एक red wine नातं (भाग 7)
तिचा लेक आता दहावीत गेला होता; त्यामुळे तिच्यावर बाहेर पडण्याच्या बाबतीत बंधनं आली होती. लेकाचा अभ्यास, शाळेच्या-क्लासच्या वेळा, त्याच्या वाढत्या भुकेची तंत्र... ती अगदी मनापासून जपत होती. लेक मोठा होत असताना तिच्याही नकळत तिने त्याच्या सोबत आई पासून मैत्रिणीपर्यंतचा प्रवास केला होता. त्यामुळे आता त्याला अभ्यास करण्यासाठी रागवावं लागत नव्हतं. प्रिलिंम झाली आणि त्याचा रिझल्ट देखील आला. प्रिलिंम्समध्येच त्याने झक्कास मार्क मिळवले होते. त्यामुळे ती एकदम खुश होती. त्याच दिवशी रात्री तिला मेसेज आला.
'मी येतो आहे. परवाचं फ्लाईट आहे. पोहोचलो की फोन करतोच.'
त्याचा तो मेसेज बघून ती मनातून एकदम सुखावून गेली. पण दुसऱ्याच क्षणी तिच्या मनात आलं; त्याला भेटता येईल न आपल्याला? लेकाच्या वेळा सांभाळत काहीतरी प्लॅन करावा लागेल. पूर्वी ठीक होत सुजाता होती सांभाळून घ्यायला. आताही ती सगळं करायला तयार होईल; पण अभ्यासाचं कारण देऊन हा मुळीच जाणार नाही कुठेही. माझं मी बघीन; तू जा; म्हणेल. बराचवेळ विचार करत बसली होती ती. पण मग अति आणि आत्ता विचार करून काहीही होणार नाही; हे लक्षात येऊन तिने तो विषय सोडला. 'तेव्हाचं तेव्हा बघू.' तिने ठरवलं.
***
दोन दिवसांनी सकाळी ती उठली आणि नेहेमीप्रमाणे कामाला लागली. पण मनातली आवर्तनं तिला अस्वस्थ करत होती. 'पहाटेच उतरला असेल. म्हणजे आत्ता झोपला असेल. तसंही घरी त्याचे आई-बाबा, सासू-सासरे सगळेच जमले असतील. एवढ्यात तो बाहेर पडणं शक्यच नाही आणि फोन देखील करता येणार नाही त्याला.' तिच्या मनातले विचार बहुतेक तिच्या चेहेऱ्यावर दिसत होते. ती टेबलावर पोह्यांची कढई ठेवत होती त्यावेळी नवऱ्याने विचारलंच; "बरं नाही का ग तुला?"
"बरंय की. का रे?" तिने त्याच्याकडे न बघता त्याची प्लेट भरत म्हंटलं.
"अस्वस्थ वाटते आहेस; तर म्हंटलं विचारावं काही हवंय का? किंवा हरवलंय का!" तिच्याकडे एकटक बघत तो म्हणाला. त्यावर हलकंस हसत तिने नकारार्थी मान हलवली आणि परत स्वयंपाक घरात गेली. खरं तर आत काम असं काही नव्हतं. पण त्याच्या सोबत बसणं तिला टाळायचं होतं. कसं कोण जाणे पण नवऱ्याच्या ते लक्षात आलं बहुतेक. आतल्या दिशेने बघत तो म्हणाला; "ये ग लवकर. थांबलोय मी. पोहे गार होत आहेत." आत उगाच खुडबुड करणाऱ्या तिला खुदकन हसायलाच आलं.
'हा कधीच स्पष्ट काही विचारत का नाही मला? त्याने विचारलं तर मी सांगणार नाही का?' तिने मानेला एक झटका दिला आणि मनातले विचार मागे ढकलत ती बाहेर त्याच्या सोबत येऊन बसली.
आत गेलेली 'ती' आणि बाहेर आलेली 'बायको' हा फरक त्याच्या लक्षात आला. तो मनातल्या मनात अस्वस्थ झाला. पण मग काही एक न बोलता ब्रेकफास्ट करून निघाला.
