9 डिसेंबरला माझ्या पहिल्या वहिल्या पुस्तकाचे 'कथा विविधा'चे प्रकाशन झाले. आत्मस्तुतिची चेष्टा स्वीकारून मनापासून सांगते; प्रकाशनाचा कार्यक्रम दृष्ट लागण्यासारखा अप्रतिम आणि आगळा-वेगळा झाला. कथा संग्रहातल्या 'एक रेड वाईन नातं' या कथेचे अल्प अभिवाचन प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमीतने केले; तर 'तो आणि ती...' या पौराणिक नाट्य कथेतील श्रीकृष्णचे मनोगत चिन्मय मांडलेकर यांनी नाट्य स्वरूपात सादर केले. 'लाली' या सामाजिक कथेवर एक शॉर्ट फिल्म देखील आम्ही सादर केली. काहीसा भावनिक आणि मन:स्पर्शी कार्यक्रम झाला एकूणच.
खर सांगायचं तर आजवर एकूण तेवीस कथा मी लिहिल्या आहेत. काही हिंदी आणि मराठी कविता देखील केल्या आहेत. मनाला स्पर्शून जाणाऱ्या विषयांवर लेखही लिहिले आहेत. त्यामुळे पुस्तक प्रकाशन करताना यातील काय प्रकाशित करायचं यावर मी बराच विचार केला. पण मग कधीतरी एका क्षणी माझ्या मनानेच मला जाणवून दिलं की माझी कोणती ओळख झालेली मला जास्त भावेल; ते लेखन प्रकाशित झालं पाहिजे. आणि मग मी ठरवलं की 'कथा लेखिका' म्हणून जर ओळख हवी असेल तर विविध विषयांवरच्या माझ्या कथांचं प्रकाशन 'कथा विविधा' या नावाने करायचं. हेच नाव का? तर यातून पुस्तक 'कथां'चं आहे हे लक्षात येत.... त्यात 'विविध' प्रकारच्या कथा आहेत; हे प्रेरित होतं आणि एक थोडं आपुलकीचं कारण म्हणजे परागने (माझा नवरा) हे नाव सुचवलं!
खरं म्हणजे माझ्या भावाला (अभयला) वाचनाची खूप आवड. तो जे पुस्तक वाचायचा ते मी देखील वाचलंच पाहिजे असा त्याचा आग्रह असायचा. त्यामुळे तो देईल ते वाचायची सवय लागली आणि पुढे वाचनाचं वेडच लागलं. चांदोबापासून झालेली ही सुरवात मग थांबलीच नाही. अभयमुळेच गूढ, रहस्य, भय, विज्ञान कथा वाचायला लागले आणि मग त्या देखील खूप आवडायला लागल्या. रत्नाकर मतकरी, नारायण धारप, सुहास शिरवाडकर आवडते लेखक. विनोदी शैलीतील पु. लंची व्यक्तिचित्रणं हसता-हसता जगायला शिकवून गेली. व. पु. च्या कथांमधला भावनिक स्पर्श आवडायला लागला... ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबऱ्या वाचताना तर वेळेचं भान देखील राहायचं नाही. रणजीत देसाई, शिवाजी सावंत, द. मा. मिरासदार, वी. स. खांडेकर सगळ्याच प्रतिभाशाली लेखकांच्या कादंबऱ्या वाचल्या. थोडं मोठं झाल्यानंतर दर्जेदार विषयांची भाषांतरित पुस्तकं देखील वाचायला लागले.
ही पुस्तकं वाचताना माझं असं एक विश्व तयार व्हायचं. त्या विश्वात ते पुस्तक आणि त्यातल्या घटना मी अक्षरशः जगायचे. पुस्तक वाचून संपलं तरी पुढचे कित्येक दिवस मी त्याच विश्वात असायचे. मग कधीतरी नकळत मनातल्या मनात माझी अशी एक गोष्ट तयार करायला लागले. काहीसं वाचलेल्या कथेतलं आणि काहीसं माझ्या मनातलं. खूप मजा यायची मला अशा कल्पनांच्या राज्यात रमायला. त्यावेळी कधी कधी वाटायचं की आपण हे असं फक्त कल्पनांच्या राज्यात रमण्यापेक्षा मस्त लिहील पाहिजे. ही लेखनाची हौस मी शाळेत आणि कॉलेजमध्ये कथा कथन, वाद-विवाद स्पर्धा आणि निबंध स्पर्धेत भाग घेऊन पूर्ण करायचे. कधी कधी बक्षीसं देखील मिळाली आहेत. पण मग शिक्षण संपल आणि अस काही लिखाण करण देखील संपल.
