राज की समाज.......... कारण!(?)
अण्णा साहेब सकाळी 10 वाजल्या पासून त्यांच्या केबिनमधे येरझा-या घालत होते. ते कोणावर तरी प्रचंड चिडले होते. पण कोणावर ते कळायला मार्ग नव्हता. आणि त्या तापल्येल्या राक्षसाच्या समोर जाण्याची कोणाचीच हिम्मत नव्हती. सगळेच उदयची वाट बघत होते. उदय म्हणजे आण्णांचा मुलगा. त्याचा उदयच मुळी दुपारी व्हायचा. सवईप्रमाणे साधारण एकच्या सुमारास उदयने कार्यालयात पाऊल ठेवले.
"आण्णासाहेब सकाळपासून भडकले आहेत." एकाने तत्परतेने उदयला माहिती दिली. त्याच्याकडे दुर्लक्ष करत उदय आण्णांच्या केबिनमधे शिरला.
"कुठे उलथलेला असतोस रे तू?" भडकलेल्या आण्णांनी खाऊ का गिळू या नजरेने उदयकडे बघत प्रश्न विचारला.
"आण्णा तुम्हाला माहित आहे. का विचारता आणि उगाच मला तोंड उघडायला लावता. काय झालय् इतकं तापायला?" उदयने तेवढ्याच थंडपणे उत्तर दिले.
"अबे... तुझ्या मायला. मला अक्कल नको शिकवूस भोसडीच्या. म्हणे का विचारता... साल्या आजकाल तुला ती चवचाल भवानी भेटली आहे तेव्हापासून तुझ लक्षच नसत." उदयच्या थंडपणामुळे अजून भडकून आण्णा ओरडत म्हणाले.
"ओ.... माझी चवचाल भवानी माझ्या ताब्यात असती. तुम्ही तुमच बेण सांभाळा ना. बोलता का आता काय झालय् ते? की मी निघु?" उदय उद्धटपणे बोलला.
"फार तोंड़ सुटत आहे भडव्या तुझ आज काल." त्याच्या बोलण्याने भडकलेले आण्णा आता काय करतात अस बाहेरच्यांना वाटलं. पण क्षणात शांत होत ते म्हणाले,"बर ते जाऊ दे. गावात कोण आलिय रे ती नवी बया? ऑ? सालीने पंचायतीच्या हॉलच्या शेजारचीच रूम घेतली आहे. संस्थेचा बोर्ड पण लावला आहे स्वतःच्या. म्हणे गावच्या सर्व स्त्रियांना एकत्र करणार. काम देणार. कमवायला शिकवणार. चायला... आता बायका घराबाहेर पडून कमवणार तर पुरुष काय घर सांभाळणार आणि पोरं पैदा करणार का? माहिती घे रे तिची. दोन दिवसात दुखवटा व्यक्त करावा लागेल तिचा तेव्हा उपयोगाला येईल."
"मला वाटलच होत तुमच्या रागाच कारण हेच असेल. म्हणून मी आत्ताच सगळी माहिती काढली आहे. तिच्या वाकड्यात जाण्यात अर्थ नाही..."उदय समोरची खुर्ची ओढून त्यावर बसत म्हणाला.
"का रे भवानी काय चिलखत घालून फिरते की काय?" आश्चर्य वाटून आण्णांनी विचारल. उदयने माहिती काढून आणली आहे हे समजल्यावर त्यांचा पारा थोडा उतरला होता.
"तसच समजा हव तर. ती अपोजिट पक्षातल्या जिल्हा स्तरावरच्या नेत्याची मुलगी आहे. तिचा नवरा IPS अधिकारी आहे. ही बया स्वतः सामाजिक काम गेली 12-13वर्ष करते आहे. ज्या संस्थेसाठी करते आहे ती संस्थासुद्धा बरीच फेमस आहे. पार परदेशातून मदत येती म्हणे तिला." उदयने एकूणच इत्यंभूत माहिती दिली.
हे सगळ ऐकून आण्णा भलतेच शांत झाले. येरझारा थांबवून ते त्यांच्या जागेवर जाऊन बसले.
"तिच्यायला... इथे आपल्या गावात का उगवली आहे ही ब्याद?" त्यांनी कपाळावर हात मारत काहीस स्वतःला आणि काहीस उदयला उद्देशून प्रश्न केला.
उदयच आण्णाकडे लक्ष नव्हत. त्यामुळे ते आपल्याला विचारत आहेत अस समजून त्याने त्याच्या नेहेमीच्या स्टाईळे उत्तर दिल. "ते तिच नीट सांगू शकेल. बोलावून घेऊ का तिला इथे?"
त्याच्या उत्तराने परत एकदा आण्णांचा पारा चढला. ते परत एकदा त्याच्यावर ओरडले,"उदय तू बिंडोक आहेस.. अरे तू माझा वारस ना रे? आत्ताच तूच म्हणालास ना तिच्या वाकड्यात जाण्यात अर्थ नाही म्हणून. मग इथे बोलावून कस चालेल? बेअक्कल कुठला. जा चल तू निघ इथून. बघतो मी काय ते."
बेफिकीरपणे खांदे उडवत "ठीके" अस म्हणून उदय केबिन मधून बाहेर पडला आणि त्याच्या मागोमाग आण्णासाहेब देखिल दुपारच्या जेवणासाठी वाड्याकडे निघाले.
आण्णांची घरी येण्याची वेळ तशी ठरलेली नसायची. त्यामुळे त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई कायमच त्यांची वाट बघत असायच्या. त्याच कारण देखील तसच होत. त्या आण्णांना खूप घाबरून असायच्या. तापट आण्णा कधी कोणत्या गोष्टीवरुन चिड़तील आणि अंगावर हात टाकतील याचा काही भरोसा नसायचा. अजूनही.... मुलगा इतका मोठा झाला तरीही परिस्थिती बदलली नव्हती. ज्याच्याकड़े आशेने बघितल असत असा मुलगा उदयदेखील दिवटा निघाला होता. त्याची शिक्षणाच्या नावाने बोंब होती. वयाच्या सोळाव्या वर्षापासुनच बापाने दिलेल्या बुलेटवरुन गावात भटकायच आणि स्वतःच्या वयाचा विचारही न करता पोरी-बाळींना सतवायच याशिवाय त्याने कधी काही केल नव्हतं. आता तिशीचा झाला होता पण चोविशीचा होता तेव्हा एका सतरा वर्षाच्या पोरीला पुरत नासवल होत. तिला त्याने मारूनच टाकल असत. पण नेमक्या निवडणुका समोर होत्या म्हणून आण्णासाहेबानी लग्न लाउन दिल होत... म्हणून लग्न झाल म्हणायच आपल्. त्या पोरीची अवस्था लक्ष्मीबाईंसारखीच होती.
