एक red wine नातं (भाग 8)
'ए तुझं पिल्लू बारावी झालं नं? कसे दिवस जातात कळत नाही.'
त्याचा मेसेज होता.
'न कळायला काय झालं? अलीकडे सतत अक्कल शिकवतो आहे तो मला. त्यामुळे मी मागच्या पिढीत जाऊन बसले आहे; याची जाणीव खोल मनात होते आहे.' तिने उत्तर दिलं.
'त्यालाच उद्देशून एक कविता लिहिली आहे नुकतीच. थांब पाठवते... असं म्हणून तिने नुकतीच पूर्ण केलेली कविता त्याला पाठवली.
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!
गर गर फिरणारा भोवरा.. बनुन बघायचय मला...
भरारणारा तो पतंग- त्याची ती उंची;
वाऱ्याशी दोस्ती काटाकाटीची मस्ती...
वेगळंच जगणं अनुभवायचंय मला!
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!
Born clerk... died clerk सगळेच असतात;
वेगळा option click फ़क्त थोडेच करतात;
त्या थोड्यांमद्धे रहायचंय मला...
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!
White color job आपला फंडा नाय...
कोपऱ्यावरच्या पक्याचा रुबाबसुद्धा जमत नाय..
एक वेगळ आयुष्य जगायचंय मला...
काय अन् कसं कोणी सुचवतंय का ज़रा?
I.A.S., I. P.S. किंवा एखादा BUSINESS,
10 वि, 12 वि च्या result मूळे आई बाबा expects...
यासर्व अपेक्षांपासून दूर जायचंय मला...
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!
झटपट यश... भरपूर प्रसिद्धि...
'डी' gang ची सर्वांनाच भिती...
करू का try थोडं? चाकोरीच्या बाहेर येणं...
Visky अन् rum च्या सोबतित धुंद होणं...
कुणाशीतरी हे सगळ discuss करायचय मला..
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!
नकोच जगुस चाकोरीबद्ध...
आयुष्य जगावंच धुंद धुंद...
चल तुला करवते एक वेगळी सैर;
चाकोरीच्या बाहेर उजाडलेली जशी एकच तिमिर!
धुंद निसर्ग धुंद नशा...
Canvasवर उतरवून रंग.. बदलून टाक दिशा.
नि:शब्द गुंफा, बोलकी स्कल्पचर्स...
Archaeology मधे आहेत चाकोरी बाहेरची features...
जगाचा प्रवास कर; प्रवासाचा picture कर...
दिसणाऱ्या प्रत्येक आश्चर्याचा
मनापासून आदर कर...
हे सुद्धा वेगळच आहे; चाकोरी बाहेरचच् आहे...
तू वेगळा विचार करतोयस; यातंच आयुष्याचं गमक आहे.
कळतिये ग आई मला तुझ्या विचारांची दिशा...
चाकोरी बाहेरच्या आयुष्याच्या तिमिराची नशा...
माझ्यात सामावलेल्य़ा तुझ्या प्रतिबिम्बाला हलवणार नाही...
चाकोरी बाहेरच्या आयुष्याला
गालबोट लावणार नाही!!!
अप्रतिम लिहिलं आहेस ग. कसं सुचत असतं हे सगळं तुला?
'तू आत्ता ज्याचा पिल्लू म्हणून उल्लेख केला आहेस न... त्या गधड्या बाप्याने हे सुचायला भाग पडलंय मला...' तिने उत्तर लिहिलं आणि खदखदून हसलेले असे अनेक स्माईलीज आले आणि त्यापुढे मेसेज;
'बाप्या'
'कसले मस्त शब्द वापरतेस ग. मी माझ्या मातीपासून आणि माझ्या भाषेपासून लांब असल्याची जाणीव पुसुन टाकतेस.'
त्याचं उत्तर वाचून ती हसली.
'तू ही काही कमीचा नाहीस भन्नाट शब्द वापरण्याच्या बाबतीत.' तिचा reply होता.
'You are right. मला पण असे गमतीदार आणि वेगळे शब्द वापरायला आवडतं. आठवतं तुला? आपल्या tour नंतरच्या गणपतीमध्ये तुम्ही घरी आला होतात. तुझे मिस्टर देखील होते. त्यावेळी माझी होणारी 'साखरपुडी' देखील आली होती घरी. आई-बाबांनी आणि तिने देखील किती आपुलकीने आणि आग्रहाने आमंत्रण दिलं होतं लग्नाचं.'
'आठवतं नं! गणपतीच्या अगोदरच आपण दोन-चार वेळा भेटलो होतो. तुझी एकूणच बोलायची पद्धत मला तेव्हा कळली होती. तरीही तू ओळख करून देताना खरंच म्हणाला होतास; "ही माझी होणारी साखरपुडी आणि मग कायमची बायको." ती प्रचंड वैतागली होती आणि मी आतून इतकी फुटले होते.... पण सगळे इतके गंभीर चेहेरा करून होते की अगदी शांत सभ्य चेहेरा करून बसले मी.