त्यानंतर अनेक वर्षांनी कधीतरी माझ्या शाळेतल्या मित्राशी (प्रदीपशी) गप्पा मारताना मनातल्या एका कथेची कल्पना त्याला सांगितली आणि त्याने आग्रह केला म्हणून ती कथा लिहून त्यालाच पाठवली. कथा छान जमली आहे असा त्याचा अभिप्राय आला आणि मग मात्र लेखनाचा उत्साह आला. त्यानंतर मात्र मला जे विषय भावले किंवा मनाला स्पर्श करून गेले किंवा जे अनेक विषय बरीच वर्षे मनात घोळत होते त्यावर लिहायला लागले.
माझ्या कथांविषयी सांगण्यासारखा अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे माझ्या कथांमधील मध्यवर्ती व्यक्तिमत्व स्त्रीचंच असतं. त्याचं कारण देखील तसंच महत्वाचं आहे. अनेक स्त्रियांप्रमाणे मला देखील माझ्या स्त्री जन्माचा आदरयुक्त अभिमान आहे. शिवाय अनेक वर्षे भारतीय स्त्रीशक्तीचं काम केल्याने या अभिमानाला विचारांची बैठक मिळाली आहे. हा माझ्या स्वभावातला विशेष या स्त्रीपात्रांतून दिसतो. या कथा मासिकांना पाठवाव्यात किंवा पुस्तक प्रकाशित करावं असं कधी वाटलं नव्हतं. आवडतं आणि मजा येते म्हणून लिहायचे आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींना आणि सदृदांना पाठवायचे. पण मग पराग (माझा नवरा) आणि विनीत (मित्र) यांच्या आग्रहामुळे पुस्तक प्रकाशन करण्याचा विचार पक्का केला. रहस्य, गूढ, सामाजिक, राजकीय, विज्ञान, भावनिक आणि पौराणिक अशा सात वेगवेगळ्या विषयांवरच्या कथा या पुस्तकात आहेत.
कथा प्रकाशनाचा माझा पहिलाच प्रयत्न असूनही 'ग्रंथाली' सारख्या नामावन्त प्रकाशन संस्थेने आस्थेने माझ्या कथा संग्रहाचे प्रकाशन केले त्याबद्दल मी त्यांची मनापासून ऋणी आहे. आपले अभिप्राय समजून घेण्याची खूप खूप उत्सुकता आहे. तुमच्यासारखे सुजाण वाचक 'कथा विविधा' हा माझा कथा संग्रह वाचतील आणि त्यांची प्रामाणिक मते माझ्यापर्यंत पोहोचवतील अशी आशा आहे.
It is a treat to hear your stories ...looking forward for lots more
ReplyDeletethank you very much. या ब्लॉगवर माझ्या कथांसोबत मी केलेल्या कविता आणि लेख देखील अपलोड करणार आहे
Deleteज्योतीताई ..तुम्ही इतका छान विचार करू शकता व ते प्रत्यक्ष लेखणीतून साकारही करता. पण हे झालं कल्पना विलासापुरतं. बालपण तरूणाई व आताचा राजकीय प्रवास यावर काही भाष्य करता आलं तर पहा. ते जास्त सजीव व सजग वाटेल. लोकांच्या आणखी जवळ जाऊन त्या मानसिकतेचा कानोसा घेता आलं तर पहा.
ReplyDeleteपुढील वैचारिक लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा !!
अमरेंद्र करंदीकर .
वास्तववादी लेखक आणि काल्पनिक लेखक असे दोन प्रकार असतात. मी शब्दश: वास्तव लेखन करू शकेन असे मला वाटत नाही. मात्र वास्तव जीवनातील अनुभव कथा स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न जरूर करेन
DeleteBest wishes ....!!!
ReplyDelete- Nikhil Kalwint
thank u
Deletebest wishes and happy new year Jyoti.😘😘
ReplyDeleteJyoti ji,its great keep it up.Unable to reply in marathi pl bear with me.The launching programme was simply great
ReplyDeleteदिनानाथजी आपण उत्तम मराठी बोलता, वाचता आणि मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांना आवर्जून येता. त्यामूळे इथे जरी आपण मराठी मधून रिप्लाय केला नाहीत तरी देखील आपल्या मराठी वाङ्मय आवडीची मला कल्पना आहे.
Deleteआपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
अप्रतिम सुरवात,पुस्तक अतिशय सुंदर आणि ओघवते.
ReplyDeleteआता ब्लॉगवरील पुढील लिखाणाची उत्सुकता आहे.
खूप शुभेच्छा.
धन्यवाद
DeleteGood luck..Aniket Karandikar
ReplyDeletethank you
Delete