घरात शिरता-शिरता आण्णानी लक्ष्मीबाईंना आवाज दिला.
"लक्ष्मी.. ए लक्ष्मी...."
त्या मागील दारी मच्छीवाली आली होती तिच्याशी बोलत होत्या. त्यांना हाक एकु गेली नाही. इथे सुनबाईच काळीज सासुपुढे वाढून ठेवलेल्या लाथा-बुक्क्यांचा ताटाने धड़धड़ु लागल. ती मागिल दारी धावली.
"आई... अहो सोडा ते. मामंजी आल्येत. तुम्हाला बोलावतायत. जा लवकर. मी बघते इथल." घाईघाईने सासूबाईचा हात ओढत ती म्हणाली.
लक्ष्मीबाईंच्या पायाखालची जमिनच हादरली. पहिल्या हाकेत उत्तर नसल की काय होत याची त्यांना कल्पना होती. त्या दिवानखाण्याच्या दिशेने अक्षरशः धावल्या. तोवर आण्णानी अजुन 2-3 वेळा हाक मारली होती.
"मागिल दारी होते जी. हाक एकु नाही जी आली." धपापत खालच्या आवाजात लक्ष्मीबाईं म्हणाल्या.
त्यांना समोर बघितल्या क्षणी कारण नसताना चिडत काहीही बोलायच्या अगोदर आण्णानी त्यांच्या मुस्काटात भड़कावली आणि मग म्हणाले,"ए बये मला कारण सांगू नकोस नाहीतर भर चौकात चाबकाने फोडेन. चल जेवायला वाढ मला."
अचानक बसलेल्या मारामुळे धड़पडलेल्या लक्ष्मीबांई स्वतः ला सांभाळत आणि डोळ्यात येणारे पाणी लपवत आत गेल्या. त्यांनी आण्णाच ताट वाढल. ते जेवायला बसले.
"लक्ष्मी एक काम करायच आज. गावात एक अति शिक्षित भवानी आली आहे. काय संस्था-बींस्था चालवते. त्या बयेला घरी बोलवायचं तुमच काहीतरी बायकांच कारण काढून. पुढच मी बघुन घेतो." जेवताना आण्णांनी लक्ष्मीबाईना फर्मान सोडलं.
लक्ष्मीबाईं धास्तावल्या. "म्हणजे घरात काही......"
"ए सांगतो तेवढ कर. मगासची ठेवून दिलेली कमी पडली काय?" आण्णा वसकन लक्ष्मीबाईंवर ओरडले. तशी लक्ष्मीबाईं गप आत गेल्या. साधारण तीनच्या सुमाराला त्या 'स्व निर्भरा महिला संस्था' च्या कार्यालयात पोहोचल्या. सुगंधा तिथेच बसली होती. ती नविन सुरु करायच्या प्रोजेक्टचा final draft तयार करत होती.
"नमस्कार. मी लक्ष्मी. आण्णा साहेबांची पत्नी." लक्ष्मीबाईं आत शिरून थेट सुगंधाच्या समोर उभ्या राहिल्या आणि बोलल्या.
सुगंधा माने म्हणजे अजितराव राणे यांची कन्या होती. अजितराव राणे म्हणजे देशातल्या एका मोठ्या पक्षामधील या जिल्ह्यातील सर्वेसर्वाच म्हणायचे. सुगंधाचे पति IPS अधिकारी होते. सुगंधाला राजकारणापेक्षा सामाजिक कामाची आवड होती. त्यामुळे वडिलांच्या इच्छेविरुद्ध ती गेली अनेक वर्षे स्व-निर्भराच काम करत होती. लग्नानंतरही तिच ते काम चालूच होत. सध्या तिला या गावात संस्थेची नवीन शाखा सुरु करण्याची जवाबदारी दिली होती. तिने आण्णा दळवी यांच्याबद्धल बरच एकल होत. त्यांच्या मदतिशिवाय या गावात काही करता येणार नाही याची तिला कल्पना होती. गेली दहा एक वर्षे ती या संस्थेच् काम करत होती. त्यामुळे 'पानी में रेहेना हे तो मगरमछ से दोस्ती अच्छी।' असा तिचा विचार होता. तशी ती सामाजिक कार्यकर्ती असली तरी बरीच प्रैक्टिकल होती. त्यामुळे आण्णासाहेबांच्या पत्नीच आपणहून आल्या आहेत हे पाहून तिला बर वाटल.
लक्ष्मीबाईना समोर बसायला सांगत सुगंधा म्हणाली,"नमस्कार वहिनी. अरे बसा न. ऐकून आहे मी आण्णासाहेबांबद्धल. पण तुम्ही कशा काय इथे? आमच्या संस्थेच् काम करायला की काय?" तिने मुद्दाम खोडसाळ पणा केला.
लक्ष्मीबाई एकदम विंचु चावल्या सारख्या उडाल्या. "छे छे.. आमच्याकडे असलं काही चालत नाही. अहो ताई हे आज सांगत होते की तुम्ही आमच्या गावातल्या बाया-बापड्यांसाठी काम करायला आला आहात. म्हंटल तुमची ओळख करून घ्यावी. तुमच काम आटपल की आज चहा पाण्याला या की घरी."
सुगंधा हसली. "अहो काम काय होत राहील. तुम्ही इतका आग्रह करता आहात तर चला. आत्ताच येते तुमच्या बरोबर."
लक्ष्मीबाईंना हे अपेक्षित नव्हतं. मुळात त्यांना सुगंधला घरी बोलवायच नव्हतं. त्यामुळे त्या थोड्या गडबडल्या पण त्यांनी पटकन सावरून घेतल आणि सुगंधा लक्ष्मीबाईं बरोबर निघाली. दोघी रस्त्याने चालत होत्या. सकाळच्या माराच्या खुणा लक्ष्मीबाईंच्या गालावर उमटल्या होत्या. सुगंधाला ते लक्षात आल.