आजही तो प्रसंग आठवून ती हसायला लागली होती. त्याचं लग्न विसरणं शक्यच नव्हतं तिला. नेमका नवरा कामाच्या निमित्ताने टूरला गेला होता. त्यामुळे ती लेकाला घेऊन एकटीच गेली होती. त्यावेळी गूगल मॅप अजून सुरू झाला नव्हता. लेक लहान असल्याने तिने टॅक्सी केली होती; पण हॉल असलेला तो भाग तिला अजिबात माहीत नव्हता. त्यामुळे लग्नाचा हॉल काही केल्या मिळत नव्हता. तिच्याकडे फोन नंबर तर फक्त नवरदेवाचा! त्याच्या आई-वडिलांचा नंबर कधी विचारायची वेळच आली नव्हती. आता काय करावं ते सुचेना. शेवटी तिने विचार केला तो विधींमध्ये असेल. म्हणजे फोन त्याच्या आई किंवा वडिलांकडे असेल; म्हणून मग हिम्मत करून तिने फोन लावला. समोरून फोन उचलला गेला हे लक्षात आलं आणि ती घाईघाईने म्हणाली; "सॉरी हं! तुम्ही सगळे लग्नाच्या विधींच्या गडबडीत असाल. पण मी थोडी रस्ता चुकले आहे. हॉलवर जवळची काहीतरी खूण सांगू शकाल का?"
"अग, मीच बोलतो आहे. विधी कधीच सुरू झाले आहेत. वाट पाहातो आहे तुझी. अशी कशी चुकलीस? कमाल करतेस. किमान सप्तपदीच्या वेळेपर्यंत पोहोच हं. तू हवी आहेस मला समोर."
त्याचा आवाज ऐकून तिला धक्काच बसला.
"ए वेडपट! तू काय फोन घेऊन बसला आहेस? तुझं लग्न होतंय तिथे." ती म्हणाली.
"ए तू दुप्पट! लग्न माझंच होतं आहे... तिकडे नाही इथे. पण अधून मधून फक्त मुलीचे विधी असतात म्हंटलं. ते सुरू झाले आणि मी फोन घेतला मागून तुला फोन करायला. फोन हातात घेतला आणि तुझाच कॉल आला. बरं, आता उगाच बडबड करू नकोस... किती बोलते रे बाबा ही मुलगी! ऐक.... लग्नाच्या हॉलच्या शेजारीच एक मोठ्ठं CCD आहे. तिथे नको जाऊस आयरिश कॉफी घ्यायला. हॉलवर ये. तू येईपर्यंत मी सप्तपदी टाळत राहणार आहे हे लक्षात ठेव." तो एका श्वासात सगळं बोलला आणि तो खरंच थांबेल म्हणून ती धास्तावली. ड्रायव्हरला आणि रस्त्यावरच्या लोकांना सतत प्रश्न विचारत तिने हॉल एकदाचा शोधून काढला आणि अक्षरशः पळत-पळत आत शिरली. तिला पाहून त्याने हात केला भर विधी चालू असताना. तिने देखील एकदम आनंदाने हात हलवला. पण मग एकूण गर्दीकडे नजर टाकून आपल्या आनंदाच्या उधाणाला तिने आवर घातला. त्याची सप्तपदी झाली. तिने प्रेमाने त्याच्या बायकोला मिठी मारली आणि म्हणाली; "खूप लकी आहे ग हा; तुझ्यासारखी सांभाळून घेणारी बायको मिळाली आहे त्याला. केवळ त्याच्या स्वप्नासाठी तू परदेशात जायला तयार झालीस. खरंच मोठा निर्णय आहे तुझा." तिला वाटलं होतं ती इतक्या मित्रत्वाच्या नात्याने बोलते आहे तर त्याची बायको अगदीच काही नाही तर हसेल तरी तिच्याकडे बघून. पण नव्या नवरीने नजर वर करून देखील बघितलं नाही. तिच्या मनात काहीतरी हललं... पण ती काहीच बोलली नाही. त्याच्या आई-वडिलांना भेटून त्याला न सांगताच निघाली ती हॉलवरून.
***
त्याच्या लग्नाहून ती घरी आली ते तिथल्या अनुभवामुळे अस्वस्थ होऊनच. 'नशीब नवरोबा नाहीत. नाहीतर आडून आडून प्रश्न विचारून भंडावून सोडलं असतं.' तिच्या मनात आलं. नवरा परत आला तोपर्यंत तशी ती ठीक झाली होती. पण त्याची भिरभिरती नजर सतत तिचा पाठलाग करतच होती.
शेवटी दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी तो लवकर घरी आला तेव्हा तिने त्याला समोर बसवत विचारलं; "ऑफिसमध्ये काही टेन्शन आहे का?"
"छे! नाही ग. का?" त्याने नजर चुकवत तिला विचारलं.