नवऱ्याच्या चेहेऱ्यावरचे भाव आठवून तिला परत एकदा हसायला आलं. 'अगदी असाच अस्वस्थ झाला होता हा; जेव्हा तो पहिल्यांदा आला होता भारतात. याचा अर्थ माझ्या चेहेऱ्यावर देखील तेच ते पहिल्यांदा तो आला होता तेव्हाचे अस्वस्थ भाव असतील. तिच्या मनात आलं.'
....तो पहिल्यांदा परत आला तेव्हा....
नेहेमीप्रमाणे हातातली खाण्याची प्लेट बाजूला सारत ती सोफ्यावर जाऊन बसली.
***
आज तिच्या नवऱ्याचं एक महत्वाचं प्रेसेंटशन होतं ऑफिसमध्ये. त्यामुळे तिच्या मनात काहीतरी चालू आहे हे लक्षात येऊन देखील तो जास्त काही बोलला नाही. खरं तर त्याला ती एक-एकदा कळायचीच नाही. त्याला माहीत होतं तिचं त्याच्यावर, लेकावर खूप प्रेम होतं. पण कधीतरी अचानक स्वतःच्याच तंद्रीत जायची. मग ती सोबत असूनही नसल्यासारखा फील यायचा त्याला. तिचं कधीतरी ते रात्री मेसेज करणं आणि सकाळी डोळे उघडल्या क्षणी मोबाईल हातात घेणं त्याला पटायचं नाही. तिच्या नकळत त्याने तिचा फोन चेक करण्यासाठी हातात घेतला देखील होता; पण मग का कोण जाणे परत ठेऊन दिला होता. तिच्यावर संशय घ्यावा असं काहीच वागायची नाही ती.... एक ते फोन मधले मेसेज प्रकरण सोडलं तर. मग उगाच आपल्या मनातल्या संशयापाई तिला दुखवायचं नव्हतं त्याला.
तो ऑफिसमध्ये पोहोचला पण मन स्वस्थ नव्हतं. मीटिंग नीट पार पडली. त्याचं प्रेसेंटशन देखील मान्य झालं. एक निःश्वास टाकत त्याने कॉफी घेतली आणि ऑफिसच्या मागच्या smoing zone मध्ये येऊन उभा राहिला.
"परत तेच ते विचार आहेत न तुझ्या मानत?" मागून मीराचा आवाज आला आणि मागे वळून बघत काही न बोलता त्याने कॉफीचा मग वर केला. मीरा त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली आणि तिने सिगरेट काढून शिलकवली.
"मीरा, तुझं नाव आणि तुझ्या कृती किती विसंगत आहेत ग." त्याने तिच्या सिगरेटकडे बघत म्हंटलं.
"नाम मे क्या रखा हें? बरं, माझं सोड. तू बोल. परत तेच ते विचार न?" मिराने मोठा झुरका घेत त्याला विचारलं.
"काय करू ग? मला तिच्या माझ्यावरच्या प्रेमाबद्दल काडी इतका देखील संशय नाही. सगळंच कसं व्यवस्थित आहे. पण तरीही कधीतरी ती हरवून गेल्यासारखी वाटते." तो दूर नजर लावत म्हणाला.
"How's your performance in the bed?" मिराने त्याला कोपराने टोचत विचारलं.
तिच्याकडे वैतागून बघत तो म्हणाला;"shut up मीरा."
ती हसत आणि खांदे उडवत "OK" म्हणाली.
दोघेही काही वेळ शांत होते. मग मिरानेच परत विषयाला सुरवात केली; "अरे यार, किती वेळा सांगितलं तुला; सरळ विचारून टाक तिला. बाई तुझ्या आयुष्यात कोणी आहे का? किंवा माझ्या सोबत समाधानी आहेस का?"