"वहिनी काय हो हे?" तिने आश्चर्य वाटून विचारल.
"छे छे... काही नाही... काही नाही..." अस म्हणत लक्ष्मीबाईनी पदर लपेटुन घेतला आणि भराभरा चालत वाडा गाठला.
सुगंधा आपल्या पत्नीसोबत लगेच आलेली पाहून आण्णांना देखील आश्चर्य वाटल. पण ते चेहेऱ्यावर दाखवून न देता सुगंधाच स्वागत करत ते म्हणाले,"या या सुगंधाताई. बरच एकल आहे तुमच्या बद्धल आणि तुमच्या कामाबद्धल."
"नमस्कार आण्णा साहेब. मी देखिल बरच एकून आहे आपल्याबद्धल. आपल्या मदतिशिवाय गावात नविन काही करण शक्य नाही म्हणतात." सुगंधाने हसत म्हंटल आणि त्यांना नमस्कार केला.
आण्णाना सुगंधा इतकं स्पष्ट बोलेल अस वाटल नव्हतं त्यामुळे ते थोडे गडबडले. पण ते देखील पक्के खिलाडी होते. सावरून घेत म्हणाले,"अहो कसल काय? आम्ही देखिल थोड़ फार सामाजिक काम करतो. म्हणून तर लोकांनी निवडून दिल आहे. म्हंटल इतकी मोठी संस्था आमच्या गावात येणार ... काम करणार... पण काम बाया-बापड्यांसाठी आहे. म्हणून तर लक्ष्मीला म्हंटल जरा लक्ष घाल तू पण."
"हे बाकी बर केलत. उद्यापासून येऊ देत वहिनीना आमच्या संस्थेत. त्यांच्या सारख्या महिलांची खरच गरज आहे." सुगंधाने डाव साधत लगेच बोलून टाकल.
आण्णा एकदम गड़बडले. त्यांना फ़क्त एवढच म्हणायच होत की तुला बोलावण्या पुरत लक्ष्मीला लक्ष घालायला सांगितल. पण आता त्यांना मागे हटता येईना. त्यांनी विचार केला आत्ता हो म्हणू... रात्रि लक्ष्मीला काय ते समजाऊ. म्हणजे तिच नाही म्हणेल उद्या.
"हो हो... येईल न ती. तशी ती आमच्या शब्दाबाहेर नाही."
"बघा वहिनी मी म्हणाले नव्हते तुम्हाला? तुम्ही उगाच घरच काम... शेती... पै-पाहुणा.. असली असंख्य कारण रस्ताभर मला सांगितलीत. आण्णाचीच इच्छा आहे तुम्ही आमच्या संस्थेच काम करावत. आणि मी काही दिवसभर नाही बोलवत तुम्हाला. दुपारी या साधारण दोन-तीनपर्यंत. तास दोन तास थांबा आणि आजच्या सारख्या सहाला घरी चहाच्या वेळेपर्यंत. काय?" सुगंधा हसत म्हणाली. खरतर तिच आणि लक्ष्मीबाईच अस काहीच बोलण झाल नव्हतं. पण इतक्या वर्षात आता सुगंधालासुद्धा कशी खेळी करायची ते माहीत झाल होत. मात्र खरी पंचाईत लक्ष्मीबाईची झाली होती. हो म्हणावं तर नवरा काय करील याचा भरोसा नाही आणि नाही म्हणावं तर ही हुशार बाई काय ते समजून जाईल. त्यामुळे त्या गप्पच बसल्या. त्या काही बोलत नाही हे बधून सुगंध म्हणाली,"वहिनी आला नाहीत उद्यापासुन तर मी स्वतः घ्यायला येईन ह."
त्यावर आण्णासाहेबच म्हणाले,"येईल हो ती उद्यापासून. तुम्ही बसा." आणि लक्ष्मीबाईना त्यांनी चहा आणायला सांगितलं.
---------------------
"आठ दिवस झाले तुझी आई देवळात गेली नसेल इतक्या भक्तिभावाने त्या संस्थेत जाते आहे. उदय... हे काही खर नाही पोरा. त्या भवानीला आट्यात घ्यायलाच हवी. पण यावेळी थोड़ वेगळा गेम करावा लागेल. तयारीची दिसती आहे टवळी." दुपारच्या जेवणानंतर आण्णा उदयशी बोलत होते.
"उचलु का तिला? ब-याच दिवसात नविन काही नाही पाहिल." उदयने नेहेमीप्रमाणे मुक्ताफळ उधळली.
"भाड्या मी काय विचार करतोय आणि तू काय बोलतो आहेस. उदय अरे जरा काम-धंद्याला लाग. पालिकेच्या निवडणुका आठ महिन्यावर आल्यात. गावाच राजकारण आता तू बघायच. मी पंचक्रोशीच बघतो आहे गेली तीन वर्ष. गावसुद्धा मीच सांभाळायच का? बास कर की तुझा हा बाहेरख्यालीपणा" आण्णा वैतागून म्हणाले.
"वा वा! कोण कोणाला सांगतय बाहेरख्यालीपणा बद्दल! आण्णा शैला म्हणत होती परवा रात्रि तुम्ही तिच्या दाराशी थांबला होतात. पाणी मागितलत आणि हात धरलात. अहो ती माझी आहे. तिला तरी सोडा." उदय उर्मटपणे आण्णाकडे बघत म्हणाला.
उदयच्या उर्मटपणाने चिडलेले आण्णा त्याच्या अंगावर धावून जात ओरडले,"ए भेनच्योद तोंड आवर नाहीतर जीभ हासडून ठेवेन. भाड्या तुझी काय ती? तीचेच दागिने विकुन खाल्लेस... तिला लग्न करू देत नाहीस... साली आली होती रडत आणि पदर पसरून माझ्याकडे त्यादिवशी. पदर जास्त पसरला गेला आणि थोड़ा इथे तिथे हात लागला... एवढच. पण आता तू इतका मोठा झालास की मला तू विचारणार? आजही कानाखाली आवाज काढिन तुझ्या. समजल? चल चालता हो. मला विचार करू दे."
आण्णांचे बोलणे एकून उदय विचारात पडला. तो काही न बोलता वाड्यातून बाहेर पडला. आण्णा मात्र त्यांच्या आरामखुर्चीत बसून विचार करत होते.
