करायची. तिचा कॉलेजचा अभ्यास तर चालूच होता पण त्याबरोबरच तिने बरीचशी अवांतर माहिती देखील मिळवली होती.
निर्मिती पदवीधर झाली आणि राणे सरांनी तिला बोलावून घेतलं. तिला समोर बसवत त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे लगेच विषयाला हात घातला आणि तिला विचारलं,"बेटा आता तू पुढे काय करायचं ठरवल आहेस? एम. ए. तर करशीलच आणि मग पी. एच. डी. देखील होईलच. पण नक्की कोणत्या दिशेने तुझा अभ्यास तू करणार आहेस?" निर्मितीने अगदी क्षणभर विचार केला आणि ती हसत हसत म्हणाली,"सर तुम्ही मला हा प्रश्न विचरता आहात म्हणजे तुम्ही नक्कीच माझ्यासाठी काहीतरी विचार करून ठेवलेला असणार. त्यामुळे मी काय ठरवल आहे यापेक्षा तुम्ही माझ्यासाठी काय विचार केला आहे ते समजून घ्यायला मला जास्त आवडेल." तिच उत्तर एकून राणे सर देखील हसले. पण मग थोडं गंभीर होत ते म्हणाले,"हे बघ बेटा, तुला माहीतच आहे गेले काही महिने मी आसामच्या एका खोऱ्यात सतत जातो आहे. तिथे एका खूप जुन्या संसकृतीच अस्तित्व सापडलं आहे. इतक्या दिवसांच्या भेटी नंतर मी इतकीच माहिती सांगू शकतो की ते जे काही मंदिर सदृश आहे तिथूनच खरी सुरवात आहे. कदाचित् अनेक युगांपूर्वीची संस्कृती असावी असा माझा कयास आहे. परंतु अजूनही मी याविषयी खूपच शाशंक असल्याने कोणाकडेही फारसे बोललेलो नाही. हा परिसर घनदाट झाडांनी आच्छादलेला आहे. त्यामुळे भर दिवसा देखील तिथे फारसा उजेड नसतो. त्यात तिथेल्या आदिवासींमध्ये असा समाज आहे की तो एकूण भाग शापित आहे. मी हळूहळू त्या लोकांचा विश्वास मिळवून त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा मला समजल की त्या आदिवासींचा अनुभव असा आहे की तिथे येणाऱ्या आपल्यासारख्या बाहेरच्या लोकांना वेड लागत किंवा मग ते अचानक गायब होतात . अर्थात तिथल्या स्थानिकांना मात्र कधी हा त्रास झालेला नाही. त्यामुळे त्यांचा त्या भागातला वावर अगदी सहज असतो. असाच त्यांच्यातलाच तिथेच खेळत मोठा झालेला; एक मुलगा मिठ्ठू चांगला शिकला. त्याला त्या जागेच महत्व समजल. हे शापित मंदिर काहीतरी खूप महत्वाचं आहे ज्याचा उलगडा अजूनही झालेला नाही हे लक्षात आल्यामुळे त्याने स्थानिकांच्या नकळत त्या जागेची माहिती आपल्या पुरातत्व विभागापर्यंत पोहोचवली आणि तिथल्या स्थापत्याचा आणि त्या अनुषंगाने त्या काळातील मानवी जीवनाचा शोध आणि अभ्यास करायची जवाबदरी माझ्यावर टाकण्यात आली." बोलता बोलताच राणे सरांची तंद्री लागली. निर्मितीला त्यांची ही सवय देखील माहित होती. त्यामुळे ती काही न बोलता बसून राहिली. कारण तिला माहित होत की सरांनी तिला आपणहून बोलावून घेतल आहे याचा अर्थ त्यांच्या मनात काहीतरी नक्की असणार.