"अग, पण ती असमाधानी नाहीच वाटत. तुला कसं सांगू तेच कळत नाही मला. तिच्या आयुष्यात कोणी आहे का... हा प्रश्न नाही सतावत मला. वाईट वाटतं की जर तसा कोणी असलाच तर तो मी नाही!" तो मिराकडे वळत म्हणाला.
त्याच्याकडे एक शांत कटाक्ष टाकत मीरा म्हणाली; "हम्म! मला कळतंय तुला नक्की काय म्हणायचं आहे. यावरचा उपाय एकच आहे; एक तर तू तिला स्पष्ट विचार किंवा stop thinking about it. एक लक्षात ठेव; आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक ग्रे एरिया असतो. तो ज्याचा त्याला जपू द्यावा."
अजूनही त्याच्या चेहेऱ्यावरचा अस्वस्थ भाव गेला नव्हता हे मिराच्या लक्षात आलं. त्याने मिराकडे पाठ वळवली आणि परत ऑफिसमध्ये शिरत होता; तेव्हा तिने त्याला हाक मारली आणि मिश्कीलपणे विचारलं; "मग? विचारणार आहेस का आजच?"
तिच्याकडे वैतागलेल्या नजरेने बघत तो हसला आणि म्हणाला; "मीरा, तेरा कूच नही हो सकता." आणि हसत हसत तिथून निघाला.
***
तिने सोफ्यावर बसत त्या दिवशीचं वर्तमानपत्र हातात घेतलं; पण मन कधीच त्याच्या पहिल्या परतीच्या भेटीत गुंतलं होतं. असाच मेसेज होता...
'मी येतो आहे... तुला भेटायला अगदी अधीर झालो आहे. आलो की दोन-चार दिवसात फोन करतो. काहीतरी मस्त प्लॅन करून ठेवशील न? बरोबर एक महिन्याने येतो आहे मी. सत्तावीस जानेवारीला पोहोचेन. तो पूर्ण दिवस घरी. मग सासुरवाडी. मग मित्र. हे सगळे सोपस्कार पूर्ण केल्याशिवाय तुला भेटता येणार नाही. कारण माझं मन जरी आपल्या नात्याच्या बाबतीत तुझ्या इतकंच स्पष्ट असलं तरी माझ्या घरचे समजून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचं समाधान झालं की मग भेटणार आहे मी तुला.'
त्याचा मेसेज वाचून परीक्षा संपल्यावर धावत येऊन वडा-पावचा हट्ट करणाऱ्या लेकाचा चेहेरा तिला आठवला आणि खुदकन हसली ती.
'ए इतकं मोठं स्पष्टीकरण देण्याची खरंच गरज आहे का? तू येतो आहेस आणि मला भेटणार आहेस... खूप आहे इतकंच माझ्यासाठी.' तिने त्याला उत्तर लिहिलं होतं.
तो आल्यानंतर तीन दिवसांनी तिच्या मोबाईलमध्ये मेसेज आला होता.
'दोघेही एकाच वेळेच्या मर्यादेत आलो आहोत; हा विचार देखील किती सुखावह आहे ग. बरं, बोल... कधी? कुठे?"
'चर्चगेट स्टेशन? साधारण अकरा वाजता दोन नंबर प्लॅटफॉर्म! ledies डब्ब्या जवळ.' तिने त्याला लिहिलं.
'पोहोचलोसुद्धा.' त्याचं उत्तर आलं आणि ती मनापासून हसली.
***
लेकाने जर्मन भाषा शिकायचं ठरवलं होतं. तिला देखील त्याचा तो निर्णय पटला होता. चर्चगेटच्या मॅक्समोलर इन्स्टिट्यूटमध्ये त्यासंदर्भातली माहिती आणि फॉर्म्स घेण्यासाठी तिला चर्चगेटला जायचंच होतं. काम पटकन उरकून ती स्टेशनवर येऊन बसली होती. त्याची वाट बघत. तो तिला दिसला. धावली ती. त्याला मिठी मारून मनापासून हसली. क्षणभर तो गोंधळाला. पण मग स्टेशन गुलाबी झालं.