-------------------------------------
आण्णांनीच सुगंधासमोर परवानगी दिल्यामुळे लक्ष्मीबाई रोज न चुकता सुगंधाच्या संस्थेत जात होत्या. आण्णा त्यांना थांबवू शकत नव्हते आणि त्यांना हे अस लक्ष्मीबाईच संस्थेत जाण आणि काम कारण पटत देखील नव्हत.
आण्णा आज थोड़े लवकरच वाड़यावर आले. लक्ष्मीबाई अजुन संस्थेतून घरी आल्या नव्हत्या. हे समजल्यावर आण्णाचा पारा चढ़ला. लक्ष्मीबाईनी घरात पाय ठेवला आणि आण्णानी त्यांना वृन्दावनासमोर बडव-बड़व... बडवल. लक्ष्मीबाई दोन दिवस तर त्या खोलीतून बाहेर पडु शकत नव्हत्या. पण त्यांना सुगंधा वाट बघत असेल याची कल्पना होती. त्यांच्या सुनेला घराबाहेर जाण्याची परवानगी नव्हती. पण त्यांनी सुनेला गळ घातली.... म्हणल्या,"सुगंधा माझी वाट बघत असेल ग पोरी. तिला निरोप तरी दे ग. कसही कर आणि तिला कळव की मला थोडं बर नाही. मला विचारात सुगंधा घरी आली तर अनर्थ होईल." पण सुन तरी काय करणार? जर ती बाहेर पडली अस उदयला समजल असत तर तिची खाट लक्ष्मीबाईच्या शेजारी पडली असती. त्यामुळे ती गेली नाही. शेवटी लक्ष्मीबाईना ज़ी भिती होती तेच झाल. सुगंधा तिस-या दिवशी घरी आली. कर्मधर्मसंयोगाने आण्णा घराच होते.
"या... या... सुगंधाताई. आज इकडे कुठे?" तिला समोर बघून त्यांनी खोट हसत तिच स्वागत केल.
"अहो वहिनी पडल्या म्हणे? चौकशिला आले." त्यांना हसत नमस्कार करत सुगंधाने उत्तर दिल.
आण्णा अवाक् झाले. कारण लक्ष्मीला बर नाही याची खबर बाहेर नव्हती.
"छे हो! तिला काय धाड़ भरली आहे. झक्कास आहे ती." त्यांनी उत्तर दिल.
"मग बोलवा न!" अस म्हणून सुगंधानेच हाक मारायला सुरवात केली. "वहिनी अहो वहिनी..."
"त्या जरा पडल्यात. थोड़ी कणकण आहे अंगात." आतल्या दाराशी येऊन सुनेने उत्तर दिल.
"अरे? तू कोण?" माहित असूनही सुगंधाने मुद्दाम आश्चर्याचा आव आणून विचारल.
"आमची सुनबाई." सून काहीतरी बोलेल म्हणून मनात नसूनही आण्णांनी उत्तर दिल.
"अरे वा आण्णा. तुम्हाला सुनदेखिल आहे? वाटत नाही तुमच्याकडे बघुन. तुम्ही अजूनही बरेच तरुण दिसता की" सुगंधाने आण्णांना चढवण्यासाठी म्हंटल.
हे ऐकून आण्णा खुश झाले. मिशीला पिळ देत त्यांनी आत बघत ऑर्डर सोडली. "पाहुण्या ताई आल्यात. चहां पाण्याच् बघा."
सुन मागल्या पावली आत पळाली आणि चहा-नाश्ता घेऊन आली.
तिला समोर आलेलं बघून सुगंधाने मुद्दाम तिच्याशी बोलायला सुरवात केली. तिला आपल्या बरोबर बसायला सांगत सुगंधाने विचारल,"अरे लहान दिसतेस ग. काही शिकली आहेस की नाही?"
पदर घट्ट डोक्यावरुन लपेटुन तिने हळूच उत्तर दिल. "हो जी. सातवी पास."
"अरे वा... बरीच शिकली आहेस की. बर झाल बाई तू भेटलीस. उद्या पासून तू पण ये संस्थेत वाहीनिंबरोबर. लिखा-पढ़ी तूच करशील. माझ काय बाई... माझ्यासाठी हा दोन-चार महिन्यांचा प्रोजेक्ट आहे. मग मी जाणार. तुला आणि वाहिनींनाच मग चालवायची आहे संस्था. काय आण्णा साहेब बरोबर न?" सुनेशी बोलत पण आण्णांना हवी असणारी माहिती स्वतःहून देत सुगंधा म्हणाली.
ही नवीन माहिती ऐकून आण्णा एकदम खुश झाले. 'म्हणजे ही बाई थोड्या दिवसांसाठीच् आली आहे तर.' अचानक त्यांना सुटल्यासारखे झाले. त्यांनी विचार केला 'बर झाल. मोठ नाव असलेल्या संस्थेचा आधार मिळाला तर भविष्यात उपयोग होईल. त्यात लक्ष्मी आणि सुनबाईनाच ही हाताशी घेते आहे. म्हणजे पुढे हिची संस्था आपल्यला खिशात घालता येणार आहे.' आपल्या विचारावर खुश होत आण्णा मोठ्याने म्हणाले,"हो हो... अगदी बरोबर. येईल न तीसुद्धा लक्ष्मीबरोबर. तशा दुपारी त्या मोकळयाच असतात." सुगंधाने हसत-हसत मान डोलावली आणि चहा घेऊन ती वाड्यावरून निघाली.
--------------------------
संस्थेच्या कामाला जवळ-जवळ दोन महीने झाले होते. लक्ष्मीबाईनी स्वतः गावात फिरून बायकांना एकत्र केल होत. त्यांची सुनसुद्धा आता संस्थेच्या कामाला सरावली होती. बायका ही आता मोकळेपणाने सुगंधाशी बोलायला लागल्या होत्या. सुगंधादेखिल कधीच मोठी मोठी भाषण देत नसे. त्यांच्याशी गप्पा मारायच्या. त्यांचे प्रश्न विचारायचे... आणि हळूहळू त्यांना स्वतः च्या पायावर उभ राहाण्याच महत्व समजावायच. असा एकूण तिचा कार्यक्रम असे. त्यातच त्यांच्याशी बोलून गावात कुठला व्यवसाय सुरु कारण जमेल त्याची पड़ताळणी देखील ती करत असे.