"मग असा लहान मुलांसारखा माझ्या मागे मागे का करतो आहेस? काहीतरी खटकतं आहे तुझ्या वागण्यातलं." तिने शांतपणे त्याला म्हटलं.
"उगाच काहीतरी डोक्यात आणू नको हं." तो म्हणाला आणि लेकाशी बोलण्याच्या निमित्ताने त्याच्या खोलीत निघून गेला.
***
दुसऱ्या दिवशी मिरा ऑफिसमध्ये पोहोचली तर तो तिच्या केबिनमध्ये अगोदरच येऊन बसला होता. तिच्या लाडक्या पेपरवेटशी खेळत होता तो. केबिनमध्ये शिरल्या शिरल्या तिने ते त्याच्या हातून काढून घेतलं आणि फक्त भुवया उडवल्या.
"तू जर फुकटचा शिष्ठपणा करून दाखवणार असलीस न तर मी जातो इथून." तो मिरावरच वैतागला.
तिने थंडपणे त्याच्याकडे बघितलं आणि आपल्या जागेवर बसत म्हणाली; "मग का थांबला आहेस? जा की."
"मीरा, तुला कळतंय मी कोणत्या परिस्थितीतून जातो आहे. तर मला समजून घ्यायचं सोडून तू हे असले थंड कटाक्ष टाकते आहेस माझ्याकडे. कमाल करतेस यार." तो अजूनच वैतागत म्हणाला.
"हे बघ, एक तर तुझा गुंता तूच सोडवायचा आहे. मी फक्त ऐकायचं काम करते आहे. कारण मी आजवर सांगितलेल्या अनेक उपायांपैकी तू एकही वापरलेला नाही आहेस." मीरा शांतपणे म्हणाली.
"तुझे उपाय? जा बायकोला विचार तुझ्या आयुष्यात माझ्या व्यतिरिक्त कोणी आहे का? हे तुझे उपाय. म्हणजे मी माझ्या लग्नाला वाचवायचा प्रयत्न करतो आहे आणि तू....." मिराने एकदम थांबण्याचा हात करत टेबलावर झुकून त्याला म्हंटलं, "हे बघ. तुझं लग्न मुळीच बुडत नाही आहे. त्यामुळे वाचवायचा प्रयत्न वगैरे म्हणणं बंद कर. मला विचार लग्न बुडणं किंवा तुटणं म्हणजे काय! दोन अनुभव आहेत गाठीशी. आता नीट ऐक. हे जे काही तुला वाटतं आहे न; तो सगळा तुझ्या मनाचा खेळ आहे. चल, एक वेळ मी मान्य करते की तिच्या आयुष्यात कोणीतरी आहे. मग? परत एकदा सांगते; एकतर तिला स्पष्ट विचार नाहीतर सोडून दे विषय. याचा परिणाम फक्त आणि फक्त तुझ्यावर होणार आहे. तू तुला काही विचारत नाही तोपर्यंत ती तिच्या जगात खुश आहे; आणि तू माझ्या समोर हे असला 'दर्दभरा चेहेरा घेतोस तोपर्यंतच मी या विषयात आहे. कळलं?"
मिराचं बोलणं ऐकून त्याचं समाधान झालं नाही; पण नेहेमीप्रमाणे मन थोडं मोकळं झालं आणि तो उठून त्याच्या केबिनमध्ये गेला.
***
ती घरात डस्टिंग करत फिरत होती आणि तिचा मोबाईल वाजला;
'न जेवता निघालीस न तू लग्नातून?'
लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी त्याचा मेसेज आला तो एकदम हाच.
'अहं! अगदी नीट जेवले होते. पण आता माझा सासरा बनू नकोस हं काय काय खाल्लंस ते सांग म्हणत.' तिने उत्तर दिलं; आणि खुदकन हसली. मात्र त्याच्याकडून काहीच मेसेज नाही आला. एकदा तिच्या मानत आलं होतं की परत मेसेज करावा... पण आता तिने स्वतःला थांबवलं.
'त्याचं लग्न झालंय. नव्याची नवलाई आहे सगळी. असा अचानक मेसेज नको करायला. अजून त्याच्या बायकोचा अंदाज नाही आलेला.'
तिने विचार केला.... आणि तरीही तिला माहीत होतं की तिचा हा मनातला विचार देखील खरा नाही. काहीतरी चुकलं आहे किंवा चुकतं आहे. त्याच्या बायकोचं ते 'तुला बघून मला फार आनंद झालेला नाही'; हे न बोलता दाखवणं तिच्या आंतर्मनाला जाणवलं होतं.
म्हणूनच तिने अगदी ठरवून स्वतःहून मेसेज करणं बंद केलं होतं. त्याच्या देखील ते लक्षात आलं होतं; पण त्याला ते स्वीकारायचं नव्हतं.
***
'बायकोची मंगळागौर आहे. तू आलंच पाहिजेस.'
त्याचा मेसेज वाचून ती गोंधळली.