"आता यापुढे तुला जेव्हा जेव्हा भेटेन आणि जिथे जिथे भेटेन ती जागा गुलाबी होऊन जाणार बघ." ती मिठी सोडून लांब झाली तसं तो म्हणाला. ती गालात हसली आणि दोघे निघाले. स्टेशन बाहेर आल्यावर त्याने विचारलं; "मग कुठे?" आणि तिने हसत डोळा मारला.
एकदम पाय आपटत तो म्हणाला; "आपल्या अनेक स्वप्नांमधलं पुढंचं स्वप्न नं? ए... जा ग! इतकं मनकवडं कसं असू शकतं कोणी?" त्याचं ते बालिश वागणं आणि बोलणं ऐकून ती खडखदली आणि तिला जाणवलं... 'तो असला की मी बदलते; त्याच्यासोबत असताना मला माझ्यातली 'मी' सापडते आहे का?' पण मनातले विचार दूर सारत ती म्हणाली;
"You are right! Pizza by the Bey! मी टेबल book करून ठेवलं आहे. म्हंटलं नेमकं आपण जाऊ आणि आपला लाडका दिसायचा नाही आपल्याला." ती हसत म्हणाली.
"तुला नेहेमीच कळत ग माझ्या मनातलं. पण मला खात्री आहे; तू माझ्याकडे आलीस की मी देखील तू न संगता आपली स्वप्न पूर्ण करेन तुझ्यासोबत. तू खरंच ये न माझ्याकडे. इतके समुद्र किनारे दाखवायचे आहेत तुला. तुझ्याशिवाय त्या ओल्या वाळूचा स्पर्श सुख नाही देत." तो तिच्या सोबत चालत म्हणाला. तो सतत बोलत होता; आणि ती त्याचं बोलणं ऐकत असताना देखील स्वतःमध्ये हरवत होती.
काही क्षणांनंतर तिने त्याच्याकडे बघितलं तर तो देखील तिच्याकडे बघत होता. तिने बोलण्यासाठी मोठा श्वास घेतला आणि त्याने तिला थांबण्याची खूण करत म्हंटलं; "अहं! तू नाही येणार आहेस तिथे! कारण इथले भारतातले सगळे समुद्रकिनारे अगोदर बघायचे आहेत तुला. तुझं तुझ्या भारतातल्या निसर्गसौंदर्यावर जास्त प्रेम आहे. तुला माहीत आहे न की तुझे डोळे बोलतात?" त्याच्या त्या बोलण्याने ती मनापासून हसली आणि म्हणाली; "पण खरंच आपल्या देशाला जितकं निसर्गसौंदर्य लाभलं आहे तितकं इतर कुठेही नसेल; असं मला मनापासून वाटतं. अर्थात हे देखील मी मान्य करते की आपण ते नीट जपत नाही किंवा त्याचं संवर्धन देखील करत नाही."
"ए! गोवा?" त्याने तिच्या लेक्चरला आळा घालत म्हंटलं; आणि ती लहान मुलींसारखी खुदकन हसली.
"हो! गोवा! तू आणि मी... आपला लाडका समुद्र.... मावळत्या संध्याकाळपासून ते उगवत्या पाहाटेपर्यंत हातात हात घालून चालूया आपण. एकदा गोव्याला जाऊ या आपण." तिचे डोळे स्वप्नाळू झाले होते. असेच काही क्षण गेले आणि दोघेही भानावर आले.
तिने खास सांगून ठेवलेल्या टेबलवर ते बसले आणि नकळत दोघांनीही नजर त्यांच्या लाडक्या समुद्राकडे वळली.