असाच थोडा वेळ गेला आणि सर भानावर आले. त्यांनी निर्मितीकडे बघितल आणि आपली तंद्री लागली होती हे त्यांच्या लक्षात येऊन ते हसले. निर्मितीकडे बघत ते म्हणाले,"अग बेटा माझी बोलता बोलता तंद्री लागली पण तू तरी हाक मारायची न मला." त्यावर निर्मिती हसली आणि म्हणाली,"सर, तुम्ही मला आपणहून बोलावल आहात म्हणजे तुमच्या मनात काहीतरी आहे जे तुम्ही मला नक्की सांगणार आहात. मग मी तुमच्या विचारांची शृंखला कशाला तोडू." तिचा समंजसपणा बघून सरांना बर वाटल. ते उठून तिच्या शेजारच्या खुर्चीत येऊन बसले आणि तिला म्हणाले,"बेटा, मला हा तुझा समजुतदारपणा आणि पेशन्स खरच खूप आवडतो. बर, मी फार मोठं भाषण वगैरे देणार नाही आहे तुला, फक्त इतकच सांगतो की मी त्या जागेचा अभ्यास करण्यासाठी पुढच्या आठवड्यात तिथे जातो आहे. माझी इच्छा आहे की तू देखील माझ्याबरोबर तिथे चलावस. कारण तुझ वय जरी लहान असलं तरी तुझ्या बुद्धीचा आवाका मला माहित आहे. आणि तुझ्यासाठी तिथे खूप काही शिकण्यासारख आहे बेटा. पण अर्थात तू याव अस जरी मला वाटत असल तरी यायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी तुझाच असणार आहे. मला वाटत एकदा तू तुझ्या आई-वडिलांशी बोलून घे."
राणे सरांचं बोलणं एकून निर्मिती एकदम हरकून गेली. उठून त्यांना नमस्कार करत ती म्हणाली,"सर, तुम्ही माझ्यावर इतका विश्वास दाखवता आहात यातच सगळ आलं. मी नक्की माझ्या बाबांशी आजच बोलून घेते. मला माहित आहे आई बिलकुल तयार होणार नाही मला पाठवायला. पण बाबा तिला समजावतील याचा देखील विश्वास आहे. खर तर मी उद्या संध्याकाळच गावाच तिकीट काढल होत. काही दिवस घरी जाऊन यायचा विचार केला होता. पण ते मी आताच जाऊन रद्द करून टाकते. म्हणजे तुमच्या बरोबर येण्या अगोदर तिथल्या भौगोलिक आणि ऐतिहासिक आणि पुरातन शास्त्राचा थोडा फार अभ्यास करायला मला वेळ मिळेल. सर, मी तुमच्या बरोबर येणार... अगदी नक्की येणार. इतकी मोठी संधी मला सोडायची नाही आहे. सर, एम. ए. आणि पी. एच. डी. तर होत राहील. ते औपचारिक शिक्षण आहे. पण तुमच्या बरोबर तिथे जाऊन जे शिकेन ते मला आयुष्यभर उपयोगाला येणार आहे. मला कायमच मानवी संस्कृतीबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. पूर्वी अनेकदा मानवी संस्कृती प्रगत झाली होती. याची अनेक दाखले आहेत आपल्याकडे. पण मग त्यांचा ऱ्हास झाला. अनेकदा या ऱ्हासाच कारण नैसर्गिक आपत्ति हेच समोर येत. पण का कोणास ठाऊक मला वाटत की निसर्गातल्या त्या सर्वमान्य शक्तिला डोळे आहेत आणि म्हणूनच ती शक्ति ठरवते की ही मानव संस्कृती आता अशा उत्कर्षाला पोहोचली आहे की येथून पुढे जाण्याचा मार्गच नाही. त्यामुळे मग ही प्रगत जमात एकमेकांवर कुरघोडी करायला सुरवात करते. त्यात कदाचित निसर्गाचा आणि पर्यायाने त्या शक्तीचाच नाश होऊ शकतो. अस होऊ नये म्हणून कदाचित नैसर्गिक आपत्ती निर्माण करून ही शक्ति त्या त्या काळातील मानवीय संस्कृतीचा ऱ्हास करते. पण मग परत मानव जन्मतो..... प्रगती करतो... उत्कार्षाला येतोच... आणि उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचून परत एकदा ऱ्हास..... हे चक्र युगानुयुगं चालूच आहे.