'अरे मंगळागौर श्रावणात असते. काहीतरी काय बोलत असतोस तू?'
तिने उत्तर पाठवलं.
'माहीत आहे ग. पण आम्ही नसू न श्रावणात. तोपर्यंत न्यूझीलंडवासी झालेले असू आम्ही. पण आमच्याकडचे सगळेच हौशी आहेत. त्यामुळे एक रात्र जागवून-खेळून घ्यायचा विचार आहे. तसा तुला आईचा फोन येईलच. पण मी आपलं सांगून ठेवतो आहे. मला माहीत आहे तुला सगळे खेळ येत असतील. ये नक्की.'
तिने त्याला काहीच उत्तर दिलं नाही. खरंच तिला मंगळागौर खेळायला खूप आवडायचं. तिच्या लग्नानंतरच्या पाचही वर्षांच्या मंगळागौरी तिने जागवल्या होत्या. इतर मैत्रिणींकडून देखील तिला आग्रहाचं आमंत्रण असायचं. तिने घातलेला कोंबडा, गाठोडं जोरदार असायचं. तिच्या सोबत होडी करायला सगळ्याच उत्सुक असायच्या.
तिचं काहीच उत्तर येत नाही बघून त्याने परत मेसेज केला.
'येशील न?'
आता मात्र तिला त्याची चेष्टाचा करायचा मूड आला.
'हो मंगळागौरीला येते. पण मग तुझी बायको वटपौर्णिमा पण त्याअगोदर करणार असेल न? त्याचं आमंत्रण नाही का मला?'
तिच्या त्या मेसेजने तो एकदम गोंधळून गेला.
'तुला नक्की काय म्हणायचं आहे? अग, वटपौर्णिमा तर ती तिकडे पण करू शकते न? म्हणजे अगदी वडाचं झाड नाही मिळालं तरी फक्त उपास करूच शकेल; किंवा आमच्या मातोश्री तिला एक फांदी कुरियर करतील.' असं म्हणून त्याने हसणारे स्मायली पाठवले.
खरं तर त्याचं उत्तर अगदी साधंसं होतं. पण का कोणजाणे तिचा पारा एकदम चढला. एक दीर्घ श्वास घेत तिने मेसेज टाईप करायला घेतला.
'म्हणजे तुझी इच्छा आहे की तिने वडाची पूजा करावी तुझ्यासाठी. तूच पति असावास पुढील सात जन्म म्हणून? पटतं का रे तुला हे सगळं? मला मान्य आहे की तुझा प्रेम विवाह आहे... माझा देखील. पण तरीही याच पुरुषासोबत या जन्मी वर्षानुवर्षं राहिल्यानंतर; मला तर बुवा चॉईस. पण तरीही जर चॉईस नाहीच मिळाला तर मात्र पुढच्या जन्मी मी नवरा आणि तो बायको.... विनोदाचा भाग सोड! पण खरंच तुला पटतं का हे असं वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून घरी आणून त्याची पूजा करणं? अरे सत्यवान-सावित्रीच्या मूळ कथेमध्ये सत्यवानाला लहानपणापासून फिट्स येत होत्या. हे सत्य सावित्रीला माहीत होतं; तरीही तिने लग्न केलं. सत्य माहीत असूनही अशा मुलाशी तिने लग्न केलं याचा अर्थ तिला स्वतःविषयी विश्वास होता की त्याच्या फिट्स वरचा उपाय ती शोधू शकते. अशीच कोणतीतरी फिट आली असेल त्याला लाकडं तोडायला जंगलात गेला असताना. तुला एक शास्त्रीय सत्य माहीत आहे का? वडाचं झाड चोवीस तास ऑक्सिजन देतं. त्याला फिट आल्याचं कळल्यावर कदाचित तिने त्याला वडाच्या झाडांच्या जंगलात नेलं असेल; कारण तिला माहीत असेल की त्याच्या फिट्सवर उपाय एकच आहे की जास्त प्रमाणात सतत त्याला प्राणवायू मिळायला हवा. वडाच्या झाडांच्या जंगलात त्याला सतत आणि अत्यंत शुद्ध प्राणवायू मिळाला असेल आणि त्याला परत जाग आली असेल. हा उपाय लक्षात आल्यानंतर त्यांनी वडाच्या झाडांच्या जंगलाजवळच राहाणं पसंत केलं असेल; आणि म्हणून तो जगला असेल..... या शास्त्रीय कारणांचा विचार न करता हे काय रे वडसवित्री आणि वडपौर्णिमा पूजन-उपास घेऊन बसलास?'
तिचा तो एवढा मोठा मेसेज वाचून तो एकदम गडबडला.
'अग, एकदम इतकी का चिडते आहेस? माझ्या बायकोने वडपौर्णिमेचा उपास करावा आणि वडाची पूजा करावी असं माझं मुळीच म्हणणं नाही. उलट मी तर म्हणतो याच जन्मी सात वर्षांनी आपण बदलून टाकावा नवरा.'
