Friday, January 10, 2020

एक 'पोपटी'ची संध्याकाळ

एक 'पोपटी'ची संध्याकाळ


जानेवारीची मस्त थंडी आणि त्यात आम्ही दोन दिवसांकरता का होईना पण अलिबागला गेलो होतो. आम्ही उतरलो होतो तो बंगला तर केवळ अप्रतिमच होता. एक मस्त तरण तलाव होता. मागच्या आवारात भरपूर नारळाची झाडं आणि हिरवं गार गवत. एकदम शांत वातावरण. आवाज फक्त पक्षांचे आणि आमच्या गप्पा-हसण्याचे. याहून छान आणि निवांत अस काही असूच शकत नाही; अस वाटत होत. दुपारच्या जेवणानंतर मस्त वामकुक्षी आटोपून मुलींबरोबर त्या तरण तलावाकाठी गप्पा मारत कॉफीचा आस्वाद घेत बसलो होतो. त्यावेळी बंगल्याचे caretaker विनोदजी आले. त्यांनी विचारले, "या सिझनला पोपटी करतात. तुम्हाला आवडणार असेल तर करतो." म्हंटल,"हे पोपटी काय असत? माहित नाही आम्हाला." ते म्हणाले,"मडक्यात भाजलेलं चिकन आणि भाज्या. बघा आवडेल नक्की." मी म्हणाले,"मी नॉनवेज नाही खात. बाकी हे तिघे सगळं खातात." ते म्हणाले,"वाहिनी, तुमच्यासाठी कणीस, बटाटा, वांगी असतील. खाऊन बघा. नक्की आवडेल." म्हंटल, "हे काहीतरी नवीन आहे. नक्की बघितलं पाहिजे. नक्की खाऊ आम्ही. कराच तुम्ही ही पोपटी."

मी हो म्हंटल्यावर ते तयारी करायला गेले. थोड्यावेळाने बघितलं तर २ किलो वालाच्या शेंगा, तितक्याच वाटाण्याच्या शेंगा, ४-५ बटाटे, वांगी, अंडी आणि चिकन घेऊन ते आले. बटाटा, वांगी आणि चिकन याला फक्त तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला आणि अख्खा लसूण लावून त्यांनी ते मुरायला ठेऊन दिल. दिवस मावळला तसं एक मोठसं मडक घेऊन ते स्वच्छ धूतलं. त्यात ते कोणतीतरी झुडपं घालत होते. मी विचारलं," हे काय आहे नक्की?" त्यांनी माहिती दिली,"हा भांभूर्डीचा पाला आहे. बघा याला वास कसा येतो." हातात घेऊन बघितलं त्याला मस्त ओव्याचा वास येत होता. खूप छान वाटला तो ताजा ओलसर झाडाचा ओव्यासारखा वास. त्यांनी पुढे माहिती दिली. "हा या मडक्यात घालायचा. त्यावर या गावठी वालाच्या शेंगा आणि वाटाणा शेंगा घालायच्या. त्यावर चिकन आणि अंडी. मग परत शेंगा. मग तुमची वांगी आणि बटाटे. परत शेंगा. आणि मग परत भांभूर्डीचा पाला."

एकूण हे सगळ त्यांनी त्या मडक्यात भरलं. मग आवारात एका कोपऱ्यात ते मडक त्यांनी उलट करून ठेवलं. त्यावर सुकलेल्या काथ्या रचल्या. मग सुकलेलं गवत निट रचून त्याला आग लावली चारी बाजूनी. गोल फिरून आग नीट लागली आहे की नाही ते पाहिलं. मी देखील त्यांच्या बरोबर तिथे उभी राहून बघत होते. ते म्हणाले,"वाहिनी, आता २० मिनिट बसा आरामात." साधारण २०-२५ मिनिटांनी त्यांनी काठीने त्या मडक्याच्या बाजूचा जाळ हलवायला सुरवात केली. मडक चांगलच लालसर गरम झालेलं दिसत होत. मी म्हंटल,"आता हे गार होईपर्यंत थांबावं लागेल." त्यावर विनोदजी म्हणाले, "अरे गार झाल्यावर खाण्यात काय मजा? आता ओल्या गोणपाटात मडक उचलून आणतो पुढे. चला तुम्ही." आणि खरच एक गोणपाट ओल करून ते त्या मडक्यावर टाकल. ते गरम मडक उचलून त्यांनी आम्ही बसलो होतो तिथे आणलं. त्या ओल्या गोणपाटानेच त्यांनी वरचा पाला काढला. तिथे एक परात तयार ठेवलेली होती. त्यात त्यांनी ते मडक उलटं केलं. आतून मस्त खरपूस भाजलेल्या शेंगा, बटाटा, वांगी, अंडी बाहेर आली. मग एक मोठा चिमटा घेऊन त्यांनी चिकनचे तुकडे बाहेर काढले आणि परात आमच्या समोर ठेवली. म्हणाले,"हे असंच गरम-गरम खाऊन बघा."

तो एकूण प्रकार बघून मुली काही फार उत्साही नव्हत्या ते खायला. पण त्यांची मेहेनत बघून त्यांनी एक एक चिकनचा तुकडा उचलला. खायला सुरवात केली मात्र... सर्वांचाच चेहेरा खुलला. भाजलेल्या भाज्या आणि चिकन-अंडी सगळ एकूणच इतक अप्रतिम चविष्ट होतं. भाजलेल्या शेंगा देखील अगदी मस्त लागत होत्या. 'मी काही फारस खाणार नाही ह....' अस म्हणणाऱ्या माझ्या लेकीनी अगदी मनापासून सगळ खाल्ल. नंतर शेंगांच्या सालींचा झालेला ढीग बघून आम्ही एकमेकांना चिडवत हसायला लागलो.
खरच! इतकं स्वादिष्ट... मस्त खरपूस भाजलेली... अत्यंत पौष्टिक आणि तेल-तूप किंवा फार काही मसाले नसलेली ती पोपटी आमची संध्याकाळ एकदम सप्तरंगी चविष्ट करून गेली.




****










6 comments:

  1. छान नव्या पिढीचे स्वातंत्र्य व मैत्री अबाधित ठेवून घेतलेला समंजस निर्णय

    ReplyDelete
    Replies
    1. आपण माझ्या मागील शुक्रवारच्या कथे संदर्भात ही कंमेंट केली आहेत असे वाटते.

      धन्यवाद

      Delete
  2. हा पोपटीचा अनुभव सगळयानी घ्यावा...अप्रतिम वर्णन....

    ReplyDelete