सर, अभ्यास करत असताना मी एक लेख वाचला होता. त्यात म्हंटल होत की साधारण चार बिलियन वर्षांपूर्वी, पृथ्वीवर काही विशिष्ठ रेणू, विशिष्ट उर्जेच्या संपर्कात असताना एकत्र आले आणि त्यातून सजिव तयार झाले. पुढे ७०,००० वर्षांनंतर सजीवानंमधल्या होमो सेपियन नावाच्या एका प्रजातीने गुंतागुंतीची आणि विस्तृत रचना तयार केली ती म्हणजे संस्कृती. या होमो सेपियन्समध्ये एक सब स्पेसीज अस्तित्वात होते. बहुतेक त्यांना होमो सेपियन इडालटू म्हणतात. त्यांचे साधारण पावणे दोन लाख वर्षांपूर्वीचे अवशेष इथिओपियात मिळाले आहेत. त्यानंतर ही प्रजात नष्ट झाली असे त्या लेखात म्हंटले होते. ही जात रूपाने होमो सेपियनपेक्षा वेगळी होती. सर, लेखामध्ये जरी इथिओपियाचा उल्लेख असला तरी ही माहिती वाचल्यानंतर माझ्या मनात एक शंका आली की कदाचित आपल्या इथल्या म्हणजे आजच्या भारतातल्या कोणत्या ना कोणत्या भूभागावर ते सब स्पेसीज अस्तित्वात असू शकतील का? आणि त्याआनुशांगाने मी त्यावर माहिती गोळा करण्याचे ठरवले होते. परीक्षेनंतर मला थोडा वेळ मिळाला होता त्यावेळी मी याविषयावरची पुस्तके कॉलेजच्या लायब्ररीमध्ये शोधून वाचली."
निर्मिती मनापासून बोलत होती आणि प्रोफेसर राणे ती सांगत असलेली माहिती डोळे मिटून ऐकत होते. त्यांना झोप लागली की काय असं मनात येऊन निर्मिती क्षणभर थांबली. त्याबरोबर डोळे उघडून प्रोफेसर तिला म्हणाले,"काय माहिती मिळाली तुला निर्मिती? मी ऐकतो आहे. तू बोल. अगदी योग्य दिशेने तुझं वाचन चालू आहे... हे मी तुला नक्की सांगतो."
त्यांच बोलण एकून निर्मिती अजून उत्साहाने सांगायला लागली,"सर, मी जी माहिती वाचली त्याप्रमाणे कदाचित् ही प्रजात अति उष्ण किंवा अति थंड प्रदेशात टिकू शकत नसावी. त्याशिवाय ही प्रजात आजच्या होमो सेपियनपेक्षा जास्त प्रगत असावी. कदाचित् मी अगोदर म्हंटल्या प्रमाणे ही प्रजात अति प्रगत अवस्थेला पोहोचली आणि म्हणूनच कदाचित् नष्ट झाली. अर्थात जर यांचे अस्तित्व इथल्या भूभागात असले तर मग ते कुठे असू शकते याचा विचार मी केला. त्यावेळी माझ्या मनात आले की ब्रम्हपुत्रा नदीचा परिसर हा अति उष्ण नाही किंवा अति थंड देखील नाही. तिथे विपुल प्रमाणात पर्वत, पाणी आणि जीवनावश्यक नैसर्गिक गोष्टी सहज उपलब्ध आहेत. मग कदाचित ही प्रजात तिथेच अस्तित्वात होती का? सर, आपण जर काही प्रमाणात आपल्या पुराणांचा आधार घेतला तर एक गोष्ट लक्षात येते की त्या काळात देखील ब्रह्मपुत्रेच महत्त्व अनन्य साधारण होतं. अर्थात हे सगळे माझ्या मनातले विचार आहेत सर. यासंदर्भात मला अजून माहिती गोळा करायची आहे. आणि गम्मत बघा न मी जो विषय सहज उत्सुकता म्हणून वाचत होते आणि ज्या प्रदेशाचा विचार करत होते तिथे जाण्याची संधी मला तुमच्यामुळे मिळते आहे. सर, माझ्या मनात अनेक शंका आणि अनेक प्रश्न आहेत. कदाचित् त्यासार्वांची उत्तरं मला तुमच्या बरोबर येऊन मिळतील. त्यामुळे मी तुमच्या बरोबर नक्की येणार." बोलताना निर्मितीचे डोळे उत्साहाने आणि आनंदाने चमकत होते.