त्याचा मेसेज बघून अचानक चढलेला तिचा पारा एकदम खाली उतरला आणि 'गप रे...' म्हणत तिने 'bye' म्हणत फोन बंद केला.
त्याच्या आईचा फोन आला आणि तिने जायचं कबूल देखील केलं. पण ती खेळणार नव्हती. 'रात्री उशीर नाही जमणार... लेक लहान आहे'; हे कारण देऊन लवकर निघणार होती... ठरवलंच होतं तिने.
ती हॉलवर पोहोचली. तिचा चेहेरा अगदी शांत होता. एरवी तो असताना ओसंडून वाहणारा उत्साह एकदम गायब होता. त्याची बायको समोरून आली आणि अगदी आपलेपणाने बोलली. हात धरून तिला आत नेलं. पण तरीही ती शांतच होती. गंम्मत म्हणजे पुरुष मंडळी देखील होती तिथेच. थोडावेळ गप्पा झाल्या आणि सगळ्या उठल्या खेळायला. त्याची आई आली तिला बोलवायला. पण ती म्हणाली; "मला फारसं खेळता येत नाही." मग त्यांनी देखील फार आग्रह नाही केला. सगळे खेळ चालू होते आणि ती आतून दाटून येणारी उर्मी चेहेऱ्यावर दिसू न देण्याचा खेळ स्वतःशीच खेळत बसली होती. काही वेळाने सगळ्यांचा उत्साह ओसरला आणि नेहेमी प्रमाणे भेंड्या सुरू झाल्या. तसे रात्रीचे दहा वाजत आले होते. ती उठली आणि त्याच्या आईचा आणि बायकोचा निरोप घेऊन निघाली. तिला थांबण्याचा आग्रह झाला नाही; याचं मनातून तिला हायसंच वाटलं होतं. तो तसा हॉलच्या आतच आजूबाजूला हुंदडत होता मित्रांसोबत. त्याला फक्त तिने हात केला लांबूनच.
***
'मुद्दाम खेळली नाहीस न?'
ती अजून घरी पोहोचली देखील नव्हती आणि तिच्या फोनने वाजायला सुरवात केली.
'अरे मला येत नाही फारसं खेळायला. त्यात माझं पिल्लू लहान आहे म्हंटलं. घरी वेळेत गेलेलं बरं म्हणून निघाले.' तिने शांतपणे उत्तर दिलं.
तिला उत्तरादाखल दोन फोटो आले. एक ती कोपऱ्यात बसली होती पण पूर्ण गुंतलेली होती समोर चाललेल्या खेळात. दुसरा फोटो............. तिने मुडपून गच्च धरलेली पायाची बोटं होती. टॅक्सिच्या खिडकीबाहेर नजर वळवत ती घर यायची वाट बघायला लागली.
***
'बोलणार आहेस का?' काही दिवसांनी त्याचा मेसेज आला.
'या विषयावर आत्ता एकदा आणि शेवटचंच. चालणार असेल तरच बोलते.' तिने उत्तर दिलं.
'जशी तुमची मर्जी राणी सरकार.'
'हे बघ.... तुला मी आवडते आणि मला तू. आपली मैत्री आहे का? हो आहे! मैत्रीच्या पुढे काही आहे का? हो आहे! मग त्याला प्रेम म्हणायचं का? हो म्हणायचं! पण त्याचं कारण मैत्रीच्या पुढे आणि रूढार्थाने 'प्रेम' असतं त्याच्या अलीकडे असं काहीतरी नातं असतं... पण त्याला अजून नाव नाही. शब्दातीत आहेत या भावना... पण म्हणूनच समजून घ्यायला अवघड. तुझ्या घरच्यांनी आणि माझ्या नवऱ्याने त्या समजून घ्याव्यात ही मनापासून इच्छा करू शकतो आपण. पण जबरदस्ती नाही! समोरून स्वतःहुन तर मी स्पष्टीकरण कधीच देणार नाही. त्यामुळे तुझ्या बायकोने मला स्वीकारावं हा प्रयत्न तू बंद कर.'
'हम्म!' त्याचं उत्तर. पण थोड्यावेळाने एक गाणं आलं तिच्या मेसेजमध्ये.
https://youtu.be/doPtBhDTpj0
गाणं ऐकताना तिचं मन जड झालं होतं. गाणं संपलं आणि तिने एक जड निःश्वास सोडला.
.....आणि मग त्यानंतर त्या दोघांमध्ये तिच्या किंवा त्याच्या घरच्यांचा विषय नाही निघाला. घरी होणारे गमतीदार - चांगले - वाईट प्रसंग सांगितले जायचे एकमेकांना. पण ते सगळं बोलण्याच्या ओघातला भाग असायचं. बोलण्याचा मुख्य विषय तो नसायचा. मुळात त्यांच्याकडे इतके सुंदर आणि वेगवेगळे विषय होते बोलायला की घरचे आणि त्यांची यांच्या बद्दलची मतं हा विषय कधीच मागे पडून गेला होता.
