अनाहत सत्य
भाग 5
निर्मिती आत शिरली आणि तिच्या लक्षात आलं की सर जागेच आहेत.
"सर? जागे आहात तुम्ही?" तिने काहीसं अवघडून सरांना विचारलं.
"हो! म्हणजे थोड्या वेळापूर्वी जाग आली. तू आत येत होतीस आणि परत मागे वाळलीस न तेव्हा..." सर शांतपणे म्हणाले.
"अरे!? मग तुम्ही बाहेर का नाही आलात?" निर्मितीने आश्चर्याने विचारलं.
"मी आलो असतो तर कदाचित मिठठू बोलायचा थांबला असता आणि सगळंच माझ्यावर सोडून निघून गेला असता. खरं तर माझी इच्छा होती की त्याने तुला स्वीकारावं. फक्त त्यानेच नाही तर... त्यासर्वांनीच." सर उठून बसत म्हणाले.
"सर्वांनी म्हणजे या कबिल्यातल्या सर्वांनी न सर?" निर्मितीने विचारलं.
"अहं! हा कबिला आणि त्यांचा मुखीया हे केवळ नाममात्र ग. खरे ते कोणी वेगळेच आहेत." सर शांतपणे म्हणाले.
निर्मितीला काही कळत नव्हतं सर काय म्हणत आहेत.... त्यामुळे ती काही एक न बोलता सर जे बोलत होते ते ऐकत होती.
"निर्मिती.... मिठठू जे बोलत होता ते काही तंद्रीमध्ये किंवा झोपेत नाही.... तो जाता-जाता म्हणाला ना की तो परवानगी घ्यायला जातो आहे.... मला तेच अपेक्षित होतं." सर जे बोलत होते ते अजूनही निर्मितीला कळत नव्हतं. "सर, मला काहीही कळत नाही आहे. नीट फोड करून सांगाल का प्लीज." निर्मिती म्हणाली आणि सर हसले.
"अग, मला देखील नक्की माहीत नाही. पण जे कळतंय ते सांगतो. मला हे देखील माहीत आहे की मी तुला जे सांगणार आहे ते कदाचित तुला पटणार देखील नाही.... पण आता इथवर आल्यानंतर तुला काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे. निर्मिती... बेटा.... आपण जे देऊळ बघायला जाणार आहोत ते फक्त पुराण वास्तु इतकंच नाही तर त्याहूनही खूप काही जास्त आहे." सर सावरून बसत म्हणाले.
"खूप काही जास्त? म्हणजे नक्की काय सर?" निर्मिती पूर्ण बुचकळ्यात पडली होती.
"निर्मिती.... ते मंदिर म्हणजे एका वेगळ्या जगाचा मार्ग आहे... किंवा सुरवात आहे.... किंवा... असंच काहीतरी आहे. मला देखील नक्की सांगता येणार नाही. कारण अजून मी देखील चाचपडतो आहे. तुला आठवतं का या मंदिरासंदर्भात माहिती सांगताना तुला मी सांगितलं होतं की ते जे काही मंदिर सदृश आहे तिथून एका गूढ अस्तित्वाची सुरवात आहे. तिथे पूर्वी कदाचित् अनेक युगांपूर्वीची संस्कृती नांदत असावी असा माझा कयास आहे. परंतु अजूनही मी याविषयी खूपच शाशंक असल्याने कोणाकडेही फारसं बोललेलो नाही. हा परिसर घनदाट झाडांनी आच्छादलेला आहे. त्यामुळे भर दिवसा देखील तिथे फारसा उजेड नसतो. त्यात तिथेल्या आदिवासींमध्ये असा समाज आहे की तो एकूण भाग शापित आहे. मी हळूहळू त्या लोकांचा विश्वास मिळवून त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा मला समजलं की त्या आदिवासींचा अनुभव असा आहे की तिथे येणाऱ्या आपल्यासारख्या बाहेरच्या लोकांना वेड लागतं किंवा मग ते अचानक गायब होतात . अर्थात तिथल्या स्थानिकांना मात्र कधी हा त्रास झालेला नाही. त्यामुळे त्यांचा त्या भागातला वावर अगदी सहज असतो. निर्मिती.... प्रश्न हा आहे की इथल्या लोकांना तिथे जाताना काहीही त्रास होत नाही; मग बाहेरून येणाऱ्यांना तो भाग स्वीकारत का नाही? या प्रश्नाचं उत्तर अगोदर मिळवणं आवश्यक वाटल्यामुळेच मी स्वतः इथे अनेकदा येऊन माझ्या अस्तित्वाची तिथे ओळख निर्माण केली. मला यांच्यातलाच एक असल्याप्रमाणे स्वतःची ओळख निर्माण करायची होती... आणि त्याचवेळी असं कोणीतरी माझ्या सोबत हवं होतं जे या जागेसाठी नवीन असेल पण या विषयासंदर्भात नवीन नसेल." सर म्हणाले आणि निर्मितीला एक मोठ्ठा धक्का बसला.
