Friday, October 7, 2022

प्रेम

 प्रेम


हा शब्द आपल्याला सगळ्यांनाच आवडतो. कारण आपण प्रत्येकजण आयुष्यात प्रेम नक्की करतो. अर्थात प्रत्येकाची आपलीच अशी पद्धत असते... पण ती नक्कीच त्याच्यासाठी गोड असते.

काहीजण खूप जास्त एक्सप्रेसिव्ह असतात. I love you म्हणायला त्यांना खूप आवडतं... मग सहाजिकच आहे की तेच I love you ऐकायला देखील त्यांना खूप आवडतं.

काही कृतीतून व्यक्त करतात... तर काही आयुष्यात फक्त एकदाच!

हे एकदाच व्यक्त करणारे असतात ना त्यांचं लॉजिक मला कळतच नाही. प्रेम आहेच... आणि ते माहीत आहे.... मग परत परत का म्हणायचं? असा विचार करणारे मुळात प्रेम करत असतील का? हा प्रश्न सतत माझ्या मनात येतो.

आमच्या मागच्या पिढीत तर प्रेम व्यक्त न करणं हेच प्रेम होतं. पण मग थोडा विचार बदलला. आमच्या तरुणपणी प्रेम व्यक्त करणं आवश्यक झालं. पण अगदी प्रामाणिकपणे सांगू का? आमच्या पिढीतल्या बहुतांशिंचं मत आहे की सुरवातीला केलं न व्यक्त... आणि ते यशस्वी देखील झालंच की.... म्हणजे लग्न झालं न आपलं; झालं तर मग. आता परत परत तेच? प्रेम होतं-आहे; म्हणून तर लग्न केलं-आणि संसार करतोय आपण!

पण अलीकडे मी माझ्या पुढची पिढी बघते आहे... ते व्यक्त सतत व्यक्त होत असतात. अर्थात त्यांच्याकडे अनेक माध्यमं आहेत; त्याचा ते पुरेपूर वापर करतात. व्यक्तिक सांगू का? मला ते खूप आवडतं. मी आमच्या पिढीतल्या अनेकांना हे म्हणताना ऐकलं आहे की हा छचोरपणा अमच्यावेळी नव्हता. मला असा विचार करणारे न खूप संकुचित मनाचे वाटतात.... किंवा असं तर नसेल न; की त्यांना मनातून आवडत असेल... पण मिळत नाही म्हणून नावं ठेवायची?

आमच्या पिढीमध्ये सर्वसाधारणपणे मुलगा मुलीला विचारायचा... आणि ते ही डायरेक्ट लग्नासाठी बर का!

पण अलीकडे थोडं वेगळं असतं. एक तर मुलानेच विचारायचं असं काही नसतं. मुलीला जर एकदा मुलगा मनापासून आवडला तर ती देखील तिच्या 'प्यार का इजहार' त्याच्या समोर करते. पण हे म्हणजे फक्त 'मला तू आवडतोस/ आवडतेस'; इतकंच असतं बारं का.... किमान सुरवातीला! मग सुरू होते ती Co-ship. म्हणजे एकमेकांना समजून घेणं. यात 'जन्मजन्मांतरीच' वगैरे नसतं... एकमेकांना समजून घेत एकमेकांचा अंदाज घेणं असतं. मला वाटतं या co-ship काळात एकमेकां बरोबरच स्वतःच्या मनातल्या भावनांना देखील ही मुलं समजून घेत असतात. या काळात एक गोष्ट अगदी स्पष्ट असते बरं का! जर सिनेमा किंवा बाहेर खायला गेले दोघे तर खर्च दोघेही करतात. आमच्या वेळी मुलगाच करायचा बरं का! पण मग जर मुलाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसेल... जी usually नसायचीच... मुलगी समजून उमजून काही demand नाही करायची.

आता आपापला खर्च... त्यामुळे मला जिथे आवडतं तिथे मी जाणार... Do you wanna accompany me? इतकं सरळ सोपं झालंय. या co-ship मध्ये जर दोघांच्या लक्षात आलं की जमतंय आपलं तर मग ते relationship या दुसऱ्या पायरीवर येतात. मग त्यांचं social media वरचं statusr बदलतं. अहं! गैरसमज नको हं! हे status फक्त In relationship! असं होतं. अर्थात हे प्रेम आणि co-ship आणि relationship चालू असताना शिक्षण आणि आयुष्यातले पुढचे प्लॅन्स देखील असतातच सुरू. अलीकडे अजून एक गोष्ट मी observe केली आहे... प्रेम आहे आणि असतंच! पण म्हणून आपल्या करियरमध्ये कोणीही compramise करत नाही. म्हणजे जर शिक्षण संपल्यानंतर कोणाही एकाला वेगळ्या शहरात किंवा अगदी वेगळ्या देशात जॉब ऑफर आली तर ती स्वीकारली जाते. अर्थात जर co-ship च्या पुढची पायरी असेल तर पार्टनरशी बोललं जातं. पण जर ऑफर उत्तम असेल तर सहसा comprmise नाही केलं जात.