वेटरने येऊन समोर मेन्यूकार्ड ठेवलं आणि दोघेही आपापल्या तंद्रीतून जागे झाले आणि एकमेकांकडे बघून सगळं उमजल्यासारखे हसले. त्याने ऑर्डर दिली आणि मग दोघांमध्ये खूप गप्पा रंगल्या! तिला वेळेचं भान होतं.... त्यालाही! पण तरीही गप्पा रंगल्या. तिथे गेल्यावर सुरवातीला त्याला खूप अडचणी आलेल्या होत्या. पण त्यावर त्याने जिद्दीने मात केली होती; आणि आता एक छानशी नोकरी मिळाली होती. अजूनही त्याचं Ph D चालूच होतं. सगळं कसं छान चालू आहे ते तो उत्साहाने सांगत होता आणि ती समाधानाने मनापासून ऐकत होती. तिच्या आयुष्यात घडलेले आणि घडणारे बदल ती देखील मनापासून त्याला सांगत होती; आणि तिच्या डोळ्यात खोलवर बघत तो ते ऐकत होता.
'असं काय बघतोस?' ती.
'काही नाही.' तो.
'ए तुझ्या डोळ्यांच्या पापण्या मला फार आवडतात; आणि तुझे ब्राऊन डोळे तर खूपच गहिरे आहेत रे.' ती.
'फक्त माझे नाही... तुझे पण त्याच रंगाचे आहेत. आणि त्याला ब्राऊन नाही.. गावठी मधाचा रंग म्हणतात.' तो.
'कोण म्हणतात?' तिचा तोच तो मिश्किल आवाज तिच्याही नकळत बाहेर आला.
'आम्ही.... म्हणजे मी ग. तुझ्या डोळ्यातला गावठी मध मला गुंतवून ठेवतो.' त्याचा ओलावलेला हळुवार आवाज.
त्याच्या बोलण्यावर ती फक्त हसली.... मधाळसं!
घड्याळ पुढे सरकत होतं; आणि दोघांना त्याची जाणीव सतत होत होती. शेवटी निघाले दोघे स्टेशनच्या दिशेने.
"तसंच जायचं न? ट्रेनने... दारात उभं राहून... पूर्वीसारखं!" त्याने विचारलं.
"Of course... तू गेल्यापासून ट्रेनच्या दारात उभं राहायची वेळ नाही आलेली. बहुतेक तुझ्यासाठीच थांबले होते." ती खळखळून हसत म्हणाली आणि दोघेही स्टेशनच्या दिशेने निघाले. अचानक थांबत ती म्हणाली; "ए आज बसने जाऊया? डबलडेकरमध्ये! वरती सर्वात पुढे बसून!!!"
"टायटॅनिकचा feel येतो न?" त्याने तिच्याकडे बघत डोळा मारला आणि दोघेही समोर आलेल्या बसमध्ये शिरले.
"उशीर होईल न तुला?" तिने त्याला विचारलं.
"हो! तुला?" त्याने तिच्याकडे बघत हळुवार प्रश्न केला.
"खरं सांगू? माझा नवरा काहीच विचारणार नाही. काहीसा वेडा आहे रे तो. मला माहीत आहे; कधी कधी माझ्या वागण्यामुळे तो अस्वस्थ होतो. पण तो मला काहीच विचारत नाही.... आणि मी तुला मागेच सांगितलं तसं... मी आपणहून काहीही सांगणार नाही." ती बाहेर दूरवर बघत म्हणाली.
"हो! आठवतंय मला. पण का नाही सांगणार तू आपणहून?" त्याने काहीसं गोंधळून विचारलं.
"कारण दुर्दैवाने आपल्या सामाजिक बैठकीमध्ये एखादी स्त्री नवऱ्याला आपणहून तिच्या मित्राबद्दल सांगायला गेली तर तिच्या मनात अपराधीपणाची भावना आहे; असा अर्थ काढला जातो. तू माझा मित्र आहेस... किंबहुना मित्रापेक्षाही खूप काही जास्त आहेस.... पण त्यात अपराधीपणाची भावना नाही. प्रेम आहे, आदर आहे, अगदी नव्हाळीची हुरहूर देखील आहे... पण तरीही मला त्यात काही चूक आहे असं वाटत नाही; आणि म्हणून मी कधीच त्याला आपणहून जाऊन आपल्या या नात्याबद्दल सांगणार नाही. अर्थात; मागे म्हंटलं तसं.... त्याने विचारलं तर काहीच लपवणार नाही." ती म्हणाली. तो तिचं बोलणं ऐकत होता; त्याला ते पटत देखील होतं. पण तरीही त्याला ते इतक्या सहजपणे निभावता येईल का याबद्दल तो मनातून साशंक झाला होता. मन अस्वस्थ व्हायला लागलं त्याचं; पण तिची तंद्री लागली होती. शेवटी 'let's go with the flow...' असा विचार करून त्याने देखील नजर बाहेर वळवली.