"सर, मला तुम्ही गिनीपिग म्हणून आणलं आहात?" अत्यंत दुखावलेल्या आवाजात निर्मिती म्हणाली.
"निर्मिती, उगाच काहीतरी शब्द वापरू नकोस. तुला मी गिनीपिग करेन का? तू इथे माझ्या सोबत आहेस कारण तुला ऐतिहासिक.... पौराणिक विषयांमध्ये रस आहे. त्याच सोबत तुझा अभ्यास देखील खूप प्रामाणिक आणि फक्त पुस्तकांच्या आतला नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे जर काही वेगळं नवीन असेल तर तू लगेच ते नाकारणार नाहीस... अशी मला खात्री आहे." सर म्हणाले.
"सर, वेगळं.... नवीन.... नक्कीच नाकारणार नाही. पण अतिरंजित किंवा काहीतरी अंधश्रद्धा असली तर मात्र मी नाही स्वीकारणार." निर्मिती काहीशा स्थिर आणि गंभीर आवाजात म्हणाली.
"निर्मिती, तुला वाटतं का की काहीतरी अतिरंजित असं मी तुला सांगेन? बेटा... अंधश्रद्धा असली तर मी देखील ते मान्य करणार नाही. इथे काहीतरी वेगळं आहे. ते आपल्या नेणिवेच्या जाणिवेपलीकडे आहे." सर शांतपणे म्हणाले.
"सर.... नेणिवेच्या जाणिवेपलीकडे म्हणजे नक्की काय?" निर्मितीने विचारलं.
"निर्मिती... कधी कधी आपण विचारात गढलेले असतो किंवा तंद्रीमध्ये असतो आणि अचानक आपल्याला कोणीतरी हाक मारल्यासारखं वाटतं. म्हणजे... खरंच हाक मारली आहे असं वाटतं आणि आपण वळून बघतो; पण मग लक्षात येतं की कोणीच नाही... आणि मग आपल्याला भास झाला अशी स्वतःची समजून काढतो आपण. पण कल्पना कर... की खरंच त्यावेळी त्या व्यक्तीने आपल्याला तीव्रतेने आठवलं असेल... किंवा हाक मारली असेल तर?..." सरांना मध्येच थांबवत निर्मिती म्हणाली; "सर, होतं की असं कधी कधी.... कोणीतरी सांगतं आपल्याला की अग परवाच तुझी आठवण काढली... आणि आपल्याला आठवतं की आपल्याला देखील त्या व्यक्तीने हाक मारल्यासारखं वाटलं होतं... किंवा ती व्यक्ती अगदी तीव्रतेने आठवली होती त्याक्षणी. पण त्याचा इथे काय संबंध सर?"
"निर्मिती.... तुझ्या उदाहरणामध्ये आपल्या माहितीमधल्या व्यक्तीने आपली आठवण काढलेली असते किंवा आपल्याला हाक मारली असते असं म्हणते आहेस. मी त्याहूनही वेगळं काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो आहे. समज.... तू ओळखत नाहीस... आणि तरीही एखादी व्यक्ती किंवा एखादं अस्तित्व तुला बोलावायला लागलं तर तू काय म्हणशील त्याला?" सर निर्मितीकडे एकटक बघत म्हणाले.
सरांच्या नजरेने निमिर्ती अस्वस्थ झाली आणि त्यांची नजर चुकवत म्हणाली; "सर, हे काहीतरी विचित्र आहे. म्हणजे तुमचा प्रश्नच मला कळला नाही आहे. जर मला ओखत नाही तर का कोणी मला हाक मारेल?"
