Friday, March 13, 2020

कुंती, द्रौपदी, सीता.... काळ आणि परिस्थिती!


आपल्या पुराण कथांमध्ये सांगितले आहे की दुर्वास मुनी एकदा कुंतीभोज राजाकडे आले आणि म्हणाले की त्यांना एक यज्ञ करायचा आहे आणि त्यासाठी त्यांना एकांत हवा आहे; मात्र त्यांच्या गरजा पूर्ण होणे देखील महत्वाचे आहे. दुर्वास मुनी अत्यंत तापट असल्याने वेळी-अवेळी दुर्वासांनी बोलावले असता तत्पर असणारी व्यक्तीच त्यांची सेवा करू शकेल; याची कुंतीभोजा कल्पना होती. त्यामुळे त्याने आपल्या गुणी आणि अत्यंत समंजस अशा कन्येला; कुंतीला ही जवाबदारी दिली. कुंतीने देखील ही जवाबदारी अत्यंत मनापासून स्वीकारली आणि दुर्वासांची सेवा मनोभावे केली. त्यायोगे दुर्वास मुनींचा यज्ञ यथासांग पार पडला. दुर्वास मुनी कुंतीच्या शांत आणि सेवाभावी स्वाभावाने खुश झाले आणि त्यांनी तिच्यावर अनुग्रह करून तिला एक वरदान दिले. त्यांनी त्यांच्या तपश्चर्येने मिळवलेला असा एक मंत्र कुंतीला दिला की त्याचे स्मरण करून ती ज्या शक्तीला आव्हाहन करेल ती शक्ती तिच्या समोर प्रगट होऊन तिला पुत्ररत्न देईल. हा मंत्र दिला त्यावेळी कुंतीने केवळ तारुण्यसुलभ कुतूहलातून तिला कायम मोह वाटत असणाऱ्या तेजोमय शक्तीच्या देवाला सूर्याला आव्हाहन केले. त्यातूनच कर्णाचा जन्म झाला. मात्र त्यावेळी कुंती कुमारी असल्याने, आणि त्यावेळी देखील सामाजिक बंधीकीचा पगडा खूप जास्त असल्याने तिला कर्णाचा त्याग करावा लागला. पुढे यथावकाश कुंतीचे लग्न हस्तिनापूरचा राजा पांडू याच्याशी झाले. परंतु दुर्दैवाने राजा पांडूला एक शाप मिळाला. या शापामुळे राजा पांडू प्रणय करू शकणार नव्हता. हे समजल्यानंतर पांडूची राज्य त्याग केला आणि कुंती व द्वितीय पत्नी माद्री वानप्रस्थाश्रमात स्वीकारला. पांडू वानप्रस्थाश्रमात होम-हवन, धर्म कार्य करीत होता; परंतु तरीही कायम दु:खी होता. जर पुत्र प्राप्ति झाली नाही तर स्वर्गात जागा मिळणार नाही; हा विचार त्याचे मन जाळत होता. हे पतीचे दु:ख समजून कुंतीने दुर्वास मुनींकडून मिळालेल्या वरदानाची माहिती पांडूला दिली. त्यानंतर त्याच्या सांगण्यावरून तिने तीन शक्तींशी समागम केला आणि पुत्र प्राप्ति करून घेतली. कुंतीला झालेले तीन पुत्र पाहून माद्री... पांडूची दुसरी पत्नी दु:खी राहू लागली; त्यावेळी पांडूच्या विनंतीवरून कुंतीने आपले वरदान माद्रीच्या ओटीत घातले. अशाप्रकारे माद्रीला देखील दोन पुत्र झाले. त्याकाळात लग्नानंतर स्त्रीने जन्म दिलेली मुले ही ती ज्या व्यक्तीची पत्नी असे त्या व्यक्तीचीच मानली जायची. त्यामुळे धर्म, भीम, अर्जुन हे कुंती पुत्र आणि नकुल, सहदेव हे माद्री पुत्र पुढे पांडू पुत्र म्हणून ओळखले जायला लागले.


