Friday, July 30, 2021

सुख!

 आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपल्याला खऱ्या सुखाचा विसर पडलेला असतो का? आपण फारच भौतिकसुखवादी तर नाही ना झालेलो... गेले काही दिवस या विचाराने अस्वस्थ होते... एक प्रश्न मला सतत सतावतो आहे... खरं सुख म्हणजे नक्की काय? माझ्यापरीने या प्रश्नाचं उत्तर शोधायचा एक लहानसा प्रयत्न केला आहे. तो आपल्यासमोर कवितेच्या माध्यमातून मांडते आहे.


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर...
सुखाचा अर्थ वेगळा असतो!
त्या वळणापूरता तो;
अगदी अगदी खरा असतो...

नकळत पण आपण फसतो...
जवाबदऱ्यांमध्ये सुखाला शोधतो...
खरं सुख हिरमुसलं असतं;
'मी फक्त तुझ्यासाठी' म्हणत असतं!

काय हरकत आहे थोडं थांबायला...
नभ, पक्षी, इंद्रधुनत सुख शोधायला...
वाढत्या वयात काय प्रेम आटतं?
मनातलं नवथरपण असं कसं हरवतं?

जवाबदाऱ्या कधी संपतात का?
सुखाची गणितं अशी मोजतात का?
धुंद स्वच्छंद आयुष्य हळूच चोरायचं...
गणित करण्यापेक्षा जगायला शिकायचं!

1 comment: