Friday, January 17, 2020

बंगला

बंगला

आम्ही नविनच फ्लॅट घेतला. थोडा गावा बाहेर. पण एका नवीन बिल्डींगमधे होता आणि मुख्य म्हणजे छान प्रशस्त होता. मुलांची शाळा आणि बायकोच ऑफिस थोडं लांब होत. पण  शाळेची आणि ऑफिसची बस जवळच्या वळणावर येत होती. त्यामुळे त्यांना काहीच त्रास नव्हता.  माझ ऑफिस मात्र जवळच होत. त्यामुळे मी माझ्या स्कूटरने जायचो.  मला पहिल्यापासूनच शांतता आवडते. म्हणून तर बायको आणि मुल फारशी तयार नसतानासुद्धा त्याचं न ऐकता मी हा फ्लॅट बुक केला होता. खर तर मला बंगलाच आवडला असता. अगदी आमच्या बिल्डिंग समोरच जसा टुमदार बंगला आहे तसा. ते एक मी माझ्या मनाशी जपलेल.... फक्त मलाच माहित असलेलं; अस माझ एकट्याच स्वप्न आहे. पण बंगला परवडणार नाही म्हणून तर हा मस्त आणि प्रशस्त फ्लॅट पसंत केला होता. स्वतःचा बंगला मला कधी परवडणार नसला तरी किमान समोर दिसणारा बंगला बघून मनातल्या मनात समाधान करून घेतो.

आता तुम्हाला वाटेल इतकं का मी बंगला बंगला करोत आहे. सांगतोच आता! एकूणच सुंदरच आहे तो बंगला. बाहेर खूप मोठ नाही खूप लहान नाही अस छानस आवार. या आवारात गुलाब, चाफा, अनंत, पारिजात, आणि वेगवेगळ्या प्रकारची जास्वंद अशी एक ना अनेक फुल झाड आहेत आणि बंगल्याच्या भोवतीने चार नारळ, एक आंबा, एक फणस, जांभुळ, बकुळ अशी मोठी झाड़ देखील आहेत. त्यामुळे घरावर कायम सावली असते. बंगल्याच्या चारही बाजुनी तारेच साधसच कुंपण आहे. मोठस गेट. पोर्च. बहुतेक वरुन पोर्चच्या वरच्या बाजूला गॅलरी असावी.

आता तुम्हाला वाटेल मला कस काय हे सगळ माहित; ते ही इतक्या डिटेलमध्ये! नुकताच राहायला आलो आहे तरीही. अहो, संध्याकाळी बाहेर पडतो ना मी ऑफिसमधून आलो की, ते मुद्धामच. मला या बंगल्याच निरीक्षण करायचा नादच लागला आहे. इतके दिवस रोज फिरतो त्याच्या बाजूने आणि रोज काहीतरी नवीन दिसतच. म्हणजे कधी एखाद्या झाडाला आलेलं फुल किंवा नवीन लावलेलं झाड. मोठ्या झाडांना लागलेली फळ मोजण तर मला फार आवडत. मी राहायला आलो त्याच दिवशी तिथे जाऊन तिथल्या नोकराकडे चौकशीसुद्धा करून आलो बंगल्यात कोण राहात? त्याचं नाव काय? वगैरे... सर्वसाधारण मानवी स्वभाव; दुसर काय? कळल ते अस की एक एकटी मध्यम वयाची कोणी स्त्री राहाते. बस्! पण तेव्हापासून का कोण जाणे माझ कुतूहल जाग झाल आहे.

तो नोकर.... किंवा माळी किंवा खानसामा... काय हवी ती उपाधी देता येईल..... त्याने बाकी काही माहिती दिली नाही. आता मी दिसलो की तो माझ्याकडे थोडा विचित्र नजरेने पाहत असतो म्हणा. पण मी मुद्धामच बंगल्याच्या थोडा लांबून चालतो. त्यामुळे त्याला माझ हे निरीक्षण करण आणि बंगल्याच्या आजूबाजूला घोटाळण आवडत नसल तरी तो काही बोलू शकत नाही.

बंगल्याच्या मालकीणबाई मध्यम वयाच्या अस आपल् म्हणायच. पण दिसायला अत्यंत सुंदर, आणि टापटीप आहेत. रोज सकाळी 7 ला त्या पोर्चच्या गॅलरीमधे बसून चहा घेताना दिसतात त्या. मग 10/10.30 पर्यंत बागेत काम. त्यानंतर कधी या गॅलरीत तर कधी त्या खिड़कीत दिसतात. कधी पडदे सारखे कर; कधी गाण गुणगुणत शिवण-टिपण कर. शिवण-टिपण हा आपला माझा अंदाज हो; नाहीतर म्हणाल याला बरे माहित ती सुंदर बंगल्याची सुंदर मालकीण तिच्या घरात काय करते ते. हा हा हा!

१२ नंतर मात्र त्या दिसत नाहीत. मग त्यांचे दर्शन 4 च्या सुमारास आंब्याच्या झाडाकडच्या गॅलरीत चहा घेताना होत. बाई मजेत चहा आणि नाष्टा करते. एकटी असली तरी शिस्त भारी आहे बहुतेक. चहा केटलीतूनच लागतो. आणि नाश्तासुद्धा काहीतरी गरम-गरम असतो. उगाच चकल्या-चिवडा अस नसावं; असा माझा अंदाज बरका. ज्याप्रकारे त्या प्लेट हातात घेऊन झाडांकडे बघत निवांतपणे खात असतात त्यावरून.  मग छान तयार होऊन कुठेतरी बाहेर पडतात. जाताना बागेतल फूल तोडून केसात माळताना अनेकदा दिसतात, पण बाहेर बहुतेक मागच्या गेट ने जात असतील. पुढच गेट उघडताना त्या कधी दिसत नाहीत. बहुतेक बाजार किंवा लायब्ररी किंवा एखाद महिला मंडळ असावं रोज वेगळ ठिकाण. पण आजूबाजूला कोणाशी कधी बोलताना बघितल नाही त्यांना. आमची बिल्डिंग तशी नवीन. त्यामुळे इथले लोकं पण नवीन. पण त्यांच्या बंगल्याच्या थोड पुढे एक बिल्डिंग होती. तिन मजली. बऱ्यापैकी जुनी असावी. पण तिकडचे कोणी कधी बंगल्याकडे आलेले बघितले नाहीत किंवा मालकीणबाई कधी त्या बिल्डींगच्या बाजूला गेलेल्या दिसल्या नाहीत.  त्यांच्याकडे कधी पाहुणे आलेले देखील दिसले नाहीत; की त्यांच्या रूटीनमधे कधी फरक पडला नाही. मात्र कधी कधी त्या बिल्डिंगच्या बाजूच्या गॅलरीत उभं राहून त्या बिल्डींगच निरीक्षण करताना मी बघितल आहे त्यांना.

मात्र एक गम्मत सांगू का? त्या मालकीणबाई गॅलरीत असोत किंवा बागेत.. त्यांची माझी दृष्टादृष्ट क्वचित कधी झाली तर त्यांना माझ्याशी बोलायच आहे अस मला वाटायच. बहुतेक त्या हसायच्या देखिल माझ्याकडे बघुन. कदाचित ती माझी आंतरिक इच्छा होती; म्हणूनही मला असं वाटत असेल... पण मी त्यांना कधी कोणाशीही बोलताना बघितलं नाही की पुढच्या गेटजवळ आलेलं बघितल नाही. त्यांचा सोबती अस म्हणायला तो एकुलता एक नोकर होता; बंगल्याची आणि मालकीणबाईंची देखील काळजी घेणारा... कारण त्या आवारात झाडा-फुलांमध्ये असल्या की तो सतत त्यांच्या आजूबाजूला रंगाळत असतो. कधी कधी तर मला वाटत की मालकीणबाईना बोलायचं असल तरी या नोकरामुळे त्या बोलायला पुढे येत नाहीत. तो तर त्यांची पाठ एक मिनिट देखील सोडत नाही. राहातो देखील आवारातल्या दोन खोल्यात. मी  त्यालाही कधी कोणाशी बोलताना बघितला नाही.

बहुतेक मी ऑफिसला जायचो तेव्हा तो घरच सामान आणत असावा. कारण त्याला तर कधी मी आवाराबाहेर पडलेलासुद्धा बघितला नाही. फक्त मी जेव्हा बंगल्याच्या बाजूने फेऱ्या मारायचो तेव्हा तो काहीतरी काम करतो आहे अस दाखवत बंगल्याच्या आतून माझ्यावर नजर ठेवून असायचा. त्याला वाटत असेल मला कळत नाही,; पण मला माहित होत की त्याच पहिल्या दिवसापासूनच माझ्याकडे लक्ष होत.

मला मात्र त्या बंगल्याबद्दल आणि त्याच्या मालकिणी बद्दल खूप उत्सुकता, कुतूहल  होत. अनेकदा मी प्रयत्न केला त्या मालकीणबाईना गाठण्याचा. पण त्या कधी बाहेर पडायच्या ते कळलच नाही. दिवसां मागून दिवस आणि महिन्यांमागून महिने जात होते; पण तरी पहिल्या काही दिवसात जितकी माहिती मिळाली त्याहून जास्त माहिती अशी कळतच् नव्हती त्या बंगल्याच्या मालकिणी बद्धल किंवा त्या नोकाराबाद्धल. मी आजूबाजूला देखील चौकशी केली सहज बोलता-बोलता. लोक काही फार उत्सुक नसायचे त्या बंगल्याबाद्धाल बोलायला. आणि मग मला का बुवा त्या बंगल्याची एवढी उत्सुकता? असा प्रश्न हे लोक विचारतील आणि एकूणच ते वाईट दिसेल म्हणून मी देखिल कोणाला काही बोललो नाही. आपली आपणच जमेल तशी माहिती काढावी अस मी मनात ठरवून टाकल.

अर्थात माझा संसार चांगला चालू होता. माझ आपल ऑफिस आणि घर इतकच चालू असायचं. सुरवातीला रविवारी बाहेर जाण्यासाठी मुलं हट्ट करायची. पण मी टाळायचो.  मग माझ्याकडे रागीट कटाक्ष टाकून बायकोच मुलांना घेऊन जायची कुठेतरी. मुलांच्या शाळेच्या पिकनिक असायच्या त्याला आवर्जून पाठवायचो त्यांना. बायको पण ऑफिसच्या पिकनिकला जायची. ती नाही म्हणाली तरी मी आग्रह करायचो तिला जाण्यासाठी. म्हणजे मग माझ्यामागे नको लागायला बाहेरगावी जाऊया म्हणून. आमच्या ऑफिसची पिकनिक देखील ठरायची; मला विचारायचे देखील सुरवातीला. पण मी काही ना काही कारण सांगून टाळायचो. मग हळूहळू त्यांनी मला विचारण सोडलं. त्याच कारण देखील तसच आहे. तसा मी आत्ता तुमच्याशी बोलतो आहे; पण मुळचा अबोलच.मला फार कोणाशी बोलायला आवडत नाही. जर बायको मुद्धाम येऊन माझ्याशी बोलली नाही तर मी आपणहून नाही तिच्याशी बोलायला जात. मला नेहेमीच प्रश्न पडतो... काय बोलायचं असत अस? लोकं सारख गप्पा काय मारतात? इतक काय असत त्यांच्याकडे बोलण्यासारख? अर्थात मी कामात चोख आहे; त्यामुळे ऑफिसमध्ये जरी फारसा कोणाला आवडत नसलो तरी कोणी मला त्रास द्यायला नाही येत. त्यात मला त्या चढाओढीत इंटरेस्ट नाही. त्यामुळे माझ्या कामाच्या जोरावर जी इन्क्रिमेंट मिळते आणि वरची पोस्ट मिळते त्यात मी सुखी असतो.

आता परवाच इन्क्रिमेंट झाली. बायकोला रात्री जेवताना सांगितल तर ती वैतागली. म्हणे इतकी चांगली बातमी अशी शांतपणे काही खास नसल्यासारखं काय सांगता? अहो आल्या आल्या बोलला असतात तर बाहेर गेलो असतो ना सेलिब्रेट करायला.

आता हिला काय सांगू? बाहेर जायचं म्हणजे संध्याकाळचा माझा फेरफटका ही बुडवायला लावणार. म्हणजे त्या बंगल्याच दर्शन नाही होणार. कालच मी बघितलं होत की दोन पपया छान पिकल्या होत्या. आज तो नोकर त्या उतरवतो की नाही ते बघायला नको का? हिला काहीच कळत नाही. बर मला माझा फेरफटका चुकवायला आवडत नाही अस सांगितलं तर घराला रणागाणाच रूप आल असत.

मागे झाल होत न असच. कुठलासा नवीन सिनेमा आला होता. हिला आणि मुलांना तो फर्स्ट डे लाच बघायचाच होता. माझी शुक्रवार संध्याकाळ एकदमच लाडकी. कारण शनिवारी ऑफिस नाही त्यामुळे शुक्रवारी निवांतपणे खूपवेळ मी भटकतो. त्या बंगल्याच्या आजू-बाजूने आणि मग तसाच बंगल्याच्या मागच्या बाजूच्या टेकडीवर पण जाऊन येतो. अगदी एकलकोंडी आहे ती टेकडी. कधी कोणाला तिथे जाताना मी बघितलेलं नाही. मला मात्र तिथे जायला फार आवडत. हे घरात कोणालाच माहित नाही. घरात काय.... इतर कोणालाच ते माहित नाही. गंमत म्हणजे त्या छानशा बंगल्याच्या नोकराला देखील माहित नसावं. कारण मी जोवर बंगल्याच्या आजूबाजूला फिरत असतो तोवर त्याची माझ्यावर बारीक नजर असते. मात्र मी बंगल्यापासून ४-५ फुटावर गेलो की मग मी काय करतो आहे याची त्याला फिकीर नसते. मग परत त्याची नजर बंगल्यात वळते.

अरे लिंक तुटली वटत; तर काय म्हणत होतो.... की मी शुक्रवारी त्या टेकडीवर जातो.  ती टेकडी म्हणे झपाटलेली आहे. लोकाना म्हणे तिथून चित्र-विचित्र आवाज एकू येतात. मूर्खपणा सगळा. अहो; मी कायम जातोच की तिथे. काही नाही तिथे. सुंदर निसर्ग सोडला तर. लोकाना जे विचित्र आवाज वाटतात ना ते वारा दगडांवर आणि झाडांमधून वाहत असतो; त्याचा असतो. आपल्याला वाटत की खरच कोणीतरी आपल्याला हाक मारत आहे. पण तस काहीच नाही.

हव तर चला माझ्याबरोबर तुम्ही एकदा त्या टेकडीवर. आणि मला तर वाटत की बंगल्याच्या मालकीणबाई पण बहुतेक जात असाव्यात टेकडीवर. कारण त्या तयार होतात पण मागून बाहेर पडतात अस मी बघून ठेवल. आहे. असो! तर.... सांगायचा मुद्धा हा, की मी त्यादिवशी नाही म्हणालो सिनेमाला यायला. मग घरात जो काही प्रकार झाला त्यावरून मला पहिलं आणि दुसर जागतिक युद्ध कस झाल असेल याची कल्पना आली. पण मी मात्र माझ्या म्हणण्यावर  ठाम राहिलो. परिणाम एवढाच झाला की बायको आणि मुल सिनेमा गेली आणि मग बाहेरच जेवून रात्री उशिरा आली आणि मी फक्त ब्रेड खाऊन झोपलो. पण ते नव्हते ते माझ्या पथ्यावरच पडल बर का! खूप उशिरा पर्यंत भटकलो मी त्यादिवशी टेकडीवर. आणि असा शोधही लागला मला की टेकडीचा एक सुळका बंगल्याच्या अगदी जवळ आहे आणि त्यामुळे बंगल्याच्या आतल्या भागांच निट निरीक्षण करता येयील मला. फक्त दिवसा जायला हव टेकडीवर.

अहो तसा मी अबोल आहे ना त्यामुळे बोलायची सवय नाही. मग लिंक तुटते माझी बोलताना. मुळात मी तुम्हाला दुसरच सांगत होतो न. तर; मी जेव्हा बायकोला सांगिलतल की मला इन्क्रिमेंट मिळाली आहे तेव्हा तिला आनंद पण झाला आणि सेलिब्रेशन नाही म्हणून राग पण आला. म्हणून मग मुलांना बोलावून तिने लगेच परस्परच सांगून टाकल की त्या शनिवार-रविवार बाबा.... म्हणजे अस्मादिक.... सेलिब्रेशन म्हणून त्यांना जवळच्या थंड हवेच्या ठिकाणी नेणार आहेत. अस्सा राग आला मला. कोणी सांगितल होत हिला असला शहाणपणा करायला. बर 'नाही' म्हणावं तरी पंचायीत. तिसर महायुद्ध मला नको होत. म्हणून मग हो म्हणालो. हॉटेलच बुकिंग केल... शनिवार सकाळसाठी गाडी बुक केली.... मुलं आणि बायको एकदम खुश होते. मी मात्र काहीच बोलत नव्हतो... आणि  मला अचानक शुक्रवारी रात्री ताप भरला. मुलांची तोंड उतरली. बायकोला सुद्धा खूप वाईट वाटत होत; हे मला कळत होत. मग मीच हिला समजावलं की ताप असा काही फार नाही. तू जा मुलांना घेऊन. त्यांचा हिरमोड नको. मी सांभाळीन स्वतःला. तिची अगोदर तयारी नव्हती मला एकट्याला सोडून जायची. पण मग मुलांच्या हिरमुसल्या तोंडांकडे बघून तयार झाली. शनिवार सकाळी ६ वाजता गाडीत बसवून दिल त्यांना आणि पोहोचल्यावर फोन करा म्हणून सांगितल.

मी जिना चढून वर घरी आलो तेच शीळ वाजवत. अहो असा प्रश्नार्थक चेहेरा काय करताय? मला ताप बीप काही नव्हता. उगाच नाटक केल. मग अंग कस गरम लागल? आहो त्यात काय.... आपण म्हंटल न अंग गरम आहे की या बायका लगेच खर मानतात. त्यात मला जायचं नव्हत. पण त्या तिघाना जायचंच होत न... त्यामुळे जाण्याची तयारी.. तिथे करायची मजा.. त्यांच्या असल्याच गप्पा जास्त होत होत्या. मग माझा उतरलेला चेहेरा आणि ब्लंकेट घेऊन पडून राहाण इतकं पुरेसं होत मला ताप आला आहे हे सिद्ध करायला. बस!

काय हो, आता पर्यंत तुम्हाला मी न जाण्याच कारण समजलच असेल न? तसे तुम्ही हुशार आहात. अगदी बरोबर! मला आजचा पूर्ण दिवस आणि उद्या दुपारपर्यंत मी कुठे जातोय; काय करतोय ते विचारणार कोणीही नाही. त्यामुळे मी आजच दुपारी टेकडीवर जाणार आहे. प्रत्यक्ष त्या बंगल्याच्या आत जाण माझ स्वप्न आहे; पण तो योग काही जुळून येत नाही आहे. मग निदान त्या सुळक्यावरून काही दिसलं तर बघायची मला खूप उत्सुकता आहे. म्हणजे मला हे बघायचं आहे की तो बंगला आतून कसा ठेवला आहे.

त्यामुळे माझ मी ठरवल्याप्रमाणे दुपारच जेवण आटोपून गेलो टेकडीवर. बंगल्याच्या बाजूने जात होतो तेव्हा त्या नोकराच माझ्याकडे लक्ष होत. पण मी मुद्धामच शीळ घालत माझ बंगल्याकडे लक्ष नाही अस दाखवत बंगल्याला लांबून एक फेरी मारून टेकडीच्या दिशेने गेलो. मस्त टेकडी फिरलो अगोदर. अर्थात त्याची दोन कारण होती. एकतर टेकडीवर अजून कोणी नाही ना याची खात्री करून घ्यायची होती. नाहीतर मी आपला बंगल्याच निरीक्षण केवळ कुतूहल म्हणून करणार आणि कोणी बघितल तर वाटणार की मी कोणी चोर-बीर आहे. आणि दुसर म्हणजे; मी खरच ती टेकडी अजून निट पूर्ण बघितालील नव्हती. त्यामुळे तिचं सौंदर्य देखील मला बघायचं होत.

तर टेकडी फिरलो. चांगला तास दोन तास फिरत होतो. थोडी भूक लागल्या सारख वाटल. मग बरोबर नेलेली sangwhiches खाली. एका मस्त वडाच्या झाडाखाली मस्त ताणून दिली. थोड्यावेळाने जाग आली. काहीतरी आवाज जाणवला. मी वळून बघितलं आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या बंगल्याच्या मालकीणबाई टेकडीच्या दिशेनेच येत होत्या. काळ्या रंगाचा चुडीदार त्यांच्या गोऱ्या कांतीवर खुलून दिसत होता. त्याचं अजून तरी माझ्याकडे लक्ष गेलं नव्हत. मी पटकन उठून झाडामागे लपलो. मी त्यांना दिसू नये असा मला वाटत होत. कारण त्या कुठे जातात त्याची मला उत्सुकता होती. त्या देखील इथे तिथे न बघता नाकासमोर सरळ चालत टेकडीच्या टोकावर गेल्या. पार वर-वर. तस पाहिलं तर एका मर्यादेनंतर टेकडीचा चढ दमछाक करणारा होता. पण बाईला सवय असावी. झपझप चालत त्या वर गेल्या. माझी खुप इच्छा होती त्यांच्या मागे जायची. निदान कळल असत की त्या कुठे जातात रोज छान तयार होऊन. पण वरती फक्त साधी झुडपं होती. त्यांनी मागे वळून बघितल असत तर लपायला ना मोठे दगड ना झाड. म्हणून मग मी त्या परत यायची वाट बघत बसलो.

माझ्या मनात आल आता तर मला मी ठरवल्येल्या सुळक्यावर जाऊन त्या बंगल्याच निरीक्षण देखील करता येणार नव्हत. कारण मी अस काही करत असताना जर त्या खाली उतरल्या असत्या आणि त्यांनी बघितल असत तर पंचाईत झाली असती. त्यामुळे मी त्या खाली येण्याची वाट बघत बसलो. सहा वाजून गेले तरी त्यांचा पत्ता नव्हता. आणि अचानक चांगलाच जोरात वारा सुटला. मोठमोठ्याने शीळ घालत होता वारा. मला तर वाटल की कोणाच्यातरी नावाचा जप चालू झाला आहे. गम्मत म्हणजे वारा टेकडीवर सुटला होता आणि मला भास होत होता की हाका बंगल्यातून येत आहेत. हळूहळू अंधार झाला. मी गोंधळून गेलो होतो. अजून मालकीणबाई टेकडीवरून उतरल्या नव्हत्या. काही प्रोब्लेम नसेल ना झाला. माझ्या मनात आल. वर जाव का? मदतीच्या निमित्ताने ओळख पण होईल. पण तेवढ्यात त्यांना मी घाईघाईने टेकडीवरून खाली येताना बघितल. इथे तिथे न बघता त्या वेगात टेकडी उतरल्या आणि बंगल्याच्या दिशेने अदृश्य झाल्या. मनातून चरफडत मी घराकडे निघालो; हे ठरवूनच की दुसऱ्या दिवशी सकाळीच जायचं टेकडीवर. कारण अस अचानक त्यांच्या येण्यामुळे मी जे ठरवलं होत त्यावर सगळ पाणी पडलं होत.

पण हाय रे माझ दुर्दैव! रात्रीच मला खरच बराच ताप चढला. इतका की औषध घ्यायलासुद्धा मी पलंगावरून उठू शकत नव्हतो. फोन वाजत होता बाहेरच्या खोलीत. पण तो उचलायला जाण्याचे पण अंगात त्राण नव्हते. बायको आणि मुलं दुसऱ्या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी येणार होती. माझ्या मनात आलं म्हणजे आता ते लोक येईपर्यंत आपलं काही खर नाही. पण आश्चर्य म्हणजे सकाळी मी डोळे उघडले तर ही माझ्या समोर उभी. म्हंटल तू कशी काय आत्ता या वेळेला. तर म्हणाली काल दुपारपासून फोन लावत होते घरचा... तुम्ही एकदाही उचलला नाहीत. त्यामुळे खूप काळजी वाटायला लागली. शेजारच्या वाहीनींना फोन केला तर म्हणाल्या तुम्ही काल दुपारीच बाहेर कुठेतरी गेला होतात. कधी आलात ते कळल नाही. म्हणजे उशिरा आला असाल; असा अंदाज केला मी. बर नाही त्यात भर उन्हात बाहेर गेलात आणि घरी कधी आलात कोणाला माहित नाही... मग राहावल नाही आणि मुलांना समजाऊन घेऊन आले परत. काय सांगू हिच्या या वागण्याला. अस कोणी कोणा व्यक्तिवर इतका जीव लावत का? मूर्ख आहे. जाऊ दे झाल.

त्यादिवशी तब्बेत ठीक नव्हती तरी मी त्या टेकडीच्या सुळक्याकडे गेलो असतो. पण आता ही आली म्हणजे घरातच रहायला हवं हे लक्षात आल माझ्या. परत कधीतरी जाऊ असा विचार करून मनाला समजावलं. पण मग असेच दिवसांमागून दिवस जात राहिले पण त्या सुळक्याकडे जाण काही जमलं नाही मला.

माझी नोकरी मात्र छान चालू होती. कोणाशी मैत्री नाही... कोणाशी बोलत नाही.. त्यामुळे मी माझ काम भलतच चांगल करत होत अस वाटत. कारण मला वरची पोस्ट मिळणार होती याची मला कुणकुण लागली. मग प्रयत्न करून मी ती ऑफर टाळली. अहो आता काय सांगू तुम्हाला? फिरतीवर जाव लागल असत मला ती पोस्ट घेतल्यावर. म्हणजे त्या बंगल्यापासून लांब. म्हणून मग नाही घेतली बढती. हिला बोललो नाही मात्र. नाहीतर उगाच तिची चिडचिड आणि बडबड ऐकायला लागली असती.

 असेच दिवस आणि वर्ष जात होती. आता माझी मुलं मोठी झाली होती . ती इतकी मोठी कधी झाली ते कळलच नाही. तशी माझी बायको व्यवहारी आणि हुशार. तिनेच वाढवलं मुलांना. मी आपला नावाला. कमावून आणायचं ते तिच्या हातात ठेवायचं आणि घरात रहायचं.... बस! एवढाच केल मी कायम. पण मला यात काही वावग वाटलच नाही. कारण तसा मी अबोल आणि एकटाच रहायला आवडणारा मनुष्य आहे न. गम्मत म्हणजे माझ्या लेकीच लग्न ठरल. ते सगळ ठरल्यावर मला माझ्या बायकोने सांगितल. अगदी आमंत्रण पर्त्रीका पण तयार झाल्या होत्या. आणि मला पत्ताच नव्हता. पण त्यात माझी काही तक्रारच नव्हती. मात्र आमंत्रण पत्रिका बघून माझ्या मनात एक कल्पना आली आणि  मी आमंत्रण देण्याच्या निमित्ताने बंगल्याकडे वळलो.

चला या निमित्ताने इतकी वर्षे समोर असूनही कधी ओळख न झालेल्या त्या बंगल्याची आणि बंगल्याच्या मालकिणीची ओळख होईल अस वाटल होत मला. पण नेमक्या मालकिणबाई काही दिवसांसाठी बाहेर गावी गेल्या होत्या असे नोकराने मी गेटजवळच पोहोचताच मला बाहेरच थांबवून सांगितले. इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच तो माझ्याशी बोलला. पण तेही फक्त माहिती देण्यापुरताच. एकुलता एक मार्ग देखील संपला तो बंगला जवळून.... आतून पहाण्याचा. खूप वाईट वाटल मला.

ठरल्या प्रमाणे आणि ठरल्या दिवशी लेकीच लग्न झाल आणि पुढे यथावकाश मुलाचही. मुलगा लग्ना नंतर गावात घर घेऊन राहायला गेला. हिला बोलावून घेतल. मी मात्र गावातला कोलाहल आणि ती गडबड घाई असल जीवन मला आवडत नाही या सबबिवर इथेच राहिलो.

आता मी रिटायर झालो होतो. संपूर्ण दिवस माझाच होता. आता तर बायकोही नव्हती अडवायला. त्यामुळे रोज तो बंगला आणि त्याची काड़ी इतकाही बदल न झालेली मालकिण यांच निरिक्षण करायचा नादच लागला होता मला. वयापरत्वे मी टेकडीकडे जाणे मात्र सोडून दिले होते. कारण अगदी थोडसच जरी चढलं तरी  तिथून आल की हमखास मला ताप यायचा. तिथला वारा मला सोसत नव्हता. बर; तब्बेत बिघडली की हिला याव लागायचं. मग तिच्या तोंडाचा पट्टा सुरु व्हायचा. ते नकोस वाटायचं. त्या सुळक्याकडे पोहोचणं तर आता अशक्यच होत. त्यामुळे माझा मुक्कमपोस्ट आमच्या घराची प्रशस्त गॅलरी हाच झाला होता.

आता तर मालकीणबाईंचा दिनक्रम मला जवळ जवळ पाठ झाला होता. त्या कधी कोणत्या गॅलरीमध्ये दिसतील याचा अंदाज बंधणे हा माझा आवडता खेळ होता. काहीही झाल तरी त्या दिवसभरात एकदा तरी त्या जुनी बिल्डिंग दिसायची त्या गॅलरीमध्ये एकदा तरी नक्की जाऊन उभ्या राहायच्या. मात्र गेले दोन दिवस मला मालकीणबाई आवारात फिरताना किंवा कुठल्याच खिडकीत किंवा गॅलरीमध्ये दिसल्या नाहीत. खूप आश्चर्य वाटलं. बंगल्याच्या जवळपास फिरून बघितल; पण काही पत्ता लागेना. मग विचार केला टेकडीवरून निरीक्षण कराव. काहीतरी समजेल. म्हणून मग झेपत नव्हत तरी गेलो टेकडीवर. पण कसलं काय! काही दिसलच नाही. उलट नेहेमीसारख जोराचं वारं सुटलं आणि मला हाका एकू आल्या. पण गम्मत म्हणजे मला माझच नाव कोणीतरी घेत आहे अस वाटल. खूप हसू आल. मज्जा पण वाटली. कितीतरी वेळ मी अंदाज घेत होतो कुठून हाका येत आहेत. पण काही केल्या कळेना.  मग मात्र वाऱ्याचा त्रास होईल आणि आजारी पडू या विचाराने उतरलो टेकडी आणि घरी आलो माझ्या. रात्री थोड़ बर वाटेनास झालचं मला आणि त्यात थंडीचे दिवस. सर्दी-खोकला. मग थोड़ा ताप आला.

दुसऱ्या दिवशी अंगात चांगलीच कणकण होती सकाळपासून. पण बायकोला फोन करून नाही बोलावलं. तिची कटकट नको होती मला. बर नव्हत वाटत म्हणून मी संध्याकाळ झाली तरी दिवे न लावता बेड रूम मधे पडून होतो. अचानक खालुन कोणीतरी हाक मारतं आहे असा भास झाला. नीट कान देऊन एकल.. कोणीतरी माझ नाव घेऊन 'चला.... या...' अस काहिस म्हणत होत. आश्चर्य म्हणजे काल टेकडीवर जशी हाक मी एकली होती तशीच हाक होती ती.  म्हणून मग मी उठून गॅलरीतुन खाली बघितल तर समोरच्या बंगल्यातला नोकर! मला खूप आश्चर्य वाटल. ज्याच्याशी गेले अनेक वर्षे मी बोलायचा प्रयत्न करतो आहे, ज्याला मी रोज बघतो आहे; पण ना बोलतो ना बंगल्याच्या जवळ येऊ देतो... तो आज चक्क मला हाक मारतो आहे.... आणि तेही माझ्या घराकडे येऊन?  मी त्याला खुणेनेच काय म्हणून विचारल. आवाज बसला होता माझा. त्याने बंगल्याकडे बोट दाखवत ' चला.... या  तुम्ही.' अस काहिस म्हंटल्यासारख वाटल.

मनुष्य स्वभाव कसा असतो बघा. इतकं बर नसुनही बंगला बघायला मिळणार या आनंदात मी चपलाही न घालता उतरलो आणि तड़क बंगल्याकडे येऊन गेट उघडून आत शिरलो..........

.............."अहो सकाळी आमचे 'हे' दुधाला जात होते तेव्हा त्यांना दिसल. काय झाल... कस झाल... कुणास ठाऊक? तुम्ही गेलात मुलाकडे राहायला आणि कधीही बघाव तेव्हा तुमचे 'हे' सारखे आपले गॅलरीत बसलेले असायचे. काल हे भाजी घेऊन येत होते तेव्हा त्यांची आणि ह्यांची दारात क्षण दोन क्षण भेट झाली. हे हसले तर तुमचे  मिस्टर देखील कधी नव्हे ते हसले. म्हणून मग यांनी विचारल 'काय म्हणता'; तर म्हणाले 'थोड़ बर  वाटत नाहीये. आता जेवून आराम करीन'. हे बर म्हणाले आणि तुमचे मिस्टर घरात गेले.  सकाळी हे गॅलरीमध्ये उभे राहून चहा घेत होते तेव्हा यांच सहज लक्ष गेल तर तुमचे मिस्टर त्या पछाडलेल्या बंगल्याच्या दिशेने जाताना दिसले. तसे ते नेहेमीच जातात त्या बाजूला हे आता सगळ्यांना माहित झाल आहे त्यामुळे ह्यांनी दुर्लक्ष केलं. पण मग अंघोळ आणि पूजा आटपून हे परत गॅलरीत सहज गेले तर त्यांना त्या बंगल्याच्या तुटक्या पोर्चच्या वरच्या गॅलरीसारख्या भागातून कोणीतरी अर्धवट वाकलेल दिसल. अगोदर ह्याना कळलच नाही अस अचानक त्या बंद पडक्या बंगल्यात कोणी का दिसावं? म्हणून त्यांनी दुर्लक्ष केल. उगाच कशाला! नाही का? पछाडलेला बंगला आहे म्हणतात तर आपण कशाला पडा त्यात. पण मग त्यांना त्या व्यक्तिचे कपडे ओळखीचे वाटले म्हणून हे 'कोण आहे त्या बंगल्याकडे'; अस मोठ्याने ओरडले. तिथून काही उत्तर नाही. पण मी, मुलगा आणि सून बाहेर आलो. बिल्डिंग मधले इतर लोक देखील त्यांच्या त्यांच्या गॅलरीतून डोकावले. काहीच हालचाल दिसली नाही बंगल्यातून मग मात्र काहीतरी गड़बड़ आहे हे लक्षात येऊन आम्ही ताबड़तोप पोलिसात कळवल. पोलिस आले तोपर्यंत आम्ही तुम्हाला कळवल....  पण तुम्ही यायच्या अगोदरच डॉक्टरांनी सांगितल ते गेले. खूप वाईट झाल हो. पण वाहिनी तुमचे मिस्टर सारखं त्या पडक्या बंगल्याकडे का बघत बसायचे हो? आम्हाला कायम नवल वाटायच. पण तसे अगदीच अबोल होते. त्यामुळे ह्यांनी कधी विचारल नाही. कधी तुम्हाला तरी बोलले का?"

"नाही हो वाहिनी. आयुष्यभर संसार करूनही ते कधीही संसारात रमलेच नाहीत. सुरवातीला खूप वाईट वाटायचं. इथे या घरात राहायला आल्यानंतर तर ते आमचे राहिलेच नाहीत. खूपदा वाटायचं अस सतत त्या बंगल्याकडे काय बघत असता. पण मला माहित होत त्यांनी काही उत्तर दिल नसत. म्हणून मग कधी विचारलच नाही. मात्र त्यांनी मला कधी कशालाही अडवल नाही. हाच त्यांच्या मनाचा मोठेपणा समजून मी सोडून दिल. आणि मग हळुहळु आम्हाला पण त्यांच्या अलिप्तपणाची सवय झाली. जाऊ दे. खूप काही आहे मनात. पण आता गेलेल्या माणसाबद्दल काय बोलायच? जाऊ दे!"

..................बंगल्यात तर आलो आहे... अनेक वर्ष मनाशी जपलेलं स्वप्न पूर्ण झालं एकदाच. संपूर्ण बंगला आधाशासारखा फिरून बघितला. बाहेरून जितका सुंदर आहे तितकाच आतून देखील छान ठेवला आहे. पण बंघ्ल्याच्या मालकिण बाई नाही दिसल्या. तो नोकर सांगून गेला फ्लॅट सोडून मी या बंगल्यात शिफ्ट झालो तरी चालेल. हे अस अचानक त्याने मला सांगण थोडं आश्चर्य वाटल मला. पण खूप खुश झालो मी. उत्साहाने पोर्चच्या वर असणाऱ्या गॅलरीत गेलो आणि घराकडे बघितल तर बायको दिसली घराच्या गॅलरीमध्ये..... कमाल आहे. मी न बोलावता ही कशी आली? पण बर झालं... आता तिला देखील बोलावून घेतो इथे. दोघे मस्त राहू या बंगल्यात. अरे!! पण कधीची  हाक मारतो आहे तर बघतही नाही माझ्याकडे. जाऊ दे झाल. मला इथे यायच होत... आलो... बस.......

-------------------------------------------------------


4 comments:

  1. नारायम धारपांची नात शोभशील

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद... I take it as a huge compliment

      Delete
  2. छान. कथेतल्या परिसराचं वर्णन वाचताना त्या तिथे असल्यासारखं वाटत होतं.

    ReplyDelete