मग खरं तर पुढची पायरी असते; ती म्हणजे long distance relationship ची. कधी ती जमून जाते; तर कधी पूर्ण गंडते. गंडली तर त्याला मी दोष नाही देणार आणि जमली म्हणून 'यशस्वी नातं' असा टॅग देखील नाही मान्य मला. कारणमीमांसा करूया का?

समजा नाही जमलं long distance relationship... तर का नाही जमलं? दोन वेगळे देश असतील तर वेगळ्या वेळा असतात जगण्याच्या. मग contact कमी होतो... त्यातून गैरसमज-वाद होऊ शकतात. केवळ दोन वेगळी शहरं असली तरी देखील कामाच्या वेळा आणि जो/जी एकटे असतात; त्यांना सगळं स्वतः manage करावं लागतं; त्यातून अनेकदा येणारं irritation... ही कारणं असू शकतात. मुळात कारणं काहीही असतील अवघड असतंच न ते. समजा bond खूप strong आहे; तर या वादातून आणि गैरसमजातून समजून घेण्याकडचा मार्ग असतो.

आमच्या पिढीमध्ये लग्नानंतर आई-वडिलांसोबत राहाणं खूप स्वाभाविक होतं. पण अलीकडे तसं नाही... गंमत म्हणजे अनेक आयांना; म्हणजे माझ्या वयाच्या अनेकजणींना; मुलाने-मुलीने वेगळं राहायला हवं असतं. अगोदर आमच्या पिढीची कारणं सांगते हं! नवीन पिढीमध्ये 9 to 5 जॉब हा concept नाही. त्यामुळे मुलगा/मुलगी सकाळी एकदा कामासाठी बाहेर पडली की घरी कधी येतील याचा नेम नसतो. Work from home असेल तरी देखील ऑफिसचं काम करताना भाजी चिरण वगैरे नाही करत कोणी.... आमच्या पिढीमध्ये मी अनेक स्त्रियांना ट्रेनमध्ये भाजी निवडताना आणि चिरून ठेवताना बघितलं आहे.... असो! न करणाऱ्या पिढीचा दोष नाही आणि करणाऱ्या पिढीचं महात्म्य नाही! तर.... आयांना देखील अलीकडे स्वतःचं असं आयुष्य हवं असतं. मैत्रिणींसोबत morning walk; कधीतरी मॉलमध्ये भटकणं; बाहेर जाणं; गाण्याचे कार्यक्रम; सिनेमा!!! मग स्वयंपाकाची बांधिलकी नको असते. अर्थात गरज असेल तेव्हा या आया एका पायावर असतात बरका मदतीला.

पुढच्या पिढीला तर त्यांचं मोकळं जगणं आणि वागणं यावर बंधन नको असतं; त्यामुळे वेगळं राहाणं हवं असतं. थोडी बायस होऊन एक सांगू का? मुलग्यांना.... त्यातल्या त्यात घरातलं काम कधी न शिकलेल्या; म्हणजे थोडक्यात अति लाडावलेल्या मुळग्यांना बरं का.... वेगळं राहायचं नसतं. पण अलीकडे मुली त्यांचं मत खंबीरपणे मांडतात आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम असतात. त्यामुळे वेगळं राहणारी जोडपी अनेक असतात.

मुळात करियर सेट होईपर्यंत लग्न नसतंच. पण मग live in relations अनेक दिसतात. अर्थात यावर योग्य आणि अयोग्य अशी अनेक मत-मतांतर असू शकतात. माझं व्यक्तिक मत सांगायचं तर... मला पटतं हे live in! आपलं आपल्या जोडीदारासोबत जमतं आहे का याचा अंदाज घेणं चुकीचं नाही. एकदम लग्न करून एकत्र रहायला लागल्यावर वर्ष-दोन वर्षांनी जर जाणवलं की आपला निर्णय चुकला तर घटस्फोट घेणं अवघड जातं; आणि मुळात live in relationship कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपण थोडा बदलायला हवा. राहून बघूया जमतंय का! असा विचार ही पिढी करते; असं आपण म्हणतो... पण जमवून घेण्यासाठी राहूया... असा विचार कशावरून करत नसतील ते?

आपण आपल्या मुलांवर लहानपणापासून संस्कार केले आहेत न? त्यावर तर विश्वास ठेवला पाहिजे न आपण? बरं! भांडणं कोणामध्ये होत नाहीत? एकदा कोणतंही couple एकाच बेडरूमचं छत बघायला लागलं न की वाद होतातच. कारण मग प्रेम असलं तरी रोमान्स कमी होतो... उद्या भाजी काय करायची? बिलं भरली आहेत की नाही? EMI cut होईल; account मध्ये balance आहे न.... हे विचार मनात यायला लागले न की romance कमी झालाच समजा!!!

आणि इथेच येतो माझा पहिला मुद्दा!!! प्रेम!!! प्रेम असतंच!! फक्त ते व्यक्त होत नाही. Friends.... एकवेळ romance कमी झाला तरी चालेल... प्रेम असतंच; व्यक्त झालं पाहिजे! मग ती कोणतीही पिढी असो! यार.... I love you हे जादूचे शब्द कोणत्याही वयात चेहेऱ्यावर हसूच आणतात.

काय पटतंय का?

No comments:

Post a Comment