Friday, August 19, 2022

सँडविच पिढी

 हो! सँडविच झालेली पिढी आज भारताच्या प्रत्येक घरात आहे. मला नक्की काय म्हणायचं आहे ते उदाहरणासाहित देते.


समजा :

एका मुलीचं साधारण एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाकडे लग्न झालं. नवरा उत्तम कंपनीत चांगल्या पगारावर होता. त्याच्या आई-वडिलांचा 2BHK फ्लॅट होता. एकुलता एक असल्याने तो फ्लॅट पुढे त्यांनाच मिळणार होता. वेगळं राहण्याचा प्रश्नच नव्हता. पुढच्या चार वर्षात तिला त्या काळच्या पद्धती प्रमाणे दोन मुलं झाली. मोठी मुलगी आणि धाकटा मुलगा. म्हणजे साधारण पंचविशीत ती दोन मुलांची आई; सासू-सासरे, नवरा आणि सण-समारंभ सांभाळत नोकरी करत होती. तिच्या आई-वडिलांनी तिला चांगलं शिक्षण दिलं होतं. चांगली ग्रॅज्युएट होती आणि मग कंपनी सेक्रेटरीचं शिक्षण देखील घेतलं होतं. त्यामुळे नोकरी अगदी उत्तम होती.

साधारण 1998 च्या सुमारास पेजर आला. आठवतं तुम्हाला? कोणीही कुठूनही स्वतःचा नंबर आणि नाव पाठवू शकत होतं त्या पेजरवर किंवा थोडा महाग घेतला तर चार ओळींचा मेसेज पाठवणं शक्य होतं. तिच्या नवऱ्याने स्वतःसाठी पेजर घेतला. एव्हाना घरचा कर्ता पुरुष झाला होता तो. आई-वडील रिटायर्ड होते. मुलं लहान होती. त्यामुळे जर काही धावपळ करायची वेळ आली तर त्याला कळवण सोपं जावं म्हणून केलेली सोय.

एक दिवस संध्याकाळी तिला तिच्या घरून फोन आला. तिचे सासरे अचानक कोलप्स झाले होते; मुलांनी फोन केला होता. तिने घाई घाईने नवऱ्याला पेजरवर मेसेज टाकला, हॉस्पिटल ला फोन करून ॲम्बुलन्स घरी पाठवली आणि घरी पोहोचली. ती घरी पोहोचली तोपर्यंत ॲम्बुलन्स देखील आली होती. तिने सासऱ्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं; घरी येऊन मुलांची आणि सासूबाईंच्या जेवणाची सोय केली आणि परत हॉस्पिटलमध्ये गेली. रात्री उशिरा तिचा नवरा हॉस्पिटलमध्ये आला. त्याने पेजर वरचा मेसेज उशिरा बघितला होता त्यामुळे त्याला घरी यायला उशीर झाला असं त्याने सांगितलं. दुर्दैवाने त्या आजारामध्ये तिचे सासरे निवडले सासु सोबत सांभाळून घेत मुलांना मोठं करण्याच्या रेसमध्ये तिने धावायला सुरुवात केली. मुलं मोठी होत होती; त्याच वेळेला तिची ऑफिसमधली जबाबदारी देखील वाढत होती. नवऱ्याचं देखील खूप चांगली प्रगती होत होती. आर्थिक परिस्थिती कौतुकास्पद परिस्थितीने वाढत होती.

मात्र वाढत्या वयातली मुले आणि जुन्या विचारांची सासू या मधला बॅलेन्स सांभाळणं तिला हळूहळू खूप अवघड व्हायला लागलं होतं. उच्च शिक्षणासाठी मुलांना वेगवेगळ्या क्लासला जावं लागत होतो त्यामुळे हळूहळू त्यांचं घरी येण्याची वेळ नक्की राहिली नाही मुले खूप उशिरा घरी यायची यावरून तिची सासू नाराज राहायची. कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी तिच्या सासूला ते पटत नव्हतं सासू आणि मुलांमध्ये वाद होऊ नये; म्हणून ती सतत मुलांची बाजू घेऊन सासूला समजावायची आणि सासूची बाजू मुलांना सांगायचा प्रयत्न करायची. अनेकदा तिने तिच्या नवऱ्याला या विषयांमध्ये लक्ष घालायला सांगितलं पण अशा लहान विषयांमध्ये उगाच फार विचार करायची गरज नाही असाच तो नेहमी म्हणत राहिला.

तिची नोकरी देखील सुरूच होती. मुलं शिकली आणि उत्तम नोकरीला लागली. मुलाचं लग्न झाल; तो वेगळा राहिला. मुलीचे देखील नंतर लग्न झालं; ती देखील तिच्या संसारात सुखाने राहायला लागली. तिची सासू आता खूपच वृद्ध झाली होती. त्यामुळे सासूची सेवा करणं आणि नोकरी मधील जबाबदारी पूर्ण करणं ह्यातच तिचे दिवस संपत होते. अलीकडे कधीतरी तिला वाटायचं की थोडं तरी रिलॅक्स व्हावं; कुठेतरी फिरून यावं. मोबाईलच्या आगमनामुळे जुन्या मित्र-मैत्रिणींशी निर्माण झालेले कॉन्टॅक्टस वाढवावेत. पण अजूनही तिची जबाबदारी संपलीच नव्हती. त्यामुळे इच्छा असूनही तिला तिची स्वप्न बाजूला ठेवायला लागली.

कधीतरी तिचा नवरा रिटायर झाला आणि वर्षा दोन वर्षात तिलाही उत्तम पोस्ट वरून रिटायरमेंट मिळाली. मधल्या काळात वृद्ध सासु देखील निवर्तली होती. आता खरं म्हणजे दोघंच जण आनंदाने राहणार असं होतं. तिने नवऱ्याला खूप सांगायचा प्रयत्न केला की आपण कुठेतरी फिरायला जाऊ. पण 'मी नुकताच रिटायर झालो आहे; आता मला माझ्या मित्रांना भेटायचं आहे;' असं तो सतत सांगत राहिला. त्याच वेळेला मुलगी डिलिव्हरीसाठी आली तिला एक गोंडस बाळ देखील झालं. ती परत सासरी गेली; त्याच वेळेला मुलाने देखील त्याची बायको प्रेग्नेंट असल्याची गोड न्यूज दिली. तिला खूप आनंद झाला.

दोन दोन नातवंड आता तिच्या सोबतीला होती. सून आणि मुलगी दोघीही नोकरी करत असल्यामुळे बाळांना बघण्याची जबाबदारी तिच्यावर आली. नातवंडांना सांभाळत मिळेल त्या वेळामध्ये छानशी पुस्तकं वाचणं; वेळ मिळेल तसं मित्र-मैत्रिणींना भेटणं; यातच तिची पंचाहत्तरी कधी आली तिला कळलंच नाही. आता नातवंडं शाळेत वरच्या वर्गात असल्याने तिच्याकडे फारशी येत नसत. तिचा मुलगा आणि लेक अलीकडे तिला सतत सांगत; 'तुला फिरायला आवडायचं ना आई; मग आता का नाही फिरत?' पण आता तिच्या नवऱ्याचं बरंच वय झालं होतं; अनेक शारीरिक व्याधी असल्यामुळे मनाला येईल तसं फिरणं आता त्याला अवघड वाटत होतं. तिची मानसिकता एकटं फिरण्याची नसल्यामुळे; इच्छा असूनही आणि पैशाची अडचण नसताना देखील आजही ती घरीच अडकलेली आहे.

No comments:

Post a Comment