***
त्याची प्रत्येक भारत भेट खास व्हायला लागली होती तिच्या सोबत. वर्षातून दोन किंवा तीन दिवस... फार तर दोन किंवा तीन तास भेटायचं! पण तरीही त्यांच्यातलं प्रेम फुलत होतं. हो 'प्रेम'च होतं ते. पण स्पष्टीकरण द्यावं लागेल असं प्रेम नाही!
त्याच प्रेमाचा पुढचा टप्पा होता का तो? तिला त्याचा एक मेल आला.... फक्त तिच्याचसाठी लिहिलेला....
दिवस, महिने... वर्षे सरली,
तशीच ओढ तरी का मज तुझ्या भेटीची?
नेहेमीच होते मन अधीर भेटण्यास तुला;
जाते चुकवून हळूच काळजाचा ठोका.
दिसताच तू वाटे धडधड अनामिक,
बोलायाचे असे बरेच,पण शब्दच हरवतात,
असे परंतु काही जादू तुझ्या स्पर्शात,
मज जाणवले ते प्रत्येक क्षणात.
घेताच मी हात तुझा माझ्या हाती,
होते शांत काहूर उठले जे मनात.....
तिने मेल वाचली आणि ती हसली... डोळ्यात अश्रू तरळले होते का दोन? फक्त त्याच्यासाठी? कुणास ठाऊक!
तिने त्याला फक्त 'मस्त' इतकाच रिप्लाय केला. अन् पुरेसा होता तो त्याला. एक मंद स्मित होतं त्याच्या चेहेऱ्यावर तिचा तो एक शब्दाचा मेल वाचताना.
***
दिवस... महिने सरकत होती. कधीतरी तो एकदम ओसंडून जायचा... मग सतत मेसेज असायचे त्याचे. कधी तिची तारांबळ व्हायची उत्तरं देताना. तर कधी त्याच मौन समजून घेणं अवघड व्हायचं. मग त्या प्रत्येक वेळी तिची एक कविता असायची.
असे बरेच दिवस गेले होते... त्याने स्वतःहून मेसेज केला नव्हता. ती देखील संसारात रमली होती. पण तरीही आठवण जागत होती. एकदिवस कॉफी पिता पिता तिला काहीतरी सुचलं आणि लगेच तिने ते त्याला पाठवलं...
कॉफ़ीत एक नशा असते...
ती कधी एकट्याने.. तर कधी दुकट्याने..
अनुभवायची असते..
नशा काही कॉफ़ीची नसते..
ती सोबतिच्या भावनेची असते..
एकटेपणातही नशेची company असते...
ती कधी खोल गर्तेत नेते..
दुकटेपणात romance ची सोबत असते...
romantic नशेची धुंदी कॉफ़ीत असते...
मोजक्या गप्पा, business deals;
कॉफ़ी च्या टेबलावरची अनेक thrills...
गरमा-गरम गप्पांची वाफाळती कॉफ़ी,
हळुवार नजरांची बर्फाळती कॉफ़ी...
प्रेमाच्या आणा-भाका; कुटुंबांची बैठक
कॉफ़ी च्या टेबलाची अशीही एक रौनक!
सोबत कॉफ़ीची वाट पहातानाची....
खूप कामानंतरच्या निवांत क्षणाची!
कधी सुरु झाली ही कॉफ़ी संस्कृति?
कळत-नकळत झाली आपल्यात sink ती...
टपरीच्या चहाची इज्जत भारी;
पण कॉफ़ी च्या टेबलाने आणली नजाकत न्यारी!
खुश होती ती तिच्या त्या कॉफीवर. आणि त्याच्या उत्तराने तर मोरपीस फुललं तिच्या मनावर!
'माझी आयरिश ती!'
'ए! तुला माहीत आहे आपण जी आयरिश पितो न तो फक्त फ्लेवर आहे. खरी आयरिश इथे प्यायलो मी. तशी खरी आयरिश तुझ्यासोबत घ्यायची आहे. ए! लगेच लेक्चर नको. मुंबईमध्येच घ्यायची! ताज!!! बांद्रा!!! एकदा नक्की...'
***
आणि एकदिवस अचानक त्याचा मेल आला...
मी घोळ घालून ठेवला आहे. माझ्या बायकोने तुझे माझे whatsaap वरचे chats बघितले. तसं मी नेहेमी डिलीट करतो ग. पण काल राहिलं आणि तिने माझा फोन हाताळताना तुझ नाव वाचून आपलं chat उघडलं आणि बघितलं. आपल्या साध्याच गप्पा होत्या नेहेमी प्रमाणे. पण मी तुझा उल्लेख 'राणी', 'सोन्या', 'डार्लिंग' असा केलेला तिने बघितला आणि मग घरात तिसरं महायुद्ध झालं. तिने लगेच आई-बाबांना फोन करून सांगितलं. त्यांना हे माहित आहे की आपण अधून मधून बोलतो; पण तरीही त्यांना देखील या असल्या गप्पा पटल्या नाहीत. त्याचं देखील बरोबर आहे न; आपली जी आणि जशी मैत्री आहे ती सहसा कोणाला पटणार नाही. म्हणून त्यांच्या समाधानासाठी तुला एक whatsaap मेसेज करोतो आहे.