हळूहळू तिने गोणपाटाच्या पिशव्या बनवण्याचा व्यवसाय तुम्ही करु शकता; असा विश्वास गावातल्या महिलांच्या मनात निर्माण केला. पहिल्या शंभर पिशव्या त्यांच्या मागे लागून करून देखील घेतल्या. आता प्रश्न या पिशव्या विकण्याचा होता. यासाठी आश्चर्यकारक रित्या आण्णासाहेब पुढे आले. जील्ह्याच्या ठिकाणी काही मोठ्या दुकानातून त्यांच्या ओळखी होत्या. त्या लोकांशी बोलणी करून देण्यासाठी स्वतः आण्णासाहेब सुगंधाला नेणार होते. त्यांनी लक्ष्मीबाई बरोबर सुगंधाला निरोप पाठवला होता. वाड्यावर लवकर या. सकाळी लवकर निघावे लागणार होते. म्हणून मग काम लवकर आटपून त्यादिवशी सुगंधा घरी लवकर आली होती.
सगळ लवकर उरकून सुगंधा पलंगावर आडवी झाली. रात्रि अचानक तिच्या खोलीच्या खिड़कीची कड़ी अगदी हळू आवाजात वाजली. पण त्या आवाजाने देखिल सुगंधाला जाग आली. तिच्या लहानपणापासून तिला सांभाळणारे सदा काका तिच्या खोली बाहेर झोपले होते. साठीच्या घरात असले तरी आजही चार जणांना भारी पडतील अशी शरीर यष्टि होती त्यांची. त्यांच्याच भरोशावर सुगंधाचे वडील आणि पति तिला असे चार-चार महीने घरापासून लांब राहायला देत होते. सदा काकांची झोपही सावध होती. ते लगेच उठुन आत आले. तिला गप रहाण्याची खूण करून खिड़कीजवळ गेले. आतली अस्पष्ट हालचाल जाणवून बाहेरील व्यक्तिने हलक्या आवाजात हाक मारली. आवाज स्त्रीचा होता. सुगंधा पटकन खिड़कीजवळ गेली आणि तिने हळूच खिड़की उघडली.
"ताई मी शैला. मला आत घ्या ना."
एकदा सदा काकांकडे बघुन सुगंधाने तिच्यासाठी दार उघडले. शैला आत येऊन अक्षरशः सुगंधाच्या पायावर कोसळली. तिचा बांध फुटला होता. आणि तरीही आवाज होऊ नये म्हणून तोंडात पदराचा बोळा खुपसुन ती ओक्साभोक्षी रडत होती. सुगंधा ती शांत व्हायची वाट बघत होती. काही वेळाने शैलाने स्वतःला सावरले आणि ती बोलायला लागली,"ताई मला त्या हलकट आण्णा आणि त्याचा मुलगा उदय पासून वाचवा हो. पाच महीन्यांपूर्वी माझे वडील गेले. आई लहानपणीच् गेली होती. वडील गेल्याच्या दुस-या दिवशी उदयने घरात घुसून माझ्यावर बलात्कार केला. तो दिवस आणि आज... शप्पथ सांगते ताई.. एक रात्र सोडत नाही हो तो. दिवसा देखील कधीही घुसतो. कधी शेतात ओढतो... माझ्या वडिलांनी माझ्या लग्नासाठी हौसेने दोन-चार दागिने केले होते तेसुद्धा त्याने घेतले आणि विकले. म्हणे आता मी तुला ठेवली आहे तर लग्नाचा प्रश्नच येत नाही. मग दागिने कशाला हवेत. ताई हे कमी होते म्हणून की काय काल आण्णानी निरोप पाठवला. वाहिनीनी बोलावल आहे वाड्यावर. मला मुर्खाला कळल नाही हो त्यांचा डाव. दुपारी वहिनी आणि उदयची बायको तुमच्या संस्थेत येतात ना... त्यावेळी बोलावून त्यांनी देखिल माझ्यावर हात टाकला हो. जीवाच्या आकांताने पळाले आणि आत्तापर्यंत शिवारात लपले होते. ताई, आण्णांचा गावात दरारा आहे. सगळे घाबरून आहेत त्यांना. त्यामुळे या उभ्या गावात आण्णाच्या विरुद्ध कोणी जाणार नाही. त्यांना आणि त्यांच्या मुलाला हे गाव म्हणजे त्यांची जहागिरि वाटते. सगळ्या गावातल्या पुरुषानी बांगड्या भरल्या आहेतजणू. काही दिवसांपूर्वी उदयच्या तोंडुन एकल होत की तुम्ही खूप हुशार आहात आणि बायकांसाठी काही करता आहात म्हणून. तुम्ही कामाला सुरुवात करायच्या अगोदर आण्णांच्या वाड्यावर गेला होतात. त्यामुळे लोक तुम्हाला त्यांच्या बाजूचे समजायला लागले आहेत. त्यामुळे त्यांनी तुमच्याकडे त्यांच्या बायका-सुनांना पाठवल आहे. त्यात तुम्ही लक्ष्मीबाईना आणि उदयच्या बायकोला पण तुमच्याकडे घेतल आहेत. त्यामुळे गावातल्या पुरुषांचा तुमच्यावर विश्वास आहे. अलीकडे बायाना तुमच्याबद्धल विश्वास वाटतो हे देखील मला माहित आहे. म्हणूनच मी तुमच्याकडे आले आहे. ताई मला मदत करा हो! उद्या मी उदयच्या हाती लागले काय किंवा आण्णांच्या हाती लागले काय माझ मरणच आहे ताई."
तिच बोलण एकून सुगंधा विचारात पडली. तिच्या पाठीवर थोपटत ती म्हणाली,"शैला शांत हो. मला विचार करायला वेळ दे. मी उद्या आण्णा साहेबांबरोबर जिल्ह्याच्या गावी जाते आहे. तिथून आले की आपण काय करायचे ते ठरवू. तोवर तू इथेच थांब."
"ताई मला मदत कराल न? इथे नाही थांबत मी. शिवारात जास्त सुरक्षित वाटत. परत उद्या रात्रि येते. मला सोडवा हो ताई या छळातून. नाहीतर जीव देण्याशिवाय पर्याय नाही हो मला." सुगंधाचा हात गच्च धरत शैला म्हणाली.