"निमिर्ती तुला कळलं नाही आहे मी काय म्हणतो आहे.... तू ओखत नाहीस.... पण जर ती व्यक्ती..... ते अस्तित्व तुला ओळखत असेल तर? एका वेगळ्याच मितीमध्ये तुला हाक मारली असेल त्या अस्तित्वाने तर? तू तुझ्याही नकळत ओ दिली असलीस तर?" सर अजूनही निर्मितीकडे एकटक बघत बोलत होते.
"सर.... मी ओखत नाही.... पण तरीही जर कोणी मला हाक मारत असेल तर कदाचित मी उत्तरच देणार नाही. हे झालं सर्वसाधारणपणे सर्वसामान्य परिस्थितीतलं माझं वागणं. पण मला कळतंय की तुम्ही सर्वसामान्य परिस्थितीबद्दल बोलत नाही आहात. तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते मला नीट फोड करून सांगाल का सर? कारण तुमच्या या बोलण्याने मी अस्वस्थ होते आहे... आणि खूपच गोंधळून गेले आहे. मुळात मला असं वाटायला लागलं आहे की तुम्ही आणि मिठठूने मिळून मला मुद्दाम इथे आणलं आहे. सर, माझा तुमच्यावर विश्वास आहे... अगदी डोळे मिटून मी तुमच्या सोबत कधीही कुठेही येईन. पण तरीही आत्ता आपल्यामध्ये जो संवाद होतो आहे... त्यामुळे मी खूप अस्वस्थ होते आहे." निमिर्ती स्पष्टपणे बोलली.
तिचं बोलणं ऐकून सर मनापासून हसले आणि म्हणाले; "निर्मिती तुझा माझ्यावर विश्वास आहे हे मला माहीत आहे. मुळात तुला अस्वस्थ करण्याचा किंवा गोंधळवून टाकण्याचा माझा उद्देश नाही; पण खरं सांगू का? मला देखील कल्पना नाही की नक्की काय सांगावं तुला. माझे त्या भागाविषयीचे अनुभव हे केवळ माझ्या आतेंद्रियांना जाणवणारे आहेत. काहीतरी वेगळं आहे तिथे. म्हणजे कसं ते सांगतो.... कधी कधी आपण सरळ समोर बघत असतो; पण डोळ्यांच्या कडेला काहीतरी हालचाल जाणवते आपल्याला जी आपल्या मागे किंवा अगदी दूर झालेली असते. अनेकदा आपला त्या हालचालीशी संबंध देखील नसतो; पण केवळ आपल्याला डोळ्यांच्या कडांकडून जाणवत आणि आपण वळून बघतो... पण आपण वळलो की आपला संबंध नाही त्याच्याशी. त्या भागात गेलं की असं काहीसं जाणवत राहातं मला. काहीतरी असतं तिथे... जे घडत असतं. मला जाणवतं देखील... पण तरीही मी त्यातला भाग नसतो... किंवा अजून तरी नाही. पण तरीही मी तिथे असावं; किंवा असं म्हणूया की माझं अस्तित्व तिथे असलंच पाहिजे अशी त्या डोळ्यांच्या कडांकडच्या हालचाली करणाऱ्यांची इच्छा असावी."
सरांचं बोलणं निर्मिती मनापासून ऐकत होती. ते बोलायचे थांबले तशी ती म्हणाली; "सर, म्हणजे तुमचा sixth sence तुम्हाला जाणवतो का तिथे गेल्यावर?"
"Excatly निर्मिती! मी तिथे असण्यात त्यांना काही प्रॉब्लेम नाही; पण माझं असणं हे केवळ कार्यकारण भाव आहे; असं देखील मला जाणवतं ग." सर म्हणाले.
"म्हणजे काय सर?" निर्मितीने नकळून विचारलं.
"अग, म्हणजे त्यांना माझ्याकडून काहीतरी अपेक्षा आहे; म्हणून माझं तिथे असणं ते स्वीकारत आहेत; असं मला जाणवतं सतत." सर म्हणाले.