द्रौपदीच्या पांडवांबरोबरच्या लग्नाच्या बाबतीत एक कथा प्रचलित आहे. त्यातील एक कथा अशी की, द्रौपदीने पूर्व जन्मात शंकराचे तप करून 'सर्वगुण संपन्न पुरुष' पुढील जन्मात पती म्हणून मिळावा असे वरदान प्राप्त केले होते. द्रौपदीला पणात जिंकल्यानंतर अर्जुन तिला घेऊन घरी आला आणि आई कुंतीला द्रौपदीबद्दल सांगताना 'मी कोणती भिक्षा आणली आहे बघ'; असे म्हणाला. त्यावेळी कुंतीची दाराकडे पाठ होती. तिने मागे न बघताच आदेश दिला की आणलेली भिक्षा पाचहीजणांमध्ये वाटून घ्या; त्यावेळी हे ऐकून द्रौपदी स्तंभित झाली. तिने या प्रस्तावाला नकार दिला. त्यावेळी श्रीकृष्णाने तिला तिच्या पूर्वजन्मी केलेल्या तपाची आठवण करून दिली आणि पाच पांडवांचे गुण मिळून एक सर्वगुण संपन्न पुरुष होतो; असे सांगून तिला त्या लग्नासाठी तयार केले.


वडिलांनी त्यांच्या पत्नीला दिलेला शब्द पाळण्यासाठी रामाने वनवासाला जाण्याचा निर्णय घेतला. पतीच्या बरोबरच पत्नीने असावे' या त्या काळाला साजेशा विचाराने सीतेनेही रामाबरोबर जाणे ठरवले. पुढे वनात रामाला बघून रावणाची बहीण शूर्पणखा त्याच्यावर मोहित झाली; आणि तिने त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. रामाने नकार देताच ती लक्ष्मणाकडे गेली; परंतु लक्ष्मणाकडून देखील तिला नकार मिळाला. त्यावेळी लक्ष्मणाने रागाने शुर्पणखेचा एक कान आणि नाक कापले. आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला म्हणून रावणाने सीतेचे अपहरण केले. त्यानंतर त्याने तिला अशोक वनात ठेवले आणि आपल्याशी विवाह करण्याची विनंती केली. परंतु त्याने कधीही सीतेला स्पर्श केला नाही. तरीही लंकेवर स्वारी करून पत्नीला सोडवल्यानंतर केवळ सामाजिक बांधिलकीचा विचार करून रामाने तिला अग्नी परीक्षा द्यायला लावली. अग्नी परीक्षा देऊनही सीतेच्या आयुष्यातले दु:ख संपले नाही. पुढे एका धोब्याच्या बोलण्यावारून राजा रामाने राणी सीतेचा त्याग केला. त्यानंतर रामाच्या पुत्रांना जन्म देऊन त्यांचे योग्य शिक्षण सीतेने परत एकदा वनात राहूनच केले. सरते शेवटी रामाला त्याचे पुत्र सुपूर्द करून तिने धरतीमध्ये स्वतःला सामावून घेतले.


या पुराण काळातील तीन स्त्रिया आणि त्यांच्या आयुष्याचा हा साधारणसा गोषवारा. कुंतीच्या तारुण्य सुलभ उत्सुकतेतून कर्ण जन्माला. त्याकाळात देखील समाजाच्या भीतीने तिने हे सत्य आयुष्यभर लपवले. मात्र लग्नानंतर पतीच्या इच्छेखातर आणि त्याच्या आज्ञेनुसार तिने इतर कोणाकडून पुत्रप्राप्ती करून घेतली. द्रौपदीच्या बाबतीत देखील; श्रीकृष्णाने तिला तिच्या पूर्व जन्मीच्या तपाची आठवण करून दिली आणि तिला पाचही भावांशी लग्न करण्यास भाग पाडले. मात्र तिने तप केले होते हे केवळ श्रीकृष्णाला माहीत होते; आणि श्रीकृष्ण कुशल राजकारणी होता हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे सौंदर्यवती द्रौपदीमुळे पाच भावांमध्ये भांडण होऊन फूट पडू नये म्हणून श्रीकृष्णाने ही शक्कल लढवली असणे शक्य आहे. सीतेच्या बाबतीत विचार केला तर तिच्या आयुष्यात घडलेल्या कुठल्याच घटनांवर किंवा काळावर तिचे नियंत्रण नव्हते. तरीही तिच्या आयुष्याची परवड कधीच संपली नाही.