थोड़ा विचार करून सुगंधा सदा काकांना म्हणाली,"काका मी नाहितरी उद्या जिल्ह्यात आहे. तुम्ही हिला घेऊन आत्ताच ताबडतोप निघा. घरी जाऊन तिला आईकडे सुपुर्द करा आणि त्याच पावली परत या. म्हणजे दुपारपर्यंत याल. तुम्ही जिल्ह्याला जाऊन आलात हे कोणाला लक्षात येणार नाही. सध्यातरी मला संशयाची सुई माझ्या दिशेने वळायला नको आहे."
तिच बोलण एकून सदाकाकांनी मान हलवली आणि म्हणाले,"सुगंधा काय आहे तुझ्या डोक्यात मला माहीत नाही. पण मी तुझ्या शब्दाबाहेर नाही."
"शैला तू जा काकांबरोबर. अजिबात काळजी करू नकोस. मी तुला स्वतःहून येऊन भेटेन. तोवर माझ्या आई-वडिलांकडे रहा." सुगंधा शैलाला म्हणाली. डोळे पुसत शैलाने सुगंधाचे पाय धरले. त्याबरोबर तिला उठवत सुगंधा म्हणाली,"अग माझे पाय नको धरूस. चल... उठ आणि निघ तू काकांबरोबर."
सदाकाका आणि शैलाला निरोप देऊन सुगंधा पलंगावर येऊन पडली तोवर तांबड फुटायला लागल होत.
--------------------------
दुस-या दिवशी सुगंधा आणि आण्णा साहेब जिल्ह्याच्या गावी जाऊन आले. आण्णांनी खरच काही दुकानातून बोलणी करून दिली आणि लगोलग ऑर्डर्स पण मिळवून दिल्या गोणपाटाच्या पिशव्यांसाठी. आण्णांनी सुगंधाला त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे देखिल नेल. ओळख करून देताना सुगंधाचे वडील आणि पति यांच्याबद्धल देखिल माहिती दिली.
आण्णा परतीच्या प्रवासात बरेच खुशीत होते. डाव त्यांच्या मना प्रमाणे साधला होता. सुगंधाला तिच्या संस्थेसाठी ऑर्डर्स मिळाल्या होत्या. त्यामुळे तिचा त्यांच्यावरचा विश्वास वाढला होता. मोठ्या नेत्यांना देखिल आण्णांच्या कामगिरीचे कौतुक वाटले होते. आता संस्थेने सुरु केलेल्या व्यवसायाचा जम बसायला वेळ लागणार नव्हता. म्हणजे सुगंधा आता काही दिवसात निघून जाईल असा कयास आण्णांनी बदला होता. काही दिवसातच ही संस्था आपल्या हातात येणार याची स्वप्न बघत आण्णा खुशीत हस्त होते. ते दोघे गावात परत आले मात्र गावातलं वातावरण तंग आहे हे आण्णाच्या लक्षात आल. उदयने काही गडबड तर करून ठेवलेली नाही ना या विचाराने सुगंधाला गाडीतून उतरवून आण्णा वाड्यावर धावले.
वाड्यात शिरताच समोर उदयला बघून आण्णांनी त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरु केला. "उदय काय झालय नक्की? अरे एक दिवस तुझा बाप बाहेर गेला तर काय गोंधळ घातलात तुम्ही इथे? अरे किती दिवस बापाच्या जीवावर जगणार तू? जरा स्वतः काही करत नाहीस. आणि तुझीच सोय करायला गेलो तर इथे अजून घाण करून ठेवतोस काय?"
"ओ.. बाप आहात तर बापासारख वागा. तुम्ही इथे वाड्यावर बोलावून माझ्या शैलावर हात टाकलात का ते बोला..." उदयने आण्णाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत उलट त्यांच्या अंगावर धावून जात सवाल केला.
"हो... टाकला होता हात... पण सुटली साली रांड. सरळ येत नव्हती म्हणून इथे बोलावली होती. काय करशील?" आण्णा भडकून म्हणाले.
त्यांच्या उत्तराने उदय भलताच भडकला आणि म्हणाला,"बर झाल मला बहिण नाही... नाहीतर तुम्ही तिला देखिल सोडल नसत."
"ए भेनच्योद... आता गपतो का? की घालू ही गुप्ति तुझ्या नरद्यात्. गावात काय झालय ते बोल. कोणाच मयत आहे की काही घोळ झालाय ते सांग. बाकी गप् बसायच गुमान. समजलास?" अंगावर आलेल्या उडायला ढकलत आण्णा म्हणाले.
आण्णाचा अवतार बघून उदय थोडा वरमला आणि म्हणाला,"ती शैला गायब आहे वाड़यावरुन पळाल्यापासून."
उदयच्या बोलण्याने बेफिकीर होत आण्णा म्हणाले,"गायब तर गायब. दिला असेल जीव तिने. तू तुझी दूसरी सोय बघ. आणि जरा घरात आणलेल्या बाईकडे बघ. पाळणा हलवून टाक परत एकदा. एकदा पालिका निवडणुका आल्या की वेळ मिळणार नाही." त्यांनी तो विषय तिथेच संपवून टाकला.
दुस-या दिवशी आण्णांच्या कार्यालयात पोलिस चौकशिला आले. पण आण्णानी माहीत नाही म्हणून हात वर केले. शैलाच कोणीच नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी फाईल बंद केली.
------------
असेच दोन महीने गेले. संस्थेचे काम आता नीट चालायला लागले होते. सुगंधाने तिच्या परतीची तयारी सुरु केली. एक दिवशी अचानकपणे लक्ष्मीबाई आणि त्यांची सुन बाराच्या सुमाराला सुगंधाच्या घरी आल्या.
"अरे वहिनी आज इथे कुठे?" त्यादोघीना बघून सुगंधा आश्चर्याने म्हणाली.
"सुगंधा तू मला माझ्या मूली सारखी आहेस म्हणून आज तुझ्याकडे आले आहे. काल संस्थेत चर्चा होती की तू आता जाणार आहेस. अग अशी आम्हाला एकट सोडून जाऊ नकोस ग. अग माझ्या नव-याने आणि नालायक मुलाने गावातल्या अनेकांच्या आयुष्याची वाट लावली आहे. मी तर संपूर्ण आयुष्य फ़क्त नरक यातनाच् भोगल्या ग. तुझ्या रूपाने मला, माझ्या सुनेला आणि गावातल्या बायकाना आशेचा किरण दिसला आहे. पण तू गेलीस की हे आमच प्रामाणिक काम बंद होणार. माझा हलकट नवरा ही संस्था ताब्यात घेईल. म्हणून म्हणते जाऊ नकोस." हळव्या होत आणि सुगंधाचा हात धरत लक्ष्मीबाई म्हणल्या.