***
त्यानंतर तो जाण्याच्या दोन दिवस आधी देखील ते भेटले. यावेळी बसस्टॉप गुलाबी झाला होता त्यांच्यासाठी. तिने त्याला वरळीला यायला सांगितलं होतं.
"ए, आपल्याही नकळत आपण या लाटांना आपल्या सोबत जोडून घेतलं आहे न." टळटळीत दुपार असूनही कॅमेऱ्याला उसंत न देता तो बोलत होता.
"हम्म!" तिने उत्तर दिलं. गप्पांमधला हा त्याचा तिसरा प्रश्न होता आणि त्यावरचं तिचं तिसरं उत्तर देखील "हम्म!" होतं. काहीतरी गडबड आहे हे लक्षात येऊन त्याने कॅमेरातून नजर काढून तिच्याकडे बघितलं. ती कुठेतरी एकटक बघत होती. चेहेऱ्यावर बालिश उत्सुकता होती. तिच्या नजरेचा धागा पकडत त्याने देखील नजर उचलली.
"आपली रोमँटिक डेट तिथेच असणार आहे राणी." अँबॅसेडर हॉटेलच्या सर्वात वरच्या मजल्याकडे दोघेही बघत होते. रिव्हॉव्हींग होता तो मजला. तिथली नजर हलवत त्याच्या दंडाला चापटीचा जुना प्रसाद देत ती म्हणाली; "माहीत आहे का तिथले मेन्यूकार्ड मधले रेट्स?"
"नाही." तो निरागसपणे म्हणाला. पण मग तिच्याकडे नजर वळवत म्हणाला; "पण मेन्यूच्या उजवीकडे बघावं लागणार नाही याची खात्री देतो तुला; आणि एक सांगू? चार बंगड्यांमध्ये बसवून घरी सोडायला येईन मी." त्याचं बोलणं ऐकून तिने हसत बरं म्हणून मान हलवली आणि दोघे निघाले.
कुर्ला स्टेशनला दोघे पोहोचले. तो निघाला होता; तिचा जीव हुरहूरला होता नेहेमीप्रमाणे. दोघेही एकमेकांना सांगत नव्हते; तरीही दोघांनाही मनातल्या भावना कळत होत्या. स्टेशनमध्ये शिरण्या अगोदर त्याने खांद्यावरची त्याची सॅक काढली आणि त्यातून एक खूपच सुंदर निळ्या रंगाची cool blue नावाची परफ्युमची बाटली काढली.
"राणी, हा तुझा पाडवा! आपल्याला आवडणाऱ्या सागराच्या रंगाचा." तो म्हणाला आणि तिने काहीही बोलायच्या आत तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाला; "काही गोष्टी न सांगता स्वीकारायच्या असतात."
तिच्या डोळ्यात उभं राहणारं पाणी बघायला मात्र तो थांबला नव्हता. लांब लांब पावलं टाकत तो आत स्टेशनमध्ये नाहीसा झाला होता.
***
लेकाची दहावी झाली. झक्कास मार्क मिळवले होते त्याने. 94% होते. नवरा तर इतका खुश होता तिचा... रिझल्टच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊन तो घरी थांबला. तिघेही डायनिंग टेबलावर बसले होते.
"बोल बेटा काय ठरवलं आहेस तू? म्हणजे सायन्सची ऍडमिशन सहज होईल आता; ते माझं टेन्शन तू घालवलं आहेस... पण पुढे काय विचार केला आहेस?" नवऱ्याने लेकाला केलेला प्रश्न तिने ऐकला आणि मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. त्यापुढे होणाऱ्या शाब्दिक युद्धाची ती फक्त साक्षीदार राहणार होती.