आज जेव्हा मी या तीनही स्त्रियांचा विचार करते तेव्हा मनात येत की भावनिक पातळीवर या स्त्रियांची किती परवड झाली; हे कोणालाही लक्षात येत नाही. मात्र या तीनही स्त्रिया मनाने खंबीर आणि स्वत्वासाठी आयुष्यभर झगडल्या हे चित्र आपल्या डोळ्यांसमोर कायम उभं राहातं. मात्र दुर्दैवाने केवळ 'समाज काय म्हणेल' या विचारामुळे किंवा वडील, पती, सखा यांच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याची परवड करून घेतली. जी कथा या पुराणातील स्त्रियांची.... तीच कथा आजच्या स्त्रीची देखील नाही का? आजची स्त्री खूप शिकते आहे. प्रत्येक क्षेत्रात तिचा स्वतःचा ठसा ती उमटवते आहे. विविध स्त्ररांवर खंबीरपणे निर्णय घेऊन त्या निर्णयांची जवाबदारी बाळगत ते निर्णय यशस्वी करते आहे. नवीन नवीन क्षितिजं ती पादाक्रांत करते आहे. आणि तरीही.... ती भावनिक पातळीवर अजूनही हळवी आहे. आपल्या जिवलग लोकांसाठी... वडील, पती, मुलगा आणि कधी कधी तर समाजाच्या भीतीने देखील ती
स्वतःसाठीचेच निर्णय पण स्वतःच्या मनाविरुद्ध घेते आहे.

खरंच पुराणापासून आजवर काळ बदलला आहे का? आजची परिस्थिती वेगळी आहे का? ती एक स्त्री म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून तिला योग्य वाटतील असे तिच्या स्वतःसाठीचे निर्णय घेऊ शकते आहे का? हे आणि असे अनेक प्रश्न!!! मला इथे उत्तराची अपेक्षाच नाही.... ते प्रत्येकाने स्वतःला द्यावं असं मला वाटतं.

4 comments:

  1. सुंदर व मुख्यतः प्रत्येक स्त्री ने हा लेख वाचवा असा आहे, त्याच बरोबर प्रत्येक पुरुषाने हा लेख वाचून समाजात ल्या स्त्री कडे व तिच्या विचारांकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे व आदर करावा... असे वाटते...

    ReplyDelete
  2. खूप छान आणि अंतर्मुख व्हायला लावणारा लेख आहे , स्त्री तशी पहिल्यापासूनच सामर्थ्यवान आहे. देवाने तिला ताकद दिली पण त्यापेक्षा जास्त मोठी सोशिकता दिली आणि त्यामुळे ती कायमच सोसत आलीय आणि इतरांच्या सुखासाठी त्याग करत आली. कुंती , द्रौपदी आणि सीता या तिघीही सामर्थ्यवान होत्या म्हणून आजही आपण त्यांना ओळखतो , इतिहासातील त्यांची ओळख काळ पुसू शकलेला नाहीय पण कुठंतरी त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रियजनांसाठी तडजोड करत त्यागच स्वीकारला. पण दुर्दैवाने त्यांच्या पुरुषांनी त्या त्यागाला सुद्धा गृहीत धरले आणि आजचाही पुरुष त्या त्यागाला गृहीतच धरतो म्हणून कुटुंबासाठी जेंव्हा दोघातल्या एकाला आपले करियर संपवावे लागते तेंव्हा एक स्त्रीच तिचे करियर संपवते

    ReplyDelete
  3. अगदी खरे

    आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

    ReplyDelete