"सर पण हे ते जे कोणी आहेत... ते कोण? ते तर सांगा न. मी अजूनच गोंधळून जाते आहे." निर्मिती न राहून म्हणाली.
सर उठून तिच्या जवळ येऊन बसले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले; "बाळ निर्मिती, मला देखील अजून ते कळलेलं नाही. पण हे नक्की की मला आतून असा एक संकेत जाणवला की मी तुला घेऊन आलं पाहिजे इथे. म्हणूनच मी तुला विचारलं. अर्थात तू जर नाही म्हणाली असतीस तर मी तुला आग्रह केला नसता. पण का कोण जाणे मला खात्री होती की तू नाही म्हणणार नाहीस. निर्मिती, कदाचित मी तुला इथे आणण्याचा एक दुवा असेन. किंवा आपण दोघांनी एकत्र इथे असणं ही त्यांची गरज असेल."
निर्मिती सरांच्या बोलण्याने काहीशी अस्वस्थ झाली होती. सरांच्या ते लक्षात आलं. परत एकदा स्वतःच्या बिछान्याकडे वळत सर म्हणाले; "आत्ता फार विचार नको करुस निर्मिती. कदाचित मी देखील तुला नीट समजावू शकत नाही आहे. मिठठू जाताना काय म्हणाला ते आठव... तो परवानगी घेऊन येतो म्हणून सांगून गेला आहे न. याचा अर्थ कदाचित मी जे माझा sixth sence म्हणतो आहे... माझ्या अतींद्रिय जाणिवा..... ते खरं असेल. त्या मंदिराच्या जवळ जे काही आहे... ते इथल्या लोकांना माहीत आहे; जाणवतं आहे किंवा कदाचीत त्यांचा त्याच्याशी सहज संपर्क देखील आहे. त्या आपल्याला माहीत नसलेल्या कशाची तरी.... आपल्या सोयीसाठी आपण त्याला अकल्पित शक्ती म्हणू.... तिची परवानगी घ्यायला गेला आहे मिठठू. म्हणजे नक्की कसली परवानगी हे मला विचारू नकोस... कारण मला देखील ते माहीत नाही. पण बेटा एक नक्की की आपण एका वेगळ्या परिस्थितीमध्ये शिरतो आहोत. मात्र माझ्यावर एक विश्वास ठेव निर्मिती; मी तुला कोणत्याही अडचणीत टाकणार नाही."
खूप शांत आणि हसऱ्या आवाजात निर्मिती म्हणाली; "सर, मी मगाशीच म्हंटलं की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला स्वतःची कोणतीही काळजी नाही. फक्त सत्य आणि अतिरंजित यामध्ये आपण सत्याचा स्वीकार कायम केला पाहिजे हा माझा आग्रह आहे आणि राहील."
तिच्याकडे बघत मोकळेपणी हसत सर म्हणाले; "अगदी मान्य निर्मिती. माझं देखील कायमच हे म्हणणं राहिलं आहे. बरं, आता थोड्यावेळ पड बेटा तू. घड्याळात बघितलंस तर पाहाट होण्याची वेळ झाली आहे हे तुझ्या लक्षात येईल. पण इथे तसही खूप उजाडलं असं होत नाही.... अगदी दिवस वर येईपर्यंत. एकतर तुझं पूर्ण रात्र जागरण झालं आहे; जे एका अर्थी बरं झालं... पण आता तसही मिठठू परत येइपर्यंत आता आपल्याला करण्यासारखं काहीही नाही. त्यामुळे आपण दोघेही परत एकदा झोपुया. इथून निघाल्यानंतर पुढे काय काय घडणार आहे ते आपल्या हातात नाही; किंबहुना आपल्याला माहीत नाही किंवा आपण कल्पना देखील करू शकणार नाही. त्यामुळे आपलं मन आणि शरीर फ्रेश असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे झोप तू. मी पण परत एकदा झोपतो आहे."
असं म्हणून सर परत एकदा आडवे झाले आणि त्यांनी डोळे मिटून घेतले. सरांकडे एकदा एकटक बघून निर्मिती देखील तिच्या अंथरुणावर जाऊन पडली. विचार करता करता नकळत निर्मितीला झोप लागली... अगदी गाढ!
क्रमशः