तिचा उत्साह बघून प्रोफेसर राणेंना हसू आलं. तिच्याकडे कौतुकाने बघत ते म्हणाले,"निर्मिती मला खात्री होती की तुला एकूण सगळी माहिती दिली की तू नक्की माझ्याबरोबर येशील. मला तुझ्या कॉलेजच्या प्रोफेसर कडून तू या विषयावर आपणहून अभ्यास करते आहेस आणि बरंच वाचन केलं आहेस हे कळल होत. म्हणून तर मी तुला माझ्याबरोबर येण्याबद्दल विचारलं. त्यामुळे मी अगोदरच तुझ्या तिकीटाची सोय देखील करून ठेवली आहे. तू जरूर अभ्यास करून ठेव त्या भागाचा. त्याचा आपल्याला खूपच उपयोग होईल. मी देखील काही नोट्स काढून ठेवल्या आहेत, त्या तुला देऊन ठेवीन. म्हणजे तिथे जाताना तुझ्या मनात कोणताही किंतु-परंतु नसेल. त्याचा तुला आणि मलासुद्धा काम करताना उपयोग होईल." त्यांच्या बोलण्यावर मान डोलावून हसत निर्मितीने त्यांचा निरोप घेतला आणि ती सरांकडून निघाली.
निर्मिती खरच खूप खुश होती. इतक्या लवकर आणि इतक्या सहज एवढी मोठी संधी आपल्याला मिळेल अस तिला कधीच वाटलं नव्हत. तिने सरांकडून बाहेर पडल्या बरोबर तिच्या वडिलांना फोन लावला आणि सरांबरोबर झालेल्या गप्पांचा पूर्ण वृत्तांत सांगितला. ते सगळ एकून तिच्या वडिलांना देखील आनंद झाला. निर्मितीच्या वडिलांना तिच्या लहानपणीच तिची आवड लक्षात आली होती म्हणून तर त्यांनी तिला शिकायला अस आपल्यापासून दूर ठेवलं होत. पण तिला अशी एवढी मोठी संधी इतक्या लवकर मिळेल अस त्यांना देखील वाटल नव्हत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रोफेसरांनी आपल्या मुलीला इतका मोठी संधी द्यावी याच त्यांना खूप अप्रूप वाटलं. ते निर्मितीला म्हणाले," बेटा, खरच खूप मोठी संधी तुला मिळते आहे आणि मला याचा खूप आनंद झाला आहे. तुझं कौतुक देखिल वाटत आहे. मात्र तुझ्या आवाजातला उत्साहच मला सांगतो आहे की तू उद्या इथे घरी येणार नाही आहेस." त्याचं शेवटच वाक्य एकून मात्र निर्मिती थोडी वरमली. पण ती काही बोलण्याच्या अगोदर तिचे वडील म्हणाले,"अग, वाईट नको वाटून घेउस. मी समजाविन तुझ्या आईला आणि वहिनीला. तू नक्की जा तुझ्या सरांबरोबर. आमचा सर्वांचा आशीर्वाद आहे तुझ्या बरोबर. फक्त बेटा अधून मधून फोन करत जा मला, आईला आणि वाहिनीला." त्यांच्या बोलण्याने सुखावलेली निर्मिती म्हणाली,"बाबा, मी खरच खूप नशीबवान आहे की मला समजून घेणारे तुमच्यासारखे वडील आहेत. मी नक्की फोन करत जाईन तुम्हाला सगळ्यांना. आई आणि वाहिनीला सॉरी सांगा हं. आता आले की महिना दोन महिने घरी येऊन राहीन म्हणून सांगा त्या दोघींना. बर फोन ठेवू?"