लेकाने आर्टस् घेतलं आणि त्यासोबतच जर्मन आणि जपानी भाषा देखील शिकायला सुरवात केली. तिच्या नवऱ्याला ते अजिबात पटलं नव्हतं. घरात या निर्णयावरून महाभारत युद्ध झालं होतं. पण आजच्या जमान्याचा अभिमन्यू धारातीर्थी पडला नव्हता.
***
अशीच त्याची पुढची भारत भेट होती.....
'मी ठरवू यावेळी आपण कुठे भेटायचं?' त्याचा मेसेज वाचून तिला हसू आलं.
'हो! चालेल की. बरंच होईल.' तिने लिहिलं.
'ठाण्यातला मॉल.' त्याचं उत्तर आलं.
'मॉल? हम्म! आलं लक्षात. बरं. पण आपण थोडं लवकर भेटू हं. लेकाच्या घरी येण्या-जाण्याच्या वेळा बदलल्या आहेत. आता शाळेची बंधनं नाहीत न.' तिने लिहिलं.
मॉलच्या बाहेर तो तिची वाट बघत उभा होता. "ए, दोनची वेळ ठरली होती न?" तो बराच वेळ उभा असावा हे लक्षात येऊन तिने विचारलं.
"राहवलं नाही ग. म्हणून लवकर निघालो.. आणि लवकर निघालो; म्हणून लवकर आलो." तो हसत म्हणाला.
"चल, मला कांजीवरम हवी आहे; नल्लीज मधून." ती मॉलच्या आत शिरत म्हणाली आणि तो एकदम खुश होत म्हणाला; "मन बागबाग हो गया मेरा; जो आपने समज लिया मेरे दिल का ख्वाब." तिने त्याच्याकडे कृतकोपाने बघितलं आणि स्वतःचा दंड तिच्या समोर करत तो म्हणाला; "सुकला आहे ग हा बिचारा; वर्षभर प्रसाद नाही न मिळाला त्याला."
खदखदून हसत तिने त्याला चापट मारली आणि दोघेही मॉलमध्ये शिरले. ती एक एक दुकान बघत पुढे पुढे सरकत होती. त्याने एक-दोन वेळा खिशात हात घालून खास तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट बाहेर काढलं होतं आणि परत आत ठेवलं होतं. तसं तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. पण त्याच्या त्या सततच्या खिशात हात घालण्यामुळे तिने त्याच्याकडे वळून बघितलं आणि न बोलता फक्त भुवया उडवत 'काय' अशी खूण केली. त्याने देखील स्वतःच्या खिशाकडे बघून परत तिच्याकडे बघितलं आणि भुवया उडवल्या. त्याला काय म्हणायचं आहे हे नकळून तिने परत भुवया उडवल्या.... मग त्याने परत.... एक जोरदार चापटीचा 'संपूर्ण भोग' त्याच्या दंडाला मिळाल्या बरोबर त्याचं तोंड उघडलं.
"ओये! Physical abuse करू नकोस. पोलिसांना तक्रार करीन."
"फजिलपणा बंद कर म्हणजे physical abuse बंद होईल. काय चाललं काय आहे तुझं कधीच? खिशाकडे काय बघतोस... माझ्याकडे काय बघतोस... बरा आहेस न?" तिने त्याला विचारलं.
"हो ग राणी! एकदम बरा आहे. फक्त तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे ते कसं देऊ याचा विचार करतो आहे." तो म्हणाला.
"कसं देऊ म्हणजे? तुझ्या हातांनी माझ्या हातात!!! वेडोबा कुठला." तिने चेष्टेच्या सुरात म्हंटलं.
"हो क्का? मला वाटलं पायाने पायात देतात तुमच्यात. म्हणून विचार करत थांबलो होतो." त्याने तिला वेडावत म्हंटलं.