आणि त्याचा whatsaap वरचा मेसेज होता.....
आपल्यामध्ये जी काही मैत्री or जे काही होतं ते सगळं मी थांबवतो आहे. ह्या पुढे मी तुला कुठलाही मेसेज, chat or इतर काहीही contact करणार नाही. good bye
तिला धक्का बसला.... पण क्षणभरात तिने स्वतःला सावरलं आणि त्याच्या मेसेजला उत्तर लिहीलं.....
जे काही होतं? अरे आपली एक चांगली healthy मैत्री आहे. किंवा होती म्हणू. हे अचानक काय आलं? पण ठीके! नाही बोलायचं तर नको. तू माझ्याशी किंवा मी तुझ्याशी न बोलल्यामुळे आपलं आयुष्य थांबणार नाही आहे. किंवा बोलल्यामुळे आयुष्य वेगळं देखील होणार नाही आहे. मुळात आपण असं किती बोलतो रे; की बोलणं थांबवायचा मेसेज तू करोत आहेस? एक लक्षात घे मी एक सुखी सांसारिक स्त्री आहे. तुझे आई-वडील आणि माझा नवरा एकमेकांशी का comfortable होऊ शकले नाहीत ते मला माहित नाही. त्यामुळे माझं देखील तुझ्या आई-वडिलांशी बोलण थांबलं... पण असं का झालं ते मी त्यांना देखील कधी विचारलं नाही. बरं; थट्टा, मस्करी, गप्पा याव्यातीरिक्त आपण नक्की काय बोलतो रे की तू म्हणावस की जे काही होतं? अरे माझा मुलगा आणि नवरा देखील माझा मोबाईल हाताळतात आणि माझी त्याबद्दल काही हरकत देखील नाही. ते दोघे फोन घेतात म्हणून मी कधी तुझे मेसेज डिलीट नाही करत. तुझा हा मेसेज बघून त्यांचा काही गैरसमज होऊ शकतो ना. किमान १० वेळा विचार करायचास की रे मेसेज करताना. बरं; फक्त तुझ्या माहितीसाठी सांगते आहे... मी हे मेसेज पण डिलीट नाही करणार. जर त्यांनी बघितले आणि काही विचारलं तर मी स्पष्ट सांगीन की आम्ही बोलायचो.. आणि त्याने असा अचानक हा मेसेज का पाठवला त्याचं त्याला माहित. तुला माझी बाजू सांगणं मला गरजेचं वाटलं म्हणून हा मेसेज करते आहे. good bye
तिने whatsaap बंद केला आणि तशीच स्वस्थ बसून राहिली. तिला फार वाट बघायची गरजच नव्हती. मेल आल्याचं तिच्या मोबाईलने लगेच ओरडून सांगितलं तिला. तिने हसतच inbox उघडलं.
अग हा काय मेसेज केलास? मी फक्त त्यांच्या समाधानासाठी मेसेज करतो आहे असा मेल केला होता तो बघितला नाहीस का? रागावली आहेस का राणी? खरंच बोलायचं नाही का आपण आता? अर्थात तू अस ठरवलं असलंस तर तुझं देखील बरोबर आहे म्हणा. हे असं खोटं बोलून नाव नसलेलं नात जर तुला पटत नसेल तर मी तुला काहीच प्रश्न नाही विचारणार.
ती हसली. मात्र त्याचा उतरलेला चेहेरा तिच्या डोळ्यासमोर आला आणि तिने घाईघाईने रिप्लाय केला.
वेडा आहेस तू अगदी. माझ्या मेसेजने तू जर गडबडला आहेस तर नक्कीच त्याचा योग्य तो परिणाम इतरांवर झाला असेल न? मला कळतं रे; की नाही पटणार तुझ्या घरच्यांना हे असं आपलं बोलणं. ही मैत्री स्वीकारणं अवघड आहे सगळ्यांना. तो मेसेज करताना देखील मला मनातून वाटत होतं की खरं तर हे असं काहीतरी एक बोलायचं आणि वेगळंच वागायचं मला पटत नाही. तसा माझा काय आणि तुझा काय स्वभाव नाही. पण कोणालाही काहीतरी सिद्ध करून दाखवण्यापेक्षा.... आणि काय पटतं आहे किंवा नाही याहीपेक्षा तुझं माझ्या आयुष्यात असणं मला जास्त महत्वाचं वाटतं. तुझं मन देखील हेच सांगतं आहे तुला याची मला खात्री आहे. त्यामुळे आता फार विचार करू नकोस. झालं गेलं संपलं ते सगळं. बस! आता मात्र काळजी घे.