दुसऱ्या दिवसापासूनच निर्मितीने आसामच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि पुरातन शास्त्राचा अभ्यास सुरु केला. त्याच्याच बरोबर ती प्रोफेसर राणेंबरोबर ज्या ठिकाणी जात होती तिथेल्या परिसराला काही ऐतिहासिक किंवा कोणत्याही जुन्या संस्कृतीचा काही वारसा लाभलेला आहे का त्याचा शोध देखील ती घेत होती. तिच्या वाचनात अनेक गोष्टी आल्या. निर्मितीने त्यासर्वांच्या नोट्स बनवून ठेवायला सुरवात केली.
मुळात आसाम म्हणजे ब्रमापुत्रा नदीचे खोरेच. मुबलक निसर्ग सौंदर्य आणि विस्तीर्ण पर्वंत रांगांमुळे अत्यंत कठीण असा हा प्रदेश. त्यात निर्मिती आणि प्रोफेसर राणे जाणार होते तो भाग तर एका खोल दरीमध्ये संपूर्णपणे आदिवासी लोकांच्या वस्तीतला होता. हा भाग आजच्या प्रगत भारताचा भाग आहे असे कोणीही म्हणाले नसते. इतका दुर्गम आणि जंगलाने वेढलेला होता. कधी कोणा एकलकोंड्या डॉक्टरने फिरत फिरत येऊन तिथल्या एका आदिवासी पाड्यात दोन वर्षांसाठी बस्तान बसवले होते. पण मग त्याला देखील तिथे टिकाव धरणे अवघड झाले आणि तो तिथून निघून गेला. पण त्याच्या त्या दोन वर्षांच्या वास्तव्यामध्ये त्या पन्नास घरांच्या पाड्यातल्या एकाच मुलाने आपलं स्वतःच भलं करून घेतलं होत. तोच होता प्रोफेसर राणेंनी सांगितलेला मिठ्ठू!
निर्मिती आणि प्रोफेसर राणे जेव्हा त्या आदिवासी पाड्यावर पोहोचले तेव्हा त्यांच्या बरोबरच मिठ्ठू होता. तो बारावी पर्यंत शिकून मग नोकरी करत होता. त्यामुळे त्याला हिंदी भाषा येत होती. त्याने प्रोफेसर राणेंबरोबर निर्मितीला बघितल्यावर हरकत घेतली. तो राणेंना एका बाजूला घेऊन म्हणाला,"सर, लडकी नही चलेगी. उसको वापस भेज दो. हमारा लोग उसको आने नही देंगा." त्यावर प्रोफेसरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून थोपटल्या सारखं केल आणि म्हणाले,"देखो वो छोटी दिखती हे लेकीन बहुत पिढी-लेखी लडकी हे. उसकी वजहसे मुझे काम करना आसन हो जाएगा. इसलिये सरकारने उसे मेरे साथ भेजा हे. वो वापस चाली गई तो बहुत नुकसान हो जाएगा." प्रोफेसरांच बोलण एकून मिठ्ठू शांत झाला. पण त्याला मोठी चिंता होती की आपल्या पाड्यावर या मुलीला कोणी स्वीकारले नाही तर काय करायचे. कारण मुळात मिठ्ठुने त्या मंदिराची माहिती बाहेर दिली होती म्हणून त्याच्यावर तिथेले लोक नाराज होते. पण प्रोफेसर ऐकत नाहीत म्हंटल्यावर तो काही न बोलता निर्मितीच आणि प्रोफेसरांच सामान उचलून चालू पडला.