"वहिनी अहो मग तुम्ही काय शिकलात इतक्या महिन्यात? अहो थोडा आत्मविश्वास वाढवा. तुम्ही सर्व स्त्रीया एकत्र आलात तर उदय आणि आण्णा सारख्या नाराधमाला नक्की धड़ा शिकवू शकाल." सुगंधा त्यांच्या खांद्यावर थोपटत म्हणाली.
"सुगंधा त्यांना राजकीय पाठबळ खूप आहे ग. तुला काय वाटत मी प्रयत्न केले नसतील? पूर्वी कधी कधी मला ते जिल्ह्यात घेऊन जायचे. तुला ज्या मोठ्या साहेबांकड़े नेल होत तिथे मला ही नेल आहे त्यांनी दोन-चार वेळा. त्यावेलील मी मोठ्या साहेबांच्या बायकोकडे आण्णांच्या अपरोक्ष गा-हाण घातल होत. तुला माहीत आहे त्या काय म्हणाल्या? म्हणे तुझ्या एकटीच्या दुःखापायी आम्ही काय आण्णाला देशोधडीला लाऊ का? हा घरातला प्रश्न आहे. जरा कुठे थोड़ सहन कराव बाई माणसाने. आण्णा पक्षाला पैसा पुरवतात. गावात काम आहे... पंचक्रोशित नाव आहे. जळणारी लोक असतात. लोकांच् ऐकून तू काही करु नकोस बर. एकटी पडशील. त्यानंतर साहेबांनी ह्यांना सांगितल मला जिल्ह्यात आणायच नाही. आम्ही वाड्यावर आलो आणि त्यादिवशी माझी जी पिटाई झाली की मला हॉस्पिटलमधे पंधरा दिवस ठेवाव लागल. साहेब-वहिनी येऊन गेल्या. आणि माझ तोंड कायमच बंद झाल. तुझ्या रूपाने मला आशेचा किरण दिसला आहे. माझ काय ग रहिलय. पण हिची माझ्या सुनेची काळजी वाटते." लक्ष्मीबाई पोटतिडकीने बोलत होत्या.
"वहिनी इतके दिवस काही का नाही बोललात? मला आता गेलच पाहिजे... पण तुम्ही चिंता करू नका. मी परत येईनच. नगर पालिका निवडणुका तोंडावर आहेत. आण्णा उदयला उभ करायची तयारी करत आहेत. त्यामुळे सध्या संस्थेच्या कामाला धोका नाही. तुम्ही दोघी संस्थेला बंद पडू देऊ नका. सर्व बायका एकजुटीने रहा. मी अजून काही महिने येऊन जाऊन असेनच. त्यामुळे आण्णा घाई करणार नाहीत. माझ्या मनात काही उपाय आहेत तुमच्या प्रश्नावर. माझ्यावर विश्वास ठेवा. बस आत्ता इतकंच सांगू शकते." सुगंधाने लक्ष्मीबाईचा हात हातात घेत त्यांना आश्वासन दिले.
"तुझ्यावर स्वतः पेक्षा जास्त विश्वास आहे सुगंधा." अस म्हणून लक्ष्मीबाई सुनेला घेऊन निघाल्या.
-----------------------------
निवडणुकांचे वारे वाहायला लागले. त्यामुळे आण्णा आणि उदय उद्योगाला लागले. त्यांना सध्या संस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. आणि तसही सुगंधा गेलीच होती. फक्त संस्थेच्या कामासाठी महिन्यातून एखाद-दोन वेळा येऊन जात होती. त्यामुळे निवडणुकीनंतर सगळा कारभार हातात घेऊ असा आण्णांनी विचार केला होता. सुगंधा जेव्हा केव्हा गावात येत होती तेव्हा तिला गावातल्या बायकांकडून सगळ्या खबरी कळत होत्या. पण ती शांत होती. आता बायकाच् काय पण गावातल्या पुरुषमंडळीना देखील सुगंधाबद्दल आदर निर्माण झाला होता. त्यांना देखील आण्णाची आणि उडायची आरेरावी नकोशी झाली होती. त्यामुळे बायकांच्या माध्यमातून या पुरुषमंडळीनी देखिल सुगंधाला भेटून आण्णापासून सुटकारा व्हायला मदत मागितली होती.
अपेक्षेप्रमाणे आण्णांच्या पक्षाने उदयला तिकीट जाहिर केले. उदयने जाऊन फॉर्म भरला. प्रचाराची रण धुमाळी सुरु झाली. फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. दुसरा पक्ष बहुतेक उमेदवार देणार नाही असे बोलले जाऊ लागले होते आणि त्या दिवशी अचानक वीस पंचवीस गाड्या गावात आल्या. दुस-या पक्षाचा उमेद्वार फॉर्म भरायला आला होता.... नव्हे आली होती.
शैला गायकवाड़! उदयच्या विरुद्ध याहुन चांगला उमेद्वार कोण असू शकत होता? आण्णा आणि उदय हड़बडले. गोंधळले. संपूर्ण निवडणुकीचे एकवीस दिवस स्वतः सुगंधा आणि तिचा IPS नवरा गावात ठाण मांडून बसले होते. शैलाच्या बाजूने सुगंधा उभी राहिली होती.
प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली. शैलाला समोर उभी बघून उदय भडकला होता. पण आण्णांनी त्याला शांत केला. निवडणुकी नंतर काय ते बघू असे त्याला समजावले. कारण आण्णांना त्यांच्या जिंकण्याबद्धल पूर्ण विश्वास होता. त्याच कारण देखील असच होत. अत्यंत खालच्या दर्जाचा प्रचार आण्णांच्या गोटातून चालु होता. त. शैलाच्या चारित्र्याबद्दल अत्यंत वाईट शब्दात पोस्टर्स लावले जात होते. घराघरात तिच्या आणि उदयच्या संबंधा बद्दलची वर्णनं लिहून टाकली जात होती.