तिचा मेल वाचून तो विसावला आणि मग त्याचं उत्तर आलं तिच्या मेलला....
आठवतं का ग असंच एकदा आपण गप्पा मारत होतो; तेव्हा कधीतरी मी तुला विचरलं होतं 'काय नाव द्यावं आपल्या या नात्याला?' आणि तू म्हणाली होतीस 'या नात्याला नाव नको देऊया.' पण आत्ता माझ्या मूर्खपणामुळे ज्या काही घटना घडल्या आणि तू मला सावरून घेतलंस.... आणि त्याहूनही जास्त महत्वाचं म्हणजे... तू का सावरून घेतलंस याचं कारण सांगितलंस आणि मनात आलं खरंच काही नाव का नसावं ह्या नात्याला? किंवा काय नाव देता येईल ह्या नात्याला? तसं आपल्या सामाजिक परिस्थितीत आपलं हे नातं कुठेच बसत नाही. म्हणजे 'खूप चांगली मैत्री'च्या बरंच पुढे 'girlfriend - boyfriend' च्या देखील पुढे गेलंय हे नातं. तरीही अस्तित्वात असलेल्या कोणत्याही नात्यापर्यंत पोहोचू न शकणारं असं हे विलक्षण साधंसं आणि तरीही गुंतागुंतीचं........ भावनिक आणि तरीही सुंदर........... नातं आहे हे. मग मनात विचार आला ह्या विलक्षण नात्याला नाव देखील तेवढंच विलक्षण हवं. नाव असावंच असं नाही, पण काय आहे न आपलं दोघांचं हे नातं खरंच खूप सुंदर आहे. इतकी वर्ष होऊनही तेवढंच जिवंत आणि तरुण आहे. ना कधी भांडण ना वाद... हा; एखादा विषय पटला नाही तर चर्चा होतेच की आपल्यात.... तू तुझा मुद्दा सोडत नाहीस आणि मी माझा... पण ते तेवढ्या पुरतंच असतं; आणि दोघांनाही त्याची पूर्ण जाणीव असते. एक वेगळीच समज आहे या नात्याला. मग अशा या नात्याला नाव पण तसंच हवं न.
विचार करताना मनात आलं एक नाव.... red wine नातं! रुढार्थाने कोणत्याही नात्याच्या अटींमध्ये न बसणारं आणि एकमेव असं हे नातं आहे. आता जर हे नाव मी देतो आहे तर त्याचं कारण देखील तुला सांगितलं पाहिजे न.... हेच नाव का ते सांगू?
एकतर; red wine आपल्याला दोघांना आवडते. बर wine घ्यायला काळ वेळ लागत नाही. तरीही जेव्हा wine घेतली जाते ती वेळ खास असते. आपलं पण असंच आहे न... केव्हाही आणि कुठेही भेटलो तरी ती जागा आणि ती वेळ खास होते. red wine मध्ये एकूणच elegance आहे, नाजुकपणा आहे. wine घेताना ती कधीच संपू नये असं सारखं वाटत असतं. तसंच आपल्या नात्यात आहे. एक elegance आहे... एक नाजुकपणा आहे आपल्या नात्यात..... आणि भेटलो की ती भेट संपूच नये असं वाटतं. बियर म्हंटलं की विजय मल्ल्याची किंगफिशर आणि त्याची जाहिरात करणाऱ्या अल्पवस्त्रांकित ललना डोळ्यासमोर येतात. त्यामुळे तू आणि बीअर असा विचार कधी मनाला नाही शिवला. red wineचं तसं नाही. red wine म्हंटलं की एक शांत संध्याकाळ.... मावळतीचा सूर्य किंवा एखादी पौर्णिमेची रात्र आठवते. समोर अथांग समुद्र... जो आपल्याला दोघांना आवडतो.... आणि माझ्या शेजारी संपूर्ण पांढऱ्या शुभ्र ड्रेस मध्ये केस मोकळे सोडून बसलेली तूच आठवतेस. अजून एक कारण हेच नाव देण्याचं. red wine चा लाल रंग; तू असलीस की सगळं कसं गुलाबी होतं न... हा गुलाबी रंग पण त्या लाल रंगात मुरला आहे. एक अजून, red wine ची चव बराच वेळ रेंगाळते.... तुझ्या आठवणी सारखी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे wine ला expairy date नसते.... उलट ती जितकी जुनी तेवढीच तिची चव मुरते.... तिचा elegance वाढतो आणि रंग गहिरा होत जातो.
राणी; आज या नात्याला नाव देताना मनातून समाधान वाटतं आहे.... खूप काहीतरी शांत झालं आहे मनात. माझं माझ्या आयुष्यावर.... आई-बाबांवर आणि बायकोवर जितकं प्रेम आहे न तितकंच ते तुझ्यावर देखील आहे.... हे 'red wine' नातं खूप खूप खास आहे माझ्यासाठी............. अहं................. आपल्यासाठी!!!
क्रमशः
No comments:
Post a Comment