एका बस मधून उतरून दुसरी बस. मग मोटरसायकल वरून प्रवास आणि त्यानंतर जवळ जवळ तीन तास जंगलातून चालल्यानंतर ही वरात मिठ्ठूच्या पाड्यावर पोहोचली. तोवर संध्याकाळ झाली होती. जेमतेम सहा वाजले होते पण कीर्र काळोख दाटला होता. थोडे बहुत कंदील-चिमण्या आजू-बाजूच्या खोपट्यामधून दिसत होते. काही खोपट्याच्या बाहेर पलिते खोचलेले होते. त्याच्या उजेडातच निर्मिती आणि प्रोफेसर मिठूठूच्या मागून चालत एका बाजूच्या झोपडीकडे पोहोचले. बाहेर लावलेल्या पालीत्याच्या मदतीने मिठ्ठुने एक कंदील पेटवला आणि त्या झोपडीत प्रवेश केला. एक मोठी ऐसपैस खोली होती ती. समान आत ठेवून मिठ्ठू प्रोफेसरांना म्हणाला,"आप लोग बैठो. में कूच खानेका देखता हु. और फिर इसी कुठी मे बांबू लगाके बिबीजी के लिये अलग जगा बनाता हु." समोर असणाऱ्या घोंगड्यावर बसत दमलेल्या प्रोफेसरांनी बर म्हणून मान डोलावली आणि मिठ्ठू बाहेर गेला.
तो बाहेर गेल्या बरोबर निर्मितीने प्रोफेसरांच्या शेजारी बसत त्यांना विचारलं,"सर, हा मिठ्ठू तर मला इथे घेऊन यायला तयार नव्हता ना? मग तुम्ही नक्की काय सांगितलत त्याला?" त्यावर हसत हसत प्रोफेसरांनी मिठ्ठुला जे सांगितल होत तेच तिला देखील सांगितल. आपल्यासाठी सर खोटं बोलले या विचाराने निर्मिती ओशाळली. प्रोफेसर राणे तिच्याकडे बघत शांतपणे म्हणाले,"बेटा, तू इथे कशी आलीस हे महत्वाचं नाही; तर इथून पुढे तू काय आणि कशी वागणार आहेस ते महत्वाचं आहे. आपण जेव्हा त्या मंदिराकडे जाणार आहोत आणि एकूणच अभ्यासाला सुरवात करणार आहोत त्यावेळी कदाचित् तुझं हे नवखेपण जास्त उपयोगाच असेल. तू आत्ता येताना केवळ या भागाचा भौगोलिक आणि ऐतिहासिक अभ्यास तो ही केवळ पुस्तकांमधून केला आहेस. त्याव्यतिरिक्त तुला या प्रदेशाची फारशी माहिती नाही. त्याचबरोबर तुझा मानवीय उत्पत्ती यावर देखील फक्त अभ्यास आहे. माझ्या बाबतीत म्हणायचं तर मी या विषयाचा इतका अभ्यास केला आहे आणि त्या निमित्ताने इतकी ठिकाणं फिरलो आहे की कदाचित माझे काही ठोकताळे पूर्वग्रहातून केले जातील. का कोणास ठाऊक पण मला सारखे वाटते आहे की इथे जी माहिती आपल्याला मिळणार आहे ती नक्की मानवीय इतिहासाला वेगळ वळण देणारी असेल. माझ्या आजवरच्या अनुभवाच्या जोरावर मी बांधलेले ठोकताळे कदाचित् इथे उपयोगी पडणार नाहीत. अग इथे मी गेले सहा महिने येतो आहे. पण तरीही मला अपेक्षित अशी प्रगती होत नाही आहे. कुठेतरी काहीतरी वेगळ आहे; याची जाणीव मला होते आहे. पण काय ते मात्र कळत नाही. म्हणून तर तुला मी मुद्दाम इथे घेऊन आलो आहे. निर्मिती, कदाचित तुझ्या नावाप्रमाणे तू इथे खरच नवीन माहिती शास्त्राची निर्मिती करशील अशी मला आशा आहे. बर ते जाऊ दे. आपण आता आराम करूया. तो मिठ्ठू आपल्यासाठी काहीतरी खाण आणायला गेला आहे. तो आला की खाऊन घेऊन वेळेत झोप. इथे अंधार लवकर पडतो आणि सूर्योदय उशिरा होतो. त्यामुळे आपल्यालाच आपले कामाचे तास ठरवून घेऊन लवकर उठून कामाला लागायचं आहे."
प्रोफेसर राणेंकडे आदरयुक्त प्रेमाने बघत निर्मिती तिथून उठली.
क्रमशः
No comments:
Post a Comment