"नमनाला घडाभर तेल झालं हं आता......" असं म्हणत ती पुढे झाली आणि त्याच्या खिशात हात घालून तिचं गिफ्ट काढून घेतलं. त्याच्याकडे एकदा बघून तिने ते गिफ्ट उघडलं.
Sea green, काहीशी shining blue अशा दोन eye pencels होत्या त्या. त्या बघून तिला काहीच कळलं नाही.
"हे दोन रंग तू माझ्यासाठी आणले आहेस?" तिने प्रचंड आश्चर्याने त्याला विचारलं.
"हो! कारण तू जेव्हा समुद्रात विरघळणाऱ्या सोन्याकडे बघतेस नं तेव्हा तुझे डोळे पण सोनेरी होतात. म्हंटलं त्या सोन्याला या दोन समुद्री रंगांचं कोंदण द्यावं." तो खूप गोड आवाजात म्हणाला.
तिने त्याच्याकडे क्षणभर बघितलं आणि त्याच्याकडे पाठ करून चालायला लागली. तिच्या त्या प्रतिक्रियेमुळे तो एकदम गोंधळला. तिला गाठत त्याने विचारलं; "राग आला का तुला? नाही आवडलं का गिफ्ट?"
त्याच्याकडे न बघता अगदी सहज म्हणाली ती; " खूप छान आहेत दोन्ही रंग. मी नक्की नक्की वापरणार आहे ते. पण हेच रंग का ते तू सांगितलंस आणि नक्की काय म्हणावं ते मला कळलंच नाही आणि मनातला गोंधळ तुला दिसू नये म्हणून चालायला लागले एकदम."
तिने न सांगता देखील त्याच्या लक्षात आलं होतं की बहुतेक असा तिचा इतका विचार करून आजवर कोणी तिला काहीतरी वेगळं गिफ्ट दिलं नसावं. ती सुखावली की नाही ते त्याला कळलं नाही. पण मग त्याने विचार केला; देताना मला बरं वाटलं आणि तिने ते नाकारलं नाही; यातच सगळं आलं. दोघेही साडीच्या दुकानात शिरले. क्षणापूर्वी अचानक भावनिक झालेली ती साड्या बघायला लागल्यावर मात्र एकदम जादू व्हावी तशी बदलून गेली. 'अलीकडे तिचं पाडवा गिफ्ट ती हक्काने घ्यायला लागली आहे;' त्याच्या मानत आलं. आवडती साडी घेताना तिचा चेहेरा जसा खुलला होता तसाच ती साडी विकत घेताना त्याचा चेहेरा देखील खुलला होता.
साडीचं शॉपिंग झालं आणि तो तिला म्हणाला; "भूक लागली आहे ग. चल न काहीतरी खाऊया." तिने हसत हसत बरं म्हंटलं आणि ते food court ला गेले. समोरच कैलाश परबत दिसलं. आजचा त्यांचा खास मेन्यू होता 'पुरी, बटाटा भाजी आणि श्रीखंड.' ते वाचून ती त्याच्याकडे वळून म्हणाली; "ए! तो मेन्यू वाच. मस्त न?" त्याने मेन्यू बघितला आणि म्हणाला; "थांब आणतो."
"अहं ! ते नाही तू केलेलं." त्याच्याकडे वळून बघत लाडिक आवाजात ती म्हणाली; "मुलीने मुलाच्या आवडीचा पदार्थ करायचा आणि मुलाने तो खायचा असं नेहेमीच होतं सगळीकडे. आपण वेगळे आहोत किनै... मग आपण वेगळं केलं पाहिजे न? त्यामुळे मी श्रीखंड घेऊन येईन. तू पुरी भाजी बनव फक्कडशी." त्याला गंम्मत वाटली तिच्या बोलण्याची.
"हो ग! आपण खरंच वेगळे आहोत. त्यामुळे आपण सगळंच वेगळं केलं पाहिजे कायम!" तो तिच्या डोळ्यात पाहात म्हणाला.
क्रमशः
No comments:
Post a Comment