सुगंधा मात्र शांत होती. तिने प्रचाराचे प्लानिग व्यवस्थित केले होते. गाव सोडलेली शैला आणि उमेद्वार शैला यात जमीन आस्मानाचा फरक होता. शैला भावनिक आव्हाहन अजिबात करत नव्हती. ती फ़क्त विकासाचा आराखडा आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलत होती. शैलाला एकूण पालिकेच्या कामाची व्यवस्थित माहिती होती हे दिसत होते. तिचा आत्मविश्वास वाखाडण्यासारखा होता.
आणि मग जसजसे दिवस उलटायला लागले तसतसे आण्णांना थोड़े टेंशन यायला लागले. त्या रात्रि आण्णा खूप उशिरा सभा संपवून आणि कार्यालयातले काम आटपुन वाड्यावर पोहोचले. समोरच उदय पीत बसला होता. ते बघुन त्यांचा पारा चढ़ला. त्यांनी चिडून त्याच्या कमरेत लाथ घातली.
"भाड्या मी इथे जीव काढतो आहे आणि तू आरामात पीत बसला आहेस? अरे मर्द असशील तर त्या शैलाला खेचून चौकात उभ कर आणि चाबकाने फोडून काढ़. अरे काहीतरी कर साल्या नाहीतर तू माझा मुलगा नाहीस." भडकून आण्णांनी वाड्याबाहेर हकलले.
उदयचे डोके अगोदरच फिरले होते. त्यात बापाने घातलेल्या लाथेमुळे तो अजुनच भड़कला. तसाच तिथून निघुन तो शैलाच्या घरी गेला. तिथे पोहोचेपर्यंत त्याने थोड़ा विचार केला. थोड़ डोक शांत केल आणि दाराची कड़ी वाजवली. शैलाने स्वतःच दार उघडले.
"तू?" शैलाने शांतपणे त्याच्याकडे बघत प्रश्न केला.
"शैला मला तुझ्याशी बोलायच आहे. जरा बाहेर येतेस?" उदय कमालीच्या शांतपणे बोलत होता.
"तूच ये घरात. तुला सवय आहे की या घराची आणि मला बाहेर यायची इच्छा नाही." शैला दारातून बाजूला होत म्हणाली.
"एकटीच् आहेस?" उदयने आत घरात नजर टाकत विचारले.
"हो" शैला शांतपणे म्हणाली.
उदयला आश्चर्य वाटले. आणि बर देखील. तो घरात आला आणि मग मात्र त्याचा पवित्रा बदलला. त्याने शैलाचे बखोट धरले आणि तिला खसकन स्वतःकडे ओढत म्हणला,"ए भवाने... फार चर्बी चढ़ली ग तुला. ज्यांच्या जीवावर उड़ते आहेस ते आयुष्यभर साथ नाही देनारेत तुला. साsssली रांड... गप गुमान पडून राहा एका कोप-यात निवडणूक होई पर्यंत. समजलिस? नाहीतरी तू हरणारच आहेस. मग बघून घेईनच मी तुला. कोण उभ राहील ग मग तुझ्या पाठीशी?"
"एssss तुझ्या आईच्या.... " त्याने धरलेला हात झटकत अचानक शैला कडाडली. "भेनच्योद तूझ्या औकातीत राहा.. समजलास? मी ती जुनी शैला नाही; जी तुला घाबरायची. कुठली ठस्सन देतोस् रे भाड्या? काय करणार तू मला? आणि माझ्या माग रडायला आहे कोण मला? इज्जत जी काही होती ती तू आन तुझ्या बापान कधीच वेशीला टांगली आहे. माझ्या नावाची पोस्टर्स लावत फिरता आहात ना ती कहाणी पुऱ्या गावाला अगोदरच माहित आहे. एक लक्षात ठेव.... मला ना आगा... ना पीछा... जिंकेन् की हारेन ते पुढच पुढे. पण मी राहणार याच गावात. तुझ्या नाकावर टिच्चून. हात तर लाव... नाय भर चौकात नागवा करून चाबकाने फोडला तर नावाची शैला नाही. चल चालता हो. मादरच्योद....... तुझ्या सारख्या नपुसकाला ज्याचा माज आहे तेच पायाने ठेचून तुझा जीव घेतला पाहिजे; म्हणजे पुढे भविष्यात तुझ्यासारखे नपुंसक नराधम जन्मणार नाहीत...."
शैलाचा आवाज टिपेला पोहोचला होता. बाजूच्या घरातले कार्यकर्ते, सुगंधा ... तिचा नवरा... सगळेच धावत आले. सगळ्यांना बघुन उदय घाबरला. धड़पडत मागे सरकत तो पळून गेला. दुसऱ्या दिवशी गावात आदल्या रात्रीच्या प्रसंगाचीच चर्चा होती. पण शैला मात्र शांत होती. ती तिचा प्रचार करत होती. अनेकांनी तिला पोलीस कम्प्लेंट करायला सांगितले. पण तिने नकार दिला. मात्र एवढे सगळे होऊनही आण्णांचा विश्वास दांडगा होता. त्यांनी गावात पैसा वाटायला सुरुवात केली. आता हा फ़क्त हार-जीत चा प्रश्न नव्हता त्यांच्यासाठी. हा आण्णांच्या अस्तित्वाचा प्रश्न झाला होता. लोकहि म्हणत होते; काहीही झाल तरी आम्ही आण्णांच्या बाजूने आहोत. काल आलेली ही बाई गावाला काय देणार असेही असे म्हणत होते. शेवटचे दोन दिवस तर दारू-चिकन-मटणाचा जोर लावून दिला होता आण्णांनी. लोकं देखील शैलाच्या सभेला जात नव्हते आणि आपल्या घरच्या बायकांना देखील जाऊ देत नव्हते. तरीही शैला शांतच होती.
याच दुमश्चाक्रीत मतदान आले. गावातील प्रत्येक पुरुष आणि बाई मतदान केंद्रावर पोहोचते आहे की नाही हे आण्णा आणि उदय जातीने बघत होते.
................ आणि रिजल्ट लागला. पुन्हा एकदा आण्णा साहेबांचा विजय होऊन त्यांच्या साम्राजाचे पाय पक्के आणि कायमचे रोवले.................... जाऊ नयेत म्हणून गावातल्या लोकांनी स्वतः बदल घडवून आणत शैला गायकवाड़ला प्रचंड बहुमतांनी निवडून दिल होत!!!
चांगल्याचा वाईटावर विजय झाला होता.......
---------------------------------------------